Friday, November 1, 2019

संवादाचा दुस्तर घाट पार करण्यासाठी

“मैं आपकी सभी बातों से मुआफिक नहीं हूँ. फिर भी आपसे बात करना चाहता हूँ. हमारे मदरसा में आप जरुर आईएगा.” 

मौलवींच्या या वक्तव्याने मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. वास्तविक ‘मुआफिक’ या शब्दाचा नेमका अर्थ मला ठाऊक नव्हता. पण संदर्भाने अंदाज आला. माझ्या मांडणीतल्या सर्व बाबींशी ते सहमत नसले तरी माझ्याशी संवाद, संपर्क ठेवू इच्छितात एवढे उमगले. ‘जरुर बात करेंगे’ असे मी त्यांना म्हणालो. नंतर शब्दकोशात पाहिले. मुआफिक हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ अनुकूल असा आहे, असे समजले. म्हणजे माझा अंदाज बरोबर निघाला. 

संविधानातल्या मूल्यांचा प्रचार-प्रसार हा हल्ली माझा मुख्य व्याप बनला आहे. त्यासाठीची शिबिरे, सत्रे, व्याख्याने यांसाठी शाळा, कॉलेज, वस्त्या असे जमेल तिथे जात असतो. जमेल त्या लोकांना भेटत असतो. बहुधा सहमतीत असणाऱ्या नेहमीच्या पुरोगामी वर्तुळाच्या पलीकडच्या समुदायांना भेटण्याचा प्रयत्न असतो. अशाच एका सत्रावेळी हे मौलवी भेटले. 

हे मौलवी माझ्या म्हणण्याला पूर्ण अनुकूल नव्हते. तरीही मला कृतकृत्य का वाटले? 

मतभेदासहित ते माझ्याशी संवाद ठेवू इच्छित होते. अशा संवादाला मी खुला आहे हा विश्वास माझ्या मांडणीतून त्यांच्यापर्यंत पोहोचला, याचा मला आनंद झाला. भोवतालच्या वाढत्या असहिष्णू वातावरणात, समविचारी मंडळींचे सहज कंपू होत असलेल्या काळात, भिन्न मतांच्या माणसांशी संपर्क-संवाद दुरापास्त होत असलेल्या माहोलात या मौलवींना हा विश्वास मी देऊ शकलो, हे माझ्या कृतकृत्यतेचे कारण आहे. 

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश ही माणसे संवादाला-मतभिन्नतेला मोकळी होती. त्यांच्या म्हणण्याशी मुआफिक नसलेल्यांना त्यांच्याशी बोलता आले असते. थेट तोंडावर टीका करता आली असती. त्यांच्या मतांचा प्रतिवाद करणारे लेख लिहिता आले असते. सभा घेता आल्या असत्या. सनदशीर निदर्शने करता आली असती. पण त्यांच्या मतांना विरोध असलेल्या काही कडव्या विरोधकांनी चक्क त्यांना संपवले. त्यांचे खून केले. त्या देहांची वाचा कायमची बंद केली. त्यांच्याशी संवादाची शक्यताच संपवली. 

काही देहांची वाचा बंद करुन काही काळ दहशत माजवता येते. हा काही काळ दीर्घही असू शकतो. पण ही स्थिती कायमस्वरुपी असू शकत नाही. काळाचे अनेक वळसे पडून कमी-अधिक सशक्त प्रतिरोध उभे राहतातच. याला जगाचा इतिहास साक्षी आहे. त्याला कारण माणसाची घडण. विविध संदर्भात ती समजून घेऊ. 

माणूस फक्त ध्वनी काढून अन्य प्राण्यांप्रमाणे दुसऱ्या माणसाला इशारे देत नाही. अन्य प्राण्यांपासून वेगळा होऊन माणसात उत्क्रांत होत असताना त्याला विचारशक्ती लाभली. ही विचारशक्ती त्याच्या अनुभवाच्या संचितावर आधारलेली असते. प्रत्येक मनुष्याचे अनुभव व त्याला प्रतिसाद देणारी त्याची विचारशक्ती, भावनाशीलता यांचे स्वरुप एकसारखे नसते. साहजिकच प्रत्येक मनुष्य आणि त्याचा विचार अनन्य असतो. वैचारिक वर्गवारीत ढोबळपणे एका विचाराची माणसे असे आपण म्हणत असलो, हितसंबंधांच्या सारखेपणामुळे ही माणसे एका गटात दिसत असली, तरीही ती हुबेहूब एका विचाराची नसतात. तशी असलीच तर ती माणसे असू शकत नाहीत. मतांचे व विचारप्रक्रियेचे साम्य नसलेली माणसे जीवनव्यवहार एकत्र करत असतात. टारझनसारखी एकटीच रानात वेलींवरुन झोका घेत, झेपावत नसतात. टारझनही कुकारा देतो. पण तो मुख्यतः प्राणी पातळीवरचा असतो. कुटुंबात, शाळा-कॉलेजात, कार्यालयात, समाजात, देशात जे काही माणसे करत असतात, ते परस्परांशी क्रिया-प्रतिक्रिया करत. ही क्रिया-प्रतिक्रिया आपापतः होत नाही. ती सहेतुक, विचारपूर्वक होत असते. संवाद हे त्याचे प्रमुख माध्यम असते. माणसाचे हे नैसर्गिक वास्तव आहे. 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाचा गणपती बसवणे ही काही फार विचार करण्याची बाब नव्हे. तरीही मंडळाची बैठक होते. त्यात मूर्तीचा आकार, स्वरुप, देखावा, वर्गणी यांची चर्चा होते. वेगवेगळी मते येतात. त्यातून सहमती साधावी लागते. ती नाही साधली तर भांडणे होतात. तट पडतात. मंडळ फुटते. दोन वेगळे गणपती बसतात. वेगळे गणपती बसवणाऱ्यांनाही आपल्या गटात चर्चेची प्रक्रिया करावीच लागते. गणपती याबाबत सद्बुद्धी द्यायला अक्षम असतो. माणसांनाच ती जबाबदारी पार पाडावी लागते. मते वेगळी म्हणून मंडळ फुटून वेगळा गणपती इथवर ठीक. पण जर यात कोणी कोणाचा उपमर्द केला-हिशेबावरुन, पुढे पुढे मिरवण्यावरुन; तर आवाज चढतात, मारामाऱ्या होतात, प्रसंगी रक्त सांडते. याला माणूसजात म्हणून आपण कबुली देतो का? ..नाही देत. बोला. बोलून प्रश्न सोडवा. नसेल पटत तर वेगळे व्हा. कोणी कोणाला आडवे येऊ नका, असाच सल्ला शहाणीसुरती माणसे देतात. कुटुंब, मंडळ, देश, जग या माणसांशी संबंधित सर्व क्षेत्रांना हे शहाणपण लागू असते. 

राष्ट्राबाबतीत सूत्र हेच पण परिमाण मोठे असते. साहजिकच त्याचे परिणामही व्यापक असतात. चांगले तसेच वाईटही. स्वातंत्र्य चळवळीत अनेक हितसंबंधांचा मेळ साधत, स्वतंत्र भारत काय दिशेने पुढे न्यायचा यावर सहमती विकसित करत आपण पुढे सरकलो. आपल्यातील एका विभागाला आपण या सहमतीत नाही आणू शकलो. त्याने आपला दुसरा देश केला. ही प्रक्रिया रक्तलांच्छित झाली. ती अपरिहार्य होती का? ..जे झाले ते झाले. आता तो भूतकाळ आहे, असे म्हणून नाही चालत. संवादाचे पूल कोठे ढासळले, तिथे काय कमकुवत होते, हे आज शोधणे निरर्थक नाही. आपल्या त्या भूतकाळाचे ओझे आणि ताण अजूनही आहेत. दोन्हीकडचे काही लोक त्या वेळच्या जखमांवर खपल्या धरुच देत नाहीत. या जखमा भराव्यात, नव्या तयार होऊ नयेत यासाठी संवादाच्या पुलामधील कमकुवत जागा शोधून त्या दुरुस्त कराव्या लागतील. नवे पूलही बांधावे लागतील. 

काश्मीर प्रश्नावर बोलताना इम्रान खान आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, याची पुन्हा पुन्हा आठवण करुन देत आहेत. याला उत्तर आमच्या भारताकडेही अणुबॉम्ब आहे, एवढेच असू शकते का? आमच्याकडे किमान लोकशाही आहे. इथले लष्कर लोकनियुक्त प्रतिनिधींचे आदेश ऐकते. पाकिस्तानमध्ये पंतप्रधान बाहुला आहे. लष्कर खरे सत्ताधारी आहे. त्या देशात अंतर्गत लोकशाही संवादाची वानवा आहे. कोणीही अणुबॉम्ब टाकला तरी दोन्हीकडे संहार होऊ शकतो, हे वास्तव आहे. म्हणून या वास्तवाला घाबरून कोणी तो मार्ग अनुसरणारच नाही, या विवेकाची खात्री आज देता येत नाही. आत्मघाती पथके, स्वतःच्याच लोकांना मारणाऱ्या तालिबानी वृत्ती हे नव्या जगाचे एक ठळक वास्तव आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊन लोकशाहीचा गळा घोटणारे आणि जग टाचेखाली आणण्याचे मनसुबे रचणारे माथेफिरु सत्तास्थानी गेलेले, जात असलेले आपण आजच्या जगात बघत आहोत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ‘राष्ट्र म्हणजे सर्वसहमतीने जगणे, राष्ट्र ही सांघिक संवादाच्या अनुभवाची पद्धती असते.’ आपल्या देशातल्याच एका विभागाला न विचारता, त्याच्याशी कोणताही संवाद न साधता, त्याच्या नेत्यांना बंदिवान करुन त्याच्या विभाजनाचा, त्याला घटनेने दिलेल्या खास अस्तित्वाचा अधिकार आपण तांत्रिक लोकशाहीने काढून घेतो. काश्मिरच्या विभाजनाचा आणि ३७० कलम काढून घेण्याचा जो निर्णय संसदेत झाला, ती केवळ बहुमताच्या ताकदीने रेटलेली तांत्रिकता होती. लोकशाही बहुमताच्या यांत्रिक प्रक्रियेवर टिकत नसते. अल्पसंख्याकांशी संवाद, त्यांना सुरक्षित वाटेल असा बहुसंख्याकांचा व्यवहार हे लोकशाहीचे अभिन्न अंग असते. बाबासाहेब आंबेडकर, पं. नेहरु यांसारख्या संविधानाच्या-देशाच्या रचनाकारांनी हे सतत अधोरेखित केले आहे. बाबासाहेब म्हणतात तो सांघिक संवाद आज देशात पायदळी तुडवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. हा देशांतर्गत संवाद मजबूत असणे, त्या आधारे अन्य देशांशी संवाद करणे यातूनच आपण व तेही टिकू शकतात. पुढे जाऊ शकतात. 

माणूस प्राण्यांहून वेगळ्या रीतीने उत्क्रांत झाल्याचा उल्लेख वर आलाच आहे. अन्य प्राण्यांप्रमाणे जगणे हा एकच हेतू वा प्रेरणा माणसाची नसते. हे जगणे कसे असावे याबाबत त्याची भूमिका असते. काही मापदंड असतात. केवळ भौतिक सुख त्याला पुरेसे नसते, त्याच्या जगण्याची शान त्याची अस्मिता, स्वत्व शाबूत राहण्यात असते. काश्मिरी जनतेला कितीही सुखसुविधांचे प्रलोभन दाखवले, या सुविधा प्रत्यक्षात आणल्या, तरीही ती ज्याला स्वत्व मानते ते तिने गमावल्याची भावना तेथील बहुसंख्याकांची राहणार. ३७० कलम किती पातळ झाले होते किंवा आता ते निरर्थकच आहे, हे काश्मिरबाहेरच्यांचे म्हणणे असू शकते. जे काही माझे होते, जसे होते, ते तुम्ही मला न विचारता, माझ्याशी कोणताही संवाद न करता हिरावून घेतलेत, ही काश्मिरी जनतेची वेदना असणारच. तिला कोणत्याही स्पष्टीकरणाने वा भौतिक सुखसुविधांच्या आश्वासनांनी वा अंमलबजावणीने उतार पडणार नाही. खड्या सैन्याच्या जोरावर, चहुकडून नाकेबंदी करुन, त्यांच्या नेत्यांना कैदेत टाकून काश्मीर शांत ठेवण्याला मर्यादा पडणारच. जेव्हा कधी हे पहारे उठतील, त्यावेळी उद्रेक होणे अटळ आहे. भारताच्या सांघिक रचनेचा भाग काश्मीरचा भूप्रदेश नव्हे, तर तेथील जनता आहे. बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे ‘राष्ट्र ही सांघिक संवादाच्या अनुभवाची पद्धती’ असेल, तर काश्मिरी जनतेशी संवाद करावाच लागेल. मनाने माणसे आधी वेगळी होतात, नंतर घरे तुटतात. देशाचेही तसेच असते. सैन्यबळाच्या जोरावर काश्मीरचा भूगोल आमच्या ताब्यात असेल, पण तेथील जनतेची मने देशापासून तुटलेली असतील. 

भारतीय जनतेला आपण हे समजावणार कसे? बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादाचा ज्वर चढतोच आहे. या ज्वराधीनतेत अल्पसंख्याक मुस्लिमांची प्रतिमा तिला विकटच दिसते. घरातले सगळे सेक्युलर असलेल्या आमच्या एका सहकाऱ्याला मध्यंतरी आलेला अनुभव हादरवणारा आहे. त्याचा लहान मुलगा मॉलमध्ये एका टोपी व दाढी असलेल्या मुस्लिम माणसाकडे बोट दाखवत म्हणाला- ‘Papa, see the bad guy!’ 

या मुलाला मुस्लिम मनुष्य वाईट असतो, हे घरातून तर कळले नव्हते. म्हणजेच, शेजारीपाजारी, त्याचे मित्र बोलतात त्यातून, अन्य नातेवाईकांच्या बोलण्यातून, तो जिथे शिकतो तेथून त्याच्या कानावर असे काही संवाद आले असतील, ज्यातून मुस्लिम मनुष्याबद्दलची त्याच्या मनात अशी प्रतिमा तयार झाली. 

म्हणूनच, जनतेला असे संवाद करु नका असे समजावत राहावे लागेल. आज जरी ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसली तरी तिच्याशी संवाद चालू ठेवावा लागेल. कोवळ्या मुलांची मनेही कोवळी असतात. त्यावर उमटणारे ठसे खोल असतात. कुटुंबातले लोक एकत्र गप्पा मारत बसले असताना एखाद्याविषयीचे मतभेद सरळपणे मांडावेत. आपल्या बोलण्यातून एखाद्या समूहाची खलनायकी प्रतिमा मुलांच्या मनात तयार होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी, असे आवाहन तिला करत राहावे लागेल. आपल्याच मुलांची मने आपण नासवतो, हे पटवत राहावे लागेल. 

आज संवादाचे घाट दुस्तर झालेत हे खरे. एका बाजूला खाई, दुसरीकडे ढासळणारे कडे अशातून आपण चाललो आहोत. असे असले तरी आपली परंपरा ही संवादाची आहे, हे विसरुया नको. अमर्त्य सेन भारतीयांचे वर्णन ‘Argumentative Indian’ (वाद-संवादप्रिय भारतीय) असे करतात. याच शीर्षकाच्या पुस्तकात आपल्या संस्कृतीतील त्याची कितीतरी उदाहरणे ते देतात. त्यांचे स्मरण जागवावे लागेल. वर्तमानातली अशी उदाहरणे पुढे आणावी लागतील. भारतीय विविधतेचे स्वाभाविक सूत्र मतमतांतरे, संघर्ष, संवाद यांसह एकत्रित प्रवाहित राहणे हे आहे. त्याचे धार्मिक मान्यता वा भाषा कशाच्याही आधाराने एकसाचीकरण करणे हे त्याच्या स्वाभाविक प्रकृतिविरोधात आहे. एकसाचीकरणाची छेडछाड काहींना यशोगामी वाटली तरी तिची अंतिम परिणती भारतीयत्वाची विण उसवण्यातच होऊ शकते. म्हणूनच परस्पर संवादी भारतीयत्वाचे धागे बळकट करण्यातच देशाचे हित आहे. 

संवाद हरवण्याला प्रतिगामीच कारण असतात असे नाही. पुरोगाम्यांतही आपल्यालाच सत्य गवसल्याचा आणि आपली बाजूच बरोबर असल्याचा अहंगंड मुबलक आढळतो. प्रतिपक्षावर वार करणे, वकिली युक्तिवादाने त्याला नामोहरम करणे, त्याची खिल्ली उडवणे हे त्यांना लढ्याचे मार्ग वाटतात. या मार्गांनी प्रतिपक्षाशी सहमत असणाऱ्या सामान्यजनांच्या समजात भर पडून ते आपल्या बाजूला येणे सोडाच; ते अधिकच दुसऱ्या बाजूला जातात. ज्या बुद्धाविषयी पुरोगामी वर्तुळात बरीच आस्था असते, त्या बुद्धाच्या ‘सम्यक वाचा’ या तत्त्वाचे आचरण करणारे या वर्तुळात अल्पसंख्याक आहेत. 

व्यक्तीच्या अनुभवाला, वाचनाला, चिंतनाला त्याच्या जीवनकालाची, मिळालेल्या परिसराची, त्याच्या आकलनक्षमतेची मर्यादा असते. त्याला कळले ती सत्याची एक बाजू असू शकते. अशाच मर्यादा असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला कळलेली बाब आणखी वेगळी असू शकते. अशा अनेकांनी विनम्रतेने परस्परांशी संवाद केला, त्यांना कळले ते समजून घेतले, अगदी कट्टर विरोधकाशीही आदराने चर्चेची तयारी ठेवली, तरच समग्र सत्याच्या आकलनाच्या दिशेने अधिक पुढे जाता येईल. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ याचा अर्थ हाच आहे. 

संवादाचे आजचे दुस्तर घाट सहज-सोपे करण्यासाठी हीच भूमिका व वृत्ती हवी. ती अंगात बाणली तर विरोधी मतांच्या माणसांना देहाने संपवणे मग निरर्थक होऊन जाईल. ‘मैं आपसे मुआफिक नहीं हूँ’ हे मोकळेपणाने सांगितले जाईल. कुणाची खिल्ली उडवणे, त्याला नामोहरम करणे यांत कोणाला रस उरणार नाही. हितसंबंधांचे विरोध, मतभेद जरुर राहतील. त्यावर उदंड चर्चा झडत राहतील. वादविवाद होत राहतील. सामान्यजन त्यातले पटेल ते स्वीकारतील. जे पटले त्यावरही पुढे प्रश्न उभे राहतील. त्यांच्या सोडवणुकीचा क्रमही हाच राहील. 

हे सगळे आदर्श स्वप्न आहे ना? ...हो. आहे! पण अशक्य आहे का? तुम्ही ‘नाही’ म्हणावे अशी अपेक्षा आहे. पण ‘हो’ म्हणालात तर? ...तर मी म्हणेन, ‘मैं आपसे मुआफिक नहीं हूँ.’ 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुरुष उवाच, दिवाळी, २०१९)

No comments: