Thursday, December 4, 2008

मुंबईवर झालेल्‍या अतिरेक्‍यांच्‍या हल्‍ल्‍यातील शहिदांना राष्ट्रीय एकता समितीचे अभिवादन

२६ नोव्‍हेंबरला रात्री मुंबईवर झालेल्‍या अतिरेक्‍यांच्‍या हल्‍ल्‍याचा काल जवळपास ५९ तासांच्‍या धुमश्‍चक्रीनंतर आपल्‍या सुरक्षा रक्षक दलाच्‍या शूर जवानांनी अखेर पाडाव केला. पण या हल्‍ल्‍याची फार मोठी किंमत आपल्‍याला चुकवावी लागली. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर या कर्तबगार अधिका-यांसह अनेक पोलीस कर्मचारी, लष्‍कराचे अधिकारी, सुरक्षा रक्षक दलाचे कमांडो यात हुतात्‍मा झाले. स्‍टेशन तसेच रस्‍त्‍यावरचे निरपराध सामान्‍य नागरिक, नरिमन भवन मधील रहिवाशी, ताज व ओबेरॉय हॉटेलचे कर्मचारी आणि ओलीस ठेवलेले देशी व परदेशी पर्यटक असे सुमारे १८३ लोक या हल्‍ल्‍यात नाहक बळी गेले. जखमींची संख्‍या याच्‍या दुप्‍पट आहे. या आकड्यांत अजून भर पडण्‍याची शक्‍यता आहे. हॉटेल ताजसारख्‍या सुंदर व ऐतिहासिक वास्‍तूची झालेली हानी अप‍रिमित आहे. स्‍फोटांचे, गोळीबाराचे आवाज, रक्‍त, आक्रंदन यांचे काळीज पिळवटणारे अमानुष क्रौर्य, थरार आपण अनुभवत होतो. आपल्‍यातले असंख्‍य लोक हे तीन दिवस झोपू शकलेले नाहीत.
या सर्व शहीद व बळींना राष्‍ट्रीय एकता समितीचे भावपूर्ण अभिवादन!
क्रौर्याचे तांडव संपले. पण पुढे होणार नाही कशावरुन? ही आशंका भेडसावतच आहे. संतापाने अंतःकरण धगधगते आहे. हे तांडव करणारे कोण होते, कोठून आले, त्‍यांचा उद्देश काय होता, ते एवढी शस्‍त्रे घेऊन मुंबईत शिरलेच कसे इ. अनेक प्रश्‍न आपल्‍या मनात घुमत आहेत. त्‍याची स्‍पष्‍ट उत्‍तरे अजून मिळालेली नाहीत. चौकशी पूर्ण झाल्‍यावर हे तपशील मिळतील. त्‍यास अजून वेळ लागणार आहे. तथापि, काही आडाखे आपण नक्‍की बांधू शकतो.
एकतर, हा हल्‍ला केवळ देशांतर्गत हिंदू-मुस्लिम तणाव, काश्‍मीर प्रश्‍न यांच्‍यामुळे झालेला दिसत नाही. याचा अर्थ त्‍याचा अजिबात संबंध नाही, असे नाही. त्‍यातील विद्वेष, दुखावलेपण याचे संदर्भ आहेतच. पण त्‍याहून अधिक आंतरराष्‍ट्रीय संदर्भ त्‍यास आहेत. इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात अमेरिकेने कायम लावून धरलेली इस्रायलची बाजू, या अमेरिकेशी भारताची वाढत चाललेली दोस्‍ती, शांतताप्रिय जागतिक जनतेकडून ज्‍या ओबामांच्‍या अमेरिकेच्‍या अध्‍यक्षीय निवडणुकीतील विजयाचे स्‍वागत केले गेले त्‍यांनी पाकिस्‍तानला दहशतवाद्यांना आळा घालायचा दिलेला इशारा, पाकिस्‍तानचे अध्‍यक्ष झरदारींनी भारताशी सहकार्य करण्‍यासाठी घेतलेला पुढाकार या सर्वांना इशारा देण्‍यासाठी हा हल्‍ला झाला. एकप्रकारे, हा हल्‍ला आंतरराष्‍ट्रीय आहे. मुंबई हे जागतिक भांडवली व्‍यवहाराचे एक महत्‍वाचे केंद्र आहे. हॉटेल ताज, ओबेरॉयमध्‍ये उतरणारे लोक हे आंतरराष्‍ट्रीय बडे लोक असतात, नरिमन भवन हे ज्‍यू धर्मगुरुंचे वसतीस्‍थान आहे. या वास्‍तूंवर हल्‍ला म्‍हणूनच केला गेला.
काही देशांतर्गत घटना लक्षात घ्‍यायला हव्‍यात. देशात अनेक मतभेदांसहित विकासाची वाटचाल सुरु होती. फुटीरवादी दहशतीच्‍या भयानक छायेखाली असलेल्‍या काश्‍मीरमधील जनतेने प्राणांचे भय न बाळगता निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करुन भारतीय लोकशाहीवर विश्‍वास दाखवला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम धर्मांध अतिरेक्‍यांनी स्‍फोट घडविण्‍याचे प्रकार चालू होतेच. त्‍यात हिंदुत्‍वाचा पुकार करणा-या धर्मांधांनी मालेगाव स्‍फोटासारख्‍या घटनांनी आम्‍हीही कमी नाही, हे दाखवण्‍याचा प्रकार सुरु केला. तथापि, काही जातीयवादी संघटना वगळता त्‍यांना जनतेतून व्‍यापक पाठिंबा नाही. ‘देवबंद’ सारख्‍या मुस्लिम पीठांनी हैद्राबाद तसेच इतरही अनेक ठिकाणी हजारो मुस्लिमांचे मेळावे घेऊन इस्‍लाम दहशतवादाला विरोध करतो, असे ठणकावून सांगत मुस्लिम अतिरेक्‍यांचा समाजातील पाया कमजोर करायला सुरुवात केली होती. देशातील हिंदू-मुस्लिम समाजातील सौहार्द बळकट होण्‍याच्‍या क्रमाला रोखणे हा उद्देशही या हल्‍ल्‍यामागे असावा. हिंदू व मुस्लिम दोहोंकडच्‍या धर्मांधांचा हा समान उद्देश आहे. भारतीय जनतेने तो सफल होऊ देता कामा नये.
दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे मालेगावच्‍या स्‍फोटाचे धागेदोरे खणण्‍यात यशस्‍वी होऊ लागल्‍यावर त्‍यांना हिंदू अतिरेक्‍यांकडून खूनाच्‍या धमक्‍या आल्‍या. प्रत्‍यक्षात ते मुस्लिम अतिरेक्‍यांचा बंदोबस्‍त करताना शहीद झाले. अतिरेक्‍याला धर्म नसतो, असे ते नेहमी म्‍हणायचे. तसेच आपल्‍या दहशतखोरविरोधी पथकाचे नाव त्‍यांनी हदशतवादविरोधी पथक असे केले होते. कारण दहशतखोर व्‍यक्‍तीशी आपला झगडा नसून तो दहशतवाद या प्रवृत्‍तीशी आहे, असे ते आपल्‍या पथकातील सहका-यांना सांगत असत. करकरेंसारख्‍या शहिदांचे बलिदान व्‍यर्थ जायचे नसेल तर हा सामाजिक सद्भाव वाढवण्‍याची आपण प्रतिज्ञा घ्‍यायला हवी.
पाकिस्‍तानशी युद्ध पुकारावे, अशा अतिरेकी सूचनाही या काळात पुढे येतील. त्‍यांपासून सावध राहावे लागेल. जे झरदारी आज पाकिस्‍तानचे अध्‍यक्ष आहेत, त्‍यांची पत्‍नी माजी पंतप्रधान बेनझीर भुत्‍तो या निवडणुकीच्‍या प्रचारात असताना पाकिस्‍तानातील मुस्लिम अतिरेक्‍यांकडूनच मारल्‍या गेल्‍या. पाकिस्‍तानातील मुस्लिम धर्मांधांच्‍या कारवाया, लष्‍कराचा राजकारणातला हस्‍तक्षेप यांनी पाकिस्‍तानच्‍या आजच्‍या राज्‍यकर्त्‍यांना घेरलेले आहे. त्‍यांच्‍यावर बेछूट टीका करुन अथवा आक्रमण करुन या धर्मांधांच्‍या व लष्‍कराच्‍या घे-यात त्‍यांना अधिक अडकवायचे की त्‍यांना ताकद देऊन तेथे खरी लोकशाही प्रस्‍थापित करण्‍यासाठी मदत करायची हे डावपेच म्‍हणूनही आपल्‍याला ठरवणे आवश्‍यक आहे.
आपल्‍या सुरक्षा यंत्रणेतल्‍या कमजो-या, भ्रष्‍टाचार, राज्‍यकर्त्‍यांचा हलगर्जीपणा तसेच सत्‍तालाभासाठी संकुचित अस्मितांचा वापर करणा-या बेजबाबदार राजकारण्‍यांना ठिकाणावर आणण्‍यासाठी मतदानातली जागरुकता आणि राजकारणाला योग्‍य वळण लागण्‍यासाठी त्‍यात सक्रीय सहभाग तसेच अन्‍य उपक्रम जनतेने करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.
ज्‍या संविधानाने आपल्‍याला देशातील सामाजिक सद्भाव, एकता अखंड राखण्‍यासाठी तसेच जागतिक शांततेसाठी प्रयत्‍नरत राहण्‍याचा संकल्‍प दिला त्‍या ‘घटना दिना’ दिवशीच २६ नोव्‍हेंबरला हा अतिरेकी हल्‍ला झाला. संविधानाने दिलेल्‍या संकल्‍पाच्‍या मूळावर आघात करणा-या या हल्‍ल्‍याला खरे प्रत्‍युत्‍तर हे संविधानाने दिलेला हा संकल्‍प अधिक बळकट करणे हे आणि हेच होऊ शकते. तेच या हल्‍ल्‍यातील शहिदांना आणि बळींना खरेखुरे अभिवादन आहे.
३०.११.२००८
संपर्कः सुरेश सावंत - नीला लिमये, श्रमिक, ९३२-९३३, से. ७, कोपरखैरणे, नवी मुंबई- ४००७०९. फोनः २७५४४२१९, २७५४८२१२