Friday, September 8, 2017

गौरी लंकेशच्या खुनाला जबाबदार कोण?

गौरी लंकेश या ५५ वर्षीय पत्रकार-संपादक महिलेचा बंगळुरुत तिच्या राहत्या घराच्या बाहेर अनंत चतुर्दशीच्या दिवशी खून झाला. ७ गोळ्या छाती-डोक्यात अगदी जवळून घातल्या गेल्या. देशभर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. निदर्शने झाली. काल तिचा अंत्यविधी झाला. आज तिचा भाऊ इंद्रजित व बहीण कविता प्रसारमाध्यमांशी बोलत होता. गौरी लंकेश यांच्या भावाने त्यांच्या खूनाला जबाबदार असणाऱ्यांमध्ये नक्षलवाद्यांकडेही इशारा केला आहे. गौरी लंकेश नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाच्या कामात होत्या, त्यामुळे नाराज असलेल्या नक्षलींकडून हा खून झाला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. आता भावानेच असे म्हटल्यानंतर आपणही ती शक्यता नाकारुन कसे चालेल? पण तिच्या बहिणीने कविताने भावाशी असहमती दाखवली आहे. तिच्या मते गौरीचे नक्षलवाद्यांशी मैत्रीचे संबंध होते व उजव्या शक्ती तिच्या विरोधात होत्या. कविताच्या म्हणण्यानुसार इंद्रजित व गौरीचे वैचारिक तसेच ‘लंकेश पत्रिके’च्या मालकी व व्यवस्थापनावरुन वाद होते. इंद्रजितचे म्हणणे आहे, तिचे-माझे वैचारिक मतभेद होते हे खरे; पण आम्हा भाऊ-बहिणीच्या नात्याचे बंधही पक्के होते.

आता सख्ख्या बहिणीचे म्हणणे तरी कसे नाकारायचे? म्हणजे कोणतीच शक्यता नाकारुन चालत नाही. यापलीकडे गौरी लंकेश यांचे वैयक्तिक काही भांडणही कोणाशी असेल, त्यातूनही हे होऊ शकते. मारायचे होते दुसऱ्याला पण चुकून यांना मारले असेही असू शकते. असे काहीही असू शकते. पोलीस या सगळ्या बाजूंची तपासणी करतील.
 
मग आपण काय करायचे? आपण पोलिसांचे काम त्यांना करु द्यायचे. त्यात शक्य ते सहकार्य करायचे. त्यांच्या तपासातून जो निष्कर्ष येईल, त्याचा मोकळ्या मनाने सन्मान करायचा. पण तोवर फक्त प्रतीक्षा करायची? काहीही बोलायचे नाही? काहीही अंदाज बांधायचा नाही? या बाबींना प्रतिबंध कसा बसेल, त्यादृष्टीने समाजमन कसे घडवायचे याचा काहीच विचार करायचा नाही का?
 
असा विचार जरुर करायचा. लोकशाही अधिकारांच्या चौकटीत त्याचे प्रकटीकरण करायचे. चर्चा घडवायची. त्यातील आपण अंदाज केलेल्या बाबी उद्या चुकीच्या निघाल्या तर त्या स्वीकारायची तयारी ठेवून ही चर्चा करायची. अर्थात ती बिनबुडाची असता कामा नये. त्यात काही तर्क व मुख्य म्हणजे माणसाबद्दल कणव व समाजाची सम्यक धारणा हा तिचा पाया असायला हवा. माणूसपण व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ते अगदी गरजेचे आहे. या लेखातल्या चर्चेमागेही तीच भूमिका आहे.
 
गौरी लंकेशना ७.६५ एमएमच्या देशी बनावटीच्या पिस्तुलाने मारल्याचे आता पोलिसांनी सांगितले आहे. कलबुर्गींच्या मारेकऱ्यांनीही याच बनावटीचे पिस्तूल वापरले होते. पानसरे व दाभोलकर यांच्या खूनातही हेच पिस्तूल आढळते. मोटारसायकलहून येऊन मारण्याची पद्धतीही तीच आढळते. हा योगायोग समजायचा का? असूही शकतो. पण सर्वसाधारणपणे असे होत नाही. तर्क असाच करावा लागतो की या चारही हत्यांच्या मागे असलेली मंडळी एकच असू शकतात. हा तर्क बळकट व्हायला दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ही चारही मंडळी पुरोगामी व उजव्या शक्तींच्या कट्टर विरोधातली होती. याचा अर्थ त्यांचे विरोधक एकच असू शकतात. गौरी लंकेश व कलबुर्गी हे लिंगायत समाजाचे. लिंगायत हा हिंदूधर्माचा भाग नाही. आमचे अस्तित्व स्वतंत्रपणे गणले जावे ही लिंगायतांची भूमिका आहे. हा संघर्ष कट्टर हिंदुत्ववाद्यांना दुखावणारा आहे. हिंदुराष्ट्राच्या ध्येयपूर्तीतले हे मोठे अडथळे त्यांना वाटतात. हे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न होणे स्वाभाविक आहे. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास सनातन संस्थेभोवती फिरतो आहे, त्या अर्थी गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातही सनातनला आणणे भाग आहे.
 
सनातन संस्था कडव्या हिंदुत्वाची प्रचारक आहे. आधुनिकता, लोकशाही, सेक्युलॅरिझम, वैज्ञानिकता या मूल्यांच्या कट्टर विरोधात सनातनचे साधक लिहीत-बोलत असतात. पुरोगाम्यांविषयी अतिशय क़डवट व विद्वेषी असतात. म्हणून त्यांच्याविषयी अधिक संशय. पण हिंदुराष्ट्राच्या आपल्या स्वप्नपूर्तीला भारतीय संविधान ही अडचण आहे म्हणून संविधानाच्या रचनेपासून त्यातील मूल्यांना ज्यांनी विरोध केला त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर याची मुख्य जबाबदारी येते. संविधान तयार होत असताना त्यात मनुस्मृतीतील मूल्यांचा विचार केलेला नाही, त्यात काहीही भारतीय नाही, हे पाश्चात्यांचे अनुसरण आहे, अशी टीका व आंदोलन करणाऱ्या संघाने आपले हे विचार बदलल्याचे अजून जाहीर केलेले नाही. आपले विचार न बदलता संघाने भारतीय संविधानाची शपथ घेऊन आपल्या स्वयंसेवकांना देशाचे पंतप्रधान व मंत्री होऊ दिले. राजसत्तेच्या सहाय्याने आपल्या उद्दिष्टाकडे सरकण्याचा हा डाव आहे. आज त्यात त्यांची सरशी झाली आहे. ज्या तिरंग्यातील रंग त्यांना अपशकुनी वाटत होते, त्याच तिरंग्याभोवती आता त्यांनी आपला राष्ट्रवाद गुंफला आहे. संघ स्वतः सगळे बोलत नाही. पण त्यांच्या छत्रछायेखालच्या विविध संघटना विविध पातळ्यांवर आवाज लावतात व विविध तीव्रतेची कृती करत असतात. गोरक्षणाच्या नावाखाली दलित-मुस्लिमांचे मुडदे पाडतात. घरवापसी, लवजिहादच्या निमित्ताने मुस्लिमांच्या घरांची राखरांगोळी करतात. गांधीजींविषयी विषारी-विखारी प्रचारात अग्रभागी असलेल्या संघाने त्यांच्या खुनाची जबाबदारी गोडसेपुरतीच मर्यादित केली. आजही या सगळ्या हत्या, कत्तलींची जबाबदारी त्या त्या संघटना व व्यक्तींपुरत्याच सीमित करण्याची तीच रीत संघाची आहे. ज्या वल्लभभाई पटेलांचा महिमा हल्ली संघ-भाजप गात असतो, त्या पटेलांनीच ‘गांधीजींच्या खुनानंतर मिठाई संघाने वाटली व ते प्रत्यक्ष खूनात सहभागी नसले तरी त्यांनी जे विषारी वातावरण देशात तयार केले त्यातून गांधीजींचा खून झाला’ असे लेखी नमूद केले आहे. संघावर बंदी याच कारणासाठी आणली होती व ती उठवताना या विषारी प्रचारापासून दूर राहण्याची अट पटेलांनी घातली होती.
 
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, म्हणून तेच याला जबाबदार आहे हा भाजपचा आरोप बिनबुडाचा व बेजबाबदार आहे. राज्यातली कायदा-सुव्यवस्था राखण्यात सिद्धरामय्या कमी पडले असे फारतर म्हणता येईल. काँग्रेसची मूळ विचारधारा मानणारे काडर त्या पक्षात आहे, अशी एकूणच काँग्रेसची स्थिती नाही. कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या प्रचार-प्रभावात असलेले कार्यकर्ते काँग्रेसमध्येही आहेत. या कमकुवतपणाची जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाला टाळता येणार नाही. पण भाजपने याची संपूर्ण जबाबदारी काँग्रेसवर ढकलणे म्हणजे चोराला सोडून पहारेकऱ्याला त्याच्या निष्काळजीपणासाठी मुख्य आरोपी करण्यासारखे आहे.
 
संघ, त्याच्या परिवारातल्या संघटना, केंद्रात व विविध राज्यांत सत्तेवर असलेला भाजप हा एक वाद्यवृंद आहे. थोडे इकडे तिकडे झाले तरी त्यातील प्रत्येकाचा सूर-ताल परस्परपूरक असतो. विद्वेषी कारवाया हा आधीपासूनच यांचा कार्यक्रम होता. पण सत्तेवर आल्यावर त्यांनी उन्मादाची जी पातळी गाठली आहे, ती आपण सगळेच पाहतो आहोत. वल्लभभाई पटेलांना स्मरुन, हा उन्माद व तो निर्माण करणाऱ्या या सर्व शक्ती गौरी लंकेश व त्या आधीच्या कलबुर्गी, पानसरे व दाभोलकर यांच्या खऱ्या खुनी आहेत, असेच म्हणावे लागेल.
 
– सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_________________________________________

No comments: