Monday, December 26, 2011

अण्‍णा हजारेंच्‍या भारतीय संविधान उध्‍वस्‍त करु पाहणा-या जनलोकपाल आंदोलनाला विरोध करा


भ्रष्टाचाराला पायबंद बसण्‍यासाठी कठोरात कठोर कायदेशीर उपाययोजनेच्‍या मागणीला तसेच त्‍यासाठीच्‍या संवै‍धानिक चौकटीतील आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तथापि, अण्‍णा हजारेंचे जनलोकपाल आंदोलन भ्रष्‍टाचाराविषयीच्‍या तीव्र लोकभावनांचा वापर करुन भारतीय घटनेच्‍या पायालाच उध्‍वस्‍त करु पाहत आहे तसेच संसदेच्‍या सार्वभौम अधिकाराला धुडकावून लावत आहे. म्‍हणून या आंदोलनाला आम्‍ही विरोध करत आहोत.

स्‍वातंत्र्य व सामाजिक परिवर्तनाच्‍या महान संग्रामातून साकारलेल्‍या भारतीय घटनेद्वारे जनहिताचे कायदे करण्‍याचा अधिकार जनतेने निवडून दिलेल्‍या संसद सदस्‍यांना दिलेला आहे. भारतातील कोणीही नागरिक अथवा संघटना त्‍यांना अपेक्षित असलेल्‍या कायद्याचा मसुदा सरकारला देऊ शकते, जनतेची व्‍यापक चळवळ उभारुन त्‍यासाठीचा दबावही तयार करु शकते. मात्र, आम्‍ही म्‍हणू तसाच कायदा झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊ शकत नाही. सबंध भारतीय जनतेचे प्रतिनिधीत्‍व करणा-या संसदेत विवेकशील व सर्वांगीण चर्चेनंतर कायदा संमत होण्‍याची रीत पाळली गेली नाही, तर अशारीतीचा संसदबाह्य दबाव अराजकाला जन्‍म देऊ शकतो.

भारतीय संविधान संमत होण्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला, 25 नोव्‍हेंबर1949 रोजी या संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीतील आपल्‍या शेवटच्‍या भाषणात भारतीय जनतेला जो कळकळीचा इशारा दिला तो किती रास्‍त व भविष्‍यवेधी होता, ते आज 62 वर्षांनंतरही आपल्‍या प्रत्‍ययास येते. ते म्‍हणतात, ‘...जेव्‍हा, संवैधानिक मार्ग उपलब्‍ध आहेत, तेव्‍हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्‍याकरण आहे आणि जितक्‍या लवकर आपण त्‍यांना दूर सारु तेवढे ते आपल्‍या हिताचे होईल.’ पुढे ते म्‍हणतात, ‘...विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्‍याही देशाच्‍या राजकारणात दिसणार नाही, इतक्‍या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्‍ती ही आत्‍म्‍याच्‍या मुक्‍तीचा मार्ग असू शकेल. परंतु, राजकारणात भक्‍ती किंवा व्‍यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’

आज अण्‍णांच्‍या आंदोलनात हीच विभूतिपूजा दिसते. अण्‍णाच या देशाला खरा मार्ग दाखवू शकतात आणि म्‍हणून त्‍यांनी सुचविलेला जनलोकपाल हा आपल्‍या जीवनातील सर्व समस्‍यांवरचा तोडगा ठरु शकतो, अशा वि‍वेकहीन मनःस्थितीचे बळी अण्‍णांना पाठिंबा देणारे असंख्‍य सत्‍प्रवृत्‍त लोक झालेले आहेत. देशात भ्रष्‍टाचाराबरोबरच इतर अनेक महत्‍वाचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्‍नांसंबंधी राजकारणी मंडळींना धोरण घ्‍यावे लागते. निवडणुका या समग्र धोरणावर लढवाव्‍या लागतात. असे कोणतेही समग्र धोरण न मांडता केवळ एका ‘जनलोकपाला’च्‍या मुद्द्यावर निवडणुकांत विरोधी प्रचार करण्‍याचे अण्‍णांचे आवाहन लोकांची फसगत व संसदीय प्रणालीचा विश्‍वासघात करते. आजचे राजकारणी नालायक असतील, तर त्‍यांना बाजूला सारण्‍यासाठी आपल्‍याला पटणा-या राजकीय पक्षात सहभागी होऊन अथवा स्‍वतःचा राजकीय पक्ष स्‍थापून निवडणुकांच्‍या राजकारणात सिव्हिल सोसायटीने उतरायला हवे. काठावर बसून बेजबाबदार नैतिक दहशत निर्माण करणे, गैर आहे. ‘जे ठरेल ते आता रस्त्‍यावर’ ही अण्‍णा टीमची दर्पोक्‍ती बेजबाबदारपणाचा कळस आहे. त्‍यातून बहुसंख्‍याकांची हुकूमशाहीच तयार होऊ शकते. दलि‍त-आदिवासींना अथवा स्त्रियांना राखीव जागा, अल्‍पसंख्‍याकांसाठीच्‍या तरतुदी या बाबी रस्‍त्‍यावरच्‍या आंदोलनात ठरु शकल्‍या नसत्‍या. संसदेतील गंभीर व विवेकशील चर्चेतूनच हे निर्णय होऊ शकतात.

रामदेव बाबा, श्री रविशंकर यांचा अण्‍णांच्‍या आंदोलनात सक्रीय सहभाग आहे. अध्‍यात्‍मापोटी आकर्षित झालेल्‍या लोकांना हे गुरु जनआंदोलनाच्‍या अथवा राजकारणाच्‍या मुद्द्याकडे वळवून संविधानातील ‘सेक्‍युलॅरिझम’ या तत्‍त्‍वाला उध्‍वस्‍त करत आहेत. भारतीय घटना तयार होत असतानाच प्रत्‍येकाला एक मत, सेक्‍युलॅरिझम, दलित-अल्‍पसंख्‍याकांचे संरक्षण या तत्‍त्‍वांना विरोध करणा-या शक्‍ती देशात होत्‍या. त्‍या आपल्‍या उद्दिष्‍टपूर्तीसाठी संधी शोधत असतात. अण्‍णांच्‍या खांद्यावर बसून व अण्‍णांना पाठिंबा देणा-या सत्‍प्रवृत्‍तांच्‍या भावनांवर आरुढ होऊन या शक्‍ती देशाचा मूलाधार असलेल्‍या संविधानाला उखडून देशात अराजक माजविण्‍याचे कारस्‍थान करत आहेत. हे कारस्‍थान आपण यशस्‍वी होऊ देता कामा नये, असे सर्व सुबुद्ध भारतीय जनतेला आम्‍ही आवाहन करत आहोत.

आपले,


सुरेश सावंत, नीला लिमये, भारती शर्मा, मिलिंद रानडे, दत्‍ता बाळसराफ

Monday, December 5, 2011

आपल्‍या शेजारच्‍या राज्‍यांतले रेशन सुधारणांचे प्रयोग

रेशनसंबंधीच्‍या विविध प्रयोगांची माहिती घेण्‍यासाठी भरत रामस्‍वामी व मिलिंद मुरुगकर या अभ्‍यासकांनी छत्‍तीसगड, मध्‍यप्रदेश व गुजरात या 3 राज्‍यांचा दौरा केला. त्‍यांच्‍यासोबत फिरण्‍याची मलाही संधी मिळाली. या राज्‍यांतले उच्‍चपदस्‍थ अधिकारी, रेशन दुकाने, गावांतील लोक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, भात गिरणी, शेतकरी सोसायट्यांचे पदाधिकारी, संगणकीकरण तसेच फूड कुपनांच्‍या व्‍यवहारात सहभागी असलेले सॉफ्टवेअर कंपनी व बहुराष्‍ट्रीय कंपनी यांचे तज्‍ज्ञ अशांच्‍या भेटी तसेच इ-ग्रामपंचायतील संगणकावरील नोंदींचे प्रात्‍यक्षिक, धान्‍य खरेदी केंद्रांतील व्‍यवहाराची प्रत्‍यक्ष पाहणी असे दौ-याचे स्‍वरुप होते. याबाबतची माझी निरीक्षणे खाली नोंदवत आहे.

छत्‍तीसगढमधील संरचनात्‍मक व तांत्रिक सुधारणा

छत्‍तीसगड राज्‍यात जवळपास 70 टक्‍के जनतेला अंत्‍योदयच्‍या दराने धान्‍य मिळते. बीपीएल व अंत्‍योदयच्या रेशनकार्डधारकांचे धान्‍य केंद्राकडून येत असते. तथापि, केंद्राने या कार्डधारकांचा कोटा ठरवून दिलेला असतो. याच्‍या अतिरिक्‍त लोकांना लाभ द्यायचा असे राज्‍यांनी ठरविल्‍यास त्‍यांच्‍यासाठीच्‍या खर्चाचा भार राज्‍यांना उचलावा लागतो. छत्‍तीसगढने केंद्राने ठरवून दिलेल्‍या कोट्याहून कितीतरी अधिक लोकांना अंत्‍योदयचा लाभ देण्‍याचा निर्णय घेतल्‍याने त्‍यास स्‍वतःच्‍या तिजोरीतून जवळपास 1200 कोटींचे अनुदान द्यावे लागते. छत्‍तीसगढमध्ये रेशन यंत्रणेचे संपूर्ण संगणकीकरण झालेले आहे. छत्‍तीसगढ राज्‍याच्‍या वेबसाईटवर गेल्‍यास रेशनकार्डधारकांचा दुकानवार, जिल्‍हावार, जातीवार, गाववार तपशील तसेच संपूर्ण रेशनकार्डच बघायला मिळते. यामुळे बोगस रेशनकार्डांना ब-यापैकी आळा बसतो. छत्‍तीसगढचे दुसरे वैशिष्‍ट्य म्‍हणजे, त्‍यांची विकेंद्रित धान्‍य खरेदी. या राज्‍यात तांदळाचे उत्‍पादन भरपूर होते. स्‍वतःला ठेवून भारतीय अन्‍न महामंडळाला ते मोठा हिस्‍सा देत असते. या विकेंद्रित खरेदीमुळे शेतक-यांना त्‍यांच्‍या गावापासून जवळच्‍या अंतरावर आपले धान्‍य सरकारला विकता येते. या व्‍यवस्‍थेचेही संगणकीकरण झाल्‍याने या व्‍यवहाराची नोंद तात्‍काळ होऊन शेतक-यांना ताबडतोब चेक मिळतो. शेतक-यांच्‍या सहकारी संस्‍थांमार्फत हा सर्व व्‍यवहार होतो. अनेक गावांत इ-ग्रामपंचायती आहेत. गावातील विविध नोंदी करणे, सातबाराचा उतारा देणे इ. कामे ग्रामपंचायतीच्‍या कार्यालयातील संगणकाद्वारेच होतात. याच इ-ग्रामपंचायतीतील संगणकाचा वापर शेतक-यांच्‍या धान्‍य खरेदीसाठी केला जातो. या व्‍यवहाराची नोंद त्‍याचवेळी सरकारच्‍या मध्‍यवर्ती कक्षातील संगणकावर पोहाचत असते. त्‍यामुळे या व्‍यवहाराची ताजी व सर्व माहिती राज्‍य सरकारकडे असते. विकेंद्रित धान्‍य खरेदीमुळे राज्‍य सरकारच्‍या नियंत्रणात धान्‍यसाठा राहतो व तो रेशन दुकानांवर तात्‍काळ पोहोचवता येतो. पूर्वीप्रमाणे भारतीय अन्‍न महामंडळाच्‍या अधिका-यांच्‍या मिनतवा-या कराव्‍या लागत नाहीत.

छत्‍तीसगढमध्‍ये खाजगी रेशन दुकानदार नष्‍ट करुन त्‍यांच्‍या जागी आता बचत गट, ग्रामपंचायती, आदिवासींच्‍या समित्‍या, सहकारी संस्‍था यांची मालकी स्‍थापित करण्‍यात आलेली आहे. बचतगटांना 75000 रु. बिनव्‍याजी कर्ज 20 वर्षांच्‍या मुदतीने दिल्‍याने तसेच द्वार वितरण योजनेमार्फत दुकानापर्यंत माल पोहोचत असल्‍याने रेशन दुकानांना आपला कारभार आतबट्ट्याचा होतो, परवडत नाही, अशी तक्रार करायला वाव नाही. तक्रारींसाठी कॉल सेंटरची व्‍यवस्‍था, केरोसीन-धान्‍य वाहतुकीच्‍या हेराफेरीवरील नियंत्रणासाठी जीपीएस यंत्रणा, दुकानावर माल कधी येणार याची माहिती देणारे एसएमएस यांसारख्‍या तांत्रिक सुधारणा मोठ्या प्रमाणावर करण्‍यात आलेल्‍या आहेत. ग्रामीण भागातील रेशनची गरज असलेला गरीब वर्ग संख्‍येने मोठा व आर्थिकदृष्‍ट्या एकसंध आहे. आपल्‍यासाठी किती कोटा येणार याची माहिती व निश्चिती त्‍याला असते. त्‍यामुळे त्‍याच्‍या मागणीचा एक दबाव तयार होतो. सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे मुख्‍यमंत्र्यांची जबरदस्‍त राजकीय इच्‍छाशक्‍ती. तिला अंमलबजावणीच्‍या उच्‍चस्‍थानी असलेल्‍या अधिका-यांची जनतेप्रती आस्‍था व सर्जनशील उत्‍साह यांची जोड. अन्‍न अधिकाराच्‍या आंदोलनातील कार्यकर्त्‍यांची देखरेख व या सर्जनशील अधिका-यांशी त्‍यांचा असलेला समन्‍वय. या सगळ्यामुळे छत्‍तीसगढच्‍या ग्रामीण भागातील रेशनव्‍यवस्‍था आधीच्‍या तुलनेत कितीतरी परिणामकारक झालेली आहे.

रायपूरमधील ‘स्‍मार्ट कार्ड’

पण शहरी भागात हा परिणाम साधता आलेला नाही. वर उल्‍लेखिलेले गरिबांच्‍या मोठ्या संख्‍येचे आर्थिकदृष्‍ट्या एकसंध असलेले गाव हे एकक शहरात नाही. लोक त्‍या अर्थाने परस्‍परांशी जोडलेले व संघटित नाहीत. रेशन दुकाने नावाला सोसायट्यांची असतात. प्रत्‍यक्षात मालक असतात टगे व्‍यापारी. लोकांना धान्‍य प्रमाणात न मिळणे, भेसळ होणे, मापात मारणे, दादागिरी इ. चा जो अनुभव मुंबईसारख्‍या शहरात येतो तोच रायपूरसारख्‍या छत्‍तीसगढच्‍या राजधानीत येतो. मुंबईत राजकीय इच्‍छाशक्‍तीचा अभाव. पण रायपूरमध्‍ये ती जोरात. म्हणून सरकार तिथे एक नवा प्रयोग करते आहे, तो स्‍मार्ट कार्डचा. प्रत्‍येक कार्डधारकाला एटीएम/क्रेडिट कार्डसारखे स्‍मार्ट कार्ड दिले जाणार. या कार्डावर रेशन कार्डधारकाचा डिजिटल तपशील असेल. रेशन दुकानावर स्‍मार्ट कार्ड पडताळणीचे यंत्र असेल. या यंत्रातून स्‍मार्ट कार्ड फिरवल्‍यावर रेशन दुकानातील धान्‍य वाटपाचा व्‍यवहार सुरु होईल. रेशन दुकानातील या व्‍यवहाराची नोंद त्‍याचवेळी सरकारच्‍या नियंत्रक कक्षातील संगणकावर होईल. त्‍याच कार्डधारकाला रेशन मिळाले का व किती मिळाले, याची सरकारकडे ताबडतोब नोंद होणार. आता पूर्वीसारखे एकाच रेशन दुकानाला कार्डधारकाला बांधून न ठेवता 15-20 दुकानांचा गट करुन या गटातल्‍या कोणत्‍याही दुकानातून रेशन घेण्‍याची मुभा त्‍यास मिळणार आहे. हे निवडीचे स्‍वातंत्र्य मिळाल्‍याने वाईट वागणा-या, फसवणूक करणा-या दुकानदाराकडे लोक कमी जातील, हे उघडच आहे. ज्‍या दुकानदाराकडे लोक अधिक जातील, तो दुकानदार बरा, असे सरकारलाही कळेल. परिणामी, गि-हाईक जोडून ठेवायचे असल्‍यास वाईट वागणा-या दुकानदाराला आपले वागणे बदलावे लागेल. दुकानदाराला बोगस कार्डे आता ठेवता येणार नाहीत. कारण खोट्या नावांवरील, अस्तित्‍वात नसलेल्‍या कार्डधारकांचे स्‍मार्ट कार्ड तयार करण्‍याची तज्‍ज्ञता दुकानदाराच्‍या पातळीवर असणे कठीण आहे.

गुजरातमधील ‘फूड कुपन’

गुजरातमधील रेशन व्‍यवस्‍थेतील प्रश्‍न महाराष्‍ट्रासारखेच. थोडेसे अधिकच म्‍हणावे लागेल. या प्रश्‍नांवर उतारा म्‍हणून ‘फूड कुपन’चा प्रायोगिक प्रकल्‍प गुजरात राज्‍याने सुरु केला आहे. प्रत्‍येक जिल्‍ह्यात एका तालुक्‍यातील एका गावात हा प्रयोग सुरु आहे. हे गाव इ-ग्रामपंचायत म्‍हणून आधीच काम करणारे असते. तेथे संगणक व इंटरनेटची सुविधा असते. गावातील शिक्षित युवकाला प्रशिक्षण देऊन या कामाची जबाबदारी दिलेली असते. प्रति व्‍यवहार 3 रु. रेशन कार्डधारकाकडून त्‍याला मिळतात. प्रत्‍यक्ष दुकानातून वस्‍तू घेतेवेळी हे 3 रु. वजा करुन कार्डधारकाने रक्‍कम दुकानदाराला द्यायची असते. फूड कुपनावर त्याची नोंद असते. प्रयोगाच्‍या प्रारंभी गावातील रेशन कार्डधारकाच्‍या कुटुंबातील रेशन दुकानावर व्‍यवहारासाठी येणा-या व्‍यक्‍तींच्‍या बोटांचे ठसे (बायोमेट्रिक तपशील) घेतले गेले आहेत. ते सरकारच्‍या मध्‍यवर्ती सर्व्‍हरवर आहेत. कार्डधारकाने ग्रामपंचायतीत यायचे. तेथील संगणक ऑपरेटर या कार्डधारकाचा अंगठा एका छोट्या स्‍कॅनरवर ठेवतो. इंटरनेटद्वारे मध्‍यवर्ती सर्व्‍हरकरवी त्‍याची ओळख पटल्‍यावरच संगणकाच्‍या पडद्यावर या कार्डधारकाचा तपशील व महिन्‍याची कुपने दिसू लागतात. त्‍याचा प्रिंटआऊट कार्डधारकाला दिला जातो. या कुपनांवर कार्डधारकाचे नाव, दुकानाचा क्रमांक, गाव, वस्‍तूचे नाव, प्रमाण, किंमती, कार्डाचा प्रकार इ. तपशील असतो. शिवाय बारकोड (सांकेतिक उभ्‍या रेषा) असतात. रेशन दुकानदाराकडे ही कुपने जमा झाल्‍यावर ती जिथून मिळाली, त्‍या केंद्रावर जाऊन संगणकावर बारकोडचे स्‍कॅनिंग करुन त्‍याने शिधावस्‍तू कार्डधारकाला दिल्‍याचे सरकारला कळवावे लागते. या व्‍यवहाराच्‍या तपशिलाच्‍या आधारे सरकार या रेशन दुकानदारास पुढचा कोटा मंजूर करते.

आम्‍ही ज्‍या गावांत गेलो ती रेशन दुकाने सोसायटीची होती. त्‍यांनी एक पगारी माणूस कामाला ठेवलेला होता. पण त्‍याचे वागणे-बोलणे हे खाजगी दुकानदारासारखेच दिसत होते. तो दुकानदार तसेच सोसायटीचे पदाधिकारी सरकारकडून वेळेवर कोटा येत नाही, कुपने घेण्‍यासाठी व जमा करण्‍यासाठी एक नवी यंत्रणा मध्‍ये उभी राहिल्‍याने वेळ जातो, ही यंत्रणा असलेले केंद्र भौगोलिकदृष्‍टया जवळ असतेच असे नाही इ. तक्रार करत होते. गावक-यांच्‍या भेटीवेळी दुकानदार व सोसायटीवाले आधीच त्‍यांना भेटून गेल्‍याचे व सगळे काही नीट मिळते, असे सांगा, असे सांगून गेल्‍याचे कळले. कुपने आली तरी लोकांना वेळेवर कोटा मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी लोकांच्‍या होत्‍या. अधिका-यांची देखरेख नीट नसल्‍याचे तसेच ते दुकानदारांच्‍या संगनमतात असल्‍याचे जाणवत होते. तथापि, कुपने व बायोमेट्रिक तपशिलामुळे बोगस रेशन कार्डे दुकानदारांना आता ठेवता येत नाहीत. बहुधा तेच त्‍यांचे मुख्‍य दुखणे असावे.

मध्‍यप्रदेशमध्‍येही ‘फूड कुपने’; पण गुजरातपेक्षा वेगळी

मध्‍यप्रदेशचे प्रश्‍नही महाराष्‍ट्रासारखेच. स्‍वतःची फारशी रक्‍कम रेशनव्‍यवस्‍थेत घालायची नाही, ही वृत्‍तीही तशीच. अशा या मध्‍यप्रदेशमध्‍ये होशिंगाबाद जिल्‍ह्यात स्‍मार्ट कार्डचा प्रायोगिक प्रकल्‍प झाला. याआधी चंदीगडमध्‍ये असा प्रयोग झाला. रायपूरमध्‍ये होऊ घातला आहे, तसा. या प्रयोगात भ्रष्‍टाचाराला लगाम बसणार म्‍हणून नाराज दुकानदारांनी स्‍मार्ट कार्डची पडताळणी करणा-या यंत्रावर तेल ओतून ते नादुरुस्‍त कर, यंत्रातून पडताळणीसाठी फिरविण्‍यास दिलेल्‍या स्‍मार्ट कार्डवर सुईने ओरखडे मार असे प्रकार सुरु केले. चंदीगडमध्‍येही असे अनुभव आल्‍याचे सांगितले जाते. या प्रयोगातून दुकानदारांच्‍या हातात स्‍मार्ट कार्ड पडताळणीच्‍या मशिनसारखे काहीच राहता कामा नये, हे शिक्षण झाल्‍याने मध्‍यप्रदेशमध्‍ये फूड कुपनची कल्‍पना पुढे आली.

होशिंगाबाद व हरदा या दोन जिल्‍ह्यांत ही कुपनची पद्धत लवकरच सुरु होणार आहे. या दोन जिल्‍ह्यांतील सर्वांची कँप लावून एकमेवाद्वितीय क्रमांक देणारी ‘आधार’ची नोंद पूर्ण करण्‍यात आली आहे. राज्‍य सरकारने केंद्राच्‍या या उपक्रमाबरोबरच आपल्‍याला आवश्‍यक असा तपशीलही गोळा केला. प्रत्‍येक कुटुंबाचा अन्‍य तपशील, त्‍यांना होणा-या योजनांचा लाभ यांचा चेकलिस्‍ट फॉर्मही भरुन घेण्‍यात आला. एकूण बीपीएल रेशन कार्डधारकांपैकी एक लक्षणीय विभाग या कँपकडे फिरकलाच नाही. अधिका-यांच्‍या मते, ज्‍या अर्थी हे बीपीएल कार्डधारक आलेच नाहीत, त्‍याअर्थी ते असित्‍वातच नाहीत. म्‍हणजेच, ही रेशनकार्डे बोगस होती. आता या अस्तित्‍वात असलेल्‍या आधार क्रमांक मिळालेल्‍या रेशन कार्डधारकांना वर्षाची कुपने एकदम दिली जाणार आहेत. ही कुपने छापणे, ती वितरित करणे व रेशन दुकानदारांकडून ती परत घेऊन व्‍यवहाराचे एक वर्तुळ पूर्ण करणे यासाठी एका बहुराष्‍ट्रीय कंपनीला नेमण्‍यात आले आहे. ही कंपनी या व्‍यवहाराचे विश्‍लेषण करुन सरकारला ते नियमित पुढील कार्यवाहीसाठी पाठवत राहणार आहे. या कामासाठी तिला प्रति कार्ड प्रति व्‍यवहार 12 रु.च्‍या आसपास रक्‍कम दिली जाणार आहे. हा खर्च सरकारला कसा परवडणार ? या प्रश्‍नाला उत्‍तर देताना, बोगस कार्डे रद्द झाल्‍याने तसेच कुपन पद्धतीने जो आटोपशीरपणा येणार आहे, त्‍यामुळे सरकारच्‍या खर्चात मोठी बचत होणार आहे. त्‍या तुलनेत हा खर्च अल्‍प आहे, असे अधिकारी सांगत होते. प्रत्‍यक्ष व्‍यवहार सुरुच न झाल्‍याने आतापर्यंत एकही पैसा राज्‍य सरकारने या कंपनीला दिलेला नाही.

गुजरातप्रमाणे कुपने मिळविण्‍यासाठी एक अतिरिक्‍त टप्‍पा इथे असणार नाही. शिवाय गुजरातप्रमाणे दर महिन्‍याऐवजी वर्षाची कुपने एकाच वेळी दिली जाणार आहेत. ही कुपने चलनाच्‍या पद्धतीने छापली जाणार आहेत. त्‍याचे नमुने आम्‍हाला पाहायला मिळाले. या कुपनांवर गुजरातप्रमाणेच तपशील व बारकोड असणार आहे. कुपनातच कडेची बाजू स्‍थळप्रत म्‍हणून ठेवण्‍याची सोय आहे. ठरलेल्‍या प्रमाणाच्‍या मर्यादेत ठरलेल्‍या महिन्‍यात हवे तेव्‍हा, हवी तेवढी कुपने देऊन कुपनांवर निर्देशित धान्‍य, निर्देशित रक्‍कम देऊन कार्डधारक घेऊ शकतो. रायपूरप्रमाणे इथेही एकाऐवजी दुस-या कोणत्‍याही रेशन दुकानात जाऊन या कुपनांच्‍या सहाय्याने शिधावस्‍तू घेण्‍याची मुभा पुढील टप्‍प्‍यावर लोकांना राहणार आहे. त्‍या नंतरच्‍या टप्‍प्‍यावर खुल्‍या बाजारातही त्‍यांचा वापर करता येईल का, याचा अदमास अधिकारी घेत आहेत.

अभिप्राय

छत्‍तीसगढ, गुजरात व मध्‍यप्रदेश या तिन्‍ही राज्‍यांमध्‍ये राजकीय इच्‍छाशक्‍ती जोरात आहे. अधिका-यांशी, कार्यकर्त्‍यांशी बोलताना व अंदाज घेतल्‍यावर प्रत्‍यक्षात मुख्‍यमंत्र्यांचा वैयक्तिक पुढाकार या सर्वात कळीचा असल्‍याचे लक्षात येते. हे जे काही चालले व होणार आहे, त्‍यास मंत्र्यांचा, यंत्रणेतले विविध स्‍तरावरचे अधिकारी, दुकानदार यांचा विरोध आहे. हे काहीच होऊ नये, असे प्रयत्‍न ते करतात. ते रोखता येत नसल्‍यास किमान त्‍यांची गती हळू करता येईल का, अशा खटपटीत ते असतात. तांत्रिक अथवा संरचनात्‍मक बदलामागे मुख्‍यमंत्र्यांची इच्‍छाशक्‍ती नसली, तर हे काहीच होणार नाही, असे बोलले जाते.

छत्‍तीसगढमध्‍ये सरकार भरभक्‍कम पैसे टाकते. तसे गुजरात व मध्‍यप्रदेशचे नाही. त्‍यातल्‍या त्‍यात गव्‍हाचा गुणवर्धित आटा व मीठ यासाठी गुजरात सरकार काही रक्‍कम खर्च करते. त्‍यामुळे छत्‍तीसगढमध्‍ये लाभार्थ्‍यांचा विस्‍तार सहज झाला, तसा या राज्‍यांत झालेला नाही. तांत्रिक बदलांनी रेशन व्‍यवस्‍थेला ठाकठीक करण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न आहे. गुजरातमधील प्रयोगात दरमहा कुपने देण्‍याची एक पायरी वाढल्‍याने तसेच अधिका-यांकडेच देखरेख असल्‍याने (ती खूप सैल असल्‍याचे प्रत्‍यक्ष दिसतच होते) शिवाय इंटरनेटची वेगवान व नियमित सोय सर्वत्र आतातरी नसल्‍याने या प्रयोगाची गती धिमी दिसते.

रायपूरमध्‍ये चंदीगड व होशिंगाबादमधील स्‍मार्ट कार्ड मध्‍ये आलेले अडथळे येणार नाहीत कशावरुन ? पण अजून तो प्रयोग झालेला नाही. तो झाल्‍यावर स्‍मार्ट कार्डच्‍या प्रयोगाविषयीचे निष्‍कर्ष अधिक स्‍पष्‍ट होतील. मध्‍यप्रदेशमधील कुपनांच्‍या प्रयोगात सरकारने आपल्‍या यंत्रणेचा हस्‍तक्षेप कमी व हितसंबंधांचा मेळ अधिक घातला आहे. कुपन करणारी कंपनी तिच्‍या फायद्यासाठी कुपने नीट पोहोचणे व दुकानदाराकरवी ती परत येणे याबाबत दक्ष राहणार. कारण ती फेरी पूर्ण झाल्‍याशिवाय तिला पैसे मिळणार नाहीत. रेशन यंत्रणेतील भ्रष्‍टाचाराच्‍या साखळीच्‍या ती पूर्णतः बाहेर असल्‍याने या भ्रष्‍टाचारातील वाट्यात रस असल्‍याने कामाची गती मंद वा वाकडी होण्‍याची जी शक्‍यता असते, ती या कंपनीबाबत संभवत नाही.

हे सर्व प्रयत्‍न रेशन व्‍यवस्‍थेतील भ्रष्‍टाचाराला प्रतिबंध करणे व त्‍यायोगे सरकारचा वाया जाणारा खर्च वाचवणे व लोकांना रेशन नीट मिळणे यासाठी आहे. या भ्रष्‍टाचाराच्‍या साखळीतले घटक प्रत्‍यक्ष अप्रत्‍यक्ष राजकीय मंडळींनी पुरस्‍कृत केलेले असतात. मग त्‍यांना हात लावायला ही तीन राज्‍ये का धजावली ? छत्‍तीसगढ नवीन राज्‍य होते. हितसंबंध खूप मुरलेले नव्‍हते. नक्षलवादही जोरात. त्‍याला उतारा हवा होता. लोकप्रियता मिळवायची होती. कॉंग्रेसच्‍या राजवटीपेक्षा आपण उजवे आहोत, हे सिद्ध करायचे होते. यासाठी रेशनव्‍यवस्‍थेतील प्रस्‍थापित भ्रष्‍टाचाराच्‍या साखळीला दुखावणे हा सौदा परवडण्‍यासारखा होता. मुख्‍यमंत्री रमणसिंग यांनी व्यक्तिशः हे धैर्य दाखवले. पुढच्‍या निवडणुकीत ‘चावलबाबा’ या नामाभिधानानेच त्‍यांचा प्रचार झाला. बहुमताने निवडून येऊन त्‍यांचे सरकार कायम राहिले. बहुधा यातूनच गुजरात व मध्‍यप्रदेशच्‍या मुख्‍यमंत्र्यांना प्रेरणा मिळाली असावी. वाया जाणारे अनुदान वाचवणे व लक्ष्‍य गटाला रेशन नीट पोहोचवण्‍यातून जी लोकप्रियता मिळेल, राजकीय लाभ होईल तो रेशन दुकानदार व त्‍यावरच्‍या साखळीला संरक्षण देण्‍यातून साधता येणार नाही, हे शिवराजसिंग चौहान व नरेंद्र मोदी यांनाही लक्षात आले असावे. शिवाय एकूण अर्थव्‍यवस्‍थेची मुक्‍त भांडवली विकासाची दिशा लक्षात घेता त्यास अडथळा ठरणारे सरंजामी उंदीर, घुशी आज ना उद्या माराव्‍याच लागणार आहेत, याचाही साक्षात्‍कार असावा.

फूड कुपन वा स्‍मार्ट कार्डाचे हे प्रयोग म्‍हणजे कॅश ट्रान्‍स्‍फर नव्‍हे. सध्‍याच्‍या रेशनमधील व्‍यवहाराचे ते पहारेकरी अथवा उत्‍प्रेरक म्‍हणा हवे तर. काऊंटर चेकिंगचेच काम ते करतात. पण तेही परिणामकारक झाले व रेशन दुकानदारांच्‍या भ्रष्‍टाचाराला लगाम बसू लागला, तर केवळ कमिशनखातर रेशन दुकानदार रेशन चालवतील ही शक्‍यता कमी दिसते. बोगस कार्डेच नाहीत, येणा-याला कोटा संपला म्‍हणून परत पाठवणे किंवा कोटा कमी आला सांगून कमी देणे हे बंद झाल्‍यास मापात-वजनात माल मारण्‍यासारखे किरकोळीचे उद्योग फार काळ त्‍यांना पसंद पडतीलसे वाटत नाही. शिवाय वरच्‍या भ्रष्‍टाचारी साखळीचाही हफ्त्‍यापोटी खालून येणारा दाणा-पाणी बंद झाला व त्‍यांच्‍या पातळीवरचीही लूट थांबवणे भाग पडले, तर या पावलांना परतवण्‍याचा ते कसोशीने प्रयत्‍न करतील. हे प्रयत्‍न यशस्‍वी झालेच नाहीत, तर अखेरीस रेशन दुकाने बंद पडतील. म्‍हणजे दुकानात इतर किराणा सामान मिळेल. पण रेशन मिळणार नाही. सरकारने वाजवी नफ्याची तरतूद केली तरीही सध्‍याची भ्रष्‍टाचाराला चटावलेली रेशनदुकानदारी तिची आजची वृत्‍तीप्रवृत्‍ती बघता हाच शेवट होईलसे वाटते. अर्थात, हा दिशेचा अंदाज आहे. मध्‍ये खूप वळसे पडणार आहेत. तो प्रवास करावाच लागणार आहे. म्‍हणूनच या प्रयोगांना पाठिंबा देणे व त्‍यातून शिकणे आवश्‍यक आहे.

ज्‍या राज्‍यात आम्‍ही गेलो नाही, पण त्‍या राज्‍यातही एक वेगळा प्रयोग होऊ घातला आहे, ते म्‍हणजे बिहार. येथील प्रयोग म्‍हणजे कॅश ट्रान्‍स्‍फर. अनुदान सरळ रोखीत देणे. उदा. रेशनवरील गव्‍हाची किंमत प्रति किलो 5 रु. व त्‍याची खुल्‍या बाजारातली किंमत 20 रु. असेल तर या दोहोतला फरक रु. 15 सरळ रेशन कार्डधारकाला देणे. सध्‍या या प्रयोगाची तयारी सुरु आहे. देशातील सर्वात मोडकळीला आलेली व बेबंद व्‍यवस्‍था असा बिहारमधील रेशन व्‍यवस्‍थेचा लौकिक आहे. जिथे लोकांना काहीच मिळत नव्‍हते अथवा नगण्‍य मिळत होते, तिथे या अनुदानाच्‍या सरळ मिळणा-या रकमेचे स्‍वागतच होणार.

गुजरात, छत्‍तीसगढ व मध्‍यप्रदेश ही तिन्‍ही राज्‍ये भाजपची सत्‍ता असलेली आहेत. बिहारमध्‍ये नितीशकुमारांबरोबर भाजप संयुक्‍तपणे सत्‍तेत आहे. परंतु, या तिन्‍ही अथवा चारी राज्‍यांनी रेशन सुधारणांचा एकच फॉर्म्‍युला वापरलेला नाही. आणि ते बरोबरच आहे. प्रत्‍येक राज्‍याची म्‍हणून काही वैशिष्‍ट्ये अस‍तात. सर्व राज्‍यांतील (बरेचदा राज्‍यांतर्गतही) सामाजिक संबंध व विकासाची अवस्‍था, प्रशासकीय परंपरा, हितसंबंधांचे स्‍वरुप, यावर तिथली उपाययोजना ठरत असते. म्‍हणूनच सबंध देशात एकच एक सुधारणांचा फॉर्म्‍युला चालू शकणार नाही. प्रयोगांची विविधताच राहणार. खुद्द छत्‍तीसगढमध्‍ये ग्रामीण भागात ब-यापैकी यशस्‍वी ठरलेला फॉर्म्‍युला त्‍याच राज्‍यातील शहरात स्‍मार्ट कार्डसारख्‍या प्रयोगांनी सुधारावा लागत आहे.

या कॉंग्रेसेतर पक्षांची सत्‍ता असलेल्‍या राज्‍यांनी कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने सुरु केलेल्‍या उपक्रमांचे आपल्‍या राज्‍यांत धडाक्‍याने अंमलबजावणी केल्‍याने त्‍यांचे श्रेय या राज्‍यांतील सत्‍ताधा-यांनाच मिळणार, अशी स्थिती आहे. या सर्व राज्‍यांनी आपल्‍या रेशनच्‍या प्रयोगांसाठी ‘आधार’चा आधार घेतला आहे. त्‍यांतील काहींचा आक्षेप त्‍याच्‍या हळू गतीवर तसेच त्‍यात घेतल्‍या जाणा-या तपशिलापेक्षा अधिक तपशील मिळावा, यासाठी आहे. मध्‍य प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी ‘आधार’ च्‍या नोंदींत सामील होण्‍यासाठी राज्‍यभर स्‍वतःचा फोटो असलेली पोस्‍टर्स लावली आहेत. त्‍यातून ही केंद्राची योजना आहे, याचा कोठेच बोध होत नाही. ही आपल्‍या मुख्‍यमंत्र्यांचीच योजना आहे, असेच जनतेला वाटते. त्‍यांची धडाक्‍याने अंमलबजावणी हेही असे वाटण्‍याचे कारण आहे. उपक्रम कॉंग्रेसचा-श्रेय भाजपचे असेच येथे होणार. हा आमच्‍या सरकारने केंद्रात घेतलेला उपक्रम आहे, असे प्रचारण्‍याची तसदी या राज्यांतील कॉंग्रेसचे नेते घेत आहेत, असे दिसत नाही.

महाराष्‍ट्रात तर स्‍वतःचे सरकार असूनही कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी पक्ष ही तसदी घेत नाहीत. महाराष्‍ट्रात बायोमेट्रिक रेशन कार्डे या वर्षीच्‍या मार्चपर्यंत मिळतील, असे अनिल देशमुखांनी जाहीर केले होते. नंतर ‘आधार’ची जोड यास देण्‍यात येईल असे त्‍यांनी सांगितले. आता ‘आधार’ची नोंद पूर्ण झाल्‍याशिवाय ही कार्डे देता येणार नाहीत, असे ते म्‍हणतात. मध्‍य प्रदेशने ‘आधार’ला गती दिली. स्‍वतःहून प्रचार केला. कॅप लावले. त्‍यातूनही गती मिळत नाही म्‍हटल्‍यावर ते आधारसाठी खोळंबले नाहीत. त्‍यांनी त्‍यांच्‍यासाठी आवश्‍यक तपशील गोळा केला व ते आधारसह अथवा आधारविना कार्डे देत आहेत. आधारविना कार्डांना आधार पूर्ण झाल्‍यावर त्‍याची जोड देण्‍याची त्‍यांनी सोय करुन ठेवली आहे. महाराष्‍ट्रात मात्र आधार हळू चालण्‍याचे बायोमेट्रिक रेशन कार्ड देण्‍याचे लांबवायला निमित्‍तच मिळाले. रेशन व्‍यवस्‍थेच्‍या संगणकीकरणासाठी 2005 साली म्‍हणजे वर उल्‍लेखलेल्‍या राज्‍यांमधील संगणकीकरणाच्‍या कितीतरी आधी महाराष्‍ट्र सरकारने तज्‍ज्ञ कंपन्‍यांना कंत्राटे दिली. पुढे काहीच झाले नाही. इतर राज्‍ये मागून येऊन पुढे गेली. आता छत्‍तीसगढ मध्‍ये महाराष्‍ट्रातल्‍या अधिका-यांचा एक अभ्‍यासदौरा झाल्‍याचे कळते. विशेष म्‍हणजे या राज्‍यातील राष्‍ट्रवादी पक्षाकडेच राज्‍यातील तसेच केंद्रातील रेशनखात्‍याचे मंत्रिपद राहिले आहे. आता अगदी अलिकडे शरद पवारांनी या खात्‍याचा भार सोडला. महाराष्‍ट्रातील या स्थितीला सत्‍ताधा-यांबरोबरच विरोधी पक्षांची या प्रश्‍नाबाबतची अनास्‍था कारण आहे की ‘जैसे थे’ स्थितीतच आपले हितसंबंध अधिक सुरक्षित राहू शकतात, ही सामुदायिक दक्षता कारण आहे ?

महाराष्‍ट्रात चळवळी मात्र इतर राज्‍यांच्‍या तुलनेत अधिक गतिशील आहेत. चळवळींची अशी गती आज वर उल्‍लेखिलेल्‍या प्रयोगशील राज्‍यांत नाहीत. याचा अर्थ, महाराष्‍ट्रातील चळवळींना आत्‍मपरीक्षणाची गरज आहे. आपल्‍या डावपेचांची आपल्‍या राज्‍यातील विकासक्रमाचा आढावा घेऊन फेररचनाही करावी लागेल. जाता जाता एक गंमत सांगतो. मध्‍यप्रदेशमध्‍ये बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यांना कुपनचे काम दिले आहे, असे सांगितल्‍यावर आमचे आंदोलनातील एक सहकारी दचकले व उद्गारले- ‘बहुराष्‍ट्रीय कंपनीला?’ त्‍यांच्‍या या दचकलेपणात बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यांबरोबर सहकार्य म्‍हणजे ‘पावित्र्यभंग’ असाच भाव होता. नंतर दुस-या एका अशाच पुरोगामी सहका-यांशी बोलत होतो. त्‍यांचा रेशनमध्‍ये ‘कॅश ट्रान्‍स्‍फर’ला तत्‍त्‍वतःच विरोध होता. त्‍यांना म्‍हटले, ‘मध्‍य प्रदेशमध्‍ये कॅश ट्रान्‍स्‍फरला जोरदार विरोध असणारे व तुम्‍ही करता तोच युक्तिवाद करणारे काही जण भेटले.’ या माझ्या सहका-यांनी उत्‍सुकतेने विचारले, ‘कोण होते ते ?’ मी उत्‍तरलो- ‘फूड कुपन्‍सचे वितरण करण्‍याचे काम घेतलेल्‍या बहुराष्‍ट्रीय कंपनीचे अधिकारी.’ या माझ्या सहका-यांच्‍या पुढच्‍या प्रतिक्रियेची वाट न पाहताच मला वाटणारे त्‍यांच्‍या विरोधाचे कारणही सांगितले- ‘कॅश ट्रान्‍स्‍फर सुरु झाले तर या कंपन्‍यांचा कुपन्‍सचा धंदा कसा चालेल ?

हितसंबंधांची व अं‍तर्विरोधांची गुंतागुंत वाढत चालेल्‍या आजच्‍या काळात, आपले, म्‍हणजे ज्‍यांच्‍यासाठी आपण लढतो त्‍या तळच्‍या गरीब माणसाचे हितसंबंध सुरक्षित राखण्‍याचा सरळसोपा मार्ग नाही. वास्‍तवाचे विविध पदर निरहंकारी व अभिनिवेशरहित पद्धतीने समजून घेत या अंतर्विरोधांचा वेध घेण्‍याची गरज आहे. त्‍यातूनच नव्‍या प्रयोगांना सामोरे जाण्‍याची ‘नवी’ वृत्‍ती येईल.

- सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com / 9892865937

5 डिसेंबर 2011

Wednesday, October 5, 2011

दारिद्र्यरेषेचा वाद नीट समजून घेऊ

‘26 रु. खेड्यात आणि 32 रु. शहरात एका दिवशी खर्च करुन जगणारा माणूस सापडू शकतो का ? नियोजन आयोगाने घातलेली ही मर्यादा गरिबांची चेष्‍टा करणारी आहे.’ असा हल्‍ला अलिकडेच नियोजन आयोगाने सर्वोच्‍च न्‍यायालयात सादर केलेल्‍या शपथपत्राच्‍या संदर्भात प्रसारमाध्‍यमांतून, कार्यकर्त्‍यांकडून चढवला गेला. खुद्द सरकारमधूनही जयराम रमेश, राहुल गांधी आदिंकडून या व्‍याख्‍येविषयी नाराजी व्‍यक्‍त होऊन त्‍यात सुधारणेची गरज प्रतिपादन करण्‍यात आली. या सगळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर सोमवारी नियोजन आयोगाचे उपाध्‍यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया व ग्रामीण वि‍कास मंत्री जयराम रमेश यांनी संयुक्‍तरित्‍या काही बदल जाहीर केले. या सगळ्याचा अर्थबोध होण्‍यासाठी या प्रकरणाची इतर अंगे व संदर्भ समजून घेणे गरजेचे आहे.

न्‍यायालयात दाखल केलेल्‍या शपथपत्रात नियोजन आयोगाने तेंडुलकर समितीचा फॉर्म्‍युला वापरुन प्रति व्‍यक्‍ती प्रति महिना शहरासाठी रु. 965 (प्रति कुटुंब रु. 4824) व ग्रामीण विभागासाठी रु. 781 (प्रति कुटुंब रु. 3905) गरिबी ठरविण्‍यासाठीची खर्चमर्यादा नमूद केली आहे. यात प्रति व्‍यक्‍ती प्रति दिन 32 रु. वा 26 रु. या आकड्यांची नोंद नाही. वरील रकमांच्‍या आधारे दिवसाचे हे आकडे काढले आहेत. घरातला खर्च एकत्रित होत असतो, हे लक्षात घेता कुटुंबाच्‍या खर्चाचा आकडा विचारात घेणे अधिक उचित ठरते. 32 रु.त दिवसाचा खर्च भागवून दाखव, अशा पद्धतीने टीका करण्‍यात म्‍हणून फारसा अर्थ नसतो. अर्थात, नियोजन आयोगाने नमूद केलेले मासिक आकडेही आजच्‍या वास्‍तवाला धरुन नाहीत. मुंबईसारख्‍या शहरात आज किमान 8000 रु. गरिबातल्‍या गरीब कुटुंबाला महिन्‍याला मिळवावेच लागतात. जगण्‍यासाठीचे सर्वच स्रोत पैश्‍यांच्‍या रुपात नसल्‍याने ग्रामीण भागात असा अंदाज कठीण असला, तरीही तो 6000 रु.च्‍या जवळपास जातो. सोमवारच्‍या पत्रकार परिषदेत अहलुवालियांनी आत्‍यंतिक गरिबीत जगणा-या कुटुंबांचे हे आकडे आहेत, असे केलेले समर्थनही म्‍हणूनच पचनी पडत नाही.

नियोजन आयोगाच्‍या या निवेदनावर टीका करुन विधायक पर्याय देण्‍याऐवजी विरोधकांनी त्‍याचे राजकीय भांडवलच अधिक केले. सोयीच्‍या प्रचाराचे एक उदाहरण पाहू. अर्जुन सेनगुप्‍ता समितीने 77 टक्‍के गरिबीचा अंदाज देताना 20 रु. प्रति दिन प्रति व्‍यक्‍ती खर्च ही मर्यादा धरली होती. तिचा आधार राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) 2004-05 च्‍या पाहणीचाच होता. तेंडुलकर समितीचाही आधार हीच पाहणी होती. मग सेनगुप्‍ता समितीच्‍या अहवालावर ‘20 रु. त जगणारी एकतरी व्‍यक्‍ती दाखवा’ अशी टीका का नाही झाली ? तिथे 77 टक्‍के गरिबीचा आकडा महत्‍वाचा होता. कारण या आकड्याने ‘स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर देश अधिकाधिक गरीब झाला’ ही राजकीय लाईन प्रशस्‍त होत होती.

महाराष्‍ट्रात 1997 साली सेना-भाजपाच्‍या काळात रेशनच्‍या पिवळ्या (बीपीएल) कार्डांसाठीची प्रति कुटु्ंब 15000 रु. वार्षिक उत्‍पन्‍न मर्यादा (प्रति कुटुंब दरमहा 1250 रु. व प्रति व्‍यक्‍ती प्रति दिन 8 रू.) राज्‍याने ठरविली. केंद्राने नव्‍हे. त्‍यानंतरच्‍या कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या सरकारांची कातडीही तेवढीच निबर राहिली. त्‍यांनीही यात काहीही बदल केला नाही. आज 14 वर्षांनंतरही हीच दिवसाला प्रति व्‍यक्ती 8 रु. मर्यादा रेशनसाठीच्‍या गरिबांसाठी आहे. नव्‍या सर्वेक्षणातून येणारी यादी तयार होईपर्यंत तीच राहणार आहे. 32 रु.वर हल्‍ला करणारी प्रसारमाध्‍यमे, विरोधी पक्ष आजच्‍या 8 रु. च्‍या प्रचलित गरिबीच्‍या व्‍याख्‍येवर तुटून का नाही पडले ? केंद्रात भाजपच्‍या नेतृत्‍वाखालच्‍या एनडीए सरकारच्‍या काळात 2002 च्‍या दारिद्रयरेषेच्‍या सर्वेक्षणातून देशातील गरिबांची संख्‍या 26 टक्‍के असल्‍याचे जाहीर झाले. 2000 सालापर्यंत 36-37 टक्‍के असलेली गरीबी भाजपच्‍या पुढील 2 वर्षांच्‍या ‘शायनिंग इंडिया’ कारभाराने 10 टक्‍क्यानी कमी होण्‍याचा चमत्‍कार कसा घडला, याचा खुलासा भाजपने करायला हवा होता. प्रसारमाध्‍यमांनीही त्‍यांच्‍या आजच्‍या टीकेला प्रसिद्धी देताना हा प्रश्‍न विचारायला हवा होता. कॉंग्रेसच्‍या राजवटीने स्‍वीकारलेल्‍या तेंडुलकर समितीने गरिबीचा आकडा 37 टक्‍के दिला आहे. 2004 साली सत्‍तेवर आल्‍यानंतरच्‍या कारकीर्दीत भाजपच्‍या काळात 10 टक्‍क्‍यांनी कमी झालेली गरीबी पुन्‍हा 10 टक्‍क्‍यांनी कशी काय वाढली, हे कॉंग्रेसलाही माध्‍यमांनी विचारायला हवे. NSSO चे आकडे शास्‍त्रीय पद्धतीने गोळा झाले तरी त्‍यांचा अर्थ लावताना, राजकारण असते. सरकारला किती लोकांना लाभ द्यायचा आहे, त्‍यावर गरिबीच्‍या संख्‍येची मर्यादा ठरवली जाते, हेच यावरुन अधोरेखित होते.

आजचा हा सर्व वाद गरिबांच्‍या संख्‍येच्‍या अंदाजाविषयीचा आहे. अंदाज व निवड या दोन स्‍वतंत्र गोष्‍टी आहेत. तथापि, प्रसारमाध्‍यमांतील सध्‍याच्‍या गदारोळातून हे स्‍पष्‍ट होत नाही. आताच्‍या दारिद्रयरेषेच्‍या सर्वेक्षणावेळी 32 रु. हून तुमचा खर्च अधिक आहे का, असाच जणू प्रश्‍न विचारला जाणार आहे व त्‍याचे उत्‍तर ‘होय’ असे दिले, तर आपणास दारिद्रयरेषेच्‍या यादीतून बाहेर काढले जाणार आहे, अशी सर्वसामान्‍यांची गैरसमजूत होत आहे. 2 ऑक्‍टोबरपासून होणार म्‍हणून जाहीर झालेल्‍या महाराष्‍ट्रातील जात व सामाजिक-आर्थिक गणनेच्‍या प्रश्‍नावलीत असा एकही प्रश्‍न नाही. ते प्रश्‍न सर्वस्‍वी वेगळे आहेत.

या सर्वेक्षणातून तयार होणा-या कुटुंबांच्‍या यादीचे विशिष्‍ट पद्धतीने विश्‍लेषण करुन त्‍यातील गरीब कुटुंबे निश्चित केली जाणार आहेत. तेंडुलकर समितीच्‍या अंदाजाइतकी (37 टक्‍के) ही कुटुंबांची मर्यादा ठेवायची असा सरकारचा विचार होता. त्‍याप्रमाणे राज्‍यवार आकडेही जाहीर झाले होते. तसेच विश्‍लेषण पद्धतीत सरळ वगळावयाची कुटुंबे, सरळ आत घ्‍यावयाची कुटुंबे व वंचितता निदर्शक लावून गुणानुक्रमे समाविष्‍ट करावयाची कुटुंबे यासाठीचे निकष ग्रामीण भागासाठी सरकारने निश्चित केले होते. वर उल्‍लेख केलेल्‍या सोमवारच्‍या अहलुवालिया-जयराम रमेश यांच्‍या संयुक्‍त निवेदनात यासंदर्भात बदल झालेले दिसतात.

जानेवारी 2012 पर्यंत आताचे सर्वेक्षण पूर्ण होईल. नियोजन आयोगाने जाहीर केलेला राज्‍यवार गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज या सर्वेक्षणातून निश्चित करावयाच्‍या शासनाच्‍या विविध योजनांच्‍या लाभार्थींची संख्‍या मर्यादित करण्‍यासाठी वापरला जाणार नाही. दरम्‍यान, लाभार्थी निश्चित करण्‍यासाठीच्‍या पद्धतीबाबत सहमती तयार करण्‍यासाठी राज्‍य सरकारे, तज्‍ज्ञ व नागरी संघटना यांच्‍याशी चर्चा करण्‍यात येईल. विविध सरकारी योजनांसाठी पात्र असलेले एकही गरीब अथवा वंचित कुटुंब वगळले जाऊ नये याची दक्षता घेण्‍यात येईल. आगामी अन्‍न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी याच पद्धतीशी सुसंगत कशी राखता येईल, हे ठरविण्‍यासाठी तज्‍ज्ञांची एक समिती नेमण्‍यात येईल, असे या निवेदनात म्‍हटले आहे.

या बाबी निश्चित स्‍वागतार्ह आहेत. या निवेदनात अपेक्षिल्‍याप्रमाणे टीकाकारांनी, तज्‍ज्ञांनी तसेच कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या सूचना देणे व त्यासाठीचा पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. याच्‍याही आधी तातडीने करावयाची गोष्‍ट म्‍हणजे, आपल्‍याला वाटणारी गरीब कुटुंबे आता होत असलेल्‍या सर्वेक्षणात नोंदली जात आहेत, याची खात्री करणे. महाराष्‍ट्र सरकारच्‍या तयारीची स्थिती पाहता, बेघर, कचरा वेचक, सायकल रिक्‍शावाले, नाका कामगार, स्‍थलांतरित होणारे आदिवासी अशांसारखे दुर्बल घटक दुर्लक्षिले जाण्‍याची शक्‍यता दाट आहे. सर्वेक्षणातूनच हे लोक वगळले गेल्‍यास, कोणत्‍याही पद्धतीने दारिद्रयरेषा ठरली तरी ते दारिद्रयरेषेच्‍या यादीत येणार नाहीत, हे उघड आहे.

- सुरेश सावंत

Thursday, September 29, 2011

दारिद्र्यरेषेच्‍या वादाचे स्‍वरुप व पर्याय

‘26 रु. खेड्यात आणि 32 रु. शहरात एका दिवशी खर्च करुन जगणारा माणूस सापडू शकतो का ? नियोजन आयोगाने घातलेली ही मर्यादा गरिबांची चेष्‍टा करणारी आहे.’ असा हल्‍ला अलिकडेच नियोजन आयोगाने सर्वोच्‍च न्‍यायालयात सादर केलेल्‍या शपथपत्राच्‍या संदर्भात प्रसारमाध्‍यमांतून, कार्यकर्त्‍यांकडून जोरदार चालू आहे. हा हल्‍ला योग्‍यच आहे. तथापि, याबाबतच्‍या वास्‍तवाचे इतर पदर समजून न घेता केलेली टीका ही एकांगी शेरेबाजी ठरेल. त्‍यावरची उपाययोजना सुचवता येणार नाही. यादृष्‍टीने या वादाची संदर्भचौकट मांडण्‍याचा येथे प्रयत्‍न करत आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयात 2001 पासून सुरु असलेल्‍या अन्‍न अधिकाराच्‍या याचिकेसंदर्भातील सुनावण्‍या अजूनही चालू आहेत. अलिकडच्‍या एका सुनावणीत बीपीएलची रेशन कार्डे कोणाला दिली जातात, याबाबत नियोजन आयोगाने आपले म्‍हणणे सादर करावे, असा आदेश न्‍यायालयाने दिला होता. नियोजन आयोगाने शपथपत्राद्वारे सरळ व नेमके उत्‍तर न देता सुरेश तेंडुलकर समितीच्‍या अहवालात नमूद केलेली प्रतिदिन प्रति व्‍यक्‍ती 15 रु. व 20 रु. अनुक्रमे ग्रामीण व शहरासाठीच्‍या गरिबीसाठीची खर्चमर्यादा सादर केली. तेंडुलकर समितीने राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) 2004-05 च्‍या पाहणीचा तपशील आपल्‍या मापनासाठी वापरला होता. मे महिन्‍याच्‍या सुनावणीत न्‍यायालयाने या खर्चमर्यादेवर अवास्‍तव असल्‍याचे ताशेरे ओढले व आजच्‍या काळाशी सुसंगत अशी सुधारित मर्यादा सादर करण्‍याचा आदेश दिला. त्‍याप्रमाणे सप्‍टेंबरमध्‍ये सादर केलेल्‍या शपथपत्रात 26 रु. ग्रामीण व 32 रु. शहर हे सुधारित आकडे नियोजन आयोगाने नमूद केले. हे आकडे तेंडुलकर समितीचा फॉर्म्‍युला आणि राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) 2009-10 च्‍या पाहणीचा तपशील यावर आधारित आहेत.

शपथपत्रातील या आकड्यांवर प्रसारमाध्‍यमांतून हल्‍ला सुरु झाला. सबंध नियोजन आयोग, विधी मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय यांच्‍या मंजुरीनेच अशी शपथपत्रे सादर होतात, म्‍हणून पंतप्रधान व सरकारच यास जबाबदार आहे, असा आरोप होऊ लागला. त्‍यावर नियोजन आयोगातून, सरकारमधून प्रतिक्रिया व्‍यक्‍त होऊ लागल्‍या. नियोजन आयोगातील अभिजित सेन व अन्‍य काहींनी हे शपथपत्र आमच्‍या नजरेखालून गेलेले नाही. वास्‍तविक अशा महत्‍वाच्‍या बाबीची आधी सर्व सदस्‍यांत चर्चा व्‍हायला हवी होती, असे वृत्‍तप्रतिनिधींना सांगितले. ज्‍यांच्‍याकडे या विषयाची खास जबाबदारी होती, ते नियोजन आयोगाचे दुसरे सदस्‍य सौमित्र चौधुरी म्‍हणाले, ‘ही दैनंदिन स्‍वरुपाची बाब असल्‍याने तेंडुलकर समितीच्‍या अहवालाच्‍या सूत्रानुसारच सुधारित आकडे आम्‍ही सादर केले.’ सरकारच्‍या विधी म्‍हणजेच कायदे खात्‍याने आमच्‍याकडे मंजुरीसाठी हे शपथपत्र आलेच नव्‍हते, असे सांगितले. पंतप्रधान कार्यालयाशीही अर्थातच संपर्क करण्‍यात आलेला नव्‍हता.

हे काहीही असले शपथपत्र सरकारच्‍या वतीने जाहीर केलेले असल्‍याने सरकारला मान्‍य असलेलेच हे आकडे आहेत, असा अर्थ होतो. हे आकडे निश्चितच कमी आहेत. मुंबई व ग्रामीण महाराष्‍ट्रात कार्यकर्त्‍यांनी वरवर घेतलेल्‍या अंदाजानुसार आज हे आकडे 50 रु. व 40 रु. च्‍या आसपास असायला हवेत. अर्थात, कार्यकर्त्‍यांचे हे आकडे शास्‍त्रीय पद्धतीने काढलेले नाहीत. पण डोळ्यांनी दिसणा-या वास्‍तवाशी जुळणारे आहेत. मग नियोजन आयोगाचे शास्‍त्रीय पद्धतीने काढलेले आकडे वास्‍तवाशी जुळणारे का नाहीत ? वरील आकडे मुंबई-महाराष्‍ट्रातले आहेत. देशाच्‍या अन्‍य भागातले वास्‍तव वेगळे असल्‍याने त्‍या सर्वांची सरासरी म्‍हणून नियोजन आयोगाचे आकडे कमी झाले आहेत का ? ज्‍या राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) तपशिलावर आयोगाचे हे आ‍कडे आधारित आहेत, तिच्‍या हेतूंविषयी व शास्‍त्रीयतेवर कोणी आक्षेप घेतल्‍याचे ऐकिवात नाही. सरकारी, बिगरसरकारी समित्‍यांचे बहुतेक अहवाल NSSO च्‍याच आकड्यांवर आधारित असतात. आणि या समित्‍यांच्‍या तपशिलाचा आधार एकच असताना, निष्‍कर्षांत मात्र फरक आढळतात. (उदा. गरिबीचे प्रमाणः अर्जुन सेनगुप्‍ता- 77 टक्के, सक्‍सेना- 50 टक्‍के व तेंडुलकर- 37 टक्‍के).

याचा अर्थ, या आकड्यांचा अर्थ लावण्‍यात केवळ शास्‍त्र नसते, तर दृष्टिकोन, भूमिका, राजकारण असते, असे मानले पाहिजे. अर्थशास्‍त्र हे निव्‍वळ अर्थशास्‍त्र नसते, ते राजकीय अर्थशास्‍त्रच असते. अर्थात, असा अर्थ लावताना व आपली भूमिका प्रचारताना प्रतिपक्षाची बाजू नीट मांडणे हे केवळ नैतिकच नव्‍हे, तर ‘योग्‍य उपचारांसाठी योग्‍य निदान व योग्‍य निदानासाठी योग्‍य तपासण्‍या’ असे महत्‍व त्‍यास आहे. सोयीचे निदान चुकीच्‍या उपचारांनी भविष्‍यात गैरसोयीचेच ठरते. सोयीच्‍या प्रचाराचे एक उदाहरण पाहू. अर्जुन सेनगुप्‍ता समितीने 77 टक्‍के गरिबीचा अंदाज देताना 20 रु. प्रति दिन प्रति व्‍यक्‍ती खर्च ही मर्यादा धरली होती. तिचा आधार राष्‍ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्‍या (NSSO) 2004-05 च्‍या पाहणीचाच होता. तेंडुलकर समितीचाही आधार हीच पाहणी होती, हे वर उल्‍लेखिलेले आहेच. मग सेनगुप्‍ता समितीच्‍या अहवालावर ‘20 रु. त जगणारी एकतरी व्‍यक्‍ती दाखवा’ अशी टीका का नाही झाली ? तिथे 77 टक्‍के गरिबीचा आकडा महत्‍वाचा होता. कारण या आकड्याने ‘स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर देश अधिकाधिक गरीब झाला’ ही राजकीय लाईन प्रशस्‍त होत होती. दिवसाला 26 आणि 32 रुपयांत तुम्‍ही जगून दाखवा, असा पंतप्रधानांना आज विचारला जाणारा प्रश्‍न आधी सेनगुप्‍तांना विचारायला हवा होता.

अजून एक बाब. केंद्रातील व राज्‍यातील भाजपचे नेते सरकारवर या शपथपत्राच्‍या निमित्‍ताने तोंडसुख घेत आहेत. त्‍यांनी थोडे स्‍मरण करावे. महाराष्‍ट्रात 1997 साली रेशनच्‍या पिवळ्या (बीपीएल) कार्डांसाठीची प्रति कुटु्ंब 15000 रु. वार्षिक उत्‍पन्‍न मर्यादा ठरविली गेली. म्‍हणजे महिन्‍याला 1250 रु. त जगणारे कुटुंब किंवा दिवसाला 8 रु.त जगणारी व्‍यक्‍ती गरीब मानली गेली. या उत्‍पन्‍न मर्यादेत जगणारे कुटुंब तेव्‍हाही मिळणे असंभव होते. मनोहरपंतांच्‍या नेतृत्‍वाखालच्‍या सेना-भाजपचे सरकार तेव्‍हा होते. केंद्राने बीपीएल कार्डासाठीचा कोटा ठरवून दिला होता. गरीब निवडण्‍याची जबाबदारी राज्‍यांची होती. केंद्राने गरिबीची व्‍याख्‍या 15000 रु. अशी ठरवून दिलेली नव्‍हती. त्‍यानंतरच्‍या कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या सरकारांची कातडीही तेवढीच निबर राहिली. त्‍यांनीही यात काहीही बदल केला नाही. आज 14 वर्षांनंतरही हीच दिवसाला प्रति व्‍यक्ती 8 रु. मर्यादा रेशनसाठीच्‍या गरिबांसाठी आहे. नव्‍या सर्वेक्षणातून येणारी यादी तयार होईपर्यंत तीच राहणार आहे. 32 रु.वर हल्‍ला करणारी प्रसारमाध्‍यमे, विरोधी पक्ष आजच्‍या 8 रु. च्‍या प्रचलित गरिबीच्‍या व्‍याख्‍येवर तुटून का नाही पडले ? केंद्रात भाजपच्‍या नेतृत्‍वाखालच्‍या एनडीए सरकारच्‍या काळात 2002 च्‍या दारिद्रयरेषेच्‍या सर्वेक्षणातून देशातील गरिबांची संख्‍या 26 टक्‍के असल्‍याचे जाहीर झाले. 2000 सालापर्यंत 36-37 टक्‍के असलेली गरीबी भाजपच्‍या पुढील 2 वर्षांच्‍या ‘शायनिंग इंडिया’ कारभाराने 10 टक्‍क्यानी कमी होण्‍याचा चमत्‍कार कसा घडला, याचा खुलासा भाजपने करायला हवा होता. प्रसारमाध्‍यमांनीही त्‍यांच्‍या आजच्‍या टीकेला प्रसिद्धी देताना हा प्रश्‍न विचारायला हवा होता. कॉंग्रेसच्‍या राजवटीने स्‍वीकारलेल्‍या तेंडुलकर समितीने गरिबीचा आकडा 37 टक्‍के दिला आहे. 2004 साली सत्‍तेवर आल्‍यानंतरच्‍या कारकीर्दीत भाजपच्‍या काळात 10 टक्‍क्‍यांनी कमी झालेली गरीबी पुन्‍हा 10 टक्‍क्‍यांनी वाढवण्‍याचा चमत्‍कार तुम्‍ही कसा केलात, हे कॉंग्रेसलाही माध्‍यमांनी विचारायला हवे.

या सगळ्या गदारोळात सामान्‍य माणसांच्‍या मनाचा गोंधळ किंबहुना चुकीची समजूत होत आहे, ही गंभीर व काळजीची बाब आहे.

सेनगुप्‍ता, तेंडुलकर, एनएसएसओ या सर्वांचे निकष धोरणकर्त्‍यांना गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज घेण्‍यासाठी आहेत. आगामी सर्वेक्षण हे प्रत्‍यक्ष गरीब निवडीचे आहे. त्‍यात तुमचा दिवसाला खर्च किती, असा एकही प्रश्‍न नाही. हे प्रश्‍न सर्वस्‍वी वेगळे आहेत. प्रसारमाध्‍यमांतून गाजणा-या चर्चांमुळे जणू शहरात 32 रु.च्‍या वर व खेड्यात 26 रु.च्‍या वर खर्च करतो, असे सांगितले की आपल्‍याला दारिद्र्यरेषेच्‍या यादीत घेणार नाहीत, असा समज पसरला आहे. या वादाचा आजच्‍या तुमच्‍या सर्वेक्षणाशी ताबडतोबीने संबंध नाही, तुम्‍ही तुमची उत्‍तरे सर्वेक्षण करणा-यांना प्रामाणिकपणे द्या, असे सांगून लोकांना सर्व राजकीय पक्षांनी, संघटनांनी व प्रसारमाध्‍यमांनी आश्वस्‍त केले पाहिजे. 2 ऑक्‍टोबरपासून होऊ घातलेले सर्वेक्षण नीट होणे ही आपल्‍या सर्वांची जबाबदारी आहे.

या अंदाजाचा संबंध सर्वेक्षण पूर्ण झाल्‍यावर किती गरीब निवडायचे ही कटऑफ लाईन ठरविण्‍याच्‍यावेळी येणार आहे. त्‍यासाठीची मोर्चेबांधणी लोकांना वरील स्‍पष्‍टता देऊन स्‍वतंत्रपणे केली पाहिजे. खर्चाचे आकडे बदलले की अंदाजातही बदल होऊ शकतो. तसे सूतोवाच नियोजन आयोगाच्‍या शपथपत्रातही केलेले आहे. हा अंदाज योग्‍य असावा म्हणून गरिबांचे न्‍याय्य मापन होऊन त्‍यांची संख्‍या व निवड झाली पाहिजे. यासाठी पर्यायी मापनपद्धती मांडण्‍याची गरज आहे.

अलिकडेच बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी गरीब निवडीसाठी संख्‍येची कॅप (कटऑफलाईन, मर्यादा, कोटा) असता कामा नये, अशी मागणी केली आहे. त्‍याला प्रतिसाद देताना ग्रामीण विकास विभागाचे मंत्री जयराम रमेश यांनी तत्‍त्‍वतः मला ही गोष्‍ट मान्‍य आहे, नियोजन आयोगाशी सरकार चर्चा करेल, असे सांगितले आहे. गरीबांची यादी निश्चित करण्‍यासाठी यावेळी आपोआप वगळावयाचे लोक, आपोआप आत घ्‍यावयाचे लोक व उरलेल्‍यांना वंचिततेच्‍या निकषांनी गुणानुक्रम लावून अधिक गुणवाल्‍यांना प्रधम प्राधान्‍य अशी पद्धती वापरली जाणार आहे. या सध्‍या स्‍वीकारलेल्‍या पर्यायाबरोबरच अधिक न्‍याय व्‍हावा म्हणून त्‍यांनी दोन पर्याय मांडले आहेतः एक, सर्वेक्षणातून तयार होणा-या यादीतून कोणाला वगळायचे हे निश्चित करुन त्‍यांना वगळावे व उर्वरित सर्वांना गरिबांसाठीच्‍या योजनांचा लाभ द्यावा. दोन, कटऑफलाईनच्‍या थोडेसे वर गेल्‍याने गरिबीच्‍या यादीतून बाहेर पडावयाचा संभव असणा-यांना समाविष्‍ट करावे, त्‍यासाठी कटऑफलाईन सैल ठेवावी.

माझे म्‍हणणे असेः

} केंद्राची संसाधनांची तथाकथित मर्यादा व राज्‍यांची केंद्रावरच अधिक जबाबदारी ढकलण्‍याची वृत्‍ती या कारणांनी आपल्‍याला सोयीच्‍या संख्‍यामर्यादेएवढेच गरीब देशात आहेत, असा अंदाज शास्‍त्रीय म्‍हणून सांगण्‍याचा आभास बंद व्‍हायला हवा.

} न्‍याय्य व आजच्‍या काळातील विकसित जीवनमानाला आवाक्‍यात घेणा-या निकषांवर आधारित गरीब ठरावेत.

} गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज रुपयांत व निवड सामाजिक-आर्थिक निकषांनी हे विसंगत आहे. अंदाज व निवडीचे निकष सुसंगत हवेत.

} हे निकष खर्चावर आधारित रुपयांच्‍या भाषेत नको. रुपयांची भाषा फसवी असते. फुटपाथवर राहणा-याची, भिक मागून जगणा-याची, शरीरविक्रय करणा-या असहाय्य स्‍त्रीची मिळकत भले अधिक असली, तरी त्‍यांचे जगणे अशाश्‍वत व मानवी प्रतिष्‍ठेच्‍या दृष्‍टीने सन्‍मान्‍य नसते. हे निकष सामाजिक-आर्थिकच हवेत. जमतील तेवढे एकेरी हवेत. (उदा. हाताने मैला साफ करणारे, कचरा वेचक, मोलकरीण, नाका कामगार, आदिम जमात, वेश्‍या, हिजडे, माळावर पाल टाकून राहणारे भटके, फुटपाथवर राहणारे, सायकल रिक्‍शावाले इ.)

} या सर्व गरिबांची समग्र यादी (मग ती 37 टक्‍के किंवा त्‍याहून कितीतरी अधिक झाली तरी चालेल) करावी.

} या यादीतील गुणानुक्रमे अल्‍पगुणवाले सर्वप्रथम या रीतीने केंद्राने आपल्‍या संसाधनांच्‍या मर्यादेत सहाय्य द्यावयाच्‍या गरिबांची संख्‍या निश्चित करावी. त्‍यावरील गरिबांची जबाबदारी राज्‍यांनी घ्‍यावी.

या सर्वाचा महाराष्‍ट्रावर जो परिणाम होणार आहे, त्‍या संदर्भात एक नोंद देऊन हे विवेचन संपवितो.

सरकारने ग्राह्य धरलेल्‍या तेंडुलकर समितीने महाराष्‍ट्रासाठी दिलेला अंदाज असा आहेः शहर- 25.6 टक्‍के, ग्रामीण- 47.9 टक्‍के व एकूण 38 टक्‍के. हा अंदाज आधीच्‍या अंदाजापेक्षा अधिक आहे. सरकारने हाच अंदाज ठेवून आगामी सर्वेक्षणातून गरीब निवडले तरी ते पहिल्‍यापेक्षा अधिक असतील. रेशनमध्‍ये हे प्रकर्षाने लक्षात येईल. रेशनची अंत्‍योदयची कार्डे (2 रु. गहू व 3 रु. तांदूळ एकूण 35 किलो धान्‍य दरमहा मिळणारी) आज 22 टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहेत. ती प्रस्‍तावित अन्‍नसुरक्षा कायद्यानुसार ग्रामीण महाराष्‍ट्रात 46 टक्‍के होतील. मुंबई शहरात अंत्‍योदय-बीपीएल मिळून 1 टक्‍के रेश‍नकार्डे आहेत. पुण्‍यासारख्‍या अन्‍य शहरांमध्‍येही ती 5-6 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाहीत. या सर्व ठिकाणी अंत्‍योदयच्‍या दराने रेशन मिळणा-यांची संख्‍या 28 टक्‍के होईल. गरीबीच्‍या यादीचे तसेच प्रस्‍तावित कायद्याचे सर्व सोपस्‍कार अजून पूर्ण व्‍हायला अवकाश असल्‍याने हे सगळे आजतरी ‘जर-तर’च्‍या भाषेतच मांडावे लागणार. अर्थात, जे होईल, ते महाराष्‍ट्रात आधीच्‍या तुलनेत पुढेच जाणारे असेल, ही शक्‍यता दांडगी आहे.

- सुरेश सावंत

Thursday, September 15, 2011

‘गरिबीचे न्‍याय्य मापन झालेच पाहिजे’ या मागणीसाठी एक दिवसीय धरणे

ऑक्‍टोबरमध्‍ये सुरु होणा-या दारिद्र्यरेषेच्‍या सर्वेक्षणात

‘गरिबीचे न्‍याय्य मापन झालेच पाहिजे’

या मागणीसाठी

एक दिवसीय धरणे

20 सप्‍टेंबर 2011, दु. 12 ते सायं. 5, आझाद मैदान, मुंबई

जातीच्‍या जनगणनेबरोबरच दारिद्र्यरेषेच्‍या सर्वेक्षणाला जूनपासून देशभर सुरुवात झाली असून येत्‍या 2 ऑक्‍टोबरपासून महाराष्‍ट्रातील ग्रामीण व शहरी भागात ते सुरु होत आहे. डिसेंबरअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याआधीच्‍या 1997 तसेच 2002 च्‍या सर्वेक्षणांचा अनुभव चांगला नव्‍हता. असंख्‍य पात्र गरी‍ब त्‍यातून वगळले गेले होते. चुकीचे वा अपुरे निकष तसेच सर्वेक्षणातील त्रुटी यामुळे असे घडले.

यावेळच्‍या सर्वेक्षणात असे होऊ नये यासाठी राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियान केंद्र सरकारशी पाठपुरावा करत असून महाराष्‍ट्र सरकारकडे राज्‍य अन्‍न अधिकार अभियान पाठपुरावा करत आहे. या पाठपुराव्‍या दरम्‍यान, या अत्‍यंत महत्‍वाच्‍या सर्वेक्षणासाठी सरकार सिद्ध असल्‍याचे दिसले नाही. जेमतेम 12 दिवसांत प्रगणकांचे प्रशिक्षण तसेच अन्‍य यंत्रणा राज्‍य सरकार कशी उभारणार आहे, हे कळत नाही. यावेळी देशात प्रथमच शहरांचेही सर्वेक्षण होणार असल्‍याने त्‍यासाठीची तयारी तर अधिकच करणे गरजेचे आहे. तथापि, हे सर्वेक्षण करण्‍याची जबाबदारी असणा-या महानगरपालिका, नगरपालिकांना अजून याची पुरेशी खबरबातच नाही. शहरी भागासाठी गरीब ठरविण्‍याचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत.

प्रस्‍तावित अन्‍न सुरक्षा कायदा, राजीव आवास योजना इ. अनेक योजनांसाठी या सर्वेक्षणातून तयार होणारी गरिबांची यादी पुढील 5 वर्षांसाठी आधार मानली जाणार आहे. यादृष्‍टीने हे सर्वेक्षण निर्दोष व न्‍याय्य होणे गरजेचे आहे. तथापि, सरकारची वरील अवस्‍था पाहता, पुन्‍हा जुन्‍या सर्वेक्षणांतील उणिवांची पुनरावृत्‍ती होण्‍याचीच शक्‍यता दिसते.

अशावेळी जागृत नागरिक म्‍हणून आपण सरकारला याचा जाब विचारला पाहिजे व सर्वेक्षणासाठीची आवश्‍यक ती सिद्धता युद्धपातळीवर करुन गरिबीचे न्याय्य मापन करायला भाग पाडले पाहिजे.

या हेतूने अन्‍न अधिकार अभियानाशी संबंधित राज्‍यातल्‍या संघटनांनी 20 सप्‍टेंबर 2011 रोजी दु. 12 ते सायं. 5 या वेळात आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसीय धरणे आयोजित केले आहे. यावेळी सरकारला सर्वेक्षणाच्‍या गांभीर्याबाबतचा इशारा देत असतानाच संभाव्‍य त्रुटी दूर करुन गरिबीचे न्याय्य मापन होण्‍यासाठीच्‍या सूचनाही करण्‍यात येणार आहेत.

प्रश्‍नाचे महत्‍व व तातडी लक्षात घेता, आपण या धरणे आंदोलनात मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे तसेच आपल्‍या संपर्कातील जास्‍तीत जास्‍त लोकांना, संघटनांना हे पत्रक पाठवून आंदोलनात सहभागी होण्‍याचे आवाहन करावे, ही विनंती.

या विषयीची अधिक माहिती, अन्‍य संदर्भ साहित्‍य, अहवाल, मागणीपत्र यासाठी खाली संपर्क करावा.

- अन्‍न अधिकार अभियान, महाराष्‍ट्र

संपर्कः मुक्‍ता श्रीवास्‍तव, 604, सप्‍तगिरी, कॉस्‍मॉस हिल्‍स, उपवन तलावासमोर, पोखरण, मार्ग क्र. 1, ठाणे (प) – 40060 र्इमेलः muktaliberated@gmail.com फोनः 9969530060

Tuesday, September 6, 2011

हितसंबंधीयांच्‍या संघर्षातून वाट काढत निघालेला प्रस्‍तावित राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा कायदा

प्रस्‍तावित राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा कायद्यासाठीच्‍या विधेयकाचा त्रोटक का होईन सरकारी मसुदा अखेर तयार झाला आहे. मंत्रिमंडळाची मंजूरी, संसदेत मांडला जाणे, स्‍थायी समितीकडे अधिक चिकित्‍सेसाठी सोपविले जाणे इ. सोपस्‍कारांचा पुढचा टप्पा आता सुरु होईल, अशी आशा आहे. आशा म्‍हणण्‍याचे कारण त्‍याला आजवर होत आलेल्‍या विरोधात आहे. या कायद्याच्‍या किमान प्रस्‍तावित तरतुदी काय आहेत, हे बघण्‍याआधी त्‍याच्‍या निर्मितीप्रक्रियेतील हितसंबंधीयांतील संघर्षाचा थोडक्‍यात परिचय करुन घेणे राजकीयदृष्‍ट्या उद्बोधक ठरेल.

आर्थिक विकासाच्‍या गतीतून क्रयशक्‍ती असलेला वर्ग वाढत असला, तरी याच विकासप्रक्रियेतून जन्‍माला आलेल्‍या विषमतेने दोन वेळच्‍या अन्‍नाची भ्रांत मिटवू शकेल, अशी क्रयशक्‍ती अजूनही वाट्याला न आलेला एक मोठा समुदाय जगभर आहे. विकसनशील व अविकसित राष्‍ट्रांत त्‍याचे प्रमाण साहजिकच अधिक आहे. 2008 सालचे जागतिक अन्‍नअरिष्‍ट हे प्रगतीपथावरील मानवतेला लांच्‍छन होते. हैती, फिलिपाईन्‍स, बांगला देश इ. देशांत दंगली, सत्‍तांतरे झाली. शेतीच्‍या अनेक गंभीर प्रश्‍नांना भारत तोंड देत असला तरी हरितक्रांतीसारख्‍या धोरणांनी आयातीवरचे अवलंबित्‍व सं‍पविल्‍याने तसेच जागतिक अन्‍नव्‍यापारातील आपला सहभाग कमी असल्‍याने भारताला या अरिष्‍टाचा फारसा धोका पोहोचला नाही. तथापि, तो टळला आहे, असेही नाही. जागतिक संदर्भ असलेली अन्‍नसुरक्षेची समस्‍या कधी उग्र रुप धारण करील, याचा नेम नाही. जगभरचे तज्‍ज्ञ, नेते, युनो, अगदी जागतिक बँकेसारख्‍या आंतरराष्‍ट्रीय संघटनांचे प्रमुखही विकासप्रक्रियेतील प्राधान्‍यक्रमाबाबत शंका उपस्थित करत आहेत. जागतिक मध्‍यमवर्गाच्‍या इंधनाच्‍या तसेच मांस-दुग्‍धजन्‍य पदार्थांच्‍या वाढत्‍या उपभोगासाठी अन्‍नधान्‍याचा वापर (जैवइंधन व जनावरांचा आहार यासाठी धान्‍याचा वापर) होणे आणि अन्‍नधान्‍याच्‍या व्‍यापारातील सट्टेबाजारी यामुळे अन्‍नसुरक्षेचा धोका अधिक गडद होत आहे, यावर बहुतांश तज्‍ज्ञांची सहमती आहे. अनेक राष्‍ट्रे या समस्‍येचा मुकाबला करण्‍यासाठी आपापल्‍यापरीने उपाययोजना करत आहेत.

आर्थिक विकासस्‍तराच्‍या दृष्‍टीने आपल्‍याला जवळचा असलेल्‍या ब्राझीलने ‘अन्‍नसुरक्षा कायदा’ करुन आपल्‍या देशातील गोरगरीब, सामान्‍य जनतेचे भुकेपासून संरक्षण करण्‍यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. असा कायदा भारतातही व्‍हावा, अशी मागणी अनेक अभ्‍यासक, कार्यकर्ते करत होते. भारतातील हरितक्रांतीचे एक जनक कृषितज्‍ज्ञ डॉ. एम.एस. स्‍वामिनाथन यांनी तर कितीतरी वर्षे हा मुद्दा लावून धरला होता. एकीकडे गोदामांत धान्‍य ठेवायला जागा नाही व दुसरीकडे रेशनवर धान्‍य मिळत नाही, कुपोषण, उपासमारीचे प्रमाण लक्षणीय आहे या विरोधाभासावर बोट ठेवणारी एक याचिका 2001 साली पी.यू.सी.एल. या संस्‍थेने सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली. सर्वोच्‍च न्‍यायालयाने सरकारचे वाभाडे काढून जे अंतरिम आदेश दिले, त्‍यातून अन्‍नसुरक्षेशी संबंधित अनेक योजनांना (रेशन, अंगणवाडीतील, शाळेतील आहार, वृद्ध पेन्‍शन योजना, मातृत्‍व अनुदान इ.) कायदेशीर संरक्षण प्राप्‍त झाले. योजनांच्या अंमलबजावणीदरम्‍यानची प्रशासनाची अनास्‍था, भ्रष्‍टाचार, लोकांच्‍या तक्रारींबाबतची बेफिकीरी याला काही प्रमाणात आळा बसू लागला. यातून योजनांऐवजी ‘कायदा’ असणे अधिक लाभप्रद ठरेल हे अधोरेखित झाले व अन्‍नसुरक्षेच्‍या कायद्याच्‍या मागणीला अन्‍न अधिकाराच्‍या चळवळींमधून पाठिंबा वाढू लागला. वरील याचिकेवरील अं‍तरिम आदेशांच्‍या पार्श्‍वभूमीवर आकारास आलेल्‍या अनेक संघटना, आघाड्यांचा समावेश असलेल्‍या राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानातही या कायद्याची चर्चा जोर पकडू लागली.

कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्‍या पहिल्‍या खंडातील कारकीर्दीत माहितीचा अधिकार, राष्‍ट्रीय रोजगार हमी हे कायदे झाले होते. 2009 च्‍या निवडणुकांतील यशात या कायद्यांचा हातभार आहे, याची नोंद संपुआच्‍या नेतृत्‍वाने घेतली व आता चालू असलेल्‍या संपुआच्‍या दुस-या कारकीर्दीच्‍या प्रारंभी राष्‍ट्रपतींच्‍या अभिभाषणाद्वारे अन्‍नसुरक्षा कायद्याचे सूतोवाच केले. कायद्याचे सूतोवाच झाले, त्‍याच्‍या दुस-या दिवसापासून, असे कायद्याने बांधून घेणे कितपत योग्‍य ठरेल, वाढीव धान्‍याची उचल व त्‍यासाठीचे वाढीव अनुदान सरकारला पेलणारे आहे का, अशा शंका सरकारमधील प्रमुख मंडळींनीच उपस्थित करायला सुरुवात केली. शरद पवार हे त्‍यातील एक मुख्‍य घटक होते. सोनिया गांधींचा निग्रह लक्षात घेऊन पवारांच्‍या अन्‍न खात्‍याने अखेर एक मसुदा तयार केला. हा मसुदा अत्‍यंत अपुरा व असंवेदनशील होता. पुढे प्रणव मुखर्जींच्‍या नेतृत्‍वाखालील सक्षम मंत्रिगटाकडे अवलोकनार्थ हा मसुदा गेला. या मंत्रिगटानेही यात विशेष मौलिक बदल केला नाही. कायद्यामागील उद्देश सफल होण्‍याऐवजी, आज लोकांना मिळणारे लाभही मर्यादित होण्‍याची भिती निर्माण झाली होती.

याच दरम्‍यान, राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानाने अनेक चर्चांनंतर कायद्यासाठीचा एक समग्र मसुदा तयार करुन त्‍याचा पाठपुरावा सुरु केला होता. अन्‍नसुरक्षेच्‍या आदर्श व्‍याख्‍येप्रमाणे अन्‍नाचे उत्‍पादन, वितरण, क्रयशक्‍ती प्रदान करणारा रोजगार, जमीनसुधारणा, अन्‍न पचविण्‍यासाठी लागणारे आरोग्‍य इ. अनेक बाबींचा समावेश या मसुद्यात होता. त्‍याच्‍या या अतिव्‍याप्‍तीशी असहमती म्‍हणून तसेच या अभियानाची एकूण राजकीय ताकद नगण्‍य असल्‍याने सरकारकडून या मसुद्याची प्रारंभी अजिबात दखल घेण्‍यात आली नाही.

तथापि, याचवेळी एक महत्‍वाची घटना घडली. सोनिया गांधींच्‍या नेतृत्‍वाखाली राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीचे पुनर्घटन झाले. या समितीत राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानाच्‍या मसुदा प्रक्रियेत प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष सहभागी असलेले एन.सी. सक्‍सेना, हर्ष मंदर, जॉं ड्रेझ, अरुणा रॉय तसेच या कायद्याची मागणी करणारे खुद्द डॉ. स्‍वामिनाथन यांचा समावेश सोनिया गांधींनी केला. समितीच्‍या पुनर्घटनानंतर पहिले कार्य सोनिया गांधींनी केले ते म्‍हणजे, मंत्रिगटाने मंजूर केलेला अन्‍नसुरक्षा कायद्याचा मसुदा समितीत चर्चेसाठी मागवला. त्‍यावर खोलात चर्चा घडवली. त्‍यानंतर सहमतीच्‍या शिफारशी बाहेर आल्‍या. हितसंबंधांच्‍या नानाविध संघर्षातून निघणारे मसुदे हे तडजोडीचेच असतात. कोणा एका गटाची संपूर्ण सरशी होत नसते. अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याच्‍या शिफारशींबाबतही तेच आहे. अन्‍न अधिकाराचा कायदा समग्र असावा, असे वाटणारा एक गट, मुक्‍त आर्थिक विकासाला अडथळा न होता व अनुदान वाया न जाता गरिबांपर्यंत नेमकेपणाने योजना पोहोचाव्‍यात या भूमिकेचा दुसरा गट, तर आजच्‍या व्‍यवस्‍थेतील हितसंबंध जैसे थे राहावेत म्‍हणून कायदा होऊच नये, झालाच तर बोथट व्‍हावा, असे इच्छिणारा तिसरा गट असा हा संघर्ष राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या मैदानात खेळला गेला. हे सर्व गट अनेक छटांसहित आजच्‍या सत्‍ताधा-यांच्‍या अंतर्गतच आहेत. सर्वोच्‍च राजकीय मान्‍यता असलेल्‍या सोनिया गांधी आपले वजन कोठे टाकणार याला खूप महत्‍व होते. तथापि, त्‍यांना कितीही राजकीय व नैतिक मान्‍यता असली, तरी अखेर सत्‍तेच्‍या राजकारणात हितसंबंधांच्‍या संघर्षातूनच मार्ग काढावा लागतो. तोल साधावा लागतो.

इथेही तेच झाले. राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीचा सहमतीच्‍या शिफारशींचा मसुदा पंतप्रधानांना पाठवण्‍यात आला. तो त्‍यांनी त्‍यांचे आर्थिक सल्‍लागार रंगराजन यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीकडे चिकित्‍सेसाठी पाठवला. रंगराजन समितीने तो अंशतः स्‍वीकारला, बहुअंशी नाकारला. सल्‍लागार समितीने रंगराजन यांच्‍या टीकेवर चर्चा करुन आपले समर्थन दिले व विधेयकाचे मसुदा प्रारुप बनवले. हे प्रारुप पंतप्रधानांना पाठवण्‍यात आले. प्रणव मुखर्जींच्‍या अध्‍यक्षतेखालील मंत्रिगटाकडे अन्‍न मंत्रालयाने सुधारित मसुदा पाठवला. तो संमत करुन पुढील प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्‍यात आला आहे.

सल्‍लागार समितीच्‍या मसुद्याचे काय झाले ? अन्‍न मंत्रालयाचे म्‍हणणे सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यातील शिफारशींच्‍या सहाय्यानेच आम्‍ही आमचा मसुदा बनवला आहे. हे संपूर्ण खरे नाही. सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यातील काही भाग या सरकारी मसुद्यात स्‍वीकारला गेला आहे. अनेक तरतुदी काढून टाकण्‍यात आल्‍या आहेत अथवा पातळ करण्‍यात आल्‍या आहेत.

सल्‍लागार समितीच्‍या चर्चांतील सर्व मुद्द्यांचा तसेच या दोन मसुद्यांतील सर्व फरकांचा परामर्श घेणे, या लेखाच्‍या मर्यादेत शक्‍य नाही. (राईट टू फूड कँपेन ऑफ इंडिया तसेच नॅशनल अॅडव्‍हायजरी काऊन्सिल यांच्‍या वेबसाइेट्सवर हे मसुदे, बैठकांची इतिवृत्‍ते, लेख उपलब्‍ध आहेत. जिज्ञासूंनी ते जरुर वाचावेत.) उदाहरणादाखल काही ठळक बाबींची नोंद येथे करत आहे.

खुद्द सल्‍लागार समितीचा मसुदा विस्‍तृत व भरीव असला तरी, अन्‍न अधिकार अभियानाने अपेक्षिल्‍याप्रमाणे समग्र नाही. वर म्‍हटल्‍याप्रमाणे तो तडजोडीचाच आहे. त्‍यात आरोग्य, जमीन, शेतीसुधारणा इ. अनेक कळीच्‍या बाबींना मार्गदर्शक तत्‍त्‍वांत टाकले गेले आहे. कायद्याच्‍या मुख्‍य भागात त्‍यांचा समावेश नाही. रेशनला अधिक महत्‍व देण्‍यात आले आहे. तेही अभियानाने अपेक्षिल्‍याप्रमाणे संपूर्ण सार्वत्रिक नाही, तर सार्वत्रिकतेच्‍या जवळ आहे. म्‍हणूनच अभियानाकडून त्‍यावर टीका झाली. अभियानातील काही घटकांकडून तर जुनी व्‍यवस्‍थाच पुन्‍हा ‘नव्‍या बाटलीत जुनी दारु’ पद्धतीने कायम केली जात असल्‍याची टीका झाली. अर्थात, ही टीका एकांगी आहे. वस्‍तुस्थिती तशी नाही. सल्‍लागार समितीच्‍या तडजोडीच्‍या शिफारशी हे पुढचेच पाऊल आहे. या शिफारशींना कात्री लावणारा सरकारी मसुदाही आधीच्‍या तुलनेत थोडे अधिक नक्‍की देतो आहे. काही प्रमुख शिफारशी पाहिल्‍यावर हे लक्षात येते.

सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यानुसार देशातील किमान 75 टक्‍के लोकांना अनुदानित अन्नधान्‍याचा कायदेशीर अधिकार देऊ केला आहे. ग्रामीण भागातील 90 टक्‍के जनतेला तर शहरांतील 50 टक्‍के जनतेला हा लाभ मिळेल. लाभार्थींचे दोन गट करण्‍यात आले आहेत. अधिक गरजवंतांचा प्राधान्‍य गट व त्‍याच्‍या वरचा सर्वसाधारण गट. ग्रामीण भागातील कायद्याच्‍या क्षेत्रातील 90 टक्‍के जनतेपैकी प्राधान्‍य गटात 46 टक्‍के व सर्वसाधारण गटात 44 टक्‍के लोक मोडतील. शहरातील कायद्याच्‍या क्षेत्रातील 50 टक्‍के जनतेपैकी प्राधान्‍य गटात 28 टक्‍के व सर्वसाधारण गटात 22 टक्‍के लोक येतील. प्राधान्‍य गटाला (46 टक्‍के ग्रामीण व 28 टक्‍के शहरी विभाग) दरमहा 35 किलो धान्‍य (प्रति व्‍यक्‍ती 7 किलो या प्रमाणे) अनुदानित दराने म्‍हणजे 1 रु. भरड धान्‍य, 2 रु. गहू व 3 रु. तांदूळ असे मिळेल. सर्वसाधारण गटाला (44 टक्‍के ग्रामीण व 22 टक्‍के शहरी विभाग) दरमहा 20 किलो धान्‍य (4 किलो प्रति व्‍यक्‍ती प्रमाणे) भरड धान्‍य, गहू व तांदूळ यांच्‍या किमान आधारभूत किंमतीच्‍या 50 टक्‍क्यांपेक्षा कमी दराने मिळेल.

सरकारी मसुद्यात ग्रामीण भागातील 90 टक्‍क्‍यांऐवजी 75 टक्‍क्‍यांना कायद्याचा अधिकार देण्‍यात येईल तसेच सर्वसाधारण गटाला प्रति व्‍यक्‍ती 4 किलो ऐवजी 3 किलो व एकूण 20 किलो ऐवजी 15 किलो धान्‍य देण्‍यात येईल, असे म्‍हटले आहे. दुसरे म्‍हणजे, प्राधान्‍य गटाची टक्‍केवारी सल्‍लागार समितीच्‍या शिफारशींप्रमाणे निश्चित करण्‍यात आलेली नाही. देशातील गरिबीच्‍या प्रमाणाच्‍या मापनाच्‍या आधारे केंद्र सरकार हा आकडा जाहीर करेल, असे नमूद करण्‍यात आले आहे.

गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज ठरविण्‍यासाठी नेमलेल्‍या सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल सरकारने स्‍वीकारल्‍याने त्‍यातील अंदाज प्रमाण मानले जाण्‍याची शक्‍यता आहे. तेंडुलकर समितीच्‍या अहवालाप्रमाणे देशात एकूण गरीबी 37.2 टक्‍के (शहरः 25.7 व ग्रामीणः 41.8) आहे. महाराष्‍ट्रासाठी समितीने दिलेला अंदाज असा आहेः शहर- 25.6 व ग्रामीण- 47.9. प्राधान्‍य गटासाठी हेच आकडे गृहीत धरले तर ग्रामीण भागात सल्‍लागार समितीच्‍या 46 टक्‍क्‍यांऐवजी सरासरी 42 टक्‍के हा आकडा असेल. तथापि, राज्‍यागणिक अंदाज भिन्‍न असल्‍याने प्राधान्‍य गटांतील लोकांचे प्रमाणही सगळीकडे सारखे नसेल. महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण भागातील 48 टक्‍के लोक तर शहरातील 26 टक्‍के लोक प्राधान्‍य गटात मोडतील. संसदेत चर्चा होऊन यात सुधारणा व्‍हायची शक्‍यता आहे. समजा झाली नाही, तरी हे आकडे व मिळणारा लाभ आताच्‍या रेशनव्‍यवस्‍थेतील लाभापेक्षा निश्चित जास्‍त असेल.

तो कसा ते पाहू.

अंत्‍योदय, बीपीएल व एपीएल या परिभाषेऐवजी 'प्राधान्‍य गटातील कुटुंबे' 'सर्वसाधारण गटातील कुटुंबे' असे शब्‍दप्रयोग अस्तित्‍वात येणार आहेत. प्राधान्‍य गटाला अंत्‍योदयच्‍या दराने 35 किलो धान्‍य मिळणार तर सर्वसाधारण गटाला बीपीएलच्‍या आसपासच्‍या दराने 15 किलो धान्‍य मिळणार. आजचे अंत्‍योदय व बीपीएल एकत्रितपणे प्राधान्‍य गटात मोडण्‍याची शक्‍यता असल्‍याने बीपीएलवाले एकप्रकारे अंत्‍योदयवाले होणार आहेत. आजच्‍या एपीएलवाल्‍यांपैकी एक विभाग सर्वसाधारण गटात येणार आहे. आजच्‍या घडीला रेशनचे अंत्‍योदय व बीपीएल धरुन देशातील 6.5 कोटी कुटुंबांना लाभ मिळतो. नव्‍या कायद्याने ही संख्‍या 10 कोटींच्‍या आसपास जाणार आहे. आज एपीएलवाल्‍यांना महाराष्‍ट्रात 15 किलो धान्‍य सरकारने दरमहा जाहीर केले आहे. परंतु, ते अजिबात मिळत नाही, असा अनुभव आहे. त्‍यापैकी एका विभागाला 15 किलोचे कायदेशीर संरक्षण मिळेल. मुंबईत आज अंत्‍योदय व बीपीएल एकत्रित कुटुंबे 1 टक्‍क्‍यांच्‍या आत आहेत. पुण्‍यात 5 टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहेत. शहरी विभागांसाठीचे प्रमाण प्राधान्‍य गटासाठी 26 टक्‍के असल्‍याने मुंबई-पुण्‍यासारख्‍या शहरांत ही संख्‍या लक्षणीयरीत्‍या वाढण्‍याची शक्यता आहे. आजच्‍या एपीएलपैकी अनेक कुटुंबे प्राधान्‍य गटात येतील. महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण जनतेला मात्र अधिक लाभ मिळण्‍याची शक्‍यता आहे. महाराष्‍ट्रात अंत्‍योदय व बीपीएल मिळून 31 टक्‍क्‍यांच्‍या आसपास कुटुंबे सध्‍या आहेत. नव्‍या कायद्याप्रमाणे प्राधान्‍य गटाचे ग्रामीण भागासाठीचे प्रमाण 48 टक्‍के असल्‍याने महाराष्ट्रातील आजची सर्व अंत्‍योदय व बीपीएल कुटुंबे प्राधान्‍य गटात येतील.

सल्‍लागार समितीच्‍या मसुदद्यात प्राधान्‍य गटातील कुटुंबांसाठीच्‍या दरांत 10 वर्षे बदल करता येणार नाही, असे म्‍हटले आहे. तर सरकारी मसुद्यात या मुदतीचे बंधन नाही. केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे दरांमध्‍ये तसेच लाभांच्‍या प्रमाणात सुधारणा करु शकते, असे त्‍यात म्‍हटले आहे. आपत्तिग्रस्‍त विभागातील सर्वसाधारण गटातील कुटुंबांना प्राधान्‍य गटाप्रमाणे किमान 1 वर्ष लाभ मिळावा, असे सल्‍लागार समितीचे म्‍हणणे आहे, तर सरकारी मसुद्यात ही तरतुदच नाही. उपासमारीने ग्रस्‍त प्राधान्‍य गटातील कुटुंबांना 6 महिने दुप्‍पट लाभ द्यावा, अशा कुटुंबांचा सरकारने स्‍वतःहून शोध घ्‍यावा, असे सल्‍लागार समितीचा मसुदा म्‍हणतो, तर सरकारी मसुद्यात अशा कुटुंबांना दोन वेळा मोफत जेवण दिले जाईल, असे म्‍हटले आहे.

रेशनच्‍या व्‍यतिरिक्‍त अन्‍य अनेक योजनांचा समावेश दोन्‍ही मसुद्यांत आहे. तथापि, सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यातील भरीवपणा सरकारी मसुद्यात नाही. मातृत्‍व अनुदान योजनेद्वारे गर्भवती स्‍त्रीला एकूण 6 महिने दरमहा 1000 रु. दिले जावेत, अशी तरतूद सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यात आहे. सरकारी मसुदा याबाबतीत मौन आहे. कुपोषित मुलांना योग्‍य असा उपचारात्‍मक आहार मोफत दिला जाईल तसेच पौष्टिकता पुनर्वसन केंद्राद्वारे त्‍यांची खास काळजी घेतली जाईल, असे सल्‍लागार समितीचा मसुदा म्‍हणतो. सरकारी मसुद्यात याचा काहीच उल्‍लेख नाही. या कायद्याच्‍या देखरेखीसाठी राष्‍ट्रीय अन्‍न आयोग असेल, त्‍याची नियुक्‍ती सार्वजनिक नामांकन पद्धतीने करण्‍यात येईल. त्‍यास संबंधित प्रशासकीय अधिका-यांवर देखरेख करण्‍याचा, त्‍यांची चौकशी व दंड करण्‍याचा अधिकार असेल. त्‍यास दिवाणी न्‍यायालयाचे अधिकार असतील, असे सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यात म्‍हटले आहे. सरकारी मसुद्यात या आयोगाच्‍या नियुक्‍तीचा अधिकार सरकारकडेच ठेवण्‍यात आला असून त्‍याला दंड करण्‍याचा अथवा न्यायालयीन चौकशीचा अधिकार नाकारण्‍यात आला आहे.

परिचयासाठी म्‍हणून एवढे मुद्दे पुरे झाले. तथापि, पुढची एक घडामोड नोंदविणे आवश्‍यक आहे. रंगराजन समितीने सल्‍लागार समितीच्‍या मसुद्यावर टीका करताना त्‍यातील तरतुदींच्‍या अंमलबजावणीसाठी लागणारे धान्‍य एकूण उत्‍पादित धान्‍याच्‍या 30 टक्‍के इतके असेल व तेवढे सरकारने उचलले तर अनुदानाचा बोझा वाढेलच शिवाय बाजारातील धान्‍याचे भाव वाढतील, असे म्‍हटले होते. यासाठी प्रत्‍यक्ष धान्‍य देण्‍याऐवजी लाभार्थ्‍यांना रोख रक्‍कम देण्‍याचा प्रयोग टप्‍प्‍याटप्‍प्‍याने करावा, त्‍यासाठी आधी प्रायोगिक प्रकल्‍प करावा, अशी सूचना केली होती. आता सरकारने नंदन नीलकेणींच्‍या नेतृत्‍वाखाली एक टास्‍क फोर्स नेमून या प्रयोगाची आखणी सूचविण्‍याची जबाबदारी त्‍यावर सोपविली आहे.

धान्‍याऐवजी रोख रक्‍कम या मुद्द्याला अन्‍न अधिकार अभियानात तीव्र विरोध आहे. तथापि, या प्रयोगाला आपण खुले असले पाहिजे, असे मला वाटते. आजही 1 . अनुदान पोहोचवायला 4 रु. खर्च होतो. अर्थात, 1 रुपयातलाही बराचसा हिस्‍सा भ्रष्‍टाचार गिळून टाकतो. गोदाम ते दुकान या प्रवासात होणा-या 40 टक्‍के धान्‍याची गळती, दुकानदाराची भेसळ व भ्रष्‍टाचार आदिंच्‍या बाबतीत संगणकीय तंत्रज्ञानाच्‍या आधारे निय‍मन करण्‍याचा प्रस्‍ताव कायद्याच्‍या मसुद्यात आहे. तथापि, या नियमनाला मर्यादाच असणार आहेत. धान्‍याच्‍या वाहतुकीची व वितरणाची आजची कमजोर यंत्रणा कायदा केला की लगेच सुधारणार आहे, ही अपेक्षा अवास्‍तव आहे. आज त्‍यामुळेच 640 लाख टन धान्‍य गोदामात साठले आहे. 2000 सालची स्थिती पुन्‍हा तयार झाली आहे. या धान्‍याची विल्‍हेवाट हा नेहमीप्रमाणे आतबट्ट्याचा व्‍यवहार ठरणार आहे. यासाठी रोख रकमेच्‍या हस्‍तांतराच्‍या ब्राझीलमध्‍ये झालेल्‍या प्रयोगांचा आपणही आपल्‍यापद्धतीने विचार करणे आवश्‍यक आहे.

या सगळ्याचा विचार करता, जराही आपल्‍या मनासारखे (अथवा राजकीय लाईनप्रमाणे) झाले नाही की दूषणे देण्‍याऐवजी, मनासारखे घडविण्‍याचा पुरेपूर लोकशाही प्रयत्‍न, जे होईल त्‍यातील पुढे जाणा-या भागाची जोपासना, अंमलबजावणी करणे व त्‍याआधारे जनाधार तयार करणे व या जनाधाराच्‍या सहाय्याने पुढे व्‍हावेसे वाटणा-या गोष्‍टींसाठी संघर्षरत राहणे असाच चळवळीचा डावपेच राहायला हवा.

कायदा व्‍हायला अजून बरेच टप्‍पे पार करावे लागणार आहेत. अशावेळी या कायद्याच्‍या मसुद्यावर जागोजाग चर्चा, मेळावे, परिषदा संघटित करुन सुधारणा सुचविणे आवश्‍यक आहे. केवळ संसदेत चर्चा न होता लोकांमध्‍ये, प्रसारमाध्‍यमांत चर्चा व्‍हायला हव्‍या. त्‍याचा दबाव संसदेतील चर्चांवर पडला पाहिजे. राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीतील चर्चांच्‍या दरम्‍यान राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानाचा अपवाद करता कोठेही देशात जनसंघटनांनी या प्रश्‍नावर व्‍यापक चर्चा, हालचाली केल्‍या असे झाले नाही. किमान आतातरी अशा हालचाली होणे आवश्‍यक आहे. धोरणकर्त्‍यांतील सत्‍प्रवृत्‍तांवर विसंबणे योग्‍य नाही. लोकशाहीत अंतिम सत्‍ताधारी जनता असते. संसदीय प्रणालीला बाधा न आणता तिची आकांक्षा तिच्‍या संघटित हालचालीने कायद्यात प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे.

- सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com