कालच विराची तब्येत नाजूक असल्याचे कळले होते. त्यामुळे तो वाचावा अशी खूप इच्छा होती. मात्र त्याचवेळी त्याच्या जाण्याची बातमी ऐकण्यास मन तसे तयारही होते. करोनाने परिचित, स्नेही, सहकारी जाण्याचा तसा आता मनाला सराव झाला आहे. आजही कोणाची बातमी येईल. आपण ऐकायला तयार असावे, अशी स्थिती आहे. पण अजून कोरडेपणा आलेला नाही. विषण्ण व्हायला होते. गेलेल्या माणसाच्या आठवणी दाटून येतात. गलबलायला होते. अंतर्यामी अस्वस्थता बराच काळ राहते.
मी विरा साथीदारला ओळखतो ते विजय वैरागडे म्हणून. ९८ च्या सुमारास रेशनिंग कृती समितीच्या चळवळीत त्याची भेट झाली. तो नागपूर रेशनिंग कृती समितीचे काम पाहायचा. तो त्यावेळी ‘युवा’ संस्थेत काम करत होता. मूळ क्रांतिकारक चळवळीशी संबंधित विजय उपजीविकेच्या काही अडचणींसाठी बहुधा त्यावेळी एनजीओत होता. त्याच्या या क्रांतिकारक वैचारिक बांधिलकीमुळे व वागण्यातील सौजन्यामुळे विजयशी मैत्र अधिक जुळले.
संघटना बांधणी वा कोणता तरी राज्यस्तरीय कार्यक्रम याच्या तयारीला आम्ही काही कार्यकर्ते नागपूरला भेटून विदर्भात हिंडणार होतो. मला ट्रेनचे रिझर्वेशन मिळाले नाही. म्हणजे एसीचे मिळत होते. पण विमान सोडाच, एसीनेही जायचे नाही हा माझा त्यावेळी वयवर्षे बत्तीशीतला ‘क्रांतिकारक बाणा’ होता. एसीने जा, विदर्भातले उन्ह आहे, उष्माघात होईल, असे सहकारी समजावत होते. पण त्यामुळे आपली ‘क्रांतिकारक रया’ नष्ट होईल, अशी धारणा असल्याने ते मी ऐकले नाही. त्यामुळे दादरहून विदर्भात जाणारी बस घेतली. हा काळ मेच्या मध्याचा होता. विदर्भात मी कधीही उन्हाळ्यात नव्हतो गेलो. त्यामुळे होऊन होऊन किती गरम होईल, याचा माझा अंदाज मर्यादित होता. पण सकाळी ८ वाजताच विदर्भातल्या झळांनी हिसका दाखवायला सुरुवात केल्यावर माझे धाबे दणाणले. सारखं पाणी पित, डोक्यावर ओतत ३० तासांनी संध्याकाळी कसाबसा नागपूरला पोहोचलो. उतरलो ते भेलकांडतच. मी कोठूनतरी फोन केल्यावर विजय बहुधा घ्यायला आला होता. मुक्कामाच्या ठिकाणी दत्ताही भेटला. दत्ता म्हणजे दत्ता बाळसराफ. तोही रेशनच्या चळवळीत त्यावेळी पुढाकाराने होता. तो त्याचे इतर काही कार्यक्रम करत तिथे पोहोचला होता. सावजीचे जेवण व रात्री विजयच्या कवितांचे वाचन यांनी प्रवासाचा शीण, डोळ्यांची काहिली कुठच्या कुठे गेली. विजयने त्यावेळी त्याच्या बहिणीच्या कवितांचीही वही आणली होती. हिंदीतल्या या कविता खूप दर्जेदार होत्या. कविता, साहित्य हेही विजयशी अधिक जवळिक वाढण्याचे कारण होते.
मुंबईतील रेशनिंग कृती समितीच्या परिषदा, मोर्चे याला मोठ्या संख्येने विदर्भातून लोक येत. यात ‘युवा’ तसेच अन्य संस्थांचे विदर्भातील संपर्क जाळे आणि त्या जाळ्याचा योग्य वापर करुन घेण्याच्या विजयच्या संघटनकौशल्याचा व कष्टकऱ्यांच्या चळवळीच्या बांधिलकीचा मोठा भाग होता. तो रेशनिंग कृती समितीचा भराचा काळ होता. हजारोंचे मोर्चे त्यावेळी होत. वस्त्यांतले संघटनही चांगले होते. मुंबईच्या गोवंडी येथील लुंबिनी बाग या विभागात अजित बनसोडे व त्याच्या सहकाऱ्यांनी रेशन हक्क परिषदेच्या संयोजनाचा लोकसहभागाने उत्तम नमुना घडवला होता तो याच काळात. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची लुंबिनी बागच्या लोकांनी आपापल्या घरी आंघोळी व नाश्त्याची सोय केली होती. सहा हजार लोक परिषदेस होते. बरेच नामवंत परिषदेस पाहुणे होते. कोठेही मध्यवर्ती जागी न घेता मुंबईच्या उपनगरातील वस्तीतील मैदानात राज्यस्तरीय परिषद घेण्याचा हा आमचा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. विजयचा या परिषदेतला तसेच आमच्या अनेक मोर्च्यांतला, शिबिरांतला, बैठकांतला वावर अजूनही माझ्या डोळ्यासमोर येत असतो.
रेशनची चळवळ चालू होती. पण विजय अचानक या सगळ्यातून अदृश्य झाला. त्याने युवा सोडल्याचे कळले. तो पुन्हा आपल्या क्रांतिकारी कामात गेल्याचे समजले. विजयचा संपर्क तुटला. मी डावा होतो. पण विजयसारख्यांच्या अतिडाव्या विचारांशी काही मतभेद राखून होतो. त्याची विजयला कल्पना होती. त्यामुळेही कदाचित त्याने तसा संपर्क ठेवला नसावा. विजयच्या वैयक्तिक मैत्रीचा मी चाहता होतो. पण त्यावेळी मोबाईल वगैरे प्रकार नव्हते. विजयच्या घरी फोन असणेही शक्य नव्हते. शिवाय विजय घरी असण्याचीही शक्यता नव्हती. नागपूरच्या सहकाऱ्यांकडे विजयची अधूनमधून चौकशी करत असे. पण फारशी काही माहिती मिळत नसे. पुढे ही विचारणा करणेही मी सोडून दिले.
जवळपास १४ वर्षांनी आम्ही पुन्हा संपर्कात आलो ते ‘कोर्ट’ सिनेमामुळे. नायकाचा चेहरा ओळखीचा वाटला. पण अभिनेत्याचे नाव होते विरा साथीदार. बारकाईने पाहिल्यावर माझी खात्री पटली हा विरा साथीदार म्हणजेच विजय वैरागडेच असणार. मग विराचा फोन नंबर मिळवला व फोन केला. “विजय वैरागडे बोलताय ना?” असे फोनवर विचारले. त्याने तुम्ही कोण विचारल्यावर मी माझी ओळख दिली. मग विजयशी बरेच बोलणे झाले. मुंबईला भेटीही झाल्या. पण त्या कार्यक्रमातल्या. खूप सविस्तर नाही. पण विजयला नव्याने भेटल्याचा खूप आनंद झाला. एकूण लोकशाही निवडणुकांविषयीच वेगळी भूमिका असलेल्या विचारप्रवाहातल्या विजयला जातियवादी शक्तींच्या पाडावासाठी आता निवडणुकीतल्या लोकशाही शक्तींच्या जुळणीची गरज वाटत होती. त्यात फाटाफूट होऊन त्याचा फायदा विरोधी शक्तींना होऊ नये, याबद्दल तो खूप दक्ष होता, हे त्याच्या अलीकडच्या मांडणीतून जाणवत होते.
त्याची ही भूमिका, त्याला अभिप्रेत क्रांतीचा आजचा कार्यक्रम आणि मुख्य म्हणजे त्याचा आमच्याशी संपर्क तुटल्यानंतरचा प्रवास, त्याच्या कविता यांविषयी समजून घ्यायचे होते. कधीतरी सवडीने याविषयी त्याच्याशी बोलू. हल्ली तो बराच बिझी दिसतो आहे, असे काहीसे मनात होते. त्यामुळे माझ्याकडून जुन्यासारखे खूप आतून काही त्याच्याशी बोलणे नव्याने संपर्क सुरु झाल्यानंतरही झाले नाही.
...आता तर ते राहूनच गेले. अलविदा विजय!!
- सुरेश सावंत
No comments:
Post a Comment