Wednesday, October 27, 2010

पुरुषसत्ताकता जातीची रक्षक (?)

एका परिसंवादाची तयारी करत होतो. विषय होता- जात ही श्रमाची नसून श्रमिकांची विभागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या जातिनिर्मूलन (Annihilation of cast)’ या 1935 सालच्‍या पुस्‍तिकेतील हे गाजलेले विधान आहे. म्‍हणून मूळ पुस्तिकाच वाचत होतो. वाचता वाचता हबकणे, आपले तसे चुकलेच, आपण तसा बराचसा योग्‍य विचार करत आलोत, बाबासाहेब किती प्रचंड धैर्याचे होते याचा अभिमान...अशा भावना मनात उमटत गेल्‍या.

बाबासाहेबांचे धैर्य किती अफाट होते, याची कल्‍पना आता येणे खरोखर कठीण आहे. लाहोरच्‍या जातपात तोडक मंडळाने बाबासाहेबांना व्‍याख्‍यानासाठी निमंत्रित केले होते. त्‍या व्‍याख्‍यानाची लिखित प्रत आयो‍जकांना खूपच जहाल वाटली. काही उल्‍लेख बदलण्‍याची त्‍यांनी बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेबांनी ती मान्‍य केली नाही. परिणामी व्‍याख्‍यान रद्द झाले. हे व्‍याख्‍यान पुस्‍तकरुपाने अनेक भाषांत नंतर प्रसिद्ध झाले. अनेकांनी टीकेची झोड उठवली. महात्‍मा गांधींनीही यंग इंडियामधून त्‍यावर टीका केली. त्‍यास मात्र बाबासाहेबांनी प्रत्‍युत्‍तर दिले. महात्‍मा गांधींचा विलक्षण दबदबा असलेला, दलितांची कोणत्‍याही प्रकारे राजकीय ताकद तयार झालेली नसल्‍याचा तो काळ. अशा काळात बाबासाहेबांनी एकट्याने दिलेली ही तत्‍त्‍वकठोर झुंज अफाट धैर्यवान माणूसच देऊ शकतो.

बाबासाहेबांच्‍या धैर्याची खास नोंद करण्‍याचे कारण असे की, जातिनिर्मूलन या पुस्तिकेत दलितांचे हित वगैरे मर्यादित विवेचन नाही. खरे म्‍हणजे, बाबासाहेबांच्‍या कोणत्‍याच लिखाणात तसे नाही. त्‍यांना अखिल हिंदू समाज, अखिल भारतीय समाज जातींच्‍या दलदलीतून बाहेर पडावा, त्‍यात खरीखुरी समता नांदावी, त्‍याच्‍या जीवनाच्‍या सर्वांगांत लोकशाही रुजावी ही आस होती. मानवमुक्‍तीच्‍या अंतिम ध्‍येयाचे ते प्रवासी होते.

ही पुस्तिका वाचताना माझ्या मनात ज्‍या भावना उमटत होत्‍या त्‍याचे कारण, 1935 नंतर आता 75 वर्षे झाली तरी, त्‍यातील बहुतेक संदर्भ ताजे वाटत होते. जाती अजूनही घट्ट आहेत. याचा अर्थ, बाबासाहेबांची उपाययोजना गैरलागू झाली आहे, असा नव्‍हे. तर त्‍या अंमलात आणायचे काही प्रमाणात अवधान, ब-याच प्रमाणात धैर्य दाखवले गेले नाही. याहून वाईट म्‍हणजे, प्रस्‍थापित विभागाने बाबासाहेबांना देव करुन, फ्रेमध्‍ये बंदिस्‍त करुन, त्‍यांचे विचार महान होते, असे म्‍हणत आपल्‍या संकुचित हितसंबंधांच्‍या रक्षणाचे त्‍यांना पहारेकरी केले.

माझ्यासारखी बहुतकरुन कार्य करण्‍यातच रत राहणारी कार्यकर्ते मंडळी असे कोणी परिसंवादाला, भाषणाला बोलावले की मुद्दे शोधण्‍यासाठी वाचन करु लागतात. हे काहीसे परीक्षा आली की अभ्‍यास करण्‍यासारखे आहे. वाचन महत्‍वाचे आहे, हे पटत असतानाही तो आपल्‍यातील कार्यकर्त्‍याच्‍या कार्याचा अनन्‍य भाग मात्र बनत नाही. आणि मग असे काही अचानक वाचले की दचकायला, हबकायला होते. हितसंबंधीयांबरोबरच आपण निरागसपणे दुर्लक्ष करणारेही दोषी आहोत, हे जाणवून त्रास व्‍हायला लागतो.

हा त्रास जातिनिर्मूलन पुस्तिकेतील अनेक मुद्द्यांबाबत आहे. पण तो एक स्‍वतंत्र आणि दीर्घ विवेचनाचा विषय होईल. इथे त्‍यातील 3-4 मुद्द्यांचाच संदर्भ घेत आहे. तोही मी माझ्या वैयक्तिक व माझ्या समाजाच्‍या-बौद्ध समाजाच्‍या-जीवनाबद्दल प्रामुख्‍याने घेत आहे.

सामाजिक परिवर्तनाच्‍या लढ्यातील आघाडीची तुकडी असा बौद्ध समाजाचा लौकिक आहे. स्‍वाभाविकच बदलाची सुरुवात त्‍याने स्‍वतःपासून करणे अपेक्षित आहे. बुद्ध धम्‍मप्रवेशाने महार हे लांछन घालवून वैज्ञानिकता व नैतिकता यांचा नवा मूलाधार त्‍याने स्‍वीकारला. गावगाड्याची पारंपरिक कामे सोडून दिली. शिक्षण हे प्रगतीचे महत्‍तम साधन मानून त्‍यात लक्षणीय प्रगती केली. परिवर्तनाच्‍या विविध सामाजिक-राजकीय चळवळींचा पाठीराखा राहिला. अशा जमेच्‍या बाजू त्‍याच्‍याकडे अनेक आहेत. तरीही अजून खूप महत्‍वाच्‍या गोष्‍टी त्‍याच्‍याकडून होणे अपेक्षित होते, आहे. पण त्‍या झालेल्‍या नाहीत.

बाबासाहेबांनी जातिनिर्मूलन या पुस्तिकेत जातीची काही खास वैशिष्‍ट्ये सांगितली आहेत. त्‍यातील एक आहे- जातीला जातीतीलच नेता लागतो. आजच्‍या बौद्धांच्‍या जेवढ्या संघटना आहेत, रिपब्लिकन पक्षाचे जेवढे गट आहेत, त्‍या सगळ्यांचे नेते बौद्धच आहेत. बौद्धेतर दलितही त्‍यांना चालत नाही. (अपवाद कांशिराम-मायावती. पण त्‍यांनी बाबासाहेबांनाच आपले आराध्‍य मानले असल्‍याने व पुढे केंद्रात पंतप्रधान झाल्‍यानंतर मायावती बौद्ध धर्म स्‍वीकारणार (?) असल्‍याने.)

सहानुभूती, कौतुक, सहाय्य, प्रोत्‍साहन हे आपल्‍या जातीतल्‍या सदस्‍यांपुरतेच असते असेही एक जातीचे वैशिष्‍ट्य बाबासाहेब सांगतात. आंबेडकर जयंतीला होणा-या बक्षीस वितरण समारंभांमधील मुले ही मुख्‍यतः बौद्धच असतात. आपल्‍या मुलांचे आपणच कौतुक नाही करायचे तर कोणी करायचे?’ असे आयोजक बाणेदारपणे त्‍याचे समर्थनही करत असतात. आपली मुले ही व्‍याख्‍या बौद्धांपुरतीच मर्यादित असते. आजवरच्‍या वंचनेचा इतिहास पाहता आपली मुले वंचित राहता कामा नयेत, याची दक्षता घेणे बरोबरच आहे. पण मर्यादा फक्‍त आपल्‍या मुलांपुरतीच का? ‘सब्‍बे सत्‍ता सुखि होन्‍तु (सर्व जगातील प्राणिमात्र सुखी होवोत) किंवा बहुजन हिताय-बहुजन सुखाय या बौद्ध वचनांचे मग काय करायचे? इतर जातींच्‍या मेळाव्‍यात हेच होत असते. त्‍यावर बाबासाहेबांचा आक्षेप आहे. हा आक्षेप आजच्‍या आंबेडकरअनुयायी बौद्धांना लागू होत नाही का?

जातीच्‍या खास चालीरीती असतात असे बाबासाहेब जातीचे वैशिष्‍ट्य नोंदवतात. महारपणातून मुक्‍त होऊन उज्‍ज्‍वल अशी बौद्ध संज्ञा, विचारप्रणाली, जीवनप्रणाली मिळाली. जुन्‍या चालीरीती, संस्‍कार, विधींच्‍या जागी नवे संस्‍कार, विधी प्रस्‍थापित करणे आवश्‍यक होते. त्‍याप्रमाणे ते झालेही. पण आज त्‍यांचेही कर्मकांड होऊ लागले आहे. काही काळ भगवे चिवर नेसून भिक्‍खूवेशात भिक्‍खूंच्‍या सहवासात राहून धम्‍मचिंतन, अभ्‍यास करणे ही बौद्ध परंपरा. असे करणा-यांना श्रामणेर म्‍हणतात. हल्‍ली दीक्षाभूमीवर धम्‍मचक्रप्रवर्तन दिनी हजारोंच्‍या संख्‍येने भगवी वस्‍त्रे परिधान करुन बौद्ध मंडळी सामुदायिक मुंडण करुन घेत असतात. तिरुपतीच्‍या धर्तीवर होणा-या या सामुदायिक मुंडणाला श्रामणेर दीक्षा असे म्‍हणतात. हे कर्मकांड नव्‍हे काय? बाबासाहेबांनी आपल्‍या ऐतिहासिक दीक्षासमारंभात पूर्वसुरींशी नाते सांगत महास्‍थवीर चंद्रमणींच्‍या हस्‍ते स्‍वतः दीक्षा घेतली. पण समोरच्‍या लाखोंच्‍या जनसमुदायाला त्‍यांनी स्‍वतः दीक्षा दिली. याचे कारण मला भिक्‍खूच्‍या रुपात नवा पुरोहितवर्ग उभा करायचा नाही अशी त्‍यांची भूमिका होती. धम्‍माचा अभ्‍यास, चिंतन व प्रचार-प्रसार करणे हे मुख्‍य काम असणा-या भिक्‍खूंना नामकरण-विवाह ते पुण्‍यानुमोदन या सर्व विधींना बोलावणे आता प्रतिष्‍ठेचे झाले आहे.

...याचा अर्थ, जातिनिर्मूलनासाठी जात त्‍यागणे, त्‍या जातीला आधार देणारी धर्मव्‍यवस्‍था नाकारणे हे बौद्धांनी केले. पण तेच बौद्ध एका नव्‍या बौद्ध या जातीची निर्मिती तर करत नाहीत ना?

आपला अंतिम काळ जवळ येत चालला आहे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. आजाराने शरीर थकत चालले असतानाही बुद्ध आणि त्‍याचा धम्‍म हा ग्रंथ त्‍यांनी समाजाला, जगाला दिला. समकालीन बौद्ध जगतातील अनेक धारणांना छेद देऊन त्‍यांच्‍यादृष्‍टीने मूळ बुद्धविचार त्‍यांनी ग्रथित केला. 14 ऑक्‍टोबरला बौद्ध धम्‍माची दीक्षा दिल्‍यानंतर पुढच्‍या दीड महिन्‍यातच 6 डिसेंबरला त्‍यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धम्‍म ही जीवनप्रणाली म्‍हणून लोकांनी स्‍वीकारावी, असे त्‍यांना अभिप्रेत होते. नैतिकता, विज्ञाननिष्‍ठा व लोकशाही यांचे संस्‍कार रुजवणारी ही जीवनप्रणाली देशाच्‍या व मानवाच्‍या प्रगतीसाठी आवश्‍यक आहे, अशी त्‍यांची धारणा होती. केवळ एक नवा धर्म किंवा संप्रदाय म्‍हणून तो पुढे यावा, असे अर्थातच त्‍यांना नको होते.

बाबासाहेब नोंदवत असलेले आणखी एक महत्‍वाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे जातींची उतरंड असते. याचा अर्थ, प्रत्‍येक जातीच्‍या खाली कोणती तरी जात असते. पूर्वाश्रमीच्‍या अस्‍पृश्‍य जातींतही ही उतरंड होती. ती आजही आहे. महार चांभाराच्‍या खाली व मांगाच्‍या वर. आजही बौद्ध झालेल्‍या महारांशी आंतरजातीय लग्‍न करायला चांभार समाजाची तयारी नसते. तीच गत बौद्धांनी मांगाच्‍या घरी सोयरिक करण्‍याबाबत आहे. सोयरिक याचा अर्थ, रीतसर मागणी वगैरे नाही. ते तर कोणत्‍याच दोन जातींत होत नाही. मुलामुलींनी परस्‍पर लग्‍न करायचे ठरवल्‍यानंतरच्‍या या गोष्‍टी आहेत.

बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी म्‍हणून बौद्धांनी आंतरजातीय विवाहांचा स्‍वाभाविकरित्‍याच पुरस्‍कार केला पाहिजे. कारण जातिनिर्मूलनाचा एक महत्‍वाचा उपाय म्‍हणून आंतरजातीय विवाहांचा बाबासाहेबांनी जातिनिर्मूलन या पुस्तिकेत पाऊणशे वर्षांपूर्वी पुरस्‍कार केला आहे. पण तसे होत नाही. जाणीवपूर्वक आपसातच स्‍थळे (अर्थात समान आर्थिक स्‍तरात) पाहिली जातात. मुलांनी परस्‍पर ठरवलेल्‍या आंतरजातीय लग्‍नांच्‍या संदर्भात मुलगी दुस-या जातीची चालते. अर्थात, तीही शक्‍यतो वरच्‍या जातीतली. पण आपल्‍या समाजातली मुलगी दुस-या जातीत जाऊ नये, यासाठी खास प्रयत्‍न केले जातात. याचे कारण मोठे तात्त्विक आहे. माझ्या नात्‍यातल्‍या एका मुलीने (ती बौद्ध) सवर्ण मुलाशी लग्‍न ठरवले. भावकीने विरोध केला. भावकीचे म्हणणे असेः आपले एक माणूस बाबासाहेबांनी ज्‍या हिंदू धर्माचा त्‍याग केला त्‍या हिंदूधर्मात जाणार. सारा भारत बौद्धमय करण्‍याचे बाबासाहेबांचे स्‍वप्‍न त्‍यामुळे लांबणीवर पडते.

