अलिकडेच उत्तराखंडमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लग्नासारख्या छोट्या स्वार्थासाठी हिंदू मुले-मुली धर्म बदलतात हे चूक आहे’, असे मत व्यक्त केले. साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी 'हिंदू-मुसलमानांचा 'डीएनए' एकच आहे, दोहोंचे पूर्वज समान आहेत’ असे ते एका जाहीर सभेत बोलले होते. 'हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व' असे तर ते नेहमीच बोलत असतात. मग मोहन भागवतांना मुलांनी धर्म बदलण्याची चिंता का? भागवतांच्या व्याख्येप्रमाणे असा धर्म बदलणाऱ्यांचे हिंदुत्व व डीएनए तर तोच राहणार आहे.
त्यांच्या म्हणण्याची संगती लागत नाही. कारण एकीकडे उत्तराखंडच्या भाषणात ते पालकांना कानपिचक्या देतात- “आमच्या मुलांना (अशा धर्मांतरास प्रवृत्त न होण्याच्या दृष्टीने) आम्हीच तयार करत नाही. घरातच त्यांना तसे संस्कार देण्याची गरज आहे. आपल्या धर्माबाबत अभिमान, आपल्या उपासनेबद्दल आदर त्यांच्या मनात तयार करायला हवा.” म्हणजे इथे ते हिंदू हा अन्य धर्मांप्रमाणे एक संघटित, विशिष्ट उपासना पद्धती असलेला धर्म (रिलिजन) असा अर्थ घेतात. अनेकविध धारणा, विविध उपासना पद्धती यांना सामावणारे हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व ही इतर वेळची त्यांची भूमिका त्यांना इथे अभिप्रेत नाही. पण पुन्हा लगेचच ते भारतीय परंपरेवर येतात. या परंपरेची प्रशंसा ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी केल्याचा ते उल्लेख करतात. आई-वडिलांची सेवा कशी करायची हे भारतीय परंपरेतून आपण शिकले पाहिजे, असे थॅचरबाईंनी म्हटल्याचे ते नमूद करतात. पुढे बोलताना ते म्हणतात, “वेदांपासून महाभारतापर्यंत आमचे ग्रंथ आम्हाला धर्माचे पालन कसे करायचे ते सांगतात.” वेद, महाभारत यांमधला धर्म हा रिलिजन नव्हे. त्यातला धर्माचा अर्थ नीती, कर्तव्य असा आहे. मार्गारेट थॅचर या नीती धर्माने प्रभावित आहेत. हिंदू रिलिजनने नाही.
भागवत हिंदू धर्म व हिंदुत्व बहुधा वेगळे धरत असावेत. भारतीयत्वात किंवा त्यांच्या संज्ञेनुसार हिंदुत्वात हिंदू, मुसलमान किंवा अन्य धर्मीय या सर्व भारतीयांचा समावेश होतो. कारण त्यांचे पूर्वज समान आहेत. त्यांचा डीएनए एक आहे. मुलांनी आपला धर्म सोडून दुसरा स्वीकारला तरी ते या व्यापक हिंदुत्व वा भारतीयत्वाचाच घटक राहतात. त्याची चिंता असायचे मग कारण नाही. मात्र त्यांना ती चिंता वाटते. म्हणजेच हिंदू हा रिलिजन आहे असे ते मानतात. हिंदुत्वात सगळे सामावतात, मात्र हिंदू हे जन्मानेच असावे लागतात. त्यात दुसरे सामावू शकत नाहीत. त्यातले बाहेर जाऊ शकत नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो.
घोळ होतो आहे. हा हिंदू – हिंदुत्वाचा घोळ भागवत सोडवतील तेव्हा सोडवोत. पण त्यांची आताची चिंता (मुलांनी लग्नासाठी धर्म बदलणे) दूर करण्याचा मार्ग कठीण नाही. तो त्या अर्थाने त्यांच्याच हातात आहे. कसा ते पाहू.
पटलेला धर्म स्वीकारण्याचा अधिकार घटनेने आपल्याला अनुच्छेद २५ नुसार दिलेला आहे. मी माझा जन्मजात धर्म सोडून मला पटलेला दुसरा धर्म स्वीकारु शकतो. उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या हिंदू धर्मात जन्मास आले तो सोडून १४ ऑक्टोबर १९५६ ला ते बौद्ध झाले. त्यांच्या आवाहनाप्रमाणे त्यांच्या लाखो अनुयायांनीही त्यांचे अनुकरण करत हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला. इथे हिंदू धर्म त्यागाची व बौद्ध धर्म स्वीकाराची कारणे बाबासाहेबांनी दिली आहेत. ती कोणाला पटोत न पटोत, पण ती ठोस आहेत, हे कबूल करावे लागते.
लग्नासाठी धर्म बदलणे यात अशी कारणे नाहीत. पहिला धर्म सोडून दुसरा स्वीकारण्यामागे तो पटल्याचा मुद्दा इथे नाही. यात एक तांत्रिक अपरिहार्यता आहे. घटनेने पती-पत्नी म्हणून कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या व्यक्तीची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विशेष विवाह कायद्याची त्यासाठी तरतूद सरकारने केली आहे. या कायद्याखाली लग्न करताना उभयतांपैकी कोणालाही आपला धर्म बदलण्याची गरज नसते. तथापि, यासाठीच्या प्रक्रियेत एक अडचण आहे. या कायद्याखाली एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर एक महिन्याने लग्न करता येते. हा एक महिना विवाह नोंदणी निबंधकांच्या वेब पोर्टलवर कोणाचे काही आक्षेप आहेत का ते विचारण्यासाठी लग्न करु इच्छिणाऱ्या जोडीची माहिती जाहीर केली जाते. या लग्नाच्या विरोधात जर आई-वडिल वा अन्य नातेवाईक वा धर्माचे ठेकेदार असतील तर त्यांना ही एक महिन्याची मुदत व माहिती म्हणजे लग्नात मोडता घालायला आयती संधीच असते. कायदेशीरदृष्ट्या सज्ञान व दोहोंची संमती असेल तर नातेवाईक काहीच करु शकत नाहीत. पण मारहाण, धमक्या, अपहरण या मार्गांनी ते हे लग्न मोडतात. अशा विरोधामुळे तातडीने व लपून-छपून लग्न करु पाहणाऱ्या जोडप्याला हा कायदा आधार देत नाही. त्यासाठी मग धार्मिक विधीचा आधार घेतला जातो. धार्मिक पद्धतीत वधू - वर एकाच धर्माचे असावे लागतात. ज्या एकाचा तो धर्म नसेल त्याला तो पटो वा न पटो केवळ लग्नासाठी जोडीदाराचा धर्म स्वीकारावा लागतो. याला उपाय विशेष विवाह कायद्यातली जाहीर नोटीशीची अट रद्द करणे व या जोडप्याला त्यांनी मागणी केल्यास सुरक्षितपणे महिनाभर गुप्तपणे राहता येईल अशी व्यवस्था सरकारने करणे हा आहे. जीवनाचा साथीदार निवडताना धर्म बदलण्याचे हे अपरिहार्य कारण नक्कीच छोटे नाही.
मोहन भागवत ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आहेत, त्या संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक असलेले नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी आपले संघाशी असलेले नाते सोडलेले नाही. या नात्याचा हवाला देऊन मोहन भागवतांनी मुला-मुलींना लग्नासाठी धर्म बदलावा लागू नये म्हणून विशेष विवाह कायद्यात वर सुचवलेली दुरुस्ती करण्याचे आवाहन मोदींना करायला हवे. ते झाल्यास आपल्या पसंतीचा जोडीदार (मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, आर्थिक स्तरातला असो) मुलामुलींनी निवडावा असे आवाहन मोहन भागवत बिनधोकपणे करु शकतील. यात काही विघ्न येऊ नये यासाठी अशा मुलांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा आदेश त्यांनी संघ स्वयंसेवकांना दिल्यास व्यापक, उदार भारतीयत्व वा त्यांच्या भाषेत हिंदुत्व अधिकच झळाळून उठेल. अशारीतीने हिंदू धर्म व हिंदुत्व दोन्ही सुरक्षित राहतील.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, १७ ऑक्टोबर २०२१)
No comments:
Post a Comment