Tuesday, December 27, 2022

कट्टरतेत हरवतेय का सच्ची धार्मिकता?

काही काळापूर्वी उदयपूर येथे एका हिंदू शिंप्याची दोन मुस्लिम युवकांनी भर दिवसा त्याच्या दुकानात शिरुन अत्यंत निर्दयपणे हत्या केली. त्यांच्या समजाप्रमाणे पैगंबरांच्या अवमानाची त्यांनी दिलेली ती शिक्षा होती. नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्यांनी पैगंबरांविषयी अवमानजनक काही विधाने जाहीरपणे टीव्हीवर केली होती. त्या विधानांना या शिंप्याने समाजमाध्यमांतून पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. हा त्याचा गुन्हा. त्यासाठी शिक्षा शिरच्छेद. ती या मुस्लिम युवकांनी त्याला दिली.

अशी शिक्षा देण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आपल्याकडे कायद्याचे राज्य आहे. संविधान आहे. या मुस्लिम युवकांनी त्या शिंप्याबद्दल पोलिसांत तक्रार करायला हवी होती. पोलीस तपास आणि नंतर न्यायालयाचा निकाल ही रीत आपण स्वीकारली आहे. ती नाकारुन स्वतः शिक्षा देणाऱ्या या मुस्लिम युवकांना हा अधिकार कोणत्या धर्मपीठाने बहाल केला होता? इस्लामचे असे एकच एक धर्मपीठ आहे का? वास्तविक कोणत्याच धर्माचे जगात एकच एक धर्मपीठ नाही. धर्माज्ञांचे विविध अर्थ लावणारे धर्मगुरु एकाच धर्मात जगभर आढळतात. म्हणजे या मुस्लिम युवकांनी स्वतः घेतलेल्या इस्लामच्या समजानुसार ही भीषण कृती केली.

आणि समजा असे एकच एक धर्मपीठ असते, तरी त्याच्या हुकुमाची तामिली करण्याचा अधिकार कायद्याच्या राज्यात धर्मपीठाला वा त्यांच्या अनुयायांना नाही. त्या देशातली कायदेशीर प्रक्रिया होऊनच शिक्षा होऊ शकते. फ्रान्समध्ये पैगंबरांची व्यंगचित्रे वर्गात दाखवणाऱ्या शिक्षकाचा अशाच माथेफिरू मुस्लिम युवकाने शिरच्छेद केला. तिथे फ्रान्सच्या कायद्याला धाब्यावर बसवले गेले. तालिबान्यांनी बामियानच्या हजारो वर्षांच्या भव्य आणि शिल्पकलेचा अजोड नमुना असलेल्या बुद्धाच्या मूर्तीला तोफा लावून उद्ध्वस्त केले. हे बुद्धाचे शिल्प तालिबान्यांच्या अमलाखालील भौगौलिक क्षेत्रात असले तरी तो जागतिक वारसा आहे. इस्लाम जन्माला येण्यापूर्वीपासून ते तिथे आहे. इस्लामध्ये मूर्तिपूजा निषिद्ध मानली गेली आहे. ती धारणा या तालिबान्यांच्या बेमुर्वत कृत्याचा आधार होती.

अरबस्तानातील टोळ्यांच्या विविध देवता व या देवतांच्या मूर्ती असत. त्यांवरुन त्यांचे आपसात वितुष्ट असे आणि परस्परांशी लढाया चालत. या विकृती व विनाशाचे कारण असलेल्या मूर्तिपूजेविरोधात पैगंबरांनी बंड केले. मूर्ती काढून त्या जागी एकतेच्या, बंधुतेच्या, शांतीच्या मूल्याची ग्वाही देणाऱ्या एकच एक निराकार अल्लाची स्थापना केली. त्या काळात हे निःसंशय पुरोगामी पाऊल होते. पण त्याचा आजच्या काळात चुकीचा अर्थ घेऊन, तोच खरा धर्म मानून इस्लाम कबूल न करणाऱ्यांच्या मूर्तींना, श्रद्धास्थानांना उखडणे याला म्हणतात धार्मिक मूलतत्त्ववाद. चिकित्सा व त्यानुसार नव्या काळात धर्ममतांचा विकास झाला नाही की मूलतत्त्ववाद फोफावतो. कट्टरता जोम धरते. यातून तो धर्मही प्रवाही राहत नाही. त्यात साचलेपण येते.

साचलेपणाचा आणि मूलतत्त्ववादाचा विकार हे काही फक्त इस्लामचेच वैशिष्ट्य नव्हे. प्रत्येक धर्माला कमी-अधिक प्रमाणात त्याने ग्रासले आहे. हिंदू हा रिलिजन या अर्थी एक देव, एक ग्रंथ, उपासनांची सर्वसाधारण एक रीत असा धर्म नसताना, प्रचंड वैविध्य सामावणारा, अनेकविध संप्रदायांचा एक संच असतानाही त्यात हल्ली मूलतत्त्ववादी बेछूट झाले आहेत. उत्तर प्रदेशात गोमांस घरात असल्याच्या संशयावरुन अखलाख या मुस्लिम इसमाची हत्या करणे, गुजरातेतल्या उना येथे गायींची हत्या करुन त्यांना वाहून नेण्याचा खोटा आरोप ठेवून दलित युवकांना अमानुष मारहाण करणे अशी कैक उदाहरणे गेल्या काही वर्षांत सतत पुढे येत आहेत. यात भारतासारख्या लोकशाही देशातला कायदा तर हातात घेतला जातो आहेच. त्याचबरोबर गायीचे पावित्र्य सर्वांवर थोपवण्याची जुलूम-जबरदस्तीही त्यात आहे. मुस्लिम माथेफिरुंच्या कृत्याने संतापलेल्या ख्रिश्चन माथेफिरुंनी अनेक सामान्य मुस्लिमांना त्रास दिला आहेच; तसेच मुस्लिम समजून पगडीधारी शिखांचे खून वा त्यांवर हल्ला केल्याच्या घटना कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलियात घडल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. म्यानमार आणि श्रीलंकेतले बौद्ध धर्माचे अनुयायी, बौद्ध भिख्खू अनुक्रमे रोहिंग्या मुस्लिमांशी आणि तामीळ हिंदूंशी काय क्रौर्याने वागतात, हेही आपण पाहिले आहे, पाहत आहोत. मैत्री, करुणा यांना मूठमाती देणाऱ्या या कर्मठ, कट्टर बौद्धांनी बौद्ध धर्मातल्या कोणत्या तत्त्वाचा आधार घेतला हेच कळत नाही. आम्ही बहुसंख्य, आमचे वर्चस्व चालणार, तुमची श्रद्धास्थाने, उपासना पद्धती आमच्याशी मेळ खात नाहीत, ही वर्चस्वशाली भावनाच या बौद्धांच्या कृत्याची आधारशिळा आहे.

इथे राजकीय वर्चस्वाचा मुद्दाही धर्मात गुंफला जातो. मूलतत्त्ववाद व कट्टरता हा धर्मातला रोग मोठा आहेच. पण त्याला राजकारणासाठी वापरले जाते, तेव्हा तो प्रचंड धोकादायक होतो. अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता काबीज करतात, तेव्हा तिथल्या सर्व मागास प्रथांना ऊर्जितावस्था येते आणि लोकशाही, समतेच्या अधिकारांना पाताळात गाडले जाते. याच्या सर्वाधिक भक्ष्य स्त्रिया होतात. काही एका प्रमाणात असलेली मोकळीक पूर्ण लयाला जाते. महिला बुरख्यात कोंडल्या जातात. त्यांचे शिक्षण थांबते. इराणमध्ये हिजाब न घालण्याचे औद्धत्य करणाऱ्या मुस्लिम युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो आणि त्याविरोधात महिला आणि पुरुष रस्त्यावर उतरतात. केस कापणे, हिजाब फेकून देणे या आंदोलनांनी शासनसत्तेवर कब्जा केलेल्या धर्मसत्तेला त्यांनी ललकारले आहे.

भारतात हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व असा गोलमोल शब्दच्छल करुन फॅसिस्ट हिंदू राष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न जोरकस सुरु आहेत. मुळात हिंदू म्हणून समान मान्यता, समान रीती नाहीत. मात्र त्या तशा करण्याची भरकस कोशिश सुरु आहे. गाय ही हिंदूंमधल्या ज्या विभागाला पवित्र वाटते, त्या विभागाला आपली ही आस्था जपण्याचा अधिकार आहे. पण जे अन्य हिंदू वा अन्य धर्मीय वा निधर्मी गोमांस खातात, त्यांच्यावर ते न खाण्याची कायदेशीर जबरदस्ती कशासाठी? हिंदू अस्मिता रक्षणाचा वसा घेतलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालच्या मणिपूर, अरुणाचल, गोवा या राज्यांत गोवध बंदीचा कायदा करण्याची त्यांची हिंमत नाही. ‘जे गोमांस खातात त्यांनी पाकिस्तानात जावे’ असे भाजपचे एक केंद्रिय म्हणतात. त्यावर भाजपचे दुसरे केंद्रिय मंत्री रिजीजू उत्तर देतात – ‘मी अरुणाचल प्रदेशचा आहे आणि मी गोमांस खातो. मला कोणी थांबवू शकेल का?’

स्वतःला सनातनी हिंदू म्हणणारे, गायीला पवित्र मानणारे महात्मा गांधी यांची याबद्दलची भूमिका महत्वाची आहे. ते म्हणतात – ‘हिंदू धर्माने हिंदूंना गोवध करण्यास मनाई केली आहे, संपूर्ण जगाला नाही. ही धार्मिक मनाई अंतःप्रेरणेने आलेली आहे. कोणाच्या सांगण्यावरुन ही बंदी आल्यास ती सक्ती ठरेल. अशी सक्ती धर्माला मान्य नाही. भारत हा केवळ हिंदूंचा देश नाही.’ अन्यत्र मांडलेले त्यांचे हे अजून एक मत – ‘हिंदुस्थानात गोवधबंदीचा कायदा करता येणार नाही. हिंदूंना गोहत्येस मनाई करण्यात आली आहे, याबद्दल मला शंका नाही. ...परंतु माझा धर्म हा संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेचा धर्म कसा काय असेल? हिंदू नसणाऱ्यांसाठी तो जुलूम ठरेल.’

तरीही आपल्याकडे अजून केंद्राने नाही, पण वेगवेगळ्या राज्यांनी गोवधबंदीचे कायदे केले. त्यातून भाकड गायींचा प्रश्न तीव्र झाला आहे. अशा गायी शेतकऱ्यांना परवडत नाहीत. ते त्या मोकळ्या सोडून देतात. सरकारच्या गोशाळा अपुऱ्या आणि पुरेसा निधी नसलेल्या आहेत. रस्त्यावर भटकत राहणे, नाहीतर गोशाळांत कुपोषणाने, लंपीसारख्या दुर्धर आजारांनी मरुन जाणे हे या पवित्र गायींचे सध्याचे प्राक्तन आहे.

गायींना मारल्याच्या संशयाने माणसे मारणे हा या कायद्याचा आनुषंगिक पण अमानुष परिणाम आहे. कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांना धर्माचे ठेकेदार आणि सरकार यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संरक्षण हा चिंतेचा व संतापाचा विषय आहे.

धर्माचा मूळ हेतू, सच्ची धार्मिकता या वातावरणात संभ्रमित होते. गळफटून जाते.

काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी मशि‍दीवरील भोंगे उतरवा, नाहीतर त्या मशि‍दीसमोर हनुमान चालीसा सुरु करु, असा इशारा दिला. त्यावरुन वातावरणात तणाव तयार झाला. मुस्लिमांत एक प्रकारची असुक्षितता आली. क्रियेला प्रतिक्रिया होऊन दंगली भडकल्या तर काय, ही रास्त चिंता होती. तथापि, महाराष्ट्रातल्या तत्कालीन मविआ सरकारने ही स्थिती चांगली हाताळली. पोलिसांनी मुस्लिम वस्त्त्यांत ठेवलेल्या बंदोबस्ताने मुस्लिम समाज आश्वस्त झाला होता. पुढे राज ठाकरेंनीही दोन-चार इशारे देण्यापलिकडे हे आंदोलन चालवले नाही. तूर्त, या मुद्द्यावर शांतता आहे.

इथे प्रश्न येतात दोन. एक, जुना. मशिदी असो वा मंदिरे यांवर भोंगे आले, ते लाऊड स्पीकरचा शोध लागल्यावर. त्या आधी अजान असो वा आरती ही बिन भोंग्याचीच व्हायची. मग आताच भोंगा हा धर्माचा भाग कसा काय झाला? तर तो तसा नाही. सोय म्हणून वा सार्वजनिक कार्यक्रम लाऊड स्पीकर लावूनच करायचा असतो, या सवयीपायी भोंगे आले. आता आले तर त्यांना नियम आहेत. वेळा, आवाजाचे प्रमाण कायदा वा न्यायालयाच्या आदेशाने नक्की झालेले आहे. अशावेळी नियमात न बसणाऱ्या भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरे लोकांना पोलिसांत तक्रार करायला सांगू शकतात. तशी कार्यकर्त्यांकरवी मोहीम घेऊ शकतात. पण स्वतःच कायदा हातात घेण्यास कार्यकर्त्यांना उद्युक्त करणे हे गैर आहे. गुन्हा आहे.

प्रश्न दुसरा. हनुमान चालिसा ही शांतपणे ईश्वराशी एकरुप होत करावयाची प्रार्थना आहे. मन विशुद्ध, कपटभावरहित असल्याशिवाय आध्यात्मिक समाधान साधत नाही. मशिदीसमोर जाऊन घोषणा देणे गैर असले, तरी समजू शकते. पण तिथे जाऊन हनुमान चालीसा म्हणणे म्हणजे हनुमानाची आणि प्रार्थनेची चेष्टा नव्हे काय? मनात द्वेष, कोणाला तरी धडा शिकवायचा आहे, या भावनेतून ईश्वराशी तादात्म्यता येणार कशी?

म्हणजेच राजकीय हिशेब करण्यासाठी हा धर्माचा वापर आहे. हिंदूंना हे कळत कसे नाही? आपला धर्म आपण कोणाच्या तरी राजकीय लाभासाठी बिनदिक्कत कसा काय वापरु देतो? धर्माचा मूळ हेतू व प्रयोजन कसे काय हरवू देतो?

सच्चा धार्मिकांनी मौन पाळणे, तटस्थ राहणे गैर आहे. ते त्यांच्या खऱ्या धर्माचे नुकसान करतातच; शिवाय देशालाही विनाशाकडे ढकलतात. धर्म राजकारणाचे साधन होता कामा नये, राजकीय पक्षांनी धर्माचा वापर करता कामा नये, हे प्रार्थना स्थळांत, धार्मिक स्नेहसंमेलनात तसेच प्रसंगी रस्त्यावर उतरुन त्यांनी बजावले पाहिजे.

कट्टरतेत आपली सच्ची धार्मिकता हरवू नये यासाठी या धार्मिकांनी काही बाबी मनाशी नीट स्पष्ट करायला हव्या. वास्तविक आपल्या पूर्वसुरींनी त्याची स्पष्टता करुन ठेवली आहे.

आजच्या लोकशाही, धर्मनिरपेक्ष शासनप्रणाली स्वीकारलेल्या आधुनिक काळात संविधानाने व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. व्यक्तीला वाटेल त्या धर्माची तो उपासना करु शकतो. वाडवडिलांचा धर्म आहे म्हणून तोच मी मानला पाहिजे, हे बंधन त्यावर नाही. धर्मस्वातंत्र्यात धर्माला न मानण्याचेही स्वातंत्र्य आहे. सव्वा दोन हजार वर्षांपूर्वीचा सम्राट अशोक स्वतः बौद्ध होता. त्याचे वडिल बिंदुसार वैदिक, तर आजोबा चंद्रगुप्त जैन होते. म्हणजे एकाच घराण्यात वेगवेगळे धर्म पाळणारे लोक होते. सम्राट अशोक प्राचीन काळातला. आधुनिक काळातले महात्मा फुलेही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पटणारा धर्म स्वीकारण्याचे तत्त्व अधोरेखित करतात. त्यांचे याबाबतचे अवतरण असे:

‘भूमंडळावर महासत्पुरूषांनी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत त्या सर्वांत त्या वेळेस अनुसरुन त्यांच्या समजुतीप्रमाणे काही ना काही सत्य आहे. यास्तव कोणत्याही कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौद्धधर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तो धर्म स्वीकारावा. तिच्या पतीने बायबल वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे वाटल्यास ख्रिस्ती व्हावे. व त्याच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास महंमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्यांच्या पुत्राने सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे. कोणी कोणाचा द्वेष न करिता सर्वांनी निर्मिकाच्या कुटुंबातील आहोत असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकांशी वर्तन करावे. म्हणजे ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या राज्यात धन्य होईल.’

बापाचा धर्म मुलांना जन्मतः मिळण्याची रीत व संस्कार आजही आहे. बापाचा आणि मुलांचा धर्म वेगळा असेल अशी कल्पनाही कोणी करत नाही. मात्र पावणेदोनशे वर्षांपूर्वी एका कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उपासनेच्या, आपल्याला पटतो तो धर्म स्वीकारण्याच्या स्वातंत्र्याचा पुकारा हा महान समाजक्रांतिकारक करतो. एवढेच नव्हे, असे वेगळे धर्म स्वीकारल्यानंतर कोणी कोणाचा द्वेष न करता एका कुटुंबातील आहोत हे समजून प्रेमाने नांदावे, असे आवाहन फुले करतात.

केवळ तांत्रिकदृष्ट्या धर्मांतरे करुन आपल्या धर्मातील लोकांची संख्या वाढवणे याला काहीही अर्थ नाही. धर्म हा मनाने पटावा लागतो, हे यातून आपल्या लक्षात येते. आंतरजातीय-आंतरधर्मीय लग्ने होण्याचे प्रमाण वाढते आहे. अशा लग्नांमध्ये आमच्या घरी येणाऱ्या सुनेने आमचाच धर्म पाळला पाहिजे हा आग्रह वृथा आहे. त्या नव्या मुलीला तिची उपासना करण्याचा मुक्त अधिकार व वाव दिल्यानेच ती आपल्या घरात अधिक समरस होऊ शकेल, हे लक्षात घ्यायला हवे. असे मिश्रविवाह खरे म्हणजे विशेष विवाह कायद्याखालीच व्हायला हवेत. या कायद्याखाली होणाऱ्या लग्नांत प्रत्येकाला आपले धर्म कायम ठेवता येतात.

औपचारिकदृष्ट्या धर्म स्वीकारणे किंवा खूप ग्रंथ, श्लोक, मंत्र ठाऊक असणे म्हणजे सच्ची धार्मिकता नव्हे. कबिरांचा प्रसिद्ध दोहा आपल्याला ठाऊक आहे. ‘पोथी पढ़ी पढ़ी, जग मुआ | पंडित भया न कोय | ढाई आखर प्रेम का पढ़े, सो पंडित होय |’ यातून कबीर प्रेम, मैत्री, बंधुता, सहभाव याने नाते अधिक दृढ होते, हे पटवून देतात. आधुनिक काळातले डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू होय.’ असे सांगतात.

म्हणजेच धर्म हा माणसासाठी आहे. धर्मासाठी माणूस नव्हे. साहजिकच खोटा भावनिक ज्वर तयार करुन धर्माच्या रक्षणासाठी माणसांना झुंजवण्याच्या कारस्थानाच्या विरोधात जनमत खऱ्या धार्मिकांनी तयार व संघटित करायला हवे.

भारत हा विविध धर्ममतांच्या संघर्षाचा, त्यांच्या परस्पर स्वीकाराचा आणि समावेशाचा देश आहे. त्यामुळे धर्मचिकित्सेला घाबरुन जाता कामा नये किंवा प्रक्षुब्धही होता कामा नये. उलट तिच्या स्वागताची भूमिका हवी. ही चिकित्सा गांभीर्यपूर्वक व्हायला हवी, परमताचा आदर राखून व्हायला हवी. अशा चिकित्सेनेच धर्ममत प्रवाही राहते. पुन्हा सम्राट अशोकाच्या एका वचनाचा उल्लेख इथे करुया. गिरनार येथील शिलालेखात तो म्हणतो – 'देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा सर्व संप्रदायांना मान देतो. संन्यासी आणि गृहस्थाश्रमी या दोघांनाही मान देतो. ..स्वतःच्या संप्रदायाची स्तुती न करणे, परसंप्रदायाची अवास्तव निंदा न करणे..अन्य संप्रदायांचा सुद्धा वाजवी सत्कार केलाच पाहिजे..एकमेकांचे धर्म एकमेकांनी ऐकावेत व मानावेत..’

सम्राट अशोकाच्या या विचार-वारशामुळेच त्याची काही शिल्पे, चिन्हे आपण राष्ट्रीय चिन्हे म्हणून स्वीकारली. त्याच्या सारनाथच्या सिंहस्तंभाची प्रतिमा आज आपली राजमुद्रा आहे. त्यावरील धम्मचक्र आज अशोकचक्र म्हणून आपल्या राष्ट्रध्वजावर विराजमान आहे.

धर्माचा प्रवाह स्वच्छ करण्यासाठी आपल्या धर्मातील वैगुण्ये नष्ट करणे नितांत गरजेचे आहे. या वैगुण्यांवर कट्टरता पोसली जाते. मध्ययुगीन संतांनी ही धर्माची स्वच्छता हातचे न राखता केली. आपल्याला आधुनिक काळात ती कठीण का वाटावी?

जातिभेद हे मोठे वैगुण्य आहे. सर्व माणसांना एकसमान न मानता त्यांना उतरंडीच्या रचनेत बंदिस्त करणाऱ्या जाती संपल्याशिवाय माणूस माणसाशी खऱ्या अर्थाने जोडला जाणार नाही, हे चांभार या अस्पृश्य समाजात जन्मलेल्या रैदास किंवा रविदास यांनी नेमकेपणाने ओळखले होते. ते म्हणतात – ‘जाति-जाति में जाति है, जो केतन के पात| रैदास, मनुष ना जुड सके जब तक जाति न जात|’

केळीला (झाडाला) सोलत गेल्यास एक एक पात जाईल आणि अखेरीस काहीच हाती लागणार नाही. तसेच जातीच्या आत जाती आहेत. जोवर जात हा प्रकारच नष्ट होत नाही, तोवर माणूस एक होणे कठीण आहे, हे अगदी समर्पक रुपकाद्वारे ते समजावतात.

या सर्व संतांनी ईश्वर, अल्ला आणि भक्त यातील पुरोहित, मुल्ला, पाद्री या मध्यस्थांना नकार दिला आहे. हे मध्यस्थ धर्माचा गैर अर्थ पसरवण्यास कारण होतात. तसेच त्यांच्या हाती एकवटलेल्या धर्माच्या अधिकाराद्वारे ते सत्तेच्या राजकारणात सौदा करतात. त्यातील प्यादे बनतात. सच्चा धार्मिकांनी हे मध्यस्थ दूर सारले पाहिजेत. मध्ययुगीन संत कवी-कवयित्रींच्या कवनांतून ईश्वर व भक्ताचे नाते हे आई-मुलाचे, मित्राचे, प्रियकर-प्रेयसीचे मानले आहे. म्हणजेच हे खाजगी नाते आहे. ईश्वर व त्याची आराधना करणाऱ्या भक्तांतल्या या खाजगी नात्यात दुसऱ्या कोणी का हस्तक्षेप करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो, पर प्यार भरा दिल ना तोडो’ असे बुल्लेशहांनी म्हटले आहे. तुकोबांनी विठोबाला माऊली म्हटले, जनाबाईंनी सखा म्हटले हे आपल्याला ठाऊक आहेच. जनाबाई आपल्याला जातं ओढू लागणाऱ्या या सख्याला ‘मायेच्या कार्ट्या, गेलं तुझं मढं’ अशा शिव्याही घालते. केवळ मध्ययुगात नव्हे, तर पुढे आधुनिक काळातही हा मध्यस्थ नाकारण्याची भूमिका गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदि संतांनी घेतली आहे. ‘सर्वसाक्षी जगत्पती| त्याला नकोच मध्यस्थी|’ हे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते.

धर्मातील कर्मकांडांवर तर या सर्व संतांनी आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, प्रबोधनकार ठाकरे आदि सुधारकांनी जोरदार आघात केलेत. हे सर्व धर्मविरोधी अशी हाकाटी कोणी जाहीरपणे आज पिटत नाही. पण कर्मकांड, दांभिकता यांविरोधात यांच्यापेक्षा कितीतरी सौम्यपणे प्रचार-प्रसार करणाऱ्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून केले जातात. टीका म्हणजे धर्मद्रोह व पुढे जाऊन राष्ट्रद्रोह असे समीकरण समाजमनात तयार करण्याचे काम कट्टरपंथी अहर्निश करत असतात. त्याला ही अशी विषारी फळे येतात. सच्चा धार्मिकांसमोर या कट्टरतेला विरोध करताना समाजमन कर्मकांड विरोधी, सहिष्णू बनवण्याचे मोठे आव्हान आहे. ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती’ हे तुकोबांचे वचन महाराष्ट्रातल्या सच्चा धार्मिकांना पटणे आणि लोकांना पटवणे कठीण आहे का? ‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव’ हे संत तुकडोजी महारांचे कवन किंवा गाडगेबाबांची कीर्तने ही मराठी मनात खोलवर रुजलेली आहेत. त्यांवर जर काही पुटं चढलेली असतील, तर ती झटकणे खरोखरच कठीण नाही.

…हे नाही केले, सच्ची धार्मिकता निष्क्रिय राहिली, तर ती कट्टरतेत हरवणारच.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(प्रजापत्र दीपावली २०२२)

Saturday, December 3, 2022

पँथर, मी आणि पुढे…


दलित पँथरचा १९७२ साली जन्म झाला त्यावेळी मी ७ वर्षांचा होतो. ७४ ला ती फुटली त्यावेळी ९ वर्षांचा आणि ७७ ला बरखास्त झाली त्यावेळी १२ वर्षांचा. मूळ पँथरचे एकूण आयुष्य पाच वर्षांचे. त्यातील भराचा काळ तसा अडीच-तीन वर्षांचाच. बाकी बरखास्तीपर्यंत आंदोलने होत राहिली तरी तो काळ मुख्यतः नेत्यांच्या वादावादीने व्यापलेला.

९ ते १२ वर्षे या वयातला मी आणि याच वयोगटातले माझे सवंगडी पँथरचे कार्यकर्ते असण्याचा प्रश्न नव्हता. मात्र धुमसणाऱ्या भोवतालातून येणाऱ्या संवेदना-जाणीवांनी आम्ही अंतर्बाह्य सुलाखून निघत होतो. मोर्चे, घोषणा, सभा, दगडफेक, पोलिसांशी झटापटी, तरुणांचे गल्ल्यांतून धावणे, पसार होणे, लपणे, त्यांच्या अंगावरील जखमा, रस्त्यावरील दगड-काचांचा खच आम्ही बघत होतो. नकळत त्यातील घटक होत होतो. घोषणा देत होतो, दगड फेकत होतो, पळत होतो. सकाळी सार्वजनिक शौचालयात रांग लावलेल्यांच्या चर्चा आणि संध्याकाळी-रात्री गल्लीच्या कोपऱ्यावर रंगणाऱ्या गप्पा यातून चळवळीच्या बऱ्याच आतल्या गोष्टी कळत. आपल्या लोकांवर अन्याय होतो आहे, आपली गरीबी, झोपडपट्टी याला आपले नशीब नव्हे; तर सरकार, विषम व्यवस्था जबाबदार आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी आपण लढतो आहोत, असे स्पष्ट-अस्पष्ट जाणवत होते. ‘जयभीम’ तर जन्मापासूनच येता जाता ऐकत होतो, म्हणत होतो. पण मोर्च्यांत आणि सभांतून कानावर पडणाऱ्या ‘जयभीम के नारे पे खून बहे तो बहने दो’ ने रोम न रोम चेतून उठायचा. मोर्च्यात सहभागी झालेल्या भागवत जाधवच्या शहिद होण्याची बातमी वेदना देऊन गेली. पाटलाने डोळे काढलेल्या गवई बंधूंना माझ्या गल्लीच्या कोपऱ्यावर झालेल्या सभेत मी पाहिले आणि आपल्या लोकांवर अत्याचार होतो म्हणजे काय, याचा थेट दाखला मिळाला. आतून रक्त खवळले आणि व्यवस्थेला चूड लावण्याची भावना अनुभवली.

१९७२ सालचा रौप्य महोत्सवी स्वातंत्र्य दिन ‘काळा स्वातंत्र्य दिन’ म्हणून पँथरने जाहीर केला. त्यानंतर ७५ सालच्या २६ जानेवारीला ‘काळा प्रजासत्ताक दिन’ पाळायचे आवाहन राजा ढालेंनी केले. मी पाचवीत होतो. झेंडावंदनाला शाळेत गेलो. पण शर्टच्या खिश्याला काळी फीत लावून. राष्ट्रगीताला उभा राहिलो. पण ते म्हटले नाही. शिक्षकांना सांगितले – ‘आमच्या लोकांवर अत्याचार होत आहेत. आम्हाला अजून स्वातंत्र्यच मिळाले नाही. म्हणून हा निषेध.’ आमच्या वस्तीतलीच म्युनिसिपालिटीची शाळा. शिक्षकांनाही काय भोवताली चालले आहे, ते ठाऊक होते. सगळीकडे काळ्या प्रजासत्ताक दिनाचे फलकही लागलेले होते. शिक्षक काही बोलले नाहीत. माझे त्यांनी ऐकून घेतले. मला काळी फीत काढण्याचा सल्लाही त्यांनी दिला नाही.

आमचा चेंबूरचा लेबर कँप, पेस्तम सागर-पुढे तो पी. एल. लोखंडे मार्ग झाला- हा विभाग राजा ढालेंच्या प्रभावाखालचा. राजा ढालेंची विलक्षण मोहिनी माझ्यावर होती. त्यांची भाषा, त्यांचे अक्षर आणि त्यांचे विचार याचा जबरदस्त पगडा माझ्यावर होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे उद्धारकर्ते आणि म्हणून ते आमचे आराध्य हे जन्म झाल्यावर डोळे उघडल्यापासूनच कळले होते. बुद्ध आणि बाबासाहेब यांचे घरातील, विहारातील, सार्वजनिक ठिकाणचे फोटो, मूर्ती, पुतळे, सोबतच महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमा हे परिचित होते. या सर्वांची माहिती असलेली पुस्तके, नियतकालिके, पत्रके आमच्यापर्यंत पोहोचत होती. पण या महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा अर्थ उलगडत होता तो राजा ढालेंच्या भाषणांतून. माझे वडील आणि काही नातेवाईक तसे बी. सी. कांबळेवाले. या रिपब्लिकन नेत्यांच्या विरोधात पँथरने मोहीम उघडलेली. त्यामुळे या ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांत काहीतरी गडबड आहे, एवढे जाणवायचे. पण कळत फारसे नव्हते. आमच्या विभागातील एका सभेला आलेल्या रिपब्लिकन नेत्याला एका पँथरने खाली खेचल्याचे मी पाहिले. पँथरच्या नेत्यांच्या सर्व विद्रोही कृती, बंडखोरी, ज्वलज्जहाल भाषा आम्हाला चेतवत होती. ताकद देत होती. भोवतालच्या अभावग्रस्त स्थितीत विचार व अस्मितेच्या बाबत समृद्ध करत होती. पुढे समाज परिवर्तनासाठी पूर्णवेळ काम करायचे ही धारणा यातूनच माझ्यात रुजू लागली होती.

बी. सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, गवई, खोब्रागडे ही नावे घरातल्या आणि गल्लीतल्या वडिलधाऱ्यांच्या चर्चेत असत. त्यावेळी या मंडळींना मी क्वचितच पाहिले असेन. या चर्चेतून हे लोक मोठे साहेब आहेत, हे कळे. ते गाडीतून येतात. सुटाबुटात असतात, ही प्रतिमा मनात तयार झाली होती. आम्ही पाहत असलेले पँथरचे नेते असे नव्हते. त्यांचा उल्लेख करताना राजा, नामदेव, ज. वि. असा होत असे. ते साहेब नव्हते. हे पँथरचे नेते वस्तीतली सभा उशीरा संपल्यावर तिथेच थांबत. जायला काही साधन नसायचे. मुख्य म्हणजे पैसे नसायचे. वस्तीतच त्यांची जेवणे व्हायची. रात्रभर गप्पा चालायच्या. या गप्पांत सहभागी होण्याइतके आम्ही मोठे नसलो तरी तिथे बसून ऐकत असू. एकदा राजा ढालेने माझ्याकडे बघून ‘याच्याएवढा असताना..’ असे काहीतरी म्हटले. त्यामुळे माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. हे नेते पहाटे पहिल्या लोकलने निघत. ते आमचे, आमच्यातले नेते होते.

या नेत्यांत राजा ढाले आमचा खास हिरो होता. मोर्च्यात ‘राजा ढाले-झिंदाबाद’ म्हणताना मला विशेष आनंद होई. राजाचा प्रत्येक निर्णय हा बरोबरच असणार ही श्रद्धा तयार झाली होती. पँथर विसर्जित करुन मास मुव्हमेंट काढण्याचा राजाचा निर्णय - ना मास कळत होते, ना मुव्हमेंट तरी - बरोबरच असणार यावर माझा विश्वास होता. पुढे मास, मुव्हमेंट आणि इतर बरेच कळू लागल्यानंतरही वयाच्या २५ वीशी पर्यंत राजा ढाले हा माझा नायक होता. तीन वर्षांपूर्वी २०१९ ला तो गेला तेव्हा मी लिहिले होते – ‘माझ्यातल्या दुर्दम्य अस्मितेचे पोषण करणारा नायक गेला.’ यावेळी मी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक होते – ‘राजा ढालेः माझ्यातल्या अस्मितेचा आणि असहिष्णुतेचा नायक’

अस्मितेचा आणि खास करुन असहिष्णुतेचा नायक राजा का, याबद्दल थोडे लिहावे लागेल. नव्याने लिहिण्याऐवजी याच लेखातली काही अवतरणे देतोः

‘काय बदलायचे? आपण कसे व्हायचे? ...याचा माझ्यासमोरचा नमुना राजा ढाले होता. नामदेवचे विद्रोहीपण भावायचे. पण नंतर महत्वाची वाटलेली त्याची भाषा, कवितांतले संदर्भ, वेश्यावस्तीतले कलंदर जगणे कमीपणाचे वाटायचे. जे नासलेले, सडलेले आहे, जो आमचा भूतकाळ आहे त्याची आठवण का जागवायची? ते का पुन्हा रेखाटायचे? ‘बलुतं’ सारख्या आत्मकथनांबद्दलही मला तसेच वाटायचे. राजा त्यातला नव्हता. आपण ‘दलित’ नाही, बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला दलितपणाच्या दलदलीतून बाहेर काढले आणि बौद्ध ही नवी ओळख दिली. ती घेऊन पुढे जायचे, हे राजाचे म्हणणे एकदम पटायचे.’

‘राजाच्या दिसण्याबरोबरच त्याची भाषा, त्याचे अक्षर अप्रतिम होते. त्याच्या अनुकरणाचा मोह स्वाभाविक होता. भौतिक वैभवाची आस बाळगण्याची काहीही शक्यता नसलेल्या त्या काळात भाषा, अक्षर, लिखाण या बिनपैश्याच्या क्षेत्रातल्या वैभवाच्या मागे आम्ही लागलो. वर्षानुवर्षे कोरड्या जमिनीवर पहिल्या सरी पडल्यावर जसे नवे अंकुर सरसरुन उगवतात, तसे हे होते. श आणि ष या दोन्हींतल्या उच्चाराचा बारकावा आपल्याला साधला पाहिजे, याची जीवतोड कोशीस आमची असे.’

‘नव्या अस्मितेच्या भरण-पोषणाची प्रतीके राजाने आम्हाला दिली. २२ प्रतिज्ञांचे कसोशीने पालन, दसरा नव्हे तर १४ ऑक्टोबर दीक्षा दिन, बौद्ध भिक्खूंच्या अवैज्ञानिक विधि-संस्कारांना नकार, पालीतली बौद्ध विधितली सूक्ते मराठीत अनुवादित करणे (शांताराम नांदगावकर यांनी त्याला संगीत देऊन त्याची कॅसेटही निघाली होती.), नावाच्या आधी ‘श्री.’ ऐवजी ‘आयुष्मान’ लावणे, मृत व्यक्तीच्या नावाआधी ‘कै.’ ऐवजी ‘कालकथित’ लावणे ही काही उदाहरणे.’

‘राजाचा १५ ऑगस्ट १९७२ च्या साधनेतला राष्ट्रध्वजाचा अपमान आणि दलित स्त्रीची अब्रू यात मोठे काय, असा प्रश्न विचारणारा ‘काळा स्वातंत्र्य दिन’ हा लेख आणि त्या लेखातील भाषेने झालेली खळबळ, वेश्या व्यवसायाच्या गरजेचे समर्थन करणाऱ्या दुर्गा भागवतांना भर सभेत ‘मग त्या व्यवसायाची सुरुवात तुमच्यापासून होऊ द्या.’ असे त्याचे सुनावणे, मराठी सारस्वताच्या साचलेपणापणावर प्रहार करुन रुढ संकेतांना धाब्यावर बसवणाऱ्या लघु नियतकालिकांच्या चळवळीतील त्याचे नायकत्व, या मराठी सारस्वताचे पीठ असलेल्या सत्यकथेची होळी या घटनांना मी साक्षी नव्हतो. पण ज्या वातावरणात मी वाढत होतो, तेथे पुढची बरीच वर्षे त्याचे निनाद उमटत होते.’

‘नामदेव ढसाळ कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली आहे. त्याने काढलेला जाहिरनामा हा पॅंथरचा जाहिरनामा नसून त्यातून ‘नामा’ जाहीर झाला आहे, हे राजाचे विधान मीही अनेकांना ऐकवत असे. त्यावेळी पॅंथरची फूट या भूमिकेवर मला योग्य वाटत होती. बुद्धाची रक्तविहिन क्रांती आणि मार्क्सची रक्तरंजित क्रांती यात श्रेष्ठ काय? अर्थात बुद्धाची रक्तविहिन क्रांती! मग जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या का होईना, कम्युनिस्टांशी संबंधित असतील, ज्यांच्या कविता-कथेत वा बोलण्यात वर्गीय भाषा येत असेल अशांपासून कमालीची सावधानता मी बाळगत असे. असे लोक अस्तनीतले निखारे असतात, हा माझा समज होता. नामदेवच्या या डावेपणामुळे त्याच्यापासून (व त्याच्या कवितांपासूनही) मी बराच काळ दूर राहिलो.’

‘आमच्या या फॅंटमच्या मोहजालात मी जवळपास १५ वर्षे होतो. कधीही नमस्ते म्हणायचे नाही. जयभीमच म्हणायचे. मग ते कोणीही असोत. वयाच्या १९ व्या वर्षी मी शिक्षक झालो. विद्यार्थ्यांना, सहकारी शिक्षकांना, ते कोणत्या का समाजाचे असेनात, जयभीमच घालायचा, हे माझे ठरले होते. शाळेत माझ्याकडे संस्थेची अधिकृत पत्रे लिहायचीही जबाबदारी यायची. त्यातही नावाच्या आधी आयुष्यमान आणि जयभीम असायचे. संस्थेची प्रमुख मंडळी समाजवादी होती, म्हणून बहुधा त्यांनी हे खपवून घेतलेले दिसते. मला कोणी असे करण्यापासून रोखले नाही. काही बोललेही नाही. त्यांच्या सहनशीलतेची तेव्हा मला कल्पना येणे शक्य नव्हते. पुरोगामी म्हणवणारे जोवर बौद्ध होत नाहीत, तोवर ते दांभिकच अशी माझी धारणा होती.’

ही असहिष्णुता आणि आपल्या विचारधारेचा गर्व इतका टोकाचा होता की माझी जागोजागी भांडणे होत. वास्तविक मी ती उकरुन काढत असे. एक खुमखुमी असे. सवर्णांच्या समोर बोलताना मुद्दाम देवादिकांवर आघात करायचे. त्यांचा पाणउतारा करायचा हा माझा नित्यक्रम होता. गावाकडे जाताना वाटेत लागलेल्या झाडाखाली शेंदूर फासलेले दगडाचे देव होते. ते मी उचलून फेकले आहेत. आमच्या बौद्धवाडीत आम्ही तरुण मंडळी एकत्र आलो आणि घराघरातील लिंबू-दोरे तोडून त्यांचे दहन केले. ज्या बाईच्या अंगात येईल तिला दंड बसवला.

पँथरची वाताहत, त्यातल्या नेत्यांचा अधःपात यांतून आम्हाला पुढची दिशाच गवसेना. अशावेळी अन्य पुरोगामी प्रवाहांचा शोध, त्यांना समजून घेणे सुरु झाले. त्यांच्याशी सावध सहकार्यही होऊ लागले. पुढे मी डाव्या चळवळीशी एकटाच जोडला गेलो. माझ्या सोबत तोवर असलेले काही सहकारी या डाव्या वळणावरच थबकले. काही सहानुभूत राहिले. काही वैचारिक विरोधक झाले. वस्ती, वस्तीतले काम, सामान्य लोकांचा मला असलेला पाठिंबा तसाच राहिला. त्यामुळेच मी आजवर टिकून राहिलो.

या काळातच माझे सवर्ण कार्यकर्त्या मुलीशी लग्न झाले. ती वस्तीत राहायला आली. तिच्या वडिलांच्या तीव्र विरोधापायी रजिस्टर्ड लग्नासाठीच्या नोटिशीची मुदत पूर्ण व्हायच्या आधीच तिला घराच्या बाहेर पडावे लागले. पाठिंबा देणाऱ्या तिच्या आईचा आग्रह तातडीने लग्न करा असा होता. म्हणून मग धार्मिक पद्धतीने लग्न करणे भाग होते. ते अर्थातच बौद्ध पद्धतीने हे गृहीत होते. तिचीही त्याला हरकत नव्हती. ती निरीश्वरवादी होती. पण लग्नाच्या विधीचा एक भाग म्हणून लग्न लावणाऱ्या माझ्या मित्राने तिचे धर्मांतर करण्याची सूचना मांडली आणि त्याला मी अनुमती दिली हे तिला अनपेक्षित होते. न रुचणारे होते. लग्नास आलेल्या तिच्या-माझ्या सवर्ण मित्र-मैत्रिणींनाही ते खटकले. पुरोगामी नवरा अखेर धर्मवादी निघाला, हा त्यांचा निष्कर्ष. कळून सवरुन मी हे होऊ दिले, यात पुरुषीपणाबरोबरच राजा ढालेंचा अतिरेकी बौद्धवादी संस्कार नक्की होता. पुढे बऱ्याच वर्षांनी मी लेख लिहून आणि जाहीर भाषणात ही माझी चूक झाली असे नमूद केले.

दलित पँथर अल्पजीवी; पण तिने माझ्या आणि माझ्या पिढीवर खोल परिणाम केला. आमच्या व्यक्तित्वाच्या घडणीत पँथरचे प्रचंड योगदान आहे. पँथर दिशाहिन झाली. पण आमच्या जीवनाची दिशा ठरायला तसेच बिघडायला कारण ठरली. पँथरच्या प्रारंभीच्या टप्प्यात लढलेल्या नेत्यांप्रमाणेच माझ्या पिढीतले काही जण अजून व्यवस्थेशी लढत आहेत. काही जण पुढच्या टप्प्यातील नेत्यांच्या व्यवहाराप्रमाणे स्वार्थाच्या मागे लागले आहेत. राजकारण हे समाजबदलासाठीचे साधन काहींचे आहे, तर काहींनी तो धंदा केला आहे. पँथरच्या पन्नाशीत हे दोन्ही लोक मौजूद आहेत. आणि हे दोन्ही लोक पँथरची पन्नाशी साजरी करत आहेत. त्याचबरोबर खुद्द बौद्धांच्यात आज चाळिशीपर्यंतच्या वयोगटातील बहुसंख्यांना मूळ पँथरचा काहीही संदर्भ नाही. कधीकाळी पँथरचे असलेल्या आजच्या अथःपतित नेत्यांचाच संदर्भ त्यांना आहे. त्यामुळे आपण काय गमावले आहे, हे कळण्याचाही संभव कमी आहे.

आज पँथरची पन्नाशी साजरी करताना पँथरच्या वैशिष्ट्यांची, आंदोलनांची, नेत्यांच्या हिंमतीची, भूमिकांची, वादांची, चळवळीच्या चढत्या तसेच उतरत्या आलेखाची नोंद घेणे गरजेचे आहे. चळवळीची पुढील दिशा ठरवण्यासाठी यातून मिळणारा बोध उपयुक्त ठरु शकेल. व्यक्तिशः माझ्यावरील प्रभावाचे वर्णन करताना वर काही बाबी मांडल्या आहेत. पँथरसंबंधातील आणखी काही मुद्द्यांची नोंद आणि चर्चा खाली करुया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही सशक्त करण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना खुल्या पत्राद्वारे मांडली. हा पक्ष केवळ दलितांचा नव्हे, तर सर्व भारतीयांचा तो व्यापक पक्ष असणार होता. एस. एम. जोशी, लोहिया, अत्रे यांच्याशी बाबासाहेबांची बोलणी त्यासाठी सुरु होती. त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यावर १९५७ सालच्या ऑक्टोबरमध्ये या पक्षाची स्थापना आंबेडकरी नेत्यांनी केली. मात्र पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरात हा पक्ष फुटला. यामागे वैचारिक मतभेद निमित्तमात्र; सत्ता, पदाची आकांक्षा आणि अहंता मुख्य होती. जे गट पडले, ते गटही पुढे फुटले. याच काळात दलितांवरचे अत्याचार वाढत होते. त्यावर शिक्कामोर्तब करणारा पेरुमल समितीचा अहवालही आला होता. या अत्याचारांबाबत असंवेदनशील, आपमतलबी अशा रिपब्लिकन नेत्यांच्या विरोधात शिक्षित, साहित्य क्षेत्राशी संबंधित तरुणांनी आवाज उठवला. काळ्यांवरील जुलुमाच्या विरोधात लढणाऱ्या ब्लॅक पँथर पार्टीपासून प्रेरणा घेऊन दलित पँथर या नावाने त्यांनी संघटना स्थापन केली. दारुगोळ्याच्या कोठारावर जळती काडी पडावी तसे झाले. अल्पावधीत दलित तरुणांचा प्रचंड पाठिंबा या संघटनेला मिळाला. वस्त्यांतून पँथरच्या छावण्या वेगाने उघडू लागल्या. निर्भीड, निधडेपणा आणि औद्धत्य हे या लढावू पँथर्संचे वैशिष्ट्य होते. अत्याचार झालेल्या गावात ट्रेन, बस, पायी, वाटेत खायला पुरेसे पैसे नसताना शे-दीडशे तरुण मुलांनी जाऊन अत्याचाऱ्यांना जाब विचारणे, पोलीस आणि सरकारला दखल घेण्यास भाग पाडणे हे आता स्वप्नवत वाटावे असे वैशिष्ट्य त्या काळात पँथरचे होते. शिवसेना, बाळ ठाकरे यांच्या अरेला कारे करण्याची हिंमत या पँथरांची होती. मुख्यमंत्र्यांना तोंडावर उलट जबाब देण्याचे धारिष्ट्य या पँथरांमध्ये होते.

मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत गवई बंधूंना नुकसानभरपाई म्हणून १००० रु. देऊ केले गेले. त्यावेळी संतप्त झालेल्या राजा ढाले यांनी भर बैठकीत मुख्यमंत्र्यांना सवाल केला- “आपण आपला डोळा दोन हजार रुपयांत द्याल काय?” पँथरच्या पूर्वी खूप बौद्ध मुले शिवसेनेकडे आकर्षिली गेली होती. शिवसैनिक बनली होती. ती आता शिवसेना सोडून पँथरमध्ये येऊ लागली. त्या संदर्भात नामदेव ढसाळांनी जाहीरपणे बाळ ठाकरेंना एकेरीवर येऊन ललकारले. ढसाळ म्हणतात – “याला अनेक जाहीर सभांतून मी आव्हाने दिली आहेत. हिंमत असेल तर मैदानात ये. परंतु बांबूला बांबू लावायची हिंमत नाही. तुला कशामुळे माज चढला होता मला माहीत आहे. ती गोठा विसरलेली वासरे आता इकडे परत आली आहेत. आता तुझ्या गमज्या बस झाल्या.” शिवसेनाप्रमुखांना ललकारणाऱ्या नामदेव ढसाळांचे पुढच्या काळातील त्यांच्याशी झालेले सख्य आपल्याला ठाऊक आहे.

प्रस्थापित रिपब्लिकन नेते, सरकार, प्रतिगामी विचारांचे प्रवाह आदि सर्वांना जबर आव्हान उभे करणाऱ्या दलित पँथरच्या नेत्यांची पुढील कथा प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांहून निराळी झाली नाही. त्याच अहंतेने, सत्ताकांक्षेने त्यांना घेरले. वैचारिक मतभिन्नता महत्वाची होती. पण तिचा निरास करण्याच्या प्रयत्नांआड हे वैयक्तिक रिपू आले. फुटी, फुटीच्या फुटी पडत गेल्या. ...आणि पँथर संपली.

फुटी हे काही फक्त आंबेडकरी चळवळीचे वैशिष्ट्य नाही. ते भांडवली पक्षांत आहे. पुरोगामी चळवळींत आहे. पण म्हणून त्याला चलता है म्हणून सोडून चालणार नाही. शोषित-पीडितांच्या चळवळीतील फुटी न परवडणाऱ्या आहेत. भांडवली पक्ष सत्तेसाठी सहज युत्या करतात. त्यांच्यात खूप लवचीकता असते. आज सर्व लोकशाहीवादी शक्तींचे लचके तोडणाऱ्या फॅसिस्ट वळणाच्या संघपरिवारात आणि त्यांच्या भाजप या राजकीय साधनात वाद, व्यक्तिगत महत्वाकांक्षा नाहीत असे नाही. पण त्यांच्या उद्दिष्टाबद्दल ते इतके दक्ष व सक्रिय आहेत की, या सर्वांतून ते मार्ग काढत जातात. अभंग राहतात. पुरोगामी, आंबेडकरी चळवळींत ‘बाल की खाल’ काढण्याच्या रीतीने मतभेदांच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म रेषा शोधल्या जातात. अलीकडे त्यात थोडी सुधारणा आहे, पण ती स्थिर व नित्य नाही. पुरोगाम्यांत अधिकाअधिक व्यापक सहमतीची कक्षा वाढवत जाणे ही फॅसिझमविरोधी लढ्याची पूर्वअट आहे. आंबेडकरी चळवळीने त्यात कळीची भूमिका निभावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पँथरच्या फुटींच्या कारणांचा वेध घ्यायला हवा.

बाबासाहेबांच्या काळापासून मार्क्स की बुद्ध या वादाची चर्चा चालू आहे. रिपब्लिकन नेत्यांच्या वादांतही तो संदर्भ येतो. पँथरमध्येही तो तरारुन वर आल्याचे आढळते. नामदेव ढसाळांनी पँथरची भूमिका लिहिली. तिला जाहिरनामा नाव दिले. मार्क्स-एंगल्सने कम्युनिस्ट जाहिरनामा लिहिला होता. त्याच्याशी असलेले नामसाधर्म्य काहींना खटकले असणार. मुद्दा केवळ नामसाधर्म्याचा नव्हता. अनेक पुरोगामी, आंबेडकरी चळवळीला व्यापक करणारे व दिशा देणारे मुद्दे या जाहिरनाम्यात आहेत, हे खरे आहे. मात्र पँथरचा हा जाहिरनामा निश्चित डाव्या वळणाचा होता. त्यातील काही भाग अतिरेकी डावा होता. बाबासाहेबांच्या विचार परंपरेतील संसदीय लोकशाहीशी हे अतिडावे वळण मेळ खात नव्हते. पँथरमध्ये सक्रिय झालेल्या सुनील दिघे या ढसाळांच्या अतिडाव्या कम्युनिस्ट मित्राने हा जाहिरनामा लिहिला, हा आरोप राजा ढालेंकडून झाला. नामदेव डावा झाल्याचा हा पुरावा आहे, यादृष्टीने ‘नामा जाहीर’ झाल्याची कोटी त्यांनी केली. त्यांनी लेखी निवेदन काढले. त्यात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे महत्वाचे आहेत. संघटनेची भूमिका एकहाती लिहून परस्पर जाहीर करणे ही रीत लोकशाहीला धरुन नाही. तिची चर्चा कार्यकारी समितीत व्हायला हवी होती, हे ढालेंचे म्हणणे बरोबर होते. माझ्या मते सुनील दिघे वा अन्य कोणाचीही मदत घेऊन नामदेव ढसाळांनी भूमिकेचा मसुदा करणे यात गैर काही नाही. हा मसुदा कार्यकारी समितीसमोर ठेवून त्यावर चर्चा घडवून सहमतीचे बदल स्वीकारून तो अंतिम करणे, ही प्रक्रिया पाळणे भागच होते.

राजा ढालेंचा बौद्ध धर्मावरील अति भर, बैठकांत-कार्यक्रमांत वंदना घेण्याचा आग्रह हा गैर बौद्ध दलितांतले जे कोणी अल्प कार्यकर्ते पँथरमध्ये होते, त्यांना खटकत असे. राजा ढालेंच्या नेतृत्वाखाली झालेली शिवाजी पार्कवरील भगवद्गीतेची होळी, हिंदू देवतांची यथेच्छ टिंगलटवाळी या बाबी सवर्णांतले मित्र जोडण्यात अडथळा ठरतात, चळवळीला व्यापक करण्यात बाधा आणतात, असे नामदेव ढसाळांचे म्हणणे होते. ते रास्त होते. पण या भूमिकेवर गंभीरपणे चर्चा होण्याऐवजी मतभिन्नता व्यक्त करणाऱ्याची खिल्ली उडवणे, त्याला नामोहरम करणे ही रीत ढालेंच्या अनुयायांकडून होई. याचे एक उदाहरण पाहू. एके ठिकाणी भाषण करताना ढसाळ म्हणाले – “आपल्याला देवधर्मासंबंधी टिंगल टवाळी करायची नाही. तर, आपला लढा हा भाकरीसाठी आहे!” त्यावेळी राजा ढाले यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क भाकरी आणली आणि ते म्हणाले – “ही घ्या भाकर आणि भाषण थांबवा!”

वास्तविक हे मतभेद एवढेच कारण नव्हते. अन्य तेवढीच किंबहुना अधिक महत्वाची कारणे होती हम करे सो कार्यशैली, नेतृत्व व श्रेयासाठीची स्पर्धा, कुरघोडी आणि निधीचा ताबा. वैयक्तिक उपजीविका, संघटनात्मक कामासाठीचा खर्च यातून होणारी कुचंबणा हा मोठा प्रश्न असतो. त्याची सहसा बाहेर चर्चा होत नाही. तोही आयाम इथे होता. पण त्याची सोडवणूक करण्याची रीत तयार न होणे हा संघटनात्मक कमजोरीचाच भाग झाला. चळवळीसाठीच्या निधीचा वापर हा सामुदायिक मुद्दा असतो. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ असे झाले की चळवळीच्या सामुदायिकतेचे काही खरे नसते. यातून येणाऱ्या ताणांना, विरोधांना मग अनेकदा वैचारिक मतभेदांचा मुलामा चढवला जातो. पँथरमधील ही ऐतिहासिक फूट काही एकच नव्हती. पुढेही सातत्याने फुटी होत राहिल्या. पुढे झालेल्या या पँथर वा रिपब्लिकन फुटींना काय मार्क्स-आंबेडकर विचारधारांविषयीचे मतभेद कारण आहेत? निवडणुकीतली युती कोणाशी करायची यावर होणाऱ्या फुटींचे आधार वैचारिक वा डावपेचात्मक भूमिकांपेक्षाही सत्तेची पदे आणि आर्थिक राहिले आहेत.

एकूणच पँथरच्या पन्नास वर्षांत आंबेडकरी चळवळीचा समज, गांभीर्य वाढले आहे, असे म्हणता येत नाही. देशभरचा दलितवर्ग बाबासाहेबांना आपला उद्धारकर्ता मानून जयभीमच्या घोषणा देत ताकदीने रस्त्यावर उतरताना दिसतो आहे. ही स्थिती आश्वासक आहे. पण तिच्याशी महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीचा संबंध नाही. आज संविधान संपविणाऱ्या फॅसिस्ट शक्ती चढाईवर असताना हे सगळे निळे एल्गार एकवटले पाहिजेत. अन्य मित्रशक्तींच्या हातात हात घालून फॅसिस्टविरोधी तसेच व्यवस्थेच्या सम्यक परिवर्तनाचा लढा बुलंद केला पाहिजे. दलित पँथरच्या पन्नाशीनिमित्त तिचा जन्म साजरा करताना तिच्या घडण्या-बिघडण्याची विवेकी चिकित्सा समाजात करुन पुढची दिशा ठरवण्याची संधी घेतली पाहिजे.

यादृष्टीने काही विचारार्थ मुद्देः

मार्क्स आणि गांधींना मानणारे डावे, समाजवादी प्रवाह मार्क्स-गांधींच्या विचारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. तो साधताना मार्क्सला म्हणायचे आहे तेच किंवा गांधीजींना म्हणायचे आहे तेच बाबासाहेबांनाही म्हणायचे आहे, यासाठीची अवतरणे, संदर्भ, उदाहरणे देतात. याला आंबेडकरी विभागातून प्रतिरोध होतो. त्यांच्यातली अस्वस्थता वाढते. या सगळ्यास ऐतिहासिक कारणे आहेत. त्यामुळे समन्वय घालण्याऐवजी या महामानवांच्या प्रवाहांचे सामायिक शत्रू अथवा कार्यक्रम या आधारावर पूरकत्व अधोरेखित करायला हवे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. राजकीय आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींतून उत्क्रांत झालेली तसेच जगभरच्या प्रागतिक चळवळींतून आलेली मूल्ये आम्ही संविधानात सामावली. आज या मूल्यांना आणि देशाच्या वाटचालीचा मूलाधार असलेल्या संविधानाला उद्ध्वस्त करणाऱ्या शक्ती देशाच्या केंद्रस्थानी तसेच समाजमनांत वसलेल्या आहेत. अशावेळी या मूल्यांच्या आणि संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन लढा देणे हे या मूल्यांच्या वारसदारांचे सर्वप्रथम कर्तव्य आहे. यासाठीचे सहकार्य ‘मुद्दा आधारित’ करता येते. त्यासाठी मार्क्स आणि आंबेडकर किंवा गांधी आणि आंबेडकर यांच्यातील मतभिन्नतेचा संपूर्ण निरास होण्याची काहीही गरज नाही. गांधीजींनी एकेकाळी भले वर्णव्यवस्थेला मान्यता दिली असेल. आजचे त्यांचे अनुयायी वर्ण-जातिव्यवस्थेची भलामण करत नाहीत. रक्तरंजित क्रांती, कामगारांची हुकुमशाही याबद्दल विरोधकांचे समज अगदी ढोबळ वा प्राथमिक असतात. ते सरसकट मार्क्सच्या पदरात टाकले जातात. पण त्यांचीही चर्चा आताच्या एकजुटीसाठी तूर्त गरजेची नाही. आजचे दोन्ही प्रमुख कम्युनिस्ट पक्ष संसदीय लोकशाही व्यवहार करत आहेत. जातिअंताच्या बाजूने आहेत. एवढ्या बाबी संयुक्त आघाडीसाठी पुरेशा मानाव्या. यातून सख्य, संवाद वाढला तर या खोल वैचारिक चर्चा मित्रभावी पद्धतीने करता येतील. काही नवे समज पुढे येतील. काही मतभेद तसेच राहतील. पण मनभेद मिटवता येतील.

पँथरच्या लढाईत डावे, समाजवादी यांवरुन खूप महाभारत झाले. पण त्याउपरही या सर्वांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य सुरुच होते. पँथरच्या ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेल्या आठवणींत त्याचे दाखले मिळतात. पँथर फोडायला बाबा आढाव कारण आहेत, असा ढसाळांचा आरोप अखेरपर्यंत राहिला. पण हे बाबा आढाव पँथरला अनेक प्रकारे मदत करत होते. पकडलेल्या पँथर्सना जामीन राहत होते. वरळीच्या मोर्च्यानंतर प्रमुख नेत्यांना अटक करुन पोलीस ठाण्यात बेदम मारले गेले. त्यावेळी मृणाल गोरे त्यांना सोडवायला आल्या. भूमिगत असताना कॉ. जी. एल.-तारा रेड्डींच्या घरी विश्वास व अधिकाराने पँथर नेते लपत असत. लाल निशाण पक्षाच्या श्रमिक कार्यालयाला एस. के. लिमयेंचा मठ म्हणून हिणवणारे पँथर्स त्यांचा मेगॅमाईक हक्काने वापरत असत. पँथरच्या भराच्या काळात डांगे आणि नामदेव ढसाळ यांच्या पुढाकाराने दलित-श्रमिकांचा प्रचंड ऐतिहासिक मोर्चा निघाला होता. अशी उदाहरणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातही आपल्याला आढळतात.

तेव्हा रक्ताची सोयरिक भले नको, पण मित्र म्हणून तरी पुरोगामी प्रवाहांशी निःसंकोच जोडले जायला आजच्या आंबेडकरी चळवळीला अडचण असायचे काही कारण नाही.

बौद्ध म्हणून बुद्धाच्या विचारांचे अनुसरण करताना इतरांच्या आस्थांवर आघात करायचे आज प्रयोजन आणि वेळही नाही. रिडल्स प्रकरणी १९८७ साली आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीने शिवसेनेला माघार घ्यायला लागली. आज बाबासाहेब, फुले यांनी केलेली धर्मचिकित्सा धर्मद्रोह, ईशनिंदा समजली जाण्याचा काळ आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे भिन्न आवाज त्यांचे खून करुन दडपण्याचा प्रयत्न झाला. यांच्या शतपटीने अधिक टोकदार चिकित्सा आंबेडकर, फुले, पेरियार यांनी केली आहे. पण ती त्यावेळी स्वीकारली गेली. आज त्या रीतीची टीका पचू शकत नाही. अशावेळी आजच्या काळात भिन्न मतांबाबत सहिष्णुता, सामाजिक सद्भाव, विरोधी मतांना हिंसेने दडपण्यास विरोध या मुद्द्यांवर समाजमन घडविणे हा चळवळीचा टप्पा आहे. आपण वैचारिक प्रगतीच्या चढाईत घसरुन खाली आलो आहोत, तिथून आपल्याला पुन्हा चढाई करायची आहे, हे वास्तव आपण कबूल करायला हवे. कालचे औषध आज चालणार नाही. कालची भाषा आज चालणार नाही. बसवण्णा, कबीर, रविदास, तुकोबा आदि सर्वांच्या विचारांतल्या पुढे जाणाऱ्या बाबींचा आदर व पुरस्कार बौद्धांनी करणे गरजेचे आहे. उत्तर भारतातले दलित बुद्ध आणि रविदास एकत्र भजतात. त्यांना फक्त बुद्धच स्वीकारा, असे सांगणे हे वैचारिक मागासलेपण आहे.

याउपर प्रत्येक व्यक्तीला संविधानाने श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे, हे आपल्या मनाला पटवणे गरजेचे आहे. अगदी बौद्धांच्या घरात परधर्माची पत्नी, सून येते तेव्हा तिला जबरदस्तीने बौद्ध बनवण्याचा प्रयत्न गैर आहे. तिला तिच्या उपासनेचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आमच्या घरात हे चालणार नाही, असे म्हणणे हे संविधान विरोधी आणि स्त्रीला दुय्यम लेखणे आहे. या नव्याने घरात आलेल्या स्त्रीचेही हे घर आहे, हे कबूल केले पाहिजे. माणसाला मैत्रीने, प्रेमाने जिंकावे सांगणाऱ्या बुद्धाला मानणाऱ्यांनी अशी जबरदस्ती करणे बुद्धाच्या विचारांशी विसंगत आहे. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला पटेल तो धर्म स्वीकारण्याच्या स्वातंत्र्याची ग्वाही देणारे महात्मा फुलेंचे खालील वचन जरुर वाचावेः

‘भूमंडळावर महासत्पुरूषांनी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत त्या सर्वांत त्या वेळेस अनुसरुन त्यांच्या समजुतीप्रमाणे काही ना काही सत्य आहे. यास्तव कोणत्याही कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौद्धधर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तो धर्म स्वीकारावा. तिच्या पतीने बायबल वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे वाटल्यास ख्रिस्ती व्हावे. व त्याच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास महंमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्यांच्या पुत्राने सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे. कोणी कोणाचा द्वेष न करिता सर्वांना निर्मिकाच्या कुटुंबातील आहोत असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकांशी वर्तन करावे. म्हणजे ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या राज्यात धन्य होईल.’ (स्रोतः महात्मा फुले-धनंजय कीर, पान क्र.२८९-९०)

बाबासाहेबांनी समाजबदलाचे लढे देत असताना राजकारण अव्वल मानले. निर्णय घेण्याच्या, धोरण ठरवण्याच्या ठिकाणी म्हणजेच सत्तेत आम्ही असायला हवे. किमान त्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आम्ही तयार करायला हवी, हे बरोबरच आहे. मात्र त्यासाठी बाबासाहेबांनी दिलेली दिशा सोडता कामा नये. आज जातींच्या बेरजा हा सोपा मार्ग आंबेडकरी नेत्यांकडून अवलंबला जातो. जातींच्या बेरजांत त्या त्या जातींतले टगे स्वार्ध साधतात. आपल्या जातीला आपल्या हितासाठी वापरतात. तिच्या जीवावर सत्तेचा सौदा करतात. युती ही मुद्द्यांवर, प्रश्नांवर व्हायला हवी. बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी जेधे-जवळकरांच्या सहकार्यासाठीची ब्राम्हण नको ही अट अमान्य केली. त्यावेळी आम्ही ब्राम्हणांच्या नव्हे, तर ब्राम्हण्याच्या म्हणजे भेदभाव करण्याच्या वृत्तीविरोधात आहोत. ही वृत्ती ब्राम्हण, ब्राम्हणेतर आणि बहिष्कृत या सर्वांत असू शकते, अशी भूमिका बाबासाहेब मांडतात. पुढच्या त्यांच्या सर्व प्रवासांत थेट रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पनेपर्यंत आपल्याला हे सूत्र दिसते. त्यापासून तात्पुरत्या फायद्यासाठी आपण ढळता कामा नये. ज्यांनी अशा जातींच्या बेरजा केल्या, त्याने काय साधले हेही आता आपल्यासमोर आहे. त्यातून बोध घ्यायला हवा.

असे अजूनही बरेच मुद्दे नोंदवता येतील. पँथरच्या माझ्या स्वतःवरील प्रभावाचे वर्णन करुन दलित पँथर या ऐतिहासिक घटिताचा मागोवा कसा घ्यावा याबद्दल तसेच या चळवळीला पुढे नेण्यासाठी काय रीतीने विचार करायला हवा, यासाठी बरेच दीर्घ विवेचन मी केले आहे. पँथरच्या पन्नाशीचा लेखाजोखा मांडताना तूर्त हे पुरेसे आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(अक्षर, दिवाळी २०२२)

Monday, November 7, 2022

आरक्षणाच्या मूळ सूत्राची मृत्युघंटा!

आर्थिक निकषावर आरक्षण वैध ठरवणारा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल 'सामाजिक न्यायासाठी आरक्षण' या आरक्षणामागच्या मूळ भूमिकेची मृत्युघंटा ठरू शकतो.

एकूण आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ, त्यातून अराजक आणि यथावकाश ते पूर्ण निरर्थक करण्याचे हितसंबंधियांचे मनसुबे यातून तडीस जाऊ शकतात.

सामाजिक उतरंडीत खालचे मानले गेलेले आणि त्यामुळे विकासाच्या वाटा अवरुद्ध झालेले समाजविभाग वाऱ्यावर सोडले जाणार आहेत.

पूर्ण निकाल वाचल्यावर याविषयी अधिक नेमके बोलता येईल. पण निकाल देणाऱ्या न्यायाधीशांनी जी वक्तव्ये निकाल देताना केली आहेत, त्यावरुन तूर्त हाच बोध मला झाला. 

निकाल ३ विरुद्ध २ असा आहे. आज निवृत्त होणारे मुख्य सरन्यायाधीश उदय लळीत व न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांनी आर्थिक आरक्षणाच्या विरोधात आपले निकालपत्र दिले. त्यांच्या विरोधाचा तपशीलही नीट अभ्यासावा लागणार आहे.

वास्तविक, स्वत:च्या कमी बुद्धिमत्तेमुळे वा नाकर्तेपणामुळे नव्हे; तर जाणीवपूर्वक धर्म, रुढी यांची हजारो वर्षे बंधने घातल्याने जे मागे राहिले त्यांना सगळ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आरक्षण आहे, हे साधे सूत्र धूसर केले जाते आहे. हे सूत्र नव्या काळाचे संदर्भ लक्षात घेऊन अधिक बळकट होण्यासाठीच्या सूचना, दुरुस्त्या जरुर यायला हव्या. पण त्याने मूळ सूत्र लयाला जाता कामा नये. 

आर्थिक निकषावर आरक्षण हा चटकन पटणारा मुद्दा असतो. पण तो फसवा आहे. त्यासाठी राज्य विविध योजना आणू शकते, फ्रीशिप, स्कॉलरशिप, वसतिगृह, सुलभ कर्ज योजना आदी सहाय्य देऊ शकते. पण तो आरक्षणाचा आधार होऊ शकत नाही. उच्च जातींचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी आणि एकूण समाजमनात मागास जातींविषयी असलेल्या दुजाभावामुळे त्यांना विकासाच्या हर क्षेत्रात संधी नाकारली जाते. त्यातील फक्त सरकारी व सरकार सहाय्यित नोकरी, शिक्षण, राजकीय प्रतिनिधित्व या तीनच क्षेत्रांत कायद्याने काही जागा खास त्यांच्यासाठी राखून ठेवल्या आहेत. वाढत्या खाजगीकरणामुळे त्यांचेही प्रमाण नगण्य होत चालले आहे. 

आर्थिक स्थिती बदलू शकते. पण सामाजिक उतरंडीतले व्यक्तीचे स्थान आर्थिक स्थिती बदलल्याने बदलत नाही. दुसरी एक वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. सामाजिक मागासच आर्थिक दुर्बलांत बहुसंख्य आहेत. आणि त्यांना मात्र न्यायालयाने मान्यता दिलेल्या केंद्र सरकारच्या आर्थिक आरक्षणातून वगळलेले आहे. म्हणजे शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, भटके-विमुक्त यांना वगळून केवळ तथाकथित वरच्या त्रैवर्णिकांना हे आरक्षण मिळणार आहे. यातून जुनी उतरंड कायम व भरभक्कम होण्यालाच चालना मिळणार आहे.

आरक्षणाचे मूळ सूत्र समजण्यात (आपल्या सामाजिक स्थानानेही) गफलत होत असल्याने एरवी पुरोगामी म्हणून एका छावणीत असलेल्यांतही आरक्षणाच्या मुद्द्यावर तट पडतात. 

गेल्या दशकभरात विविध फाटे फोडून प्रतिगामी, पुरोगामी, कायदेतज्ज्ञ, बुद्धिवंत, राजकीय नेते या सगळ्यांनीच आरक्षण विषयक भूमिकेचा गुंता करून टाकला आहे. 

या ताज्या निकालाने हा गुंता अधिकच वाढणार आहे. आरक्षण विरोधकांच्या ते पथ्यावरच पडणार आहे. ...आणि खऱ्या मागासांच्या मूळावर येणार आहे.

- सुरेश सावंत

Thursday, October 13, 2022

Natchathiram Nagargiradhu : आंबेडकरी विचारविश्वाची साक्ष

परवा पुण्यात सुनीलच्या ( Sunil Gajakosh ) घरी Natchathiram Nagargiradhu हा सिनेमा Netflix वर पाहिला. मला हा सिनेमा आल्याचे ठाऊक नव्हते. त्याने सुचवले आणि आम्ही दोघांनी तो पाहिला. एक श्रीमंत अनुभव दिल्याबद्दल सुनीलला धन्यवाद. 

तामिळ भाषा. इंग्रजी उपशीर्षके. संवादात सूचकता, विविध संदर्भ आणि खोल अर्थ असल्याने थांबून थांबून ते वाचत, समजून घेत, चर्चा करत पुढे जात राहिलो.

सिनेमातील नायिकेला तिचा सहकारी मित्र विचारतो - "तू कम्युनिस्ट आहेस?" ती उत्तरते - "आंबेडकरवादी."

आंबेडकरवादी परिप्रेक्ष्यातून जात, लिंग, आर्थिक आदी माणूसपण हिरावून घेणाऱ्या विविध विषमतांच्या विरोधातला विद्रोह, स्त्री-पुरुष संबंधातल्या रुढ मान्यतांना धडका, त्यांतील गुंतागुंत, व्यवस्थेतील अनेकविध ताण आणि या सर्वांतून प्रेम, मैत्री, समता यांचा जागर मांडणारा हा कलात्मक आविष्कार मनाचा तळ ढवळतो तसेच समृद्ध करतो. 

आशय आणि रुपबंध यांच्या एकात्मतेचा हा विलक्षण प्रयोग अत्यंत प्रत्ययकारी आहे. रंगभूमीवरील प्रायोगिक नाटक आणि चित्रपट या दोन्हींच्या सामर्थ्यांचे यातील अद्वैत उच्च दर्जाचा कलात्मक अनुभव देतो. समाज परिवर्तनाच्या जाणीवा देणाऱ्या कलाकृती या प्रचारी असतात, त्या कलात्मक निकषांवर कमी पडतात, या आरोपाला मूठमाती देणारा हा चित्रपट आहे. 

आंबेडकरी विचारविश्वाला (त्यात बुद्ध अविभाज्य आहे) केवळ दलित उठावाच्या सीमेत बद्घ करणाऱ्या नजरांना या सिनेमात मधून मधून येणाऱ्या अथांग अवकाशातील  तारकापुंज दिपवल्याशिवाय तसेच त्यातून आकस्मिक होणारे उल्कापात चकित केल्याशिवाय राहणार नाहीत. बुद्धमार्गी आंबेडकरी विचारविश्व अवघी मानवता कवेत घेते, याची साक्ष देणारा हा सिनेमा आहे.

आंबेडकर आणि बुद्ध यांच्या प्रतिमा व विचार ज्योती प्रच्छन्न नव्हे, तर उघडपणे हाती घेऊन प्रस्थापित सिनेविश्वात आपले अव्वल स्थान पक्के करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रालाही दखल घ्यायला लावण्याची क्षमता असणारा पा. रंजित हा तरुण दिग्दर्शक खरोखर थोर आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा!!

Thursday, September 29, 2022

संविधानातील मूल्यांची ओळख

आकाशवाणीवर २१ ते २४ सप्टेंबर २०२२ या काळात झालेल्या प्रत्येकी ४ मिनिटांच्या ४ भाषणांची टिपणे
भाग १

आपण नुकतीच भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी केली. या स्वातंत्र्यासाठीच्या महान संग्रामात, इंग्रजांशी लढत असतानाच, स्वतंत्र भारत कसा घडवायचा, याचा आराखडाही बनवला जात होता. स्वातंत्र्य लढ्याच्या सोबतच सामाजिक सुधारणांची चळवळ सुरु होती. त्यातून नवी मूल्यं विकसित होत होती. त्यामुळे हा आराखडा अधिक समृद्ध होत होता. या विचारांचा, मूल्यांचा समावेश आपल्या संविधानात केला गेला.

म्हणूनच, भारताचं संविधान ही केवळ राज्यकारभाराची नियमावली नव्हे. किंवा या कारभारातील विविध घटकांचं स्वरुप स्पष्ट करणारा फक्त एक दस्तावेज नव्हे. हे तर त्यात आहेच. मात्र त्या पलीकडे भारतीय जनतेच्या आकांक्षांचा तो संकल्प आहे. भारत कसा घडवायचा, त्यातील जनतेचं सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन कसं समृद्ध करायचं, भारतीय जनतेत परस्पर भ्रातृभाव, भगिनीभाव वा सहभाव कसा वृद्धिंगत करायचा याचं दिग्दर्शन आपल्या संविधानात आहे.

संविधानातील ३९५ कलमं, २२ भाग आणि १२ अनुसूची यांमधून संविधानातील विचार किंवा मूल्यं शोधायची कशी? ...यासाठी संविधानकारांनी आपली सोय करुन ठेवली आहे. ती म्हणजे उद्देशिका. तिला प्रास्ताविका, सरनामा असंही म्हटलं जातं. संविधानाच्या प्रारंभी असलेल्या या उद्देशिकेत संविधानाचं सार आहे. त्याचा विस्तार संविधानातल्या विविध कलमांत आढळतो. संविधानाचं तत्त्वज्ञान, विचार, मूल्यं या एका वाक्याच्या उद्देशिकेत सामावलं आहे. ..हो, ही उद्देशिका एका वाक्याची आहे. ओळी अनेक दिसत असल्या तरी वाक्य एकच आहे. या एका वाक्यातले विविध शब्द ही मौलिक रत्नं आहेत. या रत्नांचा एका वाक्याच्या सूत्रात गुंफलेला हा मौल्यवान रत्नहार आहे. ही उद्देशिका समजणं म्हणजे संविधानाचं मर्म समजणं होय.

लोकशाहीत जनता सर्वोच्च असते. निवडणुकीद्वारे जनता आपले प्रतिनिधी पाठवून राज्य करत असते. हे प्रतिनिधी उद्दिष्टांनुसार कारभार करतात की नाही, यावर जनतेचं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणूनच, हे राज्य ज्या संविधानावर चालतं, ते संविधान समजून घेणं, किमान उद्देशिका समजून घेणं ही आपल्या नागरिकत्वाची पूर्वअट आहे. यादृष्टीने, उद्देशिकेत नमूद केलेल्या संकल्पना आणि मूल्यं यांचा पुढील चार भागांत आपण थोडक्यात परिचय करुन घेणार आहोत.

‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांपासून आपल्या संविधानाची उद्देशिका सुरु होते. देशाचं जे काही बरंवाईट करायचं, त्याचे सर्वाधिकार भारतीय नागरिकांच्या हाती आहेत. संविधानातली प्रत्येक बाब संविधान सभेत चर्चा होऊन संमत झाली आहे. उद्देशिकेवरही चर्चा झाली. त्यावेळी काही सूचना आल्या. संविधानाचं कामकाज सुरु असतानाच गांधीजींची हत्या झाली होती. त्यांचं हौतात्म्य आणि राष्ट्रपिता म्हणून जनतेच्या मनात असलेलं त्यांचं स्थान लक्षात घेता, उद्देशिकेच्या प्रारंभी, महात्मा गांधीजींच्या प्रति कृतज्ञता अर्पण करण्याची सूचना एका सदस्यानं केली. त्याला गांधीजींच्या अनुयायांकडूनच विरोध झाला. गांधीजी कितीही महान असले, त्यांचे देशावर कितीही उपकार असले तरी, अशा नोंदीमुळे लोकांऐवजी एखाद्या व्यक्तीला विशेष महत्व संविधानात मिळतं. ते होऊ नये, जनतेचंच स्थान आणि अधिकार अव्वल राहावा, यासाठी राष्ट्रावर अनंत उपकार असलेल्या महान व्यक्तीच्याही नावाचा उल्लेख उद्देशिकेत करणं आपण नाकारलं.

आम्ही भारताचे लोक या उद्देशिकेत जो संकल्प करत आहोत, त्यातील पहिला संकल्प भारत घडवण्याचा आहे. भारत कसा घडवणार आहोत? ..तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य पद्धतीचा. या प्रत्येक मूल्याचा तसेच उद्देशिकेतील आणखी काही संकल्पनांचा अर्थ आपण पुढील भागात समजून घेऊ.

====


भाग २

संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या देशाच्या स्वरुपाविषयीच्या मूल्यांची चर्चा या भागात आपण करुया.

आपला देश सार्वभौम असेल. सार्वभौम याचा अर्थ आमच्या देशावर आता इंग्रजांसारख्या कोणत्याही परकीय शक्तींचं नियंत्रण असणार नाही. तसेच देशाच्या अंतर्गत असलेल्याही कोणा समूहाचं वा शक्तीचं देशावर नियंत्रण असणार नाही. नियंत्रण असेल ते फक्त आणि फक्त भारतीय जनतेचं. एखाद्या राजकीय पक्षाला अथवा पक्षांच्या आघाडीला ५ वर्षे देशाचा कारभार करण्यासाठी जनता निवडते. तथापि, या काळापुरतं का होईना, सत्ताधारी पक्ष म्हणजे देशाचे मालक नव्हेत. अंतिम सत्ताधारी जनताच असणार.

देशाच्या स्वरुपाचं वर्णन करणारी दुसरी संकल्पना आहे - समाजवाद. जंगल, जमीन, उद्योग, खाणी आदि उत्पादनाची साधनं खाजगी मालकीची न राहता, ती समाजाच्या, पर्यायाने सरकारच्या मालकीची असणं आणि येणाऱ्या उत्पन्नाचं समाजात न्याय्य वितरण करणं म्हणजे समाजवाद. - हा समाजवादाचा अभिजात अर्थ. आपल्या देशातला समाजवाद असा अभिजात नाही. खाजगी आणि सरकारी मालकीची संमिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली. मात्र एकूण आर्थिक धोरणात इथल्या गरीब, कष्टकरी, वंचित समूहांच्या विकासाला प्राधान्य असेल, असं आपण ठरवलं. कमाल जमीन धारणेसारखे कायदे आणून आपण भूमिहिनांना जमिनीचं वाटप केलं, ते याच धोरणातून. संपत्तीचा संचय एका जागी होऊ न देता उपजीविकेच्या साधनांचं न्याय्य वितरण करण्याचं मार्गदर्शक सूत्र संविधानात आहे. आपला समाजवाद हा या प्रकारचा आहे.

धर्मनिरपेक्षता हे देशाच्या स्वरुपाचं वर्णन करणारं तिसरं मूल्य. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला धर्माचं पालन, त्याचा प्रसार आणि त्याची उपासना करण्याचं स्वातंत्र्य असेल. तथापि, शासनाचा कोणताही धर्म नसेल. व्यक्तीला असलेलं धर्म स्वातंत्र्य निरंकुश नाही. सार्वजनिक सुव्यवस्था, आरोग्य, नैतिकता तसेच अन्य मूलभूत अधिकारांना हानी पोहोचणार नाही या अटी त्यात आहेत. धर्म पालनाबरोबरच धर्म न पाळण्याचाही अधिकार इथं गृहीत आहे. उद्देशिकेच्या प्रारंभी ‘ईश्वरास स्मरुन’ असं लिहावं, अशीही एक सूचना संविधान सभेत आली होती. ही सूचना बहुमतानं फेटाळली गेली. ही सूचना फेटाळणारे बहुसंख्य सदस्य काही निरीश्वरवादी नव्हते. मात्र शासनाचा कोणताही धर्म नसेल याबाबत या सर्वांची सहमती होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत झालेल्या विचारमंथनातून ही सहमती आकारास आलेली होती.

लोकशाही हे देशाचं स्वरुप नोंदवणारं चौथं मूल्य. प्रौढ आणि सार्वत्रिक मतदानानं लोकप्रतिनिधींची निवड आणि त्यातील बहुमताच्या गटाचं सरकार ही संसदीय लोकशाहीची प्रणाली आपण स्वीकारली. कायदा करताना ज्यांच्याविषयी तो कायदा आहे, त्या समाज घटकांकडून सूचना घेऊन, विरोधकांना विचारात घेऊन शक्य तितकी सहमती करुन तो मंजूर करायचा ही सांविधानिक नैतिकता सरकारनं पाळणं गरजेचं असतं. तरच लोकशाही अर्थपूर्ण होते. लोकशाही हे शासनाच्या कारभाराचं तसेच लोकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनाचंही मूल्य आहे.

देशाच्या स्वरुपाविषयीचं पाचवं आणि शेवटचं मूल्य – गणराज्य. सत्तेशी संबंधित कोणतंही पद वंशपरंपरागत नसणं म्हणजे गणराज्य. इंग्लंडमध्ये लोकशाही आहे. पण तिथं आतापर्यंत राणी होती. आता राजा आहे. राणी वा राजा वंशपरंपरागत असतात. आपल्याकडे राष्ट्रपतींची निवडणूक होते. म्हणूनच इंग्लंड हा लोकशाही देश आहे; पण ते गणराज्य नाही. भारत हे लोकशाही गणराज्य आहे.

पुढच्या दोन भागांत आपण देशातील नागरिकांना बहाल केलेले न्याय, स्वातंत्र्य, समता हे अधिकार आणि त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या बंधुतेच्या अटीची चर्चा करणार आहोत.

====


भाग ३

आम्ही भारताचे लोक आम्हा भारतीय जनतेला कोणते अधिकार प्रदान करत आहोत, त्याची चर्चा या भागात आपण करुया.

भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्यायाची हमी दिलेली आहे. हा न्याय तीन प्रकारचा आहे. पहिला सामाजिक, दुसरा आर्थिक आणि तिसरा राजनैतिक. हा क्रमही महत्वाचा आहे. गरीब असो वा श्रीमंत, तथाकथित उच्चवर्णीय असोत वा अनुसूचित जाती-जमातीचे लोक, स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला मतदानाचा तसेच निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. निवडणुकांत पैश्याची आमिषं, जाती-पातीची आवाहनं या न्यायात अडथळा आणत असली तरी, हा न्याय बऱ्याच अंशी प्रत्यक्षात येतो. या आधीचे दोन न्याय - सामाजिक आणि आर्थिक, अजून अपुरे आहेत. अनेक महत्वाचे कायदे झाले आहेत. त्यांचा उपयोग होतो. आधारही मिळतो. तथापि, सामाजिक भेदभाव आजही तीव्र आहे. जातींची उतरंड कायम आहे. अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, स्त्रिया यांच्यावरील अत्याचार थांबलेले नाहीत. सामाजिक न्यायाचा मुक्काम बराच दूर आहे. त्यासाठी समाजाची मानसिकता घडवण्याचं मोठं काम करत राहावं लागणार आहे.

आर्थिक विषमता तीव्र होते आहे. कोविडच्या काळात स्थिर आणि उच्च उत्पन्न असलेल्यांना फारशी झळ पोहोचली नाही. तथापि, हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती शोचनीय झाल्याचं आपण पाहिलं. आर्थिक विषमता वाढत राहिली तर महत्प्रयासानं उभारलेली आपली ही लोकशाहीची इमारत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिला होता. तो लक्षात घेणे गरजेचे आहे.

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ही पाच प्रकारची स्वातंत्र्यं संविधानानं दिली आहेत. ही स्वातंत्र्यं इतरांच्या याच स्वातंत्र्यांना धक्का न पोहोचवता भोगावयाची आहेत. विशिष्ट विचाराचा स्वीकार आणि त्या विचाराची भाषण, लेख, नाट्य, सिनेमा, कथा, कविता, चित्र आदि माध्यमांद्वारे अभिव्यक्ती करणं याचा व्यक्तीला अधिकार आहे. वास्तविक, भारतीय परंपरा ही परस्परांच्या आस्थांचा आदर राखणारी आहे. हा आदर राखून धर्ममतांची चिकित्सा करण्याचा संदेश देणारे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. मध्ययुगात कबीर, रविदास, तुकोबा, जनाबाई, बुल्लेशहा आदि संतांनी कर्मकांडावर आघात केलेत. ब्रिटिश काळात नवशिक्षण घेतलेल्या पिढीतील महात्मा फुले, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे वगैरे समाज सुधारकांनी हे चिकित्सेचं प्रबोधन खूप पुढं नेलं.

मात्र आज लोकांच्या धार्मिक-जातीय भावना फारच हळव्या झालेल्या दिसतात. त्याचा फायदा संविधानातील मूल्यांचे विरोधक घेतात. भिन्न मतं मांडणाऱ्यांना धमक्या देतात. प्रत्यक्ष हिंसेवर उतरतात. टीकेला उत्तर टीका हेच आहे. मतभेद असलेल्यांना धमक्या वा हिंसा हे उत्तर कदापि असता कामा नये. ‘वादे वादे जायते-तत्त्वबोधः’ हे प्राचीन विचारसूत्र आपल्या संविधानानंही अधोरेखित केलं आहे. ते धोक्यात येणं हे समाजाच्या पतनाचं लक्षण आहे. आधी मनांचं आणि नंतर देशाचं विघटन होतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

ही स्वातंत्र्यं व्यक्तीला दिलेली आहेत. उदाहरणार्थ, प्रौढ स्त्री-पुरुषांना पसंतीचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यांच्या जातीच्या वा धर्माच्या समूहाने त्यात बाधा आणता कामा नये. आपापले धर्म कायम ठेवून विशेष विवाह कायद्याखाली लग्न करता येतं. अशा लग्नांना प्रोत्साहन, संरक्षण आणि सहाय्य देणं हे शासनाचं कर्तव्य आहेच. पण समाजानेही ते मनापासून स्वीकारणं आवश्यक आहे. समाजाच्या निरामय वाढीसाठी ते गरजेचं आहे.

====

भाग ४

या शेवटच्या भागात आपण समता आणि बंधुता या संविधानातल्या मूल्यांचा परिचय करुन घेणार आहोत.

देशातील प्रत्येक नागरिकाचा धर्म, लिंग, जन्मस्थान, भाषा कोणतीही असो, हे सर्व नागरिक कायद्यापुढे समान असतील आणि त्या सर्वांना कायद्याचं समान संरक्षण असेल. तथापि, समता म्हणजे एवढंच नव्हे. संविधानाच्या उद्देशिकेत समतेचा उल्लेख करताना ‘दर्जाची व संधीची समानता’ असं म्हटलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा दर्जा वा मूल्य समान असेल. या सर्वांना विकासाची संधी समान असेल. पाच-सहा वर्षांपूर्वीचा प्रसंग. महाराष्ट्रातील दोन धर्मस्थळांत पुरुषांना जिथवर प्रवेश दिला जातो, तिथवर आम्हालाही प्रवेश द्या, अशी त्या त्या धर्मातल्या महिलांनी मागणी केली होती. या मागणीच्या मागे स्त्री आणि पुरुष या दोहोंचा दर्जा संविधानानं समान मानला आहे, हे सूत्र होतं. बरीच आंदोलनं या महिलांनी केली. नंतर न्यायालयात त्यांनी दाद मागितली. न्यायालयानं संविधानातील दर्जाच्या समानतेचं तत्त्व प्रमाण मानून या महिलांच्या बाजूनं न्याय दिला.

समान संधी याचा अर्थ तगडे आणि दुबळे यांची एकाच रेषेवरुन स्पर्धा लावणं नव्हे. यात तगडे जिंकणार हे उघडच आहे. समाजातील संसाधनं तसेच विकासाच्या संधी यांत खुली स्पर्धा ठेवली, तर समाजातील ताकदवान व्यक्ती वा समूहच त्यांवर कब्जा करतील आणि दुबळ्या व्यक्ती वा समूह वंचित राहतील. त्यांच्या प्रति न्याय होणार नाही. म्हणून अशा दुबळ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी, सवलती, राखीव जागा यांची व्यवस्था सरकार करतं. ही सकारात्मक विषमता खरी समता अस्तित्वात येण्यासाठी गरजेची आहे. अर्थात, दुबळे अन्य सशक्तांबरोबर स्पर्धा करायला तयार होईपर्यंतच ही वेगळी तरतूद, सवलत वा राखीव जागा असणार आहेत.

बंधुतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनन्यसाधारण महत्व देतात. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ही एक तत्त्वत्रयी ते मानतात. यातलं कोणतंही एक वगळून चालणार नाही. बंधुता नसेल तर न्याय, स्वातंत्र्य, समता यांच्या रक्षणासाठी पोलीस ठेवायला लागेल असं ते म्हणतात. समाजातील व्यक्तींना परस्परांबद्दल आपुलकी, ममत्व नसेल, तर दुसऱ्याचं दुःख कळणार कसं? ते कळलं नाही तर त्यावर उपाय करायला पुढं येणार कसं? समाजातले दुबळे, उपेक्षित समूह, अल्पसंख्य, स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अन्यायानं मन कळवळलं तरच त्यांच्या संरक्षणासाठी लोक पुढे येतील. या विभागांबद्दल जर मनात विद्वेष, नफरत असेल, तर त्यांनाही न्याय मिळावा, त्यांनाही समान दर्जा व संधी मिळावी, त्यांनाही सर्व प्रकारची घटनादत्त स्वातंत्र्यं मिळावीत, यासाठी प्रयत्न वा सदिच्छाही राहणार नाही. अशावेळी संविधानानं या विभागांना दिलेले अधिकार संविधानातच राहतील. ते प्रत्यक्षात येणार नाहीत.

‘व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता’ अशी शब्दरचना उद्देशिकेत आहे. यातील क्रम महत्वाचा आहे. इथं व्यक्ती प्रथम आहे. व्यक्तीचं सुख हा आपल्या संविधानाचा केंद्रबिंदू आहे. या व्यक्तीसाठी राष्ट्र आहे. राष्ट्रासाठी व्यक्ती नव्हे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता आवश्यक आहे, ती व्यक्तीच्या भल्यासाठी. हे सूत्र कळलं, तर ‘राष्ट्र म्हणजे भूप्रदेश नव्हे; तर तेथील लोक’ आणि या लोकांचं कल्याण म्हणजेच राष्ट्रकल्याण हे आपल्या मनात दृढ होईल.

संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांच्या या ओळखीतूनच आपल्या भारतीयत्वाची ओळख सिद्ध होते, हे आपल्या ध्यानी आलं असेलच.

====

हिजाब काढणे व घालणे या दोहोंतील सक्तीच्या मी विरोधात


मुस्लिम मुली हिजाब घालतात तो त्यांचा अभिमानाचा मुद्दा माझ्या दृष्टीने नक्कीच नाही. तो पुरुषी वर्चस्वाचाच धर्मातला भाग आहे. तो जायला हवा, हेच माझे मत आहे. पण तो निर्णय त्या मुलींचा हवा. त्यासाठीचे प्रबोधन व संघर्ष त्या समाजांतर्गत व्हायला हवा. इराण मध्ये तो सुरु आहे. त्याचे मी स्वागत करतो. हिजाबच्या सक्तीपायी महसा अमिनी या इराणी युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्या विरोधात इराणमध्ये तेथील प्रतिगामी राजवटीविरुद्ध जो प्रक्षोभ उसळला आहे, ते समाजाला पुढे नेणारे पाऊल आहे, असेच मला वाटते. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे.
तथापि, "जब मुस्लिम देश ईरान में हिजाब के खिलाफ उठ रही आवाज तो फिर हिंदुस्तान में इसके समर्थन में हंगामा क्यों?" हा प्रश्न उपस्थित करणारे एकतर सरळ मार्गी आहेत, अज्ञानी आहेत किंवा मतलबी. इराण व भारत येथील स्थिती एक नाही. दोन्ही समाजातले ताणेबाणे व वर्तमान अंतर्विरोध सारखे नाहीत.
इराणमध्ये एकाच धर्मातल्या कर्मठ व प्रगतीशील या दोन गटांत संघर्ष आहे. भारतात हिंदू कट्टरपंथी हा तिसरा आणि सर्वाधिक ताकदीचा घटक आहे. जो सर्वार्थाने प्रतिगामी आहे. सर्व प्रगतीशील मूल्यांचा तो शत्रू आहे. त्याचा शासन-प्रशासनावरही प्रभाव आहे. त्याचा शिक्षण संस्थांत मुलींनी हिजाब घालण्याला विरोध हा सेक्युलॅरिझम वरील विश्वासापायी नसून मुस्लिम द्वेषातून आहे. 'हे हिंदू राष्ट्र आहे. इथे मुस्लिमांनी मापात राहा', असे ते मुस्लिम मुलींच्या हिजाबला विरोध करण्याच्या मिषाने बजावत आहेत. मुस्लिम मुलींविषयी कणव वा न्याय ही त्यांची भावना नाही.
अशावेळी परधर्माचे कोणी मला जबरदस्तीने मी ज्याला (अज्ञान, रुढी याने का होईना) मानबिंदू मानते, ती बाब काढायला सांगत असेल तर मी त्या बाबत अधिकच आग्रही राहणार. कारण तो माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, पर्यायाने माझ्या अस्तित्वावरचा घाला आहे, असे मी मानते. कर्नाटकातल्या मुलींची ही मनःस्थिती समजून घ्यायला हवी.
त्यामुळे इतरांना हानी न पोहोचवणाऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे ही भूमिका या स्थितीत योग्य राहील. यात हिजाब नाकारणाऱ्या इराण मधील मुस्लिम स्त्रिया आणि हिजाब हवा म्हणणाऱ्या भारतातील मुस्लिम मुली या दोहोंच्या व्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबा द्यावा लागेल. यात मला विसंगती दिसत नाही.
इराणमध्ये महिला एकाच शत्रूशी लढत आहेत. भारतात मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही कट्टरपंथीयांशी एकाच वेळी लढायचे कसे? एकाला विरोध करताना दुसऱ्याला त्याचा फायदा होता कामा नये, यासाठीची रणनीती काय? कार्यक्रम काय? ...हा पेच सोडवण्याचे परिणामकारक मार्ग पुढे येईपर्यंत व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्याला धरुन दोन्ही देशांतील मुस्लिम महिलांना पाठिंबा देण्याची माझी भूमिका राहील. त्याचवेळी हितचिंतक म्हणून हळुवारपणे, जमेल तसे, जमेल तिथे, जमेल तेवढे, हिजाब घालणे ही गुलामी आहे, हेही नोंदवण्याचा प्रयत्न मी करत राहणार.
- सुरेश सावंत

'धर्म आणि संविधान' पुस्तिकेचे प्रकाशन

'दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अन्नपूर्णा परिवार' साठी मी लिहिलेल्या 'धर्म आणि संविधान' या पुस्तिकेचे आज अन्नपूर्णा परिवाराच्या वारजे, पुणे येथील सभागृहात प्रकाशन झाले. यावेळी अन्नपूर्णा परिवाराच्या प्रमुख मेधाताई सामंत, कॉ. सुरेश धोपेश्वरकर, प्रमोद मुजुमदार, वृषाली मगदूम तसेच संस्थेचे अन्य विश्वस्त मंचावर उपस्थित होते. तत्पूर्वी 'धर्म, धार्मिकता आणि धर्मांधता' या विषयावर प्रमोद मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात नीलम पंडित, संकेत मुनोत, परिमल माया सुधाकर, तमन्ना इनामदार व प्रशांत केदारी हे वक्ते होते.
_______

धर्म आणि संविधान
सुरेश सावंत
पृष्ठे : ८० | किंमत : ६० रु.
_______

पुस्तिका मिळण्याचे ठिकाण :

दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अन्नपूर्णा परिवार, सुवास्तू प्रेस्टिज, आदित्य गार्डन सिटी जवळ, मेघमल्हार सोसायटी शेजारी, आर. एम. डी. इन्स्टिट्यूटच्या मागे, मुबई - गोवा हायवे जवळ, वारजे, पुणे - ४११०५८
मो. क्र.: ९३७२७१५४२१; ९९२२९६७०००

काही काळात खालील वेबसाईटवर मोफत download करण्यासाठी पुस्तिका उपलब्ध होईल :
यथावकाश या पुस्तिकेचा इंग्रजी अनुवादही प्रकशित होणार आहे आणि तोही वरील वेबसाईटवर उपलब्ध होईल.

Monday, May 2, 2022

सोलापुरातील बाबासाहेबांची चळवळ


गूगलच्या नकाशात एका मोठ्या भूभागातील छोटे ठिकाण आकार वाढवून (zoom in) आपण पाहतो तेव्हा त्यातील अनेक बारीक तपशील आपल्यासमोर येतात. थोरांच्या चरित्राचेही तसेच असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र चरित्र आपण वाचलेले असते. त्यात चळवळीच्या निमित्ताने भेटी दिलेल्या, काही कार्यक्रम घेतलेल्या शहरांचे, गावांचे उल्लेख येतात. तथापि, त्यांचे विस्तृत वा सखोल विवेचन, वर्णन तिथे नसते. ते शक्यही नसते. मात्र असे तपशील कळले तर बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या भूमिकांविषयी, आंदोलनाविषयी, संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या ताकदीविषयी अधिक जाणता येऊ शकते. ही उणीव भरुन काढण्याचे प्रयत्न अभ्यासकांनी, त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी करावयाचे असतात. पण तसे होतेच असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या महाराष्ट्रातील विविध भागांतील संचाराविषयी तेथील मंडळींनी तपशील गोळा करुन असे काही लिहिल्यास बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, तेथील जनतेच्या प्रेरणा व स्पंदनांविषयी बऱ्याच बाबी उजेडात येऊ शकतील, अधिक ठळक होतील. हे घडू शकते, अगदी प्रभावीपणे घडू शकते, याचा नमुना म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचे ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. पुस्तकाच्या शीर्षकाखाली अधिक स्पष्टतेसाठी ते नोंदवतात – ‘रमाई आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले सोलापूर.’ सोलापुरातील बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारे हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे. वयाच्या ऐंशिव्या वर्षी कोविडच्या काळात दत्ता गायकवाड हा प्रकल्प हाती घेतात व विविध संदर्भ शोधत, अभ्यासत तडफेने पूर्ण करतात, हे विशेषच म्हणावे लागेल आणि त्यासाठी त्यांना धन्यवादच द्यावे लागतील.

पुस्तकाच्या परिचयादाखल काही बाबींची नोंद इथे करत आहे.

१९२४ ते १९५४ या कालखंडातील सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतील वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातील विविध भागांतील या नोंदी आहेत. पहिल्या प्रकरणात बार्शीच्या भेटींविषयी लिहिताना १९२४, १९३७ व १९४१ अशा तीन भेटी बाबासाहेबांनी बार्शीला दिल्याचे ते सांगतात. २४ साली बाबासाहेब ३३ वर्षांचे युवक होते. मात्र त्याही वयात दलित जनतेने त्यांना आपल्या उद्धारकर्त्याचे स्थान दिले होते. ‘बाबासाहेब कोण हाय – दलितांचा राजा हाय’ ही घोषणा प्रत्येक भेटीवेळी लोक देताना दिसतात. आपल्या उद्धारकर्त्याला बघण्यासाठीची लोकांची आतुरता, त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून लोकांची साधनांची कमतरता असलेल्या त्या काळातली धडपड यांचे चित्रदर्शी वर्णन या पुस्तकात आहे. बाबासाहेब येणार आहेत हे कळल्यावर त्या गावातील लोक आपल्या अन्य गावांतील सोयऱ्याधायऱ्यांना आमंत्रित करत असत. बाबासाहेब कितीही विरोध करत असले, तरी लोक पाया पडायला धडपडत असत. समता सैनिक दलाचा बंदोबस्त असतानाही एक बाई एका स्वयंसेवकाच्या पायातून शिरली व बाबासाहेबांच्या चरणांवर पडली. मरिआईच्या कट्ट्यावर बाबासाहेबांनी सभा घेतल्याची कोंडाबाई कांबळे या वयोवृद्ध बाईंची आठवण लेखक नोंदवतात. एके ठिकाणी बाबासाहेबांना उतरण्यासाठी योग्य जागा नव्हती म्हणून शाळेतला एक वर्ग स्वच्छ केला जातो. तिथे गादी, पलंग घातला जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी दलित समाजातील तरुण पहिलवान चहुबाजूंनी रात्रभर पहारा देतात. त्या काळात लोकांच्या बाबासाहेबांच्या प्रति काय भावना आहेत, याचा अंदाज आपल्याला असतो. पण त्याचे हे तपशील वाचल्यावर आपणास त्याची अचंबित करणारी प्रचिती येते.

मोठ्या चरित्रात छोट्या घटना व त्यातील मानवी संबंध फारसे व्यक्त होत नाहीत. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई गरोदर असताना त्यांची प्रकृती खालावली होती. हवापालटासाठी मुंबईच्या बाहेर नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी सोलापुरातील बावी येथे रमाई सहकुटुंब राहिल्या होत्या. सत्यशोधकी विचारांच्या वालचंद कोठारींनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केले होते. त्या वसतिगृहात रमाई उतरल्या होत्या. निंगप्पा ऐदाळे हे आधी शाहू महाराजांकडे असलेले बाबासाहेबांचे सहकारी वसतिगृहाची व्यवस्था पाहत असत. त्यांची पुतणी गंगुबाई या रमाईंच्या सहवासात होत्या. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात रमाईंविषयीच्या या काळातील आठवणी लिहिल्या आहेत. त्यातील एक अवतरण लेखकांनी या पुस्तकात दिले आहे. इतिहास लेखनाचे हे स्रोत गायकवाडांनी उजेडात आणले आहेत. अन्यथा ते अंधारातच गुडूप झाले असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य चळवळीचे विरोधक आणि निजामाचे हस्तक होते, हे दोन आरोप आजही हितसंबंधी मंडळी करत असतात. हे दोन्ही आरोप बिनबुडाचे आहेत, हे बाबासाहेबांच्या भूमिकांचे वस्तुनिष्ठ परिशीलन करणाऱ्यांना लक्षात येते. या पुस्तकात २२-२३ फेब्रुवारी १९४१ च्या सोलापुरातील कसबे तडवळे येथे झालेल्या महार मांग परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातील काही उतारे आहेत. त्यातील एक खाली देत आहे. त्यावरुन या आरोपांचा फोलपणा आपल्याला सहज ध्यानात येतो. या परिषदेत बाबासाहेब म्हणतात -

“निजाम हा आपल्या मातृभूमीचा शत्रू आहे. ही गोष्ट अस्पृश्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हिंदी संघराज्यात सामील होण्याला निजामाचा विरोध आहे. ...त्याबद्दल त्याची गय करता कामा नये. तसेच निजाम हा अस्पृश्यांचा आणि अस्पृश्यांच्या मातृभूमतीचा शत्रू आहे. म्हणून हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्यप्रिय दलितांनी हैद्राबाद संस्थान हिंदी संघराज्यात सामील करण्यासाठी झटावे.”

अशा परिषदांमध्ये व्यापक धोरणासंबंधी तसेच स्थानिक प्रश्नासंबंधीचे ठराव होत असत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या प्रेरणेबरोबरच शिक्षण, संघटन व राजकारण यांची अपरिहार्यता समजून सांगत. त्या त्या वेळच्या ऐरणीवर आलेल्या (उदा. महार वतन खालसा करण्याची गरज) मुद्द्यांविषयी सविस्तरपणे समजावत असत. वैज्ञानिक दृष्टी असलेला नवा माणूस घडविण्यासाठी जुनाट अंधरुढींवर ते प्रहार व त्याचे प्रात्यक्षिक करत असत. या परिषदांच्या वेळी गोसावी, पोतराज, माळकरी, जटाधारी यांनी आपापल्या अंगावरच्या माळा, आभरान, भगव्या कफन्या स्टेजजवळच्या खड्ड्यात टाकून त्यावर रॉकेल ओतून त्यांचे दहन केल्याचे प्रसंग लेखकाने चितारले आहेत. देवदासींनी आपल्या जटा कापून त्यांना जाळल्याचेही प्रसंग यात आहेत. या परिषदांवेळी प्रबोधनात्मक जलसे होत. या जलशांत काही ठिकाणी स्टेजवर महिला सहभागी झाल्याचीही नोंद या पुस्तकात आहे. पाण्यासाठी अस्पृश्यांची स्वतंत्र विहीर बांधली जाते. तिला ‘आंबेडकर बावडी’ नाव पडते. या विहिरीचे उद्घाटन बाबासाहेब करतात. त्यांच्या हातून पाणी पिण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. हाही प्रसंग लेखकाने नोंदवला आहे. बाबासाहेबांच्या विचार-प्रेरणेची ऊर्जा माणसाचे माणूसपण कसे जागे करते त्याची कैक उदाहरणे सोलापुरातील या हकिगतींत आढळतात.

येवल्याला १९३५ साली धर्मांतराची घोषणा होण्यापूर्वी त्याबाबतचे सूतोवाच कितीतरी आधी सोलापुरात बाबासाहेब करतात. सोलापूरची मिल मालकाने बंद केल्याने खाजगी संपत्तीच्या अधिकारासंबंधीची पहिली घटना दुरुस्ती होते. गाडगे महाराज आजारी असताना भेटायला आलेल्या बाबासाहेबांना आपली पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा शैक्षणिक कामासाठी दान करतात. अशा अनेक घटनांची नोंद या पुस्तकात आहे.

बाबासाहेबांसाठी सर्वस्व अर्पण करणारे, चळवळीसाठी विविध मार्गांनी सहकार्य करणारे दलित व सवर्ण सहकारी हे आंबेडकरी चळवळीचे वैशिष्ट्य राहिले आहे. सोलापुरातील अशा सहकाऱ्यांचे पुस्तकात प्रसंगाप्रसंगाने उल्लेख, वर्णने येतातच. त्याचबरोबर लेखकांनी शेवटी त्यावर खास प्रकरणच लिहिले आहे. अशा सहकाऱ्यांची सविस्तर माहिती त्यात आहे. मोठ्या चरित्रात ठळक नावे येतात. बाकी असंख्य कार्यकर्ते विस्मृतीत जातात. स्थानिक चळवळीच्या इतिहासाची नोंद करणाऱ्या अशा पुस्तकांतून त्यांचा यथोचित परिचय देणे ही त्यांच्याप्रतिची कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले बाबासाहेबांचे जवळचे सहकारी जिवप्पा ऐदाळे अखेरपर्यंत निष्कांचन होते, हे इथे आपल्याला कळते. सोलापुरातील बाबासाहेबांच्या समकालीनांमध्ये वालचंद कोठारी, निंपप्पा ऐदाळे, हरिभाऊ तोरणे, उद्धव शिवशरण, जनार्दन सोनकांबळे, जी. आर. देशपांडे, दादासाहेब व भालचंद्र मुळे, एन. टी. बनसोडे, जी. डी. जाधव, हणमंतू सायन्ना यांची विस्तृत नोंद लेखकांनी केली आहे. जी. डी. जाधवांची एक हकिगत इथे कळते. महाडच्या संग्रामातील एक प्रमुख नेते अनंतराव चित्रे यांच्या घरी जेवणाच्या पंगतीत त्यांची कन्या जाधवांच्या नजरेस पडते. ते तिला मागणी घालतात. सगळ्यांना आनंद होतो. त्यांचा विवाह चळवळीतून झालेला आंतरजातीय विवाह होता.

पुस्तकाच्या परिचयाच्या अखेरीस येताना बाबासाहेबांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य सोलापुरातातील भेटींतही कसे दिसते, हे लक्षात घेणे उद्बोधक ठरेल. बाबासाहेब कमालीचे लोकशाहीवादी, विचार स्वातंत्र्यवादी होते. मतभिन्नता असलेल्यांचा दुस्वास नव्हे, तर त्यांचा आदर करणे, मात्र त्याचवेळी आपली मते पातळ न करता रोखठोक मांडणे हे बाबासाहेबांचे खास वैशिष्ट्य होते. बाबासाहेबांच्या या गुणामुळेच तर त्यांना त्यांच्याशी अनेक बाबतींत असहमती असणारेही भेटीचे निमंत्रण आग्रहाने देत असत. सोलापुरील अशा तीन भेटी लेखकांनी नोंदवल्या आहेत.

त्यातील एक, बार्शीच्या महात्मा गांधी छात्रालयाचे अ. दा. सहस्रबुद्धे यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्या बोर्डिंगला बाबासाहेबांची भेट. ही आठवण सहस्रबुद्धे यांनी लिहून ठेवली आहे. ते लिहितात – “बाबासाहेबांनी प्रथम मला माझे नाव विचारले. मी सहस्रबुद्धे असे सांगितले.” त्यावर बाबासाहेब काय म्हणाले त्याची नोंद ते करतात – “म्हणजे तुम्ही ब्राम्हण आहात तर! ब्राम्हण लोकांत माझ्याबद्दल फार गैरसमज आहेत. ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत. माझ्या चळवळीत अनेक ब्राम्हण्यरहित ब्राम्हण आहेत. ब्राम्हण्यवृत्ती असलेल्या सनातनी ब्राम्हणांबद्दल मात्र मला मनस्वी चीड आहे.”

बाबासाहेब सहस्रबुद्धेंना विद्यार्थ्यांविषयी, त्यांच्या वागणुकीविषयी विचारतात. त्यावर सहस्रबुद्धे सांगतात – “बोर्डिंगमधील महार विद्यार्थ्यांवर आपल्या विचारांचा अत्यंत प्रभाव आहे. हिंदू धर्माचे सण, उपवास, प्रार्थना या बाबी त्यांना अजिबात पसंत नाहीत. आषाढी, कार्तिकी या एकादशीच्या दिवशी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भाजीभाकरीचे जेवण आम्ही देतो व मांग, चांभार विद्यार्थ्यांना फराळाचे साहित्य देतो. आश्रमीय प्रार्थना महार विद्यार्थ्यांना पसंत नसते म्हणून सर्वांच्या संमतीने वंदे मातरम ही प्रार्थना बोर्डिंगमध्ये होते. सूतकताई मुलांच्या इच्छेवर ठेवली आहे. विद्यार्थ्यांवर बळजबरीने कोणतीही गोष्ट लादली जात नाही. अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून मी जास्त काळजी घेतो. विद्यार्थी शिकावेत, शहाणे व्हावेत आणि शिक्षणानंतर त्यांनी योग्य वाटेल तो सामाजिक, राजकीय विचार स्वीकारावा हे येथील बोर्डिंगचे वैशिष्ट्य आहे.”

सध्याचे हिजाब प्रकरण आठवून पहा. सर्वसमावेशी सेक्युलर धोरण काय असावे याची १९३४ सालची ही नोंद आहे. ती मुद्दाम सविस्तर दिली. आंबेडकर व गांधीवादी या दोहोंतल्या संवादातले हे मूल्य आपण आज गमावत आहोत. धूसर करत आहोत.

दुसरी भेट आहे, १४ जानेवारी १९४६ रोजीची. बाबासाहेबांच्या आगमनाप्रीत्यर्थ मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापुरातील सावरकर मंडळाने तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात बाबासाहेब सहभागी झाले. तिसरी भेट एम. एन. रॉय यांच्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सोलापुरातील कार्यालयास भेट.

गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट या तिन्हींशी बाबासाहेबांचे मतभेद किती तीव्र होते हे जगजाहीर आहे. अशावेळी या कोणालाही अस्पृश्य न मानता त्यांच्याशी माणूस म्हणून संवादी राहण्याची बाबासाहेबांसारख्या महामानवाची ही भूमिका आजच्या परमत असहिष्णुतेच्या वास्तवात खास अधोरेखित करण्याची गरज आहे.

बाबासाहेबांच्या चळवळीचा आपापल्या जिल्ह्यातील मागोवा घेण्याची प्रेरणा या पुस्तकाने नक्कीच संबंधितांना मिळेल आणि त्या योगे दत्ता गायकवाडांचे ऐंशिव्या वर्षी असे पुस्तक लिहिण्याचे श्रम अधिकाधिक सार्थकी लागतील असे मला वाटते.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मे २०२२)

____________

चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दत्ता गायकवाड

सुविद्या प्रकाशन

पृष्ठे ३०३ | मूल्य ३५० रु.

संपर्क क्रमांक : ९९७५६२६७१०

_____________

कळल्यावरी कुठे कशास्तव…

सध्या आमचे सामाजिक सलोखा अभियान सुरु आहे. चेंबूर-मानखुर्द-ट्रॉम्बे परिसरातील साधारणपणे दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या वस्त्यांत आमच्या बैठका, भेटीगाठी सुरु आहेत. आमच्या म्हणजे संविधान संवर्धन समितीच्या. संविधानावरील हल्ल्यांच्या विरोधात आवाज उठवणे, चळवळ करणे हे या संघटनेचे काम. या कामाचा एक महत्वाचा भाग म्हणून संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार शाळा, कॉलेज, वस्त्यांमधून ती करत असते. संविधान जागर यात्रा, कलापथक, महामानवांचे जन्म-स्मृतिदिनांचे उत्सव त्यांच्या विचारांचे संविधानाशी नाते जोडून साजरे करणे हेही तिचे उपक्रम. संविधानाला इजा पोहोचवणाऱ्या राजकीय-सामाजिक कृत्यांविरोधात निदर्शने-आंदोलनांद्वारे प्रासंगिक प्रतिसाद देत असते.

यावेळचा प्रसंग होता व आहे, तो राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याच्या इशाऱ्याचा. हा इशारा उघडच हिंदू-मुस्लिम तणावातून प्रक्षोभक वातावरण तयार करण्यासाठी आहे. सध्या देशभर अशा सांप्रदायिक आणि संविधानातील मूल्यांची गळचेपी करणाऱ्या घटनांना ऊत आला आहे. केंद्रात सरकार म्हणून आणि रस्त्यावर पक्ष म्हणून भाजप आपल्या परिवारातील कट्टर हिंदुत्ववादी शक्तींना चालना देत आहे. उरल्या सुरल्या संविधानाला कायमची मूठमाती देऊन २०२४ पर्यंत त्यांना अपेक्षित हिंदू राष्ट्र प्रत्यक्षात आणण्याचे संघपरिवाराचे लक्ष्य साधण्यासाठी या शक्तींच्या हालचालींचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजप विरोधी मोहिमेत जान फुंकणाऱ्या राज ठाकरेंनी ईडीच्या भयाने असो वा त्यांना नवा साक्षात्कार झाला म्हणून असो, शीर्षासन करुन त्यांनी आपली भूमिका बदलली आणि मालिक से वफादार होत ते मुसलमानांच्या मागे लागले आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्याच्या मुद्द्यामागे भाजप-संघ परिवाराची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आज हा तर उद्या दुसरा मुद्दा घेऊन त्यांचा विखारी प्रचार वा घातक कारवाया चालणारच आहेत. देश ज्या मूल्यांवर उभा राहिला, तो पाया उद्ध्वस्त करु पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधी युद्धातली ही लढाई आहे, हे लक्षात घेऊन राज ठाकरेंचा इशारा गंभीरपणे घेणे भाग आहे. या इशाऱ्यात ते वेगवेगळे बदल करु शकतात. पण हे सर्व बदल हिंदू-मुस्लिम तणाव वाढवत दंगली घडवण्याच्या दिशेने जाणारे असतील, एवढे नक्की दिसते आहे.

त्यामुळेच मुस्लिमांतही या इशाऱ्यानंतर असुरक्षितता व अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. वस्त्यांत फिरताना ते जाणवते. ९२-९३ च्या दंगलींच्या आठवणी आमच्या या वस्त्यांतल्या बैठकांत निघत आहेत. आमच्या मोहिमेची या क्षणीची मांडणी आहे ती सामाजिक सलोखा राखण्याची. आपल्या वस्तीत कोणत्याही प्रकारे तीन मे नंतर वा त्यापुढच्या नजिकच्या काळात सांप्रदायिक टकराव होता कामा नये. कोणी कितीही उसकवले तरी हिंदू-मुसलमानांनी हिंसेला प्रवृत्त होता कामा नये. अगदी अजानच्या वेळी मशिदीसमोर जाणून बुजून हनुमान चालीसा वा तत्सम प्रकार घडले तरी मुस्लिम समाजातून त्याला प्रतिक्रिया येता कामा नये, असे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत.

या बैठकांना हिंदू, मुस्लिम, बौद्ध समुदायांचे लोक हजर असतात. ‘आमच्या वस्तीत आम्ही सगळे एकत्र आहोत. इथे काही होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही’, असे सांगतात. ९२-९३ ला आम्ही भोगले आहे. महागाई, करोना यांनी एवढी हालत झाली आहे की माणसे या राज ठाकरेच्या नादाला लागणार नाहीत, असेही काहींना वाटते. ‘तुमचे हे एकजुटीचे वातावरण चांगलेच आहे. ९२-९३ चा धडा आपल्या लक्षात आहे, हे उत्तम आहे. पण त्यानंतर जन्माला आलेल्या पिढीचे काय? ती आज राज ठाकरेंसारख्यांना प्रतिसाद काय देते, याचा विचार आपण कसा करणार?’ ..असे प्रश्न आम्ही उपस्थित केल्यावर त्याला लोकांची उत्तरे ठाम नसतात. आपल्या वस्तीत आपली मुले काही गडबड करणार नाहीत, इथून बाहेर गडबड करायला जाणार नाहीत, बाहेरची मुले गडबड करायला इथे येणार नाहीत, यावर आपण नजर ठेवणे, काही होण्याची तयारी चालल्याचे कळल्यास लगेच पोलिसांना खबर करणे या दक्षता लोक मान्य करतात.

वाशिनाक्याच्या मुकुंद नगर मध्ये बौद्धांनी बुद्धविहाराच्या पटांगणात हिंदू व मुसलमानांना एकत्र करुन इफ्तारची पार्टी दिली होती. ही नक्कीच विशेष बाब होती. या वस्तीत वर्षभरापूर्वी हिंदू-मुसलमान संघर्ष झाला होता. त्या पार्टीनंतर तिथेच निवडक लोकांबरोबर आमची बैठक झाली. स्थानिक नगरसेवकही होते. एकजुटीचा महिमा सगळ्यांनीच गायला. हा मुख्य मुद्दा झाल्यानंतर एकाने नगरसेवकापुढे अडून राहिलेल्या रस्त्याचा प्रश्न मांडला. रस्ता नसल्याने अंत्ययात्रेवेळी मयत कसे रेल्वे रुळांवरुन उचलून न्यावे लागते वगैरे. नगरसेवक म्हणाले, ‘मी माझ्या खर्चाने रस्ता पूर्ण करायला तयार आहे. पण तुमच्यातली भांडणे मिटवा.’ बैठक झाल्यावर अधिक चौकशी केली तेव्हा कारण कळले ते असे. एका बाजूला मशीद आणि एका बाजूला होऊ लागलेले मंदिर यांतले एक हटवल्याशिवाय रस्ता होऊ शकत नाही.

हा प्रश्न इफ्तार पार्टीने सुटत नाही. त्याला सततच्या संवादाचे, विश्वास निर्माण करण्याचे आणि हे करु शकणारे लोक तिथे असण्याची गरज आहे. धारावीत ९३ च्या दंगलीनंतर एका वस्तीत शेजारच्या गल्ल्यांत राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांनी एका रात्रीत भिंत उभी केली होती. तिथे राष्ट्रीय एकता समिती म्हणून आम्ही काम करत होतो. एका बाजूला जाळलेल्या घरांबाबतचे, मनुष्यहानीचे मदत कार्य आणि दुसऱ्या बाजूला मने सांधण्याचे काम आम्ही करत होतो. मने सांधण्याच्या गटाचा मी भाग होतो. या दोन्ही समूहांची आधी अतितीव्र प्रतिक्रिया होती. भिंत राहणारच यावर ते अटळ होते. रोजच्या आमच्या भेटींनी ही तीव्रता कमी होत गेली. अखेरीस ते राजी झाले. भिंत तुम्ही पाडा असे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही भूमिका घेतली – ‘भिंत तुम्ही बांधलीत. तोडायची तुम्हीच.’ पुढे भिंत त्यांनी तोडली. आमचे मिशन यशस्वी झाले. वस्त्यांतले असे प्रश्न सोडवायला असा सततचा संवाद करणारे, नैतिक अधिकार असलेले लोक, संघटना गरजेचे आहे. प्रासंगिक भेटींतून वा मनोमीलनाच्या कार्यक्रमांतून हे आपोआप घडेल असे समजणे योग्य नाही. असे प्रसंग हा या मोहिमेचा प्रारंभ वा क्रमातला टप्पा समजला पाहिजे. तेच अंतिम ध्येय असू नये.

रामनवमीच्या दिवशी रात्री उशीरा मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीत जी तोडफोड झाली तिथे आम्ही काहींना भेटलो. यापूर्वी अशी मिरवणूक कधीही इथून गेलेली नाही. यावेळी जाणूनबुजून तरुणांच्या एका गटाने ती काढली. हे बाहेरचे लोक होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मशिदीच्या जवळ आल्यावर मुद्दाम घोषणा आणि डिवचणारी भाषा वापरली गेली. त्यातून बाचाबाची झाली. मिरवणूक काढणारे परत गेले आणि रात्री उशीरा मोठ्या संख्येने येऊन मशिदीच्या आसपासच्या परिसरातील वाहने त्यांनी तोडली. ही वाहने काय फक्त मुसलमानांची नव्हती. मशीद व अन्य इमारती जवळ जवळ आहेत. मुस्लिम, हिंदू आणि लक्षणीय संख्येने बौद्ध इथे राहतात. सगळ्यांची वाहने तिथे होती.

ही घटना सुटी बघून चालणार नाही. तोडफोड करणारे तरुण भले बाहेरचे असतील. पण या वस्तीत आणि आसपास बजरंग दल, हिंदू शब्दापुढे जागृती, युवा वाहिनी वगैरे असलेल्या संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिंनी बरीच वर्षे आपले जाळे विणले आहे. तरुण मंडळींना सदस्य करण्याची मोहीम आणि विविध हिंदू सणांच्या निमित्ताने वा अन्य निमित्ते तयार करुन त्यांच्या मिरवणुका, मेळावे सतत सुरु असतात. बौद्ध मुलेही त्यांनी गळाला लावलेली आहेत. या संघटनांचा भाजप तर पालकच आहे. पण शिवसेना, मनसेचे लोकही या कट्टरपंथीय हिंदूंच्या बाजूने असतात. वरच्या नेतृत्वाची भूमिका मग काहीही असो. अन्य पक्षांतले हिंदूही या प्रकारच्या ‘हिंदुत्वाला’ सहानुभूत असतात किंवा तटस्थ राहतात. बौद्धांचे म्हणणे असते, आमच्या वाट्याला कोणी जात नाही. अशा एका प्रतिक्रियेवर मी म्हणालो, ‘पण तुम्ही हस्तक्षेप करत नाही ना! कोणा एकाची बाजू भले नका घेऊ. मात्र जे काही करायचे ते कायद्याने करा. संविधानात्मक मार्ग वापरा. हिंसा आम्ही होऊ देणार नाही, असे रस्त्यावर येऊन तुम्ही बजावायला नको का?’ असे बोलल्यावर ‘हो. हा हस्तक्षेप करायला हवा’ यास ते कबूल होतात.

याच म्हाडा कॉलनीतल्या एका विशीतल्या मुलीने वर्षभरापूर्वी मशिदीच्या भोंग्यांविषयी मशिदीच्या आवारात एकटीने जाऊन जाब विचारला होता. तिच्या या शौर्याचे बरेच व्हिडिओ माध्यमांवर त्यावेळी फिरले. देशभरच्या हिंदू कट्टरांनी तिला जोरदार पाठिंबा तिला. घरी येऊन तिचा सत्कार केला. प्रारंभीची आवृत्ती एवढीच होती – या मुलीच्या खिडकीच्या दिशेने मशिदीच्या भोंग्यांचा आवाज थेट येतो. अजान भोंग्यांवर करायला तिचा विरोध नाही. आवाज कमी ठेवा एवढेच तिचे म्हणणे. पुढे जाऊन यात तीव्रता तयार होते. आणि ही मुलगी हिंदू कट्टरांची पाठिराखी होते. किंवा ती या कट्टर हिंदू संघटनांची आधी घटकही असेल. त्यांच्या मोहिमेचा भाग म्हणूनही तिची हे विरोचित कृत्य असेल. आमच्या सहकाऱ्याने रस्त्यावरुन तिच्या खिडकीकडे बोट दाखवले. तिथे भगवा झेंडा लावलेला होता.

या मुलीच्या ट्विटरवर हा लेख लिहिण्याआधी चक्कर मारली. तिथे सलगपणे हिंदू कट्टरांची भलामण करणारे संदेश दिसतात. १० एप्रिलला रामनवमी होती. त्या दिवशी म्हाडा कॉलनीत हिंसाचार झाला. त्याच्या आधी दोन दिवस म्हणजे ८ तारखेला तिने युद्धाच्या पवित्र्यातील धनुष्यधारी रामाचे चित्र देऊन एक ट्विट केले आहे. त्यात ती म्हणते – ‘राम बिती हुई हिस्टरी नही, हमारा वर्तमान है, वर्तमान हमें बताता है कि, क्यूं शस्त्र के बिना धर्म की रक्षा नही हो सकती. कोई सीमा पर शस्त्र धारण करता है, इसलिए हमारी धर्मशाला में धर्म नाच रहा है. ध्यान और युद्ध अलग नही किये जा सकते..’

बाकी अनेक ट्विटांमध्ये ‘जय हिंद. जय श्रीराम. स्टँड फॉर ह्युमन राईट्स. जय संविधान. वंदे मातरम.’ असे ती लिहिताना दिसते. तिला पाठिंबा देणाऱ्या हॅशटॅग मोहिमेबद्दल आभार व्यक्त करते. आपण करतो तेच संविधानाला खरोखर अभिप्रेत आहे अशी या मुलांची भूमिका असेल, तर आम्ही संविधानाच्या प्रचार-प्रसाराचे काम करणारे लोक त्यांच्यादृष्टीने स्यूडो ठरतो, हे उघडच आहे.

मशिदींवरचे लाऊड स्पीकर कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेत नसतील, तर त्यांची तक्रार जरुर व्हावी. त्यासाठी प्रयत्न करुन थकलेल्या आणि संतप्त झालेल्या मुलीने थेट मशिदीत जाऊन भांडण काढले हे समजू शकते. पण इथे केवळ तसे दिसत नाही. जाणीवपूर्वक मुस्लिमांची खोड काढत, त्यांना डिवचत, अवमान करत त्यांना प्रक्षुब्ध करण्याचा व त्यांच्याकडून हिंसक प्रतिक्रिया आणण्याचा आणि त्यायोगे दंगली घडवण्याचा हा सुनियोजित डाव आहे, याला देशभरच्या अलिकडच्या अनेक घटनांतून पुष्टी मिळते.

माहुल, गवाणपाडा, विष्णू नगर, भारत नगर, टेकडीवरील राहुल नगर, नागाबाबा नगर, अशोक नगर, सह्याद्री नगर, पेट्रोलियम विभागातील वाहतुकीसाठीच्या रेल्वे पटरीच्या आसपासचा परिसर ते चेंबूर कँप इथपर्यंत विविध वस्त्यांमध्ये मी २०-२५ वर्षांपूर्वी साक्षरता आणि पुढे रेशन या चळवळींसाठी खूप हिंडत असे. त्यावेळी न दिसलेली आणि त्यानंतर मी अनेकवेळा या भागात जाऊनही तिचे गांभीर्य न कळलेली बाब म्हणजे संघपरिवारातल्या संघटनांचे वाढते जाळे. मानखुर्दची म्हाडा कॉलनी, पीएमजीपी कॉलनी, साठे नगर, गोवंडीची बैंगनवाडी, शिवाजी नगर ते माहुल-वाशिनाका हा चेंबूर-ट्रॉम्बेचा पट्टा या संघटनांनी प्रचंड पोखरला आहे. वाशिनाक्याच्या रस्त्यावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची विविध निमित्ताने सतत फ्लेक्स पोस्टर्स लागलेली असतात. त्यांच्या मिरवणुका निघत असतात. गेल्या वर्षी आमच्या एका बौद्ध व चळवळीत सक्रिय सहकाऱ्याच्या मुलाचा फोटो बजरंग दलाच्या बॅनरवर मी पाहिला होता. १८ वर्षांच्या खालच्या मुलांचा भरणा यांत मोठा असतो. हिंदू राष्ट्राची मन उचंबळवणारी भावना त्यांना एक ध्येय देते. त्यासाठी मुसलमानांचा निःपात हे कर्तव्य त्यांच्या मनात रुजवले जाते. अनधिकृतपणे शस्त्रे दिली जातात. सोबत बटन नावाने प्रसिद्ध असलेले ड्रग मुबलक दिले जाते. पैश्यांची पाकिटे येतात. रात्री चायनीज वा अन्य हॉटेलांत यांचे अड्डे जमतात. तिथले खर्च कोणी दानी करत असतात. आधी ध्येय, त्यासाठीचा भावनिक उन्माद वाढवणारी कथ्ये, घोषणा आणि त्या सर्वांच्या पोषणासाठी नंतर धनाचा मुबलक आधार हा क्रम असतो. १८ वर्षांच्या खालील मुलांनी गुन्हे केले तरी त्यांना कायद्याने सज्ञान नसल्याचा फायदा मिळून कायद्याच्या कचाट्यातून वा शिक्षेतून ती लवकर बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे या कोवळ्या संस्कारक्षम, भावनाशील आणि ऊर्जावान वयाच्या टप्प्यावर समाज विघातक शक्ती त्यांना पकडतात.

हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर झाले. पण आम्ही नीट पाहू शकलो नाही. ओळखू शकलो नाही. या मुलांशी आपल्याला भेटता येईल का, बोलता येईल का, या माझ्या प्रश्नाला तिथले आमचे सहकारी उत्तर देतात – ‘काही उपयोग नाही. बोलण्याच्या मनःस्थितीतच ही मुले नसतात. पालकांचेही ऐकत नाहीत. बोलणे सहन झाले नाही तर अंगावर येतात.’ पण कसा, कुठे याचा विचार करुन हा संवाद करावाच लागेल, अशी माझी भूमिका आहे. मी ती सहकाऱ्यांशी बोलत असतो. जी मुले यांत नाहीत, त्यांच्यासाठी काय उपक्रम करता येतील, याचा विचार करायला हवा. थेट वाईटाला भिडता आले नाही तरी चांगले वाढवणे हे वाईटाचा परिणाम घटवणारे असते. या दिशेने काही ठरवावे लागेल.

बौद्ध विभाग हा आमचा मुख्य आधार. राजकीयदृष्ट्या अत्यंत दक्ष हा त्याचा लौकिक. पण तोही अंतर्गत फाटाफुटी, नव्या स्थितीच्या समजाचा अभाव यांमुळे या स्थितीत दखल द्यायला पुरेसा सक्षम नाही. त्यातही संघपरिवाराने काहींना गळाला लावले आहे. मातंग, चर्मकार, वाल्मिकी आदि दलित समूह बौद्धांच्या जुटीत येत नाहीत. बौद्धांविषयीच्या खऱ्याखोट्या गृहितकांनी, व्यवहाराने ते बौद्धांविषयी दुस्वास व्यक्त करतात. त्यांना तर संघपरिवाराने कधीच आपलेसे केले आहे. बुद्धविहारातल्या बैठकांत मुस्लिमांविषयी घृणेने बोलणारेही भेटतात. पण ते कमी दिसतात. मातंग-चर्मकारांत ते अधिक असतात. मातंग-चर्मकारांना व्यापक हिंदू आयडेंटी अधिक प्रतिष्ठेची वाटते. साठे नगरच्या मांगिरबाबा मंदिरात मातंग अधिक संख्येने असलेल्या बैठकीत याचा प्रत्यय आमच्या कार्यकर्त्यांना आलाच. मशिदीवरील भोंग्यांबाबत त्यांची प्रतिक्रिया तीव्र होती.

या भेटी-गाठी, बैठका करणे हे कष्टप्रद, कधीकधी नाऊमेद करणारेही काम आहे. आमच्या संघटनेत कोणी पगारी पूर्णवेळ काम करणारे नाही. आपापले व्यवसाय, नोकऱ्या करुन स्वखर्चाने हिंडणारे, वेळ देणारे कार्यकर्ते आहेत. त्यांची संख्या प्रसंगाप्रसंगाने कमी वा अधिक असते. कधी कधी एकटे-दुकटेच फिरावे लागते. ज्या वस्तीत स्वतःचा प्रवास खर्च, वेळ काढून जावे, तिथे लोक जमलेले असतील असे नाही. काही वेळा आपल्यालाच लोक जमवावे लागतात. कधीतरी लोक येतच नाहीत. एखाद-दुसऱ्या व्यक्तीशी बोलून पुढची वेळ ठरवून परतावे लागते. बरे या कष्टाची नोंद कोणी तसे घेत नाही. अनेकांना तुम्ही एकटे कुठे हिंडत असता हे कळतही नाही. बैठक झाली आणि त्याचे फोटो फेसबुक-व्हॉट्सअपवर टाकले तरच ते कळते आणि काही लाईक्स मिळतात. त्यामुळे हा उद्योग करण्यापेक्षा फेसबुकवर हिंदू फॅसिस्टांच्या करवायांविषयी प्रतिक्रिया देत राहणे सोपे आहे. त्यातून ‘काही केल्याचे’, त्यांची ‘जिरवल्याचे’ समाधान (जे कृतक आहे) मिळते. आपले समविचारी फ्रेन्ड्स आपल्या या पोस्ट्सची वाहवा करतात. त्यातून आपण रणभूमीवर आहोत आणि शत्रूला खडे चारत आहोत, अशी एक विजयी योद्ध्याची भावना मनात नांदत राहते. ती कमी झाली की पुन्हा एक पोस्ट. पुन्हा विजयी भावना. हे सतत करणाऱ्याला अहर्निश चळवळीच्या कामात आपण आहोत, ही भावना सहज टिकवता येते. कायम ठेवता येते. (हे काहीसे ‘बटन’ च्या नशेसारखे आहे, असा माझा कयास आहे.)

हिंदू कट्टरपंथीयांकडे जे एक ध्येय आणि त्यासाठीची पॅशन आहे, तिची पुरोगामी प्रवाहांत वानवा आहे. हे ध्येय आणि पॅशन कशी आकार घेणार हा मोठा प्रश्न आहे. माझे वैयक्तिक नुकसान या क्षणी काही नाही. माझ्या जीवनमानात काहीही फरक नाही. अशावेळी मला जाणिवेनेच हा धोका समजून घ्यायला हवा. पण आज हे सार्वत्रिक नाही. त्यामुळे मानवाच्या प्राथमिक अवस्थेत अग्नी जपायला गुहेत बसून एखाद-दुसऱ्याला अग्निहोत्र करावे लागे, तसे ते आज ज्यांना कळते त्यांना करत राहावे लागणार आहे. कोण दखल घेतो हा मापदंड असून चालणार नाही.

आमच्या संघटनेच्या प्रवासात कधी वाळवंट, कधी ओढा, कधी एकदम पूर आणि पुन्हा प्रवाहातले खडक उघडे, एकाकी असे होत राहते. संविधान जागर यात्रा एकदम हजारोंच्या; नंतर जेमतेम ५० लोक. कधीतरी नुसतेच एकेकाला भेटत हिंडायचे. कधी संविधानावर भाषणे करायला निमंत्रणे, तर कधी आपणच भाषणांचे ‘वार’ लावून घ्यायचे. म्हणजे मी तुमच्याकडे उद्या संविधानावर बोलायला येतो आहे, जमेल तेवढ्यांना एकत्र करा, असे सांगायचे. मानधन सोडा, चहा कोणी दिला, आपण जाण्याआधी लोकांनी झाडून-लोटून ठेवले यानेच बरे वाटते. औपचारिक कार्यक्रमांत, व्याख्यानांना बोलावून मानधन देणारेही असतात. पण ते अगदीच प्रासंगिक. चळवळीच्या यात्रांसारख्या कार्यक्रमांना लोक आर्थिक सहाय्य करतात. पण दैनंदिन कामांसाठी पैसे उभे राहत नाहीत.

प्रारंभी उल्लेख केलेल्या आमच्या सध्याच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबई पोलीस कमिशनर आले. ते पूर्वनियोजित नव्हते. वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या कानावर आमच्या हितचिंतकांनी ही बाब घातली, विनंती केली आणि ते आले. पण त्यामुळे आमच्या सभेला एकदम प्रसिद्धी मिळाली. ते फोटो फेसबुकवर टाकल्यावर भरपूर लाईक्स, शेअर आणि प्रशंसा आमच्या वाट्याला आली. आमचे लोक खुश झाले. मेहनतीचे चीज झाले असे वाटले.

हे ठीक आहे. त्यामुळे उमेद वाढली. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटे फिरावे लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावे लागेल हे मनात पक्के असायला हवे. या मापदंडांच्या पलीकडे जाऊन ‘कळल्यावरी कुठे कशास्तव, मरणे सोपे रे ध्येयास्तव’ या प्रचितीचा शोध जारी ठेवायला हवा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(मुक्त संवाद, मे २०२२)