Saturday, December 3, 2022

पँथर, मी आणि पुढे…


दलित पँथरचा १९७२ साली जन्म झाला त्यावेळी मी ७ वर्षांचा होतो. ७४ ला ती फुटली त्यावेळी ९ वर्षांचा आणि ७७ ला बरखास्त झाली त्यावेळी १२ वर्षांचा. मूळ पँथरचे एकूण आयुष्य पाच वर्षांचे. त्यातील भराचा काळ तसा अडीच-तीन वर्षांचाच. बाकी बरखास्तीपर्यंत आंदोलने होत राहिली तरी तो काळ मुख्यतः नेत्यांच्या वादावादीने व्यापलेला.

९ ते १२ वर्षे या वयातला मी आणि याच वयोगटातले माझे सवंगडी पँथरचे कार्यकर्ते असण्याचा प्रश्न नव्हता. मात्र धुमसणाऱ्या भोवतालातून येणाऱ्या संवेदना-जाणीवांनी आम्ही अंतर्बाह्य सुलाखून निघत होतो. मोर्चे, घोषणा, सभा, दगडफेक, पोलिसांशी झटापटी, तरुणांचे गल्ल्यांतून धावणे, पसार होणे, लपणे, त्यांच्या अंगावरील जखमा, रस्त्यावरील दगड-काचांचा खच आम्ही बघत होतो. नकळत त्यातील घटक होत होतो. घोषणा देत होतो, दगड फेकत होतो, पळत होतो. सकाळी सार्वजनिक शौचालयात रांग लावलेल्यांच्या चर्चा आणि संध्याकाळी-रात्री गल्लीच्या कोपऱ्यावर रंगणाऱ्या गप्पा यातून चळवळीच्या बऱ्याच आतल्या गोष्टी कळत. आपल्या लोकांवर अन्याय होतो आहे, आपली गरीबी, झोपडपट्टी याला आपले नशीब नव्हे; तर सरकार, विषम व्यवस्था जबाबदार आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी आपण लढतो आहोत, असे स्पष्ट-अस्पष्ट जाणवत होते. ‘जयभीम’ तर जन्मापासूनच येता जाता ऐकत होतो, म्हणत होतो. पण मोर्च्यांत आणि सभांतून कानावर पडणाऱ्या ‘जयभीम के नारे पे खून बहे तो बहने दो’ ने रोम न रोम चेतून उठायचा. मोर्च्यात सहभागी झालेल्या भागवत जाधवच्या शहिद होण्याची बातमी वेदना देऊन गेली. पाटलाने डोळे काढलेल्या गवई बंधूंना माझ्या गल्लीच्या कोपऱ्यावर झालेल्या सभेत मी पाहिले आणि आपल्या लोकांवर अत्याचार होतो म्हणजे काय, याचा थेट दाखला मिळाला. आतून रक्त खवळले आणि व्यवस्थेला चूड लावण्याची भावना अनुभवली.

१९७२ सालचा रौप्य महोत्सवी स्वातंत्र्य दिन ‘काळा स्वातंत्र्य दिन’ म्हणून पँथरने जाहीर केला. त्यानंतर ७५ सालच्या २६ जानेवारीला ‘काळा प्रजासत्ताक दिन’ पाळायचे आवाहन राजा ढालेंनी केले. मी पाचवीत होतो. झेंडावंदनाला शाळेत गेलो. पण शर्टच्या खिश्याला काळी फीत लावून. राष्ट्रगीताला उभा राहिलो. पण ते म्हटले नाही. शिक्षकांना सांगितले – ‘आमच्या लोकांवर अत्याचार होत आहेत. आम्हाला अजून स्वातंत्र्यच मिळाले नाही. म्हणून हा निषेध.’ आमच्या वस्तीतलीच म्युनिसिपालिटीची शाळा. शिक्षकांनाही काय भोवताली चालले आहे, ते ठाऊक होते. सगळीकडे काळ्या प्रजासत्ताक दिनाचे फलकही लागलेले होते. शिक्षक काही बोलले नाहीत. माझे त्यांनी ऐकून घेतले. मला काळी फीत काढण्याचा सल्लाही त्यांनी दिला नाही.

आमचा चेंबूरचा लेबर कँप, पेस्तम सागर-पुढे तो पी. एल. लोखंडे मार्ग झाला- हा विभाग राजा ढालेंच्या प्रभावाखालचा. राजा ढालेंची विलक्षण मोहिनी माझ्यावर होती. त्यांची भाषा, त्यांचे अक्षर आणि त्यांचे विचार याचा जबरदस्त पगडा माझ्यावर होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे उद्धारकर्ते आणि म्हणून ते आमचे आराध्य हे जन्म झाल्यावर डोळे उघडल्यापासूनच कळले होते. बुद्ध आणि बाबासाहेब यांचे घरातील, विहारातील, सार्वजनिक ठिकाणचे फोटो, मूर्ती, पुतळे, सोबतच महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमा हे परिचित होते. या सर्वांची माहिती असलेली पुस्तके, नियतकालिके, पत्रके आमच्यापर्यंत पोहोचत होती. पण या महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा अर्थ उलगडत होता तो राजा ढालेंच्या भाषणांतून. माझे वडील आणि काही नातेवाईक तसे बी. सी. कांबळेवाले. या रिपब्लिकन नेत्यांच्या विरोधात पँथरने मोहीम उघडलेली. त्यामुळे या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांत काहीतरी गडबड आहे, एवढे जाणवायचे. पण कळत फारसे नव्हते. आमच्या विभागातील एका सभेला आलेल्या रिपब्लिकन नेत्याला एका पँथरने खाली खेचल्याचे मी पाहिले. पँथरच्या नेत्यांच्या सर्व विद्रोही कृती, बंडखोरी, ज्वलज्जहाल भाषा आम्हाला चेतवत होती. ताकद देत होती. भोवतालच्या अभावग्रस्त स्थितीत विचार व अस्मितेच्या बाबत समृद्ध करत होती. पुढे समाज परिवर्तनासाठी पूर्णवेळ काम करायचे ही धारणा यातूनच माझ्यात रुजू लागली होती.

