Tuesday, January 4, 2022

हर हर मोदी (?)


गेल्या महिन्यात (मोदींनी काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचे उद्घाटन केले त्या आधी पंधरा दिवस) आम्ही आठवडाभर वाराणसीत होतो. देशपातळीवरच्या एका प्रशिक्षण शिबिरात संविधानाच्या विविध पैलूंबाबत बोलण्यासाठी आम्हाला निमंत्रित केले गेले होते. गंगेच्या काठावर अत्यंत रम्य व शांत अशा जे कृष्णमूर्ती फाऊंडेशनध्ये आमचा निवास व प्रशिक्षण स्थळ होते. हा परिसर राजघाट. तिथून पुढे विविध घाट रांगेत आहेत. दिवसभर सत्रे असत. मात्र सकाळी व सायंकाळनंतर रात्री उशीरापर्यंत आम्ही फिरु शकत होतो.

देवदिवाळी (त्रिपुरी/कार्तिक पौर्णिमा) हा इथला मोठा उत्सव. देशभरच्या भाविकांची मोठी गर्दी असते. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. गंगेच्या काठावर त्यांनी लावलेल्या पणत्यांची (दीपदान) दुसरी गंगा वाहत असते. आरास, आतषबाजी नेत्र दीपवून टाकत असतात. हा सर्व भव्य, विलोभनीय देखावा आम्हाला नावेतून हिंडत पाहता आला. त्यानंतर एके दिवशी अस्सी घाटावरची गंगा आरती, अंत्यविधी होणारा मणिकर्णिका घाट तसेच अन्य बरेच घाट, काशी विश्वनाथाचे मंदिर व त्याचा पूर्ण होत आलेला कॉरिडॉर, त्यात घेरलेली मशीद (‘काशी मथुरा बाकी है’ मधली), घाटाकडे जाणाऱ्या तसेच बनारसच्या अन्य भागातल्या गल्ल्या, अशाच एका गल्लीतली संत कबीर यांची मूळ गादी (म्हणजे घर), बुद्धाचे पहिले प्रवचन (धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ते प्रसिद्ध आहे) जिथे झाले ते बनारसपासून जवळच असलेले सारनाथ, तेथील सम्राट अशोकाने बांधलेला स्तूप तसेच विहारांचे अवशेष, भारताने राजमुद्रा म्हणून स्वीकारलेला चार सिंह असलेला प्रसिद्ध अशोक स्तंभ...असे बरेच काही पाहता आले. बनारसची कचोरी, वेगवेगळ्या मिठाया, दूध यांचा आस्वाद घेता आला.

कोणत्या परिसरात, वातावरणात आम्ही लोकांशी बोलत होतो, त्याचा हा कॅनव्हास. तो अर्थातच मर्यादित आहे. जे बोललो, निरीक्षणे केली, अंदाज बांधले त्याचे सर्वसाधारणीकरण करणे योग्य होणार नाही, हे उघडच आहे. मात्र पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेले, प्राचीन व आजही महत्वाचे असलेले उत्तर प्रदेशातील हे शहर काय विचार करते, हा संदर्भही दुर्लक्षून चालणार नाही.

कोरोनाने थैमान घातलेला, सामान्य तसेच पद्मश्री-पद्मभूषण उपाध्या मिळालेली माणसे त्यात गमावलेला हा भाग आता बिनमास्कचा आहे. आपण मास्क लावला तर लोक काय म्हणतील, असे वाटावे अशी स्थिती. ४० वर्षांपूर्वी बिहारमधून इथे आलेल्या एका रापलेल्या चेहऱ्याच्या, बहुधा दलित किंवा तत्सम अतिपिछड्या वर्गातील रिक्शावाल्याशी झालेला हा संवाद :

“कोरोनाने आपके रोजगार को चौपट किया होगा ना?”

“हां साब. उस वक्त बहुत परेशानी हुई. पर अब ठीक है.”

“नोटबंदी की वजह से आपको बहुत तकलिफ हुई होगी?”

“हां. वैसे तो हुई. पर दीवार में चुनवा गयी नोटे मोदीजी ने बाहर निकलवायी. कितना काला पैसा था! सब बाहर आ गया.”

“फिर भी महंगाई कितनी बढ़ गयी है...”

“वो तो होगी ही ना! इतना कुछ मोदी जनता के लिए कर रहे हैं. वो कहां से पैसा लाएंगे? कुछ अच्छा करना है, तो खर्चा लगेगाही. महंगाई तो बढ़ेगीही. ”

“क्या किया मोदीजीने?”

“आप ये देख नहीं रहे हो? ...ये नये रास्ते मोदी आने के बाद हुए है. घाट, मंदिरों की मरम्मत उन्होनेही करवाई. ये जगह इतनी साफसुथरी पहले कभी भी नहीं थी.”

पुढचा संवाद एका दुसऱ्या रिक्शावाल्याशीच. पण हा रिक्शावाला शिबिरार्थींच्या व्यवस्थेत असलेला. सद्भावना असलेला. संवेदनशील. त्याला हे प्रशिक्षणाचे काम भावले होते. ही मंडळी खूप चांगले काम करतात. त्याला मदत म्हणून नेहमीच्या दरांपेक्षा कमी दरात व बोलावू तेव्हा तो उपलब्ध राहत असे. हा ओबीसी किंवा मध्यम जातीतला असावा. मूळचा बनारसचा. मात्र भूमिहिन. रिक्शा हेच उत्पन्नाचे साधन.

महागाई, नोटबंदी, कोरोना, रस्ते यावरची त्याची मते आधीच्या रिक्शावाल्यासारखीच. काहीही फरक नाही. दोघे एकमेकांशी ठरवून बोलल्यासारखे. त्यामुळे संवादातले वेगळे मुद्दे इथे पाहू.

“कल हमने काशी विश्वनाथ का कॉरिडॉर देखा. आजकी स्थिती में इतना खर्च करने की जरुरत क्या थी?”

“यहां के पहलेवाले हालात नहीं देखे हैं आपने. कितनी गंदगी, अव्यवस्था थी यहां! ये जगह सिर्फ बनारसवालों की नही है. पुरे देश के हिंदुओं का यह अभिमान है. अब तक किसी सरकार ने यह काम नही किया जो मोदीजी ने कर दिखाया है. ...उनके लिए (म्हणजे मुसलमान) तो अनेक देश हैं, हमारे लिए तो यही एक है.”

“भय्या, आपके पड़ोसवाले मुसलमान यहीं पैदा हुये, यहीं मरेंगे. कौन जानेवाला है दूसरे देश. यह हम सब का देश है.”

“हां. वो तो सही है.”

मग मी काशी विश्वनाथ मंदिराजवळच्या मशिदीचा विषय काढला.

“हमने कल देखा, वो मस्जिद तो पुरी घिरी हुई है. क्या अब भी यह मसला है?”

“देखो साब. आपकेही घर में घुस कर आपकी दीवारे कोई तोड़ता है, तो आप क्या करोगे?”

(औरंगजेबाने मंदिर तोडून तिथे मशीद बांधली हा आक्षेप.)

“इतिहास में जो कुछ हुआ, वो सच है या झूठ, जो भी हो, उसकी वजह से आज का माहोल क्यों बिगाड़ना? और अभी तो १५ अगस्त १९४७ में ऐसी विवादित वास्तुओं की जो स्थिती थी, वोही बरकरार रहे, ऐसा तय हुआ है.”

“वो तो ठीक है. पर लोगों के मन में तो यह बात रहेगी ही ना!”

मी दुसरा मुद्दा काढला.

“यह जो लव्ह जिहाद के नाम से, गोहत्या का कारण बताकर जो मुसलमानों के साथ हिंसा होती है, उसका क्या करे?”

तो थोडा थांबला. म्हणाला, “वो ठीक नहीं है. लेकिन दो तरफा कारण होते है.”

यावर त्याला अधिक बोलायचे नव्हते. आमचा रिक्शाचा प्रवास सुरु होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, “गांधीजीने एक बात ठीक नही की.”

माझी उत्सुकता ताणली. विचारले, “कौनसी?”

तो उत्तरला, “बटवारे के समय उन सबको (म्हणजे मुसलमान) यहां से पाकिस्तान भेजना चाहिए था. यह झगड़े की जड़ ही नही रहती.”

हे ऐकून मी सर्द झालो. हा माणूस काही कडव्या, अंगावर येऊन बोलणाऱ्या ‘भक्तगणा’तला नव्हता. त्याचा हिंदूंवरही राग होता. वेगळ्या कारणासाठी. मात्र संदर्भ याच रांगेतला. तो म्हणाला, “उनके (म्हणजे मुसलमान. त्याने एकदाही थेट मुसलमान म्हटले नाही.) वोट एक तरफा गिरते है. और हमारे वोट बंट जाते हैं.” हा सर्वसामान्य हिंदू त्याची व्यथा, खंत मोकळेपणाने मांडत होता.

ज्या अनेकांशी बोललो, त्यातले हे दोन प्रातिनिधिक. एकच माणूस मोदींच्या विरोधात बोलणारा मिळाला. पण तो अखिलेश यादवच्या समाजवादी पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता होता. एका यादव नावाच्या तरुणाला त्याचे यादव नाव लक्षात घेऊन सपाबद्दल (म्हणजे समाजवादी पार्टी) विचारले, तर तो म्हणाला, “यह दंगे भड़काने वाली पार्टी है.”

आमच्या शिबिरात शिबिरार्थींच्या विविध जिल्ह्यातील अनुभव कथनाचे एक सत्र होते. हे शिबिरार्थी वाराणसीच्या सभोवतालच्या चार जिल्ह्यांत चार गट करुन गेले होते. वेगवेगळ्या थरातल्या लोकांशी भेटणे, अनौपचारिक गप्पा मारणे, त्यायोगे तिथली सामाजिक-राजकीय स्थिती, दृष्टिकोन समजून घेणे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या वृत्तांत कथनात आमच्या या अनुभवाला दुजोराच मिळाला. लोकांना महागाई, करोना, नोटबंदी याचे फार काही वाटत नव्हते. नोटबंदीचे तर समर्थनच होते. वरच्या समजल्या जाणाऱ्या जातींत तर मोदींना पाठिंबा होताच. पण खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींतही मोदींबद्दल आस्था होती. हा माणूस संसार-परिवारवाला नाही. तो चोरी-लबाडी किंवा भ्रष्टाचार कोणासाठी करेल, हा त्यांचा प्रश्न होता.

हे सगळे ऐकताना योगी आदित्यनाथनी काय केले, ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हा मुद्दाच कोणाच्या लेखी नव्हता. उत्तर प्रदेशचे पालक मोदीच आहेत, ही भावना होती. “बनारसची माणसे मुंबईला नोकरीला का येतात? इथे उद्योग-कंपन्या मोदींनी का सुरु केल्या नाहीत?” असा एकाला प्रश्न केला त्यावेळी त्याचे उत्तर होते – “उसका कारण यहां के बाहुबली. कोई कंपनी अगर यहां आयी तो ये बाहुबली उसको सताते है. कंपनीवाले क्यों रुकेंगे यहां?” म्हणजे दोष मोदींचा नाही. मोदींची इच्छा आहे, प्रयत्न आहेत. पण ते सफल होऊ न देणारे अन्य कोणी आहेत.

मोदींनी काशी कॉरिडॉरच्या उद्घाटकीय भाषणात धर्माबरोबरच ऑप्टिकल फायबरचे जाळे आम्ही कसे विणत आहोत हा विकासाचा शंखही फुंकला. पण त्याहून वेगळ्या कारणासाठी हे लोक मोदींना मानतात. ते कारण आहे, हा माणूस आम्हा हिंदूंच्या अस्मितेचा-स्वत्वाचा रक्षक आहे. तो जे काही करतो आहे, त्यात यश येईल, अपयश येईल; पण तो खराखुरा आमचा माणूस आहे. काशी कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी दिवसातून त्याने किती वेळा कपडे बदलले, ते किती महागडे होते, ५५ कॅमेरे कशी त्यांची छबी टिपत होते, तिजोरीत खडखडाट होत चाललेला असताना किती कोटी खर्च या कार्यक्रमावर झाला...ही सगळी टीका ‘आमचा माणूस’, ‘हिंदूंच्या स्वत्वाचा रक्षक’ प्रतिमेच्या तुलनेत फिकी पडते. गल्ल्यांचे पुरातनत्व, मंदिरांचे प्राचीनत्व कॉरिडॉरच्या बांधकामात चिणले गेले हे खरे. पण संबंधितांना भरभक्कम नुकसान भरपाई दिली गेली. (मोदींच्या जवळच्या भांडवलदारांनी यात मोठी साथ केली, त्यात वावगे काय? ) या गल्ल्यांतून म्हाताऱ्या माणसांनी, इतर काही कारणांनी ज्यांना चालणे कठीण जाते अशांनी घाटावर येणे, गंगेत स्नान करुन मग काशी विश्वनाथाचे दर्शन घेणे हे खूप जिकीरीचे होते. आता गंगेत स्नान करुन थेट बाबा विश्वनाथाला भेटता येते. ही बाब किती महत्वाची आहे हे ईश्वरपूजेशी, तीर्थस्थळांशी देणेघेणे नसणाऱ्यांना कळणे कठीण आहे. मोदी म्हणतात त्याप्रमाणे परंपरा व आधुनिकता यांचा संगम या कॉरिडॉरमध्ये आहे. त्यात धंदाही आहे. अर्थात, श्रद्धा व धंदा ही जुनीच गोष्ट. मोदींनी त्यास अत्याधुनिक केले. पण लोकांची सोय किती झाली! तीर्थस्थळी येणारे लोक (यातले भिकारी, अतिगरीब वगळू. ते तुलनेत कमी असतात.) सोयींसाठी खर्च करायला तयार असतात. त्यांना बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी जो वेळ लागायचा, जी गैरसोय सहन करावी लागायची, ती आता निश्चित कमी होणार आहे. अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले ३००० चौरस फूटांचे मूळ मंदिर आता ५ लाख चौरस फुटाच्या सुसज्ज, भव्य प्रांगणात दिमाखात उभे आहे. (आणि हिंदूंवरील आक्रमणाचे प्रतीक, औरंगजेबाने बांधलेली मशीद बापुडी होऊन कॉरिडॉरच्या भव्य भिंतींच्या मागे कशीबशी टिकून आहे.) ...हे अहिल्याबाईंनंतर मोदींचेच कर्तृत्व!

आम्ही प्रसिद्ध गंगा आरती बघायला अस्सी घाटावर एके संध्याकाळी गेलो. आरतीच्या लांबट आयताकृती मंचावर पूजेच्या वस्तूंची नेटकी मांडणी. आरती करणाऱ्या तरुणांचे आखीव-रेखीव वेश व समलयीतल्या हालचाली. एका सुरात शंख फुंकणे. सगळे प्रभावित करणारे. गंगेतून तसेच घाटावरुन सगळ्यांना या हालचाली दिसाव्यात म्हणून आरती करणारा चमू सर्व दिशांनी फिरणे. आरतीला आलेल्यांसाठी मांडलेल्या खुर्च्या. आरती संपल्यावर मिळणारा प्रसाद. आणि भक्तांनी देणग्या, दान देणे वगैरे. सगळे शिस्तीत. हा रोजचा परिपाठ.

एक शंका होती. हिंदूंच्या आरत्या इतक्या लयबद्ध, एका सुरात सिनेमातच दिसतात किंवा रेकॉर्डवर ऐकू येतात. प्रत्यक्ष होणाऱ्या आरत्या अशा नसतात. पण असेल इथली खास तयारीची परंपरा असे मी समजलो. आरत्यांचे हे मंच एकाचवेळी चार ठिकाणी होते. मी जिथे होतो, तिथे त्याच घाटावर मागे एक हनुमानाचे मंदिर होते. तिथूनही आरतीचा आवाज येत होता. ती आरती या आरतीबरोबर सुरु झाली आणि या आरतीबरोबर संपली. पण या दोन आरत्यांचे मिश्रण रसभंग करत होते. आमच्यातल्या एकांनी आरती संपल्यावर हनुमानाची आरती करणाऱ्यांना (ते चारच लोक होते. देऊळही अगदी लहान होते.) विचारले, “हा काय प्रकार आहे?” त्यावर या हनुमान भक्तांनी गंगा आरतीवाल्यांवर बरेच तोंडसुख घेतले. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे – गंगा आरती ही जुनी परंपरा. पण अलीकडच्या काही वर्षांपासून मोदींनी जपानी पंतप्रधानांना इथे आणल्यापासून त्याचे व्यावसायिकीकरण सुरु झाले आहे. त्यांना दाखवण्यासाठी आरतीचे सुबक, सुंदर नाट्य रचले गेले. तेव्हापासून या रोजच्या आरत्यांची संख्या वाढली आहे. याचे कंत्राटदार आहेत. ते तरुण मुलांना प्रशिक्षण देऊन हा कार्यक्रम सादर करतात. हे कोणी भक्त नाहीत. तो त्यांचा व्यवसाय झाला आहे. त्याचा निषेध म्हणून गंगा आरतीच्या वेळी हे हनुमान भक्त आपली आरती करत असतात. नंतर आम्ही पाहिले. गंगा आरती परफॉर्म करणारी मुले आरती संपल्यावर एका खोलीत गेली. झकपक, किनारीची धोतरे-कुर्ते-उपरणी नाटकातल्या कलाकारांसारखी त्यांनी उतरवली. बाहेर येऊन चहा घेऊन, मुठीत शंकराला वर्ज्य नसणारा पदार्थ चोळत ती निघून गेली. उद्या संध्याकाळी परतण्यासाठी.

(नंतर कळलेला एक मुद्दा - इथल्या पंड्यांचा दावा आहे, काशीच्या घाटांवर आरती करण्याचा अधिकार केवळ आम्हाला आहे. त्यामुळे इतर व्यक्ती, संस्था यांना गंगा आरती करण्यास मनाई करावी म्हणून त्यांनी अशा आरत्यांसमोरच आंदोलने केली. अलिकडे घाटावरच्या या आरतीला येणाऱ्या भाविकांची,पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरतीवाल्यांची कमाईही वाढली आहे. हे भांडण त्या कमाईसाठी आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढला आहे तो असा – गंगा आरतीच्या नावाखाली घाटावर होणारे अतिक्रमण व मनमानी चालणार नाही. एका घाटावर एकाच व्यक्ती किंवा संस्थेला गंगा आरतीच करण्याचा परवाना मिळेल. तो एक वर्षासाठी असेल. त्यासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य असेल.)

...पण यामुळे काय फरक पडतो? हे सर्व पडद्यामागे. लोकांना गंगेच्या विशाल पात्राकाठचा हा सुरेल, झगमगीत परफॉर्मन्स अधिकची आध्यात्मिक किक देत असेल, तर त्याला लोकांनी का म्हणून नावाजू नये?

१३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करताना गुलामीच्या न्यूनगंडातून देश बाहेर पडत असल्याची द्वाही नरेंद्र मोदींनी फिरवली. या उद्घाटनाच्या निमित्ताने एक महिनाभर भाजप बनारसमध्ये कार्यक्रम करणार आहे. त्यावर अखिलेश यादव यांनी टोमणा मारला- ‘शेवट आला की माणसे काशीला येऊन राहतात.’

...मला प्रश्न पडला, या विधानाचा लोकांवर काय परिणाम होईल?

लोकांशी भेटायचे, बोलायचे, त्यांची मानसिकता समजून घ्यायची हे आमचे ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही घाटांवर लोकांशी बोलत, भेटत हिंडत होतो. आमच्या एका सहकाऱ्याला एक माणूस भेटला. तो इथे कशासाठी आला हे विचारल्यावर त्याने थेट उत्तर दिले- “मरायला.” तो आणि त्याची बायको दोघे इथे मरायला आले होते. कारण इथे मेल्यावर मोक्ष मिळतो, ही धारणा. बायको मेली. तिला मोक्ष मिळाला. त्याला आठ वर्षे झाली. तेव्हापासून हा माणूस इथेच आहे. आपल्या मरणाची म्हणजेच मोक्षाची वाट बघत.

इथल्या अंत्यविधीच्या घाटांवर अहोरात्र चिता धडधडत असतात. ‘मसाण’ सिनेमा याच घाटांवर शूट केलेला. हे अंत्यविधी करणाऱ्या डोंब या अस्पृश्य समाजातील शिक्षित युवकाचा होणारा कोंडमारा दर्शवणारा. मणिकर्णिका घाटाची दुरुस्ती पेशव्यांनी केली आहे. त्याची नोंद करणारा दगडी फलक तिथे आहे. त्यावरचा एक उल्लेख असा आहे – ‘मणिकर्णिका घाट पर अनवरत प्रज्ज्वलित चिताओं की अग्नि काशी में मृत्यु में भी एक उत्सव का एहसास कराती है.’ अंत्यविधी करणारे इथले डोंब समाजातले लोक सांगत होते – “इथे दिल्ली, मुंबईहून प्रेते दहनासाठी आणली जातात.” यामागे ही मोक्षाची धारणा आहे. तो मुक्तीचा उत्सव आहे. म्हणूनच बहुधा अन्यत्र स्मशानात दिसतो तसा शोक इथे दिसत नाही.

यामुळेच, अखिलेशच्या टोमण्याचा त्याला अपेक्षित परिणाम पोहोचेल याची मला खात्री वाटत नाही. हे टर उडवणे सर्वसामान्य हिंदूंच्या पचनी पडणे कठीण आहे.

मोदींच्या काशीतील भाषणाआधी राहुल गांधींनी जयपूरच्या भाषणात हिंदू व हिंदुत्वाचा भेद मांडण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी हिंदुपणावर दावा करुन मोदींच्या विद्वेषी, खुनशी हिंदुत्वापासून सहिष्णू, समावेशक हिंदूपण वेगळे काढले. हा मुद्दा महत्वाचा आहे. पण आताच्या वातावरणात तो कसरत वाटू शकतो. मुस्लिम राजवटी आणि स्वातंत्र्यानंतर मुसलमानांचे लांगूलचालन व छद्म धर्मनिरपेक्षता यांचे संगोपन करणारी नेहरु-गांधी घराण्याची सत्ता यांमुळे इथल्या हिंदूचे स्वत्व हरपले होते, तो गुलामीच्या न्यूनगंडात जखडला गेला होता. त्याचे स्वत्व जागवून त्याला गुलामीच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्याची दमदार ऐतिहासिक कामगिरी मोदींनी केली, ही त्यांची प्रतिमा घट्ट होते आहे. अशावेळी मोदींच्या हिंदुत्वापासून अलग होऊन राहुल गांधींचे सर्वसमावेशी हिंदूपण स्वीकारायला आजच्या घडीला किती लोक पुढे येतील, ही शंकाच आहे.

राहुल गांधींना आपले म्हणणे, कथ्य (narrative) गंभीरपणे विकसित करावे लागेल. आपल्या राजकारणाची आधारशिळा नक्की करावी लागेल. अन्यथा ते प्रासंगिक विचारांचे सपकारे ठरतील. त्यातून समग्र चित्र तयार होणार नाही. गांधींजी सर्वधर्मसमभावी सनातनी हिंदू होते. त्याचवेळी या देशावर बहुसंख्याक धर्मीयांचा नव्हे, तर भारतातील सर्वांचा समान अधिकार असेल, यावर ते अढळ होते. (म्हणूनच तर हे मंजूर नसणाऱ्यांनी त्यांची हत्या केली.) मी गाईला पवित्र मानतो. लोकांनी स्वतःला पटून तिची हत्या थांबवायला हवी. मात्र ते आज इतरांचे खाद्य असल्याने गोवंश हत्याबंदी कायद्याला त्यांचा पाठिंबा नव्हता. नेहरु ईश्वरवादी नव्हते. मात्र त्यांनी भारतीय संस्कृतीचा शोध घेऊन अनेक विविधतांना सामावणाऱ्या समृद्ध भारतीयत्वाची ओळख जनतेत रुजवली. सेक्युलर शासनाशी हे अजिबात विसंवादी नव्हते. त्यांना कधी या सेक्युलरपणाशी तडजोडही करावी लागली नाही. जिथे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून असे प्रसंग आले, तिथे त्यांनी हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केले. भले ते यशस्वी झाले नसतील. पण त्यांची भूमिका सुसंगत होती. पक्षातल्या लोकांचे तसेच जनतेचे ते त्याबाबत शिक्षण करत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मी प्रथम व अंतिमतः भारतीय आहे’ असे घोषित करुन या भारतीयत्वाच्या ओळखीला धर्म, प्रदेश, जात, भाषा आदि अस्मितांनी छेद जाता कामा नये, हे बजावले. आपल्या भारतीयत्वाच्या ओळखीला व तिच्या व्यवहाराला आधार देणारे, मार्गदर्शन करणारे संविधान रचले. त्याद्वारे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची हमी दिली. गांधी, नेहरु, आंबेडकर यांच्या या भूमिकांनी जी फळी तयार होते, तिच्यावर राहुल गांधींनी भक्कम पाय रोवून आपला विचार विकसित व प्रसारित करायला हवा. हे लांब पल्ल्याचे आहे. पण तेच करावे लागेल. यास शॉर्टकट नाही.

सेक्युलर, पुरोगामी म्हणवणाऱ्या शक्तींचे शॉर्टकट, बेसावधपणा आणि धिम्या गतीने, पण चिवटपणाने गेली ९७ वर्षे संघ परिवाराने केलेले काम यांमुळे मोदी आजची मुसंडी मारु शकले आहेत. बहुसंख्य हिंदू ज्या देशात आहेत, ते हिंदूंचे राज्य असण्यात गैर काय? इतर धर्माच्या लोकांना आम्ही काही त्रास देत नाही. त्यांनीही गुण्यागोविंदाने (पण हिंदू प्रमुख आहेत याचे भान) ठेवून नांदावे, ही भावना सर्वसामान्य हिंदूंत खोलवर गेली आहे. हे हिंदू स्थानिक हिशेबानुसार मत कोणत्याही पक्षाला देत असोत. त्याने या भावनेत फरक पडत नाही. आपल्या देशाच्या सेक्युलरपणाला हे मोठे आव्हान तयार झाले आहे. विविध जुळण्या, फेरजुळण्या, आर्थिक असंतोष, हिंदीवरुन तीव्रता असणारा दक्षिण-उत्तर भेद आदिंची नीट मोट बांधली गेल्यास मोदी, भाजप कदाचित निवडणुकांत हरतीलही. पण हे आव्हान त्यामुळे संपत नाही. दुःखाचे, कष्टाचे हरण करणारा या अर्थाने ‘हर हर महादेव’ हा घोष काशीच्या घाटांवर दुमदुमत असतो. मोदींनीही तो आपल्या काशीतील भाषणावेळी वारंवार दिला. काही एका प्रमाणात हिंदू मानसिकतेत ‘हर हर मोदी’ होऊ लागले आहे. ते रोखले गेलेच पाहिजे.

हे आव्हान पेलण्याचा समग्र कार्यक्रम विकसित करावा लागेल. तोवर वा त्या दिशेने जाताना आध्यात्मिकतेचा, हिंदू तसेच सर्व संप्रदायांतील पुढे जाणाऱ्या परंपरांचा आब राखत, त्यांत संवाद घडवत, या परंपरांतील घातक बाबींना समान रीतीने विरोध करत भारतीयत्वाचा जागर मांडणे आपल्याला शक्य आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(मुक्त संवाद, जानेवारी २०२२)

No comments: