संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगलांचे निमंत्रण रद्द करणाऱ्या भेकड आयोजकांचा धिक्कार!या कृतीचा निषेध म्हणून संमेलनावर बहिष्कार टाकणाऱ्या साहित्यकर्मींचे हार्दिक अभिनंदन!!नियोजित सत्प्रवृत्त अध्यक्ष अरुणा ढेरे यांना त्यांनी अध्यक्षपद नाकारुन ‘सत्’ची बाजू घेण्याचे आवाहन!
__________________________________________
लोकसत्ताकार तसेच अन्य प्रस्थापित मंडळींनीही आपल्या विवेकाला जागून संमेलनावर बहिष्कारच नव्हे तर असा बहिष्कार अन्यांनीही टाकावा यासाठीची मोहीमच सुरु केली हे खूप आश्वासक आहे. प्रत्यक्ष संमेलनात जाऊन बाजू मांडू म्हणणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मी कदर करतो. तथापि, यावेळी अशी भूमिका घेणे हा बोटचेपेपणाच ठरेल. यावेळची घटना इतकी सुस्पष्ट आहे की त्याबाबतची कुठचीच बाजू अस्पष्ट राहिलेली नाही, जी तिथे प्रत्यक्ष जाऊन मांडण्याची गरज आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष सन्माननीय अरुणा ढेरे सत्पवृत्त आहेत. प्रचलित साहित्यिक गट-वादांपासून दूर आहेत हे खरे. पण यावेळच्या घटनेबाबत गप्प राहणे ही सत्प्रवृत्तता खचितच नव्हे. आपल्या अध्यक्षीय भाषणात याचा समाचार घेऊ असे मनाशी ठरवत तोवर गप्प राहणे यावेळी चालणार नाही. हा उशीर यावेळी अक्षम्य आहे. आयोजकांनी नयनतारा सहगलांची माफी मागून त्यांना पुन्हा सन्मानाने उद्घाटक म्हणून बोलवावे; अन्यथा मी संमेलनाची अध्यक्ष राहणार नाही, अशी ठोस भूमिका ढेरे यांनी घेणे गरजेचे आहे.
नयनतारा सहगल यांचे नियोजित उद्घाटकीय भाषण होणे हे मराठी सारस्वताची, महाराष्ट्राच्या प्रगतीशील परंपरेची शान वाढवणारे ठरले असते. हे भाषण आजच्या राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या विचारसरणीला घातक आहे. मराठी संमेलनाला इंग्रजी लेखिका नको या फालतू कारणाच्या आड खरे कारण बहुधा तेच असावे. पुरस्कार वापसी ज्या कारणासाठी सहगलांनी केली ते कारण अजूनही किती उग्र आहे, याचे हे निदर्शक आहे.
नयनतारा सहगलांचे हे भाषण आज सार्वत्रिक झाले आहे. ते संमेलनात होवो न होवो. त्याचा परिणाम ते न होण्याने अधिक होतो आहे. त्यांच्या या भाषणात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वपूर्ण उल्लेख सहगल यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९३६ साली लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. तथापि, त्यांच्या नियोजित भाषणाचा मसुदा पाहिल्यावर प्रतिगाम्यांच्या दडपणामुळे हे मंडळ मागे हटले. त्यांनी बाबासाहेबांचे निमंत्रणच रद्द केले. हे न झालेले भाषण ‘जातिनिर्मूलन’ नावाच्या पुस्तिकेद्वारे कसे अमर झाले याला आजवरचा ८३ वर्षांचा काळ साक्षी आहे. नयनतारा सहगलांच्या या भाषणाला चिरंजिवित्व लाभण्याची ताकद त्याच्या आशयात आहे. त्याचा अधिकाधिक प्रसार नक्की होणार. सूर्याला झाकण्याचे प्रयास नाकाम ठरणार.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
No comments:
Post a Comment