Sunday, March 14, 2021

उद्देशिका...घटनेचे ‘आयकार्ड’


कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही विषयाच्या शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची उद्देशिका सुरुवातीला छापलेली असते. तिला प्रास्ताविका असेही म्हणतात. अनेक शाळांत प्रार्थनेनंतर तिचे सामुदायिक पठनही केले जाते. पाठ्यपुस्तकात उद्देशिकेच्या वर ‘भारताचे संविधान’ असे लिहिलेले असते. त्यामुळे ही प्रास्ताविका किंवा उद्देशिका म्हणजेच भारताचे संविधान असाही मुलांचा आणि बरेचदा थोरांचाही समज होतो. तो बरोबर नाही. उद्देशिका, जिला इंग्रजीत ‘Preamble’ म्हणतात, ती आपल्या घटनेच्या सुरुवातीला छापलेली आहे. जगातील सर्वाधिक लांबीच्या आपल्या भारतीय संविधानाची ती संक्षिप्त ओळख आहे. ती किती संक्षिप्त आहे? तर फक्त एक वाक्य आहे ते. त्यात ओळी अनेक आहेत. पण सर्व मिळून वाक्य एकच आहे. या एका वाक्यात संविधानाचे सार आहे. संविधानाचे सारतत्त्व, संविधानाचा चबुतरा, संविधानाचे तत्त्वज्ञान अशा अनेक विशेषणांनी तिचा गौरव संविधान सभेतील सदस्यांनी तसेच अनेक कायदेतज्ज्ञांनी केलेला आहे. विख्यात कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी केलेले उद्देशिकेचे वर्णन सुप्रसिद्ध आहे. ते म्हणतात – ‘उद्देशिका हे घटनेचे चैतन्य, हृदय आणि आत्मा आहे...ते घटनेचे ओळखपत्र (I card) आहे.’

या ओळखपत्राचे महत्व काय याची थोडी ओळख इथे करुन घेऊ.
संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होताना तिच्या निर्मितीचे उद्देश स्पष्ट करणारा ठराव १३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी संविधान सभेत मांडला. या उद्दिष्टांच्या ठरावाचा आधार उद्देशिका तयार करताना घेतला गेला. त्यात काही नव्या बाबी घालण्यात आल्या. बंधुता हे त्यातील मूल्य ही संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खास देण. संविधानातील प्रत्येक बाब संविधान सभेत मंजूर व्हावी लागे. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी उद्देशिका मंजुरीसाठी संविधान सभेत ठेवली. जो मसुदा बाबासाहेबांनी मंजुरीसाठी ठेवला तो जसाच्या तसा १७ ऑक्टोबर १९४९ रोजी मंजूर झाला. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यावर काही चर्चा झाली नाही. काही दुरुस्त्या सुचवल्या गेल्या नाहीत. बऱ्याच सूचना आल्या. त्या नामंजूर होऊन शेवटी मसुदा आहे तसा स्वीकारला गेला. यातल्या काही सूचना समजून घेणे खूप उद्बोधक आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या, विविध हितसंबंधांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संविधान सभेतील सदस्यांच्या देशाबाबतच्या सामायिक सहमतीच्या भूमिकेची त्यातून आपल्याला कल्पना येते. ज्याला भारतीयत्वाची संकल्पना (idea of India) म्हटले जाते, ती या चर्चांतूनच साकारली गेली. म्हणून संविधानाबरोबरच संविधान सभेतील चर्चांचा मागोवा घेणे आवश्यक असते.
‘आम्ही भारताचे लोक’ अशी सुरुवात असलेल्या या उद्दिकेच्या प्रारंभी ‘ईश्वराला स्मरुन’ असे शब्द टाकावेत अशी सूचना एच. व्ही. कामत नावाच्या संविधान सभेच्या एका सदस्याने केली. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात देवाला स्मरुन होते, बहुतेक धर्मांत ईश्वर, परमेश्वर, निर्मिक ही कल्पना असल्याने आपणही घटनेचा शुभारंभ अशा स्मरणाने करावा, हा या सूचनेमागचा तर्क. यावर अनेकांनी आक्षेप घेतला. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देवाला या चर्चेत आपण आणू नये, अशी विनंती केली. मंत्री वा सरकारी पद ग्रहण करणाऱ्यांना संविधानाच्या रक्षणाची शपथ घ्यावी लागते. त्यावेळी त्यांना दोन पर्याय घटनेने दिले असल्याची बाब राजेंद्रबाबूंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ‘ईश्वर साक्ष शपथ घेतो की’ किंवा ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की’ असे हे दोन पर्याय आहेत. मात्र कामतांचे समाधान झाले नाही. त्यांनी आपली सूचना मताला टाकण्याचा आग्रह धरला. शेवटी ती मताला टाकली गेली आणि मोठ्या बहुतमताने फेटाळली गेली.
संविधान सभेतील बहुसंख्य लोक काही नास्तिक नव्हते. काही अपवाद वगळले तर बहुतेक सर्व ईश्वराला मानणारे होते. तरीही घटनेतील ईश्वराच्या संबोधनाबाबतची ही सूचना का फेटाळली गेली? याचे कारण आहे. व्यक्तीला धर्म, श्रद्धा मानण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र राज्य म्हणजे शासन हे कोणत्याही धर्म वा श्रद्धेवर आधारलेले असणार नाही, ते इहवादी पद्धतीने कारभार करणार हे खूप आधीपासून स्वातंत्र्य चळवळीत ठरले होते. उदाहरणार्थ, १९२८ साली मोतिलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या भावी घटनेच्या सूत्रांविषयीच्या अहवालात व्यक्तीच्या धर्म स्वातंत्र्याचा मुद्दा होता. जो आपण कलम २५ स्वरुपात पुढे राज्यघटनेत समाविष्ट केला.
दुसरी सूचना होती महात्मा गांधींच्या प्रति या उद्देशिकेत कृतज्ञता अर्पण करण्याबाबत. ही सूचनाही कामतांनीच केली होती. घटनेचे कामकाज चालू असतानाच हिंदू कट्टरपंथी नथुराम गोडसेने महात्मा गाधींचा खून केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्म्यांचे प्रतीक म्हणून गांधीजींचे नाव असावे, हे या सूचनेमागे कारण होते. गांधीजींच्या जवळच्या अनुयायांनीच या सूचनेला विरोध केला. ती काही मताला टाकली गेली नाही. ती तोंडी विरोधानेच अव्हेरली गेली. जवळपास अख्खी संविधान सभा गांधीजींना मानणारी होती. तरीही हे घडले नाही याचे कारण ‘कोणी एक व्यक्ती नव्हे; तर भारताची जनता सर्वश्रेष्ठ होय’ हे तत्त्व आपण प्रधान मानले.
स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळीचा वारसा असलेले लोक संविधान सभेत बहुसंख्य होते. या चळवळींतून साकारलेल्या मूल्यांना घटनेत समाविष्ट करुन देशाच्या तसेच आपल्या सार्वजनिक जीवनाचा त्यांना आधार बनवण्याबाबत ही मंडळी दक्ष होती. अनेक मतभेद असलेले हे लोक पायाभूत मूल्यांबाबत एकमतात होते, हे त्यांचे मोठेपण. त्यामुळेच ही मूल्ये आजही दीपस्तंभासारखी आपल्याला मार्गदर्शन करतात. देश एक ठेवायला मदत करतात.
स्वातंत्र्याबरोबरच फाळणी झाली. जिनांच्या इच्छेप्रमाणे त्यांना पाकिस्तान मिळाला. पाकिस्तानच्या घटनेच्या उद्देशिकेत अल्लाचे स्मरण, जिनांप्रति कृतज्ञता, इस्लामी सामाजिक न्यायावर आधारित लोकशाही हे उल्लेख आहेत. म्हणजे आपण जे नाकारले ते त्यांनी स्वीकारले. परिणाम काय झाला? धर्म एक असतानाही पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. बांगला देश हा दुसरा देश तयार झाला. आजही पाकिस्तानात लोकशाही रुजली नाही. लष्कराचा वरचष्मा आहे. मुस्लिम मूलतत्त्ववादी आपल्याच धर्मातल्या सामान्यांना छळत आहेत. तिथले दहशतवादी भारताला त्रास देत आहेतच. पण स्थानिकांनाही ते सोडत नाहीत. धर्माचे, भाषेचे, संस्कृतींचे वैविध्य असूनही खंडप्राय भारत देश एक राहिला. अजूनही आपण निवडणुकांत भाग घेऊन मतदानाद्वारे सरकार बदलतो. हे सामर्थ्य आपल्या घटनेत आणि त्यामागच्या सर्वसमावेशक, सहिष्णू वैचारिक परंपरेत आहे. ते जपले पाहिजे. तरच देश जपला जाईल.
कधी काही शंका आली तर घटनेचे आयकार्ड पहावे. म्हणजेच उद्देशिका वाचावी. तिचा अर्थ व घडण समजून घ्यावी. आपली उद्देशिका पाकिस्तानसारखी व्हावी हा हेतू असलेल्यांच्या उदंड कारवाया सध्या देशात सुरु आहेत. ते आपला स्मृतिभ्रंश करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यापासून आपल्याला व देशाला वाचवण्यासाठी उद्देशिकेतील मूल्यांचे सतत स्मरण व जतन करणे आवश्यक आहे.
- सुरेश सावंत,sawant.suresh@gmail.com
(पुण्यनगरी, १४ मार्च २०२१)

Saturday, March 6, 2021

कार्यकर्त्यांची मुले




बऱ्याच वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ सहकारी कार्यकर्त्यांच्या घरी आम्ही कार्यकर्ते चर्चेला बसलो होतो. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पत्नीने आमचे उत्तम आतिथ्य केले होते. मग त्याही चर्चेला बसल्या. दरम्यान त्यांचा मुलगा बाहेरुन आला. एक नजर टाकून सरळ त्याच्या खोलीत गेला. ना हसला ना बोलला. या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही त्याला थांबवून आमची दखल घ्यायला त्याला लावले नाही. आम्हाला ते खटकले. हे आमचे ज्येष्ठ सहकारी व त्यांची पत्नी इतक्या आपुलकीने वागत होते आणि हा मुलगा असा कसा? किमान हायहल्लो करण्याइतके सौजन्य त्याच्याकडे असू नये? ..आणि पुढे आणखी प्रश्न मनात आला – या मुलावर त्याच्या या कार्यकर्त्या आईवडिलांनी काहीच कसे संस्कार केले नाहीत?

...पुढे या मुलाशी वेगळ्या संदर्भात संबंध आला. त्यावेळीही तो मोकळेपणाने बोलला नाही. पण तो निगर्वी, आपल्या विश्वात किंवा क्षेत्रात मनापासून काम करणारा व रमणारा वाटला. त्याच्या संदर्भ चौकटीत आम्ही वा आमचे, म्हणजे त्याच्याही आईवडिलांचे काम नव्हते. त्याबद्दल त्याला अनादर असेल असे वाटले नाही. पण त्याबद्दल उत्सुकताही नव्हती.

कमी अधिक फरकाने आमच्या घरीही असाच प्रसंग घडला. आमचा मुलगाही असाच वागला. त्याच्या आईने, म्हणजे माझ्या पत्नीने त्याला किमान हाय तरी कर, असे दटावण्याचा प्रयत्न केल्यावर तो तिच्या समाधानाकरिता बैठकीस जमलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना हाय करुन थोडं स्मित चेहऱ्यावर आणून आतल्या खोलीत गेला. हाही असाच. ज्या घरात व नातेवाईकांच्या परिसरात तो जन्मला, वाढला ती सारीच लोकं सामाजिक कामाशी संबंधित. घरातल्या चर्चाही प्राधान्याने त्याच बाबींच्या. तरीही तो त्यापासून अलिप्त. गरिबांविषयी कणव, मित्रत्व करताना श्रेणीशी संबंध नाही, सेक्युलर, धार्मिक दृष्टिकोण त्यानेच फेसबुक प्रोफाईलवर टाकल्याप्रमाणे ‘agnostic’ (अज्ञेयवादी), अत्यंत मनस्वी, प्रचलित शिक्षण व करिअरच्या संकेतांना न जुमानता स्वतःला पटलेल्या रस्त्यावर चालणारा.

आमच्याशी संबंधित त्याच्या वयाच्या आसपासचे तरुण कार्यकर्ते हे पाहत असतात. त्यांना काय वाटत असेल, हे आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मुलांविषयी आम्हाला काय वाटले होते हे ठाऊक असल्याने अंदाज असतो. त्यांच्यातला एकजण एकदा बोललाही – ‘तुम्ही सगळे लोक जसे आमच्याशी मोकळेपणाने वागता, तशी तुमची मुले वागत नाहीत.’

आमच्या वयाच्या सहकारी कार्यकर्त्यांची मुले माझ्या मुलासारखी मनस्वी वा हायहल्लो म्हणायला त्रास वाटणारी आहेत असे नाही. पण त्यातली बहुतेक आमच्यासारखी चळवळीत सक्रिय नाहीत. आमच्या तरुण सहकाऱ्यांशी आमच्यासारखे मोकळे संबंध ठेवणारी नाहीत. एकूण आमच्या कामाबद्दल सहानुभूती असणारी, सहाय्य करणारी आहेत. आपले जीवन आपल्या आवडीप्रमाणे व्यतीत करत आहेत. आमची किमान मूल्ये मानणारी आहेत.

यातल्या काहींची लग्ने झाली. ती त्यांनी त्यांच्या पसंतीने केली. या लग्नांत कर्मकांड नाही, पण किमान काही विधी व्हावेत असे त्यांच्यातल्या काहींना वाटले. वास्तविक त्यांच्या आई-बापांची लग्ने साधेपणाने, नोंदणी पद्धतीने व धार्मिक रुढींना पूर्ण फाटा देऊन झाली होती. त्यांच्या वाढीतही कुठे देव-धर्म वा त्याचे संस्कार आले नव्हते. तरीही त्यांना हे माफक प्रमाणात करावेसे वाटले.

हे असे का, याची मला आता काहीएक समज आल्याने काही वाटत नाही. पण सुरुवातीला हा आपला पराभव वाटत होता. यांच्याच वयाची तरुण मंडळी आमच्यासोबत कार्यकर्ती असताना आमची मुले मात्र त्यात नाहीत, याची खंतही वाटे. (आताही तशी थोडी वाटते.)

काही कार्यकर्ते असेही असतात जे स्वतः चळवळीत राहतात. पण आपल्याला जो ताण सहन करावा लागला तो मुलांना लागू नये म्हणून त्यांना स्वतःहून चळवळीपासून दूर ठेवतात. कम्युनिस्ट बापांची पोरं शिवसैनिक झाली, लालबाग भगवी झाली, असे एकेकाळी बोलले गेले. त्यात बापांचे चळवळीत पूर्ण झोकून देण्याने घराची झालेली परवड, त्यांच्या मुलांच्या आकांक्षांच्या पूर्ततेच्या शक्यतांना होणारा अडथळा आणि शिवसेनेने या आकांक्षांसाठी वा मराठी माणसावरील अन्यायपूर्तीसाठी पुरवलेले शॉर्टकट्स ही त्यातील अनेक कारणांपैकी काही कारणे आहेत. आरक्षणाच्या पूर्ण बाजूने ज्यांचे कार्यकर्ते पालक आहेत, अशा कॉलेजला जाणाऱ्या मुलांच्या शिबिरांत आरक्षणाला तीव्र विरोध करणारी मुलेही मला आढळली आहेत. आमच्या परिसरात काही कार्यकर्त्यांची मुले विषम समाजव्यवस्था ही निसर्गदत्त असून, कर्तृत्व, नशीब हे व्यक्तीच्या उन्नतीला कारण ठरतात, अशावेळी आपापल्या कुवतीनुसार माणसांनी जगावे या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली असलेलीही आढळतात. आज कितीतरी तरुण मुले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पर्यावरण यांवर आवाज उठवताना, त्यासाठी सरकारी दमन सहन करताना आढळतात. तथापि, त्यांच्या बाजूने उतरण्याची तडफड या आमच्या मुलांत दिसत नाही. काहीजण जे चालले आहे ते अयोग्य आहे, याबद्दल बोलतात, त्याबद्दलचे लेख वाचतात. चर्चांतही सामील होतात. या सरकारला त्यांचा विरोध असतो. पण मतदानाला उतरत नाहीत.

हे असेच असते असे नाही. कार्यकर्त्यांची मुले कार्यकर्ती होत नाहीत वा कार्यकर्त्याच्या विचारांचा वारसा चालवत नाहीत असे नाही. अगदी त्या कार्यकर्त्यासारखीच किंबहुना अधिक चिवट व झुंजारपणे, त्यागपूर्वक काम करतानाही दिसतात. आपल्या घरच्यांच्या सामाजिक कामाच्या वातावरणाचा त्यांच्या या घडणीला पुरेपूर उपयोग झालेला दिसतो. त्यांनी तो स्वतःत मुरवून त्यापलीकडे स्वतःचा समज व योगदान वाढवलेले दिसते. मला माझा मुलगा माझ्यासारखा पूर्णवेळ कार्यकर्ता व्हावा, असे तो जन्माला आल्यापासूनच वाटू लागले. ते रोमॅंटिक होते. पण तसे घडलेले काही पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या घरात दिसतेसुद्धा. पण मी त्यामुळे खजिल व्हावे का?

वर लिहिल्याप्रमाणे काहीएक समज मला आला तो असा. जीवनाच्या अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्राबाबतही मुलांचे स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तित्व कबूल करायला हवे. आई-वडिलांशी त्यांचे जैविक नाते असते. त्यांच्यापासून त्यांची शारीरिक उत्पत्ती झालेली असते. पण त्यांना घडवणारे अन्य जैविक घटकही असतात. यात आईवडिलांच्या नातेवाईकांपासून आलेली गुणसूत्रेही समाविष्ट असतात. आणि या सगळ्यांमध्ये सामाजिक पर्यावरणातले घटक कळीचे असतात. त्यांचा वेध घेण्याचा वैचारिक दृष्टिकोण महत्वाचा असतो. भोवतालच्या पर्यावरणाला सगळे एकसारखा प्रतिसाद देत नाहीत. त्याला हे वेगवेगळे घटक व त्यांची परस्परांवरील क्रिया-प्रतिक्रिया कारण असते.

माझ्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असतानाही मी नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. मला माझा भोवतालचा समाज बदलायचा होता. ती माझी गरज होती. रुढ करिअर मला मंजूर नव्हते. माझ्या पत्नीने माझ्याशी आंतरजातीय व आंतरस्तरीय विवाह केला. तिचा आर्थिक स्तर माझ्यापेक्षा वरचा होता. रुढ संकेतांप्रमाणे तिला तिच्या जातीत, स्तरात अधिक भौतिक संपन्नतेचा जोडीदार सहज मिळणार होता. ते नाकारुन ती माझ्यासोबत आली. तिला ते सारे खूप कष्टप्रद होते. पण ती म्हणते त्याप्रमाणे तिला तिच्या जीवनाचे सार्थक उमगले होते. त्यामुळे कष्टाने वा प्रतिकूलतेने तिला खचवले नाही. तिच्या लोकांत सहज मिसळण्याच्या, सदैव मदतीस तत्पर व आनंदी राहण्याच्या वृत्तीने अधिक माणसे, कार्यकर्ती जोडली गेली. माझे माझ्याच लोकांशी अधिक स्नेहपूर्ण नाते तिच्यामुळे तयार झाले.

आमचे हे उदाहरण जसेच्या तसे आमच्यासोबतच्या आमच्या पिढीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांबाबत दिसले नाही. त्या सगळ्यांनाच हे करावेसे वाटले नाही. त्यातल्या काहींनी व्यावहारिक हिशेबही केले. जाणिवांच्या व चळवळीच्या त्याच माहोलात असतानाही हा फरक पडतो. भोवतालचा माहोल, वैचारिक संस्कार आत्मिक ताकद घडवतो. पण या आत्मिक बळाला घडवण्यात काही अन्य घटकही कारण असू शकतात.

आमच्या वाट्याला चळवळीचा माहोल आला होता. चळवळीची आम्हाला प्रत्यक्ष जीवनबदलासाठी वा जाणिवेतून वाटणारी गरज होती. पूर्णवेळ असतानाही जोडीदाराच्या नोकरीमुळे मध्यमवर्गात प्रविष्ट झालेल्या आम्हा मंडळींच्या मुलांची चळवळ ही जीवनाची गरज नाही. जाणिवेतून आली तरच ती असेल. शिवाय आज व्यक्तिवादाने झपाटलेल्या पिढीचे व वर्गाचे ही मुले घटक आहेत.

आपल्या रक्तामांसाची मुले मातीचे गोळे नसतात. त्यामुळे मनचाहा आकार त्यांना देता येत नाही. त्यांनी आकार घेण्यात सहाय्यभूत राहता येते. त्यात आम्ही कमी पडता कामा नये. मात्र त्यांनी घेतलेला आकार अखेर कबूल करावा करायला हवा. शाळेच्या निकालावेळी पालक आपल्या मुलाची तुलना त्याच्या वर्गातल्या अन्य मुलांशी करतात ते जसे योग्य नसते, तसेच इथेही आहे. करिअरचा त्याग करुन चळवळीत पूर्णवेळ पडणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकांचा सर्वसाधारणपणे विरोधच असतो. पाठिंबा देणारे अपवाद असतात. पालक विरोधात व मुले बंडखोर. हे आमच्या वेळी होते. तेच आताही आहे. आमचे निर्णय त्याच्या जबाबदारीसह आम्ही घेतले. तेच आता पूर्णवेळ होणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांनीही करायला हवे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुले चळवळीत आहेत की करिअर करत आहेत, हा संदर्भ आमच्या निर्णयाला नव्हता. त्यांच्याही निर्णयाला असू नये.

त्याही वेळी, म्हणजे मी पूर्णवेळ होण्याच्या वेळी सद्भावनेने, काळजीने सल्ला देणारे मित्र, शिक्षक होते. त्यातल्या काहींचा ‘त्यांनी त्यांच्या मुलांना करिअर करायला लावायचे आणि तुम्हाला भिकेचे कटोरे धरायला लावायचे’ असाही आमच्या ज्येष्ठांबाबतचा राग व्यक्त होई. ‘मी मला वाटते म्हणून चळवळीत पडलो. पूर्णवेळ झालो. त्यांची मुले काय करत आहेत किंवा त्यांच्यासाठी त्यांचे पालक म्हणून आमचे ज्येष्ठ काय करत आहेत, हा माझ्या विचाराचा मुद्दा होऊ शकत नाही.’ असे मी उत्तर या माझ्या हितचिंतकांना देई.

यात अजून एक बाब असे. मी ज्या तळच्या विभागांत होतो, त्यांना चळवळीची खरोखर गरज होती. आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांत मुख्यतः उच्च वर्णीय, उच्च वर्गीय पार्श्वभूमी असलेले लोक होते. त्यांनी त्यांचा वर्ग त्यागलेला होता. पिढीजात संपत्तीचा वारसा काहींनी स्वतःहून सोडला होता. तर काहींनी तो पार्टीला, चळवळीला अर्पण केला होता. त्यांच्या वा त्यांच्या समाजातील, थरातील लोकांचे जीवन बदलण्याची गरज नव्हती. त्यासाठी ते चळवळीत नव्हते. माझ्या सामाजिक व आर्थिक थरातल्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांचा हा त्याग होता. वास्तविक त्याग म्हणण्यापेक्षा त्यात त्यांना जीवनसाफल्य वाटत होते. सगळा समाज सुखी होण्यातच आमचे व आमच्या भावी पिढ्यांचे निकोप सुख आहे, अशी त्यांची धारणा होती.

हे खरे की ज्या वर्ण-वर्ग थरातून ही मंडळी डीक्लास-डीकास्ट होण्याचा प्रयत्न करतात, त्यात यातले कोणीच पूर्ण यशस्वी होऊ शकत नाहीत. ते पूर्णपणे त्यांच्या हातात नसते. ज्याला सोशल कॅपिटल असे आता म्हटले जाते, ते त्यांच्या वर्ण-वर्गाचे पर्यावरण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करत असते. त्यांचे नातेवाईक त्यांना, त्यांच्या मुलांना मदतनीस होत असतात. ती स्थिती तळच्या विभागांतून पूर्णवेळ होणाऱ्या कार्यकर्त्यांची नसते. त्यामुळे कम्युनवर राहणाऱ्या, एकसारखे जीवन जगणाऱ्या कॉम्रेड्सच्या पुढच्या पिढीची उन्नती त्यांच्या या सोशल कॅपिटलमुळे भिन्न राहते. वरच्या वर्ण-वर्ग थरातल्या साधेपणाने, काटकसरीने जगणाऱ्या कार्यकर्त्यांची मुले दलित-बहुजन कार्यकर्त्यांच्या मुलांपेक्षा अधिक संपन्न स्थितीत गेलेली दिसतात. यात अपवाद आहेत. आपण सर्वसाधारण काय असते ते इथे पाहतो आहोत.

आज समाजात विषमता आहे. ती कम्युन केले तरी पूर्णतः नष्ट होत नाही. म्हणजे असे- कम्युनवर उच्च वर्ग-वर्णीय तसेच निम्न वर्ग-वर्णीय कार्यकर्त्यांची मुले एकत्र वाढतात. एकत्र खातात. पण एखाद्याचा मामा त्या मुलाला आजोळी घेऊन जातो तेव्हा तिथले उपभोग किंवा वंचना वर्ग-वर्ण स्तराप्रमाणे बदलतात. उच्च वर्ण-वर्गीय स्तरातील कार्यकर्त्यांची कम्युनवरील मुले आपल्या आजोळी अथवा अन्य नातेवाईकांकडे जातात तेव्हा त्यांना मिळणारे उपभोग त्यांच्या कम्युनमधल्या दलित-बहुजन कार्यकर्त्यांच्या मुलांना मिळत नाहीत. हे होऊ द्यायचे नाही, यासाठी आजोळी जाण्यापासून, नातेवाईकांना भेटण्यापासून मुलांना परावृत्त करणे हा उपाय होऊ शकत नाही. तो अघोरी आहे. आर्थिक, सामाजिक विषमता पूर्णतः नष्ट झाल्यावरच हे भेद जाणार आहेत. केवळ तत्त्वकठोर व्यवहाराने ते साधणार नाही. अशी तत्त्वकठोरता मुलांची कुचंबणा करते, त्यांच्यात विकृती तयार करते.

कार्यकर्त्यांच्या पुढच्या पिढीत आणखी काही कारणांनी विकृती तयार होतात. ही मंडळी वरच्या कार्यकर्त्यांच्या प्रकारात धरायची नाहीत. हे कार्यकर्ते सुटे असतात. त्यांच्या वैयक्तिक पुढाकाराने मोठ्या संस्था उभ्या राहतात. बहुधा त्यांना सहकारी नसतात. असले तरी ते नंतर दूर होतात. केले जातात. त्यांचे अनुयायी असतात. खरे म्हणजे पूर्णवेळ कर्मचारी असतात. या संस्था उभ्या करताना त्यांचा प्रारंभ त्यागातून झालेला असू शकतो. पुढे मात्र या संस्थांची संस्थाने होतात. अशावेळी ही संस्थाने सांभाळायला त्यांची मुले ते पुढे आणतात. या मुलांना हे काम करायचे असतेच असे नाही. त्यांना काही वेगळे करण्यात गती असू शकते. पण साधनसंपन्न संस्थानांचा खानदानी वारसा आपल्याकडेच राहायला पोटची मुलेच असावी लागतात. भौतिक सुबत्तेचे वा तातडीने स्थिरस्थावर होण्याचे आकर्षण या मुलांनाही पडते. काहींना जबाबदारीही वाटते. पण आपल्या पित्याचा वकुब त्यांच्याकडे असतोच असे नाही. यात या मुलांचे व्यक्तित्व दुभंगते. दांभिकतेने ग्रासते. एकीकडे चळवळीची, साध्यसाधन शुचितेची भाषा करायची आणि दुसरीकडे स्वतःचे जगणे त्याच्या उलट जगायचे, यातून नासणेच होते. प्रस्थापित राजकारणात बापाची मुले येतात. पण तिथे ही चळवळीची, साध्यसाधन शुचितेची भाषा नसते. तिथे रुढ सत्ताकारणाचे सरळसोट हिशेब असतात. ते लोकांनाही ठाऊक असतात. तिथे दुहेरी व्यक्तिमत्व सांभाळायचे ओझे नसते.

चळवळीतल्या संस्था त्यांचे प्रमुख मृत अथवा निष्क्रिय झाल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांकडे सोपवल्या जायला हव्यात. घरची मंडळी-पत्नी वा मुले कार्यकर्ते असतील तर इतरांप्रमाणे ते त्यातला घटक असतील. ती घरची माणसे आहेत, म्हणून त्यांच्याकडे त्या संस्थांचे प्रमुखपण जाता कामा नये. ते आलेच तर कुशल कार्यकर्ता म्हणून यायला हवे. त्याला कोणाचा आक्षेप असायचे कारण नाही. हेत्वारोप तरीही होतात हा भाग सोडू. कार्यकर्त्याच्या मृत्युनंतर त्याच्या स्मृतीची जपणूक करण्याची जबाबदारी कुटुंबाची असायचे कारण नाही. कुटुंबाने त्यातून मुक्त व्हावे. तीही मालकी सोडून द्यावी. ज्या चळवळीचा तो नेता होता, त्यांनी हवे तर जपावी स्मृती. नसतील जपत तर तो त्यांचा प्रश्न मानून सोडून द्यावे. कुटुंबाने कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देणे, दरवर्षी काही जाहीर कार्यक्रम करणे हे करायचेच असेल तर फारतर पाचेक वर्षे करावे. नंतर जाहीर करुन बंद करावे. नाहीतर उगीच ओढाताण होत राहते. त्यात त्या आपल्या माणसाचीही शान राहत नाही. एखाद्या संस्थेकडे कुटुंबाने एकरकमी ठेव देऊन त्यातून कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या संस्थेने नियमित उपक्रम करणे ही वेगळी गोष्ट. ती जरुर व्हावी. पण स्वतःच हे उपक्रम संघटित करणे काही काळाने थांबवायला हवे.

‘तुम्ही दलित-कष्टकऱ्यांची पोरं आहात. आपण आधी नीट स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. नंतर चळवळीत उतरा.’ हा पोक्त सल्ला निम्नवर्ण-वर्ग स्तरातील हितचिंतक देत असतात. त्यांच्या भावनेचा आदर ठेवू. पण असे होत नसते. स्वावलंबी उत्पन्नाचे मार्ग जरुर शोधावे. पण ती पूर्वअट होऊ शकत नाही. आजवरच्या चळवळीत पडलेल्या व ज्यांनी काही घडवले त्यांत ‘आधी आर्थिक स्थैर्य व मग चळवळ’ हा पॅटर्न दिसत नाही. चळवळीत पडताना आपल्या कुटुंबाची पडझड होऊ नये याचा अधिकाधिक प्रयत्न करायला हवा. पण त्याची गॅरंटी देता येत नाही.

त्याचबरोबर सर्व त्यागूनच चळवळ यशस्वी होऊ शकते, असेही नाही. आधी चळवळीत नसलेले, स्थिरस्थावर जीवन जगणारे लोकही कुठल्या तरी एका टप्प्यावर चळवळीत पडलेले दिसतात. त्यावेळपावेतो त्यांनी कमावलेले असते, त्याचा उपयोग त्यांना जीवनाच्या गरजा नीट भागवण्यासाठी होतो. पण काहींची त्यानंतर परवडही होते. पूर्णवेळ कार्यकर्ताच समाजाला वळण लावू शकतो असे नाही. परीघावर असलेला, अगदी तरुण वा ज्येष्ठ नवागतही जाणिवा वा समजाची प्रगल्भता एखाद्या टप्प्यावर दाखवतो. नेता होतो. स्वयंप्रेरणेने अनेक अंशकालीन वेळ देणारे लोक चळवळीला हवे असतात. मात्र तिच्या समन्वयासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता असणे गरजेचे असतेच.

या कुठल्या तरी टप्प्यावर कार्यकर्त्यांची मुलंही असू शकतात. नसूही शकतात. - मात्र ती कोणाची तरी मुलं नक्की असतात.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मार्च २०२१)

Sunday, February 21, 2021

प्यार भरा दिल कभी न तोड़ो

'बेशक मंदिर-मस्जिद तोड़ो, बुल्लेशाह ये कहता, पर प्यार भरा दिल कभी न तोड़ो’ ...ही चंचलच्या आवाजातली १९७३ सालच्या बॉबी सिनेमातली अजरामर कव्वाली. तिची स्मृती जागवण्याचे कारण प्रेमाच्या या भावनेला ग्रहण लावण्याचे जोरदार प्रयत्न समाजात सध्या सुरु आहेत. आणि त्यातही गंभीर बाब म्हणजे ज्यांनी या भावनेच्या रक्षणाला उभे राहायचे अशा सरकारकडूनच या प्रयत्नांचे नेतृत्व होते आहे. ‘लव्ह जिहाद’ ही प्रेमद्रोही संकल्पना जन्माला घालून, प्रचारुन तिच्या विरोधात कायदे केले जात आहेत. ही कव्वाली बुल्लेशाह या १७ व्या शतकातल्या पंजाबातील सूफी संताच्या रचनेवर आधारलेली आहे. तीनशे वर्षांपूर्वी बुल्लेशाह प्रेमाची महती गात होते, त्याच्या आड येणाऱ्या धर्मरुढींविरोधात बंड पुकारत होते. त्या प्रेमाच्या रक्षणाची हमी देणाऱ्या संविधानाचा आज काळ आहे. मात्र संविधानमार्गाने व संविधानाचीच शपथ घेऊन सत्तेवर आलेली सरकारे त्यास न जुमानता संविधानावरच शस्त्र चालवत आहेत. हा प्रेमविरोधी माहोल असतानाही या महिन्यात प्रेमाचा दिवस-व्हॅलेंटाईन डे तरुणाईने जोरात साजरा केलाच. प्रेमाची भावना कितीही शक्तिनिशी दाबण्याचा प्रयत्न केला, तरी ती त्यातूनही उसळी मारुन वर येणारच. समाजात अजूनही पुराणमतवाद असू शकतो. तो जायला अजून अवकाश लागेल, हे कबूल. पण सरकारनेच पुराणमतवादाचा कैवार घ्यावा, हे अत्यंत गंभीर आहे.

उत्तर प्रदेश सरकारने २८ नोव्हेंबर २०२० रोजी ‘बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक आदेश’ या नावाने अध्यादेश काढला. वास्तविक ज्या काळात विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसते व ते चालू होईपर्यंत वाट पाहणे शक्य नसते अशा तातडीच्या गरजेसाठी अध्यादेश काढला जातो. पुढे सहा महिन्यांत त्याला विधिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते. विधिमंडळाच्या अधिवेशनाची वाट न पाहता हा अध्यादेश काढण्याची तातडी काय? मुसलमान तरुण आपला धर्म वाढविण्यासाठी हिंदू मुलींना भुरळ घालून फशी पाडतात, त्यांचे धर्मांतर करुन त्यांच्याशी लग्न करतात. अशा रीतीने हिंदूंची संख्या कमी होऊन मुसलमानांची संख्या वाढवण्याचा हा डाव आहे, हे एकप्रकारे धर्मयुद्ध आहे, जिहाद आहे, तो प्रेमाच्या नावाने केला जातो आहे, म्हणून तो ‘लव्ह जिहाद’ आहे...अशी ही समजूत वा गृहितक आहे. त्यास तातडीने प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आहे, असे तो करणारे राज्यकर्ते प्रचारत असतात. उत्तराखंडनेही असाच कायदा केला आहे.  मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक ही भाजपशासित राज्ये असे कायदे करण्याच्या वाटेवर आहेत.

वरचे हे गृहितक खरे आहे का? संसदेत विरोधकांकडून यावर प्रश्न विचारला गेला. त्याला गृहखात्याकडून उत्तर देण्यात आले – “एकाही केंद्रीय तपास यंत्रणेला लव्ह जिहादची एकही केस मिळालेली नाही.” मग हे अध्यादेश वा कायदे का? ‘सतावणूक करायला’ असेच म्हणावे लागेल. हिंदू कट्टरपंथीयांच्या मुसलमान समाजाविषयीची प्रतिमा मलीन करण्याच्या, त्यांना दुय्यम नागरिक ठरविण्याच्या मोहिमेचा हा भाग आहे.  या कायद्याखाली ज्या पहिल्या तक्रारी करण्यात आल्या, त्यातील एका जोडप्याचा घरच्यांच्या संमतीनेच विवाह ठरला होता. मुस्लिम व हिंदू असे दोन्ही पद्धतींनी ते लग्न होणार होते. आईबापांची, नातेवाईकांची तक्रार नसताना कोणा एका हिंदू युवा वाहिनीने केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी या दोन प्रेमी जीवांना लग्नापासून अडवले व चौकशीच्या नावाखाली त्रास द्यायला सुरु केली. दुसऱ्या एका जोडप्याचे लग्न झाले, कोणा नातेवाईकाची तक्रार नव्हती. तरी त्यांच्याबाबत याच हिंदू युवा वाहिनीद्वारे आलेली तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. पन्नासहून अधिक लोकांवर आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्यात.

संविधान याबाबत काय म्हणते ते पाहू.  घटनेच्या तिसऱ्या भागात असलेल्या मूलभूत अधिकारांच्या कलम १३, २१ व २५ यांचा इथे संबंध येतो. कलम २५ हे धर्मस्वातंत्र्याचे कलम म्हणते- ‘सदसदविवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हकदार आहेत.’ कलम २१ हे जगण्याच्या  अधिकाराचे कलम आहे. त्याने जीविताबरोबरच व्यक्तिगत स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला बहाल केले आहे. कलम १३ (२) नुसार ‘राज्य, या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही.’

भले लग्नासाठी धर्म बदलला असेल, तरी तो एका प्रौढ व्यक्तीने स्वेच्छेने घेतलेला निर्णय असतो. तो त्याचा घटनादत्त अधिकार आहे. तो हिरावून घेणारा हा लव्ह जिहादविरोधी कायदा म्हणूनच घटनाद्रोही आहे. तो सर्वोच्च न्यायालयात टिकणे कठीण आहे. पण तोवर मुसलमानांची सतावणूक करायचे साधन म्हणून तो वापरता येणार आहे.

इथे एक गोष्ट हिंदू स्त्रियांनी खास लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत खरे-खोटे पारखायची अक्कल कमी असते, ती चंचल असते म्हणून तिला स्वातंत्र्य देऊ नये, ही मनुस्मृतीची शिकवण इथे शासन पाळते आहे. कोणावर प्रेम करावे याचा सारासार विचार करण्याची तिची कुवत नसते हे गृहीत धरुन असे कायदे शासन करते आहे. हा स्त्रियांचा घोर अपमान आहे. भले-बुरे कळण्याची क्षमता स्त्री व पुरुष दोघांना तेवढीच असते, हा दर्जा व संधीच्या समानतेचा घोष करणारी घटना आता आहे. मनुस्मृतीचे दहन संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ सालीच केले होते, हे विसरुया नको.

धर्म हा आध्यात्मिक गरजेपुरता राहावा, घटना लागू झाल्यावर त्याने सामाजिक बाबींत खरे म्हणजे लक्ष घालू नये. मात्र अजूनही विवाह, वारसा याबाबत व्यक्तिगत कायदे आहेत. त्यांच्या वाट्याला जायचे नसेल तर ‘विशेष विवाह कायद्या’चा अवलंब करायला हवा. या कायद्याखाली लग्न करताना कोणालाही आपला धर्म बदलण्याची गरज नसते. लव्ह जिहादविरोधी कायदे करणाऱ्यांना धर्म बदलण्याचीच चिंता असेल तर त्यांनी एकप्रकारे समान नागरी कायदा असलेल्या या विशेष विवाह कायद्याचा प्रचार करायला हवा. एक महिन्याची नोटीस हा या कायद्यातील एक अडचणीचा भाग जरुर आहे. घरच्यांचा, समाजाचा विरोध असताना एक महिना थांबणे शक्य नसल्याने धार्मिक पद्धतीचा नाईलाजाने अवलंब आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्यांना करावा लागतो. अलीकडेच अलाहाबाद  उच्च न्यायालयाने नोटीशीचा हा कालावधी गरजेचा नसल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर आता  शिक्कामोर्तब करायला हवे. त्याचबरोबर आता झालेले हे प्रेमद्रोही, घटनाद्रोही कायदेही तातडीने रद्द करावे आणि पुढे असे कायदे करु पाहणाऱ्यांना जोरदार चाप लावावा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुण्यनगरी, २१ फेब्रुवारी २०२१)

Saturday, February 13, 2021

इश्क़ आज़ाद है



युरोपात रोमिओ-ज्युलिएट, मध्यपूर्वेत शिरीन-फरहाद किंवा लैला-मजनू, भारतात हीर-रांझा किंवा सोहनी-मेहवाल या प्रेमाच्या कहाण्या जगप्रसिद्ध आहेत. त्या अजरामर आहेत. जोवर दोन मानवी जीव असे प्रेम करत राहणार आहेत, तोवर या तसेच अशा असंख्य कहाण्या जिवंत राहणार आहेत. त्यांत नव्यांची भर पडत राहील. पण संपणार नाहीत. ज्यांची नावे दिली त्या शोकांतिका आहेत. समाजाची बंधने त्यांना रोखण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न करतात. पण त्यास या जोड्या हार जात नाहीत. मृत्युला कवटाळतात, मात्र एकमेकांपासून विलग होत नाहीत. हे प्रेमिक मरुन जिंकतात. बंधने घालणारी तख्ते हरतात. म्हणूनच या कहाण्यांना (त्या युगुलांचे लग्न होऊन सुखाचा संसार होत नाही या अर्थाने) विफल म्हणण्याची रीत असली, तरी त्या त्या अर्थाने सफल आहेत. या कहाण्या अपवाद नाहीत. आजही त्या जगात, देशात, आपल्या आसपास घडत आहेत. ‘प्यार की आंधी रुक न सकेगी, नफ़रत की दीवारों से’ या दुर्दम्य विश्वासाने, कुस्करुन टाकण्याची कराल ताकद असलेल्या शक्तींना ललकारत ‘ऐ मोहब्बत ज़िंदाबाद’चा नारा देताना त्या दिसतात.

हे खरे की सर्वच प्रेमिक एवढी हिंमत दाखवत नाहीत किंवा अन्य काही अपरिहार्यता असतात. जात, धर्म, आर्थिक स्तर यांच्या खोट्या प्रतिष्ठेपायी या प्रेमिकांना शारीरिकदृष्ट्या विलग केले जाते, काहींचे दुसरीकडे त्यांच्या इच्छेच्या विरोधात लग्न लावले जाते, या दडपणापुढे रुढ अर्थाने हे प्रेमिक मान तुकवतानाही दिसतात. सगळेच काही पळून जात नाहीत वा त्यांचे जीव संपवत नाहीत. पण मनाने या प्रेमिकांना तोडणे शक्य होत नाही. ज्यांचे पसंतीच्या जोडीदाराशी लग्न झालेले नसते, ज्यांचा संसारही नीट चाललेला असतो, नवा जोडीदार जीव लावणारा, जपणारा असतो; अशांच्याही मनाचे काही कोपरे अखेरपर्यंत ‘तो’ किंवा ‘ती’ने व्याप्त राहतात. म्हणून ती आताच्या जोडीदाराशी प्रतारणा वगैरे असत नाही. तसा त्यावर स्वतः किंवा इतरांनी शिक्का मारणे हा केवळ मूर्खपणा असतो. असा भूतकाळाचा हळवा कोपरा जपत वर्तमान नाते आनंदाने जगता येते. या नात्यातील दोन्ही घटकांत त्याबाबतच्या समजाची प्रगल्भता मात्र हवी.

शारीरिक संबंध हा प्रेमाचा एक महत्वाचा भाग असतो. पण तो म्हणजे प्रेम नसते. केवळ शारीरिक गरजेसाठी संबंध ठेवणारे जुन्या काळापासून आहेत. त्यात मनांची गुंतवणूक अजिबात वा फारशी नसते. लैंगिक बाजार अथवा राजांचे जनाने सोडले, तर अशा बिनलग्नाच्या संबंधांना नैतिक मान्यता नसे. अलिकडच्या पिढीत सरसकट नसले तरी केवळ शारीरिक गरजांच्या पूर्ततेसाठी एकत्र येणे हा एक नैतिक-अनैतिकतेला खिजगणतीत न धरणारा प्रवाह जोम धरतो आहे. लग्नाशिवाय ‘लिव्ह इन’ मध्ये राहणे यात धरायचे नाही. लग्न हा समाजासाठीचा वा कायदेशीर बाबींसाठीचा सोपस्कार असतो. तो महत्वाचा असू शकतो. पण ‘लिव्ह इन’ मध्येही परस्परांची मानसिक गुंतवणूक चिवट असलेली दिसते. त्यांनी एकमेकांना वरलेले असते. त्यांच्या नात्यावर समाजाने मोहोर उठवण्याची त्यांना गरज वाटत नाही. किंवा रीतसर लग्नासाठीच्या काही व्यावहारिक अडचणीही त्यांच्या असतात. आजच्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेत लग्नानंतर परस्परांना गृहीत धरण्याची एक स्वाभाविक प्रक्रिया सुरु होते, ती काहींना नको असते. रीतसर संसार सुरु असणाऱ्यांचाही नकळत कुठेतरी कोणावर तरी ‘जीव जडतो.’ विवाहबाह्य संबंधांना लैंगिक स्वैराचार म्हणून मोडीत काढले जाते. मात्र त्यातही, कायदेशीर जोडीदाराकडे व्यक्त करता येत नाही, अशा काही अंतरीच्या गाठी मोकळ्या करण्याचे खूप आत्मीय मैत्र असू शकते. कधी ही मैत्रं एकापेक्षा अधिक असू शकतात. यातून गुंते तयार होतात, हे खरे. पण प्रौढपणे ते सोडवायला हवेत. त्यावर नैतिक-अनैतिकतेचे शिक्के मारण्याने त्यांची सोडवणूक होत नाही. एकमेकांवरचे प्रेम वेगळे आणि शारीरिक संबंध वेगळे असेही नाही. शारीरिक संबंधांना बहार यायला परस्परांवरचे प्रेम आवश्यक असते. समलिंगी संबंधांनाही हे सर्व लागू आहे.

या सर्व गुंत्यात प्रेमाची उत्कटता हा घटक मूलभूत असतो. तो आनुषंगिक नसतो. प्रिय व्यक्तीच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या मनाची अवस्था ‘हकीकत’ सिनेमातील एका गाण्यात कैफी आजमींनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात – ‘ज़रा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं..’ प्रीतीच्या अनुभूतीचे महात्म्य वा किंमत अनंत मरणांशी कवी गोविंदाग्रज तोलतात. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणांचा’ या त्यांच्या ओळी प्रसिद्ध आहेत. याच कवितेत प्रीतीच्या अनुभूतीचे वर्णन करताना ते म्हणतात- ‘तरंगति झणी। गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी’.

प्रीतीच्या या तरंगांचा, नवथर लहरींचा अनुभव ज्यांना येत नाही, त्यांच्याबाबत गालिब म्हणतो ते खरे – ‘..हाय कंबख्त तूने कभी पी ही नहीं.’

सुरुवातीला उल्लेख केलेल्या कहाण्यांतील प्रेमिकांची ही पुरेपूर अनुभूती आहे. म्हणूनच ते परस्परांसाठी प्राणही द्यायला तयार होतात. शमेच्या ओढीने तिच्याकडे झेपावणाऱ्या परवान्याचा मृत्यू अटळ असतो. पण त्यातच त्याचे जीवित साफल्य असते. या कहाण्यांतील प्रेमिकांचा प्रेमोत्सव हा असा काळाच्या दृष्टीने अल्प पण दिव्यानुभूती देणारा असतो. समाजाच्या विरोधापायी आपण एकत्र राहू शकणार नाही, या निर्णयाला आलेली युगुलं आत्महत्या करण्याच्या बातम्या येतात. काहींना पालकच संपवतात. त्यांचे ऑनर किलिंग करतात. खोट्या प्रतिष्ठेपायी खून हा प्रेमाचा ऑनर संपवण्याचा फोल प्रयत्न असतो. त्याने माणसे संपवली जातात. पण प्रेम आबादाच राहते. म्हणजेच या फक्त कहाण्या नाहीत. ते आजचे वास्तव आहे. प्रेमासाठी संपणे वा संपवले जाणे हा मानवी समाजाचा इतिहास आणि वर्तमानही आहे. ज्यांचे खून होतात, ते त्यांच्या हातात नसते. पण आत्महत्या करणे हे समर्थनीय नाही. त्यांनी व्यवस्थेशी झुंजावे हेच आपण म्हणू. इथे मुद्दा इतकाच की उत्कट प्रेम ही कहाणी वा भूतकाळ केवळ नाही, तर तो वर्तमान आहे आणि भविष्यही असणार आहे. मानव असेपर्यंत ते असणार आहे.

अशा या प्रेमाचा उत्सव करण्याऐवजी माणसे त्याला नाना मान्यतांच्या, संकेतांच्या, धर्म नियमांच्या बंधनांत अडकवायचा नाहक प्रयत्न करतात. नाहक यासाठी की आधी म्हटल्याप्रमाणे ही माणसे ‘माणसे’ मारतात. पण प्रेमाचा आदिम प्रवाह रोखू शकत नाहीत. ती प्रेम करणाऱ्यांबरोबरच स्वतःलाही हानी पोहोचवतात. स्वतःची आनंद घेणारी, उन्नत भावनांनी समृद्ध करणारी आपली इंद्रियेच नष्ट करतात.

या प्रेमाच्या विरोधकांनी जात, धर्म, संपत्ती, प्रतिष्ठा यापायी प्रेमाला कैद करण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही ते उसळी घेताना दिसते. जाती-धर्माच्या बाहेर लग्न करणाऱ्यांचे एकूण प्रमाण खूप नाही. पण त्यांची संख्या तीव्र विरोध असतानाही वाढती आहे. ती कमी झालेली नाही. विरोध, मारहाण, मृत्यू ठाऊक असूनही प्रेमी युगुले हे धैर्य करतात, ही एक जैविक प्रेरणा आहे. ती नैसर्गिक आहे. तिला अडवायचे प्रयत्न कृत्रिम आहेत. निसर्ग नियमाच्या विरोधात आहेत. जिथे सरमिसळ आहे, अशी महाविद्यालये, नोकऱ्यांची ठिकाणे, राहत्या वसाहती इथे प्रेमात पडणारी मुले योगायोगाने एका जातीची असू शकतात. ती जात वा धर्म बघून प्रेमात पडत नाहीत. ती त्या माणसाच्या प्रेमात पडतात. हे अगदी नैसर्गिक आहे. जात, धर्म हे संदर्भ लग्नावेळी येतात. ते तेव्हातरी का यावेत? ते अनैसर्गिक आहेत. या प्रेमी युगुलाचे नाते जाहीर करण्यासाठीचा लग्न नावाचा विधी सामाजिक आहे. आजच्यासारखे संविधान नव्हते, त्या वेळी धर्माने आध्यात्मिक गरजेबरोबरच सामाजिक नियमन केले. त्यावेळी लग्न विधीत धर्माचा संबंध समजण्यासारखे होते. हा संबंध अडवण्याच्या पद्धतीने नाही, तर त्या नात्याच्या स्वागतासाठी हवा. त्याही वेळी परस्परांना साक्षी मानून देवाच्या मूर्तीला अभिवादन करुन एकमेकांच्या गळ्यांत हार घालून गांधर्व विवाह केले जात होते. आता संविधानाची कारकीर्द सुरु झाल्यावर धर्माने सामाजिक क्षेत्रातला आपला हस्तक्षेप बंद करुन आत्मिक मुक्तीच्या आपल्या मूळ कामावर लक्ष द्यायला हवे.

अलीकडेच डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी त्यांच्या स्वामी विवेकानंदांवरच्या एका लेखात विवेकानंदांना याची किती ठळक स्पष्टता होती, हे विवेकानंदांची काही अवतरणे देऊन नोंदवले आहे. त्यातील एक अवतरण असे आहे - ‘सामाजिक गोष्टींच्या बाबतीत धर्माने ढवळाढवळ केली, ही धर्माची सर्वात मोठी चूक आहे. सामाजिक नियमांचा कर्ता होण्याचा धर्माला काहीही अधिकार नाही. धर्माचा संबंध केवळ आत्म्याशी आहे, त्याने सामाजिक क्षेत्रात अजिबात ढवळाढवळ करू नये. आत्तापर्यंत जे अनर्थ घडले त्याचे एकमेव कारण- धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ केली, हे आहे.’

लव्ह जिहाद व त्याबाबच्या कायद्याची चर्चा सध्या जोरात आहे. हा कायदा घटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या आणि जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याच्या पूर्ण विरोधात आहे. कायदा, वास्तविक वटहुकूम उत्तर प्रदेश सरकारने काढला आहे. सहा महिन्यांत त्याला विधानसभेत मंजुरी घ्यावी लागेल. मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक ही भाजपशासित राज्येही आपल्या राज्यात असा कायदा करण्याच्या वाटेवर आहेत. ज्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनापर्यंत थांबून चर्चा करुन कायदा करायला फुरसत नाही, अशा तातडीच्या बाबीसाठी वटहुकूम काढला जातो. या प्रकरणात एवढी काय तातडी होती? यामागे जे गृहीतक आहे ते असे - लव्ह जिहाद म्हणजे मुस्लिम तरुण हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फशी पाडून त्यांचे धर्मांतर करुन लग्न करतात. इस्लाम धर्म वाढविण्यासाठीचा हा जिहाद म्हणजे धर्मयुद्ध आहे. याला वस्तुस्थितीचा काय आधार? तर काही नाही. संसदेतच या प्रश्नाला सरकारने लव्ह जिहादचा कोणताही पुरावा नाही असे उत्तर दिलेले आहे. तरी हा कायदा का? तर मुसलमानांना त्रास द्यायला. हिंदूंच्या राज्यात ते दुय्यम नागरिक आहेत, हे स्थापित करण्याच्या रणनीतीचा तो भाग आहे.

हा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. पण कोर्टाचा निकाल येईपर्यंत मुसलमानांना त्रास द्यायची संधी त्यामुळे मिळणार आहे. ती घ्यायला त्यांनी सुरु केले आहे. ज्यांच्याविरोधात पहिल्या तक्रारी करण्यात आल्या, त्यातील एक जोडप्याचा घरच्यांच्या संमतीनेच विवाह ठरला होता. मुस्लिम व हिंदू असे दोन्ही पद्धतींनी ते लग्न होणार होते. आईबापांची, नातेवाईकांची तक्रार नसताना कोणा एका हिंदू युवा वाहिनीने केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी या दोन प्रेमी जीवांना लग्नापासून अडवले व चौकशीच्या नावाखाली त्रास द्यायला सुरु केली. दुसऱ्या एका जोडप्याचे लग्न झाले, कोणा नातेवाईकाची तक्रार नव्हती. तरी त्यांच्याबाबत याच हिंदू युवा वाहिनीद्वारे आलेली तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. सुमारे पन्नासेक लोकांवर आतापर्यंत तक्रारी दाखल झाल्यात. त्यात दोन मुलींनी तक्रार केल्याचेही वृत्तपत्रात आले आहे. त्याचे तपशील अजून समजायचे आहेत.

इथे हिंदू स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची बाब म्हणजे या कायद्यात हिंदू पुरुषांपेक्षा हिंदू स्त्रियांना अक्कल कमी आहे, मुस्लिम पुरुषांवर त्या विचार न करता भाळतात असे गृहीत आहे. मनुस्मृतीने हेच सांगितले होते. लहानपणी बापाने, तरुणपणी नवऱ्याने व म्हातारपणी मुलाने स्त्रीचे रक्षण करावे, तिला स्वातंत्र्य देऊ नये. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिचे दहन केले होते. पुढे याच महामानवाच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारित संविधानाच्या रुपाने नवी स्मृती दिली गेली. या नव्या स्मृतीच्या जागी जुनी मनुस्मृती आणण्याची मनोमन इच्छा असणाऱ्यांनी लव्ह जिहाद कायद्याच्या रुपाने छळवाद मांडला आहे.

घटनेने आवडणारा धर्म स्वीकारण्याचे, धर्मच न मानण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जबरदस्तीने, आमिष दाखवून धर्मांतर करण्याची परवानगी घटना देत नाही. त्यासाठी काही राज्यांनी साठच्या दशकापासूनच कायदे केले आहेत. असे कायदे आपल्या राज्यात करण्याऐवजी वा जिथे ते आहेत तिथे त्याखाली तक्रारी करण्याऐवजी हा नवा कायदा आणण्याची काहीही आवश्यकता नाही.

भाजप समान नागरी कायद्याचा उद्घोष करत असतो. कोणत्याही धर्मातील, जातीतील वयाच्या अटीत बसणाऱ्या स्त्री-पुरुषांना आपले धर्म न बदलता या कायद्याप्रमाणे लग्न करता येते. या कायद्याचा आग्रह व प्रचार भाजप का करत नाही? हिंदू मुलीचा धर्मच बदलण्यावर आक्षेप असेल तर या कायद्याने त्या आक्षेपावर इलाज करता येतो. अन्य धर्मीयाशी लग्न करुनही ती हिंदू राहू शकते. पण या कायद्याच्या मसुद्यात नसलेला मूळ हेतू मुसलमानाशी हिंदू मुलीने लग्न करता कामा नये हा आहे. उद्या दलित जातींतील मुलांशी लग्न न करण्याबद्दलचाही कायदा करायला हे लोक धजावतील. नाहीतरी आता दलित जातीतील मुलगा असेल तर त्याचा एकट्याचा वा त्याच्याबरोबर त्याच्या प्रेमात पडलेल्या सवर्ण मुलीचाही खून करण्याच्या घटना भाजपशी संबंधित मंडळींकडून झालेल्या आहेतच. आधी मुसलमान, नंतर नंबर दलितांचा..!

स्वामी विवेकानंद हल्ली भाजप व संघपरिवाराने आंदण घेतले आहेत. त्याच विवेकानंदांची मूळ शिकवण धर्माचा सामाजिक बाबतीतील हस्तक्षेप संपवण्याची आहे, ती ते का पाळत नाहीत? स्वामी विवेकानंद असेही म्हणतात – ‘इतरांचे नुकसान होत नसेल तर आपण काय खावे, कोणते कपडे घालावेत, कोणाशी विवाह करावा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला हवा.’ या वचनाशी खरोखरच या लोकांची निष्ठा असती तर लव्ह जिहाद कायदा, गोमांस खाल्ल्याच्या, बाळगल्याच्या संशयावरुन दलित-मुस्लिमांना झुंडीने मारुन टाकण्याचे प्रकार घडलेच नसते.

आजच्या तरुणाईने या कारस्थानाच्या विरोधात जाणतेपणाने व खंबीरपणे उभे राहायला हवे. यात कोण कोणता पक्ष मानतो वा त्यास मत देतो हा नाही. तरुणाईच्या प्रेम करण्याच्या मोकळिकीला जेरबंद करणाऱ्या सर्वांच्या विरोधात युद्ध छेडले पाहिजे. ‘लव्ह’ चे रक्षण करण्यासाठी ‘जिहाद’ पुकारला पाहिजे. साहिर लुधियानवी आपल्या एका कव्वालीत म्हणतात – ‘इश्क़ आज़ाद है, हिंदू ना मुसलमान है इश्क़’.

प्रेम करण्याचा आमचा हक्क आहे. ते जबाबदारीने करण्याबद्दल, ते अधिक कसे फुलविता येईल याबद्दल जरुर सल्ले द्या. पण या प्रेमालाच जात-धर्माच्या नावाखाली कैद कराल, तर खबरदार..!

– हा इशारा या व्हॅलेंटाईन डेला जरा सणसणीतपणेच देऊया.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(मिळून साऱ्याजणी, फेब्रुवारी २०२१)

Saturday, February 6, 2021

श्रेय कोणाला?

एम.ए. ला असताना माझे शिक्षक मला म्हणाले, “तू तुझ्या नोट्स इतरांना देऊ नको. थोड्या फरकाने क्रमांक हुकू शकतो.”

मी त्यांना म्हणालो, “सर, माझ्या नोट्स दुसऱ्याला दिल्याने काही माझे ज्ञान कमी होणार नाही. त्यामुळे माझ्या पुढे कोण जाते, त्याचे मला काही वाटत नाही.”

मला सल्ला देणारे सर कोणाही विद्यार्थ्याला नेहमीच स्वतःहून मदत करण्यास तत्पर असत. सगळ्यांशी त्यांची मैत्री असे. त्यांनी कोणाशी आपपरभाव केल्याचे माझ्या पाहण्यात आलेले नव्हते. तथापि, रीतीप्रमाणे पहिले येण्याला त्यांच्याही दृष्टीने एक विशेष महत्व असावे. त्यामुळेच हा सल्ला त्यांनी मला दिला असावा.

मला फर्स्ट क्लास मिळाला. पण नंबर हुकला. पण तो नोट्स ज्यांना दिल्या त्यांच्यामुळे नाही, तर दुसऱ्याच एका जिल्ह्याची मुलगी पहिली आली. तिचा माझा काहीही संबंध नव्हता. परिचय नव्हता. तिचे गुण माझ्यापेक्षा अधिक होते.

एम. ए. ला असणाऱ्या आम्हा नोकरी, कष्ट करुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परस्परांना होणारी मदत केवळ परीक्षा उत्तम जावी एवढ्यापुरती नव्हती, तर ती समान आर्थिक-सामाजिक परिसरातल्या आम्हाला मानसिक उभारी देणारीही होती. एकूणच एकमेकांना अभ्यासात मदत करण्याचा माझा अनुभव लहानपणापासूनच खूप प्रेरक व ताकद देणारा आहे.

घरी अभ्यासाला जागा नाही, लाईट नाही, दारु पिऊन शिव्या-भांडणे सततची. माझ्या घरात तर अभ्यास म्हणजे काय हे न कळणारेच लोक त्यावेळी होते. “तुमची बडबड थांबवा, माझे वाचनात लक्ष लागत नाही,” असे म्हटल्यावर ते म्हणत, “तुला कोण त्रास देतोय. आम्ही आमचे बोलतोय. तू तुझा अभ्यास कर.” ते खरोखरच मला शारीरिक त्रास देत नसत, कोणतेही काम सांगत नसत. जेवणाचे ताट जागेवर मिळायचे. ते मी उचलायचे पण नाही. लागेल तो खर्च कर्ज-ओढाताण करुन करत. मी अभ्यास करुन खूप मोठा व्हावा, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी कितीही कष्ट करायची त्यांची तयारी असे. मी ओरडल्यावर ते गप्प राहत. मग शांतता होई. पण हे त्यांना पटले म्हणून नव्हे, तर मी म्हणतो म्हणून ते करत. माझ्या घरची हो टोकाची स्थिती धरली तरी एकूणात अभ्यास करुन मुले पुढे जायला हवीत, ही इच्छा पालकांची खूप असे. पण ते कसे करायचे याचे उपाय त्यांच्याकडे तसे नव्हते. काहींना कळले तरी करायची क्षमता नव्हती.

आमच्या वस्तीत दहावीला असताना आम्ही एक विद्यार्थ्यांची संघटना केली. ‘अत्त दीप भव’ (स्वयंप्रकाशित व्हा) हा बुद्धाचा संदेश तिचे ब्रीद. ‘स्वतःच दिवा व्हा, अंधार दूर होईल,’ म्हणजेच, स्वतःचा स्वतःच उद्धार करा, दुसरा कोणी तुमचा उद्धार करायला येणार नाही, हा त्याचा अर्थ. हा स्वावलंबनाचा मंत्र आम्हाला दिशा व ताकद देणारा ठरला. विभागातल्या एका मोठ्या बुद्धविहारात त्याच्या व्यवस्थापकांकडे आम्ही अभ्यासाला जागा मागितली. त्यांनी ती दिली. आम्ही दहावीचे विद्यार्थी एकत्र अभ्यास करु लागलो. ज्याचा जो विषय त्यातल्या त्यात चांगला, त्याने इतरांना तो शिकवायचा. त्याचवेळी आमची धाकटी भावंडेही तिथे अभ्यासाला येऊ लागली. आम्ही त्यांचे क्लासच सुरु केले. आमचा दहावीचा अभ्यास करत असतानाच पाचवी ते सातवीचे वर्ग चालविले. इतरही सामाजिक उपक्रम केले. हे सगळे करुन आमचा दहावीचा निकाल उत्तम लागला. दोन जण एकेका विषयात थोड्या गुणांनी गेले. बाकी सर्व उत्तीर्ण. मला तर सत्त्याहत्तर टक्के मिळाले. आमच्या वस्तीत इतके गुण मिळण्याची आणि इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्याची घटना पहिलीच. हे साल १९८१. एकत्र अभ्यास व मोठ्यांनी लहानांना शिकवण्याचा हा परिपाठच पुढे सुरु झाला. याच्याशी संबंधित मुले अभ्यासात पुढे गेलीच, पण चळवळीतही त्यांचा पुढाकार राहिला. आधी शिक्षण, मग सामाजिक काम असे काही आम्ही मानले नाही. दोन्ही एकाचवेळी सुरु होते. परस्परांच्या अनुभवांच्या देवाण-घेवाणीतून आमचे बाह्य जगाचे ज्ञानही वाढले. हा क्रम दोन दशके तरी चालला.

एकमेकांची सुख-दुःखे वाटून घेत चाललेले हे जगणे संपन्न होते. आम्हाला कधीच एकटे वाटले नाही. कोणाच्याही घरचे संकट सगळ्यांचे असे. त्यामुळे त्याने खचून जाणेही होत नसे. एकमेकांची एकमेकांना साथ पक्की होती. माझा अभ्यास मीच करणे, तो पुढे जाईल म्हणून त्याला न सांगणे हे केले असते तर आम्ही कोणीच पुढे गेलो नसतो. अनुभवांची सधनता आणि मनाचे सामर्थ्य व समाधानही मिळाले नसते.

याचे श्रेय कोणाला?

रुढ रीतीने माझे नाव घेतले जाते. पण प्रश्नाची ही चौकटच बरोबर नाही. माझा पुढाकार होता, हे खरे. पण हे करावे असे वाटणारा, संघटना स्थापन करण्याची कल्पना प्रथम मांडणारा मी नव्हतो. तो दुसरा होता. मला त्याचे म्हणणे पटले. मी साथ दिली. इतर समविचारी मित्रांना जमवू लागलो. त्यांच्यातले काही या आमच्या प्रथम कल्पना मांडणाऱ्या मित्राला नको होते. सगळे एकत्र आल्यावर पदाधिकारी निवडताना दुसऱ्यांचीच निवड झाली. त्यामुळे तो नाराज झाला आणि दूर गेला. मी समजावण्याचे, दुरावा सांधण्याचे बरेच प्रयत्न केले. पण जमले नाही. आता त्या प्रथम कल्पना मांडणाऱ्या मित्राचा संदर्भच कोणाला राहिला नाही. अनेक उपक्रमांशी माझे नाव जोडले जाते. त्यातल्या बऱ्याचशा उपक्रमांचा प्रारंभ मी एकट्याने केलेला नाही. अनेकांबरोबर मी एक होतो. काही उपक्रम सुरु करताना मी नव्हतोच. मी नंतर त्यात सहभागी झालो. या उपक्रमांच्या जोपासनेत मी टिकून, तटून राहिलो हे माझे वर्णन योग्य राहील. त्यातही अशा श्रम करणाऱ्यांत मी एकटा नव्हतो. त्यांचे प्रवक्तेपण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, त्यामुळे मी बाहेरच्यांना इतरांपेक्षा अधिक ठाऊक झालो.

अशावेळी श्रेय कोणाला द्यायचे? अशा अधिक ठाऊक असणाऱ्यालाच ते सर्वसाधारणपणे दिले जाते. पुरस्कारही मग बहुधा अशालाच मिळतात. जो उपक्रम केवळ एकट्याने होत नसतो, त्यात भागिदारी करणाऱ्या सर्वांचीच दखल घ्यायला हवी. पण तेही संभवनीय असतेच असे नाही. एकेका टप्प्यावर अनेकांची भागिदारी झालेली असते. अनेक अनामिकही त्यात असतात. अशावेळी त्या संघटनेचीच नोंद घेणे, तिलाच श्रेय वा पुरस्कार मिळणे त्यातल्या त्यात बरोबर ठरते.

पण काही वेळा संघटनांचीही स्पर्धा लागते. अमूक काम किंवा अमूक कल्पना प्रथम कोणत्या संघटनेने पुढे आणली? ..या प्रश्नाने दोन व्यक्ती नाहीत, पण व्यक्तींचे गट परस्परांच्या विरोधात उभे राहतात. एकाच ध्येयाने चळवळ करणाऱ्यांतही हा अंतराय तयार होतो. व्यक्तींवरुन संघटना, संघटनांवरुन संघटनांच्या आघाड्या अशी एकके विस्तारत गेली, तरी ‘प्रथम कोणी’ यावरुन मने फाटण्याचा क्रमही विस्तारत जातो.

हे तेव्हाच थांबेल जेव्हा एक वास्तव आपण मनोमन कबूल करु. ते म्हणजे शून्यातून अचानक काहीही उभे राहत नाही. काहीच नव्हते आणि मी किंवा आमचा गटच त्याचा निर्माता आहे, हे खरे नसते. त्याने किंवा त्यांनी ‘शून्यातून सगळे उभे केले’ ही म्हणण्याची रीत झाली. त्यातून त्यांच्या कष्टाची, नवनिर्मितीची कल्पना येते. पण शून्यातून अंगठी काढणारे जादूगार प्रत्यक्षात कुठेच नसतात. काहीतरी आधी असते. त्याच्याआधारे नवे रचले, बांधले जाते. अनेक वैज्ञानिक शोध हे आधीच्या कुठल्या तरी शोधावर वा कोणीतरी काही प्रयोग केलेल्या सामग्रीच्या सहाय्याने, मार्गदर्शनाने लागत असतात. फसलेले प्रयोगही मदतनीस होतात. त्यात आणखी सुधारणा पुढे कोणीतरी करतो. चाकाचा शोध कोणी लावला? ठाऊक नाही. पण त्याच्या आधारे पुढे बैलगाड्या, रथ, यांत्रिक वाहने आली. आता आणखी थोड्या काळाने बिनचालकाची वाहने येणार आहेत. सामाजिक, वैचारिक क्षेत्रातही तेच असते. बुद्ध जगभर गाजतो. मात्र बुद्धाच्या विचारांची आणि धम्माची पाळेमुळे त्याच्या समकालीन निरीश्वरवादी, अज्ञेयवादी, भौतिकवादी चार्वाक तसेच जैनादी समकालीन प्रवाहांशी जुळलेली आहेत. ब्राम्हणी संस्कृतीच्या विरोधात ही श्रमण संस्कृतीची छावणी होती. बुद्धाने या समकालीन आणि त्याच्या आधीच्या विचारभूमीवर आपले तत्त्वज्ञान बांधले. नवी रचना केली. ही पृष्ठभूमी विसरल्याने हवेतच काही तयार झाले अशा निष्कर्षाला आपण येतो. केवळ समविचारी नव्हे, तर विरोधी विचारांचे अस्तित्वही त्यास सहाय्यभूत ठरते. त्याच्याशी होणाऱ्या विरोध, क्रिया-प्रतिक्रियांनी नव्या विचाराच्या रेषा अधिक सुस्पष्ट होत असतात. हेच पुढे बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही. बुद्धापासूनची प्रगतीशील परंपरा, महात्मा फुल्यांचा विद्रोह, शाहू महाराजांसारख्यांचे सहाय्य, ज्या युरोप-अमेरिकेत बाबासाहेब शिकले, तेथील उदारमतवादी विचारवंतांचा प्रभाव, गांधीजींशी संघर्ष या सगळ्यातून बाबासाहेब घडले. एखादे अचंबित करणारे नाटक पाहताना त्याचे नेपथ्य, स्टेज, दिग्दर्शन, कपडे पट, संगीत हे सगळे त्या मागे असते हे विसरता कामा नये. नाहीतर हाडामासाच्या माणसांना आपण अलौकिक करतो. विभूती करतो. काहीच स्वयंभू नसते. स्वयंभू गणपती, स्वयंभू शिवलिंग ह्या वदंता असतात. त्यांचा कोणीतरी रचयिता असतो. म्हणजे दगडाला किंवा झाडाच्या खोडाला आलेला विशिष्ट देवतेचा, लिंगाचा आकार वारा, पाऊस अथवा वनस्पतीच्या वाढीची अंगभूत गती यांमुळे आलेला असतो.

मी एखादा लेख लिहितो, भाषण करतो म्हणजे त्यातील मुद्दे माझे असतात, याचा अर्थ काय? तर याआधी याच शब्दांत, त्याच वाक्यांतून कोणी ते मांडलेले नसतात. काही प्रमाणात त्याचा नव्या संदर्भातला अर्थ नवा असतो. पण हे मुद्दे किंवा त्याच्या आसपासचे मुद्दे किंवा ते मांडण्यासाठी उद्युक्त करणारे विरोधी मुद्दे वा परिस्थिती आधी अस्तित्वात असते. माझी त्यांच्याशी जी क्रिया-प्रतिक्रिया होते, त्यातून माझी मांडणी आकाराला येते. हे काहीच नसते तर मी काय लिहिले असते? हवेत इमले बनत नाहीत. त्यांना पाया लागतोच. कधी कधी गंमत म्हणा, अडचण म्हणा अशीही होते. एक मुद्दा मी नेहमी ‘मला वाटते’ असे म्हणत मांडत असे. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र मजूर पक्षावेळचे लिखाण वाचनात आले. तर त्यात तो मुद्दा जवळ जवळ तसा होता. आता बाबासाहेबांनी माझा मुद्दा चोरला असे मी म्हणू शकत नाही. कारण तो ऐंशी वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी लिहिला आहे. आणि त्याचा लिखित पुरावा आहे. मी बाबासाहेबांचा मुद्दा चोरला नाही हे लोकांना सांगू शकत नाही, पण मला ठाऊक आहे. कारण मी आधी बाबासाहेबांचे हे लिखाण वाचलेच नव्हते. हे कसे होते? ज्या विचारप्रवाहाशी आपण संबंधित असतो, त्याचे खूप काही वाचत, ऐकत असतो त्यावेळी काहीतरी प्रकारे तो मुद्दा वाहत वाहत आपल्यापर्यंत आलेला असतो. आपण तो अभिव्यक्त करतो. ती अभिव्यक्ती निश्चित आपली असते. पण त्यातील विचारांची दौलत ही पूर्णपणे आपली नसते. एकदा तर माझ्या एका लेखातील काही शब्द, वाक्ये जशीच्या तशी एका मोठ्या नेत्याच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तिकेत मला आढळली. ती आधी माझी होती हा दावा मी करु शकतो. कारण एका वर्तमानपत्रात तो माझा लेख ही पुस्तिका येण्याच्या कितीतरी आधी छापून आला होता. याचा अर्थ त्या नेत्याला स्वतःचा विचार नाही, त्याने माझे मुद्दे घेतले असे म्हणणे वेडेपणाचे आहे. आमच्या लेखनांत समान बाबी आढळल्या हा योगायोग असू शकतो किंवा या नेत्याच्या विचारांचे शब्दांकन करुन ज्याने कोणी ती पुस्तिका लिहिली, त्याने अधिक स्पष्टतेसाठी माझ्या लेखातील बाबी त्याने आधी वाचलेल्या असल्याने थोड्या निष्काळजीपणाने जशाच्या तशा घेतल्या असतील.

पण चारचौघात किंवा मनातही हे ताणायचे किती? अजिबात नाही. सोडून द्यायचे. आपण ज्या नदीत उभे आहोत, तिचेच पाणी ओंजळीत घेऊन तिलाच त्याचे अर्ध्य देत आहोत, हे मनात ठसवायला हवे. मानवसमाज ज्ञाननिर्मिती करत आला, त्याचा एक घटक म्हणून आपण त्याच्याकडून काही घेतले, त्यावर काही नवे रचले व पुढच्यांसाठी पुन्हा ते त्याला अर्पण केले.

बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आदल्या दिवशी ५ डिसेंबरला रात्री मशाली घेऊन घोषणा देत चैत्यभूमी अथवा स्थानिक ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जाण्याची रीत होती. या घोषणांनी व अशा गटांनी विस्कळीतपणे जाण्यात त्या दिवसाचे गांभीर्य राहत नसे. आम्ही आमच्या विभागात ‘श्रद्धांजली यात्रा’ हा प्रकार सुरु केला. वस्तीतील स्वतंत्रपणे जाणाऱ्या सर्व गटांना एकत्र केले. कोणत्याही एका संघटनेचा बॅनर नाही. दोन-दोनच्या रांगेत हातात मेणबत्ती घेऊन त्रिसरण म्हणत शांतपणे यात्रा निघाली. तिचा प्रभाव एवढा पडला की नंतर आम्हाला ती तशी संघटित करण्याची गरज पडली नाही. लोकांनी तिचा स्वीकार केला. मुंबईत-महाराष्ट्रात तिचे अनुकरण होऊ लागले. पुढे ती वहिवाट झाली.

ती आधी कोणी सुरु केली, आम्ही की आमच्याआधी कोणी, हा प्रश्न खरोखरच महत्वाचा आहे का? ज्याला ऐतिहासिक घटनाक्रम अभ्यासायचा असेल त्याने तो शोधावा. पण आम्ही कार्यकर्त्यांनी या प्रश्नात किती गुंतावे? बुद्ध उत्सव, भीम उत्सव असेच अजूनही महामानवांच्या नावाने होणारे उत्सव पहिले कोणी सुरु केले, या प्रश्नांचा छडा लावण्यात ताकद का आटवायची? याने काहीही साधले जात नाही, याचा नमुना हवा असला तर दलित पॅंथरची स्थापना कोणी केली याबाबतचे लेख, पुस्तिका वाचाव्या. जवळपास प्रत्येक पँथर नेता थेट वा शब्दांचे जाळे गुंफत गुंफत स्वतःपर्यंत पोहोचतो. हा शोध अभ्यासकांनी घ्यावा. पण पँथर कोणी स्थापन केली यापेक्षा तिने काय केले, काय साधले हे जाणणे चळवळीच्या पुढच्या दिशेसाठी अधिक हितावह नाही का?

पँथरचे काही प्रमुख नेते या प्रश्नाचा निर्विवाद निकाल लागण्याआधीच जग सोडून गेले. जे आहेत त्यांची वये पाहता त्यांच्या हयातीत तरी याचा अंतिम निकाल लागेल की नाही याची शंका आहे. शोकांतिका ही की वस्तीतल्या आताच्या पिढीसमोर आम्ही भाषणे करताना यांची नावे घेतली तर त्यातल्या अनेकांच्या डोळ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहते – हे कोण?

माझ्या राजकीय गुरुंनी पहिल्या भेटीत (तेव्हा ते माझे गुरु झालेले नव्हते) मला प्रश्न केला – “तू सामाजिक काम का करतोस?”

मी म्हणालो - “समाजाचे भले व्हावे. लोकांनी आपले नाव काढावे.”

त्यांनी पुढचा प्रश्न केला – “ तू आता जिथे राहतोस, तिथे पन्नास वर्षांपूर्वी कोण राहत होते ते तुला ठाऊक आहे का?”

मी उत्तरलो – “नाही.”

त्यांनी परत प्रश्न केला – “अजून पन्नास-शंभर वर्षांनी तुला ओळखणारे तिथे कोणी असेल का?”

मी दचकलो. मग आणखी त्यांनी पुढे विचारले – “इतिहासाच्या पुस्तकात सम्राट अशोकाला किती जागा आणि गांधीजींना किती जागा?”

मी म्हटले – “गांधीजींना अधिक. सम्राट अशोकाला कमी.” ते म्हणाले – “इतिहासात असेच होते. अजून दोनशे वर्षांनी गांधीजींची माहिती कदाचित एका परिच्छेदापुरतीच राहील. कारण नव्या इतिहासाला अधिक जागा द्यावी लागेल.”

यानंतर पुढच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. त्यात मी राहतो ते चेंबूर कुठे? ..मुंबईत. मुंबई कशात? ..महाराष्ट्रात. महाराष्ट्र कशात?..भारत देशात. भारत कोणत्या खंडात?..आशिया खंडात. असे खंड किती? हे खंड मिळून पृथ्वीवर जमीन किती, पाणी किती? पृथ्वी ज्या सौरमालेत आहे, अशा अगणित सौरमालांची, तारकांची आकाशगंगा, अशा अगणित आकाशगंगांचे हे विश्व.

..असे होत होत शेवटी त्यांनी प्रश्न केला – “या विश्वात तुझे स्थान काय? किती काळ?”

विश्वाची भरारी करणारा मी जमिनीवर आपटला गेलो. आता माझ्यासमोर प्रश्न उभे राहिले ते मूलभूत होते. – विश्वाच्या पसाऱ्यात आपण तसे नगण्य आहोत. कालप्रवाहात एका अत्यंत अल्प अवकाशासाठी इथे आहोत. या काळातले आपले जगणे मौलिक कसे होऊ शकते? जे करायचे त्याचा नक्की हेतू काय?

जे गळून पडले ते प्रश्न होते - जे करु त्याने आपले नाव किती होणार? या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार का?

हे प्रश्न गळून पडले हे पूर्णांशाने खरे नाही. त्यांचे महत्व कमी झाले फार तर. हे प्रश्न नकळत मधून मधून मनात ढुशी देतात. काही काळ रेंगाळतात. पण त्यांच्या अस्तित्वाचे प्रयोजनच मला सापडत नसल्याने ते मलूल पडतात. ढुशी व मलुलता हा क्रम मधून मधून चालतो, हे मात्र मला कबूल करावे लागेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, फेब्रुवारी २०२१)

Tuesday, January 26, 2021

संविधानातील दूरदृष्टी...

भारताच्या संविधान सभेतील ३८९ (फाळणीनंतर २९९)  सदस्यांपैकी फक्त १५ महिला होत्या.  टक्केवारीत चार किंवा पाच टक्के. त्यात दलित, मुस्लिम व ख्रिस्ती महिला प्रत्येकी एक. आदिवासी एकही नाही. बाकी उच्चवर्णीय हिंदू. संविधान सभेच्या महत्वाच्या सर्व समित्यांत त्यांना संधी मिळाली असे झाले नाही.  मसुदा समितीत तर एकही स्त्री नव्हती. समाजात निम्म्या असलेल्या महिला देशाच्या भविष्याचा आराखडा निश्चित करण्याच्या या सर्वोच्च प्रक्रियेत अशा अगदी अल्प. त्या अल्प होत्या पण नगण्य नव्हत्या. देशाच्या विविध भागांतून त्या निवडून आल्या होत्या. बहुतेक सुखवस्तू घरातल्या व प्रभावशाली, राजकारणी पुरुषांच्या नातेवाईक होत्या. पण कठपुतळ्या नव्हत्या. त्या स्वयंप्रज्ञ होत्या. उच्चशिक्षित होत्या. पारंपरिक बंधनांना किंवा वहिवाटीला तसेच स्वतःच्या जात-धर्म-वर्गथरातील संकेतांना ठोकरण्याची त्यांच्यात जिद्द होती. त्यांची स्वतःची अशी देशाच्या भवितव्याविषयी मते होती. समाजात नेत्या म्हणून त्यांना मान्यता होती. पारतंत्र्याविरोधात लढताना त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता. संविधान सभेत येण्यापूर्वी, संविधान सभेत असताना व त्यानंतरही त्यांनी कर्तृत्व गाजवलेले आहे. कोणी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीही झालेल्या आहेत. त्या सगळ्यांचा तसेच त्यांच्या संपूर्ण कामगिरीचा तपशील नोंदवणे इथे शक्य नाही. त्यांच्या विस्मृतीत जाणाऱ्या ओळखीवरची थोडी राख झटकली जावी या दृष्टीने त्यांच्या योगदानाची, भूमिकांची काही वैशिष्ट्ये, सूत्रे खाली नोंदवत आहे. त्या प्रकाशात आजच्या स्थितीवर जाता जाता थोडी टिप्पणीही करु.

केरळच्या पालघाट जिल्ह्यातील अम्मू स्वामिनाथन, कोचिनच्या दाक्षायणी वेलायुधन, पंजाबच्या मलेरकोटला येथील बेगम ऐजाज रसूल, आंध्रच्या दुर्गाबाई देशमुख, बडोद्याच्या हंसा जीवराज मेहता, लखनौच्या कमला चौधरी व राजकुमारी अमृत कौर, गोलपाडा- आसामच्या लीला रॉय, पूर्व बंगालातील (आजचा बांगला देश) मालती चौधरी, अलाहाबादच्या पूर्णिमा बॅनर्जी व विजयालक्ष्मी पंडित, मालदा-प. बंगालच्या रेणुका रे, हैदराबादच्या सरोजिनी नायडू, अंबाला-हरयाणाच्या सुचेता कृपलानी, थिरुवनंथपुरम-केरळच्या अॅनी मस्कारेन अशा या पंधरा जणी. संविधान सभेतल्या महिला सदस्य.

दाक्षायणी वेलायुधन या संविधान सभेतल्या एकमेव दलित महिला सदस्य. केरळातील पुलाया या अस्पृश्य जातीत जन्मलेल्या. त्या काळात या भागातील अस्पृश्य जातीतील स्त्रियांना चोळी घालायला मनाई होती. तो दंडनीय अपराध होता. ही मनाई ठोकरुन ब्लाऊज घालणाऱ्या त्या पहिल्या पुलाया महिला. दलितपणाचे भोग भोगलेल्या दाक्षायणी वेलायुधन दलितांच्या नेत्या होत्या. तथापि, दलितांच्या विकासासाठी स्वतंत्र मतदारसंघ, संयुक्त मतदारसंघ वा विशिष्ट टक्के राखीव जागा हा मार्ग  त्यांना मंजूर नव्हता. त्यांच्या मते जोवर दलित आर्थिकदृष्ट्या गुलाम आहेत तोवर या तऱ्हेच्या मार्गांचा काहीही उपयोग होणार नाही. सामाजिक दुर्बलता घालविणारे तसेच नैतिक संरक्षण कवच देणारे संरचनात्मक बदल त्यासाठी त्यांना गरजेचे वाटत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी या दोहोंच्या समर्थक असलेल्या दाक्षायणींचा बाबासाहेबांशी इथे मतभेद होता. अन्य बाबतीत त्या बाबासाहेबांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या दिसतात.

बेगम ऐजाज रसूलही स्वतः मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी असतानाही अल्पसंख्यांकांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात होत्या. त्यांच्या मते हे आत्मघातकी पाऊल आहे. त्यामुळे अल्पसंख्याक बहुसंख्याकांपासून कायमस्वरुपी अलग पडतील. जिनांच्या पाकिस्तानच्या कल्पनेशी त्या सहमत नव्हत्या. राज्यघटनेत ‘गाव की व्यक्ती’ एकक मानायचे, यावरुन घमासान चर्चा झाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘खेडे म्हणजे स्थानिकतावाद, अज्ञान, संकुचितता आणि जातीय, धार्मिक असहिष्णुतेचे डबके’ या विधानावरुन वातावरण तापले. त्यावेळी बाबासाहेबांशी बेगम रसूल यांनी संपूर्ण सहमती दाखवली. ‘आधुनिक कल समूहसंघटनेच्या तुलनेत व्यक्तीच्या हक्कसंरक्षणाकडे असून ग्रामपंचायत एकाधिकारशाही गाजवू शकते’ अशी त्यांची भूमिका होती. वैयक्तिक पातळीवर त्या जमीनदार कुटुंबातल्या असतानाही जमीनदारी निर्मूलनाच्या बाजूने त्या लढल्या.

स्वतंत्र बाण्याच्या या महिला सदस्य स्त्रियांच्या राजकीय आरक्षणालाही विरोध करतात. हंसा मेहता संविधान सभेत म्हणतात, “आम्ही कधीच कोणत्या अग्रहक्कांची मागणी केलेली नाही. आम्हाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय हवा आहे. आम्हाला अशी समानता अभिप्रेत आहे ज्याचा परस्पर आदर, सामंजस्य हा पाया असेल.” रेणुका रे यांनी या म्हणण्याला पाठिंबा दिला. हिंदू कोड बिलाच्या चर्चेवेळी दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि राजकुमारी अमृत कौर यांनी समान नागरी कायद्याची बाजू लावून धरली. या कायद्याने सर्व क्षेत्रात स्त्रियांना समानता यायला मदत होईल, असा त्यांचा दावा होता. हंसा मेहता युनोच्या मानवी अधिकारांच्या सार्वत्रिक घोषणापत्र समितीच्या सहअध्यक्ष असताना घोषणापत्रात ‘all men’ ऐवजी ‘all human beings’ या दुरुस्तीत त्यांचे मोठे योगदान झाले.


मूलभूत अधिकारांच्या उपसमितीतील चर्चेत मिनू मसानी यांनी ‘केवळ धर्म वेगळे ही बाब नागरिकांसाठी लग्नात अडथळा होता कामा नये’ हा मुद्दा स्विस घटनेतील कलमाचा आधार देऊन मांडला. यावर मतदान झाले. डॉ. आंबेडकर, हंसा मेहता, राजकुमारी कौर यांनी पाठिंबा दिला. मात्र ५:४ मतांनी या सूचनेचा पराभव झाला. आपल्या समितीच्या कक्षेबाहेरचा हा मुद्दा आहे, हे विरोधकांनी दिलेले कारण होते. पुढे १९५४ साली विशेष विवाह कायदा आल्यावर या उणीवेची बरीचशी भरपाई झाली. धर्म न बदलता लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला.

ज्यांच्या कामाची दखल घेणे या लेखात शक्य झाले नाही, त्या प्रत्येक महिला सदस्याचे काही ना काही खास वैशिष्ट्य व योगदान आहे. या सर्वांनी त्यांच्या काळात जे म्हटले वा केले त्यातला हेतू आज गैरलागू झालेला नाही. तथापि, त्यांचे बदलाच्या गतीचे जे होरे होते, ते सगळेच प्रत्यक्षात आले नाहीत. उदा. महिलांना राजकीय आरक्षणाची गरज तेव्हा त्यांना वाटली नाही. स्वबळावर तसेच सहकारी पुरुषांच्या विवेकबुद्धीने महिलांचे न्याय्य राजकीय प्रतिनिधीत्व साकारेल असे त्यांना वाटले.  या गणतंत्र दिनी संविधान लागू होऊन एकाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही महिलांच्या राज्य किंवा केंद्राच्या कायदेमंडळात महिलांची संख्या निम्मी सोडा, पावही झालेली नाही. १९५१ सालच्या पहिल्या लोकसभेत ५ टक्के महिला होत्या.  सोळाव्या लोकसभेपर्यंत त्या १४ टक्क्यांवर गेल्या आहेत. राज्यांच्या विधानसभेत आज महिलांची सरासरी संख्या आहे ९ टक्के. विवेकबुद्धीवर सोडून भागत नाही, हे कळल्याने १९९६ साली लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक आणले गेले. नगण्य अपवाद वगळता सर्व पक्षीय व जातीय पुरुषांच्या विरोधाने ते गेली २४ वर्षे बाजूला पडले आहे. याबाबत केवळ विषाद वाटून चालणार नाही. संविधाननिर्मितीतील या भागिदार महिलांनी जो कणखर बाणा दाखवला, त्या बाण्याने समानतेच्या खऱ्याखुऱ्या पक्षपात्यांनी या तसेच यासारख्या देशाची पुढे जाण्याची गती कुंठित करणाऱ्या सर्वच हितसंबंधीयांच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. गणतंत्र दिवस हा केवळ उत्सवाचा नाही, तर तो संविधानातल्या मूल्यांच्या पूर्ततेचा आढावा व नव्या संकल्पाचाही दिवस आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(दिव्य मराठी, २६ जानेवारी २०२१)

Sunday, January 24, 2021

जागर संविधानाचा, यात्रा विचारांची...


संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराचे काम आम्ही नुकतेच सुरु केले होते. त्यावेळचा प्रसंग. एका अगदी गरीब वस्तीत तिथल्या एका कार्यकर्तीने मोठ्या उत्साहात मला संविधानावर बोलायला बोलाविले. मोलमजुरी करणाऱ्या बाया कामावरुन दुपारी आलेल्या. त्यांच्यासमोर मला बोलायचे होते. अशा गटासमोर बोलताना समोरच्यांना काय ठाऊक आहे त्याचा अंदाज घेत, गप्पा-चर्चा करत पुढे सरकायचे असते. त्यांच्या कामाची वास्तपुस्त झाल्यावर मी प्रश्न विचारला- “संविधान म्हणजे काय?” त्या नुसत्याच बघत राहिल्या. मग मी “घटना म्हणजे काय?” असे विचारले. तेही त्यांना कळेना. काहीतरी घटना म्हणजे प्रसंग घडतो इतका अर्थ त्यांना समजत होता. मी इकडून तिकडून खूप वेगवेगळ्या पद्धतींनी विचारत होतो, समजावत होतो. पण त्यांना काहीही उमगत नव्हते. डीएड-बीएडच्या प्रशिक्षणार्थी शिक्षकाची उत्तम पूर्वतयारी असतानाही पाठ घेताना सुरुवातीच्याच प्रश्नांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित उत्तर न आल्याने जशी भंबेरी उडते तसे माझे झाले होते. शेवटी या बायांतल्या एकीच्या मुलीने मला वाचवले. ती तिथे होती. तिच्या शाळेच्या पुस्तकात संविधानाची उद्देशिका होती. त्यांच्या शाळेत प्रार्थनेनंतर ती म्हणून घेतली जात असे. या उद्देशिकेच्या वर ‘भारताचे संविधान’ असे लिहिलेले असते. तिने ही उद्देशिका म्हणजे संविधान असे सांगितले आणि माझे रुतलेले चाक बाहेर आले. तिचे उत्तर त्या अर्थाने बरोबर नव्हते. उद्देशिका म्हणजे संविधान नव्हे. संविधानाची ती प्रास्ताविका. पण बुडत्याला काडीपेक्षा मोठा आधार मिळाला आणि मला चर्चा पुढे नेता आली. 

या वडार बाया होत्या. त्याआधी आम्ही गरीब वस्त्यांत महिलांशी बोललो होतो ते मुख्यतः बौद्ध महिलांशी. तिथे हा प्रश्न नव्हता. या बाया कचरा वेचक म्हणजे अगदी तळच्या आर्थिक स्तरातल्या असल्या, ठार निरक्षर असल्या तरी त्यांना देशाचे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे हे ठाऊक असते. संविधानात काय असते वगैरे तपशील माहीत नसतो. पण आपल्या जीवनाचे भले करणारे, आपल्याला माणूसपण देणारे असे काहीतरी त्यात लिहिलेले आहे हा त्यांचा समज नक्की असतो. संविधान बदलणे म्हणजे आपल्या माणूसपणाचे अधिकार हिरावून घेणे, हेही त्यांना कळते. त्यामुळे या बौद्ध समूहात संविधानाचा प्रचार-प्रसार ही तुलनेने सोपी गोष्ट असते. याच आर्थिक व निरक्षर थरातल्या अन्य मागास जातिसमूहांतील बायांत हे कठीण होते. त्यांच्यातल्या पुरुषांशी बोलताना तेवढी अडचण येत नाही. त्यांना आंबेडकर हा संदर्भ बहुतकरुन ठाऊक असतो. संविधान व त्या अनुषंगाने चाललेल्या राजकारकारणाबाबत अतिगरीब बौद्ध पुरुष हे या बौद्धेतर पुरुषांहून अधिक जाणते असतात. 

खरं तर संविधानाबाबतच्या विविध आर्थिक व शैक्षणिक थरातल्या जाणतेपणाला खूप खूप मर्यादा आहेत, हे पुढे कळत गेले. सुरुवातीला ज्या मुलीने प्रास्ताविका हेच संविधान म्हणून सांगितले यात तिचा बहुधा दोष नसावा. कारण मुलांपुढे संविधानाचे सत्र घेताना मला काही ठिकाणी शिक्षकच आमच्या मुलांना संविधान पाठ असल्याचे अभिमानाने सांगतात. पहिल्या वेळी मला आश्चर्य वाटले. पण मुलांनी उद्देशिका म्हणायला सुरुवात केल्यावर कळले की सरांना उद्देशिका म्हणजेच संविधान म्हणायचे आहे. तेव्हा आता आश्चर्य वाटत नाही. ते खजिल होणार नाहीत, अशा बेताने उद्देशिका व संविधान हा फरक मी लक्षात आणून देतो. पुढे आम्ही प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी सत्रे घेऊ लागलो. कार्यकर्त्यांची शिबिरे आयोजित करु लागलो. 

शिबिरांत घटनेशी संबंधित विविध विषय घेतो. पण एकच सत्र घ्यायचे असले तर ‘उद्देशिकेतील मूल्यांचा परिचय’ यावर भर देतो. उद्देशिकेत घटनेचे सार आहे. ती एकाच वाक्याची आहे. ती विद्यार्थ्यांना बहुधा पाठ असते. इतर शिक्षित विभागाला तिची माहिती असते. काहींच्या घरात, कार्यालयात ती फ्रेम करुन लावलेली असते. त्यामुळे घटना समजून घ्यायची म्हणजे काहीतरी अपरिचित, गहन ऐकायचे आहे, या दडपणातून लोक बाहेर निघतात. त्यातील मूल्ये, संकल्पना यांच्या चर्चा वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे व समोरच्यांच्या समजाप्रमाणे घडवता येतात. त्यातून आताच्या प्रश्नांवर भाष्य करता येते. इतिहास, संस्कृती सांगता येते. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखालील लोकांतही जाता येते. त्यांच्या शाळा-कॉलेजांतही बोलता येते. कारण प्रत्येक पाठ्यपुस्तकात उद्देशिका छापलेली असते. ती समजून सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत, म्हटल्यावर फारसा प्रश्न येत नाही. अशा ठिकाणी थेट काही नावे किंवा उदाहरणे टाळण्याची दक्षता घेतली की पुरे होते. 

फार कमी ठिकाणी सार्वभौमत्व, समाजवाद व गणराज्य या शब्दांचे व्यवस्थित अर्थ अगदी शिकलेल्या मंडळींकडून, अनुभवी कार्यकर्त्यांकडून सांगितले गेले. धर्मनिरपेक्षता संकल्पनेचा गोंधळ असतोच. अलिकडे तो अधिकच आहे. सार्वभौम म्हणजे सगळे मिळून, समाजवाद म्हणजे समाजात वाद नको असे काहीही सांगितले जाते. समाजात वाद नको म्हणजे समाजवाद हा अर्थ तर मला एका डाव्या पक्षाच्या ट्रेड युनियन कार्यकर्त्यांनी सांगितला. नव्या पिढीला समाजवाद ही संकल्पनाच अनोखी वाटते. घटना बाबासाहेबांनी घरी किंवा कार्यालयात बसून लिहिली व राजेंद्र प्रसादांच्या हाती सोपवली हा समज आंबेडकरी तसेच बिगर आंबेडकरी अशा सर्व समूहांत मला आढळला. संविधान सभेची निर्मिती, त्यातील चर्चा, आजच्या लोकसभा किंवा राज्यसभेत चालते तशी ही चर्चा असे, बाबासाहेब आंबेडकरांचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणजे नेमके काय हे मग संगतवार समजवावे लागते. बिगर आंबेडकरी वा पुरोगामी वर्तुळाच्या बाहेरील लोकांत आंबेडकरांनी संविधान लिहिल्याने हे आरक्षण आले, त्यामुळे दलितांचे लाड चाललेत असा समज असतो. आंबेडकरांची ही घटना आपल्यावर लादली गेली असेही काहींना वाटते. घटना हा सर्व भारतीयांच्या प्रतिनिधींनी चर्चा करुन तयार केलेला सहमतीचा सामायिक दस्तावेज आहे, हे त्यांना नवीन असते. 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी काही सत्रांत भेटतात. त्यातील आंबेडकरी समूहातील विद्यार्थ्यांचे नेहमीचे एकदोन प्रश्न असतात. त्यांचे सवर्ण मित्र म्हणतात, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर नाहीतच. सर बेनेगल नरसिंग राव यांनी ती लिहिली. दुसरे काही म्हणतात, नेहरुंचा त्यात खूप मोठा वाटा आहे. बाबासाहेबांना एकट्याला श्रेय दिले जाते हे बरोबर नाही. हेच प्रश्न सवर्ण विद्यार्थ्यांकडूनही मला येतात. यातील आंबेडकरी समूहातील विद्यार्थ्यांना घटनेचे श्रेय बाबासाहेबांनाच हवे, त्यात कोणी वाटेकरी नको असे वाटत असते. तर सवर्ण विद्यार्थ्यांना संविधानाचे शिल्पकार ही बाबासाहेबांची उपाधी नको असते. त्यासाठी त्यांची कामगिरी ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. यातून या दोन विभागांतील जातीय ताण काय प्रकारचा आहे, हेही कळते. यावेळी मग कोणताही निष्कर्ष आधी मांडण्याऐवजी मी घटना निर्मितीची प्रक्रिया क्रमवार सांगतो. त्यात बी. एन. राव यांनी घटनेचा पहिला मसुदा केला. मात्र प्रशासकीय वा तज्ज्ञ अधिकारी घटना करणार नाही, घटना करणारे लोकांचे राजकीय प्रतिनिधी असतील हे ठरवले गेल्याने त्यांच्या मसुद्याची चिकित्सा करुन त्याची नवी रचना बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केली गेली. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या. त्यांच्या शिफारशींवर चर्चा झाल्या. काही स्वीकारल्या गेल्या. काही फेटाळल्या गेल्या. नेहरु हे निःसंशय आधुनिक भारताचे रचनाकार होते. घटना समितीत प्रचंड बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचे ते प्रमुख नेते होते. पुढे पंतप्रधान झाले. घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव मांडण्यापासून घटनेच्या पायाभूत मूल्यांच्या संस्थापनेत त्यांची मोठी भागिदारी होती. काँग्रेस सदस्यांना समजावून, कधी व्हेटो वापरून घटनेतल्या अनेक बाबी घडवण्यात ते सहभागी होते. बाबासाहेबांच्या कामगिरीबद्दल विशेषतः मसुदा समितीत एकहाती त्यांच्यावर आलेल्या जबाबदारीबद्दल घटना समितीतल्या अनेकांनी बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता, प्रशंसा व्यक्त केली आहे. खुद्द घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसादांनी बाबासाहेबांबद्दल जी भावना व्यक्त केली आहे, त्यातून त्यांचे शिल्पकारपद सिद्ध होते. ते आंबेडकरी समूहाने नव्हे, घटना समितीतल्या खूप मोठ्या लोकांनी त्यांना बहाल केले आहे. बाबासाहेबांनीही या कार्यात मदत झालेल्या सर्वांचा आदराने उल्लेख केला. आभार मानले आहेत. त्यात बी. एन. राव आहेत. काँग्रेस पक्ष आहे. हे सर्व सांगितल्यावर मग या विद्यार्थ्यांना कळते की ही मंडळी परस्परविरोधी नसून या सगळ्यांचा घटनेच्या रचनेत सहभाग आहे. तो कबूल केल्याने बाबासाहेबांचे महानपण कमी होत नाही किंवा इतरांचे योगदान दुर्लक्षिले जात नाही. घटना ही या सगळ्यांच्या कष्टाचा परिपाक आहे. 

आंबेडकरी समूहातील बामसेफ, बीएसपीच्या प्रभावाखालील लोकांना बाबासाहेबांना घटना समितीत दुसऱ्यांदा निवडण्यात काँग्रेसने केलेले सहकार्य किंवा गांधीजींनी त्यांचा केलेला पुरस्कार हे सहन होत नाही. त्यावेळीही थेट उत्तर देण्याऐवजी त्यावेळचा घटनाक्रम मी तपशीलात मांडतो. एकूण पुणे करार व त्यानंतरच्या बाबासाहेबांच्या काँग्रेस, गांधींजींवरील कठोर टीकेमुळे बाबासाहेबांचे घटना समितीत काँग्रेस नेत्यांकडून अजिबात स्वागत नव्हते. पण नेहरुंच्या उद्दिष्टांच्या ठरावावर टीका करताना त्यांच्या भाषणातून जी प्रगल्भ राष्ट्रीय जाणीव व्यक्त झाली, त्याने अख्खी संविधानसभा प्रभावित झाली. त्यानंतर बाबासाहेबांना अनेक महत्वाच्या समित्यांवर घेतले गेले. या क्रमात बाबासाहेब आता देशाची गरज झाले. फाळणीमुळे त्यांचा बंगालमधील मतदार संघ पाकिस्तानात गेल्याने त्यांच्यावर घटना समितीच्या बाहेर पडण्याची वेळ आली. अशावेळी मुंबई प्रांतातून काँग्रेसचे मावळणकर हे मोठे नेते घटना समितीवर निवडून येणार होते, त्यांना बसवले गेले व बाबासाहेबांना काँग्रेसने निवडून आणले. त्यामुळे काँग्रेसचा बाबासाहेबांना आधी विरोध होता, हे खरे तसेच त्यांना पुन्हा घटना समितीवर निवडून आणून त्यांच्या हस्ते घटना पूर्ण करण्यात मोठा सहभाग होता तो काँग्रेसचाच. मतभेद असतानाही सामायिक राष्ट्रीय हितासाठी एकत्र कसे यावे याचा हा वस्तुपाठ आहे. 

हे मांडल्यावर बरेच जण ते पहिल्यांदाच कळले व खूप वेगळे आहे, असे सांगतात. तर काहींना बाबासाहेब व गांधीजी, नेहरु, काँग्रेस यांचे साहचर्य अजूनही खटकतच राहते. 

सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने आरक्षणाची चर्चा सुरु झाली की उच्चवर्णीय व दलित, अधिककरुन बौद्ध यांत ताण तयार होतो. इतिहासाने दिलेले हे कर्ज लवकर उतरवून सगळे समान संधीच्या एका रेषेवर येण्यासाठीची ती तात्कालिक उपाययोजना आहे; हे घडले की आरक्षणाची गरज राहणार नाही, हे उच्चवर्णीयांपैकी अनेकांना पटत नाही. काहींचे तर कान बंद होतात. काही अविवेकी, तर्कहिन वाद घालू लागतात. दलितांबद्दलचा दुस्वास किती तीव्र आहे ते कळू लागते. आधीच्या मांडणीतून माझ्याविषयी झालेले त्यांचे बरे मत इथे बदलू लागते. त्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण मला एक बाजू इथे घ्यावी लागते. इथे त्यांचे थोडे, यांचे थोडे असे करता येत नाही. 

साने गुरुजी स्मारकात एक कॉलेजवयीन तरुण मुलांचे शिबीर होते. त्यात पुरोगामी कार्यकर्त्यांची मुलेही होती. तिथे आरक्षणाचा विषय सुरु झाल्यावर ही पुरोगामी कार्यकर्त्यांची मुलेही मेरिटचा मुद्दा जोरात मांडू लागली. मी त्यांना एक घटना सांगितली. 

सरकारी मेडिकल कॉलेजला एका दलित मुलाला प्रवेश मिळाला नाही. त्याचे गुण उत्तम होते. पण प्रवेश मिळालेल्या अन्य अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचे गुण त्याच्यापेक्षा अधिक होते. ठराविक जागा होत्या. त्या भरल्या गेल्याने त्याला आरक्षित जागेचा लाभ मिळाला नाही. याचवेळी या दलित विद्यार्थ्यापेक्षा कमी गुण असलेल्या एका उच्चवर्णीय विद्यार्थ्याने एका खाजगी अनुदानित मेडिकल कॉलेजमध्ये लाखो रुपये बिगर पावतीचे पैसे भरुन प्रवेश घेतला. एवढे पैसे दलित विद्यार्थ्याकडे नसल्याने तो हा मार्ग अवलंबू शकला नाही. त्याला मेडिकलचा नाद सोडावा लागला. आता तो उच्चवर्णीय विद्यार्थी डॉक्टर झाला आहे. पण हा दलित विद्यार्थी डॉक्टर होऊ शकला नाही. 

याचे काय करायचे? आरक्षणाने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, हे तुमचे म्हणणे असेल तर इथे कोणावर अन्याय झाला? पैश्याने गुणवत्ता कशी खरेदी करता येते? ..मी मुलांना प्रश्न केला. 

सगळे गप्प झाले. दुपारच्या जेवणाच्या वेळात चौकशी केल्यावर कळले की यातली अनेक मुले अशा खाजगी विनाअनुदानित कॉलेजांत बक्कळ पैसे भरुन शिकत आहेत. जातीबरोबरच हा आर्थिक वर्णही आपली कुंपणे, आपले निकष तयार करतो. या वर्णातल्यांना आपली व आपल्यापेक्षा कमी आर्थिक कुवत असलेल्यांचे मूल्य समान वाटत नाही. दोघांसाठी वेगळे मापदंड असतात, हे त्यांच्या मनात कोरले गेले आहे. दलितांतून आरक्षणाचा लाभ घेतलेले व आता या आर्थिक थरात असलेल्यांचेही हेच दंडक असतात. तुमची मुले आता विनाअनुदानित खर्चिक शाळा-कॉलेजात जातात. मात्र तुम्ही ज्या वस्तीतून आलात, तेथील मुलांना अत्यंत वाईट अवस्थेतल्या शाळांत जावे लागते. शिक्षण हे सगळ्या मुलांना उत्तम दर्जाचे मोफत किंवा परवडण्यासारखे मिळायला नको का? ..याला त्यांचेही उत्तर ‘ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे लोक मुलांना शिक्षण देणार’ हेच असते. 

हे किंवा यानंतरही मी नोंदवणार असलेले अनुभव महाराष्ट्रात आणि बाहेरही सार्वत्रिक आहेत. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, रत्नागिरी, बीड, सातारा, कोल्हापूर ही जिल्ह्याची शहरे असोत किंवा त्यांतील तालुक्यांची ठिकाणे असोत. सामाजिक-आर्थिक श्रेणीप्रमाणे मिळणाऱ्या प्रतिसादाचे, समज-गैरसमजांचे स्वरुप सारखे असते. 

आपण अजून खरेखुरे लोकशाही राष्ट्र झालेलो नाहीत. जोवर जातीच्या तसेच आर्थिक विषमता तीव्र आहेत, तोवर आपण एक राष्ट्र बनणे अशक्य आहे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत तसेच बाहेरही सतत मांडलेले आहे. जाणिवांच्या बाबतीत जिथवर आपण प्रगती केली होती, तिथूनही आता आपण खाली उतरत आहोत. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हवे की नको याला उत्तर ‘हो’ असेच मिळते. पण त्याची उदाहरणे घेऊन चर्चा करायला सुरुवात झाली की समोरच्यांत धर्म, जातनिहाय अस्वस्थता तयार होते. 

मध्ययुगीन प्रबोधनाचा भारतीय संविधानाशी संबंध सांगताना कबीराच्या ‘पाथर पूजे हरि मिले तो मैं पूजू पहाड’ या विधानाला प्रतिसाद देणारे मुस्लिम त्याच्या ‘काकर-पाथर जोडी के मस्जिद लय बनाय, ता चढ़ी मुल्ला बांग दे, क्या बहरा हुआ खुदाय’ यावर रुष्ट होतात. तस्लिमा नसरीनचे म्हणणे तुम्हाला मान्य नसेल. तिचा निषेध जरुर करावा. पण तिला औरंगाबादमध्ये आम्ही प्रवेशच देणार नाही, अशी तेथील मुस्लिम गटांनी धमकी देऊन विमानतळावरुनच तिला परतायला लावणे, हे तिच्या लोकशाही अधिकाराचे हनन नाही का? हेही सत्रातील मुस्लिमांना पटत नाही. काही जण तर खूप संतापतात. हमारे इस्लाम में इसकी इजाजत नहीं वगैरे बोलू लागतात. हिंदू कट्टरपंथीयांच्या कारवायांबद्दल आम्ही टीका करत असतो ती त्यांना एकदम पटत असते. पण स्वतःवर आले की त्यांचे निकष बदलतात. यातले गप्प राहिलेले एक-दोन सत्र संपल्यावर भेटतात. खाजगीत सांगतात – “तुमचे म्हणणे पटले. पण आमच्यातल्या या कर्मठांना ते पटायचे नाही. तेवढे तस्लिमा, कबीर वगळून बोललात तर बरे होईल.” 

घटना आमच्या बापाने लिहिली आहे, ती आमच्या रक्तातच आहे…या सुमारपणावरची टीका आंबेडकरी विभाग ऐकून घेतो. पण बाबासाहेबांच्या व्यंगचित्राचा अकरावीच्या पुस्तकात समावेश करण्यावरुन सुहास पळशीकरांच्या कार्यालयाची मोडतोड करणाऱ्या आंबेडकरवाद्यांचे काय करायचे? अरुण शौरींनी बाबासाहेबांवर टीका करणारे पुस्तक लिहिले म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काय करायचे? यावर आंबेडकरी विभागही गप्प राहतो. त्यांचा गोंधळ उडतो. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्याला सोडायचे कसे? त्याला धडा शिकवायला नको का? आपण गप्प राहून फक्त निषेध करायचा, टीकेचा टीकेने प्रतिवाद करायचा हे त्याला अगदीच श्यामळू वाटते. दलित पँथरच्या विद्रोही संस्कृतीत एका बाजूला त्यांनी जबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतले. पण दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांना देवत्व बहाल करुन त्यांच्याविरोधात बोलणाऱ्याला धर्मद्रोही केले गेले. इथे १९७२ साली स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राजा ढालेंचा साधनेतील राष्ट्रध्वजाबद्दल निरर्गल विधाने करणारा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख किंवा नामदेव ढसाळांची ‘’पंधरा ऑगस्ट एक महाकाय भगोष्ठ..कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा..स्वातंत्र्य कुठच्या गाढवीचं नाव’ ही कविता मी नमूद करतो. एवढे कठोर लिहूनही त्यांच्यावर त्यावेळी कायदेशीर कारवाई झाली नाही. कोणी त्यांना देशद्रोही म्हणून आत टाकले नाही, हे कसे काय? आता मात्र त्यांना नक्की आत टाकले गेले असते. ..वगैरे मुद्दे उपस्थित करतो. यातून मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करण्यात बाबासाहेबांच्या अनुयायांनी अधिकच दक्ष व उदार असले पाहिजे, यावर चर्चा घडवतो. 

यालाच जोडून श्रद्धा व उपासनेच्या स्वातंत्र्याची चर्चा आम्ही करतो. हिंदू धर्म सोडून बौद्ध होताना बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांना धर्माज्ञेसारखे स्वरुप बौद्ध विभागात आहे. प्रत्यक्षात त्यातील सगळे पाळले जाते असे नाही. पण समाज म्हणून ते पाळले गेलेच पाहिजे असा दंडक तयार झाला आहे. यातून प्रश्न तयार होतो, तो आंतरजातीय/धर्मीय लग्नाच्या वेळी व त्यानंतर. पुरुष प्रधानतेमुळे अशी लग्ने ही बहुतेक नवऱ्याच्या धर्माप्रमाणे होतात. नवरीला नवऱ्याच्या धर्मात धर्मांतरित व्हावे लागते. बौद्धांच्यातही हेच चालते. आम्ही घटनेतील मूल्यांचा हवाला देऊन प्रश्न उपस्थित करु लागलो – ज्या हिंदू मुलीने बौद्ध मुलाशी लग्न करायचे ठरवले, ते त्याच्या धर्माकडे बघून नाही. तिला तो धर्म पटला म्हणून नाही. तर तिला तो मुलगा आवडला म्हणून. अशावेळी लग्नात तिचा धर्म बदलण्याचे प्रयोजन काय? बाबासाहेबांच्या घटनेने तिला तिचा धर्म पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ते आपण हिरावून घेत नाही का? वास्तविक धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब. लग्नाशी त्याचा संबंध येता कामा नये. म्हणूनच अशी लग्ने कोणत्याही धर्मपद्धतीने न करता विशेष विवाह कायद्याखाली व्हायला हवीत. त्यास आपण प्रोत्साहन द्यायला हवे. 

या चर्चेत लोकांना एका बाजूला तथ्य वाटते. पण दुसरीकडे पारंपरिक धर्म व त्याभोवतीची अस्मिता यांचे संस्कार बौद्धांच्यातही खोलवर रुतल्याने त्यांना व्यवहारात ते पटत नाही. हिंदू बायको, पण तिने बौद्ध संस्कारांतच राहायला हवे, असे पुरुषप्रधान आग्रह करकचून होतात. बौद्ध संघटनांतील मातब्बरांकडूनही तू तुझ्या बायकोला ताब्यात ठेवू शकत नाहीस का? ती अजून हिंदू कशी? अशी फर्माने निघत असतात. 

आमच्या या गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नांतून काही जोडपी प्रेरित होऊन त्यांनी आपली लग्ने व संसार नव्या पद्धतींनी रचायला सुरुवात केली आहे. संविधानाला साक्ष ठेवून किंवा विशेष विवाह कायद्याखाली लग्न, कोणी कोणाचे धर्म न बदलणे, बायकोने लग्नानंतरही तिचेच नाव-आडनाव लावणे हे होऊ लागले आहे. 

हल्ली आंतरजातीय/धर्मीय लग्ने वाढू लागली आहेत. पण त्यांमागे विचारांचा भाग कमी असतो. आमच्या पिढीत होणाऱ्या अशा लग्नांना चळवळींची, विचारांची पार्श्वभूमी असे. आता तसे दिसत नाही. मात्र तरुण मुलांशी कॉलेजमध्ये, बाहेर बोलताना विशेष विवाह कायदा, बायकोचा धर्म, आडनाव न बदलणे याची जाणीव करुन दिल्यावर त्यांचा प्रतिसाद चांगला असतो. असे काही माहीतच नव्हते. याचा आम्ही जरुर विचार करु, असे ही मुले बोलून दाखवतात. 

आपण माघारी चाललो आहोत, याचा ठळक प्रत्यय सेक्युलॅरिझम-धर्मनिरपेक्षता यांच्या चर्चेवेळी येतो. सरकारचा कोणता धर्म नाही हे सर्वसाधारणपणे पटते. त्याने सर्व धर्मांचा आदर करायला हवा, हेही पटते. पण बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंचा वरचष्मा राहायलाच पाहिजे, असे हिंदूंना वाटते. म्हणजे काय हे नीट सांगता येत नाही. पण मुसलमानांनी मापात राहायला पाहिजे, हे ते नक्की सांगतात. सोरटी सोमनाथच्या मूर्तिप्रतिष्ठापनेला राष्ट्रपती पदावर असताना राजेंद्र प्रसादांनी जाऊ नये, अशी नेहरुंनी विनंती केली होती, हे त्यांना पटत नाही. मोदींनी राममंदिराचे सरकारी भूमिपूजन केले यात त्यांना काही वावगे वाटत नाही. हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात हिंदूंना एवढाही अधिकार नाही का? असा त्यांचा प्रश्न असतो. काँग्रेसच्या काळात हे चालले. आता यापुढे हे चालणार नाही, असेही हे लोक बोलतात. हा मुद्दा समजावणे आम्हाला हल्ली कठीण जाते आहे. 

CAA/NRC विरोधातल्या आंदोलनांवेळीही हिंदूंना आणि बौद्धांनाही समजावणे कठीण जात होते. आम्ही आमच्या संघटनेकरवी निदर्शने अनेक केली. आमच्यात बहुसंख्याक असलेले बौद्ध कार्यकर्ते त्यात सहभागी होत राहिले. निदर्शने संघटित करण्यातही त्यांचा पुढाकार होता. पण शाहीन बागेच्या धर्तीवर मुंबई बागेत बसलेल्या महिलांना पाठिंबा द्यायला जाण्याची तत्परता काही या मंडळींकडून दाखवली गेली नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगलीत अनेक भागातली बौद्ध मंडळी हिंदूंच्या बाजूने मुसलमानांच्या विरोधात उतरली होती. मुसलमानांबद्दलची ही भावना बौद्ध समाजात आजही तीव्र आहे. 

राष्ट्रवादाची संकल्पना समजून सांगताना आपला राष्ट्रवाद हा ‘जय भारत-जय जगत’ वाला आहे. तो सगळ्या जगाचे मंगल चिंतितो, हे आमचे म्हणणे ऐकून घेतले जाते. पण पाकिस्तानचा संदर्भ आला की आक्रमक, संकुचित राष्ट्रवादाच्याच बाजूने लोकांचा कल आहे हे कळते. काश्मीरचे विभाजन, ३७० कलम काढून घेणे व त्यानंतर तेथील जनतेला वर्षभर बिगर इंटरनेटचे कैद करणे यातली वेदना त्यांना पोहोचत नाही. ज्यारीतीने काश्मिरचा निर्णय घेतला गेला, त्यामुळे सांविधानिक नैतिकतेला सुरुंग लावला गेला हे मुसलमानांबद्दलच्या मनातल्या अढीमुळे समजून घेतले जात नाही. एखाद-दोन लोक जे कुठल्या तरी पुरोगामी चळवळीच्या मांडवाखालून गेलेले असतात तेच या मांडणीला रुकार देतात. 

आमच्या या मर्यादित प्रयत्नांतून प्रबोधनाबरोबर जे कृतिकार्यक्रम घेतले त्यात आश्वासक बाबी नक्की आढळल्या. आमच्या संघटनेसारख्या अनेक संघटना एकत्रित येऊन संविधान दिनाच्या निमित्ताने ‘संविधान जागर यात्रा’ आम्ही जोरदार संख्येच्या करु शकलो. यात आंबेडकरी, समाजवादी, गांधीवादी, कम्युनिस्ट असे पुरोगामी वर्तुळातल्या विविध प्रवाहांची चांगली एकजूट दिसली. आंबेडकरी समूहाला या निमित्ताने गांधीजी, नेहरु समजावता आले. किमान त्यांच्याप्रति आपण अद्वातद्वा बोलता कामा नये, त्यांच्या अनुयायांसहित आपण एकदिलाने काम केले पाहिजे याला मान्यता मिळाली. मराठा क्रांती मोर्चे सुरु झाले त्यावेळी त्याच्या विरोधात संविधान सन्मान मोर्चे काहींनी सुरु केले. असे काहीही न करता आरक्षण व दलित अत्याचार कायदा आढावा परिषदा आम्ही संघटित केल्या. त्यात दलित, मराठा, ओबीसी युवक एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. सर्वांनी मिळून आरक्षणाचे व दलित अत्याचार कायद्याचे आजवर काय झाले, याचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन त्यावर मत बनवायचे आवाहन केले. यामुळे सगळे सहमतीत आले असे नाही. पण गैरसमज दूर होऊन परस्परांशी संवाद ठेवायची तयारी नक्की झाली. मला अनेक मराठा युवकांचे त्या काळात फोन आले. त्यांना माझे सगळेच पटत नव्हते. पण माझ्याशी संपर्क ठेवायची, संवाद करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ही आमची मिळकत आहे, असे मला वाटते. 

आम्ही संविधान परिचय वर्ग, त्यातून प्रचारक कार्यकर्ते तयार करणे, संविधान साक्षर वस्ती, संविधान साक्षर शाळा, वस्तीत संविधान शाखा, असे नियमित उपक्रम करत असतो. करोनामुळे प्रत्यक्ष जमताना नीट काळजी घेतो. वेबसंवादाच्या मार्फत प्रबोधनपर सत्रे, चर्चा सध्या घेत आहोत. 

मी किंवा आता संविधानाच्या प्रचारात उतरलेले अनेक कार्यकर्ते हे मुळात दलित-कष्टकऱ्यांच्या भौतिक प्रश्नावर, स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारे. आमच्या कामात संविधानाचा संबंध त्यातील काही मूल्यांचा उल्लेख करण्यापुरता असे. ज्यांच्यात आम्ही काम करतो, ती मंडळी संविधानाच्या मूल्यांचा आदर करणारच हे आम्ही गृहीत धरले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या दंगलींनी आम्ही सावध झालो. संविधान, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव यावर अधिक बोलू लागलो, काम करु लागलो. पण नंतर ते सुटले. त्यात सातत्य राहिले नाही. आम्ही पुन्हा आमच्या भौतिक प्रश्नांवरच्या लढाईत रुजू झालो. गुंतून गेलो. मोदींच्या भरभक्कम बहुमताने सत्तेवर येण्याने आम्ही दचकलो. त्यानंतर जी भारतीय संस्कृतीची, सांविधानिक मूल्यांची जोरदार मोडतोड सुरु झाली. रस्त्यावर संघपरिवाराची चौखूर उधळलेली पलटण आणि त्यांना केंद्रातील सत्तेतून मिळणारे सहाय्य व प्रोत्साहन यांनी आम्ही पुरते नाही पण बरेचसे भानावर आलो. आमच्या चळवळीतून तयार झालेत असे वाटलेले लोकांचे आधार आमचे नाहीत, याचा साक्षात्कार होऊ लागला. भौतिक प्रश्नांवरील लढाया चालू असतानाच लोकांच्या मनाची वैचारिक मशागत करायची असते हे आपण विसरलो किंवा त्यावर खास लक्ष दिले नाही, हे तीव्रतेने कळले. त्यातून मग संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराचे काम पुरोगामी चळवळीतल्या अनेक मंडळींनी एक प्रमुख काम म्हणून समांतरपणे सुरु केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माणूस मरतो त्याप्रमाणे विचारही मरतो. विचार अमर्त्य असत नाही. एखाद्या रोपाची जोपासना करायला जसे नियमित पाणी घालावे लागते, तशी विचारांचीही जोपासना करावी लागते. विचारांचा प्रचार करावा लागतो. वर्तमानातील प्रश्नांशी त्याचे नाते जोडावे लागते. नवे भाष्य करावे लागते. तरच विचार जिवंत राहतात. 

संविधान हाही विचार आहे. देशाची ती भूमिका, संकल्प आहे. लोकांच्या मनात तो रुजला नाही, तर केवळ पुस्तकात राहील. घटनेचे पुस्तक पवित्र मानले जाईल. पण व्यवहार त्याच्या विरोधात केला जाईल. विचार व व्यवहार यातली विसंगती कळणार कशी? त्यासाठी घटनेत काय आहे हे तर कळले पाहिजे. म्हणूनच ही लोकांच्या मनाची मशागत करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. अर्थात त्यातून येणाऱ्या वर नोंदवलेल्या अनुभवांतून आमच्याच मनाची मशागत अधिक होते आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(वसा, दिवाळी अंक, २०२०)