Tuesday, January 24, 2012

राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा विधेयक, 2011 (सारांश)


(21 डिसेंबर 2011 रोजी लोकसभेत सादर झालेले)

उपोद्घात

या विभागात कायद्याचा उद्देश, भौगोलिक व्‍याप्‍ती तसेच व्‍याख्‍या नमूद केलेल्‍या आहेत. उद्देशात ‘माणसाला त्‍याच्‍या जन्‍मापासून मृत्‍युपर्यंत अन्‍न व पोषणमूल्‍यांची सुरक्षा प्रदान करणे’ असे म्‍हटले आहे. प्रमुख व्‍याख्‍यांमध्‍ये अंगणवाडी, निराधार, बेघर, अन्‍न सुरक्षा, अपंग इ. चा समावेश आहे. या व्‍याख्‍या कशा आहेत, हे समजण्‍यासाठी उदाहरणादाखल ‘निराधार’ ची व्‍याख्‍या पहाः ज्‍या पुरुष, महिला अथवा मुले यांना त्‍यांच्‍या उदरनिर्वाहासाठी लागणारे अन्‍न व पोषणमूल्‍ये मिळविण्‍याकरिता आवश्‍यक संसाधने, मार्ग आणि सहाय्य उपलब्‍ध नाही व त्‍यामुळे त्‍यांना उपासमारीत जीवन जगावे लागते अथवा मृत्‍युला सामोरे जावे लागते, अशांना निराधार म्‍हटले जाईल.

अधिकार

राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा कायदा विविध योजनांद्वारे विविध गटांना अधिकार देतो, ते असेः

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था (रेशन)

  • ग्रामीण भागातील 75 टक्‍के लोकांना व शहरातील 50 टक्‍के लोकांना रेशनवरील अनुदानित धान्‍याचा कायदेशीर अधिकार मिळेल.
  • हा अधिकार मिळणा-यांची प्राधान्य गट व सर्वसाधारण गट अशी विभागणी करण्‍यात आली असून ग्रामीण भागातील 46 टक्‍के लोक प्राधान्‍य गटात, तर 29 टक्‍के लोक सर्वसाधारण गटात (एकूण 75 टक्‍के), तर शहरातील 28 टक्‍के लोक प्राधान्‍य गटात व 22 टक्‍के लोक सर्वसाधारण गटात (एकूण 50 टक्‍के) मोडतील.
  • प्राधान्‍य गटाला प्रति व्‍यक्‍ती प्रति माह 7 किलो धान्‍य तर सर्वसाधारण गटाला प्रति व्‍यक्‍ती प्रति माह 3 किलो धान्‍य देण्‍याची हमी हा कायदा देतो. या धान्‍यांचे दर कायद्याच्‍या मुख्‍य भागात न देता अनुसूची 1 मध्‍ये देण्‍यात आले आहेत.
  • वरील तरतुदी दृष्टिक्षेपात कळण्‍यासाठी पुढील तक्‍ता पहाः

प्राधान्‍य गट

सर्वसाधारण गट

एकूण

वगळले जाणार

ग्रामीण

46 टक्‍के

29 टक्‍के

75 टक्‍के

25 टक्‍के

शहर

28 टक्‍के

22 टक्‍के

50 टक्‍के

50 टक्‍के

दर

गहू - 2 रु. प्रति किलो

तांदूळ- 3 रु. प्रति किलो

भरड धान्‍ये (ज्‍वारी, बाजरी, नागली इ.) – 1 रु. प्रति किलो

किमान आधारभूत किंमतीच्‍या (शेतक-यांकडून सरकारने खरेदी करताना दिलेल्‍या भावाच्‍या) निम्‍म्‍यापेक्षा हे दर अधिक नसतील.

प्रमाण

प्रति व्‍यक्‍ती प्रति माह 7 किलो. (कमाल मर्यादेचा उल्‍लेख नाही)

प्रति व्‍यक्‍ती प्रति माह 3 किलो. (कमाल मर्यादेचा उल्‍लेख नाही)

लाभ मिळण्‍यास प्रारंभ

कायदा लागू झाल्‍यापासून ताबडतोब

केंद्राने ठरविलेल्‍या रेशन सुधारणा अमलात आल्‍यावर तसेच केंद्राने ठरविलेल्‍या तारखेपासून

मुले

  • 6 महिने ते 6 वर्षे वयापर्यंतच्‍या मुलांना त्‍यांच्‍या वयाला अनुरुप असे भोजन स्‍थानिक अंगणवाडीद्वारे मोफत मिळेल.
  • 6 ते 14 वर्षे वयाच्‍या मुलांना एक वेळचे मध्‍यान्‍ह भोजन स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था संचालित, सरकारी तसेच सरकार अनुदानित शाळांमध्‍ये रोज (शाळांच्‍या सुट्या वगळून) व मोफत मिळेल.
  • कुपोषित मुलांचा शोध स्‍थानिक अंगणवाडीद्वारे घेतला जार्इल व त्‍यांच्‍यासाठी निश्चित केलेल्‍या दर्जाची पोषणमूल्‍ये असलेले जेवण मोफत दिले जाईल. (पोषणमूल्‍यांचा हा दर्जा अनुसूची 2 मध्‍ये नमूद केलेली आहेत.)

गरोदर व स्‍तनदा माता

  • प्रत्‍येक गरोदर व स्‍तनदा मातेला एकवेळचे जेवण स्‍थानिक अंगणवाडीद्वारे मोफत मिळेल तसेच अन्‍य पौष्टिक आहारासाठी दर महिन्‍याला 1000 रु. प्रमाणे 6 महिने मातृत्‍व लाभ मिळेल.

विशेष समूह

  • निराधार व्‍यक्‍तींना रोज एकवेळचे जेवण मोफत मिळेल, तर बेघर व्‍यक्‍तींना सामुदायिक स्‍वयंपाक घरांद्वारे (community kitchens) ‘परवडणा-या किंमतीत’ जेवण मिळेल.
  • उपासमार होणा-या तसेच त्‍यासदृश्‍य स्थितीत राहणा-या व्‍यक्‍तींना रोज दोन वेळा मोफत जेवण मिळेल. राज्‍य सरकारद्वारे देण्‍यात येणा-या मदतीच्‍या व्‍यतिरिक्‍तचा हा लाभ असेल.
  • स्‍थलांतरित समूहातल्‍या व्‍यक्‍तींना या कायद्याद्वारे मिळणारे अधिकार त्‍यांच्‍या सध्‍याच्‍या वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणी मिळतील.
  • आणिबाणीच्‍या अथवा आपत्‍तीच्‍या काळात, आपत्तिग्रस्‍त व्‍यक्‍तींना आप‍त्‍ती आल्‍याच्‍या तारखेपासून पुढील 3 महिने रोज दोन वेळा मोफत जेवण मिळेल.

प्राधान्‍य व सर्वसाधारण गटातील कुटुंबांची निवड

  • या निवडीसाठीचे स्‍पष्‍ट निकष या कायद्यात नमूद केलेले नाहीत. प्राधान्‍य गट, सर्वसाधारण गट तसेच कोणाला वगळायचे याबाबतची मार्गदर्शक सूत्रे केंद्र सरकार जाहीर करेल.
  • प्राधान्‍य गट व सर्वसाधारण गट यांची राज्‍यनिहाय संख्‍याही केंद्र सरकार जाहीर करेल.
  • केंद्राने ठरवून दिलेल्‍या सूत्रांनुसार प्राधान्‍य गट व सर्वसाधारण गटातील कुटुंबांच्‍या प्रत्‍यक्ष निवडीचे काम मात्र राज्‍य सरकारे अथवा केंद्राने निश्चित केलेल्‍या संस्‍थांकरवी केले जाईल.
  • तथापि, अशी निवड करताना, केंद्राने निश्चित केलेल्‍या वगळण्‍याच्‍या निकषांत बसणा-या कुटुंबांना प्राधान्‍य अथवा सर्वसाधारण यापैकी कोणत्‍याच गटात समाविष्‍ट करता येणार नाही.
  • या निवडलेल्‍या कुटुंबांची यादी सार्वजनिक जागी प्रदर्शित करण्‍यात येईल.
  • केंद्राच्‍या मागदर्शनानुसार राज्‍य सरकारे ही यादी अद्ययावत करतील.

अन्‍न आयोग

  • केंद्र व राज्‍य स्‍तरावर अनुक्रमे, केंद्रीय अन्‍न आयोग व राज्‍य अन्‍न आयोग नेमण्‍यात येतील. केंद्रीय अन्‍न आयोगाचे कार्यालय देशाच्‍या राजधानीत, तर राज्‍य अन्‍न आयोगाचे कार्यालय राज्‍याच्‍या राजधानीत असेल.
  • या दोन्‍ही आयोगांच्‍या रचनेत, एक अध्‍यक्ष, पाच अन्‍य सदस्‍य व एक सदस्‍य-सचिव असेल. या सदस्‍यांमध्‍ये किमान दोन महिला, तसेच दलित व आदिवासी समाजातील प्रत्‍येकी एक व्‍यक्‍ती असणे आवश्‍यक असेल.
  • अन्‍नसुरक्षा कायद्याच्‍या अंमलबजावणीची देखरेख आणि मूल्‍यांकन हे या दोन्‍ही आयोगांचे काम आहे.
  • या कायद्याने प्रदान केलेल्‍या अधिकारांचे हनन होत असल्‍यास तक्रारींच्‍या आधारे अथवा स्‍वतःहून हे आयोग त्‍याचा तपास करतील आणि त्‍यासंबंधीचा सल्‍ला संबंधित सरकारांना (राज्‍य किंवा केंद्र) देतील.
  • राष्‍ट्रीय आयोगाच्‍या मार्गदर्शक सूत्रांशी सुसंगत मार्गदर्शक सूत्रे राज्‍य आयोग संबंधित राज्‍य सरकारांना देतील.
  • जिल्‍हा तक्रार निवारण अधिका-यांच्‍या निर्णयाविरोधातील अपिलांची सुनावणी, राष्‍ट्रीय आयोगाकडून हस्‍तांतरित तक्रारींची सुनावणी तसेच वार्षिक अहवाल राज्‍य सरकारला सादर करणे. हा अहवाल राज्‍य सरकारे राज्‍य विधिमंडळासमोर ठेवतील.
  • राष्‍ट्रीय आयोग केंद्र सरकारला सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या विविध योजनांच्‍या समन्‍वयाबाबत तसेच नव्‍या योजनांच्‍या आखणीबाबत सल्‍ला देईल.
  • अन्‍न व पोषणविषयक योजनांच्‍या परिणामकारक अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारला सल्‍ला देणे, या योजनांच्‍या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्‍या अधिका-यांचे प्रशिक्षण, क्षमतासंवर्धन तसेच कारभाराचे व्‍यवस्‍थापन यासंबंधी आवश्‍यक त्‍या शिफारशी केंद्र सरकारला करणे, राज्‍य आयोगांच्‍या शिफारशी व अहवालांची दखल घेणे, राज्‍य आयोगांच्‍या निर्णयाविरोधात आलेल्‍या अपिलांची सुनावणी करणे तसेच कामकाजाचा वार्षिक अहवाल केंद्र सरकारला सादर करणे (जो सरकार नंतर संसदेसमोर ठेवेल) ही कामे राष्‍ट्रीय आयोगाने करावयाची आहेत.

पारदर्शकता आणि तक्रार निवारण

  • तक्रार निवारणासाठी त्रिस्‍तरीय व्‍यवस्‍था विधेयकात सुचविण्‍यात आली आहे. प्रत्‍येक जिल्ह्यासाठी एक जिल्‍हा तक्रार निवारण अधिकारी, राज्‍य पातळीवर राज्‍य आयोग व केंद्रीय पातळीवर राष्‍ट्रीय आयोग.
  • केंद्र व राज्‍य सरकारांनी अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा उभारावयाची आहे. उदा. कॉल सेंटर्स, हेल्‍प लाईन्‍स, नोडल ऑफिसर्स तसेच संबंधित सरकारांनी निश्चित केलेली अन्‍य यंत्रणा.

पारदर्शकतेसाठी उपाययोजना

  • विभाग 13 मधील भाग 35 अन्‍वये सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेसंबंधीच्‍या सर्व नोंदी सार्वजनिक ठिकाणी व जनतेला तपासता येतील अशा असाव्यात.
  • रेशन तसेच अन्‍य कल्‍याणकारी योजनांबाबत प्रत्‍येक स्‍थानिक अधिकारी ठराविक कालावधीत सामाजिक लेखाजोखा (सोशल ऑडिट) आयोजित करतील.
  • माहिती व संवाद तंत्रज्ञानाचा वापर - सर्व नोंदी पारदर्शक राहाव्‍यात यादृष्‍टीने रेशनव्‍यवस्‍थेतील प्रत्‍येक पातळीवर संगणकीकरण करण्‍यात येईल.
  • सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍था (नियंत्रण) आदेश, 2011 नुसार राज्‍य, जिल्‍हा, तालुका व रेशन दुकान पातळीवर दक्षता समित्‍या स्‍थापन करण्‍याची जबाबदारी राज्‍यांवर असेल.

जिल्‍हा तक्रार निवारण अधिकारी

  • राज्‍य व केंद्र सरकारच्‍या मार्गदर्शक सूत्रांनुसार राज्‍य सरकार प्रत्‍येक जिल्‍ह्यासाठी या अधिका-याची नियुक्‍ती करेल.
  • या अधिका-याने त्‍याच्‍याकडे आलेल्‍या तक्रारींची नोंद घेऊन निश्चित केलेल्‍या पद्धतीने कार्यवाही करावयाची आहे. तक्रारदार अथवा अधिकारी तक्रार निवारणाबद्दल समाधानी नसल्‍यास त्‍याविरोधात राज्‍य आयोगाकडे अपिल करु शकतात.

दंड आणि भरपाई

  • या कायद्याने राज्‍य व राष्‍ट्रीय आयोगाला दंड करण्‍याचा अधिकार दिलेला आहे. तक्रार निवारण अधिका-याने दिलेल्‍या निर्णयाचे एखाद्या अधिका-याने पालन न केल्‍यास त्‍याला रु. 5,000 पर्यंत दंड होऊ शकतो.
  • कायद्याने मिळणारे धान्‍य अथवा जेवण न मिळाल्‍यास त्‍या लाभार्थ्‍यास ‘अन्‍न सुरक्षा भत्‍ता’ (food security allowance) संबंधित राज्‍य सरकारकडून मिळेल. यासंबंधीची पद्धती व कालमर्यादा राज्‍य सरकार निश्चित करेल.

अन्‍य तरतुदी

रेशन सुधारणा

  • या विधेयकात सर्वसाधारण गटातील व्‍यक्‍तीला मिळणा-या अधिकाराची केंद्राला अभिप्रेत रेशन सुधारणांशी सांगड घालण्‍यात आलेली आहे. या सुधारणा झाल्‍यावर सर्वसाधारण गटाला लाभ मिळणे सुरु होईल.
  • ‘लक्ष्‍याधारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्थेतील सुधारणा’ या स्‍वतंत्र विभागात केंद्र व राज्‍य सरकारे या सुधारणांच्‍या दिशेने त्‍वरित पावले उचलतील, असे म्‍हटले आहे.
  • या सुधारणा अशा आहेतः धान्‍याचे द्वार वितरण, माहिती व संवाद तंत्रज्ञानाचा वापर, संपूर्ण संगणकीकरण, ‘आधार’ योजनेच्‍या मार्फत एकमे‍वाद्वितीय ओळख क्रमांक देणे व त्‍यायोगे योग्‍य लाभार्थीपर्यंत लाभ पाहोचविणे, नोंदींची संपूर्ण पारदर्शकता, रेशन दुकानांचे परवाने देताना सार्वजनिक संस्‍थांना (उदा. पंचायत, बचत गट, सहकारी संस्‍था) प्राधान्‍य, या दुकानांच्‍या व्‍यवस्‍थापनात महिला अथवा त्‍यांच्‍या मंडळांना प्राधान्‍य, रेशनवर मिळणा-या वस्‍तूंच्‍या प्रकारांत यथावकाश विविधता आणणे, रेशन व्‍यवस्‍थेबाबतच्‍या स्‍थानिक मॉडेल्‍सना व धान्‍य कोषांना सहाय्य, रेशनद्वारे धान्‍य देण्‍याऐवजी फूड कुपन, कॅश ट्रान्‍स्‍फर (अनुदानाची रक्‍कम रोखीत देणे) यासारख्‍या योजना राबविणे.

सक्षमीकरणाच्‍या तरतुदी (Enabling Provisions)

  • अनुसूची 3 मध्‍ये ‘अन्‍न सुरक्षा अधिक सक्षम करण्‍यासाठीच्‍या तरतुदी’ आहेत. त्‍यात पुढील बाबींची नोंद आहेः कृ‍षिसंवर्धन; धान्‍य खरेदी, साठवणूक व वाहतूक यांत सुधारणा; स्वच्‍छ व पुरेशा पाण्‍याची तसेच सांडपाण्‍याच्‍या निच-याची व्‍यवस्‍था; आरोग्‍य तपासणीच्‍या सोयी; पोषक आहार, आरोग्‍य तसेच शिक्षण याबाबतीत किशोरवयीन मुलींना सहाय्य; ज्‍येष्‍ठ ना‍गरिक, अपंग व एकल स्त्रियांना पुरेशा पेन्‍शनची व्‍यवस्‍था.

खर्चाची वाटणी (Cost Sharing)

  • विधेयकात ‘आर्थिक प्रस्‍ताव’ देण्‍यात आला आहे. त्‍यात केंद्र व राज्यांत खर्चाची वाटणी कशी असेल ते सांगितले आहे. ते असेः
  • केंद्र सरकारद्वारे करण्‍यात येणारा खर्चः अन्‍नधान्‍याचे आर्थिक अनुदान (रु. 79,800 कोटी अंदाजित) आणि पाच दशलक्ष टन धान्‍याच्‍या साठवणुकीचा (रु. 2,061 कोटी) खर्च केंद्र सरकार करेल.
  • सध्‍याची खर्च वाटणीची पद्धत जिथे जशी आहे तशीच राहीलः मध्‍यान्‍ह भोजन आणि अंगणवाडीतून द्यावयाचे मोफत भोजन यासाठीची केंद्र व राज्‍यांमधील खर्चाची वाटणी आता जशी आहे, तशीच राहील.
  • खर्च वाटणी निश्चित केली जाईलः मातृत्‍व लाभ (रु. 1000 प्रति महिना एकूण 6 महिने) केंद्रसरकार एका योजनेद्वारे निश्चित करेल. तथापि, सव्‍वा दोन कोटी गरोदर व स्‍तनदा मातांसाठी एकूण खर्च रु. 13,500 इतका राहील. त्‍याचप्रमाणे, निराधार, बेघर, आपत्तिग्रस्‍त, उपासमार होणारे अथवा तत्‍सम स्थितीत राहणारे यांच्‍यासाठीच्‍या मोफत अथवा परवडण्‍याजोग्‍या दरातील भोजनासाठीच्‍या खर्चाबाबत मागाहून ठरवण्‍यात येईल. प्राधान्‍य व सर्वसाधारण गटांतील लोक निवडण्‍यासाठीचा खर्च निश्चित केलेल्‍या पद्धतीने केंद्र व राज्‍यांत वाटला जाईल
  • राज्‍य सरकारे खर्च करतीलः उपासमार होणा-या अथवा तत्‍सम स्थितीत राहणा-या व्‍यक्‍तींची निवड, प्राधान्‍य व सर्वसाधारण गटात कुटुंबांची यादी प्रदर्शित करणे, जिल्‍हा तक्रार निवारण अधिका-यांचा वेतन व अन्‍य खर्च, राज्‍यातील केंद्राच्‍या गोदामातून धान्य उचलणे, या धान्‍याची राज्‍यांतर्गत वाहतूक, प्रत्‍यक्ष लाभार्थी व्‍यक्‍तीपर्यंत ठरलेल्‍या दरात धान्‍य पाहोचणे यासाठीच्‍या खर्चाची जबाबदारी राज्‍याची असेल. धान्‍य न मिळाल्‍यास लाभार्थींना द्यावयाच्‍या अन्‍न सुरक्षा भत्‍त्‍याचा खर्च राज्‍य सरकारांनी करावयाचा आहे. राज्‍यांतर्गतची तक्रार निवारण यंत्रणा व दक्षता समित्‍या यांचा खर्च राज्‍य सरकारला उचलावा लागेल.
  • संबंधित सरकारांनी उचलावयाचा खर्चः धान्‍य साठवणुकीच्‍या आधुनिक व शास्‍त्रीय व्‍यवस्‍था निर्माण करण्‍यासाठीच्‍या खर्चाची जबाबदारी केंद्र सरकार घेईल. मात्र, राज्‍य पातळीवरील अशा व्‍यवस्‍थांच्‍या खर्चाची जबाबदारी राज्‍य सरकावर असेल. सोशल ऑडिट्स, अन्‍न आयोगाचा निधी व खर्च, अनुसूची 3 मधील उद्दिष्‍टांची (Provisions for advancing food security) पूर्ती यांचा खर्च केंद्र अथवा राज्‍य ज्‍यांच्‍या अखत्‍यारित या बाबी येतील त्‍यांनी करावयाचा आहे.

पंचायत राज/स्‍थानिक प्राधिकरणांची भूमिका

स्‍थानिक प्राधिकरणे व पंचायत राज संस्‍था त्‍यांच्‍या कार्यक्षेत्राच्‍या मर्यादेत या कायद्याची चोख अंमलबजावणी करण्‍यास जबाबदार असतील. त्‍यांना अतिरिक्‍त जबाबदा-याही दिल्‍या जाऊ शकतात. संबंधित राज्‍य सरकारे अधिसूचनेद्वारे या जबाबदा-या प्रदान करतील.

अनुसूची

अनुसूची 1

(पहा विभाग 3(1), 30 (1), (4) आणि 32 (2), (3))

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील अनुदानित दर

प्राधान्‍य गटासाठीचे अनुदानित दर

सर्वसाधारण गटासाठीचे अनुदानित दर

1

2

तांदूळ प्रति किलो रु. 3, गहू प्रति किलो रु. 2 आणि भरड धान्‍य प्रति किलो रु. 1 पेक्षा अधिक नाही.

गहू, भरड धान्‍य, तांदूळ यांच्‍या किमान आधारभूत किंमतीच्‍या निम्‍म्‍यापेक्षा अधिक दर नाही.

अनुसूची 2

(पहा विभाग 4(), 5 (1) आणि 6)

पोषणमूल्‍यांचा दर्जा

पोषणमूल्‍यांचा दर्जाः एकात्मिक बालविकास सेवा योजनेत 6 महिने ते 3 वर्षे, 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुले आणि गरोदर व स्‍तनदा माता यांना ‘घरी घेऊन जावयाचा शिधा’ (Take home ration) किंवा ‘पौष्टिक गरम शिजवलेले जेवण’ किंवा ‘खाण्‍यासाठी तयार आहार’ यासाठी निश्चित केलेला दर्जा तसेच मध्‍यान्‍ह भोजन योजनेत प्राथमिक शाळेतील कनिष्‍ठ व ज्‍येष्‍ठ इयत्‍तांतील मुलांसाठी निश्चित केलेला दर्जा असा आहेः

अनु. क्र.

वर्गवारी

आहाराचा प्रकार

उष्‍मांक (कि.कॅ.)

प्रथिने (ग्रॅ)

1

2

3

4

5

1

मुले (6 महिने ते 3 वर्षे)

घरी घेऊन जावयाचा शिधा

500

12-15

2

मुले (3 ते 6 वर्षे)

सकाळचा नाश्‍ता व गरम शिजवलेले जेवण

500

12-15

3

कुपोषित मुले (6 महिने ते 6 वर्षे)

घरी घेऊन जावयाचा शिधा

800

20-25

4

कनिष्‍ठ प्राथमिक वर्ग

गरम शिजवलेले जेवण

450

12

5

ज्‍येष्‍ठ प्राथमिक वर्ग

गरम शिजवलेले जेवण

700

20

6

गरोदर व स्‍तनदा माता

गरम शिजवलेले जेवण

600

18-20

Note: 1.—Energy Dense Food fortified with micronutrients as per 50 per cent. of Recommended Dietary Allowance.

Note: 2.—Meals shall be prepared in accordance with the prevailing Food Laws.

NB: Nutritional standards are notified to provide balance diet and nutritious foods in terms of the calorie counts, protein value and micronutrients specified.

अनुसूची 3

(पहा विभाग 39)

अन्‍न सुरक्षा संवर्धित करण्‍यासाठीच्‍या तरतुदी

(1) शेतीला चालना –

a. छोट्या आणि सीमांत शेतक-यांच्‍या हितरक्षणाच्‍या दृष्‍टीतून शेतिसुधारणा;

b. शेतीतील गुंतवणुकीत वाढ, संशोधन व विकास यांचा त्‍यात समावेश, विस्‍तार सेवा, उत्‍पादकता व उत्‍पादन वाढीसाठी पाणीपुरवठ्याच्‍या छोट्या योजना व वीज;

c. योग्‍य मोबदला देणारे भाव, पत, पाणीपुरवठा, वीज, पीक विमा यांची हमी;

d. जमीन व पाणी अन्‍न उत्‍पादनाऐवजी अन्‍य बाबींसाठी अवाजवी कारणाने वळविण्‍यास प्रतिबंध.

(2) खरेदी, साठवणूक व वाहतूक संबंधित हस्‍तक्षेप –

a. स्‍थानिक भरड धान्यांची खरेदी तसेच विकेंद्रित खरेदी यांस प्रोत्‍साहन;

b. खरेदी प्रक्रियांमध्‍ये भौगोलिक वैविध्‍य;

c. आधुनिक व शास्‍त्रीय गोदामांची पुरेशी व विकेंद्रित निर्मिती;

d. अन्‍नधान्‍याच्‍या वाहतुकीस सर्वोच्‍च प्राधान्‍य, त्‍यासाठी पुरेशा रेक्सची व्‍यवस्‍था तसेच अतिरिक्‍त धान्‍य उत्‍पादक प्रदेशांकडून या धान्‍याची गरज असलेल्‍या प्रदेशांकडे वाहतूक करणा-या रेल्‍वे लाईन्‍समध्‍ये वाढ.

(3) अन्‍य; खालील बाबींची व्‍यवस्‍था –

a. सुरक्षित व पुरेसे पिण्‍याचे पाणी व सांडपाण्याचा निचरा;

b. आरोग्‍य तपासणी;

c. किशोरवयीन मुलींना पोषणमूल्‍ये, आरोग्‍य व शिक्षण;

d. ज्‍येष्‍ठ ना‍गरि‍क, अपंग व एकल महिला यांना पुरेशी पेन्‍शन.

अन्‍न सुरक्षा विधेयकः अपुरे तरीही स्‍वागतार्ह

प्रसिद्धीः 'महाराष्‍ट्र टाइम्‍स, 24 जानेवारी 2012 .'


2009 ला संयुक्‍त पुरोगामी आघाडीचे सरकार दुस-यांदा सत्‍तेवर आल्‍यावर राष्‍ट्रपतींच्‍या अभिभाषणात सूतोवाच झालेले अन्‍नसुरक्षा विधेयक मधल्‍या अनेक संघर्षांनंतर आता 2011 च्‍या शेवटी अखेर लोकसभेत मांडले गेले. स्‍थायी समितीतील दुरुस्‍त्‍या वगैरे सोपस्‍कार होऊन येत्‍या हिवाळी अधिवेशनात बहुधा हा कायदा संमत होईल.

वर उल्‍लेख केलेले संघर्ष खुद्द सरकारअंतर्गतच होते. राष्‍ट्रपतींच्‍या अभिभाषणात या कायद्याचे सूतोवाच झाल्‍यानंतर लगेचच तत्‍कालीन अन्‍न मंत्री शरद पवार यांनी जाहीरपणे आपला विरोध नोंदविला. त्‍यांचा हा विरोध आजतागायत आहे. तो त्‍यांनी मंत्रिमंडळाच्‍या बैठकांमध्‍येही शेवटपर्यंत लावून धरला होता. या कायद्याने आपण बांधून घेऊ नये, उद्या गोदामात धान्‍य नसले तर आयात करावे लागेल, यासाठीच्‍या अनुदानापोटी जी 27000 कोटी रु.ची जादा सबसिडी द्यावी लागेल, त्‍यामुळे विकासकामांना पैसा राहणार नाही, एवढेच नव्‍हे तर स्‍वस्‍तात मिळणा-या धान्‍याच्‍या परिणामी मजूर काम करणार नाहीत...असे चौफेर आरोप सरकारचा एक घटक असतानाही ते करत आहेत. पंतप्रधान व इतर ज्‍येष्‍ठ मंत्र्यांचा यातील जादा अनुदानाला तसेच भ्रष्‍टाचाराने पोखरलेल्‍या रेशनव्‍यवस्‍थेत संरचनात्‍मक सुधारणा न करता वाढीव अनुदान वाया घालविण्‍यास विरोध होता. कायदा झाल्‍यावर सरकारकडून जी मोठी धान्‍यखरेदी होईल, त्‍यातून बाजारात धान्‍याची कमतरता व परिणामी भाववाढ होईल, अशीही त्‍यांची चिंता होती. अखेरीस सोनिया गांधींच्‍या हस्‍तक्षेपाने मंत्रिमंडळाच्‍या अनेक बैठकांत मंजूर होऊ न शकलेले हे विधेयक मंत्रिमंडळास मंजूर करावे लागले.

सरकार अंतर्गत असलेला विरोध तसेच जयललिता, मायावती, नितीशकुमार, नरेंद्र मोदी या विरोधी पक्षांच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी नोंदवलेले आक्षेप पाहता, अनेक अभ्‍यासकांच्‍या तसेच अन्‍न अधिकाराच्‍या चळवळीतील कार्यकर्त्‍यांच्‍या अपेक्षेप्रमाणे हा कायदा होईल, अशी शक्‍यता नाही. म्‍हणूनच, या प्रतिकूल संदर्भ चौकटीत या विधेयकातील तरतुदींचे मापन करणे उचित ठरेल.

योजनेला अधिकारी भीक घालत नाहीत. रेशनवर नियमाप्रमाणे धान्‍य मिळत नसल्‍याची तक्रार केली असता वरुन कोटा कमी आला, आम्‍ही काय करणार असे उत्‍तर मिळते. रेशनची योजना आता कायदा होईल. मग अशी उत्‍तरे देता येणार नाहीत. योजनेचा कायदा होणे, ही मोठी गोष्‍ट आहे. ग्रामीण भागातील 75 टक्‍के जनतेला (प्राधान्‍य गटः 46 टक्‍के + सर्वसाधारण गटः 29 टक्‍के) तर शहरांतील 50 टक्‍के जनतेला (प्राधान्‍य गटः 28 टक्‍के + सर्वसाधारण गटः 22 टक्‍के) अनुदानित अन्‍नधान्‍याचा कायदेशीर अधिकार मिळेल. प्राधान्‍य गटासाठी धान्‍याचे प्रमाण दरमहा प्रति व्‍यक्‍ती 7 किलो व दर 1 रु. भरड धान्‍य, 2 रु. गहू व 3 रु. तांदूळ असे असतील. सर्वसाधारण गटाला धान्‍याचे प्रमाण दरमहा प्रति व्‍यक्‍ती 3 किलो व दर शेत‍क–यांकडून खरेदी करावयाच्‍या किमान आधारभूत किंमतीच्‍या 50 टक्‍क्यांपेक्षा कमी असतील.

सबंध देशभरच आज मिळणा-या रेशनच्‍या लाभांत लक्षणीय बदल यामुळे होणार आहे. महाराष्‍ट्राच्‍या उदाहरणावरुन हे लक्षात येर्इल. आज महाराष्‍ट्रात एपीएल रेशनकार्डधारकांना 15 किलो धान्‍य सरकारने दरमहा जाहीर केले आहे. परंतु, ते कधीतरी-कोणालातरी 5 किलो मिळते, असा अनुभव आहे. त्‍यापैकी एका विभागाला, म्‍हणजे सर्वसाधारण गटातील कुटुंबांना 15 किलोचे (3 किलो x 5 माणसे) कायदेशीर संरक्षण मिळेल. मुंबईत आज अंत्‍योदय व बीपीएलची एकत्रित कुटुंबे 1 टक्‍क्‍यांच्‍या आत आहेत. पुण्‍यात 5 टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहेत. शहरी विभागांसाठीचे प्रमाण प्राधान्‍य गटासाठी 28 टक्‍के असल्‍याने मुंबई-पुण्‍यासारख्‍या शहरांत ही संख्‍या लक्षणीयरीत्‍या वाढण्‍याची शक्यता आहे. आजच्‍या एपीएलपैकी अनेक कुटुंबे प्राधान्‍य गटात येतील. महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण जनतेला मात्र अधिक लाभ मिळण्‍याची शक्‍यता आहे. महाराष्‍ट्रात अंत्‍योदय व बीपीएल मिळून 31 टक्‍क्‍यांच्‍या आसपास कुटुंबे सध्‍या आहेत. नव्‍या कायद्याप्रमाणे प्राधान्‍य गटाचे ग्रामीण भागासाठीचे प्रमाण 46 टक्‍के असल्‍याने महाराष्ट्रातील आजची सर्व अंत्‍योदय व बीपीएल कुटुंबे प्राधान्‍य गटात येतील. राज्‍यनिहाय लाभार्थींचे प्रमाण केंद्र सरकार ठरवणार आहे. त्‍यामुळे सर्व राज्‍यांसाठी प्राधान्‍य गटांची टक्‍केवारी ग्रामीण 46 टक्‍के व शहरी 28 टक्‍के असणार नाही. ती कमीअधिक होऊ शकते. तथापि, यासाठीचा आधार गरिबांच्‍या संख्‍येचा अंदाज दर्शविणा-या सुरेश तेंडुलकर समितीच्‍या अहवालाचाच घेतला जाईल, असे दिसते. तसे झाल्‍यास महाराष्‍ट्रात प्राधान्‍य गटातील लोक ग्रामीण भागात 48 टक्‍के व शहरी भागात 26 टक्‍के होतील. अनुदानित धान्‍याच्‍या कायदेशीर लाभातून ग्रामीण भागातील 25 टक्‍के व शहरातील 50 टक्‍के लोक सरळ वगळले जाणार आहेत. लाभार्थींची निवड नीट न झाल्‍यास या वगळलेल्‍यांत अनेक गरजवंतांचा समावेश असण्‍याचा धोका राहतो.

या कायद्यातील मुख्‍य भाग रेशनचा असला, तरी हा कायदा केवळ रेशनसाठी नाही. अंगणवाडी व शाळेतील मध्‍यान्‍ह भोजनाद्वारे मुलांना मिळणा-या मोफत भोजनाच्‍या योजनेला या कायद्यात अंतर्भूत करण्‍यात आले आहे. गरोदर स्त्रियांना एकूण 6 महिने दरमहा 1000 रु. मातृत्‍व अनुदान दिले जाणार आहे. निराधारांना एकवेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे तर बेघरांना परवडणा-या किंमतीत जेवण देणारी कम्‍युनिटी किचन उघडली जाणार आहेत. अशा आणखी काही योजना आहेत. याचबरोबर परिणामकारक अंमलबजावणीसाठी रेशनव्‍यवस्‍थेचे संपूर्ण संगणकीकरण, रेशन दुकाने देण्‍यात ग्रामपंचायत, बचत गटांना प्राधान्‍य, रेशन कार्ड कुटुंबातील महिलेच्‍या नावे अशीही पावले उचलणार येण्‍यात आहेत.

राज्‍यांचा प्रमुख आक्षेप आहे तो, या कायद्यात सुचविलेल्‍या तक्रार निवारण यंत्रणेपोटी निर्माण होणा-या नोकरशाहीच्‍या खर्चावर. हा खर्च राज्‍यांनी करावयाचा आहे. शिवाय आज अनेक राज्‍यांत रेशनव्‍यवस्‍थेत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्‍यांना हात लावला जाता कामा नये, अशी राज्‍यांची मागणी आहे. राज्‍यांनीच अखेर अंमलबजावणी करावयाची असल्‍याने ही यंत्रणा राज्‍यांनाच केंद्राने ठरवू देणे अधिक उचित होईल. या कायद्यामुळे होणारा जादा खर्च जीडीपीच्‍या जेमतेम 1 टक्‍काच होतो. शिवाय उद्योगपतींना दिलेल्‍या करसवलतीसाठी याच्‍या पाच पट रक्‍कम खर्च होते. त्‍याबाबत शरद पवारांनी तक्रार केल्‍याचे स्‍मरत नाही. मोठ्या प्रमाणातील धान्‍यखरेदीमुळे बाजारात होणा-या विपर्यासावर उपाय म्‍हणून लाभार्थ्‍यांना धान्‍याऐवजी अनुदानाची थेट रक्‍कम देण्‍याचे प्रयोग करता येतील. अशा प्रयोगांचे उल्‍लेख या विधेयकात केलेले आहेतच. स्‍थायी समितीकडे अशा आणखी सूचना (बाजूच्‍या तसेच विरोधाच्‍या) करण्‍याचा मार्ग सर्वांनाच मोकळा आहे. कायदा झाल्‍यावरही दुरुस्‍त्या करणे शक्‍य आहे. आधी कायदा होणे महत्‍वाचे आहे. कोणत्‍याही निमित्‍ताने तो लांबणीवर पडता कामा नये.

- सुरेश सावंत

Monday, December 26, 2011

अण्‍णा हजारेंच्‍या भारतीय संविधान उध्‍वस्‍त करु पाहणा-या जनलोकपाल आंदोलनाला विरोध करा


भ्रष्टाचाराला पायबंद बसण्‍यासाठी कठोरात कठोर कायदेशीर उपाययोजनेच्‍या मागणीला तसेच त्‍यासाठीच्‍या संवै‍धानिक चौकटीतील आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तथापि, अण्‍णा हजारेंचे जनलोकपाल आंदोलन भ्रष्‍टाचाराविषयीच्‍या तीव्र लोकभावनांचा वापर करुन भारतीय घटनेच्‍या पायालाच उध्‍वस्‍त करु पाहत आहे तसेच संसदेच्‍या सार्वभौम अधिकाराला धुडकावून लावत आहे. म्‍हणून या आंदोलनाला आम्‍ही विरोध करत आहोत.

स्‍वातंत्र्य व सामाजिक परिवर्तनाच्‍या महान संग्रामातून साकारलेल्‍या भारतीय घटनेद्वारे जनहिताचे कायदे करण्‍याचा अधिकार जनतेने निवडून दिलेल्‍या संसद सदस्‍यांना दिलेला आहे. भारतातील कोणीही नागरिक अथवा संघटना त्‍यांना अपेक्षित असलेल्‍या कायद्याचा मसुदा सरकारला देऊ शकते, जनतेची व्‍यापक चळवळ उभारुन त्‍यासाठीचा दबावही तयार करु शकते. मात्र, आम्‍ही म्‍हणू तसाच कायदा झाला पाहिजे, अशी भूमिका घेऊ शकत नाही. सबंध भारतीय जनतेचे प्रतिनिधीत्‍व करणा-या संसदेत विवेकशील व सर्वांगीण चर्चेनंतर कायदा संमत होण्‍याची रीत पाळली गेली नाही, तर अशारीतीचा संसदबाह्य दबाव अराजकाला जन्‍म देऊ शकतो.

भारतीय संविधान संमत होण्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला, 25 नोव्‍हेंबर1949 रोजी या संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीतील आपल्‍या शेवटच्‍या भाषणात भारतीय जनतेला जो कळकळीचा इशारा दिला तो किती रास्‍त व भविष्‍यवेधी होता, ते आज 62 वर्षांनंतरही आपल्‍या प्रत्‍ययास येते. ते म्‍हणतात, ‘...जेव्‍हा, संवैधानिक मार्ग उपलब्‍ध आहेत, तेव्‍हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्‍याकरण आहे आणि जितक्‍या लवकर आपण त्‍यांना दूर सारु तेवढे ते आपल्‍या हिताचे होईल.’ पुढे ते म्‍हणतात, ‘...विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्‍याही देशाच्‍या राजकारणात दिसणार नाही, इतक्‍या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्‍ती ही आत्‍म्‍याच्‍या मुक्‍तीचा मार्ग असू शकेल. परंतु, राजकारणात भक्‍ती किंवा व्‍यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’

आज अण्‍णांच्‍या आंदोलनात हीच विभूतिपूजा दिसते. अण्‍णाच या देशाला खरा मार्ग दाखवू शकतात आणि म्‍हणून त्‍यांनी सुचविलेला जनलोकपाल हा आपल्‍या जीवनातील सर्व समस्‍यांवरचा तोडगा ठरु शकतो, अशा वि‍वेकहीन मनःस्थितीचे बळी अण्‍णांना पाठिंबा देणारे असंख्‍य सत्‍प्रवृत्‍त लोक झालेले आहेत. देशात भ्रष्‍टाचाराबरोबरच इतर अनेक महत्‍वाचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्‍नांसंबंधी राजकारणी मंडळींना धोरण घ्‍यावे लागते. निवडणुका या समग्र धोरणावर लढवाव्‍या लागतात. असे कोणतेही समग्र धोरण न मांडता केवळ एका ‘जनलोकपाला’च्‍या मुद्द्यावर निवडणुकांत विरोधी प्रचार करण्‍याचे अण्‍णांचे आवाहन लोकांची फसगत व संसदीय प्रणालीचा विश्‍वासघात करते. आजचे राजकारणी नालायक असतील, तर त्‍यांना बाजूला सारण्‍यासाठी आपल्‍याला पटणा-या राजकीय पक्षात सहभागी होऊन अथवा स्‍वतःचा राजकीय पक्ष स्‍थापून निवडणुकांच्‍या राजकारणात सिव्हिल सोसायटीने उतरायला हवे. काठावर बसून बेजबाबदार नैतिक दहशत निर्माण करणे, गैर आहे. ‘जे ठरेल ते आता रस्त्‍यावर’ ही अण्‍णा टीमची दर्पोक्‍ती बेजबाबदारपणाचा कळस आहे. त्‍यातून बहुसंख्‍याकांची हुकूमशाहीच तयार होऊ शकते. दलि‍त-आदिवासींना अथवा स्त्रियांना राखीव जागा, अल्‍पसंख्‍याकांसाठीच्‍या तरतुदी या बाबी रस्‍त्‍यावरच्‍या आंदोलनात ठरु शकल्‍या नसत्‍या. संसदेतील गंभीर व विवेकशील चर्चेतूनच हे निर्णय होऊ शकतात.

रामदेव बाबा, श्री रविशंकर यांचा अण्‍णांच्‍या आंदोलनात सक्रीय सहभाग आहे. अध्‍यात्‍मापोटी आकर्षित झालेल्‍या लोकांना हे गुरु जनआंदोलनाच्‍या अथवा राजकारणाच्‍या मुद्द्याकडे वळवून संविधानातील ‘सेक्‍युलॅरिझम’ या तत्‍त्‍वाला उध्‍वस्‍त करत आहेत. भारतीय घटना तयार होत असतानाच प्रत्‍येकाला एक मत, सेक्‍युलॅरिझम, दलित-अल्‍पसंख्‍याकांचे संरक्षण या तत्‍त्‍वांना विरोध करणा-या शक्‍ती देशात होत्‍या. त्‍या आपल्‍या उद्दिष्‍टपूर्तीसाठी संधी शोधत असतात. अण्‍णांच्‍या खांद्यावर बसून व अण्‍णांना पाठिंबा देणा-या सत्‍प्रवृत्‍तांच्‍या भावनांवर आरुढ होऊन या शक्‍ती देशाचा मूलाधार असलेल्‍या संविधानाला उखडून देशात अराजक माजविण्‍याचे कारस्‍थान करत आहेत. हे कारस्‍थान आपण यशस्‍वी होऊ देता कामा नये, असे सर्व सुबुद्ध भारतीय जनतेला आम्‍ही आवाहन करत आहोत.

आपले,


सुरेश सावंत, नीला लिमये, भारती शर्मा, मिलिंद रानडे, दत्‍ता बाळसराफ

Monday, December 5, 2011

आपल्‍या शेजारच्‍या राज्‍यांतले रेशन सुधारणांचे प्रयोग

रेशनसंबंधीच्‍या विविध प्रयोगांची माहिती घेण्‍यासाठी भरत रामस्‍वामी व मिलिंद मुरुगकर या अभ्‍यासकांनी छत्‍तीसगड, मध्‍यप्रदेश व गुजरात या 3 राज्‍यांचा दौरा केला. त्‍यांच्‍यासोबत फिरण्‍याची मलाही संधी मिळाली. या राज्‍यांतले उच्‍चपदस्‍थ अधिकारी, रेशन दुकाने, गावांतील लोक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, भात गिरणी, शेतकरी सोसायट्यांचे पदाधिकारी, संगणकीकरण तसेच फूड कुपनांच्‍या व्‍यवहारात सहभागी असलेले सॉफ्टवेअर कंपनी व बहुराष्‍ट्रीय कंपनी यांचे तज्‍ज्ञ अशांच्‍या भेटी तसेच इ-ग्रामपंचायतील संगणकावरील नोंदींचे प्रात्‍यक्षिक, धान्‍य खरेदी केंद्रांतील व्‍यवहाराची प्रत्‍यक्ष पाहणी असे दौ-याचे स्‍वरुप होते. याबाबतची माझी निरीक्षणे खाली नोंदवत आहे.

छत्‍तीसगढमधील संरचनात्‍मक व तांत्रिक सुधारणा

छत्‍तीसगड राज्‍यात जवळपास 70 टक्‍के जनतेला अंत्‍योदयच्‍या दराने धान्‍य मिळते. बीपीएल व अंत्‍योदयच्या रेशनकार्डधारकांचे धान्‍य केंद्राकडून येत असते. तथापि, केंद्राने या कार्डधारकांचा कोटा ठरवून दिलेला असतो. याच्‍या अतिरिक्‍त लोकांना लाभ द्यायचा असे राज्‍यांनी ठरविल्‍यास त्‍यांच्‍यासाठीच्‍या खर्चाचा भार राज्‍यांना उचलावा लागतो. छत्‍तीसगढने केंद्राने ठरवून दिलेल्‍या कोट्याहून कितीतरी अधिक लोकांना अंत्‍योदयचा लाभ देण्‍याचा निर्णय घेतल्‍याने त्‍यास स्‍वतःच्‍या तिजोरीतून जवळपास 1200 कोटींचे अनुदान द्यावे लागते. छत्‍तीसगढमध्ये रेशन यंत्रणेचे संपूर्ण संगणकीकरण झालेले आहे. छत्‍तीसगढ राज्‍याच्‍या वेबसाईटवर गेल्‍यास रेशनकार्डधारकांचा दुकानवार, जिल्‍हावार, जातीवार, गाववार तपशील तसेच संपूर्ण रेशनकार्डच बघायला मिळते. यामुळे बोगस रेशनकार्डांना ब-यापैकी आळा बसतो. छत्‍तीसगढचे दुसरे वैशिष्‍ट्य म्‍हणजे, त्‍यांची विकेंद्रित धान्‍य खरेदी. या राज्‍यात तांदळाचे उत्‍पादन भरपूर होते. स्‍वतःला ठेवून भारतीय अन्‍न महामंडळाला ते मोठा हिस्‍सा देत असते. या विकेंद्रित खरेदीमुळे शेतक-यांना त्‍यांच्‍या गावापासून जवळच्‍या अंतरावर आपले धान्‍य सरकारला विकता येते. या व्‍यवस्‍थेचेही संगणकीकरण झाल्‍याने या व्‍यवहाराची नोंद तात्‍काळ होऊन शेतक-यांना ताबडतोब चेक मिळतो. शेतक-यांच्‍या सहकारी संस्‍थांमार्फत हा सर्व व्‍यवहार होतो. अनेक गावांत इ-ग्रामपंचायती आहेत. गावातील विविध नोंदी करणे, सातबाराचा उतारा देणे इ. कामे ग्रामपंचायतीच्‍या कार्यालयातील संगणकाद्वारेच होतात. याच इ-ग्रामपंचायतीतील संगणकाचा वापर शेतक-यांच्‍या धान्‍य खरेदीसाठी केला जातो. या व्‍यवहाराची नोंद त्‍याचवेळी सरकारच्‍या मध्‍यवर्ती कक्षातील संगणकावर पोहाचत असते. त्‍यामुळे या व्‍यवहाराची ताजी व सर्व माहिती राज्‍य सरकारकडे असते. विकेंद्रित धान्‍य खरेदीमुळे राज्‍य सरकारच्‍या नियंत्रणात धान्‍यसाठा राहतो व तो रेशन दुकानांवर तात्‍काळ पोहोचवता येतो. पूर्वीप्रमाणे भारतीय अन्‍न महामंडळाच्‍या अधिका-यांच्‍या मिनतवा-या कराव्‍या लागत नाहीत.

छत्‍तीसगढमध्‍ये खाजगी रेशन दुकानदार नष्‍ट करुन त्‍यांच्‍या जागी आता बचत गट, ग्रामपंचायती, आदिवासींच्‍या समित्‍या, सहकारी संस्‍था यांची मालकी स्‍थापित करण्‍यात आलेली आहे. बचतगटांना 75000 रु. बिनव्‍याजी कर्ज 20 वर्षांच्‍या मुदतीने दिल्‍याने तसेच द्वार वितरण योजनेमार्फत दुकानापर्यंत माल पोहोचत असल्‍याने रेशन दुकानांना आपला कारभार आतबट्ट्याचा होतो, परवडत नाही, अशी तक्रार करायला वाव नाही. तक्रारींसाठी कॉल सेंटरची व्‍यवस्‍था, केरोसीन-धान्‍य वाहतुकीच्‍या हेराफेरीवरील नियंत्रणासाठी जीपीएस यंत्रणा, दुकानावर माल कधी येणार याची माहिती देणारे एसएमएस यांसारख्‍या तांत्रिक सुधारणा मोठ्या प्रमाणावर करण्‍यात आलेल्‍या आहेत. ग्रामीण भागातील रेशनची गरज असलेला गरीब वर्ग संख्‍येने मोठा व आर्थिकदृष्‍ट्या एकसंध आहे. आपल्‍यासाठी किती कोटा येणार याची माहिती व निश्चिती त्‍याला असते. त्‍यामुळे त्‍याच्‍या मागणीचा एक दबाव तयार होतो. सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे मुख्‍यमंत्र्यांची जबरदस्‍त राजकीय इच्‍छाशक्‍ती. तिला अंमलबजावणीच्‍या उच्‍चस्‍थानी असलेल्‍या अधिका-यांची जनतेप्रती आस्‍था व सर्जनशील उत्‍साह यांची जोड. अन्‍न अधिकाराच्‍या आंदोलनातील कार्यकर्त्‍यांची देखरेख व या सर्जनशील अधिका-यांशी त्‍यांचा असलेला समन्‍वय. या सगळ्यामुळे छत्‍तीसगढच्‍या ग्रामीण भागातील रेशनव्‍यवस्‍था आधीच्‍या तुलनेत कितीतरी परिणामकारक झालेली आहे.

रायपूरमधील ‘स्‍मार्ट कार्ड’

पण शहरी भागात हा परिणाम साधता आलेला नाही. वर उल्‍लेखिलेले गरिबांच्‍या मोठ्या संख्‍येचे आर्थिकदृष्‍ट्या एकसंध असलेले गाव हे एकक शहरात नाही. लोक त्‍या अर्थाने परस्‍परांशी जोडलेले व संघटित नाहीत. रेशन दुकाने नावाला सोसायट्यांची असतात. प्रत्‍यक्षात मालक असतात टगे व्‍यापारी. लोकांना धान्‍य प्रमाणात न मिळणे, भेसळ होणे, मापात मारणे, दादागिरी इ. चा जो अनुभव मुंबईसारख्‍या शहरात येतो तोच रायपूरसारख्‍या छत्‍तीसगढच्‍या राजधानीत येतो. मुंबईत राजकीय इच्‍छाशक्‍तीचा अभाव. पण रायपूरमध्‍ये ती जोरात. म्हणून सरकार तिथे एक नवा प्रयोग करते आहे, तो स्‍मार्ट कार्डचा. प्रत्‍येक कार्डधारकाला एटीएम/क्रेडिट कार्डसारखे स्‍मार्ट कार्ड दिले जाणार. या कार्डावर रेशन कार्डधारकाचा डिजिटल तपशील असेल. रेशन दुकानावर स्‍मार्ट कार्ड पडताळणीचे यंत्र असेल. या यंत्रातून स्‍मार्ट कार्ड फिरवल्‍यावर रेशन दुकानातील धान्‍य वाटपाचा व्‍यवहार सुरु होईल. रेशन दुकानातील या व्‍यवहाराची नोंद त्‍याचवेळी सरकारच्‍या नियंत्रक कक्षातील संगणकावर होईल. त्‍याच कार्डधारकाला रेशन मिळाले का व किती मिळाले, याची सरकारकडे ताबडतोब नोंद होणार. आता पूर्वीसारखे एकाच रेशन दुकानाला कार्डधारकाला बांधून न ठेवता 15-20 दुकानांचा गट करुन या गटातल्‍या कोणत्‍याही दुकानातून रेशन घेण्‍याची मुभा त्‍यास मिळणार आहे. हे निवडीचे स्‍वातंत्र्य मिळाल्‍याने वाईट वागणा-या, फसवणूक करणा-या दुकानदाराकडे लोक कमी जातील, हे उघडच आहे. ज्‍या दुकानदाराकडे लोक अधिक जातील, तो दुकानदार बरा, असे सरकारलाही कळेल. परिणामी, गि-हाईक जोडून ठेवायचे असल्‍यास वाईट वागणा-या दुकानदाराला आपले वागणे बदलावे लागेल. दुकानदाराला बोगस कार्डे आता ठेवता येणार नाहीत. कारण खोट्या नावांवरील, अस्तित्‍वात नसलेल्‍या कार्डधारकांचे स्‍मार्ट कार्ड तयार करण्‍याची तज्‍ज्ञता दुकानदाराच्‍या पातळीवर असणे कठीण आहे.

गुजरातमधील ‘फूड कुपन’

गुजरातमधील रेशन व्‍यवस्‍थेतील प्रश्‍न महाराष्‍ट्रासारखेच. थोडेसे अधिकच म्‍हणावे लागेल. या प्रश्‍नांवर उतारा म्‍हणून ‘फूड कुपन’चा प्रायोगिक प्रकल्‍प गुजरात राज्‍याने सुरु केला आहे. प्रत्‍येक जिल्‍ह्यात एका तालुक्‍यातील एका गावात हा प्रयोग सुरु आहे. हे गाव इ-ग्रामपंचायत म्‍हणून आधीच काम करणारे असते. तेथे संगणक व इंटरनेटची सुविधा असते. गावातील शिक्षित युवकाला प्रशिक्षण देऊन या कामाची जबाबदारी दिलेली असते. प्रति व्‍यवहार 3 रु. रेशन कार्डधारकाकडून त्‍याला मिळतात. प्रत्‍यक्ष दुकानातून वस्‍तू घेतेवेळी हे 3 रु. वजा करुन कार्डधारकाने रक्‍कम दुकानदाराला द्यायची असते. फूड कुपनावर त्याची नोंद असते. प्रयोगाच्‍या प्रारंभी गावातील रेशन कार्डधारकाच्‍या कुटुंबातील रेशन दुकानावर व्‍यवहारासाठी येणा-या व्‍यक्‍तींच्‍या बोटांचे ठसे (बायोमेट्रिक तपशील) घेतले गेले आहेत. ते सरकारच्‍या मध्‍यवर्ती सर्व्‍हरवर आहेत. कार्डधारकाने ग्रामपंचायतीत यायचे. तेथील संगणक ऑपरेटर या कार्डधारकाचा अंगठा एका छोट्या स्‍कॅनरवर ठेवतो. इंटरनेटद्वारे मध्‍यवर्ती सर्व्‍हरकरवी त्‍याची ओळख पटल्‍यावरच संगणकाच्‍या पडद्यावर या कार्डधारकाचा तपशील व महिन्‍याची कुपने दिसू लागतात. त्‍याचा प्रिंटआऊट कार्डधारकाला दिला जातो. या कुपनांवर कार्डधारकाचे नाव, दुकानाचा क्रमांक, गाव, वस्‍तूचे नाव, प्रमाण, किंमती, कार्डाचा प्रकार इ. तपशील असतो. शिवाय बारकोड (सांकेतिक उभ्‍या रेषा) असतात. रेशन दुकानदाराकडे ही कुपने जमा झाल्‍यावर ती जिथून मिळाली, त्‍या केंद्रावर जाऊन संगणकावर बारकोडचे स्‍कॅनिंग करुन त्‍याने शिधावस्‍तू कार्डधारकाला दिल्‍याचे सरकारला कळवावे लागते. या व्‍यवहाराच्‍या तपशिलाच्‍या आधारे सरकार या रेशन दुकानदारास पुढचा कोटा मंजूर करते.

आम्‍ही ज्‍या गावांत गेलो ती रेशन दुकाने सोसायटीची होती. त्‍यांनी एक पगारी माणूस कामाला ठेवलेला होता. पण त्‍याचे वागणे-बोलणे हे खाजगी दुकानदारासारखेच दिसत होते. तो दुकानदार तसेच सोसायटीचे पदाधिकारी सरकारकडून वेळेवर कोटा येत नाही, कुपने घेण्‍यासाठी व जमा करण्‍यासाठी एक नवी यंत्रणा मध्‍ये उभी राहिल्‍याने वेळ जातो, ही यंत्रणा असलेले केंद्र भौगोलिकदृष्‍टया जवळ असतेच असे नाही इ. तक्रार करत होते. गावक-यांच्‍या भेटीवेळी दुकानदार व सोसायटीवाले आधीच त्‍यांना भेटून गेल्‍याचे व सगळे काही नीट मिळते, असे सांगा, असे सांगून गेल्‍याचे कळले. कुपने आली तरी लोकांना वेळेवर कोटा मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी लोकांच्‍या होत्‍या. अधिका-यांची देखरेख नीट नसल्‍याचे तसेच ते दुकानदारांच्‍या संगनमतात असल्‍याचे जाणवत होते. तथापि, कुपने व बायोमेट्रिक तपशिलामुळे बोगस रेशन कार्डे दुकानदारांना आता ठेवता येत नाहीत. बहुधा तेच त्‍यांचे मुख्‍य दुखणे असावे.

मध्‍यप्रदेशमध्‍येही ‘फूड कुपने’; पण गुजरातपेक्षा वेगळी

मध्‍यप्रदेशचे प्रश्‍नही महाराष्‍ट्रासारखेच. स्‍वतःची फारशी रक्‍कम रेशनव्‍यवस्‍थेत घालायची नाही, ही वृत्‍तीही तशीच. अशा या मध्‍यप्रदेशमध्‍ये होशिंगाबाद जिल्‍ह्यात स्‍मार्ट कार्डचा प्रायोगिक प्रकल्‍प झाला. याआधी चंदीगडमध्‍ये असा प्रयोग झाला. रायपूरमध्‍ये होऊ घातला आहे, तसा. या प्रयोगात भ्रष्‍टाचाराला लगाम बसणार म्‍हणून नाराज दुकानदारांनी स्‍मार्ट कार्डची पडताळणी करणा-या यंत्रावर तेल ओतून ते नादुरुस्‍त कर, यंत्रातून पडताळणीसाठी फिरविण्‍यास दिलेल्‍या स्‍मार्ट कार्डवर सुईने ओरखडे मार असे प्रकार सुरु केले. चंदीगडमध्‍येही असे अनुभव आल्‍याचे सांगितले जाते. या प्रयोगातून दुकानदारांच्‍या हातात स्‍मार्ट कार्ड पडताळणीच्‍या मशिनसारखे काहीच राहता कामा नये, हे शिक्षण झाल्‍याने मध्‍यप्रदेशमध्‍ये फूड कुपनची कल्‍पना पुढे आली.

होशिंगाबाद व हरदा या दोन जिल्‍ह्यांत ही कुपनची पद्धत लवकरच सुरु होणार आहे. या दोन जिल्‍ह्यांतील सर्वांची कँप लावून एकमेवाद्वितीय क्रमांक देणारी ‘आधार’ची नोंद पूर्ण करण्‍यात आली आहे. राज्‍य सरकारने केंद्राच्‍या या उपक्रमाबरोबरच आपल्‍याला आवश्‍यक असा तपशीलही गोळा केला. प्रत्‍येक कुटुंबाचा अन्‍य तपशील, त्‍यांना होणा-या योजनांचा लाभ यांचा चेकलिस्‍ट फॉर्मही भरुन घेण्‍यात आला. एकूण बीपीएल रेशन कार्डधारकांपैकी एक लक्षणीय विभाग या कँपकडे फिरकलाच नाही. अधिका-यांच्‍या मते, ज्‍या अर्थी हे बीपीएल कार्डधारक आलेच नाहीत, त्‍याअर्थी ते असित्‍वातच नाहीत. म्‍हणजेच, ही रेशनकार्डे बोगस होती. आता या अस्तित्‍वात असलेल्‍या आधार क्रमांक मिळालेल्‍या रेशन कार्डधारकांना वर्षाची कुपने एकदम दिली जाणार आहेत. ही कुपने छापणे, ती वितरित करणे व रेशन दुकानदारांकडून ती परत घेऊन व्‍यवहाराचे एक वर्तुळ पूर्ण करणे यासाठी एका बहुराष्‍ट्रीय कंपनीला नेमण्‍यात आले आहे. ही कंपनी या व्‍यवहाराचे विश्‍लेषण करुन सरकारला ते नियमित पुढील कार्यवाहीसाठी पाठवत राहणार आहे. या कामासाठी तिला प्रति कार्ड प्रति व्‍यवहार 12 रु.च्‍या आसपास रक्‍कम दिली जाणार आहे. हा खर्च सरकारला कसा परवडणार ? या प्रश्‍नाला उत्‍तर देताना, बोगस कार्डे रद्द झाल्‍याने तसेच कुपन पद्धतीने जो आटोपशीरपणा येणार आहे, त्‍यामुळे सरकारच्‍या खर्चात मोठी बचत होणार आहे. त्‍या तुलनेत हा खर्च अल्‍प आहे, असे अधिकारी सांगत होते. प्रत्‍यक्ष व्‍यवहार सुरुच न झाल्‍याने आतापर्यंत एकही पैसा राज्‍य सरकारने या कंपनीला दिलेला नाही.

गुजरातप्रमाणे कुपने मिळविण्‍यासाठी एक अतिरिक्‍त टप्‍पा इथे असणार नाही. शिवाय गुजरातप्रमाणे दर महिन्‍याऐवजी वर्षाची कुपने एकाच वेळी दिली जाणार आहेत. ही कुपने चलनाच्‍या पद्धतीने छापली जाणार आहेत. त्‍याचे नमुने आम्‍हाला पाहायला मिळाले. या कुपनांवर गुजरातप्रमाणेच तपशील व बारकोड असणार आहे. कुपनातच कडेची बाजू स्‍थळप्रत म्‍हणून ठेवण्‍याची सोय आहे. ठरलेल्‍या प्रमाणाच्‍या मर्यादेत ठरलेल्‍या महिन्‍यात हवे तेव्‍हा, हवी तेवढी कुपने देऊन कुपनांवर निर्देशित धान्‍य, निर्देशित रक्‍कम देऊन कार्डधारक घेऊ शकतो. रायपूरप्रमाणे इथेही एकाऐवजी दुस-या कोणत्‍याही रेशन दुकानात जाऊन या कुपनांच्‍या सहाय्याने शिधावस्‍तू घेण्‍याची मुभा पुढील टप्‍प्‍यावर लोकांना राहणार आहे. त्‍या नंतरच्‍या टप्‍प्‍यावर खुल्‍या बाजारातही त्‍यांचा वापर करता येईल का, याचा अदमास अधिकारी घेत आहेत.

अभिप्राय

छत्‍तीसगढ, गुजरात व मध्‍यप्रदेश या तिन्‍ही राज्‍यांमध्‍ये राजकीय इच्‍छाशक्‍ती जोरात आहे. अधिका-यांशी, कार्यकर्त्‍यांशी बोलताना व अंदाज घेतल्‍यावर प्रत्‍यक्षात मुख्‍यमंत्र्यांचा वैयक्तिक पुढाकार या सर्वात कळीचा असल्‍याचे लक्षात येते. हे जे काही चालले व होणार आहे, त्‍यास मंत्र्यांचा, यंत्रणेतले विविध स्‍तरावरचे अधिकारी, दुकानदार यांचा विरोध आहे. हे काहीच होऊ नये, असे प्रयत्‍न ते करतात. ते रोखता येत नसल्‍यास किमान त्‍यांची गती हळू करता येईल का, अशा खटपटीत ते असतात. तांत्रिक अथवा संरचनात्‍मक बदलामागे मुख्‍यमंत्र्यांची इच्‍छाशक्‍ती नसली, तर हे काहीच होणार नाही, असे बोलले जाते.

छत्‍तीसगढमध्‍ये सरकार भरभक्‍कम पैसे टाकते. तसे गुजरात व मध्‍यप्रदेशचे नाही. त्‍यातल्‍या त्‍यात गव्‍हाचा गुणवर्धित आटा व मीठ यासाठी गुजरात सरकार काही रक्‍कम खर्च करते. त्‍यामुळे छत्‍तीसगढमध्‍ये लाभार्थ्‍यांचा विस्‍तार सहज झाला, तसा या राज्‍यांत झालेला नाही. तांत्रिक बदलांनी रेशन व्‍यवस्‍थेला ठाकठीक करण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न आहे. गुजरातमधील प्रयोगात दरमहा कुपने देण्‍याची एक पायरी वाढल्‍याने तसेच अधिका-यांकडेच देखरेख असल्‍याने (ती खूप सैल असल्‍याचे प्रत्‍यक्ष दिसतच होते) शिवाय इंटरनेटची वेगवान व नियमित सोय सर्वत्र आतातरी नसल्‍याने या प्रयोगाची गती धिमी दिसते.

रायपूरमध्‍ये चंदीगड व होशिंगाबादमधील स्‍मार्ट कार्ड मध्‍ये आलेले अडथळे येणार नाहीत कशावरुन ? पण अजून तो प्रयोग झालेला नाही. तो झाल्‍यावर स्‍मार्ट कार्डच्‍या प्रयोगाविषयीचे निष्‍कर्ष अधिक स्‍पष्‍ट होतील. मध्‍यप्रदेशमधील कुपनांच्‍या प्रयोगात सरकारने आपल्‍या यंत्रणेचा हस्‍तक्षेप कमी व हितसंबंधांचा मेळ अधिक घातला आहे. कुपन करणारी कंपनी तिच्‍या फायद्यासाठी कुपने नीट पोहोचणे व दुकानदाराकरवी ती परत येणे याबाबत दक्ष राहणार. कारण ती फेरी पूर्ण झाल्‍याशिवाय तिला पैसे मिळणार नाहीत. रेशन यंत्रणेतील भ्रष्‍टाचाराच्‍या साखळीच्‍या ती पूर्णतः बाहेर असल्‍याने या भ्रष्‍टाचारातील वाट्यात रस असल्‍याने कामाची गती मंद वा वाकडी होण्‍याची जी शक्‍यता असते, ती या कंपनीबाबत संभवत नाही.

हे सर्व प्रयत्‍न रेशन व्‍यवस्‍थेतील भ्रष्‍टाचाराला प्रतिबंध करणे व त्‍यायोगे सरकारचा वाया जाणारा खर्च वाचवणे व लोकांना रेशन नीट मिळणे यासाठी आहे. या भ्रष्‍टाचाराच्‍या साखळीतले घटक प्रत्‍यक्ष अप्रत्‍यक्ष राजकीय मंडळींनी पुरस्‍कृत केलेले असतात. मग त्‍यांना हात लावायला ही तीन राज्‍ये का धजावली ? छत्‍तीसगढ नवीन राज्‍य होते. हितसंबंध खूप मुरलेले नव्‍हते. नक्षलवादही जोरात. त्‍याला उतारा हवा होता. लोकप्रियता मिळवायची होती. कॉंग्रेसच्‍या राजवटीपेक्षा आपण उजवे आहोत, हे सिद्ध करायचे होते. यासाठी रेशनव्‍यवस्‍थेतील प्रस्‍थापित भ्रष्‍टाचाराच्‍या साखळीला दुखावणे हा सौदा परवडण्‍यासारखा होता. मुख्‍यमंत्री रमणसिंग यांनी व्यक्तिशः हे धैर्य दाखवले. पुढच्‍या निवडणुकीत ‘चावलबाबा’ या नामाभिधानानेच त्‍यांचा प्रचार झाला. बहुमताने निवडून येऊन त्‍यांचे सरकार कायम राहिले. बहुधा यातूनच गुजरात व मध्‍यप्रदेशच्‍या मुख्‍यमंत्र्यांना प्रेरणा मिळाली असावी. वाया जाणारे अनुदान वाचवणे व लक्ष्‍य गटाला रेशन नीट पोहोचवण्‍यातून जी लोकप्रियता मिळेल, राजकीय लाभ होईल तो रेशन दुकानदार व त्‍यावरच्‍या साखळीला संरक्षण देण्‍यातून साधता येणार नाही, हे शिवराजसिंग चौहान व नरेंद्र मोदी यांनाही लक्षात आले असावे. शिवाय एकूण अर्थव्‍यवस्‍थेची मुक्‍त भांडवली विकासाची दिशा लक्षात घेता त्यास अडथळा ठरणारे सरंजामी उंदीर, घुशी आज ना उद्या माराव्‍याच लागणार आहेत, याचाही साक्षात्‍कार असावा.

फूड कुपन वा स्‍मार्ट कार्डाचे हे प्रयोग म्‍हणजे कॅश ट्रान्‍स्‍फर नव्‍हे. सध्‍याच्‍या रेशनमधील व्‍यवहाराचे ते पहारेकरी अथवा उत्‍प्रेरक म्‍हणा हवे तर. काऊंटर चेकिंगचेच काम ते करतात. पण तेही परिणामकारक झाले व रेशन दुकानदारांच्‍या भ्रष्‍टाचाराला लगाम बसू लागला, तर केवळ कमिशनखातर रेशन दुकानदार रेशन चालवतील ही शक्‍यता कमी दिसते. बोगस कार्डेच नाहीत, येणा-याला कोटा संपला म्‍हणून परत पाठवणे किंवा कोटा कमी आला सांगून कमी देणे हे बंद झाल्‍यास मापात-वजनात माल मारण्‍यासारखे किरकोळीचे उद्योग फार काळ त्‍यांना पसंद पडतीलसे वाटत नाही. शिवाय वरच्‍या भ्रष्‍टाचारी साखळीचाही हफ्त्‍यापोटी खालून येणारा दाणा-पाणी बंद झाला व त्‍यांच्‍या पातळीवरचीही लूट थांबवणे भाग पडले, तर या पावलांना परतवण्‍याचा ते कसोशीने प्रयत्‍न करतील. हे प्रयत्‍न यशस्‍वी झालेच नाहीत, तर अखेरीस रेशन दुकाने बंद पडतील. म्‍हणजे दुकानात इतर किराणा सामान मिळेल. पण रेशन मिळणार नाही. सरकारने वाजवी नफ्याची तरतूद केली तरीही सध्‍याची भ्रष्‍टाचाराला चटावलेली रेशनदुकानदारी तिची आजची वृत्‍तीप्रवृत्‍ती बघता हाच शेवट होईलसे वाटते. अर्थात, हा दिशेचा अंदाज आहे. मध्‍ये खूप वळसे पडणार आहेत. तो प्रवास करावाच लागणार आहे. म्‍हणूनच या प्रयोगांना पाठिंबा देणे व त्‍यातून शिकणे आवश्‍यक आहे.

ज्‍या राज्‍यात आम्‍ही गेलो नाही, पण त्‍या राज्‍यातही एक वेगळा प्रयोग होऊ घातला आहे, ते म्‍हणजे बिहार. येथील प्रयोग म्‍हणजे कॅश ट्रान्‍स्‍फर. अनुदान सरळ रोखीत देणे. उदा. रेशनवरील गव्‍हाची किंमत प्रति किलो 5 रु. व त्‍याची खुल्‍या बाजारातली किंमत 20 रु. असेल तर या दोहोतला फरक रु. 15 सरळ रेशन कार्डधारकाला देणे. सध्‍या या प्रयोगाची तयारी सुरु आहे. देशातील सर्वात मोडकळीला आलेली व बेबंद व्‍यवस्‍था असा बिहारमधील रेशन व्‍यवस्‍थेचा लौकिक आहे. जिथे लोकांना काहीच मिळत नव्‍हते अथवा नगण्‍य मिळत होते, तिथे या अनुदानाच्‍या सरळ मिळणा-या रकमेचे स्‍वागतच होणार.

गुजरात, छत्‍तीसगढ व मध्‍यप्रदेश ही तिन्‍ही राज्‍ये भाजपची सत्‍ता असलेली आहेत. बिहारमध्‍ये नितीशकुमारांबरोबर भाजप संयुक्‍तपणे सत्‍तेत आहे. परंतु, या तिन्‍ही अथवा चारी राज्‍यांनी रेशन सुधारणांचा एकच फॉर्म्‍युला वापरलेला नाही. आणि ते बरोबरच आहे. प्रत्‍येक राज्‍याची म्‍हणून काही वैशिष्‍ट्ये अस‍तात. सर्व राज्‍यांतील (बरेचदा राज्‍यांतर्गतही) सामाजिक संबंध व विकासाची अवस्‍था, प्रशासकीय परंपरा, हितसंबंधांचे स्‍वरुप, यावर तिथली उपाययोजना ठरत असते. म्‍हणूनच सबंध देशात एकच एक सुधारणांचा फॉर्म्‍युला चालू शकणार नाही. प्रयोगांची विविधताच राहणार. खुद्द छत्‍तीसगढमध्‍ये ग्रामीण भागात ब-यापैकी यशस्‍वी ठरलेला फॉर्म्‍युला त्‍याच राज्‍यातील शहरात स्‍मार्ट कार्डसारख्‍या प्रयोगांनी सुधारावा लागत आहे.

या कॉंग्रेसेतर पक्षांची सत्‍ता असलेल्‍या राज्‍यांनी कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने सुरु केलेल्‍या उपक्रमांचे आपल्‍या राज्‍यांत धडाक्‍याने अंमलबजावणी केल्‍याने त्‍यांचे श्रेय या राज्‍यांतील सत्‍ताधा-यांनाच मिळणार, अशी स्थिती आहे. या सर्व राज्‍यांनी आपल्‍या रेशनच्‍या प्रयोगांसाठी ‘आधार’चा आधार घेतला आहे. त्‍यांतील काहींचा आक्षेप त्‍याच्‍या हळू गतीवर तसेच त्‍यात घेतल्‍या जाणा-या तपशिलापेक्षा अधिक तपशील मिळावा, यासाठी आहे. मध्‍य प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी ‘आधार’ च्‍या नोंदींत सामील होण्‍यासाठी राज्‍यभर स्‍वतःचा फोटो असलेली पोस्‍टर्स लावली आहेत. त्‍यातून ही केंद्राची योजना आहे, याचा कोठेच बोध होत नाही. ही आपल्‍या मुख्‍यमंत्र्यांचीच योजना आहे, असेच जनतेला वाटते. त्‍यांची धडाक्‍याने अंमलबजावणी हेही असे वाटण्‍याचे कारण आहे. उपक्रम कॉंग्रेसचा-श्रेय भाजपचे असेच येथे होणार. हा आमच्‍या सरकारने केंद्रात घेतलेला उपक्रम आहे, असे प्रचारण्‍याची तसदी या राज्यांतील कॉंग्रेसचे नेते घेत आहेत, असे दिसत नाही.

महाराष्‍ट्रात तर स्‍वतःचे सरकार असूनही कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी पक्ष ही तसदी घेत नाहीत. महाराष्‍ट्रात बायोमेट्रिक रेशन कार्डे या वर्षीच्‍या मार्चपर्यंत मिळतील, असे अनिल देशमुखांनी जाहीर केले होते. नंतर ‘आधार’ची जोड यास देण्‍यात येईल असे त्‍यांनी सांगितले. आता ‘आधार’ची नोंद पूर्ण झाल्‍याशिवाय ही कार्डे देता येणार नाहीत, असे ते म्‍हणतात. मध्‍य प्रदेशने ‘आधार’ला गती दिली. स्‍वतःहून प्रचार केला. कॅप लावले. त्‍यातूनही गती मिळत नाही म्‍हटल्‍यावर ते आधारसाठी खोळंबले नाहीत. त्‍यांनी त्‍यांच्‍यासाठी आवश्‍यक तपशील गोळा केला व ते आधारसह अथवा आधारविना कार्डे देत आहेत. आधारविना कार्डांना आधार पूर्ण झाल्‍यावर त्‍याची जोड देण्‍याची त्‍यांनी सोय करुन ठेवली आहे. महाराष्‍ट्रात मात्र आधार हळू चालण्‍याचे बायोमेट्रिक रेशन कार्ड देण्‍याचे लांबवायला निमित्‍तच मिळाले. रेशन व्‍यवस्‍थेच्‍या संगणकीकरणासाठी 2005 साली म्‍हणजे वर उल्‍लेखलेल्‍या राज्‍यांमधील संगणकीकरणाच्‍या कितीतरी आधी महाराष्‍ट्र सरकारने तज्‍ज्ञ कंपन्‍यांना कंत्राटे दिली. पुढे काहीच झाले नाही. इतर राज्‍ये मागून येऊन पुढे गेली. आता छत्‍तीसगढ मध्‍ये महाराष्‍ट्रातल्‍या अधिका-यांचा एक अभ्‍यासदौरा झाल्‍याचे कळते. विशेष म्‍हणजे या राज्‍यातील राष्‍ट्रवादी पक्षाकडेच राज्‍यातील तसेच केंद्रातील रेशनखात्‍याचे मंत्रिपद राहिले आहे. आता अगदी अलिकडे शरद पवारांनी या खात्‍याचा भार सोडला. महाराष्‍ट्रातील या स्थितीला सत्‍ताधा-यांबरोबरच विरोधी पक्षांची या प्रश्‍नाबाबतची अनास्‍था कारण आहे की ‘जैसे थे’ स्थितीतच आपले हितसंबंध अधिक सुरक्षित राहू शकतात, ही सामुदायिक दक्षता कारण आहे ?

महाराष्‍ट्रात चळवळी मात्र इतर राज्‍यांच्‍या तुलनेत अधिक गतिशील आहेत. चळवळींची अशी गती आज वर उल्‍लेखिलेल्‍या प्रयोगशील राज्‍यांत नाहीत. याचा अर्थ, महाराष्‍ट्रातील चळवळींना आत्‍मपरीक्षणाची गरज आहे. आपल्‍या डावपेचांची आपल्‍या राज्‍यातील विकासक्रमाचा आढावा घेऊन फेररचनाही करावी लागेल. जाता जाता एक गंमत सांगतो. मध्‍यप्रदेशमध्‍ये बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यांना कुपनचे काम दिले आहे, असे सांगितल्‍यावर आमचे आंदोलनातील एक सहकारी दचकले व उद्गारले- ‘बहुराष्‍ट्रीय कंपनीला?’ त्‍यांच्‍या या दचकलेपणात बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यांबरोबर सहकार्य म्‍हणजे ‘पावित्र्यभंग’ असाच भाव होता. नंतर दुस-या एका अशाच पुरोगामी सहका-यांशी बोलत होतो. त्‍यांचा रेशनमध्‍ये ‘कॅश ट्रान्‍स्‍फर’ला तत्‍त्‍वतःच विरोध होता. त्‍यांना म्‍हटले, ‘मध्‍य प्रदेशमध्‍ये कॅश ट्रान्‍स्‍फरला जोरदार विरोध असणारे व तुम्‍ही करता तोच युक्तिवाद करणारे काही जण भेटले.’ या माझ्या सहका-यांनी उत्‍सुकतेने विचारले, ‘कोण होते ते ?’ मी उत्‍तरलो- ‘फूड कुपन्‍सचे वितरण करण्‍याचे काम घेतलेल्‍या बहुराष्‍ट्रीय कंपनीचे अधिकारी.’ या माझ्या सहका-यांच्‍या पुढच्‍या प्रतिक्रियेची वाट न पाहताच मला वाटणारे त्‍यांच्‍या विरोधाचे कारणही सांगितले- ‘कॅश ट्रान्‍स्‍फर सुरु झाले तर या कंपन्‍यांचा कुपन्‍सचा धंदा कसा चालेल ?

हितसंबंधांची व अं‍तर्विरोधांची गुंतागुंत वाढत चालेल्‍या आजच्‍या काळात, आपले, म्‍हणजे ज्‍यांच्‍यासाठी आपण लढतो त्‍या तळच्‍या गरीब माणसाचे हितसंबंध सुरक्षित राखण्‍याचा सरळसोपा मार्ग नाही. वास्‍तवाचे विविध पदर निरहंकारी व अभिनिवेशरहित पद्धतीने समजून घेत या अंतर्विरोधांचा वेध घेण्‍याची गरज आहे. त्‍यातूनच नव्‍या प्रयोगांना सामोरे जाण्‍याची ‘नवी’ वृत्‍ती येईल.

- सुरेश सावंत

sawant.suresh@gmail.com / 9892865937

5 डिसेंबर 2011