Friday, May 1, 2020

| महाराष्ट्र ६० ते ७५ | - दलितांनी काय मिळवले? काय राहिले?..पुढे काय?


स्वातंत्र्य चळवळीच्या ४२ च्या टप्प्यानंतरचा मंतरलेला काळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. अर्थात या दोन्ही टप्प्यांवेळी माझी पिढी अस्तित्वातच नव्हती. ती अजून जन्मायची होती. मात्र आधीच्या पिढीकडून या दोन्ही चळवळींच्या हकिगती ऐकण्याची आणि त्यांच्या चेहऱ्या-डोळ्यांतून तो काळ पाझरताना बघण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे हे दोन्ही टप्पे आम्हाला दूरदूरचा भूतकाळ न वाटता आमच्याही जाणीवेचे ते महत्वाचे अंश बनले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अवघा महाराष्ट्र दुमदुमवून टाकणाऱ्या अमरशेख-अण्णाभाऊंच्या लाल बावटा कलापथकातील शेवटचे काही साथीदार अजूनही मंचावर गाताना तो काळ उभा करतात. ते शरीराने थकलेत. पण त्यांच्या गाण्यातून पीळाची कल्पना येते. 

४२ च्या चले जावच्या तडाख्यानंतर ४७ ला स्वातंत्र्य आले. स्वातंत्र्याकडून ज्या अपेक्षा होत्या, त्यांच्या पूर्ततेच्या गतीबद्दल, दिशेबद्दल डाव्या, समाजवादी मंडळींचे आक्षेप होते. किमान महाराष्ट्रात ही गती, दिशा आपल्याला हवी तशी वळवता येईल, असे वातावरण, ताकद व उमेद संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने तयार केली होती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उद्दिष्टांत ‘लोकसत्ताक व समाजवादी महाराष्ट्र प्रस्थापित करणे आणि समितीने पुरस्कार केलेला कार्यक्रम पूर्ण करणे.’ तसेच ‘महाराष्ट्रातील आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाची सहकारी तत्त्वावर उभारणी करणे.’ या प्रकारची सूत्रे लेखी नमूद करण्यात आली होती. 

तथापि, संयुक्त महाराष्ट्र समिती पुढे फुटली (कोणी फोडली वगैरे चर्चा अजूनही चालू आहे) आणि ही उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्याची संधी समाजवादी, डावे व रिपब्लिकन एकजुटीने गमावली. ज्या काँग्रेसशी लढून महाराष्ट्र मिळवला तो मुंबईसह महाराष्ट्र काँग्रेसच्याच यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली १ मे १९६० साली आकारास आला. त्याला या १ मे २०२० साली ६० वर्षे होत आहेत. 

या महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या आयुष्यात विविध क्षेत्रांत काय साध्य झाले, त्याचा आढावा आणि २०३५ साली येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या पंच्याहत्तरीपर्यंत काय व कसे साधता येईल, त्याची दिशा, उपाय, कार्यक्रम ही चर्चा नक्कीच उद्बोधक ठरेल. ‘आंदोलन’ ने यावर विशेषांक काढायचे ठरवले हे स्वागतार्हच आहे. 

मला दिलेला विषय आहे..दलित-मागासवर्ग. गेल्या ६० वर्षात या विभागात झालेल्या बदलांची मला आकळलेली काही सूत्रे लेखाच्या मर्यादेत मी मांडणार आहे. संदर्भ देऊन प्रबंध लिहायचा नसल्याने ते तसे कठीणही नाही. प्रश्न पुढचा आहे. खूप मुद्देसूद, संगतवार नसले तरी त्याची दिशाही कार्यकर्ता या नात्याने कायम विचारात असतेच. तिचे तपशील मांडता आले असते. पण करोनाने पंचाईत केली आहे. करोनाच्या संकटाला जेव्हा उतार पडेल, त्यावेळी जग नवीन वळणावर असेल. प्रचंड उलथापालथ झालेली असेल. पुढेही बराच काळ होत राहील. यांतून कोणते अंतर्विरोध कसे पुढे येणार आहेत, याचा आज थांग लागत नाही. अख्खे जग एक एकक म्हणून या संकटातून प्रवास करते आहे. या जगातले, देशातले विविध घटक परस्परांवर काय परिणाम करणार आहेत, कसा प्रतिसाद देणार आहेत, याची आज या संकटातून जात असताना कल्पना येत नाही. सर्व दिशा क्षितिजात लुप्त आहेत. कुठलाच किनारा अजून दृष्टिपथात नाही. 

अर्थात काय व्हायला हवे, हे काही करोनाच्या संकटाने बदलणार नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीची उद्दिष्टे अमलात यायला हवीत, हे करोनोत्तर महाराष्ट्राला लागू राहणारच आहे. त्यासाठी दलित-आदिवासी-पीडित- कष्टकऱ्यांच्या पक्षपात्यांची- डावे, समाजवादी, आंबेडकरी, लोकशाहीवादी मंडळींची व्यापक एकजूट व्हायला हवी, हेही तसेच राहणार आहे. दलित-मागासवर्गीयांच्या मुद्द्यावर प्राधान्याने काम करणाऱ्यांनी या प्रक्रियेला सहाय्यभूत ठरण्याच्या दृष्टीने आपली अंतर्गत दुरुस्ती करणे आणि अन्य पुरोगामी कार्यक्रम घेऊन पुढे जाणाऱ्यांनी त्यास पूरक बदल आपल्यात करणे याला काही पर्याय असेल असे वाटत नाही. 

तेव्हा, या मर्यादेत चर्चा करु. 

दलित-मागासवर्ग म्हणजे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य, अतिशूद्र किंवा कायदेशीर परिभाषेतील अनुसूचित जाती, ही व्याख्या चर्चा करावयाच्या घटकाबद्दल नक्की करुया. महाराष्ट्रात सुमारे ५९ अनुसूचित जाती आहेत. त्या सगळ्यांत पूर्वाश्रमीच्या महारांची (नवदीक्षित बौद्ध) जवळपास निम्मी लोकसंख्या आहे. ‘गाव तिथं महारवाडा’ ही म्हण प्रचलित आहे. अन्य दलित जातींचे अस्तित्व इतके सार्वत्रिक नाही. गावगाड्याचा घटक असूनही त्याच्या अर्थव्यवस्थेत अडकणारे नाते नसणे, राजकीय, प्रशासकीय घडामोडींबद्दलची सजगता आणि लष्करातल्या सहभागाची संधी यांमुळे दलितपणाच्या वेदनांच्या विरोधात उभे राहण्याचे जाणतेपण हे महारांच्यात प्रथम आले. मानवमुक्तीच्या संदर्भात दलितमुक्तीला स्थापित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच महार जातीतून पुढे आल्याने महार कायमच दलितमुक्तीच्या लढ्याचे अग्रणी राहिले. त्यामुळे गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्रातील दलितांच्या लढ्याचे काय झाले, हे पाहताना महार समाज (आताचा नवदीक्षित बौद्ध) मुख्य संदर्भ बिंदू राहणे स्वाभाविक आहे. 

दलितांचा मुक्तिदाता महाराष्ट्र अवतीर्ण व्हायच्या आधीच १९५६ साली अंतर्धान पावला होता. तोवर या मुक्तिदात्याने, बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना मनाने आणि कायद्याने माणूस बनवले होते. घटनेद्वारे अस्पृश्यता पाळणे गुन्हा झाला होता. राखीव जागा आल्या होत्या. हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माची दीक्षा हे क्रांतिकारक पाऊलही पडले होते. दलित-पीडितांच्या राजकीय सत्तेच्या लढ्याची साधने म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि शेवटी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना बाबासाहेबांनी तयार केली होती. ते गेल्यावर रिपब्लिकन पक्ष १९५७ साली प्रत्यक्षात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या परिणतीत दलितांबाबतची भूमिका लढ्यातील नेत्यांची काय राहील, ही शंका बाबासाहेबांना होती. ही शंका बोलून, तिच्याबद्दल काही आश्वासन घेऊन बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे हे त्यांचे सहकारी या लढ्याच्या बिनीच्या तुकडीत होते. संयुक्त महाराष्ट्र समिती संपण्याचा एक परिणाम रिपब्लिकन चळवळ आपल्या कोशात जाण्यात झाला. बाबासाहेबांची शंका व दलितांच्या या राजकीय प्रवासाविषयी नंतर बोलू. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्रात दलितांत काय बदल झाले ते आधी समजून घेऊ. 

बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या अस्मितेने अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची, आवाज उठविण्याची हिंमत दलितांत तयार झाली. आता तो मूकनायक राहिला नाही. महाराष्ट्रात आणि देशभरच नवा शिक्षित दलित तरुण एका नव्या तेजाने तळपू लागला. आपल्याला शिकायला मिळाले नाही, पण माझ्या मुलांनी शिकायला पाहिजे, यासाठी वाटेल ते कष्ट घेऊन पालक मुलांना शिकवू लागले. स्वतंत्र भारतातील सवलती, राखीव जागा, वसतिगृहे यांचा आधार या मुलांना मिळाला. यातूनच वकील, प्राध्यापक, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी तयार होऊ लागले. विचारवंत झाले. साहित्य क्षेत्रात तर दलित साहित्याच्या रुपाने जोरदार विद्रोही मुसंडी मारली गेली. प्रस्थापित मराठी सारस्वत भूकंप झाल्याप्रमाणे हादरले. ‘अत्त दीप भव’ या तथागत बुद्धाच्या संदेशानुसार आमचा उद्धार आम्हालाच करायला हवा ही मोठी प्रेरणा बाबासाहेबांच्या नंतरच्या दलितांतल्या दोन पिढ्यांपर्यंत नक्की कामी आली. 

हे पुढे गेलेले मुख्यतः पुरुष होते. प्रगतीच्या वरच्या मकामांवर पोहोचणाऱ्यांत दलित मुली अभावानेच होत्या. मुलगा बाबासाहेब झाला पाहिजे, ही भावना मुलीबद्दल नव्हती. ती शिकली पाहिजे. पण मुलगा वंशाचा दिवा म्हणून त्यास प्राधान्य ही भावना आंबेडकरी प्रेरणा घेतलेल्या दलितांतही होती. आजही आहे. रिपब्लिकन पक्षाच्या प्रस्थापित पुढाऱ्यांविरोधात आणि एकूणच व्यवस्थेच्या विरोधात जी दलित पँथर जन्मास आली, प्रचलित संकेत जिने झुगारुन दिले, तिच्या नेतृत्वातही स्त्रिया दिसत नाहीत. रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर यांनी घेतलेल्या सर्व आंदोलनांत स्त्रियांचा सहभाग प्रचंड असे. आजही असतो. मात्र पुढारपणात, निर्णयप्रक्रियेत त्यांना स्थान नसते. पंच्याहत्तरनंतर जी स्त्रियांची स्वायत्त चळवळ आकारास आली, तिने विविध समाजविभागांतल्या स्त्रियांना चालना मिळाली. दलित स्त्रियांमधूनही दलित स्त्रीवादाचा आवाज उठू लागला. सर्वसाधारण स्त्रीवादी चळवळीतल्या आपल्या अवकाशाबद्दल आणि आपल्या समाजांतर्गत पुरुषी वर्चस्वाच्या विरोधात ती संघर्ष करु लागली. 

१९७८ साली मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत झाला. त्याला तीव्र विरोध मराठवाडा अस्मितावादी आणि सरंजामी जातवर्चस्ववादी अशा दोन प्रवाहांकडून झाला. अनेक दलित वस्त्यांची राखरांगोळी झाली. हातपाय तोडून, जिवंत जाळून अनेक लढाऊ दलितांना मारल्याचे महाभयानक क्रौर्य महाराष्ट्राने अनुभवले. या लढ्यात दलित चळवळीची १६ वर्षे गेली. मोर्चे, बंद, बहिष्कार, साहित्य संमेलनात ठराव व्हावा म्हणून निदर्शने असे सतत चालत असे. दलित चळवळीतील गटनिहाय स्पर्धेमुळे त्यांच्या संख्येत अधिकच वाढ होत असे. अखेर १९९४ ला शरद पवारांनी विरोधक व समर्थक दोघांनाही कौशल्याने समजावून नामविस्ताराची तोड काढली आणि हा प्रश्न संपला. या दरम्यान १९८७ ला रिडल्सच्या प्रकरणाने दलित चळवळीच्या एकजुटीची प्रचंड ताकद महाराष्ट्राला दिसली. बाळासाहेब ठाकरेंना आपला विरोध मागे घ्यावा लागला. यानंतर खैरलांजी वगैरे दलित अत्याचाराच्या भीषण घटना आजगायत होत राहिल्या. त्याविरोधात आंदोलने होत राहिली. पण व्यवस्थेच्या समग्र परिवर्तनासाठीची एक़जुटीची चळवळ उभी करण्यात दलित चळवळ आजवर यशस्वी झालेली नाही. दलित अत्याचार नसेल, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना नसेल तर कार्यक्रमच आम्हाला काही नाही, अशी स्थिती या चळवळीची झाली. (काही अपवाद आहेत, पण ते सन्मान्य!) 

स्वतंत्र मजूर पक्ष व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनमध्ये असलेले महारेतर दलितांच्या सहभागाचे प्रमाण रिपब्लिकन पक्षावेळी कमी झाले. नेतृत्वस्थानी सगळे बौद्धच असे चित्र तयार झाले. दलित पँथरच्या प्रारंभीच्या काळात बौद्धेतर दलित काही प्रमाणात पुढाकाराने सहभागी होते. पुढे ते कमी कमी होत नावापुरते राहिले. लढायचे आम्ही आणि सवलती घ्यायच्या मांग-चांभार-ढोरांनी, असे बौद्धांच्यात बोलले जाऊ लागले. राखीव जागांचा फायदा मुख्यतः बौद्धांनीच उचलला. त्यामुळे आम्हाला आमचा वेगळा हिस्सा राखीव जागांत हवा, असे मांगांनी म्हणायला सुरुवात केली. या मनभेदाचा फायदा हिंदू कट्टरपंथीयांनी घेऊन बौद्धेतर दलितांना हिंदू म्हणून एकवटायला सुरुवात केली. बौद्ध एकाकी पडू लागले. बौद्धांच्या जातीचे म्हणून आणि बौद्धांनी आपली जादाची मालकी गाजवल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरही महाराष्ट्रातल्या बौद्धेतर दलित जातींना दूरचे वाटू लागले आहेत. त्यांनी आपल्या अस्मितांचे प्रतीक म्हणून आपल्या जातीतले कर्तबगार ऐतिहासिक पुरुष शोधायला व पुढे आणायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर महार नसल्याने बाबासाहेबांवर मालकी सांगणे कोणा एका दलित जातीला शक्य नसते. महाराष्ट्राच्या बाहेर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व दलितांचे अस्मिताबिंदू आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या दलित चळवळीचे थेट नाते बाबासाहेबांशी आहे. मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचा त्यात काहीही हस्तक्षेप आज नाही. ती ताकद आणि व्यवधानच तिचे नाही. 

एकूण आर्थिक-भौतिक प्रगती आणि खास त्यांच्यासाठीच्या योजना यांनी दलितांचे जीवन अन्य समाजाबरोबरच बदलले. पहिली वंचना, गरिबीची तीव्रता आज नाही. मात्र सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाच्या निकषावर आजही ते खूप मागे आहेत. आर्थिक विकास आणि सामाजिक स्तर यांच्या उतरंडीचा पिरॅमिड अजूनही तोच आहे. जातींच्या कथित दर्जाप्रमाणे त्यांचा विकासातला वाटा आहे. दलित, आदिवासी तळाशीच आहेत. दर्जाची आणि संधीची समानता पूर्णपणे अमलात आलेली नाही. प्राध्यापक, वकील, विचारवंत, सनदी अधिकारी ही पुढे गेलेली मंडळी संख्येने खूप कमी आहेत. बहुसंख्या ही या प्रतिष्ठेच्या आणि साधनसंपत्तीच्या पातळीवर खूप मागे आहे. ज्या बौद्धांबद्दल त्यांनी अधिक वाटा घेतला असे बौद्धेतर दलितांचे आक्षेप आहेत, त्या बौद्धांच्या तुलनेत हिंदू दलितांचा आर्थिक विकास अधिक झाल्याचे डॉ. सुखदेव थोरातांनी नोंदवले आहे. त्याची कारणे तपासावी लागतील. बौद्धेतर दलितांना गावगाड्यात असलेले काहीएक उत्पादनाचे साधन, त्याचे हिंदू म्हणून गावाशी असलेले नाते हे एक कारण असू शकते. त्याचबरोबर मुख्यतः नोकऱ्यांतल्या राखीव जागा, शिक्षणातल्या सवलती यांचा ज्या बौद्धांना फायदा होत होता, तो आज थांबला आहे. खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राखीव जागा जवळपास राहिलेल्या नाहीत. शिक्षण महाग झाले आहे. शिष्यवृत्ती, वसतिगृह, तेथील खानावळ, शैक्षणिक साधनांची उपलब्धता यांत कपात होत चालल्याने ते त्याच्या आवाक्याबाहेर चालले आहे. याचाही परिणाम असू शकेल. 

बौद्ध किंवा दलित वस्त्या गरीब, वंचित असल्या तरी तिथे एक सांस्कृतिक उत्थानाची चळवळ असे. आज तिथे साचलेपण, कुजलेपण आले आहे. ते जयभीम म्हणतात, आम्ही बौद्ध आहोत, अशीही ओळख करतात. पण त्यातले जीवन बदलाचे चैतन्य लुप्त झालेले दिसते. बौद्ध हा अन्य धर्मांप्रमाणे एक धर्म (किंबहुना एक जात), बाबासाहेब आमचे दैवत या पुढे समजाची पातळी जाताना दिसत नाही. वस्तीतून मध्यवर्गात गेलेल्यांचे या वस्तीशी नाते संपुष्टात आलेले आहे. आंबेडकरी चळवळ, दलित चळवळ, दलित साहित्य, विद्रोह यांच्याशी आजच्या बहुसंख्य दलित युवक-युवतींचे काही नाते आहे असे दिसत नाही. विकासाचे, प्रगतीचे, लोकमान्यतेचे प्रस्थापित निकषच त्यांचे निकष आज आहेत. व्यवस्था बदलून त्या जागी काय हवे, याचे चित्रच त्यांच्या मनात आज नाही. खेड्यापाड्यांत दलित महिला बचत गट, स्थानिक स्वराज्य संस्था यांत क्रियाशील सहभाग व पुढाकारही घेताना दिसतात. पण त्याची प्रेरक वा वहन शक्ती आंबेडकरी चळवळ नाही. सर्वसाधारण चळवळींतून त्यांना ही चालना मिळालेली दिसते. समाजाचे समग्र परिवर्तन या ऐवजी वैयक्तिक उत्कर्ष हीच प्रेरणा यात असते. डाव्या-पुरोगाम्यांच्या ट्रेड युनियन वा जनसंघटनांध्ये सहभागी होणाऱ्या कामगार-कष्टकऱ्यांचीही याहून वेगळी प्रेरणा आज नाही. 

वातावरणाचे मुख्य स्वरुप हे असले तरी चळवळींत काही क्षीण, वेगळे बदलही दिसतात. मार्क्स विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध मार्क्स या एकेकाळच्या तीव्र चर्चा आजही होतात. पण या तिघांचे परस्परपूरकत्व सध्याच्या हिंदू कट्टरवादाच्या काळात अधोरेखित करणाऱ्या विचाराचेही स्वागत होताना दिसते. ‘जयभीम-लाल सलाम’ ही घोषणा दलित समूहात धुडकावून लावली जात नाही. काही प्रतिसादही मिळतो. पुरोगामी प्रवाहांतला हा संवाद, सहकार्य पुढे न्यायची गरज आहे. 

राखीव जागा नाममात्र उरलेल्या असताना आणि नवे घटक त्याच्या मागणीत उतरत असताना राखीव जागांविषयीचे नवे धोरण व डावपेच आखणे आंबेडकरी चळवळीला गरजेचे आहे. दलित जातींच्या अंतर्गत न्याय होईल अशा रीतीने राखीव जागांची आखणी कशी करता येईल, ज्यांना अशा आधाराची गरजच उरलेली नाही अशा दलित कुटुंबांनी आधी स्वेच्छेने त्यातून बाहेर निघणे आणि क्रमात त्यासाठीचे अंतर्गत निकष नक्की करणे याचा विचार करावा लागेल. प्रश्न राखीव जागांनी सुटणार नाही, त्यासाठी सर्वांना शिक्षण, रोजगार व भविष्यकालीन सुरक्षितता प्रदान करणारी व्यवस्था कशी आणायची याचा आराखडा मांडावा लागेल. यासाठीची शोषितांची एकजूट उभारण्यासाठी महाराष्ट्रात मराठा मोर्चे, भीमा कोरेगाव यांतून दर्शन झालेला जातविद्वेष शमवण्याचा मार्ग आंबेडकरी चळवळीला अवलंबावा लागेल. अन्य पुरोगामी, डाव्या, समाजवादी, लोकशाहीवादी प्रवाहांनी त्यास मनापासून साथ द्यायला लागेल. त्यासाठी आपल्यातल्या विघटनाला, अभिनिवेशाला, संघटनाबाजीला, अहंतांना आळा घालून सामायिक मुद्द्यांवर एकत्र येऊन टिकून सक्रिय राहण्याची पुरजोर कोशिश करावी लागेल. 

बाबासाहेबांना स्वतंत्र भारतात दलितांचे स्थान काय राहणार हा प्रश्न होता व त्यातून त्यांचा गांधीजी, काँग्रेसशी संघर्ष झडत राहिला. तोच प्रश्न महाराष्ट्र निर्माण झाल्यावर त्यात दलितांचे स्थान काय राहणार हा त्यांना होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा मागायला गेलेल्या नेत्यांतल्या दत्ता देशमुखांना त्यांनी तो खोचकपणे विचारला - “जनरल जागांवर आम्हाला निवडून आणाल काय?” त्यावर दत्ता देशमुख म्हणाले – “’जरुर प्रयत्न करु बाबासाहेब. जी काही जूट या प्रश्नावर बांधायची आहे, त्यामुळे जनरल जागांवरही लोक निवडून देतील.”...पुढे ज्या १९५७ च्या निवडणुका झाल्या त्यात नगरमधून सर्वसाधारण जागेवर खासदार म्हणून बाबासाहेबांचे तरुण सहकारी बॅ. बी. सी. कांबळे निवडून आले. मात्र त्यावेळी बाबासाहेब हयात नव्हते. यानंतरचे ठळक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या १९९८ च्या लोकसभा निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई, जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले असे चौघेजण खुल्या जागांवर निवडून आल्याचे. 

आज राखीव जागांवर रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही, तिथे खुल्या जागेवर निवडून येण्याचा तर प्रश्नच येत नाही. शरद पवारांच्या काळातले उदाहरण आणि मुख्यतः संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वातावरणातले उदाहरण आपल्याला पुन्हा घडवता येणार नाही का? राखीव जागा असाव्या की नसाव्या या चर्चा निरर्थक व्हायच्या असतील तर ही उदाहरणे पुन्हा पुन्हा घडवावी लागतील. ज्या महाराष्ट्रात या आधी हे घडले ते पुन्हा घडणार नाही, असे कसे म्हणता येईल? ते नक्की घडू शकेल. पण त्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल. रिपब्लिकन पक्ष आणि डाव्या, पुरोगामी पक्ष-संघटनांचा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठीचा कार्यक्रम सिद्ध व्हावा लागेल. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उद्दिष्टांकडे आणि त्याच्या आजच्या संदर्भाकडे वळावे लागेल. पुढच्या पंधरा वर्षांत हे खरोखरच कठीण नाही. 

करोनाने काय उलथापालथ होईल, चळवळीचे काय आयाम बदलतील हे आज सांगता येत नाही. पण जे काही होईल त्यास दुर्दम्य ताकदीने सामोरे जाण्याची तयारी म्हणून पुरोगामी शक्तींची सामायिक मुद्द्यांवर एकजूट वा परस्परपूरकत्व हे उपयोगीच ठरणार आहे. अशा एकजुटीतून मिळणारे मानसिक आणि समूहाचे सामर्थ्य काय असते व ते काय घडवू शकते, याचा पुरावा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे. ती विस्कटली तर काय होऊ शकते, याचाही अनुभव आपल्याला आहे. महाराष्ट्राच्या साठीला त्याचे नीट स्मरण करुया आणि या बोधातून महाराष्ट्राच्या पंच्याहत्तरीला अपेक्षित पीक भरघोस येईल, यासाठीच्या मशागतीला लागूया. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, १ मे २०२०, इ विशेषांक) 

Wednesday, April 29, 2020

तारीक है दिल का आंगन

चांद तन्हा है, आस्मां तन्हा
दिल मिला है कहाँ कहाँ तन्हा 

या ओळी आहेत प्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी हिच्या कवितेतल्या. बैजुबावरा, पाकिजा, कोहिनूर, साहिब, बीवी और गुलाम या चित्रपटातल्या तिच्या भूमिका अविस्मरणीय आहेत. चित्रपटातल्या तिच्या बहुतेक भूमिका शोकात्म आहेत. तिचं व्यक्तिगत जीवनही असेच शोकात्म आहे. उदास, अप्राप्य आशेवर जगणारं. मीना काव्य व जीवन अभिन्नपणे जगत होती. 

तिला असं हवं होतं तरी काय? फक्त प्रेम, साधं, निर्व्याज प्रेम. प्रियकर-प्रेयसीचं आदर्श एकात्म, अभिन्न असं भावविश्व. ती एका कवितेत आपल्या इच्छेचं स्वरुप उलगडते – 

हम तुम दोनों एक छंद है 
शायर जिसको भूल गया 

आपण दोघं एक छंद आहोत. असा छंद ज्याला गीतकारच विसरुन गेला. पण यातला ‘तुम’ तिला कधीच हवा तसा मिळाला नाही. एखादा भेटायचा. पण या दोघांचं नातं मीनाच्या एका कवितेप्रमाणेच दिवस व रात्रीसारखं अलग राहायचं. ती म्हणते – 

हमसफर कोई गर मिले भी कहीं 
दोनों चलते रहे यहाँ तन्हा 

जीवनाच्या वाटेवर हे प्रवासी चालायचे, पण कसे? तर एकाकी. याला काहीच अर्थ नव्हता. पण तरीही दुरुन का होईना याने तिला साथ दिली का? …मग मीना असं का म्हणते? – 

पलटकर यूं न देखो तुम मुझे बस 
तडपता छोड़ दो बिस्मिल समझकर 

तो तिला घायाळ अवस्थेत सोडून जायचा. पण मीना आशावादी. ती म्हणते – 

बैठे हैं रास्ते में बयाबान ए दिल सजाकर 
शायद इसी तरफ से एक दिन बहार गुजरे 

विराण हृदय सजवून ती रस्त्यात बसायची. ‘बहार’ची वाट बघत. अन् तिला क्षितिजावर आशेचा किरण दिसू लागायचा. पण तिचं अपयशी मन साशंक असायचं. आजवर जे झालं तेच होणार का याची तिला भीती वाटायची. ती म्हणते – 

उफ़क के पार जो देखी है रोशनी हमने 
वह रोशनी है खुदा जाने या अंधेरा है 

आणि हे खरंही व्हायचं. तो अंधारच असायचा. मग तिला या लोकांची दांभिकता तीव्रतेने जाणवायची. हे जग स्वार्थी आहे. आपणास कोणी समजू शकणार नाही, हे तिला पटायचं. मग ती या जगाची अन् आपली तुलना करायची – 

तुम लोग तो बादल हो 
हवाओं के साथ आए 
कुछ देर आस्मान पर छाये रहें 
बरसे, 
और कहीं दूर निकल गये. 

हम चट्टाने हैं 
अपनी जगर पर कायम 
और हमें मालूम है कि 
जानेवाले लौटकर नहीं आते. 

पण अखेर आशा माणसाला जगवते. एवढं होऊनही मीनाची आशा दबत नाही. एका क्षणी ती पुन्हा डोकं वर काढते – 

गम की सुनसान काली रातों में 
दूर एक दीप टिमटिमाता है 

अन् मीना या दिव्याच्या रोखाने धावत सुटली. तो तिला मिळालाही. आनंदाने बेहोश होत ती त्याच्यासवे अंधार कापत निघाली. पण – 

यह दिया बुझ गया आज किस मोड़ पर 
खो गई है अंधेरे में हर रहगुज़र 
कैसे जारी रखे कोई अपना सफर 
आज तूही बता – 
मेरे कदमों तले से निकलती हुई जिन्दगी की डगर. 

आणि मग पुन्हा मीना उध्वस्ततेच्या गर्तेत सापडली. आपलं म्हणून तिला कुणी वाटलं असेल तर दारु आणि रात्र. या रात्रीच्या डोहात मदिरेच्या धुंदीत स्वतःला विसरुन जायची. रात्र तिला कशी वाटते पहा – 

आह रात आई 
चुपचाप चली आई 
इसकी खामोशी में पनाह है 
कितना प्यारा सांवलापन है 
रात का खामोश चेहरा 
झुकी हुई नर्म-नर्म खामोश आँखें 
भरी-भरी खामोश गोद 
अच्छा हुआ जो रात आई 

या रात्रीत मग तिच्या वेदना तिच्यासमोर थैमानू लागतात. अन् मग तिची स्थिती अशी होते – 

रात सुनसान है, तारीक है दिल का आंगन 
आसमां पर कोई तारा न जमीं पर जुगनू 
टिमटिमाते हैं मेरी तरसी हुई आँखों में 
कुछ दिये - 
तुम जिन्हे देखोगे तो कहोगे : आंसू. 

मीना मनसोक्त रडायची. पण रडता रडता आपल्या मनाची समजूत घालायची – 

हंस हंस के जवां दिल के हम क्यों न चुने टुकडे 
हर शख्स की किस्मत में इनाम नहीं होता 

छिन्न हृदयाचे तुकडे वेचत वास्तव का नाही स्वीकारत आपण? प्रत्येकाच्या नशिबात बक्षीस थोडंच असतं! ती आपल्या डोळ्यांनाही रडू नका म्हणून बजावयाची – 

बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर 
जो मय से पिघल जाए वह जाम नहीं होता 

ओघळणाऱ्या अश्रूंनीच डोळ्यांना समजावलं की दारुने जो वितळतो तो प्यालाच नसतो. पण हा तिचा निश्चय किती काळ टिकणार? कारण अश्रू हेच तर आता तिचं सर्वस्व उरलंय. म्हणून ती म्हणते – 

मुद्दत हो गई अब तो रोये 
बरसों से बरसात अलग है 
अन् ती पुन्हा अश्रू ढाळू लागते. 

असे हे मीनाचं शोकात्म जगणं. तिच्या कवितांचं परीक्षण ते काय करणार? परीक्षण करणं म्हणजे तटस्थ होणे. ते मला शक्य नाही. मीनाच्या भावनांशी फारकत घेणं मला शक्य किंबहुना सहनच होणार नाही. माझ्या अस्वस्थतेच्या काळात या कविता माझा मोठा आधार असतो. म्हणून मी मीनाच्या कविता मला कशा भावल्या त्याची केवळ नोंद इथे केली आहे. 

पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं, मीना फार वाईट जगली. अखेरपर्यंत ती कोणाच्या-कशाच्या तरी प्रतीक्षेत होती. जग एकाकीच सोडावं लागणार हे ठाऊक असतानाही..! 

राह देखा करेगा सदियों तक 
छोड़ जायेंगे यह जहां तन्हा... 

___________________________ 

१९८३-८४ च्या सुमारास मी अठरा-एकोणीस वर्षांचा असताना लिहिलेले हे टिपण. कागदाचे काही जीर्ण तुकडे एका जुन्या फायलीत सापडले. त्यावर हे टिपण होते. आता ते टाईप केले. – सुरेश सावंत 

Wednesday, April 1, 2020

सुजय डहाकेऐवजी त्याच्या आक्षेपाचा संदर्भ तपासूया का?


सुजय डहाके या तरुण दिग्दर्शकाने लोकसत्ता लाईव्हमधील मुलाखतीत मराठी मालिकांत मुख्य भूमिकेसाठी ब्राम्हण अभिनेत्रींनाच संधी दिली जात असल्याचा आरोप केला आणि अपेक्षेप्रमाणे टीके-प्रतिटीकेची बरीच राळ उडाली. खुद्द सुजय डहाके तसेच मराठी मालिका यांविषयी मत देण्याइतका त्यांचा परिचय मला नाही. त्यामुळे सुजय डहाकेचा आरोप मराठी मालिकांबाबत खरा की खोटा, हे मी सांगू शकत नाही. पण व्यापक सामाजिक-आर्थिक स्थिती, माध्यमांतले त्याचे प्रतिबिंब यांविषयी जे अभ्यास व निरीक्षणे मांडली जातात, त्यांचा परिचय मला आहे. सामाजिक-राजकीय चळवळीतला वावरही काही बाबी मला लक्षात आणून देत असतो. त्याआधारे सुजय डहाकेच्या आक्षेपाचा आणि त्यावरच्या टीकेचा संदर्भ पाहता येतो. सुजय डहाकेचे व्यक्तित्व उथळ की गंभीर किंवा त्याचे टीकाकार किती प्रांजळ हा माझा प्रश्न नाही. ज्या संदर्भात हा आक्षेप व त्यावरची टीका आली आहे, तो संदर्भ निश्चित गंभीर आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

सुजयच्या आरोपानंतर त्याच्या विरोधात पहिली तोफ डागली अभिनेता शशांक केतकर याने. तो म्हणतो - “माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिनबुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे. पुढे तो म्हणतो, कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्यापेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?”

ब्राम्हणी वर्चस्वाच्या विरोधात बोलणाऱ्या सुजयने त्याला संधी असताना अब्राम्हण अभिनेत्रींची निवड का केली नाही? ...हा प्रश्न वकिली युक्तिवादासाठी बरोबर आहे. त्याचे उत्तर सुजयने जरुर द्यावे. वैयक्तिक वागणूक बोले तैसा चाले नसेल तर नैतिक अधिकारही कमी होतो हे खरे. पण वैयक्तिक वागणुकीवर त्या व्यक्तीने विचारलेल्या सामाजिक महत्वाच्या प्रश्नाचे महत्व कमी ठरत नाही. तो प्रश्न नाहीच म्हणून बाजूला सारता येत नाही. एखादा थोर बेवडा दारुच्या दुष्परिणामांबद्दल वस्तुनिष्ठ माहिती देत असेल, तर ती माहिती चुकीची ठरत नाही. बेवडा सांगतोय...पण खरं बोलतोय असेच आपण म्हणू. म्हणायला हवे. तीच बाब सुजय कामाकडे लक्ष देतो की नाही यालाही लागू आहे. तो आता काहीही करत नसेल. चकाट्या पिटत असेल. त्याचे चित्रपट चालत नसतील. तरीही त्याने केलेल्या विधानाची किंमत तो खूप काम करत असताना, चित्रपट चालत असताना केलेल्या विधानापेक्षा कमी होत नाही.

शशांकचे दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत. एक, आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे. दुसरे, साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेसे नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला?’

शशांक केतकरने या दोन मुद्द्यांतून सांगितलेला निष्कर्ष हा कि, मराठी मालिका वा सिनेमा क्षेत्रात जातीला थारा नाही. तिथे गुणवत्ता पाहिली जाते. मंजुळे गुणवान आहे. या गुणवत्तेला सानेंनी जोखले, साथ दिली आणि उत्तम कलाकृती जन्मास आल्या.

शशांक मग सुजयला दिलेल्या उत्तरात पुढे असे का म्हणतो? - “कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे.

साने, केतकर, मंजुळे, कांबळे यांत काहीही फरक तो मानत नाही. गुणवत्तेलाच त्याच्या क्षेत्रात किंमत आहे. कांबळे, छल्लारे, पवार हे गुणवान आहेत. अशा गुणवानांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो याचा त्याला अभिमान आहे. ...असे साधे सरळ त्याला म्हणायचे आहे का?

नाही. सुजयच्या जातिवादाच्या आक्षेपाला तो उत्तर देतो आहे. कांबळे, छल्लारे व पवार हे अब्राम्हण किंवा कथित खालच्या जातीचे असतानाही माझ्यासारखा ब्राम्हण त्यांच्या हाताखाली काम करतो. म्हणजेच मी जातिभेद मानत नाही. त्यातून येणारी श्रेणी मी मानत नाही. केवळ गुणवत्ता मानतो, हे तो यातून सांगतो आहे.

समाजात अन्यत्र असा जातिभेद केला जातो, जातींवरुन माणसाच्या श्रेणी ठरवल्या जातात, हे त्यास बहुधा कबूल आहे. मी मात्र ते मानत नाही आणि आमच्या क्षेत्रात असे काही होत नाही, यावर तो ठाम आहे.

शशांक स्वतः भेदभावाच्या या अमानवी प्रथेपासून पूर्ण अलिप्त आहे, याची ग्वाही देतो आहे. ते खरे असू शकते. पण तेवढेच. त्याच्या क्षेत्रात असा भेदभाव होत नाही, फक्त गुणवत्ताच महत्वाची मानली जाते, हे विधान त्यातून सिद्ध होत नाही. त्यासाठी कथित तळच्या, मधल्या जातींच्या कलावंतांच्या साक्षी आवश्यक आहेत. अर्थात केवळ त्याही पुरेशा नाहीत. त्यांच्यावर हेत्वारोप होऊ शकतात. एक पद्धतशीर समाजशास्त्रीय अभ्यास गरजेचा आहे.

तेजश्री प्रधान हिनेही “मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्षं माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?” अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांच्या क्षेत्रात गुणवत्तेलाच महत्व दिले जाते. ती स्वतः अब्राम्हण असूनही तिला काही त्रास होत नाही, हा तिचाही निष्कर्ष आहे.

ब्राम्हण विरुद्ध सीकेपी हा तीव्र ऐतिहासिक झगडा आहे. मात्र तो जातीय उतरंडीच्या वरच्या भागातल्या जातींच्या स्पर्धेचा आहे. सीकेपी ही मागास जात नव्हे, हे इथे जाता जाता लक्षात ठेवूया. मागास विरुद्ध वरच्या जाती या संघर्षात छावण्या कशा पडतात, ते पहावे लागते.

सौरभ गोखले यानेही सुजयची लायकी काढून त्याला कडक समज दिली आहे- पुन्हा याप्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.

त्याचे क्षेत्र किती नितळ, निर्मळ आहे आणि आजूबाजूची घाण इथे कशी घुसडू नये हे सौरभ इथे बजावून सांगतो आहे. श्रीमुखात भडकवण्याची भाषा हा सुजयच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला वगैरे मानूया नको. सुजयच्या त्याच्या क्षेत्रातल्या मित्राचा तो सात्विक संताप आहे, असेच तूर्त गृहीत धरुया.

या सगळ्याबाबत गिरीश दातारांची एक वेगळी प्रतिक्रिया आहे. दातार नावावरुन कळते त्याप्रमाणे ब्राम्हण असावेत. ते स्वतःला ब्राम्हण वा कुठल्याही जातीचे मानतही नसतील. पण जन्म कथित ब्राम्हण घरात झालेला असावा. ते स्वतः माध्यम क्षेत्रातलेच दिसतात. ते त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात-

माझ्या मते सुजय डहाके कलाक्षेत्रातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादाबद्दल त्याची सल व्यक्त करतोय. आणि जे अतिशय योग्य असेच आहे. पण एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सहकलावंताला अशी सल का वाटतीये, याचा 'किमान विचारही' न करता, त्याच्या बोलण्यात तात्विक पातळीवर खरंच काही सत्य आहे का (मी तात्विक म्हणतोय. सांख्यिकी नाही. त्यामुळे मूर्खासारखे कोणत्या सिरीयल आणि सिनेमांमध्ये किती ब्राह्मणेतर कलाकारांनी कामे केलीयेत याची उदाहरणे देत बसू नये) हे तपासून पाहण्याची, त्याच्यावर मूर्खासारखी टीका करणाऱ्यांना गरजही वाटत नाही - हीच खरी सांस्कृतिक वंचना आहे.

ब्राम्हणी वर्चस्व म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण करताना ते पुढे नोंदवतात – काही अपवाद सोडल्यास, ब्राह्मणी चालीरीती, ब्राह्मणी भाषा, ब्राह्मणी सणवार, ब्राह्मणी पोशाख - हाच काय जणू epitome of ideal and standard culture अर्थात - भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक आदर्शाचा अत्युच्च नमुना आहे - अश्याच प्रकारे - ब्राह्मणांनी आपले सौंदर्य निकष बहुजनांवर लादणे चालवले आहे. म्हणूनच सिरीयल, सिनेमांमध्येही बहुजन पात्रेही ब्राह्मणी चालीरीती आचरताना दिसतात. (काही मोजके अपवाद वगळता).

त्यांच्या या कलाक्षेत्रात सहकलाकारांशी व्यवहार करताना हे ब्राम्हणी वर्चस्व कसे काम करते, याचे वर्णन ते असे करतात- ब्राह्मणी वर्चस्ववाद म्हणजे केवळ ब्राह्मण कलाकार संख्येने अधिक असणे, किंवा ब्राह्मणेतर कलाकारांची कलेच्या क्षेत्रात कमी संख्या असणे नव्हे, तर याहून अधिक व्यापक स्वरूपात याचा विचार व्हायला पाहिजे. '' आणि '' मधल्या फरकाने आपल्या सोबत काम करणाऱ्याला हीन लेखणे, ज्यांना तसे बोलता येत नाही म्हणून - त्यांना अत्यंत कळकळीने मराठीतले मोठे कवी तू कसे वाचले पाहिजेस, ज्यामुळे तुझी भाषा कशी सुधारेल (हे सांगणे)... हे ध्यानात घेतले तर आपणही नकळत याचे वाहक कसे होत असतो, हे ध्यानात येईल.

आपल्या सहकाऱ्याची टीका संवेदनशीलतेने ऐकून तपासण्याची गरज तसेच गुणवत्ता कशाला म्हणायचे, ब्राम्हणी वर्चस्व हे केवळ संख्येवर अवलंबून नाही तर तो धाक निर्माण करणारा एक सांस्कृतिक मापदंड असतो, असे नमूद करुन या चर्चेला प्रगल्भ आयाम दातारांनी दिले आहेत. सुजय डहाकेच्या हेतूंना वा त्याच्या मूर्खपणाला तपासण्यात वेळ घालवण्याऐवजी दातारांनी मांडलेल्या या मुद्द्यांची चर्चा शशांक, तेजश्री, सौरभ यांनी करणे गरजेचे आहे.

सांस्कृतिक वर्चस्व संख्येवर अवलंबून नसले तरी प्रत्यक्ष संख्येची अवस्था माध्यम आणि आर्थिक क्षेत्रात काय आहे आणि जातींच्या उतरंडीचा त्याच्याशी संबंध कसा आहे, हे पाहणे कमी उद्बोधक नाही. ही अवस्था स्वातंत्र्याचे आयुर्मान पाऊणशे व्हायला येत असताना असणे हे खूप गंभीर आहे.

७-८ महिन्यांपूर्वी जाहीर झालेला हा अभ्यास. ऑक्सफॅम आणि न्यूजलाँड्री यांनी केलेला. त्यात त्यांनी जातींची उतरंड माध्यमांतल्या विविध क्षेत्रात कशी आजही कायम आहे, याचे आकडे दिले आहेत. असा अभ्यास याही आधी योगेंद्र यादव वगैरे मंडळींनी केलेला आहे. त्यांचेही निष्कर्ष तेच आहेत. हे आकडे ताजे आहेत, म्हणून ते घेतले आहेत.

आधी देशातल्या लोकसंख्येची सामाजिक विभागणी कशी आहे ती पाहू.

टक्के
विभाग
२२.८
सर्वसाधारण (ब्राम्हण, कायस्थ, क्षत्रिय, बनिया आदि उच्चवर्णीय)
५२
ओबीसी (शूद्र जाती)
१६.६
अनुसूचित जाती (दलित जाती)
८.६
अनुसूचित जमाती (आदिवासी जाती)

आता माध्यमांतल्या नेतृत्वस्थानी असणाऱ्यांचे प्रमाण पाहू.

माध्यम
सर्वसाधारण (२२.८ टक्के)
ओबीसी (५२ टक्के)
अनु. जाती (१६.६ टक्के)
अनु. जमाती (८.६ टक्के)
इंग्रजी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
८९.३ टक्के



हिंदी बातम्या टी. व्ही. चॅनेल्स
१०० टक्के



इंग्रजी वर्तमानपत्रे
९१.७ टक्के



हिंदी वर्तमानपत्रे
८७.५ टक्के



डिजिटल मीडिया
८४.२ टक्के
५.३ टक्के


नियतकालिके
७२.७ टक्के
१३.६ टक्के



याचा अर्थ काय?

लोकसंख्येत २२.८ टक्के असलेल्या उच्चवर्णीयांचे जवळपास एकहाती नेतृत्व कसे काय? फक्त दोन ठिकाणी मामुली प्रमाणात ओबीसी दिसतात. दलित-आदिवासींचा तर पत्ताच नाही. (अधिक तपशीलात गेल्यास उच्चवर्णीयांतल्या श्रेणीचेही दर्शन इथे घडते.)

गुणवत्ता केवळ उच्चवर्णीयांत आहे का? ती जन्मजात आहे का? याला शशांक, सौरभ किंवा तेजश्री यांचे उत्तर नाही असेच असेल. मग आमच्या क्षेत्रात फक्त टॅलेंट पाहिले जाते, हे विधान कसे कबूल करायचे? मराठी टीव्ही किंवा मराठी सिनेमा याला अपवाद आहे का? समजा जास्त उच्चवर्णीयच प्रमुख भूमिकांत किंवा उच्च स्थानांवर असले आणि ते खरोखरच टॅलेंटमुळेच तिथे असले तरी त्यांच्यातल्याच बहुसंख्यांमध्ये हे टॅलेंट का? ...या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ व्हायला नको का? शशांकने उल्लेखिलेल्या दोन नावांबाबतच बोलायचे तर साने व मंजुळे यांपैकी किती मंजुळे सानेंच्या जागी आहेत? नसतील तर का नाहीत? या प्रश्नाने त्रास व्हायला नको का? टॅलेंट जन्मजात नाही हे कबूल असेल तर तथाकथित खालच्या जातींचे टॅलेंट पुढे न यायला काहीतरी अडथळे आहेत आणि ते शोधून दूर करायला हवेत, ही आपली भावना व खटपट असायला हवी की नको?

पैसे-संपत्ती कमाविण्याची अक्कलपण उच्चवर्णीयांतच जास्त कशी? ...योगायोगाने? अलिकडच्याच एका अभ्यासाने मांडलेली ही खालील आकडेवारी पहा.

जात/समाज विभाग
संपत्तीतला वाटा (%)
हिंदू उच्चवर्णीय
४१
हिंदू ओबीसी
३०.७
अन्य
मुस्लिम
हिंदू अनु. जाती
७.६
हिंदू अनु. जमाती
३.७

हिंदू समाजातली सामाजिक/जातीची उतरंड जशीच्या तशी आर्थिक बाबतीत दिसते. व्यवसायांतही त्याचा पडताळा येतो. सफाई कामात शतप्रतिशत दलित कसे? लोकसंख्येतले जातनिहाय प्रमाण सफाई कामगारांत का दिसत नाही?

सुजय डहाकेने हे सर्व प्रश्न विचारलेले नाहीत. पण त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे सर्व मुद्दे येतात.  त्याने विचारलेल्या प्रश्नाला गैरलागू ठरवताना हे प्रश्न गैरलागू कसे ठरवणार? ते ढळढळीत समोर उभे आहेत. त्यांची उत्तरे द्यावीत लागतील.

स्वतंत्र भारतात विकास जरुर झाला. नव्या आर्थिक धोरणाने काही काळ आर्थिक उन्नतीला गती आली. पण हा विकास वा उन्नती कोणाच्या, किती व काय प्रकारे वाट्याला आली? त्याचा परिणाम काय झाला? ...हा हिशेब करायचा नाही का? प्रत्येक जातीत काहीजण सुळक्यासारखे वर आलेले दिसतात. पण त्यावर त्या जातीचे मोजमाप करुन चालणार नाही. त्याचे जातीतले प्रमाण किती ते पहावेच लागेल. नव्या आर्थिक धोरणानंतरच्या संपत्ती वितरणात दिवसेंदिवस विषमता वाढत चालली आहे, असे अभ्यासक नोंदवत आहेत. त्यावर उपाय नाही झाला तर तो असंतोष समाजात अन्य मार्गांनी उफाळून येतो. तो आपण अनुभवत आहोत. संविधानातली मानवी प्रतिष्ठा, सामाजिक-आर्थिक न्याय, समता या मूल्यांच्या रुजवातीशिवाय समाजाचा निरामय विकास संभवनीय नाही, हे आपण समजून घ्यायला अजून किती उशीर करणार आहोत?

शशांक, तेजश्री, सौरभ यांच्यात जरुर टॅलेंट आहे. पण या टॅलेंटला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा वर्ग व जात यांचे कोंदण लाभलेले आहे. त्यांची इच्छा असो वा नसो. ते मागोत वा न मागोत. त्यांना ते मदत करतच असते. हे कोंदण गळून पडून खऱ्या टॅलेंटची निःपक्षपाती निवड होण्यासाठी आजची भयावह होत चाललेली सामाजिक-आर्थिक विषमता आपल्याला कमी करत न्यावी लागेल.

हे आकळले व त्याप्रति कृतिशील संवेदना जागी झाली तर शशांक, सौरभ, तेजश्री आणि सुजय या लढ्यात बहुधा एकत्रच दिसतील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, एप्रिल २०२०)

Sunday, March 1, 2020

CAA विरोधी लढ्यातली आव्हाने


'आंदोलन' मधील माझ्या मासिक सदरासाठीचा हा लेख आता छापून आला असला तरी प्रत्यक्षात तो दिल्ली दंगलीच्या आधी लिहिलेला आहे. त्यामुळे ते संदर्भ या लेखात आढळणार नाहीत.
____________

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय लोसंख्या नोंदणी (NPR) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) यांच्या विरोधातील तसेच काही बाजूने झालेल्या देशभरच्या आंदोलनांनी प्रसार माध्यमांचा मोठा भाग बराच काळ काबीज केला आहे. सरकारकडून विरोधातली आंदोलने चेपण्यासाठी पोलिसी बळाचा, अत्याचाराचा, प्रक्षोभक भाषेचा बेछूट वापर झाला. होतो आहे. पण त्याने न दबता ही आंदोलने पुन्हा पुन्हा उसळी घेत आहेत. दिल्लीतील शाहीन बाग व त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई बागसारखी मुस्लिम महिलांची ठिय्या आंदोलने प्रचंड चिवटपणे सुरु आहेत. मुख्यतः मुस्लिम, त्यांना पाठिंबा देणारे काही सुटे पुरोगामी, भाजपविरोधी राजकीय पक्ष, मोठ्या शहरांतले सर्वधर्मीय उच्चशिक्षित, उच्चस्तरीय विद्यार्थी या आंदोलनांचे आधार आहेत. काही राज्य सरकारांनी CAA, NPR, NRC अमलात न आणण्याचे ठरावही त्यांच्या विधानसभांत केले आहेत. आंदोलक व सरकार दोहोंपैकी कोणीही मागे हटायला तयार नाहीत. लोकशाहीची बूज राखून विरोधकांशी संवाद करण्याचे काहीच चिन्ह केंद्र सरकारकडून दिसत नाही. उलट दबंगपणे ते पुढचे पुढचे निर्णय जाहीर करत निघाले आहे. या आंदोलनातील घटकांचा चिवटपणा, जिद्द याला तोड नाही. पण सरकारला भारी पडण्याइतकी त्याची ताकद राहील का, हा प्रश्न आहे. कारण बहुसंख्य समाजविभाग या आंदोलनापासून अजून दूरच आहेत. एकतर सरकार चालवणाऱ्या पक्षाच्या विचारप्रभावाखाली ते आहेत किंवा त्यातल्या अनेकांपर्यंत हा प्रश्न व्यवस्थित पोहोचलेलाच नाही. आंदोलकांतही सक्षम नेतृत्व, लढ्याचे तातडीचे व लांब पल्ल्याचे डावपेच यांत बराच उणेपणा आहे. अशावेळी या आंदोलनातील सहभागींनी या आंदोलनापुढील आव्हानांची नोंद व चिकित्सा करणे गरजेचे आहे. या लेखात मी माझ्यापरीने तसा प्रयत्न करत आहे. 

भारताच्या धर्मनिरपेक्षतेची घडण

या आंदोलनातील एक मोठे आव्हान म्हणजे भारतातील आजच्या पिढीचा भारताच्या धर्मनिरपेक्ष घडणीविषयीचा अपुरा समज. सर्व समाजालाच त्याविषयी नीट समजावून सांगावे लागणार आहे. 

गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवत. पण देवळात न जाता सर्वधर्मीय प्रार्थना करत. पाकिस्तान धर्मावर आधारित तयार होताना, या सनातनी हिंदूने ‘भारत हा केवळ बहुसंख्याक हिंदूंचा नव्हे, तर सर्व भारतवासीयांचा-मग ते कोणत्याही धर्माचे असोत’ हे प्राणपणाने सांगितले. ...त्यासाठी प्राणही दिले. या सनातनी हिंदूची ही धर्मनिरपेक्षता न मानवणाऱ्या एका हिंदूनेच त्यांचा प्राण घेतला. 

देशाची घटना लिहिण्याचे काम सुरु झाले, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य नक्की कधी मिळणार हे ठाऊक नव्हते. हे काम चालू असतानाच देश स्वतंत्र झाला. फाळणी झाली. दोन देश तयार झाले. या पार्श्वभूमीवर घटना समितीत अल्पसंख्याकांबाबत काय तरतुदी करावयाच्या याची चर्चा सुरु झाली. हिंदू महासभेचे एक सदस्य उठून म्हणाले, “आधी पाकिस्तान त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांबद्दल काय धोरण घेते ते पाहू. मग आपले ठरवू.” बाबासाहेब ताडकन उठले आणि म्हणाले- “आपण एक स्वतंत्र देश आहोत. आपल्या देशातील अल्पसंख्याकांबाबतचे धोरण पाकिस्तान तिथल्या अल्पसंख्याकांबाबत काय धोरण घेते त्यावर अवलंबून असणार नाही.” पुढे ते असेही म्हणाले, “तेथील अल्पसंख्याकांबद्दलच्या पाकिस्तानच्या व्यवहाराबाबतचा तोडगा हा राजकीय शिष्टाईचा भाग आहे.” 

जिनांनी धर्मावर आधारित पाकिस्तान करण्याची मागणी लावून धरली. ती मिळवली. याला मौलाना अबुल कलाम आझादांसारख्या मुस्लिम नेत्यांचा पूर्ण विरोध होता. ज्यांना जिनांची भूमिका मान्य होती असे किंवा वेगवेगळ्या कारणांनी अपरिहार्यता असलेले मुसलमान पाकिस्तानला गेले. बहुसंख्य मुसलमान इथेच राहिले. त्यांचा देश इतर भारतवासीयांप्रमाणे भारतच आहे. पाकिस्तान धर्माच्या आधारावर झाला, पण घटना समितीत भारत सेक्युलर असणार हे फाळणी आधीच ठरले होते. त्याची सेक्युलर ही भूमिका फाळणीमुळे बदलण्याचा प्रश्न नव्हता. 

हे सेक्युलरपण जपण्याचे, जोपासण्याचे काम पंतप्रधान नेहरुंनी पुढे १७ वर्षे म्हणजेच मरेपर्यंत केले. खुद्द राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांना त्यांनी सोमनाथच्या मूर्तिप्रतिष्ठापनेत सहभागी न होण्याची पत्र लिहून विनंती केली. सरकारमधील माणसांना वैयक्तिक आस्थेचा अधिकार असला तरी सरकारी पदावर असताना अशा धार्मिक कार्यक्रमांतील सहभाग बरोबर नाही. राष्ट्रपतींसारख्यांच्या अशा कृतीतून चुकीची वहिवाट तयार होईल, ही त्यांची चिंता होती. राजेंद्र प्रसादांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्यांचीही काही भूमिका होती. मात्र पुढे ही वहिवाट झाली. नेहरुंची भीती खरी ठरली. 

हिंदू कोड बिलाच्यावेळी आंबेडकर व नेहरु दोघांनाही कर्मठ हिंदूंकडून शिव्याशाप मिळत होते. काँग्रेस अंतर्गतही राजेंद्र प्रसादांसारख्यांचा विरोध होता. हिंदू महासभेच्या नेत्याने तर ‘अशा सुधारणा हिंदूंतच का, मुसलमानांत का करत नाही?’ असे सभागृहातच विचारले. नेहरुंचे उत्तर होते – ज्यांच्यात शक्य आहे त्यांच्यात सुधारणा करत आहोत. नुकतीच फाळणी झाली आहे. मुस्लिमांच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता आहे. अशावेळी या सुधारणा करणे शक्य नाही. 

हा धागा सुटल्याचे परिणाम 

पुढे काँग्रेसचा हा धागा सुटला. नेहरुंप्रमाणे इंदिरा गांधीही हिंदू कट्टपंथीयांच्या पूर्ण विरोधात व धर्मनिरपेक्षतेच्या ठाम बाजूने होत्या. पण पक्ष व देशांतर्गत अस्वस्थतेच्या चक्रात मुस्लिमांतल्या सुधारणा हे त्यांचे व्यवधान राहिले नाही. राजीव गांधींच्या भूमिकेबद्दलही अशी शंका नसली तरी प्रत्यक्ष व्यवहारातले झोक (शहाबानो व अयोध्येतील बाबरी मशिदीत ठेवलेल्या राममूर्तीचे टाळे उघडणे) हिंदू-मुस्लिम दोहोंकडच्या प्रतिगाम्यांच्या पथ्यावर पडले. यथावकाश मशिदीवर भोंगे लागले. 

बिगर काँग्रेसी लोकशाहीवादी सरकारांच्या काळातही हे लांगूलचालन चालू राहिले. उमेदवारांच्या याद्या इमाम बुखारीला दाखवून मान्यता घेण्याच्या व्ही.पी. सिंगांच्या व्यवहाराचे समर्थन ‘राजकीय अपरिहार्यता’ म्हणून पुरोगामी समाजवाद्यांनी केलेले आहे. व्ही. पी. सिंगांचे सरकार तर एका बाजूने डाव्यांच्या आणि दुसऱ्या बाजूने भाजपच्या पाठिंब्यावर टिकले होते. त्याआधीचा जनसंघासहितचा केंद्रातला जनता पार्टीचा आणि महाराष्ट्रातला पुलोद प्रयोग आपण जाणतोच. गैरकाँग्रेसवादाच्या धोरणापायी झालेली ही सबगोलंकारी एकजूट भाजपला वाढायला मदतनीस ठरली. उजव्या शक्तींना तिने ताकद दिली. 

बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय-सामाजिक लढाईत कधीही जाती-धर्माच्या बेरजांचे डावपेच अवलंबले नाहीत. त्यांनी केलेल्या जुटी तत्त्वाधारित होत्या. त्यांच्या अनुयायांतल्या काहींनी मात्र दलित मुक्तीसाठी दलित-मुस्लिम एकजूट प्रचारली. ही एकजूट दोहोंकडच्या शोषितांची नव्हती अथवा मुस्लिमांतल्या सुधारणावाद्यांना दिलेली ती साथ नव्हती. सुधारणांना विरोध असणाऱ्या कर्मठ मुस्लिमांशी ही दोस्ती होती. 

बहुसंख्य सामान्य मुस्लिमाचे काहीही हित साधल्या न गेलेल्या या दोस्ती, अपरिहार्यतांनी हिंदू कट्टरपंथीयांना ताकद मिळाली. स्वातंत्र्य चळवळ व सामाजिक सुधारणांची चळवळ या दोहोंतून विकसित झालेले, पुढे घटनेत पायाभूत महत्व पावलेले आणि नेहरुंनी दीर्घकाळ जोपासलेले धर्मनिरपेक्षतेचे मूल्य जायबंदी झाले. 

आमच्या या ढिल्या व्यवहाराने आणि हिंदू कट्टरपंथीयांच्या नित्याच्या खऱ्याखोट्या मजबूत प्रचाराने बहुजातीय बहुसंख्य हिंदू समाज मुस्लिमांप्रति विषाक्त बनू लागला. आम्हाला कायम गृहीत धरतात, शहाणपणा आम्हालाच शिकवतात, फक्त आमच्याच देवा-धर्मावर टीका करतात, मुस्लिमांतल्या गैरबाबींबाबत मूग गिळून बसतात या भावनेची मनावरची पुटं जाड होत गेली. 

गंगा जल फिरवून, विटा गोळा करुन हिंदू कट्टरपंथीयांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. दंगली झाल्या. मनाबरोबरच हिंदू-मुस्लिमांच्या वस्त्यांचेही ध्रुवीकरण झाले. बुरखा, हिजाब, तोकडे पायजमे, दाढ्या, टोप्या वाढू लागले. 

ब्रिटिशांच्या विरोधात न लढलेल्यांचे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना पाठिंबा दिलेल्यांचे, एकेकाळी वळचणीला टाकले गेलेले वंशज राजकीय सत्तासोपान पायरी दर पायरी चढत आज राक्षसी बहुमताने सत्तेवर आले आहेत. अनेक कथित पुरोगामी, आंबेडकरी, समाजवादी त्यांचे सालगडी झालेले आहेत. 

....या सगळ्याच्या परिणामी आज बहुसंख्य हिंदू मुस्लिमद्वेषी झाला आहे. आंबेडकरी विभागातही हा मुस्लिमद्वेष प्रचंड आहे. CAA विरोधी आंदोलनात तिरंगा, संविधान व आंबेडकर-गांधींच्या प्रतिमा घेऊन उतरण्याचा नवा व स्वागतार्ह पायंडा मुस्लिम समाजात पडला आहे. पण त्यामुळे लगेच या मुस्लिमद्वेषाला उतार पडेल, असे नाही. 

आज CAA, NPR व NRC हा मुद्दा केवळ मुस्लिमांचा आहे, हीच भावना बहुसंख्याक हिंदूंच्या मनात आहे. आंबेडकरी समूहही त्याला अपवाद नाही. तो तसा जात्याच लोकशाहीविरोधी हिंदूराष्ट्राच्या विरोधात आहे. पण CAA च्या मार्फत हिंदू राष्ट्राचे आगमन होते आहे, हे त्याला आकळत नाही. या मुद्दयांवर प्रबोधन करण्याचे प्रयत्न एकतर होत नाहीत. जे होतात ते खूपच तोकडे आहेत. 

मुस्लिमांतही या मुद्द्यांची नीट स्पष्टता आहे असे नाही. ‘CAA ला भारतीय मुस्लिम का विरोध करतात ते मला कळत नाही’ या राज ठाकरेंच्या प्रश्नाला मुस्लिम आंदोलनातील अनेक लोकही नीट उत्तर देऊ शकणार नाहीत. मात्र मुस्लिमांना या कायद्याच्या तपशिलाची गरज नाही. त्यांना त्याचे मर्म कळले आहे. हे मर्म आहे मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचे. मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी जे अनुभवले आहे, त्यातून त्यांचे हे मर्म पक्के झाले आहे. आपल्या या देशातील स्वतंत्र, बरोबरीच्या अस्तित्वावरच घाला आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. म्हणूनच ते आज CAA च्या विरोधात प्राणपणाने लढत आहेत. 

हा लढा आपलाही आहे, देशाची पायाभूत मूल्ये टिकवण्याचा, संविधान वाचवण्याचा मुद्दा आहे, ही भावना बहुसंख्याक समाजातील काही व्यक्तींची आहे. सुट्या सुट्या लोकांची आहे. सबंध समाजापर्यंत ती पोहोचविणारे अधिकारी नेतृत्व आज नाही. 

देशातल्या प्रमुख शहरांतल्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा या लढ्याला जोरदार पाठिंबा आहे. ते अधिकतर उच्चवर्णीय, उच्चस्तरीय तसेच पुरोगामी चळवळींशी संबंधित विद्यार्थी आहेत. स्वतंत्र अवकाशाची चव चाखलेल्या या विद्यार्थ्यांना निदर्शने केली म्हणून पोलीस कॅम्पसमध्ये घुसून बेदम मारतात हे कल्पनेच्या पलीकडे अवमानकारक वाटले आहे. त्यांच्या लढ्याला त्यामुळे एक विलक्षण धार आहे. आधुनिक मूल्यांची त्यांची समजही दांडगी आहे. 

आंदोलनापासून बहुसंख्य अलिप्त

मात्र यांच्या पलीकडचे सामान्य थरातील, छोट्या शहरांतील महाविद्यालयीन विद्यार्थी अजूनही अलिप्त आहेत. खुद्द मुंबईत गेटवेला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांत काही ठरावीक शिक्षणसंस्थांतीलच विद्यार्थी होते. सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी अथवा सामान्य थरांतील विद्यार्थी यात दिसत नव्हते. त्यांच्याशी बोलल्यावर त्यातल्या अनेकांना हे नक्की काय चालले आहे, हे ठाऊक नसल्याचे जाणवते. तर अनेकांच्या मनात तोच समाजात असलेला मुस्लिमद्वेषाचा फुत्कार आढळतो. हे विद्यार्थी बहुसंख्य आहेत. आंदोलनात जाणीवेने व जिगरीने उतरलेले विद्यार्थी अल्प आहेत. 

दिल्लीच्या शाहीन बागेच्या धर्तीवर नागपाड्याला चाललेले मुंबई बाग आंदोलन केवळ मुस्लिम महिलांचे राहू नये, अन्य समाजातील महिलांनी त्यात सहभागी व्हावे, याला तसा प्रतिसाद मिळत नाही. पुरोगामी, आंबेडकरी, डावे कार्यकर्ते व्यक्तिगत पातळीवर मधूनमधून भेटी देत असतात. भाषणे करत असतात. पण त्यांच्या संघटनांतले लोक अथवा त्यांच्या समाजातील लोक या महिलांसोबत येऊन बसत आहेत, असे चित्र दिसत नाही. यातले काही प्रयत्न करत असतात. पण त्यांच्या संघटनांतून विरोध नसला तरी पाठिंबा मिळत नाही. काहीतरी आपपरभाव तिथे आहे हे नक्की. 

बहुसंख्याक समाजाला CAA द्वारे केवळ मुस्लिमांना वगळणे हा आपल्या देशाच्या सेक्युलॅरिझमच्या मूलाधारावर आघात आहे, हे कळत नाही. पटत नाही. सावरकर काय म्हणाले हे यातील सगळ्यांना सांगता येणार नाही. पण त्यांचे पितृभू, पुण्यभू हे भारतीयत्वाचे निकष त्यांना आतून पटतात. हिंदूंना त्यांच्याच देशात अधिकार नाही मिळणार तर कुठे, ही भावना त्यांच्यात प्रबळ आहे. कोणी कोणाला मारु नये हे पटते. सगळ्यांनी गुण्यागोविंदाने पण आपापल्या मापात राहावे ही त्यांची इच्छा असते. म्हणजेच घटनेतल्या समतेऐवजी संघाची समरसता अधिक भावते. 

सामाजिक व आर्थिक दुबळ्यांवर NRC आघात करणार असे आम्ही दलित, भटक्या, आदिवासी समूहांत प्रचारतो. त्यांना आसाममध्ये काय झाले, ते वर्णन करुन सांगतो. आमच्यावर विश्वास ठेवून, यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल म्हणून यातले काही आमच्या आंदोलनात येतात. पण आसाममध्ये नक्की काय झाले याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना नाही. बरे आसामप्रमाणेच इथे होईल कशावरुन? NRC देशभर कधी व कसे करणार हे कुठे सरकारने जाहीर केले आहे. आसामप्रमाणे करतील असे आमचे अनुमान आहे. आसाममधील अनुभवातून तेही शिकणारच की! 

कागदाविना गरिबाचे अडते

अमित शहांनी CAA ची क्रोनॉलॉजी सांगितल्यानंतर कागदाच्या शोधासाठी अनेक मुस्लिम गरीब आणि काही अन्य समाजातल्या मजूर, कारागिरांनीही कागद मिळवण्यासाठी आपल्या गावच्या तसेच सरकारी कार्यालयांच्या चकरा सुरु केल्या आहेत. सरकारी कार्यालयांतील या कामांची गर्दी वाढू लागल्याचे आकडे येऊ लागले आहेत. आता हे कागद सरळ नाही मिळाले तर पैसे देऊन मिळवले जाणार. 

CAA, NPR, NRC विरोधातील आमच्या आंदोलनात एक घोषणा दिली जाते - ‘कागज नहीं दिखाएंगे!’ 

मला प्रश्न पडतो, आमचे हे म्हणणे ऐकणार कोण? 

घोषणेला प्रतिसाद देणारे लोक तरी त्याप्रमाणे वागतील का? वागू शकतील का? ...मला शंका आहे. 

ज्यांच्याकडे विविध प्रकारचे कागद आहेत, असे काही निवडक शिक्षित मध्यवर्गीय कार्यकर्ते जरुर ऐकतील. एकटे पडले तरी लढतील. त्यांचा विवेक ते शाबूत ठेवतील. फेसबुकवर त्यांच्या या एकाकी झगडण्याच्या कहाण्या नोंदवत राहतील. त्यांच्या या झुंजीला माझा सलाम राहील. पण चळवळीत सहभागी सामान्य माणसे असे करतील वा करु शकतील असे वाटत नाही. 

कागदाविना गरिबाचे खरोखर अडते. त्याला कोणी गणतीत धरत नाही. त्याला प्रायव्हसीच्या अधिकारापेक्षा माझी गणना करा ही मुख्य गरज वाटते. विविध योजनांसाठी, पोलिसांसाठी, जगण्यासाठी, मी रहिवाशी आहे, मी अस्तित्वात आहे यासाठीच्या पुराव्यासाठी त्याला ही गणना हवी असते. ‘आधार’ वेळी हेच झाले. काही डाव्या पुरोगाम्यांनी आधार नको, तो आमच्या खाजगीपणावर आघात आहे, सरकार या माहितीचा उपयोग आपल्या विरोधात करेल वगैरे प्रचार केला. या प्रचाराचा या गोरगरीब समूहावर काही परिणाम झाला नाही. त्याने लायनी लावून आधार मिळवले. 

अशावेळी NPR होईल तेव्हा माहिती देऊ नका, हे आवाहन कितपत ऐकले जाईल ही शंका आहे. मे महिन्यात आपल्याकडे ही पाहणी सुरु होईल. शिवाय ती जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे घर मोजणीसोबत होईल. जनगणना तर गरजेची आहे. ती करु नये असे आपण म्हणणार नाही. शिवाय त्यासाठीची माहिती देणे आपल्यावर कायद्याने बंधनकारक आहे. जनगणनेच्या माहितीबरोबर NPR ची माहिती घेतली जाईल त्यावेळी या दोहोंतला फरक सामान्यांना कळणार कसा? नोंदणी करणाऱ्यांनी हा फरक सांगावा, असे आपण म्हणू. पण प्रत्यक्षात तसे होणार नाही, हे आपल्यालाही कळते. 

NPR मधून बहुसंख्य लोक (त्यात दलित, पीडित, गरीब विभाग, मुस्लिम आले) सहीसलामत पुढच्या टप्प्यावर जाणार आहेत. जनगणना आणि NPR करतेवेळी कागद मागितलाच जाणार नाही. म्हणजे कागद नहीं दिखाएंगेची अंमलबजावणी करण्याचा या टप्प्यावर प्रश्नच येणार नाही. संशयित म्हणून जे अडकतील ते लायनीत स्वतःला सिद्ध करायला उभे राहतील. त्यावेळी कागद लागतील. जे लटकतील ते अल्प असतील. त्यांची धाकधूक ‘कोणताही कागद देतो, पण मला सोडवा’ अशी राहील की बाणेदारपणे ते म्हणतील- काहीही होवो. कागज नहीं दिखाएंगे! 

अशावेळी ‘कागज नहीं दिखाएंगे’ हे आपले मध्यवर्गीय कार्यकर्त्यांचे एकाकी चित्कार राहण्याचीच शक्यता अधिक आहे. मध्यमवर्गातले जाणते लोक बाणेदारपणे ‘काहीही होवो’ला तयार राहतील. ‘आधार’ न काढता यातले काही लोक अजूनही टिकून आहेतच. अर्थात त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे अन्य कागद आहेत. शिवाय त्यांच्याकडे कायदेशीर लढाईची ताकदही आहे. 

राज्याने अंमलबजावणीस नकार देण्यासाठी प्रयत्न 

आपले CAA विरोधी आंदोलन बहुसंख्य समाज ढवळून निघण्याच्या अवस्थेत आलेले नाही. त्यासाठीचे व्यापक संघटनही आज आपले नाही. सुट्या मंडळींची प्रसंगोपात आघाडी आपण करत असतो. त्या आघाडीतही समाजाच्या विविध सोडा, केवळ गरीब समूहांच्यापर्यंतही पोहोचण्याची क्षमता नाही. 

राहिला आधार लोकशाहीवादी भाजपविरोधी पक्षांचा. त्यांच्यातही माहितीची निरक्षरता प्रचंड आहे. अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर तत्त्वाचा प्रश्न म्हणून अजिबात तडजोड न करणारे आंबेडकर, नेहरू या पक्षांत आज नाहीत. पण तरीही ते राजकीय पक्ष असल्याने त्यांची हालचाल बिगर राजकीय संघटनांच्या प्रमाणात अधिक परिणामकारक ठरते. CAA, NPR, NRC न राबवण्याचे ठराव काही राज्यांनी केले आहेत. त्याला नक्कीच मोल आहे. या बाबी राज्य सरकारांच्या सहकार्याशिवाय करायच्या तर केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारितील कर्मचारीच कामाला लावावे लागतील. ते किती पुरे पडतील ही शंका आहे. दुसरा मार्ग सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा. या मुद्द्यावर ६-७ राज्ये बरखास्त करण्याचे पाऊन केंद्र सरकार उचलेल का याची मला शंका आहे. त्यांना संघराज्यीय प्रणाली, सांविधानिक नैतिकता वगैरेचे काहीच पडलेले नाही हे खरे. पण एवढे धैर्य ते लगेच करतील असे वाटत नाही. अन्य मार्गांनी धार्मिक, जातीय तणाव वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न राहतील. 

म्हणून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादींनी सरकारवर दबाव आणून या बाबी आम्ही करणार नाही, असा ठराव संमत करण्यासाठी आपण मोर्चेबांधणी करायला हवी. शिवसेनेने केंद्रात CAA च्या बाजूने मत दिले आहे. पण त्यावरुन त्यांना अडवण्याऐवजी NPR आम्ही करणार नाही, एवढ्याला तरी त्यांनी राजी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

दीर्घ पल्ल्याची लढाई 

यापलीकडे, आपली ताकद लक्षात घेता, ती वाढवत अजून आपण काय करु शकतो याचा विचार करायला हवा. 

हरण्याची खात्री असली तरी लढत राहावेच लागेल. हरल्यावर पुन्हा उठू. आपल्या अनुभवातून पुढच्यांना प्रेरणा आणि वाट गवसेल. प्रबोधन करत (विद्यापीठांतील संघर्षरत विद्यार्थ्यांसारख्या पुढे येणाऱ्या विविध घटकांचा) पाठिंबा जमवत लढावे लागेल. ती तयारी आपली हवी. कागद न दाखवण्याचा निर्णय ज्यांना हवा त्यांनी फेसबुकवर जाहीर करावा. ते स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण आपला विवेक फेसबुकवरच्या या कृतीसोबत शांतवू नये. लोकांत उतरुन प्रबोधन व संघर्ष करावा लागेल. लोक ऐकत नाहीत म्हणून लगेच माघार घेऊ नये. दीर्घ पल्ल्याच्या लढाईची तयारी आपल्या मनात हवी. 

केजरीवाल विजयी झाले. शहा-मोदी कंपनीला ही सणसणीत चपराक बसली. पण या विजयाने वर उपस्थित केलेले मुद्दे वा भय संपलेले नाही. ते प्रश्नच केजरीवालांनी उपस्थित केले नव्हते. उलट त्यांना बगल दिली होती. तो त्यांचा डावपेच की त्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांच्याच भूमिकांचा प्रश्न आहे, हे पुढे कळेल. तूर्त हे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. कारण ते बोललेच गेले नाहीत. ‘राज्यात केजरी-केंद्रात मोदी’ हा फॉर्म्युला दिल्लीतल्या जनतेने याआधी अवलंबला आहे. तो पुढेही येऊ शकतो. 

वाढती महागाई, बेरोजगारी आदि आर्थिक-भौतिक प्रश्न सांस्कृतिक-वैचारिक प्रश्नांना भले खाली दाबतील. त्यातून तयार होणाऱ्या असंतोषापायी अजून काही सरकारे भाजपच्या हातून जातील. पण त्यामुळे हिंदू कट्टरपंथीयांच्या मुद्द्यांप्रति जनता निराभास झाली आहे, असा समज करुन घेणे धोक्याचे ठरेल. कोणत्याही क्षणी हे दबलेले निखारे ज्वाळांत परिवर्तित होऊ शकतात. त्यांचा निरास करण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे करतच राहावा लागेल. – अगदी केंद्रातले भाजपचे राज्य गेले तरीही! नेहरु-गांधी-आंबेडकर-मौलाना आझाद यांच्या काळातील सेक्युलर कथ्य (नरेटिव्ह) आज बहुसंख्य समाजमानसात दुबळे झाले आहे, हे मनात पुन्हा पुन्हा अधोरेखित करुया. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मार्च २०२०)