Thursday, December 24, 2009

आंबेडकरी चळवळीचा उद्याच्‍या महाराष्‍ट्रातील मुक्‍काम कोठे ? कसा ?

'आंदोलन'साठी 24 डिसेंबर 2009 रोजी तयार केलेला लेख

महाराष्‍ट्राच्‍या संदर्भात ओळखली जाणारी दलित चळवळ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा व वारसा मानणा-या दलितांतील बहुसंख्‍य अशा बौद्ध (पूर्वाश्रमीचा महार समाज) समाजाच्‍या पुढाकाराखालची चळवळ राहिली आहे. तिला आंबेडकरी चळवळ असे म्‍हणण्‍याचा प्रघात पडला आहे. म्‍हणून इथेही मी तेच संबोधन वापरत आहे. वस्‍तीपासून तुटलेल्‍या बौद्ध मध्‍यमवर्गीय कुटुंबातील अलिकडची पिढी सोडली, तर पूर्वी बौद्ध समाजात जन्‍माला आलेल्‍या प्रत्‍येकाला 3 गोष्‍टी जन्‍मतः मिळायच्‍या. एक, बौद्ध धर्म, दोन, कार्यकर्तेपण आणि तीन, रिपब्लिकन पक्ष. जन्‍मतः पक्ष मिळणारा हा एकमेव समाज असावा. माझ्या वाट्यालाही या तिन्‍ही गोष्‍टी जन्‍मतः आल्‍या. पुढच्‍या वाटचालीत माझे नाते अन्‍य प्रगतीशील विचारांशी-चळवळींशी विस्‍तारत गेले. हा स्‍वपरिचय यासाठी की, माझे पुढील कथन त्‍या अर्थाने तटस्‍थ नाही. माझी भावनिक गुंतवणूक निःसंशय त्‍यात आहे. आंबेडकरी चळवळीच्‍या वर्तमानातील घडामोडींवरील माझ्या प्रतिक्रिया, आकलन व अपेक्षा अशीच पुढील मांडणी आहे. आंबेडकरी चळवळीचे ऐतिहासिक विश्‍लेषण असे तिचे स्‍वरुप नाही.

या विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाने स्‍वतःचे सुमारे 180 उमेदवार उभे केले होते. त्‍यातला एकही निवडून आला नाही. रिडालोसचेही जेमतेम 11 जण निवडून आले. ते आमचे असे भलेही रामदास आठवले म्‍हणत असले, तरी ते काही खरे नाही, हे त्‍यांनाही कळते. रिडालोसच्‍या या जेमतेम यशामागेही शेकापचा भाजपसेनेसहित केलेल्‍या महायुतीचा फॉर्म्‍युला आणि समाजवादी पक्षाचा मुस्लिमांतील वाढता जातीय आधार मुख्‍यतः कारणीभूत आहे. आठवले रिडालोसचे निमंत्रक म्हणून रिडालोसच्‍या यशाच्‍या श्रेयाचे प्रवक्‍तेपण जरुर करु शकतात. तथापि, निवडणुकांच्‍या आधी जो मान त्‍यांना रिडालोसचे अन्‍य घटक देत होते, तो आता उरलेला नाही.

एकच उदाहरण देतो. या आघाडीतील एक पक्ष आहे राष्‍ट्रीय समाज पक्ष. या पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. त्‍याच्‍या सत्‍कारासाठीच्‍या सभेची पोस्‍टर्स जागोजागी लागली. त्‍या पोस्‍टरवर पक्षाचे प्रमुख महादेव जानकर व विजयी उमेदवार यांच्‍याबरोबरीने खरे म्‍हणजे या आघाडीचे निमंत्रक असलेल्‍या रामदास आठवलेंचे नाव ठळकपणे असायला हवे. तथापि, प्रमुख पाहुणे म्‍हणून अबू आझमी (समाजवादी पक्ष) आणि उदघाटक म्‍हणून जयंत पाटील (शेकाप) या दोघांची नावे मोठ्या टाईपात छापलेली होती. आठवलेंचे नाव खालच्‍या बारी‍क टाईपातील यादीत कोठेतरी.

अबू आझमी दोन ठिकाणांहून निवडून आले. शिवाय धनिक. जयंत पाटलांचे 4 लोक निवडून आले. तेही धनिक. (रिडालोसच्‍या शिवाजी पार्कच्‍या सभेचा खर्च जयंत पाटलांनी केला होता. त्‍यामुळे ते त्‍या सभेचे स्‍वागताध्‍यक्ष होते.) सत्‍ता-संपत्‍तीचा हा सरळ हिशेबी व्‍यवहार !

रिपब्लिकन पक्षाला इतर घटकांनी निवडणुकीआधी जे महत्‍व दिले व आठवलेंना निमंत्रक केले त्‍यामागील प्रमुख (कदाचित एकमेव) कारण या पक्षामागे गृहीत धरलेला बौद्ध समाजाचा जनाधार. दलितांत बहुसंख्‍य व राज्‍याच्‍या लोकसंख्‍येत सुमारे 7 टक्‍के ही बौद्ध समाजाची मतांच्‍या राजकारणातली ताकद आहे. बाबासाहेब कसे महान होते, हे राजकारणी मंडळी भाषणात आवर्जून सांगत असतात, त्‍यामागे खरे कारण हेच आहे. महाराष्‍ट्रातल्‍या मराठी माणसाच्‍या हक्‍कांची मांडणी करताना राज ठाकरेंनाही बाबासाहेबांची साक्ष त्‍याचमुळे काढावी लागते. (महात्‍मा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज या महामानवांच्‍या महतीगायनामागेही हाच हिशेब असतो. बिचा-या महात्‍मा गांधींना ते भाग्‍य नाही. त्‍यांच्‍यामागे त्‍यांचा असा समाज नाही. ओबामा किंवा मंडेला अशा एक-दोघांनी त्‍यांना महान म्‍हटले की आपले लक्ष वेधते, एवढेच !)

शिवाजी पार्कच्‍या फारतर 35 हजाराच्‍या (ही संख्‍याही चांगलीच) सभेचे वर्णन आपल्‍या मुखपत्रात एक लाखाची सभा असे करणा-या डाव्‍यांचाही फार वेगळा हिशेब नव्‍हता. जर तो असता तर एकतर, रिडालोसची विशिष्‍ट कार्यक्रमावर आधारित चळवळीच्‍या क्रमात उभारणी करण्‍याचा खूप आधीपासून त्‍यांनी प्रयत्‍न केला असता किंवा निवडणुकांच्‍या एकजुटीसंबंधी काही तत्‍त्‍वांचा आग्रह त्‍यांनी जाणीवपूर्वक धरला असता. मुस्लिम धर्मांधांचा मेरुमणी असलेले अबू आझमी आणि भाजपसेनेसहित बिनदिक्‍कत युतीचा फॉर्म्‍युला वापरणारे शेकाप यांच्‍याबद्दल त्‍यांनी काहीतरी वेगळे म्‍हटले असते, किमान काही चर्चा घडवली असती. हे काहीही झाले नाही. तेरीभी चूप-मेरीभी चूप ! विधानसभेत मनसेच्‍या आमदारांनी अबू आझमींना बुकलले, हे अत्‍यंत गैरच झाले. पण अबू आझमींचे मनसेला उचकावण्‍याचे आधीपासूनचे पद्धतशीर प्रयत्‍न आणि हिंदीत शपथ घेऊन मर्दुमकी गाजवल्‍याबद्दल त्‍यांचा उत्‍तर प्रदेशमध्‍ये करण्‍यात आलेला सत्‍कार व त्‍यावेळी त्‍यांनी उत्‍तर भारतीयांना मुंबईत बिनधास्‍त येण्‍याचे केलेले आवाहन याबद्दल रिडालोसमधील डाव्‍यांनी, समाजवाद्यांनी, रिपब्लिकनांनी काही म्‍हटल्‍याचे ऐकिवात नाही. अबू आझमींनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याला किंमत दिली नसती, हे अलाहिदा ! पण सर्व समाजाच्‍या दृष्‍टीने आणि तत्‍त्‍वाच्‍या दृष्‍टीने आपली भूमिका तरी मांडायला हवी होती. निवडणुका झाल्‍या. व्‍हायचे ते झाले. आता गरज कुणाची कुणाला ? पुढच्‍या निवडणुका येतील तेव्‍हा बघू !

लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात हार पत्‍करावी लागलेली असतानाही आठवलेंना रिडालोसमध्‍ये किंमत होती, ती त्‍यांच्‍यामागे गृहीत धरलेल्‍या बौद्ध जनाधारामुळे. तो तसा नव्‍हता, हे या निवडणुकांत लक्षात आल्‍याने रिडालोसच्‍या अन्‍य घटकांनी आठवलेंना किंमत देणे सोडून दिले.

या विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन उमेदवारांचा त्‍यांच्‍या बालेकिल्‍ल्‍यांतही (म्‍हणजे बौद्ध मतदार मोठ्या संख्‍येने असलेले विभाग) धुव्‍वा उडालेला दिसतो. याचा अर्थ, ऐक्‍याच्‍या फार्साला नेहमी फसत आलेली आशावादी बौद्ध जनता यावेळच्‍या रिपब्लिकन ऐक्‍यावर मात्र भाळली नाही. तिने एकतर पारंपरिकरित्‍या कॉंग्रेसला आणि तिच्‍यातील तरुणांनी मनसेला कौल दिला. (बसपचे मायाजालही यावेळी फाटले होते). कार्यकर्ते पैश्‍यांनी विकत घेतले गेले आणि आम्‍ही असा खर्च करु शकत नाही, हे रिपब्लिकन नेत्‍यांचे आकांडतांडव वस्‍तुस्थितीला धरुन असले, तरी दांभिक होते. सत्‍ता-संपत्तिसाठी विकले जाण्‍याची परंपरा आधी नेत्‍यांनी सुरु केली. गुरुत्‍वाकर्षणाच्‍या नियमाने ती नंतर कार्यकर्त्‍यांच्‍या खालच्‍या वेगवेगळ्या पातळ्यांपर्यंत वाहत गेली. कोणत्‍याही पातळीवर लोकशाहीची अशी खरेदी-विक्री अर्थातच निषेधार्ह आहे. पण केवळ या खरेदी-विक्रीनेच मतदान होते, हे खरे नाही. आपापल्‍या विवेकाला स्‍मरुन, समजाला धरुन बहुसंख्‍य जनता मतदान करत असते. कार्यकर्त्‍यांनी जरी पैसे घेतले असले, तरी बहुसंख्‍य बौद्ध जनतेने आपल्‍या भूमिकेशी प्रामाणिक राहून मतदान केले आहे. आपल्‍याच कार्यकर्त्‍यांनी आपल्‍याला फसवल्‍याने घायाळ झालेल्‍या जुन्‍या पँथरांचा शहाजोगपणा आता जनतेला नकोसा झाला आहे.

एकेकाळी दलित चळवळीला सामाजिकतेबरोबरच वर्गीय परिमाण देऊन समग्र परिवर्तनाची मांडणी करणारे नामदेव ढसाळ शिवसेनेबरोबर काय म्‍हणून गेले ? नामांतर लढ्यातील लॉंग मार्चची पुण्‍याई ज्‍यांच्‍या नावावर जमा आहे, त्‍या प्रा. जोगेंद्र कवाडेंनी नितीन गडकरी आणि त्‍यांच्‍या भाजपला पाठिंबा काय म्‍हणून दिला होता ? लढाऊ व संघटक म्‍हणून ख्‍याती व सर्वाधिक लोकप्रियता असलेल्‍या रामदास आठवलेंनी कॉंग्रेस व पुढे राष्‍ट्रवादीशी जातीयवादी शक्‍ती सत्‍तेवर येऊ नयेत म्‍हणून सहकार्य केले. हा तर्क योग्‍यच होता. पण चळवळ सोडायचे काय कारण होते ? सत्‍तेत भागिदारी न करताही हे सहकार्य करता आले असते. त्‍याचा प्रचंड दबाव कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीवर राहिला असता. आठवलेंची नैतिक व पर्यायाने राजकीय ताकद खूप वाढली असती. सत्‍तेत सहभागी व्‍हायचे, ते आपल्‍या समाजासाठी, असे म्‍हणता म्‍हणता ढाण्‍या पँथर सत्‍ताधा-यांचे मांजर कधी झाला, हे त्‍यालाही कळले नाही. कळले तेव्‍हा या पँथरच्‍या आग ओकणा-या डोळ्यांच्‍या कचकड्या झाल्‍या होत्‍या. आता या डोळ्यांना कोण घाबरणार ? दिल्‍लीत मंत्रिपद दिले नाही तेव्‍हा, तसेच शिर्डीत पराभूत झाल्‍यावर आंदोलन करणा-या आठवलेंच्‍या कार्यकर्त्‍यांना जनतेने साथ दिली नाही. सत्‍तेच्‍या विविध स्‍तरांवर लाभार्थी झालेल्‍या पँथर कार्यकर्त्‍यांचे पोषाख, व्‍यक्तिमत्‍व, वागणे अन्‍य सत्‍ताधारी पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांहून कोणत्‍याही अर्थाने भिन्‍न दिसत नाही. सत्‍तेच्‍या दलालांच्‍या या बाजारात नव्‍या पिढीला जुना पँथर कसा होता, हे दाखवायचे झाले, तर म्‍युझियमध्‍ये ठेवायला त्‍याचा सांगाडाही शिल्‍लक नाही. एकतर त्‍यांच्‍या हाडांनाही मांद्य आलेले आहे किंवा ती अगदी भुसभुशीत झालेली आहेत.

रामदास आठवलेंची जमेची बाजू म्‍हणजे ते संकुचित नाहीत, आक्रस्‍ताळे नाहीत. व्‍यापक एकजुटीच्‍या बाजूचे आहेत, धर्मांधतेच्‍या निश्चित विरोधात आहेत. पण हा चांगुलपणा व्‍यवहारात शक्‍ती म्‍हणून आज रुपांतरित होत नाही. प्रकाश आंबेडकरांचे चळवळीतले पदार्पणच मुळी सम्‍यक समाज आंदोलन या व्‍यापक पायावर झाले. ते एकजातीय (म्‍हणजे केवळ बौद्धांपुरते) तेव्‍हाही नव्‍हते, आताही नाहीत. मात्र ते जातींच्‍या बेरजांवर विश्‍वास ठेवतात. शिवाय सत्‍तेच्‍या सारिपाटात कोणाशीही- भाजप-सेनेशीही एकजुटीचे प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष क्रम त्‍यांना मंजूर असतात. विदर्भात काही ठिकाणी त्‍यांनी स्‍वतःचा असा जनाधार तयार केला आहे. संघटना बांधली आहे. ते यावेळच्‍या ऐक्‍य प्रक्रियेपासून ठरवून दूर होते. त्‍यांनी स्‍वतःच्‍या ताकदीवर दोन आमदार यावेळी निवडून आणले आहेत. त्‍यामुळे स्‍वाभिमानाने सत्‍तेचे राजकारण आम्‍हीच करतो, असा दावा ते करु शकतात. पण त्‍यांच्‍या जुन्‍या हेकेखोर व अविश्‍वासार्ह व्‍यवहारांमुळे त्‍यांना आंबेडकरी जनतेची व्‍यापक मान्‍यता अजूनही नाही. गवईंचे राजकारण सत्‍तेची ऊब घेत जाण्‍याचे राहिले. त्‍यांची निष्‍ठा काही काळ त्‍यांच्‍या सुपुत्रांनी रिडालोसमध्‍ये जाऊन भंग केली. तथापि, चुकीची दुरुस्‍ती लगेच करुन ते मूळ वळचणीला परतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी छेडलेले देशव्‍यापी भूमिहिनांचे आंदोलन, महाराष्ट्राच्‍या सांस्‍कृतिक सारस्‍वताला हादरविणारे दलित साहित्‍य, सामाजिक-राजकीय जीवनाला थरारुन सोडणारी दलित पँथरची गर्जना, नामांतर-रिडल्‍सची आंदोलने अशा अनेक सत्‍कर्मांची नोंद आंबेडकरी चळवळीच्‍या इतिहा‍सात असली तरी आज वट्टात पराभूतता, दिशाहिनता हेच आहे. अर्थात, दिशाहिनता हे केवळ आंबेडकरी चळवळीचे वैशिष्‍ट्य नाही. वर उल्‍लेख केलेला रिडालोसमधील पुरोगामी शक्‍तींचा व्‍यवहार लघुदृष्‍टीचा व दिशाहिनच आहे. एकूण पुरोगामी चळवळीने कात टाकल्‍याशिवाय ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीलाही दिशा मिळणे कठीण आहे. परिवर्तनाच्‍या चळवळीतील हे घटक परिस्‍परपरिणामकारी, परस्‍परावलंबी आहेत. उद्याचा महाराष्‍ट्र घडविण्‍यासाठी या सर्वांनाच स्‍वतःत मूलगामी बदल घडवावे लागतील.

तूर्त, आपण आंबेडकरी चळवळ या त्‍यातील एका घटकाचा विचार करत आहोत.

आंबेडकरी समुदायाची विशेष दखल घेण्‍याचे कारण म्‍हणजे, तो अख्‍खा समाज म्‍हणून पुरोगामी चळवळीत उतरतो. बुद्ध, कबीर, फुले, शाहू या सर्व पुरोगामी परंपरांचा तो जात्‍याच स्‍वतःला पाईक मानतो. कारण त्‍याचे आराध्‍य असलेल्‍या बाबासाहेबांनी त्‍याला बाबां वाक्‍यं प्रमाणम् पासून, आपला भक्‍त होण्‍यापासून दूर ठेवण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न केला व अन्‍य पुरोगामी परंपरांची गुंफण आपल्‍या मांडणीत करुन त्‍याला ती सोपवली. म्‍हणूनच जातिव्‍यवस्‍थेविरोधात, स्‍त्री-पुरुष विषमतेविरोधात तो सहजच उभा राहतो. मंडल आयोगाच्‍या अंमलबजावणीचा-ओबीसींच्‍या आरक्षणाचा लढा महाराष्‍ट्रात त्‍याने आपला म्‍हणून लढवला. ओबीसी समाज अजून स्‍वतःच्‍याच या लढ्यात पुरता यायचा आहे. बौद्ध समाज पूर्वी अखंड; आता बहुसंख्‍य कष्‍टकरी आहे. आता त्‍यात एक लक्षणीय मध्‍यमवर्ग तयार झाला आहे. तो वाढत असला तरी अजूनही अल्‍प आहे. बहुसंख्‍य समाज गरीब, कष्‍टकरीच आहे. 6 डिसेंबरला चैत्‍यभूमीवर व धम्‍मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर फिरताना हा फरक ठळकपणे जाणवतो.

बौद्धांमधला शिक्षित मध्‍यमवर्ग ही खरे तर ताकद आहे. पण तिच्‍यात अनेक विकृती तयार झाल्‍या आहेत. एकूण मध्‍यमवर्गात आलेली आत्‍ममश्‍गुलता बौद्ध मध्‍यवर्गातही गतीने येऊ लागली आहे. शासकीय नोक-या, आरक्षणे, बढत्‍या, महामंडळांची कर्जे, गृहसंस्‍थांतल्‍या सवलती यांत आपल्‍याला व आपल्‍यानंतर आपल्‍या मुलाबाळांनाच लाभ कसा मिळेल, याबाबत तो विलक्षण दक्ष असतो. आपली जात्‍याच असलेली राजकीय-सामाजिक तल्‍लखता तो इथे पुरेपूर वापरतो. त्‍यासाठी वशिला, लाच, सत्‍ताधा-यांची खुशामत इ. रुढ मार्गांतला कोणताही मार्ग त्‍याला वर्ज्‍य नसतो. पण आपल्‍याच समाजातल्‍या गरीब स्‍तरातील बौद्धांचे कष्‍टकरी, गरीब म्‍हणून असलेले प्रश्‍न सोडवण्‍याबाबत, त्‍यांवर चळवळ संघटित करण्‍याबाबत तो अलिप्‍त राहतो. आपल्‍या नेत्‍यांचे राजकारण दुरुस्‍त करण्‍याचा आग्रह धरण्‍याऐवजी संधी मिळताच तो स्‍वतःच त्‍याचा वाटेकरी होतो. आपल्‍या व्‍यवहाराचे ढोंगी समर्थन करतो. आंबेडकरी चळवळीवरची ही साय दिवसेंदिवस दाट होत चालली आहे. आंबेडकरी चळवळीच्‍या दिशाहिनतेत त्‍यामुळे भर पडते आहे.

बौद्ध जनतेला नेत्‍यांचे हे वागणे नकोसे झाले आहे, तिला त्‍याबद्दल पूर्वी खेद होता. आता हे सुधारणारच नाहीत, असे म्‍हणून तिने आपल्‍याला सुचेल ती वाट धरली आहे. संधिसाधू नेत्‍यांविषयी भ्रमनिरास होणे, हे चांगले. कुंकवाचा धनी म्‍हणून नाईलाजाने एकएक नेता धरुन ठेवण्‍याच्‍या मानसिकतेतून ती मुक्‍त होत असेल तर ते योग्‍यच. पण आता चळवळीचे दिवस संपले, आता बाबासाहेब परत येणार नाहीत, आणि तसा कोणी होणारही नाही. आपल्‍याला इतर वापरतात, आता आपणही त्‍यांना का वापरु नये ?... अशा मनो‍वस्‍थेत बौद्ध समाज जात आहे. आपल्‍याला आता पहले खुद का देख पद्धतीने जायला लागणार. तोच आजचा युगधर्म आहे. अशी ठाम समजूत सामान्‍य बौद्ध जनतेची होऊ लागली आहे. भोवतालचे राजकारणी, आपले नेते, आपल्‍यातला मध्‍यमवर्ग यांबद्दल निराभास होता होता तो आंबेडकरी व एकूण परिवर्तनाच्‍या चळवळीबाबतच निराभास होतो आहे, ही सर्वात वाईट व यातनादायी बाब आहे.

ज्‍यांना हे कळते, असे अनेक कार्यकर्ते आजही आंबेडकरी तसेच अन्‍य पुरोगामी चळवळीत आहेत. आंबेडकरी समाजाने आपली मूळ उमेद पुन्‍हा जागवावी, खरेखुरे आंबेडकरी कार्यकर्त्‍याचे नवे तेजोमयी व्‍यक्तित्‍व घडवावे, पहिल्‍यापेक्षा अधिक व्‍यापक जाणीव घेऊन क्रियाशील व्‍हावे, यासाठी या जाणत्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रयत्‍न करावयास हवेत. परिस्थितीच्‍या रेट्याची वाट न बघता एकएका कार्यकर्त्‍याशी संवाद केला पाहिजे. काही किमान सहमतीच्‍या मुद्द्यांवर हालचाली सुरु केल्‍या पाहिजेत. धुक्‍यात नुसतेच गप्‍प उभे राहण्‍यापेक्षा त्‍यातल्‍या त्‍यात विरळ थरातून हिंमतीने वाट शोधायला लागले पाहिजे. या प्रयत्‍नांतूनच सूर्य उगवणार आहे. धुके सरणार आहे. वाट स्‍पष्‍ट होणार आहे. दिशा मोकळ्या होणार आहेत.

रिपब्लिकन पक्ष नाम के वास्‍ते का होईना आज एकवटला आहे. त्‍याला योग्‍य दिशा देण्‍याचा प्रयत्‍न व्‍हायला हवा. ही दिशा कोणती हे फार शोधण्‍याची गरजच नाही. आता तरी बाबासाहेबांनी त्‍यांच्‍या खुल्‍या पत्रात मांडलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्‍पना पुरेशी आहे. आधी तिथवर पोहोचणे आवश्‍यक आहे. मग त्‍याचा विकास करता येईल.

काय आहे ही संकल्‍पना ?

लोकशाही रचनेत लोकशाहीच्‍या रक्षणासाठी प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणे (खरा रिडालोस), ही तळमळ त्‍यात आहे. त्‍यात कोठेही एकजातीयता, विशिष्‍टता नाही, तर समष्‍टीच्‍या समग्र कल्‍याणाचा घोष त्‍यात आहे. केवळ बौद्धांचा पक्ष असे जे संकुचित स्‍वरुप आजच्‍या रिपब्लिकन पक्षाचे आहे, त्‍याचा मागमूसही बाबासाहेबांच्‍या मूळ संकल्‍पनेत नाही, किंबहुना त्‍यास पूर्ण विरोधी अशीच बाबासाहेबांची मांडणी आहे. या पक्षाच्‍या संकल्‍पनेसंबंधात त्‍यांनी एस.एम. जोशी, लोहिया यांच्‍याशी बोलणीही सुरु केली होती. तथापि, त्‍याच काळात त्‍यांचे महापरिनिर्वाण झाल्‍याने ही बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत.

या मांडणीबाबत आणखी काही नोंदवत राहणे, ही विनाकारण पुनरुक्‍ती ठरेल. बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्षाची संकल्‍पना स्‍पष्‍ट करणारे त्‍यांचे खुले पत्र (ज्‍याचा सगळे ऐक्‍यवादी रिपब्लिकन पुढारी उल्‍लेख करत असतात व त्‍यावर आधारित आमचे ऐक्‍य किंवा पक्ष असल्‍याचा दावा करत असतात व नेमके त्‍याच्‍या विरोधात व्‍यवहार करत असतात) जिज्ञासूंनी मुळातून वाचावे. महाराष्‍ट्र शासनाने प्रकाशित केलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन व भाषणे, खंड 20 मध्‍ये ते उपलब्‍ध आहे.

उद्याच्‍या महाराष्‍ट्रात नव्‍या तेजोमयी व्‍यक्तित्‍वाचा आंबेडकरी कार्यकर्ता घडायचा असेल, तर आजच्‍या आंबेडकरी तसेच अन्‍य पुरोगामी कार्यकर्त्‍यांनी काही समज व व्‍यवहार जाणतेपणाने अमलात आणायला हवेत. उदाहरणादाखल काही बाबी खाली देत आहे.

आजही दलित अत्‍याचारांच्‍या घटना महाराष्‍ट्रात घडत असतात. खैरलांजीच्‍या निर्घृण हत्‍याकांडाने तर महाराष्‍ट्रातील आंबेडकरी व अन्‍य तमाम पुरोगामी जनतेच्‍या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. दलित पँथरच्‍या काळात अशा घटनांबाबत तात्‍काळ प्रतिक्रिया उमटायच्‍या. खैरलांजी हत्‍याकांडानंतर जवळपास महिन्‍याने प्रति‍क्रिया उमटल्‍या. पँथरच्‍या काळाच्‍या तुलनेने आजच्‍या आंबेडकरी समाजात विलक्षण बदल झालेत, तरीही असे का व्‍हावे ? आज बौद्ध समाजात 4 वर्तमानपत्रे आहेत. सुमारे 74 टक्‍के साक्षरता (ब्राम्‍हण समकक्ष जातींच्‍या खालोखाल) आहे. गतीने वाढणारा उच्‍चशिक्षित वर्ग आहे. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांपासून संसदेपर्यंत पहिल्‍यापेक्षा अधिक राजकीय सत्‍तेत सहभाग आहे....तरीही असे का व्‍हावे ? भौतिक विकासाच्‍या क्रमात संवेदनांचा विकास अडखळत तर नाही ?

अशा अत्‍याचारांत न्‍याय मिळणे म्‍हणजे नक्‍की काय ?

एक म्‍हणजे, गुन्‍हेगारांना कठोरात कठोर शासन होणे. हा एक टप्‍पा आहे. त्‍यासाठी सर्वत-हेचे प्रयत्‍न करायला हवेत. मात्र दुसरा टप्‍पा अशारीतीची एकही घटना महाराष्‍ट्रात यापुढे घडणार नाही, असे वातावरण निर्माण करणे हा आहे. पहिला टप्‍पा झाला की आपले काम झाले, असे होऊ नये. दुसरे काम हे लांब पल्‍ल्‍याचे आहे. ते चिकाटीने व सातत्‍याने करावे लागणार आहे.

खैरलांजी हत्‍याकांडातील आरोपींपैकी काहींना फाशी तर काहींना जन्‍मठेप अशी शिक्षा खालच्‍या न्‍यायालयाने दिली. आता वरच्‍या न्‍यायालयात पुढची कार्यवाही चालेल. तिथेही या शिक्षा कायम राहाव्‍यात, यासाठी सजग प्रयत्‍न करावेच लागतील. पण आज खैरलांजीत एकही बौद्ध कुटुंब शिल्‍लक नाही, त्‍याचे काय करायचे ? या हत्‍याकांडानंतर तेथील उरलेली 3 बौद्ध कुटुंबे गाव सोडून निघून गेली. ती परत कशी येणार ?

आंबेडकरी चळवळीत काहींच्‍याकडून दलितांच्‍या स्‍वतंत्र वसाहती करा ही खुद्द बाबासाहेबांनी रद्दबातल केलेली मागणी परत पुढे आली. काहींनी दलितांना बंदुका द्या अशीही मागणी केली. काही विद्यापीठाच्‍या आवारात सुरक्षित राहणा-या विद्वानांनी आता होऊन जाऊ द्या यादवी अशा बेजबाबदार चिथावण्‍याही दिल्‍या.

असे अत्‍याचार पुढे घडता कामा नये, यासाठीची खरोखरीची उपाययोजना दोन पातळ्यांवर करावी लागेल. एक, बौद्धांची-दलितांची संघटनात्‍मक कमजोरी घालविणे आणि दोन, अजूनही सवर्णांच्‍या मनात असलेली तीव्र जातीयता नष्‍ट करणे.

आंबेडकरी चळवळीची संघटनात्‍मक मजबुती म्‍हणजे निवडणुकांच्‍या तोंडावर रिपब्लिकन ऐक्‍याचे फार्स नव्‍हे. रिपब्लिकन पक्ष एकवटण्‍याचे प्रयत्‍न तळातून, कार्यक्रमाधारित व लोकशाही मार्गाने व्‍हायला हवेत. ज्‍यांना रिपब्लिकन पक्षात यायचे नसेल, त्‍यांना स्‍वतंत्र राहण्‍याची मुभा ठेवून दोस्‍ती केली पाहिजे. ऐक्‍य हा भावनिक प्रकार होता कामा नये. नेतृत्‍वाच्‍या वैयक्तिक आकांक्षा व राजकीय भूमिका यांमुळे आजवरचे ऐक्‍याचे प्रयोग फसत आले. याच गोष्‍टी ऐक्‍याच्‍या प्रक्रियेपासून दूर ठेवावयास हव्‍यात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्‍यांचे विचार व त्‍यांनी दिलेला बौद्ध धम्‍म या सर्व गटातटांत मान्‍यता असलेल्‍या सामायिक व अत्‍यंत आदरणीय बाबी आहेत. प्रत्‍येक बौद्ध वस्‍तीत बुद्धविहार असतेच. या बुद्धविहारात त्‍या वस्‍तीतले सर्व गटातटांना मानणारे सामान्‍य लोक एकत्र येऊ शकतील. बाबासाहेब, त्‍यांचे विचार व बुद्ध धम्‍म या सामायिक बाबींबाबत अधिक समजून घेणे, आपले जाणतेपण वाढविणे व समाज म्‍हणून एक राहणे, हे होऊ शकते. अट एकच, पक्षीय किंवा गटाच्‍या राजकीय भूमिकांची या पातळीवर चर्चा न करणे. प्रत्‍येकाला राजकीय भूमिका घ्‍यायला मोकळीक ठेवणे. समान किमान भूमिकेवर आधारलेल्‍या वस्‍त्‍यांवस्‍त्‍यांमधील अशा सामान्‍यांच्‍या ऐक्‍यातूनच राज्‍यपातळीवरील टिकाऊ ऐक्‍य उदयास येऊ शकेल. अत्‍याचार करु धजणा-यांना या ऐक्‍याचा निश्चितच धाक राहील व राजसत्‍तेलाही या ऐक्‍याची पदोपदी दखल घ्‍यावी लागेल.

संतांच्‍या, थोर समाजसुधारकांच्‍या या महाराष्‍ट्रात अजूनही जातीयता तीव्र आहे. दृश्‍य अस्‍पृश्‍यता भलेही नसेल; पण जातभावना तीव्र आहे. ती वितळण्‍याची गती फारच हळू आहे. ती गती वाढवावी लागेल. त्‍यासाठी आर्थिक-भौतिक प्रश्‍नांवर लढे लढविणा-या संघटनांनी, नेत्‍यांनी जाणीवपूर्वक आपल्‍या संबंधात येणा-या व कष्‍टकरी म्‍हणून एक नाते असणा-या दलित-सवर्णांच्‍या सामाजिक मनोमीलनाचे कसोशीने प्रयत्‍न करायला हवेत. (खैरलांजीत मारणारे व मरणारे दोघेही कष्‍टकरी व सामाजिक श्रेणीत निम्‍नस्‍तरावरचेच होते.)

महात्‍मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्‍यात मतभेद होते. तथापि, अस्‍पृश्‍यता हा कलंक आहे, ही भावना सवर्ण हिंदूंमध्‍ये मुरविण्‍यात महात्‍मा गांधींचा मोठा वाटा होता. या भावनेची बाबासाहेबांच्‍या चळवळीला अप्रत्‍यक्ष मदतच झाली. महाराष्‍ट्रातील अनेक सवर्णांचे आंबेडकरी चळवळीविषयी अनेक समज-गैरसमज असू शकतात. पण खैरलांजीसारख्‍या अमानुष हत्‍याकांडांना, अत्‍याचारांना नक्‍कीच समर्थन असणार नाही. अशावेळी आंबेडकरी तसेच अन्‍य समाजातल्‍या जाणत्‍यांनी महाराष्‍ट्राच्‍या विवेकशक्‍तीला साद घालण्‍याची गरज आहे. सवर्णांचा व्‍यवहार, हिदू धर्मातील जातीय उतरंड-विषमता यांवर सम्‍यक टीका जरुर हवी; मात्र सवंग प्रसिद्धीसाठी, टाळ्या घेण्‍यासाठी शिव्‍या घालणे आंबेडकरी कार्यकर्त्‍यांनी बंद करावयास हवे. यामुळे मने अधिक फाटतात.

बौद्ध संघटित झाले. त्‍यांना इतर दलितांनी साथ दिली; तरीही ते अल्‍पसंख्‍य आहेत. बहुसंख्‍य समाजावर संख्‍येच्‍या जोरावर नियंत्रण ठेवणे शक्‍य नाही. केवळ आपल्‍या मतांच्‍या जोरावर निर्णायक ठरणे लोकशाही प्रणालीत शक्‍य नाही. कष्‍टकरी म्‍हणून असलेल्‍या हितसंबंधांच्‍या तसेच मानवतेच्‍या कार्यक्रमावर आधारित समाजातील अन्‍य घटकांशी संबंध जोडून बौद्ध समाजास बहुसंख्‍य व्‍हावेच लागेल.

यासाठीच आंदोलनाचे मार्ग नव्‍याने ठरवावे लागतील. राजकारणातील तत्‍त्‍वशून्‍य जातींच्‍या बेरजांच्‍या आहारी जाऊन बहुसंख्‍य होता येणार नाही. प्रथम तत्‍त्‍व, भूमिका निश्चित करावी लागेल. एकाही ब्राम्‍हणाला सोबत घेऊ नका, तरच आम्‍ही चवदार तळ्याच्‍या सत्‍याग्रहात सामील होऊ, ही चवदार तळ्याच्‍या सत्‍याग्रहावेळी ब्राम्‍हणेतर चळवळीतील नेत्‍यांची अट बाबासाहेबांनी अमान्‍य केली होती. मी ब्राम्‍हणांच्‍या नव्‍हे; ब्राम्‍हण्‍याच्‍या विरोधात आहे. हे ब्राम्‍हण्‍य असलेल्‍या ब्राम्‍हणांच्‍या, ब्राम्‍हणेतरांच्‍या तसेच बहिष्‍कृतांच्‍याही (दलितांच्‍या) मी विरोधात आहे, अशी बाबासाहेबांची तत्‍त्‍वकठोर भूमिका होती. तात्‍पुरत्‍या व्‍यावहारिक फायद्यासाठी तत्‍त्‍वहिन बेरजेला त्‍यांनी महत्‍व दिले नाही. आजही तत्‍त्‍वाच्‍या, भूमिकेच्‍या व कार्यक्रमाच्‍या आधारेच सोबत, युती किंवा आघाडी झाली पाहिजे.

प्रक्षोभित होऊन तोडफोड करणे, जाळपोळ करणे हे खरे आंदोलन नव्‍हे. शासनव्‍यवस्‍थाच बदलायची असेल, क्रांती करायची असेल, तर कायदा व सुव्‍यवस्‍था हातात घ्‍यायची अशी आंदोलने एकवेळ समजून घेता येतील. पण तीही तयारीने, मजबूत संघटनाच्‍या व व्‍यापक पाठिंब्‍याच्‍या सहाय्याने करावयाची असतात. दलित चळवळीला भडकाऊ भाषणांची पँथरच्‍या काळापासून प्रथा पडली आहे. पँथरच्‍या काळातील पोटतिडिक जाऊन आता नाटकीपणा आला आहे. सवंगपणे समाजाला भडकावले, कंठाळी भाषण केले तरच आपले नेतृत्‍व शाबित होऊ शकते, असे अनेक नेत्‍यांना-कार्यकर्त्‍यांना वाटते. यामुळे समाजाची फसगत होते. अशा भडकाऊ भाषणांनंतर होणा-या आंदोलनांत सामान्‍य दलित माणूस भरडला जातो. नेते अनेकदा नामानिराळे राहतात. केसेसमधून सोडवायला कोणी येत नाही. औषधोपचाराच्‍या मदतीलाही कोणी हात देत नाही. मृत्‍युमुखी पडलेल्‍यांच्‍या कुटुंबांना लांबवर साथ देण्‍याची उसंत कोणाला नसते. अशा हिंसक आंदोलनांनी मनातील चीड, संताप यांना वाट मिळाली असे वाटते. पण त्‍याने साधत काहीच नाही. उलट आपल्‍याच पायावर धोंडा मारुन घेणे होते. दलित वस्‍त्‍यांतील अनेक उद्रेकांच्‍या-अगदी खैरलांजीनंतरच्‍याही-अनुभवांतून आंदोलनांच्‍या मार्गांच्‍या पुनर्विचाराचाच मुद्दा अधोरेखित होतो.

बाबासाहेबांनी अशी आंदोलने केली नाहीत व अशी आगखाऊ भाषणेही केली नाहीत. मुद्द्याची अभ्‍यासपूर्ण मांडणी, नियोजनपूर्वक आंदोलन व केव्‍हा माघार घ्‍यायची याचा योग्‍य निर्णय ही त्‍यांच्‍या आंदोलनाची वैशिष्‍ट्ये होती. इच्‍छाशक्‍तीचे ताकदीने प्रकटीकरण होणे व जगाचे लक्ष वेधणे हेच जर आंदोलनाचे उद्दिष्‍ट असेल, तर बुद्धाच्‍या शांततेच्‍या मार्गाने होणारे आंदोलन अधिक परिणामकारक होते. महात्‍मा गांधींच्‍या पुढाकाराखालच्‍या आंदोलनांनी हेच सिद्ध केले. हिंसक आंदोलनात इतर समाजाची सहानुभूती गमावली जाते. उलट शांततेने, कळकळीने आवाहन करण्‍याच्‍या आंदोलनांनी इतरांचे लक्ष वेधते, आपले म्‍हणणे समजून घेण्‍याची मानसिकता तयार होते. आंदोलनांची रीत बदलण्‍याचे वळण लागणे कठीण आहे. पण अशक्‍य नाही. शिवाय हे मूळचे बाबासाहेबांचे, बुद्धाच्‍या शिकवणुकीचे वळण आहे. या वळणानेच पुढचे खैरलांजीसारखे अत्‍याचार टळू शकतात.

उद्याच्‍या महाराष्‍ट्रातील शाश्‍वत समतेचा मुक्‍काम आंबेडकरी चळवळीला त्‍याच वाटेवर सापडू शकतो.

- सुरेश सावंत

Wednesday, December 23, 2009

निर्णय


क्षात्रकुलोत्‍पन्‍न मराठा समाजाचे परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्‍कूल, ज्‍यु. कॉलेज व अध्‍यापक विद्यालय यांच्‍या संयुक्‍तपणे निघणा-या विकास या वार्षिकांकात 1983 साली प्रसिद्ध झालेली ही माझी कथा. मी त्‍यावेळी अध्‍यापक विद्यालयात शिकत होतो. सुरेश सावंत

खरे तर चारचौघांसारखं गवत खाणारं आयुष्‍य त्‍याने केव्‍हाच नाकारलं होतं. लग्‍न, पत्‍नी, मुले, संसार या गोष्‍टी आपल्‍यासाठी नाहीतच अशी त्‍याने आपल्‍या मनाची पक्‍की धारणा करुन घेतली होती. माणूस जन्‍माला येतो, मोठा होतो, लग्‍न करतो, संसार करतो आणि मरुन जातो. अखेर यातून तो मिळवतो काय ?

त्‍याला असे चार‍ भिंतींच्‍या आत सडायचे नव्‍हते. त्‍याला बेबंद आयुष्‍य हवे होते. स्‍वतःच्‍या मस्‍तीत धुंदपणे जगायचे होते. स्‍वयंप्रकाशित होऊन जगायचे होते. पण स्‍वतःच्‍या कल्‍याणासाठी, सन्‍मानासाठी नव्‍हे; तर त्‍याच्‍या भोवताली पसरलेल्‍या समाजासाठी, दीनदलितांच्‍या उद्धारासाठी. जन्‍मापासून आजतागायत बकाल झोपडपट्टीतले सगळे संस्‍कार रिचवतच तो मोठा झाला होता. पण ह्या आगीत तो लाकडासारखा जळून खाक झाला नाही, तर धातूसारखा तेजाळून निघाला.

परंतु जसजसा तो मोठा होत गेला, तसतसा नको तेवढा संवेदनशील होत गेला. पाने, फुले, समुद्र, आकाश, तारे यांच्‍याविषयी बरंचसं अनाकलनीय जाणू लागला. हळूवार, तरल स्‍वप्‍नांमध्‍ये रमू लागला. पण फक्‍त रमूच लागला. कारण भोवतालच्‍या समाजव्‍यवस्‍थेला तो पुरता जाणून होता. म्‍हणूनच स्‍वतःची तरलता तो स्‍वतःतच दाबत होता नि ह्या व्‍यवस्‍थेवर वीज होऊन कोसळण्‍याची तयारी करीत होता.

आणि...आणि अचानक त्‍याला ती भेटली. खरं तर तो मुलींना चांगलं ओळखून होता. आयुष्‍याचं हे वळणच असं फुलपाखरी स्‍वप्‍नांचं असतं. ह्या मुली येतात. पण त्‍यांना हवं असतं बागडणं. काही क्षण बागडतात नि आल्‍या तशा निघूनही जातात. पण जाता जाता एक आयुष्‍य, ध्‍येय उध्‍वस्‍त मात्र करतात.

पण ही तशी नव्‍हती. भावनिक, तरल संवेदनशील मनाची अन् अत्‍यंत समजुतदार, खळाळणा-या निर्झरासारखी.

तो स्‍वतःस आवर घालण्‍याचा प्रयत्‍न करतो. हे सगळे भास आहेत. आपल्‍या आयुष्‍यात अशी कोणी येणंच शक्‍य नाही. आपलं आयुष्‍य म्‍हणजे एक विराण वाळवंट. तिथे असं एखादं ओअॅसिस......छे! शक्‍यच नाही !

पण त्‍याने स्‍वतःला कितीही समजावण्‍याचा प्रयत्‍न केला असला तरीही तो त्‍याच्‍या नकळत गुंतत चालला होता.

स्‍त्री, पुरुषाची अर्धांगिनी. तिच्‍याशिवाय पुरुषाला पूर्णत्‍व नाही, यशाची प्रेरणा पुरुषाला मिळते ती स्‍त्रीच्‍या जीवापाड प्रेमातूनच. सावित्रीबाई, रमाबाई, कस्‍तुरबा ह्या साध्‍वी स्त्रियांच्‍या आधारानेच तर फुले, आंबेडकर, गांधी यशस्‍वी आयुष्‍याची वाटचाल खंबीरपणे करु शकले. महात्‍मा होऊ शकले. समाजाला घडवू शकले.

मग आपल्‍या आयुष्‍यात स्‍त्रीमुळे कमकुवतपणा येईल का ? आपली ध्‍येये कोलमडून पडतील का ? नाही. उलट ती आपल्‍या आयुष्‍यात बहार फुलवू शकेल. आयुष्‍याच्‍या नौकेचं सुकाणू समर्थपणे सांभाळू शकेल.

खरंच आपणासही आयुष्‍याच्‍या प्रत्‍येक वादळात खंबीरपणे साथ देईल अशीच सोबतीण हवी होती. यासाठी लागणारे सगळे गुण तिच्‍यात ठासून भरलेले आहेत. मग....? .....?

आता त्‍याने स्‍वतःस पूर्णपणे झोकून दिले. तीही त्‍याच्‍यात सामावून गेली. जगाची जाणीवच दोघं विसरुन गेली.

संध्‍याकाळी समुद्रावर ती दोघं जायची. सांध्‍यमेघांमध्‍ये स्‍वप्‍ननगरी वसवायची. कलत्‍या सूर्याच्‍या पाण्‍यावरील सुवर्णांकित चमचमत्‍या राजमार्गावरुन बेभान होऊन धावायची. विशेष म्‍हणजे ती दोघंही कवितांच्‍या प्रदेशात वावरणारी. त्‍यामुळे एकूण बहारच !

अन् एक दिवस.

ए, मला तुझ्या घरी घेऊन चल ना !’

तो एकदम दचकला. घर.......बकाल झोपडपट्टीतलं ते खुराडं. खुराडं तरी सुबक. गरजांच्‍या जाणिवेनुसार बांधलेलं. पण हे-

तसं त्‍याने तिला सगळं सविस्‍तरपणे सांगितलं होतं. घर, परिस्थिती, ध्‍येय वगैरे. आणि तिनेही ह्या सगळ्याला तोंड देण्‍याची केव्‍हाची तयारी केली होती. तुझ्या प्रेमाखातर मी सर्वस्‍वाची होळी करुन तुला साथ देईन. आयुष्‍याच्‍या रणांगणात तुझ्या खांद्याला खांदा भिडवून लढा देईन. तुझ्या दारिद्र्याशी मला काहीही सोयरसुतक नाही. फक्‍त तुझ्या यशस्‍वी आयुष्‍याची भागिदारी मला पत्‍करायची आहे, असेही तिने त्‍याला एका कलत्‍या वेळी सांगितले होते नि तोही तिच्‍या त्‍या उदात्‍त विचारसरणीने आषाढातील मेघांप्रमाणे भरुन आला होता.

पण तरीही तो मनातून दचकला. शंकेची पाल अस्‍पष्‍टशी चुकचुकली..... पण नाही! ती कमकुवत नाही. आपलं मनच शंकेखोर!

आणि त्‍याने तिला आपलं घर, परिसर दाखवून आणले. गटारावरुन उड्या मारताना तिची उडणारी त्रेधा त्‍याला बघवेना. घरात चटईवर बसवताना साधी खुर्चीही आपल्‍याकडे असू नये, याचे त्‍याला मनस्‍वी दुःख झाले. विशेषतः तिच्‍या चेह-यावरचे बदलणारे भाव तर त्‍याला भयानक अस्‍वस्‍थ करु लागले.

तिला निरोप दिल्‍यानंतर तो ह्याच अस्‍वस्‍थतेत बुडून गेला होता. बोलणं सोपं असतं. पण करणं कठीण. कथा-कादंब-यांमध्‍ये श्रीमंत नायिका गरीब नायकासाठी सर्वस्‍वाचा त्‍याग करुन येते. पण हे वाचणं सोपं असतं; प्रत्‍यक्ष कृतीस अवघड. हे तारुण्‍याचे चार-दोन क्षण उडून जातील. पुढे आयुष्‍याशी समायोजन साधणे कसं शक्‍य होईल ? ती पांढरपेशा कुटुंबात वाढलेली. तिच्‍या गरजा वेगळ्या, आकांक्षा वेगळ्या, शिवाय क्रूर जातिव्‍यवस्‍थेने नाडलेल्‍या हिंदू समाजातील संस्‍कारांनी ती जखडलेली.

खरंच ती करेल का याचा भेद ? आपले आयुष्‍य म्‍हणजे एक अग्निकुंड. ती टाकेल यात उडी ? आहे तिच्‍यात एवढं धैर्य ?

पण हे एवढं आपण केलंच का ? काय हक्‍क आहे आपणास एका कळीला अकाली कोमेजवायचा ? तिला उमलण्‍यास तिच्‍या योग्‍य अशी बागच हवी. आपले रेताड काय कामाचे ?

नको. नकोच ! तिला आपण सांगून टाकू सरळ की, तू तुझ्या मार्गाने जा. माझ्या प्रदेशाकडे कधीही फिरकू नकोस.

पण हे सांगणंही तेवढं सोपं नव्‍हतं. आयुष्‍यात त्‍याने पहिल्‍यांदाच, तेही उदात्‍त आकांक्षा बाळगून कोणावर तरी प्रेम केलं होतं. स्‍वप्‍नांचे इमले उभारले होते; पण पांढरपेशा संसाराचे नव्‍हे. त्‍या संसाराच्‍या नाट्यातील एक बाहुली म्‍हणून त्‍याला नको होती ती. समाज संग्रामात उतरण्‍यास त्‍याला हवी होती ती सावित्रीबाई फुले म्‍हणून. कस्‍तुरबा गांधी म्‍हणून. रमाबाई आंबेडकर म्‍हणून.

त्‍याच्‍या डोक्‍यात भयानक गुंता माजला होता. आपण असा विचार का करतोय ? ती तशी नाही. ती इतकी डरपोक नाही. आपल्‍या मनाला समजू शकणारी आहे ती. पण... आज तिच्‍या चेह-यावरचे बदललेले भाव..?

त्‍या संध्‍याकाळी तो तिला गाठतोच. ती काहीशी गंभीरच असते. दोघंही समुद्र किना-यावर नेहमीच्‍या ठिकाणी येऊन बसतात.

समुद्रावर सांज गडद होत चाललेली. सूर्य अस्‍तास गेलेला. तो तिला सरळ विचारतो-

इतकं पाहूनही तू तयार आहेस माझ्याशी लग्‍न करायला ?’

ती काहीच बोलत नाही. तो पुन्‍हा विचारतो-

बोल तू तयार आहेस ?’

तरीही तिचे मौन.उत्‍तरोत्‍तर गडद होत चाललेल्‍या कातरवेळेसारखी ती गहिरी होत चाललेली...


Thursday, November 26, 2009

माझ्या मनात झालेले ‘मिरॅकल’

मिरॅकल इन रवांडा.

90 मिनिटांचा मंचकावरील थरार. वंशसंहाराचा भीषण, बिभत्‍स कल्‍लोळ.

भयाच्‍या भयाण तांडवात आध्‍यात्मिक शांततेचा शोध- भय, संताप, सूड यांच्‍या पार जाणारा.

क्रौर्याची परिसीमा गाठून सर्वस्‍व उजाड करणा-या गुन्‍हेगारांना पिडितानेच दिलेली अखेरची क्षमा. विद्वेषाच्‍या समूळ उच्‍चाटनाचा शाश्‍वत मार्ग उजागर करणारी. अखिल मानवतेला कवेत घेणारी.

प्रेक्षक म्‍हणून माझ्या मनात भय, थरकाप, आक्रोश, अश्रू आणि अखेर उन्‍नत उन्‍मनावस्‍था...

मुंबई विद्यापीठातील नाट्यलेखिकांच्‍या आंतरराष्‍ट्रीय परिषदेतच्‍या समारोपावेळच्‍या या नाटकाने झालेल्‍या या उन्‍मनावस्‍थेतून अजूनही मी पुरता बाहेर पडू शकलेलो नाही. खरे तर बाहेर पडायची इच्‍छाही नाही. रोजचे व्‍यवहार चालू असले तरी आत इम्‍याक्‍युलीचे स्‍वगत, ईश्‍वराशी चाललेला तिचा संवाद चालू असतो. मध्‍येच कळ येते. कळवळायलाही होते. जखम भळभळते. श्‍वास वाढतात. गदगदून येते. डोळे ओथंबून येतात. ...तरीही खूप बरे वाटते. काहीतरी साचलेले मोकळे होते आहे, असे वाटते. अखिल मानवजातीच्‍या भविष्‍याची आश्‍वासकता श्‍वासांतून वाहू लागते.

या नाटकाबद्दल मला काय वाटते, हे लिहिणे त्‍या अर्थाने व्‍यक्तिगत झाले आहे. माझ्या जाणिवांचा, संवेदनांचा तो आविष्‍कार आहे. डायरी लिहिल्‍यासारखा. ते तटस्‍थ, वस्‍तुनिष्‍ठ वगैरे काही नाही. मला असे वाटले, एवढेच.

रवांडातील वंशसंहारावरची ही एकपात्री एकांकिका. लेस्‍ली लेविस स्‍वोर्ड ही लेखिका आणि तीच अभिनेत्री. कथा वास्‍तवात घडलेली. इम्‍याक्‍युली या मुलीच्‍या आयुष्‍यावर बेतलेली.

रवांडा हा आफ्रिका खंडातील एक छोटा देश. लोकसंख्‍या 73 लाख. तेथील दोन प्रमुख टोळ्या- हुतू व तुत्‍सी. हुतू बहुसंख्‍य म्‍हणजे 84 टक्‍के. तुत्‍सी 15 टक्‍के. 1 टक्‍का त्‍वा नावाची एक छोटी जमात. या दोन टोळ्यांना आधीचाच संघर्षाचा इतिहास. तुलनाच करायची तर जर्मनीत ज्‍यू व भारतात मुस्लिम तसे रवांडात तुत्‍सी. या तुत्‍सींविषयी हुतूंच्‍या मनात ख-या-खोट्या कल्‍पनांचे, अफवांचे जहर साचत आलेले. तुत्‍सी आपल्‍याला कमी प्रतीचे मानतात, त्‍यांच्‍या बायका आमच्‍या हुतू पुरुषांना नादी लावतात व त्‍यांना जीवनातून उठवतात. आमच्‍या सर्वनाशाला हे तुत्‍सी कारण होणार आहेत. त्‍यांचा योग्‍य बंदोबस्‍त करायलाच हवा. ही मानसिकता तयार होत चाललेली. सरकारमधील अनेकांच्‍या मनात हाच द्वेष भरुन राहिलेला व तो प्रकटपणे व्‍यक्‍तही होणारा. आकाशवाणीवरच्‍या बातम्‍यांत, कार्यक्रमांतूनही हा द्वेष पोसला जात होता.

अशात समेटाचा प्रयत्‍न करणा-या जुवेनाल हब्‍यारिमाना या रवांडाच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांचे विमान पाडले जाते व त्‍यांचा त्‍यात अंत होतो. 6 एप्रिल 1994 रोजीची ही घटना. हे कृत्‍य करणारे नक्‍की कोण, याबद्दल अजूनही वाद असला तरी त्‍यावेळी हे करणारे तुत्‍सीच आहेत असे गृहीत धरले जाते व संहाराचा आगडोंब उसळतो. पुढच्‍या तीन महिन्‍यातील तुत्‍सींची क्रूर, हाल हाल करुन कत्‍तल केली जाते. या कत्‍तल झालेल्‍यांत तुत्‍सींच्‍या सहानुभूतिदार हुतूंचाही समावेश आहे. ही कत्‍तल लहानपणापासून एकत्र राहिलेल्‍या शेजा-यांनी, गावातल्‍या जवळच्‍या परिचितांनीच प्रामुख्‍याने केलेल्‍या आहेत.

सरकारच्‍या अधिकृत आकडेवारीनुसार 1,174,000 लोक 100 दिवसांत मारले गेले. (10,000 लोक प्रतिदिनी, 400 लोक प्रतितास, 7 जण प्रतिमिनिट). अन्‍य स्रोतांच्‍यानुसार हा आकडा 8,00,000 आहे. 3,00,000 तुत्‍सी वाचले. हजारो स्त्रिया विधवा झाल्‍या. त्‍यातल्‍या पुष्‍कळांना बलात्‍काराला सामोरे जावे लागले होते. अनेक बलात्‍कार अशा विटंबना करुन झाले की ब-याच जणी त्‍याचवेळी मेल्‍या. जिवंत बलात्‍कारितांपैकी बहुतेकांना आता एड्सने वेढले आहे. 4 लाख मुले अनाथ झाली. ज्‍या शाळांमध्‍ये, चर्चमध्‍ये तुत्‍सी जीव वाचवण्‍यासाठी लपले होते, अशा अनेक शाळा, चर्चेस आता त्‍यांच्‍या सांगाड्यांची, कवट्यांची म्‍युझियम्‍स झाली आहेत.

या भयानक वेडाचाराला आळा घालण्‍याचा काहीच प्रयत्‍न देशात झाला नाही. उलट मारेक-यांना प्रोत्‍साहन देण्‍याचा, सर्वतोपरी शस्‍त्रांचे सहाय्य देण्‍याचा, तुत्‍सींचा ठावठिकाणा सांगायला सरकारी यंत्रणाच सज्‍ज होती. आकाशवाणीवरुन तुत्‍सी झुरळांना चिरडण्‍याचे आवाहनच केले जायचे. या रणकंदनावेळी जगाची, युनोचीही स्थिती जवळपास बघ्‍यासारखी होती. यावर नियंत्रण घालण्‍याचे परिणामकारक प्रयत्‍न बाहेरुनही झाले नाहीत. त्‍यातल्‍या त्‍यात उशीरा का होईना पण फ्रान्‍सच्‍या हस्‍तक्षेपानेच थोडाफार परिणाम साधला गेला. त्‍यांनी उभारलेल्‍या छावण्‍यांतून तुत्‍सी निर्वासितांना आधार मिळाला.

इबॅगिझा या तुत्‍सी कुटुंबातील इम्‍याक्‍युली ही 24 वर्षांची युवती. वंशसंहार सुरु झाल्‍यावर वडील तिला त्‍यांच्‍या एका हुतू मित्राकडे जाऊन लपायला सांगतात. ती तयार नसते. पण तरुण मुलींना दंगलखोर काय रीतीने वागवतात, हे बापाला ठाऊक असल्‍याने तो आग्रहच करतो व इम्‍याक्‍युली अखेर घरातून निघते. तिची लपण्‍याची जागा म्‍हणजे त्‍या घरातील एक पटकन लक्षात न येणारे ओले, कोंदट बाथरुम. 3 फूट रुंद व 4 फूट लांब एवढी ही अरुंद जागा. त्‍यात आधीच 7 जणी लपलेल्‍या. सगळ्या जणी एकावेळी खाली बसूही शकत नव्‍हत्‍या अशा या जागेत इम्‍याक्‍युली तब्‍बल 91 दिवस राहिली. बाथरुमच्‍या बाहेरचे जग या काळात तिने पाहिलेच नाही. बाहेर हुतू मारेकरी सुरे परजत आरोळ्या ठोकत असलेले ऐकू येई. ते कधी ती लपलेल्‍या घरावर थापा मारत, मालकाला दम देत, घर आतून तपासत. तिच्‍या नावाने ओरडत. पण त्‍यांना ते बाथरुम काही लक्षात येत नसे. अशा अवस्‍थेत मोठ्याने बोलायचे नाही, बाथरुममधल्‍या पाण्‍याचाही आवाज होऊ द्यायचा नाही, याची खबरदारी लपलेल्‍यांना घ्‍यावी लागे. घरमालकानेही स्‍वतः मृत्‍यूवर उदार होऊनच यांना आधार दिलेला असतो.

बाहेरच्‍या थापा, आपण सापडलो तर आपल्‍यावर बलात्‍कार होणार, आपण मारले जाणार या भयाने उसासणारी, थरकापणारी, हाडांचा सापळा झालेली इम्‍याक्‍युली हळू हळू ईश्‍वराशी संवाद साधू लागते. तिचे उसासे, थरकाप, भय, चीड एका निरव शांततेत परिवर्तीत होऊ लागते.

आणि याचवेळी फ्रान्‍सचा हस्‍तक्षेप झाल्‍याचे व त्‍यांनी छावण्‍या उघडल्‍याचे कळते व इम्‍याक्‍युली जवळच्‍या छावणीत जाण्‍याचा निर्णय घेते. हिंमतीने घराच्‍या बाहेर पडते. प्रदीर्घ काळ अवघडून राहिल्‍याने व ताकदच संपल्‍याने तिला प्रथम धड उभेच राहता येईना. हळू हळू ताकद एकवटून ती रांगत, धडपडत फ्रेंच छावणीत दाखल होते. सुटकेचा निःश्‍वास टाकते.

आता आपल्‍या घरच्‍यांची माहिती घेऊ लागते. तेथील रजिस्‍टरमधली नावे आतुरतेने वाचायला लागते. अन् वडील, आई, भाऊ एक एक करुन सगळे कुटुंबीय केवळ मारले नव्‍हे, तर क्रूरपणे ठार केले गेल्‍याचे तिला समजते. एका भयाण पोकळीच्‍या विवरात ती कोसळत जाते. तिच्‍या कुटुंबात ती आता एकटीच शिल्‍लक असते. तिचा ईश्‍वराशी चाललेला संवाद तिला बहुधा ताकद देऊन उभी करतो. तिच्‍या कुटुंबीयांना ठार मारलेल्‍याला बघायचे आहे का, म्‍हणून तिला विचारले जाते व त्‍या मारेक-यास तिच्‍या समोर आणले जाते. ती शारीरिक व मानसिक दृष्‍ट्या थकून गेलेली आहे, गळून गेलेली आहे. आता तिने काय करायचे ? त्‍यास काय म्‍हणायचे ?

...ती एवढेच म्‍हणते, मी तुला क्षमा करते.

वास्‍तव आणि नाटक इथे संपते. वास्‍तवातल्‍या इम्‍याक्‍युलीने Left to Tell: Discovering God Amidst the Rwandan Holocaust (2006) हे पुस्‍तक लिहून हा सगळा घटनाक्रम नोंदवला आहे. लेस्‍लीने त्‍याचे मिरॅकल इन रवांडा हे नाटक केले. ते करण्‍यासाठी ती स्‍वतः वास्‍तवातल्‍या इम्‍याक्‍युलीबरोबर रवांडात हिंडली. घटनाक्रमातली माणसे, स्‍थळे समजून घेतली. इम्‍याक्‍युलीच्‍या मनाशी, तिच्‍या जाणिवांशी, संवेदनांशी एकरुप झाली. ते ती जणू स्‍वतः जगली. नाटक तिने लिहिले व नाटकात तिनेच काम केले.

नाटक लिहिले, काम केले असे म्‍हणणे खरे म्‍हणजे बरोबरच नाही. ती लेस्‍ली राहिलीच नाही. संहितेत आणि प्रयोगात ती इम्‍याक्‍युलीच होती. तिला कोणी बनावे लागलेच नाही. लेस्‍ली आणि इम्‍याक्‍युली या अभिन्‍न, एकच होत्‍या. रवांडातला अख्‍खा वंशसंहार त्‍याच्‍या अमानुष क्रौर्यासहित लेस्‍लीने रंगमंचावर एकटीने उभा केला. प्रत्‍यक्षातला इम्‍याक्‍युलीचा काळजीत पडलेला बाप, लपायला आधार देणारा हुतू घरमालक, आरोळ्या ठोकत धिंगाणा घालणारे हुतू मारेकरी, छावणीतला फ्रेंच सैनिक, तिच्‍या कुटुंबीयांचा मारेकरी या सर्वांना लेस्‍लीनेच आपल्‍या प्रचंड ताकदीच्‍या अभिनयाने सजीव केले. प्रेक्षकांना त्‍या सर्व थराराचा जिवंत प्रत्‍यय दिला.

लेस्‍ली हे नाटक घेऊन जगभर हिंडते आहे. त्‍याच्‍या तिकिटांतून येणा-या पैश्‍यांतला एक हिस्‍सा रवांडातल्‍या अनाथ मुलांच्‍या संगोपनासाठी खर्च होणार आहे (A portion of all ticket sales is donated to Orphans Of Rwanda), असे या नाटकाच्‍या वेबसाईटवरील आवाहनात छापलेले आहे. तिने स्‍वतः रवांडातील दोन मुले दत्‍तक घेतली आहेत.

एवढेच नव्‍हे, या नाटकाच्‍या वेबसाईटवर तिने असेही आवाहन केले आहे If your theater or organization is interested in bringing this incredible message of forgiveness to your area, please contact us!

हा क्षमाशीलतेचा संदेश तिला महत्‍वाचा वाटतो व त्‍याचा प्रसार जगभर ती करु पाहते आहे. विलक्षण ताकदीची अभिनेत्री अन् त्‍याहून मोठी जग सुंदर, मानव्‍यपूर्ण करु इच्छिणारी कार्यकर्ती ! या कार्यकर्तीच्‍या कोंदणामुळे तिच्‍यातली अभिनेत्री खुलून दिसते.

नाटकाच्‍या शेवटी जो प्रचंड टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांकडून झाला त्‍यास तिने हसू आणि आसू भरल्‍या मुद्रेने प्रतिसाद दिला. केवळ कलाकार ती असती तर हसू पुरेसे होते. शेवटी भेटायला गेलेल्‍या एका कार्यकर्तीशी बोलताना नाटकाचा संदेश -क्षमेचा- खरेच लोकांपर्यंत पोहोचला का ?’ हा प्रश्‍न तिला विचारावासा वाटला.

कलेने निःसंशय संदेश द्यायचा असतो. अर्थात, तो प्रचारकी पद्धतीने नव्‍हे, तर त्‍याहून अधिक सशक्‍त, प्रत्‍ययकारी मार्गाने म्‍हणजे कलात्‍मकतेने. मानवी जीवनात सौंदर्य, समृद्धता निर्माण करणे, हेच तर कोणत्‍याही कलेचे अंतिम लक्ष्‍य असते.

नाटक पाहत असताना आपल्‍या देशांतील फाळणीपासून, गुजरातपर्यंतच्‍या हिंदू-मुस्लिम दंगली समोर येत होत्‍या. बाबरी मशिदीच्‍या विध्‍वंसानंतरची दंगल तर अगदी जवळून, म्‍हणजे तिच्‍यात वावरुनच अनुभवली होती. 93 च्‍या जानेवारीतील दंगलीत शिवाजी नगर, धारावीत मी पाहिलेली माणसे मला 94 च्‍या रवांडाच्‍या वंशसंहारात त्‍याच वृत्तीप्रवृत्‍तींसह आढळली.

रवांडातली इम्‍याक्‍युली अमेरिकेतील फिलिपिनी लेस्‍ली मुंबईच्‍या रंगमंचावर साकार करते आणि क्षमेनेच द्वेषाचे उच्‍चाटन होणार आहे, हा बुद्ध, ख्रिस्‍त, गांधी, मार्टिन ल्‍यूथर, मंडेला आदिंनी दिलेला अखिल मानवी संदेश देते. या त्‍याच्‍या व्‍यापक मानव्‍याच्‍या मध्‍यवर्तीत्‍वामुळेच मंचकावरील नाट्य माझ्याही मनात सुरु होते. इम्‍याक्‍युली, लेस्‍ली आणि मी वेगळ्या देशांचे नव्‍हतोच. आम्‍ही एकाच पृथ्‍वी ग्रहावरचे मानव वंशाचे सदस्‍य होतो.

जगात आजही फार फार वाईट वागणारे लोक आहेत. ते स्‍वतःच्‍याच मानवी वंशाच्‍या सदस्‍यांच्‍या कत्‍तली करत आहेत, दुस-यांना मारण्‍यासाठी स्‍वतःलाही बॉम्‍बने उडवत आहेत. आपल्‍याच मानवी वंशाच्‍या दुस-या व्‍यक्‍तीचा धर्म, जात, प्रदेश, देश, भाषा वेगळी आहे, म्‍हणून अपरंपार द्वेष करत आहेत. या सगळ्यामुळे मला असुरक्षित वाटते, माझे मित्र, माझी घरची माणसे यांच्‍या सुरक्षिततेबद्दल मला काळजी वाटते. केवळ लिंगाच्‍या फरकामुळे स्त्रियांशी होणारा विषम, अवमानकारक व्‍यवहार पाहिला की अस्‍वस्‍थ व्‍हायला होते. खूप मोठे लोक हा समाज, जग सुधारण्‍यासाठी प्रयत्‍न करुन गेले, तरी अजून जग पूर्ण मोकळा श्‍वास घेऊ शकत नाही. या जाणिवेने मी उदास होतो. हतबल झाल्‍यासारखेही वाटते.

...पण मग असे काही वाचले, पाहिले, ऐकले, केले की मिरॅकल होते. मन उभारी धरते. रंध्रारंध्रातून ऊर्जा प्रसवायला लागते. मन शांत होते. वैश्विक अणू-रेणूंशी माझी तादात्‍म्‍यता साधली जाते. एकाकीपण दूर होते. वाईटापेक्षा जग चांगले करणा-यांचा प्रवाह अधिक ओजस्‍वी, तेजोपुंज व दमदार आहे, याची प्रचिती येते.

मिरॅकल इन रवांडाने हेच माझ्या बाबतीत केले.

म्‍हणूनच सुरुवातीला म्‍हटल्‍याप्रमाणे या नाटकाने झालेल्‍या या उन्‍मनावस्‍थेतून अजूनही मी पुरता बाहेर पडू शकलेलो नाही. खरे तर बाहेर पडायची इच्‍छाही नाही.

- सुरेश सावंत