Sunday, March 10, 2019

लाच न देण्याची चैन!

“काका तुमचं काम झालं!” मी दिलेला कागद फाईलला लावत पोलीस म्हणाले अन् मी मनातल्या मनात हुश्श केले. ताणलेले शरीर-मन एकदम सैल झाले. गेले तीन दिवस खूप ताणात गेले होते. पासपोर्टच्या नूतनीकरणासाठीची प्रक्रिया पासपोर्ट कार्यालयात अगदी सुरळीत झाली होती. पासपोर्ट पोस्टाने हातातही आला होता. पण पोलीस तपासणी त्यालाही लागू असते. त्याशिवाय हातात असलेल्या पासपोर्टला किंमत नसते. परवा पोलीस कॉन्स्टेबल तपासणीसाठी घरी येऊन गेले. मी घरी नव्हतो. मी खरेच इथे राहतो का हे जाणण्यासाठी त्यांनी घरच्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. नंतर ते आसपासच्या घरी गेले. तिथून पुन्हा आमच्या घरी आले व म्हणाले, “त्यांना कोणी ओळखत नाही. ते इथे राहतात हे कशावरुन?” घरच्यांना हे आश्चर्यच होते. सासूबाई आजूबाजूच्या लोकांना तुम्ही असे कसे सांगितलेत हे पोलीसासमोरच विचारायला बाहेर आल्या. पण हे पोलीस कॉन्स्टेबल थांबलेच नाहीत. पोलीस स्टेशनला त्यांना यायला सांगा, असे म्हणून लागलीच निघून गेले. 

मला हे कळल्यावर आश्चर्य वाटले. मनात अस्वस्थता दाटली. ही इमारत तयार होत असतानाच आम्ही राहायला आलो. अठरा वर्षे झाली. अशावेळी मला कोणीच ओळखत नाही, हे कसे असू शकेल? भाडोत्री बदलत असतात. त्यांना ठाऊक नसू शकते. जुन्यापैकी काहींना माझे आडनाव माहीत नसू शकते. माझी पत्नी सोसायटीत क्रियाशील असते. तिच्या आडनावाने मला बरेच जण ओळखतात. ते मी फारसे दुरुस्त करत नाही. पण अनेक जण माझ्या आडनावासहित ओळखणारे आहेत हेही मला ठाऊक आहे. सोसायटीचे पदाधिकारी, कार्यालयीन व्यवस्थापक यांना तर आम्हा दोघांच्या नावे घराची मालकी असल्याने दोन्ही नावांची अधिकृत माहिती आहे. तरीही चौकशीत मी इथे राहत नाही या निष्कर्षाला पोलीस कॉन्स्टेबल ‘पोलीस’ असूनही यावेत याचे मला आकलन होत नव्हते. एखादा आरोपी शोधताना आजूबाजूचे लोक सांगतात तो इथे राहत नाही यावर पोलीस विसंबत नाहीत. ते विविध मार्गांनी खातरजमा करतात. पण माझ्याबाबतीत अशा सहज निष्कर्षाला ते कसे येऊ शकतात? 

....या विचाराने मला त्रास होऊ लागला. अडवणूक करुन पैश्यांची मागणी करण्यासाठी हे असू शकते, असा संशय मनात दाटू लागला. तो खरा त्रासदायक मुद्दा होता. मागे एकदा मुलाच्या पासपोर्टच्या तपासणीसाठी आलेल्या पोलिसाने जाताना ‘चहा-पाण्यासाठी काही आहे की नाही?’ अशी विचारणा केली होती. ‘आम्ही याच्या विरोधात आहोत, तुम्हीही अशी मागणी करु नये, यात मागणाऱ्याची व देणाऱ्याचीही प्रतिष्ठा राहत नाही.’ ...वगैरे उपदेश करुन त्या पोलिसाला परतवले होते. 

त्याचा परिणाम..? 

सगळे नीट असतानाही पासपोर्ट कार्यालयातून निरोप आला पोलिसांनी तुमचा पासपोर्ट रिजेक्ट करण्याची शिफारस केली आहे. आम्ही चिंतेत पडलो. अशी काय उणीव राहिली आमच्याकडून काही कळेना. पासपोर्ट कार्यालयात भेटीला गेलो तेव्हा कळले, पोलिसांनी पत्ता चुकीचा असल्याने पासपोर्ट रिजेक्ट करावा असा शेरा दिला आहे. आमच्या मुलाने पत्त्याची सगळी कागदपत्रे दाखवली तेव्हा ते अधिकारीही हसू लागले. प्लॉट नंबर लिहिलेला नव्हता. तो एरवीही आम्ही कोणी लिहीत नाही. कोठच्याच कागदपत्रावर तो नाही. मुलाच्या आधीच्या पासपोर्टवरही तो नव्हता. अधिकाऱ्यांनी पोलिसांचा आक्षेप अमान्य करुन पासपोर्ट मंजूर केला. 

पण या सर्व सव्यापसव्यासाठी गेलेला वेळ, श्रम. मानसिक त्रास व प्रवासखर्च याचे मोल त्या पोलिसाला द्याव्या लागणाऱ्या पैश्यांपेक्षा कित्येक पटींनी जास्त होते. बरे या सर्व त्रासाअंती काम झाले ही मोठी आनंदाची गोष्ट. त्यामुळे त्या कष्टा-खर्चाचे काही वाटले नाही. पण पोलिसांच्या अडवणुकीने जर काम झालेच नसते तर..? 

आमच्या आधीच्या पासपोर्टवेळी आमच्या एका पोलीस अधिकारी मित्राचे मित्रच संबंधित पोलीस ठाण्यात होते. त्यामुळे तेथील आमचे काम करणाऱ्या कॉन्स्टेबलचे सौजन्यच लक्षात राहिले. त्यावेळी त्याने काय तपासणी केली हे आता आठवत नाही. 

तर दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेलो. कॉन्स्टेबल तरुण होते. त्यांनी कडकपणे मला तुम्हाला तिथे कोणी ओळखत नाही वगैरे सांगायला सुरुवात केली. मी म्हणालो, “अहो, असे एकतर होणार नाही. दुसरे म्हणजे तुम्ही तेवढ्यावर कसे विसंबता? तुम्हाला शंका असेल तर मध्यरात्री येऊन पहा ना तो माणूस तिथे आहे की नाही! तुम्हाला शंका आहे ना! मी तुमच्या खात्यातीलच माझ्या पोलीस अधिकारी मित्राला तुमच्याशी बोलायला लावतो. ते याच भागात राहतात. माझ्या घरी येत असतात.” त्यावर ते कॉन्स्टेबल म्हणाले, “मी अशी ओळखीने कामे करत नाही. जे असेल ते नियमाप्रमाणे करतो.” मी त्यांच्या या म्हणण्याचे जोरात स्वागत केले. म्हणालो, “अगदी योग्य! असेच असायला हवे. तुम्ही नियमाप्रमाणे माझा तपास करा. नियमाप्रमाणे रिजेक्टचा शेरा द्या. माझी काहीच हरकत असणार नाही.” त्यावर ‘’सगळीच कामे कायद्याने होत नाहीत” असे ते पुढे म्हणाले. मला नियमाप्रमाणे करण्याचे व कायद्याने कामे न होण्याचे या दोहोंची काही संगती लागेना. मग थोडी हुज्जत झाली. अखेर ते कॉन्स्टेबल खाली आले. माझ्याकडच्या कागदपत्रांमधून आवश्यक ती कागदपत्रे घेतली. एक सोसायटीचे ओळखीचे पत्र हवे होते. ते दुसऱ्या दिवशी दिले. कॉन्स्टेबल म्हणाले, “काका तुमचे काम झाले.” त्यांना धन्यवाद देऊन “ओळखीने काम न करण्याची तुमची पद्धत मला चांगली वाटली. असेच असायला हवे” अशी त्यांची प्रशंसा केली. संविधानातील मूल्यांची आमची पुस्तिका दिली. कॉन्स्टेबलच्या तोंडावर हसू फुलले. माझा नंबर घेतला. मी नक्की तुम्हाला फोन करीन, असे मी निघत असताना ते म्हणाले. 

माझा ताण हलका झाला. हा ताण कागदपत्रे देण्याचा, फेऱ्या मारण्याचा नव्हता. तो मला कबूल होता. प्रश्न त्या कॉन्स्टेबलने पैसे मागितले तर काय याचा होता. त्यावरुन हुज्जत, अशी लाच घेणे बरोबर नाही, मी देणार नाही, काय करायचे ते करा...हा प्रसंग वाट्याला येणार याने शरीर-मन ताणले होते. आजपर्यंत तरी लाच देणे कधीच वाट्याला आले नाही. ना पोलीस, ना कोणी अधिकारी, ना टीसी. झगडावे लागले. पण काम झाले. 

मात्र एव्हढेच लिहून थांबणे बरोबर होणार नाही. झगडले की काम होते. लाच द्यावी लागत नाही, हा निष्कर्ष फसगत करणारा होईल. तांत्रिकदृष्ट्या मला माझ्या हाताने लाच द्यावी लागण्याचा प्रसंग आला नाही, हे खरे. पण माझ्या वतीने काहींनी ही कामे केली आहेत. माझ्या कळत अथवा नकळत. कोंबडे मी कापले नाही. मी हत्या केली नाही. मी केवळ खाल्ले. पण माझ्यासाठी कोणीतरी दुसऱ्याने हत्या केली होती. त्याचे काय करायचे? 

गावच्या नव्या घरी वीज जोडणी घेताना जवळ विजेचा खांब नव्हता. प्रतीक्षा यादीप्रमाणे तो यायला बरेच महिने जाणार होते. आम्हाला तर घाई होती. घराचे कंत्राट घेणाऱ्याकडेच विजेच्या जोडणीची जबाबदारी होती. त्याने त्याच्या ओळखीने, १२-१३ हजार रुपये जास्त देऊन हा खांब, मीटर दोन दिवसात आणला. हे पैसे मी थेट दिले नाहीत. ते घराच्या एकूण कंत्राटाच्या हिशेबात शेवटी कमी-जास्त करताना त्याने लावले. मुंबईच्या घराच्या कामावेळी रस्त्यावर पडलेल्या डेब्रिजचा प्रश्न होता. त्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आले. घर पाहिले. मला भेटले. गेले. बाहेर जाताना त्यांच्या सोबत कंत्राटदार गेला. त्याने जे काय ‘मॅनेज’ करायचे ते केले. 

या दोन्ही घटनांत लाच द्यावी लागली व ती माझ्या कामासाठी द्यावी लागली ही वस्तुस्थिती आहे. माझ्या हाताने ती द्यावी लागली नाही. हे कुकर्म मला करावे लागले नाही, एव्हढेच. ट्रेनच्या लांबच्या प्रवासात रिझर्वेशनची गडबड असताना माझी सोय करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी टीसीशी काहीतरी जुगाड केलेला असणारच. तो मला त्यांनी सांगितलेला नाही एव्हढेच. 

आमच्या सत्याच्या आग्रहासाठीच्या चळवळीच्या केसेस कोर्टात चालताना आमच्यासाठी फुकट लढणाऱ्या नामांकित कार्यकर्त्या वकिलांनी एखादा कागद मिळवण्यासाठी, हितचिंतक न्यायाधीशाकडे केस येण्यासाठी तेथील शिपाई वा कारकुनाचे हात स्वखर्चाने ओले केलेले मला ठाऊक आहेत. अगदी भ्रष्टाचाराच्या विरोधातली केस लढवतानाही हा भ्रष्टाचार या वकिलांना करावा लागतो. ती रीतच आहे. ते नाही केले तर आपण लटकू असे त्यांचे म्हणणे असते. 

ज्यांच्याकडे किमान साधनसंपदा, प्रतिष्ठा, शिक्षण आहे अशांना बरेचदा थेट स्वतः लाच न देण्याची सवलत मिळू शकते. तुम्ही मेधा पाटकर-अण्णा हजारे असाल तर ‘त्या येड्यांच्या’ नादाला लागू नका असा सल्ला व्यवस्थेला मिळत असतो. पण मेधा पाटकर-अण्णा हजारे यांसारखे असामान्य नसलेल्या, कोणतीच साधनसंपदा वा किमान शिक्षण व प्रतिष्ठा नसलेल्या सामान्य, अल्पशिक्षित, निरक्षर, गरिबांचे काय? त्यांच्या मदतीला गावातील, वस्तीतील ‘सोशल-पोलिटिकल वर्कर’ येत असतात. सरकारदरबारी करावयाच्या कामांत ते मध्यस्थ असतात. तिथे द्यावयाचे पैसे अधिक त्यांची स्वतःची फी ते या गरिबांकडून वसूल करतात. पैसे न देता कामे करुन घेण्याची चळवळीची यंत्रणा प्रत्येक गावात वा वस्तीत अर्थातच नसते. असली तरी तो दबाव नियमित ठेवणे किती जिकिरीचे असते, हे चळवळीतल्या तळच्या कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. एका अत्यंत लढाऊ व बऱ्याच लढाया जिंकलेल्या युनियनकडून काम लवकर होत नाही असे दिसल्यावर आपल्याला परमनंट करण्यासाठी या युनियनमध्ये असलेल्या सफाई कामगारांनी नगरसेवक-महापौर-अधिकारी यांना काही लाख रुपये जमवून देण्याची तयारी केल्याचे उदाहरण मला परिचयाचे आहे. 

कायद्याने लाच देणे व घेणे दोन्ही गुन्हा आहे. फक्त लाचलुचपत खात्याच्या सल्ल्याने लाच घेणाऱ्याला पकडण्यासाठी दिलेली लाच आणि स्टिंग ऑपरेशनवेळची लाच गुन्हा मानला जात नाही. लाच दिल्याचे उघडकीस आल्यास देणाऱ्यालाही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे देणारा न बोलणे, तक्रार न करणे पसंत करतो. याचा फायदा वा संरक्षण लाच घेणाऱ्याला मिळते. म्हणून लाच देणे हा कायद्याने गुन्हा असता कामा नये. तसे केल्यास नाईलाजाने लाच देणारे तक्रार करायला पुढे येतील. लाच घेणाऱ्याचे संरक्षण जाईल व तो सापडणे सुलभ जाईल वा त्याच्या बिनदिक्कत लाच घेण्यास काही प्रमाणात पायबंद बसू शकेल, अशी कायद्यात सुधारणा करण्याची सूचना मनमोहन सिंगांचे अर्थ सल्लागार कौशिक बसू यांनी २०११ मध्ये केली होती. त्यावर खूप गदारोळ उठला. मनमोहन सिंग स्वतः त्या विरोधात होते. पण त्यांनी ही सूचना करण्याचे कौशिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य केले होते. 

या सूचनेच्या विविध अंगांची मला कल्पना नसल्याने ती योग्य की अयोग्य या निष्कर्षाला मी येऊ शकत नाही. तथापि, ही सूचना अमलात आली तरी सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहातील अडिअडचणींत मूलभूत सुधार होईल असे वाटत नाही. सर्व काही नियमांनुसार असताना फाईल पुढे सरकवायला अडवणारे किंवा नियमानुसार नसताना नियम वाकवणारे या दोहोंमुळे नडलेले वा त्यांची गरज असलेले लोक कायद्याचा लंबा मार्ग किती अनुसरतील ही शंका आहे. आज अधिकाधिक एकाकी होत जाणारा, घाईत असणारा समाज पैसा द्या व पुढे सरका या मनःस्थितीत खोल बुडत आहे. त्यासाठीच्या लढाया ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असल्याचे त्याला वाटत आहे. पैसे घेतात अन् कामही करतात असे लोक त्याच्या आदराला पात्र होतात. केवळ बड्यांकडून पैसे घेणारा आणि गरिबांना बिनपैश्यांची मदत करणारा रॉबिनहूड तर लोकांना देवमाणूसच वाटतो. 

‘सगळीच कामे कायद्याने होत नाहीत’ या सल्ल्याची लोकांना, कार्यकर्त्यांनाही प्रचिती येत असते. एका वस्तीत एकाने दुसऱ्याचे कर्ज घेतले. सावकारी पद्धतीच्या या कर्जाचे मासिक दहा टक्के व्याज. व्याज मुदलीच्या चार पट फेडले तरी मुद्दल तशीच. तीही नंतर जवळपास फिटली. थोडी शिल्लक होती. त्या हिशेबात कर्ज देणाऱ्याने गडबड केली. सगळा व्यवहार तोंडीच होता. लेखी काहीच नव्हते. माझी अमूक इतकी मुद्दल अजून बाकी आहे, ती दे म्हणून कर्जदाराला तो धमकावू लागला. आमच्या एका वस्तीतल्या हरहुन्नरी कार्यकर्त्याला हा कर्जदार भेटला. या कार्यकर्त्याला यात अन्याय दिसला. त्याने ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याकडे त्याला नेले. पोलीस अधिकाऱ्याने कर्ज देणाऱ्याला बोलावून घेतले. मुकाट ऐकतोस की सावकारी बंदी कायद्याखाली आत टाकू असे दमात घेतले. कर्ज देणारा सूतासारखा सरळ आला. कर्जदारावरचा अन्याय दूर झाला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर या कार्यकर्त्याने कर्जदाराला सल्ला दिला- ‘ते साहेब होते म्हणून तुझे काम झाले. तुझे पैसे वाचले. आता सद्भावनेने त्यांना काहीतरी दे.’ 

इथे त्या कार्यकर्त्याने त्याच्याकडून आपल्या रदबदलीचे काही घेतले नाही, याची मला कल्पना आहे. असे घेत नाहीत असे नाही. वर अशा सोशल वर्कर मध्यस्थांचा उल्लेख केलाच आहे. पण या कार्यकर्त्याने घेतले नाहीत. त्याची अपेक्षा एवढीच होती, या साहेबांचे आणि त्याचे संबंध चांगले राहावेत. वस्तीतल्या अन्य भांडण-तंट्यात त्यांनी सहकार्य करावे. त्याला मान द्यावा. काम करणाऱ्याला पैसे द्यावेत हा व्यवहार त्याला खटकत नव्हता. उलट साहेबाने मागितले नसताना आपण कृतज्ञ राहायला हवे असे त्याचे तत्त्व होते. ही त्याची तत्त्वच्युती, अज्ञान की सत्प्रवृत्तता? ...निर्णय काय करायचा? 

जीवन व्यामिश्र असते, सगळेच तर्काने चालत नाही..असे काही सूत्र मला मांडायचे नाही. आज ज्या व्यवस्थेचे आपण घटक आहोत, ती सामाजिक-आर्थिक-राजकीय तसेच लिंगीय विषमता व शोषणाने भरलेली आहे. साधनसंपदेचे न्याय्य वितरण अर्थातच नाही. वंचित-शोषितांची जाणीवही त्या दिशेने विकसित झालेली नाही. आहेरे वर्गातल्या विविध थरांना तो आपला जन्मजात व कष्टार्जित मामला वाटतो. सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळायला हवा याविषयी त्यांचे दुमत नाही. पण ते समतेच्या बाजूने नाहीत. त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांची एक स्तरीय उतरंड आहे. त्या त्या थराचे रीतीरीवाज पाळणे (ज्याने त्याने आपापल्या पायरीने राहावे) हे त्यांनी गृहीत धरले आहे. एका जातीचे असलेले, पण आर्थिक बाबतीत वरचे असलेले आपल्या गरीब जातबांधवाने त्याच्या पायरीने वागावे असेच अपेक्षित धरतात. या संस्कारांना अनुसरुन गावातून-वस्तीतून आलेले, पैसे न खाणारे कार्यकर्तेही त्या गावातील-वस्तीतील सामान्यांपेक्षा स्वतःची प्रतिष्ठा वेगळी मानायला लागतात. ...हे सर्व बदलायला हवे. या परिस्थितीच्या साच्यात माणसाचे व्यक्तित्व-वृत्ती घडणे स्वाभाविक असताना जाणत्यांनी माणसांना माणूस घडवण्याचा आज अस्वाभाविक वाटणारा प्रयत्न समांतरपणे करायला हवा. 

तेवीसशे वर्षांपूर्वी चाणक्याने आपल्या अर्थशास्त्रात ‘पाण्यातला मासा पाणी कधी चाखतो ते कळत नाही, तद्वत सरकारी माणूस सार्वजनिक पैसा कसा खातो ते कळणे कठीण आहे’ असे सांगितल्याची नोंद भ्रष्टाचाराचे हे दुखणे किती प्राचीन आहे, हे सांगण्यासाठी केली जाते. हे प्राचीन आहे. पण माणसाच्या उगमापासून नाही. साहजिकच मानवजातीच्या अंतापर्यंतही असू शकत नाही. वर नमूद केलेली पद, पैसा, प्रतिष्ठा यावर आधारित विषम समाज व्यवस्था तयार झाल्यानंतरचे हे दुखणे आहे. म्हणजेच या विषमतेच्या विलयाबरोबरच भ्रष्टाचाराचे दुखणे संपणार आहे. तोवर नियंत्रणाचे विविध मार्ग, तंत्रज्ञानाचा वापर, कायद्यातील बदल, संघर्ष, लोकांच्या सत्प्रवृत्ततेला आवाहन वगैरे करावे लागेलच. 

..आणि तोवर पैसे न देता काम करुन घेण्याची चैन काही लोकांना काही वेळाच परवडू शकते अन् तीही वरवरची, कृतक असू शकते हे शांतपणे स्वीकारावे लागेल. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मार्च २०१९)

बाळासाहेब आंबेडकर यांना मित्रांचे आवाहन

३ मार्च २०१९ 

प्रिय बाळासाहेब, 

महाराष्ट्र लोकशाही आघाडी, जातिअंताची चळवळ तसेच आपल्या नेतृत्वाखालच्या विविध चळवळींत सहभाग घेतलेले, त्याबाबतच्या विचारविनिमयात असलेले आम्ही आपले मित्र आहोत हे आपल्या पक्षपरिवारातही सुविदित आहे. तुमच्या आजच्या अत्यंत वादळी दिनक्रमातही तुम्ही कधी फोनवर-कधी प्रत्यक्ष आमच्याशी मित्रत्वाच्या हक्काने बोलत असता, ही आमच्यासाठी खूप आश्वासक व समाधान देणारी बाब आहे. आपल्यातल्या मित्रत्वाच्या या हक्कानेच आजच्या राजकीय माहोलात आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत. 

बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ही आपल्याला मिळालेली जन्मजात विरासत. पण तिचे तुम्ही कधीही भांडवल केले नाहीत. बाबासाहेबांच्या घराण्यातील म्हणून लोक आदराने, भावनेपोटी आपल्याला एक वेगळे स्थान देतात. ते स्वाभाविकही आहे. तथापि, तुम्ही व्यक्तिशः त्यापासून दूर राहण्याची खटपट करत असता हा आमचा अनुभव आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत व्यापक रिपब्लिकन चळवळ एकजातीय घेऱ्यात अडकलेली असताना तुम्ही जाणीवपूर्वक तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न निरंतर करत आहात. गांधी-मार्क्स यांबाबत ठोकळेबाज विरोधाच्या वातावरणात गांधी-मार्क्स-आंबेडकर तसेच अन्य पुरोगामी विचारधारांतल्या पूरकत्वाची साथ करत आलात. आमच्यासारखे मित्र जोडलेत. त्यांच्यासह सामायिक सहमतीचे लढे उभारलेत. यासाठी तथाकथित स्वकियांच्या नाराजीची तुम्ही तमा बाळगली नाहीत. यामुळेच सामाजिक व कष्टकरी या दोहोंबाबत शोषित समूहाला सर्वंकष परिवर्तनासाठी सिद्ध करण्याची संधी व अवकाश आपल्या नेतृत्वाने तयार होतो आहे. देशात बहुसंख्येने असलेल्या सामाजिक व आर्थिक शोषितांना एकवटून आजच्या लोकशाही मतदानाच्या प्रक्रियेत बहुमताने राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नांत आपण निर्णायक ठरु शकता, ही भावना आमची आहे. 

वंचित, बहुजन आघाडी या आपल्या प्रयोगाची दिशाही तीच असावी, अशी आमची अपेक्षा आहे. पायाला भिंगरी लावून ज्या रीतीने गेले वर्षभर आपण विविध जातसमूहांना भिडत आहात, त्यांच्यात सत्ताकांक्षा जागृत करत आहात हे अत्यंत स्पृहणीय आहे. या जातसमूहांच्या आकांक्षा संकुचिततेकडे न जाता आपल्या जातिअंताच्या मोहिमेचा पुढचा टप्पा या नात्याने व्यापक सामाजिक-आर्थिक शोषिततेचे व्यापक भान त्यांना आपण देतच असणार यात शंका नाही. आपल्या प्रचंड संख्येने होणाऱ्या सभा, त्यातील लोकांची ऊर्जा पाहता एक नवीन सामाजिक-राजकीय घटित आपल्या नेतृत्वाखाली उदयास येत आहे, याविषयी आम्हालाच काय आजच्या सत्ताधारी वा विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आपली भूमिका काय राहणार याकडे सगळा महाराष्ट्र डोळे लावून आहे. 

आपली चळवळ लांबपल्ल्याची आहे. मात्र तातडीने येणाऱ्या निवडणुका हा आपल्या सर्वांच्याच काळजीचा भाग झाला आहे. भाजपच्या रुपाने संघाचे फॅसिस्ट सरकार आज भारतीय लोकशाहीच्या उरावर बसले आहे, ते तातडीने खाली उतरवणे हे आज सर्व लोकशाहीवाद्यांसमोर कळीचे आव्हान बनले आहे. आपल्या भाषणांतून संघाच्या या फॅसिझमवर जे प्रचंड आघात होत असतात ते त्यामुळेच. लोकशाहीवादी भांडवली पक्षांची साथ न घेता केवळ आपल्या कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके आदि दुबळ्यांच्या संघटनाद्वारे त्यांचा पाडाव व्हायला हवा याविषयी आपल्या कोणाच्याच मनात शंका नाही. मात्र वस्तुस्थिती केवळ आपल्या ताकदीवर फॅसिझमचा पराभव करु शकतो ही नाही. तुम्हाला मिळत असलेला प्रचंड पाठिंबा संघटनात्मक पातळीवर स्थिर होऊन मतांत परिवर्तीत होण्याची त्यात क्षमता जरुर असली तरी तेवढा अवधी आज आपल्याकडे नाही. या दोन-तीन दिवसांत निवडणुका जाहीर होतील. अशावेळी भाजपचा पराभव ही क्रमांक एकची बाब करुनच आपल्याला निवडणुकांतले डावपेच ठरवणे भाग आहे. 

तुमची जाहीर भूमिका काँग्रेसशी अनेक बाबतीत मतभेद वा तीव्र विरोध असला तरी सहकार्याची आहे. भाजप हा क्रमांक एकचा शत्रू आहे आणि त्याला आधी संपवला पाहिजे, हे आपल्या मनाशी स्पष्ट आहे, हेच त्यातून उघड होते. मात्र त्यासाठी तुमच्या अटी आहेत. जागांच्या आणि संघाला कायदेशीर चौकटीत आणण्याचे त्यांनी जाहीर करण्याबाबतच्या. काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वर्गचरित्राविषयी आपण सहमतीतच आहोत. आजवर आपले लढे त्यांच्या विरोधातच होते. पुढेही राहतील. त्यांचे अधिकृत धोरण आणि त्यांच्या नेत्यांचा व्यवहार यातील अंतर आपल्याला सुपरिचित आहे. उद्या ते सत्तेवर आले तरी त्यांच्याशी लढावेच लागेल याविषयी आपल्या कोणाच्याच मनात शंका नाही. मात्र त्यांच्या काळात लोकशाही लढ्यांना जो किमान अवकाश होता तो मूळासकट नष्ट करण्याची भाजपची खटपट आपण रोज अनुभवत आहोत. संघ पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान, निवडणुका राहतील की नाही, ही आपल्या सगळ्यांसमोर भीती आहे. जपान्यांच्या हल्ल्याविरोधात परस्परांचे कट्टर शत्रू असलेले माओ व चैंग कै शेक चीनमध्ये एकत्र येतात. हिटलरच्या फॅसिझमला परतवण्यासाठी आधी एकमेकांच्या विरोधात लढणारे रशिया व इंग्लंड एकत्र येतात. ही उदाहरणे लक्षात घेता भारतात फॅसिझमला गाडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या भांडवली पक्षांसह अन्य लोकशाहीवादी शक्तींची कार्यक्रमाधारित एकजूट उभारणे गरजेचे आहे. काँग्रेसशी सहकार्य करण्यासाठी आपण अटी ठेवताना ही मूळ भूमिका आपणास मान्य असणारच. 

आपल्या अटी मान्य करुन काँग्रेसने आपल्याशी एकजूट करावी, अशीच आमचीही अपेक्षा होती. तथापि, एकजुटीबाबत अनुकूल असतानाही तुमच्यात चर्चा होऊन काही पुढचे पाऊल पडत नाही, याबाबत आम्ही चिंतित होतो. मात्र काँग्रेसला २८ फेब्रुवारीची आपण जी अंतिम मुदत दिलीत, त्याला वंचित बहुजन आघाडीचा राज्यभर सुसाट सुटलेल्या वारुची दखल घेत दोन्ही काँग्रेसने संयुक्तरित्या आपल्याला पत्र लिहून जो प्रतिसाद दिला, त्यामुळे कोंडी फुटायला एक अवकाश तयार झाला आहे असे आम्हाला वाटते. ४ जागा नक्की, वाटाघाटीत त्या वाढू शकतात आणि संघाविषयीचे आपल्याला अपेक्षित निवेदन हे ठोस पाऊल पडले असे आम्हाला वाटते. आपण आपल्याकडून सहकार्याचा हात पुढे करुन चर्चेला बसावे, त्यातून लोकसभेच्या जागांविषयी तद्वत विधानसभांबाबतही आताच आश्वासन घ्यावे. महत्वाचे म्हणजे दलित, कष्टकरी, वंचितांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे लेखी अभिवचन घ्यावे. त्याची पूर्तता न झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपला संघर्ष अटळ आहे, याची आताच त्यांना नोंद द्यावी. 

या सहकार्यामुळे, युतीमुळे भाजपला रोखण्याच्या दिशेने दमदार पाऊल पडेल. त्यातून जे आश्वासक वातावरण तयार होईल त्यातून आपल्या समूहांची प्रेरणा वाढेल आणि आपल्यालाही संघटना बांधणीसाठी उसंत मिळू शकेल. 

आपण याचा विचार करावा, हे विनम्र आवाहन. 

कोणत्याही स्थितीत आपल्या स्वतंत्र उभे राहण्याने भाजपरुपी फॅसिझमला मदत होणार नाही, हे आपल्या मनाशी नक्की असणार याची आम्हा मित्रांना खात्री आहे. 

आपल्या जोमदार वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा! 

आपले,

भारत पाटणकर, मिलिंद रानडे, उल्का महाजन, सुरेश सावंत

Thursday, February 7, 2019

अपना बाजारच्या गोष्टीचे तात्पर्य

रुढ अर्थाने खातूभाईंच्या (गजानन खातू) ‘अपना बाजारची गोष्ट’ या पुस्तकाचे हे परीक्षण वा परिचय नाही.  असा परिचय झाल्यास तो आनुषंगिक परिणाम समजावा. या पुस्तकातील मला भावलेल्या, शिकवणाऱ्या व अधोरेखित करावे असे वाटलेल्या काही मुद्द्यांकडे वाचकांचे लक्ष वेधावे आणि त्यांनी त्या मुद्द्यांच्या अधिक विवेचनासाठी मूळ पुस्तक वाचण्यास उद्युक्त व्हावे, हा मर्यादित हेतू या लेखाचा आहे. शीर्षकात नमूद केलेल्या ‘तात्पर्य’ शब्दाची जबाबदारी माझी. लेखक वा वाचकांचे वेगळे मत असू शकते.
समाजवादी-पुरोगामी चळवळीत वय व समज या दोन्ही बाबतीत ज्येष्ठ असलेले खूप कमी लोक आता आहेत. त्यातील एक खातूभाई. या ज्येष्ठाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वय-समजाला अजिबात न दबकता त्यांच्याशी बोलता येते. त्यांना ज्येष्ठ मानणाऱ्या काहींशी बोलताना थोडे दबकायला होते. पण खातूभाईंशी थेट आपल्या वयाच्या पातळीवरुन दोस्ती करता येते. भिन्न मते मांडायला वा त्यांच्या मतावर प्रश्न उभे करायला किंचितही त्यांची ज्येष्ठता आड येत नाही. उलट आपल्या म्हणण्याचे स्वागत होऊन त्याबद्दल आज ना उद्या अजून काही नवे समज वाढवणारे त्यांच्याकडून मिळेल याची खात्री असते. वयाने जुने होत असताना वर्तमानाच्या तारांचे नवनवे झंकार ऐकत भविष्याचा वेध घेण्याची त्यांची वृत्ती व क्षमता अनुभवताना आपल्या म्हातारपणाविषयी मनात एक लोभस चित्र तयार होते. खातूभाईंचे खाणे, राहणे, बोलणे यातला रस पाहता ‘संध्याछाया भिवविती हृदया’ हा कविवर्य तांबेंचा स्वतःपुरताच अनुभव असावा असे वाटू लागते.
अशा या खातूभाईंचे वैचारिक लेखन वाचले होते. पण ‘अपना बाजार’शी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक संबंधाचा केवळ संदर्भच मला होता. त्याचे तपशील ठाऊक नव्हते. या पुस्तकामुळे ती उणीव दूर झाली. त्यांच्या व्यक्तित्वाची आणि अपना बाजार या एका अत्यंत महत्वपूर्ण सहकाराच्या प्रयोगाची घडण कळायला मदत झाली.
१९६८ ते १९८२ या १४ वर्षांतली, त्यांच्या वयाच्या २७ ते ४२ या कालखंडातली ही घडण ते रेखाटतात तब्बल ३६ वर्षांनी. ‘हे पुस्तक अपना बाजारचा इतिहास नाही. १९४८ ते १९६८ पर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीची त्यात नोंद नाही. १९८२ नंतरच्या कालखंडाचीही चर्चा नाही. त्यामुळे अनेकांना ते अपुरे वाटेल.’ असा ‘कबुलीजबाब’ ते सुरुवातीलाच देतात. पण ‘निरोप घेताना’ या शेवटाकडच्या प्रकरणात ते म्हणतात- ‘ही १४ वर्षे अविरत कामाची होती. प्रतिवर्षी काही ना काही घडत होते. जणू बाल्यावस्थेतून युवावस्थेत वाटचाल होताना जडणघडणीची वाटचाल.’ त्यामुळे या पुस्तकात अपना बाजारचा संपूर्ण इतिहास नसला तरी त्यात नोंदवलेल्या काळाचे मोल मोठे आहे.
पर्सोनेल मॅनेजमेंट हा विषय असलेले खातूभाई ‘क्रॉम्पटनच्या भव्य कारखान्यातली’ नोकरी सोडून अपना बाजारच्या ‘नायगावच्या पत्राशेडच्या कार्यालयात’ येतात.  ते म्हणतात- ‘पण मला त्याचे फारसे वाटले नाही. कारण ही आपली माणसं होती. आपल्या विचारांची होती. क्रॉम्प्टनमधले कामगारविरोधी वातावरण मला कधी आवडले नाही. आपल्या विचारांच्या क्षेत्रात यायला मिळाले याचाही आनंद होता.’
ज्या परिसरात अपना बाजार उभे राहत होते, तो परिसर नायगाव, दादरचा. खातूभाई या परिसराचे व्यक्तित्व रेखाटताना लिहितात- ‘नायगाव हे कामगार व राजकीय चळवळीचं केंद्र. अशोक मेहतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी कामगार चळवळीने इथे सामाजिक कामाची पायाभरणी केली. (त्यांच्याच प्रेरणेने अपना बाजार सुरु झाले.) जी. डी. आंबेकरांनी इंटकची उभारणी केली. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांग्यांनी लाल बावटा उभारला. त्यामुळे नायगावच्या सामाजिक राजकीय जीवनात समाजवादी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट या तिन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते होते. त्यामध्ये नंतर शिवसेनेची भर पडली.’
अपना बाजारच्या टीमचे निर्विवाद कॅप्टन असलेले दादा सरफरे आणि त्यांचे सहकारी या सर्व प्रवाहांना कसे यशस्वीपणे हाताळत होते त्याची नोंद खातूभाई करतात. अपना बाजारची अध्वर्यू असलेल्या या मंडळींची पाळेमुळे त्या भागातील सामाजिक-राजकीय जीवनात खोल रुतलेली होती. नायगावमध्ये आदराचे स्थान असलेल्या दादा सरफरेंबद्दल लिहिताना ते म्हणतात- ‘दादांच्या घरी गेले की दादा बहुधा नायगावमधील कुठल्या तरी मर्तिकाला जाऊन आलेले असत. …बहुधा त्या काळात नायगावमधील एकही मर्तिक असे नसेल ज्याला दादा गेले नाहीत. …दादांच्या या चौफेर जनसंपर्कामुळेच दादा नायगावचे किंगमेकर झाले.’ दादांच्या बरोबरीने अपना बाजार उभारणीतले सहकारी, पुढे आमदार झालेले व आमदार होऊनही शेवटपर्यंत एकाच खोलीच्या घरात राहणारे एन. के. सावंत यांचाही नायगावच्या सामाजिक-राजकीय जीवनावर ठसा होता. अपना बाजारचे बहुतेक कार्यकर्ते प्रजा समाजवादी पक्षाचे. संस्थेच्या कामाचा मोबदला न घेणारे, मासिक बैठकीचा प्रवासभत्ताही पार्टीला देणारे, व्यापाऱ्यांच्या दिवाळी भेटी घरी न स्वीकारता ऑफिसमध्ये जमा करायला लावणारे हे पदाधिकारी. या सर्व सामाजिक-राजकीयदृष्ट्या धगधगत्या काळातील प्रेरक, ध्येयवादी कार्यकर्त्यांच्या विलक्षण जिद्दीचे कोंदण अपना बाजारच्या घडणीला मिळाले.
या चबुतऱ्यावर अपना बाजारची इमारत आकार घेत होती. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर व पुढे जनरल मॅनेजर म्हणून खातूभाईंचा सहभाग सुरु झाला तो या माहोलात, या गतीत. ते लिहितात- ‘पाण्यात पडलेला माणूस जसा जिवाची बाजी लावून हातपाय मारतो तसे आम्ही करत होतो.’ फिरती बससेवा, बोनस स्टॅम्प योजना, विजयी भांडी बचत योजना, दिवाळी भेट, जनता मिठाई अशा अनेक यशस्वी तर काही अयशस्वी उपक्रमांद्वारे तसेच अनेक क्षेत्रांत संचार करत अपना बाजार शिकत पुढे जात होते. या प्रयोगांवेळचे अनेक मासलेवाईक अनुभव-जिंकल्याचे, पडल्याचे, फसल्याचे या पुस्तकात वाचायला मिळतात.
खातूभाईंच्या कारकीर्दीतील या सर्व प्रयत्नांचे फलित नोंदवताना ते लिहितात-‘१९६८ ते १९८२ या चौदा वर्षांत अपना बाजारचा कायापालट झाला. १९४८ साली नायगावमध्ये एक धान्य दुकान सुरु करणाऱ्या नायगाव कामगार ग्राहक सहकारी संस्थेचे १४ शाखा आणि २५ प्राथमिक संस्था सदस्य असलेल्या मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक संस्थेत रुपांतर झाले. अन्नधान्याबरोबर रेशनिंगचे वितरण, कापड दुकान, औषध दुकान आणि औषध भांडार असा विस्तार झाला. मुंबईपासून दिल्लीपर्यंत संस्थेची ओळख निर्माण झाली.’ नायगावमधील अपना बाजार मागोमाग वाशी, मुलुंड, अंधेरी या ठिकाणी स्वतःच्या इमारतींत अपना बाजार विस्तारला. याच काळात संस्थेने सरकारचे भागभांडवल व कर्जाची संपूर्ण परतफेड केली. अशी परतफेड करणारी संस्था हे अपना बाजारचे वेगळेपण …या तसेच आणखी बऱ्याच मिळकती ते पुढे नोंदवतात.
या यशाची गुरुकिल्ली काय? ..याचं सरळसोपं उत्तर नाही आणि तसं ते नसंतही असे ते म्हणतात. मात्र काही ठळक गोष्टींची, वैशिष्ट्यांची ते नोंद करतात. उदा. पदाधिकारी व अधिकारी यांची साप्ताहिक बैठक. त्यामुळे निर्णयप्रक्रिया जलद व्हायला तसेच पदाधिकारी व अधिकारी यांतील संवाद वाढायला मदत झाली. अपना बाजारचे वार्षिक अहवाल फक्त कायद्याच्या पूर्ततेसाठी नसत तर त्यातून सभासदांना आपली संस्था खरोखरी कशी चालते ते कळण्यासाठी असत. त्यात कारणमीमांसा असे. सभोवतालच्या घडामोडींचा (उदा. १९७१ चे बांगला देशाचे स्वातंत्र्य युद्ध), सरकारी धोरणांचा या अहवालात तपशील असे. खातूभाई म्हणतात- ‘अपना बाजारचे अहवाल म्हणजे वैश्विक विचार आणि स्थानिक कृती याचा वस्तुपाठच आहेत.’ अपना बाजार हे समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी उभे केलेले रचनात्मक काम आहे व सहकारी चळवळ परिवर्तनासाठी आहे हे भान कायम ठेवले. परिणामी राजकीयदृष्ट्या कायम एकत्र राहिलेल्या या मंडळींनी संस्था चालवताना पक्षीय संकुचितता येणार नाही याची काळजी घेतली.
परिवर्तनवादी संस्थाचालक आणि त्याच दृष्टिकोणाचा उत्तम प्रशासकीय कौशल्य असलेला व्यवस्थापक एकत्र आल्याने धंदा, परिवर्तनाची चळवळ व कामगारांचे हितसंबंध यांची कशी समतोल सांगड घातली जाते, तुटू न देता पेच कसे सोडवले जातात याचे नमुने या पुस्तकात आहेत. अपना बाजारच्या कामगारांनी शिवसेनेची युनियन आणली तेव्हा तिला मान्यता द्यायचा प्रश्न तयार झाला. खाजगी कारखान्यात मालकधार्जिणी युनियन असायला आपला विरोध असतो. सहकारी क्षेत्रही याला अपवाद असता कामा नये. या भूमिकेतून कामगारांच्या युनियन निवडण्याच्या अधिकाराची खातूभाईंनी साथ केली. संस्थाचालक नाराज झाले. पण त्यांनी आपला आग्रह सोडून अखेर या युनियनला मान्यता दिली.
कामगारांचे अधिकार आणि धंद्याचे हित याबाबत कामगार संघटनांतील कार्यकर्ते व नेत्यांची भूमिका हा मोठा प्रश्न आजही आहे. या दोन्ही बाबींचा साकल्याने विचार करण्याचे व तसे कामगारांचे शिक्षण करण्याचे काम कॉ. डांगेंनी केले. पण ती परंपरा पुढे चालवणारे नेते पुढे कमी राहिले. जवळपास दुर्मिळ आहेत. खातूभाई या परंपरेचे वाहक आहेत. कामगारांच्या योग्य मागणीसाठी संस्थाचालकांशी संघर्ष आणि संस्थेच्या व पर्यायाने कामगारांच्या भविष्यातील अहिताला रोखण्यासाठी युनियनच्या मागणीला विरोध यात खातूभाईंनी कधी तडजोड केली नाही.
अपना बाजारचा सेवक वर्ग मुख्यतः बहुजन समाजातला. कारागिरी, शेती आणि कष्ट करणारा. पारंपारिकपणे उच्चवर्णीयांचा प्रभाव असलेल्या व्यापारात बहुजनसमाजातील नव्या पिढीत व्यापार हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचे काम खातूभाईंच्या पुढाकाराखाली अपना बाजारमध्ये झाले. अपना बाजारच्या चळवळीचे मापन करताना या social engineering ची दखल घेणे गरजेचे आहे, असे खातूभाई म्हणतात ते रास्तच आहे.
अपना बाजारच्या सेवकांना हाऊसिंग बोर्डाच्या जागा मिळाव्यात यासाठी संस्थेने प्रयत्न केले. आर्थिक अडचणींमुळे पुढे न येणाऱ्या सेवकांना ही संधी कशी महत्वाची आहे, त्यासाठी सोने विका, पतपेढीतून कर्ज घ्या असे समजवावे लागे. या कर्जाचा न पेलणारा भार संस्थेने उचलावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खातूभाई सेवकांना देत. यामुळे या सेवकांचे आयुष्य कसे बदलून गेले याची उदाहरणे खातूभाईंनी पुस्तकात दिली आहेत. या सेवकांच्या करवी झालेल्या, सामान्य माणसाच्या कर्तृत्वावरचा विश्वास वाढवणाऱ्या घटनाही ते नोंदवतात. सेवकांना शिकवणारे खातूभाई ‘भोगलेंमुळे मला शिक्षणापलीकडच्या व्यावहारिक शहाणपणाचे दर्शन झाले.’ असेही नमूद करतात.
इतकं सगळं करणाऱ्या खातूभाईंनी अपना बाजार यशाच्या शिखरावर असताना आणि कर्तृत्वाची आणखी भरारी घेण्याचे वय असताना, संस्थेच्या वाढीबरोबरच मोठ्या प्रमाणात वेतनवाढीची शक्यता असताना, विशेषतः मुले लहान व एकटा कमावता असताना अवघ्या ४२ व्या वर्षी अपना बाजार का सोडले?
पदाधिकाऱ्यांबरोबर मतभेद नव्हते. कामकाजात पेचप्रसंग नव्हते. सेवकांशी उत्तम संबंध होते. अशावेळी काहीही कारण नसताना मी अपना बाजार सोडले हे आपल्या स्नेही, सहकाऱ्यांना शेवटपर्यंत पटले नाही, असे खातूभाई म्हणतात. या पुस्तकात काही कारणे, त्यावेळची त्यांची मनःस्थिती तसेच भूमिका ते नोंदवतात.
संस्था उत्तम अवस्थेत असताना, सर्वांशी सलोख्याचे संबंध असताना बाहेर पडावे हे उत्तम, हे पहिले कारण. आपल्याकडून होण्यासारखे, निर्मिती करण्यासारखे जे होते ते झाल्यावर केवळ दैनंदिन कामात अडकून पडावे असे वाटत नव्हते. असे अडकून पडणे संस्थेच्या हिताला तसेच व्यक्तिगत विकासाला अडथळा ठरणार होते. अशावेळी नव्या नेतृत्वाला संधी देऊन नव्या दिशेच्या शोधाच्या शक्यता निर्माण करणे, हे दुसरे.
संवेदना पूर्ण शाबूत ठेवून वस्तुनिष्ठपणे जीवनाला सामोरे जाण्याच्या (छे! जीवनाला वळविण्याच्या) या निःसंग स्थितप्रज्ञतेमुळेच त्यांच्या निरोपाची घटना अशी असू शकते – ‘प्रत्येक माळ्यावरती सर्वांना भेटत चार मजले उतरलो आणि हिंदमाताच्या बस स्टॉपवर पुढच्या बसची वाट पाहत उभा राहिलो.’
अपना बाजार सोडल्यावर पुढे काय? ऐन उमेदीच्या काळात गतिमान आयुष्याला ब्रेक लागणार होता. पण त्याच्यावर मात करणारे अपना बाजारच्या बाहेर सामाजिक कामाचे एक बृहद वर्तुळ मी तयार केले होते, असे खातूभाई सांगतात. अपना बाजारमध्ये असतानाच राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, विषमता निर्मूलन शिबिरे, नामांतर आंदोलन, जेपी आंदोलन यांत त्यांचा सहभाग असे. या सामाजिक-राजकीय कामातून अनेक आव्हाने पुढे येत होती. त्यामुळे अपना बाजारनंतर नोकरी स्वीकारली नाही असे खातूभाई म्हणतात. रिटेल मॅनेजमेंटमध्ये कन्सलटन्सी, व्याप न वाढवता गरजेपेक्षा जास्त कमाईच्या मागे लागायचे नाही असे ठरवून १९८२ पासून ‘सार्वकालिक कार्यकर्ता न होता सर्वकाळ सार्वजनिक जीवनात वावरलो.’ असे ते नोंदवतात.
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात सहकारी चळवळीच्या भवितव्याविषयी खातूभाईंचे चिंतन आहे. हे प्रकरण मूळातूनच वाचायला हवे. या चिंतनाची प्रत कळावी म्हणून काही सूत्रे नोंदवतो.
  • औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आर्थिक विषमतेच्या कष्टकऱ्यांना बसणाऱ्या चटक्यांपासून सोडवणूक करायला शासनव्यवस्था पुरेशी सक्षम नव्हती. अशावेळी या दुर्बल घटकांनी सहकारी चळवळीचा आधार घेतला. हे जगभरच्या विकसनशील तसेच विकसित देशांत घडले.
  • आता औद्योगिक भांडवलशाहीची जागा वित्तीय भांडवलशाहीने घेतली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या आणि सेवाक्षेत्रातील रोजगार घटतो आहे. संघटित क्षेत्र मोडल्यामुळे संघटित कामगार चळवळ संदर्भहिन होत आहे. तशीच आजवरची सहकारी चळवळही संदर्भहिन होत आहे.
  • सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक घेण्याचे अधिकार जसे रजिस्ट्रारकडे आहेत, तसेच लहानसहान हाऊसिंग सोसायट्यांची निवडणूकही रजिस्ट्रारच घेत आहे. मग या सगळ्यात लोकसहभाग आणि सहकार राहिला कोठे?
  • शेतीसमाज, औद्योगिक कष्टकरी समाज आणि मध्यमवर्ग या स्थिर व आंतरिक नाते असलेल्या समूहांचे स्थलांतर सुरु झाले. असा विखंडित समूह परस्पर सहकार्याने सहकारी संस्था कशा उभ्या करु शकेल?
  • तरीही सहकारी चळवळीला भविष्य प्रदान करणारी नवी परिस्थिती आता तयार होत आहे. कोणत्याही पेचप्रसंगातून बाहेर पडू शकेल अशी लवचिकता दाखवणाऱ्या भांडवलशाहीला २००८ नंतरच्या अरिष्टातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अर्थव्यवस्था ठीकठाक करण्याच्या सर्व प्रचलित उपाययोजना निरुपयोगी ठरत आहेत. अशावेळी सहकारी अर्थव्यवस्था प्रस्थापित स्पर्धेच्या मूल्याला, प्रस्थापित नफ्याच्या संकल्पनेला आणि प्रचलित भांडवलीकरणाच्या प्रक्रियेला पर्याय देऊ शकते.
तथापि, यासाठी सहकाराचे नवे प्रारुप सिद्ध करण्याची गरज पुस्तकाच्या अखेरीस ते नमूद करतात.
-सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, फेब्रुवारी २०१९)
अपना बाजारची गोष्ट
गजानन खातू
अक्षर प्रकाशन
पृष्ठेः १९० | मूल्यः २०० रुपये
अप

Friday, February 1, 2019

सामाजिक सद्भाव' या विषयावर सह्याद्री वाहिनीवर झालेली मुलाखत

हुतात्मा दिनी 'सामाजिक सद्भाव' या विषयावर सह्याद्री वाहिनीवर झालेली सुरेश सावंत यांची मुलाखत. सवड झाल्यास ती पहावी ही विनंती.

https://youtu.be/lNIvAXMYp_8

Monday, January 7, 2019

संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगलांचे निमंत्रण रद्द करणाऱ्या भेकड आयोजकांचा धिक्कार!

संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगलांचे निमंत्रण रद्द करणाऱ्या भेकड आयोजकांचा धिक्कार!
या कृतीचा निषेध म्हणून संमेलनावर बहिष्कार टाकणाऱ्या साहित्यकर्मींचे हार्दिक अभिनंदन!!
नियोजित सत्प्रवृत्त अध्यक्ष अरुणा ढेरे यांना त्यांनी अध्यक्षपद नाकारुन ‘सत्’ची बाजू घेण्याचे आवाहन!
__________________________________________

मराठी साहित्य संमेलनाची प्रक्रिया आधीच इतकी दलिंदर होत गेली आहे की आता आपणच उद्घाटक म्हणून बोलावलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना येऊ नका सांगण्याच्या दलिंदरगिरीच्या मापनाला शब्दच राहिले नाहीत. ‘मराठी सारस्वता’च्या या दावेदारांच्या भिकारपणाची आता हद्द झाली आहे. कोणत्याही प्रकारे या संमेलनाशी संबंध ठेवणे हे आपले ‘स्वत्व’ विकण्यासारखे आहे. अनेक निमंत्रित साहित्यिक-पत्रकार मंडळींनी या संमेलनावर बहिष्कार टाकून असे स्वत्व विकण्यास नकार दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! त्यांच्या या कृतीला मनःपूर्वक पाठिंबा!

लोकसत्ताकार तसेच अन्य प्रस्थापित मंडळींनीही आपल्या विवेकाला जागून संमेलनावर बहिष्कारच नव्हे तर असा बहिष्कार अन्यांनीही टाकावा यासाठीची मोहीमच सुरु केली हे खूप आश्वासक आहे. प्रत्यक्ष संमेलनात जाऊन बाजू मांडू म्हणणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मी कदर करतो. तथापि, यावेळी अशी भूमिका घेणे हा बोटचेपेपणाच ठरेल. यावेळची घटना इतकी सुस्पष्ट आहे की त्याबाबतची कुठचीच बाजू अस्पष्ट राहिलेली नाही, जी तिथे प्रत्यक्ष जाऊन मांडण्याची गरज आहे. नियोजित संमेलनाध्यक्ष सन्माननीय अरुणा ढेरे सत्पवृत्त आहेत. प्रचलित साहित्यिक गट-वादांपासून दूर आहेत हे खरे. पण यावेळच्या घटनेबाबत गप्प राहणे ही सत्प्रवृत्तता खचितच नव्हे. आपल्या अध्यक्षीय भाषणात याचा समाचार घेऊ असे मनाशी ठरवत तोवर गप्प राहणे यावेळी चालणार नाही. हा उशीर यावेळी अक्षम्य आहे. आयोजकांनी नयनतारा सहगलांची माफी मागून त्यांना पुन्हा सन्मानाने उद्घाटक म्हणून बोलवावे; अन्यथा मी संमेलनाची अध्यक्ष राहणार नाही, अशी ठोस भूमिका ढेरे यांनी घेणे गरजेचे आहे.

नयनतारा सहगल यांचे नियोजित उद्घाटकीय भाषण होणे हे मराठी सारस्वताची, महाराष्ट्राच्या प्रगतीशील परंपरेची शान वाढवणारे ठरले असते. हे भाषण आजच्या राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या विचारसरणीला घातक आहे. मराठी संमेलनाला इंग्रजी लेखिका नको या फालतू कारणाच्या आड खरे कारण बहुधा तेच असावे. पुरस्कार वापसी ज्या कारणासाठी सहगलांनी केली ते कारण अजूनही किती उग्र आहे, याचे हे निदर्शक आहे.

नयनतारा सहगलांचे हे भाषण आज सार्वत्रिक झाले आहे. ते संमेलनात होवो न होवो. त्याचा परिणाम ते न होण्याने अधिक होतो आहे. त्यांच्या या भाषणात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वपूर्ण उल्लेख सहगल यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९३६ साली लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. तथापि, त्यांच्या नियोजित भाषणाचा मसुदा पाहिल्यावर प्रतिगाम्यांच्या दडपणामुळे हे मंडळ मागे हटले. त्यांनी बाबासाहेबांचे निमंत्रणच रद्द केले. हे न झालेले भाषण ‘जातिनिर्मूलन’ नावाच्या पुस्तिकेद्वारे कसे अमर झाले याला आजवरचा ८३ वर्षांचा काळ साक्षी आहे. नयनतारा सहगलांच्या या भाषणाला चिरंजिवित्व लाभण्याची ताकद त्याच्या आशयात आहे. त्याचा अधिकाधिक प्रसार नक्की होणार. सूर्याला झाकण्याचे प्रयास नाकाम ठरणार.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

Saturday, January 5, 2019

नव्या आकलनाविषयी काही निरीक्षणे, काही शंका

‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवादः नवे आकलन, नव्या दिशा’ हे उद्धव कांबळे (निवृत्त IPS) यांचे लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेले पुस्तक. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिराच्या मिनि थिएटरमध्ये २१ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. डॉ. भालचंद्र कानगो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, EPW चे संपादक डॉ. गोपाळ गुरु यांच्यासमवेत मीही एक वक्ता होतो. त्यावेळच्या माझ्या भाषणातील हे काही मुद्देः
पुरोगामी चळवळीला अजगराचा विळखा पडावा तसा विळखा घातलेला आंबेडकर-मार्क्स हा प्रश्न आजही तीव्र आहे. कन्हैया कुमार, रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयूतील वादळ या निमित्ताने दलित-दलितेतर पुरोगामी शिक्षित तरुण विभागांच्या एकजुटीला हा मुद्दा मोठा अडसर ठरतो हे आपण अनुभवले. अनुभवत आहोत. बाहेर फॅसिझम धुमाकूळ घालत असताना पुरोगामी छावणीतला हा अंतराय परवडणारा नाही. हा अंतराय सांधण्याच्या आजवरच्या प्रयत्नांतला हे पुस्तक एक सशक्त प्रयत्न आहे. असे पुस्तक देणाऱ्या लेखकाचे व लेखकानेच व्यक्त केल्याप्रमाणे त्यातील आपल्याविषयीची कठोर टीका पचवून त्याचे प्रकाशन करणाऱ्या लोकवाङ्मय गृहाचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच धन्यवाद. या पुस्तकाची तात्त्विक समीक्षा हा माझा आवाका नाही. अभ्यासमंडळाला बसलेल्या एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मला भावलेली, अधोरेखित करावी वाटणारी काही निरीक्षणे, काही शंका, प्रश्न मी मांडणार आहे.

आंबेडकरी समूहातील संशयाची पिशाच्चे शांत करण्यासाठी मार्क्स व आंबेडकर यांना तेच म्हणायचे आहे, अशा गोल गोल पद्धतीने जाऊन चालत नाही हे आजवर लक्षात आले आहे. तद्वत (जाहीरपणे बोलण्याची हिम्मत होत नसली तरी) आंबेडकर हे भांडवलदारांचे हस्तक, एक क्रांतिकारी होऊ शकणारा समुदाय त्यांनी धर्माच्या चौकटीत जेरबंद केला या आरोपांनीही काही पुढचे पाऊल पडत नाही हे सिद्ध झाले आहे. अशावेळी आंबेडकर-मार्क्स या जुटीची अपरिहार्यता या दोन्ही चळवळींविषयी अपार कळकळ असलेल्या उद्धव कांबळे यांनी मांडावी, तीही चिकित्सकपणे याचे मी स्वागत करतो. या मांडणीत मार्क्स-आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या उद्दिष्टातील समानता अधोरेखित करतानाच त्यांच्या मांडणीतील मतभिन्नतेच्या बाबी नेमकेपणाने ते समोर आणतात. त्यात आंबेडकरांच्या विवेचनातील काही मुद्द्यांचे अपुरेपण ते नम्रपणे पण थेट नमूद करतात हे मला खूपच स्वागतार्ह वाटते. असे करणारे खूप कमी लोक आज आहेत. अगदी अपवादात्मक. डॉ. आंबेडकरांनी या टीकेचे स्वागतच केले असते. विचारवंताला आपल्या हयातीत उत्तम टीकाकार मिळणे हे भाग्याचे असते, असे ते म्हणत.

‘बुद्ध आणि मार्क्स’ हे काठमांडूचे बाबासाहेबांचे त्यांच्या अखेरच्या काळातील प्रसिद्ध भाषण. त्यातील बाबासाहेबांची टीकेची पातळी व गांभीर्य समजून न घेता बुद्ध आणि मार्क्स हे दोघे परस्परांचे शत्रू असल्याची भावना आंबेडकरी समुदायात आज आहे. त्याला या भाषणाच्या पुस्तिकेला काही प्रकाशकांनी दिलेले ‘बुद्ध की मार्क्स’ हे पर्यायवाची शीर्षकही जबाबदार आहे. आंबेडकरी समुदायाने मार्क्स समजून घेण्याच्या मार्गात हे भाषण यामुळेच एक stumbling block झाले आहे. या भाषणाचा उद्धव कांबळे यांनी आपल्या ग्रंथात वस्तुनिष्ठ व चिकित्सक आढावा घेतला आहे. त्यांनी मांडलेले सहमतीचे मुद्दे, मतभेदाचे मुद्दे आणि या मतभेदांवरची लेखकाची टीका, विश्लेषण हे खूप उद्बोधक आहे.

या भाषणात मार्क्स व बुद्ध यांच्यातील साम्याची नोंद करताना बाबासाहेबांनी दैन्य, दुःख, यातना आणि शोषण हे एकाच अर्थाने घेण्याचे सूचित केले आहे ते न पटणारे आहे, असे लेखक म्हणतात. त्यांचे म्हणणे- अनेकदा दुःख, दैन्य वैयक्तिकही असू शकते पण शोषण हे नेहमीच सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्थेत असते.

समाजात राजा-राजा, सरदार-सरदार, आई-मुलगा, वडिल- मुलगा हे संघर्ष – म्हणजेच वर्गसंघर्ष असतात, असे बुद्धाचे म्हणणे बाबासाहेब सांगतात. हे वैयक्तिक संघर्ष म्हणजे वर्गसंघर्ष नव्हे याचे विवेचन लेखक करतात. मलाही हा प्रश्न नेहमी पडायचा. कारण मी ऐकलेली मार्क्सवादी वर्गाची व्याख्या वेगळी होती. ती अशीः वर्ग  म्हणजे ‘उत्पादन साधनाशी ज्याचा जो संबंध तो त्याचा वर्ग.’ उदा. उत्पादन साधनाची मालकी असलेला तो मालक वर्ग, तर त्याच्या सहाय्याने काम करणारा तो मजूर किंवा कामगार. जमिनदार व शेतमजूर, भांडवलदार व कामगार असे हे वर्ग असतात. शेतकरी हा जमिनीचा म्हणजेच उत्पादन साधनाचा मालक असतो. पण छोटे शेतकरी स्वतः जमिनीचे मालक असतात आणि त्यावर ते स्वतः राबतही असतात. म्हणून तो मध्यमवर्ग. त्याचे हितसंबंध दुहेरी असतात. अल्प उत्पादनाची वेदना असली तरी जमिनीच्या फेरवाटपाला म्हणूनच तो सहसा राजी नसतो. मार्क्सवादातील मध्यमवर्ग म्हणजे प्रचलित अर्थाने मध्यम आर्थिक स्तरातील लोक नव्हेत.

बुद्ध व मार्क्स यांचा काळ पाहता, त्यांची अशी तुलना फार मूलगामी ठरत नाही, हे लेखकाप्रमाणे मलाही वाटते.

बाबासाहेबांची मार्क्सवरील टीका रशिया तसेच भारतातील कम्युनिस्टांच्या व्यवहाराच्या दर्शनातून आली आहे. तिला मर्यादा पडण्याचे दुसरे कारण म्हणजे मार्क्सचे महत्वाचे लिखाण १९५० पर्यंत इंग्रजीत प्रसिद्धच झाले नव्हते, असा एक नवा मुद्दा लेखक मांडतात. तसेच या भाषणावेळची आंतरराष्ट्रीय राजकारणाची नेपथ्यरचनाही ते नमूद करतात. अमेरिका-युरोपची मार्क्सवादाविरोधीची मोर्चेबांधणी ही मोठी पार्श्वभूमी काठमांडूच्या आयोजकांनी ऐनवेळी मूळ विषय बदलून या विषयावर बोलण्याच्या बाबासाहेबांना केलेल्या सूचनेमागे असल्याचे ते नोंदवतात. हा आयामही यापूर्वी पुढे न आलेला आहे.

राज्य नाहीसे होईल (withering away of State) हे घडले नाही, अशी बाबासाहेबांची टीका मार्क्सची मूळ संकल्पनाच समजून न घेतल्याने होते असे लेखकाला वाटते. मलाही ते बरोबर वाटते. राज्य नाहीसे होणे म्हणजे प्रशासकीय व्यवस्थापनाची कामे नाहीशी होणे नव्हे, तर वर्गविभाजन संपुष्टात आल्यावर शोषक वर्गाचे दमनाचे साधन या अर्थी राज्य उरणार नाही.

‘कामगारांची हुकूमशाही’ या शब्दप्रयोगातील हुकूमशाहीचा प्रचलित अर्थ लेखक नाकारतो. विविध व सविस्तर संदर्भांनी मार्क्सच्या परिसरात त्या काळी तो शासन या अर्थी असल्याचे ते स्पष्ट करतात. हेही आपल्याला नवीन आहे.

या चर्चेत बौद्ध धर्माचा स्वीकार व त्याने काय साध्य केले याबद्दलचे लेखकाचे विवेचन मात्र जवळपास आढळत नाही.

हजारो वर्षे इथल्या समाजव्यवस्थेने ज्या अस्पृश्य वर्गाला अस्तित्वहिन केले होते त्याला बुद्ध धम्म स्वीकाराने नवी ओळख, अस्मिता, ऊर्जा मिळाली. या विभागातील आमच्या दुसऱ्या पिढीपर्यंत तरी तिने मोठी कामगिरी बजावली. मी महार नाही-बौद्ध आहे, आम्ही विज्ञानिष्ठ धर्मविचाराचे वाहक आहोत. देव-चमत्काराच्या श्रद्धांना आमच्यात स्थान नाही, ही संपन्नतेची, विलक्षण ताकद देणारी भावना होती. ‘अत्त दीप भव’ ही स्वाबलंबी होऊन जीवन आमूलाग्र बदलण्याची संजीवनी होती. आता पुढे हे ढासळले आहे. त्याला कारण या विचारांचे जाणते वाहक नसणे, आंबेडकरी चळवळीचे विखुरलेपण हे आहे. मूळ बाबासाहेबांची वा बुद्ध धम्माची भूमिका त्यास कारण नाही. ही भूमिका वर्गलढ्याला अपायकारक असण्याचे कारण नाही. उलट ती पूरकच ठरु शकते.

मला इथे एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. धर्म हा मूळातच प्रतिगामी समजायचे का? धर्म हे शोषणासाठीच जन्माला आले असे म्हणवत नाही. त्यावेळी समाजाच्या भल्यासाठी जेवढे कळले तेवढे त्यावेळच्या भल्या लोकांनी मांडले. कृतीही केली. आजवरच्या विचारवंतांनी जगाचा फक्त अर्थ लावला असे नव्हे. जग बदलण्याचा मुद्दा त्यांच्यापुढेही होता. त्यासाठीची कृती त्यांनी त्यांच्यापरीने करायचा प्रयत्न केला. त्यात शास्त्रीयता येण्याचा मार्क्सचा काळ तेव्हा नव्हता. अर्थात या धर्माचा वापर शोषक शक्तींनी केला, त्यासाठी त्यांनी धर्मतत्त्वांचा अर्थ सोयीने बदलला, नव्याने नोंदवला हे अगदी खरे. पण ‘बहुसंख्याकांचे सर्वच धर्म हिंसा, अन्याय, अत्याचार करत असतात. बुद्ध धर्मही त्याला अपवाद नाही. तोही हिंसेपासून मुक्त नाही,’ हे लेखकाचे म्हणणे सरसकट धर्माला जबाबदार धरणारे आहे. धर्माचे ठेकेदार, अनुयायी म्हणणे अधिक वस्तुस्थितीला धरुन होईल. म्यानमार-रोहिंग्या प्रकरणाला राज्यकर्ते, भिख्खू जबाबदार; ‘न हि वेरेन वेरानी…’ म्हणणारा बुद्ध धम्म कसा जबाबदार? मार्क्सचे ‘धर्म हा पिचलेल्या माणसाचा निःश्वास आहे. हुंकार आहे. धर्म रुक्ष, कठोर (Heartless) जगाचा आत्मा आहे. तसाच तो मरगळलेल्या चैतन्यहिन जगाला चैतन्य देणारा स्फुल्लिंग आहे. तो अशा जगाची अफू आहे. (लेखकाचीच नोंद)’ हे अधिक संयुक्तिक वाटते. शिवाय साम्यवादी अवस्थेत धर्माची गरज उरणारही नाही कदाचित. पण आज ती सर्वसामान्य समाजाला नैतिक जीवनाच्या नियमनासाठी नितांत गरजेची आहे. आणि धार्मिक मूलतत्त्ववादी थैमान घालत असताना धर्माचा आपल्याला उपयुक्त अर्थ (जो त्यातील सत्प्रवृत्तांनी कायम प्रचारलेला आहे) समाजात रुजवणे हे आजचे क्रांतिकारकच काम आहे. विचारबहुल, बहुधर्मी भारतीय समाजाला सेक्युलर भारतात गुंफण्यासाठी गांधीजींची सर्वधर्मी प्रार्थना क्रांतिकारकच ठरली.

या पुस्तकातील  ‘क्रांतिकारी लढ्यातील हिंसेचे स्थान’ हे एक महत्वाचे प्रकरण आहे. मार्क्सकालीन व मार्क्सोत्तर तत्त्वज्ञांच्या मांडणीचे विस्तृत संदर्भ या विवेचनात आहेत. ते वाचताना लेखकाच्या कमालीच्या व्यासंगाची व कष्टाची कल्पना येते. या विवेचनाबद्दल मला काही प्रश्न आहेत.

‘घृणा, कमालीची घृणा, तिरस्कार (Hatred) सुरुवातीला नकारात्मक व अमूर्त वाटत असले तरी क्रांतीच्या लढ्यात तीच शोषितांची खरी संपत्ती असते.’ हा मुद्दा अनेक तत्त्ववेत्त्यांचा हवाला देत, चे गव्हेरासारख्या कांतिकारकाच्या उदाहरणाद्वारे (फितूर मित्राच्या कानशिलात गोळी घालून गव्हेराने त्याला ठार करणे) लेखकाने मांडला आहे. तो मला पचत नाही. रवींद्रनाथ टागोर, नेहरु, गांधी यांच्या ‘माणसाचा दुस्वास नव्हे, त्याच्या विचाराचा विरोध हवा’ या प्रभावाखाली मी आहे. इंग्रज माणूस नव्हे, तर त्यांच्या व्यवस्थेविरोधात आपला संघर्ष आहे, या शिकवणीने भारतीय समाजाला बुळगे बनवले, लढायला कमकुवत केले असे दिसत नाही. उलट त्यांना अधिक मानवी, अधिक उन्नत बनवले असे दिसते.

‘कष्टकरी जनतेला चेपणाऱ्या सशस्त्र सत्ताधाऱ्यांविरोधात आम्ही शक्य असेल तिथे शांततेने संघर्ष करु आणि गरज पडल्यास सशस्त्र लढा देऊ.’ हे मार्क्सचे म्हणणे मला पटते. आंबेडकर, बुद्ध यांनीही अशारीतीने अपरिहार्य हिंसेला समर्थन दिल्याचे लेखकाने नोंदवलेले आहे.

आज ‘अर्बन लक्षली’ वातावरणात तर पुस्तकातील या मांडणीचा तुम्ही नक्षलवाद्यांना समर्थन व चिथावणी देता असाच अर्थ घेतला जाण्याची शक्यता आहे.

आणि आज नक्षली सोडले तर कष्टकरी जनता कोणत्याही प्रकारे सशस्त्र वा बिगर सशस्त्र क्रांतीच्या मनःस्थितीत नाही. अनन्वित कष्ट सोसूनही प्रस्थापित चौकटीतच तिची आंदोलने चाललेली असतात. न्यायव्यवस्था, पोलीस यांच्याविषयी कितीही अविश्वास, नाराजी असली तरी ही चौकट आज उद्ध्वस्त करायच्या तयारीत ती नाही. तशी तिची ताकद व जाणीवही नाही.

शेवटचे प्रकरण आहे - ‘उपाय व व्यूहरचना’. याबद्दल विस्तृत चर्चा करुन लेखक शेवटी म्हणतातः ‘…तसेच हे संघटित लढे यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे साध्य-साधनांच्या सापळ्यात न अडकता आक्रमक आणि प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे, त्यांची दमछाक करणारे असले तरच त्याची दखल घेतली जाते. असे दमछाक करणारे, त्यांना घाम फोडणारे लढे श्रमिक कामगार व आपल्या पूर्वसुरींनी केलेले आहेत. पुन्हा एकदा त्या दिशेने चाल आणि वाटचाल करणे एवढाच एक पर्याय आता शिल्लक आहे.’

मला वाटते या दिशेच्या कृतीचे ताबडतोबीचे तपशील आपल्याला मांडावे लागतील. भाजपविरोधी लढाई ही क्रमांक एकवर घ्यावी लागेल. यावर डावे सहमत आहेत ही आश्वासक बाब आहे. काँग्रेसहित व्यापक एकजुटीला आज पर्याय नाही. समान किमान कार्यक्रमावर आघाडी व्हायला हवी. त्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष हवा. आणि त्याच्यावरच सोबत सोडणे हवे. डाव्यांनी १२३ वर (अमेरिकेशी अणुकरार) मनमोहनसिंगांची सोबत सोडली, याचा अर्थ खाली पोहोचलाच नाही. ही सोबत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या संघर्षातून सोडली जायला हवी होती.

ज्या समूहांना क्रांतिकारक करायचे त्याबाबत डाव्या चळवळीत आजही पराकोटीची अनास्था आहे. अर्थवादी पद्धतीने कामगार संघटना चालवून राजकीय दृष्ट्या काही हाती लागत नाही, हे आम्हाला कळते आहे. पण वेगाने वळत नाही. ‘लोक आमचे-पण त्यांची डोकी भाजपच्या धर्मद्वेषी प्रचाराची’ अशी स्थिती आजही आहे. ‘लाल सलाम’ बरोबर ‘जयभीम’ म्हणण्यातून केवळ आंबेडकरी समुदाय क्रांतिकारकपणे जोडला जाणार नाही. त्याच्याशी विचारांची देवाण-घेवाण करावी लागेल. राजकीयीकरण करणे म्हणजे सभेत राजकीय बोलणे वा कधीतरी कामगारांचे अभ्यासमंडळ घेणे नव्हे. तो पेळू दैनंदिन कामातून वळावा लागेल. त्यांच्या जनसंघटनेच्या प्रश्नाबद्दल बोलतानाच भोवतालच्या घटनांविषयी त्यांच्याशी संवाद करावा लागेल.

भाजप-सेना-मनसेचे मोर्चे राजकीय असतात. त्यांच्याशी राजकीय सहमती असलेले लोक तिथे येतात. आमच्या राजकीय मोर्च्यात मुख्यतः जनसंघटनांचे लोक असतात. आम्ही त्यांचे प्रश्न सोडवणारे नेते असतो. आम्ही सांगतो म्हणून ते येतात.

आज तरी लेखकाने नोंदवलेल्या संसदीय लोकशाहीच्या, घटनेच्या कितीही मर्यादा असल्या तरी त्या चौकटीतच पुढे सरकावे लागेल. ते अधिक जाणतेपणाने कसे सरकता येईल, आपला आधार त्यायोगे कसा वाढवता येईल, समूहांची जाणीव कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल.

डॉ. आंबेडकर व मार्क्स यांच्या भूमिकांच्या चर्चा चालू राहतील. त्यांच्या समन्वयाचा आग्रह न धरता आजच्या काळात पूरकत्व मांडले पाहिजे. हे ऐतिहासिक मतभेद आजच्या लढ्यांतील सहभागाला कोणत्याही प्रकारे आड येत नाहीत.

बाबासाहेबांची मार्क्सवरील काहीही टीका असली तरी सामाजिक व आर्थिक शोषणाविरुद्ध लढा दलित-सवर्णांनी एकत्र लढला पाहिजे हे त्यांचे प्रमुख सूत्र कायम दिसते. स्वतंत्र मजूर पक्ष-अगदी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा कार्यक्रम ते रिपब्लिकन पक्षाची संकल्पना इथपर्यंत. म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत. दलितांनी वर्ण-वर्ग वर्चस्व भेदण्याच्या लढ्याचे नेतृत्व करावे ही त्यांची स्वतंत्र मजूर पक्षावेळची धारणा सतत अधोरेखित करायला हवी. २२ ऑगस्ट १९३६ च्या अंकातील हे अवतरण य. दि. फडके यांनी आपल्या ‘आंबेडकरी चळवळ’ या पुस्तकात दिले आहे. ते असे – 

‘अस्पृश्यतानिवारणाच्या लढ्याचे बाह्य स्वरुप जरी जातिनिष्ठ दिसत असले तरी तत्त्वतः तो लढा आर्थिक आहे हे आम्ही वेळोवेळी आमच्या लेखात सांगितलेले आहे. अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतीत अस्पृश्य श्रमजीवी जनतेचे हितसंबंध स्पृश्य श्रमजीवी जनतेच्या हितसंबंधांहून वेगळे किंबहुना परस्परविरोधी असल्यामुळे अस्पृश्यवर्गाला आपला लढा स्वतंत्रपणे लढविणे प्राप्त होते. परंतु, आर्थिक लढ्यात स्पृश्य आणि अस्पृश्य शेतकरी कामकरी वर्गांचे हितसंबंध एकजीव आहेत. अस्पृश्य वर्गाला आपला आर्थिक लढा स्पृश्य शेतकरी कामकरी वर्गाच्या सहाय्यावाचून स्वतंत्रपणे लढता येणार नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय वगैरे सर्व बाजूंनी गांजलेला अस्पृश्य वर्ग हिंदी श्रमजीविकांच्या लढ्यात पुढारीपण घ्यायला लायक आहे असे आम्ही मागे एकदा म्हटलेले होते.’

या सर्व चर्चेला चालना देण्याचे काम हे पुस्तक नक्की करेल. उद्धव कांबळेंना आणि लोकवाङ्मयला पुन्हा एकदा धन्यवाद.

सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, जानेवारी २०१९)
_______________
 ‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवादः नवे आकलन, नव्या दिशा’
लेखकः उद्धव कांबळे
प्रकाशकः लोकवाङ्मय गृह
पृष्ठेः ३२४. किंमतः रु. ३५०
_______________

Sunday, December 9, 2018

नवदीक्षित बौद्धांची नवसांस्कृतिक चौकट कोणती?


संविधान जागर यात्रेच्या तयारीसाठी भेटीगाठी घेत हिंडत होतो. आमच्या विभागातल्या एका नेत्यांना भेटायचे होते. ते माजी मंत्रीही आहेत. ती कोजागिरीची रात्र होती. त्या निमित्त काही तरुण मुलांनी आयोजित केलेल्या गरब्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. आम्ही तिथेच गेलो. तर त्यांनी मंचावरच बोलावून घेतले. समोर गरब्यात थिरकणारी मुले-मुली आणि वर मंचावर आमच्या गप्पा...यात्रेच्या तयारीपासून ते आगामी निवडणुकांपर्यंत. एक प्रश्न बरेच दिवस विचारायचाच होता तो त्यांना विचारला. 

म्हटले, “ही मुले किती धुंद झाली आहेत. अशा या नाचाची त्यांना गरज आहे. तिकडे गुजरातमध्ये आंबेडकर जयंतीला ‘भीम गरबा’ चालल्याचे मी यूट्युबला पाहिले आहे. आपल्याकडे का नाही आपण तसे करत? गरबा किंवा दांडिया हा नाच आहे. देवा-धर्माच्या निमित्ताने तो सुरु झाला. पण आता ती धर्माची चौकट असण्याचे कारण काय? नाच तो नाच. तो देवीच्या गाण्यांवर होतो. तसाच भीमगीतांवरही होऊ शकतो. नाहीतरी गरब्यात सगळी गाणी काय देवीची असतात असे नाही. हिंदी गाण्यांचे रीमिक्स, नुसती धून असतेच की!” 

दहा वाजायला आले होते. नियमाप्रमाणे दहा वाजता थांबायला लागणार होते. शेवटचा टप्पा सुरु होता. समोरची मुले बेधुंद गिरक्या घेत नाचत होती. त्यावेळीही एक हिंदी गाण्याची धूनच लागली होती. त्यात देवी, हिंदू धर्म कोठेच नव्हता. 

आमचे हे नेते-माजी मंत्री म्हणाले, “अरे, करायला हरकत नाही. पण समाज काय म्हणेल म्हणून आपण गप्प बसतो.” 

समाज म्हणजे बौद्ध समाज. आमचा हा विभाग बौद्धांचा बालेकिल्ला. बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळात येणे-जाणे असलेला, दलित पँथरचा झंझावात अनुभवलेला. हिंदू सण-समारंभ करणे सोडा, चुकून त्यात कोणी दिसला तरी त्याची खैर नसायची अशी या पँथर्सची दहशत. आम्ही लहान. पण त्याच दहशतीचे पुरस्कर्ते. हे नेतेही त्याच संस्कारांतून गेलेले. मध्ये खूप पाणी वाहून गेले. दूषित-प्रदूषित. अजूनही वाहते आहे. जुन्या विद्रोहाच्या नौका कागदी असल्यासारख्या कुठच्या कुठे वाहून गेल्या. त्यांचा काहीही थांग नाही. या नौकाचालकांच्या देखत आता या विभागात गणपती बसतात. नवरात्र होते. 

यावेळच्या अनंत चतुर्दशीला आमच्या बुद्धविहाराच्या सर्वसाधारण सभेसाठी मी तिथे होतो. गल्ली-गल्लीतून सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका निघत होत्या. जयभीम वगैरे नावाच्या मित्रमंडळांच्या भक्तगणांचे फ्लेक्स बॅनर रस्ताभर लागलेले. आमच्या या नेत्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. त्यांनी रस्त्यावर कडेला मंडप टाकलेला. त्यात त्या मंचावर उभ्या राहून गणेशभक्तगणांचे स्वागत करुन मिरवणुकांना निरोप देत होत्या. हे गणपती काही मिश्र समाजाचे नव्हते. बौद्धांनी बौद्धांसाठी बसवलेले बौद्धांचे सार्वजनिक गणपती. त्याचे स्वागत करणाऱ्या नगरसेविका बौद्ध. नवरात्र आणि नंतर देवीच्या मिरवणुकाही अशाच बौद्धांनी बौद्धांसाठी काढलेल्या. वर उल्लेख केलेला गरबाही बौद्धांनी आयोजित केलेला. त्यात थिरकणारी मुलेही बौद्धांचीच. आणि आम्ही स्टेजवरचेही सगळे बौद्धच. 

पण एक आहे. आमचा हा विभाग बाबासाहेबांचा कडवा अभिमानी. बालेकिल्लाच तो! भीमजयंतीची मिरवणूक काय जोशात निघते म्हणून सांगू! तिला तोड नाही. 

आमचे हे नेते आंबेडकर जयंतीनिमित्त गरबा आयोजित करण्यात पुढाकार घ्यायला मग का तयार नाहीत? मुलांना तर आवडेलच ते. त्यांना ‘समाज काय म्हणेल?’ ही जी अडचण वाटते तो ‘समाज’ कोणता? 

एकतर यांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही जागे असलेले आदर्श बौद्ध समाजाचे संकेत. जुन्या विद्रोही संस्कारांचे अवशेष. शिवाय बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञांचा वचक. दुसरे म्हणजे बौद्ध मंडळी हिंदू सणांत कितीही ‘समरस’ झाली तरी त्यास अधिकृत मान्यता अजून मिळालेली नाही. आता वस्त्यांत राहत नाहीत, पण माध्यमांतून ज्यांचे धर्मपीठ कब्जा करुन आहे ते विद्वान बौद्ध बौद्धांच्या या अधःपतनाबाबत निवाडे देत असतात, फर्मान काढत असतात. जसा मी, तसेच हे सर्व ज्या वस्त्यांतून बाहेर गेले, त्यांच्या वस्त्यांत हेच चालू आहे, जे माझ्या. त्यांत काहीही हस्तक्षेप करण्याची ताकद आमची नाही. तथापि, अशी ताकद नाही, हे कबूल करण्याचीही कुवत नाही. जिला बाबासाहेब आंबेडकर आणि गणपती दोघेही सारखे ती नवी पिढी आम्हाला जुमानत नाही, जुमानणार नाही. पण आमच्या या नेत्यांच्या मनात आमच्याविषयी काही इज्जत असते. कारण तेही आमच्याच विद्रोही पिढीचे. त्यामुळे नव्या बदलाला सामोरे जाण्याचे त्यांचे धैर्य मर्यादित. त्यांच्या पुढच्या पिढीत ही कमजोरी नक्की असणार नाही. 

माझे हे तिरकस बोलणे सोडून द्या. त्यातल्या मुद्द्याची चर्चा करु. 

जुन्या अन्यायी, कर्मठ व्यवस्थेवर आघात करुन झाले. पण तिच्या जागी नव्या रचनेचे काय? नवदीक्षित बौद्ध हे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य मानले गेलेले मुख्यतः महार. या अस्पृश्य मानलेल्या जाती हिंदू धर्मसंस्कारांत वाढलेल्या. हे संस्कार शेकडो वर्षांचे. बौद्ध झाल्या झाल्या ते जातील हे शक्य नव्हते. म्हणूनच काय सोडा व काय धरा हे सुस्पष्टपणे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी धम्मदीक्षेवेळी बावीस प्रतिज्ञा दिल्या. दीक्षा दिल्यावर दीड महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धर्मीय संस्कृतीच्या नव्या संस्थात्मक रचना करण्यासाठीचा पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. तरीही ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. आणि विधीबाबत काही ढोबळ आराखडा मांडला. पुढच्या नेतृत्वाकडून त्यांचा जो विकास होणे अपेक्षित होते, तसा तो झाला नाही. नंतर पँथरच्या काळात जोरदार सांस्कृतिक-सामाजिक तोडफोड, मूर्तिभंजन झाले. पण नवी रचना झाली नाही. हमरी-तुमरीवर येऊनच्या वादांत, नेतृत्वाच्या स्पर्धेत पँथरच्या ठिकऱ्या उडाल्या. जिथे संघटनेचीच रचना नाही तिथे नव्या सांस्कृतिक रचनांचे अवधान ते काय राहणार! 

एक सांगायला हवे. पँथरने कविता, साहित्य, भाषणे, मोर्चे आदि मार्गांनी व्यवस्थेवर जे आघात केले त्यातून आमची पिढी घडली. ती प्रेरणा, अस्मिता आजही बलवान आहे. 

‘हा भाकरीचा जाहीरनामा 
हा संसदेचा रंडीखाना 
ही देश नावाची आई 
राजरोस निजते कुबेराच्या सोबत..’ 

हे नामदेवचे (नामदेव ढसाळ यांचे. तेव्हा नामदेव ढसाळांना नामदेव, राजा ढालेंना राजा असेच म्हणायची प्रथा होती) शब्द ही सडकी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच्या तोफा आमच्या हाती देत असे. 

तर 

‘मनगटावरच्या चमेलीगजर्‍यात कवळया कलेजीची शिकार उरकून 
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक’ 

या ओळी कमालीची करुणा आणि संताप आमच्या आत निर्माण करत असत. 

साचलेपण आलेल्या मराठी साहित्यसंस्कृतीला ही निखाऱ्यांची भेट होती. त्यातून तीही तावून-सुलाखून निघाली. दलित, विद्रोही साहित्याने एक नवी संस्कृती साहित्यविश्वात निर्माण केली. त्याने नव्या सौंदर्यशास्त्राचाही निकड अधोरेखित केली. नवे संकेत, नव्या प्रतिमा, नवी भाषा, नवी शैली, नवे शब्द यांनी मराठी साहित्याची समृद्धी वाढायला मदत झाली. 

ही प्रचंड मोठी कामगिरी होती. तथापि, ती या साहित्य क्षेत्रातच. तसेच त्याने प्रेरित झालेला घटक हा शिक्षित दलित तरुणच होता. - त्यातलाही एक विभाग. हे वर्णन वस्तुस्थितीला धरुन होईल. हे मुक्तछंदीय आधुनिक काव्य वा लघुकथा, एकांकिका न आकळणारा सर्वसामान्य समाज बहुसंख्येने या प्रभावक्षेत्राच्या बाहेरच होता. त्याला पँथरांची अन्यायाविरुद्ध आग ओकणारी भाषणे कळत होती. त्याने तो पेटून उठत होता. पण संस्कृतीच्या नव्या रचना त्याला त्यातून मिळत नव्हत्या. त्याच्या सांस्कृतिक जीवनावर प्रभाव गाजवत होत्या त्या कव्वाल्या आणि त्याही आधी काही विभागांत आंबेडकरी जलसे. 

जलशांची परंपरा महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलश्यांपासून. बाबासाहेबांच्या काळात भीमराव कर्डकांनी हे जलसे सुरु केले. खुद्द बाबासाहेबांनी ‘माझी दहा भाषणे आणि कर्डकांचा एक जलसा’ अशी त्यांची प्रशंसा केली होती. या जलशांना पुढे ‘आंबेडकरी जलसे’ असे नाव पडले. मी कोकणात हे आंबेडकरी जलसे पाहिलेत. आमच्या वाडीतलेच कलाकार होते. या जलशांतील विषय, गाण्यांचा आशय आंबेडकरी, पण त्याची रचना कोकणातल्या ‘नमन’ किंवा ‘दशावतारी’ या प्रकाराशी साधर्म्य असलेली. 

जसे विद्रोही साहित्यिक-कवी आंबेडकरी समूहातून आश्चर्यकारकरित्या बहुसंख्येने आले, तसेच त्याआधी आणि नंतरही कव्वाली गायक याच आंबेडकरी समूहातून मोठ्या प्रमाणात आले. त्यांतले काही तर खरोखर खूप प्रतिभावान होते. (यातली बरीच प्रतिभा दारुत संपली हे खेदाने बोलावे लागते.) कव्वाली ही सूफी पंथाची देणगी. उर्दूचे बुलंद सौंदर्य प्रकट करणारी. मी ऐकलेल्या आंबेडकरी कव्वालांचेही उर्दू बुलंद होते. त्यांची गायकी उर्दू-मराठी असे. 

आमच्या गावी लग्नाची गाणी बौद्ध महिला म्हणत. त्यांच्या नुसत्या चाली ऐकल्या तर त्या चाली आणि आजूबाजूच्या कुणबी, गवळी, सुतार, गुरव वाड्यांतून कानावर येणाऱ्या लग्नाच्या गाण्याच्या चाली यात फरक नसे. फरक असे या गाण्यांच्या शब्दांत. बौद्ध महिलांच्या लग्नगीतांत बाबासाहेब, बुद्ध...अगदी बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आणि पुतण्या मुकुंद यांचीही नावे गुंफलेली असायची. हीच स्थिती पाळणा गीतांची. ‘जो जो रे बाळा जो’ आणि चाल बौद्ध वा हिंदूंची तीच. त्यातले नावांचे व काही वर्णनांचे शब्द वेगळे. हिंदूंच्या पाळणागीतांत राम-कृष्ण तर बौद्धांच्या पाळणागीतांत भीमबाळाची महती असे. 

संस्कृतीची ही मुळे लोकमनात खूप खोलवर रुजलेली असतात. त्यांच्या आधारावर त्यांचे सामूहिक कलांचे आविष्कार फुलत असतात. विशिष्ट प्रदेशातील लोकसमूह जाती, धर्म निरपेक्ष पद्धतीने या मुळांतून जीवनरस शोषत असतो. आपापला नवस्वीकृत आशय वेगळा असला तरी त्याच्या सांगितिक वा अन्य कलात्मक बंधांचा स्रोत बहुधा एकच असतो. अनेक पुरोगामी चळवळींनी आपल्या प्रचार-प्रसारासाठी या पारंपरिक आकारबंधांचा वापर केला आहे. ओवी, नमन, मंगळागौर, भारुड हे पारंपरिक रचनाबंध आणि त्यातून मांडावयाचा आशय पुरोगामी. स्त्री मुक्ती संघटनेचे मुक्तनाट्य ‘मुलगी झाली हो’ किंवा चळवळीत नेहमी म्हटली जाणारी ‘सावित्रीची ओवी’ हे याचे उत्तम नमुने आहेत. हे पारंपरिक कलाप्रकार वापरल्याने हा आशय लोकांना अधिक भिडतो असे लक्षात येते. आधुनिक अभिजात साहित्यातही हा अनुभव येतो. पारंपरिक स्रोतांशी जोडून विकसित होणारे साहित्य हे अधिक लोकप्रिय होते असे आढळते. परंपरेच्या पायावर नवतेची इमारत अधिक भक्कम होते हा बोध यातून मिळतो. 

बौद्ध वा निधर्मी होऊन हिंदू धर्माशी नाते तोडणे याचा अर्थ त्यातील कर्मकांडाशी, विषमतेशी, अवैज्ञानिक शिकवणुकीशी नाते तोडणे होय. हिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसांत लोकप्रिय असलेले कलाप्रकार त्यासाठी नाकारण्याची गरज नाही. मुळात हिंदू ही ओळख अलीकडची आहे. विविध पंथांचे साहचर्य-विरोध यातून साकारलेली भारतीय संस्कृती ही मिश्र आहे. ती गंगा-जमनी तहजीब आहे. कोणा एका पंथाला तिची सपूर्ण मालकी बहाल करणे हे वस्तुस्थितीला सोडून होईल. त्यामुळेच हे कलाप्रकार हिंदू धर्माच्या मालकीचे आहेत असे समजणे अनैतिहासिक आहे. 

एक खरे की माणूस कलेचा केंद्र होणे ही आधुनिक घटना आहे. त्यापूर्वी सर्व कला या ईश्वराची करुणा भाकणाऱ्या वा त्याच्या निमित्तानेच सादर होत असत. त्यामुळे या कलांचा आशयही धार्मिकच असे. दांडियाचा संबंध कृष्ण-गोपींच्या रासक्रीडेशी आहे. आपण चळवळीच्या गाण्यांत जर देवाचा आशय काढून आधुनिक प्रगतीशील आशय घालतो तर मग दांडिया वा गरबा यातील देवाचा संबंध काढून टाकून त्या जागी नव्या प्रगतीशील आशयाचे रोपण करण्यास काय हरकत आहे? आज दांडिया वा गरबा अनेक धर्मांच्या-जातींच्या मुलांना भारुन टाकत असेल, त्यांच्या ऊर्जेचे विरेचन करत असेल, त्यातील लय-ठेका त्यांना परमानंद देत असेल आणि यात काही नकारात्मक विचार वा जाणीव नसेल तर आपण त्याचा स्वीकार का करु नये? मुले स्वीकारतातच आहेत. त्याच्या असेल त्या आशयासह. आपण जाणत्यांनी त्यात नवा आशय घातला तर ही मुले तो नाकारणार थोडाच आहेत! तुम्ही हा आशय द्या, नका देऊ. त्यांना जे करायचे आहेत ते ते करणारच आहेत. आपण बौद्ध वा पुरोगाम्यांनी आपल्या मनातल्या धुसफुसणाऱ्या कर्मठतेला विराम देण्याची खरी गरज आहे. 

ही अडचण महाराष्ट्राबाहेरच्या दलित उत्थानाला फारशी येत नाही. महाराष्ट्राबाहेरचा नवशिक्षित, नवजागृत दलित थेट बाबासाहेब व त्यांच्यामुळे बुद्धाशी जोडला जातो. त्यात महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचे काही योगदान नाही. त्यामुळे त्यात ही धुसफुसणारी कर्मठताही नाही. 

पारंपरिक ‘बले बले’ भांगडा आणि आफ्रिकी-अमेरिकन विद्रोहींनी सत्तरच्या दशकात अमेरिकेच्या रस्त्यावर लोकप्रिय केलेला ‘रॅप’ यांचे फ्यूजन करुन पंजाबातील दलित समाजातली १७-१८ वर्षाची गिन्नी माही ही गायिका ‘राज बाबा साहिबदा’ व ‘जयभीम’ ज्या जोशात गाते त्याने माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. अभिमानाने ऊर भरुन येतो. ती एका गाण्यात तर आपली जात (डेंजर चमार) ज्या आवेशात सांगते तेव्हा तर तिने व्यवस्थेला लावलेल्या सुरुंगांचेच स्फोट होत आहेत असे वाटते. पंजाबीबरोबरच तिने हिंदीतही गाणी म्हटली आहेत. तिच्या ‘नमो बुद्धाय’ या हिंदी गाण्यात पंचशीलाचे तसेच निळे ध्वज पार्श्वभूमीवर लहरत असतात. बाबासाहेबांच्य प्रतिमा तर बहुतेक गाण्यांत असतातच. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती बुद्धाबरोबरच पंजाबातील सुधारक संत सतगुरु रविदासांची महती गाते. बुद्ध आणि रविदास यांच्या प्रतिमा एकामागून एक येत राहतात. तिला बुद्ध स्वीकारण्यासाठी त्यांच्या पारंपरिक रविदासांना नकार द्यावा लागत नाही. उलट या समन्वयातून ती नवी ताकद जन्मास घालते. 

गुजरातमधील नवजागृत दलितांनी आपल्या पारंपरिक गरब्याला बाबासाहेबांच्या गाण्यांची जोड देऊन ‘भीम गरबा’ निर्माण केला आहे. त्यातले एक गायक अशोक सोळंकी गरब्याच्या तालावर नाचणाऱ्या आपल्या स्त्री-पुरुष साथींना गाण्यातून आवाहन करतात- ‘दलितो नाचो, दलितो गाओ I’ पुढे देवीचे नाही तर बाबासाहेबांचे गुण गातात, त्यांची शिकवण सांगतात- ‘बाबा भीमराव तारा काइदा बोले I’ 

आम्ही मुंबईच्या अनेक बुद्धविहारांत संविधानाच्या प्रचारासाठी बैठका घेत असतो. बौद्ध या नात्याने अनेक धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेत असतो. संविधानावर गाणी रचणारे, ती सादर करणारे माझे दोन सहकारी एकदा विहारातल्या कार्यक्रमाला जमलेल्या बायांना म्हणाले, “विहारात यायचे, वंदना म्हणायची, प्रवचन ऐकायचे आणि जायचे. बरे, वंदना-पूजा हे सगळे पालीत असल्याने काय म्हणतोय तेही कळत नाही. केवळ एवढेच म्हणायचे आणि फक्त ऐकायचे असे का? आपण नाचायचे का नाही? बाया-पुरुषांनी विहारात, त्याच्या पटांगणात गाऊन-नाचून आपले सण का नाही साजरे करायचे? त्यातून आनंद का नाही घ्यायचा?” 

मला एकदम नवे काही कळल्यासारखे झाले. मी पूर्वी बौद्ध धम्मावर प्रवचन देत असे. आताही कधीकधी देतो. पाली सूक्ते मराठीत झाली पाहिजेत हे मी बोलत असे. पण बौद्ध धम्माचे पालन, पूजन ही गंभीरच बाब असली पाहिजे, हा दंडक माझ्याही मनात कुठेतरी होता. माझ्या या सहकाऱ्यांच्या प्रश्नाने मला नवे कळले ते असे- केवळ गंभीरपणे विहारात वंदना घेण्याने बौद्धपण स्थापित होणार नाही. त्यासाठी लोकांना सामूहिकपणे नाचता-गाता येतील, आनंद घेता येईल अशा नव्या रचना करण्याची गरज आहे. केवळ वैचारिक प्रबोधनाने नवी प्रगतीशील संस्कृती आकाराला येणार नाही. लोकांच्या पारंपरिक कलांच्या आकृतिबंधांवर आधारलेले नवे आविष्कार तयार करण्याची नितांत गरज आहे. ते नाही केले तर लोक दोन पातळ्यांवर जगणार आहेत. जगत आहेत- विहारात आणि नवरात्रात. 

हा पेच लडाख-अरुणाचल-सिक्किमच्या पारंपरिक बौद्धांमध्ये नाही. शेकडो वर्षांत त्यांची म्हणून संस्कृती, गाणी, नृत्ये तयार झाली आहेत. प्रश्न महाराष्ट्रातल्या बौद्धांचा आहे. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी महायान, हीनयान या पारंपरिक बौद्ध पंथांपासून निराळा असा ‘नवयान’ जन्मास घातला. जन्मदाते लगेच गेल्याने या नवयानाच्या नव्या संस्कृतीच्या रचनांबाबत त्यांना काही करता आले नाही. आपल्याला मात्र या प्रश्नापासून फार काळ दूर राहता येणार नाही. बाबासाहेबांची धम्मक्रांती प्रवाहित ठेवायची असेल तर नवदीक्षित बौद्धांच्या नव्या संस्कृतीची चौकट सिद्ध करावीच लागेल. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, डिसेंबर २०१८)