Monday, February 17, 2014

फँड्री...विषम समाजव्यवस्थेच्या विरोधातला सणसणीत एल्गार

फेसबुकवरच्या मित्रांच्या जोरदार शिफारशी वाचून फँन्ड्री पाहिला. त्यांना तसेच या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करणाऱ्या नागराज मंजुळेंना मनोमन धन्यवाद. हा नितांत सुंदर चित्रपट अजूनही न पाहिलेल्या सर्वांनी पहावा, असेच आवाहन मीही आता करु लागलो आहे.

स्थळ-काळाचे तपशील वेगळे असले तरी 'जब्या'चे भावविश्व हेच आमचेही भावविश्व होते. किशोरवयातील त्याच्या मनात उमललेले हळुवार अंकुर, त्यांची मुग्ध कोवळिकता व नाजूक संवेदनांनी मनाचे आभाळ झंकारणे ही भावस्थिती आमचीही होती. तथाकथित खालची जात अन् या जातीला सावलीइतके अपरिहार्य बनून आलेले दारिद्र्य, वंचना यामुळे 'शालू' हे आम्हालाही अप्राप्य असे गुलबकावलीचे फूल होते. सामाजिक-आर्थिक विषमतेच्या या दाहक वास्तवाने आमच्या भावजीवनाच्या झालेल्या चिंधड्या आ़जही ठसठसत असतात. फॅंन्ड्रीने तर त्यांवरची खपलीच ओरबाडून काढली.

याच किशोरवयात 'प्यासा' पाहिला. एकदाच नाही. अनेकदा. गुरुदत्त दुरावलेल्या माला सिन्हाला म्हणतो, “मुझे तुमसे शिकायत नहीं. मुझे शिकायत है समाज के इस ढाँचे से.” भोवताली घोंगावणाऱ्या फुले-आंबेडकरी, डाव्या-समाजवादी चळवळींमुळे हेच विचारसूत्र आम्हाला मिळाले. माझे दारिद्र्य, माझी जात व त्यामुळे येणारी प्रेमातली विफलता यास मी किंवा ती जबाबदार नाही, तर जबाबदार आहे ही 'समाजव्यवस्था'. ...आणि म्हणूनच पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला ही वंचना, ही विफलता येऊ द्यायची नसेल, तर समाजाचा हा 'ढाँचा' बदलला पाहिजे, हे आपसूकच जीवनाचे ध्येय झाले.

समाज खूप बदलला आहे, बदलतो आहे, हे खरे. तथापि, सामाजिक परिवर्तन हे राजकीय परिवर्तनासारखे वेगाने होत नाही. ते धिमे असते. सामाजिक बदलाचा संघर्ष चिवट असतो. अनेक पिढ्यांचा हा प्रवास असतो. हे लक्षात घेऊन या लढ्यातील चिकाटी व सातत्य टिकवावे लागेल.

सिनेमाच्या अखेरीस जब्याने त्वेषाने फेकलेल्या दगडाने आपले तोंड सणसणीत फुटणार या जाणिवेने आपण दचकतो. जब्याचा हा दगड हा या विषम समाजव्यवस्थेवरच्या तीव्र संतापातून फेकलेला व तिला उध्वस्त करु पाहणारा एल्गार आहे. नव्या पिढीला जब्याचा हा एल्गार प्रेरित करेल, ही अपेक्षा.

- सुरेश सावंत