गूगलच्या नकाशात एका मोठ्या भूभागातील छोटे ठिकाण आकार वाढवून (zoom in) आपण पाहतो तेव्हा त्यातील अनेक बारीक तपशील आपल्यासमोर येतात. थोरांच्या चरित्राचेही तसेच असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र चरित्र आपण वाचलेले असते. त्यात चळवळीच्या निमित्ताने भेटी दिलेल्या, काही कार्यक्रम घेतलेल्या शहरांचे, गावांचे उल्लेख येतात. तथापि, त्यांचे विस्तृत वा सखोल विवेचन, वर्णन तिथे नसते. ते शक्यही नसते. मात्र असे तपशील कळले तर बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या भूमिकांविषयी, आंदोलनाविषयी, संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या ताकदीविषयी अधिक जाणता येऊ शकते. ही उणीव भरुन काढण्याचे प्रयत्न अभ्यासकांनी, त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी करावयाचे असतात. पण तसे होतेच असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या महाराष्ट्रातील विविध भागांतील संचाराविषयी तेथील मंडळींनी तपशील गोळा करुन असे काही लिहिल्यास बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, तेथील जनतेच्या प्रेरणा व स्पंदनांविषयी बऱ्याच बाबी उजेडात येऊ शकतील, अधिक ठळक होतील. हे घडू शकते, अगदी प्रभावीपणे घडू शकते, याचा नमुना म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचे ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. पुस्तकाच्या शीर्षकाखाली अधिक स्पष्टतेसाठी ते नोंदवतात – ‘रमाई आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले सोलापूर.’ सोलापुरातील बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारे हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे. वयाच्या ऐंशिव्या वर्षी कोविडच्या काळात दत्ता गायकवाड हा प्रकल्प हाती घेतात व विविध संदर्भ शोधत, अभ्यासत तडफेने पूर्ण करतात, हे विशेषच म्हणावे लागेल आणि त्यासाठी त्यांना धन्यवादच द्यावे लागतील.
पुस्तकाच्या परिचयादाखल काही बाबींची नोंद इथे करत आहे.
१९२४ ते १९५४ या कालखंडातील सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतील वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातील विविध भागांतील या नोंदी आहेत. पहिल्या प्रकरणात बार्शीच्या भेटींविषयी लिहिताना १९२४, १९३७ व १९४१ अशा तीन भेटी बाबासाहेबांनी बार्शीला दिल्याचे ते सांगतात. २४ साली बाबासाहेब ३३ वर्षांचे युवक होते. मात्र त्याही वयात दलित जनतेने त्यांना आपल्या उद्धारकर्त्याचे स्थान दिले होते. ‘बाबासाहेब कोण हाय – दलितांचा राजा हाय’ ही घोषणा प्रत्येक भेटीवेळी लोक देताना दिसतात. आपल्या उद्धारकर्त्याला बघण्यासाठीची लोकांची आतुरता, त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून लोकांची साधनांची कमतरता असलेल्या त्या काळातली धडपड यांचे चित्रदर्शी वर्णन या पुस्तकात आहे. बाबासाहेब येणार आहेत हे कळल्यावर त्या गावातील लोक आपल्या अन्य गावांतील सोयऱ्याधायऱ्यांना आमंत्रित करत असत. बाबासाहेब कितीही विरोध करत असले, तरी लोक पाया पडायला धडपडत असत. समता सैनिक दलाचा बंदोबस्त असतानाही एक बाई एका स्वयंसेवकाच्या पायातून शिरली व बाबासाहेबांच्या चरणांवर पडली. मरिआईच्या कट्ट्यावर बाबासाहेबांनी सभा घेतल्याची कोंडाबाई कांबळे या वयोवृद्ध बाईंची आठवण लेखक नोंदवतात. एके ठिकाणी बाबासाहेबांना उतरण्यासाठी योग्य जागा नव्हती म्हणून शाळेतला एक वर्ग स्वच्छ केला जातो. तिथे गादी, पलंग घातला जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी दलित समाजातील तरुण पहिलवान चहुबाजूंनी रात्रभर पहारा देतात. त्या काळात लोकांच्या बाबासाहेबांच्या प्रति काय भावना आहेत, याचा अंदाज आपल्याला असतो. पण त्याचे हे तपशील वाचल्यावर आपणास त्याची अचंबित करणारी प्रचिती येते.
मोठ्या चरित्रात छोट्या घटना व त्यातील मानवी संबंध फारसे व्यक्त होत नाहीत. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई गरोदर असताना त्यांची प्रकृती खालावली होती. हवापालटासाठी मुंबईच्या बाहेर नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी सोलापुरातील बावी येथे रमाई सहकुटुंब राहिल्या होत्या. सत्यशोधकी विचारांच्या वालचंद कोठारींनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केले होते. त्या वसतिगृहात रमाई उतरल्या होत्या. निंगप्पा ऐदाळे हे आधी शाहू महाराजांकडे असलेले बाबासाहेबांचे सहकारी वसतिगृहाची व्यवस्था पाहत असत. त्यांची पुतणी गंगुबाई या रमाईंच्या सहवासात होत्या. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात रमाईंविषयीच्या या काळातील आठवणी लिहिल्या आहेत. त्यातील एक अवतरण लेखकांनी या पुस्तकात दिले आहे. इतिहास लेखनाचे हे स्रोत गायकवाडांनी उजेडात आणले आहेत. अन्यथा ते अंधारातच गुडूप झाले असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य चळवळीचे विरोधक आणि निजामाचे हस्तक होते, हे दोन आरोप आजही हितसंबंधी मंडळी करत असतात. हे दोन्ही आरोप बिनबुडाचे आहेत, हे बाबासाहेबांच्या भूमिकांचे वस्तुनिष्ठ परिशीलन करणाऱ्यांना लक्षात येते. या पुस्तकात २२-२३ फेब्रुवारी १९४१ च्या सोलापुरातील कसबे तडवळे येथे झालेल्या महार मांग परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातील काही उतारे आहेत. त्यातील एक खाली देत आहे. त्यावरुन या आरोपांचा फोलपणा आपल्याला सहज ध्यानात येतो. या परिषदेत बाबासाहेब म्हणतात -
“निजाम हा आपल्या मातृभूमीचा शत्रू आहे. ही गोष्ट अस्पृश्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हिंदी संघराज्यात सामील होण्याला निजामाचा विरोध आहे. ...त्याबद्दल त्याची गय करता कामा नये. तसेच निजाम हा अस्पृश्यांचा आणि अस्पृश्यांच्या मातृभूमतीचा शत्रू आहे. म्हणून हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्यप्रिय दलितांनी हैद्राबाद संस्थान हिंदी संघराज्यात सामील करण्यासाठी झटावे.”
अशा परिषदांमध्ये व्यापक धोरणासंबंधी तसेच स्थानिक प्रश्नासंबंधीचे ठराव होत असत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या प्रेरणेबरोबरच शिक्षण, संघटन व राजकारण यांची अपरिहार्यता समजून सांगत. त्या त्या वेळच्या ऐरणीवर आलेल्या (उदा. महार वतन खालसा करण्याची गरज) मुद्द्यांविषयी सविस्तरपणे समजावत असत. वैज्ञानिक दृष्टी असलेला नवा माणूस घडविण्यासाठी जुनाट अंधरुढींवर ते प्रहार व त्याचे प्रात्यक्षिक करत असत. या परिषदांच्या वेळी गोसावी, पोतराज, माळकरी, जटाधारी यांनी आपापल्या अंगावरच्या माळा, आभरान, भगव्या कफन्या स्टेजजवळच्या खड्ड्यात टाकून त्यावर रॉकेल ओतून त्यांचे दहन केल्याचे प्रसंग लेखकाने चितारले आहेत. देवदासींनी आपल्या जटा कापून त्यांना जाळल्याचेही प्रसंग यात आहेत. या परिषदांवेळी प्रबोधनात्मक जलसे होत. या जलशांत काही ठिकाणी स्टेजवर महिला सहभागी झाल्याचीही नोंद या पुस्तकात आहे. पाण्यासाठी अस्पृश्यांची स्वतंत्र विहीर बांधली जाते. तिला ‘आंबेडकर बावडी’ नाव पडते. या विहिरीचे उद्घाटन बाबासाहेब करतात. त्यांच्या हातून पाणी पिण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. हाही प्रसंग लेखकाने नोंदवला आहे. बाबासाहेबांच्या विचार-प्रेरणेची ऊर्जा माणसाचे माणूसपण कसे जागे करते त्याची कैक उदाहरणे सोलापुरातील या हकिगतींत आढळतात.
येवल्याला १९३५ साली धर्मांतराची घोषणा होण्यापूर्वी त्याबाबतचे सूतोवाच कितीतरी आधी सोलापुरात बाबासाहेब करतात. सोलापूरची मिल मालकाने बंद केल्याने खाजगी संपत्तीच्या अधिकारासंबंधीची पहिली घटना दुरुस्ती होते. गाडगे महाराज आजारी असताना भेटायला आलेल्या बाबासाहेबांना आपली पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा शैक्षणिक कामासाठी दान करतात. अशा अनेक घटनांची नोंद या पुस्तकात आहे.
बाबासाहेबांसाठी सर्वस्व अर्पण करणारे, चळवळीसाठी विविध मार्गांनी सहकार्य करणारे दलित व सवर्ण सहकारी हे आंबेडकरी चळवळीचे वैशिष्ट्य राहिले आहे. सोलापुरातील अशा सहकाऱ्यांचे पुस्तकात प्रसंगाप्रसंगाने उल्लेख, वर्णने येतातच. त्याचबरोबर लेखकांनी शेवटी त्यावर खास प्रकरणच लिहिले आहे. अशा सहकाऱ्यांची सविस्तर माहिती त्यात आहे. मोठ्या चरित्रात ठळक नावे येतात. बाकी असंख्य कार्यकर्ते विस्मृतीत जातात. स्थानिक चळवळीच्या इतिहासाची नोंद करणाऱ्या अशा पुस्तकांतून त्यांचा यथोचित परिचय देणे ही त्यांच्याप्रतिची कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले बाबासाहेबांचे जवळचे सहकारी जिवप्पा ऐदाळे अखेरपर्यंत निष्कांचन होते, हे इथे आपल्याला कळते. सोलापुरातील बाबासाहेबांच्या समकालीनांमध्ये वालचंद कोठारी, निंपप्पा ऐदाळे, हरिभाऊ तोरणे, उद्धव शिवशरण, जनार्दन सोनकांबळे, जी. आर. देशपांडे, दादासाहेब व भालचंद्र मुळे, एन. टी. बनसोडे, जी. डी. जाधव, हणमंतू सायन्ना यांची विस्तृत नोंद लेखकांनी केली आहे. जी. डी. जाधवांची एक हकिगत इथे कळते. महाडच्या संग्रामातील एक प्रमुख नेते अनंतराव चित्रे यांच्या घरी जेवणाच्या पंगतीत त्यांची कन्या जाधवांच्या नजरेस पडते. ते तिला मागणी घालतात. सगळ्यांना आनंद होतो. त्यांचा विवाह चळवळीतून झालेला आंतरजातीय विवाह होता.
पुस्तकाच्या परिचयाच्या अखेरीस येताना बाबासाहेबांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य सोलापुरातातील भेटींतही कसे दिसते, हे लक्षात घेणे उद्बोधक ठरेल. बाबासाहेब कमालीचे लोकशाहीवादी, विचार स्वातंत्र्यवादी होते. मतभिन्नता असलेल्यांचा दुस्वास नव्हे, तर त्यांचा आदर करणे, मात्र त्याचवेळी आपली मते पातळ न करता रोखठोक मांडणे हे बाबासाहेबांचे खास वैशिष्ट्य होते. बाबासाहेबांच्या या गुणामुळेच तर त्यांना त्यांच्याशी अनेक बाबतींत असहमती असणारेही भेटीचे निमंत्रण आग्रहाने देत असत. सोलापुरील अशा तीन भेटी लेखकांनी नोंदवल्या आहेत.
त्यातील एक, बार्शीच्या महात्मा गांधी छात्रालयाचे अ. दा. सहस्रबुद्धे यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्या बोर्डिंगला बाबासाहेबांची भेट. ही आठवण सहस्रबुद्धे यांनी लिहून ठेवली आहे. ते लिहितात – “बाबासाहेबांनी प्रथम मला माझे नाव विचारले. मी सहस्रबुद्धे असे सांगितले.” त्यावर बाबासाहेब काय म्हणाले त्याची नोंद ते करतात – “म्हणजे तुम्ही ब्राम्हण आहात तर! ब्राम्हण लोकांत माझ्याबद्दल फार गैरसमज आहेत. ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत. माझ्या चळवळीत अनेक ब्राम्हण्यरहित ब्राम्हण आहेत. ब्राम्हण्यवृत्ती असलेल्या सनातनी ब्राम्हणांबद्दल मात्र मला मनस्वी चीड आहे.”
बाबासाहेब सहस्रबुद्धेंना विद्यार्थ्यांविषयी, त्यांच्या वागणुकीविषयी विचारतात. त्यावर सहस्रबुद्धे सांगतात – “बोर्डिंगमधील महार विद्यार्थ्यांवर आपल्या विचारांचा अत्यंत प्रभाव आहे. हिंदू धर्माचे सण, उपवास, प्रार्थना या बाबी त्यांना अजिबात पसंत नाहीत. आषाढी, कार्तिकी या एकादशीच्या दिवशी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भाजीभाकरीचे जेवण आम्ही देतो व मांग, चांभार विद्यार्थ्यांना फराळाचे साहित्य देतो. आश्रमीय प्रार्थना महार विद्यार्थ्यांना पसंत नसते म्हणून सर्वांच्या संमतीने वंदे मातरम ही प्रार्थना बोर्डिंगमध्ये होते. सूतकताई मुलांच्या इच्छेवर ठेवली आहे. विद्यार्थ्यांवर बळजबरीने कोणतीही गोष्ट लादली जात नाही. अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून मी जास्त काळजी घेतो. विद्यार्थी शिकावेत, शहाणे व्हावेत आणि शिक्षणानंतर त्यांनी योग्य वाटेल तो सामाजिक, राजकीय विचार स्वीकारावा हे येथील बोर्डिंगचे वैशिष्ट्य आहे.”
सध्याचे हिजाब प्रकरण आठवून पहा. सर्वसमावेशी सेक्युलर धोरण काय असावे याची १९३४ सालची ही नोंद आहे. ती मुद्दाम सविस्तर दिली. आंबेडकर व गांधीवादी या दोहोंतल्या संवादातले हे मूल्य आपण आज गमावत आहोत. धूसर करत आहोत.
दुसरी भेट आहे, १४ जानेवारी १९४६ रोजीची. बाबासाहेबांच्या आगमनाप्रीत्यर्थ मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापुरातील सावरकर मंडळाने तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात बाबासाहेब सहभागी झाले. तिसरी भेट एम. एन. रॉय यांच्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सोलापुरातील कार्यालयास भेट.
गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट या तिन्हींशी बाबासाहेबांचे मतभेद किती तीव्र होते हे जगजाहीर आहे. अशावेळी या कोणालाही अस्पृश्य न मानता त्यांच्याशी माणूस म्हणून संवादी राहण्याची बाबासाहेबांसारख्या महामानवाची ही भूमिका आजच्या परमत असहिष्णुतेच्या वास्तवात खास अधोरेखित करण्याची गरज आहे.
बाबासाहेबांच्या चळवळीचा आपापल्या जिल्ह्यातील मागोवा घेण्याची प्रेरणा या पुस्तकाने नक्कीच संबंधितांना मिळेल आणि त्या योगे दत्ता गायकवाडांचे ऐंशिव्या वर्षी असे पुस्तक लिहिण्याचे श्रम अधिकाधिक सार्थकी लागतील असे मला वाटते.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, मे २०२२)
____________
चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दत्ता गायकवाड
सुविद्या प्रकाशन
पृष्ठे ३०३ | मूल्य ३५० रु.
संपर्क क्रमांक : ९९७५६२६७१०
_____________
No comments:
Post a Comment