बौद्धांनी दिवाळी साजरी करावी की करु नये? …या प्रश्नाने माझा हॅम्लेट झालाय – To be or not to be?
बौद्धांमधला एक विभाग बौद्ध परंपरेतील अशुभ प्रसंग सांगून दिवाळी साजरी करणे हा धर्मद्रोह मानतो. तर दुसरा विभाग बौद्ध परंपरेतीलच शुभ प्रसंगाचा दाखला देऊन तो दीपदानोत्सव नामाभिधानाने साजरा करावा असे आवाहन करतो.
हा फक्त उच्चशिक्षित व विद्वान बौद्धांतला वाद नव्हे. एका धम्मपरिषदेत या मुद्द्यावरून खुद्द बौद्ध भिक्खूंच्यात दोन गट पडले व त्याची अभिव्यक्ती दोन्ही गटांनी तीव्रतेने केली. या दोहोंत एकमत न झाल्याने समोर ऐकणारे शेकडो सामान्य बौद्ध संभ्रमात पडले.
माझीही तीच अवस्था आहे.
लहानपणासून आमच्याही घरी, वस्तीत दिवाळी साजरी होई. नवे कपडे, करंज्या असत. थेट बाबासाहेबांच्या धर्म बदलण्याच्या आवाहनानुसार आणि २२ प्रतिज्ञांसह बौद्ध धर्माची जाहीर दीक्षा घेतलेल्या पिढीतले माझे आईवडील. त्यामुळे कोणतेही हिंदू देवतांचे फोटो घरात नाहीत. दिवाळीलाही कोणते पूजन नाही. बुद्ध-बाबासाहेबांच्या प्रतिमांना हार घातले जात. मेणबत्ती, अगरबत्ती लावून त्रिसरण पंचशील घेतले जाई. दिवाळी हा केवळ हिंदूंचा सण असे कोणाच्याही मनात नसे. तो आपलाच आनंद साजरा करण्याचा सर्वात मोठा सण असेच वातावरण होते. त्यातच मी वाढलो.
माझ्या नात्यात, बौद्ध वस्त्यांत आजही दिवाळी जोरदार साजरी होत असते. तेही कोणी पूजन वगैरे करताना आढळत नाहीत. नवे कपडे घालून मुले आनंदाने बागडत असतात. फटाके वाजवत असतात. गोडधोड खात असतात.
आता बौद्धांनी दिवाळी साजरी करावी की करु नये हा वाद प्रकर्षाने पुढे आल्याने त्यांना तसेच हिंदू मित्र मंडळी आणि नातेवाईक (आंतरधर्मीय लग्नामुळे झालेले) यांना मी स्वतःहून दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला घाबरतो. उद्या जर दिवाळी विरोधी गटाचे मत सिद्ध झाले तर उगीच आपल्यावर धर्मद्रोही शिक्का बसायचा. मग बहिष्कार वगैरे (आणि ट्रोलिंग) प्रकार सुरु व्हायचे. घटनेने व्यक्ती प्रमाण मानली असली तरी आजच्या काळात धर्म या संघटित एककाला धरुन राहण्यात शहाणपण आहे.
माझी दोन्हीकडे नाती आहेत. बौद्धांत आणि हिंदूंत. या दोहोंपैकी कोणीही शुभेच्छा दिल्या तर त्यांना धन्यवाद द्यावे का? उलट शुभेच्छा द्यायच्या का? या प्रश्नांनी माझी मोठी अडचण होते आहे. कोणाचे एकाचे ऐकावे तर दुसरा आपल्याला धर्मविरोधी ठरवणार.
दिवाळी करुच नये असे सिद्ध झाले असते, तर किमान बौद्ध नातेवाईकांना (हिंदू नातेवाईकांना सांगण्याचा प्रश्न येत नाही) सांगितले असते – ‘मुलांना साधे कपडे घाला. फटाके वाजवणाऱ्या इतर हिंदू मुलांत मिसळू देऊ नका. मुले ऐकत नसतील तर त्यांना फटके देऊन घरात डांबून ठेवा. दिवाळी संपेपर्यंत घराच्या बाहेर जाऊ देऊ नका. आपल्याला खरेखुरे (म्हणजे कट्टर बौद्ध) व्हायचे आहे.’
बौद्धांनी दिवाळी करुच नये किंवा करावीच याचा निकाल आमच्यातील विद्वान व भिक्खू यांच्या चर्चेतून लागला असता तर मला सोपे गेले असते. मग मी अभिमानाने सांगितले असते – ‘सॉरी, आमच्यात दिवाळी अशुभ आहे. तुम्ही आम्हाला शुभेच्छा देत नका जाऊ.’ किंवा ‘तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि तुम्हालाही दीपदानोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!’
अशा निर्णयाने सुटका झाली तरी अजूनही काही पेच शिल्लक राहतात.
मी संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराचे, विषमतेला विरोध करून वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक भारतीय संस्कृती लोकांत रुजावी असा प्रयत्न करत असतो. सहिष्णुता व आदर हा या सर्वसमावेशकतेचा पाया आहे. मांसाहार करु नये याबद्दल ठाम मत असणाऱ्या शेजाऱ्यांनीही मांसाहार करणाऱ्या शेजाऱ्यांच्या आहाराच्या बाबतीत सहिष्णू असायला हवे. त्यांच्या आहार स्वातंत्र्याचा सन्मान राखला पाहिजे. जे सण आपण करत नाही ते करणारे शेजारी, मित्र असतील तर त्यांना त्यांच्या सणाबद्दल शुभेच्छा द्याव्यात. त्यांनी घरी बोलावले, प्रसाद वा फराळाचे ताट दिले तर त्याचा स्वीकार करुन त्यांच्या भावनेचा मान राखावा, आदर करावा असे मांडत असतो.
‘माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे’ असे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात म्हटले आहे.
इतरांनी माणुसकीपोटी, शेजारधर्म म्हणून, मित्रभाव म्हणून त्यांच्या सणावेळी शुभेच्छा दिल्या, घरी बोलावले आणि त्यांना आपण तितक्याच मैत्री भावनेने प्रतिसाद दिला, आपणही आपल्या सणांना तसेच केले तर त्यामुळे आपला बौद्ध धर्म भ्रष्ट होतो, आपल्या बौद्ध असण्यात उणीव तयार होते की माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते भक्कम होते?
‘मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे’ ही बाबासाहेबांची भूमिका प्रत्यक्षात यायची तर मुलांना इतरांच्या सणात सहभागी होऊ नका असे प्रतिबंध घालून ती प्रत्यक्षात कशी येईल? ज्यांना धर्माचा अर्थ कळत नाही अशा निरागस छोट्या जीवांच्या मनाच्या कळ्या कुस्करायच्या का? स्वाभाविक आनंदापासून त्यांना रोखायचे का? आपपरभावाच्या विषाची बीजे अशारितीने त्यांच्या या संस्कारक्षम वयात त्यांच्यात रुजवायची का?
बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू जर माणुसकी, मैत्री, करुणा, सहभाव, नीती असेल तर त्याच्या जोपासनेचा आदर्श आपल्या वर्तनाने घालून द्यायचा की विधी-कर्मकांडात बुद्धाच्या धम्माला कट्टर धर्म बनवायचा?
… आता प्रश्न आणखी कठीण होत चाललाय.
याचे उत्तर ज्याच्या त्याच्या विवेकावर सोडावे का? मलाही आपला विवेक वापरता येईल का?
तरीही हे प्रश्न राहतातच –
विवेक म्हणजे नक्की काय? तो कुठे मिळेल? तो वापरायला इतरांची मान्यता राहील का?
– सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com