Monday, October 23, 2017

ती सध्या काय करते?


ती अलिकडेच निवृत्त झाली. बहुधा स्वेच्छानिवृत्ती असावी. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी असली तरी निवृत्तीचे वय झाले असावे असे वाटत नाही. असो. काहीही असो. ते तसे महत्वाचे नाही. मुद्दा हा की तिने मला निवृत्तीच्या निरोप समारंभाचा आमच्या एका सामायिक मित्राकरवी निरोप पाठवला होता. आश्चर्य वाटले. कारण गेल्या ३३ वर्षांत आमचा संपर्क नाही. एकमेकांना पाहिलेलेही नाही. कार्यक्रमाला गेलो नाही. त्या दिवशी एक काम होते. त्याचे कारण दिले. पण मला जायचे नव्हते, हा खरा मुद्दा होता. ज्या संबंधांना संपून एवढा प्रदीर्घ काळ लोटला त्यांच्या एखाद्या पापुद्र्यालाही-कोणत्याही निमित्ताने स्पर्श मला नको होता.

म्हणजे मी हे सहज घेऊ शकत नव्हतो. ती आजही माझ्या डोक्यात-मनात आहे, हे कबूल करतो. वास्तविक आमचा ओळखीपासून निरोपापर्यंतचा सगळा काळ जेमतेम दोन वर्षांचा. त्यातला आमच्या जवळ असण्याचा अगदीच अल्प. बाकी एकमेकांचा ‘संदर्भ’ असण्याचा. पण हा संदर्भ पिळवटणारा, घुसमटवणारा. या संदर्भाचा अवकाश उमलत्या वयातील दोन स्त्री-पुरुषांच्या भावना-आकांक्षांचा केवळ नव्हता. त्याला आर्थिक स्थिती व जात या कठोर वास्तवांचे कराल पहारे होते. पुढच्या एका टप्प्यावर हे पहारे भेदणारीही मला भेटली. पण परस्परांवर जीव ओवाळून टाकू पाहणाऱ्या अनेक उमलत्या फुलांचे गुलाबी निःश्वास गुदमरवून टाकणारी आर्थिक-जात वास्तवाची तटबंदी आजही मजबूत आहे. हा संदर्भ बहुधा तिला माझ्या मनातून विसर्जित होऊ देत नसण्याचे महत्वाचे कारण असावा.

ती मराठा. मी बौद्ध. ती इमारतीत राहणारी. मी झोपडपट्टीत. अर्थात, नेहमीप्रमाणे हे संदर्भ आमच्या जवळीकीच्या प्रारंभी आले नव्हते. ते दरम्यान आले. आमची मैत्री खूप चांगली. एकमेकांना आश्वस्त करणारी. जपणारी. ती तशीच राहिली असती तर आम्ही आजही उत्तम मित्र असतो. ती उत्तम गायची. अक्षर सुरेख. कॉलेजच्या स्नेसंमेलनातल्या तिच्या नृत्यांची तालीमही चुकवू नये इतकी मला ती भावायची. मित्रमंडळींबरोबर असतानाचे हास्यविनोद, थट्टामस्करी, फिरणे, आग्रहाने आपल्या डब्यातले खाऊ घालणे याची आजही असोशी वाटते. पण मैत्रीच्या पुढचे काही बंध तयार होऊ लागले आणि हे विस्कटले.

बंध तयार होण्याचा काळ अर्थातच मोहरण्याचा होता. स्वतःच्या तसेच इतरांच्या कवितांचे सूचक, थेट संदर्भ या बंधांची वाट प्रशस्त करत होते. मी या काळात डायरी लिहीत असे. ती गद्य असे. तशीच अगद्यही. त्यातील ही एक नोंदः

‘किती वेंधळा रे तू! साधी भेळ तुला नीट खाता येऊ नये.’ – तू म्हणालीस.
बुडता सूर्य लाटांशी लपाछपी खेळताना
स्वतःजवळची भेळ भरवताना
मी तुझं बोट कधी चावलं कळलंच नाही.
...आता एक चित्कार कानभर
सूर्य मुकाट बुडताना;
व सांडलेली भेळ इतस्तत:

आमचे मैत्रीच्या पुढचे नाते सिद्ध झाल्या झाल्याच खरे तर हे इतस्ततः विखुरणेही सुरु झाले. जी कधीच संपू नये असे वाटले ती अगदी दुर्मीळ अशी समुद्रकिनारीची एक भेट अगदी कालच्यासारखी स्मरणात आहे. बिलगून बसलेले. हातात हात गुंफलेले. कलत्या सूर्यकिरणांनी मंद लाटांवर एक वाट प्रकाशमान केलेली. आमच्यापासून सुरु होऊन दूर क्षितीजात विरुन जाणारी. ती गात होतीः ‘..पत्ता पत्ता बूटा बूटा..’ जया-अमिताभचे ‘एक नजर’मधले गीत. तिच्या आवाजात ऐकलेली गाणी रेडिओ-टीव्हीवर लागली की ती समोर येई. आजही येते. तिच्या आठवणीसाठीही ती ऐकतो.

माझा काळ दलित पॅंथरच्या उताराचा. पण तरीही वस्त्या धगधगत होत्या. आम्हीही त्यातच घडत होतो. चळवळीत कधी पडलो असा कोणी प्रश्न केला तर आमच्या वस्तीत राहणाऱ्या त्या पिढीचे उत्तर असेल- जन्माला आल्या आल्या. एका बाजूला नाजूक भावनिक आंदोलने व दुसऱ्या बाजूला-नव्हे भोवताली रणरणती सामाजिक आंदोलने. हे सोबतच चालले होते. सामाजिक परिवर्तनाची चळवळ हेच आपले भागधेय हे तेव्हाच नक्की झाले होते. आणि ते नॉन निगोशिएबल होते.

अर्थात त्याबद्दल तिने थेट अभिप्राय कधीच दिला नाही. आमच्या चर्चा-संवादात हे संदर्भ असायचे. माझ्या अस्तित्वाचा तो भागच असल्याने अपरिहार्यपणे यायचे. ‘माझ्या घरी या नात्याचा स्वीकार होणे कठीण, वडिलांची मी खूप लाडकी आहे. त्यांना कसे दुखवायचे?..’ हे प्रश्न तिच्या बोलण्यात वाढू लागले. अनिश्चितता, अस्थिरता आम्हाला घेरु लागली. तिचा स्वर जड होई. डोळे भरुन येत. आमच्या एकत्र असण्यातला अधिकाधिक वेळ या अस्थिरतेच्या ताणाने भरलेला असायचा. जवळच्या मित्र-मैत्रिणींनी तिला निर्णयात आधार द्यायचा खूप प्रयत्न केला. त्यामुळे ती दोलायमान मात्र होई.

या दोलायमान अवस्थेत दुसऱ्या टोकाला गेलेला लंबक वेगाने या टोकाला आल्यावर तिने मला लिहिलेले हे पत्रः

प्रिय सुरेश,

‘हमे तुमसे प्यार कितना
ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते
तुम्हारे बिना’

मी आतापर्यंत तुला दुःख आणि दुःखच दिलं आहे. पण आता येणारे आषाढमेघ न बरसता निघून जाण्यासाठी नव्हेत. या गदगदणाऱ्या शिशिराची झळ आपल्या वसंत बहाराला लागणार नाही याचे आश्वासन देते. मला तुला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. तुझं भवितव्य उज्जवल आहे यात तिळमात्र शंका नाही.

चांगला अभ्यास कर.

तुझी आणि तुझीच,

……

(पत्राच्या खालच्या मोकळ्या जागेत मोठी ठळक आद्याक्षरांना हंसाचा आकार दिलेली आमची दोघांची नावे.)

तिच्या सुरेख अक्षरातले हे पत्र मी अजून जपून ठेवले आहे. हे लिहिताना ते माझ्या समोरच आहे.

आश्वस्ततेचा हा काळ अगदीच मामुली ठरला. पुन्हा तीच दोलायमान आंदोलने. याची नोंद करताना डायरीत मी लिहिलेः

तुझं न येणं गृहीत धरुनही
मी उभा होतो कारंज्याशी
तुझ्या प्रतीक्षेत केव्हाचा!
कारंजे...जसे तुझे शब्द
तुषाराची सप्तरंगी कमान
तुझ्या भोवती;
तशीच हौदाची चाकोरीही.
हौदाचे कठडे
खरंच इतके बळकट
की तुलाच हवी आहे कमान..?

आमच्या नात्याला अधिकृत विराम न देताच ते विरत गेले. कॉलेज संपले. प्रत्यक्ष दिसणेही संपले. तिच्या पत्राशिवाय तिचा फोटो वगैरे काहीही जवळ ठेवले नाही. आम्ही एकत्रित केलेल्या नाटकाचा फोटोही मी घेतला नाही. तिने तो घेतला असे मला नंतर कळले.

आमच्या नात्याची ही अटळ परिणती आहे, याचा पुरेपूर अंदाज आला असतानाही मी स्वतःला स्थिर ठेवू शकलो नाही. बाहेरुन दिसलो नाही तरी आतून खूप विकल झालो. पण या स्थितीत राहण्याची चैनही करता येत नव्हती. आधीच गरीबी. त्यात गिरणी संपाने केलेली वाताहत. आई-वडिलांची आजारपणं. लहान भावाची जबाबदारी. कॉलेज करत राहणं शक्य नव्हतं. कमावणं भाग होतं. नोकरीला लागलो. पुढचे शिक्षण नोकरी करत केले. सामाजिक कामात होतोच. तो तर श्वासच होता. संधी मिळताच पूर्णवेळ कार्यकर्ता व्हायचे हे मनात होतेच. आंबेडकरी परिसराबरोबरच अन्य पुरोगामी चळवळींतला सहभागही वाढत गेला.

जीवनाचा हा नवा टप्पा सुरु झालेला असतानाच ती लग्नाची पत्रिका द्यायला घरी आली. मी नव्हतो. आईजवळ ठेवून गेली. तिच्या लग्नाच्या दिवशीच मी स्त्री मुक्ती संघटनेच्या विदर्भ दौऱ्यात नाटकात उभा होतो. माझे पात्र गंभीर होते. त्यात भावूक होणे हा नाटकाचाच भाग होता. खरं तर हे पात्र करताना मी आपसूकच भावूक होई. पण आजच्या अश्रूंना एक वेगळे परिमाण होते. नाटक संपल्यावर आंघोळीला गेलो. कडाक्याच्या थंडीत कितीतरी वेळ नळाखाली बसून राहिलो.

डायरीत एक नोंद आहेः

कालपरवापर्यंत दूरवर का होईना 
एक ‘घर’ होतं माझ्या दृष्टिक्षेपात...
आज अखंड मुशाफिरीची दीक्षा.
कुठले कवडसे, कुठल्या तिरीपी,
कुठलीच शलाका जोजारणं नाही.
पायलीभर चांदण्या ओतून अवकाशाचे मापन नाही.
समाधान, खेद, हर्ष, दुःख..सारे पडद्याआड;
मला अनोळखी आहेत ते.

दुसरी एक नोंद अशीः

जखम मुक्तपणे वाहू द्यावी...
शुष्क मांसात चोपडावी माती 
पाहिजे तर ‘निर्दय’ या संज्ञेने.
राखेला खाक होण्याची भीती आता कशासाठी..?
अंगणातला गुलमोहोर पेटला तरी खंत नाही.
निःश्वासाची गोष्टच दूर
विझविण्याचा प्रयत्न नाही.
वैफल्य- स्थितप्रज्ञतेचा पाया भरतं का..?

मी स्थितप्रज्ञ वगैरे काही झालो नाही. तिच्या लग्नानंतर तिच्याविषयीच्या खोल कुठेतरी असलेल्या प्रतीक्षेला विराम मिळाला एवढेच. तिच्याविषयी काही तक्रार नव्हती. पुढेही राहिली नाही. या काळात मीनाकुमारी, गुरुदत्त हे दोस्त वाटत. त्यांच्याशी कितीतरी गुजगोष्टी मी डायरीत केल्या आहेत. ‘चाँद तन्हा है आसमाँ तन्हा, दिल मिला है कहाँ-कहाँ तन्हा’ या मीनाच्या ओळी वेदनेवर फुंकर घालत. गुरुदत्त या स्थितीला एक भला थोरला सामाजिक आयाम देई. कितीतरी वेळा पाहिलेल्या ‘प्यासा’तला गुरुदत्त ही आपलीच प्रतिमा वाटे. दुरावलेल्या माला सिन्हाला तो जे म्हणतो ते माझेच उद्गार वाटत- “मुझे तुमसे शिकायत नहीं. मुझे शिकायत है समाज के इस ढाँचे से.” भोवताली घोंगावणाऱ्या फुले-आंबेडकरी, डाव्या-समाजवादी चळवळींमुळे हेच विचारसूत्र आम्हाला मिळाले. माझे दारिद्र्य, माझी जात व त्यामुळे येणारी प्रेमातली विफलता यास मी किंवा ती जबाबदार नाही, तर जबाबदार आहे ही 'समाजव्यवस्था'. ...आणि म्हणूनच पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला ही वंचना, ही विफलता येऊ द्यायची नसेल, तर समाजाचा हा 'ढाँचा' बदलला पाहिजे हे ध्येय अधिकच पक्के झाले.

हा प्रवास एकट्याने करावा लागणार याची तयारी मनाशी झाली होती. याचा अर्थ जोडीदाराची आस संपली होती असे नव्हे. पण ती मिळेल याची प्रतीक्षा मात्र सोडली. मनाने वास्तवाचा स्वीकार बऱ्याच प्रमाणात केला होता.  ज्या कोणी सहकारी, मैत्रिणी सहवासात येत त्यांना कोणत्यातरी निमित्ताने घर-वस्ती अगत्याने दाखवत असे. त्यामुळे संबंधांचा पाया प्रारंभीच पुरेसा स्पष्ट होई. आमच्या वस्तीत संघटनेच्या उच्चवर्णीय सहकारी मुली सोबत येत त्यावेळी नेहमीचा एक प्रश्न वस्तीतल्या कार्यकर्त्या मित्रांकडून येई– ‘यातली कोण लग्न करुन येईल का राहायला या झोपडपट्टीत?’ त्यांना मी समजावत असे- ‘अरे, त्या माझ्या सहकारी आहेत. आपल्या वस्तीत येतात याचे आपण स्वागत करायला हवे. माझ्याशी लग्न करुन इथे राहणे ही त्यांच्या कामाची पावती कशी काय असू शकते?’

पण यातल्याच एकीने माझ्याशी लग्न केले. समजून-उमजून. वस्ती, घर, आई-वडील सगळे सगळे बघून. तिला घरी संघर्ष करावा लागला. आई-भावंडांनी साथ दिली. पण वडिलांचा विरोध तीव्र होता. विरोधाचे कारण जात. तिला घरातून बाहेर पडावे लागले. ज्या वस्तीत आम्ही राहत होतो, तिथे तिला काय सोसावे लागले हे कळायचे असेल तर ‘सैराट’मधील आर्ची-परशा पळून जाऊन ज्या घरात राहतात, ते घर डोळ्यासमोर आणा. ज्या शौचालयात जाताना आर्चीला कसंनुसं होत होतं त्यापेक्षा वाईट स्थिती आमच्या सार्वजनिक शौचालयांची होती. तिने हे सोसलं वगैरे म्हणणे तिला फारसे पटत नाही. तिची भूमिका असते- ‘ती माझी निवड होती. आयुष्यात काय हवंय याची मला स्पष्टता होती.’ त्यामुळे मीही तिने काय व कसे सोसले हे जाहीरपणे सांगण्याचे किंवा त्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करण्याचे धारिष्ट्य अजून तरी दाखवलेले नाही.

चळवळीतले सहकारी म्हणून वस्तीतल्या तसेच बाहेरच्या अनेक कामांत आम्ही एकत्र असू. पण घर चालवणे, सांभाळणे व उभे करण्यात तिचाच वाटा आहे. आमचे लग्न झाले तेव्हा मी पंचविशीत व ती तेवीस वर्षांची होती. ती शिकत होती. त्याचवेळी मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. चळवळीतल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने तिचे शिक्षण व नोकरी मिळेपर्यंतचा काळ आम्ही निभावला. आई-वडिलांची आजारपणं, अन्य नातेवाईकांचे करणे ही जबाबदारी तिने अधिक उचलली. वस्तीतल्या तसेच गावातल्या लोकांशी तिच्या दोस्तीने माझे त्यांच्याशी नव्याने संबंध तयार झाले. मी कार्यकर्ता होतो. मांडणी करण्यात मला गती होती. पण व्यक्ती-व्यक्तींशी हृदयाचे नाते जोडून त्यांना संघटित करण्यातले तिचे कसब माझ्यात नव्हते.

आम्ही संघटनेत एकत्र होतो. पण जेव्हा जोडीदार म्हणून विचार करण्यासाठी भेटलो, त्या दिवसाला उद्देशून मी जे लिहिले व तिला दिले त्यातल्या शेवटच्या काही ओळी अशा आहेतः

हे २५ जून १९८८,
उगवलास अन् मावळलास त्याच सूर्यास्ताने
जगरहाटीचे, रुढ नियमांचे बाज सांभाळत;
तरीही
उसळलास माझ्या आत-भोवती
किनारा गिळू पाहणाऱ्या समुद्रलाटांचे तुफानणारे श्वास होऊन,
मात्र उसळलास, तुफानलास, झेपावलास एवढेच नाही;
तर गेलास याच्याही पल्याड आणि-
शांतवलास आदिम ज्वालाडोह,
तुफानणाऱ्या लाटांना दिलीस हलक्या समुद्रगाजेची कुजबुज,
बेमुर्वत आषाढसरी झाल्या कारंज्याची थुईथुई,
काळ्या मेघांची भयकारी गुहा छेदून दिलेस
निरभ्र आकाश
पिवळे, शांत, निळे
ज्यात पाखरांचा विहार
मनसोक्त, मुक्त, संथ...

भौतिक स्थितीत तसेच चळवळीत ज्या काही लाटा वरखाली व्हायच्या त्या होत राहिल्या. पण आमच्या नात्याचे हे निरभ्र, मुक्त, संथत्व आजही ढळलेले नाही. उलट त्याला आता एक प्रौढ गहिरेपण आलं आहे. खरं म्हणजे आता आम्ही अनेक जबाबदाऱ्यांतून बऱ्यापैकी मुक्त आहोत. आम्ही दोघेच एकत्र असणे, जाणे हे आता अधिक होते. लग्नावेळी आमचा हनिमून होऊ शकला नाही. पण आता ‘हनिमूनी’अवस्था ही नित्यावस्था आहे.

आणि याला ‘तिची’आठवण बाधा होत नाही. काळाचा अगदी लहान पण मनाचा मोठा अवकाश व्यापणारा तो टप्पा डायरीसारखा सोबत राहिला. पुढेही राहील. मंद. तेवत. कधीतरी झुळूकीने ज्योत हलेल. मोठी होईल. एवढेच.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________

पुरुष उवाच, दिवाळी. २०१७

No comments: