Wednesday, July 31, 2013

अन्न सुरक्षा अध्यादेशः निर्मिती व वैशिष्ट्ये


माहितीचा अधिकार, राष्‍ट्रीय रोजगार हमी या कायद्यांच्‍या यशानंतर अन्‍नाच्‍या अधिकाराचा कायदा संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्‍या विषयपत्रिकेवर आला. आला म्हणण्‍यापेक्षा सोनिया गांधींनी तो लावून धरला, हे वर्णन अधिक योग्‍य होईल. २००९ ला राष्‍ट्रपतींनी आपल्‍या अभिभाषणात या कायद्याचे सूतोवाच केल्‍यानंतर असे कायद्याने बांधून घेणे कितपत योग्‍य ठरेल, वाढीव धान्‍याची उचल व त्‍यासाठीचे वाढीव अनुदान सरकारला पेलणारे आहे का, अशा शंका सरकारमधील प्रमुख मंडळींनीच उपस्थित करायला सुरुवात केली. शरद पवार हे त्‍यातील एक मुख्‍य घटक होते. सोनिया गांधींचा निग्रह लक्षात घेऊन पवारांच्या अन्‍न खात्‍याने अखेर एक मसुदा तयार केला. हा मसुदा अत्‍यंत अपुरा व असंवेदनशील होता. पुढे प्रणव मुखर्जींच्‍या नेतृत्‍वाखालील सक्षम मंत्रिगटाकडे अवलोकनार्थ हा मसुदा गेला. या मंत्रिगटानेही यात विशेष मौलिक बदल केला नाही. कायद्यामागील उद्देश सफल होण्‍याऐवजी, आज लोकांना मिळणारे लाभही मर्यादित होण्‍याची भीती निर्माण झाली होती.

याच दरम्‍यान सोनिया गांधींच्‍या नेतृत्‍वाखाली राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीचे पुनर्घटन झाले. त्‍यांनतर पहिले कार्य सोनिया गांधींनी केले ते म्‍हणजे, हा मंत्रिगटाने मंजूर केलेला मसुदा समितीत चर्चेसाठी मागवला. त्‍यावर खोलात चर्चा घडवली. त्‍यानंतर सहमतीच्‍या शिफारशी बाहेर आल्‍या. हितसंबंधांच्‍या नानाविध संघर्षातून निघणारे मसुदे हे तडजोडीचेच असतात. कोणा एका गटाची संपूर्ण सरशी होत नसते. अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याच्‍या शिफारशींबाबतही तेच आहे. अन्‍न अधिकाराचा कायदा समग्र असावा, असे वाटणारा एक गट, मुक्‍त आर्थिक विकासाला अडथळा न होता व अनुदान वाया न जाता गरिबांपर्यंत नेमकेपणाने योजना पोहोचाव्‍यात या भूमिकेचा दुसरा गट, तर आजच्‍या व्‍यवस्‍थेतील हितसंबंध जैसे थे राहावेत म्‍हणून कायदा होऊच नये, झालाच तर बोथट व्‍हावा, असे इच्छिणारा तिसरा गट असा हा संघर्ष आधी राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या मैदानात व पुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीत खेळला गेला. सर्वोच्‍च राजकीय मान्‍यता असलेल्‍या सोनिया गांधी आपले वजन कोठे टाकणार याला खूप महत्‍व होते. त्‍यांना कितीही राजकीय व नैतिक मान्‍यता असली, तरी अखेर सत्‍तेच्‍या राजकारणात हितसंबंधांच्‍या संघर्षातूनच मार्ग काढावा लागतो. तोल साधावा लागतो. त्‍यामुळे खुद्द त्‍यांच्‍याही मनाप्रमाणे हा मसुदा झालाच असेल असे नाही.

कायद्याच्या अंमलबजावणीची प्राथमिक जबाबदारी असलेल्या राज्यांच्या भूमिका समजावून घेणे, त्यांचा समावेश विधेयकात करणे, स्टँडिंग कमिटीकडे अधिक चर्चेसाठी विधेयक जाणे यामुळेही या विधेयकास अंतिम स्वरुप येण्यास अपरिहार्यपणे काही काळ गेला.

संसदेत चर्चा होऊनच हा कायदा संमत होणे आवश्यक होते. तथापि, विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज रोखून धरल्याने या कायद्याचे भविष्यच धूसर झाले. त्यामुळेच सरकारला (आगामी निवडणुका ध्यानात घेता) अध्यादेशाचे पाऊल उचलावे लागले. यथावकाश संसदेत मंजुरी घेताना यावर अधिक चर्चा होईल व हा अध्यादेश अधिक समावेशक होईल अशी अपेक्षा आहे.

हा कायदा झाल्याने रेशन, मातृत्व अनुदान, मध्यान्ह भोजन आदि महत्वाच्या योजनांना आता कायदेशीर आधार तयार झाला आहे. त्यांची व्याप्ती व परिणामकारता अधिक वाढणार आहे.

अशावेळी जे झाले आहे, त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अधिकच्या सुधारणा व मागण्यांना यातूनच बळ मिळू शकेल.

या अध्यादेशाची वैशिष्ट्येः
  • जगातील सर्वाधिक व्याप्तीचा अन्नसुरक्षा कार्यक्रम.
  • ७५% ग्रामीण व ५०% शहरी जनतेला प्रति व्यक्ती प्रति माह ५ किलो धान्य-तांदूळ, गहू, भरड धान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी इ.) अनुक्रमे ३ रु., २ रु. व १ रु. दराने मिळणार
  • देशातील १२० कोटी लोकसंख्येच्या दोन तृतीयांश भागाला हा स्वस्त धान्याचा लाभ मिळणार.
  • सध्याच्या अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच दरमहा ३५ किलो धान्य रु. ३, २ व १ प्रमाणे मिळणार.
  • राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे सध्याचे धान्य नियतन तसेच चालू राहील. तथापि, गत ३ वर्षांच्या सरासरी उचलीच्या अधीन राहून हे नियतन ठरविले जाईल.
  • ७५% ग्रामीण व ५०% शहरी या देशपातळीवरील प्रमाणास अनुसरुन राज्यनिहाय प्रमाण केंद्रसरकार निश्चित करेल. (गरिबीचे प्रमाण सर्वत्र सारखे नसल्याने काही राज्यांत हे आकडे वाढतील तर काही राज्यांत ते कमी होतील.)
  • वरील प्रमाणाच्या अधीन राहून पात्र कुटुंबांची निवड करण्याचे काम राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यावर सोपवण्यात आले आहे. यासाठी ते स्वतःचे निकष लावू शकतात किंवा सामाजिक-आर्थिक-जात गणनेच्या तपशीलाचा वापर करु शकतात.
  • गरोदर व स्तनदा मातांना निश्चित केलेल्या पोषणमूल्यांप्रमाणे पौष्टिक आहार मिळेलच. शिवाय रु. ६००० मातृत्व अनुदान मिळेल.
  • ६ ते १४ वयोगटातील मुलांना निश्चित केलेल्या पोषणमूल्यांप्रमाणे घरी घेऊन जावयाचा शिधा अथवा गरम शिजवलेले अन्न मिळेल.
  • निश्चित प्रमाणापेक्षा कमी धान्य केंद्राने राज्यांना पाठवल्यास उर्वरित धान्याचे पैसे केंद्र सरकार राज्यांना देईल. राज्यांनी पात्र व्यक्तींना जर धान्य अथवा जेवण दिले नाही, तर त्या व्यक्तींना केंद्राने ठरवून दिलेला ‘अन्नसुरक्षा भत्ता’ राज्य सरकारला द्यावा लागेल.
  • राज्यांतर्गत वाहतूक, अन्नधान्याची हाताळणी तसेच रेशन दुकानदारांचे कमिशन यासाठी राज्य सरकारला कराव्या लागणाऱ्या खर्चात केंद्र सरकार राज्यांना सहाय्य करेल. यासंबंधीचे निकष ठरवण्यात येतील. यामुळे वाहतूक वेळेत होण्यात व अन्नधान्याची हाताळणी कार्यक्षमरीत्या होण्यात मदत होईल.
  • रेशनविषयक काही सुधारणांचा अंतर्भाव या अध्यादेशात आहे. उदा. द्वार वितरण योजना, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, संपूर्ण संगणकीकरण, ‘आधार’च्या सहाय्याने लाभार्थ्यांची ओळख, रेशनवर द्यावयाच्या वस्तूंमध्ये विविधता इ.
  • कुटुंबातील १८ वर्षांवरील वयाच्या सर्वात ज्येष्ठ स्त्रीला कुटुंबप्रमुख मानून तिच्या नावे रेशनकार्ड देण्यात येईल. जर अशी स्त्री नसेल तर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुषाला कुटुंबप्रमुख समजण्यात येईल.
  • प्रत्येक जिल्ह्यासाठी तक्रार निवारण अधिकारी व राज्यपातळीवर अन्न आयोग असेल. नवी तक्रार यंत्रणा स्थापित करण्याचा खर्च वाचविण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या तक्रार निवारण यंत्रणेतूनही ही रचना राज्य सरकार करु शकते. तक्रार निवारण यंत्रणेत कॉल सेंटर्स, हेल्पलाईन आदिंचाही समावेश असेल.
  • पारदर्शकता व उत्तरदायित्वासाठी रेशन व्यवस्थेविषयीच्या नोंदी खुल्या केल्या जातील. सामाजिक लेखाजोखा केला जाईल. दक्षता समित्या स्थापन केल्या जातील.
  • आलेल्या तक्रारीबाबत जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याकडून करण्यात आलेली शिफारस अमलात आणण्यात संबंधित सरकारी कर्मचारी किंवा यंत्रणा अयशस्वी ठरली तर तिला दंड करण्यात येईल.
  • प्रस्तावित लाभाची व्याप्ती लक्षात घेता, २०१३-१४ सालासाठी ६१२.३ लाख टन धान्य लागेल, असा अंदाज आहे. तसेच यासाठीचे एकूण अनुदान १,२४,७२४ कोटी रु. लागेल असा अंदाज आहे.
महाराष्ट्रावरचा परिणाम
  • राज्यात सुमारे ३१ टक्के इतक्याच स्वस्त धान्याचा निश्चित लाभ असलेल्या अंत्योदय-बीपीएल कार्डधारकांची संख्या (मुंबईत ती जेमतेम १ टक्के आहे. अन्य शहरांतही हे प्रमाण ५-७ टक्क्यांच्या पुढे नाही.) वाढून ती ग्रामीण भागात ७२.५१% तर शहरी भागात ४४.६४ % होणार आहे. (नव्या पाहणीनुसार या आकडेवारीत बदल होऊ शकतात.)
  • ग्रामीण भागातील शुभ्र रेशनकार्डधारक (ज्यांना सध्याही काहीच लाभ मिळत नाही) वगळता उर्वरित सर्व कार्डधारक या कायद्याखाली येण्याची शक्यता आहे.
  • रेशनवर गहू-तांदळाबरोबरच ज्वारी-बाजरी-नाचणीसारखी भरड धान्ये प्रति किलो १ रु. दराने देण्याची तरतूद या अध्यादेशात आहे. महाराष्ट्राला ही एक संधी आहे. आजही राज्यात भरड धान्ये खाण्याचे प्रमाण मोठे आहे. शिवाय शहरातील आरोग्याबाबत नवजागृत विभागही या धान्यांकडे आता वळू लागला आहे. आपण केंद्राच्या वतीने आधारभूत किंमती जाहीर करुन ही धान्ये आपल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करु शकतो. कोरडवाहू शेतकऱ्यांची बहुसंख्या असलेल्या आपल्या राज्याला ही बाब फायदेशीर ठरु शकेल.
  • या अध्यादेशात रेशनव्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण अभिप्रेत आहे. आपल्या राज्यात त्यास प्रारंभ झालेला आहे. बारकोड असलेली बायोमेट्रिक रेशनकार्डे दिली जाणार आहेत. यामुळे बोगस कार्डांवर नियंत्रण येणार आहे. ज्या असंघटित व स्थलांतरित कामगारांना ओळखीच्या व वास्तव्याच्या पुराव्यांअभावी रेशनकार्डे मिळणे कठीण जात होते, त्यांना ही कार्डे मिळून त्यांचा रेशनव्यस्थेतील प्रवेश सुलभ होऊ शकेल. अनेक वंचित विभाग रेशनच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे.
  • निवडीचे निकष ठरवण्याची अनुमती राज्यांना असल्याने कचरा वेचक, सायकल रिक्शावाले, फूटपाथवर राहणारे, शेतमजूर इ. विभागांचा रेशनव्यवस्थेतील (अगदी अंत्योदय योजनेतही) प्रवेश सुलभ होऊ शकेल.
  • आजच्या बीपीएल कार्डधारकांचे मात्र नुकसान व्हायची शक्यता आहे. आज त्यांना ५ व ६ रु. दराने ३५ किलो धान्य मिळते. या कायद्यांतर्गत २ व ३ रु. ने धान्य मिळणार असले तरी ते एकूण २५ किलो (५ माणसांचे कुटुंब धरल्यास) असणार आहे. उरलेले १० किलो धान्य बाजारभावाने घ्यावे लागणार. हा खर्च आजच्यापेक्षा अधिक होतो. याला उपाय म्हणजे राज्याने त्यांचा खर्च उचलणे. छत्तीसगड, तामिळनाडूसारखी राज्ये आजही केंद्राने ठरवून दिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपलीकडच्या लोकांचा समावेश करण्यासाठीचा खर्च स्वतःच्या तिजोरीतून करतात.
  • रेशन दुकानांच्या मार्जिनचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. संगणकीकरण व बायोमेट्रिक कार्डांमुळे बोगस कार्डे जवळपास संपुष्टात येणार. अन्य प्रकारच्या भ्रष्टाचारावरही अंकुश येणार. अशावेळी राज्य सरकारला केंद्राच्या सहाय्याने हा प्रश्न सोडवावाच लागेल. अन्यथा रेशन दुकाने हळूहळू बंद होऊ लागतील.

अध्यादेशाची राज्यनिहाय व्याप्ती


लोकसंख्या2011 (दशलक्ष)

अन्नसुरक्षा अध्यादेशाची व्याप्ती (%)
ग्रामीण
शहरी
आंध्र प्रदेश
84.7
66.16
48.27
आसाम
31.2
78.78
51.66
बिहार
103.8
86.70
73.16
छत्तीसगड
25.5
84.27
56.52
गुजरात
60.4
71.71
44.82
हरयाणा
25.4
51.59
51.66
हिमाचल प्रदेश
6.9
48.34
34.91
जम्मू व काश्मीर
12.5
57.03
52.05
झारखंड
33.0
83.44
58.51
कर्नाटक
61.1
73.03
45.19
केरळ
33.4
45.76
38.22
मध्य प्रदेश
72.6
78.58
54.05
महाराष्ट्र
112.4
72.51
44.64
ओडिशा
41.9
79.04
56.11
पंजाब
27.7
52.10
49.19
राजस्तान
68.6
76.04
54.03
तामिळनाडू
72.1
65.29
42.70
उत्तर प्रदेश
199.6
80.71
61.25
उत्तराखंड
10.1
62.07
54.21
प. बंगाल
91.3
78.31
51.44
भारत
1,210.2
75
50
अरुणाचल

65.52
54.43
गोवा

48.66
32.93
दिल्ली

30.91
44.21
मणिपूर

88.04
85.81
मेघालय

76.70
63.36
मिझोराम

78.47
38.74
नागालँड

77.81
66.68
सिक्कीम

61.52
25.93
त्रिपुरा

68.24
41.64
अंदमान व निकोबार

11.69
10.66
चंदिगड

21.21
24.88
दादरा व नगरहवेली

84.57
64.58
दमण व दीव

57.72
59.79
लक्षद्विप

42.83
24.34
पुद्दुचेरी

21.64
23.93
 -   सुरेश सावंत

Saturday, June 15, 2013

एका मुख्‍याध्‍यापकाच्‍या जाणिवांची मशागत करणाऱ्या आठवणी

पुस्‍तक परिचय

शिक्षणविषयक चिंतक, लेखक व कार्यकर्ते हा अ‍रविंद वैद्य यांचा परिचय महाराष्‍ट्राला आहेच. ते मुख्‍याध्‍यापक होते, हेही ठाऊक आहे. तथापि, त्‍यांच्‍या या चिंतन-लेखनाला त्‍यांच्‍या व्‍यासंगाबरोबरच बिघडलेली शाळा सरळ करण्‍यासाठी स्‍वतःहून स्‍वीकारलेले आव्‍हान व तिथे रुतून-रुजून केलेले प्रयोग या अवलियेपणाचा भक्‍कम आधार आहे, हे जवळचे संबंधित सोडले तर इतरांना फारसे ठाऊक नाही. आता 'नंदादीप-आठवणीतल्‍या साठवणी' हे त्‍यांचे पुस्‍तकच आल्‍याने हे अवलियेपण कळणे सोपे झाले आहे. ज्‍या शाळेत वैद्यसर मुख्‍याध्‍यापक होते त्‍या नंदादीप विद्यालयाचे २०१३ हे सुवर्णमहोत्‍सवी वर्ष. त्‍या निमित्‍ताने या शाळेच्‍या 'नंदादीपीय' या माजी विद्यार्थी व माजी शिक्षक संघटनेने ते प्रकाशित केले आहे. प्रसिद्ध मानसोपचारतज्‍ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्‍याची प्रस्‍तावना लिहिली आहे.
नंदादीप विद्यालय ही मुंबईच्‍या गोरेगाव या उपनगरातील शाळा. या शाळेतील आपल्‍या प्रवेशाचे कारण सांगताना वैद्यसर नमूद करतात- '१९७१ ते १९७४ या काळात शिक्षकांच्‍या सेवासमाप्‍तीच्‍या प्रश्‍नावरुन असे काही राजकारण घडत होते की त्‍याची परिणती विद्यार्थी पूर्णपणे बेशिस्‍त बनण्‍यात झाली होती.' तरुण शिक्षिकेला शाळेतील १०वी-११वीच्‍या मुलांनी शाळेबाहेर घेरुन भलभलते प्रश्‍न विचारुन त्‍या रडायला लागल्‍यावरच सोडणे, शाळातपासणीला अधिकारी आले असता शाळेत फटाके लावणे, शाळेत सिगारेटी पिणे, मुख्‍याध्‍यापकांना मारणे अशी काही उदाहरणे या बेशिस्‍तीची कल्‍पना यावी म्‍हणून त्‍यांनी दिली आहेत. अशा या शाळेत मुख्‍याध्‍यापक टिकत नव्‍हते. विद्यमान शिक्षकांपैकी कोणी मुख्‍याध्‍यापक व्‍हायला राजी नव्‍हते. दादरच्‍या छबिलदास हायस्‍कूलमध्‍ये शिक्षक असलेल्‍या अरविंद वैद्यांनी नंदादीपच्‍या संस्‍थाचालकांच्‍या विनंतीला मान देऊन हे आव्‍हान स्‍वीकारले. १९७४ च्‍या जूनमध्‍ये ते नंदादीपचे मुख्‍याध्‍यापक झाले. त्‍यावेळी त्‍यांचे वय होते २७ वर्षे. १५ वर्षे मुख्‍याध्‍यापक म्‍हणून काम करुन १९८९ ला त्‍यांनी स्‍वेच्‍छानिवृत्‍ती घेतली. त्‍यावेळी त्‍यांचे वय होते ४२ वर्षे. पुढचा सर्व काळ पूर्णवेळ कार्यकर्ते म्‍हणून ते काम करत आहेत.
मुख्‍याध्‍यापक म्हणून औपचारिकपणे कार्यभार स्‍वीकारणे वेगळे आणि ख-या अर्थाने शाळेचा ताबा घेणे वेगळे. शाळेची पार्श्‍वभूमी ध्‍यानी घेता तर यास विशेषच महत्‍व होते. पहिलाच प्रसंग वर्गात शिक्षिकेला बाण मारण्‍याचा. फळ्यावर लिहिण्‍यासाठी मुलांकडे पाठ फिरवली की मुले बाण मारायची. बाण कोणी मारले, या प्रश्‍नावर सगळे 'लोकमान्‍य' झाल्‍यावर वैद्यसरांनी अख्‍ख्‍या वर्गाला शाळेबाहेर मैदानात आणले. पाऊस पडत होता. सर्वत्र गवत व चिखल होता. सरांनी मुलांना वर हात करुन उड्या मारायला लावल्‍या. ज्‍याचे पाय एक फूट उंच उठणार नाहीत, त्‍याला मी मारीन, अशी हातात छडी घेऊन हिंडणा-या सरांनी तंबी दिली. सगळी मुले व शिक्षक व्‍हरांड्यातून हा प्रकार बघत होते. १५ मिनिटांनी अखेरीस एक मुलगा पोटात दुखायला लागून खाली बसला. त्‍याचे बकोट धरुन सरांनी त्‍याला उभे केले व बाण मारणा-याचे नाव सांग नाहीतर उड्या मार, असे दरडावले. युक्‍ती कामी आली. त्‍याने पटापट नावे सांगितली. वैद्यसरांनी या मुलांना शाळेतून आठ दिवसांसाठी रस्टिकेट केले व पत्रे पाठवून पालकांना भेटायला बोलावले. नंतर सर्व वर्गांत नोटीस फिरवली - 'झाला प्रकार तुम्‍ही पाहिला आहेच. त्‍यातून योग्‍य तो बोध घ्‍यावा.' ... या घटनेने वैद्यसरांनी शाळेचा ताबा घेतला, हे वेगळे सांगायला नको. पुढे वर्षानंतर या मुलांना शाळेतून त्‍यांनी काढून टाकले. मात्र त्‍याचवेळी दुस-या शाळेतील मुख्‍याध्‍यापकांना सांगून त्‍यांच्‍या प्रवेशाचीही व्‍यवस्‍था केली. ही मुले त्‍या शाळेतून एस.एस.सी झाली. या मुलांची भावंडे याच शाळेत होती. सर नमूद करतात 'या सर्वांचे संबंध आजही माझ्याशी अत्‍यंत चांगले आहेत.'
या आठवणीच्‍या शेवटी ते बालमानसशास्‍त्राची चिकित्‍सा करतात. बालमानसशास्‍त्रात गृहीत धरलेल्‍या १६ वर्षाच्‍या मर्यादेहून अधिक वयाची मुले १०वी-११वीच्‍या वर्गात अनेक असतात. त्‍यांना हे बालमानसशास्‍त्र लागू होत नाही. काही झाले तरी अजिबात मारायचे नाही, ही भूमिका योग्‍य नव्‍हे. शारीरिक शिक्षेलाही काही स्‍थान आहे. अर्थात कोणत्‍याही शिक्षेचा हेतू व्‍यक्‍तीला सुधारणे हा असायला हवा. बदला अथवा अद्दल घडवण्‍याचा असता कामा नये, असे वैद्यसरांचे मत आहे.
वैद्यसरांची शाळेवर मुख्‍याध्‍यापक म्‍हणून अधिकार तयार करण्‍यासाठीची प्रक्रिया व भूमिका नीट कळावी, म्‍हणून हा प्रसंग काहीशा विस्‍ताराने दिला आहे. पुढच्‍या प्रत्‍येक आठवणीत वैद्यसरांनी घटना व चिंतन असाच क्रम ठेवला आहे.
नारळी पौर्णिमेची सुटी हवी म्‍हणून मुले संप करतात. संप केलेल्‍या मुलांवर ते चिडत-रागावत नाहीत. त्‍यांच्‍या संपाचा आदर करतात. त्‍यांना विश्‍वासात घेऊन शाळेच्‍या सर्व सुट्यांचे गणित त्‍यांना समजावून सांगतात. ज्‍या शाळांनी आज सुटी दिलेली आहे, त्‍या शाळा चालू असताना आपण कसे सुटीवर असू, वैकल्पिक सुट्यांची आखणी आपण नव्‍याने केली तर पुढच्‍या वर्षी आपल्‍यालाही 'नारळी पौर्णिमेची सुटी घेता येऊ शकते...इत्‍यादी. मुलांना हे पटते. मुलांच्‍या आणि मुख्‍याध्‍यापकांच्‍या दोहोंच्‍या बाजूने संप 'यशस्‍वी' करण्‍याची किमया वैद्य सर येथे साधतात. आपली टिप्‍पणी करताना सर पुढे लिहितात - 'सर्वच प्रश्‍न धाकाने अथवा शिक्षा करुन सोडवायची गरज नसते/नव्‍हे तसे करणे हिताचेही नसते आणि शक्‍यही नसते.'
किशोरवयीन मुलांत असलेल्‍या प्रचंड ऊर्जेचे योग्‍य रीतीने विरेचन झाले नाही, तर ती गैरवर्तनात रुपांतरित होते. माथेरानची सहल हा असा सकारात्‍मक विरेचनाचा नमुना आहे. सर शनिवारी रात्री मुलांना सहलीला नेतात. नेरळ ते माथेरान रात्री पायी चालत जातात. रविवारचा सबंध दिवस पॉइंट्स पाहून रात्री उशीरा परततात. या दमछाक करणा-या सहलीत मुलांना 'इतर' उद्योग करण्‍याची उसंतच मिळत नाही. शिवाय आपले सर आपल्‍याबरोबर चालण्‍यात कमी पडत नाहीत; उलट आपल्‍या पुढे असतात, याचा साक्षात्‍कार सरांबद्दल आदर निर्माण करणारा ठरतो. सहलीच्‍या दरम्‍यान मुले व शिक्षक यांची एक नवी ओळख परस्‍परांना होते, हीही अशा उपक्रमांची मोठी मिळकत असते. सहली-शिबिरांचे असे अनेक उपक्रम नियमितपणे वैद्यसरांनी शाळेत सुरु केले. श्रमदान हा असाच मुलांना घडवणारा उपक्रम होता. शिक्षक, संस्‍थाचालक व मुले एकत्र श्रमदानाने शाळेच्‍या सुविधा तयार करतात, हे दृश्‍य कोणत्‍याही पुस्‍तकातील पाठापेक्षा अधिक शिक्षण करणारे असते. एकमेकांशी कायमचे जोडणारे असते. वैद्यसर याबाबत म्‍हणतात- ' शिक्षणाची व्‍याख्‍या करताना 'हँड, हार्ट व हेड' यांचा उल्‍लेख नेहमी केला जातो. पण शाळेतील उपक्रम राबविताना, त्‍यांचे मूल्‍यमापन करताना आणि शाळा व विद्यार्थी यांचा दर्जा ठरविताना मात्र हेडचाच प्रामुख्‍याने विचार केला जातो. श्रमप्रतिष्‍ठा, ज्ञानाचे उपयोजन इ. गोष्‍टी भाषणात आणि पाठ्यक्रमातच राहतात. त्‍यामुळे शिक्षणातील आत्‍माच हरवतो असे मला वाटते.'
वैद्यसरांच्‍या शाळेतील सर्व हस्‍तक्षेपाचे हा 'आत्‍मा' हेच लक्ष्‍य होते. मुलांची तसेच तरुण शिक्षकांची प्रेमप्रकरणे हा शाळांतील तसे पाहिले तर नेहमीचा विषय. पण तो कुजबुज, पाप, अब्रम्‍हण्‍यं अशांनी अवगुंठीत होणारा. वैद्य सरांची या प्रकरणांची हाताळणी कौशल्‍यपूर्ण आहेच; पण मुख्‍य म्‍हणजे मानव्‍यपूर्ण आहे. म्‍हणूनच ही उमलती मने अपराधी गंडाच्‍या गर्तेत जात नाहीत. ती सावरतात. पालकांचेही यात शिक्षण होते. सरांनी हाताळलेल्‍या या प्रकरणांच्‍या आलेखात यशाचा स्‍तंभ खूपच उंच आहे. तथापि, हॉटेलात सापडलेल्‍या व सुधारगृहात पाठवणी झालेल्‍या एखाद्या 'राणी' ची समस्‍या आपण सोडवू शकलो नाही, हे वैयक्तिक अपयश त्‍यांना वाटते. ते शल्‍य ते आजही विसरु शकत नाहीत.
असे शल्‍य, चूक सर मोकळेपणाने व्‍यक्‍त करताना दिसतात. उंच, बांधेसूद, बेडर वृत्‍तीचा व उत्‍तम खेळाडू असलेला रवी सरांचा लाडका विद्यार्थी. पण तो प्रश्‍नपत्रिका चोरीच्‍या प्रकरणात सापडतो तेव्‍हा सर त्‍याला बेदम, मांड्यातून रक्‍त फुटेपर्यंत मारतात. ज्‍येष्‍ठ शिक्षिका कामतबाई मध्‍ये पडतात व सरांना आवरतात. सर रवीच्‍या घरी जाऊन आपण त्‍याला कसे मारले ते सांगतात. रवीने सरांनी मारल्‍याचे सांगितलेले नसते. दुसरेच कुठलेतरी कुंपणाच्‍या तारा लागल्‍याचे कारण सांगतो. रवीचे वडील चिडत नाहीत. उलट सर आपुलकीने घरी आल्‍याबद्दल आभारच मानतात. पुढे रवीचा भाऊ व सर त्‍याला सुधारण्‍याचा प्रयत्‍न करतात. त्‍यात त्‍यांना यश येते. रवी मोठा होतो. नोकरीला लागतो. मात्र पहिला पगार घेऊन घरी येत असतानाच चालत्‍या ट्रेनमधून पडून त्‍याचा मृत्‍यू होतो. ही घटना कळल्‍यावर सर त्‍याच्‍या घरी जातात. हा प्रसंग खूपच हृदयद्रावक आहे. सरांनी त्‍याला मारण्‍याची घटना सगळे विसरलेले आहेत. कोणीच अढी ठेवलेली नाही. संबंध मोकळे झालेले होते. तरीही सरांना मारण्‍याची ती घटना अस्‍वस्‍थ करत राहते. ते लिहितात- 'रवीला मारताना मी अतिरेक केला होता. शिक्षकाला राग येणे क्षम्‍य आहे. पण रागाने अंधत्‍व येणे क्षम्‍य नाही. रवी आज जगात नाही. पण आज एवढ्या वर्षांनंतर त्‍याच्‍या स्‍मृतींना साक्षी ठेवून मी म्‍हटलेच पाहिजे 'मी चुकलो'.' या ओघात ते कामतबाईंचेही आभार मानतात- 'माझ्या अशा सहका-यांनी वेळोवेळी मला सावरले आहे. ..मी खरेच त्‍यांचा ऋणी आहे.'
या पुस्‍तकात सरांना भेटलेल्‍या अधिका-यांचे वर्णन आहे. त्‍यात सिद्दीकींसारखे 'तपासणी ही मार्गदर्शन होऊन सुधारणा व्‍हावी म्‍हणून करायची असते.' अशी भूमिका असणारे चांगले अधिकारी आहेत. तसेच त्रास देणारे अधिकारीही आहेत. सरांना भेटलेल्‍या पालकांतही चांगले वाईट आहेत. पण सर म्‍हणतात त्‍याप्रमाणे त्रासदायक पालक हे १ टक्‍केही नसतात. परंतु उरलेला ९९ टक्‍के विभाग एवढा अलिप्‍त असतो की पालकांच्‍या कार्याचे क्षेत्र या १ टक्‍केवाल्‍यांना आंदण दिल्‍यासारखे होते.' सर मात्र यातला चांगुलपणा जपत राहिले. चांगले अधिकारी, चांगले पालक यांच्‍याशी त्‍यांचे संबंध दीर्घकाळ राहिले. शिक्षकेतर कर्मचारी, शाळेच्‍या संस्‍थापक आशाताई व संस्‍थाचालक अप्‍पा नाईक, परिसरातील विविध संस्‍था, मदतीला उभे राहणारे लोक या सर्वांमधल्‍या चांगुलपणाची नोंद या पुस्‍तकात सरांनी आवर्जून घेतली आहे.
व्‍याख्‍यानमाला, फिल्‍म फेस्टिवल, रशियन भाषा वर्ग असे अनेक उपक्रम सरांनी राबवले. शाळेचे मैदान, इमारत तसेच आतील सुविधा यांत लक्षणीय सुधारणा घडवल्‍या. शाळेतील तसेच शाळेच्‍या बाहेरील अनेकविध घटकांच्‍या सहाय्यानेच हे शक्‍य झाले. अर्थात, या सगळ्याचा सुयोग्‍य मेळ घालणारे ते कुशल सूत्रधार होते. यामुळेच त्‍यांची शाळा विद्यार्थ्‍यांपुरती न राहता ती समाजाची झाली. पुस्‍तकाच्‍या अखेरीस शाळेच्‍या स्‍वरुपाविषयी ते म्‍हणतात - 'शाळेवर, तेथील मैदानादि साधन संपत्‍तीवर पहिला हक्‍क आजी विद्यार्थ्‍यांचा. त्‍यानंतर शाळा व परिसर समाजासाठी मोकळा हवा. शाळा हे सामाजिक उपक्रमांचे केंद्र असावे. सकाळी ६ ते रात्री किमान ९-१० पर्यंत शाळेला कुलूप असणे अनैतिक आहे.'
आजच्‍या शिक्षणक्षेत्रातील (खरे म्‍हणजे एकूण समाजातील) बाजारु, व्‍यक्तिवादी वातावरणात नव्‍या पिढीला अरविंद वैद्यांच्‍या या आठवणी कपोलकल्पित वाटण्‍याचीच शक्‍यता दाट आहे. तर ज्‍यांना या जुन्‍या काळाचे संदर्भ आहेत, त्‍यांच्‍यासाठी तो 'नॉस्‍टॅल्जिया' आहे. या दोन स्थितींत अडकायचे नसेल, तर वैद्यसरांनी त्‍यांच्‍या मनोगतात मांडलेल्‍या पुढील भूमिकेचा स्‍वीकार करणे आवश्‍यक ठरते -
'मी ज्‍या काळात शाळेत होतो, तेव्‍हाच्‍या शाळांमध्‍ये, विद्यार्थी वर्गात, शिक्षक, सेवकांमध्‍ये, पालक वर्गात आणि शिक्षण संस्‍थांमध्‍ये गुणात्‍मक फरक झालेला आहे. काळाबरोबर तो होणे साहजिकही आहे. पण हा सारा बदल जसा पूर्ण नकारात्‍मक नाही तसा सकारात्‍मकही नाही; आणि इथेच माणसाच्‍या हस्‍तक्षेपाची गरज तयार होते. नव्‍या काळाशी सुसंगत असे नवे उभे करताना जुन्‍यातून जे चांगले आहे ते घेऊन पुढे जायचे असते. माणूस हे जाणीवपूर्वक करु शकतो.'
आपल्‍या जाणिवांची मशागत करणारे हे पुस्‍तक सर्वांनी जरुर वाचावे.
- सुरेश सावंत


'नंदादीप - आठवणीतल्‍या साठवणी'अरविंद वैद्य
प्रकाशकः नंदादीपीय - माजी विद्यार्थी व माजी शिक्षक संघटना,
द्वारा-सिग्‍मा एज्‍युकेशन, गुलमोहर कॉम्‍लेक्‍स, अनुपम सिनेमासमोर, गोरेगाव (पूर्व), मुंबई.
मोबाईल - 9702036019 ईमेल- nandadeepiy@gmail.com
देणगी मूल्‍यः रु. १००

हा लेख 'प्रेरक ललकारी'च्या जून २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.





Saturday, May 4, 2013

सरबजितचा मृत्‍यू दुःखदायकच; पण त्‍यास शहीद म्‍हणणे योग्‍य आहे का ?

सरबजितचा मृत्‍यू दुःखदायकच आहे. पण त्‍याला शहीद म्‍हणणे म्‍हणजे भारताच्‍या वतीने पाकिस्‍तानात तो हेरगिरी करत होता, हे कबुल करणे नव्हे काय ? आणि मग पाकिस्‍तानच्‍या हेराविषयी आपण जो व्‍यवहार करु तोच व्‍यवहार आपल्‍या हेराविषयी करण्‍यास पाकिस्‍तान मुखत्‍यार नाही का ?

Thursday, December 20, 2012

प्रकट चिंतनः दिल्‍लीतील बलात्‍काराच्‍या क्रौर्याची परिसीमा गाठणा-या घटनेविषयी

  • या घटनेने अख्‍खा देश हादरला आहे. मीही हादरलो आहे.

  • गुन्‍हेगारांना तातडीने व अत्‍यंत कडक शासन व्‍हायला हवे असे मलाही वाटते. तथापि, काहीजण फाशी तर काही जण castration (पुरुषाचे वृषण काढून त्‍याला नपुंसक बनविणे) अशा शिक्षांची मागणी करत आहेत. त्‍यांविषयी मात्र मनात किंतु आहेत. विचार करतो आहे. पण या शिक्षांच्‍या बाजूने मन अजून तयार होत नाही. फास्‍ट ट्रॅक कोर्टात रोज सुनावणी होऊन आताच्‍या कायद्यातील कठोरात कठोर शिक्षा तातडीने व्‍हायला हवी, एवढे मात्र निश्चित वाटते.

  • आपली अंतर्गत सुरक्षा, कायदा-सुव्‍यवस्‍था संभाव्‍य गुन्‍हेगारांना जबर धाक वाटावी, अशी नाही, ही वस्‍तुस्थिती आहे. यादृष्‍टीने पोलिस यंत्रणेत आवश्‍यक त्‍या सुधारणा तातडीने होणे गरजेचे आहे. त्‍याविषयी अनेक सूचना येऊ लागल्‍या आहेत. त्‍यांचा गांभीर्याने विचार व्‍हायला हवा.

  • एक लक्षात घ्‍यायला हवे असे वाटते. अशा सुधारणा करुन पोलिस यंत्रणा कितीही परिणामकारक केली, तरी त्‍यास मर्यादा राहणारच. अशा गुन्‍ह्यांबाबत नागरिकांनी सजग राहून, वेळेवर हस्‍तक्षेप करणेही गरजेचे आहे. दादरला पत्‍नी समजून ज्‍याने दुस-याच मुलीवर कोयत्‍याने वार केले, त्‍याला लोकांनी तिथल्‍या तिथे पकडून पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले, हे यादृष्‍टीने खूप आश्‍वासक आहे.

  • दिल्‍लीच्‍या या घटनेबाबत ज्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त झाल्‍या, त्‍यात बॉलिवूडमधील अनेकांनी कठोर शिक्षांची मागणी केली आहे. तथापि, त्‍यांच्‍यापैकीच एक, अनुराग कश्‍यप यांनी आपल्‍या बिरादरीला आत्‍मचिंतन करायला लावले आहे. त्‍यांनी स्‍त्रीकडे भोगवस्‍तू म्‍हणूनच पाहायला शिकवणा-या 'तू चिज बडी है मस्‍त मस्‍त' सारख्‍या 'आयटम सॉंग' कडे लक्ष वेधले आहे. मला हे खूप महत्‍वाचे वाटते. गणपती, आंबेडकर जयंती इ. अनेक सार्वजनिक उत्‍सवांच्‍या वेळी, अगदी शाळा-कॉलेजांतील गॅदरिंगला, टीव्‍हीवरच्‍या नृत्‍यस्‍पर्धांवेळी या प्रकारच्‍या गाण्‍यांना खास मागणी आपल्‍याकडूनच असते. आपल्‍या मुलींना-अगदी न कळत्‍या मुलींनाही आपण हीच गाणी शिकवून नाचायला लावतो. त्‍यांना लोकांनी शिट्या, टाळया वाजवल्‍या की आपण पालक कृतार्थ होत असतो. मुलींच्‍या 'वस्‍तूकरणात' आपण हा जो क्रियाशील सहभाग घेत असतो, त्‍याचे काय करायचे ?

  • मुंबईसारख्‍या शहरांत नवरात्रातले टिप-यांच्‍या तालावर चढत जाणारे दांडिया नृत्‍य आता मोकळ्या मैदानावर दिसणे बंद झाले आहे. आधी गणपती पडद्यात बंद झाले आणि नंतर दांडिया. गणपतीचे बाहेरुन दर्शन आता घेता येत नाही. तथापि, रांग लावून बिनपैश्‍याने त्‍यास अजूनही बघता येते. दांडियाला मात्र ब-यापैकी पैसे मोजल्‍याशिवाय जाता येत नाही. या दांडियात आता निखळ मूळ गुजराती लोकसंगीत नसते. त्‍याचे बॉलिवूडी गाण्‍यांशी फ्यूजन केले जाते. ही गाणी 'तू चिज...' सारखीच असतात. हल्‍ली नवरात्रानंतर अविवाहित तरुण मुलींच्‍या गर्भपाताच्‍या घटना वाढल्‍याचे वृत्‍तांत आहेत.

  • आपल्‍या गणपती, नवरात्र, दहीहंडी, होळीसारख्‍या सणांचे हे बाजारीकरण आम्‍ही मुकाटपणे नव्‍हे, सहर्ष स्‍वीकारले यास जबाबदार कोण ?

  • सध्‍याच्‍या आर्थिक व्‍यवस्‍थेने भौतिक विकास नक्‍की साधला आहे. पण तो आजही विषम व असंतुलित आहे. त्‍यागाची, साधेपणाची महती गाणारा पूर्वीचा मध्‍यमवर्ग आज विलक्षण गतीने अर्थसंपन्‍न झाला आहे. गरजेपेक्षाही प्रतिष्‍ठेसाठी तो गाड्या, मोबाईल बदलतो. राहण्‍यापेक्षाही गुंतवणूक म्‍हणून घरे घेतो. प्रसंगी भाड्याने न देता रिकामी ठेवतो. सोसायटीत राहणा-यांची ही सुबत्‍ता आणि त्‍या सोसायटीची रखवाली करणा-या सिक्‍युरिटी गार्डला जेमतेम 3 ते 5 हजार रुपये महिन्‍याचा पगार. सोसायटीतल्‍यांची साधनसंपदा तो रोज बघत असतो. अर्ध्‍याअधु-या तंग कपड्यातल्‍या मुली-बाया त्‍याच्‍या समोरुन सतत जात येत असतात. या स्थितीत त्‍याच्‍या मनात काय चालत असेल ? त्‍याचे गाव, तिथली गरिबी, तिथल्‍या मुली, तिथली वंचना आणि इथे...? - अशा या विषमतेचे काय करायचे ? वॉचमन, ट्रक-शाळा-कंपन्‍यांचे ड्रायव्‍हर-क्लिनर, सफाई कामगार असलेल्‍या या मंडळींनी अशा विषमतेत मन मात्र 'सं‍तुलित' ठेवायचे अशी अपेक्षा बहुधा आपण करतो आहोत.

  • मध्‍यम-उच्‍च मध्‍यमवर्गातले तरी 'संतुलित' मनाचे आहेत का ? नाहीत. राहू शकत नाहीत. स्‍पर्धेच्‍या, प्रतिष्‍ठेच्‍या, प्रगतीच्‍या, सुखाच्‍या, मनोरंजनाच्‍या 'चकव्‍या' मापदंडांचे तेही बळी आहेत.

  • म्‍हणूनच, विषमतेच्‍या या सर्व थरांत विकृती जन्‍मास येतात. त्‍या गुन्‍ह्यांना जन्‍म देतात.

  • ज्‍या सुविधा आपल्‍याला आहेत, त्‍या सर्व समाजाला मिळायला हव्‍यात, यासाठी मी प्रयत्‍न करायला हवा. जो सन्‍मान, सामाजिक स्‍थान मला आहे, ते प्रत्‍येक व्‍यक्‍तीला मिळायला हवे यासाठी माझी खटपट राहील. सत्‍ता-प्रतिष्‍ठा-पैसा या मागे दमछाक होईपर्यंत धावण्‍याला लगाम घालून मोकळ्या आकाशाकडे, अथांग समुद्राकडे पाहण्‍यास, माणसांत रमण्‍यास वेळ काढेन. कातडीपेक्षा मनाच्‍या सौंदर्याचा वेध घेईन. वाद्यांच्‍या कर्कश्‍य गोंगाटाऐवजी संगीताचा मधूर सूर ओळखायला लागेन. रंगांच्‍या-आकारांच्‍या-कसरतींच्‍या चमत्‍कृतींतील निरर्थकता समजून घेऊन ख-या कलेचा आस्‍वाद घेईन.

  • ...आजच्‍या विकृतींना, पर्यायाने गुन्‍ह्यांना उतार मिळण्‍याचा हा सरळ साधा मार्ग आहे.

    - सुरेश सावंत
    20 डिसेंबर 12