Tuesday, February 24, 2015

‘संविधान परिवार’ संकल्पना प्रत्यक्षात कशी आणायची?

‘संघपरिवारा’विरोधात ‘संविधान परिवार’ उभा राहायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करणारे माझे पत्र लोकसत्तेत वाचून काहींनी मला हा प्रश्न केला. त्या काहींना उत्तर देताना मी म्हणालो, “तसे पाहिले तर हे माझे wishful thinking आहे. काय व्हावे, ती इच्छा मी व्यक्त केली आहे. ते प्रत्यक्षात येईल का, मला ठाऊक नाही. यायला हवे असे निश्चित वाटते. ते प्रत्यक्षात येण्याची आत्यंतिक गरज आहे, हे मला पटलेले आहे. ते कसे करता येईल, याचे खूप तपशील माझ्याकडे नसले, तरी काहीएक कल्पना आहेत. आपण एकत्र बसून काही विचार केला तर अधिक कल्पना येतील. सुचलेल्या कल्पनांतून अधिक व्यवहार्य कार्यक्रमही पुढे येईल.”

काही ढोबळ कल्पना प्रारंभिक चर्चेसाठी खाली मांडत आहे.

‘संविधान परिवार’ म्हणजे संविधानाच्या सरनाम्यातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, सामाजिक न्याय, समता, बंधुता आदी मूल्यांचा वारसा मानणाऱ्या व्यक्ती, संघटना, पक्ष. आपल्या देशात झालेल्या राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळींच्या घुसळणीतून ही मूल्ये आकाराला आली आणि घटनेत प्रतिबिंबीत झाली. या दोन्ही चळवळींचा वारसा या व्यक्ती, संघटनांना आहे. फुले-आंबेडकरी, कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, सर्वोदयवादी या प्रवाहांतल्या संघटना, व्यक्ती, पक्ष या संविधान परिवारात मोडतात.

या मंडळींत अनेक मतभेद आहेत. एकत्र येण्यासाठी या मतभेदांवरच्या सहमतीचा आग्रह न धरता तूर्त संविधानातील मूल्ये टिकविणे-संवर्धित करणे ही किमान सामायिक भूमिका व कार्यक्रम या परिवाराला घेता येऊ शकतो. या व्यतिरिक्तच्या मुद्द्यांवर ज्यांची अधिक सहमती होईल, असे लोक आपले अन्य मंच व कार्यक्रम ठरवायला मोकळे आहेत. त्यासाठी सविधान परिवारातील सर्वांनी त्यात आले पाहिजे, अशा आग्रहाची गरज नाही. व्यापक व किमान सहमतीच्या, प्राथमिक, सैल, अनौपचारिक अशा या मंचाची खेचाखेच करण्याची गरज नाही.

यात अडचण आहे, ती नेतृत्वांच्या अहंकारांची, वैचारिक अभिनिवेशांची, पारदर्शकतेची, व्यापक एकजुटीतील शिस्तीच्या अभावाची व इतरांना सामावून न घेण्याच्या वृत्तीची. दुसरी अडचण आहे, सर्वमान्य अधिकारितेची (Authority). नेतृत्वांतील एखाद्या व्यक्तीला ती इतरांनी द्यावी लागते. तसेच ती त्या व्यक्तीला कमवावीही लागते. संविधान परिवार उभारताना ही मोठी अडचण आज आहे. प्रारंभी सर्वमान्य व्यक्तींचा एक छोटा गट करुन पुढे जायचा प्रयत्न करायला हवा.

‘संघपरिवार’ या नावाचा मंच नाही. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या संघटना, व्यक्ती स्वतःला त्या परिवाराचा घटक मानतात. आपल्या परिवारातील अन्य सदस्यांना मदतनीस राहतात, पूरक राहतात. मतभेद झाले तरी ते टोकाला नेऊन परस्परांचे शत्रू होत नाहीत. उलट जरुरीच्या वेळी वेगाने एकत्र येतात. संघाचे सरसंघसंचालक ही या परिवाराची Authority आहे. ते काही जाहीर आदेश देत नाहीत. पण त्यांचा सूचक इशारा त्यांना पुरेसा असतो. काही गुप्त बैठका, खलबते, निरोप हेही असतात. 

‘संविधान परिवार’ या नावाचा अधिकृत मंच असू नये. त्यातील घटकांनी परस्पर नात्याची ती ओळख स्वीकारण्याची व परस्परपूरक राहण्याची गरज आहे. 

एखाद्या सर्वमान्य संयुक्त कृतीतून, कार्यक्रमातून या दिशेने पुढे सरकता येते का याची चाचपणी, प्रयोग करता येऊ शकतो. कॉ. पानसरेंच्या हत्येच्या विरोधात या परिवारात येऊ शकणारे घटक सध्या क्रियाशील झाले आहेत. अनेक ठिकाणी ते एकत्र येऊन निदर्शने करत आहेत. ही आश्वासक बाब आहे.

कालचा २२ तारखेचा बंद ही एकत्र ठरवून केलेली कृती होती की नाही मला माहीत नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बंद पुकारला व इतरांनी त्याला पाठिंबा दिला, असे झाले असण्याचीही शक्यता आहे. हा बंद संमिश्र झाला. पूर्ण यशस्वी झाला नाही. बंद करण्यासाठी संघटना, कार्यकर्ते लागतात. ते जिथे होते. तिथे बंद झाला. आम्हाला बंद मान्य नाही, कसे करता ते बघू, अशी विरोधाची भूमिका भाजप-सेनेने घेतली नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादीने तर पाठिंबाच दिला होता. सामान्य लोकांच्या मनात पानसरेंच्या या हत्येमुळे सहानुभूती होती. त्यामुळे हा बंद तसा सोपा होता. पण तो पूर्ण यशस्वी न होण्यात आपली संघटनात्मक तयारी कमी पडली हेच खरे. काँग्रेस-राष्ट्रवादीने नुसताच पाठिंबा दिला. बंद करायला ते प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलेले दिसले नाहीत. ते उतरायला हवे होते. ते उतरले नाहीत, हे बरोबर नाही, हे नक्की म्हणू. पण ते न उतरल्याने बंद यशस्वी झाला नाही, असे तर आपण म्हणू शकत नाही. बंद आपण आपल्या हिंमतीवर केला होता. तेव्हा आपल्या हिमतीचे मापन आपणच करायला हवे.

यातून जे लक्षात येईल, त्याची ११ मार्चच्या मोर्च्याच्या तयारीत दुरुस्ती करता येईल. ११ मार्चच्या मोर्चाची ज्यांनी हाक दिली आहे, त्यांनी त्याच्या आखणीसाठी संविधान परिवाराच्या परिघात येणाऱ्या सर्वांना न चुकता बोलावले पाहिजे. पहिली हाक कोणीही देवो; आता मात्र त्याचे संयोजक संविधान परिवारातले सर्व घटक (किंवा जास्तीत जास्त घटक) व्हायला हवेत. हा मोर्चा ही नव्या वातावरणात संविधान परिवार संघटित करायच्या दिशेने जाण्याची संयुक्त कृती होऊ शकते.

या संयोजकांनी आपली असलेली सर्व ताकद मोर्च्यात एकवटायला हवीच. पण त्याबाहेरच्या सर्वसाधारण जनतेलाही आवाहन करायला हवे. हे आवाहन फक्त माध्यमांतून करुन पुरेसे होणार नाही. त्यासाठी लोकांत जाऊन पत्रके वाटणे, बैठका घेणे हे करायला हवे. कार्यालये, कॉलेजे, वस्त्या, स्टेशन्स, चौक इ. ठिकाणी लोकांशी प्रत्यक्ष संपर्क करायला हवा.

या सुट्या ठिकाणांहून मोर्च्याला लोक किती येतील, हा प्रश्न गौण आहे. त्या निमित्ताने जनजागरण होईल, हे महत्वाचे. या जनजागरणात समोर कोण लोक आहेत, ते पाहून आपल्या भाषणाची मात्रा द्यायला हवी. संघपरिवार, हिंदुत्ववाद याबाबतची सगळीच मांडणी करण्याची गरज नाही. 

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्यांचा खरा हेतू घटनेने दिलेल्या विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणे हा आहे, असे आम्ही मानतो. भिन्न मताचा आदर करुन त्याच्या मताचा प्रतिवाद करण्याचा अधिकार देणारी लोकशाही आपण राजकीय व सामाजिक स्वातंत्र्याच्या महान संग्रामातून मिळवली आहे. माणसे मारुन ही मिळकत उध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या या कारवाया आम्ही भारतीय लोक कधीच यशस्वी होऊ देणार नाही, याची त्यांनी नोंद घ्यावी.’

‘गोडसेवाद्यांच्या’ किंवा ‘नथुरामप्रवृत्तीच्या’ विरोधात आम्ही आहोत, हे सूत्र मांडता येईल. संघाची-भाजपची मंडळी जाहीरपणे नथुराम गोडसेंची बाजू घेत नाहीत, याचा उपयोग नथुरामवाद्यांना कोंडीत पकडण्यासाठी होऊ शकेल.

एवढी किमान मांडणी पुरेशी असू शकते. हिंदुत्वविचारांना सहानुभूती असणारे किंवा पुरोगामी-प्रतिगामी न कळणारे सर्वसाधारण ‘आम’ लोक लोकशाहीच्या, विचारस्वातंत्र्य दडपण्याच्या, त्यासाठी खून करण्याच्या विरोधात असतात. पानसरेंच्या हत्येनंतर अशा विभागांतून यावेळी निषेधाचे सूर मोठ्या प्रमाणात उठले. या सर्वांना आवाहन करण्यासाठी वरील प्रस्ताव योग्य ठरु शकतो. आंबेडकरी वस्त्यांतील बैठकांत याच्या पुढे जाऊन मांडणी करता येईल. जनसंघटनांतील कार्यकर्त्यांचे या निमित्ताने अभ्यासवर्ग घेता येऊ शकतील. त्यात दाभोलकर-पानसरे यांचे काम, भूमिका, संविधानातील मूल्ये इ. बद्दल अधिक बोलता येईल.

‘शिवाजी कोण होता?’ हे कॉ. पानसरेंचे भाषण यू ट्यूबवर उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करुन बैठकांत दाखवता, ऐकवता येईल. Whatsupp, FB वर ते सध्या फिरते आहे. ते अधिकाधिक पसरावयाला हवेच. त्याच्या पुस्तकाची pdf प्रतही online उपलब्ध आहे. तीही लोकांना पाठवायला हवी. पण प्रत्यक्ष भेटून लोकांना गटात व्हिडिओ दाखवणे, ऑडिओ ऐकवणे अथवा पुस्तकातले काही भाग वाचणे आणि त्यानंतर त्यावर चर्चा करणे याला पर्याय नाही. माध्यमे माहिती वितरणासाठी उपयुक्त आहेत. लोकांना संघटित करण्यासाठी मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटणेच आवश्यक आहे.

११ मार्चच्या मोर्च्याच्या आयोजकांपैकी आपण नसलो तरीही व्यक्तिगत पातळीवर आपल्या इष्टमित्रांबरोबर, कार्यालयातील सहकाऱ्यांबरोबर, राहतो त्या ठिकाणच्या सोसायटीतील लोकांबरोबर आपण या गोष्टी बोलू शकतो. त्यांना दाखवू शकतो. पटलं तर पहा, असं सांगून पुढचे बोलू शकतो. पटलं तेवढं घ्या. बाकी सोडून द्या. पण विचार पटले नाहीत म्हणून हत्या करणे याच्या आपण विरोधात उभे राहायलाच पाहिजे, असे शेवटी सांगू शकतो.

लवचिकता दाखवत प्रतिसादाची अशी अनेक स्तरावरची वलये सामावत आपण विस्तारायला हवे.

११ मार्चनंतर हा सर्व प्रतिसाद अधिक दृढ करण्याच्या दिशेने आखणी करु शकतो, आपली संघटनात्मक संपर्क व विचारविनिमय यंत्रणा विकसित करू शकतो. विभागवार विशिष्ट तारखेला भेटणे, 0nline सामायिक बातमी पत्र, फेसबुक पेज तयार करणे, संघटना-कार्यकर्त्यांचे रजिस्टर तयार करणे, कोण कोणत्या विषयात मांडणी करतो, त्याचीही यात नोंद ठेवणे, आपल्या अभ्यासवर्गांत-शिबिरांत त्यांना बोलावणे, परस्परांच्या आंदोलनांची/उपक्रमांची माहिती परस्परांना देणे, संघपरिवाच्या विरोधात संविधान परिवाराच्या सक्षमतेसाठीच्या मुद्द्यांची, कल्पनांची देवाणघेवाण करणे इ. पद्धतीने पुढे जाऊ शकतो.

सर्व पुरोगामी प्रवाहांना सामावणारे ‘विचारवेध’ सारखे वार्षिक संमेलन सुरु करणे. विचारवंत, कार्यकर्ते, साहित्यिक-कलावंत, सहानुभूतिदार रसिक-वाचक इ. सर्वांना प्रत्यक्ष एकत्र येण्याचा तो उपक्रम असेल. अशी विभागवार संमेलने किंवा अधिक विशिष्ट भूमिका घेतलेली ‘विद्रोही’सारखी संमेलने शक्य तितकी अधिक व्हायला हवीत.

...हा माझा कल्पनाविलास इथे थांबवतो. खरं तर वर मांडलेल्या कल्पनांत काही माझ्या तर अनेक इतरांकडून कळलेल्या आहेत. त्या मी संकलित केल्या आहेत. तुमच्याही मनात अशा अनेक गोष्टी असतील. त्या सर्वांच्या मांडणीतून काही व्यवहार्य मुद्दे नक्की पुढे येतील.

- सुरेश सावंत/२३ फेब्रुवारी २०१५

Saturday, February 21, 2015

जात नाहीशी होणार आहे का?

हा प्रश्न कार्यकर्त्यांपासून विचारवंतांपर्यंत कायम चर्चेचा राहिलेला आहे. सध्या दिल्लीतील ‘आप’च्या दणदणीत विजयाने या चर्चेला एक नवी फोडणी बसली आहे. तळपासून वरपर्यंतच्या सर्व जातींनी ‘आप’ला पाठिंबा दिला आहे. तेव्हा, आता लोक ‘बिजली-सडक-पानी’ यालाच महत्व देतात; जातींना नाही. जात गैरलागू ठरत आहे, असेही निष्कर्ष काढले जात आहेत. एक कार्यकर्ता या नात्याने मुख्यतः निरीक्षणे व काही थोरा-मोठ्यांचे संदर्भ या आधारे या चर्चेत मी पडत आहे.

जात हे खास भारतीय समाजाचे (फार तर भारतीय उपखंडाचे) वैशिष्ट्य. जगात इतर ठिकाणी वर्गीय किंवा वांशिक अथवा त्वचेच्या रंगावरुन पडणारे फरक आढळतात. पण आपल्याकडे तसे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारतात त्याप्रमाणे, मद्रासच्या काळ्याकुट्ट ब्राम्हणात व पंजाबच्या श्वेतवर्णी ब्राम्हणात कोणते साम्य आहे? उलट मद्रासचा अस्पृश्य व ब्राम्हण वंशाने जास्त निकट आहेत. महाराष्ट्रातही देशस्थ ब्राम्हण व दलित यांच्यात रंगावरुन काय फरक करणार? विशिष्ट पर्यारणात तो विशिष्ट समूह किती काळ राहतो, त्यावर त्याचा रंग व शारीरिक ठेवण ठरते, असे मानववंशशास्त्र मानते. वंश हा प्रकारच अलिकडच्या संशोधनाने निकाली काढला आहे. आपल्याकडे रंगापेक्षा, त्याच्या वर्गापेक्षा ‘जात’ महत्वाची मानली जाते. जन्मापासून मिळणारी जातीची ओळख त्याच्या मृत्युनंतरही कायम राहते. एखाद्याला धर्म विचारला आणि त्याने उत्तर दिले – ‘हिंदू’; तर तेवढ्याने प्रश्नकर्त्याचे समाधान होत नाही. जात हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. जातीशिवाय नुसती ‘हिंदू’ म्हणून ओळख अपुरी असते. इतर धर्मांचे तसे होत नाही. तथापि, भारतातील अन्य धर्मांनाही या जातींची लागण कमीअधिक प्रमाणात झालेली आढळते.

इतरत्र वर्गीय, वांशिक रचना असताना भारतात मात्र जात कशी काय जन्माला आली?

बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, समाज वर्गीय असणे ही जागतिक वस्तुस्थिती असल्याने सुरुवातीचा हिंदू समाजही त्याला अपवाद नव्हता. मात्र नंतर भारतात वर्ग बंदिस्त झाला. तसे जगात इतर ठिकाणी झाले नाही. भारतातही आपल्या वर्गाबाहेर विवाह करण्याची प्रथा प्रारंभी होती. नंतर ही वर्गबाह्य विवाहपद्धती बंद होऊन ती वर्गांतर्गत झाली. भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासात वर्गबाह्य विवाहपद्धतीवर अशारीतीने वर्गांतर्गत विवाहांचा वरचष्मा होण्यातून जातिसंस्थेचा उदय झाला. अशारीतीने ज्याने प्रथम आपला वर्ग बंदिस्त केला तो वर्ग म्हणजे पुरोहितवर्ग, असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. अनुकरणाच्या प्रक्रियेने पुरोहितवर्गानंतर इतर वर्गांनीही आपली दारे बंद करुन स्वतःला बंदिस्त केले. आणि अशारीतीने जाती तयार झाल्या. जातिव्यवस्था ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे, असे बाबासाहेब म्हणतात.

बाबासाहेबांची ही उपपत्ती नमुन्यादाखल दिली. जातीच्या उद्गमाविषयी अशा अनेक उपपत्त्या अनेक मोठ्या अभ्यासकांनी मांडलेल्या आहेत. त्यांच्यात मतभिन्नताही खूप आहे. त्यांचा अभ्यास उपयुक्त आहेच. पण माझी तशी तयारी नाही. आणि आताचा तो मुख्य विषयही नाही.

जात निर्माण झाली व ती आज आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपला आताचा प्रश्न- ही जात नाहीशी होणार आहे का?

काहींचे म्हणणे असते, जात नाही ती जात. तुम्ही कितीही लढलात, झगडलात तरी जात काही जाणार नाही. तर काहींना वाटते, आज तसा जातिभेद राहिलेलाच नाही. निदान आम्ही तरी मानत नाही.

असते एकेकाचे मत. तुमचेही असू शकते. माझेही आहे. पण मी ते सरळ मांडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी जातीचे स्वभावधर्म/लक्षणे सांगितली आहेत. त्यांच्या आधारे मी माझी निरीक्षणे नोंदवणार आहे.

पुनरुक्ती टाळण्यासाठी या दोहोंनी सांगितलेली सामायिक लक्षणे स्वतंत्रपणे न नोंदवता ती एकत्र करत आहे. ती अशीः १) एका जातीला दुसरीबद्दल आपुलकी नाही. २) स्वतःचा वेगळेपणा कायम राखण्यासाठी झटत असते. ३) आपल्याच जातीत रोटीव्यवहार. ४) आपल्याच जातीत बेटीव्यहार. ५) जातिवर्धक असा पेहराव. ६) आनुवंशिकता. ७) जन्मसिद्ध व्यवसाय. ८) उच्चनीचता, अस्पृश्यता. ९) जातपंचायत.

ही लक्षणे आजही दिसतात का, त्यांच्यात काही फरक पडला आहे का, याचा विचार करु.

एका जातीला दुसरीबद्दल आपुलकी नाही, हे आजही दिसते. तीव्रतेत फरक असतो. सवर्ण जातींमध्ये असलेला दुरावा आणि सगळ्या सवर्ण जातींना दलित जातींविषयी असलेला दुरावा यांत दलित जातींविषयीची तीव्रता अधिक असते. स्वतःचा वेगळेपणा कायम राखण्यासाठी झटणे, हे लक्षण आजही आहे. जातींची संमेलने, लग्ने यांतून हे व्यक्त होत असते. आनुवंशिकतेने तर जात सिद्ध होत असते. बापाची जात मुलाला हे जातीच्या जन्मापासून आजतागायत चालू आहे. आनुवंशिकता या लक्षणाला अजिबातच धक्का पोहोचलेला नाही.

जातिवर्धक किंवा जात दर्शविणारा पोशाख हे लक्षण आज जवळपास गैरलागू झाले आहे. ऐपत झाली तरीही ब्राम्हणासारखा पोशाख दलित करु शकत नसे. धर्मानेच बंदी होती. बाबासाहेबच सुटाबुटात राहू लागले. त्यांच्यानंतरच्या शिक्षित दलित पिढीने जाणीवपूर्वक तो वेश स्वीकारला. आता अशी जाणीव ठेवण्याची गरजच नाही, इतके वातावरण बदलले आहे. पोशाखाची एकसारखी धाटणी रुळली आहे. प्रादेशिकतेचे फरकही पोशाखाने ओलांडले आहेत. काही पुरोहिताचा व्यवसाय करणारे ब्राम्हण सोडले तर, शेंडीवाला ब्राम्हण सहसा दिसत नाही. वरुन पोशाखात सारखेपणा असला तरी द्विज जातींमधील काही जण अजूनही आतून जानवे घालतात.

जन्मसिद्ध व्यवसायांत खूप बदल झाले. आणि गतीने होत आहेत. औद्योगिकीकरणाने जातिनिहाय व्यवसायांचा पायाच मोडून काढला. नेहमी दिले जाणारे उदाहरण म्हणजे, बाटाच्या कारखान्यात चपला बनविणारे हे काही सगळे चांभार नसतात. कोल्हापूरची अभ्यंकरांची (चित्पावन ब्राम्हण) चप्पल खूप प्रसिद्ध आहे. बाबासाहेबांनी जातियतेची दलदल असलेली खेडी सोडायचा आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात महार मंडळी शहरांकडे आली आणि ब्रिटिशकालीन औद्योगिकरणाच्या संधींचा त्यांनी वापर केला व गिरणी, रेल्वे इ. उद्योगांत कामाला लागले. अनेक जातींचे लोक आज आपला पारंपरिक व्यवसाय करताना दिसत असले तरी, त्यांना ते काम करण्याची सक्ती आज धर्म करत नाही. अर्थात सफाई कामांत आजही दलितच प्रामुख्याने आहेत, संडास सफाईचे काम तर भंग्यांच्याच वाट्याचे अशी स्थिती आज दिसते. याचे कारण या अप्रतिष्ठित, घाणीच्या धंद्यांत इतर जातींचे लोक येत नाहीत. आणि जे दलित किंवा भंगी येतात, त्यांना इतर रोजगार सहजासहजी मिळत नसतो आणि हे काम त्या मानाने सहज उपलब्ध होते. शिवाय ते त्यांचे पारंपरिक काम असल्याने त्यांना ते अपरिचित नसते. हे काम केल्याने जात बुडविली, असे कोणी हिणवणारही नसते. पण आधी म्हटल्याप्रमाणे त्यांना ते करण्याची सक्ती नसते. अशा कामांतले दलित कामगार आपल्या मुलांनी या कामांत येऊ नये, असाच प्रयत्न करतात. काही बनिया जाती नव्या भांडवली व्यवसायांत आपले पारंपरिक कौशल्य वाढवून अधिक प्रगत होताना दिसतात. या व्यवसायांत जम बसविण्यास त्यांच्या जातबंधूंचे सहाय्य त्यांना होत असते. जातींचे बंध त्यांना इथे उपयुक्त ठरतात. पण या धंद्यांत इतर जातींचेही लोक मुसंडी मारताना दिसू लागले आहेत. थोडक्यात, जाती म्हणजे श्रमिकांची विभागणी, हे एकेकाळचे ठळक वास्तव आता वेगाने धूसर होत आहे.

रोटीव्यवहार आपल्याच जातीत असे शहरात राहिलेले नाही. खेड्यांतही बदल होतो आहे. दलितांसाठी वेगळे कप ठेवण्याचा मागासपणा अजून काही गावाकडच्या हॉटेलांत चालतो. त्यांना वेगळे वाढले जाते. आपल्या पंक्तीला बसवले जात नाही. हा भेदभावही अनेक खेड्यांत आढळतो. दलितांसाठी वेगळे पाणवठे ठेवण्याकडेच कल असतो. दृश्य स्वरुपातली अस्पृश्यता गतीने कमी होत आहे. मात्र उच्चनीच भाव अजूनही लक्षणीय आहे. जातपंचायत हे जातीचे व्यवच्छेदक लक्षण आजही दिसते. स्वरुप व कार्य थोडे बदलले आहे. काही भटक्या, दलित जाती सोडल्या तर आता न्याय जातपंचायतीत होत नाही. कायदा, न्यायालयांचा वापर होतो. पण लग्नकार्याला, जातींच्या संमेलनांना, जातीतील मुलांच्या विकासाला मदत करणारी अशी जातमंडळे आता आहेत. काहींनी आपले हॉल, मंगल कार्यालयेही बांधलेली आढळतात.

मुद्दाम शेवटी चर्चेसाठी ठेवले ते लक्षण म्हणजे जातीअंतर्गत बेटीव्यवहार. प्रत्येक जातीचा, कुटुंबाचा आटोकाट प्रयत्न असतो, तो आपल्या मुला-मुलींनी जातीतच लग्ने करावीत असा. त्याच जातीच्या माता-पित्यांपासून मूल जन्मण्यातून ती जात चालू राहणार असते. वर्गांतर्गत विवाह ही जातीच्या अस्तित्वासाठी कळीची बाब असते. वंश वा रक्तशुद्धीसाठी हे आवश्यक आहे, असेही काही कर्मठांचे म्हणणे असते. पण जातींच्या प्रारंभापासून आजतागायत पूर्णपणे यशस्वी न झालेली ही बाब आहे. मिश्रणे कायम होत राहिली. अधिकृत विवाहाने अथवा अनधिकृतपणे. म्हणूनच तर जाती रुपावरुन समजत नाहीत. आंतरजातीय विवाह जुन्या काळीही होत होते. आता तर त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पळून जाऊन लग्न करणारे बहुधा भिन्न जातींचे-धर्मांचेच असतात. आज काही जण ठरवून करावयाच्या विवाहांमध्येही वेगळ्या जाती सहन करतात. पण खालच्या नको असे जाणीवपूर्वक म्हणतात. वर्तमानपत्रातल्या जाहिरातींत ‘जातीची अट नाही (SC/ST क्षमस्व)’ असे कटाक्षाने नोंदवलेले आढळते.

वरील निरीक्षणांतून असे दिसते की, काही लक्षणे आज अजिबात दिसत नाहीत, किंवा नष्ट होऊ लागली आहेत. काही लक्षणांचे मर्म आजही ताजे आहे. पण एकूणात जातींच्या भिंतींना जोरात धडका बसू लागल्या आहेत. काही ठिकाणी भगदाडेही पडू लागली आहेत. म्हणजेच दिशा जात जाण्याची आहे. पण...

हा ‘पण’ अवघड घाट आहे. राजकारणी आणि जातीजातींत तयार होणारा मध्यमवर्ग हा या जातिअंताच्या झारीतला शुक्राचार्य आहे. राहू, केतू जे काही म्हणायचे ते म्हणा. जातिअंताची दिशा आपल्या स्वार्थासाठी अडवून ठेवण्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम हे घटक करत आहेत.

भारतातील लोकशाही इतर नवमुक्त राष्ट्रांमधली एकमेव टिकलेली लोकशाही आहे. ही बाब अभिमानास्पदच आहे. पण लोकशाही जीवनप्रणाली पूर्णांशाने आपल्यात मुरणे अजून खूप दूर आहे. जातीची एकगठ्ठा मते हा या लोकशाही प्रक्रियेला अडसर ठरतो. आज उमेदवार ठरवताना त्याची जात, त्याच्या मतदारसंघातील जातींचे बलाबल हे हिशेब प्रधान असतात. मग पुरोगामी नेत्यांकडूनही दुर्बल जातींच्या बेरजांची भाषा सुरु होते.

आता मागास जातींतही एक मध्यमवर्ग तयार होऊ लागला आहे. हा शिक्षित, थोडाफार साधनसंपन्न मध्यमवर्ग त्या त्या जातीचा प्रवक्ता असतो. तो त्या जातीचे नेतृत्व करत असतो. ते आवश्यकच असते. पण त्याच्या स्तराच्या आर्थिक, भौतिक आकांक्षा त्याच्यात संधिसाधूपणा निर्माण करतात व त्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी तो आपल्या समाजविभागाला वापरु लागतो. त्या समाजविभागाचा त्राता म्हणून आभास तयार करतो. मात्र त्याचे खरेखुरे प्रश्न शेवटास नेत नाही. त्याच्या स्वार्थासाठी तो ते कायम ताजे ठेवत असतो.

यामुळे मरु घातलेल्या जाती ताज्या राहतात.

हे बदलू शकत नाही का? निश्चित बदलू शकते.

जातींच्या लक्षणांचा आढावा घेताना जातींची दिशा जाण्याची आहे, हे जे म्हटले ते आपोआप घडलेले नाही. विज्ञानतंत्रज्ञानाने उत्पादनव्यवस्थेत झालेले बदल तसेच जाणीवपूर्वक केलेले सामाजिक प्रबोधनाचे, बदलाचे संघर्ष, असंख्य थोरा-मोठ्यांचे, जाणत्यांचे अथक प्रयास त्यामागे आहेत. असेच अथक, जाणते प्रयास आपल्याला करावे लागतील. भौतिक परिस्थिती तर पोषकच आहे.

यादृष्टीने जातिअंताच्या लढवय्यांनी सुचवलेले व अवलंबलेले तसेच काही नवीन उपाय आपल्याला योजावे लागतील. त्यातील काही असेः

बाबासाहेब तसेच अन्य सुधारकांचा ज्यावर भर होता तो आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करतच राहावा लागेल. याचा अर्थ, मने जुळत नसतील तरी उच्च ध्येयासाठी आंतरजातीय विवाह करणे, असे नव्हे. जात हे मर्यादित क्षेत्र असते. मोकळ्या जगात वावरणाऱ्या मुलामुलींना मनाजोगता जोडीदार निवडण्याची संधी व मोठ्यांचा पाठिंबा असेल तर बहुतेक विवाह हे जातिबाहेरच होतील. कारण हे मोकळे जग विविध जाती-धर्म समूहांचे मिश्रण आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी अशी लग्ने कोणत्याही धार्मिक पद्धतीने न करता विशेष विवाह कायद्याखाली नोंदणी पद्धतीने करावी. आपल्या मुलांची शाळेत कोणतीही जात वा धर्म नोंदवू नये. मुलांची नावे त्याचे नाव + आईचे नाव + वडिलांचे नाव अशारीतीने लावावी. त्यामुळे आडनावातून जात कळण्याचा तसेच मूल आईचे व वडिलांचे दोघांचे असताना केवळ वडिलांचे नाव धारण करण्यातली पितृप्रधानता दिसण्याचा प्रश्न निकाली निघतो. असे करणारे लोक पूर्वी दुर्मिळ होते. आता ते वाढताना दिसत आहेत, हे आश्वासक आहे.

जातींच्या ओळखी नाहीशा होऊन शोषक व शोषित असा वर्गीय झगडा उभा राहायचा असेल, तर गावकुसाच्या आतल्या व बाहेरच्या कष्टकऱ्यांचे ‘कष्टकरी’ हे नाते ठळक करावे लागेल. त्यासाठी त्यांच्या सामायिक प्रश्नांचे लढे जोरदार करावे लागतील. आणि त्यांचे त्या लढ्याच्या क्रमात, मात्र जाणीवपूर्वक जातिअंताचे प्रबोधन करावे लागेल. कष्टकरी म्हणून नाते उजळले की जातीचा संस्कार आपोआप जाईल, असे होणार नाही. हजारो वर्षांच्या तिच्या अस्तित्वाची मनावर चढलेली पुटं लगेच जात नसतात. जात हे त्या अर्थाने काळजाचे दुखणे असते. ते काळजीपूर्वक हाताळावे लागते.

याचबरोबर आपल्या जातीअंतर्गत तयार झालेल्या परंतु संकुचित स्वार्थासाठी जातीला वापरणाऱ्या आपल्याच मध्यमवर्गीय जाचबांधवांशी संघर्षही करावा लागेल. राखीव जागा केवळ आर्थिक निकषावर नको, हे बरोबरच आहे. पण ती जागा खुली न करता, त्या वर्गवारीत ओबीसींप्रमाणे दलित-आदिवासींसाठीही अंतर्गत आर्थिक निकष लावण्याची मागणी कधीतरी करावीच लागेल. त्या विशिष्ट वर्गवारीसाठी असलेल्या सवलती त्या वर्गवारीतील अधिक गरिबाला मिळणे, हाच न्याय आहे. राखीव प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या वरच्या थरातील व्यक्ती राखीव जागा अथवा सवलतीचा लाभ घेताना दिसल्यामुळे तिच्याविषयी जो खुल्या वर्गातील निम्न आर्थिक स्तरातील लोकांमध्ये दुखरेपणा तयार होतो, तो निवळायला मदत होईल.

युरोपात सरंजामशाही तिच्या भाराने कोसळली. ती कोसळत असताना तेथील समाजाच्या सर्वांगात बदलाच्या ऊर्मी वाहू लागल्या. राजकीय व सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा एकच प्रवाह तिथे होता. आपल्याकडे मात्र निराळे घडले. आपली सरंजामशाही मोडकळीला येण्याची चिन्हे दिसू लागली होती. परंतु, तिची मूळे अजून सुकलेली नव्हती. अशावेली इंग्रज येथे आले आणि त्यांनी आपल्या भांडवलशाहीचे कलम येथील सरंजामशाहीवर केले. त्यामुळे भांडवली विकास, त्यातून नवे रोजगार, आधुनिक शिक्षण, लोकशाहीसारखा नवविचार यांसोबतच सरंजामशाहीतील जाती, जुनाट बंधने, संस्कार टिकून राहिले. परिणामी ‘आधी सामाजिक की आधी राजकीय’ असा तिढा इथे तयार झाला. साहजिकच सामाजिक व राजकीय चळवळींचे पुरस्कर्ते परस्पर शत्रू वाटावेत असे चित्र तयार झाले. या विशिष्ट अवस्थेमुळे भांडवली विकासातही जातींचे तण जोमदार राहिले. स्वातंत्र्यानंतर हा अंतर्विरोध नष्ट झाला. तथापि, शोषक वर्ग व त्याला आपल्या संकुचित स्वार्थासाठी पाठिंबा देणारा मध्यमवर्ग हे तण आज पोसतो आहे. जातीच्या आवाहनाला अजिबात थारा न देता निखळ लोकशाही निवडणुकांची प्रक्रिया होण्यासाठी सायास करावे लागतील. अथक सामाजिक प्रबोधन व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक एकजुटीचा संघर्ष करत भांडवली लोकशाही विकासाला (समाजवादाच्या वाटेवरील अपरिहार्य टप्पा म्हणून) गती देण्यानेच जातींचे ढासळू लागलेले, तरीही आज भक्कम असलेले बुरुज उध्वस्त होणार आहेत.

...जात खरोखरच नाहीशी होणार आहे.

- सुरेश सावंत

Friday, February 20, 2015

मोदींच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या निवेदनाचे स्वागत जरुर; पण सावध

ख्रिस्ती संमेलनात बोलताना आपण कोणालाही धार्मिक अतिरेक करू देणार नाही तसेच देशातील जनतेस धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपल्याला हव्या त्या धर्माचे अनुसरण करण्याची मुभा देशातील नागरिकांना पूर्णपणे आहे, असे मोदींनी निःसंदिग्ध विधान केले. भारतीय संविधान व आपल्या राजकीय परंपरेला हे धरुनच असले, तरीही मोदींचे सहोदर असलेल्या हिंदुत्ववादी मंडळींनी अलिकडे जी मुक्ताफळे उधळली वा कारवाया केल्या त्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे सुस्पष्ट निवेदन महत्वाचे आहे. स्वागतार्ह आहे.
तथापि, यावरुन मोदी वेगळे व ही कारवायाखोर मंडळी वेगळी, त्यांच्याशी मोदींचा काहीही संबंध नाही, एकेकाळी असतील ते संघाचे प्रचारक, आता ते देशाचे पंतप्रधान आहेत अशी समजूत करुन घेणे धोक्याचे ठरेल. पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार करताना मी काय पथ्ये पाळणार आहे, याची त्यांनी जाहीर ग्वाही दिली, एवढ्याचसाठी हे स्वागत.
मग शंका काय आहे?
शंका ही आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचा परिवार-ज्याला संघपरिवार म्हटले जाते तो झोटिंग आहे. झोटिंग हे रुप बदलणारं भूत. ते एकदा घरवापसी जोरदार पुकारणार, दुसरीकडे इथे सर्व धर्म समान आहेत, त्यांना त्यांच्या प्रचार-प्रसाराचे स्वातंत्र्य आहे, असेही म्हणणार. ४ मुलांना जन्म देण्याचे आवाहन एका बाजूला, तर अशी मुले जन्माला घालणारी स्त्री ही काय मशीन आहे, असे फटकारणे दुसऱ्या बाजूला. पलट्या मारत राहणे हे संघपरिवाराचे वैशिष्ट्य. या पलट्या मूळ उद्देशाच्या दिशेने जाण्यासाठीचे डावपेच, तडजोडी असतात, हे लक्षात घ्यायला हवे. तर, अशा या संघाचे मोदी पूर्णवेळ कार्यकर्ते, प्रचारक होते. आजही आहेत. जीवन त्यासाठीच त्यांनी वाहिलेले आहे. पंतप्रधान ही त्यांची निराळी जबाबदारी नाही. तर संघाच्या उद्दिष्टपूर्तीच्या मोहिमेचा एक भाग आहे. भारताचे संविधान, समाजाचे सद्य स्वरुप व परंपरा, आंतरराष्ट्रीय वातावरण लक्षात घेता जमेल तितकी आपली कार्यक्रमपत्रिका रेटायची; कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष; असा त्यांचा म्हणजेच मोदींचा प्रयत्न राहणार.
अलिकडेच काही मुस्लिम धर्मगुरुंनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून संघाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सहा प्रश्न विचारले आहेत. भारत हे हिंदू राष्ट्र आहे असे संघाचे मत आहे का, भारताला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी संघाने कोणता मसुदा तयार केला आहे का, हे हिंदू राष्ट्र हिंदू धर्मग्रंथांवर आधारित आहे का, की संघाने नवे तत्त्वज्ञान तयार केले आहे, धर्मांतराबाबत संघाला काय हवे आहे, संघाला मुस्लिमांकडून कोणत्या प्रकारचे राष्ट्रप्रेम हवे आहे आणि संघाचे इस्लामबाबत मत काय आहे, असे हे सहा प्रश्न आहेत. मुस्लिम धर्मगुरुंच्या शिष्टमंडळाला लगेच उत्तरे देण्यास संघाच्या पदाधिकाऱ्याने नकार दिला व मुस्लिम संघटनांची परिषद घ्या, तिथे ही उत्तरे देऊ, असे सांगितले आहे.
लगेच उत्तरे देण्याइतपत भूमिका व अभिव्यक्ती यांत तार्किक सुसंगती ठेवण्यात संघाने कधीच सचोटी दाखवलेली नाही. ती भोवतालच्या संदर्भानुसार चलाखीची राहिलेली आहे. वरील प्रश्नांची उत्तरे संघ देईलही. या नव्या संदर्भात रचलेल्या उत्तरांत आपण अनेक कोलांट्या, पलट्या पाहू शकू.
म्हणूनच, संघस्वयंसेवक, संघप्रचारक पंतप्रधान मोदींच्या वरील निवेदनाचे स्वागत जरुर हवे; पण ते संघचारित्र्याच्या या पार्श्वभूमीवर सावध हवे.
- सुरेश सावंत

Thursday, February 19, 2015

आपचा विजय केवळ बिजली-पानी-भ्रष्टाचार यामुळे...?

आपचा विजय अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण व आश्वासक आहे, हे निश्चित. तथापि, आपच्या दिल्ली विजयाची वैशिष्ट्ये नोंदवताना जात-धर्माला थारा न देता बिजली-सडक-पानी हेच जनतेने महत्वाचे मानले, असे एक मत मांडले जाते. हे संपूर्ण खरे नाही. एकूण गोरगरीब जनतेच्या या प्रश्नांना आपच्या गेल्या काही वर्षांतील दिल्लीच्या रस्त्यांवरील धुमश्चक्रीत आवाज मिळाला, हे खरे. मध्यमवर्गाला भ्रष्टाचारमुक्त दिल्ली, सुरक्षितता यासाठी लढणारा आप त्याच्या प्रामाणिकतेमुळे व नव्या धडाडीच्या नेतृत्वामुळे जवळचा वाटला, हेही खरे. मोदींच्या लोकसभेतील यशाच्या वेळी हिंदुत्ववादी मांडणीऐवजी विकासाचा मूड प्रभावी होता. हा मूडही आपला उपयोगी ठरला. याच्या परिणामी, मायावतींना मानणारा दलित व भाजपकडे स्वाभाविकपणे कल असलेला हिंदू मध्यमवर्गीय बहुसंख्येने आपच्या बाजूने उभा राहिला. इथवर बरोबर आहे.

तथापि, मुस्लिम व शिखांचे भरघोस मतदान आपला होण्यात केवळ बिजली-सडक..नाही. काँग्रेसचे विविध कारणांनी क्षीण झालेले अस्तित्व व त्यामुळे तयार झालेली ढोबळ सर्वसमावेशक ‘लोकवादी’ राजकारणाची पोकळी आपला काँग्रेसने जणू आंदण दिली. काँग्रेसच्या पारंपरिक दलित, मुस्लिम मतदारांना दुसरा भक्कम पर्याय हवा होता. ८४ च्या दंगलीत भरडलेले शिख काँग्रेसवर आधीच नाराज; त्यात भाजप व आपने त्याला गेला काही काळ भरपूर इंधन देऊन ती वाढवली होती. काँग्रेसवरची शिखांची ही नाराजी मागच्या निवडणुकांत भाजपला मदतनीस ठरली होती. यावेळी मात्र शिखांनी भाजपला दूर सारले व आपचा स्वीकार केला. मतदानाची काही आकडेवारी पाहू.

दिल्लीच्या लोकसंख्येत १२ टक्के मुस्लिम. त्यातल्या ७७ टक्क्यांनी आपला मतदान केले. शिख दिल्लीच्या लोकसंख्येत ४ टक्के. त्यातल्या ५७ टक्क्यांनी आपला मते टाकली. गेल्या वेळी ६८ टक्के शिखांनी भाजपला मतदान केले होते. यावेळी ते ३४ टक्के आहे.

मोदींच्या राज्यारोहणानंतर हिंदुत्ववादी संघटनांना जे बळ मिळाले व घर वापसी इ. जे चाळे सुरू झाले, त्याची धास्ती मुस्लिम आणि शिखांनीही घेतली व त्यांनी आपला भरघोस पाठिंबा दिला.

त्यामुळे केवळ बिजली-पानीचा हा विजय आहे, एवढंच मापन करणे व देशात आता हेच वातावरण असणार आहे, असा निष्कर्ष काढणे घाईचे होईल.

- सुरेश सावंत

दाभोलकर-पानसरेंवरील हल्ल्यांचा बोधः ‘संघपरिवारा’विरोधात ‘संविधान परिवार’ उभारणे

कॉ. गोविंदराव पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोहोंच्यावरील हल्ल्यांत साम्य असल्याचे बोलले जात आहे. ते खरे आहे. सकाळी चालायला जाताना हल्ला होणे, हल्लेखोरांचे मोटारसायकलवरुन येऊन गोळ्या झाडणे हे साम्य आहेच. शिवाय दोघेही भारतीय संविधानातील लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद इ. मूल्ये जोपासण्याचे आयुष्यभराचे व्रत घेतलेले कार्यकर्ते होते. साहजिकच ज्यांना ही मूल्ये समाजात रुजणे मान्य नाही, अशा शक्तींनीच त्यांच्यावर हल्ला केला असणार अशी शक्यता वर्तवणे स्वाभाविक आहे. त्यांचे चारित्र्य पाहता वैयक्तिक हितसंबंध वा हेवेदाव्यांमुळे हे हल्ले झाले असणे अजिबात शक्य नाही.

दाभोलकरांचे खूनी १८ महिने झाले अजून सापडले नाहीत, तेवढ्यात कॉ. पानसरेंवर हा हल्ला झाला आहे. तीन दिवस झाले तरी अजून हल्लेखोर सापडलेले नाहीत. या हल्ल्यांनी व आरोपींना पकडण्यात येत असलेल्या उशीरामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता व संताप आहे. जागोजागी त्यांची निदर्शनेही होत आहेत. या निदर्शनांत सध्या सत्तेत असलेल्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. आजचे केंद्रातले व राज्यातले सत्ताधारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला निष्ठा असणारे आहेत. रास्वसं आज जाहीरपणे काहीही बोलत असला तरी संविधानातील वर उल्लेख केलेल्या मूल्यांचा व दाभोलकर-पानसरेंच्या कार्याचा कायम विरोधक राहिला आहे. संघाची छत्रछाया असलेल्या विविध कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटना व त्यांचे नेते यांची अलिकडची वक्तव्ये व कारवाया यांना जोर आला आहे. वर आपलेच सरकार आहे, ही भावना त्यामागे आहे. त्यामुळे पुरोगामी कार्यकर्त्यांचे सरकार व संघपरिवार यांवरील टिकास्त्रही स्वाभाविक आहे.

तथापि, अशा टीकास्त्राचा नीटसा बोध न होणारे, मात्र अशा हल्ल्यांना मनापासून विरोध असलेले खूप लोक समाजात आज आहेत. निदर्शकांच्या घोषणा व भाषणे ऐकून त्यांना कळत नाही, अशा निदर्शनांत सहभागी व्हायचे की नाही. काहींना हिंदुत्ववादी मंडळींचे काही पटतही असते, मात्र त्यांचा हिंसकपणा मंजूर नसतो. तेही अशा निदर्शनांपासून दूर राहतात. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या जनसंघटनांतही असा नीटसा बोध न होणारे किंवा संघीय विचारांपैकी काही बाबी पटणारे लोक असतात. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या प्रभावामुळे तसेच मनापासून अशा निदर्शनांत ते सहभागी मात्र होत असतात.

दाभोलकर-पानसरेंवर हल्ला करणाऱ्या शक्तींची ताकद कमी करावयाची असेल तर नीटसा बोध न होणारे तसेच विरोधी शक्तींच्या काही बाबी पटणारे हे जे लोक आहेत, त्यांचे शिक्षण गरजेचे आहे. त्यांच्या समजुतींवर कठोर भाषेत हल्ला न करता सौहार्दाने त्यांच्याशी संवाद वाढविणे आवश्यक आहे.

बनचुक्यांवरचा हल्ला त्यामुळे सौम्य करायचा असे अजिबात नाही. मात्र या दोन्ही गोष्टी समांतरपणे चालू ठेवणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार निदर्शनांचे दोन प्रकारही करता येऊ शकतात. एकात, हा पूर्ण हल्ला असू शकतो. त्याला आपल्याशी संपूर्ण सहमत असलेले, जाणते लोक बोलवायचे. दुसरा प्रकार हा समाजाच्या विवेकाला आवाहन करणारा व असे हल्ले मानवतेला लांच्छनास्पद आहेत, लोकशाहीला घातक आहेत या तऱ्हेची व्यापक परंतु मर्यादित मांडणी करणारा असावा.

अशारीतीच्या हल्ल्यांनंतर पुरोगाम्यांना व्यापक एकजुटीचे आवाहन केले जाते. त्याला प्रतिसादही मिळतो. मतभेद असलेले तथापि पुरोगामी छावणीतले हे लोक एकत्र निदर्शने करतात. पुढे हा निदर्शनांचा जोर ओसरतो व प्रत्येकजण आपापल्या तंबूत परत जातात. संघपरिवारातल्या संघटना-व्यक्ती ज्या रीतीने परस्परपूरक राहतात व वेळ आली की एकत्र होतात (उदा. मोदींना निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्या खूप आधी रामजन्मभूमी आंदोलन व दरम्यान बरेच काही). या परस्परपूरकतेत त्यांची ताकद आहे. तशी ताकद उभारण्यासाठी पुरोगामी मंडळींनी अशी परस्परपूरकता साधायला हवी. त्यासाठी स्वतःला लवचिक व समावेशक करायला हवे. मतभेद संवादी चर्चेत ठेवून आपल्यातले सामायिकत्व शोधले पाहिजे. या सामायिकातूनच एक सहमतीची भूमिका ठरविली पाहिजे व कार्यक्रम आखला पाहिजे. ही लांब पल्ल्याची मोहीम आहे. रास्वसंघाने त्यांची मोहीम १९२५ साली सुरू केली. त्याला अलिकडच्या काळात फळे येऊ लागली आहेत. पुरोगामी शक्तींना इतका नाही तरी दीर्घ काळ हा एकजुटीचा प्रयोग चालवावा लागेल. ‘संघपरिवारा’ला आव्हान देणारा सशक्त ‘संविधान परिवार’ उभारण्यात आता अधिक उशीर तसेच कसूर न करणे, हा दाभोलकर-पानसरेंवरील हल्ल्यांचा बोध आहे.

- सुरेश सावंत

Wednesday, January 28, 2015

RIP की आदरांजली?

मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहताना बहुतेकांकडून सवयीने comment नोंदवली जाते -'RIP'. 'Rest in peace'चा हा संक्षेप. मृतात्म्यास शांती/चिरशांती लाभो, असा त्याचा अर्थ. माणूस मेल्यावर दहन झाल्यास त्याची राख होते किंवा दफन झाल्यास माती होते. शांतीचा अनुभव घेण्यासाठीची जाणीव मेंदू असला तरच होणार. मेंदूच नष्ट झाल्यावर अशी चिरशांती मृत व्यक्ती कशी काय अनुभवणार? जी काय शांती मिळावयास हवी, तिची कामना आपण ती व्यक्ती जिवंत असतानाच करणे संयुक्तिक नव्हे काय? किमान लोक आपल्याविषयी अशा भावना व्यक्त करुन आपली दखल घेत आहेत, यामुळे ती व्यक्ती काही काळ तरी नक्की सुखावेल. कारण हे समजण्यासाठीचा तिचा मेंदू तेव्हा जिवंत असतो.

तात्पर्य, मृत व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना RIP ऐवजी 'आदरांजली', 'स्मृतीस अभिवादन' असे म्हणणे वास्तवाला धरुन होईल.

------------------------

टीपः 'आत्मा अमर आहे'अशी ठाम समजूत असलेल्यांना वरील अपील लागू नाही. अशी समजूत बाळगण्याच्या त्यांच्या अधिकाराचा मी आदर करतो.

Saturday, January 3, 2015

वसंतराव गोवारीकर गेले! काही आठवणी जाग्या झाल्या...

९०-९१ साल असावे. मी डॉ. माधव चव्हाणांबरोबर (सध्या'प्रथम'चे प्रमुख) साक्षरतेच्या आंदोलनात काम करत होतो. साक्षरतेसाठीचे संसाधन केंद्र ते जिथे शिकवत त्या माटुंग्याच्या UDCTत भीम रास्करांच्या नेतृत्वाखाली चालत होते. या केंद्राचा मीही एक भाग होतो. 

एके दिवशी तेथील फोन खणखणला. मी उचलला. माझ्या 'हॅलो..' नंतर पलीकडून शांत, हळुवार स्वर आले, "मी वसंत गोवारीकर बोलतोय. माधव आहे का?" मी उडालोच. साक्षात वसंतराव गोवारीकर! तेही दिल्लीहून! तेव्हा दिल्लीचा फोन म्हणजे ट्रंक कॉल. भरभक्कम बिल व्हायचे. बोलणाऱ्या दोहोंपैकी कोणावर तरी त्याचा भार येणार. अशा ट्रंक कॉलचे मला नेहमीच दडपण यायचे. त्यात एका प्रचंड मोठ्या माणसाबरोबर मी बोलत होतो. त्यांची ख्याती शालेय जीवनापासूनच ऐकत आलो होतो. यावेळी ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व भारत सरकारच्य विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. 

मी काही क्षण चाचरलो. पण गोवारीकरच इतक्या निवांतपणी व खास मराठीत बोलत होते की मीही सावरलो. माधव लेक्चरला की कुठे होता, ते सांगितले. त्यांनी माधवसाठी काहीतरी निरोप दिला. 

खास मराठीत म्हणण्याचे कारण त्यात कोठेही इंग्रजी शब्द नव्हता. दिल्ली-परदेशी वावरलेली (आता तर कॉलेजला गेलेली बहुतेक सगळीच) माणसे मराठी असूनही मिंग्लिशमध्ये बोलताना दिसतात. गोवारीकरांच्या पिढीचेच बहुधा हे वैशिष्टय असावे. या व त्यांच्या आधीच्याही पिढीतील इंग्रजी शिक्षण घेतलेली-विशेषतः इंग्रजांच्या काळात शिक्षण घेतलेली मराठी माणसे एकावेळी एकाच भाषेत बोलताना मी पाहिली आहेत. इंग्रजीत बोलताना ती इंग्रजीतच बोलत. मराठीत बोलताना मराठीतच बोलत. 

गोवारीकर व माधवचे संबंध तसे जुने. माधवचे वडील (लाल निशाण पक्षाचे) कॉ. यशवंतराव चव्हाण व गोवारीकर यांचा स्नेह-परिचय बहुधा कोल्हापूरच्या त्यांच्या लहानपणापासूनचा. गोवारीकरांच्या मुंबईत माधव (व बहुधा यशवंतरावांबरोबरही) दोन-तीन भेटी झाल्या. या भेटींत एकदा त्यांच्याबरोबर चेंबूरच्या आचार्य उद्यानाजवळील 'योगी' हॉटेलमध्ये जेवायला गेल्याचेही खास लक्षात आहे. हे खास लक्षात राहण्याचे कारण म्हणजे योगी हे आमच्यादृष्टीने तेव्हाचे मोठ्या लोकांचे हॉटेल. वस्तीत राहणारे आम्ही लहानपणापासून त्या हॉटेलच्या अवतीभोवती फिरत असू. पण आत जाणे हमारे बस की बात नव्हती. आता ते किंवा त्यासारखी हॉटेले तशी मोठी वाटत नाहीत. अशा हॉटेलांत जाणे आता अगदी सहज नाही, पण खूप कठीणही वाटत नाही. असो. 

चेंबूरला आमचे साक्षरतेचे काम ज्या चेंबूर-गोवंडी परिसरात चालले होते, त्या परिसरातील देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून इंधन की काहीतरी करण्याचा एक प्रयोग चालू होता. तसेच लोखंडे मार्ग, लुंबिनी बाग येथील वस्त्यांत गोल आकाराच्या पे अँड युज तत्वावरच्या शौचालयांचा प्रयोग चालू होता. या दोन्ही प्रयोगांशी गोवारीकरांचा जवळून संबंध होता. काय ते आता विसरलो. पण आम्हाला प्रत्यक्ष त्यांनीच ही ठिकाणे फिरुन दाखवली. या दोन्ही प्रयोगांत आम्ही लक्ष घालावे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यापैकी, गोल आकाराची शौचालये आमच्या-कोरो साक्षरता समितीच्या स्थानिक युवक व महिला कार्यकर्त्यांनी चालवायला घेतली. चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी तो आर्थिक आधारही झाला. पुढे या कार्यकर्त्यांचीच संस्था करुन त्यांनाच ती सोपवण्यात आली. २५ वर्षे होत आली. आजही ती उत्तम चालू आहेत. 

या परिसरात फिरताना ही शौचालये दिसली की वसंतराव गोवारीकरांची हटकून आठवण येई. त्यांचे संयत, ऋजू व्यक्तित्व व 'खास'मराठीतून बोलणे आठवे. आता तर ते अधिकच आठवेल. 

...वसंतराव तुम्हाला आदरांजली!

- सुरेश सावंत