Wednesday, July 31, 2013

अन्न सुरक्षा अध्यादेशः निर्मिती व वैशिष्ट्ये


माहितीचा अधिकार, राष्‍ट्रीय रोजगार हमी या कायद्यांच्‍या यशानंतर अन्‍नाच्‍या अधिकाराचा कायदा संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्‍या विषयपत्रिकेवर आला. आला म्हणण्‍यापेक्षा सोनिया गांधींनी तो लावून धरला, हे वर्णन अधिक योग्‍य होईल. २००९ ला राष्‍ट्रपतींनी आपल्‍या अभिभाषणात या कायद्याचे सूतोवाच केल्‍यानंतर असे कायद्याने बांधून घेणे कितपत योग्‍य ठरेल, वाढीव धान्‍याची उचल व त्‍यासाठीचे वाढीव अनुदान सरकारला पेलणारे आहे का, अशा शंका सरकारमधील प्रमुख मंडळींनीच उपस्थित करायला सुरुवात केली. शरद पवार हे त्‍यातील एक मुख्‍य घटक होते. सोनिया गांधींचा निग्रह लक्षात घेऊन पवारांच्या अन्‍न खात्‍याने अखेर एक मसुदा तयार केला. हा मसुदा अत्‍यंत अपुरा व असंवेदनशील होता. पुढे प्रणव मुखर्जींच्‍या नेतृत्‍वाखालील सक्षम मंत्रिगटाकडे अवलोकनार्थ हा मसुदा गेला. या मंत्रिगटानेही यात विशेष मौलिक बदल केला नाही. कायद्यामागील उद्देश सफल होण्‍याऐवजी, आज लोकांना मिळणारे लाभही मर्यादित होण्‍याची भीती निर्माण झाली होती.

याच दरम्‍यान सोनिया गांधींच्‍या नेतृत्‍वाखाली राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीचे पुनर्घटन झाले. त्‍यांनतर पहिले कार्य सोनिया गांधींनी केले ते म्‍हणजे, हा मंत्रिगटाने मंजूर केलेला मसुदा समितीत चर्चेसाठी मागवला. त्‍यावर खोलात चर्चा घडवली. त्‍यानंतर सहमतीच्‍या शिफारशी बाहेर आल्‍या. हितसंबंधांच्‍या नानाविध संघर्षातून निघणारे मसुदे हे तडजोडीचेच असतात. कोणा एका गटाची संपूर्ण सरशी होत नसते. अन्‍न अधिकाराच्‍या कायद्याच्‍या शिफारशींबाबतही तेच आहे. अन्‍न अधिकाराचा कायदा समग्र असावा, असे वाटणारा एक गट, मुक्‍त आर्थिक विकासाला अडथळा न होता व अनुदान वाया न जाता गरिबांपर्यंत नेमकेपणाने योजना पोहोचाव्‍यात या भूमिकेचा दुसरा गट, तर आजच्‍या व्‍यवस्‍थेतील हितसंबंध जैसे थे राहावेत म्‍हणून कायदा होऊच नये, झालाच तर बोथट व्‍हावा, असे इच्छिणारा तिसरा गट असा हा संघर्ष आधी राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या मैदानात व पुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीत खेळला गेला. सर्वोच्‍च राजकीय मान्‍यता असलेल्‍या सोनिया गांधी आपले वजन कोठे टाकणार याला खूप महत्‍व होते. त्‍यांना कितीही राजकीय व नैतिक मान्‍यता असली, तरी अखेर सत्‍तेच्‍या राजकारणात हितसंबंधांच्‍या संघर्षातूनच मार्ग काढावा लागतो. तोल साधावा लागतो. त्‍यामुळे खुद्द त्‍यांच्‍याही मनाप्रमाणे हा मसुदा झालाच असेल असे नाही.

कायद्याच्या अंमलबजावणीची प्राथमिक जबाबदारी असलेल्या राज्यांच्या भूमिका समजावून घेणे, त्यांचा समावेश विधेयकात करणे, स्टँडिंग कमिटीकडे अधिक चर्चेसाठी विधेयक जाणे यामुळेही या विधेयकास अंतिम स्वरुप येण्यास अपरिहार्यपणे काही काळ गेला.

संसदेत चर्चा होऊनच हा कायदा संमत होणे आवश्यक होते. तथापि, विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज रोखून धरल्याने या कायद्याचे भविष्यच धूसर झाले. त्यामुळेच सरकारला (आगामी निवडणुका ध्यानात घेता) अध्यादेशाचे पाऊल उचलावे लागले. यथावकाश संसदेत मंजुरी घेताना यावर अधिक चर्चा होईल व हा अध्यादेश अधिक समावेशक होईल अशी अपेक्षा आहे.

हा कायदा झाल्याने रेशन, मातृत्व अनुदान, मध्यान्ह भोजन आदि महत्वाच्या योजनांना आता कायदेशीर आधार तयार झाला आहे. त्यांची व्याप्ती व परिणामकारता अधिक वाढणार आहे.

अशावेळी जे झाले आहे, त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अधिकच्या सुधारणा व मागण्यांना यातूनच बळ मिळू शकेल.

या अध्यादेशाची वैशिष्ट्येः
  • जगातील सर्वाधिक व्याप्तीचा अन्नसुरक्षा कार्यक्रम.
  • ७५% ग्रामीण व ५०% शहरी जनतेला प्रति व्यक्ती प्रति माह ५ किलो धान्य-तांदूळ, गहू, भरड धान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी इ.) अनुक्रमे ३ रु., २ रु. व १ रु. दराने मिळणार
  • देशातील १२० कोटी लोकसंख्येच्या दोन तृतीयांश भागाला हा स्वस्त धान्याचा लाभ मिळणार.
  • सध्याच्या अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच दरमहा ३५ किलो धान्य रु. ३, २ व १ प्रमाणे मिळणार.
  • राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे सध्याचे धान्य नियतन तसेच चालू राहील. तथापि, गत ३ वर्षांच्या सरासरी उचलीच्या अधीन राहून हे नियतन ठरविले जाईल.
  • ७५% ग्रामीण व ५०% शहरी या देशपातळीवरील प्रमाणास अनुसरुन राज्यनिहाय प्रमाण केंद्रसरकार निश्चित करेल. (गरिबीचे प्रमाण सर्वत्र सारखे नसल्याने काही राज्यांत हे आकडे वाढतील तर काही राज्यांत ते कमी होतील.)
  • वरील प्रमाणाच्या अधीन राहून पात्र कुटुंबांची निवड करण्याचे काम राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यावर सोपवण्यात आले आहे. यासाठी ते स्वतःचे निकष लावू शकतात किंवा सामाजिक-आर्थिक-जात गणनेच्या तपशीलाचा वापर करु शकतात.
  • गरोदर व स्तनदा मातांना निश्चित केलेल्या पोषणमूल्यांप्रमाणे पौष्टिक आहार मिळेलच. शिवाय रु. ६००० मातृत्व अनुदान मिळेल.
  • ६ ते १४ वयोगटातील मुलांना निश्चित केलेल्या पोषणमूल्यांप्रमाणे घरी घेऊन जावयाचा शिधा अथवा गरम शिजवलेले अन्न मिळेल.
  • निश्चित प्रमाणापेक्षा कमी धान्य केंद्राने राज्यांना पाठवल्यास उर्वरित धान्याचे पैसे केंद्र सरकार राज्यांना देईल. राज्यांनी पात्र व्यक्तींना जर धान्य अथवा जेवण दिले नाही, तर त्या व्यक्तींना केंद्राने ठरवून दिलेला ‘अन्नसुरक्षा भत्ता’ राज्य सरकारला द्यावा लागेल.
  • राज्यांतर्गत वाहतूक, अन्नधान्याची हाताळणी तसेच रेशन दुकानदारांचे कमिशन यासाठी राज्य सरकारला कराव्या लागणाऱ्या खर्चात केंद्र सरकार राज्यांना सहाय्य करेल. यासंबंधीचे निकष ठरवण्यात येतील. यामुळे वाहतूक वेळेत होण्यात व अन्नधान्याची हाताळणी कार्यक्षमरीत्या होण्यात मदत होईल.
  • रेशनविषयक काही सुधारणांचा अंतर्भाव या अध्यादेशात आहे. उदा. द्वार वितरण योजना, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, संपूर्ण संगणकीकरण, ‘आधार’च्या सहाय्याने लाभार्थ्यांची ओळख, रेशनवर द्यावयाच्या वस्तूंमध्ये विविधता इ.
  • कुटुंबातील १८ वर्षांवरील वयाच्या सर्वात ज्येष्ठ स्त्रीला कुटुंबप्रमुख मानून तिच्या नावे रेशनकार्ड देण्यात येईल. जर अशी स्त्री नसेल तर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ पुरुषाला कुटुंबप्रमुख समजण्यात येईल.
  • प्रत्येक जिल्ह्यासाठी तक्रार निवारण अधिकारी व राज्यपातळीवर अन्न आयोग असेल. नवी तक्रार यंत्रणा स्थापित करण्याचा खर्च वाचविण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या तक्रार निवारण यंत्रणेतूनही ही रचना राज्य सरकार करु शकते. तक्रार निवारण यंत्रणेत कॉल सेंटर्स, हेल्पलाईन आदिंचाही समावेश असेल.
  • पारदर्शकता व उत्तरदायित्वासाठी रेशन व्यवस्थेविषयीच्या नोंदी खुल्या केल्या जातील. सामाजिक लेखाजोखा केला जाईल. दक्षता समित्या स्थापन केल्या जातील.
  • आलेल्या तक्रारीबाबत जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्याकडून करण्यात आलेली शिफारस अमलात आणण्यात संबंधित सरकारी कर्मचारी किंवा यंत्रणा अयशस्वी ठरली तर तिला दंड करण्यात येईल.
  • प्रस्तावित लाभाची व्याप्ती लक्षात घेता, २०१३-१४ सालासाठी ६१२.३ लाख टन धान्य लागेल, असा अंदाज आहे. तसेच यासाठीचे एकूण अनुदान १,२४,७२४ कोटी रु. लागेल असा अंदाज आहे.
महाराष्ट्रावरचा परिणाम
  • राज्यात सुमारे ३१ टक्के इतक्याच स्वस्त धान्याचा निश्चित लाभ असलेल्या अंत्योदय-बीपीएल कार्डधारकांची संख्या (मुंबईत ती जेमतेम १ टक्के आहे. अन्य शहरांतही हे प्रमाण ५-७ टक्क्यांच्या पुढे नाही.) वाढून ती ग्रामीण भागात ७२.५१% तर शहरी भागात ४४.६४ % होणार आहे. (नव्या पाहणीनुसार या आकडेवारीत बदल होऊ शकतात.)
  • ग्रामीण भागातील शुभ्र रेशनकार्डधारक (ज्यांना सध्याही काहीच लाभ मिळत नाही) वगळता उर्वरित सर्व कार्डधारक या कायद्याखाली येण्याची शक्यता आहे.
  • रेशनवर गहू-तांदळाबरोबरच ज्वारी-बाजरी-नाचणीसारखी भरड धान्ये प्रति किलो १ रु. दराने देण्याची तरतूद या अध्यादेशात आहे. महाराष्ट्राला ही एक संधी आहे. आजही राज्यात भरड धान्ये खाण्याचे प्रमाण मोठे आहे. शिवाय शहरातील आरोग्याबाबत नवजागृत विभागही या धान्यांकडे आता वळू लागला आहे. आपण केंद्राच्या वतीने आधारभूत किंमती जाहीर करुन ही धान्ये आपल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करु शकतो. कोरडवाहू शेतकऱ्यांची बहुसंख्या असलेल्या आपल्या राज्याला ही बाब फायदेशीर ठरु शकेल.
  • या अध्यादेशात रेशनव्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण अभिप्रेत आहे. आपल्या राज्यात त्यास प्रारंभ झालेला आहे. बारकोड असलेली बायोमेट्रिक रेशनकार्डे दिली जाणार आहेत. यामुळे बोगस कार्डांवर नियंत्रण येणार आहे. ज्या असंघटित व स्थलांतरित कामगारांना ओळखीच्या व वास्तव्याच्या पुराव्यांअभावी रेशनकार्डे मिळणे कठीण जात होते, त्यांना ही कार्डे मिळून त्यांचा रेशनव्यस्थेतील प्रवेश सुलभ होऊ शकेल. अनेक वंचित विभाग रेशनच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे.
  • निवडीचे निकष ठरवण्याची अनुमती राज्यांना असल्याने कचरा वेचक, सायकल रिक्शावाले, फूटपाथवर राहणारे, शेतमजूर इ. विभागांचा रेशनव्यवस्थेतील (अगदी अंत्योदय योजनेतही) प्रवेश सुलभ होऊ शकेल.
  • आजच्या बीपीएल कार्डधारकांचे मात्र नुकसान व्हायची शक्यता आहे. आज त्यांना ५ व ६ रु. दराने ३५ किलो धान्य मिळते. या कायद्यांतर्गत २ व ३ रु. ने धान्य मिळणार असले तरी ते एकूण २५ किलो (५ माणसांचे कुटुंब धरल्यास) असणार आहे. उरलेले १० किलो धान्य बाजारभावाने घ्यावे लागणार. हा खर्च आजच्यापेक्षा अधिक होतो. याला उपाय म्हणजे राज्याने त्यांचा खर्च उचलणे. छत्तीसगड, तामिळनाडूसारखी राज्ये आजही केंद्राने ठरवून दिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपलीकडच्या लोकांचा समावेश करण्यासाठीचा खर्च स्वतःच्या तिजोरीतून करतात.
  • रेशन दुकानांच्या मार्जिनचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. संगणकीकरण व बायोमेट्रिक कार्डांमुळे बोगस कार्डे जवळपास संपुष्टात येणार. अन्य प्रकारच्या भ्रष्टाचारावरही अंकुश येणार. अशावेळी राज्य सरकारला केंद्राच्या सहाय्याने हा प्रश्न सोडवावाच लागेल. अन्यथा रेशन दुकाने हळूहळू बंद होऊ लागतील.

अध्यादेशाची राज्यनिहाय व्याप्ती


लोकसंख्या2011 (दशलक्ष)

अन्नसुरक्षा अध्यादेशाची व्याप्ती (%)
ग्रामीण
शहरी
आंध्र प्रदेश
84.7
66.16
48.27
आसाम
31.2
78.78
51.66
बिहार
103.8
86.70
73.16
छत्तीसगड
25.5
84.27
56.52
गुजरात
60.4
71.71
44.82
हरयाणा
25.4
51.59
51.66
हिमाचल प्रदेश
6.9
48.34
34.91
जम्मू व काश्मीर
12.5
57.03
52.05
झारखंड
33.0
83.44
58.51
कर्नाटक
61.1
73.03
45.19
केरळ
33.4
45.76
38.22
मध्य प्रदेश
72.6
78.58
54.05
महाराष्ट्र
112.4
72.51
44.64
ओडिशा
41.9
79.04
56.11
पंजाब
27.7
52.10
49.19
राजस्तान
68.6
76.04
54.03
तामिळनाडू
72.1
65.29
42.70
उत्तर प्रदेश
199.6
80.71
61.25
उत्तराखंड
10.1
62.07
54.21
प. बंगाल
91.3
78.31
51.44
भारत
1,210.2
75
50
अरुणाचल

65.52
54.43
गोवा

48.66
32.93
दिल्ली

30.91
44.21
मणिपूर

88.04
85.81
मेघालय

76.70
63.36
मिझोराम

78.47
38.74
नागालँड

77.81
66.68
सिक्कीम

61.52
25.93
त्रिपुरा

68.24
41.64
अंदमान व निकोबार

11.69
10.66
चंदिगड

21.21
24.88
दादरा व नगरहवेली

84.57
64.58
दमण व दीव

57.72
59.79
लक्षद्विप

42.83
24.34
पुद्दुचेरी

21.64
23.93
 -   सुरेश सावंत