‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना|
मंदिर बनाओ-पर मस्जिद न तोड़ो |
चर्चा से सवाल सुलझाओ|
चर्चा से हल नहीं निकला तो न्यायालय का निर्णय मानो|
दोनो तरफ की धर्मांधता का हम विरोध करते हैं|
देश की एकता अखंड रखने का संकल्प दोहराते हैं|’
१९९२. बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरणाने देश ढवळून निघाला होता. भावना भडकावून सत्तेचे तख्त पटकावण्याचा व क्रमात लोकशाहीविरोधी हिंदू राष्ट्राच्या दिशेने सरकण्याचा तो विखारी डाव होता. मुंबईतले आम्ही पंचविशी-तिशीतले युवक-युवती आमच्या परीने यात उतरलो. वरील मजकुरावर सह्यांची मोहीम सुरु केली. चौकात-वस्त्यांत-स्टेशनबाहेर उभे राहून गाणी, भाषणे व नंतर सह्यांचे आवाहन असा हा कार्यक्रम असे.
संघपरिवारातल्या संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावरील या कार्यक्रमात कुठे कुठे वाद घालायचे. पण त्यामुळे व्यत्यय असा कुठे येत नव्हता. सामान्यजनांचा पाठिंबाच मिळायचा. त्याची कारणे होती. एकतर आम्ही मंदिर नको असे म्हणत नव्हतो. ते बांधा, पण मशीद तोडू नका. चर्चेने प्रश्न सोडवा. दांडगाईने नको. चर्चेने प्रश्न सुटत नसला तर न्यायालयाचा निर्णय माना. दुसरे म्हणजे आम्ही दोन्हीकडच्या धर्मांधतेचा विरोध करत होतो. मुस्लिमांची बाजू घेऊन केवळ हिंदूंना झोडपणारे अशी आमची प्रतिमा नव्हती. देशाची एकता जपू पाहणारे होतो. सामान्यपणे दंगा-धोपा न करता, जुलुम-जबरदस्ती न होता प्रश्न सुटावा, सगळ्या धर्मांनी गुण्यागोविंदाने इथे नांदावे ही बहुसंख्यांची भावना असते. त्यांच्या सद्भावनेला, विवेकाला आमचे आवाहन असे. मंदिर व्हावे अशी मनीषा असलेले हिंदू तसेच बाबरी तुटू नये वाटणारे मुसलमान या दोन्ही विभागांतून आम्हाला पाठिंबा मिळत असे. या चौकात बघे असलेल्यांतले काही लोक पुढच्या चौकांत आमच्यातले एक होऊन सह्या गोळा करत असत. त्या काळात दूरदर्शनवर गाजलेल्या ‘उड़ान’ मालिकेच्या दिग्दर्शिका व इन्स्पेक्टर कल्याणीच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या कविता चौधरीही या मोहिमेत सहभागी झाल्या. पुढे बराच काळ त्या आमच्यासोबत होत्या.
या मोहिमेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातले लोक जोडल्या जाऊ लागले. हजारो सह्या गोळा झाल्या. या भांडवलावर लोकशाहीवादी नेत्या-संघटना-पक्षांना आम्ही भेटू लागलो. यातूनच ‘राष्ट्रीय एकता समिती’ हा धार्मिक तेढ माजवणाऱ्या शक्तींच्या विरोधातला व्यापक एकजुटीचा मंच तयार झाला. समितीच्या बहुतेक बैठका दादरला ‘श्रमिक’ या लाल निशाण पक्षाच्या कार्यालयात होत असत. समाजवादी वसंतराव खानोलकर, कम्युनिस्ट कॉ. धुमे, काँग्रेसी प्रभाकर कुंटे अशा मंडळींचा या बैठकांत पुढाकार असे. राजकीयदृष्ट्या विविध छावण्यांत; परंतु, सेक्युलॅरिझमच्या मुद्द्यावर एका मंचावर या मंडळींना आणण्यात आम्हाला यश आले होते. ‘राष्ट्रीय एकता समिती’ हे नाव वसंतराव खानोलकरांनी सुचवले. सह्यांची मोहीम सुरु करण्याआधीही या मंडळींना आम्ही भेटून एकजुटीचे आवाहन करत होतो. तथापि, गाडे फारसे हलत नव्हते. सह्यांच्या मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर हे गाडे हलू लागले. वर ‘भांडवल’ हा शब्द त्यामुळेच वापरला आहे.
४ डिसेंबर १९९२ ला ‘राष्ट्रीय एकता समिती’च्या बॅनरखाली ‘आझाद मैदान ते महाराष्ट्र हायस्कूल मैदान’ असा उलट्या दिशेने व्यापक एकजुटीचा मोठा मोर्चा झाला. अन् एक दिवसाच्या अंतराने ६ डिसेंबरला मशीद पाडली गेली.
६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. आम्ही चैत्यभूमीला चाललो होतो. दादरला गोमंतकच्या समोर बाबासाहेबांचा व रामाचा फोटो शेजारी शेजारी ठेवून त्यांना हार घालून सुधीर फडके दोहोंचा जयजयकार करताना दिसले. परतताना कळले की त्याचवेळी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली जात होती.
...मग दंगली भडकल्या. माणसे मारली गेली. नुसतीच मारली गेली नाहीत; क्रौर्याचे विविध प्रयोग झाले.
शब्दशः रक्ताची थारोळी ओलांडत व हंबरडे ऐकत धारावी-शिवाजी नगरमध्ये आम्ही हिंडत होतो, सांत्वनाचे लंगडे प्रयत्न करत होतो. मदत गोळा करत, वाटत होतो. बेपत्ता नवरे-मुलांना हवालदिल होऊन शोधणाऱ्या बायांना सहाय्य करत होतो. जळलेली घरं उभी करण्यासाठी आधार देत होतो. दोन्ही समाजांना हात जोडून आपापल्या घरी निर्धोक मनाने परतण्याचे आवाहन करत होतो. लालकृष्ण अडवाणींची विष ओकत जाणारी रथयात्रा, बाळासाहेब ठाकरेंची जहरी भाषणे, सामना-नवाकाळने आगीत ओतलेले तेल यांनी अपेक्षित डाव साधला होता.
विद्वेषाने माणसे किती हिंस्र होतात, याचे आम्ही साक्षी होतो. धर्मांध शक्तींचा डाव यशस्वी झाला होता. संख्येने अधिक असूनही पुरेशा एकजुटीअभावी व वेळेवारी हस्तक्षेप आणि लोकजागरण न केल्याने सेक्युलर शक्तींनी मार खाल्ला.
आमची सह्यांची मोहीम थांबली. आता आम्ही अपरिहार्यपणे मदत कार्यात व मने सांधण्याच्या कामात जुंपले गेलो.
आम्ही धारावीत होतो. धारावी हा कष्टकऱ्यांचा ‘मिनिभारत’. पण धर्मभेदाच्या विषाने भाषा-प्रदेशभिन्नता लोपून हिंदू व मुसलमान असे दोन तट पडले. वर्षानुवर्षे परस्परांना सोबत करणाऱ्यांना परस्परांचे भय वाटू लागले. धारावी कोळीवाड्यात एक बैठक झाली. सिनेअभिनेते फारुख शेख या बैठकीला होते. तसे ते आमच्या अनेक बैठकांना न बोलावता येत. सामान्यांप्रमाणे एका बाजूला बसत. यावेळी त्यांना बोलण्याचा आग्रह झाला. ते बोललेही. त्यांचे नेमके शब्द आता आठवत नाहीत. पण आशय, त्यांची कळकळ, देहबोली मनात कोरली गेल्यासारखी स्मरणात आहे. धारावीतल्या आतल्या प्रवासात हिंदू-मुस्लिमांना परस्परांच्या वस्त्या पार कराव्या लागतात. दंगलीत असा प्रवास करणाऱ्यांचे जीव घेतले जात होते, ही वस्तुस्थिती होती. फारुख शेख याचाच संदर्भ घेत बोलले- ‘रास्ता काटते समय पीठ में छुरा घोपने का डर..यह इन्सान की बस्ती है या जंगल है?..कहाँ गयी वो इन्सानियत..?’
एका भागात तर लोकांनी रातोरात भिंत बांधली होती. ‘ते’ हल्ला करतात हे कारण होते. हिंदू-मुसलमानांची ही स्थानिक पण फाळणी होती. मदतकार्याच्या सोयीसाठी राष्ट्रीय एकता समितीच्या कामाचे विविध भाग आम्ही केले होते. आम्हा काहींच्याकडे मने सांधण्याचे काम होते. ही भिंत नष्ट करणे हे आमच्यासमोर आव्हान होते. दोन्हीकडच्या लोकांशी दोन-तीन दिवस सतत बोलणी करत राहिलो. हळूहळू भावनिक तीव्रतेचा ज्वर कमी होत गेला. अखेर भिंत पाडायला लोक राजी झाले. पण म्हणाले – तुम्ही संघटनेच्या लोकांनी भिंत पाडा. आम्ही नकार दिला. म्हणालो, “तुम्ही बांधलीत. तुमच्याच हाताने पाडा.” आम्ही आग्रही राहिलो. अखेर ज्यांनी ती बांधली त्यांनीच ती पाडली. असे छोटे छोटे हस्तक्षेप आम्ही बरेच केले.
मदतकार्याची घाई संपली आणि मुलांची शिबिरे, महिला, रेशन, अशा विविध मार्गांनी पुढची आठ-नऊ वर्षे आम्ही धारावीत तसेच अन्यत्रही क्रियाशील राहिलो. राष्ट्रीय एकता समिती हा अनेकांचा सामायिक मंच होता. मात्र हळूहळू राजकीय पक्ष-संघटनांचे लोक निवडणुका लागल्यावर आपापल्या वाटांनी वेगळे झाले. अनेक संघटनांनी आपापल्या भागातल्या कामावर लक्ष केंद्रित केले. मूळ सह्या घेण्यात पुढाकार घेणारे आम्ही लोकच अधिक टिकलो. आम्हीही नंतर लोकांच्या भौतिक प्रश्नावरील कामांच्या आघाड्यांत गुंतून गेलो. संविधानाला आव्हान उभ्या करणाऱ्या संघपरिवाराच्या विरोधात एकवटलेला ‘संविधान परिवार’ क्रमशः विरत गेला.
धर्माचा वापर करुन फॅसिस्ट राजवट आणू पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधात काँग्रेससह सर्व लोकशाहीवादी पक्षांची एकजूट झाली पाहिजे, असे लाल निशाण पक्षाचे कॉ. यशवंत चव्हाण सतत प्रतिपादत व त्यासाठी खटपट करत होते. मात्र काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू या काहींच्या भूमिकेमुळे, तर निवडणुकीतल्या जागावाटपांत हवा तो हिस्सा मिळत नसल्याच्या काहींच्या आक्षेपामुळे ही एकजूट प्रभावीपणे कधी आकाराला आली नाही. सर्व पुरोगामी, लोकशाहीवादी शक्तींच्या एकजुटीने व सहकार्याने राष्ट्र सेवा दलाच्या शाखा जागोजाग सक्रिय करायला हव्यात, ही सूचनाही ते वारंवार मांडत. भाई वैद्य आणि इतर काही समाजवादी नेत्यांसमवेतच्या जाहीर सभेतच त्यांनी एकदा ही सूचना केली होती. त्या सूचनेसही पुढे गती मिळाली नाही.
बाबरी मशीद पडल्यानंतरच्या दंगलींनंतर आमच्या दोन सहकाऱ्यांनी ‘एक लढाई हरलोय आम्ही’ अशा शीर्षकाची एक कविता केली होती. ही केवळ एक लढाई हरलोय, पुढच्या जिंकणार आहोत, त्यासाठी नव्या उमेदीने लढणार आहोत, असे त्यातून प्रतीत होत होते. बाबरी मशीद पाडली तरी निवडणुकांच्या राजकारणात २०१४ पर्यंत भाजपला स्वतःच्याच ताकदीवर तसे मोठे यश मिळाले नाही, हे खरे. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आले होते. पण ते इतरांच्या मदतीने. तथापि, त्यांच्या विचारांना मिळणारा लोकांतील पाठिंबा वाढतच राहिला. २०१४ ला ते सत्तेत आले, त्याला काँग्रेसविषयीची खरी आणि बनवलेली नाराजी तसेच मोदींनी दाखवलेले विकासाचे स्वप्न कारण होते. त्यांची वैचारिक भूमिका हा त्यातील कळीचा भाग नव्हता, हेही खरे. पण त्यांनी, मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे चिवट, सखोल व विस्तृत जाळे विणले होते, त्याचा ही मते गोळा करायला प्रचंड उपयोग झाला. या आघाडीवर आम्ही सतत हरत आलो आहोत. २०१९ च्या विजयाला आधीचे सर्व घटक आणि दरम्यान वाढलेली मोदींची कणखर नेता ही प्रतिमा कामास आली. राक्षसी बहुमताने त्यांची सत्ता पुढच्या पाच वर्षांसाठी अधिक घट्ट झाली.
आमच्यासहित अनेक पुरोगामी मंडळींनी सेक्युलॅरिझम, धर्मांधताविरोध या मुद्द्यांवर रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात जी सक्रियता दाखवली होती, ती पुढे ठेवली नाही. धारावीतील काही विभागांत आमच्या कितीतरी आधी संघाने जम बसवला होता. आम्ही धारावीत असतानाही ते टिकून होते. आम्ही गेल्यावरही ते तिथेच राहिले. वाढले. नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात एक सत्र मी पाच-सहा महिन्यांपूर्वी धारावीत घेतले. आयोजक बाजूने, उपस्थितांतले अनेक तटस्थ, तर एक विभाग तीव्रतेने विरोधात हा अनुभव मला त्यावेळी आला. हे मला अनपेक्षित होते. धारावीत मी सक्रिय राहिलो नाही. पण आमची अनेक पुरोगामी सहकारी, मित्रमंडळी वेगवेगळ्या प्रकारे लोकांशी संबंध ठेवून आहेत. पण तेही कमी पडलेत असाच याचा अर्थ आहे. बहुभाषिक, मुख्यतः दलित-मागासवर्गीय असलेल्या धारावीने करोनाला तोंड देण्याची एक दिशा दाखवली. पण जातीय विष उतरवायचा तेथील पॅटर्न काय असू शकतो, ते आम्हाला अजून अवगत झालेले नाही. खरं म्हणजे, धर्मविद्वेषाचे विष कसे पसरते त्याचा पॅटर्न तिथे अभ्यासता येईल. त्यातूनच कदाचित आम्हाला अपेक्षित पॅटर्न कळू शकेल.
...हे सगळे ५ ऑगस्टचा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ऑनलाईन पाहत असताना मला आठवत होते. तेव्हापासून सतत आणि बरेच आठवते आहे. ‘बाजार’मधल्या ‘करोगे याद तो हर बात याद आएगी’ या गजलेसारखे. एरवी ही गजल खूप वैयक्तिक, नाजूक आठवणींचा तळ ढवळून काढणारी. पण हल्ली आमच्या वैचारिक-राजकीय चळवळीच्या माघारीच्या आठवणी तीव्रतेने उकलणारी.
सह्यांच्या मोहिमेवेळी आम्ही चर्चेने प्रश्न सुटला नाही तर न्यायालयाचा निर्णय माना असे सांगत होतो. आता न्यायालयाचा निर्णय झाला. तो असा होईल, असे कल्पनेतही नव्हते. म्हणजे, मूळ राम मंदिरच होते. ते बाबराने पाडले, त्या जागी मशीद बांधली याचे पुरातत्व संशोधनातून पुरावे मिळतील. त्या पुराव्याआधारे न्यायालय राम मंदिराच्या बाजूने निर्णय देईल, अशी शक्यता आम्ही धरुन होतो. पण तो आधारच न्यायालयाने घेतला नाही. रामाची मूर्ती तिथे आहे, तिची पूजा होते एवढ्यावरच निकाल दिला. मंदिर वहीं बनाएंगे या मोहिमेला तसेच मशीद उद्ध्वस्त करण्याच्या हेतूला एक प्रकारे मान्यताच या निकालामुळे मिळाली. मुसलमानांना अगदीच डावलले असे वाटू नये म्हणून अयोध्येतच दूर अंतरावर मशिदीसाठी पाच एकर जमीन सरकारने द्यावी असा आदेश न्यायालयाने दिला.
भारतीय संविधानाचे पायाभूत तत्त्व असलेल्या सेक्युलॅरिझमला कायम विरोध करणाऱ्या संघपरिवाराच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पाला भरभक्कम नैतिक वैधता न्यायालयाच्या निकालाने मिळाली. यातूनच संकल्पपूर्तीचा क्रम दामटावयाला चालना मिळाली. राम मंदिराचा ट्रस्ट बनवून तो मार्गी लावण्यापर्यंतचे काम सरकारचे होते. या नियोजित राम मंदिराचे ट्रस्टी, पुजारी यांच्या विनंतीवरुन पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यापर्यंतही एक वेळ चालू शकले असते. वास्तविक सरकारी पदावरील कोणीही अशा धार्मिक कार्यक्रमात जायला नको. पण लोकांच्या धार्मिक भावनांचा (मतांसाठी) आदर करण्याची परंपरा राजकारणी मंडळींनी आता प्रस्थापितच केली आहे. ती बहुपक्षीय आहे. केवळ भाजपने केलेली नाही. त्यामुळे त्या परंपरेपर्यंत मोदी-योगी सरकारने थांबणे ठीक झाले असते. पण थेट पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वागताध्यक्ष म्हणजेच यजमान आणि या यजमानांनी आमच्या ‘विचार परिवाराचे प्रमुख’ म्हणून ज्यांना तिथे जाहीरपणे संबोधले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सन्माननीय पाहुणे हे काय दर्शवते? संघाचा आधुनिक मूल्यांवर आधारलेल्या भारतीय राज्यघटनेला तिच्या निर्मितीपासून विरोध राहिला आहे. मनुस्मृतीचा घटनेला आधार हवा, अशी त्यांनी जाहीर मागणी त्यावेळी केली होती. भूमिपूजनाच्या कार्यक्रमातही भागवतांनी ब्राम्हणांची महती अधोरेखित करणाऱ्या मनुस्मृतीतील श्लोकाचे उच्चारण केले.
मशीद पाडण्याचा दिवस घटनाकार बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन. मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही नेमका निवडला गेला. काश्मिरच्या विधानसभेला विचारात न घेता ३७० कलम रद्द करुन व काश्मिरचे विभाजन करुन भारतीय संघराज्य प्रणालीला धाब्यावर बसवलेल्या दिवसाचा वाढदिवस. जिच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा दावा सरकारने केला ती काश्मिरी जनता व प्रमुख नेते अख्खे वर्ष जेरबंद आहेत.
राज्यकारभारात कोणत्याही धर्माचा संबंध नसेल, देशाचा कोणताही अधिकृत धर्म नसेल, नागरिकांना त्यांना हव्या त्या धर्माची उपासना करण्याचे, धर्म न मानण्याचे स्वातंत्र्य असेल, सर्व धर्मांप्रती सरकार समभावाने वागेल हे आपल्या सेक्युलॅरिझमचे मूळ स्वरुप. म्हणूनच राष्ट्रपती या नात्याने सोरटी सोमनाथ मंदिराच्या मूर्तिप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात आपण भाग घेऊ नये, त्यामुळे चुकीची वहिवाट पडेल, अशी विनंती राजेंद्र प्रसादांना नेहरुंनी केली होती. त्यांनी ती मानली नाही. पुढे ती वहिवाट पडली. सोरटी सोमनाथचा ट्रस्ट वेगळा होता. त्याचे पैसे सरकारी नव्हते. मात्र आता राम मंदिर भूमिपूजनापासूनच सरकारी प्रकल्प होतो आहे. मोदींनी या वेळच्या भाषणात आणि राष्ट्रपती कोविंद यांनी १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणात राम मंदिर हा देशाच्या अभिमानाचा मानबिंदू असल्याचे जाहीर केले आहे. मशिदीच्या प्रारंभ सोहळ्याला तुम्ही जाल का, या प्रश्नाला योगी आदित्यनाथ यांनी एक योगी व हिंदू असल्याने मी जाणार नाही, असे उत्तर दिले आहे. सेक्युलॅरिझमला अधिकृतपणे मूठमाती देण्याचा व बहुसंख्याक हिंदूंचा वरचष्मा असलेल्या (सुहास पळशीकरांच्या रास्त शब्दांत) ‘दुसऱ्या प्रजासत्ताकाचा’ भारतात आरंभ होतो आहे.
सरकारचा हा व्यवहार गंभीर चिंतेचा आहे. पण याहून गंभीर चिंतेची बाब आहे ती सर्वसामान्य लोकांना हे काही उमजत नाही, ही. कोणाही सामान्य हिंदू माणसाला यात काहीच वावगे वाटत नाही. या देशात बहुसंख्य हिंदू आहेत. मग तो हिंदूंचा देश का नको? हिंदू बहुसंख्य असलेल्या देशाचे पंतप्रधान हिंदूंच्या मंदिराच्या भूमिपूजनाला गेले तर ते चुकीचे कसे? हिंदूंचा वरचष्मा म्हणजे अन्य धर्मीयांशी वाईट वागणे नव्हे. अन्य धर्मीय लोकही या (हिंदूंच्या) देशात गुण्यागोविंदाने राहावेत, हे त्याला मान्य असते. ही भावना जर दलित, आदिवासींपासून ब्राम्हणांपर्यंत स्वतःला हिंदू समजणाऱ्यांच्या मनात रुजली असली तर भारताचा पाकिस्तान व्हायला अवधी कितीसा राहिला? पाकिस्तानचा अधिकृत धर्म इस्लाम आहे. अन्य धर्मीयांना उपासनेचे स्वातंत्र्य तिथे आहे. फाळणीवेळी धर्म हा आधार पाकिस्तानने घेतला. भारताने नाही. आता त्या भारतालाही तो निकष लावला जाणार आहे. माफीवीर म्हणून सावरकरांची संभावना करण्यात पुरोगाम्यांनी जरुर समाधान मानावे. पण त्यांचा द्विराष्ट्राचा सिद्धांत भारतात प्रत्यक्षात येऊ घातला आहे. घटना थेट न बदलता हे सर्व होत आहे. सरकार, प्रशासन, न्यायालय, पोलीस आणि जनता असे सर्व अंकित असताना प्रत्यक्ष घटना बदलायला वेळ तो कितीसा लागणार?
अशा एका ऐतिहासिक वळणावर, कड्यावर आपण उभे आहोत. हे ज्यांना कळत नाही, त्यांचे ठीक. त्यांना कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. पण आपण लोकशाहीवादी, सेक्युलर, पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी व एकूण संविधानवादी लोकांचे काय?
मुळातून सगळे उभे करावे लागणार आहे. भाजपविरोधी राजकीय जुळणी, लोकांच्या दैनंदिन प्रश्नांवर झगडणे आणि त्याचवेळी आधुनिक भारताच्या पायाभूत मूल्यांबाबत लोकांच्या मनांची मशागत हे नित्याचे काम असणार आहे. एकप्रकारे शांतपणे, चिकाटीने नोहाची नौका उभारायचे हे काम आहे.
अशावेळी मित्रशक्ती कोणाला म्हणायचे, त्यांच्याशी मतभेदासहित सहमतीच्या मुद्द्यांवर एकजूट कशी उभारायची याबद्दलची खूप स्पष्टता आणायला लागणार आहे. खूप उदार, सहिष्णू समावेशकता अंगी बाणवावी लागणार आहे. परस्पर मतभेदाच्या प्रकटीकरणाचे, एकमेकांच्या आदराच्या स्थानांच्या चिकित्सेची काळ-वेळ पाळावी लागणार आहे. अन्यथा वैचारिक अभिनिवेश, स्पष्टवक्तेपणा यांची चैन मित्र गमावणारी ठरेल. आज एकेक मित्र जोडणे लाखमोलाचे आहे. याविषयी पुढे कधीतरी सविस्तर लिहिता येईल. या आधीही लिहीत आलो आहे. या लेखाच्या दृष्टीने काही संदर्भ संक्षेपात देतो.
अण्णाभाऊ साठे व लो. टिळक यांची अनुक्रमे जन्म व स्मृती शताब्दी यावर्षी होती. त्यांच्या मोठेपणाच्या तुलनेबाबतची चर्चा दरवर्षीच होते. यावर्षी जास्तच झाली. टिळकांचे एक अंग अगदी प्रतिगामी. त्याचे त्यांच्या लेखनातच पुरावे मिळतात. इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सामाजिक सनातन्यांची ताकदही एकवटावी ही अपरिहार्यता त्यामागे होती, असे समर्थनही त्याबद्दल केले जाते. आगरकर व टिळक या मित्रांत यावरुन असलेली तीव्रताही आपल्याला ठाऊक आहे. एक खरे की टिळकांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसदारांपैकी सनातनी मंडळींचा प्रवाह हिंदुत्ववादी शक्तींच्या बरोबर गेला. मात्र दुसरा प्रवाह गांधीयुगात राष्ट्रीय चळवळीत राहिला. या राष्ट्रीय प्रवाहातले टिळकांना मानणारे लोक लोकशाहीवादी, जात, धर्म, लिंग भेदांच्या विरोधी आहेत. ते टिळकांच्या सनातनी व्यवहाराचा वारसा चालवत नाहीत. त्याचे समर्थनही करत नाहीत. टिळकांचे किंवा कोणाही महान व्यक्तींचे ऐतिहासिक संदर्भात मापन केले नाही तर आपल्याच समजुतीत उणेपणा राहतो. आणि ही चिकित्सा जर योग्य भाषेत, आब राखून केली नाही, ती अवमानना करण्याच्या दिशेने गेली तर त्याने आजच्या मित्रांच्या मनात अंतराय तयार होतो. जे सेक्युलर म्हणून आपल्या छावणीत असतात. टिळकांना मानणारे त्यांच्या भावलेल्या अंगाबद्दल कृतज्ञ असतात. त्यांच्या समग्र मांडणीशी सहमत असतात असे नव्हे. किंवा ती त्यातल्या सगळ्यांना ठाउक असते असेही नाही. डाव्यांना त्यांची समाजवादाविषयीची, सोव्हियतविषयीची आस्था माहीत असते. म्हणून त्याबद्दलची जाहीर कृतज्ञता ते व्यक्त करतात. अशी कृतज्ञता व्यक्त करणारे प्रतिगामी किंवा विरोधक किंवा टाकाऊ ठरत नाहीत. खुद्द अण्णाभाऊंनी टिळकांना अभिवादन करणारा गण रचला आहे – ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करुनिया गर्जना / लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना..’
‘श्यामच्या आई’ वर केलेल्या मिम्सच्या निमित्ताने अलिकडे समाजमाध्यमांवर वादंग झाला. आम्ही ज्या तळच्या समाजविभागात वाढलो, ज्या सांस्कृतिक वातावरणात घडलो त्यांना श्यामची आई भावत नाही, असे काहींनी म्हटले. त्यावर आम्ही ‘बलुतं’ समजून घेतो, तर तुम्हाला ‘श्यामची आई’ समजून घ्यायला अडचण का यावी? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. ‘श्यामची आई’ न भावणारे कथित मागास विभागातले व ‘बलुतं’ समजून घेणारे कथित उच्चवर्णीय विभागातले. मात्र हे दोघेही पुरोगामी वर्तुळातले. श्यामच्या आईचा काळ, त्यावेळचे समाजवास्तव, त्याच्यातून मार्ग काढण्याच्या तिच्या प्रेरणा, मागास असो वा उच्चवर्णीय दोहोंतील ‘आई’ पणाची प्रत, समाजाला पुढे नेणारे साहित्य कोण कोणत्या जातीतला ते प्रसवतो त्यावर अवलंबून असते का? ...ही चर्चा करायला लागेल. तूर्त, ‘श्यामची आई’ हे जवळपास त्यांचे आत्मचरित्रच लिहिणारे साने गुरुजी आपण कोणत्या छावणीत घालणार? ते निःसंशय पुरोगामी, दलित-पिडितांबद्दल कणव असणारे, त्यांच्याबाजूने ठामपणे लढणारे. पंढरपूरचे विठोबाचे मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठीचा त्यांचा सत्याग्रह ही उच्च कोटीची कृतिशीलता आहे. अशावेळी श्यामच्या आईवरील अभिप्रायाद्वारे एकप्रकारे साने गुरुजींचे ब्राम्हण्य काढण्याचा प्रकार त्यांना मानणाऱ्या कथित उच्चवर्णीय पुरोगामी कार्यकर्त्यांना, खरं म्हणजे इतरांनाही खंतावणाराच ठरणार ना!
अवमानना प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापुढे माफी मागायला नकार देऊन सजा स्वीकारण्याच्या प्रशांत भूषण यांच्या निर्णयाला पुरोगामी वर्तुळातून खूप पाठिंबा मिळतो आहे. अशावेळी कर्णन या दलित समाजातील न्यायाधीशांना अवमानना प्रकरणातच सजा झाली, तेव्हा तुम्ही कोठे होता? अशी निवडक बाजू का घेतली जाते? खुद्द प्रशांत भूषण यांनी कर्णनवरील आरोपांचे समर्थन केले होते त्याचे काय? अशी विचारणा केली जाते आहे. अशी विचारणा होणे हे स्वाभाविक आहे. त्याची चर्चा जरुर व्हायला हवी. पण ज्यावेळी या देशात संविधान बुडवून हिंदू राष्ट्राचा हुकूमशाही प्रकल्प राबविला जातो आहे आणि त्यात न्यायालयांच्या अशा निकालांनी मदत होते आहे, अशावेळी त्या विरोधात आवाज उठवणारे प्रशांत भूषण आपल्या छावणीतले मानायचे की नाही? जुन्याची नोंद देऊ, पण आता आम्ही ठामपणे प्रशांत भूषण यांच्या पाठीशी राहू हीच भूमिका योग्य राहील.
ज्या ऐतिहासिक व्यक्तींशी कमी अथवा अधिक विचारभिन्नता आणि त्यापायी संघर्ष आहे, तो यथावकाश करत राहावा. मात्र त्यावरुनच त्यांच्या आताच्या अनुयायांचे संपूर्ण मापन करण्यात आपली फसगत होते. गांधीजींनी एका टप्प्यावर वर्णव्यवस्थेचे समर्थन केले. आज त्यांचे अनुयायीही त्याचे समर्थन करत आहेत का, हे पाहिले पाहिजे. टिळकांच्या बद्दलही तेच. या दोहोंचेही अनुयायी जर लोकशाहीवादी लढ्याला पाठिंबा देत संघपरिवाराच्या फॅसिस्ट हिंदू राष्ट्र प्रकल्पाच्या विरोधात ठामपणे लढत असतील, तर ते आपले मित्र, सहकारी, कॉम्रेडच आहेत! सावरकरांच्या विज्ञानवादाच्या वारसदारांशी विज्ञानवादावर सहमत होऊ; पण ते हिंदू राष्ट्र प्रकल्पाचे घटक आहेत. ते आमचे लढ्यातील मित्र होऊ शकत नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणारे, त्यांचा नामजप करणारे भाजपला धार्जिणे असतील, सत्तेच्या तुकड्यासाठी त्यांच्या सोबत जात असतील, तर केवळ ते मागास विभागातील आहेत म्हणून आपले कसे होऊ शकतील?
...बरेच आठवले. बरेच लिहिले. आता थांबतो. शेवटपर्यंत वाचलेत, त्याबद्दल धन्यवाद!
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, इ अंक, सप्टेंबर २०२०)
No comments:
Post a Comment