Tuesday, August 3, 2021

चळवळीचे संवैधानिक मार्ग कोणते?


‘…केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्यामते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.’

संविधान मंजूर झाले त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला उद्देशून आपले शेवटचे भाषण केले. या ऐतिहासिक व अत्यंत गाजलेल्या भाषणात ते जे इशारे देतात, त्यातील एक इशारा म्हणजे वरचे अवतरण. हा इशारा काही जाता जाता व्यक्त केलेला शेरा नव्हे. संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधान देशाला सोपवताना केलेल्या अत्यंत गंभीर व औपचारिक भाषणातील त्यांचे हे मत आहे. त्यांच्या या मताला म्हणूनच खूप मोल आहे.

त्यांच्या या मताच्या निमित्ताने चळवळीच्या मार्गांविषयी आणि एकूणच संविधानविषयक अथवा सांविधानिक नैतिकतेशी संबंधित अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहतात. त्यातील काही खाली नोंदवत आहे. त्यांच्या स्पष्टतेची मला गरज आहे. आपल्याला त्याविषयी अधिक काही ठाऊक असल्यास, वेगळे काही म्हणावयाचे असल्यास जरुर लिहावे. मला त्याची मदत होईल.

रक्तरंजित मार्ग दूर सारला पाहिजे, हे समजू शकतो. डाव्या पक्ष/संघटनांपैकी अनेकांनी आता संसदीय प्रणालीचा अंगिकार केला आहे. पण त्यातही काहींचे म्हणणे असते, लढायचे साधन हे सरकारी दमनयंत्रणा काय प्रकारे वागते, त्यावर ठरते. ती जर हिंसक पद्धतीने आंदोलने दडपणार असेल, तर त्याविरोधी लढण्याचा मार्ग अहिंसक ठेवता येईलच असे नाही. सध्याची शोषण व विषमतेवर आधारित व्यवस्था बदलण्यासाठी क्रांती हवी, हे बाबासाहेब नाकारत नाहीत. मग ही क्रांती संवैधानिक मार्गाने कशी करायची? कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग गांधीजींनी वापरलेत. खुद्द बाबासाहेबांनी सत्याग्रहाचा मार्ग चवदार तळे, काळाराम मंदिर प्रवेश आदि लढ्यांवेळी वापरला आहे. ते मार्ग अहिंसक आहेत. रक्तरंजित नाहीत. तरीही असंवैधानिक म्हणून बाबासाहेब त्यांना नकार देतात. गांधीजी किंवा बाबासाहेब यांनी तसेच अन्य मंडळींनी हे मार्ग वापरले त्यावेळी संविधान नव्हते. त्यामुळे ते वापरणे उचित होते. आता संविधान आहे. त्यामुळे हे पूर्वीचे मार्ग वापरणे गैर आहे. आता संवैधानिक मार्गानेच जायला हवे. ..तर मग हे मार्ग कोणते? आजही अनेक गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या चळवळी सनदशीर मार्ग म्हणून या अहिंसक हत्यारांचा वापर करतात. तेही जर बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे अराजकतेचे व्याकरण असेल, तर आपल्या हितासाठी आंदोलनांचे कोणते मार्ग या लोकांनी वापरायचे?

सांविधानिक व्यवस्थेप्रमाणे आता लोकांचे राज्य आहे. लोकांनी आपल्या हिताच्या बाबींसाठी आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीकरवी आवाज उठवावा, संबंधित सरकारी यंत्रणांच्या पातळीवर त्याच्याकरवी पाठपुरावा करावा, असे अभिप्रेत आहे. आपल्याला हवे ते कायदे निवडून दिलेल्या सरकारने करायचे असतात. हे सरकार जनतेने आपल्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी बसवलेले असते. जर आपण निवडून दिलेला प्रतिनिधी अथवा सरकार हे करण्यात कमी पडले तर त्यांना पुढच्या वेळी जनता निवडून देणार नाही. त्यांच्या जागी हे सगळे करण्यास तयार असलेल्या दुसऱ्या लोकांना जनता निवडून देईल. हे असेच चालू राहील. म्हणूनच लोकांच्या या राज्यात लोकांनीच आंदोलन करण्याचा प्रश्न येत नाही.
...बाबासाहेबांना ही अशी आदर्श रचना अपेक्षित होती का? ती प्रत्यक्षात अशी चालेल असे खरोखर वाटत होते का? – पटत नाही. बाबासाहेबांसारखा आयुष्यभर चळवळी करणारा, भारतीयांची नसन नस ठाऊक असणारा, इथल्या सामाजिक-आर्थिक बलाबलांची बारकाईने जाण असलेला आणि लोकशाहीच्या अनुसरणातील भारतीयांच्या मर्यादा ओळखणारा महामानव इतका भाबडेपणा दाखवेल, हे पटत नाही. ...पण मग त्यांच्या दृष्टीने संविधान आल्यानंतरचे चळवळीचे मार्ग कोणते?

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणुकांचे राजकारण केले. त्याचवेळी त्यांचे निकटचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहिनांचा सत्याग्रहही केला. त्यावेळी देशभरात लाखो लोक तुरुंगात गेले. या लोकांनी सत्याग्रह न करता केवळ आपल्या लोकप्रतिनिधींमार्फत प्रश्न मांडायला हवा होता, असे आपण म्हणू शकतो का? खुद्द बाबासाहेबांनी दादासाहेबांपेक्षा वेगळे काही केले असते असे वाटत नाही.

आंबेडकरी म्हणवणारे आपल्याच समाजातले रिपब्लिकन नेते प्रस्थापितांची री ओढू लागले, स्वतःच प्रस्थापितांचा भाग झाले, राखीव जागांतून निवडून जाणाऱ्या दलित प्रतिनिधींना स्वतःचा आवाज न राहता त्यांना निवडून आणणाऱ्या पक्षांचे ते मिंधे झाले, म्हणून दलित पँथर जन्मास आली. तिने या नेतृत्वाच्या तसेच सरकारच्या व एकूण अन्यायी व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला. त्यांची आंदोलने तर सत्याग्रह वगैरेंच्या पलीकडे गेली. ज्यात तोडफोड, हिंसा होती. दलितांवरील अनन्वित अत्याचाराच्या विरोधात लोकशाही शासनाला व समाजाला हलवून जागा करणारा आणि दलितांच्या अस्मितेला ललकारणारा तो त्वेष होता. म्हणूनच त्याची घोषणा होती - ‘जयभीम के नारे पे, खून बहे तो बहने दो.’ ही तोडफोड, हिंसा काही वेळा अपरिहार्य असेल. पण म्हणून ती पूर्णतः समर्थनीय मी मानत नाही. राडा संस्कृती शिवसेनेने याचवेळी जन्मास घातली होती. मराठी अस्मितेच्या आवरणाखाली तिला मान्यताही मिळत होती. ती तर अजिबात समर्थनीय नाही.
जनता एकसंध नाही. तिच्यात जाती, आर्थिक थर, वर्ग आहेत. त्यांचे हितसंबंध वेगवेगळे असतात. एकाच मतदारसंघात एकाच हितसंबंधांचे लोक नसतात. अशावेळी बहुमताने निवडून जाणारा प्रतिनिधी नक्की कोणाच्या आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करणार? संविधानाच्या उद्देशिकेतील संकल्पाप्रमाणे त्याचे प्राधान्यक्रम असायला हवेत. पण प्रत्यक्षात ज्यांच्या हितसंबंधांशी त्याचे जवळचे नाते आहे, त्यांचे हित आणि त्याचा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ पहिल्या क्रमांकावर राहतो. शिवाय त्याच्या पक्षाचे म्हणून काही धोरण व हितसंबंध असतात. त्यांचीही मर्यादा त्याला असते. म्हणूनच असे लोकप्रतिनिधी व त्यांचे पक्ष यांच्यावर दबाव तयार करण्यासाठी, त्यांचे लक्ष वेधत राहण्यासाठी सनदशीर आंदोलने गरजेची असतात. प्रतिनिधी निवडून दिल्यावर लोकशाही आपोआप चालत नाही. तिला चालवावी लागते.
घटना येण्याआधी ब्रिटिश आमदानीत मर्यादित प्रमाणात निवडणुका होत होत्या. त्यात बाबासाहेबांचा, त्यांच्या पक्षाचा सक्रिय सहभाग असे. घटना आल्यावर हे सगळे आपोआप बदलेल, असे बाबासाहेबांनी गृहीत धरले, असे तर आपण म्हणू शकत नाही. पण तरीही मूळ प्रश्न तसाच राहतो – बाबासाहेबांना अभिप्रेत चळवळीचे संवैधानिक मार्ग कोणते?

बाबासाहेब आंबेडकरांच्या अवतरणाबाबतचे प्रश्न इथे संपले. आता इतर.

आपल्या मागण्यांसाठी मोर्चे, सत्याग्रह, धरणे, संप हे सनदशीर मार्ग आहेत. त्यात चर्चेला वाव असतो. विचारविनिमयाला उसंतही मिळते. पण आमरण उपोषण हे सरकारला वेठीला धरणे नाही का? अर्थात आमरण उपोषणाचा निर्णय अचानक होत नाही. सरकारला अनेक विनंत्या-अर्ज केल्यावर वा आंदोलनांचे अन्य मार्ग अवलंबल्यावर नाईलाजाने हे पाऊल उचलले जाते, हे कबूल. अशावेळी त्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या मरणाला घाबरुन सरकारने उपोषण करणाऱ्याचे ऐकायचे का? समजा या व्यक्तीचे ऐकले व या व्यक्तीच्या विरोधी हितसंबंध असलेल्या दुसऱ्या व्यक्तीनेही तसेच आमरण उपोषण केले, तर सरकारने काय करायचे? लक्ष वेधायला लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण ही वेगळी बाब. त्यात प्राण पणाला लागत नाही. आमरण उपोषण हा अत्यंत गंभीर मार्ग आहे. पण त्याचे गांभीर्य कमी करणारे लोक आंदोलनकर्त्यांत आणि सरकारांतही हल्ली वाढले आहेत. नावाला आमरण म्हणायचे. प्रत्यक्षात ते तातडीने मागे घेतले जाईल याची तजवीज करायची. ही त्या मार्गाची चेष्टा झाली. मी मुद्दा मांडतो आहे, तो अत्यंत गंभीरपणे आमरण उपोषण करण्याबाबतचा. मला आदरणीय असलेल्या, आयुष्य चळवळीला अर्पण केलेल्या व्यक्ती हा मार्ग अनुसरत असतात. त्याने बरेचदा तो प्रश्न सुटायला, किमान पुढे जायला चालना मिळते, हेही मला ठाऊक आहे. तरीही आमरण उपोषण हा चळवळीचा मार्ग असावा का, याबद्दल मी साशंक आहे. पुणे करारातून जे साधले गेले ते तडजोडीचे पुढचे पाऊलच होते, हे मला मान्य आहे. मात्र गांधीजींचा जीव वाचवण्यासाठी बाबासाहेबांची जी प्रचंड घालमेल झाली, ती उचित होती का? आपण अडून राहिलो आणि भारतीयांमध्ये देवासमान स्थान असलेल्या गांधीजींचा जीव गेला तर सवर्ण हिंदूंकडून देशभर दलितांचे काय हाल केले जातील, या जाणिवेने बाबासाहेबांच्या मनाची काय अवस्था झाली असेल? अशा दडपणाद्वारे निर्णय घ्यायला भाग पाडण्याची रीत माझ्या मनात प्रश्न उपस्थित करते हे नक्की. आपल्या आत्मक्लेषाने दुसऱ्याच्या संवेदना जागविणे इथवर ठीक. पण दुसऱ्याचा त्याची बाजू मांडण्याचा, लढविण्याचा अवकाश काढून घेणारी नैतिक दडपणाची ही कृती खरोखर नैतिक आहे का?

रस्त्यावर हजारो लोक उतरवून, आताच्या आता निर्णय घ्या, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा, असे सरकारला धमकावणे, संवैधानिक मार्गांत बसते का? ज्या समाजविभागाकडे संख्येची, म्हणजेच मतसंख्येची ताकद असेल, तो आपल्या मागण्यांसाठी रस्ता अडवेल, रेल्वे रोखेल व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करुन सरकारला जेरीस आणून आपल्या मागण्या मान्य करायला लावेल. पण जो विभाग अल्पसंख्य असेल, दुबळा असेल त्याने आपल्या मागण्यांसाठी कोणता मार्ग अनुसरायचा? हे ‘बळी तो कान पिळी’ नव्हे काय? ही बहुसंख्याकशाही लोकशाहीत बसते का? अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटणे ही लोकशाहीची पूर्वअट मानली जाते. त्या अटीचे इथे काय करायचे? समूह नव्हे, तर व्यक्ती हे संविधानाचे केंद्र आहे. जात, धर्म आदि संबंधाने समूहाची ताकद मिळणाऱ्या व्यक्तीची किंमत व्यक्ती म्हणून न राहता समूहाच्या ताकदीवर अवलंबून राहणे हे कितपत संवैधानिक? मराठा आरक्षणासाठी प्रचंड खटाटोप करणारे अथवा तसा आव आणणारे सत्ताधारी तसेच विरोधक न्यायालयाने स्वीकृत केलेले मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण अमलात आणण्याची काही वार्ताच करत नाहीत. याचा अर्थ काय?
आंदोलनाचा एक भाग म्हणून विशिष्ट विभागाच्या प्रश्नांवर ‘जनसंसद’ आयोजित केली जाते. देशाच्या संसदेत देशभरातून निवडून आलेले प्रतिनिधी असतात. विविध हितसंबंधीयांच्या घमासान चर्चेतून तेथील कायद्याची प्रक्रिया पार पडते. (हल्ली हे होत नाही. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनाही ठाऊक नसते आज आपल्याला कशाच्या बाजूने हात वर करायचा आहे. नेतृत्व जे विधेयक मांडेल ते मुकाट्याने मंजूर करायचे. विरोधकांना तर जुमानायचेच नाही. ही असाधारण स्थिती आहे. आपण साधारण स्थितीबाबत बोलत आहोत.) जनसंसदेत एकाच हितसंबंधाचे व निवडून न आलेले लोक असतात. अशावेळी तिला संसद म्हणणे योग्य आहे का? देशाची संसद झूठी आहे; आपली संसद हीच खरी आहे, असा तेथे जमलेल्या लोकांचा समज होणे योग्य आहे का? तिला ‘जनसुनवाई’ म्हणणेच अधिक उचित नव्हे काय? पूर्णपणे अहिंसक मार्गाने मात्र तात्कालिक भावनोद्दिपनातून प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरवून संसदेला घेराव घालण्याची घोषणा करणे, रस्त्यावर उतरलेले हे लोक संसदेपेक्षा मोठे आहेत असे मानणे वा जाहीरपणे बोलणे संवैधानिक असू शकते का? क्रांती करुन आजच्यापेक्षा अधिक उत्तम व्यवस्था आणायची असल्यास वेगळी गोष्ट. पण त्यासाठीची समग्र भूमिका, पर्यायी कार्यक्रम व रचना, तो साकार करणारी संघटना व कार्यकर्त्यांची फळी असावी लागते. व्यक्तिकेंद्री मसीहा पद्धतीच्या उत्स्फूर्त भावनोद्दिपनातून ते साध्य होत नाही. उलट ते अराजकाला निमंत्रण असते. त्याचा फायदा संघटित हितशत्रूच घेतात.

...मी स्वतः वरील प्रकारांपासून पूर्ण अलिप्त नाही. कार्यकर्ता म्हणून ज्या चळवळींचा मी भाग आहे, तेथे वरीलपैकी अनेक मार्ग अनुसरले जातात. त्यात मी सहभागी होत असतो. नवीन मार्ग न सुचल्याने किंवा सुचविलेले सहकाऱ्यांना न पटल्याने आहे त्या मार्गांना मी अनुमोदन देत राहतो. पण मनात असमाधान असते. मनात प्रश्न, शंका फेर धरत असतात. असे प्रश्न, शंका व त्यांची संभाव्य उत्तरे आपल्याही मनात असतील. सुरुवातीला विनंती केल्याप्रमाणे आपल्याला याबद्दल जे काही अधिक ठाऊक असेल वा स्पष्टता असेल, त्याबद्दल कळविल्यास मला माझ्या भूमिका नेटक्या करायला त्याचे सहाय्य होईल.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, ऑगस्ट २०२१)

Monday, July 19, 2021

धर्मनिरपेक्षता व भारत


भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे १९७६ साली इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत धर्मनिरपेक्ष हा शब्द घातला गेला. त्यामुळे काही मंडळी अगदी आजही घटनाकारांना धर्मनिरपेक्षता मंजूर नव्हती, हा शब्द मागाहून घुसडण्यात आला असे प्रचारत असतात. हा शब्द घटना तयार झाली तेव्हा नव्हता. त्याची मागाहून भर घालण्यात आली, हे खरे. पण घटनाकारांना तो अभिप्रेत नव्हता, हे खोटे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक भारताचे शिल्पकार पं. नेहरु आणि तमाम तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणांत, मांडणीत स्वतंत्र भारताचे शासन सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असणार हे सतत नोंदवले जात होते. १९३१ च्या कराची कॉंग्रेसच्या मूलभूत अधिकारांच्या ठरावात ‘सर्व धर्मांच्या बाबत राज्य तटस्थ असेल’ असे नमूद केले होते. १९४६ साली घटना समितीचे कामकाज सुरु झाले, त्यावेळी हे सूत्र घटनेचा पाया म्हणून स्वीकारण्यात आले होते.

घटना समितीचे कामकाज सुरु असतानाच देश स्वतंत्र झाला. पण त्याचे दोन तुकडे झाले. पाकिस्तान व भारत. पाकिस्तानने त्यांचा देश धर्मावर आधारित केला. आपण मात्र फाळणीनंतरही आपली मूळ भूमिका कायम ठेवली. ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ बनवू इच्छिणाऱ्यांना महात्मा गांधींनी १९४२ सालीच निक्षून सांगितले होते –‘भारत त्या सर्व लोकांचा आहे जे इथे जन्मले आणि वाढले. त्यामुळे तो जेवढा हिंदूंचा आहे तेवढाच पारशी, ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान आणि अन्य हिंदू नसलेल्यांचाही आहे. स्वतंत्र भारतामध्ये हिंदूंचे नाही, तर हिंदुस्थानींचे (भारतीयांचे) राज्य चालेल व ते कुठल्याही धार्मिक भेदभावाशिवाय, सर्व जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालेल. धर्म हा वैयक्तिक विषय आहे. त्याला राजकारणात कुठलेही स्थान असता कामा नये.’

गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवत. आणि तरीही त्यांची धर्मनिरपेक्ष राज्याची वरील भूमिका होती. (ती मान्य नसलेल्यांनी गांधीजींचा खून केला.) सनातनी हिंदू अथवा कोणतीही धार्मिक धारणा वैयक्तिक पातळीवर ठेवणे आणि राज्य धर्मनिरपेक्ष असणे या परस्परांना छेदणाऱ्या बाबी नाहीत. धर्म मानण्याचे, त्याचे पालन व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य २५ व्या कलमानुसार घटनेने दिलेले आहे. या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारात धर्म न पाळण्याचेही स्वातंत्र्य अंतर्भूत आहे.

धार्मिक आधारावर तयार झालेला ‘मुसलमानांचा पाकिस्तान’ म्हणजे जणू भारतातल्या सगळ्या मुसलमानांसाठी पाकिस्तान हा वेगळा देश दिला होता, असा धादांत खोटा प्रचार केला जातो. ज्यांना जायचे होते, ते मुसलमान पाकिस्तानमध्ये गेले. जे इथे आहेत, ते आधीही इथे होते. आताही इथे आहेत. त्यांचा देश या भूमीतील अन्य धर्मीय भारतीयांप्रमाणे भारतच आहे. भारतीय म्हणून इतरांइतकाच त्यांचा या देशावर समान अधिकार आहे.

बुद्धिभेदाचे प्रयत्न संविधान तयार होत असतानाही होतच होते. अल्पसंख्याकांबद्दल भारताचे धोरण ठरवताना आधी पाकिस्तान त्यांच्या देशातील अल्पसंख्याकांबाबत काय धोरण घेते ते पाहू व मग आपण आपले धोरण ठरवू, अशी सूचना हिंदू महासभेच्या एका नेत्यांनी सभागृहात केली. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ताडकन उत्तर दिले, ‘पाकिस्तान व भारत दोन स्वतंत्र देश आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांबद्दल काय ठरवले जाणार, त्यावर आपले धोरण अवलंबून असणार नाही. आपले धोरण आपण ठरवणार.’

या सगळ्या पार्श्वभूमीशी सुसंगत व जुनीच भूमिका अधोरेखित करणारी इंदिरा गाधींची दुरुस्ती असल्याने तिला पुढे कोणत्याही सरकारने वा न्यायालयाने रद्दबातल केले नाही.

ज्यांना धर्माच्या आधारावर राष्ट्र व्हावे असे वाटते, त्यांनी पाकिस्तानचे पुढे काय झाले ते आठवावे. एक धर्म असतानाही भाषा, संस्कृती व राजकीय वर्चस्व या कारणांनी त्याची दोन शकले होऊन बांगला देश हा नवा देश तयार झाला. एकच धर्म असलेली राष्ट्रे परस्परांशी स्नेहभावाने वागतात असा जगात अनुभव नाही. नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्रही आता धर्मनिरपेक्ष झाले आहे. धर्म, संप्रदाय, पंथ, भाषा, भूगोल आदि बाबतीत प्रचंड वैविध्य असलेला खंडप्राय भारत आजही एक आहे. त्याचे महत्वाचे कारण त्याच्या शासनाचे सेक्युलर असणे हे आहे. भारत एक राहायचा असेल तर एक देश-एक धर्म, एक देश-एक भाषा, एक देश-एक संस्कृती नव्हे, तर या वैविध्याचा आब राखणारी भारतीय शासनाची तटस्थता टिकविणे गरजेचे आहे. कोणत्या तरी एका घटकाला शासन जवळ करते व कोणा दुसऱ्याशी दुजाभाव दाखवते अशी भावना पसरणे म्हणजे भारतीयत्व दुबळे करणे आहे, हे आपल्या मनावर कोरुन ठेवूया.

धर्मापासून तटस्थता याचा अर्थ शासन कोणत्याही धर्मावर आधारित असणार नाही. कोणत्याही एका धर्माला विशेष महत्व देणार नाही. सर्व धर्मांच्या यात्रा, उत्सव यासाठीच्या व्यवस्थेत सरकार सहाय्य करत असते. तथापि, धर्माच्या नावाने काहीही करण्याची मुभा तो धर्म मानणाऱ्यांना सरकार देत नाही. सार्वजनिक व्यवस्था, आरोग्य, सामाजिक नैतिकता आणि संविधानातील मूल्ये यांना धक्का पोहोचत असेल तर सरकारला धर्माच्या नावाने होणाऱ्या व्यवहारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. हिंदू धर्मातल्या अस्पृश्यतेसारख्या रुढीला घटनेतल्या १७ व्या कलमाद्वारे गुन्हा ठरवण्यात आले. शनि शिंगणापूर व हाजिअली दर्गा येथे पुरुषांच्या बरोबरीने उपासनेचा अधिकार मिळावा म्हणून स्त्रियांनी आंदोलन केले, त्या न्यायालयात गेल्या. त्यावेळी दर्जाची व संधीची समानता या घटनेतील मूल्याच्या रक्षणासाठी या महिलांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला.

अलीकडे छोट्या छोट्या कारणांवरुन आपल्या धर्मभावना दुखावतात. यातून धर्माच्या ठेकेदारांचे फावते. समाज पुढे जायला धर्मचिकित्सा गरजेची असते. यासाठी आपापल्या धर्मातल्या विवेकवाद्यांना साथ केली पाहिजे. भारतीय शासनाच्या धर्मनिरपेक्षतेला बळ मिळण्यासाठी, ती अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी नागरिक म्हणून आपण ही प्रगल्भता दाखवणे खूप गरजेचे आहे. ‘मी प्रथम व अंतिमतः भारतीय आहे. माझ्या धर्म, जात, प्रदेश, भाषा आदि निष्ठांनी या भारतीयत्वाला छेद जाता कामा नये.’ या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्याची उजळणी सतत मनात करत राहायला हवी.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, १८ जुलै २०२१)

Thursday, July 1, 2021

समतेशी करार : नवी आव्हाने, नवी सूत्रे

May be an image of text that says 'मधु कांबळे समतेशी करार समाजमंथन S'लोकसत्तेचे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांचा लोकसत्तेत लेख दिसला की एक उत्सुकता असते. आजच्या सामाजिक कोंडींबद्दल काय वेगळे सूत्र त्यांनी मांडले आहे, हे समजून घेण्याची. दलित-पीडितांविषयीचा कळवळा ही त्यांच्या लेखनाची प्रेरणा आहेच; मात्र या पीडितांची केवळ वेदना प्रकट करुन ते थांबत नाहीत. थोरा-मोठ्यांनी या विभागांच्या मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची केवळ नोंद त्यांना पुरेशी वाटत नाही. आजच्या संदर्भातली आव्हाने आणि या नव्या आव्हानांना नव्याने सामोरे जाण्याचे नवे मार्ग काय असू शकतील याबाबतची सूत्रे ते चर्चेसाठी ठेवतात. तीच अंतिम आहेत असा त्यांचा दावा नसतो. तथापि, चिकित्सेसाठीचे हे मुद्दे खूप सघन असतात, हे नक्की
मधु कांबळेंच्या लोकसत्तेतील अलिकडच्या काही लेखांचे ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे या वर्षी प्रसिद्ध झालेले पुस्तक. हे लेख सुटे असले तरी ती एकप्रकारे सलग विषय उलगडणारी प्रकरणे आहेत. जातिव्यवस्था या जुनाट रोगाचा इलाज करण्यासाठी आपण संविधानाच्या द्वारे समता प्रस्थापित करण्यासाठी विविध उपायांचा करार केला. हा करार करताना फक्त पीडितांचेच प्रतिनिधी नव्हते. तर जातिव्यवस्थेने ज्यांना कथित वरचे स्थान दिले होते, अशा विभागांतल्या अनेकांचा जाणिवेने या करारात सहभाग व पुढाकार होता, याची नोंद वेगवेगळ्या ठिकाणी कांबळेंनी दिली आहे. जातींची अभिनिवेशी डबकी अधिक खोल होत असलेल्या, जातीच्या बाहेरुन येणाऱ्या सहकार्याच्या हातांकडे संशयाने पाहण्याच्या या काळात ही नोंद गरजेची आहेच. पण तेवढाच त्यांचा हेतू नाही. लढ्याच्या पुढील दिशेची ती आवश्यक अट त्यांना वाटते. पहिल्या लेखात ते म्हणतात, ‘अन्यायग्रस्त समाज सनदशीर मार्गाने उठाव करु शकतो, आक्रोश करु शकतो; परंतु त्यासाठी सर्वच समाजातील विवेकी लोकांची साथ आवश्यक आहे.’ जातिव्यवस्थेच्या नाशासाठी जात सोडण्याचे उपाय अवलंबताना ‘समाजव्यवस्थेच्या वरच्या स्थानावरील वर्गाने त्याची सुरुवात करावी’ ही जबाबदारी आपल्या शेवटच्या लेखात याच वरच्या वर्गावर ते सोपवतात.
मधु कांबळेंची सर्व मांडणी समजून घेण्यासाठी मूळ पुस्तक वाचायला हवे. माझा हा लेख त्यांच्या पुस्तकाचा समग्र परिचय करुन देण्यासाठी नाही. जातिव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना ज्या सूत्रांचे ते विवेचन करतात, त्यातील काही सूत्रांकडे लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
आरक्षण हा आजचा ज्वलज्जहाल विषय. घटनात्मक आरक्षण मिळाले त्यावेळी आजच्यासारखी स्थिती नव्हती. ज्यांना आरक्षण त्यावेळी दिले गेले, त्यांच्या सामाजिक व पर्यायाने आर्थिक-भौतिक अवनतीबद्दल सहमती होती. दारिद्र्य सार्वत्रिकच होते. पण या घटकांच्या वाट्याला ते अधिक तीव्र आहे, याबद्दल तशी शंका नव्हती. आता देशाच्या स्वातंत्र्याला सात दशके लोटल्यावर काही नवे अंतर्विरोध तयार झालेत. आरक्षित गटांतल्या भले अल्प असतील पण काही व्यक्ती, कुटुंबे आपल्या बरोबरीने आल्याचे वा पुढे गेल्याचे बिगर आरक्षित गटांतल्या नव्या पिढीला दिसू लागते, तेव्हा त्याचा योग्य समज घेता न आल्याने ताण तयार होतात. बिगर आरक्षित गटांतल्या लक्षणीय विभागाला बदललेल्या आर्थिक पर्यावरणाचा फटका बसला आहे, बसतो आहे. त्यातून त्या विभागात नवे आर्थिक थर तयार झाले आहेत. त्यातल्या तळच्या थरांना आरक्षित गटांतले आरक्षणाचे लाभार्थी डाचू लागतात. त्यांच्यात मनभेद तयार होतात. या स्थितीचे मधु कांबळे यांनी पुढीलप्रमाणे सोदाहरण स्पष्टीकरण केले आहे –
‘आरक्षित आणि बिगरआरक्षित अशा दोन वर्गांतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून मुले शाळा-महाविद्यालयांच्या प्रांगणात हातात हात घालून प्रवेश करतात आणि जेव्हा सूचनाफलकावर प्रवेशाच्या दोन याद्या पाहतात, त्यावेळी मैत्रीचे घट्ट हात आपोआपच सैल होतात. दोघांमध्ये एक अदृश्य मनविभाजक भिंत उभी राहते. अन्यायाचे परिमार्जन म्हणून या दोन वेगवेगळ्या प्रवेशाच्या याद्या आहेत, याचे दोघांनाही आकलन होत नाही. आरक्षित वर्गातील पिढीला वाटते, आरक्षण जणू वंशपरंपरेने चालत आले आहे, म्हणून ते आपणासही मिळत आहे. त्याने कुठे अन्यायाच्या झळा सोसलेल्या आहेत? बिगरआरक्षित वर्गातील पिढीला प्रश्न पडतो, की ‘मी कुठे, कधी कोणावर अन्याय केला आहे? मग हा अलगपणा, हा भेदभाव कशासाठी? न्याय ही संकल्पना अन्यायी कशी असू शकते?’ अन्य समाजातील आर्थिक परिस्थितीने पिचलेली कुटुंबे ते पाहतात, त्यांच्यावर कुणी अन्याय केला नसेल; परंतु न्यायाचे समान वाटप का होत नाही? असे प्रश्न नव्या पिढीला डाचतात, त्यावेळी हा अलगपणा आणखी गडद आणि भीतिदायक होत जातो.’
मधु कांबळेंनी आजच्या बिगर आरक्षित विभागातल्या नव्या पिढीच्या मानसिकतेचा अगदी बरोबर वेध घेतला आहे. ऐतिहासिक अन्याय दूर करायला आरक्षण वगैरे सैद्धांतिक स्पष्टीकरणे त्याला पटत नाहीत. त्याला तो जाणिवपूर्वक केलेला भेदभाव व म्हणून अन्यायच वाटतो. हे आव्हान गडद व भीतिदायकच आहे. ते तसेच ठेवून जातिनिर्मूलन आणि समतेची प्रस्थापना असंभव आहे. घटनाकारांच्या पिढीसमोर हा पेच नव्हता. हे नवे आव्हान आहे. आपल्या पिढीला नव्या उपायांनी त्याला सामोरे जावे लागेल. ज्यात दोन्हींकडच्यांना काही सोडायची, दुरुस्त्यांची तयारी ठेवावी लागेल. कांबळे काही उपायांचा निर्देश करतात. ते पटतील न पटतील. अपुरे वाटतील. पण त्यांची चर्चा अपरिहार्य आहे. ज्यांना पटणार नाही, अपुरे वाटतील त्यांनी नवे वा दुरुस्त पर्याय द्यायला हवे.
कांबळेंची सूचना आहे, सरकारने राष्ट्रीय आयोग नेमून आरक्षित गटांच्या स्थितीचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून आरक्षणाच्या धोरणाची फेरआखणी करायला हवी. त्यानुसार, एका कुटुंबात फक्त दोनदाच आरक्षणाचा लाभ द्यावा. ज्या कुटुंबाला पहिले आरक्षण मिळाले असेल त्याला दुसऱ्या आरक्षणासाठी मागच्या रांगेत उभे राहावे लागेल. ज्या कुटुंबाला आजवर अजिबात आरक्षण मिळाले नाही, त्याला पहिले प्राधान्य दिले जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीला दिलेल्या सूचनांत जमिनीचे राष्ट्रीयीकरण हा मुद्दा होता. त्यावेळी तो मंजूर झाला नाही. सर्वच समाजातील दुर्बल घटकांना जगण्याचे साधन त्यामुळे मिळाले असते. तथापि, मागाहून जमीन सुधारणांचे, भूमिहिनांना जमीन देण्याचे काही प्रयत्न झाले. आताच्या बदललेल्या आर्थिक रचनेत जमिनींचे मालकी हितसंबंध लक्षात घेता सरकार जमिनींच्या फेरवाटपासाठीची इच्छा दाखवणे कठीण आहे. हा पर्याय ‘अशक्यतेकडेच अधिक झेपावतो’ असे लेखकाला वाटते. तथापि, ‘पाण्याचे समन्यायी वाटप’ हा मुद्दा सरकारच्या ताब्यात असल्याने तो प्रत्यक्षात येऊ शकतो असे लेखकाचे मत आहे. जमिनीखालचे व जमिनीवरचे दोन्ही ठिकाणचे पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे, तिच्यावर सगळ्यांचा, भूमिहिनांचाही अधिकार असायला हवा. ज्याला जमीन नाही, त्याच्याही वाट्याचे पाणी असेल. ते तो विकू शकतो. लेखकाने मांडलेली ही समन्यायी पाणी वाटपाची मागणी व प्रयोग महाराष्ट्राला नवा नाही. कॉ. भारत पाटणकर आदि मंडळींनी याबाबतीत बरेच काम केले आहे. त्या अनुभवाचाही मागोवा घ्यायला हवा. मुळात नोकरी व शिक्षण हीच केवळ जगण्याची वा विकासाची संसाधने नव्हेत. त्यामुळे आरक्षण केवळ तिथेच का? उपजीविकेच्या सर्वच संसाधनांचे न्याय्य वाटप, तेही समाजातील सर्व घटकांना, हा मुद्दा अधिक मूलभूत आहे. नैसर्गिक साधनसंपदा ही सर्व समाजाची असल्याने त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचेही ‘सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (Universal Basic Income - UBI)’ म्हणून समाजाला वाटप करण्याची संकल्पना जगातील काही देशांनी मान्य केली आहे. त्याची व्याप्ती आणि अंमलबजावणी यात अनेक समस्या आहेत.
सर्वांना, सर्वप्रकारचे शिक्षण मोफत द्यावे, ही लेखकाची सूचना आहे. उद्योगांकडून सीएसआरसाठीची रक्कम फक्त शिक्षणासाठीच वापरावी, त्यात सरकारची अर्थसंकल्पातली तरतूद आणि व्यावसायिक, व्यापारी आदिंकडून एक-दोन टक्के अधिभार या रीतीने शिक्षणाचा खर्च भागवता येईल, असे लेखकाला वाटते. शिक्षणाचा खर्च परवडत नाही, म्हणून राखीव जागांची मागणी सामाजिकदृष्ट्या वरचे विभाग करत असतात. त्याने प्रश्न सुटणार नाही. शिक्षणाची सार्वत्रिक व मोफत उपलब्धता ही लेखकाने सुचवलेली दिशा म्हणूनच महत्वाची आहे.
राजकीय आरक्षणाचे औचित्य, उपयुक्तता व परिणामकारकता याची चिकित्सा आणि त्याला पर्याय यावर तीन लेख या पुस्तकात आहेत. गांधी-आंबेडकरांमधील पुणे कराराने राजकीय आरक्षण आले. तथापि, या आरक्षणाच्या परिणामकारकतेविषयी पुढच्या १० वर्षांतच बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित करुन या आरक्षणाला विरोध केल्याचे स्मरण लेखक देतात. पुढे घटनेत आरक्षण समाविष्ट झाले. मात्र त्यानेही दलितांचे खरेखुरे प्रतिनिधीत्व करण्याचा हेतू पुढे गेला नाही. राखीव जागेवर निवडून येणारे लोकप्रतिनिधी हे त्यांच्या पक्षाचे अंकित असतात. पक्षधोरणाच्या मर्यादेतच त्यांना सभागृहात बोलावे लागते. त्यामुळे दलितांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या बाबत ते निकामी आहेत, अशी याबाबतीतली तक्रार आहे. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी म्हणूनच बाबासाहेबांनी घटना समितीतही मांडली होती. पण ती मंजूर झाली नाही. राखीव जागांचेच धोरण घेतले गेले, याची आठवण कांबळे देतात. शिक्षण-नोकरीतल्या आरक्षणाला मुदत नाही. या राजकीय आरक्षणाला मात्र १० वर्षांची मुदत होती. तथापि, त्याला नियमितपणे मुदतवाढ सर्व पक्षांची सरकारे देत आली आहेत. कारण वेगवेगळ्या जातिसमूहांची मते मिळविण्यासाठी ती हुकमी सोय आहे, असे लेखकाचे निरीक्षण आहे. असे बिनकामाचे हे राजकीय आरक्षण उलट जातिव्यवस्थेला बळकटीच देते. मग ते हवे कशाला? असा लेखकाचा सवाल आहे. ते नसले तरीही आज समाजातील विविध घटकांतील राजकीय जागृती लक्षात घेता, उमेदवारी देताना या जागृत घटकांचा राजकीय पक्षांना विचार करावाच लागेल, असा लेखकाचा अंदाज आहे.
पण मग या राजकीय आरक्षणाला पर्याय काय? – प्रमाणबद्ध निवडणूक पद्धत.
ही सूचना मांडत असताना मतदारसंघात कोणत्या जातीचे प्राबल्य आहे, हे लक्षात घेऊन उमेदवार देण्याची रीत सर्वसाधारणपणे ८० च्या दशकानंतर वाढल्याचे लेखक नमूद करतात. ज्यांच्यावर हजारो वर्षे अन्याय झाला, अशा समाजातील राजकीय नेतृत्वही यापासून मुक्त नाही, याची नोंद देऊन ते सवाल करतात– ‘मनुवादी राजकारणावर हल्लाबोल करीत, ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी,’ हे तथाकथित बहुजनवादी राजकारण जातिव्यवस्थेला बळकटी देणारे नाही काय?’ लेखकाला ‘सोशल इंजिनिअरिंग’ हा तद्दन खोटेपणा वाटतो. त्याच्या मते ती सामाजिक नव्हे, तर जातीय समीकरणेच असतात.
प्रमाणबद्ध निवडणुकांबाबत चर्चा संविधान सभेतही झाली होती. मात्र त्यावेळी राजकीय स्थैर्याचा विचार करुन ती नाकारली गेली. आता तिचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे लेखकाला वाटते. प्रमाणपद्ध निवडणूक याचा अर्थ उमेदवाराऐवजी पक्षाला मत देणे. जेवढी मते पक्षाला मिळतील, तेवढे प्रतिनिधी तो सभागृहात पाठवेल. आजच्या मतदारसंघनिहाय निवडणुकीत ज्यांना बहुमत मिळत नाही, त्या पक्षाची मते वाया जातात. ते इथे होणार नाही. ही सर्व मते पक्षाच्या एकूण मतांत धरली जाऊन त्यावर त्याला प्रतिनिधी मिळण्याची सोय होईल. त्यामुळे जातींचे प्राबल्य बघून उमेदवार देण्याला लगाम बसेल. या पद्धतीत पक्षाचे धोरण व कार्यक्रम हाच उमेदवार असेल. आपल्याकडे १९७७ साली निडणूक आयुक्त एस. एल. शकधर यांनी जर्मनीच्या धर्तीवर निवडणूक पद्धतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती लेखक देतात. या पद्धतीत प्रमाणबद्ध व मतदारसंघ केंद्रित अशा दोन पद्धतींचा मिलाप केला जातो. सध्याच्या रीतीने बहुमताच्या आधारावर लोकसभेच्या ५४३ जागा निवडून द्यायच्या. त्याच्या २५ टक्के म्हणजे १३६ जागा या प्रमाणबद्ध पद्धतीने निवडायच्या. अलीकडे २०१५ साली विधी आयोगानेही प्रमाणबद्ध पद्धतीची शिफारस सरकारला केल्याची माहिती लेखक इथे देतात. डाव्या तसेच अन्य काही पक्षांकडूनही याबाबत मधून मधून बोलले जात असते. त्यामुळे ही अगदी अपरिचित व अशक्यप्राय सूचना लेखक नक्की करत नाहीत. तिचा विचार आपल्याला करायला हवा.
जातिव्यवस्थेच्या निर्मूलनाकडून समतेकडे जाताना दलित-आदिवासींसाठीच असलेला ॲट्रॉसिटी कायदा हा एक मोठा अडसर ठरतो आहे, असे लेखकाला वाटते. भटक्या-विमुक्तांवर या दोन्ही समाजांपेक्षा अधिक अत्याचार होत असतानाही त्यांना कोणत्या कायद्याचे संरक्षण आहे? असे लेखक विचारतो. ॲट्रॉसिटी कायद्याऐवजी सर्वांसाठी असलेल्या कायद्यांचा वापर करावा तसेच कायद्याचा आधार घेण्यापूर्वी सरकारी तसेच विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधीत्व असलेल्या सामाजिक सलोखा समित्यासारख्या समित्या गावोगाव तयार करुन त्यांच्याकरवी प्रश्न सोडवायचे प्रयत्न करावेत, अशा काही पर्यायी शिफारशी लेखकाने केल्या आहेत.
आंतरजातीय विवाह हा जातिनिर्मूलनाचा प्रभावी मार्ग असल्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदवले आहे. विशेष विवाह कायदा आपल्याकडे आहे. त्याद्वारे कोणत्याही जाति-धर्माच्या व्यक्तींना आपल्या धर्म-जातीच्या ओळखींचा संदर्भ येऊ न देता परस्परांशी लग्न करता येते. याचबरोबर आंतरजातीय लग्नासाठीचा कायदा झाला पाहिजे, असे लेखकाला वाटते. छ. शाहू महाराजांनी असा कायदा १९२० साली त्यांच्या राज्यात केला होता. त्याद्वारे असे लग्न करणाऱ्यांना नोकरी, जमीनजुमला व घर देण्याची तरतूद त्यात होती, ही माहिती लेखक आपल्याला देतात. हल्ली आंतरजातीय लग्न करणाऱ्यांत एक मागासवर्गीय असेल तरच प्रोत्साहन योजनेचा लाभ होतो. ही अट काढून टाकून सर्व आंतरजातीय लग्नांना तो लाभ मिळायला हवा, असे लेखक म्हणतात.
समाजव्यवस्थेच्या वरच्या स्थानावर असलेल्या बिगर आरक्षित वर्गाने पहिल्यांदा जात सोडावी असे आवाहन करताना लेखक त्यांनी काय करावे हे पुढीलप्रमाणे सांगतात – ‘या वर्गातील सर्व व्यक्तींनी शाळेच्या दाखल्यावरुन आणि सर्व प्रकारच्या सरकारी कागदपत्रांवरुन आपापल्या जातीचा उल्लेख काढून टाकावा. शाळेत मुलाचे नाव नोंदविताना जात व धर्माचा रकाना रिकामा ठेवावा. अन्य समाजही त्यांचे अनुकरण करील.’
समतेकडे जाताना धर्म ही बाबही अडथळा ठरते. राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही ही धर्मनिरपेक्षता आपण स्वीकारली आहे. तथापि, शासन व शिक्षणापासून धर्माची पूर्ण फारकत झालेली नाही याची अनेक उदाहरणे देऊन लेखक ही फारकत कटाक्षाने करायला हवी असे बजावतात. जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी आवश्यक तर आजचे कायदे, घटनात्मक तरतुदी बदलाव्या लागतील याबद्दलही लेखक लिहितात. जातिनिर्मूलन व्हायला हवे हे बोलताना आपण खरे बोलावे वगैरे सदिच्छेच्या पद्धतीने अधिक जात असतो. लेखक इथे निक्षून सांगतात ते म्हणजे – ‘जातिव्यवस्था ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली पाहिजे.’ तरच त्यावरचे उपाय तातडीने व गंभीरपणे योजायची गरज आपल्याला वाटेल.
मधु कांबळेंनी समतेशी आपण केलेल्या कराराचे स्मरण देताना आपल्या डोळ्यांत जळजळीत अंजन घातले आहे, असे मला वाटते. जातिअंताच्या सैद्धांतिक चर्चा आपण करत असतो. पुढेही करु. त्या आवश्यक आहेतच. पण जाती घालवायला आपण स्वतः, समाजाने व सरकारने नक्की काय करायचे, याबद्दल इतकी सुस्पष्ट मांडणी असलेले अलिकडच्या काळातील माझ्या माहितीतले हे अपवादात्मक पुस्तक. ...त्याचे मनःपूर्वक स्वागत.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, जुलै २०२१)
__________________________________
‘समतेशी करार-समाजमंथन’
मधु कांबळे
एक्सप्रेस पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर
पृष्ठे : १२७ | मूल्य : २०० रु.
_________________________________

Sunday, June 20, 2021

आरक्षण : वास्तव, संभ्रम व पेच


प्रशासन, शिक्षण, न्याय आदि क्षेत्रांत शतप्रतिशत ब्राम्हणांचे वर्चस्व असलेल्या १९ व्या शतकात ‘जातजातीच्या संख्याप्रमाण कामें नेमा ती| खरी ही न्यायाची रिति|’ असे राखीव जागांचे सूतोवाच केले ते महात्मा जोतिराव फुले यांनी. २० व्या शतकाच्या प्रारंभी ते प्रत्यक्षात आणले त्यांचे वैचारिक वारसदार छ. शाहू महाराज यांनी. ब्राम्हण, प्रभू व शेणवी या उच्च जाती वगळून इतरांसाठी आपल्या संस्थानातील सरकारी नोकऱ्यांत त्यांनी निम्म्या जागा राखीव ठेवल्या. पुढे त्यांचे प्रमाण वाढवले.

धर्म व संस्कृती यांमुळे ज्यांच्या वाट्याला कमीअधिक तीव्रतेचा मागासपणा आला त्यातील प्रमुख विभाग दलित, आदिवासी व ओबीसी असले तरी संविधानाची रचना चालू असताना राखीव जागा मिळाल्या त्या दलित व आदिवासी या घटकांना. याचे एक कारण म्हणजे या दोन विभागांच्या मागासपणाबद्दल कोणतेही दुमत नव्हते. त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यासाठीची सहमतीही होती. शिवाय दलित व आदिवासींत कोणत्या जाती वा जमाती येतात याच्या याद्या इंग्रजांच्या काळातच (१९३५ साली) तयार झालेल्या होत्या. या दोन्ही घटकांना त्यांच्या संख्येच्या टक्केवारीप्रमाणे नोकरी, शिक्षण व राजकीय प्रतिनिधीत्वात राखीव जागा देण्यात आल्या. ओबीसींच्या आरक्षणासाठी घटनेतील कलम ३४० प्रमाणे आयोग नेमले गेले. यातील मंडल आयोगाच्या शिफारशी व्ही. पी. सिंगांच्या काळात लागू केल्या गेल्या व १९९३ पासून ओबीसींना नोकरी व शिक्षणात २७ टक्के आरक्षण मिळू लागले.

शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण आणि पुरेसे प्रतिनिधीत्व नसणे हे निकष आरक्षणाच्या धोरणामागे आहेत. तो गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. ज्यांना आरक्षण मिळते त्या व्यक्ती-कुटुंबांचा विकास व्हायला व त्यांची गरिबी दूर व्हायला जरुर मदत होते. पण तो आनुषंगिक लाभ आहे. ज्या समाजविभागांना कमी प्रतीचे मानून मुख्य प्रवाहात येण्यापासून कथित वरचे सामाजिक थर रोखतात, त्या दुबळ्या समाजविभागांना खात्रीने प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी राखीव जागा आहेत. या प्रतिनिधीत्वाने मुख्य प्रवाहातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग होईल व आपल्या विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी अवकाश मिळेल, या प्रतिनिधीत्वाला तिथे पाहून त्याच्या समाजविभागाला प्रेरणा व आधार मिळेल हा हेतू आरक्षणामागे आहे. समान संधीचे तत्त्व शाबूत राहावे म्हणून ही सर्व आरक्षणे ५० टक्क्यांच्या आत असतील हे सूत्र घटनाकारांच्या घटना समितीतील चर्चांच्या हवाल्याने सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले आहे.

नव्या आरक्षणाच्या मागण्यांना ही ५० टक्क्यांची मर्यादा, सामाजिक-शैक्षणिक मागासलेपण व पुरेसे प्रतिनिधीत्व नसणे या अटी आज अडसर ठरत आहेत. जाट, पटेल, ठाकूर आदि मध्यम जातींची आरक्षणे यामुळेच अडून राहिली आहेत. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने याच निकषांवर नाकारले आहे. आर्थिक निकषावरचे १०३ व्या घटनादुरुस्तीद्वारे केंद्राने आणलेले आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा आणि सामाजिक-शैक्षणिक मागासलेपण या निकषांवर अवैध ठरणार आहे. परंतु त्याला आव्हान दिलेले असूनही सर्वोच्च न्यायालयाने अजून त्याची सुनावणी सुरु केलेली नाही. त्यामुळे आमचे आरक्षण उडवण्याची जी तातडी न्यायालयाने दाखवली ती आर्थिक आरक्षणाबाबत का नाही, असा रास्त प्रश्न मराठा आरक्षणाचे समर्थक विचारत आहेत. महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करते आहे, विरोधी पक्षातले आवाज उठवत आहेत, मराठा नेते आंदोलन छेडत आहेत. हे चालू राहील. अशी लढाई लढणे हा मराठा किंवा कोणत्याही विभागाचा घटनादत्त लोकशाही अधिकारच आहे.  

मात्र त्याचबरोबर आपण ज्याच्यासाठी लढतो आहोत, त्या आरक्षणाच्या परिणामकारकतेची, ज्यांना ते आजवर मिळाले आहे त्यांच्या लाभाच्या आजच्या वास्तवाची वस्तुनिष्ठ चिकित्साही गरजेची आहे. तरच आरक्षणविषयक संभ्रम दूर होतील. नव्या पेचांना सामोरे जाता येईल. नोकऱ्यांतली आरक्षणे ही सरकारी व सरकारी अनुदान मिळणाऱ्या आस्थापनांत आहेत. खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या लाटेत ही सरकारी क्षेत्रे वेगाने गडप होऊ लागली आहेत. त्यामुळे आरक्षणाची टक्केवारी काहीही असली तरी प्रत्यक्ष लाभ नगण्य होतो आहे. सरकारी बॅँका, रेल्वेचे काही विभागही आता खाजगी होऊ लागले आहेत. तिथे आरक्षण अर्थातच राहणार नाही. एका बाजूला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे उच्चरवाने सांगणारे सरकार दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात आरक्षण गैरलागू करते आहे. कालचे सत्ताधारी जे आज विरोधी बाकांवरुन आरक्षणाची बाजू लढवत आहेत, तेही या खाजगीकरण-कंत्राटीकरणाच्या धोरणाच्या बाजूनेच आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या बाजूची त्यांची भाषणे ही आरक्षण असणाऱ्या तसेच नव्याने मागणाऱ्या समाजविभागांना भुलविण्यासाठी तसेच खऱ्या प्रश्नांना त्यांनी भिडू नये यादृष्टीने आरक्षणाभोवती त्यांना गुंगवून ठेवण्यासाठी आहेत. खाजगीकरण-कंत्राटीकरणाची धोरणे आरक्षणाच्या आड येऊ नयेत यासाठी तुम्ही काय करणार आहात, हा जाब अशावेळी त्यांना विचारणे गरजेचे आहे. विनाअनुदानित धोरण आणून पुढे शिक्षणाचा धंदा करण्यात याच राजकारणी मंडळींचा पुढाकार राहिला आहे. सामान्य थरातील मराठा समाजाची कोंडी ज्या शेतीच्या अरिष्टामुळे झाली त्याला हाच राज्यकर्ता विभाग जबाबदार आहेत. त्याची सोडवणूक करण्याऐवजी मराठा क्रांती मोर्च्यांच्या मागोमाग चालण्याचा साळसूदपणा तो करत असतो.  आज दलित, आदिवासी, ओबीसी यांना शिक्षणात राखीव जागा असूनही तेथील अन्य फिया व आनुषंगिक खर्चामुळे शिक्षण परवडेनासे झाले आहे. स्कॉलरशिप, फ्रीशीप या सवलतींतही कपात झाल्याने मागास-गरीब विद्यार्थ्यांची ससेहोलपट होते आहे. गरीब विद्यार्थी मग ते कोणत्याही जातींतले असो, सगळ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटा या शिक्षणातील नफेखोरीमुळे अवरुद्ध झाल्या आहेत.

म्हणजेच, आजचे प्रश्न हे समाजातील आर्थिक-भौतिकदृष्ट्या शोषित वर्गाचे आहेत. आरक्षणाचा लाभ मिळून दलित-आदिवासींतला एक किरकोळ हिस्सा पुढे गेला. त्यातील बहुसंख्या आजही विकासक्रमात मागच्या रांगेतच आहे. सामाजिक श्रेणी आणि आर्थिक श्रेणी यांची उतरंड आजही समान असल्याचेच विविध अभ्यासांतून पुढे आले आहे. आरक्षण लाभार्थी असूनही पुढे न गेलेले दलित, आदिवासी, भटके, विमुक्त जाती, ओबीसी हे विभाग, कथित उच्च जातींतले तसेच विविध धर्मीयांतले आर्थिक दुर्बल विभाग या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या सर्वांच्या हिताला अडसर ठरणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात लढणे हाच सर्वांची कोंडी फोडण्याचा खरा मार्ग आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुण्यनगरी, २० जून २०२१)

Tuesday, June 1, 2021

‘मृत्यू’वर बोलू काही…


हा लेख लिहिताना देशात करोनाच्या लाटेने उच्चांक गाठला आहे. तो छापून येईतो ही लाट ओसरायला लागो, ही मनापासून इच्छा. आजच्या इतके परिचितांचे, जवळच्यांचे ‘मृत्यू’ आयुष्यात कधी मी पाहिले नव्हते. आपणही कोणी पाहिले नसतील. करोनाच्या मागच्या लाटेतही माणसे जात होती. पण थेट नात्यागोत्यात, आप्तस्वकीयांत एकामागून एक माणसे जाणे हे या दुसऱ्या लाटेत घडते आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठे, दुसरे काही गंभीर आजार सोबतीला असलेल्यांचे मृत्यू दुःख देत होते, अस्वस्थ करत होते. पण काही काळाने मन त्याचा स्वीकार करत होते. यावेळच्या मृत्यूंनी मात्र हबकून जायला झालेय. अन्य काहीही आजार नसलेले, वेळेवर उपचार सुरु केलेले, आपल्यापेक्षा वयाने लहान, उत्तम तब्येत असलेले, लशीचा एखादा डोस घेतलेले स्नेहमित्र, सहकारी हा करोना गिळतो आहे. कोणी हॉस्पिटलमधून आता मला बरे वाटते आहे, ऑक्सिजनची पातळी वाढते आहे, तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या असे कळवतो आणि पुढच्या दोन दिवसांत नाहीसा होतो. सहज चौकशीसाठी आप्तमित्रांना फोन करावा, तर त्यांच्या नात्यात, कधी घरात कोणीतरी करोनाने गेले असल्याचे कळते.

फेसबुक उघडायचे तर आता कोणाचा फोटो समोर येईल याने धडधड व्हायला लागते. आपलाही असाच फोटो लोक टाकतील, त्याखाली आपल्याविषयी काही चांगलं लिहितील ही कल्पना मनाला चाटून नव्हे, तर मधून मधून उसळी मारत राहते. त्याने अधिकच अस्वस्थ व्हायला होते. आपण आता आहोत, हे लिहीत आहोत आणि अचानक संपूनही जाऊ शकतो. हा लॅपटॉप, ही खुर्ची, हे टेबल, ही खोली, खिडकी, घरचे लोक यांना आपण पुन्हा कधीच पाहू वा भेटू शकणार नाही, ही कल्पना भुंग्यासारखी रोंरावत राहते. आपण मरु. विझून जाऊ. आपल्याला काहीच जाणीवा नंतर असणार नाहीत. म्हणजे यातना, विरहाचे दुःख, चिंता काहीच असणार नाही, हा विवेकी साक्षात्कार स्वतःविषयी दिलासा देतो. पण आपण नसल्याचा आपल्या जवळच्यांना जो त्रास होईल त्याच्या कल्पनेने टोचणी लागत राहते. तरी बरे, माझ्यावर आता कोणी अवलंबून नाही. (उलट मीच त्यांच्यावर अवलंबून आहे.) ज्यावेळी आई-वडिल, लहान भाऊ माझ्यावर अवलंबून होते, त्यावेळी मला मृत्यूच्या जाणीवेने खूपच अस्वस्थ व्हायला व्हायचे. मी आजाराने, अपघाताने अचानक गेलो तर माझ्यानंतर यांचे काय होणार याने मन पोखरत राहायचे. वास्तविक त्यावेळी काही करोनाची आजच्यासारखी साथ नव्हती. तरीही हा विचार सारखा मनात यायचा. ते आठवले की आता आपल्यावर ते काहीही ओझे नाही, याने खूप हलके वाटते. जीवन आनंदाने जगण्याची, समाजाला उपयुक्त होण्याची क्षमता आपल्यात असताना असे अवेळी आपण जाऊ नये असेच मला वाटते. पण ही क्षमता असलेली आपल्या भोवतालची माणसे पटापट उडून जाताना पाहिली की आपल्या वाट्याला हे येणारच नाही, याची खात्री राहत नाही. पण वर म्हटले तसे आज आपल्या जाण्याने आर्थिक अडचण कोणाची होणार नाही, या विचाराने मृत्यूच्या तावडीत आपण सापडूच नये याची तडफड बरीच कमी होते. म्हणजे, मृत्यूच्या बाबतीत मी आता भाग्यवान असेन. ज्यावेळी माझ्यावर कुटुंब पोसायची जबाबदारी होती, त्यावेळी अशी काही करोनाची साथ आली नाही, हे किती चांगले झाले!

ही भावना म्हणजे आत्मकेंद्रितताच खरे तर. ज्यांच्यावर कुटुंबाच्या पालनाची जबाबदारी आहे, त्यांचे मृत्यू होत असताना रोज पाहतो आहे. आम्ही मित्रमंडळी काही सहाय्य जमा करतो, इतरांकडून मिळवतो व मृत्यू झालेल्या सहकाऱ्याच्या कुटुंबांना देतो. पण ते प्रतीकात्मकच आहे. त्यांच्या घरातील प्रिय माणूस तर गेलेच. पण त्या दुःखाबरोबरच त्याच्या जाण्याने त्या कुटुंबाची प्रदीर्घ काळ जी आर्थिक ससेहोलपट होणार आहे, त्यावर आज आमच्याकडे काहीच इलाज नाही. स्वतःच्या मृत्यूच्या विवेकी मापनातून जी मनाची स्थिरता मिळते, ती या असहायतेने पार बिघडून जाते. मला आनंदाने जगायचे असेल किंवा शांतपणे मरायचे असेल, तर माझ्याभोवतीची ही ससेहोलपट होणार नाही याची शाश्वती मला गरजेची आहे.

मृत्यूविषयी अनेक तत्त्वेत्त्यांनी लिहिले आहे. मृत्यूची अपरिहार्यता, त्यास स्वीकारण्याची मानसिक तयारी त्यातून होते. खरे म्हणजे मृत्यू हा काही कधीतरी होणारा, काहींच्याच वाट्याला येणारा अपघात वा विजेचे कोसळणे नव्हे. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला, आज करोनातून सहिसलामत वाचणाऱ्यांनाही मृत्यू गाठणारच आहे. पण म्हणून काही जन्म आणि मृत्यू यांना एकाच भावनेने स्वीकारले जात नाही. जन्म ही आनंददायी तर मृत्यू ही अपरिहार्य व निश्चित दुःख देणारी बाब आहे. शंभरी गाठलेल्यांचा मृत्यू होतो तेव्हाही अश्रू गाळले जातात. ते जर आजारांनी, वेदनांनी ग्रस्त असतील तर त्या वेदनेतून ते सुटल्याचे समाधानही असते. मात्र त्याचबरोबर कुटुंबासाठी त्याच्या झिजण्याच्या तसेच अन्य भल्याबुऱ्या प्रदीर्घ काळच्या आठवणींचा संचय ज्याच्या अस्तित्वात होता ते अस्तित्व नाहीसे झाल्याची रिक्त भावना काही काळ जवळच्यांच्या मनात राहतेच. असे अचानक नको होते जायला, यांच्या जाण्याने आमचे काय होणार, समाजाची खूप हानी झाली अशा काही भावना या मृत्यूंमुळे असणार नाहीत. तशा त्या कोणी व्यक्त केल्या तर ते एकतर ढोंग किंवा औपचारिकता असेल.

मृत्यूला नकार नाही. ती वस्तुस्थिती कबूल आहे. आपले जीवन पूर्ण जगून झाल्यावर मृत्यू पावणे हे सगळ्यांच्या वाट्याला यायला हवे. आरोग्याच्या, आहार-विहाराच्या, नात्यागोत्यातील प्रेमाच्या बाबी अनुकूल असूनही काही मृत्यू होतील. पण ते अपवाद असावेत. नैसर्गिक असावेत. मनुष्यनिर्मित सामाजिक-आर्थिक पर्यावरण हे त्यास कारण असू नये. आदिम मनुष्य कमी जगत होता. भोवतालच्या स्थितीत तगून राहण्याची क्षमता हाच त्यावेळी निकष होता. आधुनिक औषधांचा शोध लागेपर्यंत आर्थिक सुबत्तेत लोळणारे राजे-महाराजेही मुश्किलीने वयाची साठी पार करत होते. आता सर्वांचेच आयुर्मान वाढले आहे. मात्र मनुष्य निर्मित दारिद्र्य, क्रयशक्तीअभावी पौष्टिक अन्नाची कमतरता किंवा उपासमार, वास्तव्याची जागा गलिच्छ, कर्ता माणूस मेला तर त्याच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षेची हमी नसणे, सामाजिक-लैंगिक विषमतेमुळे, जाति-धर्माच्या खोट्या उतरंडीमुळे होणारा अन्याय, हिंसा वा उपेक्षा, युद्धे यांमुळे माणसे अकाली मरतात. त्याचा स्वीकार करता येत नाही. त्याला निसर्ग वा ती मरणारी माणसे स्वतः जबाबदार नाहीत. तर इथली सामाजिक-आर्थिक व्यवस्था जबाबदार आहे.

करोनाने होणारे आताचे मृत्यूही असेच तपासावे लागतील. करोना ही जागतिक आपत्ती. ती कशी निर्माण झाली, कोणी जाणीवपूर्वक प्रयोगशाळेत विषाणू तयार केला की नैसर्गिकपणेच कमी हानिकारक विषाणूचे उत्परिवर्तन होऊन तो घातक झाला, याचा शोध घेत राहावा. पण जगातल्या प्रगत-अप्रगत राष्ट्रांतल्या श्रीमंत-गरीब, सर्व धर्मिय-जातीय लोकांना त्याने आपपरभाव न करता गाठले ही वस्तुस्थिती आहे. करोना सगळ्यांशी समभावाने वागला असे आपण जरुर म्हणू शकू. पण त्याच्या विरोधात ज्या उपाययोजना सरकारांनी करायला हव्या त्या न केल्याने तसेच आपल्या आर्थिक धोरणांच्या परिणामी काहींच्या वाट्याला आधीच दुर्बलता आल्याने ही सरकारे आपल्या सर्व नागरिकांना समान संरक्षण देऊ शकली नाहीत. हे निश्चित नैसर्गिक नाही. याला ही सरकारे व एकूण राज्यकर्ता वर्ग जबाबदार आहे. म्हणजेच या करोनाच्या महासाथीचा हाहाकार कमी करणे हे आपल्या हातात होते. मृत्यू कमी करणे आपल्या हाती होते. ते आपण केले नाही. मृत्यू माणसाच्या हातात नाही. पण तो लांबवणे आपल्या हाती होते. आहे. करोनाच्या मृत्यूंनी हबकलेल्या माझ्यासारख्या अनेकांनी ही आपत्ती केवळ नैसर्गिक नाही, तिला भयावह इथल्या व्यवस्थेने केले आहे, हे लक्षात घेऊन ती व्यवस्था बदलण्यासाठी प्राणपणाने लढले पाहिजे. पुढच्या नैसर्गिक साथींतले प्राण वाचवण्यासाठी ते अत्यंत गरजेचे आहे.

माझ्या लहानपणी आम्हा मुंबईच्या वस्तीत-चाळींत राहणाऱ्यांना आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये भरती झाले तर खर्च करावा लागेल हे कधी वाटलेच नव्हते. सायन, केईएम, जे.जे. सारख्या हॉस्पिटलांत जायचे. केसपेपरलाही त्यावेळी फी नव्हती. सगळे उपचार विनाखर्च करुन परत यायचे हे गृहीत होते. हॉस्पिटलला जायचा होईल तेवढाच खर्च. किरकोळ आजारांसाठी वस्तीतल्या खाजगी दवाखान्यांत जात असू त्यावेळी थोडा खर्च येई. पण पुढे वस्त्यांतही महानगरपालिकेची आरोग्य केंद्रे सुरु झाल्याने तो मोफतचा पर्यायही असे. मला कुत्रा चावला होता. मी तिसरीत होतो. म्हणजे लहान होतो. पण मी एकटाच महानगरपालिकेच्या आमच्या चेंबूरच्या मा हॉस्पिटलमध्ये जाऊन चौदा दिवस चौदा इंजेक्शने घेतली. त्यावेळी हे कुत्र्याचे इंजेक्शन मोठे असायचे व पोटात दिले जायचे. मी इंजेक्शनला घाबरत नव्हतो हा माझा गुण मानला तरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांनीही असे सहज जाणे व हॉस्पिटलनेही तसे उपचार करणे हे सभोवताली वातावरणच होते. माझे वडिल गिरणी कामगार. सतत आजारी असत. विम्याच्या गांधी हॉस्पिटलमध्ये ते सतत भरती होत. माझे मामा महानगरपालिकेत रस्ता दुरुस्ती कामगार. टी. बी. झाल्यावर शिवडीच्या टी. बी. हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यांना भेटायला जाऊ तेव्हा त्यांना मिळालेली शिजवलेली अंडी ते मला देत. बॉम्बे, जसलोक अशी बड्या लोकांची खाजगी हॉस्पिटले तेव्हाही होती. पण आमची त्याबद्दल काही तक्रार नव्हती. आम्हाला उत्तम उपचार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतून मिळत होते. हे सगळं आदर्श होतं, त्यात काही प्रश्न नव्हते असे नाही. पण आरोग्य ही सरकारची जबाबदारी हे सरकार व समाज मानत होते.

पुढे हे बदलत गेले. खाजगी जनरल प्रॅक्टिस करणारे छोटे दवाखाने ही परवडणारी, उधारीवर चालणारी व्यवस्था त्यावेळी त्रासदायक नव्हती. उलट मदतनसीच होती. मात्र नफा कमावणारी व कट प्रॅक्टिस करणारी चिकित्सालये, रुग्णालये यांचे नंतर पेव फुटले. या गल्लोगल्लीच्या, पोटमाळ्यांवरच्या हॉस्पिटलांबाबतची मानके दुर्लक्षित करुन त्यांना मान्यता देण्यात आल्या. मुंबईतली गर्दी वाढली. देशभरचे गंभीर रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले. मात्र त्या प्रमाणात महानगरपालिका वा सरकारी हॉस्पिटले वाढली नाहीत. सर्वपक्षीय राज्यकर्ते याला जबाबदार आहेत. या सर्वांनी मिळून खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या धोरणाला आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रातही खुले आम चालना दिली. आरोग्य व शिक्षण गरिबांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले. संघटित कामगार व नव्या आर्थिक धोरणाने उदयास आलेला नवमध्यमवर्ग या खाजगीकरणाचा पुरस्कर्ता बनला. सार्वजनिक व्यवस्थांचा (आरोग्य, शिक्षण, वाहतूक) वापर कमी कमी करत त्याने जवळपास सोडून दिला. ज्या वस्त्या, चाळींतून हा वर्ग पुढे आला, त्यांच्याशी त्याचे नाते तुटू लागले. ज्यांना याचा आघात बसतो आहे, त्यांनीही आता हे असेच असणार याचा स्वीकार करुन ते मुकाट्याने हे सगळे सोसू लागले.

करोनाने या कमकुवत व्यवस्थांचे कंबरडे मोडले आणि राज्यकर्त्यांच्या बेफिकिरीला उघडेनागडे केले. करोनाच्या पहिल्या लाटेत काय करावे, करु नये याचा राज्यकर्त्यांना अंदाज नव्हता हे समजू शकते. त्याही वेळी आपल्या देशात करोनाचे आगमन झाले त्यानंतर काही महिन्यांनी केंद्र सरकारने त्याची दखल घेतली. पण तरीही आपण या नव्या संकटाला तयार नव्हतो, हे गृहीत धरु. पण नंतर याबाबतची अधिकाधिक माहिती येऊ लागली, वेगवेगळ्या देशांनी केलेल्या उपाययोजना कळू लागल्या, त्यावेळी आपण त्यापासून काय धडा घेतला हा प्रश्नच आहे. इतर देशांपेक्षा आमच्या देशात करोना किती लवकर उताराला लागला, ही जणू आमची कर्तबगारी अशा फुशारक्या आपले पंतप्रधान मारु लागले. मन की बात ऊठसूठ करणारे पंतप्रधान आता या दुसऱ्या लाटेच्या भयावह तांडवावेळी मौन आहेत. लोक मास्क घालत नाहीत, दक्षता घेत नाहीत, यावर जरुर बोलावे. पण निवडणुका, कुंभमेळा या बाबी सरकारच्या हाती होत्या. त्यात त्यांनी जो बेदरकारपणा दाखवला, त्याने करोनाच्या या दुसऱ्या लाटेला तीव्र केले. ऑक्सिजन, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर यांची चणचण पहिल्या लाटेत अंदाज नसल्याने समजू शकते. पण दुसऱ्या लाटेची शक्यता ठाऊक असताना सरकारने या व्यवस्थांच्या पूर्वनियोजनाकडे दुर्लक्ष कसे केले? याला काहीच कारण त्यांच्याकडे नाही.

यावेळी मेडिक्लेम वा आर्थिक कुवत मोठी असल्याने खाजगी हॉस्पिटले आम्हाला मिळणारच असा विश्वास असलेल्या मध्यम व उच्च मध्यमवर्गालाही मोठा दणका बसला. मेडिक्लेम आहे, पैसे आहेत तरीही बेड मिळत नाही म्हणून यातल्या असंख्यांना हॉस्पिटलबाहेर गाडीत प्रतीक्षा करत तडफडत प्राण सोडावे लागले. श्रीमंत धार्जिणी आरोग्य व्यवस्था यावेळी या वर्गाच्या उपयोगास आली नाही. केरळच्या आरोग्य मंत्री श्रीमती शैलजा यांनी देशातील आरोग्य व्यवस्थेच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीचे महत्व मध्यमवर्गाला आता तरी कळेल असे धरुया. यावेळी उच्च व सर्वोच्च न्यायालये यांनीही सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार आसूड ओढलेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तर आरोग्याच्या व्यवस्था गलथान ठेवून सरकार मानवसंहार करत आहे, इतका गंभीर आरोप सरकारवर केला आहे. जरा जरी लाज नावाची गोष्ट सरकारकडे असेल तर सेंट्रल व्हिस्टासारखे हजारो करोडोंचे प्रकल्प थांबवून त्याने आरोग्य व्यवस्था भक्कम करण्यावर तो खर्च करायला हवा.

सरकारच्या आरोग्यादी सार्वजनिक व्यवस्था दुबळ्या करण्याच्या धोरणाविरोधात बोलणाऱ्या संघटना, कार्यकर्त्यांकडे सरकार, माध्यमे, मध्यमवर्ग व न्यायालयही तसे लक्ष देत नव्हते. आता या सगळ्यांनाच याचे फटके बसले आहेत. सरकारी धोरण मुळातून बदलण्याच्या, एकूण सार्वजनिक व्यवस्था भक्कम करण्याच्या मागणीला मोठ्या जनमताचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आता तयार झाली आहे. अशावेळी करोनाच्या या आपत्तीत सगळ्या दक्षता घेऊन हा विचार लोकांत विविध माध्यमांतून प्रचारला पाहिजे. जसा करोनाला उतार पडेल, तसे लोकांत जाऊन त्यांना संघटित करुन रस्त्यावर उतरवले पाहिजे. आरोग्य व्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण या प्रमुख मागणीवर परिषदा घेतल्या पाहिजेत. त्यानंतर एकजुटीच्या व्यापक मोर्च्यांनी सरकारला सळो की पळो करुन सोडले पाहिजे. आता नडलेले, संकटात सापडलेले लोक ओळखीपाळखीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा फोलपणा त्यांना कळतो आहे. पण त्यात जेवढे सहकार्य करता येईल तेवढे अन्य सर्वांनी करायला हवेच. माणसे वाचवण्याला आज प्राधान्य द्यायला हवे. मात्र यापुढे, करोनाच्या कितीही लाटा येवोत, आपल्या जागृत नसण्याने तसेच सरकारच्या अनास्थेने एकही बळी जाणार नाही, या जिद्दीने व त्वेषाने आपण लढले पाहिजे.

करोना आवाज उठवणाऱ्या चळवळीतल्या लोकांचेही बळी घेत आहे. अजूनही बळी जातील. पण हे संकट काही सूर्याचा स्फोट होऊन पृथ्वी नष्ट होणारे नाही. म्हणजेच अख्खी मनुष्यजात काही गारद होणार नाही. तसेच आपल्यातले सगळेच कार्यकर्ते, आपापल्या परीने आवाज उठवणाऱ्या सगळ्याच व्यक्ती काही संपणार नाहीत. जे जोवर आहेत त्यांनी तोपर्यंत आणि जे शिल्लक राहतील त्यांनी त्यापुढे मानवता अधिक न्याय्यपूर्ण, अधिक सुंदर व्हायला लढायचेच आहे. जगाच्या इतिहासात हे होताना आजवर दिसले आहे. तेच आपण करायचे आहे. या संग्रामात भागिदारी करुन आपल्या जगण्याचे सार्थक करुया. मृत्यू लगेच येईल न येईल, पण जे जीवन मिळेल ते याच मार्गाने अर्थपूर्ण होईल. अशा संपूर्ण ऊर्जेने जगताना मृत्यू आलाच तर अखंड वाहणाऱ्या मानवी जीवनप्रवाहातील केवळ एका बिंदूचा तो विराम असेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, जून २०२१)

Sunday, May 16, 2021

राष्ट्रवाद व राष्ट्रद्रोह


‘भारताचा शोध’ या पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ नावाची मालिका बऱ्याच वर्षांपूर्वी दूरदर्शनवर झाली. आता ती यूट्यूबवर उपलब्ध आहे. मालिकेच्या पहिल्या भागात बैलगाडीतून एका गावात नेहरु सभेला चालल्याचा प्रसंग आहे. गाडीसोबतचा जमाव ‘भारतमाता की जय’ तसेच ‘पंडित नेहरु झिंदाबाद’ अशा घोषणा देत आहे. नंतर सभा सुरु होते. सभेत बोलताना नेहरु लोकांना प्रश्न विचारतात- “क्या हमारे पहाड़, नदियां, जंगल, जमीन, वन संपदा, खनिज... यही भारत माता है?” पुढे तेच त्याचे उत्तर देतात – “आप भारत माता की जय का नारा लगाते हैं तो आप हमारे प्राकृतिक संसाधनों की जय ही करते हैं. हिन्दुस्तान एक ख़ूबसूरत औरत नहीं है. नंगे किसान हिन्दुस्तान हैं. वे न तो ख़ूबसूरत हैं, न देखने में अच्छे हैं- क्योंकि ग़रीबी अच्छी चीज़ नहीं है, वह बुरी चीज़ है. इसलिए जब आप 'भारतमाता' की जय कहते हैं- तो याद रखिए कि भारत क्या है..”
भारतमातेच्या मुक्तीचा संग्राम चालू असतानाचा हा काळ आहे. भारतमातेच्या अभिमानाने लोक भारावून गेलेले आहेत. लढ्यासाठी एवढे पुरेसे होते. मात्र नेहरु तिथे थांबत नाहीत. भारतमातेचा म्हणजेच राष्ट्राचा खरा अर्थ ते या महासंग्रामावेळीच सांगत आहेत. एखादे राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमांच्या आतला विशिष्ट भूप्रदेश नव्हे. तसेच हा भूप्रदेश मुक्त करणे यातच आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाचे सार्थक नाही. तर या भूप्रदेशावर राहणारी माणसे, त्यांच्या आकांक्षा म्हणजे राष्ट्र. भूप्रदेश मुक्त तर करावा लागेलच. पण त्यावरील माणसांचे दारिद्र्य, त्यांच्यातील विषमता दूर करुन एक न्याय्य, समतेच्या पातळीवरचा समाज घडवणे हे या मुक्तिसंग्रामाचे महत्वाचे उद्दिष्ट असणार आहे. तरच ते राष्ट्र सुंदर होईल. भारतमाता म्हणजे काय, ती सुंदर कशी होईल याचे खूपच प्रभावी निरुपण या प्रसंगातून होते.
राष्ट्र म्हणजे केवळ भूप्रदेश नाही, परस्परांत बंधुता-भगिनीभाव व भविष्याविषयीच्या सामायिक आकांक्षा असलेल्या लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र असते, हे आपण पाहिले. मग राष्ट्रवाद म्हणजे काय?..तर या आकांक्षांच्या पूर्ततेसाठीचा विचार, भूमिका यांना राष्ट्रवाद म्हणतात. तो संकुचित असू शकतो, तसेच व्यापक असू शकतो. हिटलरने जर्मन आर्यवंश हाच शुद्ध मानववंश असून तोच जगावर राज्य करायला लायक आहे, असा आक्रमक राष्ट्रवाद जोपासला. या राष्ट्रवादाला अखेर पराभव पत्करावा लागला. पण जर्मनीतील ज्यूंना आणि जगालाही त्याचे प्रचंड भोग भोगावे लागले. भारताचा राष्ट्रवाद व्यापक राहिला आहे. आपण केवळ आपल्यापुरता विचार केला नाही. देश मुक्त होण्याआधीच आपल्यासारख्या पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना एकत्र करुन त्यांची अलिप्त राष्ट्रांची संघटना तयार करण्यात नेहरुंनी पुढाकार घेतला. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे भारताचे प्राचीन काळापासूनचे सूत्र आहे. आधुनिक काळात विनोबा भावेंनी ‘जय जगत’ हा नारा दिला. ‘जय हिंद’ बरोबरच ‘जय जगत’ ही आपल्या देशाची भूमिका आहे.
मग आपल्याला अमूल्या नावाच्या एका १९ वर्षांच्या मुलीने ओवेसींच्या बंगलोरच्या सभेत पाकिस्तान तसेच अन्य देशांच्या झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा त्रास का व्हावा? तिला पोलिसांनी अटक करुन तिच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ‘जग जगत’ म्हणण्यास आपली हरकत नसते. पण पाकिस्तान झिंदाबाद हा आपल्याला आपल्या राष्ट्राशी केलेला द्रोह वाटतो. पाकिस्तानशी आपले राजनैतिक वैर आहे. पण म्हणून त्या देशातील जनतेचे कल्याण व्हावे, ही भूमिका गैर कशी? राजनैतिक वैर राजकीय पातळीवर संपविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल किंवा न होईल; पण म्हणून ते राष्ट्र म्हणजे त्यातील जनता ही शत्रू मानून तिचे अकल्याण इच्छिणे उचित नाही. आपल्या राष्ट्रवादात ते बसत नाही.
समाजाची मानसिकता, सत्ताधाऱ्यांची भूमिका यांमुळे पोलीस अटकेची कारवाई करतात. पण न्यायालयात हे राजद्रोहाचे खटले सहसा टिकत नाहीत. कारण आपल्या संविधानाने कलम १९ द्वारे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. कलम २१ मध्येही व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो. ही कलमे तयार करताना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळींतून उत्क्रांत झालेली वैचारिक भूमिका घटना तयार करणाऱ्यांच्या मनात होती. संविधान सभेतील चर्चांमधून ती व्यक्त होते. न्यायालयांनी कलमांबरोबरच या चर्चांचाही आधार घेतलेला आहे. केरळमधील जेनोआ विटनेसेस पंथाच्या मुलांनी शाळेत राष्ट्रगीत म्हटले नाही, म्हणून त्यांना शाळेतून काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने १९८६ साली या मुलांच्या बाजूने खटल्याचा निकाल दिला. तो देताना न्यायालय म्हणते –‘राष्ट्रगीत न म्हणता शांत राहणे याने कोणत्याही कायद्याचे हनन होत नाही…आपली परंपरा सहिष्णुता शिकवते. आपले संविधान सहिष्णुता प्रचारते. आपण ती पातळ करुया नको.'
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ही राष्ट्राची अभिमानाची प्रतीके आहेत. त्यांचा यथोचित मान राखला पाहिजे. त्यासाठी कायदेही झाले आहेत. पण तीच महत्वाची मानणे आणि त्यामागील विचारांचा विसर पडणे हे घातक आहे. आपण ‘भारतमाता की जय’ म्हणू, इतरांना म्हणायला जबरदस्ती करु, जे म्हणणार नाहीत त्यांना मारहाण करु; पण त्या भारतमातेच्या मुलांना भोगावे लागणारे दैन्य, विषमता संपवून त्यांचे खरोखरी बंधुता, मैत्री व परस्पर विश्वासावर आधारलेले नाते तयार करणे हा आपल्या राष्ट्रवादाचा हेतू आपण गमावून बसू.
१९७२ चा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव होता. त्याचवेळी दलितांवरील अत्याचारही वाढले होते. त्या विरोधात दलित पँथरने आंदोलन छेडले होते. ज्या देशात आमच्यावर अनन्वित अत्याचार होतात, तो देश आम्ही आमचा कसा मानावा, हा त्यांचा सवाल होता. कविता, लेख, भाषणांतून राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्हे यांना आव्हान दिले जात होते. त्यावेळच्या एका कवितेत पँथरचे एक नेते व प्रतिभावान कवी नामदेव ढसाळ म्हणतात- ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे?...कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा?' दुसरे एक नेते राजा ढाले यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या स्वातंत्र्य दिनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्तच्या विशेषांकात 'काळा स्वातंत्र्य दिन' असा लेख लिहिला. त्यात त्यांनी राष्ट्रध्वजाबद्दल अत्यंत निरर्गल भाषा वापरली.
या दोन्ही कृतींमधील भाषेबद्दल अनेकांकडून नाराजी प्रकट झाली. मात्र त्यांच्या त्यामागील हेतूबद्दल कुणाचा आक्षेप नव्हता. सरकारनेही ७१ साली राष्ट्रीय प्रतीकांच्या अवमानाबद्दल कायदा झालेला असतानाही या दोहोंवर काही कठोर कारवाई केली नाही. तत्कालीन राजकीय नेतृत्वाने आपल्या राष्ट्राच्या घडणीतील उण्या बाजू दुरुस्त करण्याकडे ही मंडळी लक्ष वेधत आहेत, ते राष्ट्राचा अवमान करत नसून, राष्ट्राला, भारतमातेला अधिक सुंदर कसे करता येईल हेच ते सांगत आहेत, हे मानले.
घटना एकच पण ती राबवणाऱ्या सत्ताधाऱ्यांची विचारसरणी महत्वाची ठरते, हेच यातून दिसते. म्हणूनच आपली फसगत होऊ नये यासाठी देश व घटना रचणाऱ्यांना अपेक्षित राष्ट्रवाद व राष्ट्रद्रोहासारख्या संकल्पनांच्या मूळ भूमिका जाणून घेणे गरजेचे आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, १६ मे २०२१)

Monday, May 3, 2021

सत्यमेव जयते..?


सम्राट अशोकाचा सारनाथचा सिंहस्तंभ आपण राजमुद्रा म्हणून स्वीकारला. या राजमुद्रेखाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले आहे. तो मूळ सिंहस्तंभाचा भाग नाही. हे वचन मुण्डक उपनिषदातून घेतलेले आहे. ते आपले राष्ट्रीय बोधवाक्य आहे. ‘सत्यमेव जयते’ या संस्कृत वचनाचा अर्थ आहे - सत्याचाच विजय होतो. आम्ही भारतीय सत्याचा मार्ग अनुसरणारे आहोत, आमच्या शासनाचे मार्गक्रमणही याच सत्याच्या मार्गाने असणार आहे. लबाडी, खोटेपणा टिकत नाही. कितीही अडचणी आल्या तरी अखेर सत्यच टिकते. या सत्याच्या मार्गावरुन आपण ढळता कामा नये, असा या बोधवाक्याचा प्रचलित अर्थ आहे.

इथे सत्य म्हणजे सर्वोच्च सद्गुण, सदाचार असे आपण मानतो. यात माणुसकी, करुणा, सहिष्णुता, बंधु-भगिनीभाव, परस्पर सहकार्य, परदुःख निवारण्यासाठी प्रयत्न, सर्व मानवजातीच्या सुखाची कामना अशा तमाम गुणांचा, वृत्तींचा समावेश होतो. पण सत्याचा हाच एकमेव अर्थ आहे, असे आढळत नाही. उपनिषदे तसेच अन्य आध्यात्मिक दर्शनांनुसार सत्य याचा अर्थ या सृष्टीचे मूळ तत्त्व, जे अपरिवर्तनीय आहे, निश्चित आहे. हे सत् तत्त्व म्हणजे ब्रम्ह, परमात्मा असेही समजले जाते. ‘ब्रम्हं सत्य, जगत् मिथ्या’ हे सूत्र आपण ऐकलेले आहे. सत्याचा हा अर्थ घेतला तर आपल्या बोधवाक्याचे मग काही खरे नाही. जे इंद्रिय गोचर म्हणजे आपल्या इंद्रियांनी जे पाहता, स्पर्शता, ऐकता येते, ज्याचा गंध घेता येतो ते आपण वास्तव जग मानतो. वरील सूत्रात हे सर्व इंद्रियांनी आकळणारे वास्तव माया, भ्रम मानले गेले आहे. जे इंद्रिय गोचर नाही असे जे काही ते आहे ते ‘ब्रम्ह’ हे खरे सत्य, असे अध्यात्म पुरुषांनी, ग्रंथांनी ठरवून टाकले आहे. अनेक गुरु, महाराज, अध्यात्म निरुपणकार या ब्रम्ह वा परमसत्याचे पदर आपल्या प्रवचनांतून, कीर्तनांतून उलगडत असतात. त्याचा लौकिक जीवनाशी अन्वय लावत या परमसत्याच्या प्राप्तीतच जीवनाचे साफल्य असल्याचा निर्वाळा देतात.

बुद्धाने चार आर्यसत्ये प्रतिपादिल्याचे पारंपरिक बौद्ध तत्त्वज्ञानात आहे. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे..वगैरे. आर्य म्हणजे महान, आदर्श. (आर्य लोक नव्हे.) आर्यसत्ये म्हणजे महान सत्ये. ही आर्यसत्ये बुद्धाच्या मूळ शिकवणुकीचा भाग आहे की नंतर त्यात घुसवलेला प्रक्षिप्त भाग आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याबाबत शंका घेतलेली आहे. ही आर्यसत्ये बुद्ध धम्माला निराशावादी बनवतात, असा त्यांचा आक्षेप आहे. आता त्या तपशीलात जायचे कारण नाही. काहीतरी मूळ, महान, चिरंतन असे तत्त्व म्हणजे सत्य ही सत्याची व्याख्या आपल्याला बुद्धाच्या या आर्यसत्यांच्या तत्त्वज्ञानात मिळते. तेवढ्याचीच नोंद आपण आता घेऊ. हे बुद्धाचे सत्य ब्रम्ह किंवा परमतत्त्वासारखे ज्याचे अस्तित्व इंद्रियांनी, लौकिक तर्काने सिद्ध करता येत नाही, असे नाही. ते स्पष्टपणे कळणारे आहे. त्यातील संदेशाचे बाबासाहेब करतात त्याप्रमाणे मापन वेगळे होऊ शकते, ती बाब वेगळी.

जैनादि तत्त्वज्ञानांत सत्याच्या आकलनाचा एकच एक थेट मार्ग मानला जात नाही. अनेक मार्गांनी सत्याच्या बोधाप्रतचा प्रवास करावा लागतो. ‘अनेकांतवाद’ असे त्याला म्हटले जाते. चक्रधरांची हत्ती व आंधळ्यांची कथा आपल्याला ठाऊक आहे. अनेकांतवाद समजायला ती आपण आठवूया. ज्याला जे हाताला लागेल, त्याला तो हत्ती समजतो व त्याप्रमाणे त्याचे हत्ती सुपासारखा, हत्ती खांबासारखा असे वर्णन करतो. जेवढे आकळते तो त्या हत्तीचा भाग जरुर; पण संपूर्ण हत्ती म्हणजे तो केवळ एक भाग नव्हे. तर या विविध भागांचा मिळून हत्ती होतो. सत्याचे समग्र आकलन असे विविध पैलू, आयाम लक्षात घेतल्याशिवाय होत नाही. केवळ जी बाजू आपल्याला कळते तीच आपण सत्य मानू नये. आणखी अनेक बाजू असू शकतात. त्या समजून घेऊन निष्कर्षाला यावे हे वस्तुनिष्ठ व्यावहारिक शहाणपण आपल्याला इथे सापडते.

हा खरा आधुनिक विज्ञानाच्या शोधाचा रास्त मार्ग आहे. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ही डोळ्यांनी दिसणारी म्हणजे इंद्रिय गोचर बाब. ती इंद्रिय गोचर आहे, म्हणून सत्य आहे, असा दावा पुढचे शोध लागण्यापूर्वीच्या काळात केला जाई. पण वैज्ञानिक या एका निरीक्षणावर संतुष्ट होऊन गप्प राहिले नाहीत. त्यांनी अजून वेगवेगळ्या रीतीने तपासले (याला बराच काळ गेला, अनेक शास्त्रज्ञ दरम्यान होऊन गेले) आणि मग निष्कर्ष निघाला की सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सत्याचा शोध हा असा फक्त जेवढे दिसते त्यावरुन घ्यायचा नसतो. अनेक अंगांनी, मार्गांनी सत्याच्या शोधाला निघायचे असते.

‘जसे आहे तसे म्हणजे सत्य’ अशी शब्दकोशातली व्याख्या आहे. इथेही जेवढे दिसते त्यावरुन सत्य ठरवायचे नसते. विविध मार्गांनी तपास करुन जे आढळते ते जसे आहे तसे स्वीकारणे म्हणजे सत्यवादीपण. जे सत्य समोर येते ते प्रिय असेल अथवा अप्रिय. ते सत्य आहे. स्वीकारलेच पाहिजे. या स्वीकारातूनच पुढच्या दिशा किंवा उपाय ठरवता येऊ शकतात.

सत्य म्हणजे आपल्या किंवा धर्मग्रंथांनी पवित्र ठरवलेल्या धारणा नव्हे. पण त्यासच सत्य म्हणावे असा आग्रह या धर्मग्रंथांचा असतो. ऋग्वेदातील पुरुषसूक्त (हेही प्रक्षिप्त असावे असे बोलले जाते) वर्णव्यवस्थेच्या उद्गमाचे चित्र रेखाटते. ब्रम्ह्याच्या मुखातून ब्राम्हण, बाहुंतून क्षत्रिय व जांघांतून शूद्र वगैरे. हेच सत्य मानून जेव्हा समाजव्यवस्था चालवली जाते वा तिचे समर्थन केले जाते, तेव्हा सत्याची ही आवृत्ती वास्तविक असत्य असते. पण धार्मिक श्रद्धा व विवेकबुद्धीच्या वापरास बंदी यामुळे ते असत्यच सत्याच्या दिमाखात वावरते. बहुसंख्य समाज हे सत्य मानतो, म्हणून जिला विवेकबुद्धी आहे व तिचा निर्वाळा हे असत्य आहे असा आहे, त्या व्यक्तीनेही ते मानावे का? समाजातील कथित अधिकारी वर्ग वा सबंध समाजाचा तो आग्रह असू शकतो. या आग्रहास सगळेच शरण जात नाहीत. आपले बरेच काही पणाला लावून ‘सत्यअसत्याशी मन केले ग्वाही-नाही मानिले बहुमता’ अशी ठाम भूमिका घेणारे तुकोबा असतातच. भेदाभेद करणारी जातिव्यवस्था, ब्राम्हणांचे वर्चस्व हे परमसत्य असल्याची अगदी त्यांच्या आप्तांची धारणा महात्मा फुले ठोकरतात. स्त्रीशूद्रातिशूद्रांना समान लेखणारे, मांग-महम्मद-ब्राम्हणांना एकाच मायेने पोटाशी धरणारे ‘सत्य’ ते ‘सर्वांचे आदिघर’, ‘सर्व धर्मांचे माहेर’ मानतात. या सत्याच्या प्रस्थापनेसाठी सत्यशोधक चळवळ उभारतात. महात्मा गांधी ईश्वराला सत्य नव्हे, तर सत्याला ईश्वर मानतात. सत्य सर्वांठायी आहे. प्रेम हा त्याचा आविष्कार आहे. सर्वांचे भले साधणाऱ्या, विरोधकाच्या माणुसकीला आवाहन करणाऱ्या सत्याला जागविण्यासाठी ते ‘सत्याग्रह’ करतात. अलिकडे दलाई लामांनी बुद्ध विचार आणि वैज्ञानिक सत्य यांत विरोध आढळल्यास मी विज्ञानाच्या बाजूने कौल देईन असे जाहीर विधान केले. बुद्धाच्या ‘एही पस्सिको’ (या आणि पहा) तत्त्वाशी आणि स्वानुभवाच्या, व्यवहाराच्या कसोटीवर माझे विचार तपासूनच ते स्वीकारा या भूमिकेशी दलाई लामांचे हे विधान सुसंगतच आहे.

संशोधकांचा भौतिक सत्याचा शोध किंवा सद्विचारांच्या सत्याचे संरक्षण या वरील प्रकारच्या बंडखोरींमुळे शक्य होते. सत्य स्वतःच्या ताकदीवर टिकते असे दिसत नाही. ‘सत्यमेव जयते’ किंवा ‘सत्याचाच अखेरीस विजय’ हे आपोआप होत नाही. पृथ्वी सपाट नसून ती गोल आहे, हे नंतर कळले. पण ती वस्तुस्थिती किंवा सत्य आधी, नंतर तसेच कायम होते. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्नच झाले नसते, विविध पुराव्यांनी ते सिद्ध केले गेले नसते, तर पृथ्वी गोल असूनही ती सपाट आहे, या बायबलच्या म्हणण्यालाच लोक सत्य मानत राहिले असते.

काही सत्ये ही सत्ये असतातच. पण आपल्यासमोर आलेल्या आयामांचाच केवळ अन्वय लावून निकाल दिला तर तो सत्याची बाजू घेणारा असेलच असे नाही. आपण सत्यवादी असू. पण सत्य त्यामुळे पुढे येईलच व आपण त्याचे रक्षण करु शकू असे नाही. आकिरा कुरोसोवाचा ‘राशोमॉन’ चित्रपट जगप्रसिद्ध आहे. त्यात खून झाला आहे. ते सत्य आहे. पण तो कोणी केला याच्या अनेक आवृत्त्या संबंधितांकडून मांडल्या जातात. त्या इतक्या प्रभावी असतात, की आता ऐकलेली आवृत्तीच सत्य वाटावी. हा सिनेमा आहे. पण प्रत्यक्ष व्यवहारात असे खून वकिली युक्तिवादांतून सिद्ध होतातच असे नाही किंवा भलताच निरपराध माणूस खुनी म्हणून लटकवला जातो. खूप नंतर कधीतरी योगायोगाने दुसऱ्या वस्तुस्थिती पुढे येतात व तो निरपराध असल्याचे कळते. तोवर तो मेलेला असतो, प्रदीर्घ शिक्षा त्याने भोगलेली असते, त्याचे कौटुंबिक जीवन, समाजातली त्याची प्रतिमा उद्ध्वस्त झालेली असते. अशा सत्य घटनांवर आधारित अनेक सिनेमे निघालेले आहेत. फाशीची शिक्षा देऊ नये या मागणीतला हाही एक मुद्दा असतो. कधीतरी नंतर जर नव्या पुराव्यांनी तो मनुष्य गुन्हेगार नाही असे कळले, तर त्याच्या प्रति न्याय करायला तो किमान जिवंत तरी हवा. फाशी दिलेली असल्यास या नंतरच्या पुराव्यास त्या माणसाच्या दृष्टीने काही अर्थ राहत नाही. म्हणून कठोरातल्या कठोर गुन्ह्यासही फाशी नव्हे, तर जन्मठेप हीच सर्वोच्च शिक्षा हवी असे काहींचे मत आहे.

वैचारिक मान्यतांच्या सत्याबाबत एक अडचण असते, ती म्हणजे ते सत्य निरपेक्ष, वस्तुनिष्ठ नसते. पृथ्वी गोल आहे, हे सिद्ध झाले की झाले. त्यावर मतभिन्नता राहण्याचा संभव नसतो. पण विशिष्ट विचारांना सत्य मानले जाते, त्यावेळी ते वादातीत नसते. समाजाच्या सुव्यवस्थित संचालनासाठी वर्णव्यवस्था-जातिव्यवस्था हवी. पण ती जन्मावर आधारित नको. कर्मावर ठरावी. ती श्रेणीबद्ध नसावी. ती समांतर असावी. या जातींजातींत विवाह तसेच भोजन आदि बाबींना प्रतिबंध नको. परस्परांच्यात समरसता असावी. आर्यसमाज तसेच अन्य काही प्रगतीशील हिंदू प्रवाहांची ही भूमिका होती. आर्य समाज वर्णव्यवस्था मानायचा. हे लोक सत्प्रवृत्त होते. त्यांच्या मनात विखार, द्वेष नव्हता. पीडितांबाबत त्यांच्या मनात कणव, करुणा होती. या मतप्रवाहाच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांना मुळात जातिव्यवस्था ही रचनाच मंजूर नव्हती. ती व तिला आधार देणाऱ्या धर्ममान्यतांवर त्यांनी कठोर आघात केले. समाजाच्या सुव्यवस्थित संचालनासाठी जगभर कामांची विभागणी आहे. ती वैयक्तिक निवडीवर आधारित आहे. त्यासाठी जातीची, वर्णाची संज्ञा कशाला हवी? समरसता अखेरीस जैसे थे रचनेला पुरस्कृत करते. म्हणून सर्व व्यक्तींना समान पायावर उभी करणारी, त्यांचे मोल एकच मानणारी समता प्रस्थापित करण्याचा ते चंग बांधतात. गांधीजी व आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार कोणाला खलनायक न ठरवता समजून घ्यायचा झाला, तर तो दोन सत्यांतला संघर्ष होता, असे म्हणायला लागेल. म्हणजेच ही सत्ये सापेक्ष आहेत. त्यांचा निकाल या दोन महामानवांच्या हयातीत तर लागला नाहीच. पण त्यांच्या हयातीनंतर आजही लागलेला नाही. या दोन सत्यांप्रति ठाम बाजू असणारे दोन्ही बाजूंचे सत्प्रवृत्त लोक आजही आहेत. कोणी कठोर बोलेल, तर कोणी सौम्य. पण सत्याच्या बाजू दोन किंवा सत्येच दोन नक्की. अजून खूप काळानंतर कदाचित यातले अधिक योग्य कोणते किंवा या दोहोंपेक्षाही तिसराच पर्याय अधिक योग्य ठरला असता असे काहीतरी पुढे येऊ शकते. कदाचित ते दोघांनाही मान्य होऊ शकते. इथे सत्य एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल का? अखेरीस सत्याचा विजय होतो, असे म्हणता येईल का? दोहोंपैकी एकही सत्य टिकले नाही, तिसरेच पुढे आले, तर त्या तिसऱ्या सत्याचा विजय झाला असे तरी म्हणता येईल का? ...कारण पुढे जाऊन, ज्यावर सहमती झाल्याने मतभेद राहिले नाहीत, तरी दोहोंना विचार करायला लावणारा एखादा नवा आयाम समोर येऊ शकतो.

अहिंसक, द्वेषरहित आंदोलन करणाऱ्या लोकांबाबत आपण हे पाहिले. पण इथे हिटलर व त्याला साथ देणारे वंशविद्वेषाची शिकार झालेले जर्मन यांचा विचार कसा करायचा? ज्या क्रौर्याने हे लोक वागले, त्याचे त्यांचे म्हणून समर्थन होते. अर्थात ती वर्चस्ववादी मनोरुग्णता होती. त्याला कोणीच सत्य म्हणून मान्यता देणार नाही. या मंडळींचा पुढे पराभव झाला. नाझींत सहभागी झालेले जे कोणी आताआतापर्यंत शिल्लक होते, त्यांच्या पश्चातापाच्या कहाण्याही पुढे आल्या आहेत. इथे उशीरा का होईना, सत्याचा विजय झाला असे आपण म्हणू. अर्थात त्यासाठी प्रचंड किंमत द्यावी लागली. तरीही जय सत्याचाच झाला हे खरे. पण हे नेहमीच होईल वा होते असे नव्हे. समाजमनाची खरी-खोटी दुखरी बाजू, अवमानाची भावना चेतवून प्रचंड क्रौर्य करुन आयुष्यभर हुकुमशहा म्हणून जगणारेही आहेत. त्यांच्या पोलादी पकडीत अनेक निरपराध लोक राष्ट्राचे शत्रू म्हणून घोषित होऊन लोकपाठिंब्याने यमसदनाला धाडले गेले आहेत. इथे सत्याचा विजय किमान या सगळ्यांच्या हयातीत तरी होत नाही. विरोधकांना नेस्तनाबूत करणारे, त्यासाठी कोणत्याही मार्गांचा अवलंब करणारे उलट्या काळजाचे राजकारणी आपल्या देशात सध्या आहेतच. त्यांची मने इतकी निगरगट्ट आहेत की त्यांच्या स्वप्नातही या क्रूर कृत्यांच्या छाया त्यांना भेडसावत नाहीत. त्यामुळे असत्याने वागणे माणसाला अंतर्यामी खात राहते, अस्वस्थ करते हे सार्वत्रिक नाही. ते ज्यांची काळिजे नाजूक असतात, त्यांच्याबाबतीत खरे असते. सत्याच्या रक्षणासाठी या निगरगट्ट, निर्ममांशी करावयाचा संघर्ष व्यापक अर्थाने आंतरिक विवेकाला साद घालून करता येईल असे नव्हे. समाजाला ती हाक जरुर देता येईल. समाजाच्या मनोभूमिकेचा दबाव तयार करता येईल. पण या निष्ठूर, क्रूरकर्म्यांना जेरबंद करावयाचे अन्य मार्गही वापरावे लागतील.

व्यवस्था बदलाचे उपाय विश्वस्त, वर्गसंघर्ष, लोकतांत्रिक कायदे या दोन्ही-तिन्ही पद्धतींनी करण्याच्या भूमिका आपल्याकडे तसेच जगात आहेत. त्या अवलंबल्या गेल्या आहेत. त्याचे अगदी निर्णायक नसले तरी कमीअधिक अनुकूल परिणामही दिसतात. या विचारप्रणाल्यांनी कार्यरत लोक लोकहिताच्या त्यांना वाटणाऱ्या सत्याच्या स्थापनेसाठी जिद्दीने काम करताना दिसतात. त्यांच्यात मतभिन्नतेसह सामायिक सहमतीच्या मुद्द्यांवर सहकार्य व प्रसंगी संघर्ष हीच सत्याकडे जाण्याची रीत असू शकते. ती ‘सत्य रीत’ असू शकते. अनेक संघर्ष व मतभिन्नतेसह संविधानाची निर्मिती ही आंबेडकर, गांधी, नेहरु यांची सामायिक सहमतीची कृती होती. आपापल्या सत्याप्रत जाण्याचे त्यांचे संघर्ष व मतभेद संविधान निर्मितीनंतरही चालू होते.

हे एक किंवा अनेक जनहितकारी सत्ये आपण पाहिले त्याप्रमाणे आपसूक स्थापित वा विजयी होत नाहीत. त्यांच्या प्रस्थापनेसाठी तत्त्वज्ञान सिद्ध करावे लागते. त्याच्या प्रकाशात समाजविण समजून घ्यावी लागते. त्यातून झालेल्या बोधाप्रमाणे प्रबोधन, आंदोलन करावे लागते. संघटना बांधावी लागते. रणनीती आखावी लागते. तिची अंमलबजावणी करताना सतत दक्ष राहावे लागते. ‘सत्य’ चप्पल घालून तयार होईपर्यंत ‘खोटं’ गावभर हिंडून आलेलं असतं, हे आपलं ग्रामीण बोलीतलं शहाणपणही तेच सांगतं.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, मे २०२१)