Saturday, March 6, 2021

कार्यकर्त्यांची मुले




बऱ्याच वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ सहकारी कार्यकर्त्यांच्या घरी आम्ही कार्यकर्ते चर्चेला बसलो होतो. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पत्नीने आमचे उत्तम आतिथ्य केले होते. मग त्याही चर्चेला बसल्या. दरम्यान त्यांचा मुलगा बाहेरुन आला. एक नजर टाकून सरळ त्याच्या खोलीत गेला. ना हसला ना बोलला. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही त्याला थांबवून आमची दखल घ्यायला त्याला लावले नाही. आम्हाला ते खटकले. हे आमचे ज्येष्ठ सहकारी व त्यांची पत्नी इतक्या आपुलकीने वागत होते आणि हा मुलगा असा कसा? किमान हायहल्लो करण्याइतके सौजन्य त्याच्याकडे असू नये? ..आणि पुढे आणखी प्रश्न मनात आला – या मुलावर त्याच्या या कार्यकर्त्या आईवडिलांनी काहीच कसे संस्कार केले नाहीत?

...पुढे या मुलाशी वेगळ्या संदर्भात संबंध आला. त्यावेळीही तो मोकळेपणाने बोलला नाही. पण तो निगर्वी, आपल्या विश्वात किंवा क्षेत्रात मनापासून काम करणारा व रमणारा वाटला. त्याच्या संदर्भ चौकटीत आम्ही वा आमचे, म्हणजे त्याच्याही आईवडिलांचे काम नव्हते. त्याबद्दल त्याला अनादर असेल असे वाटले नाही. पण त्याबद्दल उत्सुकताही नव्हती.

कमी अधिक फरकाने आमच्या घरीही असाच प्रसंग घडला. आमचा मुलगाही असाच वागला. त्याच्या आईने, म्हणजे माझ्या पत्नीने त्याला किमान हाय तरी कर, असे दटावण्याचा प्रयत्न केल्यावर तो तिच्या समाधानाकरिता बैठकीस जमलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना हाय करुन थोडं स्मित चेहऱ्यावर आणून आतल्या खोलीत गेला. हाही असाच. ज्या घरात व नातेवाईकांच्या परिसरात तो जन्मला, वाढला ती सारीच लोकं सामाजिक कामाशी संबंधित. घरातल्या चर्चाही प्राधान्याने त्याच बाबींच्या. तरीही तो त्यापासून अलिप्त. गरिबांविषयी कणव, मित्रत्व करताना श्रेणीशी संबंध नाही, सेक्युलर, धार्मिक दृष्टिकोण त्यानेच फेसबुक प्रोफाईलवर टाकल्याप्रमाणे ‘agnostic’ (अज्ञेयवादी), अत्यंत मनस्वी, प्रचलित शिक्षण व करिअरच्या संकेतांना न जुमानता स्वतःला पटलेल्या रस्त्यावर चालणारा.

आमच्याशी संबंधित त्याच्या वयाच्या आसपासचे तरुण कार्यकर्ते हे पाहत असतात. त्यांना काय वाटत असेल, हे आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मुलांविषयी आम्हाला काय वाटले होते हे ठाऊक असल्याने अंदाज असतो. त्यांच्यातला एकजण एकदा बोललाही – ‘तुम्ही सगळे लोक जसे आमच्याशी मोकळेपणाने वागता, तशी तुमची मुले वागत नाहीत.’

आमच्या वयाच्या सहकारी कार्यकर्त्यांची मुले माझ्या मुलासारखी मनस्वी वा हायहल्लो म्हणायला त्रास वाटणारी आहेत असे नाही. पण त्यातली बहुतेक आमच्यासारखी चळवळीत सक्रिय नाहीत. आमच्या तरुण सहकाऱ्यांशी आमच्यासारखे मोकळे संबंध ठेवणारी नाहीत. एकूण आमच्या कामाबद्दल सहानुभूती असणारी, सहाय्य करणारी आहेत. आपले जीवन आपल्या आवडीप्रमाणे व्यतीत करत आहेत. आमची किमान मूल्ये मानणारी आहेत.

यातल्या काहींची लग्ने झाली. ती त्यांनी त्यांच्या पसंतीने केली. या लग्नांत कर्मकांड नाही, पण किमान काही विधी व्हावेत असे त्यांच्यातल्या काहींना वाटले. वास्तविक त्यांच्या आई-बापांची लग्ने साधेपणाने, नोंदणी पद्धतीने व धार्मिक रुढींना पूर्ण फाटा देऊन झाली होती. त्यांच्या वाढीतही कुठे देव-धर्म वा त्याचे संस्कार आले नव्हते. तरीही त्यांना हे माफक प्रमाणात करावेसे वाटले.

हे असे का, याची मला आता काहीएक समज आल्याने काही वाटत नाही. पण सुरुवातीला हा आपला पराभव वाटत होता. यांच्याच वयाची तरुण मंडळी आमच्यासोबत कार्यकर्ती असताना आमची मुले मात्र त्यात नाहीत, याची खंतही वाटे. (आताही तशी थोडी वाटते.)

काही कार्यकर्ते असेही असतात जे स्वतः चळवळीत राहतात. पण आपल्याला जो ताण सहन करावा लागला तो मुलांना लागू नये म्हणून त्यांना स्वतःहून चळवळीपासून दूर ठेवतात. कम्युनिस्ट बापांची पोरं शिवसैनिक झाली, लालबाग भगवी झाली, असे एकेकाळी बोलले गेले. त्यात बापांचे चळवळीत पूर्ण झोकून देण्याने घराची झालेली परवड, त्यांच्या मुलांच्या आकांक्षांच्या पूर्ततेच्या शक्यतांना होणारा अडथळा आणि शिवसेनेने या आकांक्षांसाठी वा मराठी माणसावरील अन्यायपूर्तीसाठी पुरवलेले शॉर्टकट्स ही त्यातील अनेक कारणांपैकी काही कारणे आहेत. आरक्षणाच्या पूर्ण बाजूने ज्यांचे कार्यकर्ते पालक आहेत, अशा कॉलेजला जाणाऱ्या मुलांच्या शिबिरांत आरक्षणाला तीव्र विरोध करणारी मुलेही मला आढळली आहेत. आमच्या परिसरात काही कार्यकर्त्यांची मुले विषम समाजव्यवस्था ही निसर्गदत्त असून, कर्तृत्व, नशीब हे व्यक्तीच्या उन्नतीला कारण ठरतात, अशावेळी आपापल्या कुवतीनुसार माणसांनी जगावे या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली असलेलीही आढळतात. आज कितीतरी तरुण मुले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पर्यावरण यांवर आवाज उठवताना, त्यासाठी सरकारी दमन सहन करताना आढळतात. तथापि, त्यांच्या बाजूने उतरण्याची तडफड या आमच्या मुलांत दिसत नाही. काहीजण जे चालले आहे ते अयोग्य आहे, याबद्दल बोलतात, त्याबद्दलचे लेख वाचतात. चर्चांतही सामील होतात. या सरकारला त्यांचा विरोध असतो. पण मतदानाला उतरत नाहीत.

हे असेच असते असे नाही. कार्यकर्त्यांची मुले कार्यकर्ती होत नाहीत वा कार्यकर्त्याच्या विचारांचा वारसा चालवत नाहीत असे नाही. अगदी त्या कार्यकर्त्यासारखीच किंबहुना अधिक चिवट व झुंजारपणे, त्यागपूर्वक काम करतानाही दिसतात. आपल्या घरच्यांच्या सामाजिक कामाच्या वातावरणाचा त्यांच्या या घडणीला पुरेपूर उपयोग झालेला दिसतो. त्यांनी तो स्वतःत मुरवून त्यापलीकडे स्वतःचा समज व योगदान वाढवलेले दिसते. मला माझा मुलगा माझ्यासारखा पूर्णवेळ कार्यकर्ता व्हावा, असे तो जन्माला आल्यापासूनच वाटू लागले. ते रोमॅंटिक होते. पण तसे घडलेले काही पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या घरात दिसतेसुद्धा. पण मी त्यामुळे खजिल व्हावे का?

वर लिहिल्याप्रमाणे काहीएक समज मला आला तो असा. जीवनाच्या अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्राबाबतही मुलांचे स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तित्व कबूल करायला हवे. आई-वडिलांशी त्यांचे जैविक नाते असते. त्यांच्यापासून त्यांची शारीरिक उत्पत्ती झालेली असते. पण त्यांना घडवणारे अन्य जैविक घटकही असतात. यात आईवडिलांच्या नातेवाईकांपासून आलेली गुणसूत्रेही समाविष्ट असतात. आणि या सगळ्यांमध्ये सामाजिक पर्यावरणातले घटक कळीचे असतात. त्यांचा वेध घेण्याचा वैचारिक दृष्टिकोण महत्वाचा असतो. भोवतालच्या पर्यावरणाला सगळे एकसारखा प्रतिसाद देत नाहीत. त्याला हे वेगवेगळे घटक व त्यांची परस्परांवरील क्रिया-प्रतिक्रिया कारण असते.

माझ्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असतानाही मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. मला माझा भोवतालचा समाज बदलायचा होता. ती माझी गरज होती. रुढ करिअर मला मंजूर नव्हते. माझ्या पत्नीने माझ्याशी आंतरजातीय व आंतरस्तरीय विवाह केला. तिचा आर्थिक स्तर माझ्यापेक्षा वरचा होता. रुढ संकेतांप्रमाणे तिला तिच्या जातीत, स्तरात अधिक भौतिक संपन्नतेचा जोडीदार सहज मिळणार होता. ते नाकारुन ती माझ्यासोबत आली. तिला ते सारे खूप कष्टप्रद होते. पण ती म्हणते त्याप्रमाणे तिला तिच्या जीवनाचे सार्थक उमगले होते. त्यामुळे कष्टाने वा प्रतिकूलतेने तिला खचवले नाही. तिच्या लोकांत सहज मिसळण्याच्या, सदैव मदतीस तत्पर व आनंदी राहण्याच्या वृत्तीने अधिक माणसे, कार्यकर्ती जोडली गेली. माझे माझ्याच लोकांशी अधिक स्नेहपूर्ण नाते तिच्यामुळे तयार झाले.

आमचे हे उदाहरण जसेच्या तसे आमच्यासोबतच्या आमच्या पिढीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांबाबत दिसले नाही. त्या सगळ्यांनाच हे करावेसे वाटले नाही. त्यातल्या काहींनी व्यावहारिक हिशेबही केले. जाणिवांच्या व चळवळीच्या त्याच माहोलात असतानाही हा फरक पडतो. भोवतालचा माहोल, वैचारिक संस्कार आत्मिक ताकद घडवतो. पण या आत्मिक बळाला घडवण्यात काही अन्य घटकही कारण असू शकतात.

आमच्या वाट्याला चळवळीचा माहोल आला होता. चळवळीची आम्हाला प्रत्यक्ष जीवनबदलासाठी वा जाणिवेतून वाटणारी गरज होती. पूर्णवेळ असतानाही जोडीदाराच्या नोकरीमुळे मध्यमवर्गात प्रविष्ट झालेल्या आम्हा मंडळींच्या मुलांची चळवळ ही जीवनाची गरज नाही. जाणिवेतून आली तरच ती असेल. शिवाय आज व्यक्तिवादाने झपाटलेल्या पिढीचे व वर्गाचे ही मुले घटक आहेत.

आपल्या रक्तामांसाची मुले मातीचे गोळे नसतात. त्यामुळे मनचाहा आकार त्यांना देता येत नाही. त्यांनी आकार घेण्यात सहाय्यभूत राहता येते. त्यात आम्ही कमी पडता कामा नये. मात्र त्यांनी घेतलेला आकार अखेर कबूल करावा करायला हवा. शाळेच्या निकालावेळी पालक आपल्या मुलाची तुलना त्याच्या वर्गातल्या अन्य मुलांशी करतात ते जसे योग्य नसते, तसेच इथेही आहे. करिअरचा त्याग करुन चळवळीत पूर्णवेळ पडणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकांचा सर्वसाधारणपणे विरोधच असतो. पाठिंबा देणारे अपवाद असतात. पालक विरोधात व मुले बंडखोर. हे आमच्या वेळी होते. तेच आताही आहे. आमचे निर्णय त्याच्या जबाबदारीसह आम्ही घेतले. तेच आता पूर्णवेळ होणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांनीही करायला हवे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुले चळवळीत आहेत की करिअर करत आहेत, हा संदर्भ आमच्या निर्णयाला नव्हता. त्यांच्याही निर्णयाला असू नये.

त्याही वेळी, म्हणजे मी पूर्णवेळ होण्याच्या वेळी सद्भावनेने, काळजीने सल्ला देणारे मित्र, शिक्षक होते. त्यातल्या काहींचा ‘त्यांनी त्यांच्या मुलांना करिअर करायला लावायचे आणि तुम्हाला भिकेचे कटोरे धरायला लावायचे’ असाही आमच्या ज्येष्ठांबाबतचा राग व्यक्त होई. ‘मी मला वाटते म्हणून चळवळीत पडलो. पूर्णवेळ झालो. त्यांची मुले काय करत आहेत किंवा त्यांच्यासाठी त्यांचे पालक म्हणून आमचे ज्येष्ठ काय करत आहेत, हा माझ्या विचाराचा मुद्दा होऊ शकत नाही.’ असे मी उत्तर या माझ्या हितचिंतकांना देई.

यात अजून एक बाब असे. मी ज्या तळच्या विभागांत होतो, त्यांना चळवळीची खरोखर गरज होती. आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांत मुख्यतः उच्च वर्णीय, उच्च वर्गीय पार्श्वभूमी असलेले लोक होते. त्यांनी त्यांचा वर्ग त्यागलेला होता. पिढीजात संपत्तीचा वारसा काहींनी स्वतःहून सोडला होता. तर काहींनी तो पार्टीला, चळवळीला अर्पण केला होता. त्यांच्या वा त्यांच्या समाजातील, थरातील लोकांचे जीवन बदलण्याची गरज नव्हती. त्यासाठी ते चळवळीत नव्हते. माझ्या सामाजिक व आर्थिक थरातल्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांचा हा त्याग होता. वास्तविक त्याग म्हणण्यापेक्षा त्यात त्यांना जीवनसाफल्य वाटत होते. सगळा समाज सुखी होण्यातच आमचे व आमच्या भावी पिढ्यांचे निकोप सुख आहे, अशी त्यांची धारणा होती.

हे खरे की ज्या वर्ण-वर्ग थरातून ही मंडळी डीक्लास-डीकास्ट होण्याचा प्रयत्न करतात, त्यात यातले कोणीच पूर्ण यशस्वी होऊ शकत नाहीत. ते पूर्णपणे त्यांच्या हातात नसते. ज्याला सोशल कॅपिटल असे आता म्हटले जाते, ते त्यांच्या वर्ण-वर्गाचे पर्यावरण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करत असते. त्यांचे नातेवाईक त्यांना, त्यांच्या मुलांना मदतनीस होत असतात. ती स्थिती तळच्या विभागांतून पूर्णवेळ होणाऱ्या कार्यकर्त्यांची नसते. त्यामुळे कम्युनवर राहणाऱ्या, एकसारखे जीवन जगणाऱ्या कॉम्रेड्सच्या पुढच्या पिढीची उन्नती त्यांच्या या सोशल कॅपिटलमुळे भिन्न राहते. वरच्या वर्ण-वर्ग थरातल्या साधेपणाने, काटकसरीने जगणाऱ्या कार्यकर्त्यांची मुले दलित-बहुजन कार्यकर्त्यांच्या मुलांपेक्षा अधिक संपन्न स्थितीत गेलेली दिसतात. यात अपवाद आहेत. आपण सर्वसाधारण काय असते ते इथे पाहतो आहोत.

आज समाजात विषमता आहे. ती कम्युन केले तरी पूर्णतः नष्ट होत नाही. म्हणजे असे- कम्युनवर उच्च वर्ग-वर्णीय तसेच निम्न वर्ग-वर्णीय कार्यकर्त्यांची मुले एकत्र वाढतात. एकत्र खातात. पण एखाद्याचा मामा त्या मुलाला आजोळी घेऊन जातो तेव्हा तिथले उपभोग किंवा वंचना वर्ग-वर्ण स्तराप्रमाणे बदलतात. उच्च वर्ण-वर्गीय स्तरातील कार्यकर्त्यांची कम्युनवरील मुले आपल्या आजोळी अथवा अन्य नातेवाईकांकडे जातात तेव्हा त्यांना मिळणारे उपभोग त्यांच्या कम्युनमधल्या दलित-बहुजन कार्यकर्त्यांच्या मुलांना मिळत नाहीत. हे होऊ द्यायचे नाही, यासाठी आजोळी जाण्यापासून, नातेवाईकांना भेटण्यापासून मुलांना परावृत्त करणे हा उपाय होऊ शकत नाही. तो अघोरी आहे. आर्थिक, सामाजिक विषमता पूर्णतः नष्ट झाल्यावरच हे भेद जाणार आहेत. केवळ तत्त्वकठोर व्यवहाराने ते साधणार नाही. अशी तत्त्वकठोरता मुलांची कुचंबणा करते, त्यांच्यात विकृती तयार करते.

कार्यकर्त्यांच्या पुढच्या पिढीत आणखी काही कारणांनी विकृती तयार होतात. ही मंडळी वरच्या कार्यकर्त्यांच्या प्रकारात धरायची नाहीत. हे कार्यकर्ते सुटे असतात. त्यांच्या वैयक्तिक पुढाकाराने मोठ्या संस्था उभ्या राहतात. बहुधा त्यांना सहकारी नसतात. असले तरी ते नंतर दूर होतात. केले जातात. त्यांचे अनुयायी असतात. खरे म्हणजे पूर्णवेळ कर्मचारी असतात. या संस्था उभ्या करताना त्यांचा प्रारंभ त्यागातून झालेला असू शकतो. पुढे मात्र या संस्थांची संस्थाने होतात. अशावेळी ही संस्थाने सांभाळायला त्यांची मुले ते पुढे आणतात. या मुलांना हे काम करायचे असतेच असे नाही. त्यांना काही वेगळे करण्यात गती असू शकते. पण साधनसंपन्न संस्थानांचा खानदानी वारसा आपल्याकडेच राहायला पोटची मुलेच असावी लागतात. भौतिक सुबत्तेचे वा तातडीने स्थिरस्थावर होण्याचे आकर्षण या मुलांनाही पडते. काहींना जबाबदारीही वाटते. पण आपल्या पित्याचा वकुब त्यांच्याकडे असतोच असे नाही. यात या मुलांचे व्यक्तित्व दुभंगते. दांभिकतेने ग्रासते. एकीकडे चळवळीची, साध्यसाधन शुचितेची भाषा करायची आणि दुसरीकडे स्वतःचे जगणे त्याच्या उलट जगायचे, यातून नासणेच होते. प्रस्थापित राजकारणात बापाची मुले येतात. पण तिथे ही चळवळीची, साध्यसाधन शुचितेची भाषा नसते. तिथे रुढ सत्ताकारणाचे सरळसोट हिशेब असतात. ते लोकांनाही ठाऊक असतात. तिथे दुहेरी व्यक्तिमत्व सांभाळायचे ओझे नसते.

चळवळीतल्या संस्था त्यांचे प्रमुख मृत अथवा निष्क्रिय झाल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांकडे सोपवल्या जायला हव्यात. घरची मंडळी-पत्नी वा मुले कार्यकर्ते असतील तर इतरांप्रमाणे ते त्यातला घटक असतील. ती घरची माणसे आहेत, म्हणून त्यांच्याकडे त्या संस्थांचे प्रमुखपण जाता कामा नये. ते आलेच तर कुशल कार्यकर्ता म्हणून यायला हवे. त्याला कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही. हेत्वारोप तरीही होतात हा भाग सोडू. कार्यकर्त्याच्या मृत्युनंतर त्याच्या स्मृतीची जपणूक करण्याची जबाबदारी कुटुंबाची असायचे कारण नाही. कुटुंबाने त्यातून मुक्त व्हावे. तीही मालकी सोडून द्यावी. ज्या चळवळीचा तो नेता होता, त्यांनी हवे तर जपावी स्मृती. नसतील जपत तर तो त्यांचा प्रश्न मानून सोडून द्यावे. कुटुंबाने कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देणे, दरवर्षी काही जाहीर कार्यक्रम करणे हे करायचेच असेल तर फारतर पाचेक वर्षे करावे. नंतर जाहीर करुन बंद करावे. नाहीतर उगीच ओढाताण होत राहते. त्यात त्या आपल्या माणसाचीही शान राहत नाही. एखाद्या संस्थेकडे कुटुंबाने एकरकमी ठेव देऊन त्यातून कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या संस्थेने नियमित उपक्रम करणे ही वेगळी गोष्ट. ती जरुर व्हावी. पण स्वतःच हे उपक्रम संघटित करणे काही काळाने थांबवायला हवे.

‘तुम्ही दलित-कष्टकऱ्यांची पोरं आहात. आपण आधी नीट स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. नंतर चळवळीत उतरा.’ हा पोक्त सल्ला निम्नवर्ण-वर्ग स्तरातील हितचिंतक देत असतात. त्यांच्या भावनेचा आदर ठेवू. पण असे होत नसते. स्वावलंबी उत्पन्नाचे मार्ग जरुर शोधावे. पण ती पूर्वअट होऊ शकत नाही. आजवरच्या चळवळीत पडलेल्या व ज्यांनी काही घडवले त्यांत ‘आधी आर्थिक स्थैर्य व मग चळवळ’ हा पॅटर्न दिसत नाही. चळवळीत पडताना आपल्या कुटुंबाची पडझड होऊ नये याचा अधिकाधिक प्रयत्न करायला हवा. पण त्याची गॅरंटी देता येत नाही.

त्याचबरोबर सर्व त्यागूनच चळवळ यशस्वी होऊ शकते, असेही नाही. आधी चळवळीत नसलेले, स्थिरस्थावर जीवन जगणारे लोकही कुठल्या तरी एका टप्प्यावर चळवळीत पडलेले दिसतात. त्यावेळपावेतो त्यांनी कमावलेले असते, त्याचा उपयोग त्यांना जीवनाच्या गरजा नीट भागवण्यासाठी होतो. पण काहींची त्यानंतर परवडही होते. पूर्णवेळ कार्यकर्ताच समाजाला वळण लावू शकतो असे नाही. परीघावर असलेला, अगदी तरुण वा ज्येष्ठ नवागतही जाणिवा वा समजाची प्रगल्भता एखाद्या टप्प्यावर दाखवतो. नेता होतो. स्वयंप्रेरणेने अनेक अंशकालीन वेळ देणारे लोक चळवळीला हवे असतात. मात्र तिच्या समन्वयासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता असणे गरजेचे असतेच.

या कुठल्या तरी टप्प्यावर कार्यकर्त्यांची मुलंही असू शकतात. नसूही शकतात. - मात्र ती कोणाची तरी मुलं नक्की असतात.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मार्च २०२१)

No comments: