राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांची २५ मे २०२५ रोजी ‘ऑर्गनायझर’ या संघविचारांचा प्रसार करणाऱ्या इंग्रजी नियतकालिकात एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात एक प्रश्न होता – ‘पुढील २५ वर्षांसाठी काय संकल्प आहे?’ त्याला उत्तर देताना भागवत म्हणतात, ‘संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करुन देशाला परमवैभव संपन्न करणे हा उद्देश आहे. पण त्यापलीकडे आणखी एक गोष्ट आहे की, संपूर्ण विश्वालाही असेच बनवायचे आहे. डॉ. हेडगेवारांच्या काळापासून ही दृष्टी आहे. त्यांनी १९२० मध्ये प्रस्ताव मांडला होता की, 'भारताचे पूर्ण स्वातंत्र्य हे आपले ध्येय आहे आणि स्वतंत्र भारताने जगातील देशांना भांडवलशाहीच्या मगरमिठीतून मुक्त करावे' असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने म्हणावे.”’
पुढील २५ वर्षे म्हणजे २०५० साली भारतीय संविधानाला १०० वर्षे होतील तोवरचा हा संकल्प स्पृहणीयच मानला पाहिजे. केवळ हिंदू संघटन का, सबंध भारतीयांचे संघटन का नाही, अशी शंका मनाला चाटून गेली तरी एकूण देशाला परमवैभव संपन्न करणे आणि विश्वालाही तसेच बनवणे; एवढेच नव्हे तर हेडगेवारांच्या दृष्टीनुसार भांडवलशाहीच्या मगरमिठीतून जगातील देशांना मुक्त करणे हा निश्चित उन्नत संकल्प आहे. केवळ या शब्दांवर विश्वास ठेवणाऱ्यांना संघाचा या संकल्पाच्या पूर्ततेचा पुढील कार्यक्रमही तेवढाच उदात्त असेल असे वाटू शकते.
पण तिथेच फसगत होते. संघाची मंडळी आता काय बोलतात यावर जाऊन चालणार नाही. त्यांचे पूर्वसुरी काय म्हणत होते, करत काय होते, आजचे संघाचे आणि त्याच्या परिवारातले लोक काय करतात हे पाहणे नितांत गरजेचे आहे. तरच संघाची आगामी २५ वर्षांतली खरी विषयपत्रिका आपल्याला कळू शकते.
वरील विधानातील ‘हिंदू संघटन’ हे ‘हिंदू राष्ट्रासाठी’ आहे. केशव बळीराम हेडगेवारांचा १९२० सालातला प्रस्ताव संघ संस्थापक म्हणून त्यांनी मांडलेला नव्हता. कारण संघ स्थापन झाला १९२५ साली. १९२० साली हेडगेवार काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्या नात्याने त्यांनी मांडलेला तो प्रस्ताव होता. भांडवलशाही संपवण्याबद्दल इतकी स्वच्छ भूमिका संघाने कधीही घेतलेली नाही. तरुणपणी काही काळ काँग्रेसमध्ये घालवल्यावर हेडगेवारांचा भ्रमनिरास झाला व एकात्म हिंदू राष्ट्राच्या ध्येयासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. यानंतर ब्रिटिशांशी अजिबात वाकड्यात न जाता, उलट त्यांची स्तुती करत आपले ध्येय साधण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला. ७ ऑक्टोबर १९३५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दशकपूर्ती कार्यक्रमात हेडगेवारांनी भारतातील ब्रिटिश सत्तेला ‘ईश्वरी कृपा’ व ‘ब्रिटिश शासनाने आम्हाला संघटना बांधणीचा धडा शिकवला’ असे म्हटल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने नोंदवले आहे.
संघाची वैचारिक व संघटनात्मक बांधणी भक्कम व विस्तृत करणारे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर. संघाला आजही परमपूज्य असणाऱ्या गोळवलकरांनी त्यांच्या १९३९ च्या ‘We or Our Nationhood Defined’ या पुस्तकात म्हटले आहे – 'हिंदुस्थानातील परकीय वंशांनी हिंदू संस्कृती व भाषा स्वीकारली पाहिजे. त्यांनी हिंदू धर्माचा आदर करावा व त्याला पूज्यभावाने मान द्यावा, हिंदू समाज व संस्कृती—म्हणजेच हिंदू राष्ट्र—यांच्या गौरवाशिवाय इतर कोणतीही कल्पना मनात आणू नये आणि आपले वेगळे अस्तित्व सोडून हिंदू समाजात विलीन व्हावे. अन्यथा, जर त्यांना या देशात राहायचे असेल, तर हिंदू राष्ट्राच्या पूर्ण अधीन राहून, काहीही हक्क न मागता, कोणत्याही विशेष सुविधांवर दावा न करता, अगदी नागरिकत्वाच्या अधिकारालाही मुकून राहावे. त्यांच्यासमोर याशिवाय दुसरा मार्ग नसावा, असू नये.'
भारताचे स्वातंत्र्य रक्तरंजित फाळणीसोबत आले. गांधीजींच्या उपोषणाने हिंदू-मुस्लिम दंगलींना उतार पडला आणि मुस्लिमांवरील रोषाच्या लाटेवर आरुढ होऊन सत्ता हस्तगत करण्याचा हिंदुत्ववाद्यांचा डाव फसला. स्वातंत्र्यानंतर हा देश केवळ हिंदूंचा नव्हे, तर या देशातल्या सर्वांचा राहील ही निःसंदिग्ध भूमिका स्वतःला सनातनी हिंदू म्हणवणाऱ्या गांधीजींनी घेतली. हे मंजूर नसणाऱ्या शक्तींनी गांधीजींची हत्या केली. भारताचे सर्वसमावेशक, वैविध्यतेला कवेत घेणारे स्वरुप तसेच राहणार यावर संविधान सभेनेही शिक्कामोर्तब केले. गोळवलकरांना अशा स्वरुपाचे संघराज्य मंजूर नव्हते. १९५६ साली भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भातील लेखात एककेंद्री रचनेचा पुरस्कार करताना ते लिहितात – ‘एक देश, एक शासन, एक विधिमंडळ, एक कार्यपालिका घोषित करायला हवी. संविधानाची फेरतपासणी आणि पुनर्लेखन व्हायला हवे.’
विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत गोळवलकरांच्या या भूमिकांशी ‘असहमत’ आहोत असे थेट न म्हणता आम्ही 'युगानुकूल परिवर्तन' केले आहे, असा वळसा घेतात. ‘हिंदुत्व’ म्हणजेच ‘भारतीयत्व’, ‘इस्लामशिवाय देशाची कल्पना हा हिंदू विचार नाही’ असे मांडत असतात. जर हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व असेल तर तेच सरळ म्हणावे. अन्य धर्मांचे लोक हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व ही व्याख्या कशी कबूल करणार? संविधानात भारताचे राष्ट्रीयत्व हे भारतीयत्वच आहे; ते हिंदुत्व कसे काय तुम्ही म्हणू शकता? त्यासाठी गोळवलकरांनी अपेक्षिल्याप्रमाणे संविधान बदलावे लागेल.
संघाचे राजकीय साधन असलेल्या भाजपची देशात सत्ता आहे. ही संधी घेत व्यापक भारतीयत्वाचा मुखवटा घालून हिंदू राष्ट्राच्या अधिकृत स्थापनेच्या दिशेने चाल करण्याची ही चलाखी आहे. एकीकडे मुस्लिमांना आपले म्हणायचे आणि दुसरीकडे संघाची सर्वोच्च निर्णय समिती असलेल्या प्रतिनिधी सभेची एक घटक विश्व हिंदू परिषद बिल्किस बानोच्या अत्याचाऱ्यांचा जाहीर सत्कार करते. संघ काहीच बोलत नाही. या विश्व हिंदू परिषदेची युवा शाखा असलेले बजरंग दल गोरक्षण आणि लव्ह जिहादच्या मिषाने दलित-मुस्लिमांचे झुंडबळी घेते. तरीही संघ चूप. मुस्लिमांना वगळणारी दुरुस्ती नागरिकता कायद्यात होते. संघ अवाक्षर काढत नाही.
भागवतांचे शब्दांचे फुलोरे काहीही असले तरी येत्या २५ वर्षांत गोळवलकरांनी घालून दिलेले उद्दिष्ट व कार्यक्रमच संघ चालू ठेवणार आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
___________
नवशक्ती, रविवार, १५ फेब्रुवारी २०२६
