Tuesday, July 18, 2023

अण्णा भाऊ साठे : जीवन, विचार व साहित्य


आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरील चिंतन कार्यक्रमात 'अण्णा भाऊ साठेः जीवन, विचार व साहित्य' या विषयावरील १७ ते २० जुलै २०२३ या कालावधीतील ४ छोटेखानी भाषणांची ही टिपणे.

अण्णा भाऊ साठे : वारसा आणि जीवन

रुढ अर्थानं औपचारिक शिक्षण न झालेल्या, उपेक्षित समाजात जन्मलेल्या माणसाचं साहित्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात लागतं, त्यांच्या साहित्याचा जगभर गौरव होतो, रशियासारख्या देशात त्यांचा पुतळा उभा राहतो, असे अण्णा भाऊ साठे आपल्या राज्याला-देशाला ललामभूत आहेत. मराठी मनं थरारून टाकणारी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातली त्यांची शाहिरी कामगिरी लक्षात घेता ते मराठी जगताचा मानबिंदू ठरतात.
वास्तविक, प्रत्येक मनुष्याची प्रतिभा विकसित व्हायला समान अवसर मिळायला हवा. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनेनं तसेच आपल्या देशाच्या संविधानानं ते ठळकपणे नमूद केलं आहे. मात्र आर्थिक स्थिती आणि विशेषकरुन जातिव्यवस्था हे घडू देत नाही. भारतीय उपखंडाला विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेनं जराजर्जर केलं. आपले कायदे, योजना यांनी आज तुलनेनं फरक पडला असला तरी त्यातून आपली पूर्ण सुटका अजून झालेली नाही. जोवर लग्न करताना माणसं जातीतच स्थळ शोधतात तोवर जात गेली असं म्हणता येणार नाही.
माणसांना जखडून टाकणाऱ्या जातींच्या या उतरंडीत अगदी तळाला असलेल्या, एकेकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या मातंग समाजात अण्णा भाऊ जन्माला आले. त्यांच्या जन्माच्या जवळपास पाऊण शतक आधी महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत शिकलेली मुक्ता साळवे मातंग समाजातली. मुक्ताचा ‘ज्ञानोदय’मासिकामध्ये १ मार्च १८५५ ला "मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध" या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखात अस्पृश्यांना वेद, धर्मग्रंथ वाचायला मनाई करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना ती ठणकावते – “याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान, आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग!” या निबंधात मुक्तानं तत्कालीन अस्पृश्य मानल्या गेलेल्या समूहांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकून त्यांना अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे.
मुक्ताच्या आणि पुढं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक प्रेरणेचे, लढ्याचे वारसदार अण्णा भाऊ आहेत. त्यांच्या जन्माच्या वेळी मुक्तानं वर्णन केलेली अवस्था फारशी बदललेली नव्हती. इंग्रजी राजवटीच्या काळात शहरात काही प्रमाणात उद्योगधंदे उभे राहत होते. त्यामुळे गावाकडं रोजगाराविना उपासमार होणारे आणि जातीचा जाच सोसणारे समुदाय मुंबईची वाट धरु लागले. अण्णा भाऊंचे वडील आधीच मुंबईला आले होते. त्यांच्या मागोमाग अण्णा भाऊंसह त्यांचं सर्व कुटुंब मुंबईला आलं. कसं? तर चालत. प्रवासासाठी पैसे नाहीत. म्हणून मजल दरमजल करत, मध्ये लागलेल्या शहरांत काही काम करुन अन्न मिळवत ते मुंबई नगरीत पोहोचले.
या मुंबई नगरीत ते मजूर वस्तीत राहतात. वाढतात. तिथल्या कामगार लढ्यांत सहभागी होतात. शोषणमुक्तीच्या लढ्याचं शास्त्र सांगणाऱ्या मार्क्सवादाची दीक्षा त्यांना या कामगार लढ्यांत मिळते. या नवविचाराच्या सहाय्यानं शोषितांच्या दुःखाची गाणी, कथा, कादंबऱ्या, पोवाडे ते लिहितात. लोकनाट्यांतून त्यांच्या वेदनेला सादर करतात. भाषावार प्रांत रचना होताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान हाणून पाडण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन उभं राहतं. त्या आंदोलनात शाहीर अमरशेख, गवाणकर यांच्यासह अण्णा भाऊ आपल्या शाहिरी कलापथकाद्वारे उभा महाराष्ट्र जागवतात. ‘आनंद भुवन तू भूवरी भूषण भारतवर्षा’ असं महाराष्ट्राचं गौरव गान गातात.
सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावात १ ऑगस्ट १९२० रोजी जन्माला आलेले प्रतिभावान साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ता असलेले अण्णा भाऊ साठे मुंबई या त्यांच्या कर्मभूमीत १८ जुलै १९६९ ला वयाच्या ४९ व्या वर्षी कारकीर्दीच्या ऐन उमेदीत कायमचा विसावा घेतात.
...........

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, दिवसाही पुरेसा उजेड नसलेल्या झोपडीत, रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात अण्णा भाऊ साठेंनी आपलं बहुतेक साहित्य लिहिलं. ते प्रचंड आहे. वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी एकूण ३२ कादंबऱ्या लिहिल्या. त्यातल्या ७ कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले. त्यांनी लघुकथा लिहिल्या. त्यांचे २२ कथासंग्रह आहेत. लोकनाट्यासाठी लिहिलेले वग, नाटिका यांची १६ पुस्तकं आहेत. त्यांनी केलेल्या रशियाच्या प्रवासाचं वर्णन करणारं एक पुस्तक आहे. याशिवाय त्यांची गीतं, छक्कड, लावणी, पोवाडे हे पद्यलेखन बरेच आहे.
त्यातल्या काही कृतींची नावं पाहू. अकलेची गोष्ट, अमृत, आघात, आबी, आवडी, इनामदार, कापऱ्या चोर, कृष्णाकाठच्या कथा, खुळंवाडा, गजाआड, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, चिरानगरची भुतं, नवती, निखारा, जिवंत काडतूस, तारा, देशभक्त घोटाळे, पाझर, पिसाळलेला माणूस, पुढारी मिळाला, पेंग्याचं लगीन, फकिरा,फरारी, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, रूपा, बरबाद्या कंजारी, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, रानबोका, लोकमंत्र्यांचा दौरा, वारणेचा वाघ, वैजयंता, वैर, शेटजींचे इलेक्शन, संघर्ष, सुगंधा, सुलतान. ...अशी ही यादीच दमछाक करणारी आहे. अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या अधाश्यासारख्या वाचल्या जात. त्यांची शैली, निसर्गवर्णनं, व्यक्तिचित्रणं, कथानकांतले वळसे वाचकाला खिळवून ठेवतात.
त्यांच्या काही कादंबऱ्यांवर सिनेमे निघाले. ‘आवडी’ कादंबरीवर ‘टिळा लावते मी रक्ताचा’, ‘माकडीचा माळ’ वर ‘डोंगरची मैना’, ‘चिखलातील कमळ’ वर ‘मुरली मल्हारी रायाची’, ‘अलगूज’ कादंबरीवर ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’, तर वैजयंता, वारणेचा वाघ, फकिरा या कादंबऱ्यांवर त्याच नावाने सिनेमे निघाले. वैजयंता सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
अण्णा भाऊंच्या साहित्यात काय आहे आणि त्याचे मोल काय हे समजून घेण्यासाठी त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना पाहू. त्यात खांडेकर म्हणतात, "समाजाच्या तळाच्या थरातील माणसं, घटना आणि जीवन हे सारं अण्णा भाऊंनी अनुभवलं आहे, पचविलं आहे. माझ्यासारखे पांढरपेशे लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीत टाकलेल्या आरामखुर्चीतून बाहेरचं जीवन अनुभवतात. तसं अण्णा भाऊंचं नाही. या थरातच त्यांचा जन्म झाला. ...टीपकागद जसा झटकन ओली अक्षरं टिपतो, त्याप्रमाणे लहानपणापासून खेडेगावातली दलितांच्या आयुष्यातली आसवं अण्णा भाऊंच्या कलावंत मनाने टिपून घेतली आहेत. नुसती आसवंच नाहीत तर त्यांच्या आकांक्षा. त्यांचे राग-लोभ सारं काही त्यांनी आत्मसात केलं आहे. या साऱ्या अनुभवातून त्यांच्या कथा निर्माण झाल्या आहेत."
अनेक नामवंत लेखक-कलावंत अण्णा भाऊंची दखल घेत पुढं जातात. पु. ल. देशपांडे यांनी त्यांचा ‘तीन पैश्यांचा तमाशा’ हे मुक्तनाट्य अण्णा भाऊंना अर्पण केलं आहे. अण्णा भाऊंचे ‘लाल बावटा कलापथका’तले सोबती शाहीर अमरशेख म्हणतात – ‘शाहीर अण्णा भाऊंनी तमाशाचा वग लिहावा. आम्ही तो महाराष्ट्र जनतेपुढं ठेवावा आणि महाराष्ट्रीय जनतेनं, आबालवृद्धानं, धुंद मनानं त्याला डोक्यावर घेऊन नाचावं, हा मुळी अलीकडील काळात महाराष्ट्रीय कलेच्या क्षेत्रात पायंडाच पडून गेला आहे.’
‘आई’ या जगप्रसिद्ध कांदबरीचे लेखक मॅक्झिम गॉर्की. ते रशियातले. सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सदा कऱ्हाडे अण्णा भाऊंवर गॉर्कीचा प्रभाव असल्याचं नोंदवतात. मात्र त्यांनी त्याचं अनुकरण केलं नाही, असाही निर्वाळा देतात. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ ला ऐतिहासिक कादंबरी संबोधून ते इतिहासाचं साधन मानतात.
अण्णा भाऊंच्या साहित्याच्या वैशिष्ट्यांची चर्चा याआधी बरीच झाली आहे. पुढेही होत राहील.
..........

अण्णा भाऊ साठे यांचा साहित्य विचार

‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ हा आपल्याकडे वादाचा विषय राहिलेला आहे. त्याचे अनेक पदर आहेत. हे किंवा ते अशा दोनच पर्यायांत विचार करता कामा नये, असंही म्हटलं जातं. या वादाची चिकित्सा हा आताचा विषय नाही. अण्णा भाऊ साठे यांना यात कुठं बसवायचं? त्यांचा साहित्यविषयक विचार काय आहे? हे आपण पाहणार आहोत.
‘कलेसाठी कला’ या बाजूचे ते नव्हते, एवढं नक्की म्हणता येईल. याचा अर्थ त्यांचं साहित्य प्रचारकी होतं का?
‘हो’ आणि ‘नाही’ अशी दोन्ही उत्तरं द्यावी लागतील. त्यांच्या मुक्तनाट्यांतले वग, पोवाडे हे प्रचारकी आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांची शाहिरी प्रचार करते. पण त्यांच्या कथा, कादंबऱ्या थेट प्रचारकी नाहीत. त्या मुळात कलात्मक रचना आहेत. या कलात्मकतेतून प्रतीत होणारा आशय हा समाजातल्या तळच्या, उपेक्षित विभागांच्या, स्त्रियांच्या वेदनेचं जळजळीत अंजन आपल्या डोळ्यांत घालतो. हे अंजन या पीडित-शोषित विभागांबद्दल आपल्या मनात करुणा जागी करतं. त्यांना त्यांच्या या अवस्थेतून मुक्त करण्याची जाणीव आणि प्रेरणा देतं. कलेनं अशी प्रेरणा देऊ नये, त्यामुळे त्यातलं सौंदर्य बाधित होतं अशी काही अट नाही. अण्णा भाऊंचं वैशिष्ट्य म्हणजे जे प्रचारकी पोवाडे, लावण्या त्यांनी लिहिल्या तेही कलेचे अव्वल नमुने आहेत.
उदाहरणादाखल 'माझी मैना गावावर राहिली' ही छक्कड घ्या. मुंबईला येताना आपल्या प्रियेला निरोप देतानाचं कासावीस होणं. तिच्या कोमेजलेल्या कळीचं वर्णन, तिची समजूत काढतानाचे वायदे हे ज्या शब्दांत, प्रतिमांत अण्णा भाऊंनी गुंफलं आहे, त्याला तोड नाही. ती अत्युच्च विराणी आहे. पण ती स्त्री-पुरुष नात्यापुरती मर्यादित नाही.
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी म्हटल्याप्रमाणं “हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे. अण्णा भाऊंच्या छकडीतली मैना नितांत सुंदर आहे. तसाच हा बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग देखील सुंदर आहे. हा भाग आपल्याला मिळाला नाही. इतर महाराष्ट्राची आणि या भागाची ताटातूट झाली आहे असं अण्णा भाऊ सुचवतात. दोन जिवांची ताटातूट झाल्यावर काय होतं याचं समर्पक वर्णन या छकडीमध्ये आपल्याला दिसतं."
एका आत्मनिष्ठ नात्यातला भाव समग्रतेला भिडतो म्हणूनच आजही ही छक्कड ऐकल्यावर आपल्याला घायाळ व्हायला होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या प्रचाराचं गीत एवढ्यावर तिची बोळवण आपण करणार की उत्तम काव्यगुण असलेली श्रेष्ठ कलाकृती म्हणून तिचा सन्मान करणार?...याचा निर्णय ज्यानं त्यानं करावा.
केवळ प्रतिभेनं काम भागत नाही. उत्तम कलाकृती निर्माण होण्यासाठी प्रतिभेला कोणते आधार हवे असतात, याबद्दल खुद्द अण्णा भाऊ एके ठिकाणी म्हणतात – ‘प्रतिभेला सत्याचं, जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती हे शब्द निरर्थक आहेत. कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातल्या आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. कल्पकता निर्बल होते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते तद्वतच कल्पनेला जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणं शक्य नाही.’
कलावंतानं भूमिका घेऊ नये, त्यामुळे कलेच्या आविष्कारावर परिणाम होतो, असा एक विचार प्रचारला जातो. अण्णा भाऊंचं उदाहरण याला पुष्टी देत नाही. ते प्रतिभावान होतेच. पण त्यांच्या प्रतिभेला हे भूमिकेचं कोंदण असल्यानं ते श्रेष्ठ कलावंत झाले.
..........

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातल्या नायिका

जाती आणि त्यातलं स्त्रियांचं स्थान सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मडक्यांच्या उतरंडीचं रुपक योजतात. कथित उच्चतेच्या मान्यतेनुसार जातींची मडकी एकावर एक रचलेली आहेत. सगळ्यात वर सर्वोच्च मानलेल्या जातीचं. मग त्याखाली वरच्याहून दुय्यम पण खालच्यापेक्षा वरचं मानलेल्या जातीचं. अशी ही उतरंड आहे. या उतरंडीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक जातीच्या मडक्यात दोन थर आहेत. वरचा थर पुरुषाचा तर खालचा स्त्रीचा. म्हणजेच प्रत्येक जातीत स्त्री पुरुषाच्या तुलनेत दुय्यम मानली गेली आहे. कथित सर्वोच्च जातीतली स्त्री त्या जातीतल्या पुरुषाहून कमी लेखली जाते आणि कथित तळच्या जातीतली स्त्रीही त्या जातीतल्या पुरुषापेक्षा कमतर मानली जाते. या कथित तळच्या जातीतल्या स्त्रीला तिहेरी जाच सोसावा लागतो. ती जातीनं तळची असल्यानं त्या जातीचे भोग तिच्या वाट्याला येतातच. शिवाय स्त्री म्हणून आपल्या जातीतल्या पुरुषांचं वर्चस्व, त्रास सहन करावा लागतो. तळच्या जातीतली आणि स्त्री असल्यानं ती साधनसंपत्तीपासून वंचित असते. तिला आपल्या मुलांच्या, कुटुंबाच्या पोषणासाठी मिळेल ती मजुरी, रोजगार करावा लागतो. ही मजुरी देणाऱ्या मालकांच्या शोषणाचा त्यांना सामना करावा लागतो.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातल्या नायिका मुख्यतः या तळच्या विभागातल्या आहेत. त्या तिहेरी शोषणाचा मुकाबला करतात. डगमगत नाहीत. त्यांची जीवनप्रेरणा त्यांना चिवटपणे झुंजायला लावते. अण्णा भाऊंच्या साहित्याच्या बहुतेक अभ्यासकांनी त्यातल्या स्त्री चित्रणाविषयी हे निरीक्षण नोंदवलं आहे. तारा रेड्डी, प्रा. इंदिरा आठवले अण्णा भाऊंच्या साहित्यातल्या स्त्रियांना लढाऊ, आत्मविश्वासानं बहरलेल्या नायिका मानतात. आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंड्या या गावगुंडाला शेवटी फुला ही नायिका त्याच्या रानातल्या घरात कोंडून, जाळून मारते. बापानं आजारी, अयोग्य नवऱ्याशी लग्न केलं म्हणून त्याला सोडून जाणारी बरबाद्या कंजाऱ्याची मुलगी आणि तिच्या भल्यासाठी समाजाचं वैर ओढवून घेणारा बरबाद्या, यातून चुकीचे संबंध फेटाळणाऱ्या नायिकेचं दर्शन घडतं.
अण्णा भाऊंच्या विचार व साहित्याचे अभ्यासक महादेव खुडे यांच्या मते अण्णा भाऊंच्या नायिकेचं खरं विस्तृत जीवन त्यांच्या कादंबऱ्यांतून कळतं. त्यांच्या काही कादंबऱ्या तर नायिकाप्रधान आहेत. चित्रा, वैजयंता, चंदन, चिखलातील कमळ, फुलपाखरु, रत्ना, आवडी, टिळा लाविते मी रक्ताचा या कादंबऱ्यांमधल्या नायिका स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या प्रातिनिधिक नायिका आहेत. तर अलगूज, राणगंगा, संघर्ष, अहंकार या प्रेमकथांमधल्या नायिका उदात्त प्रीतीचं दर्शन घडवतात. माकडीचा माळ मधली दुर्गा, चंदन, आवडी, चित्रा, वैजयंता, रत्ना, माझी मैनामधली मैना, निखारातली फुला यांनाच खऱ्या अर्थानं अण्णा भाऊंच्या प्रातिनिधिक नायिका मानावं लागेल असं खुडे म्हणतात. त्याचं कारण नोंदवताना ते म्हणतात – या नायिकांचं वर्णन करताना अण्णा भाऊंनी स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीनं सन्मानाचा, आदराचा दर्जा दिला आहे. अण्णा भाऊंच्या नायिका नाजूक कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. त्या रणरागिणी आहेत. खांद्यावर बंदूक घेऊन पुरुषांच्या बरोबरीनं ब्रिटिशांच्या विरोधात लढणारी मंगला इथं आढळते. पैलवान भावानं केलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी घरदार सोडून रामोशी समाजातल्या प्रियकराची साथ करणारी चौगुल्याची आवडी इथं सापडते. दुर्दैवी मजूर स्त्रीचं जीवन जगताना झोपडपट्टी दादाबरोबर लढणारी चंदन आढळते. भटक्या जमातीतली वासनेनं बरबटलेल्या रानरेड्याशी झुंजणारी दुर्गा आपल्याला भेटते.
अशा प्रकारे कष्टकरी-शोषित स्त्रियांना आपल्या साहित्यातल्या नायिका बनवून त्यांना संघर्षाच्या मैदानात उतरवणं हे अण्णा भाऊ साठे यांचं अनन्य वैशिष्ट्य आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
Like
Comment
Share

No comments: