Wednesday, January 28, 2015

RIP की आदरांजली?

मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहताना बहुतेकांकडून सवयीने comment नोंदवली जाते -'RIP'. 'Rest in peace'चा हा संक्षेप. मृतात्म्यास शांती/चिरशांती लाभो, असा त्याचा अर्थ. माणूस मेल्यावर दहन झाल्यास त्याची राख होते किंवा दफन झाल्यास माती होते. शांतीचा अनुभव घेण्यासाठीची जाणीव मेंदू असला तरच होणार. मेंदूच नष्ट झाल्यावर अशी चिरशांती मृत व्यक्ती कशी काय अनुभवणार? जी काय शांती मिळावयास हवी, तिची कामना आपण ती व्यक्ती जिवंत असतानाच करणे संयुक्तिक नव्हे काय? किमान लोक आपल्याविषयी अशा भावना व्यक्त करुन आपली दखल घेत आहेत, यामुळे ती व्यक्ती काही काळ तरी नक्की सुखावेल. कारण हे समजण्यासाठीचा तिचा मेंदू तेव्हा जिवंत असतो.

तात्पर्य, मृत व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना RIP ऐवजी 'आदरांजली', 'स्मृतीस अभिवादन' असे म्हणणे वास्तवाला धरुन होईल.

------------------------

टीपः 'आत्मा अमर आहे'अशी ठाम समजूत असलेल्यांना वरील अपील लागू नाही. अशी समजूत बाळगण्याच्या त्यांच्या अधिकाराचा मी आदर करतो.

Saturday, January 3, 2015

वसंतराव गोवारीकर गेले! काही आठवणी जाग्या झाल्या...

९०-९१ साल असावे. मी डॉ. माधव चव्हाणांबरोबर (सध्या'प्रथम'चे प्रमुख) साक्षरतेच्या आंदोलनात काम करत होतो. साक्षरतेसाठीचे संसाधन केंद्र ते जिथे शिकवत त्या माटुंग्याच्या UDCTत भीम रास्करांच्या नेतृत्वाखाली चालत होते. या केंद्राचा मीही एक भाग होतो. 

एके दिवशी तेथील फोन खणखणला. मी उचलला. माझ्या 'हॅलो..' नंतर पलीकडून शांत, हळुवार स्वर आले, "मी वसंत गोवारीकर बोलतोय. माधव आहे का?" मी उडालोच. साक्षात वसंतराव गोवारीकर! तेही दिल्लीहून! तेव्हा दिल्लीचा फोन म्हणजे ट्रंक कॉल. भरभक्कम बिल व्हायचे. बोलणाऱ्या दोहोंपैकी कोणावर तरी त्याचा भार येणार. अशा ट्रंक कॉलचे मला नेहमीच दडपण यायचे. त्यात एका प्रचंड मोठ्या माणसाबरोबर मी बोलत होतो. त्यांची ख्याती शालेय जीवनापासूनच ऐकत आलो होतो. यावेळी ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व भारत सरकारच्य विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. 

मी काही क्षण चाचरलो. पण गोवारीकरच इतक्या निवांतपणी व खास मराठीत बोलत होते की मीही सावरलो. माधव लेक्चरला की कुठे होता, ते सांगितले. त्यांनी माधवसाठी काहीतरी निरोप दिला. 

खास मराठीत म्हणण्याचे कारण त्यात कोठेही इंग्रजी शब्द नव्हता. दिल्ली-परदेशी वावरलेली (आता तर कॉलेजला गेलेली बहुतेक सगळीच) माणसे मराठी असूनही मिंग्लिशमध्ये बोलताना दिसतात. गोवारीकरांच्या पिढीचेच बहुधा हे वैशिष्टय असावे. या व त्यांच्या आधीच्याही पिढीतील इंग्रजी शिक्षण घेतलेली-विशेषतः इंग्रजांच्या काळात शिक्षण घेतलेली मराठी माणसे एकावेळी एकाच भाषेत बोलताना मी पाहिली आहेत. इंग्रजीत बोलताना ती इंग्रजीतच बोलत. मराठीत बोलताना मराठीतच बोलत. 

गोवारीकर व माधवचे संबंध तसे जुने. माधवचे वडील (लाल निशाण पक्षाचे) कॉ. यशवंतराव चव्हाण व गोवारीकर यांचा स्नेह-परिचय बहुधा कोल्हापूरच्या त्यांच्या लहानपणापासूनचा. गोवारीकरांच्या मुंबईत माधव (व बहुधा यशवंतरावांबरोबरही) दोन-तीन भेटी झाल्या. या भेटींत एकदा त्यांच्याबरोबर चेंबूरच्या आचार्य उद्यानाजवळील 'योगी' हॉटेलमध्ये जेवायला गेल्याचेही खास लक्षात आहे. हे खास लक्षात राहण्याचे कारण म्हणजे योगी हे आमच्यादृष्टीने तेव्हाचे मोठ्या लोकांचे हॉटेल. वस्तीत राहणारे आम्ही लहानपणापासून त्या हॉटेलच्या अवतीभोवती फिरत असू. पण आत जाणे हमारे बस की बात नव्हती. आता ते किंवा त्यासारखी हॉटेले तशी मोठी वाटत नाहीत. अशा हॉटेलांत जाणे आता अगदी सहज नाही, पण खूप कठीणही वाटत नाही. असो. 

चेंबूरला आमचे साक्षरतेचे काम ज्या चेंबूर-गोवंडी परिसरात चालले होते, त्या परिसरातील देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून इंधन की काहीतरी करण्याचा एक प्रयोग चालू होता. तसेच लोखंडे मार्ग, लुंबिनी बाग येथील वस्त्यांत गोल आकाराच्या पे अँड युज तत्वावरच्या शौचालयांचा प्रयोग चालू होता. या दोन्ही प्रयोगांशी गोवारीकरांचा जवळून संबंध होता. काय ते आता विसरलो. पण आम्हाला प्रत्यक्ष त्यांनीच ही ठिकाणे फिरुन दाखवली. या दोन्ही प्रयोगांत आम्ही लक्ष घालावे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यापैकी, गोल आकाराची शौचालये आमच्या-कोरो साक्षरता समितीच्या स्थानिक युवक व महिला कार्यकर्त्यांनी चालवायला घेतली. चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी तो आर्थिक आधारही झाला. पुढे या कार्यकर्त्यांचीच संस्था करुन त्यांनाच ती सोपवण्यात आली. २५ वर्षे होत आली. आजही ती उत्तम चालू आहेत. 

या परिसरात फिरताना ही शौचालये दिसली की वसंतराव गोवारीकरांची हटकून आठवण येई. त्यांचे संयत, ऋजू व्यक्तित्व व 'खास'मराठीतून बोलणे आठवे. आता तर ते अधिकच आठवेल. 

...वसंतराव तुम्हाला आदरांजली!

- सुरेश सावंत