कोकणातल्‍या भावक्‍या कर्मठपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्‍यांना एकवेळ समजून घेऊ. पण बौद्धांमध्‍ये सर्वाधिक वाचल्‍या जाणा-या, बौद्धांनी बौद्धांसाठी चालवलेल्‍या बौद्धांच्‍या एका वर्तमानपत्राच्‍या अग्रलेखातील ही विधाने पहाः आंतरजातीय विवाहाने जरी जातीयता कमी होत असली, तरी स्‍वजातीच्‍या मुलामुलींच्‍या विवाहाचा प्रश्‍न त्‍यामुळे निर्माण होतो, हे नाकारुन चालणार नाही. बुद्ध धम्‍मात जात नसल्‍याने बौद्धांनी आपल्‍या मुलामुलींचे विवाह बुद्ध धम्‍मीयांशीच करावेत. त्‍यामुळे जाता नाही ती जात असे म्‍हणण्‍याचा प्रसंग त्‍यांच्‍यावर येणार नाही.

बाबासाहेबांना फ्रेमबंद करुन त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याचा विपर्यास कसा केला जातो आहे व बौद्ध हीच एक बंदिस्‍त जात कशी होत आहे, यावर आणखी भाष्‍य करण्‍याची यानंतर गरज नाही.

बाबासाहेबांना अपेक्षित असलेले आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आता वाढत चालले आहे, ही खूप चांगली गोष्‍ट आहे. काही ठिकाणी तीव्र विरोध, खुनाखूनी, उभयतांचे तसेच त्‍यांच्‍या कुटुंबीयांचे जीवन संपवण्‍याच्‍याही घटना होत असतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात या घटना अधिक होतात. तरीही आंतरजातीय विवाहांचे एकूण प्रमाण वाढतच चालले आहे. बाबासाहेबांच्‍या मताप्रमाणे हे रक्‍‍तमिश्रण जाती मोडायला मदत करील. अशा रक्‍तमिश्रणातून तयार होणारी संतती आई-वडिलांच्‍या जैविकरित्‍या कोण्‍या एका जातीची वाहक नसल्‍याने किमान त्‍या संततीच्‍या मनात तरी एका विशिष्‍ट जातीचा अभिमान/दुराभिमान असायची शक्‍यता मंदावते.

मंदावते म्‍हणायचे कारण जातीची ओळख पूर्णतः संपुष्‍टात येत नाही. बापाची जात मुलाला लागते. आमच्‍या घरात आमच्‍या पिढीतील सर्वांची लग्‍ने आंतरजातीय आहेत. मी चौकशी केली तर प्रत्येक जोडीतील नव-याची जात मुलाला लागलेली आहे. पतीची जात अधिक पत्‍नीची जात याचे उत्‍तर कोणतीही जात नाही असे न येता पतीची जात असे येते. याचा अर्थ, आंतरजातीय विवाह केल्‍यानंतरही मुलांना अधिकृतपणे एक जात मिळते. धर्म वेगळे असले तर बापाचा धर्म मुलाला‍ मिळतो. अशारीतीने जात किंवा धर्माची ओळख पुढे चालू राहते.

याच्‍या आधीही एक टप्‍पा असतो. तो लग्‍नाचा. आंतरजातीय-धर्मीय विवाह धार्मिक पद्धतीने करावयाचा झाल्‍यास तो हटकून नव-याच्‍या जाती‍ किंवा धर्माच्‍या चालीरीतीप्रमाणेच होतो. पूर्वी वधूचे नाव सर्रास बदलले जायचे. आता बदलले जातेच असे नाही. मात्र आडनाव नव-याचेच लागते. काहीजणी बंड करुन स्‍वतःचेच आडनाव लावतात. त्‍यांना हरठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. काहीजणी स्‍वतःचे व नव-याचे अशी दोन आडनावे लावतात. ही तडजोड मात्र समाजाने स्‍वीकारलेली दिसते. पत्‍नीची जात आता कायद्यानेच बदलत नाही. कारण जात ही जन्‍मसिद्ध आहे. ती स्‍वीकारता येत नाही. धर्म स्‍वीकारता येतो. लग्‍नातच नवरीचे नव-याच्‍या धर्मात धर्मांतर केले जाते. काहीजणी कागदोपत्री स्‍वतःचाच धर्म लावतात. पण व्‍यवहारात मात्र तिला नव-याच्‍याच धर्माचरणात सहभागी व्‍हावे लागते. पुरुषसत्‍ताकता स्‍त्रीचे दुय्यमत्‍वच नव्‍हे, तर जातीचेही संरक्षण करते ती अशी.

पुरोगामी-जाणत्‍या कार्यकर्त्‍यांचा व्‍यवहार कसा होतो ?

माझेच उदाहरण देतो. मी बौद्ध, माझी पत्‍नी सवर्ण. दोघेही चळवळीतले. चळवळीतच लग्‍न ठरले. नोंदणी पद्धतीने लग्‍न करण्‍यासाठीची नोटीस दिलेली. तिची मुदत संपायच्‍या आतच माझ्या पत्‍नीला तिचे घर सोडावे लागल्‍याने आम्‍हाला तातडीने लग्‍न करणे भाग होते. असे लग्‍न धार्मिक पद्धतीनेच शक्‍य होते. कोणत्‍या धर्माप्रमाणे लग्‍न करायचे, यात विचार करण्‍याचा माझ्या दृष्‍टीने प्रश्‍नच नव्‍हता. हे लग्‍न बौद्ध पद्धतीनेच होणार. कारण तो पुरोगामी धर्म आहे. माझ्या होणा-या पत्‍नीचे काही वेगळे म्‍हणणे आहे का, असे विचारणेही मला अप्रस्‍तुत वाटले. तिचेही तेच मत असणार (असले पाहिजे), हे माझ्या मनात ठाम होते. बौद्ध पद्धतीने लग्‍न करायचे ठरले. तिने त्‍यास हरकत घेतली नाही. विधीची सूक्‍ते म्‍हणण्‍यास प्रारंभ झाल्‍यानंतर मध्‍येच तिचे धर्मांतर करण्‍यात आले व तिच्‍याकडून 22 प्रतिज्ञा वदवून घेण्‍यात आल्‍या. (बाबासाहेबांनी समाजाला दीक्षा देताना हिंदू धर्म त्‍यागायचे म्‍हणजे काय करायचे, यासाठी तत्‍कालीन संदर्भात या 22 प्रतिज्ञा दिल्‍या होत्‍या.) त्‍यात ब्रम्‍हा, महेश, विष्‍णू यांना देव मानणार नाही... वगैरेंचा समावेश आहे. यावेळी मात्र ती व तिची सवर्ण मित्रमंडळी अस्‍वस्‍थ झाली. माझी पत्‍नी या देवांची किंवा हिंदू धर्माची उपासक होती, असे अजिबात नव्‍हते. मात्र, असे धर्मांतर व प्रतिज्ञांची जबरदस्‍ती हा तिच्‍या स्‍वतंत्र व्‍यक्तित्‍वाचा अवमान होता. तातडीने लग्‍न होणे ही परिस्थितीची निकड लक्षात घेऊन तिने हे निमूटपणे सहन केले.

काहीतरी गडबड होते आहे, हे मला जाणवले. पण जगात सर्वश्रेष्‍ठ धर्म बौद्धच आहे व कोणीही पुरोगाम्‍याने देवांना मानताच कामा नये, ही माझी कठोर धारणा असल्‍याने माझ्या पत्‍नीची अस्‍वस्‍थता मला पोहोचलीच नाही.

आता कळते की, ही माझी महाभयंकर चूक झाली. धर्मांतर व प्रतिज्ञा या दोन गोष्‍टी तरी मी थांबवायलाच हव्‍या होत्‍या. (मी हतबल वगैरे नव्‍हतो. ठरवले असते तर विधी काय करायचा, कसा करायचा हे मी सांगू शकत होतो. पंचक्रोशीतील बौद्ध समाजात मी तसा मान्‍यताप्राप्‍त कार्यकर्ता होतो.) प्रत्‍यक्षात माझ्या पत्‍नीचा कागदोपत्री धर्मही बदललेला नाही आणि तिचे आडनावही बदललेले नाही. पण तरीही तेव्‍हा मी हस्‍तक्षेप करायला हवाच होता. ती चूक झालीच. 21 वर्षांपूर्वीची ती चूक आता दुरुस्‍त होणे शक्‍य नाही. बूँद से गयी...पद्धतीची ती चूक आहे.

दोन व्‍यक्‍तींच्‍या लग्‍नात धर्माचा खरे म्‍हणजे संबंधच काय ? लग्‍न झालेल्‍या दोन व्‍यक्‍ती आपापल्‍या धर्माचे आचरण करु शकतात. हे उपासना स्‍वातंत्र्य त्‍यांना घटनेने दिलेले आहे. बाबासाहेब आंबेडकर व्‍यक्तिस्‍वातंत्र्याचे कडवे पुरस्‍कर्ते होते. पण आम्‍ही त्‍यांचे पुरुष अनुयायी स्त्रियांचे अस्तित्‍व आमच्‍यातच सामावलेले असते, असे गृहीत धरतो. जुन्‍या काळात सम्राट अशोक, अकबर यांच्‍या परधर्मीय राण्‍या त्‍यांच्‍या धर्माचे आचरण करण्‍यास मुखत्‍यार होत्‍या. हे ठाऊक असूनही आम्‍ही स्‍वयंसिद्ध पुरोगामी बौद्ध स्‍वतःला त्‍याबाबतीत अपवाद ठरवतो. बौद्ध हा विचार आहे. तो मनाने पटून स्‍वीकारावा लागतो. हे आम्‍ही ठार विसरतो. त्‍याच्‍या आकृतिबंधासच महत्‍व देतो.

पुढे मुलाला शाळेत घालताना धर्म म्‍हणून बौद्ध अशीच मी नोंद केली. खरे म्‍हणजे काहीही लिहू नये, असा आग्रह धरावा, असा एक विचार होता. पण असे केल्‍याने मी जात लपवतो, असा माझ्या बौद्ध समाजातून आरोप होईल, ही धास्‍ती मला होती. कारण जात लपवणारे, जयभीम म्‍हणायला लाजणारे अनेक मध्‍यमवर्गीय बौद्ध मला ठाऊक होते. अशांवर सडकून टीका करण्‍यात मी आघाडीवर असे. अशांना चारचौघात जाहीररित्‍या जयभीम म्‍हणून त्‍यांना अवघडून टाकणे हा माझा कार्यक्रमच असे.

आता वाटते, या पुरोगामीपणाच्‍या आविष्‍कारामागे एक सामाजिक मान्‍यतेचे भय व पोथीवादी अहंता होती. आणि या वैचारिक अहंतेच्‍या-भयाच्‍या आत कळत नकळत पुरुषी अहंता होती.

आता हे कळू लागल्‍यावर मी मुलाला सांगितले, तुझा शाळेत लावलेला धर्म व आडनाव मी दिलेले आहे. ते तांत्रिक आहे. कोणताही धर्म हा पटून स्‍वीकारावा लागतो. त्‍यामुळे तू जन्‍मतः बौद्ध असण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. तू 18 वर्षांचा झाल्‍यावर धर्म, आडनाव ही ओळख तुझी तू ठरव.

मला वाटते, ज्‍यांना पटते त्‍या सर्वांनीच, खास करुन आंतरजातीय अथवा आंतरधर्मीय लग्‍न करणा-यांनी आपल्‍या मुलांना कोणताच धर्म अथवा जात लावू नये. (राखीव जागांचा लाभ घेणे ज्‍यांना आज आवश्‍यकच आहे, अशांचा अपवाद करावा लागेल.) त्‍यांना आडनावेही आपली देऊ नयेत. स्‍वतःचे नाव त्‍यानंतर आईचे नाव व शेवटी वडिलांचे नाव ही आपल्‍याकडे काहीजण अनुसरत असलेली पद्धतच योग्‍य आहे. शाळा-कॉलेजे, सरकारी कार्यालये किंवा जिथे कोठे शक्‍य असेल तिथे जात/धर्म न नोंदवण्‍याचा एक पर्याय असलाच पाहिजे. हा पर्याय स्‍वीकारणा-यांची संख्‍या आजच्‍या काळात नक्‍की वाढू शकते. ती अधिक वाढण्‍यासाठी प्रचार-प्रसारही करावा लागेल.

जाती ह्या मनातूनच नष्‍ट व्‍हाव्‍या लागतील. वरील उपाय हे त्‍या अर्थाने बाह्यांग आहे. पण तेच निदर्शक असल्‍याने ते स्‍वीकारणे उपयुक्‍त ठरेल. जातींच्‍या ओळखीचा प्रवास खंडित होण्‍याचा तो किमान एक महत्‍वाचा उपाय नक्‍की असू शकतो.

- सुरेश सावंत

‘पुरुषस्पंदन’ च्‍या 2010 च्‍या दिवाळी अंकासाठी पाठवलेला लेख

आंबेडकरी समूहातील आर्थिक-सांस्कृतिक बदल व आंबेडकरी चळवळीचे भवितव्य

एका साहित्यिक मित्राच्‍या जुने कार्यकर्ते असलेल्‍या वडिलांचा अमृतमहोत्‍सव.

अनेक अधिकारी, संपादक, साहित्यिक, प्रतिष्ठित मंडळी जमलेली. हॉलच्‍या बाहेर अनेक गाड्या लागलेल्‍या.

पंच्‍याहत्‍तरी-ऐंशीचे लोक भाषणात बाबासाहेबांच्‍या काळातल्‍या जुन्‍या स्‍फूर्तिदायी आठवणी जागवत होते. त्‍यांच्‍या वाणीतून, डोळ्यांतून तत्‍कालीन चळवळीचा अभिमान, तेज ओसंडत होते. साठीचे लोक पँथरच्‍या काळातील आठवणींनी सुरुवात करत आज कशी चळवळ संपली आहेचा निराश सूर लावत होते. त्‍यांच्‍या चेह-यांवर काही गमावल्‍याची छाया तरंगत होती.

12 ते 22 वयोगटातील आमची (म्‍हणजे 40 ते 50 चा वयोगट) मुले आजुबाजूला खेळत किंवा गप्‍पा मारत होती. त्‍यांना यात काहीच गम्‍य नव्‍हते. आता ती कंटाळू लागलेली. बुफे च्‍या टेबलावरील पात्रांची झाकणे कधी उघडतात, याची वाट पाहत असलेली.

माझ्या मित्राची शिक्षिका असलेली पत्‍नी मला म्‍हणाली, भाऊजी, ह्यांना आवरतं घ्‍या म्‍हणावं आता. पोरं पार कंटाळलीत. आम्‍हाला त्रास द्यायला लागलीत.

माझ्या घरातला एक प्रसंग.

माझा बाप म्‍हणजे तुझा आजा मेलेली जनावरं ओढायचा असे सांगितल्‍यावर माध्‍यमिक शाळेतील माझा मुलगा मला म्‍हणाला होता- काय पकवतोयस !’

...पुढचं काही ऐकून घ्‍यायला त्‍याला इंटरेस्‍ट नव्‍हता. टीव्‍हीवर चाललेल्‍या रोडीज मधल्‍या युवक-युवतींच्‍या विरोचित करामतींत तो गुंगून गेला.

आपला भू‍तकाळ, आपला समाज, आपली चळवळ याविषयी जाणीवपूर्वक बोलण्‍याचा माझा प्रयत्‍न सुटत नाही. लादले न जाता त्‍याच्‍या कलाकलाने बोलत असतो. थोडा प्रतिसाद, अन् बरेचसे दुर्लक्ष असे चालते.

बालपणापासून फ्लॅट व मिश्र संस्‍कृतीत वाढलेल्‍या माझ्या मुलाला इतरांपासून काही वेगळे दिसत असले तर घरातला बाबासाहेबांचा फोटो, बुद्धाची मूर्ती एवढेच. तो बाय डिफॉल्‍ट निरीश्‍वरवादी आहे. याचे कारण घरात कोणत्‍याही देवाचे अस्तित्‍व नाही, चर्चा नाही.

माझा साहित्यिक‍ मित्र आणि मी एकाच झोपडपट्टीत वाढलेले. त्‍याचे वडील सरकारी कारकून, पुढे बढत्‍या मिळत अधिकारी म्‍हणून निवृत्‍त झालेले. माझे वडील एक निरक्षर गिरणी कामगार. पुढे 82 च्‍या संपात साफ धूळधाण झालेले. आमच्‍या दोघांच्‍या वडिलांच्‍या शिक्षणात-नोकरीत खूप फरक असला तरी आमचे भौतिक-सांस्‍कृतिक वातावरण एकच होते. नंतर हे गतीने बदलत गेले. त्‍याचे कुटुंब आधी फ्लॅट, नंतर बंगल्‍यात फार लवकर गेले. मला फ्लॅटमध्‍ये यायला उशीर लागला. पण हा उशीर तसा सापेक्षच. ज्‍या वस्‍तीतून आम्‍ही काहीजण बाहेर पडलो, तिथे आजही आमचे अनेक मित्र, नातेवाईक राहत आहेतच. त्‍यावेळच्‍या झोपडपट्टीत व आताच्‍या बराच फरक झाला आहे. आता पत्र्याची, कुडाची घरे नाहीत. बहुतेक कॉंक्रिटची झाली आहेत. सार्वजनिक संडास, गटारे यांची व्‍यवस्‍था पूर्वीच्‍या तुलनेत खूप सुधारली आहे. संधी मिळेल तसे आमचे तिथे राहणारे नातेवाईक, मित्र बाहेर पडत आहेत. काही मित्र नामांकित गँगचे सदस्‍य आहेत. त्‍यातील ब-याच जणांचे एन्‍काउंटर झाले. जे शिल्‍लक आहेत, ते भेटल्‍यावर आस्‍थेने, कळवळ्याने म्‍हणतात, बरे झाले तू शिकलास. इथनं बाहेर निघालास. आमचं काही खरं नाही.

आमच्‍या बालपणी दारिद्र्याचा अवतीभवती सुकाळ होता. लग्‍नांच्‍या पंगतीत उघड्या गटाराच्‍या रांगेत मांडी घालून बसायचे आणि अख्‍खे गहू व गूळ यांचेच मिश्रण असलेली लापशी पक्‍वान्‍न म्‍हणून खायचे. एक सांगायला हवे, उपासमार अशी आमच्‍या वाट्याला आली नाही. गावाहून पोट भरायला मुंबईत आलेल्‍या आमच्‍या वडलांना जी उपासमार सोसावी लागली, तिचा आम्‍हाला अनुभव नाही. मुंबईत खरोखरच पोट भरले. 72-73 च्‍या दुष्‍काळातही आम्‍ही शहरातले दलित उपाशी राहिलो नाही. राळ्याचे तांदूळ व जवाच्‍या चपात्‍या का होईना आम्‍हाला मिळाल्‍या. पण आमचे समाजबांधव याच उपासमारीमुळे याच काळात मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मुंबईत स्‍थलांतरित झाले.

मी वडिलांकडून ऐकलेली एक गोष्‍ट. ते म्‍हणत, उपासमार जास्‍तच व्‍हायला लागली की, रानात चरणा-या गुरांतल्‍या एखाद्या जनावराला आम्‍हीच मुंडी पिरगाळून ठार करत असू आणि घरी-महारवाडीत परतत असू. काही काळाने गावातून मेलेले जनावर ओढून नेण्‍यासाठी आम्‍हाला हाक यायची. मग आमची चंगळ व्‍हायची. माझ्या वडिलांची बहीण-माझी आत्‍या उपासमारीने मेली. तीव्रतेत अधिकउणे असले तरी उपासमारीची ही स्थिती कोकणातल्‍या सर्व जातींच्‍या वाट्याला आलेली. कोकणातल्‍या घरटी एकतरी माणसाला मुंबईत यावेच लागले. कोणी बोटीने आले, कोणी चालत. माझे वडिल पैसे नसल्‍याने चालत आले. मुंबईनेच आम्‍हाला तगवले हे मात्र नक्‍की.

आर्थिक वंचनेत, बिनचपलांच्‍या, अपु-या कपड्यांतल्‍या आम्‍हा मुलांना एक सांस्‍कृतिक वैभवाचा काळ लाभला. वर उल्‍लेख केलेल्‍या साहित्यिक मित्राच्‍या वडिलांच्‍या वयाची माणसे बाबासाहेबांच्‍या सभांच्‍या रसभरित आठवणी आम्‍हाला सांगत. आमच्‍या लेबर कॅम्‍पात बाबासाहेबांची सभा होती. चेंबूर स्‍टेशनच्‍या पलीकडे बाबासाहेबांची गाडी थांबली. लेबर कॅम्‍पात यायचे तर बाबासाहेबांना रुळ ओलांडून चालत यावे लागणार. हे काही बरोबर नाही, असे लोकांना वाटले. मग त्‍यातल्‍या पहिलवानांनी सरळ बाबासाहेबांची गाडीच उचलून रुळांच्‍या अलिकडे आणून ठेवली. आमच्‍या महारा-मांगांच्‍या त्‍या वस्‍तीत पहिलवान बरेच असत. आमच्‍याकडे त्‍यावेळी कुस्‍त्‍यांचे फड होत. हे पहिलवान घडविण्‍यासाठी एक तालीमही होती. त्‍या तालमीत आम्‍ही मुलेपण जात असू. पुढे व्‍यायामशाळा आल्‍या. अगदी अलिकडे ती तालीम पाडण्‍यात आली.

बाबासाहेबांच्‍या जयंतीला बैलगाडीत बाबासाहेब, बुद्ध, महात्‍मा फुले यांच्‍या प्रतिमा ठेवून लेझिम खेळत मिरवणुका निघत. पँथरच्‍या काळातली, दलित अत्‍याचारांविरोधातली, नामांतराची आंदोलने, जयभीम शब्‍दांच्‍या उच्‍चारांतून शरीरात सळसळणारी वीज, स्‍वातंत्र्य हे कुठच्‍या गाढविणीचं नाव आहे ही नामदेव ढसाळांची कविता आणि राजा ढालेंचा साधनेतला राष्‍ट्रध्‍वजासंबंधीचा अवमानकारक उल्‍लेख यांचा अभिमान बाळगून (हे सर्वथैव चूक, अत्‍यंत गैर होते हे नंतर कळले) प्राथमिक शाळेत स्‍वातंत्र्यदिनाच्‍या दिवशी काळी फीत लावून जाण्‍यातली, राष्‍ट्रगीत म्‍हणायला नकार देण्‍यातली बंडखोरी....हे सर्व वैभव होते. बुद्ध की मार्क्‍स, गांधी विरुद्ध आंबेडकर, समाजवादी, आरएसएस या सगळ्या संकल्‍पना-चर्चा-वाद कानांवर आदळत असत. सभांना येणा-या कोणत्‍याही नेत्‍याकडे त्‍यावेळी गाड्या नव्‍हत्‍या. रात्री उशीरा लोकांच्‍या घरीच जेवायचे किंवा साध्‍या हॉटेलात खायचे आणि पहाटे लोकल सुरु झाल्‍या की घरी परतायचे. प्रस्‍थापितांवर आग ओकणारे हे नेते खरोखरच आमचे हीरो होते. जयभीम के नारे पे खून बहे तो बहने दो... ही घोषणा देताना रक्‍तातला थेंब न थेंब पेटून उठायचा.

हळू हळू चळवळ ओसरु लागली. नेत्‍यांचे जलद गतीने पतन व पुढे प्रस्‍थापितीकरण झाले. आम्‍ही मुलांचे आता तरुण झालो होतो. भोवताली संकुचिततेचे डबके साठायला सुरुवात झाली होती. एकप्रकारची कोंडी होऊ लागली होती. यातूनच माझ्यासारख्‍या काहींचा नव्‍या वाटांचा शोध सुरु झाला. माझा स्‍त्री मुक्‍ती संघटनेशी, लाल निशाण पक्षाशी संबंध आल्‍यानंतर कावळ्याने शिवलेल्‍या चिमणीच्‍या पिलाला चिमण्‍या जसे बाहेर टाकतात तसे एक बहिष्‍काराचे वातावरण माझ्याभोवती तयार झाले. पण ते मुख्‍यतः माजी बंडखोर व नंतर प्रस्‍थापित झालेल्‍यांकडून. जवळच्‍या सोबत्‍यांपैकीही काही त्‍यात सामील झाले. पण लोकांची साथ कमी झाली नाही. माझ्या आधीच्‍या पिढीतले डाव्‍या चळवळीत आलेले कार्यकर्ते अक्षरशः समाजातून उठले होते, उठवले गेले होते. त्‍यांच्‍या घरात सोयरीकीही करायला नकार दिला जायचा. माझ्या बाबतीत हे झाले नाही. माझे लग्‍न झाले. स्‍त्री मुक्‍ती संघटनेतल्‍याच एका सवर्ण कार्यकर्तीने माझ्याशी लग्‍न केले. त्‍याबद्दल, तिच्‍या वस्‍तीतल्‍या सहज वावराबद्दल, लोकांत मिसळण्‍याबद्दल एक अपूर्वाई, कौतुक होते. आमची राहती झोपडी दुरुस्‍तीला काढली गेली त्‍यावेळी वस्‍तीबाहेरच्‍या अनेक सहका-यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. या आर्थिक मदतीतून साहित्‍य विकत आणले. बाकी अंगमेहनतीची कामे वस्‍तीतल्‍या कार्यकर्त्‍यांनीच केली. अनेक सामान्‍य माणसे ओळखीची, फारशी ओळखीची नसलेली मदतीला आली. आमची झोपडी दुरुस्‍त करणे हे सामाजिक काम बनले होते. ते एक इर्जिक होते.

मी वस्‍ती सोडली अन् माझे हे सामुदायिक जीवन, सांस्‍कृतिक वैभव ही लयाला गेले. त्‍याची एक पोकळी, तुटलेपण मनात कायम वास्‍तव्‍यास आले. माझ्या मुलाच्‍या वाट्याला माझे आर्थिक-भौतिक भोग आले नाहीत, हे चांगलेच झाले. पण माझ्या सांस्‍कृतिक संपन्‍नतेला तो पारखा राहिला (हे मला वाटते). त्‍या गुणवत्‍तेची (प्रकाराची म्‍हणत नाही मी) पर्यायी सांस्‍कृतिक संपन्‍नताही त्‍याच्‍या भोवताली आज नाही. अर्थात, काय नाही हे ही त्‍याला किंवा त्‍याच्‍या पिढीच्‍या इतर मुलांना कळत नाही. कळणे शक्‍यही नाही. समजून सांगताही येत नाही. तुला नव्‍या जगाची आण, चल उचल हत्‍यार, होऊन हुशार ही वसंत बापटांची त्‍याला अभ्‍यासक्रमात असलेली कविता त्‍याला समजावताना माझ्या नाकी नऊ आले. आण म्‍हणजे शपथ हे त्‍याला समजवू शकलो. पण नवे जग म्‍हणजे काय, आणि त्‍यासाठी हत्‍यार का उचलायचे, हे काही केल्‍या मी त्‍याला समजावू शकलो नाही. अखेरीस त्‍यालाही कवी कशाची आण घ्‍यायला सांगत आहे?’ या प्रश्‍नाचे नव्‍या जगाची एवढे उत्‍तर पाठ करणे पुरेसे वाटले.

मी ज्‍या वस्‍तीतून आलो, तिथे तरी आता ही सांस्‍कृतिक संपन्‍नता आहे का ? अजिबात नाही. बौद्ध वस्‍तीत राहत असल्‍याने, बुद्धविहार शेजारी असल्‍याने बुद्ध, आंबेडकर हे संदर्भ त्‍यांना कळतात. निवडणुकांच्‍या राजकारणात वस्‍ती ढवळून निघत असल्‍याने ते अधिक कळते. जे माझ्या मुलाला कळणे कठीण जाते. पण यापलीकडे त्‍या मुलांना जवळपास कळत नाही. अशाच वस्‍तीतला एक कार्यकर्ता नागपूरला माझ्यासोबत होता. दीक्षाभूमीवरील स्‍तूपात आम्‍ही फिरत होतो. बाबासाहेब व त्‍यांच्‍या वरच्‍या बाजूस बुद्धाची आशीर्वाद देणारी प्रतिमा एकत्रित असलेला एक फोटो समोर होता. सोबतच्‍या त्‍या तरुण कार्यकर्त्‍याने निरागसपणे विचारले, सर, बाबासाहेब अ‍ाणि बुद्ध एकाच वेळेस होते का ?’

बाबासाहेबांसारखा महापुरुष या जगात दुसरा नाही, ते महान होते, बुद्धाइतके कोणी श्रेष्‍ठ नाही, एवढेच या वस्‍तीतल्‍या तरुणांच्‍या कानांवर पडते. महान होते, म्‍हणजे नक्‍की काय, याचा तपशील त्‍यांनी ऐकलेला नसतो. नेत्‍यांनी किंवा मध्‍यमवर्गात गेलेल्‍या कार्यकर्त्‍यांनी हे प्रबोधन करण्‍याची तसदीच घेतलेली नसते.

गेल्‍या महिन्‍यातली गोष्‍ट.

मनसेचे लोक म्‍हणतात, बाबासाहेब आंबेडकर आमचे असे तुम्‍ही का म्‍हणता ? ‘आपले म्‍हणा ना ! त्‍यांनी घटना देशासाठी लिहिली. फक्‍त दलितांसाठी नाही. महाराष्‍ट्र राज्‍याबद्दल, मराठी माणसाबद्दल त्‍यांनी भूमिका मांडली. बाबासाहेब हे आपल्‍या सगळ्यांचे आहेत. सर्व महाराष्‍ट्राचे, सर्व देशाचे आहेत. तुम्‍हीच लोकांनी बाबासाहेबांना संकुचित बनवले.

...वस्‍तीतील एक तरुण कार्यकर्ता बैठक संपल्‍यावर माझ्याशी बोलत होता. नंतर रिपब्लिकन नेत्‍यांना त्‍याने जाम शिव्‍या घातल्‍या आणि मग आपली पोरे मनसेत जातात याला जबाबदार कोण ?’ असा उत्‍तराची अपेक्षा नसणारा प्रश्‍न माझ्यापुढे टाकला.

वरच्‍या सर्व प्रसंगांतील युवा पिढी बौद्धच आहे. पण विविध आर्थिक व शैक्षणिक थरातली. बौद्ध असण्‍याबरोबरच आणखी एक गोष्‍ट तिच्‍यात सामायिक आहे. ती म्‍हणजे- आंबेडकरी चळवळीबाबतची निर्भान, निर्शल्‍य दिशाहिनता. ज्‍याचे भान नाही, ज्‍याचे शल्‍य नाही, ज्‍याचा खेद नाही अशी दिशाहिनता.

ह्याला जबाबदार कोण ?

...परिस्थिती ?

होय. पण काही प्रमाणात. परिस्थिती बदलतच असते. जग परिवर्तनशील आहे. थोपवू म्‍हटले तरी ते थांबणार नाही. जगातल्‍या, समाजातल्‍या सगळ्यांच्‍याच जगण्‍याला ह्या बदलत्‍या परिस्थितीचे संदर्भ असतात. बौद्धांच्‍या तसेच बौद्धेतरांच्‍या.

पण परिस्थिती सुटी नसते. ती एक शृंखला असते. तो एक प्रवाह असतो. स्‍वच्‍छ, गढूळ, डोह, खडक असे सगळे त्‍यात असते. या परिस्थितीच्‍या स्थित्‍यंतरात आधीचे प्रगतीशील घटक पुढच्‍या पिढीकडे जाणीवपूर्वक सोपवावे लागतात. मागच्‍याने पुढच्‍याकडे मशाल सोपवायची असते. मागच्‍याने पुढच्‍याला चाल द्यायची असते. ही जाणीवपूर्वकता चळवळीत विशेष महत्‍वाची असते. आंबेडकरी चळवळीत हे झाले का ? होत आहे का ?

याचे उत्‍तर जवळ जवळ नाही असे द्यावे लागले असते, तरी बरे झाले असते. ते कमी धोकादायक होते. पण विचित्र, तिरपागडे, हानिकारक असे काहीतरी पुढच्‍या पिढीला सोपवले जात आहे. आणि ते खूपच गंभीर आहे.

आंबेडकरी चळवळ याचा अर्थ काय ?

बौद्धांनी (म्‍हणजे पूर्वाश्रमीच्‍या महारांनी) बौद्धांसाठी (म्‍हणजे पूर्वाश्रमीच्‍या महारांसाठी) चालवलेली चळवळ, असा आहे का ?

नाही. ती सर्व पीडितांना, शोषितांना मुक्‍त करणारी मानवमुक्‍तीची चळवळ आहे, अशीच तिची व्‍याख्‍या सगळे आंबेडकरवादी करतात. ती केवळ बौद्धांपुरती संकुचित होणे त्‍यांना तत्‍वतः मान्‍य नाही.

मग वरच्‍या घटनेतील मनसेला बाबासाहेबांचे व्‍यापकत्‍व आजच्‍या आं‍बेडकरी तरुणांना सांगण्‍याचा अधिकार कोणी दिला ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी छेडलेले देशव्‍यापी भूमिहिनांचे आंदोलन, महाराष्ट्राच्‍या सांस्‍कृतिक सारस्‍वताला हादरविणारे दलित साहित्‍य, सामाजिक-राजकीय जीवनाला थरारुन सोडणारी दलित पँथरची गर्जना, नामांतर-रिडल्‍सची आंदोलने अशा अनेक सत्‍कर्मांची नोंद आंबेडकरी चळवळीच्‍या इतिहा‍सात असली तरी आज वट्टात पराभूतता, दिशाहिनता हेच आहे. याला कारण कोण ?

निःसंशय आंबेडकरी चळवळीतले आजचे नेते आणि आजची शिक्षित व मध्‍यमवर्गीय मध्‍यवयीन पिढी.

आज ऐक्‍य केलेल्‍या व एकेकाळी समग्र परिवर्तनाची मांडणी करणा-या रिपब्लिकन नेत्‍यांचा नजिकच्‍या भूतकाळातला व्‍यवहार काय राहिला आहे ? केवळ संधिसाधू असेच म्‍हणावे लागेल. सत्‍तेच्‍या विविध स्‍तरांवर लाभार्थी झालेल्‍या जुन्‍या पँथर कार्यकर्त्‍यांचे पोषाख, व्‍यक्तिमत्‍व, वागणे अन्‍य सत्‍ताधारी पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांहून कोणत्‍याही अर्थाने भिन्‍न दिसत नाही. सत्‍तेच्‍या दलालांच्‍या या बाजारात नव्‍या पिढीला जुना पँथर कसा होता, हे दाखवायचे झाले, तर म्‍युझियमध्‍ये ठेवायला त्‍याचा सांगाडाही शिल्‍लक नाही. एकतर त्‍यांच्‍या हाडांनाही मांद्य आलेले आहे किंवा ती अगदी भुसभुशीत झालेली आहेत.

परिणामी, या विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन उमेदवारांचा त्‍यांच्‍या बालेकिल्‍ल्‍यांतही (म्‍हणजे बौद्ध मतदार मोठ्या संख्‍येने असलेले विभाग) धुव्‍वा उडाला. याचा अर्थ, ऐक्‍याच्‍या फार्साला नेहमी फसत आलेली आशावादी बौद्ध जनता यावेळच्‍या रिपब्लिकन ऐक्‍यावर मात्र भाळली नाही. तिने एकतर पारंपरिकरित्‍या कॉंग्रेसला आणि तिच्‍यातील तरुणांनी मनसेला कौल दिला. (बसपचे मायाजालही यावेळी फाटले होते)

रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्‍व बौद्धांच्‍या बाहेर कधी गेलेच नाही. त्‍यांनी बाबासाहेब महान होते हे सांगण्‍याच्‍या आणि त्‍यांच्‍या नावाच्‍या वापराच्‍या पल्‍याड परिणामकारक असे काही सांगितलेच नाही. वासाहतिक शोषणाचे विश्‍लेषण करणारे बाबासाहेब, जागतिक लोकशाही लढ्यांचा वारसा व संदर्भ देणारे बाबासाहेब, कामगारांसाठी 8 तासांचा दिवस, कामगार स्‍त्रीला बाळंतपणाची रजा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, समस्‍त हिंदू स्त्रियांना वारसा हक्‍क यांसाठी झगडणारे बाबासाहेब, भाषावार प्रांतरचनेसंबंधी-पाकिस्‍तानविषयी भूमिका मांडणारे बाबासाहेब आम्‍ही अन्‍य समाजाला कधी समजावलेच नाहीत. एवढेच नाही. ज्‍या बाबासाहेबांनी आम्‍हाला वैश्विक बुद्ध दिला. तोही आम्‍ही महार करुन टाकला. अन्‍य समाजातील अनेकांचा बुद्ध हा महार होता असा समज आहे. हे त्‍यांचे अज्ञान आहे, हे खरेच. पण आमचे नाकर्तेपण त्‍यामुळे कमी होत नाही.

आज बौद्धांच्‍यात 74 टक्‍के (ब्राम्‍हण समकक्ष जातींच्‍या खालोखाल) साक्षरता आहे. 4 वर्तमानपत्रे आहेत. उच्‍चपदस्‍थ अधिकारी, विचारवंत आहेत. सुस्थित असा लक्षणीय मध्‍यमवर्ग आहे. तरीही गेल्‍या 59 वर्षांत बाबासाहेबांनी आपल्‍याला दिलेला बुद्ध हा वैश्विक ठेवा सार्वत्रिक करणे सोडाच; आपल्‍या व्‍यतिरिक्‍तच्‍या अन्‍य दलित व मागास जातींपर्यंत आम्‍ही नेऊ शकलो नाही.

भारत बौद्धमय करण्‍याचा मार्ग म्‍हणजे जयंती-मयंतीला आपल्‍याच कोंडाळ्यात बेंबीच्‍या देठापासून भाषणे करणे असा आम्‍ही लावलेला आहे. शिक्षित मध्‍यमवर्गीय झोपडपट्टीतल्‍या जयंतीत प्रमुख पाहुणा म्‍हणून बाबासाहेबांबद्दल, बुद्धाबद्दल मोठमोठ्या गोष्‍टी करतो आणि आपल्‍याच सोसायटीतल्‍या, ऑफिसातल्‍या दुस-या बौद्धाला चारचौघात जयभीम म्‍हणायला कचरतो.

बौद्धांमधला शिक्षित मध्‍यमवर्ग ही खरे तर ताकद आहे. पण तिच्‍यात अनेक विकृती तयार झाल्‍या आहेत. एकूण मध्‍यमवर्गात आलेली आत्‍ममश्‍गुलता बौद्ध मध्‍यवर्गातही गतीने येऊ लागली आहे. शासकीय नोक-या, आरक्षणे, बढत्‍या, महामंडळांची कर्जे, गृहसंस्‍थांतल्‍या सवलती यांत आपल्‍याला व आपल्‍यानंतर आपल्‍या मुलाबाळांनाच लाभ कसा मिळेल, याबाबत तो विलक्षण दक्ष असतो. आपली जात्‍याच असलेली राजकीय-सामाजिक तल्‍लखता तो इथे पुरेपूर वापरतो. त्‍यासाठी वशिला, लाच, सत्‍ताधा-यांची खुशामत इ. रुढ मार्गांतला कोणताही मार्ग त्‍याला वर्ज्‍य नसतो. पण आपल्‍याच समाजातल्‍या गरीब स्‍तरातील बौद्धांचे कष्‍टकरी, गरीब म्‍हणून असलेले प्रश्‍न सोडवण्‍याबाबत, त्‍यांवर चळवळ संघटित करण्‍याबाबत तो अलिप्‍त राहतो. आपल्‍या मुलांसाठी आपण आरक्षण न घेतल्‍यास आपल्‍यातल्‍या गरीब मुलांना त्‍याचा लाभ मिळेल, हा अंतर्गत सामाजिक न्‍याय त्‍याला मंजूर नसतो. आपली मुले अभिजनवर्गात मिसळावीत म्‍हणून आपली ओळख ओळख लपविण्‍याचा, पुसण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न करतो. आंबेडकरी परिभाषेचा वाराही त्‍यांना लागणार नाही, याची निर्लज्‍ज दक्षता घेतो. सोसायटीतल्‍या गणेशोत्‍सवात सर्वधर्मसमभाव किंवा औचित्‍याचा प्रश्‍न म्‍हणून सहभागी होणे वेगळे. पण आम्‍ही तुमच्‍यातलेच हे दाखवण्‍यासाठी स्‍वतःच गणपती बसविण्‍यासारखे प्रकार तो करतो. जसजसा आर्थिक स्‍तर बदलेल, जसजसे घर अनेक खोल्‍यांचे होत जाईल, तसतसा बाबासाहेबांचा फोटोही हॉलमधून बेडरुमध्‍ये आणि नंतर तेथूनही दिसेनासा होतो. हा शिक्षित मध्‍यमवर्ग आपल्‍या नेत्‍यांचे राजकारण दुरुस्‍त करण्‍याचा आग्रह धरण्‍याऐवजी संधी मिळताच तो स्‍वतःच त्‍याचा वाटेकरी होतो. आपल्‍या व्‍यवहाराचे ढोंगी समर्थन करतो. आंबेडकरी चळवळीवरची ही साय दिवसेंदिवस दाट होत चालली आहे. आंबेडकरी चळवळीच्‍या दिशाहिनतेत त्‍यामुळे भर पडते आहे.

आंबेडकरी चळवळीचे भवितव्‍य धोक्‍यात आहे, ही चिंतेची बाब आहे. आणि त्‍याहून चिंतेची बाब म्‍हणजे युवा पिढीला या धोक्‍याची जाणीवच नसणे ही आहे.

यावर उपाय काय ?

ज्‍यांना हे कळते, असे अनेक कार्यकर्ते आजही आंबेडकरी तसेच अन्‍य पुरोगामी चळवळीत आहेत. आंबेडकरी समाजाने आपली मूळ उमेद पुन्‍हा जागवावी, खरेखुरे आंबेडकरी कार्यकर्त्‍याचे नवे तेजोमयी व्‍यक्तित्‍व घडवावे, पहिल्‍यापेक्षा अधिक व्‍यापक जाणीव घेऊन क्रियाशील व्‍हावे, यासाठी या जाणत्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रयत्‍न करावयास हवेत. परिस्थितीच्‍या रेट्याची वाट न बघता एकएका कार्यकर्त्‍याशी संवाद केला पाहिजे. काही किमान सहमतीच्‍या मुद्द्यांवर हालचाली सुरु केल्‍या पाहिजेत. रिपब्लिकन पक्ष नाम के वास्‍ते का होईना आज एकवटला आहे. त्‍याला योग्‍य दिशा देण्‍याचा प्रयत्‍न व्‍हायला हवा. ही दिशा कोणती हे फार शोधण्‍याची गरजच नाही. आता तरी बाबासाहेबांनी त्‍यांच्‍या खुल्‍या पत्रात मांडलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्‍पना पुरेशी आहे. आधी तिथवर पोहोचणे आवश्‍यक आहे. मग त्‍याचा विकास करता येईल.

काय आहे ही संकल्‍पना ?

लोकशाही रचनेत लोकशाहीच्‍या रक्षणासाठी प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणे (खरा रिडालोस), ही तळमळ त्‍यात आहे. त्‍यात कोठेही एकजातीयता, विशिष्‍टता नाही, तर समष्‍टीच्‍या समग्र कल्‍याणाचा घोष त्‍यात आहे. केवळ बौद्धांचा पक्ष असे जे संकुचित स्‍वरुप आजच्‍या रिपब्लिकन पक्षाचे आहे, त्‍याचा मागमूसही बाबासाहेबांच्‍या मूळ संकल्‍पनेत नाही, किंबहुना त्‍यास पूर्ण विरोधी अशीच बाबासाहेबांची मांडणी आहे. या मांडणीबाबत आणखी काही नोंदवत राहणे, ही विनाकारण पुनरुक्‍ती ठरेल. बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्षाची संकल्‍पना स्‍पष्‍ट करणारे त्‍यांचे खुले पत्र (ज्‍याचा सगळे ऐक्‍यवादी रिपब्लिकन पुढारी उल्‍लेख करत असतात व त्‍यावर आधारित आमचे ऐक्‍य किंवा पक्ष असल्‍याचा दावा करत असतात व नेमके त्‍याच्‍या विरोधात व्‍यवहार करत असतात) जिज्ञासूंनी मुळातून वाचावे. महाराष्‍ट्र शासनाने प्रकाशित केलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन व भाषणे, खंड 20 मध्‍ये ते उपलब्‍ध आहे.

असा रिपल्किन पक्ष उभा करुन सर्व पीडितांच्‍या मुक्‍तीच्‍या कार्यक्रमावर चळवळ उभारणे व त्‍या क्रमात निवडणुका लढणे असे व्‍हायला हवे.

दुसरे म्‍हणजे, बुद्धविहार केंद्र धरुन वस्‍तीत सामाजिक ऐक्‍य उदयास आले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्‍यांचे विचार व त्‍यांनी दिलेला बौद्ध धम्‍म या सर्व गटातटांत मान्‍यता असलेल्‍या सामायिक व अत्‍यंत आदरणीय बाबी आहेत. प्रत्‍येक बौद्ध वस्‍तीत बुद्धविहार असतेच. या बुद्धविहारात त्‍या वस्‍तीतले सर्व गटातटांना मानणारे सामान्‍य लोक एकत्र येऊ शकतील. बाबासाहेब, त्‍यांचे विचार व बुद्ध धम्‍म या सामायिक बाबींबाबत अधिक समजून घेणे, आपले जाणतेपण वाढविणे व समाज म्‍हणून एक राहणे, हे होऊ शकते. अट एकच, पक्षीय किंवा गटाच्‍या राजकीय भूमिकांची या पातळीवर चर्चा न करणे. प्रत्‍येकाला राजकीय भूमिका घ्‍यायला मोकळीक ठेवणे. समान किमान भूमिकेवर आधारलेल्‍या वस्‍त्‍यांवस्‍त्‍यांमधील अशा सामान्‍यांच्‍या ऐक्‍यातूनच राज्‍यपातळीवरील टिकाऊ ऐक्‍य उदयास येऊ शकेल. अत्‍याचार करु धजणा-यांना या ऐक्‍याचा निश्चितच धाक राहील व राजसत्‍तेलाही या ऐक्‍याची पदोपदी दखल घ्‍यावी लागेल.

असे आणखी अनेक उपाय असू शकतात. अशा उपायांनीच आंबेडकरी चळवळीचे आणि पर्यायाने एकूण पुरोगामी चळवळीचे भवितव्‍य सुरक्षित करता येईल.

- सुरेश सावंत

मार्च 2010 च्‍या ललकारीच्‍या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख

Thursday, September 23, 2010

गोदामे ओसंडतात-धान्‍य सडते; मात्र रेशनवर धान्‍य नाही गरिबांची ही चेष्‍टा रा.लो.आ. जावून सं.पु.आ. आले तरी अजूनही चालूच


धान्‍य गोदामात सडण्‍याऐवजी ते गरिबांना अल्‍प दरात अथवा मोफत वाटा, असा सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश, न्‍यायालयाचा हा आदेश नसून सल्‍ला आहे व त्‍याप्रमाणे धान्‍य मोफत वाटणे व्‍यवहार्य नाही, ही शरद पवारांची प्रतिक्रिया, त्‍यानंतर न्‍यायालयाने हा आमचा सल्‍ला नसून आदेश आहे, असे फटकारणे, पुन्‍हा पंतप्रधानांनी शरद पवारांच्‍या विधानास अधोरेखित करणे...यांमुळे प्रसारमाध्‍यमे व संसदेत जो गदारोळ झाला, ज्‍या चकमकी झडल्‍या त्‍यामुळे रेशनचा दुर्लक्षित प्रश्‍न चर्चेत तरी आला. यासाठी तरी या घटनांना धन्‍यवादच दिले पाहिजेत.

आता प्रश्‍न आहे तो ह्या चकमकी नुसत्‍याच डोळे दीपवणार की पुढची वाट स्‍पष्‍ट करणार हा. चकमकी बंद झाल्‍या की पुन्‍हा पहिल्‍यासारखाच अंधार, असे होता कामा नये. यासाठीच खूप लांबची नाही, मात्र त्‍या दिशेने जाणारी ताबडतोबीची वाट स्‍पष्‍ट करण्‍याचा हा एक प्रयत्‍न.

प्रथम सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाची पार्श्वभूमी पाहू.

केंद्र व राज्‍य सरकारांच्‍या ताब्‍यातील सर्व गोदामे मिळून धान्‍य ठेवण्‍याची क्षमता 280 लाख टन एवढी आहे. प्रत्‍यक्षात शेतक-यांकडून किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी केलेले धान्‍य 610 लाख टनांवर गेले. एवढे धान्‍य गोदामात ठेवायला जागा नाही. साहजिकच साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक झालेले धान्‍य बाहेर उघड्यावर ठेवले गेले. त्‍यापैकी गेल्‍या महिन्‍यापर्यंत 168 लाख टन धान्‍य सडून फुकट गेले. (हा लेख लिहीपर्यंत हा आकडा आणखी वाढला असणार.) या सडलेल्‍या धान्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठीही मोठा खर्च येणार आहे. एकीकडे धान्‍य सडते आहे व दुसरीकडे रेशनवर धान्‍य नाही, हा विरोधाभास संतापजनक व गरिबांची चेष्‍टा करणारा आहे. या विरोधाभासाकडे लक्ष वेधणा-या याचिकेवर सर्वोच्‍च न्‍यायालयाने असा आदेश दिला की, जादा झालेले हे धान्‍य गोरगरिबांना अधिक प्रमाणात, स्‍वस्‍तात किंवा मोफत वाटावे.

परंतु, सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या सल्‍ल्याप्रमाणे हे धान्‍य मोफत वाटणे व्‍यवहार्य नाही, असे विधान करुन सर्वोच्‍च न्‍यायालयाचा हा आदेश केंद्रीय अन्‍न मंत्री शरद पवार यांनी प्रारंभी उडवून लावला. तथापि, न्‍यायालयाने दुस-या सुनावणीत तो सल्‍ला नसून आदेश असल्‍याची कानउघाडणी केल्‍यावर शरद पवार नरमले व लोकसभेत विरोधकांनी केलेल्‍या गदारोळाच्‍या पार्श्‍वभूमीवर आम्‍ही न्‍यायालयाच्‍या आदेशाच्‍या अंमलबजावणीसाठी योजना आखू असे त्‍यांनी सभागृहाला आश्‍वासन दिले. शरद पवारांच्‍या या आश्‍वासनानंतर आधीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही याच आशयाचे विधान केले. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशात व्‍यक्‍त करण्‍यात आलेल्‍या चिंतेचा आम्‍ही जरुर आदर करतो, तथापि, धोरण ठरविणे हे सरकारचे काम असते, त्‍यात सर्वोच्‍च न्‍यायालयाने हस्‍तक्षेप करु नये, असाही शेरा पंतप्रधानांनी मारला. गोंधळाला परत सुरुवात झाली.

लोकांनी निवडून दिलेल्‍या प्रतिनिधींनाच धोरण ठरविण्‍याचा अधिकार असला पाहिजे, हे अगदी योग्‍य आहे. तथापि, जनतेचे घटनात्‍मक अधिकार धोक्‍यात येत असतील, तर त्‍याविषयी आपले मत तसेच आदेश देण्‍याचा सर्वोच्‍च न्‍यायालयाला जरुर अधिकार आहे. अन्‍न खात्‍याचे मंत्री म्‍हणून शरद पवार व पंतप्रधान म्‍हणून मनमोहन सिंग यांना गोदामात धान्‍य सडते आहे व असंख्‍य गरजवंतांना रेशनवर ते मिळत नाही, ही अवस्‍था सर्वोच्‍च न्‍यायालयाने आदेश देईपर्यंत का कळली नव्‍हती, असा प्रश्‍न पडतो. या स्थितीवर मार्ग काढण्‍याच्‍या हालचाली सुरु करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाची सरकारने वाट का पाहिली? सर्वोच्‍च न्‍यायालयाने असा आदेश दिला नसता, तर सरकारही शिथील राहिले असते, असाच याचा अर्थ होतो. म्‍हणूनच, शरद पवार किंवा मनमोहन सिंग या दोहोंचे सर्वोच्‍च न्‍यायालयाबाबतचे उद्गगार गैर व निषेधार्ह आहेत.

सरकार असे वागते, यामागे केवळ अनास्‍था, गैरव्‍यवस्‍थापन हीच कारणे असतात, असे नाही. याहून काही गंभीर कारणे असू शकतात.

आज गोंधळ घालणा-या व शरद पवारांचा राजिनामा मागणा-या भाजपचा इतिहास यापेक्षा वेगळा नाही. तो अधिकच गंभीर आहे.

2001 साली अटलबिहारी वाजपेयींच्‍या नेतृत्‍वाखालील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्‍या काळातही अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्‍यावेळी आजच्‍यापेक्षाही जादा धान्‍य (664 लाख टन) गोदामात साठले होते. तेव्‍हाही ते सडत होते. सडणा-या धान्‍याच्‍या विल्‍हेवाटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जात असल्‍याच्‍या बातम्‍या त्‍यावेळी वर्तमानपत्रात येत होत्‍या. सरकारच्‍या अन्‍न अनुदानात कपात करण्‍यासाठी म्‍हणून एपीएल (दारिद्र्यरेषेच्‍यावरील) रेशनकार्डधारकांना अनुदानित धान्‍य न देता सरकारला खरेदी ते वितरणापर्यंत येणा-या प्रत्‍यक्ष खर्चावर आधारित हे दर असतील व त्‍याच्‍या निम्‍म्या दरात बीपीएलच्‍या (गरिबीरेषेच्‍या खालील) रेशनकार्डधारकांना धान्‍य देण्‍यात येईल, असे धोरण त्‍यावेळी सरकारने घेतले होते. या धोरणामुळे महाराष्‍ट्रात तर त्‍यावेळी अभूतपूर्व अशी स्थिती तयार झाली होती. रेशनवर एपीएलसाठीचा गहू 10.55 रु. तर तांदूळ 13.90 रु. प्रति किलो मिळणार असे जाहीर झाले. खुल्‍या बाजारात हेच भाव अनुक्रमे 8 रु. व 11 रु. असे होते. खुल्‍या बाजारात स्‍वस्‍त व रेशनवर महाग हा चमत्‍कार त्‍यावेळी झाला. (धान्‍याची खरेदी ते वितरण या दरम्‍यानचा सरकारी यंत्रणेचा हत्‍ती पोसण्‍याची व भ्रष्‍टाचाराची ती करामत होती.) काळ्या बाजारात विकण्‍यासाठी रेशन दुकानदारांनाही धान्‍य स्‍वस्‍तात मिळावे लागते. तेच महाग म्‍हटल्‍यानंतर हे दुकानदार गोदामांतून धान्‍य उचलेनासे झाले. परिणामी, धान्‍यसाठा वाढत गेला. सरकारच्‍या अनुदानात कपात झालीच नाही. उलट जादा धान्‍याची साठवणूक व विल्‍हेवाट लावण्‍यासाठी 1100 कोटी रुपये अधिकच लागले. कामासाठी अन्‍न योजनेसाठी तसेच गरजवंत एपीएल (दारिद्र्यरेषेच्‍यावरील) रेशनकार्डधारकांना बीपीएलच्‍या (गरिबीरेषेच्‍या खालील) दराने दिले तरी सरकारचा खर्च वाचेल, असे अनेक तज्‍ज्ञांनी त्‍यावेळी सरकारला सांगितले. केरळ व महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी (सेना-भाजप युतीचे नारायण राणे त्‍यावेळी मुख्‍यमंत्री होते) आम्‍हाला हे धान्‍य बीपीएलच्‍या दराने द्या, आम्‍ही राज्‍यातील गरजू एपीएल कार्डधारकांसाठी त्‍याचा वापर करु, अशी मागणीही केली. तथापि, ही मागणी मान्‍य न करता गरजू लोकांना धान्‍य न देता बीपीएलपेक्षा कमी दरात ते निर्यात केले गेले. काही धान्‍य मुक्‍त विक्री योजनेखाली देशातील व्‍यापा-यांना देण्‍यात आले. गोरगरीब जनतेला उपाशी ठेवून निर्यातदार व देशांतर्गत व्‍यापा-यांचे भले तत्‍कालीन सरकारने केले. त्‍यावेळीही सर्वोच्‍च न्‍यायालयाने आजच्‍याप्रमाणेच सरकारला खडसावले होते व अन्‍न अधिकाराच्‍या योजना परिणामकारकपणे अंमलात आणण्‍याचा आदेश दिला होता.

रेशनवर धान्‍य पुरेसे व स्‍वस्‍तात उपलब्‍ध असले की बाजारभावांवर नियंत्रण राहते. रेशनचा तो एक प्रमुख उद्देश आहे. म्‍हणूनच रेशनवर धान्‍य कमी द्यायचे किंवा द्यायचेच नाही, असे धोरण जाणीवपूर्वक व्‍यापा-यांच्‍या हितासाठी घेतले जाते. रेशनव्‍यवस्‍था मजबूत करण्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यामागे आज सरकारमधील काहींचा असा उद्देश नक्‍की असू शकतो.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आजच्‍या आदेशाच्‍या पार्श्‍वभूमीवर रेशनव्‍यवस्‍थेकडे प्रसारमाध्‍यमे, मध्‍यमवर्ग, विरोधी राजकीय पक्ष यांचे लक्ष वेधले गेले आहे. या वातावरणाचा उपयोग करुन तज्‍ज्ञांनी, कार्यकर्त्‍यांनी तसेच संघटनांनी आपले रास्‍त प्रश्‍न व उपाययोजना समाज, प्रसारमाध्‍यमे, विरोधी पक्ष व सरकार यांच्‍यापर्यंत पोहो‍चविल्‍या पाहिजेत. सामान्‍य लोकांचा रेशनव्‍यवस्‍था मजबूत करण्‍यासाठी संघटित दबाव तयार केला पाहिजे.

गोदामात साठलेल्‍या जादा धान्‍याचा वापर करुन महाराष्‍ट्रातील रेशनव्‍यवस्‍था मजबूत करण्‍यासाठी पुढील उपाययोजनांची मागणी करायला हवीः

1. केशरी कार्डधारकांसाठी सरकारने जाहीर केल्‍याप्रमाणे 35 किलो धान्‍य दरमहा द्याः महाराष्‍ट्रात दारिद्र्यरेषेखालच्‍यांना पिवळी कार्डे देण्‍यासाठीची उत्‍पन्‍नमर्यादा 1997 साली प्रति कुटुंब प्रति वर्ष 15000 रु. (मासिक 1250 रु.) इतकी अल्‍प ठेवण्‍यात आली होती. आज 13 वर्षांनंतरही ती तेवढीच आहे. याचा एक परिणाम म्‍हणून, आज मुंबईत 1 टक्‍क्यापेक्षाही कमी लोकांकडे पिवळी कार्डे आहेत. याचा अर्थ, मुंबईत 1 टक्‍क्‍यापेक्षा अधिक गरीबच नाहीत, असा होतो. परिणामी, गरिबीरेषेच्‍या वरच्‍यांना मिळणारे केशरी कार्डच बहुसंख्‍यांकडे असल्‍याने व त्‍यांना वरुन उपलब्‍ध झाले तरच धान्‍य देऊ अशी महाराष्‍ट्र सरकारची भूमिका असल्‍याने महाराष्‍ट्रात केशरी कार्डधारकांना जवळपास अजिबात धान्‍य मिळत नाही, अशी स्थिती आहे. दारिद्र्यरेषेच्‍या व्‍याख्‍येत कोणताही बदल न करणा-या सत्‍ताधा-यांना तसेच या बदलासाठी आवाज न उठवणा-या विरोधी पक्षांना ही लाजिरवाणी बाब आहे. या केशरी कार्डधारकांना 35 किलो धान्‍य ठरलेल्‍या दरात (गहू 7.20 रु. प्रति किलो व तांदूळ 9.60 रु. प्रति किलो) दरमहा देण्‍यासाठी केंद्राच्‍या गोदामात साठलेले धान्‍य राज्‍याकडे पाठवा, अशी मागणी या सर्वांनी करायला हवी व केंद्राला ते पाठवण्‍यास भाग पाडले पाहिजे. राज्‍यात कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीचे सरकार आहे व केंद्रातही त्‍यांचेच सरकार आहे. रेशनचे खाते तर राज्‍यात व केंद्रात राष्‍ट्रवादीकडेच आहे. केंद्रातले रेशनचे मंत्री शरद पवार हे महाराष्‍ट्रातील फार मोठे नेते आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही मागणी मान्‍य होण्‍यास खरे म्‍हणजे जड जाऊ नये.

2. 65 वर्षांच्‍या वरील निराधार व्‍यक्‍तींना लागू असलेल्‍या अन्‍नपूर्णा योजनेखाली दरमहा 10 किलो धान्‍य मोफत मिळते. त्‍यात 15 किलोची वाढ करुन ते दरमहा 25 किलो करण्‍यात यावे.

3. दरमहा 35 किलो धान्‍य अंत्‍योदय योजनेखाली गहू 2 रु. प्रति किलो व तांदूळ 3 रु. प्रति किलो या दराने तर बीपीएल योजनेखाली गहू 5 रु. प्रति किलो व तांदूळ 6 रु. प्रति किलो या दराने देणे सरकारला बंधनकारक आहे. तरीही राज्‍यात काही ठिकाणी यापेक्षा कमी प्रमाणात धान्‍य दिले जाते. गोदामात जादा साठलेल्‍या धान्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर या दोन्‍ही योजनांखाली 15 किलो अतिरिक्‍त धान्‍य देऊन त्‍यांचे दरमहा 35 किलोऐवजी 50 किलो धान्‍य हे प्रमाण करण्‍यात यावे.

4. वास्‍तव्‍याचे पुरावे नसल्‍याचे कारण सांगून हजारो गोरगरीब आज रेशनच्‍या कक्षेबाहेर ठेवण्‍यात आले आहेत. यात हातावर पोट असलेले मोलमजुरी करणारे असंघटित कामगारच प्रामुख्‍याने आहेत. अशांना रेशनकार्डे देण्‍याची खास मोहीम सरकारने आखली पाहिजे. आपल्‍या कार्यालयाच्‍या कक्षेत अशी एकही व्‍यक्‍ती रेशनपासून वंचित राहू नये, यासाठी रेशन अधिका-यांना व्‍यक्तिशः जबाबदार धरण्‍यात यावे.

5. कचरा वेचक, सायकल रिक्‍शावाले, हातगाडी ओढणारे हमाल इ. ना अंत्‍योदय योजनेत समाविष्‍ट करण्‍याबाबतचा शासन निर्णय (जी.आर.) निघून बरीच वर्षे झाली, तरी अजून त्‍याची अंमलबजावणी झालेली नाही. ही अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे. त्‍याचीही खास मोहीम घेतली पाहिजे.

6. दारिद्र्यरेषेची न्‍याय्य व्‍याख्‍या ठरविण्‍याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करायला हवी. तोपर्यंत एखादे काम व अथवा वास्‍तव्‍य गरीबच करतात, हे उघडपणेच कळते, अशा लोकांना सरसकट बीपीएल अथवा अंत्‍योदय योजनेत समाविष्‍ट करावे. वर उल्‍लेख केलेले, असंघटित कामगार, नाका कामगार, बांधकाम मजूर, सायकल रिक्‍शावाले तसेच मोलकरणी, फूटपाथवर राहणारे, गावाच्‍या बाहेर पाले टाकून राहणारे, अगदी कच्‍च्‍या घरांत राहणारे इ. बाबत ही पद्धत अवलंबता येईल.

7. रेशनची अत्‍यंत गरज असलेल्‍या वरील गरीब समूहांबरोबर अनेक सामाजिक संघटना काम करत असतात. अशा गरीब कुटुंबांची निवड व त्‍यांना रेशनकार्डांचे वाटप यासाठी सरकारला अशा संघटनांचे सहाय्य घेता येईल.

8. पंजाब, हरयाणा व उत्‍तरप्रदेश यांमधूनच प्रामुख्‍याने गहू-तांदूळ खरेदी केला जातो. त्‍याऐवजी त्‍या त्‍या राज्‍यात खाल्‍ले जाणारे सर्वसामान्‍यांचे धान्‍य (ज्‍वारी-बाजरी-नागली इ.) त्‍या त्‍या राज्‍यातील शेतक-यांकडून खरेदी केले जावे, त्‍यांची तिथेच साठवणूक करावी व तेथेच वितरण करावे, ही रेशनच्‍या विकेंद्रीकरणाची मागणी केंद्राकडे करायला हवी.

9. महाराष्‍ट्राने यासाठी नमुना घालून द्यावा. ज्‍वारी-बाजरीपासून दारु गाळण्‍यासाठी 36 कारखान्‍यांना (ज्‍यांचे प्रत्‍यक्ष अप्रत्‍यक्ष मालक राजकारणी नेते आहेत) परवानगी महाराष्‍ट्र सरकारने दिली आहे. त्‍यासाठी दरवर्षी 1000 कोटी रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. याचा अर्थ, धान्‍यापासून दारु तयार करण्‍याइतकी ज्‍वारी-बाजरी महाराष्‍ट्रात आहे व अनुदान देण्‍याची ताकदही आहे. म्‍हणूनच, धान्‍यापासून दारु तयार करण्‍याचे हे परवाने ताबडतोब रद्द करुन हे धान्‍य रेशनवर अनुदानित दरात द्यावे. दारुने संसार उध्‍वस्‍त होण्‍यास हातभार लागण्‍यापेक्षा गरिबांच्‍या पोटात हे धान्‍य जाईल व राज्‍यातील आत्‍महत्‍या करणा-या सामान्‍य शेतक-यांनाही भाव मिळेल.

अशा काही ठोस मागण्‍यांसाठी आग्रह धरण्‍यानेच रेशनच्‍या मजबुतीची वाट स्‍पष्‍ट होईल. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाने उठलेली चकमक पुन्‍हा विझून जाऊ नये, याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया.

- सुरेश सावंत

रेशन आघाडीवरील सरकारचा मला आलेला अनुभव


माझी आघाडी रेशनिंग कृती समिती. रेशनसंबंधीच्‍या केंद्र व राज्‍य सरकारच्‍या अनुभवासंबंधात नवे पर्वत मी सतत लिहीत आलो आहे. अगदी अलिकडे म्‍हणजे गेल्‍या अंकात अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याच्‍या निर्मितीतील संघर्ष हा लेख आहे तर याच अंकात गोदामांत धान्‍य सडण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवरील गोदामे ओसंडतात-धान्‍य सडते; मात्र रेशनवर धान्‍य नाही, गरिबांची ही चेष्‍टा रा.लो.आ. जावून सं.पु.आ. आले तरी अजूनही चालूच अशा दीर्घ शीर्षकाचा लेख आहे. या दोन तसेच आधीच्‍या लेखांतून तपशील खूप आलेले आहेत. त्‍यांची पुनरुक्‍ती करणे म्‍हणजे एक प्रबंधच होईल. अर्थातच तसे करणे अनावश्‍यक आहे. खाली काही अनुभवाची सूत्रे व संदर्भासाठी म्‍हणून काही तपशील देत आहे.

65 साली प्रमुख शहरांत सुरु झालेली रेशनची व्‍यवस्‍था 70 च्‍या दशकात देशभर पसरली. त्‍यावेळच्‍या धान्‍य टंचाईच्‍या पार्श्‍वभूमीवर ही रेशन व्‍यवस्‍था सार्वत्रिक होती. म्‍हणजे सर्वांना सारख्‍या प्रमाणात सारख्‍या दरात धान्‍य मिळत होते. सर्वसामान्‍यांना निश्चित दरात निश्चित प्रमाणात धान्‍य पुरवठा व बाजारातील भावांवर नियंत्रण या प्रमुख उद्देशांबरोबरच शे‍तक-यांना किमान आधारभूत किंमत व आपत्‍तीकाळासाठी धान्‍यसाठा हेही उद्देश रेशन व्‍यवस्‍थेत अंतर्भूत होते. हरितक्रांतीनंतर धान्‍यटंचाई संपली व बाजारात धान्‍य उपलब्‍ध झाले तसेच बाजारातील हे धान्‍य खरेदी करु शकणारा मध्‍यमवर्ग देशात वाढू लागला. या पार्श्‍वभूमीवर रेशनची व्‍यवस्‍था सार्वत्रिकतेकडून लक्ष्‍याधारित करण्‍याचे धोरण तिस-या आघाडीच्‍या काळात 1997 साली घेतले गेले.

गरिबांना अधिक स्‍वस्‍तात व अधिक प्रमाणात व इतरांना आंशिक अनुदानात रेशन देण्‍याचे धोरण तत्‍त्‍वतः योग्‍य होते. प्रत्‍यक्षात मात्र गरीब ठरवण्‍यात मोठे घोळ घातले गेले. या घोळामागे गरीब कमी दाखवण्‍यासाठी धोरणात्‍मक तसेच प्रशासकीय ढिसाळपणा, यंत्रणा व दुकानदार यांचा भ्रष्‍टाचार व स्‍थानिक राजकीय हितसंबंध अशी अनेक कारणे आहेत.

महाराष्‍ट्र राज्‍यासाठी 65 लाख कुटुंबांचे लक्ष्‍य बीपीएल कार्डांसाठी केंद्र सरकारने दिले होते. ते पूर्ण करताना शहरात 15000 रु. तर खेड्यात 4000 रु. वार्षिक दारिद्र्यरेषा ठरविण्‍यात आली. पुढे आंदोलने झाल्‍यानंतर ती सरसकट 15000 रु. ठेवण्‍यात आली. ग्रामीण भागातील 1997 सालच्‍या दारिद्र्यरेषा यादीतील 15000 रु. पर्यंतच्‍या लोकांना पिवळे कार्ड द्यायचे असे ठरवण्‍यात आले. शहरात मात्र अशी यादीच नसल्‍याने अर्जदाराने लिहून दिलेल्‍या अर्जाची तपासणी करुन अधिका-यांनी निर्णय घ्‍यायचा असे ठरवण्‍यात आले. ही उत्‍पन्‍न मर्यादा व पद्धती ठरवण्‍यात कोणताच शास्‍त्रीय आधार घेण्‍यात आला नाही. यावेळी सेना-भाजप युतीचे सरकार होते. पुढच्‍या कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या सरकारांनीही यात आजतागायत काहीही बदल केलेला नाही. युतीच्‍या काळातील मंत्र्यांनी शिष्‍टमंडळाच्‍या भेटींमध्‍ये जी काही थोड्या प्रमाणात संवेदनशीलता दाखवली तेवढी एक दत्‍ता मेघे वगळता पुढच्‍या कोणत्‍याच कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या मंत्र्यांनी दाखवली नाही.

रेशनव्‍यवस्‍था लक्ष्‍याधारित जर आहे, तर असंघटित कामगार, कचरा वेचक, सायकल रिक्‍शावाले, फुटपाथवर राहणारे, नाका कामगार, मोलकरणी, आदिम जमाती, भटक्या जमाती असे गरीब विभाग रेशनव्‍यवस्‍थेत आणण्‍याचे जाणीवपूर्वक प्रयत्‍न केंद्र व राज्य सरकारांनी करायला हवे होते. परंतु, लक्ष्‍याधारित रेशनव्‍यवस्‍था झाल्‍यानंतर 2000 साली आलेल्‍या भाजपच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने याबाबत पूर्ण अनास्‍था दाखवली. गोदामात अतिरिक्‍त साठलेले धान्‍य निर्यात करुन व्‍यापा-यांचे हित केले, हे सोबतच्‍या लेखात आहेच. तथापि, या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्‍च न्‍यायालयाने आदेश दिल्‍यावर वर उल्‍लेख केलेल्‍यांपैकी काही विभागांना अंत्‍योदय योजनेत समाविष्‍ट करण्‍याचा निर्णय वाजपेयी सरकारने घेतला व त्‍यासाठीचा लक्ष्‍यांकही वाढवला. महाराष्‍ट्रात आजतागायत राज्‍याचाही शासन निर्णय असताना आदिम जमातीतील सर्व कुटुंबे अंत्‍योदयमध्‍ये नाहीत. कचरा वेचक, सायकल रिक्‍शावाले यांनाही विभाग म्‍हणून अंत्‍योदयची कार्डे दिलेली नाहीत. बीपीएलचीही नाहीत. काहींकडे एपीएलची तर असंख्‍यांना कार्डेच नाहीत. अशा दुर्बल विभागांना रेशनव्‍यवस्‍थेत समाविष्‍ट करण्‍याबाबत केंद्रातील भाजपचे सरकार व महाराष्‍ट्रातील आतापर्यंतची सर्व सरकारे ठार संवेदनशील राहिली आहेत.

संपुआ 1 सत्‍तेवर आल्‍यावर केंद्रात काही अनुकूल गोष्‍टी घडायला थोडीशी सुरुवात झाली. ज्‍या नंगेपणाने भाजप सरकार व्‍यापा-यांचा पक्षपात करत होते, त्‍यात घट झाली. एपीएलवाल्‍यांनाही अनुदान सुरु झाले. आज गहू 7.20 रू. व तांदूळ 9.60 रु. हे दर राज्‍यातील कार्डधारकांसाठी आहेत. खुल्‍या बाजाराच्‍या तुलनेत ते निम्‍म्‍याने कमी आहेत. तथापि, संपुआ 1 च्‍या काळात गोदामातील धान्‍याची उपलब्‍धता प्रारंभी कमी असल्‍याने (आधीच्‍या भाजप सरकार ते निर्यात करुन मोकळे झाले होते) राज्‍यांना एपीएलचा कोटा गरजेपेक्षा खूपच कमी पाठवण्‍यात येत होता. गत 3 वर्षाच्‍या उचलीच्‍या सरासरीवर हे प्रमाण आधारण्‍याचे धोरण स्‍वीकारल्‍याने ज्‍या दक्षिणेतल्‍या राज्‍यांची रेशन यंत्रणा पारंपरिकरित्‍याच मजबूत होती, त्‍यांची सरासरी अधिक निघाली व त्‍यांना कोटा अधिक जाऊ लागला. बिहारसारख्‍या गरीब राज्‍यात वर्षाला प्रतिव्‍यक्‍ती 6 किलो तर केरळमध्‍ये 60 किलो असा विरोधाभास तयार झाला. तो अजूनही पुरता दुरुस्‍त झालेला नाही. काही राज्‍यांनी जोरदार पाठपुरावा करुन आपला असलेला वाटा पुरतेपणी मिळवला. महाराष्‍ट्र सरकार मात्र कायम ढिम्‍म राहिले. आपल्‍या वाट्याचा बीपीएलचा कोटाही जो 100 टक्‍के द्यायला केंद्र बांधील आहे, तोही प्रारंभी निम्‍माच उचलत असे. पुढे तो 80 टक्‍क्यांपर्यंत गेला.

छत्‍तीसगढ सरकारने आपल्‍या राज्‍यांत ज्‍या लक्षणीय सुधारणा केल्‍या आहेत, त्‍यातील काही सुधारणा इथल्‍या आमच्‍या आंदोलनांनंतर जे जी.आर. निघाले (पण नीटपणे अंमलात आले नाहीत) त्‍यांच्‍या आधारावर करण्‍यात आल्‍या. याबद्दल तिथले कार्यकर्ते व अधिकारीच बोलतात. छत्‍तीसगढच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी देशातल्‍या सर्व राज्‍यांच्‍या अन्‍न खात्‍यांच्‍या प्रधान सचिवांना आपल्‍या राज्‍यात एका परिषदेसाठी बोलावले होते. आम्‍ही केलेल्‍या सुधारणा पहा, त्‍यात आम्‍हाला सूचना करा, असे त्‍यांनी आवाहन केले होते. महाराष्‍ट्राच्‍या अधिका-यांना खास भेटून तुम्‍ही कसे जाणे आवश्‍यक आहे, हे सांगण्‍याचा आम्‍ही खूप प्रयत्‍न केला. परंतु, त्‍याला त्‍यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. ते गेलेही नाहीत. आम्‍हा काही कार्यकर्त्‍यांनाही मुख्‍यमंत्री रमणसिंग यांनी बोलावले होते. परिषदेनंतर कार्यकर्त्‍यांना त्‍यांनी घरी भोजनासाठीही निमंत्रित केले होते. निरोप देताना 10 किलो तांदळाची प्रत्‍येकाला भेटही दिली. हे विस्‍ताराने यासाठी सांगितले की, ही संवेदनशीलता, याबाबतीतील इच्‍छाशक्‍ती महाराष्‍ट्राच्‍या राज्‍यकर्त्‍यांमध्‍ये शून्‍य आहे. गेल्‍या 2 महिन्‍यांपूर्वी काही अधिकारी मंडळी छत्‍तीसगढला जाऊन आल्‍याचे कळते.

राज्‍यातील रेशनव्‍यवस्‍थेचे संगणकीकरण करण्‍याची पहिली घोषणा 2005 साली झाली. त्‍याची कन्‍सल्‍टन्‍सी एका कंपनीला देऊन झाली, त्‍यानंतर सगळ्यांकडून पुन्‍हा नव्‍या कार्डासाठीचे फॉर्म्‍स भरुन घेण्‍यात आले. पुढे हे काहीच झाले नाही. कोट्यवधी रुपये व श्रम वाया गेले (अथवा मधल्‍या काहींनी खाल्‍ले). आता पुन्‍हा फॉर्म भरण्‍याचा प्रयोग करण्‍यात आला. तोही जवळपास वाया जाणार आहे. त्‍याची कोणतीही पूर्वतयारी नसल्‍याने त्‍या फॉर्मचे करायचे काय, याचे कोणालाच काही मार्गदर्शन नाही. आता नंदन नीलकेणींच्‍या एकमेवाद्वितीय ओळख क्रमांकाशी (युआयडी) सांगड घालून बायोमेट्रिक रेशन कार्ड मार्च 2011 मध्‍ये सर्वांना मिळणार असे जाहीर झाले आहे. त्‍याचे सर्वेक्षण नोव्‍हेंबरमध्‍ये सुरु होणार आहे. ही योजना वरुनच असल्‍याने व सोनिया गांधींचा वैयक्तिक व जोरदार पुढाकार असल्‍याने ती अंमलात येण्‍याची शक्‍यता दिसते आहे.

पंचमढीला कॉंग्रेसच्‍या अधिवेशनातील ठराव तसेच सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश या पार्श्‍वभूमीवर बचत गटांना रेशनकार्डे देण्‍याचा क्रांतिकारी निर्णय राज्‍य सरकारने 2006 साली सावित्रीबाई फुलेंच्‍या जयंतीच्‍या दिवशी 3 जानेवारी रोजी घेतला. त्‍याचा त्‍या तारखेचा शासन निर्णयही निघाला. रेशन दुकानदार कोर्टात गेले. त्‍यांनी स्‍थगिती आणली. न्‍यायालयाने निर्णय देण्‍याच्‍या आधीच सर्वपक्षीय आमदारांच्‍या दबावाखाली सरकारने हा निर्णय माघारी घेतला. सुधारित निर्णय केवळ बंद पडलेल्‍या दुकानांबाबत घेतला. पण दुकान परवडण्‍यासाठीच्‍या तरतुदी काढून घेतल्‍या. त्‍यालाही स्‍थगिती आली. आता ती उठली. ज्‍यांना ही दुकाने मिळणार आहेत, अथवा मिळाली आहेत, ते बचतगट दुकाने परवडण्‍याची काहीच व्‍यवस्‍था नसल्‍याने पारंपरिक गैर व्‍यवहारांना बळी पडत आहेत. काहींच्‍या नावाने खाजगी दुकानदारच ती चालवत आहेत. अशारीतीने सरकारचा क्रांतिकारी निर्णय त्‍यांनी स्‍वतःच मोडीत काढला. सरकारबरोबरच यास सर्वपक्षीय राजकारणीही तेवढेच जबाबदार आहेत. छत्‍तीसगढमध्‍येही बचत गटांना रेशन दुकाने देताना दुकानदार न्‍यायालयात गेले होते. तथापि, कॅव्‍हेट दाखल करण्‍याची जी दक्षता छत्‍तीसगढ सरकारने घेतली, ती महाराष्‍ट्र सरकारने जाणीवपूर्वक घेतली नाही.

केंद्रात संपुआ 1 च्‍या काळात राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा तयार झाला. त्‍यांत सोनिया गांधींचा वैयक्तिक पुढाकार होता. संपुआ 2 च्‍या कारकीर्दीत त्‍यांनी अन्‍नाच्‍या अधिकाराचा कायदा आणण्‍याचा केवळ मनोदय नव्‍हे, तर त्‍या हात धुवून त्‍याच्‍या मागे लागल्‍या. शरद पवारांचा विरोध, मनमोहनसिंग-अहलुवालियांचे अनुदानाच्‍या तरतुदीचे प्रश्‍न यांतून हा कायदा तुंबवायचे, लांबवायचे, पातळ करण्‍याचे जोरदार प्रयत्‍न चालू आहेत. अन्‍न खात्‍याच्‍या किंवा मंत्रिगटाच्‍या अधीन न सोडता या कायद्याचा मसुदा सोनिया गांधींनी राष्‍ट्रीय सल्‍लागार परिषदेच्‍या पहिल्‍याच बैठकीत मागवून घेतला. आता तो दुरुस्‍त करणे चालू आहे. त्‍यातही हे अंतर्गत संघर्ष व्‍यक्‍त होतात. पण सोनिया गांधींच्‍या राजकीय मान्‍यतेच्‍या व अधिकाराच्‍या बळावर हा कायदा हवा तसा नसला तरी रेशनव्‍यवस्‍थेला व अन्‍नाच्‍या अधिकाराला ब-याच प्रमाणात न्‍याय देणारा ठरेल, अशी शक्‍यता आहे. राष्‍ट्रीय स्‍तरावरील ज्‍या अभियानाशी माझा संबंध आहे, त्‍यातील काही जण राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीत आहेत. त्‍यांच्‍याकडून अंतर्गत संघर्षाचा तपशील व सोनिया गांधींची प्रबळ इच्‍छाशक्‍ती व पुढाकार समजत असतो.

इथे एक गोष्‍ट नमूद करणे आवश्‍यक आहे. आज तिथे 3 छावण्‍या दिसतात. एक, शरद पवार, दुसरी मनमोहनसिंग-अहलु‍वालिया व तिसरी, सोनिया गांधी. शरद पवार आधुनिक व मुक्‍त भांडवलशाहीचे पुरस्‍कर्ते असले तरी त्‍यांचे संघटनात्‍मक यंत्रणेतले सरंजामी संबंध सुटत नाहीत. रेशनव्‍यवस्‍था जैसे थे राहण्‍यातच त्‍यांच्‍या व कॉंग्रेसमधील तसेच अन्‍य पक्षांमधीलही रेशन दुकानदार, वाहतूकदार व नोकरशहा यांचे हितसंबंध जपले जाणार आहेत. अन्‍न महामंडळाकडील धान्‍याची आयात-निर्यात हा तर त्‍यांच्‍या व कॉंग्रेसमधील काही सोबत्‍यांच्‍या वैयक्तिक रुचीचा भाग आहे. दुस-या छावणीतल्‍या लोकांचा म्‍हणजे मनामोहनसिंग प्रभृतींचा या सरंजामी भ्रष्‍टाचाराला कडाडून विरोध आहे. या सरंजामी भ्रष्‍टाचारामुळेच सरकारची सबसिडी 9191 साली 2,850 कोटी होती ती वाढत जाऊन आता 56,000 कोटींवर पोहोचली आहे. जीडीपीच्‍या तुलनेतही हे प्रमाण अधिकच आहे. नियोजन विभागाच्‍या अधिकृत अभ्‍यास अहवालानुसार केंद्राकडून निघालेल्‍या 100 गोण्‍यांपैकी 40 गोण्‍या मध्‍येच गुल होतात. 1 रु. पोहोचवायला 4 रु. खर्च येतो. सरकार ज्‍या गरिबांसाठी धान्‍य पाठवते, त्‍यातील 50 टक्‍के लोकांना ते मिळतच नाही. या प्रश्‍नांचे काय करायचे, याबद्दल ही दुसरी छावणी प्रश्‍न उपस्थित करते व त्‍यावर आपली उपाययोजनाही सुचवत असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, फुड स्‍टँप, प्रत्‍यक्ष रक्‍कम देणे आदिंचे प्रयोग व्‍हावेत, असे त्‍यांना वाटते. पण त्‍याला एक विरोध सरंजामी भ्रष्‍टाचारी गटाकडून होतो, तर दुसरा विरोध हे जागतिक बँकेचे हस्‍तक असल्‍याने रेशन व्‍यवस्‍था नष्‍ट करणे हाच त्‍यांचा गुप्‍त हेतू असल्‍याची टीका डाव्‍या संघटनांकडून होत असते. त्‍यास काही आदर्शवादी, मानवतावादीही बळी पडत असतात. भांडवली विकासातूनच संपत्‍ती तयार होणार आहे व ती खाली झिरपणार आहे. हा विकास समावेशक असावा यासाठी विस्‍तृतपणे नव्‍या उद्योगांना लागणारी कौशल्‍यवृद्धी कामगारांमध्‍ये तयार करावी, माहिती तंत्रज्ञान तळापर्यंत पोहोचावे, पायाभूत विकास जलद होऊन बदलत्‍या अर्थव्‍यवस्‍थेत दुर्गमातील दुर्गम भागातील माणूस समाविष्‍ट झाला पाहिजे, ही त्‍यांची मनीषा आहे. उद्योगजगताला खास सवलती व संघटित कामगारांच्‍या कायदेशीर संरक्षणात कपात व गरिबांच्‍या योजनांचे अनुदान व्‍यवहार्य व परिणामकारक करणे हे याच धोरणाचा भाग आहे. संपत्‍तीचे विषम वाटप होईल. पण वंचितता, गरीबी नष्‍ट होईल या भविष्‍यावर त्‍यांचा विश्‍वास आहे. या धोरणातील मुक्‍त भांडवलशाहीकडे असलेला त्‍यांचा झोक व सोनिया गांधींचा गांधी घराण्‍यातील आम आदमीशी असलेल्‍या नात्‍याच्‍या दृढतेपोटी त्‍याच्‍या आजच्‍या संरक्षणाला प्राधान्‍य यांत एक ताण आहे. या ताणामुळेच सोनिया गांधी व त्‍यांच्‍या आधारे दुर्बलांचे संरक्षण करु इच्छिणारे अभ्‍यासक, कार्यकर्ते यांची तिसरी छावणी आहे, असे मला वाटते. या तिस-या छावणीत सहभागी असलेल्‍या आमच्‍याशी संबंधित मंडळींवर आमच्‍यातलेच अतिडावे सोनिया गांधींचे हस्‍तक म्‍हणून टीका करत असतात. सार्वत्रिक रेशनव्‍यवस्‍थेला दुस-या छावणीचा विरोध असताना, सोनिया गांधींच्‍या ताकदीचा वापर करुन प्रारंभी सर्वाधिक गरीब एक चतुर्थांश जिल्‍ह्यांत म्‍हणजे 150 जिल्‍ह्यांत रेशन व्‍यवस्‍था सार्वत्रिक करुया, इथपर्यंत सहमती आणण्‍यात जे सल्‍लागार समितीतील आमच्‍याशी संबंधित सदस्‍य त्‍यातल्‍या त्‍यात यशस्‍वी होत होते, त्‍यांच्‍यावर आमच्‍याशी संबंधित डाव्‍या विचारवंताने जोरदार व जाहीर हल्‍ला चढवला. 150 जिल्‍ह्यांची ही तडजोड अजिबात होता कामा नये, रेशन व्‍यवस्‍था संपूर्ण देशात संपूर्ण सार्वत्रिक, कुटुंबाला 90 किलो धान्‍य 2 रु. दराने देणारी अशीच असली पाहिजे, ही त्‍यांची भूमिका. या भूमिकेच्‍या मागे जनतेचे संघटनात्‍मक प्रबळ असे कोणतेच बळ नाही. 150 ची तडजोड करणा-यांमागेही नाही. संबंध राष्‍ट्रीय अन्‍न अधिकार अभियानामागेही नाही. जनतेचा प्रभावी असा कोणताच हस्‍तक्षेप नसताना अतिडावी भूमिका ही केवळ वल्‍गना ठरते. भाषा क्रांतिकारी असून चालत नाही. व्‍यवहार क्रांतिकारक असावा लागतो. राजकारणातला हा बलाबलांच्‍या हितसंबंधांच्‍या गलबल्‍यातून किती पुढे सरकता येते, हे पाहणे म्‍हणजे क्रांतिकारकत्‍व असे मला वाटते. सोनिया गांधींच्‍या व्‍यापक मान्‍यतेचा उपयोग करत मनमोहनसिंगांच्‍या दुस-या छावणीला तडजोडीसाठी खाली आणणे व शरद पवारांसारख्‍या पहिल्‍या सरंजामी छावणीला पूर्ण नमवणे हाच आमच्‍या राष्‍ट्रीय अन्‍न आघाडीचा व्‍यवहार असला पाहिजे, असे मला वाटते. डावी कर्मठता, सॅटेलाईट बुद्धिजीवी वावदूकता व साधनसामग्रीने संपन्‍न तळच्‍यांशी जबाबदार नसलेले एनजीओंचे प्रतिनिधी यांचा एकत्र काला या क्रांतिकारक व्‍यवहाराला अडथळा ठरत राहतो. तरीही यातले बहुसंख्‍य गरिबांच्‍याविषयी मनोमन आस्‍था असणारे असल्‍याने शेवटी निवेदनात कठोर डावे राहूनही व्‍यवहारात तडजोडींना अनेकदा रुकार देतात.

कधी नव्‍हे एवढी रेशन व्‍यवस्‍थेवर केंद्रात आता चर्चा होत आहेत. या सर्वांच्‍या परिणामी, रेशन व्‍यवस्‍थेला पूर्वीपेक्षा बरी अवस्‍था येणार असा माझा अंदाज आहे. कायदा झाला, नव्‍या व्‍यवस्‍था निश्चित झाल्‍या की भोंगळपणाही कमी होईल, जबाबदा-या, तक्रार यंत्रणा निश्‍चित होईल. यातून महाराष्‍ट्रातील सरकारलाही इच्‍छा असो अथवा नसो पहिल्‍यासारखे अंग झटकता येणे कठीण जाईल.

या अंतर्विरोधाचा बारकाईने विचार करुन पक्ष कार्यकर्त्‍यांना तसेच जनसंघटनेतील काडरला त्‍याचे भान देण्‍याचा प्रयत्‍न करणे व या अं‍तर्विरोधांतील कोणत्‍या शक्‍ती आपल्‍या कोणत्‍या व्‍यवहाराने बळकट होतील याची निश्चिती करणे व त्‍याप्रमाणे हस्‍तक्षेपाचा कार्यक्रम ठरवून जनतेला संघटित करणे आवश्‍यक आहे, असे मला वाटते.

वरील मांडणी हे एक प्रकारे लाऊड थिंकींग आहे, याची मला पूर्ण कल्‍पना आहे. अर्थात, पक्षात त्‍याबद्दल औपचारिक अशी चर्चा होऊन भूमिका निश्चित न झाल्‍याने आता तरी तीच मी सर्वत्र माझे मत म्‍हणून मांडत आहे. पक्ष कार्यकर्त्‍यांनी वरील मांडणीसंबंधात काही प्रश्‍न उपस्थित करावेत, वेगळे आयाम लक्षात आणून द्यावेत व त्‍यांची एकत्रित औपचारिक चर्चा व्‍हावी व त्‍या सांगोपांग चर्चेतून तयार झालेल्‍या पक्षाच्‍या अधिकृत भूमिकेचा मी वाहक व्‍हावा, यासाठी खरे तर मी आसुसलेला आहे.

- सुरेश सावंत

Wednesday, September 8, 2010

डॉ. बाबासाहेबांची एक महत्‍वाची सूचना

'जन्‍मजात पुरोहितगिरीची पद्धत बंद करुन पुरोहितांचा धंदा सर्व हिंदूंना (सर्व जातींना) खुला केला पाहिजे. जो हिंदू (कोणत्‍याही जातीचा) उपाध्‍यायाची परीक्षा उत्‍तीर्ण होईल त्‍याला पुरोहिताची सनद दिली पाहिजे.'

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, पान क्र. 280)


आता गणपतीत ब्राम्‍हण पुरोहितांना प्रचंड मागणी येणार. घरच्‍या-सार्वजनिक गणेशोत्‍सवांत आरत्‍या लोक रोज म्‍हणतात. पण खास आरत्‍यांना आणि सत्‍यनारायणाच्‍या पूजांना आवर्जून ब्राम्‍हण आणलेच जातात. बहुजनसमाजाला हा कधीही प्रश्‍न पडत नाही की ब्राम्‍हणाच्‍या हातूनच ही पूजा करणे म्‍हणजे तो सर्वश्रेष्‍ठ व आपण निम्‍नश्रेणीचे आहोत. हा आपला अपमान आपणच करुन घेतो. आपल्‍या देवाला भजण्‍यासाठी आपल्‍याला मध्‍यस्‍थाची गरजच काय, याची जाणीवच त्‍याला होत नाही. पूर्वी याबद्दल चर्चा तरी होत. आता त्‍याही बंद आहेत. आपल्‍यातले अनेक पुरोगामी देवाला मानतच नसल्‍याने ते ह्या चर्चेत पडतच नाहीत. तथापि, आपले मत तूर्त बाजूला ठेवून, गणपती मोठ्या प्रमाणात बसवले जातात, हे लक्षात घेऊन त्‍याची पूजा गणपती बसवणा-या आपणच करायला हवी, कोणी ब्राम्‍हण असता कामा नये, एवढा तरी प्रश्‍न नम्रपणे आपापल्‍या ठिकाणी आपण का उपस्थित करु नये. तो मानला जाणार नाही, हे ही उघड आहे. तरी असा काही प्रश्‍न तरी आहे, एवढे तरी पोहोचेल.

तसेच याचवेळी बाबासाहेबांनी 75 वर्षांपूर्वी आपल्‍या 'जातिनिर्मूलन' या प्रबंधात केलेली उपाध्‍यायाच्‍या परीक्षेसंबंधातली वरील सूचनाही चर्चेत आणण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे, असे मला वाटते.

.... सुरेश सावंत

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा ब्राम्‍हणच होते’ हे गिरिजा कीरांचे विधान खुद्द बाबासाहेबांनाच अमान्‍य

8 सप्‍टेंबरच्‍या लोकसत्‍तेतील एका बातमीत ठाण्‍यात होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या एक उमेदवार गिरिजा कीर यांचे म्‍हणणे उद्धृत करताना जो सहन करतो, पिळला जातो, ती व्‍यक्‍ती दलित होय तर ज्ञानाने जो परिपूर्ण असतो तो ब्राम्‍हण होय असे सांगून कीर म्‍हणाल्‍या की त्‍यादृष्‍टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा ब्राम्‍हणच होते, असे माझे मत आहे. असे नमूद केलेले आहे. याच बातमीत त्‍यांचे माझ्या विधानाचा विपर्यास करुन वाक्‍याचा पुढचा-मागचा संदर्भ गाळला गेला... असेही उद्गार उद्धृत करण्‍यात आले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनाच उद्देशून मी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली तर, त्‍याविषयीही त्‍या तसे म्‍हणू शकतील. शिवाय या आशयाचे विधान अनेक नामवंत व्‍यक्‍ती (अगदी बाबासाहेबांच्‍या काळापासून) सद्भावनेपोटी करत असतात, असेही मी गृहीत धरतो. म्‍हणूनच, कीर किंवा असे उद्गार काढणारे अन्‍य प्रतिष्ठित यांच्या हेतूबाबत शंका न घेता केवळ या विधानाबाबत खुद्द डॉ. बाबासाहेबांचे म्‍हणणे काय होते, हे त्‍यांनी समजून घ्‍यावे व अशी विधाने किमान बाबासाहेबांबाबत तरी करु नयेत, अशी विनंती करत आहे.

1935 सालच्‍या जातिनिर्मूलन (Annihilation of Caste) या आपल्‍या प्रबंधातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या संबंधातील विधाने अर्थाबद्दल कोणतीही शंका राहू नये म्‍हणून अनुवाद न करता त्‍यांच्‍याच शब्‍दांत मूळ इंग्रजीत देत आहेः

...To make it more attractive and to disarm opposition the protagonists of Chaturvarnya take great care to point out that their Chaturvarnya is based not on birth but on guna (worth). ...I do not understand why the Arya Samajists insist upon labelling men as Brahmin, Kshatriya, Vaishya and Shudra. A learned man would be honoured without his being labeled a Brahmin. A solder would be respected without his being designed a Kshatriya. If Europian Society honours its solders and servants without giving them permanent labels, why should Hindu Society find it difficult to do so is a question, which Arya Samajists have not cared to consider. …The names, Brahmin, Kshatriya, Vaishya and Shudra, are names which are associated with a definite and fixed notion in the mind of every Hindu. That notion is that of a hierarchy based on birth. So long as these names continue, Hindus will continue to think of the Brahmin, Kshatriya, Vaishya and Shudra as hierarchical divisions of high and low, based on birth, and act accordingly. The Hindu must be made to unlearn all this.’

(Annihilation of Caste, S. K. Publication, Nagpur, page 26-27)

‘unlearn’ करण्‍याची बाबासाहेबांची 1935 सालची ही अपेक्षा पूर्ण करण्‍यास गिरिजा कीरांसारख्‍या विद्वतजनांनाही 75 वर्षांचा कालावधी पुरेसा झालेला नाही का ?

- सुरेश सावंत