Friday, August 3, 2012

अण्‍णांचे आंदोलन राजकीय पक्षात परिवर्तीत होणार-एक सुचिन्‍ह

दिल्‍लीस्थित उपोषणाच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यात (2 ऑगस्‍ट रोजी) आपले आंदोलन राजकीय पक्षात परिवर्तीत करण्‍याच्‍या सहका-यांच्‍या मागणीला अण्‍णा हजारेंनी रुकार दिला आहे. उपोषणात वेळ वाया घालवण्‍याऐवजी राजकीय पर्याय उभा करण्‍यासाठी देशभर प्रचार मोहिमा काढण्‍याचा मनोदय त्‍यांनी जाहीर केला आहे. येत्‍या दोन दिवसांत यासंबंधी जनतेच्‍या प्रतिक्रिया त्‍यांनी मागवल्‍या आहेत. त्‍यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे. अण्‍णांनी मी स्‍वतः निवडणूक लढवणार नसल्‍याचे म्‍हटले आहे. पण तो काही महत्‍वाचा मुद्दा नाही. आपल्‍या आंदोलनाला ते राजकीय प्रक्रियेत आणत आहेत, हे महत्‍वाचे. यामुळे आजवरच्‍या निर्नायकी उधाणाला लगाम बसून अण्‍णांच्‍या आंदोलनाला पाठिंबा देणा-या सत्‍प्रवृत्‍त जनतेला योग्‍य दिशा गवसण्‍याची शक्‍यता तयार होऊ शकते. या अर्थाने, अण्‍णा टीमचा राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍याचा हा विचार हे सुचिन्‍ह ठरेल.

अर्थात, हे सर्व आंदोलनांना लागू नाही. कोणतेही आंदोलन अखेरीस पक्षात परिवर्तीत करायला हवे, असा याचा अर्थ नाही. अण्‍णांच्‍या आंदोलनाचे आजचे स्‍वरुप लक्षात घेता त्‍यास हीच मात्रा उपयुक्‍त ठरु शकते. या अर्थाने, हा उपाय 'विशिष्‍ट' आहे, 'सर्वसाधारण' नाही.

आपण लोकशाही प्रजासत्‍ताक देश आहोत. लोकांनी निवडून दिलेल्‍या प्रतिनिधींनी संसदेत अथवा विधिमंडळांत जाऊन कायदे करावयाचे असतात. लोकांच्‍या आशाआकांक्षा प्रति‍बिंबित करावयाच्‍या असतात. या आशाआकांक्षाना हितसंबंधांचा पाया असतो. 'भारतीय जनता' म्‍हणून तिची काही सर्वसाधारण समान लक्षणे आहेत, तसेच तिच्‍यात अनेक हितसंबंधांची गुंतागुंतही आहे. आर्थिक, सामाजिक, प्रादेशिक असे अनेक पैलू या हितसंबंधांना आहेत. कर्नाटकातील जनता व महाराष्‍ट्रातील जनता 'भारतीय' असूनही 'बेळगाव'चा तिढा सुटत नाही. तामिळनाडूच्‍या जनतेचे कर्नाटकी जनतेइतकेच 'भारतीयत्‍व' अस्‍सल आहे, पण 'कावेरी'च्‍या पाण्‍याचा वाद चालूच राहतो. 'भारतीय' दलित-आदिवासींना राखीव जागा, विशेष सवलती देणे 'भारतीय' सवर्णांतल्‍या सर्वांनाच रुचते असे नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. 'भारतीय जनता' आपले प्रतिनिधी निवडते, ती या हितसंबंधांना अनुसरुन. संसदेत अथवा विधिमंडळात या हितसंबंधांचे टकराव होत असतात. चर्चेच्‍या अखेरीस बहुमताने निर्णय होत असतात. तथापि, या बहुमताला भारतीय संविधानाने दिलेल्‍या दलित-आदिवासींसारख्‍या दुर्बल विभागांच्‍या खास संरक्षणांना हात लावता येत नाही. तसेच सेक्‍युलॅरिझमसारख्‍या मूळ चौकटीला इजा पोहोचवता येत नाही. त्‍या मर्यादेतच हे निर्णय करावे लागतात. कायदेमंडळांतल्‍या या चर्चा जेवढ्या विवेकी तेवढे हे निर्णय संतुलित असतात. भारतीय स्‍वातंत्र्याचा व सामाजिक सुधारणांचा जो महान संग्राम आपल्‍या देशात झाला, त्‍या संग्रामातून तयार झालेल्‍या 'भारतीय संविधानाने' देशाचा कारभार व पुढील वाटचाल ठरवण्‍यासाठी संसद व विधिमंडळाची ही व्‍यवस्‍था तयार केली आहे. कोणतीही 'व्‍यवस्‍था' ही परिपूर्ण नसते. तथापि, आपण स्‍वीकारलेली संसदीय प्रणाली आजचे प्रश्‍न सोडवायला निकामी ठरते आहे, अशीही आज स्थिती नाही. ही व्‍यवस्‍था नीट वापरली जात नाही, हा खरा प्रश्‍न आहे. ही व्‍यवस्‍था परिणामकारकपणे वापरण्‍याचे प्रयत्‍न ही आजची खरी गरज आहे. देशातील दुर्बल विभागांच्‍या कल्‍याणासह सर्व जनतेचे भविष्‍य घडविण्‍यासाठी ही संवैधानिक व्‍यवस्‍थाच आज उपयुक्‍त आहे, या विश्‍वासापोटी भारतीय संविधान संमत होण्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला, 25 नोव्‍हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीतील आपल्‍या शेवटच्‍या भाषणात भारतीय जनतेला कळकळीचा इशारा देतात- ‘ ...जेव्‍हा, संवैधानिक मार्ग उपलब्‍ध आहेत, तेव्‍हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्‍याकरण आहे आणि जितक्‍या लवकर आपण त्‍यांना दूर सारु तेवढे ते आपल्‍या हिताचे होईल.’ 

याचा अर्थ आंदोलने करायचीच नाहीत, केवळ निवडणुकांत भागिदारी करावयाची असे नाही. आपापल्‍या हितसंबंधांच्‍या संवर्धनासाठी संघटना बांधणे, सभा-मेळावे-प्रचारपत्रकांद्वारे भूमिका प्रचारणे, सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी सनदशीर आंदोलन करणे हे या संसदीय प्रणालीचा भागच आहे. अर्थात, अशी आंदोलने ही विशिष्‍ट मुद्दा अथवा हितसंबंधावर आधारित असल्‍याने त्‍याकडे सरकारचे लक्ष वेधणे, सरकारने त्‍यावर चर्चा करावी, यासाठी दबाव निर्माण करणे, एवढ्यापुरतीच मर्यादित असली पाहिजेत. संसदीय निर्णयप्रकियेलाच आव्‍हान देणारी असता कामा नयेत. कामगार, दलित, आदिवासी, स्त्रिया, अल्‍पसंख्‍याक इ. विविध समाजविभाग आपापल्‍या हितरक्षणार्थ आपापल्‍या संघटनांकरवी आवाज उठवत असतात. सरकारशी बोलणी करत असतात. त्‍यावेळी त्‍यांच्‍या विशिष्‍ट मागण्‍या असतात. त्‍या मागण्‍यांपुरतेच त्‍यांचे संघटन व आंदोलन असते. काही संघटना याहूनही अधिक समग्र भूमिका घेऊन आंदोलने करतात. विवेकी पद्धतीने अशी आंदोलने वा आवाज उठवणे लोकशाही प्रजासत्‍ताक संवर्धित होण्‍यासाठी आवश्‍यकच आहेत. अण्‍णा हजारेंनी माहितीच्‍या अधिकारासाठी, भ्रष्‍टाचाराच्‍या विशिष्‍ट प्रकरणांचा छडा लावण्‍यासाठी केलेली याआधीची आंदोलने ही या प्रकारात मोडतात.

मात्र, जनलोकपाल आंदोलन हे या मर्यादा ओलांडणारे आहे. संसदीय प्रणालीवर आघात करु पाहणारे आहे. देशातील सर्व समस्‍यांचे मूळ भ्रष्‍टाचार आहे व लोकपालसारखी यंत्रणा उभारली की या समस्‍या दूर होतील, असा आभास या आंदोलनकर्त्‍यांनी निर्माण केला. प्रत्‍येकाला भ्रष्‍टाचाराचा त्रास आपापल्‍या पातळीवर होत असतो. अण्‍णांच्‍या आंदोलनात वकिलांची संघटना उतरली ती त्‍यांना न्‍यायालयात कागदपत्रे मिळविताना होणा-या भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधात. पण याच वकील मंडळींपैकी अनेकजण आपल्‍या अशिलांना लुटत असतात, तो त्‍यांच्‍या लेखी भ्रष्‍टाचार नसतो. सरकारच्‍या भ्रष्‍टाराविरोधात जे सिनेतारे अण्‍णांच्‍या आंदोलनात उतरले, त्‍यांच्‍यातल्‍या अनेकांना कर चुकवणे हा भ्रष्‍टाचार वाटत नाही. उच्‍चमध्‍यमवर्गातल्‍या तसेच उच्‍चवर्णीयांतल्‍या अण्‍णांना पाठिंबा देणा-या अनेकांनी आपल्‍या मुलांना विनाअनुदानित महाविद्यालयांत कॅपिटेशन फी भरुन प्रवेश घेतला आहे. त्‍यांना हा बिनपावत्‍यांचा पैसा देण्‍याचा राग आहे. आणि तो खरा आहे. पण ज्‍या दलित विद्यार्थ्‍याला थोडेसे गुण कमी पडल्‍याने राखीव जागातल्‍या मेरिटलिस्‍टमध्‍ये येता येत नाही त्‍याला या मध्‍यमवर्गातल्‍या सवर्ण विद्यार्थ्‍यापेक्षा अधिक गुण असूनही विनाअनुदानित महाविद्यालयांत पैश्‍यांअभावी प्रवेश मिळत नाही. राखीव जागांविषयी बोटे मोडणा-या सवर्णांतल्‍या अनेक मंडळींना दलित विद्यार्थ्‍याची जात व गरीबी ही दुहेरी व्‍यथा आपली वाटत नाही. अण्‍णांच्‍या आंदोलनात 'भ्रष्‍टाचारविरोध' या सबगोलंकारी संकल्‍पनेच्‍या एकाच ढगात प्रत्‍येकाला आपापले आकार दिसतात. हितसंबंधांचे हे अंतर्विरोध दिसेनासे होतात. 'भारतमाता की जय' म्‍हटले की प्रत्‍येकाला आपापल्‍या हितसंबंधाचा जयजयकार झाल्‍यासारखा वाटतो. 'इन्किलाब झिंदाबाद' या घोषणेचेही तसेच. प्रत्‍येकाला क्रांती आपापल्‍या सोयीची असणार असेच वाटते. अण्‍णा टीम भारतीय जनता, इन्किलाब या शब्‍दांचा वापर भोंगळपणे करुन जनतेची दिशाभूल तर करतेच, पण मुख्‍य म्‍हणजे संसदीय प्रणालीवरील जनतेचा विश्‍वास उडवते. अराजकीय माहौल तयार करते. खरा क्रांतिकारी लढ्याचा मार्ग यातून धूसर होतो. सर्वधर्मसमभाव व दलित-कष्‍टकरी-स्त्रियांच्‍या हितशत्रूंना आपल्‍या कारस्‍थानांसाठी भरपूर अवकाश तयार होतो. 

अण्‍णांच्‍या लोकपाल आंदोलनाचा राजकीय पक्ष होण्‍याने हा अराजकीय माहौल ओसरायला मदत होईल. राजकीय पक्षाला देशातील विविध हितसंबंधांबाबत भूमिका घेऊन समग्र धोरण जाहीर करावे लागते. आमच्‍या उमेदवाराला केवळ लोकपालसाठी निवडून द्या, असे म्‍हणता येत नाही. अण्‍णांच्‍या आंदोलनाला आपले आर्थिक, सामाजिक धोरण राजकीय पक्ष होताना ठरवावेच लागेल. आजचा गोलमालपणा बंद होईल. अण्‍णांचे उमेदवार निवडणुकांत भागिदारी करतील, त्‍यावेळी या सर्व प्रश्‍नांविषयी त्‍यांना बोलावे लागेल. पैश्‍याचा गैरवापर व उधळमाधळ टाळून निवडणुका लढवण्‍याचे चांगले पायंडेही ते पार पाडतील. मुख्‍य म्‍हणजे, निवडून जाऊन संसदेतील चर्चांत भाग घेऊन आपले उद्दिष्‍ट गाठायचा प्रयत्‍न करतील. त्‍यामुळे आजची संसदबाह्य अराजकी वाटचाल थांबेल. या क्रमात राजकारण्‍यांच्‍या भूलथापांना व भ्रष्‍टाचाराला कातावून अण्‍णांना पाठिंबा देणा-या सत्‍प्रवृत्‍त मंडळींना आंदोलनाच्‍या योग्‍य रीतीचा बोध होण्‍याचा मार्गही प्रशस्‍त होईल. 

- सुरेश सावंत

Thursday, August 2, 2012

रिओची वसुंधरा परिषद, जागतिक पर्यावरण व जीवाश्‍म इंधन

खनिज तेल, गॅस व कोळसा यांना जीवाश्‍म इंधन म्‍हटले जाते. या इंधनाच्‍या अतिरेकी वापराने जागतिक पर्यावरणाला हानिकारक अशा कार्बनचे उत्‍सर्जन मोठ्या प्रमाणात होत असते. त्‍यामुळेच या इंधनाचा वापर कमी करावा, त्‍यासाठी त्‍यावरचे देशांतर्गत दिले जाणारे अनुदान कमी करावे तसेच अन्‍य शाश्‍वत व पुनर्वापरयोग्‍य ऊर्जास्रोतांच्‍या (हवा, पाणी, सूर्य) शोधांना चालना द्यावी अशी मांडणी आंतराष्‍ट्रीय स्‍तरावर गेली अनेक वर्षे चालू आहे. कार्यकर्ते, अभ्‍यासक हा मुद्दा लावून धरत आहेतच. एवढेच नव्‍हे, तर देशादेशांच्‍या आंतरराष्‍ट्रीय परिषदांतही यासंबंधी चर्चा होऊन या दिशेने पावले टाकण्‍याचे निर्णय झालेले आहेत. तथापि, या पावलांच्‍या गतिबद्दल प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित करणारे अभ्‍यास प्रसिद्ध होत आहेत. या अभ्‍यासांच्‍या आधारे जागतिक मंचांवर प्रश्‍न विचारले जात आहेत, आंदोलनेही होत आहेत. नुकतीच जून महिन्‍यात रिओ येथे वसुंधरा परिषद पार पडली. या परिषदेवेळीही आंदोलने झाली. परिषदेत चर्चाही झाल्‍या. परंतु, परिषदेच्‍या अंतिम निवेदनात त्‍यासंबंधी ठोस निश्‍चय जाहीर झाले नाहीत, असा आक्षेप घेतला जात आहे. जवळपास 28 राष्‍ट्रांचा सहभाग असलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय ऊर्जा एजन्‍सी (आयइए) चे मुख्‍य अर्थतज्‍ज्ञ फतिह बिरोल (Fatih Birol) यांची या प्रश्‍नाचा परिचय करुन देणारी मुलाखत 'गार्डियन' वृत्‍तपत्राने या दरम्‍यान घेतली होती. त्‍यातील काही मुद्दे खाली नमूद करत आहेः 

जीवाश्‍म इंधनावर देश देत असलेले अनुदान पर्यावरणाला घातक ठरत आहे. जी-20 राष्‍ट्रसमूहांच्‍या 2009 च्‍या बैठकीत हे अनुदान टप्‍प्याटप्‍प्‍याने कमी करत जाण्‍याची प्रतिज्ञा करण्‍यात आली होती. तथापि, 2010 मध्‍येच अब्‍जावधीत दिल्‍या जाणा-या या अनुदानांचा आकडा अधिक फु्गलेला दिसतो. देशाच्‍या सरकारांनी अनुदान देऊन किंमती कमी करण्‍याच्‍या या पद्धतीमुळे या इंधनांचा वायफळ वापर वाढतो, सार्वजनिक पैसा अवाजवी खर्च होतो तसेच इंधनाचे स्‍मगलिंग वाढते. पुनर्वापरयोग्‍य ऊर्जास्रोतांच्‍या निर्मितीतील स्‍पर्धाशीलताही मंदावते. आयइएच्‍या अभ्‍यासातून 37 राष्‍ट्रांनी 409 बिलिअन डॉलर्सचे अनुदान देऊन जीवाश्‍म इंधनाच्‍या किंमती कृत्रिमरित्‍या कमी केल्‍याचे, मात्र पुनर्वापरयोग्‍य ऊर्जास्रोतांच्‍या तंत्रज्ञानासाठी केवळ 66 बिलिअन डॉलर्स खर्च केल्‍याचे उघड होते. 

गरिबी निर्मूलनासाठी हे अनुदान दिले जात असल्‍याचा दावा अनेकांकडून केला जातो. तथापि, आइएच्‍या अभ्‍यासातून गरिबांतील तळच्‍या विभागाला या अनुदानातील योग्‍य वाटा मिळत नसल्‍याचेच समोर येते. 2010 साली खर्च झालेल्‍या 409 बिलिअन डॉलर्सच्‍या अनुदानातील जेमतेम 8 टक्‍के रक्‍कम तळच्‍या 20 टक्‍के गरिबांपर्यंत पोहोचल्‍याचे आढळून येते. याऐवजी थेट कल्‍याणकारी योजनांचा लाभ या गरिबांना अधिक व कमी खर्चात होऊ शकला असता. या गरिबांना 'दुहेरी शिक्षा' भोगावी लागते. त्‍यांना या अनुदानाचा योग्‍य लाभ मिळत नाही तो नाही, शिवाय या वाया जाणा-या पैश्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठीच्‍या शाळा, इस्पितळे आदि सार्वजनिक सेवांसाठी पुरेसा निधी शिल्‍लक राहत नाही. 

अर्थात, हे अनुदान कमी करणे देशांतर्गत असंतोषाला चालना देऊ शकते. पेट्रोलवरील अनुदान कमी करण्‍याच्‍या निर्णयाने नायजेरियात या वर्षी एक आठवड्याहून जास्‍त काळ संपांना सामोरे जावे लागले. कामगार संघटनांनी पेट्रोलच्‍या प्रचंड दरवाढीविरोधात आंदोलने केली. अखेरीस पंतप्रधान गुडलक जोनाथन यांना अनुदानातील कपात काही अंशी माघारी घेऊन पेट्रोलच्‍या किंमती कमी कराव्‍या लागल्‍या. उठावांच्‍या दबावाने ही अनुदाने कायम ठेवणे योग्‍य होणार नाही. मात्र, अनुदानात एकदम मोठी कपात न करता ती क्रमशः करत जावी तसेच समाजातील गरीब गजरवंतांना ती नेमकेपणाने मिळेल, असे उपाय करावेत, हा धडा या आंदोलनांतून घ्‍यायला हवा. नायजेरियातील 49 टक्‍के जनता विजेपासून वंचित आहे. वास्‍तविक, हा देश निर्यात करत असलेल्‍या जीवाश्‍म इंधनाच्‍या महसुलातील केवळ 0.6 टक्‍के रक्‍कम या जनतेपर्यंत वीज पोहोचवायला पुरेशी आहे. 

विकसित देशांत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने इंधन अनुदान कमी करण्‍याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तथापि, अन्‍य मार्गांनी हे अनुदान दिले जात असल्‍याचे 'ओइसीडी' (परस्‍पर विकासासाठी राष्‍ट्राराष्‍ट्रांनी एकत्र येऊन स्‍थापन केलेली संस्‍था) ने निदर्शनास आणले आहे. तेल, गॅस व कोळसा उद्योगांना करसवलत तसेच स्‍वस्‍तात जमीन व अन्‍य पायाभूत सुविधांच्‍या मार्गाने हे अनुदान दिले जात आहे. 

बिरोल यांच्‍या भूमिकेची चिकित्‍सा तज्‍ज्ञ करतीलच. तथापि, त्‍यांच्‍या वरील म्‍हणण्‍यातून जीवाश्‍म इंधनाच्‍या अतिवापराचा व त्‍यावरील अनुदानाचा प्रश्‍न गंभीरपणे अधोरेखित होतो. पेट्रोल-डिझेल-गॅस यांच्‍या अनुदानात कपात करणे व त्‍यांचे भाव वाढविणे ही प्रक्रिया भारतातही सुरु आहे. अशी भाववाढ झाली की त्‍याला सार्वत्रिक विरोधही होतो. सरकारने त्‍यावरील आपले विविध कर कमी केले तर अशी भाववाढ करावी लागणार नाही, असेही उपाय डाव्‍या संघटनांकडून सुचवले जातात. त्‍यांचा जरुर विचार करावा. मात्र, बहुतेकवेळा इंधन भाववाढीला विरोध हा सवंग व सत्‍ताधा-यांच्‍या विरोधात करायलाच हवा, म्‍हणून असतो. या गदारोळात, हे अनुदान सत्‍पात्री लागण्‍याचे व इंधनाचा वायफळ वापर टाळण्‍याचे उपाय दुर्लक्षित राहतात, असे मला वाटते. देशात 35 कोटींचा मध्‍यमवर्ग आज आहे. त्‍यातील काहींना खरे म्‍हणजे या अनुदानित इंधनाची गरज नाही आणि उरलेल्‍यांना या इंधनाच्‍या भाववाढीचा भार सोसू शकतो. प्रश्‍न गरिबांचा आहे. त्‍यांच्‍यावर निश्चितपणे प्रत्‍यक्ष अ‍थवा अप्रत्‍यक्ष भार पडता कामा नये. त्‍यासाठी थेट अनुदानाची पद्धत अवलंबावयास हवी. 

यादृष्‍टीने अनेक तज्ज्ञांकडून सुचवलेले काही उपाय खाली देत आहेः 

घरगुती वापराच्‍या गॅस कनेक्‍शन्‍ससाठी उत्‍तेजन, प्रसंगी गरिबांना मोफत कनेक्‍शन्‍स देणे. नळाद्वारे गॅस वितरणाचीच व्‍यवस्‍था अंतिमतः करणे. तोवर परवडतील अशा दराची छोटी सिलेंडर्स देणे. ती सहज उपलब्‍ध होतील, याची यंत्रणा उभी करणे. इंधनासाठी रॉकेलचा वापर शून्‍य करणे. 

पेट्रोल-डिझेलपेक्षा रॉकेलचा स्‍वस्‍त दर हा या भेसळीला उत्‍तेजन देणारा मूळ घटक आहे. पेट्रोल, डिझेल व रॉकेल यांचे दर एकच करणे. त्‍यामुळे भेसळीची शक्‍यताच नाहीशी होते. रॉकेल खुल्‍या बाजारात आणून ते कोणालाही खरेदी करण्‍याची मुभा ठेवावी. ज्‍या छोट्या व्‍यावसायिकांना, अगदी लोडशेडिंगमुळे दिवाबत्‍तीसाठी ज्‍या मध्‍यवर्गीयांना ते हवे असेल ते त्‍यांना विनाअनुदानित दरात सहज उपलब्‍ध होईल. असे फ्री सेलचे रॉकेल आज उपलब्‍ध नसल्‍याने हे सर्व गरजवंत रेशनच्‍या काळ्याबाजारात नाईलाजाने सहभागी होतात. 

रेशनकार्डधारकांना त्‍यांचे अनुदान थेट अथवा स्‍मार्टकार्डद्वारे देणे आहे. याचा अर्थ, रेशनकार्डधारकाच्‍या वाट्याच्‍या रॉकेलचे अनुदान दरमहा सरकार त्‍याच्‍या बँकखात्‍यात जमा करील. अथवा स्‍मार्ट कार्ड (क्रेडिट कार्डप्रमाणे) द्वारे देईल. खुल्‍या बाजारातील रॉकेल विक्रेत्‍याला स्‍मार्ट कार्ड आपल्‍या मशीनमध्‍ये स्‍वाईप केल्‍यावर अनुदानाची रक्‍कम आपोआप मिळेल व उरलेली रक्‍कम तो रेशन कार्डधारकाकडून (स्‍मार्टकार्डधारकाकडून) रोखीने घेईल. ही रक्‍कम रेशनच्‍या रॉकेल दराइतकीच असेल. या पद्धतीमुळे अनुदान वाया न जाता नेमकेपणाने गरजवंतलाच मिळेल. त्‍याला हवे तेव्‍हा रॉकेल घेता येईल. फे-या माराव्‍या लागणार नाहीत. खुल्‍या बाजारातील कोणत्‍या रॉकेल विक्रेत्‍याकडे जायचे याचे स्‍वातंत्र्य त्‍याला राहील. 

रेशन कार्डधारकाप्रमाणेच ज्‍या कोणाला रॉकेल अथवा डिझेल सवलतीत द्यायचे असेल, त्‍यांनाही असे थेट अनुदान देता येईल. उदा. सावर्जनिक प्रवासी वाहतूक करणा-या परिवहन सेवा. आवश्‍यक तर डिझेल वापरणा-या मालवाहतूकदारांनाही असे थेट अनुदान देता येईल. (त्‍यामुळे रॉकेलमिश्रित डिझेलच्‍या वापराने होणारे प्रदूषण रोखले जाईल. ट्रकच्‍या इंजिनांची प्रकृतीही नीट राहील.) 

- सुरेश सावंत