‘हमरस्ता नाकारताना’ हे सामाजिक कार्यकर्त्या सरिता आवाड यांचे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले आत्मचरित्र. पुस्तक लिहीत असताना आणि ते प्रकाशित झाल्यावर मला त्यांचा फोन आला. विचारवेध, दक्षिणायन आदि उपक्रमांतून त्यांच्याशी कार्यकर्ता या नात्याने माझा संपर्क-संवाद होता. त्यातून माझ्या सामाजिक व वैचारिक पार्श्वभूमीचा त्यांना परिचय झाला होता. त्यामुळे या पुस्तकाबद्दल - मुख्यतः त्यांच्या नवऱ्याविषयीच्या माझ्या अभिप्रायाबद्दल त्यांना उत्सुकता होती. पुस्तक वाचून मी त्यांना पत्र लिहिले. ते वैयक्तिक होते. पण आता लक्षात आले की काही संदर्भ व संबोधने वगळता ते तसे वैयक्तिक राहत नाही. शिवाय जे म्हणून वैयक्तिक आहे, ते लेखिकेनेच नावानिशी मोकळेपणाने लिहिले आहे. म्हणजेच वैयक्तिक आधीच सार्वजनिक झाले आहे. मग मी लिहिलेला अभिप्राय तरी वैयक्तिक ठेवण्यात काय हशील? म्हणूनच लेखिकेच्या अनुमतीने हा अभिप्राय सार्वजनिक करत आहे.
__________________________________
प्रिय सरिता आवाड,
सविनय स्नेह.
‘हमरस्ता नाकारताना’ हे तुमचं आत्मचरित्र वाचून खाली ठेवलं आणि तुम्हाला लिहायला बसलोय. मुद्द्यांचा विचार केलेला नाही. संदर्भ, अवतरणे काढलेली नाहीत. सरळ लिहायला सुरु केले आहे. आता जसे जे मनात येईल ते नोंदवत जाणार आहे.
मला कल्पना आहे, तुम्हाला उत्सुकता आहे ती तुमच्या नवऱ्याबाबत, म्हणजे रमेशविषयीच्या माझ्या प्रतिक्रियेची. आम्ही दोघेही बौद्ध. पुरोगामी चळवळीशी संबंधित. दोघांचेही आंतरजातीय लग्न झालेले. त्यामुळे अशी उत्सुकता तुम्हाला असणे स्वाभाविकच. पुस्तक वाचायला घेताना मलाही तुमच्या दोघांचे नाते, तुमचा संसार, सासर, त्यात तुम्हाला कसे स्वीकारले गेले, तुमच्या घरच्यांनी कसा प्रतिसाद दिला, हे समजून घेण्याची घाई होती. आणि पुस्तकाची पाने कशीही उलटता, वाचता येत असल्याने थेट तुम्हा दोघांचे नाते सुरु होते, तिथे मी जाऊही शकत होतो. पण तसे केले नाही. कोठून, कसा, किती पाहायचा याचे आपल्या हाती नियंत्रण नसलेल्या थिएटरमधील सिनेमाप्रमाणे पुस्तक मी आरंभापासून शांतपणे वाचत गेलो. सुरुवात, शेवट, मध्य अशा कुठेही उड्या मारल्या नाहीत. त्यामुळे तुमच्या चरित्राचे एक सलग व समग्र चित्र उलगडायला मदत झाली.
तुमच्या दोन्ही आजोळांतले ब्राम्हणी वातावरण मला अपरिचित नाही. म्हणजे त्यात प्रत्यक्ष वावरलो आहे असे नव्हे. नावाजलेल्या लेखकांत ब्राम्हणच बहुसंख्य असल्याने त्यांचेच साहित्य माझ्याकडून प्रारंभी अधिक वाचले गेले. त्यात जरठ-कुमारी विवाह, विधवांची करुण स्थिती हे सार्वत्रिक संदर्भ असत. पण ते खूप जुने, ऐतिहासिक असेच वाटत. माझ्या भोवतालच्या ब्राम्हण कुटुंबांत पती-पत्नीच्या वयात तब्बल तीस वर्षांचे अंतर माझ्या पाहण्यात नव्हते. तुमच्या दोन्हीकडच्या आज्या ९-१३ वर्षांच्या आणि त्यांचे नवरे, म्हणजे तुमचे आजोबा ४०-४२ वर्षांचे. या आज्या कुमारिका आणि आजोबा पुनर्विवाहाची धर्माने परवानगी असलेले विधुर. थ्रीडीच्या आभासी वास्तवातील डायनॉसोर एकदम अंगावर येतो, तसे हे वास्तवातील भयंकर विजोड स्त्री-पुरुष नातेसंबंध माझ्या अंगावर आले. अगदी तुमच्या आज्यांपर्यंत हे असेल असे वाटले नव्हते. अर्थात ते माझे अज्ञान होते. माझ्या या अज्ञानाला अजून एक कारण म्हणजे माझ्या स्वतःच्या किंवा माझ्या परिचयाच्या कोणाच्याच घरात असा इतिहास नव्हता. विधुर वा विधवा असत. पण ठरवले तर दोघांचीही पुन्हा लग्ने होत असत. हा प्रश्न उच्चवर्णीय ब्राम्हण समकक्ष जातींचा होता. आपल्या वडिलांच्या किंवा त्याहून मोठ्या वयाच्या पुरुषांशी या मुली कशा रत होत असतील, त्यात काय आनंद त्यांना मिळत असेल, याची मला कल्पनाच करवत नाही. ज्या स्त्री-पुरुषांची स्वतःची निवड असते, त्याला वयाचा हा संदर्भ गैरलागू आहे हे मी मानतो. पण माणसाच्या इच्छेचा काहीही विचार न करता रीत, धर्म म्हणून हे केले जाते, त्यावेळी काय? परांडे आजीच्या जवळपास समवयीन असलेल्या जावयाबद्दलच्या अस्फुट भावनांचा उल्लेख तुम्ही केला आहेच. काहीही न उमलता, किंवा उमललेलं कुस्करुन टाकत धर्माच्या नावाने निर्माल्य होणं हे केवळ भयंकर आहे!
सगळ्या रीतीभाती सांभाळत घर उभं करणाऱ्या या कर्तृत्ववान परांडे आजीची पुढे नावारुपाला आलेली कर्तृत्ववान लेक म्हणजे तुमची आई - प्रसिद्ध लेखिका सुमती देवस्थळी. तुमच्याशी माझा परिचय अलीकडे काही वर्षांचा. पण तुमच्या आईंचे लेखकपण बऱ्याच वर्षांचे ठाऊक असलेले. लोकसत्तेत तुमच्या या आत्मकथनाचा सुप्रसिद्ध लेखिका आसलेल्या आईला (नावाचा उल्लेख न करता) उद्देशून लिहिलेला अंश प्रसिद्ध झाला, त्यावेळी माझी उत्सुकता चाळवली. नंतर कळले सुमती देवस्थळी या त्या लेखिका. त्यांचे हे लेखिका म्हणून नावारुपाला येणे नंतरचे. अगदी लहानपणापासून त्यांच्यात काही स्वतंत्र वृत्तीचे अंकुर, जिद्द होती, तरीही त्या शिक्षण सोडून पारंपरिक लग्न-संसाराला सामोरे गेल्या. तो संसार एकीकडे निभवत असताना त्याच्याशी, नवऱ्याशी त्या समरस होऊ शकल्या नाहीत. स्वतःच्या शोधाचा संघर्ष त्यांच्या आत धुमसत राहिला. राहिलेले शिक्षण पुरे करत, नोकरी करत पुढे त्यांनी स्वकर्तृत्वाने प्रथितयश लेखिकेचा मुक्काम गाठला. अर्थात, त्यांची अस्वस्थता, संसारातील आधे-अधुरेपणाची त्यांना त्रस्त करणारी भावना काही संपली नाही. प्रतिष्ठेच्या या मुक्कामावर पोहोचताना किंवा पोहोचल्यावरही त्यांच्या मनातल्या प्रतिष्ठेच्या रुढ चौकटी काही ढिल्या झाल्या नाहीत. या चौकटीतल्या प्रतिमेप्रमाणे मुलगी म्हणून तुम्हाला घडवायचे त्यांनी अपार प्रयत्न केले. रमेशच्या तुमच्या निवडीने ही चौकट मुळासकट उध्वस्त झाली. एका मोठ्या लेखिकेच्या मनातही पारंपरिक जात-वर्गाच्या श्रेणी इतक्या बळकट असू शकतात, याची प्रचिती वाचकाच्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेला धक्का लावतेच. पण तुम्हाला लेक म्हणूनही आईचे वागणे, तिचे रमेशच्याविषयी अनुदार उद्गार खूप धक्कादायक होते, हे कळते. आईचा हमरस्त्याचा आग्रह तुम्ही नाकारलात. स्वतःचे जग स्वतः घडवायला बाहेर पडलात.
भूमिकेच्या, विचारांच्या पातळीवर मी तुमच्या बाजूने असलो तरी तुमची आजी, तुमची आई व तुम्ही या तिघींतही एक समान स्फुल्लिंग मला आढळते. ते म्हणजे असलेली स्थिती मुकाट न स्वीकारता आपापल्या परीने ती बदलण्याची जिद्द. त्या अर्थाने हमरस्ता तुमच्याबरोबरच आधीच्या या दोघींनीही आपापल्या संदर्भात सोडलेला आहे, असे मला वाटते. दिल्या घरी यथास्थिती त्या राहिल्या नाहीत. अर्थात, तुमच्या बंडखोरीतून एका नव्या, आधुनिक जीवनाची वाट प्रशस्त होते. पारंपरिक प्रतिष्ठेच्या, सुखाच्या चौकटी तुम्ही नाकारल्यात. तुमच्या सुखाची व्याख्या वेगळी होती. त्यामुळे तुमच्या हमरस्ता नाकारण्याची प्रत निश्चित वेगळी आहे. आजीला जे शक्य नव्हते, ते ‘नवे’ रमेश व तुमच्या नात्याचा स्वीकार करुन तुमची आई रचू शकली असती. पण त्यांच्या नवरा, कुटुंब याविषयीच्या अपेक्षाभंगातून आलेले कुचंबलेपण, त्याला प्रतिक्रिया म्हणून बहुधा त्यांनी स्वीकारलेले पारंपरिक प्रतिष्ठेचे मापदंड या नव्याच्या पुरस्कारापासून त्यांना परावृत्त करायला मदतनीस झाले. जातिव्यवस्थेने दिलेले उच्चनीचतेचे, प्रतिष्ठेच्या चौकटीचे संस्कार अर्थात असणारच. ते भेदण्यास वा सहन करण्यास त्यांना ताकद न द्यायला या कुचंबणेचा मोठा हातभार लागला असे मला वाटते. तुम्हाला मिळालेला काळाचा आजी-आईच्या पुढचा टप्पा, युक्रांदसारख्या पुरोगामी संघटनांचा तसेच मार्क्स-आंबेडकरादि वैचारिकतेचा परिसर तुमच्या निर्णयप्रक्रियेला ताकद देणारा होता.
तुम्हा तिघी स्त्रियांचे (आजी, आई व तुम्ही) चैतन्य जे या पुस्तकातून व्यक्त होते, ते तुमचे आजोबा, वडिल आणि अगदी पुरोगामी नवरा या पुरुषांचे होत नाही. रमेश हुशार, आयआयटीत असलेला. आंबेडकर, मार्क्स आदिंचे वैचारिक साहित्य वाचलेला. त्यांची प्रभावी मांडणी करणारा. चळवळींत वावरणारा. प्रारंभी बिनलग्नाचे एकत्र राहण्याची अट घालणारा. म्हणजेच पारंपरिक विवाह चौकटीवर प्रश्न उभा करणारा. तरीही या चौकटी मोडण्याच्या दर्शनी चिन्हांच्या आत सहजीवनाचा परस्परांच्या आदराने, विश्वासाने फुलणारा आशय त्याला तुमच्या वर्णनाप्रमाणे गवसलेला दिसत नाही. रमेशच्या शेवटच्या वीस दिवसांत तुम्हाला यातले काही प्रत्ययास आले. परंतु, त्यानंतर तो गेलाच. त्या आधीचे त्याचे जे वागणे तुमच्या वाट्याला आले, त्याबाबत ‘पुरुषप्रधानतेचा आणि दलितद्वेषाचा बळी’ असे तुम्ही त्याचे वर्णन केले आहे. तुमच्या नात्या-गोत्यातून, काही प्रतिष्ठित पुरोगामी उच्चवर्णियांकडून रमेशबाबत जे बोलले गेले, जो व्यवहार झाला, तो निश्चित दलितद्वेषाचा निदर्शक आहे. ते केवळ रमेश या व्यक्तीबद्दलचे मापन नाही. सार्वजनिक ठिकाणच्या अस्पृश्यतेच्या आम्ही कठोर विरोधात आहोत. पण थेट आमचे जावई अस्पृश्याने होणे हे पुरोगामी उच्चवर्णियांतील एका विभागाला आजही सहन होत नाही.
तुमच्या ब्राम्हणी परिसराचे वर्णन औत्सुक्याने वाचत होतो. पण रमेशचा प्रवेश सुरु झाला आणि मी काळजातून त्याच्याशी, त्याच्या घराशी, भावा-वहिनींशी, त्यांच्या मुलांशी आणि मुख्य म्हणजे वडिलांशी जोडला जाऊ लागलो. रमेश व माझा रुढार्थाने जातीचा, सामाजिक थराचा परिसर एक आहे. रमेशच्या मनातील खळबळी, सिगरेट, दारु, वर्तनाची वैशिष्ट्ये माझ्या परिसरातील मित्रांत मी पाहिलेली, अनुभवलेली आहेत. मी या सगळ्यांत पुरेपूर असलो तरी मी थेट तसा होऊ शकलो नाही. पण माझ्यासारखे अपवाद होते. रमेश प्रातिनिधिक आहे. उच्चवर्णियांच्या मान्यतेची आकांक्षा आणि त्याचवेळी त्यांच्या नजरेतून स्पष्ट-अस्पष्ट झोंबणारी जातश्रेष्ठत्वाची अहंता यांत विद्रोही दलित युवक पिचतो. काहींचे मग अगदी चिपाड होते. टीआयएसएस, मुंबई विद्यापीठ किंवा अन्य नामांकित संस्थांमधील हुशार, कर्तबगारी करु शकण्याची क्षमता असणाऱ्या दलित विद्यार्थ्यांचे हे व्यवच्छेदक लक्षण असल्यासारखे मला जाणवत आले आहे. यातले अनेक कुठच्या ना कुठच्या वस्तीतून आलेले असतात. पण त्यांना पुन्हा तिथे जाऊन त्या लोकांच्यात काही करण्याची इच्छा उरत नाही. पँथर, मागोवा, युक्रांदच्या काळाचा अपवाद केला, तर उच्चशिक्षित असतानाही सर्व झुगारुन दलित-शोषितांच्या लढ्यात पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याची धमक आता दिसत नाही. हे लक्षण सार्वत्रिक आहे. पण जो विभाग अजूनही खूप मागे आहे, त्या दलित विभागातील, ते मागासपण, ती वंचितता, ती वेदना सोसलेल्या वा समजून घेऊ शकणाऱ्या दलित युवकांत याला अपवाद असावेत, अशी माझी अपेक्षा असते. मी अशा अनेकांशी सतत संपर्क करत असतो. त्यांना वस्तीत नेण्याचा प्रयत्न करत असतो. पण नाही होत ते. त्यांना कुठेतरी वर पोहोचायचे असते. त्यांच्या जीविताची सार्थकता त्या वरच्या जगात-स्तरात कुठेतरी त्यांना जाणवत असते.
रमेशच्या तुमच्या वर्णनात दादरच्या मुंबई मराठीच्या (ग्रंथसंग्रहालयाच्या) पायरीचा उल्लेख आहे. तो वाचून माझ्याही जुन्या आठवणी वर आल्या. मी आठवी-नववीपासून या पायरीवर ज्येष्ठ मित्रांसोबत बसत असे. पण रमेशचा संबंध आल्याचे आठवत नाही. रमेशच्या मित्रांतले वसंत पाटणकर मला एम. ए. च्या शेवटच्या वर्षाला ८८-८९ च्या सुमारास शिकवायला होते. अशोक बागवेंचा परिचय होता. निळूशी (निळकंठ कदम) खूप जवळचे नसले तरी मैत्रीचे संबंध आजही आहेत. तुम्ही दोघंही माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठे आहात. तुम्ही टीआयआयएसमध्ये तुमच्या वसतिगृहातून राज कपूरचा बंगला पाहत होता, त्यावेळी सातवीत असलेला मी त्याच बंगल्याजवळून भाड्याची सायकल चालवत असे. मी चेंबूर स्टेशनच्या लेबर कॅम्प, लोखंडे मार्ग परिसरातील झोपडपट्टीत जन्मलेला व तिथेच वाढलेला. लग्न झाल्यानंतर ६-७ वर्षांनी तिथले वास्तव्य सोडले. पण चळवळीच्या कामासाठी आजही त्याच परिसरात वावरत असतो. आपल्या वयातल्या या अंतरामुळे तुम्ही मंडळी पॅंथर, मागोवा, युक्रांद यात लढत असताना आम्ही केवळ पाहत होतो. त्या वातावरणाचा दणाणता ठसा मनावर उमटण्याइतपत सजग नक्की होतो. पॅंथरच्या नेत्यांच्या मोर्च्यांत, सभांत घोषणा देत सहभागी होत होतो. पण त्यातले सगळे बारकावे त्यावेळी उमगत नव्हते.
रमेशच्या घरातले आतिथ्य, समावेशकता हे आमचे सगळ्यांचे वैशिष्ट्य होते. माझी आई त्यावेळच्या गरिबीतही कुटुंबातल्या गरजेपेक्षा अधिक स्वयंपाक करत असे. येणारे जाणारे जेवून जाणे हे नित्याचे असे. घरी आलेल्याला आवर्जून जेवायला घालणे यात खरोखर आईला, वडिलांना आनंद होई. १० बाय १८ च्या आमच्या झोपडीत सरासरी १५ माणसे राहत. रात्री सगळीच तिथे झोपू शकत नसत. उरलेली घराच्या कडेला, रस्त्यावर, जागा मिळेल तिथे पथारी टाकत. पण समावेशकतेचे हे वैशिष्ट्य हे त्या समाजाचे नसून त्या अवस्थेचे होते, हे तुमचे निरीक्षण बरोबर आहे. शिक्षित, सुस्थित फ्लॅटधारी विभक्त दलित कुटुंबात हे चित्र दिसत नाही. काही वैशिष्ट्ये जुन्या संस्कारांमुळे काही काळ राहत असली तरी ती विरुन जाण्याचा वेगही जास्त असतो.
आई-वडिल म्हातारे आणि मीच थोरला. त्यामुळे माझी बायको व मी घरातले कर्ते. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आम्हाला होते. त्याचबरोबर या सर्वांना सांभाळण्याची जबाबदारीही होती. सकाळी मी पीठ मळायचो, ती लाटायची, मी शेकायचो...ढीगभर चपात्या करायला लागायच्या. पहाटे सार्वजनिक नळावर मी किंवा धाकट्या भावाने पाणी भरणे, हा स्वयंपाक आणि धुणे हे सगळे करुन ती नोकरीला आणि मी चळवळीच्या पूर्णवेळ कामाला निघत असे. मी नसलो तर तिलाच हे करावे लागे. रमेशच्या घरी थोरली भावंडे असल्याने तुम्ही दोघं स्वतंत्र राहू शकलात. हे राहणेही कसे कष्टप्रद होते, त्याचे वर्णन तुम्ही केलेच आहे. सिमेंट-काँक्रिटच्या शौचालय असलेल्या घरातून माझी पत्नी झोपडपट्टीत आली. तिने किती सहन केले असे कोणाला वाटले, तरी तिच्या जगण्याचे सार्थक नक्की ठरले होते, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे ती अशा सहानुभूतीला प्रतिसाद देत नाही. तुमची निवड ‘रमेश’ होती. त्यामुळे तुमचे सुस्थित घरातून अवनत अवस्थेत येणे, त्याचे ताण सहन करणे मी समजू शकतो. या काळात तुम्हाला चळवळीतल्या अनेक मित्रमंडळींनी साथ दिली. आम्हालाही अशी साथ मिळाली. तुमच्या वाट्याला आलेले संशयाचे मन उद्ध्वस्त करणारे ताण आमच्या नात्यांत आले नाहीत, पण त्याची तीव्रता समजू शकतो.
या सगळ्या प्रवासात तुमचे टिकणे, नव्या जिद्दीने जीवनाला सामोरे जाणे, नवी नाती तयार करणे विलक्षण आहे. स्पंजासारखे सगळे कडक कंगोरे सोसून संबंध जपणारे तुमचे व्यक्तित्व व जगण्याचे उद्दिष्ट ओळखणारी वैचारिक बेगमी याला कारण आहे. साठीनंतर तुमचे प्रेमात पडणे, लैंगिक स्वातंत्र्याची भूमिका असलेला जुना मित्र सचोटीचा जोडीदार लाभणे या क्लायमॅक्सचे सुखद आश्चर्य वाटते. त्याच्या कोवळ्या उबदार उन्हासारखे सान्निध्य आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला मिळते आहे, हे तुमचा हा सगळा प्रवास वाचलेल्या माझ्यासारख्या तुमच्या हितचिंतकाला समाधान देते.
सरिताच्या या आनंदसघन खळखळ वाहण्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
स्नेहांकित,
सुरेश सावंत
_______________________________
हमरस्ता नाकारताना
सरिता आवाड
राजहंस प्रकाशन
पृष्ठेः २८७ | मूल्यः रू. ३५०
______________________________
(आंदोलन, नोव्हेंबर २०१९)
No comments:
Post a Comment