डॉ. सुखदेव थोरातांच्या आजच्या (३० मार्च २०१८) लोकसत्तेतील 'मालमत्ताधारणेतील भयावह विषमता' या लेखातील हे अवतरण व तक्ता पहाः
'२०१३ च्या आकडेवारीनुसार एकंदर मालमत्तांपकी ६६ टक्के मालमत्ता या उच्चवर्णीयांच्या मालकीच्या आहेत, १८ टक्के मालमत्तांवर ओबीसींची मालकी आहे आणि अनुसूचित जातींकडे चार टक्के, अनुसूचित जमातींकडे दोन टक्के, तर मुस्लीम समाजाकडे पाच टक्के मालमत्तांची मालकी आहे. या सामाजिक प्रवर्गाचे लोकसंख्येतील प्रमाण पाहा आणि त्यांच्याकडील मालमत्ताधारणेचे प्रमाण पाहा. त्यात विषमताच दिसून येईल. मालमत्ताधारणेतील या जातीनिहाय विषमतेच्या मागे, उच्चवर्णीयांनाच झुकते माप देणारी जातिव्यवस्था हे महत्त्वाचे कारण आहे.'
देश स्वतंत्र झाल्यापासूनच्या गेल्या ७० वर्षांत प्रगती नक्की झालेली आहे. पण तिचे वाटप हे असे आहे. आदिवासी-दलित वर्गातील काही व्यक्ती पुढे गेल्या. पण समाज म्हणून जुनी उतरंड आर्थिक विकासक्रमात अजूनही तशीच आहे. ही अत्यंत नामुष्कीची बाब आहे. विकासाचे न्याय्य वाटप का झाले नाही? ते कसे करायचे? आर्थिक विषमता अजूनही राहणार असेल तर तिचे सर्व जातींत समान वाटप का नाही? जुनी जातीची उतरंड इथेही कशी काय? ही उतरंड मोडण्यासाठीच आरक्षणाचे धोरण होते. अजूनही ही उतरंड तशीच असेल तर आरक्षणाच्या विरोधकांनी ती मोडण्याचा उपाय सांगायला हवा. आरक्षण हे फक्त शिक्षण, नोकरी व राजकीय प्रतिनिधीत्व यातच आहे. जमीन, इमारती, बँकेतील जमा, शेअर्स आदि संसाधनांना ते लागू नाही. खाजगीकरण-कंत्राटीकरण-विनाअनुदानीकरण या मार्गांनी आरक्षण निरर्थक होऊ लागले आहे. अशावेळी या संसाधनांमध्ये मागास जातींना न्याय्य वाटा कसा द्यायचा? या संसाधनांचे फेरवाटप करायचे का? कसे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत घटना मंजूर होण्याच्या आधल्या दिवशी भारतीय जनतेला उद्देशून शेवटचे भाषण करतात. त्यात ते इशारा देतातः
'२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.'
आज ६७ वर्षांनी बाबासाहेबांच्या या द्रष्टेपणाला अभिवादन करायचे की त्यांच्या या इशाऱ्याकडे गंभीरपणे पाहून तातडीने दुरुस्तीला लागायचे?
...हे वेताळाचे प्रश्न नाहीत, ज्यामुळे राजा विक्रम निरुत्तर होईल. सरकार व समाजातल्या जाणत्यांनी यावर बोलायलाच हवे. आंबेडकरवाद, समाजवाद, भांडवलवाद, झिरप सिद्धांत आदि जी काही तुमची भूमिका असेल त्यातून या भयावह विषमतेला व त्यातील सामाजिक उतरंडीच्या जैसे थे ला काय उत्तर आहे, हे मांडावेच लागेल. मौन बाळगण्याची चैन आता परवडणार नाही.
- सुरेश सावंत
No comments:
Post a Comment