बी. सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, गवई, खोब्रागडे ही नावे घरातल्या आणि गल्लीतल्या वडिलधाऱ्यांच्या चर्चेत असत. त्यावेळी या मंडळींना मी क्वचितच पाहिले असेन. या चर्चेतून हे लोक मोठे साहेब आहेत, हे कळे. ते गाडीतून येतात. सुटाबुटात असतात, ही प्रतिमा मनात तयार झाली होती. आम्ही पाहत असलेले पँथरचे नेते असे नव्हते. त्यांचा उल्लेख करताना राजा, नामदेव, ज. वि. असा होत असे. ते साहेब नव्हते. हे पँथरचे नेते वस्तीतली सभा उशीरा संपल्यावर तिथेच थांबत. जायला काही साधन नसायचे. मुख्य म्हणजे पैसे नसायचे. वस्तीतच त्यांची जेवणे व्हायची. रात्रभर गप्पा चालायच्या. या गप्पांत सहभागी होण्याइतके आम्ही मोठे नसलो तरी तिथे बसून ऐकत असू. एकदा राजा ढालेने माझ्याकडे बघून ‘याच्याएवढा असताना..’ असे काहीतरी म्हटले. त्यामुळे माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. हे नेते पहाटे पहिल्या लोकलने निघत. ते आमचे, आमच्यातले नेते होते.

या नेत्यांत राजा ढाले आमचा खास हिरो होता. मोर्च्यात ‘राजा ढाले-झिंदाबाद’ म्हणताना मला विशेष आनंद होई. राजाचा प्रत्येक निर्णय हा बरोबरच असणार ही श्रद्धा तयार झाली होती. पँथर विसर्जित करुन मास मुव्हमेंट काढण्याचा राजाचा निर्णय - ना मास कळत होते, ना मुव्हमेंट तरी - बरोबरच असणार यावर माझा विश्वास होता. पुढे मास, मुव्हमेंट आणि इतर बरेच कळू लागल्यानंतरही वयाच्या २५ वीशी पर्यंत राजा ढाले हा माझा नायक होता. तीन वर्षांपूर्वी २०१९ ला तो गेला तेव्हा मी लिहिले होते – ‘माझ्यातल्या दुर्दम्य अस्मितेचे पोषण करणारा नायक गेला.’ यावेळी मी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक होते – ‘राजा ढालेः माझ्यातल्या अस्मितेचा आणि असहिष्णुतेचा नायक’

अस्मितेचा आणि खास करुन असहिष्णुतेचा नायक राजा का, याबद्दल थोडे लिहावे लागेल. नव्याने लिहिण्याऐवजी याच लेखातली काही अवतरणे देतोः

‘काय बदलायचे? आपण कसे व्हायचे? ...याचा माझ्यासमोरचा नमुना राजा ढाले होता. नामदेवचे विद्रोहीपण भावायचे. पण नंतर महत्वाची वाटलेली त्याची भाषा, कवितांतले संदर्भ, वेश्यावस्तीतले कलंदर जगणे कमीपणाचे वाटायचे. जे नासलेले, सडलेले आहे, जो आमचा भूतकाळ आहे त्याची आठवण का जागवायची? ते का पुन्हा रेखाटायचे? ‘बलुतं’ सारख्या आत्मकथनांबद्दलही मला तसेच वाटायचे. राजा त्यातला नव्हता. आपण ‘दलित’ नाही, बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला दलितपणाच्या दलदलीतून बाहेर काढले आणि बौद्ध ही नवी ओळख दिली. ती घेऊन पुढे जायचे, हे राजाचे म्हणणे एकदम पटायचे.’

‘राजाच्या दिसण्याबरोबरच त्याची भाषा, त्याचे अक्षर अप्रतिम होते. त्याच्या अनुकरणाचा मोह स्वाभाविक होता. भौतिक वैभवाची आस बाळगण्याची काहीही शक्यता नसलेल्या त्या काळात भाषा, अक्षर, लिखाण या बिनपैश्याच्या क्षेत्रातल्या वैभवाच्या मागे आम्ही लागलो. वर्षानुवर्षे कोरड्या जमिनीवर पहिल्या सरी पडल्यावर जसे नवे अंकुर सरसरुन उगवतात, तसे हे होते. श आणि ष या दोन्हींतल्या उच्चाराचा बारकावा आपल्याला साधला पाहिजे, याची जीवतोड कोशीस आमची असे.’

‘नव्या अस्मितेच्या भरण-पोषणाची प्रतीके राजाने आम्हाला दिली. २२ प्रतिज्ञांचे कसोशीने पालन, दसरा नव्हे तर १४ ऑक्टोबर दीक्षा दिन, बौद्ध भिक्खूंच्या अवैज्ञानिक विधि-संस्कारांना नकार, पालीतली बौद्ध विधितली सूक्ते मराठीत अनुवादित करणे (शांताराम नांदगावकर यांनी त्याला संगीत देऊन त्याची कॅसेटही निघाली होती.), नावाच्या आधी ‘श्री.’ ऐवजी ‘आयुष्मान’ लावणे, मृत व्यक्तीच्या नावाआधी ‘कै.’ ऐवजी ‘कालकथित’ लावणे ही काही उदाहरणे.’

‘राजाचा १५ ऑगस्ट १९७२ च्या साधनेतला राष्ट्रध्वजाचा अपमान आणि दलित स्त्रीची अब्रू यात मोठे काय, असा प्रश्न विचारणारा ‘काळा स्वातंत्र्य दिन’ हा लेख आणि त्या लेखातील भाषेने झालेली खळबळ, वेश्या व्यवसायाच्या गरजेचे समर्थन करणाऱ्या दुर्गा भागवतांना भर सभेत ‘मग त्या व्यवसायाची सुरुवात तुमच्यापासून होऊ द्या.’ असे त्याचे सुनावणे, मराठी सारस्वताच्या साचलेपणापणावर प्रहार करुन रुढ संकेतांना धाब्यावर बसवणाऱ्या लघु नियतकालिकांच्या चळवळीतील त्याचे नायकत्व, या मराठी सारस्वताचे पीठ असलेल्या सत्यकथेची होळी या घटनांना मी साक्षी नव्हतो. पण ज्या वातावरणात मी वाढत होतो, तेथे पुढची बरीच वर्षे त्याचे निनाद उमटत होते.’

‘नामदेव ढसाळ कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली आहे. त्याने काढलेला जाहिरनामा हा पॅंथरचा जाहिरनामा नसून त्यातून ‘नामा’ जाहीर झाला आहे, हे राजाचे विधान मीही अनेकांना ऐकवत असे. त्यावेळी पॅंथरची फूट या भूमिकेवर मला योग्य वाटत होती. बुद्धाची रक्तविहिन क्रांती आणि मार्क्सची रक्तरंजित क्रांती यात श्रेष्ठ काय? अर्थात बुद्धाची रक्तविहिन क्रांती! मग जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या का होईना, कम्युनिस्टांशी संबंधित असतील, ज्यांच्या कविता-कथेत वा बोलण्यात वर्गीय भाषा येत असेल अशांपासून कमालीची सावधानता मी बाळगत असे. असे लोक अस्तनीतले निखारे असतात, हा माझा समज होता. नामदेवच्या या डावेपणामुळे त्याच्यापासून (व त्याच्या कवितांपासूनही) मी बराच काळ दूर राहिलो.’

‘आमच्या या फॅंटमच्या मोहजालात मी जवळपास १५ वर्षे होतो. कधीही नमस्ते म्हणायचे नाही. जयभीमच म्हणायचे. मग ते कोणीही असोत. वयाच्या १९ व्या वर्षी मी शिक्षक झालो. विद्यार्थ्यांना, सहकारी शिक्षकांना, ते कोणत्या का समाजाचे असेनात, जयभीमच घालायचा, हे माझे ठरले होते. शाळेत माझ्याकडे संस्थेची अधिकृत पत्रे लिहायचीही जबाबदारी यायची. त्यातही नावाच्या आधी आयुष्यमान आणि जयभीम असायचे. संस्थेची प्रमुख मंडळी समाजवादी होती, म्हणून बहुधा त्यांनी हे खपवून घेतलेले दिसते. मला कोणी असे करण्यापासून रोखले नाही. काही बोललेही नाही. त्यांच्या सहनशीलतेची तेव्हा मला कल्पना येणे शक्य नव्हते. पुरोगामी म्हणवणारे जोवर बौद्ध होत नाहीत, तोवर ते दांभिकच अशी माझी धारणा होती.’

ही असहिष्णुता आणि आपल्या विचारधारेचा गर्व इतका टोकाचा होता की माझी जागोजागी भांडणे होत. वास्तविक मी ती उकरुन काढत असे. एक खुमखुमी असे. सवर्णांच्या समोर बोलताना मुद्दाम देवादिकांवर आघात करायचे. त्यांचा पाणउतारा करायचा हा माझा नित्यक्रम होता. गावाकडे जाताना वाटेत लागलेल्या झाडाखाली शेंदूर फासलेले दगडाचे देव होते. ते मी उचलून फेकले आहेत. आमच्या बौद्धवाडीत आम्ही तरुण मंडळी एकत्र आलो आणि घराघरातील लिंबू-दोरे तोडून त्यांचे दहन केले. ज्या बाईच्या अंगात येईल तिला दंड बसवला.

पँथरची वाताहत, त्यातल्या नेत्यांचा अधःपात यांतून आम्हाला पुढची दिशाच गवसेना. अशावेळी अन्य पुरोगामी प्रवाहांचा शोध, त्यांना समजून घेणे सुरु झाले. त्यांच्याशी सावध सहकार्यही होऊ लागले. पुढे मी डाव्या चळवळीशी एकटाच जोडला गेलो. माझ्या सोबत तोवर असलेले काही सहकारी या डाव्या वळणावरच थबकले. काही सहानुभूत राहिले. काही वैचारिक विरोधक झाले. वस्ती, वस्तीतले काम, सामान्य लोकांचा मला असलेला पाठिंबा तसाच राहिला. त्यामुळेच मी आजवर टिकून राहिलो.

या काळातच माझे सवर्ण कार्यकर्त्या मुलीशी लग्न झाले. ती वस्तीत राहायला आली. तिच्या वडिलांच्या तीव्र विरोधापायी रजिस्टर्ड लग्नासाठीच्या नोटिशीची मुदत पूर्ण व्हायच्या आधीच तिला घराच्या बाहेर पडावे लागले. पाठिंबा देणाऱ्या तिच्या आईचा आग्रह तातडीने लग्न करा असा होता. म्हणून मग धार्मिक पद्धतीने लग्न करणे भाग होते. ते अर्थातच बौद्ध पद्धतीने हे गृहीत होते. तिचीही त्याला हरकत नव्हती. ती निरीश्वरवादी होती. पण लग्नाच्या विधीचा एक भाग म्हणून लग्न लावणाऱ्या माझ्या मित्राने तिचे धर्मांतर करण्याची सूचना मांडली आणि त्याला मी अनुमती दिली हे तिला अनपेक्षित होते. न रुचणारे होते. लग्नास आलेल्या तिच्या-माझ्या सवर्ण मित्र-मैत्रिणींनाही ते खटकले. पुरोगामी नवरा अखेर धर्मवादी निघाला, हा त्यांचा निष्कर्ष. कळून सवरुन मी हे होऊ दिले, यात पुरुषीपणाबरोबरच राजा ढालेंचा अतिरेकी बौद्धवादी संस्कार नक्की होता. पुढे बऱ्याच वर्षांनी मी लेख लिहून आणि जाहीर भाषणात ही माझी चूक झाली असे नमूद केले.

दलित पँथर अल्पजीवी; पण तिने माझ्या आणि माझ्या पिढीवर खोल परिणाम केला. आमच्या व्यक्तित्वाच्या घडणीत पँथरचे प्रचंड योगदान आहे. पँथर दिशाहिन झाली. पण आमच्या जीवनाची दिशा ठरायला तसेच बिघडायला कारण ठरली. पँथरच्या प्रारंभीच्या टप्प्यात लढलेल्या नेत्यांप्रमाणेच माझ्या पिढीतले काही जण अजून व्यवस्थेशी लढत आहेत. काही जण पुढच्या टप्प्यातील नेत्यांच्या व्यवहाराप्रमाणे स्वार्थाच्या मागे लागले आहेत. राजकारण हे समाजबदलासाठीचे साधन काहींचे आहे, तर काहींनी तो धंदा केला आहे. पँथरच्या पन्नाशीत हे दोन्ही लोक मौजूद आहेत. आणि हे दोन्ही लोक पँथरची पन्नाशी साजरी करत आहेत. त्याचबरोबर खुद्द बौद्धांच्यात आज चाळिशीपर्यंतच्या वयोगटातील बहुसंख्यांना मूळ पँथरचा काहीही संदर्भ नाही. कधीकाळी पँथरचे असलेल्या आजच्या अथःपतित नेत्यांचाच संदर्भ त्यांना आहे. त्यामुळे आपण काय गमावले आहे, हे कळण्याचाही संभव कमी आहे.

आज पँथरची पन्नाशी साजरी करताना पँथरच्या वैशिष्ट्यांची, आंदोलनांची, नेत्यांच्या हिंमतीची, भूमिकांची, वादांची, चळवळीच्या चढत्या तसेच उतरत्या आलेखाची नोंद घेणे गरजेचे आहे. चळवळीची पुढील दिशा ठरवण्यासाठी यातून मिळणारा बोध उपयुक्त ठरु शकेल. व्यक्तिशः माझ्यावरील प्रभावाचे वर्णन करताना वर काही बाबी मांडल्या आहेत. पँथरसंबंधातील आणखी काही मुद्द्यांची नोंद आणि चर्चा खाली करुया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही सशक्त करण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना खुल्या पत्राद्वारे मांडली. हा पक्ष केवळ दलितांचा नव्हे, तर सर्व भारतीयांचा तो व्यापक पक्ष असणार होता. एस. एम. जोशी, लोहिया, अत्रे यांच्याशी बाबासाहेबांची बोलणी त्यासाठी सुरु होती. त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यावर १९५७ सालच्या ऑक्टोबरमध्ये या पक्षाची स्थापना आंबेडकरी नेत्यांनी केली. मात्र पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरात हा पक्ष फुटला. यामागे वैचारिक मतभेद निमित्तमात्र; सत्ता, पदाची आकांक्षा आणि अहंता मुख्य होती. जे गट पडले, ते गटही पुढे फुटले. याच काळात दलितांवरचे अत्याचार वाढत होते. त्यावर शिक्कामोर्तब करणारा पेरुमल समितीचा अहवालही आला होता. या अत्याचारांबाबत असंवेदनशील, आपमतलबी अशा रिपब्लिकन नेत्यांच्या विरोधात शिक्षित, साहित्य क्षेत्राशी संबंधित तरुणांनी आवाज उठवला. काळ्यांवरील जुलुमाच्या विरोधात लढणाऱ्या ब्लॅक पँथर पार्टीपासून प्रेरणा घेऊन दलित पँथर या नावाने त्यांनी संघटना स्थापन केली. दारुगोळ्याच्या कोठारावर जळती काडी पडावी तसे झाले. अल्पावधीत दलित तरुणांचा प्रचंड पाठिंबा या संघटनेला मिळाला. वस्त्यांतून पँथरच्या छावण्या वेगाने उघडू लागल्या. निर्भीड, निधडेपणा आणि औद्धत्य हे या लढावू पँथर्संचे वैशिष्ट्य होते. अत्याचार झालेल्या गावात ट्रेन, बस, पायी, वाटेत खायला पुरेसे पैसे नसताना शे-दीडशे तरुण मुलांनी जाऊन अत्याचाऱ्यांना जाब विचारणे, पोलीस आणि सरकारला दखल घेण्यास भाग पाडणे हे आता स्वप्नवत वाटावे असे वैशिष्ट्य त्या काळात पँथरचे होते. शिवसेना, बाळ ठाकरे यांच्या अरेला कारे करण्याची हिंमत या पँथरांची होती. मुख्यमंत्र्यांना तोंडावर उलट जबाब देण्याचे धारिष्ट्य या पँथरांमध्ये होते.

मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत गवई बंधूंना नुकसानभरपाई म्हणून १००० रु. देऊ केले गेले. त्यावेळी संतप्त झालेल्या राजा ढाले यांनी भर बैठकीत मुख्यमंत्र्यांना सवाल केला- “आपण आपला डोळा दोन हजार रुपयांत द्याल काय?” पँथरच्या पूर्वी खूप बौद्ध मुले शिवसेनेकडे आकर्षिली गेली होती. शिवसैनिक बनली होती. ती आता शिवसेना सोडून पँथरमध्ये येऊ लागली. त्या संदर्भात नामदेव ढसाळांनी जाहीरपणे बाळ ठाकरेंना एकेरीवर येऊन ललकारले. ढसाळ म्हणतात – “याला अनेक जाहीर सभांतून मी आव्हाने दिली आहेत. हिंमत असेल तर मैदानात ये. परंतु बांबूला बांबू लावायची हिंमत नाही. तुला कशामुळे माज चढला होता मला माहीत आहे. ती गोठा विसरलेली वासरे आता इकडे परत आली आहेत. आता तुझ्या गमज्या बस झाल्या.” शिवसेनाप्रमुखांना ललकारणाऱ्या नामदेव ढसाळांचे पुढच्या काळातील त्यांच्याशी झालेले सख्य आपल्याला ठाऊक आहे.

प्रस्थापित रिपब्लिकन नेते, सरकार, प्रतिगामी विचारांचे प्रवाह आदि सर्वांना जबर आव्हान उभे करणाऱ्या दलित पँथरच्या नेत्यांची पुढील कथा प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांहून निराळी झाली नाही. त्याच अहंतेने, सत्ताकांक्षेने त्यांना घेरले. वैचारिक मतभिन्नता महत्वाची होती. पण तिचा निरास करण्याच्या प्रयत्नांआड हे वैयक्तिक रिपू आले. फुटी, फुटीच्या फुटी पडत गेल्या. ...आणि पँथर संपली.

फुटी हे काही फक्त आंबेडकरी चळवळीचे वैशिष्ट्य नाही. ते भांडवली पक्षांत आहे. पुरोगामी चळवळींत आहे. पण म्हणून त्याला चलता है म्हणून सोडून चालणार नाही. शोषित-पीडितांच्या चळवळीतील फुटी न परवडणाऱ्या आहेत. भांडवली पक्ष सत्तेसाठी सहज युत्या करतात. त्यांच्यात खूप लवचीकता असते. आज सर्व लोकशाहीवादी शक्तींचे लचके तोडणाऱ्या फॅसिस्ट वळणाच्या संघपरिवारात आणि त्यांच्या भाजप या राजकीय साधनात वाद, व्यक्तिगत महत्वाकांक्षा नाहीत असे नाही. पण त्यांच्या उद्दिष्टाबद्दल ते इतके दक्ष व सक्रिय आहेत की, या सर्वांतून ते मार्ग काढत जातात. अभंग राहतात. पुरोगामी, आंबेडकरी चळवळींत ‘बाल की खाल’ काढण्याच्या रीतीने मतभेदांच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म रेषा शोधल्या जातात. अलीकडे त्यात थोडी सुधारणा आहे, पण ती स्थिर व नित्य नाही. पुरोगाम्यांत अधिकाअधिक व्यापक सहमतीची कक्षा वाढवत जाणे ही फॅसिझमविरोधी लढ्याची पूर्वअट आहे. आंबेडकरी चळवळीने त्यात कळीची भूमिका निभावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पँथरच्या फुटींच्या कारणांचा वेध घ्यायला हवा.

बाबासाहेबांच्या काळापासून मार्क्स की बुद्ध या वादाची चर्चा चालू आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या वादांतही तो संदर्भ येतो. पँथरमध्येही तो तरारुन वर आल्याचे आढळते. नामदेव ढसाळांनी पँथरची भूमिका लिहिली. तिला जाहिरनामा नाव दिले. मार्क्स-एंगल्सने कम्युनिस्ट जाहिरनामा लिहिला होता. त्याच्याशी असलेले नामसाधर्म्य काहींना खटकले असणार. मुद्दा केवळ नामसाधर्म्याचा नव्हता. अनेक पुरोगामी, आंबेडकरी चळवळीला व्यापक करणारे व दिशा देणारे मुद्दे या जाहिरनाम्यात आहेत, हे खरे आहे. मात्र पँथरचा हा जाहिरनामा निश्चित डाव्या वळणाचा होता. त्यातील काही भाग अतिरेकी डावा होता. बाबासाहेबांच्या विचार परंपरेतील संसदीय लोकशाहीशी हे अतिडावे वळण मेळ खात नव्हते. पँथरमध्ये सक्रिय झालेल्या सुनील दिघे या ढसाळांच्या अतिडाव्या कम्युनिस्ट मित्राने हा जाहिरनामा लिहिला, हा आरोप राजा ढालेंकडून झाला. नामदेव डावा झाल्याचा हा पुरावा आहे, यादृष्टीने ‘नामा जाहीर’ झाल्याची कोटी त्यांनी केली. त्यांनी लेखी निवेदन काढले. त्यात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्वाचे आहेत. संघटनेची भूमिका एकहाती लिहून परस्पर जाहीर करणे ही रीत लोकशाहीला धरुन नाही. तिची चर्चा कार्यकारी समितीत व्हायला हवी होती, हे ढालेंचे म्हणणे बरोबर होते. माझ्या मते सुनील दिघे वा अन्य कोणाचीही मदत घेऊन नामदेव ढसाळांनी भूमिकेचा मसुदा करणे यात गैर काही नाही. हा मसुदा कार्यकारी समितीसमोर ठेवून त्यावर चर्चा घडवून सहमतीचे बदल स्वीकारून तो अंतिम करणे, ही प्रक्रिया पाळणे भागच होते.

राजा ढालेंचा बौद्ध धर्मावरील अति भर, बैठकांत-कार्यक्रमांत वंदना घेण्याचा आग्रह हा गैर बौद्ध दलितांतले जे कोणी अल्प कार्यकर्ते पँथरमध्ये होते, त्यांना खटकत असे. राजा ढालेंच्या नेतृत्वाखाली झालेली शिवाजी पार्कवरील भगवद्गीतेची होळी, हिंदू देवतांची यथेच्छ टिंगलटवाळी या बाबी सवर्णांतले मित्र जोडण्यात अडथळा ठरतात, चळवळीला व्यापक करण्यात बाधा आणतात, असे नामदेव ढसाळांचे म्हणणे होते. ते रास्त होते. पण या भूमिकेवर गंभीरपणे चर्चा होण्याऐवजी मतभिन्नता व्यक्त करणाऱ्याची खिल्ली उडवणे, त्याला नामोहरम करणे ही रीत ढालेंच्या अनुयायांकडून होई. याचे एक उदाहरण पाहू. एके ठिकाणी भाषण करताना ढसाळ म्हणाले – “आपल्याला देवधर्मासंबंधी टिंगल टवाळी करायची नाही. तर, आपला लढा हा भाकरीसाठी आहे!” त्यावेळी राजा ढाले यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क भाकरी आणली आणि ते म्हणाले – “ही घ्या भाकर आणि भाषण थांबवा!”

वास्तविक हे मतभेद एवढेच कारण नव्हते. अन्य तेवढीच किंबहुना अधिक महत्वाची कारणे होती हम करे सो कार्यशैली, नेतृत्व व श्रेयासाठीची स्पर्धा, कुरघोडी आणि निधीचा ताबा. वैयक्तिक उपजीविका, संघटनात्मक कामासाठीचा खर्च यातून होणारी कुचंबणा हा मोठा प्रश्न असतो. त्याची सहसा बाहेर चर्चा होत नाही. तोही आयाम इथे होता. पण त्याची सोडवणूक करण्याची रीत तयार न होणे हा संघटनात्मक कमजोरीचाच भाग झाला. चळवळीसाठीच्या निधीचा वापर हा सामुदायिक मुद्दा असतो. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ असे झाले की चळवळीच्या सामुदायिकतेचे काही खरे नसते. यातून येणाऱ्या ताणांना, विरोधांना मग अनेकदा वैचारिक मतभेदांचा मुलामा चढवला जातो. पँथरमधील ही ऐतिहासिक फूट काही एकच नव्हती. पुढेही सातत्याने फुटी होत राहिल्या. पुढे झालेल्या या पँथर वा रिपब्लिकन फुटींना काय मार्क्स-आंबेडकर विचारधारांविषयीचे मतभेद कारण आहेत? निवडणुकीतली युती कोणाशी करायची यावर होणाऱ्या फुटींचे आधार वैचारिक वा डावपेचात्मक भूमिकांपेक्षाही सत्तेची पदे आणि आर्थिक राहिले आहेत.

एकूणच पँथरच्या पन्नास वर्षांत आंबेडकरी चळवळीचा समज, गांभीर्य वाढले आहे, असे म्हणता येत नाही. देशभरचा दलितवर्ग बाबासाहेबांना आपला उद्धारकर्ता मानून जयभीमच्या घोषणा देत ताकदीने रस्त्यावर उतरताना दिसतो आहे. ही स्थिती आश्वासक आहे. पण तिच्याशी महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीचा संबंध नाही. आज संविधान संपविणाऱ्या फॅसिस्ट शक्ती चढाईवर असताना हे सगळे निळे एल्गार एकवटले पाहिजेत. अन्य मित्रशक्तींच्या हातात हात घालून फॅसिस्टविरोधी तसेच व्यवस्थेच्या सम्यक परिवर्तनाचा लढा बुलंद केला पाहिजे. दलित पँथरच्या पन्नाशीनिमित्त तिचा जन्म साजरा करताना तिच्या घडण्या-बिघडण्याची विवेकी चिकित्सा समाजात करुन पुढची दिशा ठरवण्याची संधी घेतली पाहिजे.

यादृष्टीने काही विचारार्थ मुद्देः

मार्क्स आणि गांधींना मानणारे डावे, समाजवादी प्रवाह मार्क्स-गांधींच्या विचारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. तो साधताना मार्क्सला म्हणायचे आहे तेच किंवा गांधीजींना म्हणायचे आहे तेच बाबासाहेबांनाही म्हणायचे आहे, यासाठीची अवतरणे, संदर्भ, उदाहरणे देतात. याला आंबेडकरी विभागातून प्रतिरोध होतो. त्यांच्यातली अस्वस्थता वाढते. या सगळ्यास ऐतिहासिक कारणे आहेत. त्यामुळे समन्वय घालण्याऐवजी या महामानवांच्या प्रवाहांचे सामायिक शत्रू अथवा कार्यक्रम या आधारावर पूरकत्व अधोरेखित करायला हवे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. राजकीय आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींतून उत्क्रांत झालेली तसेच जगभरच्या प्रागतिक चळवळींतून आलेली मूल्ये आम्ही संविधानात सामावली. आज या मूल्यांना आणि देशाच्या वाटचालीचा मूलाधार असलेल्या संविधानाला उद्ध्वस्त करणाऱ्या शक्ती देशाच्या केंद्रस्थानी तसेच समाजमनांत वसलेल्या आहेत. अशावेळी या मूल्यांच्या आणि संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन लढा देणे हे या मूल्यांच्या वारसदारांचे सर्वप्रथम कर्तव्य आहे. यासाठीचे सहकार्य ‘मुद्दा आधारित’ करता येते. त्यासाठी मार्क्स आणि आंबेडकर किंवा गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभिन्नतेचा संपूर्ण निरास होण्याची काहीही गरज नाही. गांधीजींनी एकेकाळी भले वर्णव्यवस्थेला मान्यता दिली असेल. आजचे त्यांचे अनुयायी वर्ण-जातिव्यवस्थेची भलामण करत नाहीत. रक्तरंजित क्रांती, कामगारांची हुकुमशाही याबद्दल विरोधकांचे समज अगदी ढोबळ वा प्राथमिक असतात. ते सरसकट मार्क्सच्या पदरात टाकले जातात. पण त्यांचीही चर्चा आताच्या एकजुटीसाठी तूर्त गरजेची नाही. आजचे दोन्ही प्रमुख कम्युनिस्ट पक्ष संसदीय लोकशाही व्यवहार करत आहेत. जातिअंताच्या बाजूने आहेत. एवढ्या बाबी संयुक्त आघाडीसाठी पुरेशा मानाव्या. यातून सख्य, संवाद वाढला तर या खोल वैचारिक चर्चा मित्रभावी पद्धतीने करता येतील. काही नवे समज पुढे येतील. काही मतभेद तसेच राहतील. पण मनभेद मिटवता येतील.

पँथरच्या लढाईत डावे, समाजवादी यांवरुन खूप महाभारत झाले. पण त्याउपरही या सर्वांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य सुरुच होते. पँथरच्या ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेल्या आठवणींत त्याचे दाखले मिळतात. पँथर फोडायला बाबा आढाव कारण आहेत, असा ढसाळांचा आरोप अखेरपर्यंत राहिला. पण हे बाबा आढाव पँथरला अनेक प्रकारे मदत करत होते. पकडलेल्या पँथर्सना जामीन राहत होते. वरळीच्या मोर्च्यानंतर प्रमुख नेत्यांना अटक करुन पोलीस ठाण्यात बेदम मारले गेले. त्यावेळी मृणाल गोरे त्यांना सोडवायला आल्या. भूमिगत असताना कॉ. जी. एल.-तारा रेड्डींच्या घरी विश्वास व अधिकाराने पँथर नेते लपत असत. लाल निशाण पक्षाच्या श्रमिक कार्यालयाला एस. के. लिमयेंचा मठ म्हणून हिणवणारे पँथर्स त्यांचा मेगॅमाईक हक्काने वापरत असत. पँथरच्या भराच्या काळात डांगे आणि नामदेव ढसाळ यांच्या पुढाकाराने दलित-श्रमिकांचा प्रचंड ऐतिहासिक मोर्चा निघाला होता. अशी उदाहरणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातही आपल्याला आढळतात.

तेव्हा रक्ताची सोयरिक भले नको, पण मित्र म्हणून तरी पुरोगामी प्रवाहांशी निःसंकोच जोडले जायला आजच्या आंबेडकरी चळवळीला अडचण असायचे काही कारण नाही.

बौद्ध म्हणून बुद्धाच्या विचारांचे अनुसरण करताना इतरांच्या आस्थांवर आघात करायचे आज प्रयोजन आणि वेळही नाही. रिडल्स प्रकरणी १९८७ साली आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीने शिवसेनेला माघार घ्यायला लागली. आज बाबासाहेब, फुले यांनी केलेली धर्मचिकित्सा धर्मद्रोह, ईशनिंदा समजली जाण्याचा काळ आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे भिन्न आवाज त्यांचे खून करुन दडपण्याचा प्रयत्न झाला. यांच्या शतपटीने अधिक टोकदार चिकित्सा आंबेडकर, फुले, पेरियार यांनी केली आहे. पण ती त्यावेळी स्वीकारली गेली. आज त्या रीतीची टीका पचू शकत नाही. अशावेळी आजच्या काळात भिन्न मतांबाबत सहिष्णुता, सामाजिक सद्भाव, विरोधी मतांना हिंसेने दडपण्यास विरोध या मुद्द्यांवर समाजमन घडविणे हा चळवळीचा टप्पा आहे. आपण वैचारिक प्रगतीच्या चढाईत घसरुन खाली आलो आहोत, तिथून आपल्याला पुन्हा चढाई करायची आहे, हे वास्तव आपण कबूल करायला हवे. कालचे औषध आज चालणार नाही. कालची भाषा आज चालणार नाही. बसवण्णा, कबीर, रविदास, तुकोबा आदि सर्वांच्या विचारांतल्या पुढे जाणाऱ्या बाबींचा आदर व पुरस्कार बौद्धांनी करणे गरजेचे आहे. उत्तर भारतातले दलित बुद्ध आणि रविदास एकत्र भजतात. त्यांना फक्त बुद्धच स्वीकारा, असे सांगणे हे वैचारिक मागासलेपण आहे.

याउपर प्रत्येक व्यक्तीला संविधानाने श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे, हे आपल्या मनाला पटवणे गरजेचे आहे. अगदी बौद्धांच्या घरात परधर्माची पत्नी, सून येते तेव्हा तिला जबरदस्तीने बौद्ध बनवण्याचा प्रयत्न गैर आहे. तिला तिच्या उपासनेचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आमच्या घरात हे चालणार नाही, असे म्हणणे हे संविधान विरोधी आणि स्त्रीला दुय्यम लेखणे आहे. या नव्याने घरात आलेल्या स्त्रीचेही हे घर आहे, हे कबूल केले पाहिजे. माणसाला मैत्रीने, प्रेमाने जिंकावे सांगणाऱ्या बुद्धाला मानणाऱ्यांनी अशी जबरदस्ती करणे बुद्धाच्या विचारांशी विसंगत आहे. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला पटेल तो धर्म स्वीकारण्याच्या स्वातंत्र्याची ग्वाही देणारे महात्मा फुलेंचे खालील वचन जरुर वाचावेः

‘भूमंडळावर महासत्पुरूषांनी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत त्या सर्वांत त्या वेळेस अनुसरुन त्यांच्या समजुतीप्रमाणे काही ना काही सत्य आहे. यास्तव कोणत्याही कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौद्धधर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तो धर्म स्वीकारावा. तिच्या पतीने बायबल वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे वाटल्यास ख्रिस्ती व्हावे. व त्याच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास महंमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्यांच्या पुत्राने सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे. कोणी कोणाचा द्वेष न करिता सर्वांना निर्मिकाच्या कुटुंबातील आहोत असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकांशी वर्तन करावे. म्हणजे ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या राज्यात धन्य होईल.’ (स्रोतः महात्मा फुले-धनंजय कीर, पान क्र.२८९-९०)

बाबासाहेबांनी समाजबदलाचे लढे देत असताना राजकारण अव्वल मानले. निर्णय घेण्याच्या, धोरण ठरवण्याच्या ठिकाणी म्हणजेच सत्तेत आम्ही असायला हवे. किमान त्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आम्ही तयार करायला हवी, हे बरोबरच आहे. मात्र त्यासाठी बाबासाहेबांनी दिलेली दिशा सोडता कामा नये. आज जातींच्या बेरजा हा सोपा मार्ग आंबेडकरी नेत्यांकडून अवलंबला जातो. जातींच्या बेरजांत त्या त्या जातींतले टगे स्वार्ध साधतात. आपल्या जातीला आपल्या हितासाठी वापरतात. तिच्या जीवावर सत्तेचा सौदा करतात. युती ही मुद्द्यांवर, प्रश्नांवर व्हायला हवी. बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी जेधे-जवळकरांच्या सहकार्यासाठीची ब्राम्हण नको ही अट अमान्य केली. त्यावेळी आम्ही ब्राम्हणांच्या नव्हे, तर ब्राम्हण्याच्या म्हणजे भेदभाव करण्याच्या वृत्तीविरोधात आहोत. ही वृत्ती ब्राम्हण, ब्राम्हणेतर आणि बहिष्कृत या सर्वांत असू शकते, अशी भूमिका बाबासाहेब मांडतात. पुढच्या त्यांच्या सर्व प्रवासांत थेट रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पनेपर्यंत आपल्याला हे सूत्र दिसते. त्यापासून तात्पुरत्या फायद्यासाठी आपण ढळता कामा नये. ज्यांनी अशा जातींच्या बेरजा केल्या, त्याने काय साधले हेही आता आपल्यासमोर आहे. त्यातून बोध घ्यायला हवा.

असे अजूनही बरेच मुद्दे नोंदवता येतील. पँथरच्या माझ्या स्वतःवरील प्रभावाचे वर्णन करुन दलित पँथर या ऐतिहासिक घटिताचा मागोवा कसा घ्यावा याबद्दल तसेच या चळवळीला पुढे नेण्यासाठी काय रीतीने विचार करायला हवा, यासाठी बरेच दीर्घ विवेचन मी केले आहे. पँथरच्या पन्नाशीचा लेखाजोखा मांडताना तूर्त हे पुरेसे आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(अक्षर, दिवाळी २०२२)

No comments: