सर्व प्रमुख धर्म हजार ते चार हजार वर्षे जुने आहेत. तथापि, मनुष्यमानसावरील त्यांचा प्रभाव, समाजजीवनातील त्यांचा हस्तक्षेप आजही ताजा आहे. सृष्टीतली अनेक रहस्ये उलगडणारे आजच्या इतके प्रगत विज्ञान नव्हते, सार्वजनिक व राजकीय व्यवहाराचे नियमन करणारे संविधान किंवा राष्ट्रराज्य नव्हते, अशा काळात या गरजा धर्म भागवत होता. ती गरज आता उरलेली नसतानाही धर्माला माणसांच्या मनात तसेच सामाजिक जीवनात कळीचे महत्व आहे. मध्ययुगीन राजेशाहीच्या काळातील सम्राट अकबराने ‘दीने इलाही’ नावाचा नवा धर्म काढण्याचा प्रयत्न केला, हे समजू शकतो. पण आधुनिक काळातील महात्मा फुले यांनाही ‘सार्वजनिक सत्यधर्म’ स्थापावासा वाटतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बुद्धाचा धम्म आपल्या लाखो अनुयायांसह अनुसरावासा वाटतो याचे गमक काय?
म्हणजेच व्यक्तीची, समाजाची काहीएक महत्वाची गरज धर्म आजही भागवतो. संविधान, राष्ट्रराज्य, विज्ञान किंवा अन्य कोणतेही घटक ही गरज भागवायला अपुरे पडतात. म्हणूनच ज्यांना समाजाच्या गतीचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना समाज अधिक न्याय्यपूर्ण बनवायचा आहे, त्या अभ्यासक किंवा कार्यकर्त्यांना धर्माला टाळता येत नाही. समाजबदलाच्या दिशेचा वेध घेण्यासाठी धर्माच्या आजच्या प्रयोजनाचा, लोकमनातील व लोकजीवनातील त्याच्या अस्तित्वाच्या संदर्भांचा विचार करावाच लागतो. एक सामाजिक-राजकीय कार्यकर्ता म्हणून (व त्या मर्यादेत) या लेखाद्वारे तोच प्रयत्न मी करतो आहे.
काही संकल्पनांचे स्वरुप आधी नक्की करु.
ज्याला आपण धर्म म्हणतो त्याचा अर्थ सगळीकडे एक नाही. ज्यांना आपण नंतर धर्म म्हणू लागलो त्यांनी त्यांच्या स्थापनेच्या वेळी त्याला धर्म म्हटलेच होते असे नाही. ख्रिस्ती आणि इस्लाम हे Religion आहेत. म्हणून पाश्चात्यांनी आपल्याकडच्या धर्मांनाही त्याच दृष्टीने पाहिले व रिलिजन म्हटले. आपणही ख्रिस्ती व इस्लाम यांना धर्म म्हटले. एकमेकांचे भिन्न भाषांतले समानार्थी शब्द म्हणून वापरत असलो तरी रिलिजन व धर्म यांचा अर्थ एक नव्हे. आपल्याकडे धर्म हा शब्द कर्तव्य वा कर्तव्यांची सूची या अर्थाने आहे. एक गॉड किंवा अल्ला, एक धर्मग्रंथ, एक संस्थापक, सर्वसाधारण विधींचे निर्देश ही ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्माची वैशिष्ट्ये हिंदू धर्माला वा त्याआधीच्या वैदिक धर्माला लागू पडत नाहीत. हिंदू धर्माचा एक संस्थापक, एक ईश्वर, एक धर्मग्रंथ, उपासनेची सर्वसाधारण समान रीत नाही. बौद्ध व जैन धर्मांत ईश्वरच नाही. बौद्ध धर्मात भिख्खूंसाठी दीक्षा होती. सर्वसामान्य उपासकासाठी असा दीक्षाविधी नव्हता. ज्याला आज आपण हिंदू म्हणतो, ती हिंदू संज्ञा हिंदूंच्या प्राचीन ग्रंथांत आढळत नाही. म्हणजेच आधी जे अस्तित्वात होते त्याचे नंतर नामकरण केले गेले. भारतात प्राचीन काळापासून असलेल्या विविध संप्रदायांचा संच म्हणजे आजचा हिंदू धर्म असे म्हटल्यास वावगे ठरु नये. जगण्याची पद्धत (Way of life) असे त्यास म्हटले जात असले, तरी तीही एकसारखी नाही, असे हे धर्माचे स्वरुप होते. वैदिक चाणक्याचा शिष्य चंद्रगुप्त जैन होतो, चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार वैदिक धर्म स्वीकारतो तर बिंदुसाराचा मुलगा अशोक बौद्ध बनतो. आजोबा, पिता व मुलगा तिघांचे तीन वेगळे धर्म. सम्राट अशोक बौद्ध तरी त्याच्या राज्यात सर्व धर्मांच्या प्रति समान व्यवहार. धर्म या संज्ञेच्या अर्थाचा व स्वरुपाचा हा असा विस्तृत प्रवाही अवकाश आहे.
तरीही आज मात्र हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आदिंना आपल्याकडे सरसकटपणे धर्मच म्हटले जाते. आणि ते रिलिजन या अर्थानेच. या संज्ञांचा इतिहास काहीही असला तरी समाजमानसात त्यांचा आजचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे रिलिजन.
आता पुढची संकल्पना- अध्यात्म. धर्म आणि अध्यात्म हे एकच आहे का? नाही. म्हणजे धर्माचा अध्यात्म हा घटक असतो. पण अध्यात्म हे विशिष्ट धर्माशी जोडलेले असलेच पाहिजे असे नाही. ईश्वर, स्वर्ग, नरक मानण्याशीही अध्यात्माचा संबंध नाही. ईश्वरी शक्तीवर विश्वास असलेला तसेच असा विश्वास नसलेला निरीश्वरवादी माणूसही आध्यात्मिक असू शकतो. मी आध्यात्मिक आहे पण माझा कोणताही धर्म नाही, मी आध्यात्मिक आहे पण मी ईश्वर मानत नाही, असे म्हणणारे लोक जगात खूप आहेत. रजनीश, जे कृष्णमूर्ती यांचे पंथ आध्यात्मिक आहेत. पण त्यात रुढ अर्थाने देव नाही. गोयंकागुरुजींची विपश्यना याच प्रकारची. अध्यात्म याचा ढोबळ अर्थ- स्वतःचा शोध. मी कोण आहे, माझे या सृष्टीशी, अन्य मनुष्यमात्राशी नाते काय, माझ्या जीवनाचा हेतू काय अशा प्रश्नांचा शोध अध्यात्मात मोडतो. अध्यात्म ही अगदी वैयक्तिक प्रक्रिया आहे. रिलिजन या अर्थी धर्म ही सामूहिक बाब आहे. धर्मातले लोक वैयक्तिक पातळीवर आध्यात्मिक असू शकतात. तसेच धर्माला मानणारे पण अजिबात आध्यात्मिक नसलेले लोक असू शकतात. बहुसंख्य तसेच असतात. धर्माचे विधी, कर्मकांडे, जपजाप्य, सण-समारंभ, तीर्थयात्रा नित्यनेमाने करणारे लोक आध्यात्मिक असतातच असे नाही. तर हे काहीही न करणारे लोक पूर्णपणे आध्यात्मिक असू शकतात.
ज्या काळात सृष्टीची कोडी आजच्यासारखी विज्ञानाने उलगडलेली नव्हती, त्यावेळी निसर्गाच्या विविध रुपांविषयी अचंबित होऊन तसेच त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून त्यांना भजणारी सूक्ते मानवाने गायली. त्यांच्या कृपेसाठी अनुष्ठाने, कर्मकांडे केली. पण आता विज्ञानाने हे सर्व उलगडल्यावर त्यांची गरज काय? राज्यरचना कशी असावी, कोणाची कर्तव्ये काय असावीत, कोणत्या गुन्ह्यांना कोणत्या शिक्षा असाव्यात, उत्पन्नाचे वितरण कसे व्हावे यासाठी घटना व राज्याचे प्रशासन, दंडसंहिता असताना धर्माचे काम काय? कोणताही धर्म न मानता आजच्या व्यवस्थेत मी जगू शकतो. या व्यवस्था नसण्याच्या काळात मला ते शक्य झाले नसते. आज व्यक्ती म्हणून मला याबाबतीत मोकळीक आहे. घटनेने मला उपासनेचे तसेच उपासना न करण्याचे, धर्म मानण्याचे तसेच धर्म न मानण्याचे स्वातंत्र्य मूलभूत अधिकार म्हणून दिला आहे. तरीही बहुसंख्य लोक धर्माचा अंगिकार करतात. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर धर्माचा पुरस्कार करतात.
विज्ञान सृष्टीची रहस्ये उलगडते, त्यातील घटनांची कार्यकारणपरंपरा विशद करते. मात्र माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगत नाही. विज्ञान नीती शिकवत नाही. विज्ञान अणूचा वापर काय काय प्रकारे करता येऊ शकतो, याच्या शक्यता सिद्ध करते. पण या तंत्राच्या सहाय्याने अणुबॉम्ब बनवून हिरोशिमा-नागासाकीवर टाकून माणसांच्या कित्येक पिढ्या बरबाद करायच्या की ऊर्जेसाठी, आरोग्य चिकित्सेसाठी, पदार्थ टिकविण्यासाठी त्याचा वापर करायचा हा निर्णय विज्ञान देत नाही. तो निर्णय माणसे, त्यांचे शासन घेते. हे शासन स्वतः जगा, इतरांनाही जगू द्या सांगणारे असू शकते. त्याच्या घटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही तत्त्वे असू शकतात. ही नीतीतत्त्वे आहेत. त्यांना कायद्याचे स्वरुप असू शकते वा भविष्यातील राज्यासाठीचे ते दिशादिग्दर्शनही असू शकते. विज्ञानाने न घडणारी कामे जर राज्य व घटना करत असेल, तर मग धर्माची गरज काय? घटना लिहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. म्हणजेच धर्म करत असलेली अजून अशी काही महत्वाची कामे आहेत, जी घटना किंवा राज्य करु शकत नाही.
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- ‘धर्म माणसाला आशा देतो. त्यामुळेच गरिबांना धर्माची अधिक गरज आहे.’ मार्क्स धर्माला अफू म्हणतो, हे आपण लाख वेळा ऐकलेले आहे. पण ते विधान करण्याआधीची दोन विधाने आपल्यापर्यंत पोहोचतात असे नाही. तो म्हणतो- ‘धर्म हा पीडितांचा निःश्वास आहे, तो हृदयहिन जगाचे हृदय आहे. आत्माहिन परिस्थितीचा तो आत्मा आहे. ती माणसांची अफू आहे.’
ज्या समाजात सगळी माणसे न्याय्यपूर्ण, सर्व भौतिक सुख-सुविधा असलेले व त्या भोगण्याची उसंत असलेले जीवन जगत नाहीत, जिथे आजही प्रचंड विषमता व त्यापोटी येणारी मानसिक असुरक्षितता आहे, तिथे धर्म दिलासा देतो. आधार देतो. माणसांना परस्परांशी माणुसकीने वागण्याची प्रेरणा देतो. त्यासाठीची आत्मिक ताकद देतो. अर्थात, या आधाराने बाहेरची विषम स्थिती बदलणार नसते. ती सहन करण्याची शक्ती धर्म देतो. ऑपरेशनवेळी वेदना कळू नयेत म्हणून भूल दिली जाते. हे भुलीचे काम पूर्वी अफू करे. या अर्थाने आजच्या स्थितीत अफू उपयुक्त आहे. पण दुखणे तसेच ठेवून त्याची वेदना कळू नये म्हणून धर्माचा वापर होण्याने मूळ दुखणे दूर होणार नाही. त्यासाठी बाहेरची स्थिती बदलली पाहिजे. त्यासाठीचा संघर्ष अनिवार्य आहे. त्याला धर्म अडथळा होता कामा नये. धर्माचे हे आभासी स्वरुप म्हणूनच दूर झाले पाहिजे, अशी मार्क्सची मांडणी आहे.
बाबासाहेब आंबेडकर पारंपरिक बौद्ध धर्म नाकारुन ‘नवयान’ स्वरुपात जो धम्म देतात तो असे आभासी समाधान देत नाही. हा बौद्ध धर्म ईश्वराचा संदर्भ घेत नाही. आत्मा नाकारतो. अधिक नेमकेपणाने सांगायचे तर बुद्ध अज्ञेयवादी (Agnostic) आहे. देव आहे की नाही या चर्चेत वा त्यासंबंधीच्या अंतिम निष्कर्षात तो पडत नाही. सृष्टीच्या उत्पत्तीची कोणतीही चमत्कृतीपूर्ण कथा तो सांगत नाही. सृष्टीचा कोणीही निर्माता नसून ती विकसित झालेली असल्याचे सांगतो. जग अनित्य, परिवर्तनशील आहे, माणसे मर्त्य आहेत, ही वस्तुस्थिती मांडतो. जन्म व मृत्यू यातील जीवन ही हकिगत आहे. हे जीवन कसे सुंदर करायचे याचा मार्ग बुद्ध सांगतो. म्हणूनच मार्क्सला वाटणारी चिंता बाबासाहेबांना वाटत नाही. बौद्ध धम्म माणसाला जीवन सुंदर करण्यासाठीचा संघर्ष करायला परावृत्त करत नाही. आत्मसंतुष्ट करत नाही. बाबासाहेबांनी याची पराकाष्ठेने दक्षता घेतली आहे. मात्र त्यांच्यानंतर बौद्ध धर्माचे आचरण म्हणजे काय, याबद्दल ज्या काही बाबी वा विचार प्रचारण्यात येत आहेत, त्यांत मार्क्स म्हणतो तशी गडबड होऊ शकते. त्यातील एक भाग विपश्यना आहे. विपश्यना याचा अर्थ विशेष प्रकारे पाहणे. या ध्यानाच्या सरावाने साक्षीभावाची ताकद मिळते. तो मनाचा व्यायाम आहे. मनाचे हे स्थैर्य अंतिम लक्ष्य मानले तर गडबड होते. विपश्यनेने मिळालेली मनाच्या स्थैर्याची ताकद भोवतालचे दुःख निर्माण करणारे विषम जग बदलण्यासाठीचा संघर्ष करायला मदतच करते. मात्र केवळ विपश्यनेने प्रत्येक माणूस बदलण्याचे लक्ष्य ठेवल्याने सामाजिक-राजकीय व्यवस्था बदलत नाही. प्रत्येकाने विपश्यना करावी असा प्रचार, प्रयत्न जरुर करावा. पण तो समाज बदलण्याचा पर्यायी मार्ग नव्हे. तो तसा समजणे म्हणजे मार्क्सचे म्हणणे खरे होणे होय. बाबासाहेब बसलेला बुद्ध की उभा बौद्ध अशी चर्चा करुन उभा बुद्ध प्रचारतात ते यासाठीच.
महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म धर्म स्वीकारण्याचे आवाहन करतात. त्याचवेळी त्यांच्या चळवळी, संघर्ष चालू आहेत. हा धर्म त्यांना या संघर्षातून अलिप्त करत नाही. तर तो या संघर्षाचा एक भाग असतो. सर्व अनिष्ट रुढींना फाटा देत, मांग, मुस्लिम, ब्राम्हण सर्वांना बंधुपरी पोटाशी घेणाऱ्या नव्या समाजरचनेचा तो नमुना असतो. पुन्हा यातही हाच धर्म स्वीकारण्याचा आग्रह नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने विविध धर्मांची पुस्तके अभ्यासून त्यांना पटणारा धर्म स्वीकारण्यास फुले प्रोत्साहन देतात. अशा विविध धर्ममतांचा स्वीकार केलेली माणसे एका कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदावीत, असे त्यांचे स्वप्न आहे. सेक्युलर घटना लिहिणारा महामानव डॉ. आंबेडकर जन्माला येण्याआधी मृत्यू पावलेल्या महात्मा फुलेंचे हे द्रष्टेपण वा उद्दिष्ट किती महान होते, ते आपल्याला यावरुन कळते.
मानसिक असुरक्षिततेच्या काळात लोक अधिक धार्मिक होतात, हे आपण पाहतो. पण सारं काही नीट असतानाही माणसे धार्मिक असतात. या सृष्टीच्या उत्पत्तीची कितीतरी रहस्ये उलगडली, जगात देव नाही हे स्टिफन हॉकिंगने सिद्ध केले असले तरी बहुसंख्य माणसांना धर्म लागतो. पूर्ण विवेकवादी ती बनत नाहीत. अवकाशात यान सोडतानाही शास्त्रज्ञांकरवी धार्मिक पूजा केली जात असल्याचे आपण पाहतो. अवकाशयानाच्या तयारीच्या शास्त्रात ते ईश्वराला किंवा त्याच्या चमत्कारांना गृहीत धरत नाहीत. मात्र या अनंत, असीम विश्वाच्या पसाऱ्याचा नियंता म्हणून कुठेतरी त्यांना ईश्वर दिलासा देत असतो. तो पार करण्याची ताकद फार कमी शास्त्रज्ञांत व डॉक्टरांच्यात असते. सामान्यांचे तर विचारुच नका. म्हणूनच समाजवादी क्रांतीनंतरही लोक रशियात चर्चमध्ये किंवा चीनमध्ये बुद्धविहारात जायचे थांबत नाहीत. जेव्हा त्यांवर काही बंधने आणण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी लोकांनी लष्करी ताकदीला घाबरुन बंड केले नसेल, पण ते अत्यंत अस्वस्थ मात्र झाले. सोव्हिएट कोसळल्यावर आणि चीनमध्ये थोडी मोकळीक मिळाल्यावर लोकांचे धर्मस्थळांमध्ये जाणे प्रचंड वाढले.
माणसाच्या मनाच्या गुंत्यांचा निरास विज्ञान किंवा मानसशास्त्र पूर्णपणाने करु शकत नाही. त्याला धर्म हा आधार लागतोच असे आजही दिसते. नजिकच्या भविष्यात यात बदल होण्याची संभावना नाही. अशावेळी हा आधार मानव्यपूर्ण, करुणावंत कसा असेल, माणसाला परावलंबी करणारा नसेल याकडे आपण लक्ष द्यायला हवे. धर्माचे नव्हे, तर त्यातील कशाचे उच्चाटन करायचे याचा विवेक विवेकशील म्हणवणाऱ्यांना करावा लागेल.
आपापल्या मूर्ती कवटाळून परस्परांचे कोथळे काढणाऱ्या अरबस्थानातील टोळ्यांना एक करताना भेदांचे कारण म्हणून मूर्तींना उद्ध्वस्त करुन त्याजागी निराकार अल्लाची स्थापना करणारा इस्लाम हे प्रगत पाऊल होते. पण कोणतीही मूर्ती हाच अधर्म मानणे हा मूलतत्त्ववाद होतो. धर्माचे मर्म हरवून त्यातील सूत्राचा कर्मठ अर्थ लावणे, विवेकाला, ऐतिहासिकतेला मूठमाती देणे म्हणजे मूलतत्त्ववाद. शेकडो वर्षांची निर्मिती असलेले, असंख्यांनी आपले श्रम व कला ओतलेले बामियानचे विशाल बुद्धशिल्प तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे तालिबानचे कृत्य हा या मूलतत्त्ववादाचा क्रूर नमुना. बायबलमध्ये पृथ्वी सपाट असल्याचे म्हटले आहे. म्हणून गॅलिलिओचे पृथ्वी गोल आहे हे म्हणणे पोपच्या दृष्टीने धर्मद्रोही ठरते. गॅलिलिओपुढे विधान मागे घेणे वा देहदंड स्वीकारणे हा पर्याय ठेवला जातो. गॅलिलिओ नाईलाजाने जीव वाचावा म्हणून पहिला पर्याय स्वीकारतो. पुढच्या इतिहासात गॅलिलिओचाच जय होतो. आज ख्रिस्ती जगत बायबलमध्ये लिहिले आहे म्हणून पृथ्वी सपाट मानून व्यवहार करत नाही. धर्माच्या नावाने ख्रिश्चनांनी क्रुसेड्स तर मुस्लिमांनी जिहाद केलेत. अशी धर्मयुद्धे हिंदूंत दिसत नसली तरी धर्मरक्षणासाठी शंबुकाचा शिरच्छेद करणे, ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना बहिष्कृत करणे, तुकोबांना सदेह वैकुंठाला पोहोचविणे अशी कैक पापे हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी केली आहेत. आम्ही म्हणू ते धर्ममत. त्याला आजची कायदेव्यवस्था आड येत असेल तर तीही आम्ही धुडकावून लावू म्हणणारी या ठेकेदारांची परंपरा आजही जिवंत आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या ही या मूलतत्त्ववादी हिंदूंची अधम करणी आहे.
मूलतत्त्ववादाला कायम राजकीय हितसंबंधांसाठी वापरले जाते. अमेरिका-सोव्हिएट शीतयुद्धात तालिबान्यांना अमेरिकेने पोसले. भारत आपल्या गोटात येत नाही, म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी पाकिस्तानातील धार्मिक दहशतवाद्यांना तसेच आपल्याकडच्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना शस्त्र तसेच ते चालवण्याचे प्रशिक्षण अमेरिकन शासकांनीच दिले. बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे हे केवळ धार्मिक मूलतत्त्ववादी काम नव्हे, तो मूलतत्त्ववादाचा वापर करुन झालेली अव्वल राजकीय कृती होती. त्याची फळे मोदींच्या सत्तारोहणानंतर आपण भोगतो आहोत. संविधानाची शकले उडवण्याचा बेछूट तालिबानी कार्यक्रम अहर्निश चालू आहे. धर्माला राजकारणात खेचण्याने, धर्माच्या नावाने राष्ट्र उभारण्याने लोकांचे कल्याण होत नाही हे सिद्ध झालेले आहे. इस्लाम हा सामायिक धर्म आहे म्हणून अरबस्थान एक राहिला नाही. इराण-इराक संघर्ष शमला नाही. आपल्याच बौद्ध धर्माची माणसे आहेत म्हणून जपानने चीनवरील हल्ले सौम्य केले नाहीत. सेक्युलर भारतापासून फुटून धर्माच्या आधारावर स्थापन झालेला पाकिस्तान एक राहिला नाही. भाषा, संस्कृती व पश्चिम पाकिस्तानची प्रभुत्वशाली वृत्ती या कारणांनी बांगला देश अलग झाला.
धर्माचे निर्मूलन नव्हे, तर राजकारण, मूलतत्त्ववाद यांतून धर्माला सोडविणे हे प्रगतीशील प्रवाहाचे आजचे लक्ष्य हवे. धर्माला देशाच्या, भाषेच्या सीमा नाहीत. मुसलमानांचा पाकिस्तान म्हणून हिंदूंचा हिंदुस्तान हे अवास्तव व गैर आहे. उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे, म्हणून ती मुसलमानांची भाषा आहे हा चुकीचा समज आहे. उर्दू ही भारतीय भाषा आहे. ती उत्तरेकडील मुस्लिम व हिंदू दोहोंत प्रचलित आहे. सामाजिक सण-उत्सव, प्रार्थना स्थळे यादृष्टीने धर्माचे सामाजिक स्वरुप हानिकारक नाही. मात्र आस्थेच्या पातळीवर धर्म वैयक्तिक बाब राहणे याकडे आपण सरकायला हवे. आजही त्याचा लग्न, वारसा आदि बाबींत जो सामाजिक संबंध आहे, तो हलक्या हाताने, प्रबोधन करत दूर करायला हवा. केवळ कायद्याच्या ऑपरेशनने ते साधणार नाही. भारतीयत्वाची ओळख ठळक करणाऱ्या विशेष विवाह कायद्याचा वापर करण्यासाठी तरुण पिढीला प्रोत्साहन द्यायला हवे. कोणत्याही धर्माशिवायचे अध्यात्म मानणारी माणसे वाढली तर ते चांगलेच आहे. ही माणसे भले वैयक्तिक मुक्तीचा ध्यास धरत असतील. पण ती दुसऱ्याला हानी पोहोचावी असे कृत्य करत नाहीत. तसे झालेच तर ते त्यांना स्खलन वाटते. धर्माच्या नावाने हिंसेला त्यांचा विरोधच असतो. ती जात्याच सेक्युलर असू शकतात. घटना वा राष्ट्र राज्याचे नियमन याच्या पलीकडे जाणारे, मानसिक पातळीवर अधिक स्वीकृत होणारे नियमन धर्माचे असते. त्यासाठी वारकरी, सूफी, बाऊल असे संप्रदाय त्यांच्या निखळ स्वरुपात पसरायला हवेत.
हजारो वर्षांचा धर्म व अध्यात्माचा प्रवास आजही चालू आहे, समाजमनात तो घट्ट रुतलेला व रुजलेला आहे. आगामी काळातही तो राहणार आहे. हे कबूल करुन केवळ नव्हे, तर नीट समजून घेऊन, त्याच्याशी जोडून घेऊन, त्यातील वावगे ते दूर करण्याचे व पोषक ते टिकवण्याचे, संवर्धित करण्याचे प्रयास करणे हे आजचे पुरोगामी कार्य आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(पुरुष उवाच, दिवाळी २०२०)
2 comments:
धर्म ही संकल्पना आणि धर्म ही बाब दोन्हीही सतत बदलत आले आहेत आणि आज अत्यंत विकृत अवस्थेत पोहोचले आहेत. धर्म आणि अध्यात्म या दोन बाबी भिन्न असून त्या कायम भिन्नच राहिलेल्या आहेत आपण अशी मांडणी केलेली आहे परंतु फार पूर्वी धर्म आणि अध्यात्म या दोन वेगळ्या संकल्पना नव्हत्या. प्राचीन काळी धर्म ही एक संकल्पना होती मात्र ही संस्था अशी बाब नव्हती. प्रथम धर्म हा पंथाच्या संस्थात्मक रूपात आला. ही संस्था संन्यासी लोकांपुरतीच मर्यादित होती. तिला सामाजिक आणि राजकीय आयाम नव्हते. सेमिटिक रिलिजन्सच्या संपर्कात भारतीय धर्म आल्यानंतर भारतीय धर्मांना सामाजिक आयाम चिकटले. आज निदान भारतात तरी सर्व धर्म राजकीय आखाडे, राजकीय पक्ष झाले आहेत. धर्म मानसिक स्वास्थ्य प्रदान करतो, कसे? वगैरे वगैरे बाबी तपशीलाने मांडणे गरजेचे आहे. त्यावर आपण कधीतरी चर्चा करूया.
धर्म ही केवळ व्यक्तिगत बाब तर होतीच परंतु ती केवळ जीवन जगण्यात मानसिक आधार मिळविण्या पुरती मर्यादित नव्हती. धर्माने मनोबल प्राप्त करावे आणि बाहेरच्या जगातला बाहेरचा संघर्ष करावा अशासाठी तर अजिबातच नव्हती. माणसाच्या जीवन जगण्यात, बाहेरचा एक संघर्ष आहे, असतो, हे निश्चित. परंतु तो संघर्ष आधी माणसाच्या आत मध्ये निर्माण होतो. ज्यांच्या आत मध्ये संघर्ष आहे अशी माणसे बाहेरचा संघर्ष उभा करतात. आतला संघर्ष ज्यांचा मिटला आहे ती माणसे आतूनही शांत होतात आणि बाहेरचा संघर्ष निर्माण करीत नाहीत. म्हणून आतला संघर्ष, तो नेमका काय असतो, कसा निर्माण होतो, त्याची चिकित्सा करणे म्हणजेच धर्माचे आचरण करणे आहे. आज जीवन गतिमान झाले आहे तसा बाहेरील संघर्ष वाढला आहे. परंतु त्याचे मूळ आतल्या संघर्षात आहे. माणूस आतूनच अस्वस्थ असतो, त्याच्या आत मध्येच आधीच संघर्ष असतो. तो संघर्ष त्याला कळत नसल्याने असा माणूस बाहेरचा संघर्ष निर्माण करतो. ज्यांच्या आत संघर्ष आहे, तो दिवसेंदिवस सहन करण्या पलीकडे जातो आहे, अशा माणसांची संख्या वाढली तर संपूर्ण समाज अस्वस्थ होतो. असे लोक बाहेरचा संघर्ष निर्माण करतात. ज्यांचा आतला संघर्ष मिटला आहे अशा माणसांची संख्या वाढली तर तो समाज स्वस्थ होतो. समाजात माणसे विकली जातात, खरेदी केली जातात, दहशतीखाली असतात, अन्याय सहन करतात, दुसऱ्यांवर सुद्धा अन्याय करतात, याचे कारण त्यांच्या आत मध्ये संघर्ष आहे. प्राचीन काळी धर्म या संज्ञे अंतर्गत हा संघर्ष मिटविण्याची प्रक्रिया होती. धर्म ही संज्ञा आणि धर्म ही बाब आज तर अत्यंत विकृत झाली आहे.
- प्रल्हाद मिस्त्री
Post a Comment