Saturday, February 6, 2021

श्रेय कोणाला?

एम.ए. ला असताना माझे शिक्षक मला म्हणाले, “तू तुझ्या नोट्स इतरांना देऊ नको. थोड्या फरकाने क्रमांक हुकू शकतो.”

मी त्यांना म्हणालो, “सर, माझ्या नोट्स दुसऱ्याला दिल्याने काही माझे ज्ञान कमी होणार नाही. त्यामुळे माझ्या पुढे कोण जाते, त्याचे मला काही वाटत नाही.”

मला सल्ला देणारे सर कोणाही विद्यार्थ्याला नेहमीच स्वतःहून मदत करण्यास तत्पर असत. सगळ्यांशी त्यांची मैत्री असे. त्यांनी कोणाशी आपपरभाव केल्याचे माझ्या पाहण्यात आलेले नव्हते. तथापि, रीतीप्रमाणे पहिले येण्याला त्यांच्याही दृष्टीने एक विशेष महत्व असावे. त्यामुळेच हा सल्ला त्यांनी मला दिला असावा.

मला फर्स्ट क्लास मिळाला. पण नंबर हुकला. पण तो नोट्स ज्यांना दिल्या त्यांच्यामुळे नाही, तर दुसऱ्याच एका जिल्ह्याची मुलगी पहिली आली. तिचा माझा काहीही संबंध नव्हता. परिचय नव्हता. तिचे गुण माझ्यापेक्षा अधिक होते.

एम. ए. ला असणाऱ्या आम्हा नोकरी, कष्ट करुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परस्परांना होणारी मदत केवळ परीक्षा उत्तम जावी एवढ्यापुरती नव्हती, तर ती समान आर्थिक-सामाजिक परिसरातल्या आम्हाला मानसिक उभारी देणारीही होती. एकूणच एकमेकांना अभ्यासात मदत करण्याचा माझा अनुभव लहानपणापासूनच खूप प्रेरक व ताकद देणारा आहे.

घरी अभ्यासाला जागा नाही, लाईट नाही, दारु पिऊन शिव्या-भांडणे सततची. माझ्या घरात तर अभ्यास म्हणजे काय हे न कळणारेच लोक त्यावेळी होते. “तुमची बडबड थांबवा, माझे वाचनात लक्ष लागत नाही,” असे म्हटल्यावर ते म्हणत, “तुला कोण त्रास देतोय. आम्ही आमचे बोलतोय. तू तुझा अभ्यास कर.” ते खरोखरच मला शारीरिक त्रास देत नसत, कोणतेही काम सांगत नसत. जेवणाचे ताट जागेवर मिळायचे. ते मी उचलायचे पण नाही. लागेल तो खर्च कर्ज-ओढाताण करुन करत. मी अभ्यास करुन खूप मोठा व्हावा, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी कितीही कष्ट करायची त्यांची तयारी असे. मी ओरडल्यावर ते गप्प राहत. मग शांतता होई. पण हे त्यांना पटले म्हणून नव्हे, तर मी म्हणतो म्हणून ते करत. माझ्या घरची हो टोकाची स्थिती धरली तरी एकूणात अभ्यास करुन मुले पुढे जायला हवीत, ही इच्छा पालकांची खूप असे. पण ते कसे करायचे याचे उपाय त्यांच्याकडे तसे नव्हते. काहींना कळले तरी करायची क्षमता नव्हती.

आमच्या वस्तीत दहावीला असताना आम्ही एक विद्यार्थ्यांची संघटना केली. ‘अत्त दीप भव’ (स्वयंप्रकाशित व्हा) हा बुद्धाचा संदेश तिचे ब्रीद. ‘स्वतःच दिवा व्हा, अंधार दूर होईल,’ म्हणजेच, स्वतःचा स्वतःच उद्धार करा, दुसरा कोणी तुमचा उद्धार करायला येणार नाही, हा त्याचा अर्थ. हा स्वावलंबनाचा मंत्र आम्हाला दिशा व ताकद देणारा ठरला. विभागातल्या एका मोठ्या बुद्धविहारात त्याच्या व्यवस्थापकांकडे आम्ही अभ्यासाला जागा मागितली. त्यांनी ती दिली. आम्ही दहावीचे विद्यार्थी एकत्र अभ्यास करु लागलो. ज्याचा जो विषय त्यातल्या त्यात चांगला, त्याने इतरांना तो शिकवायचा. त्याचवेळी आमची धाकटी भावंडेही तिथे अभ्यासाला येऊ लागली. आम्ही त्यांचे क्लासच सुरु केले. आमचा दहावीचा अभ्यास करत असतानाच पाचवी ते सातवीचे वर्ग चालविले. इतरही सामाजिक उपक्रम केले. हे सगळे करुन आमचा दहावीचा निकाल उत्तम लागला. दोन जण एकेका विषयात थोड्या गुणांनी गेले. बाकी सर्व उत्तीर्ण. मला तर सत्त्याहत्तर टक्के मिळाले. आमच्या वस्तीत इतके गुण मिळण्याची आणि इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्याची घटना पहिलीच. हे साल १९८१. एकत्र अभ्यास व मोठ्यांनी लहानांना शिकवण्याचा हा परिपाठच पुढे सुरु झाला. याच्याशी संबंधित मुले अभ्यासात पुढे गेलीच, पण चळवळीतही त्यांचा पुढाकार राहिला. आधी शिक्षण, मग सामाजिक काम असे काही आम्ही मानले नाही. दोन्ही एकाचवेळी सुरु होते. परस्परांच्या अनुभवांच्या देवाण-घेवाणीतून आमचे बाह्य जगाचे ज्ञानही वाढले. हा क्रम दोन दशके तरी चालला.

एकमेकांची सुख-दुःखे वाटून घेत चाललेले हे जगणे संपन्न होते. आम्हाला कधीच एकटे वाटले नाही. कोणाच्याही घरचे संकट सगळ्यांचे असे. त्यामुळे त्याने खचून जाणेही होत नसे. एकमेकांची एकमेकांना साथ पक्की होती. माझा अभ्यास मीच करणे, तो पुढे जाईल म्हणून त्याला न सांगणे हे केले असते तर आम्ही कोणीच पुढे गेलो नसतो. अनुभवांची सधनता आणि मनाचे सामर्थ्य व समाधानही मिळाले नसते.

याचे श्रेय कोणाला?

रुढ रीतीने माझे नाव घेतले जाते. पण प्रश्नाची ही चौकटच बरोबर नाही. माझा पुढाकार होता, हे खरे. पण हे करावे असे वाटणारा, संघटना स्थापन करण्याची कल्पना प्रथम मांडणारा मी नव्हतो. तो दुसरा होता. मला त्याचे म्हणणे पटले. मी साथ दिली. इतर समविचारी मित्रांना जमवू लागलो. त्यांच्यातले काही या आमच्या प्रथम कल्पना मांडणाऱ्या मित्राला नको होते. सगळे एकत्र आल्यावर पदाधिकारी निवडताना दुसऱ्यांचीच निवड झाली. त्यामुळे तो नाराज झाला आणि दूर गेला. मी समजावण्याचे, दुरावा सांधण्याचे बरेच प्रयत्न केले. पण जमले नाही. आता त्या प्रथम कल्पना मांडणाऱ्या मित्राचा संदर्भच कोणाला राहिला नाही. अनेक उपक्रमांशी माझे नाव जोडले जाते. त्यातल्या बऱ्याचशा उपक्रमांचा प्रारंभ मी एकट्याने केलेला नाही. अनेकांबरोबर मी एक होतो. काही उपक्रम सुरु करताना मी नव्हतोच. मी नंतर त्यात सहभागी झालो. या उपक्रमांच्या जोपासनेत मी टिकून, तटून राहिलो हे माझे वर्णन योग्य राहील. त्यातही अशा श्रम करणाऱ्यांत मी एकटा नव्हतो. त्यांचे प्रवक्तेपण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, त्यामुळे मी बाहेरच्यांना इतरांपेक्षा अधिक ठाऊक झालो.

अशावेळी श्रेय कोणाला द्यायचे? अशा अधिक ठाऊक असणाऱ्यालाच ते सर्वसाधारणपणे दिले जाते. पुरस्कारही मग बहुधा अशालाच मिळतात. जो उपक्रम केवळ एकट्याने होत नसतो, त्यात भागिदारी करणाऱ्या सर्वांचीच दखल घ्यायला हवी. पण तेही संभवनीय असतेच असे नाही. एकेका टप्प्यावर अनेकांची भागिदारी झालेली असते. अनेक अनामिकही त्यात असतात. अशावेळी त्या संघटनेचीच नोंद घेणे, तिलाच श्रेय वा पुरस्कार मिळणे त्यातल्या त्यात बरोबर ठरते.

पण काही वेळा संघटनांचीही स्पर्धा लागते. अमूक काम किंवा अमूक कल्पना प्रथम कोणत्या संघटनेने पुढे आणली? ..या प्रश्नाने दोन व्यक्ती नाहीत, पण व्यक्तींचे गट परस्परांच्या विरोधात उभे राहतात. एकाच ध्येयाने चळवळ करणाऱ्यांतही हा अंतराय तयार होतो. व्यक्तींवरुन संघटना, संघटनांवरुन संघटनांच्या आघाड्या अशी एकके विस्तारत गेली, तरी ‘प्रथम कोणी’ यावरुन मने फाटण्याचा क्रमही विस्तारत जातो.

हे तेव्हाच थांबेल जेव्हा एक वास्तव आपण मनोमन कबूल करु. ते म्हणजे शून्यातून अचानक काहीही उभे राहत नाही. काहीच नव्हते आणि मी किंवा आमचा गटच त्याचा निर्माता आहे, हे खरे नसते. त्याने किंवा त्यांनी ‘शून्यातून सगळे उभे केले’ ही म्हणण्याची रीत झाली. त्यातून त्यांच्या कष्टाची, नवनिर्मितीची कल्पना येते. पण शून्यातून अंगठी काढणारे जादूगार प्रत्यक्षात कुठेच नसतात. काहीतरी आधी असते. त्याच्याआधारे नवे रचले, बांधले जाते. अनेक वैज्ञानिक शोध हे आधीच्या कुठल्या तरी शोधावर वा कोणीतरी काही प्रयोग केलेल्या सामग्रीच्या सहाय्याने, मार्गदर्शनाने लागत असतात. फसलेले प्रयोगही मदतनीस होतात. त्यात आणखी सुधारणा पुढे कोणीतरी करतो. चाकाचा शोध कोणी लावला? ठाऊक नाही. पण त्याच्या आधारे पुढे बैलगाड्या, रथ, यांत्रिक वाहने आली. आता आणखी थोड्या काळाने बिनचालकाची वाहने येणार आहेत. सामाजिक, वैचारिक क्षेत्रातही तेच असते. बुद्ध जगभर गाजतो. मात्र बुद्धाच्या विचारांची आणि धम्माची पाळेमुळे त्याच्या समकालीन निरीश्वरवादी, अज्ञेयवादी, भौतिकवादी चार्वाक तसेच जैनादी समकालीन प्रवाहांशी जुळलेली आहेत. ब्राम्हणी संस्कृतीच्या विरोधात ही श्रमण संस्कृतीची छावणी होती. बुद्धाने या समकालीन आणि त्याच्या आधीच्या विचारभूमीवर आपले तत्त्वज्ञान बांधले. नवी रचना केली. ही पृष्ठभूमी विसरल्याने हवेतच काही तयार झाले अशा निष्कर्षाला आपण येतो. केवळ समविचारी नव्हे, तर विरोधी विचारांचे अस्तित्वही त्यास सहाय्यभूत ठरते. त्याच्याशी होणाऱ्या विरोध, क्रिया-प्रतिक्रियांनी नव्या विचाराच्या रेषा अधिक सुस्पष्ट होत असतात. हेच पुढे बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही. बुद्धापासूनची प्रगतीशील परंपरा, महात्मा फुल्यांचा विद्रोह, शाहू महाराजांसारख्यांचे सहाय्य, ज्या युरोप-अमेरिकेत बाबासाहेब शिकले, तेथील उदारमतवादी विचारवंतांचा प्रभाव, गांधीजींशी संघर्ष या सगळ्यातून बाबासाहेब घडले. एखादे अचंबित करणारे नाटक पाहताना त्याचे नेपथ्य, स्टेज, दिग्दर्शन, कपडे पट, संगीत हे सगळे त्या मागे असते हे विसरता कामा नये. नाहीतर हाडामासाच्या माणसांना आपण अलौकिक करतो. विभूती करतो. काहीच स्वयंभू नसते. स्वयंभू गणपती, स्वयंभू शिवलिंग ह्या वदंता असतात. त्यांचा कोणीतरी रचयिता असतो. म्हणजे दगडाला किंवा झाडाच्या खोडाला आलेला विशिष्ट देवतेचा, लिंगाचा आकार वारा, पाऊस अथवा वनस्पतीच्या वाढीची अंगभूत गती यांमुळे आलेला असतो.

मी एखादा लेख लिहितो, भाषण करतो म्हणजे त्यातील मुद्दे माझे असतात, याचा अर्थ काय? तर याआधी याच शब्दांत, त्याच वाक्यांतून कोणी ते मांडलेले नसतात. काही प्रमाणात त्याचा नव्या संदर्भातला अर्थ नवा असतो. पण हे मुद्दे किंवा त्याच्या आसपासचे मुद्दे किंवा ते मांडण्यासाठी उद्युक्त करणारे विरोधी मुद्दे वा परिस्थिती आधी अस्तित्वात असते. माझी त्यांच्याशी जी क्रिया-प्रतिक्रिया होते, त्यातून माझी मांडणी आकाराला येते. हे काहीच नसते तर मी काय लिहिले असते? हवेत इमले बनत नाहीत. त्यांना पाया लागतोच. कधी कधी गंमत म्हणा, अडचण म्हणा अशीही होते. एक मुद्दा मी नेहमी ‘मला वाटते’ असे म्हणत मांडत असे. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र मजूर पक्षावेळचे लिखाण वाचनात आले. तर त्यात तो मुद्दा जवळ जवळ तसा होता. आता बाबासाहेबांनी माझा मुद्दा चोरला असे मी म्हणू शकत नाही. कारण तो ऐंशी वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी लिहिला आहे. आणि त्याचा लिखित पुरावा आहे. मी बाबासाहेबांचा मुद्दा चोरला नाही हे लोकांना सांगू शकत नाही, पण मला ठाऊक आहे. कारण मी आधी बाबासाहेबांचे हे लिखाण वाचलेच नव्हते. हे कसे होते? ज्या विचारप्रवाहाशी आपण संबंधित असतो, त्याचे खूप काही वाचत, ऐकत असतो त्यावेळी काहीतरी प्रकारे तो मुद्दा वाहत वाहत आपल्यापर्यंत आलेला असतो. आपण तो अभिव्यक्त करतो. ती अभिव्यक्ती निश्चित आपली असते. पण त्यातील विचारांची दौलत ही पूर्णपणे आपली नसते. एकदा तर माझ्या एका लेखातील काही शब्द, वाक्ये जशीच्या तशी एका मोठ्या नेत्याच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तिकेत मला आढळली. ती आधी माझी होती हा दावा मी करु शकतो. कारण एका वर्तमानपत्रात तो माझा लेख ही पुस्तिका येण्याच्या कितीतरी आधी छापून आला होता. याचा अर्थ त्या नेत्याला स्वतःचा विचार नाही, त्याने माझे मुद्दे घेतले असे म्हणणे वेडेपणाचे आहे. आमच्या लेखनांत समान बाबी आढळल्या हा योगायोग असू शकतो किंवा या नेत्याच्या विचारांचे शब्दांकन करुन ज्याने कोणी ती पुस्तिका लिहिली, त्याने अधिक स्पष्टतेसाठी माझ्या लेखातील बाबी त्याने आधी वाचलेल्या असल्याने थोड्या निष्काळजीपणाने जशाच्या तशा घेतल्या असतील.

पण चारचौघात किंवा मनातही हे ताणायचे किती? अजिबात नाही. सोडून द्यायचे. आपण ज्या नदीत उभे आहोत, तिचेच पाणी ओंजळीत घेऊन तिलाच त्याचे अर्ध्य देत आहोत, हे मनात ठसवायला हवे. मानवसमाज ज्ञाननिर्मिती करत आला, त्याचा एक घटक म्हणून आपण त्याच्याकडून काही घेतले, त्यावर काही नवे रचले व पुढच्यांसाठी पुन्हा ते त्याला अर्पण केले.

बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदल्या दिवशी ५ डिसेंबरला रात्री मशाली घेऊन घोषणा देत चैत्यभूमी अथवा स्थानिक ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जाण्याची रीत होती. या घोषणांनी व अशा गटांनी विस्कळीतपणे जाण्यात त्या दिवसाचे गांभीर्य राहत नसे. आम्ही आमच्या विभागात ‘श्रद्धांजली यात्रा’ हा प्रकार सुरु केला. वस्तीतील स्वतंत्रपणे जाणाऱ्या सर्व गटांना एकत्र केले. कोणत्याही एका संघटनेचा बॅनर नाही. दोन-दोनच्या रांगेत हातात मेणबत्ती घेऊन त्रिसरण म्हणत शांतपणे यात्रा निघाली. तिचा प्रभाव एवढा पडला की नंतर आम्हाला ती तशी संघटित करण्याची गरज पडली नाही. लोकांनी तिचा स्वीकार केला. मुंबईत-महाराष्ट्रात तिचे अनुकरण होऊ लागले. पुढे ती वहिवाट झाली.

ती आधी कोणी सुरु केली, आम्ही की आमच्याआधी कोणी, हा प्रश्न खरोखरच महत्वाचा आहे का? ज्याला ऐतिहासिक घटनाक्रम अभ्यासायचा असेल त्याने तो शोधावा. पण आम्ही कार्यकर्त्यांनी या प्रश्नात किती गुंतावे? बुद्ध उत्सव, भीम उत्सव असेच अजूनही महामानवांच्या नावाने होणारे उत्सव पहिले कोणी सुरु केले, या प्रश्नांचा छडा लावण्यात ताकद का आटवायची? याने काहीही साधले जात नाही, याचा नमुना हवा असला तर दलित पॅंथरची स्थापना कोणी केली याबाबतचे लेख, पुस्तिका वाचाव्या. जवळपास प्रत्येक पँथर नेता थेट वा शब्दांचे जाळे गुंफत गुंफत स्वतःपर्यंत पोहोचतो. हा शोध अभ्यासकांनी घ्यावा. पण पँथर कोणी स्थापन केली यापेक्षा तिने काय केले, काय साधले हे जाणणे चळवळीच्या पुढच्या दिशेसाठी अधिक हितावह नाही का?

पँथरचे काही प्रमुख नेते या प्रश्नाचा निर्विवाद निकाल लागण्याआधीच जग सोडून गेले. जे आहेत त्यांची वये पाहता त्यांच्या हयातीत तरी याचा अंतिम निकाल लागेल की नाही याची शंका आहे. शोकांतिका ही की वस्तीतल्या आताच्या पिढीसमोर आम्ही भाषणे करताना यांची नावे घेतली तर त्यातल्या अनेकांच्या डोळ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहते – हे कोण?

माझ्या राजकीय गुरुंनी पहिल्या भेटीत (तेव्हा ते माझे गुरु झालेले नव्हते) मला प्रश्न केला – “तू सामाजिक काम का करतोस?”

मी म्हणालो - “समाजाचे भले व्हावे. लोकांनी आपले नाव काढावे.”

त्यांनी पुढचा प्रश्न केला – “ तू आता जिथे राहतोस, तिथे पन्नास वर्षांपूर्वी कोण राहत होते ते तुला ठाऊक आहे का?”

मी उत्तरलो – “नाही.”

त्यांनी परत प्रश्न केला – “अजून पन्नास-शंभर वर्षांनी तुला ओळखणारे तिथे कोणी असेल का?”

मी दचकलो. मग आणखी त्यांनी पुढे विचारले – “इतिहासाच्या पुस्तकात सम्राट अशोकाला किती जागा आणि गांधीजींना किती जागा?”

मी म्हटले – “गांधीजींना अधिक. सम्राट अशोकाला कमी.” ते म्हणाले – “इतिहासात असेच होते. अजून दोनशे वर्षांनी गांधीजींची माहिती कदाचित एका परिच्छेदापुरतीच राहील. कारण नव्या इतिहासाला अधिक जागा द्यावी लागेल.”

यानंतर पुढच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. त्यात मी राहतो ते चेंबूर कुठे? ..मुंबईत. मुंबई कशात? ..महाराष्ट्रात. महाराष्ट्र कशात?..भारत देशात. भारत कोणत्या खंडात?..आशिया खंडात. असे खंड किती? हे खंड मिळून पृथ्वीवर जमीन किती, पाणी किती? पृथ्वी ज्या सौरमालेत आहे, अशा अगणित सौरमालांची, तारकांची आकाशगंगा, अशा अगणित आकाशगंगांचे हे विश्व.

..असे होत होत शेवटी त्यांनी प्रश्न केला – “या विश्वात तुझे स्थान काय? किती काळ?”

विश्वाची भरारी करणारा मी जमिनीवर आपटला गेलो. आता माझ्यासमोर प्रश्न उभे राहिले ते मूलभूत होते. – विश्वाच्या पसाऱ्यात आपण तसे नगण्य आहोत. कालप्रवाहात एका अत्यंत अल्प अवकाशासाठी इथे आहोत. या काळातले आपले जगणे मौलिक कसे होऊ शकते? जे करायचे त्याचा नक्की हेतू काय?

जे गळून पडले ते प्रश्न होते - जे करु त्याने आपले नाव किती होणार? या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार का?

हे प्रश्न गळून पडले हे पूर्णांशाने खरे नाही. त्यांचे महत्व कमी झाले फार तर. हे प्रश्न नकळत मधून मधून मनात ढुशी देतात. काही काळ रेंगाळतात. पण त्यांच्या अस्तित्वाचे प्रयोजनच मला सापडत नसल्याने ते मलूल पडतात. ढुशी व मलुलता हा क्रम मधून मधून चालतो, हे मात्र मला कबूल करावे लागेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, फेब्रुवारी २०२१)

No comments: