Monday, May 2, 2022

सोलापुरातील बाबासाहेबांची चळवळ


गूगलच्या नकाशात एका मोठ्या भूभागातील छोटे ठिकाण आकार वाढवून (zoom in) आपण पाहतो तेव्हा त्यातील अनेक बारीक तपशील आपल्यासमोर येतात. थोरांच्या चरित्राचेही तसेच असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र चरित्र आपण वाचलेले असते. त्यात चळवळीच्या निमित्ताने भेटी दिलेल्या, काही कार्यक्रम घेतलेल्या शहरांचे, गावांचे उल्लेख येतात. तथापि, त्यांचे विस्तृत वा सखोल विवेचन, वर्णन तिथे नसते. ते शक्यही नसते. मात्र असे तपशील कळले तर बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या भूमिकांविषयी, आंदोलनाविषयी, संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या ताकदीविषयी अधिक जाणता येऊ शकते. ही उणीव भरुन काढण्याचे प्रयत्न अभ्यासकांनी, त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी करावयाचे असतात. पण तसे होतेच असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या महाराष्ट्रातील विविध भागांतील संचाराविषयी तेथील मंडळींनी तपशील गोळा करुन असे काही लिहिल्यास बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी, त्यांच्या सहकाऱ्यांविषयी, तेथील जनतेच्या प्रेरणा व स्पंदनांविषयी बऱ्याच बाबी उजेडात येऊ शकतील, अधिक ठळक होतील. हे घडू शकते, अगदी प्रभावीपणे घडू शकते, याचा नमुना म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचे ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. पुस्तकाच्या शीर्षकाखाली अधिक स्पष्टतेसाठी ते नोंदवतात – ‘रमाई आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले सोलापूर.’ सोलापुरातील बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारे हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे. वयाच्या ऐंशिव्या वर्षी कोविडच्या काळात दत्ता गायकवाड हा प्रकल्प हाती घेतात व विविध संदर्भ शोधत, अभ्यासत तडफेने पूर्ण करतात, हे विशेषच म्हणावे लागेल आणि त्यासाठी त्यांना धन्यवादच द्यावे लागतील.

पुस्तकाच्या परिचयादाखल काही बाबींची नोंद इथे करत आहे.

१९२४ ते १९५४ या कालखंडातील सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतील वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातील विविध भागांतील या नोंदी आहेत. पहिल्या प्रकरणात बार्शीच्या भेटींविषयी लिहिताना १९२४, १९३७ व १९४१ अशा तीन भेटी बाबासाहेबांनी बार्शीला दिल्याचे ते सांगतात. २४ साली बाबासाहेब ३३ वर्षांचे युवक होते. मात्र त्याही वयात दलित जनतेने त्यांना आपल्या उद्धारकर्त्याचे स्थान दिले होते. ‘बाबासाहेब कोण हाय – दलितांचा राजा हाय’ ही घोषणा प्रत्येक भेटीवेळी लोक देताना दिसतात. आपल्या उद्धारकर्त्याला बघण्यासाठीची लोकांची आतुरता, त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहू नये म्हणून लोकांची साधनांची कमतरता असलेल्या त्या काळातली धडपड यांचे चित्रदर्शी वर्णन या पुस्तकात आहे. बाबासाहेब येणार आहेत हे कळल्यावर त्या गावातील लोक आपल्या अन्य गावांतील सोयऱ्याधायऱ्यांना आमंत्रित करत असत. बाबासाहेब कितीही विरोध करत असले, तरी लोक पाया पडायला धडपडत असत. समता सैनिक दलाचा बंदोबस्त असतानाही एक बाई एका स्वयंसेवकाच्या पायातून शिरली व बाबासाहेबांच्या चरणांवर पडली. मरिआईच्या कट्ट्यावर बाबासाहेबांनी सभा घेतल्याची कोंडाबाई कांबळे या वयोवृद्ध बाईंची आठवण लेखक नोंदवतात. एके ठिकाणी बाबासाहेबांना उतरण्यासाठी योग्य जागा नव्हती म्हणून शाळेतला एक वर्ग स्वच्छ केला जातो. तिथे गादी, पलंग घातला जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी दलित समाजातील तरुण पहिलवान चहुबाजूंनी रात्रभर पहारा देतात. त्या काळात लोकांच्या बाबासाहेबांच्या प्रति काय भावना आहेत, याचा अंदाज आपल्याला असतो. पण त्याचे हे तपशील वाचल्यावर आपणास त्याची अचंबित करणारी प्रचिती येते.

मोठ्या चरित्रात छोट्या घटना व त्यातील मानवी संबंध फारसे व्यक्त होत नाहीत. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई गरोदर असताना त्यांची प्रकृती खालावली होती. हवापालटासाठी मुंबईच्या बाहेर नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यावेळी सोलापुरातील बावी येथे रमाई सहकुटुंब राहिल्या होत्या. सत्यशोधकी विचारांच्या वालचंद कोठारींनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केले होते. त्या वसतिगृहात रमाई उतरल्या होत्या. निंगप्पा ऐदाळे हे आधी शाहू महाराजांकडे असलेले बाबासाहेबांचे सहकारी वसतिगृहाची व्यवस्था पाहत असत. त्यांची पुतणी गंगुबाई या रमाईंच्या सहवासात होत्या. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात रमाईंविषयीच्या या काळातील आठवणी लिहिल्या आहेत. त्यातील एक अवतरण लेखकांनी या पुस्तकात दिले आहे. इतिहास लेखनाचे हे स्रोत गायकवाडांनी उजेडात आणले आहेत. अन्यथा ते अंधारातच गुडूप झाले असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य चळवळीचे विरोधक आणि निजामाचे हस्तक होते, हे दोन आरोप आजही हितसंबंधी मंडळी करत असतात. हे दोन्ही आरोप बिनबुडाचे आहेत, हे बाबासाहेबांच्या भूमिकांचे वस्तुनिष्ठ परिशीलन करणाऱ्यांना लक्षात येते. या पुस्तकात २२-२३ फेब्रुवारी १९४१ च्या सोलापुरातील कसबे तडवळे येथे झालेल्या महार मांग परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातील काही उतारे आहेत. त्यातील एक खाली देत आहे. त्यावरुन या आरोपांचा फोलपणा आपल्याला सहज ध्यानात येतो. या परिषदेत बाबासाहेब म्हणतात -

“निजाम हा आपल्या मातृभूमीचा शत्रू आहे. ही गोष्ट अस्पृश्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हिंदी संघराज्यात सामील होण्याला निजामाचा विरोध आहे. ...त्याबद्दल त्याची गय करता कामा नये. तसेच निजाम हा अस्पृश्यांचा आणि अस्पृश्यांच्या मातृभूमतीचा शत्रू आहे. म्हणून हैद्राबाद संस्थानातील स्वातंत्र्यप्रिय दलितांनी हैद्राबाद संस्थान हिंदी संघराज्यात सामील करण्यासाठी झटावे.”

अशा परिषदांमध्ये व्यापक धोरणासंबंधी तसेच स्थानिक प्रश्नासंबंधीचे ठराव होत असत. बाबासाहेब अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या प्रेरणेबरोबरच शिक्षण, संघटन व राजकारण यांची अपरिहार्यता समजून सांगत. त्या त्या वेळच्या ऐरणीवर आलेल्या (उदा. महार वतन खालसा करण्याची गरज) मुद्द्यांविषयी सविस्तरपणे समजावत असत. वैज्ञानिक दृष्टी असलेला नवा माणूस घडविण्यासाठी जुनाट अंधरुढींवर ते प्रहार व त्याचे प्रात्यक्षिक करत असत. या परिषदांच्या वेळी गोसावी, पोतराज, माळकरी, जटाधारी यांनी आपापल्या अंगावरच्या माळा, आभरान, भगव्या कफन्या स्टेजजवळच्या खड्ड्यात टाकून त्यावर रॉकेल ओतून त्यांचे दहन केल्याचे प्रसंग लेखकाने चितारले आहेत. देवदासींनी आपल्या जटा कापून त्यांना जाळल्याचेही प्रसंग यात आहेत. या परिषदांवेळी प्रबोधनात्मक जलसे होत. या जलशांत काही ठिकाणी स्टेजवर महिला सहभागी झाल्याचीही नोंद या पुस्तकात आहे. पाण्यासाठी अस्पृश्यांची स्वतंत्र विहीर बांधली जाते. तिला ‘आंबेडकर बावडी’ नाव पडते. या विहिरीचे उद्घाटन बाबासाहेब करतात. त्यांच्या हातून पाणी पिण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होते. हाही प्रसंग लेखकाने नोंदवला आहे. बाबासाहेबांच्या विचार-प्रेरणेची ऊर्जा माणसाचे माणूसपण कसे जागे करते त्याची कैक उदाहरणे सोलापुरातील या हकिगतींत आढळतात.

येवल्याला १९३५ साली धर्मांतराची घोषणा होण्यापूर्वी त्याबाबतचे सूतोवाच कितीतरी आधी सोलापुरात बाबासाहेब करतात. सोलापूरची मिल मालकाने बंद केल्याने खाजगी संपत्तीच्या अधिकारासंबंधीची पहिली घटना दुरुस्ती होते. गाडगे महाराज आजारी असताना भेटायला आलेल्या बाबासाहेबांना आपली पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा शैक्षणिक कामासाठी दान करतात. अशा अनेक घटनांची नोंद या पुस्तकात आहे.

बाबासाहेबांसाठी सर्वस्व अर्पण करणारे, चळवळीसाठी विविध मार्गांनी सहकार्य करणारे दलित व सवर्ण सहकारी हे आंबेडकरी चळवळीचे वैशिष्ट्य राहिले आहे. सोलापुरातील अशा सहकाऱ्यांचे पुस्तकात प्रसंगाप्रसंगाने उल्लेख, वर्णने येतातच. त्याचबरोबर लेखकांनी शेवटी त्यावर खास प्रकरणच लिहिले आहे. अशा सहकाऱ्यांची सविस्तर माहिती त्यात आहे. मोठ्या चरित्रात ठळक नावे येतात. बाकी असंख्य कार्यकर्ते विस्मृतीत जातात. स्थानिक चळवळीच्या इतिहासाची नोंद करणाऱ्या अशा पुस्तकांतून त्यांचा यथोचित परिचय देणे ही त्यांच्याप्रतिची कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले बाबासाहेबांचे जवळचे सहकारी जिवप्पा ऐदाळे अखेरपर्यंत निष्कांचन होते, हे इथे आपल्याला कळते. सोलापुरातील बाबासाहेबांच्या समकालीनांमध्ये वालचंद कोठारी, निंपप्पा ऐदाळे, हरिभाऊ तोरणे, उद्धव शिवशरण, जनार्दन सोनकांबळे, जी. आर. देशपांडे, दादासाहेब व भालचंद्र मुळे, एन. टी. बनसोडे, जी. डी. जाधव, हणमंतू सायन्ना यांची विस्तृत नोंद लेखकांनी केली आहे. जी. डी. जाधवांची एक हकिगत इथे कळते. महाडच्या संग्रामातील एक प्रमुख नेते अनंतराव चित्रे यांच्या घरी जेवणाच्या पंगतीत त्यांची कन्या जाधवांच्या नजरेस पडते. ते तिला मागणी घालतात. सगळ्यांना आनंद होतो. त्यांचा विवाह चळवळीतून झालेला आंतरजातीय विवाह होता.

पुस्तकाच्या परिचयाच्या अखेरीस येताना बाबासाहेबांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य सोलापुरातातील भेटींतही कसे दिसते, हे लक्षात घेणे उद्बोधक ठरेल. बाबासाहेब कमालीचे लोकशाहीवादी, विचार स्वातंत्र्यवादी होते. मतभिन्नता असलेल्यांचा दुस्वास नव्हे, तर त्यांचा आदर करणे, मात्र त्याचवेळी आपली मते पातळ न करता रोखठोक मांडणे हे बाबासाहेबांचे खास वैशिष्ट्य होते. बाबासाहेबांच्या या गुणामुळेच तर त्यांना त्यांच्याशी अनेक बाबतींत असहमती असणारेही भेटीचे निमंत्रण आग्रहाने देत असत. सोलापुरील अशा तीन भेटी लेखकांनी नोंदवल्या आहेत.

त्यातील एक, बार्शीच्या महात्मा गांधी छात्रालयाचे अ. दा. सहस्रबुद्धे यांच्या निमंत्रणावरुन त्यांच्या बोर्डिंगला बाबासाहेबांची भेट. ही आठवण सहस्रबुद्धे यांनी लिहून ठेवली आहे. ते लिहितात – “बाबासाहेबांनी प्रथम मला माझे नाव विचारले. मी सहस्रबुद्धे असे सांगितले.” त्यावर बाबासाहेब काय म्हणाले त्याची नोंद ते करतात – “म्हणजे तुम्ही ब्राम्हण आहात तर! ब्राम्हण लोकांत माझ्याबद्दल फार गैरसमज आहेत. ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत. माझ्या चळवळीत अनेक ब्राम्हण्यरहित ब्राम्हण आहेत. ब्राम्हण्यवृत्ती असलेल्या सनातनी ब्राम्हणांबद्दल मात्र मला मनस्वी चीड आहे.”

बाबासाहेब सहस्रबुद्धेंना विद्यार्थ्यांविषयी, त्यांच्या वागणुकीविषयी विचारतात. त्यावर सहस्रबुद्धे सांगतात – “बोर्डिंगमधील महार विद्यार्थ्यांवर आपल्या विचारांचा अत्यंत प्रभाव आहे. हिंदू धर्माचे सण, उपवास, प्रार्थना या बाबी त्यांना अजिबात पसंत नाहीत. आषाढी, कार्तिकी या एकादशीच्या दिवशी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे भाजीभाकरीचे जेवण आम्ही देतो व मांग, चांभार विद्यार्थ्यांना फराळाचे साहित्य देतो. आश्रमीय प्रार्थना महार विद्यार्थ्यांना पसंत नसते म्हणून सर्वांच्या संमतीने वंदे मातरम ही प्रार्थना बोर्डिंगमध्ये होते. सूतकताई मुलांच्या इच्छेवर ठेवली आहे. विद्यार्थ्यांवर बळजबरीने कोणतीही गोष्ट लादली जात नाही. अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून मी जास्त काळजी घेतो. विद्यार्थी शिकावेत, शहाणे व्हावेत आणि शिक्षणानंतर त्यांनी योग्य वाटेल तो सामाजिक, राजकीय विचार स्वीकारावा हे येथील बोर्डिंगचे वैशिष्ट्य आहे.”

सध्याचे हिजाब प्रकरण आठवून पहा. सर्वसमावेशी सेक्युलर धोरण काय असावे याची १९३४ सालची ही नोंद आहे. ती मुद्दाम सविस्तर दिली. आंबेडकर व गांधीवादी या दोहोंतल्या संवादातले हे मूल्य आपण आज गमावत आहोत. धूसर करत आहोत.

दुसरी भेट आहे, १४ जानेवारी १९४६ रोजीची. बाबासाहेबांच्या आगमनाप्रीत्यर्थ मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोलापुरातील सावरकर मंडळाने तिळगूळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात बाबासाहेब सहभागी झाले. तिसरी भेट एम. एन. रॉय यांच्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीच्या सोलापुरातील कार्यालयास भेट.

गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट या तिन्हींशी बाबासाहेबांचे मतभेद किती तीव्र होते हे जगजाहीर आहे. अशावेळी या कोणालाही अस्पृश्य न मानता त्यांच्याशी माणूस म्हणून संवादी राहण्याची बाबासाहेबांसारख्या महामानवाची ही भूमिका आजच्या परमत असहिष्णुतेच्या वास्तवात खास अधोरेखित करण्याची गरज आहे.

बाबासाहेबांच्या चळवळीचा आपापल्या जिल्ह्यातील मागोवा घेण्याची प्रेरणा या पुस्तकाने नक्कीच संबंधितांना मिळेल आणि त्या योगे दत्ता गायकवाडांचे ऐंशिव्या वर्षी असे पुस्तक लिहिण्याचे श्रम अधिकाधिक सार्थकी लागतील असे मला वाटते.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, मे २०२२)

____________

चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दत्ता गायकवाड

सुविद्या प्रकाशन

पृष्ठे ३०३ | मूल्य ३५० रु.

संपर्क क्रमांक : ९९७५६२६७१०

_____________

कळल्यावरी कुठे कशास्तव…

सध्या आमचे सामाजिक सलोखा अभियान सुरु आहे. चेंबूर-मानखुर्द-ट्रॉम्बे परिसरातील साधारणपणे दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या वस्त्यांत आमच्या बैठका, भेटीगाठी सुरु आहेत. आमच्या म्हणजे संविधान संवर्धन समितीच्या. संविधानावरील हल्ल्यांच्या विरोधात आवाज उठवणे, चळवळ करणे हे या संघटनेचे काम. या कामाचा एक महत्वाचा भाग म्हणून संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार शाळा, कॉलेज, वस्त्यांमधून ती करत असते. संविधान जागर यात्रा, कलापथक, महामानवांचे जन्म-स्मृतिदिनांचे उत्सव त्यांच्या विचारांचे संविधानाशी नाते जोडून साजरे करणे हेही तिचे उपक्रम. संविधानाला इजा पोहोचवणाऱ्या राजकीय-सामाजिक कृत्यांविरोधात निदर्शने-आंदोलनांद्वारे प्रासंगिक प्रतिसाद देत असते.

यावेळचा प्रसंग होता व आहे, तो राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे तीन मे पर्यंत उतरवण्याच्या इशाऱ्याचा. हा इशारा उघडच हिंदू-मुस्लिम तणावातून प्रक्षोभक वातावरण तयार करण्यासाठी आहे. सध्या देशभर अशा सांप्रदायिक आणि संविधानातील मूल्यांची गळचेपी करणाऱ्या घटनांना ऊत आला आहे. केंद्रात सरकार म्हणून आणि रस्त्यावर पक्ष म्हणून भाजप आपल्या परिवारातील कट्टर हिंदुत्ववादी शक्तींना चालना देत आहे. उरल्या सुरल्या संविधानाला कायमची मूठमाती देऊन २०२४ पर्यंत त्यांना अपेक्षित हिंदू राष्ट्र प्रत्यक्षात आणण्याचे संघपरिवाराचे लक्ष्य साधण्यासाठी या शक्तींच्या हालचालींचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजप विरोधी मोहिमेत जान फुंकणाऱ्या राज ठाकरेंनी ईडीच्या भयाने असो वा त्यांना नवा साक्षात्कार झाला म्हणून असो, शीर्षासन करुन त्यांनी आपली भूमिका बदलली आणि मालिक से वफादार होत ते मुसलमानांच्या मागे लागले आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्याच्या मुद्द्यामागे भाजप-संघ परिवाराची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आज हा तर उद्या दुसरा मुद्दा घेऊन त्यांचा विखारी प्रचार वा घातक कारवाया चालणारच आहेत. देश ज्या मूल्यांवर उभा राहिला, तो पाया उद्ध्वस्त करु पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधी युद्धातली ही लढाई आहे, हे लक्षात घेऊन राज ठाकरेंचा इशारा गंभीरपणे घेणे भाग आहे. या इशाऱ्यात ते वेगवेगळे बदल करु शकतात. पण हे सर्व बदल हिंदू-मुस्लिम तणाव वाढवत दंगली घडवण्याच्या दिशेने जाणारे असतील, एवढे नक्की दिसते आहे.

त्यामुळेच मुस्लिमांतही या इशाऱ्यानंतर असुरक्षितता व अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. वस्त्यांत फिरताना ते जाणवते. ९२-९३ च्या दंगलींच्या आठवणी आमच्या या वस्त्यांतल्या बैठकांत निघत आहेत. आमच्या मोहिमेची या क्षणीची मांडणी आहे ती सामाजिक सलोखा राखण्याची. आपल्या वस्तीत कोणत्याही प्रकारे तीन मे नंतर वा त्यापुढच्या नजिकच्या काळात सांप्रदायिक टकराव होता कामा नये. कोणी कितीही उसकवले तरी हिंदू-मुसलमानांनी हिंसेला प्रवृत्त होता कामा नये. अगदी अजानच्या वेळी मशिदीसमोर जाणून बुजून हनुमान चालीसा वा तत्सम प्रकार घडले तरी मुस्लिम समाजातून त्याला प्रतिक्रिया येता कामा नये, असे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत.

या बैठकांना हिंदू, मुस्लिम, बौद्ध समुदायांचे लोक हजर असतात. ‘आमच्या वस्तीत आम्ही सगळे एकत्र आहोत. इथे काही होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही’, असे सांगतात. ९२-९३ ला आम्ही भोगले आहे. महागाई, करोना यांनी एवढी हालत झाली आहे की माणसे या राज ठाकरेच्या नादाला लागणार नाहीत, असेही काहींना वाटते. ‘तुमचे हे एकजुटीचे वातावरण चांगलेच आहे. ९२-९३ चा धडा आपल्या लक्षात आहे, हे उत्तम आहे. पण त्यानंतर जन्माला आलेल्या पिढीचे काय? ती आज राज ठाकरेंसारख्यांना प्रतिसाद काय देते, याचा विचार आपण कसा करणार?’ ..असे प्रश्न आम्ही उपस्थित केल्यावर त्याला लोकांची उत्तरे ठाम नसतात. आपल्या वस्तीत आपली मुले काही गडबड करणार नाहीत, इथून बाहेर गडबड करायला जाणार नाहीत, बाहेरची मुले गडबड करायला इथे येणार नाहीत, यावर आपण नजर ठेवणे, काही होण्याची तयारी चालल्याचे कळल्यास लगेच पोलिसांना खबर करणे या दक्षता लोक मान्य करतात.

वाशिनाक्याच्या मुकुंद नगर मध्ये बौद्धांनी बुद्धविहाराच्या पटांगणात हिंदू व मुसलमानांना एकत्र करुन इफ्तारची पार्टी दिली होती. ही नक्कीच विशेष बाब होती. या वस्तीत वर्षभरापूर्वी हिंदू-मुसलमान संघर्ष झाला होता. त्या पार्टीनंतर तिथेच निवडक लोकांबरोबर आमची बैठक झाली. स्थानिक नगरसेवकही होते. एकजुटीचा महिमा सगळ्यांनीच गायला. हा मुख्य मुद्दा झाल्यानंतर एकाने नगरसेवकापुढे अडून राहिलेल्या रस्त्याचा प्रश्न मांडला. रस्ता नसल्याने अंत्ययात्रेवेळी मयत कसे रेल्वे रुळांवरुन उचलून न्यावे लागते वगैरे. नगरसेवक म्हणाले, ‘मी माझ्या खर्चाने रस्ता पूर्ण करायला तयार आहे. पण तुमच्यातली भांडणे मिटवा.’ बैठक झाल्यावर अधिक चौकशी केली तेव्हा कारण कळले ते असे. एका बाजूला मशीद आणि एका बाजूला होऊ लागलेले मंदिर यांतले एक हटवल्याशिवाय रस्ता होऊ शकत नाही.

हा प्रश्न इफ्तार पार्टीने सुटत नाही. त्याला सततच्या संवादाचे, विश्वास निर्माण करण्याचे आणि हे करु शकणारे लोक तिथे असण्याची गरज आहे. धारावीत ९३ च्या दंगलीनंतर एका वस्तीत शेजारच्या गल्ल्यांत राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांनी एका रात्रीत भिंत उभी केली होती. तिथे राष्ट्रीय एकता समिती म्हणून आम्ही काम करत होतो. एका बाजूला जाळलेल्या घरांबाबतचे, मनुष्यहानीचे मदत कार्य आणि दुसऱ्या बाजूला मने सांधण्याचे काम आम्ही करत होतो. मने सांधण्याच्या गटाचा मी भाग होतो. या दोन्ही समूहांची आधी अतितीव्र प्रतिक्रिया होती. भिंत राहणारच यावर ते अटळ होते. रोजच्या आमच्या भेटींनी ही तीव्रता कमी होत गेली. अखेरीस ते राजी झाले. भिंत तुम्ही पाडा असे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही भूमिका घेतली – ‘भिंत तुम्ही बांधलीत. तोडायची तुम्हीच.’ पुढे भिंत त्यांनी तोडली. आमचे मिशन यशस्वी झाले. वस्त्यांतले असे प्रश्न सोडवायला असा सततचा संवाद करणारे, नैतिक अधिकार असलेले लोक, संघटना गरजेचे आहे. प्रासंगिक भेटींतून वा मनोमीलनाच्या कार्यक्रमांतून हे आपोआप घडेल असे समजणे योग्य नाही. असे प्रसंग हा या मोहिमेचा प्रारंभ वा क्रमातला टप्पा समजला पाहिजे. तेच अंतिम ध्येय असू नये.

रामनवमीच्या दिवशी रात्री उशीरा मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीत जी तोडफोड झाली तिथे आम्ही काहींना भेटलो. यापूर्वी अशी मिरवणूक कधीही इथून गेलेली नाही. यावेळी जाणूनबुजून तरुणांच्या एका गटाने ती काढली. हे बाहेरचे लोक होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मशिदीच्या जवळ आल्यावर मुद्दाम घोषणा आणि डिवचणारी भाषा वापरली गेली. त्यातून बाचाबाची झाली. मिरवणूक काढणारे परत गेले आणि रात्री उशीरा मोठ्या संख्येने येऊन मशिदीच्या आसपासच्या परिसरातील वाहने त्यांनी तोडली. ही वाहने काय फक्त मुसलमानांची नव्हती. मशीद व अन्य इमारती जवळ जवळ आहेत. मुस्लिम, हिंदू आणि लक्षणीय संख्येने बौद्ध इथे राहतात. सगळ्यांची वाहने तिथे होती.

ही घटना सुटी बघून चालणार नाही. तोडफोड करणारे तरुण भले बाहेरचे असतील. पण या वस्तीत आणि आसपास बजरंग दल, हिंदू शब्दापुढे जागृती, युवा वाहिनी वगैरे असलेल्या संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिंनी बरीच वर्षे आपले जाळे विणले आहे. तरुण मंडळींना सदस्य करण्याची मोहीम आणि विविध हिंदू सणांच्या निमित्ताने वा अन्य निमित्ते तयार करुन त्यांच्या मिरवणुका, मेळावे सतत सुरु असतात. बौद्ध मुलेही त्यांनी गळाला लावलेली आहेत. या संघटनांचा भाजप तर पालकच आहे. पण शिवसेना, मनसेचे लोकही या कट्टरपंथीय हिंदूंच्या बाजूने असतात. वरच्या नेतृत्वाची भूमिका मग काहीही असो. अन्य पक्षांतले हिंदूही या प्रकारच्या ‘हिंदुत्वाला’ सहानुभूत असतात किंवा तटस्थ राहतात. बौद्धांचे म्हणणे असते, आमच्या वाट्याला कोणी जात नाही. अशा एका प्रतिक्रियेवर मी म्हणालो, ‘पण तुम्ही हस्तक्षेप करत नाही ना! कोणा एकाची बाजू भले नका घेऊ. मात्र जे काही करायचे ते कायद्याने करा. संविधानात्मक मार्ग वापरा. हिंसा आम्ही होऊ देणार नाही, असे रस्त्यावर येऊन तुम्ही बजावायला नको का?’ असे बोलल्यावर ‘हो. हा हस्तक्षेप करायला हवा’ यास ते कबूल होतात.

याच म्हाडा कॉलनीतल्या एका विशीतल्या मुलीने वर्षभरापूर्वी मशिदीच्या भोंग्यांविषयी मशिदीच्या आवारात एकटीने जाऊन जाब विचारला होता. तिच्या या शौर्याचे बरेच व्हिडिओ माध्यमांवर त्यावेळी फिरले. देशभरच्या हिंदू कट्टरांनी तिला जोरदार पाठिंबा तिला. घरी येऊन तिचा सत्कार केला. प्रारंभीची आवृत्ती एवढीच होती – या मुलीच्या खिडकीच्या दिशेने मशिदीच्या भोंग्यांचा आवाज थेट येतो. अजान भोंग्यांवर करायला तिचा विरोध नाही. आवाज कमी ठेवा एवढेच तिचे म्हणणे. पुढे जाऊन यात तीव्रता तयार होते. आणि ही मुलगी हिंदू कट्टरांची पाठिराखी होते. किंवा ती या कट्टर हिंदू संघटनांची आधी घटकही असेल. त्यांच्या मोहिमेचा भाग म्हणूनही तिची हे विरोचित कृत्य असेल. आमच्या सहकाऱ्याने रस्त्यावरुन तिच्या खिडकीकडे बोट दाखवले. तिथे भगवा झेंडा लावलेला होता.

या मुलीच्या ट्विटरवर हा लेख लिहिण्याआधी चक्कर मारली. तिथे सलगपणे हिंदू कट्टरांची भलामण करणारे संदेश दिसतात. १० एप्रिलला रामनवमी होती. त्या दिवशी म्हाडा कॉलनीत हिंसाचार झाला. त्याच्या आधी दोन दिवस म्हणजे ८ तारखेला तिने युद्धाच्या पवित्र्यातील धनुष्यधारी रामाचे चित्र देऊन एक ट्विट केले आहे. त्यात ती म्हणते – ‘राम बिती हुई हिस्टरी नही, हमारा वर्तमान है, वर्तमान हमें बताता है कि, क्यूं शस्त्र के बिना धर्म की रक्षा नही हो सकती. कोई सीमा पर शस्त्र धारण करता है, इसलिए हमारी धर्मशाला में धर्म नाच रहा है. ध्यान और युद्ध अलग नही किये जा सकते..’

बाकी अनेक ट्विटांमध्ये ‘जय हिंद. जय श्रीराम. स्टँड फॉर ह्युमन राईट्स. जय संविधान. वंदे मातरम.’ असे ती लिहिताना दिसते. तिला पाठिंबा देणाऱ्या हॅशटॅग मोहिमेबद्दल आभार व्यक्त करते. आपण करतो तेच संविधानाला खरोखर अभिप्रेत आहे अशी या मुलांची भूमिका असेल, तर आम्ही संविधानाच्या प्रचार-प्रसाराचे काम करणारे लोक त्यांच्यादृष्टीने स्यूडो ठरतो, हे उघडच आहे.

मशिदींवरचे लाऊड स्पीकर कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेत नसतील, तर त्यांची तक्रार जरुर व्हावी. त्यासाठी प्रयत्न करुन थकलेल्या आणि संतप्त झालेल्या मुलीने थेट मशिदीत जाऊन भांडण काढले हे समजू शकते. पण इथे केवळ तसे दिसत नाही. जाणीवपूर्वक मुस्लिमांची खोड काढत, त्यांना डिवचत, अवमान करत त्यांना प्रक्षुब्ध करण्याचा व त्यांच्याकडून हिंसक प्रतिक्रिया आणण्याचा आणि त्यायोगे दंगली घडवण्याचा हा सुनियोजित डाव आहे, याला देशभरच्या अलिकडच्या अनेक घटनांतून पुष्टी मिळते.

माहुल, गवाणपाडा, विष्णू नगर, भारत नगर, टेकडीवरील राहुल नगर, नागाबाबा नगर, अशोक नगर, सह्याद्री नगर, पेट्रोलियम विभागातील वाहतुकीसाठीच्या रेल्वे पटरीच्या आसपासचा परिसर ते चेंबूर कँप इथपर्यंत विविध वस्त्यांमध्ये मी २०-२५ वर्षांपूर्वी साक्षरता आणि पुढे रेशन या चळवळींसाठी खूप हिंडत असे. त्यावेळी न दिसलेली आणि त्यानंतर मी अनेकवेळा या भागात जाऊनही तिचे गांभीर्य न कळलेली बाब म्हणजे संघपरिवारातल्या संघटनांचे वाढते जाळे. मानखुर्दची म्हाडा कॉलनी, पीएमजीपी कॉलनी, साठे नगर, गोवंडीची बैंगनवाडी, शिवाजी नगर ते माहुल-वाशिनाका हा चेंबूर-ट्रॉम्बेचा पट्टा या संघटनांनी प्रचंड पोखरला आहे. वाशिनाक्याच्या रस्त्यावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची विविध निमित्ताने सतत फ्लेक्स पोस्टर्स लागलेली असतात. त्यांच्या मिरवणुका निघत असतात. गेल्या वर्षी आमच्या एका बौद्ध व चळवळीत सक्रिय सहकाऱ्याच्या मुलाचा फोटो बजरंग दलाच्या बॅनरवर मी पाहिला होता. १८ वर्षांच्या खालच्या मुलांचा भरणा यांत मोठा असतो. हिंदू राष्ट्राची मन उचंबळवणारी भावना त्यांना एक ध्येय देते. त्यासाठी मुसलमानांचा निःपात हे कर्तव्य त्यांच्या मनात रुजवले जाते. अनधिकृतपणे शस्त्रे दिली जातात. सोबत बटन नावाने प्रसिद्ध असलेले ड्रग मुबलक दिले जाते. पैश्यांची पाकिटे येतात. रात्री चायनीज वा अन्य हॉटेलांत यांचे अड्डे जमतात. तिथले खर्च कोणी दानी करत असतात. आधी ध्येय, त्यासाठीचा भावनिक उन्माद वाढवणारी कथ्ये, घोषणा आणि त्या सर्वांच्या पोषणासाठी नंतर धनाचा मुबलक आधार हा क्रम असतो. १८ वर्षांच्या खालील मुलांनी गुन्हे केले तरी त्यांना कायद्याने सज्ञान नसल्याचा फायदा मिळून कायद्याच्या कचाट्यातून वा शिक्षेतून ती लवकर बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे या कोवळ्या संस्कारक्षम, भावनाशील आणि ऊर्जावान वयाच्या टप्प्यावर समाज विघातक शक्ती त्यांना पकडतात.

हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर झाले. पण आम्ही नीट पाहू शकलो नाही. ओळखू शकलो नाही. या मुलांशी आपल्याला भेटता येईल का, बोलता येईल का, या माझ्या प्रश्नाला तिथले आमचे सहकारी उत्तर देतात – ‘काही उपयोग नाही. बोलण्याच्या मनःस्थितीतच ही मुले नसतात. पालकांचेही ऐकत नाहीत. बोलणे सहन झाले नाही तर अंगावर येतात.’ पण कसा, कुठे याचा विचार करुन हा संवाद करावाच लागेल, अशी माझी भूमिका आहे. मी ती सहकाऱ्यांशी बोलत असतो. जी मुले यांत नाहीत, त्यांच्यासाठी काय उपक्रम करता येतील, याचा विचार करायला हवा. थेट वाईटाला भिडता आले नाही तरी चांगले वाढवणे हे वाईटाचा परिणाम घटवणारे असते. या दिशेने काही ठरवावे लागेल.

बौद्ध विभाग हा आमचा मुख्य आधार. राजकीयदृष्ट्या अत्यंत दक्ष हा त्याचा लौकिक. पण तोही अंतर्गत फाटाफुटी, नव्या स्थितीच्या समजाचा अभाव यांमुळे या स्थितीत दखल द्यायला पुरेसा सक्षम नाही. त्यातही संघपरिवाराने काहींना गळाला लावले आहे. मातंग, चर्मकार, वाल्मिकी आदि दलित समूह बौद्धांच्या जुटीत येत नाहीत. बौद्धांविषयीच्या खऱ्याखोट्या गृहितकांनी, व्यवहाराने ते बौद्धांविषयी दुस्वास व्यक्त करतात. त्यांना तर संघपरिवाराने कधीच आपलेसे केले आहे. बुद्धविहारातल्या बैठकांत मुस्लिमांविषयी घृणेने बोलणारेही भेटतात. पण ते कमी दिसतात. मातंग-चर्मकारांत ते अधिक असतात. मातंग-चर्मकारांना व्यापक हिंदू आयडेंटी अधिक प्रतिष्ठेची वाटते. साठे नगरच्या मांगिरबाबा मंदिरात मातंग अधिक संख्येने असलेल्या बैठकीत याचा प्रत्यय आमच्या कार्यकर्त्यांना आलाच. मशिदीवरील भोंग्यांबाबत त्यांची प्रतिक्रिया तीव्र होती.

या भेटी-गाठी, बैठका करणे हे कष्टप्रद, कधीकधी नाऊमेद करणारेही काम आहे. आमच्या संघटनेत कोणी पगारी पूर्णवेळ काम करणारे नाही. आपापले व्यवसाय, नोकऱ्या करुन स्वखर्चाने हिंडणारे, वेळ देणारे कार्यकर्ते आहेत. त्यांची संख्या प्रसंगाप्रसंगाने कमी वा अधिक असते. कधी कधी एकटे-दुकटेच फिरावे लागते. ज्या वस्तीत स्वतःचा प्रवास खर्च, वेळ काढून जावे, तिथे लोक जमलेले असतील असे नाही. काही वेळा आपल्यालाच लोक जमवावे लागतात. कधीतरी लोक येतच नाहीत. एखाद-दुसऱ्या व्यक्तीशी बोलून पुढची वेळ ठरवून परतावे लागते. बरे या कष्टाची नोंद कोणी तसे घेत नाही. अनेकांना तुम्ही एकटे कुठे हिंडत असता हे कळतही नाही. बैठक झाली आणि त्याचे फोटो फेसबुक-व्हॉट्सअपवर टाकले तरच ते कळते आणि काही लाईक्स मिळतात. त्यामुळे हा उद्योग करण्यापेक्षा फेसबुकवर हिंदू फॅसिस्टांच्या करवायांविषयी प्रतिक्रिया देत राहणे सोपे आहे. त्यातून ‘काही केल्याचे’, त्यांची ‘जिरवल्याचे’ समाधान (जे कृतक आहे) मिळते. आपले समविचारी फ्रेन्ड्स आपल्या या पोस्ट्सची वाहवा करतात. त्यातून आपण रणभूमीवर आहोत आणि शत्रूला खडे चारत आहोत, अशी एक विजयी योद्ध्याची भावना मनात नांदत राहते. ती कमी झाली की पुन्हा एक पोस्ट. पुन्हा विजयी भावना. हे सतत करणाऱ्याला अहर्निश चळवळीच्या कामात आपण आहोत, ही भावना सहज टिकवता येते. कायम ठेवता येते. (हे काहीसे ‘बटन’ च्या नशेसारखे आहे, असा माझा कयास आहे.)

हिंदू कट्टरपंथीयांकडे जे एक ध्येय आणि त्यासाठीची पॅशन आहे, तिची पुरोगामी प्रवाहांत वानवा आहे. हे ध्येय आणि पॅशन कशी आकार घेणार हा मोठा प्रश्न आहे. माझे वैयक्तिक नुकसान या क्षणी काही नाही. माझ्या जीवनमानात काहीही फरक नाही. अशावेळी मला जाणिवेनेच हा धोका समजून घ्यायला हवा. पण आज हे सार्वत्रिक नाही. त्यामुळे मानवाच्या प्राथमिक अवस्थेत अग्नी जपायला गुहेत बसून एखाद-दुसऱ्याला अग्निहोत्र करावे लागे, तसे ते आज ज्यांना कळते त्यांना करत राहावे लागणार आहे. कोण दखल घेतो हा मापदंड असून चालणार नाही.

आमच्या संघटनेच्या प्रवासात कधी वाळवंट, कधी ओढा, कधी एकदम पूर आणि पुन्हा प्रवाहातले खडक उघडे, एकाकी असे होत राहते. संविधान जागर यात्रा एकदम हजारोंच्या; नंतर जेमतेम ५० लोक. कधीतरी नुसतेच एकेकाला भेटत हिंडायचे. कधी संविधानावर भाषणे करायला निमंत्रणे, तर कधी आपणच भाषणांचे ‘वार’ लावून घ्यायचे. म्हणजे मी तुमच्याकडे उद्या संविधानावर बोलायला येतो आहे, जमेल तेवढ्यांना एकत्र करा, असे सांगायचे. मानधन सोडा, चहा कोणी दिला, आपण जाण्याआधी लोकांनी झाडून-लोटून ठेवले यानेच बरे वाटते. औपचारिक कार्यक्रमांत, व्याख्यानांना बोलावून मानधन देणारेही असतात. पण ते अगदीच प्रासंगिक. चळवळीच्या यात्रांसारख्या कार्यक्रमांना लोक आर्थिक सहाय्य करतात. पण दैनंदिन कामांसाठी पैसे उभे राहत नाहीत.

प्रारंभी उल्लेख केलेल्या आमच्या सध्याच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबई पोलीस कमिशनर आले. ते पूर्वनियोजित नव्हते. वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या कानावर आमच्या हितचिंतकांनी ही बाब घातली, विनंती केली आणि ते आले. पण त्यामुळे आमच्या सभेला एकदम प्रसिद्धी मिळाली. ते फोटो फेसबुकवर टाकल्यावर भरपूर लाईक्स, शेअर आणि प्रशंसा आमच्या वाट्याला आली. आमचे लोक खुश झाले. मेहनतीचे चीज झाले असे वाटले.

हे ठीक आहे. त्यामुळे उमेद वाढली. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटे फिरावे लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावे लागेल हे मनात पक्के असायला हवे. या मापदंडांच्या पलीकडे जाऊन ‘कळल्यावरी कुठे कशास्तव, मरणे सोपे रे ध्येयास्तव’ या प्रचितीचा शोध जारी ठेवायला हवा.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(मुक्त संवाद, मे २०२२)