Wednesday, July 23, 2025

व्हिन्सेंट शीन आणि गांधी, नेहरु, आंबेडकर


आज २३ जुलै. दादासाहेब रुपवतेंचा स्मृतिदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं आहे. बाबासाहेबांची साथ-सोबत लाभलेल्या आणि त्यांच्यानंतर आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांतले एक अग्रणी असलेल्या दादासाहेबांच्या स्मृतीस मनोभावे अभिवादन!

यानिमित्ताने त्यांनी आपल्या आठवणी सांगताना नोंदवलेली एक घटना समजून घेणे उचित ठरेल. मतभेद म्हणजे मनभेद नव्हे हे सतत अधोरेखित करणाऱ्या आणि विरोधी मतांच्या मंडळींशीही सौहार्दाचे संबंध ठेवून सहमतीच्या मुद्द्यांवर सहकार्य साधणाऱ्या दादासाहेबांच्या भूमिकेस कोणत्या वातावरणाचा आधार होता, ते यातून कळते. ‘प्रवरेचा दाता’ या त्यांच्या शब्दांकित केलेल्या आत्मकथेतील हा प्रसंग दत्ता बाळसराफ यांनी माझ्या निदर्शनास आणला. तो खाली देत आहे.

_____________________

व्हिन्सेंट शीन म्हणून एक प्रसिद्ध अमेरिकन लेखक यांनी महात्मा गांधींचे चरित्रपर लेखन केलं आणि त्याला जगभर खूप मागणी आली. त्या व्हिन्सेंट शीननं ठरवलं हा जो पैसा जमेल तो कुटुंबासाठी खर्च करायचा नाही. भारतातल्या एखाद्या महत्वाच्या विषयावर, जो विषय गांधीजींनाही प्यारा, त्याच्यावर हा पैसा खर्च करायचा. व्हिन्सेंट शीन भारतात आले. त्यांनी पंडित नेहरुंसह सर्वांची भेट घेतली. कोणी काय, कोणी काय सुचवलं. पंडितजींनी त्यांना सुचवलं तुम्ही डॉक्टर आंबेडकरांना भेटा. बाबासाहेब त्यावेळी घटना समितीत काम करत होते. कायदेमंत्री होते. त्यांनी व्हिन्सेंट शीनला सांगितलं तुझ्या पैशाचा सदुपयोग व्हायचा असेल तर माझी निवडक मुलं तू अमेरिकेला शिकायला घेऊन जा. ...व्हिन्सेंट शीननं स्कॉलरशिप द्यायच्या ठरवल्या. इथं मुंबईला त्यांनी इंटरव्ह्यू ठेवले. निवडक विद्यार्थ्यांचे. मलाही त्याच्यात तार करुन बोलवण्यात आलं. (इथे दादासाहेबांनी गावावरुन सायकल, ट्रक असे करत मुंबईला कसा थकला-भागला पोहोचलो त्याचे वर्णन केले आहे.) ...एक अँग्लो इंडियन बाई इंटरव्ह्यू घ्यायला बसली होती. माझा नंबर येताच मी तिच्यापुढे दाखल झालो. तिने मला सिगरेट ऑफर केली. कदाचित सिगरेट ओढणं हे आधुनिकतेचं लक्षण त्यावेळी समजलं जात असे. मी तर सिगरेटला कधी हातही लावला नव्हता. तोपर्यंत मी चहादेखील पीत नसे. पण त्या बाईला बरं वाटलं की मी सिगरेट पीत नाही आणि ऑफर केलेल्या सिगरेटला नकार देण्याचं धैर्य दाखवलं. माझा इंटरव्ह्यू हा सर्वात दीर्घकाळ चालला. त्या बाईंनी माझ्याशी बऱ्याच विषयांवर चर्चा केली. आणि माझी निवड झाली असं मला सांगण्यात आलं. ...नंतर काय झालं कुणास ठाऊक. ती योजनाच रद्द झाली. कशामुळे रद्द झाली याची मी चौकशी केली नाही.

(प्रवरेचा दाता, पा. क्र. १४६-४७)

_______________

प्रवरेचा दाता

दादासाहेब रुपवते

ग्रंथाली

मूल्य – ३०० रु.
_______________

Sunday, July 20, 2025

विकास की विध्वंस?


हा प्रश्नच कार्यकर्ते-पत्रकार-अभ्यासक अविनाश पोईनकर यांनी वर्षा कोडापे या आपल्या पत्नीच्या सहकार्याने लिहिलेल्या ‘सुरजागड विकास की विस्थापन?’ या पुस्तकाचा गाभा आहे. सुरेश द्वादशीवार यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांची भूमिका विकासाविरुद्ध नसून विध्वंसाविरुद्ध असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. पुस्तकप्रवेश करणारा वाचक या प्रस्तावनेनेच हादरुन जातो. पुढे काय वाढून ठेवलंय याचा अदमास तिथेच येतो आणि त्याला सामोरे जाण्याची मनाची तयारीही होते. सुरजागडचा प्रश्न, तेथील समृद्ध जल-जंगल-जमिनीचे उजाड होणे, आदिवासींची ससेहोलपट आणि त्यांचा निकराचा लढा याचे विविध आयाम सविस्तरपणे लेखकाने या पुस्तकात नोंदवले आहेत. या लढ्याशी परिचित व संबंधित असलेल्या पोईनकर यांना या लढ्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी साधना साप्ताहिकाची तांबे-रायमाने शिष्यवृत्ती मिळाल्याने समाजशास्त्रीय संशोधनाचे हे पुस्तक आकारास येऊ शकले.

लोहाबरोबरच तांबे, जस्त, सिमेंट, डोलामाईट, लयटेराईट अशा विविध खनिजांचे आगर असलेला आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हा कंपन्या आणि सरकार यांचे लक्ष्य झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर गडचिरोलीवर खास लक्ष आहे. सुरजागड हा मुख्यतः लोहखनिजाचा प्रदेश. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २००७ साली येथे सुमारे साडेतीनशे एकर जमीन ५० वर्षांच्या लीजवर खाणकाम करण्यासाठी सरकारने दिली. २०२३ मध्ये आणखी पाच कंपन्यांना मिळून साडेचार हेक्टरहून अधिक जमीन खाणींसाठी प्रदान करण्यात आली आहे. या भागात प्रामुख्याने असलेल्या माडिया या अतिअसुरक्षित आदिम जमातीची उपजीविका आणि एकूण जीवनच यामुळे धोक्यात आले असून आता किमान ४० हजार ९०० नागरिक विस्थापित होतील आणि प्रस्तावित २५ खाणी पूर्णतः सुरु झाल्यावर लाखो आदिवासींना याचा फटका बसेल असे लेखकाने नमूद केले आहे. येत्या पाच-दहा वर्षांत घनदाट जंगलाचा प्रदेश ही गडचिरोलीची ओळख पुसली जाईल असा लेखकाचा अंदाज आहे.

आदिवासी समाजाची तथाकथित मुख्यप्रवाही समाजाने कायम उपेक्षा केली. आदिवासी नेते जयपालसिंग मुंडा यांनी संविधान सभेतील आपल्या भाषणात याकडे लक्ष वेधले होते. (त्या भाषणातील एक अवतरण या पुस्तकात प्रारंभीच दिलेले आहे.) लेखकानेही ही खंत या पुस्तकात व्यक्त केली आहे. त्यादृष्टीनेच आदिवासींच्या योगदानाला उजाळा देताना स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी योद्ध्यांची कामगिरी पहिल्याच प्रकरणात नोंदवलेली आहे. या खाणींच्या प्रकल्पात भरडल्या जाणाऱ्या माडिया या आदिम जमातीचा परिचय दुसऱ्या प्रकरणात आहे. माडिया व गोंड या दोन स्वतंत्र जमाती असतानाही ‘माडिया गोंड’ म्हणून माडियांना संबोधले जाणे कसे गैर आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. माडियांच्या सांस्कृतिक जीवनाची आणि धारणांची ओळख त्या पुढच्या भागात आपल्याला मिळते. सुरजागड लोह खाणींचा इतिहास, वनकायदे, या कायद्यांना न जुमानणे तसेच त्यातील सोयिस्कर बदल, कंपन्यांचे आगमन, सरकार व लोकप्रतिनिधींचा साळसूद व्यवहार, नक्षलवादी आणि आंदोलक यांच्यातील भेद, अहिंसक आंदोलने करणाऱ्यांना मुद्दामहून नक्षलवादी ठरवून चिरडणे, प्रकल्पांमुळे आदिवासींचे विविध थरांवर होणारे शोषण या बाबी सविस्तरपणे विविध प्रकरणांतून लेखकाने मांडलेल्या आहेत. यात पोखरलेले डोंगर, सपाट झालेले जंगल, खाण माफियांकडून आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण, आरोग्याच्या समस्या, उत्खननातून निघणाऱ्या मातीने नदीचे पाणी दूषित होणे, उपीजीविकेची पारंपरिक साधने नष्ट होणे, एकूण जगण्याचा पोतच विदीर्ण होणे, दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाची माध्यमांनी दखल न घेणे अशा अनभिज्ञ वाचकाच्या मनाला आणि समजुतींना धक्का देणाऱ्या कैक बाबींचा समावेश आहे.

पाठबळ म्हणून पुस्तकाच्या अखेरीस काही महनीयांचे अभिप्राय आहेत. त्यात डॉ. कुमार सप्तर्षी यांचेही एक टिपण आहे. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘मराठी वाचकांना आपली संवेदनशीलता विस्तारित करण्यासाठी’ लेखकाने मोठ्या श्रमाने तयार केलेल्या या दस्तावेजाचा नक्कीच उपयोग होईल. यापलीकडे जाऊन त्यातील प्रश्नाची दाहकता कमी करण्यात आपण समाज म्हणून काय करु शकतो हा मुद्दा आहे. तो किती कळीचा आणि कठीण आहे, याची कल्पना येण्यासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या प्रस्तावनेकडे पुन्हा वळू. त्यात ते म्हणतात – ‘या संकटाचा सामना करण्यासाठी प्रथमच सुरजागड क्षेत्रातले नेतृत्वहिन व बहुसंख्येने निरक्षर असलेले आदिवासी एकत्र आले आहेत. पैसा आणि साधने या साऱ्यांच्या अभावी ते आपला जीवनमरणाचा संघर्ष लढवीत आहेत. या संघर्षाचा शेवट कसा होईल, याची साऱ्यांना कल्पना आहे आणि तो शेवट आदिवासींचाच असणार आहे. वारुळे जमीनदोस्त करता येतात. पण मुंग्या माराव्याच लागतात. हा नैसर्गिक दुष्टावा आता व्यावसायिक अघोरीपणात रुपांतरित झाल्याचे सांगणारे हे चित्र आहे.’

हे चित्र भीषण आहे. हा शेवट ठरलेला असेल तर लेखकाने हे पुस्तक लिहावे का? आणि आपण वाचावे तरी का? कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा यातली शोकांतिका आपण पाहतोच की! तसे याकडे पहावे का? द्वादशीवार हे चित्र लिहूनही अखेर या लढ्याला शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासोबत राहण्याचे अभिवचन देतात. जर हा शेवट अटळ असेल तर या शुभेच्छा आणि सोबत राहण्याचे वचन कशासाठी? द्वादशीवारांना त्यांनी मांडलेले चित्र बदलावे असे मनोमन वाटते. आपल्या विवेकाला हादरवून सक्रिय करणे हाच हेतू त्यांचा आहे. या देशाचे मालक असलेले ‘आम्ही भारताचे लोक’ आपले घटक असलेल्या या आदिवासी भावंडांच्या सोबत उभे राहून आपण निवडलेल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला प्रवृत्त झालो तर अविनाश पोईनकरांच्या पुस्तकलेखनाच्या श्रमाचे चीज झाले असे होईल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

________________________________

‘सुरजागड : विकास की विस्थापन?’

अविनाश पोईनकर

हर्मिस प्रकाशन, पुणे

पाने – १७० | मूल्य – २०० रुपये
________________________________

Friday, July 4, 2025

यशवंत मनोहरांच्या दोन नव्या पुस्तकांचे स्वागत

१) In the Rain of Fire (‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’चा इंग्रजी अनुवाद)


‘In the Rain of Fire’ हा ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या यशवंत मनोहर यांच्या कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद. तो केला आहे स्वतः कवी असलेल्या विवेक काटीकर यांनी. अग्निपरीक्षेचे वेळापत्रक हा ५५ कवितांचा काव्यसंग्रह; खरं म्हणजे काव्यग्रंथ. ३३५ पानांचा. यातल्या अनेक कविता दीर्घ आहेत. २०२१ साली हा कवितासंग्रह आला आणि यावर्षी २०२५ ला त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. तोही ३२८ पानांचा. मनोहरांच्या कविता गूढ नाहीत. किंबहुना कवीला म्हणायचंय त्याहून वेगळा अर्थ कवितांचा वाचकांना लागण्याच्या ते विरोधातच आहेत. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कवितालेखन करणाऱ्या मनोहरांची प्रतिभा आजही नवोन्मेषशाली आहे. त्यांची शैली आणि शब्दांची नवनिर्मिती कायम तसेच टवटवीत आहे. प्रगल्भतेचा अधिकाधिक उन्नत थर ती गाठतेच आहे. अशावेळी हे सारं इंग्रजीत आणणं हे विलक्षण आव्हान होतं. या आव्हानाला भिडण्याचं धैर्य विवेक काटीकर यांनी दाखवलं आहे.

माहितीपर गद्याचा अनुवाद आणि सर्जक साहित्याचा अनुवाद यांत जमीनअस्मानाचे अंतर असते. कवितेचा अनुवाद ही तर आणखी कठीण बाब. मूळ कवीची शैली, त्याने खेळवलेले, योजलेले शब्द, त्यांचे क्रम आणि यांतून येणारी तिची लय अनुवादात आणणे हे तर महाप्रचंड आव्हान. विवेक काटीकर त्याला सामोरे गेले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. यशवंत मनोहरांची कविता ही सर्वसाधारण कविता नव्हे. सर्व तऱ्हेच्या विरुपतांतून मानवतेला मुक्त करण्याचा तो एल्गार आहे. त्यामुळेच तो मराठीपुरता न राहता जगातील अधिक विस्तृत मानवसमूहांपर्यंत पोहोचवणे आवश्यकच होते. ते काम काटीकर यांनी केले आहे. यासाठी त्यांना धन्यवाद.

अनुवाद करण्याची काय पद्धत अनुसरली याबद्दल या पुस्तकाच्या सुरुवातीलाच काटीकर यांनी लिहिले आहे. ते म्हणतात – ‘I adopted ‘meaning to meaning’ approach rather than ‘word to word approach.’’ अर्थात हे त्यांनी योग्यच केलं. भाषेला लीलया वळवणाऱ्या, नित्यनव्या शब्दनिर्मितीने तिला श्रीमंत करणाऱ्या, शब्दांना बागडवणाऱ्या मनोहरांच्या कवितांचा शब्दशः अनुवाद करणं ही किती अवघड गोष्ट आहे, हे खालचं एक उदाहरण पाहिलं तरी लक्षात येईल.

‘नदीमाय’ कवितेच्या १५ व्या भागात ते म्हणतात –

‘अशा अनेक नद्यांमधून
पाण्याऐवजी जीवनच वेल्हाळताना मी बघितले.’

काटीकरांनी इंग्रजीत केलेला याचा अनुवाद पहा –

‘I saw in such rivers, not water,
But life manifesting itself.’

मूळ मराठी कवितेत पाण्याला समानार्थी असलेला शब्द ‘जीवन’ हा आयुष्य या अर्थी मनोहरांनी वापरला आहे. पण या जीवनाचे ‘वेल्हाळणे’ पाणी या अर्थी खळखळत्या प्रवाहाच्या प्रतिमेशी समरुप आहे. वाचकाला सोबत दुडदुडवायला लावणाऱ्या मूळ मराठीतलं हे प्रतिमा-सौंदर्यसामर्थ्य इंग्रजीत कसं येणार? इंग्रजीत water आणि life हे समानार्थी आणि तरीही वेगळ्या अर्थाचे असे शब्द नाहीत. काटीकरांना ‘manifesting’ वरच भागवावे लागले आहे. मूळ इंग्रजीतून मराठीत अनुवाद करतानाही हीच अवस्था झाली असती. सर्जक साहित्याच्या - त्यातही कवितेच्या अनुवादाची ही नैसर्गिक मर्यादा आहे.

यशवंत मनोहरांची कविता इंग्रजीत आल्याने इंग्रजीचा परिचय असलेल्या जगातील व्यापक समुदायांपर्यंत ती पोहोचेलच. पण उद्या इंग्रजी न जाणणाऱ्या समुदायांपर्यंतही इंग्रजीतून त्यांच्या भाषेत अनुवाद होऊन पोहोचण्याच्या शक्यता रुंदावल्या आहेत. यशवंत मनोहरांची कविता अशारीतीने जगात जाण्याची आवश्यकता आणखी एका कारणाने मला वाटली. ते म्हणजे या ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ या कवितासंग्रहाला यशवंत मनोहर यांनी जोडलेला ‘मी अशीच कविता का लिहितो?’ हा उपोद्घात. ‘In the Rain of Fire’ या इंग्रजी अनुवादातही तो आहे. साहित्याचा हेतू काय? लेखकाच्या भूमिकांचा प्रभाव त्याच्या साहित्यावर पडावा का?..या प्रश्नांवर भारतातच नव्हे, तर जगभरच्या कलाविश्वात आजही वाद झडतात. यशवंत मनोहर त्यांना म्हणायचे ते फक्त कवितेत म्हणून थांबत नाहीत. मी मला वाटते ते लिहिले, आता वाचकांना काय अर्थ घ्यायचा तो घेऊदे म्हणून सोडून देत नाहीत. आपले साहित्यहेतू थेट, सुस्पष्ट मांडतात. उच्चरवात जाहीर करतात. काहीही हातचे न राखता आपला संदर्भ अवकाश, आपली वैचारिक परंपरा रेखांकित करतात. ही त्यांची अनन्यता जगाला कळणे गरजेचेच होते. त्याची संभाव्यता या इंग्रजी अनुवादाने वाढली आहे.

मराठी उपोद्घातातली ही काही विधाने पाहिल्यावर आपल्यालाही त्याची सत्यता पटेल :

- मी कविता लिहितो म्हणजे अस्तांच्या नोंदीही लिहितो आणि क्षितिजाला येणाऱ्या नव्या पालवीचीही चाहूल लिहितो.

- बुद्ध, लोकायत, सॉक्रेटिस, मार्क्स, जोतीबा फुले, सार्त्र, रसेल, रामस्वामी नायकर आणि बाबासाहेब आंबेडकर अशा लाखो प्रज्ञावंतांनी हा सर्वोच्च नीतीचा इहवादी आदर्श मला सांगितला आहे.

- कविता अर्थमयच असते. कवितेची ही अर्थमयता कवीच्या जीवनदृष्टीतूनच उगवलेली असते.

- माझी कविता अज्ञान, विषमता आणि भ्रम तुडवितच पुढे जाते आणि सर्वहिताय नीतीने सांगितलेला कवितेचा अर्थ हाच माझ्या कवितेचा प्राण आहे असेच मी मानतो.

- (कवितेतून) स्वतःच्या सोयीचा अर्थ काढण्याची ही सोय कवीलाच नाकारीत असते. कवीचे सत्य नाकारण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले या लोकांना? हे चैतन्यवाद्यांचे लबाड सौंदर्यशास्त्र आहे.

- कवितेतला अर्थरहित मानणे आणि वाचकाला त्याला हवा तसा अर्थ घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणे म्हणजेच कवीच्या पुनर्रचनाशील व्यक्तिमत्वाला नकार देणेच असते.

- कवी केशवसुतांची कविता ही आजही माझी पहिली तात्त्विक आवड आहे.

- केशवसुत काही परलोकवादी प्रतिभेचे कवी नव्हते. ‘देव दानवा नरे निर्मिले’, ‘ब्राम्हण नाही हिंदुही नाही...’, ‘वंदुनिया ह्या देवांलागुनि धाई धाई मानव रडती...’, ‘जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत’ आणि ‘जग हे बदलायाचे’ हे केशवसुतांचे इहवादी क्रांतिकारी आशयविश्व बाजूला करुनच केशवसुतांसंबंधीचा आदर व्यक्त केला गेला. हा धागा १९६० नंतरच्या काही प्रतिभांनीच पुढे नेला असे मला नम्रपणे वाटते.

हे टिपण मराठी वाचकांना ‘In the Rain of Fire’ चा परिचय व्हावा म्हणून लिहिले आहे. त्यामुळे वरील विधाने मूळ मराठी पुस्तकातूनच घेतली. इंग्रजीत त्यांचा उत्तम अनुवाद विवेक कानिटकर यांनी केला आहे.

_____________________________

In the Rain of Fire

By Yashwant Manohar

Translation: Vivek Katikar

Red Sparrow A Media House

Mob: 8530675264 / 9529593553

Price: Rs. 1200

_____________________________

मनोहरांनी ‘In the Rain of Fire’ हे पुस्तक ‘मराठी क्रांतिकारी साहित्याचे संस्थापक डॉ. म. ना. वानखडे यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण’ केले आहे. याच म. ना. वानखडे यांच्यावरच्या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. त्याविषयीचा परिचय पुढे करुन घेऊ.


२) क्रांतदर्शी डॉ. म. ना. वानखडे : जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ








आपल्या प्रतिभेचा आणि व्यासंगाचा सर्जनशील तसेच वैचारिक आविष्कार करणारी शेकड्याहून अधिक पुस्तके यशवंत मनोहरांनी लिहिली आहेत. त्यात हे पुस्तक नसते तर काही तरी राहून गेले आहे, असे वाटले असते. अर्थात, हे आपल्याला जाणवते ते त्यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचूनच. साहित्यातला एक लखलखीत प्रवाह म्हणून आज देश-विदेशात दखलपात्र झालेल्या ‘विद्रोही दलित साहित्य’ या इमारतीची ओळख, चौकट आणि चबुतरा सिद्ध केला तो म. ना. वानखडे यांनी. मनोहरांच्या भाषेत ‘ज्ञानयुद्धातील आधुनिक अर्हत’ असलेले म. ना. वानखडे येणाऱ्या पिढ्यांना कळण्याची सोय यशवंत मनोहर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाने झाली आहे. वास्तविक, वानखडेंच्या एकूण साहित्याचे संकलन, अनुवाद करवून घेऊन ‘दलितांचे विद्रोही वाङ्मय’ या नावाने १९७९-८० साली निघालेले पुस्तक वामन निंबाळकरांसमवेत यशवंत मनोहरांनीच संपादित केले होते. ‘क्रांतदर्शी म. ना. वानखडे’ या पुस्तकात मनोहरांनी पाच पिढ्यांच्या लोकांना लिहायला लावले आहे. यात त्यांचे समकालीन सहकारी, विद्यार्थी तसेच नातेवाईक आहेत. या प्रत्येकाच्या नजरेतून, आकलनातून आणि अनुभवातून वानखडेंचे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि थोरवी आपल्यासमोर साकारते. विचार, आठवणी आणि परिशिष्टे अशा तीन भागांत या पुस्तकाची विभागणी आहे. एकूण ६५ लेख आणि मनोहरांची एक मुलाखत यात आहे. (लेखक व त्यांचे लेख यांची कल्पना येण्यासाठी अनुक्रमणिकेचे फोटो सोबत देत आहे.)

१९२४ ते १९७८ असे केवळ ५४ वर्षांचे आयुष्य लाभलेले मनोहर नामदेवराव वानखडे मूळचे अमरावती जिल्ह्यातले. तेजस्वी व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक राहिला. मराठवाड्यासारख्या मागास भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाद्वारे उच्चशिक्षणाचा पाया रचला. मिलिंद हे आंबेडकरोत्तर चळवळीच्या विविध क्षेत्रांत भरारी घेणारे कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ बनले. या उद्देशानेच बाबासाहेबांनी या कॉलेजमधील प्राध्यापक निवडताना व्यक्तिशः लक्ष दिले. वानखडेंना त्यांनी स्वतः मिलिंदमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवडले. पुढे परदेशातील उच्च शिक्षणासाठी ज्या १४ जणांची बाबासाहेबांनी निवड केली, त्यात म. ना. वानखडे होते. इंग्रजी साहित्यात एम. ए. आणि नंतर पी. एच. डी. वानखडेंनी केली. परदेशातून परतल्यावर पुन्हा त्यांनी मिलिंदमध्ये प्राध्यापकी सुरु केली. मिलिंदचे प्राचार्य म. भि. चिटणीस मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून गेल्यानंतर डॉ. वानखडे मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.

बाबासाहेबांना अभिप्रेत विद्यार्थी घडवणे हे त्यांचे मिशन होते. ज्या अभावग्रस्त पार्श्वभूमीतून हे विद्यार्थी येत त्यातून येणाऱ्या अडचणी दूर करणे, त्यांच्यात अस्मिता जागवणे, या विद्यार्थ्यांचा कल व गुण ओळखून त्यांना विषय सुचवणे, त्यात मार्गदर्शन करणे हे त्यांचे नित्यकर्म होते. खुद्द या पुस्तकाचे संपादक यशवंत मनोहर यांना मुदत संपल्यानंतरही त्यांना रुची असणाऱ्या कलाशाखेत प्रवेश मिळवून देणे, प्रथम वर्गात एम. ए. झाल्यावर आधी पैठण आणि नंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवून देणे यासाठी वानखडेंनी सहाय्य केले. मनोहरासंहित वानखडेंच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या या मदतीच्या व्यक्तिगत अनुभवांची या पुस्तकात कृतज्ञतापूर्वक नोंद केली आहे. ते वाचताना आपल्यालाही गहिवरुन येते. यशवंत मनोहर पुस्तकाच्या शेवटच्या भागातील आपल्या मुलाखतीत म्हणतात – ‘माझे सगळे वाङ्मयीन व्यक्तिमत्व आहे ते डॉ. म. ना. वानखडेंमुळेच निर्माण करण्याची संधी मला मिळाली. जर दुसरे कोणी प्रिन्सिपॉल असते आणि त्यांनी मला प्रवेश दिला नसता तर माझे आयुष्य वैराण झाले असते. मी यशवंत मनोहर होऊ शकलो नसतो.’ सुधीर रसाळ हेही वानखडेंचे विद्यार्थी. ते लिहितात – ‘वानखडे सरांनी पंधरा एक पुस्तकांची यादी मला दिली. ही पुस्तके कोणत्या क्रमाने वाचायची हेही मला समजावून सांगितले. मी आता मराठीतला एक चांगला समीक्षक म्हणून ओळखला जातो. खरे म्हणजे त्याचे श्रेय वानखडे सरांनी दिलेल्या पुस्तकांच्या यादीला आणि त्यांनी ती कोणत्या क्रमाने वाचायची याबद्दल दिलेल्या सल्ल्याला आहे. ’

विद्यार्थ्यांना असे सहाय्य करण्याबद्दल वानखडेंची भूमिका काय होती? मिलिंद महाविद्यालयाच्या ७५-७६ च्या वार्षिकांकात लिहितात – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच मी विद्यार्थ्यांच्या बाजूने कायम उभा राहिलो...त्यांनी माझ्या हाती दिलेली ही ज्ञानाची ज्योत मी माझ्या विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्त केली.’

अमेरिकेतल्या वास्तव्यात कृष्णवर्णीय विद्रोही चळवळीचा परिचय, त्यांच्या साहित्याचा अभ्यास यांतून म. ना. वानखडेंना भारतात दलित विद्रोही साहित्याला गती देण्याची प्रेरणा मिळाली. भारतात आल्यावर ‘प्रबुद्ध भारत’ मध्ये त्यांनी ‘दलितांनो, विद्रोही वाङ्मय लिहा’ हा लेख लिहिला. याचा अर्थ दलित साहित्य त्या आधी लिहिले जात नव्हते असे नव्हे. शंकरराव खरात, अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागूल आदि मंडळी आपल्या लेखणीतून दलित जीवन चितारतच होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिकांना काय व कसे लिहावे याबद्दल मार्गदर्शन करताना काय म्हणतात, हे डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आपल्या लेखात भालचंद्र फडकेंच्या पुस्तकातील संदर्भ देऊन नोंदवले आहे. बाबासाहेब म्हणतात – ‘मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचे आहे की उदात्त जीवनमूल्ये व सांस्कृतिक मूल्ये यांचा आपल्या साहित्यप्रकारातून आविष्कार करा. आपले लक्ष आकुंचित, मर्यादित ठेवू नका. ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका. तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करु नका. तिचे तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असे प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचे, दलितांचे फार मोठे जग आहे, हे विसरु नका. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा नीट समजावून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे.’

बाबासाहेबांनी मांडलेल्या या साहित्याच्या प्रयोजनाची बांधबंदिस्ती म. ना. वानखडेंनी केली. सर्वसाधारण मराठी साहित्याहून दलित साहित्याचे वेगळेपण काय, याची चौकट त्यांनी रचली. विद्रोह हा त्याचा अंगभूत व अनन्य गाभा कसा याची मीमांसा केली. विद्रोही दलित साहित्याची एक आखीव व्याख्या त्यांनी केली. ‘मिलिंद साहित्य सभा’ स्थापून साहित्यविषयक उपक्रमांसाठी एक संस्थात्मक मंच तयार केला. प्रस्थापित प्रकाशने दलित साहित्य प्रकाशित करणे कठीण. त्यासाठी त्यांनी ‘अस्मिता’ हे त्रैमासिक सुरु केले. सरकारी नियमांमुळे त्याचेच पुढे ‘अस्मितादर्श’ नामकरण झाले. त्यांना स्वतःला त्यात पुढे लक्ष घालता आले नाही, तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी ते चालवले. ‘अस्मितादर्श’ने अनेक लेखकांना संधी दिली. नवे लेखक घडवले.

म. ना. वानखडे यांच्या साहित्यविषयक भूमिकेची सूत्रे समजून घेण्यासाठी त्यांचे १९६७ सालच्या भुसावळच्या ‘महाराष्ट्र बौद्ध साहित्य संमेलनाच्या’ अध्यक्षपदावरुन केलेले भाषण उपयुक्त ठरते. या कृतज्ञताग्रंथातील अनेक लेखकांनी त्याची नोंद घेतली आहे. के. व्ही. सरवदेंच्या लेखातील काही अवतरणे येथे देणे उद्बोधक ठरेल. ‘आजवरच्या साहित्यात हिंदू समाजातील वरच्या मानल्या गेलेल्या वर्गाचेच जीवन प्रतिबिंबित झाले’ असल्याचे सांगून वानखडे म्हणतात – ‘आधुनिक साहित्यात मध्यमवर्गीय पांढरपेशा अशा ब्राम्हण समाजाचे चित्रण आहे. कारण लेखक हा त्या वर्गातीलच होता. काही प्रमाणात या लेखकांना स्त्रियांचे दुःख जाणवले. हरिभाऊ आपट्यांनी स्त्रियांच्या परवशतेचे चित्रण ‘पण लक्षात कोण घेतो?’ मध्ये केले. देवलांनी ‘शारदा’ या नाटकामध्ये स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. पण त्यांना आम्हा दलितांची वेदना जाणवली नाही.’

(वानखडेंचे सहकारी व प्रथितयश लेखक भालचंद्र फडके यांनी आपल्या लेखात केशवसुतांचा ते याबाबतीत अपवाद करत अशी नोंद केली आहे.)

ग्रामीण साहित्याच्या प्रवाहानेही या काळात जोम धरला होता. त्याच्याशीही फारकत घेताना ते नोंदवतात – ‘यातही आपले जीवन नाहीच. उलट त्यात चितारलेले ग्रामीण जीवनही खरे नाही. शहरात बसून रोमँटिक चष्म्यातून पाहिलेले हे जीवन आहे...जीवनाचे वास्तव दर्शनच या मराठी लेखकांना झाले नाही.’

अन्य प्रगतीशील साहित्यप्रवाहसुद्धा त्यांना जवळचे वाटत नाहीत. त्याबद्दल वानखडेंची तक्रार अशी – ‘साम्यवाद किंवा गांधीवाद यांनी प्रेरित झालेल्या मराठी वाङ्मयातही आपले चित्र आढळत नाही. या मानवतावाद्यांच्या साहित्यातील हरिजनोद्धारात आईची माया नाही. दाईची भूतदया आहे. आणि भूतदया स्वाभिमानाला डिवचणारी आहे.’

वानखडेंचे हे भाषण ‘दलित साहित्याचा जणू जाहीरनामाच’ आहे असा निर्वाळा अनेकांनी या पुस्तकात दिला आहे.

म. ना. वानखडे यांचे सर्व म्हणणे सलगपणे या पुस्तकात नाही. तो या पुस्तकाचा हेतूही नाही. यशवंत मनोहर आणि वामन निंबाळकर यांनी वानखडेंच्या लिखाणाचे संपादन करुन या आधीच पुस्तक काढल्याचे वर नमूद केले आहेच. कृतज्ञताग्रंथातील लेखांतून वानखडेंच्या मांडणीचा, त्यांच्या व्यवहाराचा काय परिणाम झाला याचा दाखला मिळतो. या लेखकांच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि व्यापक वैचारिक क्षेत्रातील मूलभूत हस्तक्षेपाबद्दलची कृतज्ञता प्रत्येक पानातून पाझरताना वाचकाला दिसते. म. ना. वानखडे २०२४ साली शंभर वर्षांचे झाले असते. त्यांच्या जन्माच्या शंभरीनिमित्ताने काढलेल्या या ग्रंथाला संपादकांनी दिलेले ‘कृतज्ञताग्रंथ’ हे अगदी सार्थ नाव आहे.

या ग्रंथातील लेख म. ना. वानखडेंविषयी असले तरी अपरिहार्यपणे मिलिंद महाविद्यालय, नागसेन वन या सर्व परिसराचे दर्शन त्यातून वाचकांना घडते. भालचंद्र फडके यांनी त्याला ‘दलित साहित्याच्या नव्या प्रवाहाचे उगमस्थान’ म्हटले आहे. बाबासाहेबांनी उभारलेल्या तेथील वास्तूंत प्रत्यक्ष वावरलेल्यांच्या जीवनाचे सोने झालेच. पण बाबासाहेबांची प्रेरणा वसत असलेल्या या परिसरातील कणाकणांचा गंध या पुस्तकातून वाचकापर्यंत पोहोचतो. त्याला ऊर्जा देतो. असे पुस्तक संपादित करण्याचे कष्ट वयाच्या ऐंशीचा टप्पा पार केलेल्या यशवंत मनोहर सरांनी घेतले आणि ही ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल सरांच्या प्रति कृतज्ञता. त्यांना सहाय्य करणाऱ्या ‘संपादक कुटुंबा’ला मनापासून धन्यवाद.

वानखडेंसारख्या प्रज्ञावंताने समाजाला अजून खूप काही दिले असते. ५४ व्या वर्षी हृदयविकाराने अकस्मात त्यांचे निधन झाले. विचारवंताच्या दृष्टीने हे उमेदीचे वय असते. त्यांच्या या जाण्याने सगळेच हादरले. या पुस्तकातील लेखांतूनही ती व्यथा व्यक्त होते. म. ना. वानखडेंचे ‘मिलिंद’ मधील एक सहकारी व थोर समीक्षक रा. ग. जाधव यांचे एक अवतरण पुस्तकाच्या प्रारंभी दिले आहे. वानखडेंनी ज्याच्या काव्यावर प्रबंध लिहिला त्या त्यांच्या आवडत्या वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीच्या कवितेचा संदर्भ या अवतरणात घेऊन जाधवांनी वानखडेंना आदरांजली वाहिली आहे. त्याची नोंद करुन या पुस्तकाचा परिचय संपवतो.

‘ “अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर व्हिटमनने एक भावोत्कट विलापिका लिहिली. तिचा आशय असा – या माझ्या कप्तानाने नाव नीटपणे किनारी लावली. वाऱ्यावादळातून ती सांभाळून अखेर एका संकटग्रस्त सफरीने मंझिल गाठली. आता किनाऱ्यावरुन घंटानाद ऐकू येत आहे. सफर सफल झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या मुखावर दृगोचर होत आहे. पण माझा कप्तान कुठे आहे? तो तर नावेत अचेतनपणे पडून आहे आणि माझ्या हृदयातून रक्ताचे थेंब ठिबकत आहेत.”

दलित साहित्याची नौका पहिल्या वादळी लाटांमधून सुरक्षितपणे सांभाळून या कप्तानाने नीटपणे किनारी लावली. पण त्याच्या जीविताची सफर मात्र निर्दयी नियतीने संपवून टाकली. माणूस पराधीन असतो हेच खरे. पण हे कप्ताना, तुझे कार्य कोण विसरेल? तुला शतशत प्रणाम!’

___________________________

क्रांतदर्शी म. ना. वानखडे : जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ

संपादक – यशवंत मनोहर

प्रकाशक – प्राईम पब्लिशिंग हाऊस

संपर्क - ८९९९२३४५५६ / ९६६५६२६७१७

किंमत: ५५० रु.

_____________________________

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com