Tuesday, June 2, 2020

मानवतेचे अवकाश उजळविणाऱ्या अग्निशलाका

‘...त्यांच्या समकालीन स्त्रियांपेक्षा या स्त्रिया वेगळे आयुष्य जगल्या...आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत त्याचा भक्कम पाया या स्त्रियांच्या संघर्षावर आधारित आहे हे आजच्या पिढीतील सर्वसामान्य स्त्रीला कळावे...हा इतिहास आपल्या सामुदायिक जाणिवेचा भाग बनण्याची आवश्यकता आहे...’ या ओळी आहेत ‘आलोचना’ या स्त्रीवादी संशोधन व संसाधन केंद्राने काढलेल्या ‘आकाश पेलताना’ या पुस्तकाच्या प्रारंभीच्या निवेदनातल्या. पुस्तकाचा हेतू पुरेसा स्पष्ट करणाऱ्या. 

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात तेज ओतलेल्या महिलांच्या मांदियाळीतली प्रेमा पुरव, कुमुद पावडे, शांता रानडे, सीमा साखरे आणि सुमन बंग ही काही नावे. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याच शब्दांत त्यांचे जीवन, कार्य व विचार या पुस्तकात नोंदवण्याचे महत्वाचे काम आलोचनाने केले आहे. मुलाखती व संपादनाचे काम मेधा कोतवाल लेले, ऊर्मिला मोहिते आणि निर्मला साठे यांनी केले आहे. 

‘या निवेदनातून त्यांच्या काळातील सामाजिक घुसळण आणि विचारसरणींचे मंथन यांची झलक आपल्याला पहायला मिळते’ असे मनोगतात म्हटले आहे. ती झलक नीट पाहण्यासाठी अर्थातच मूळ पुस्तक वाचले पाहिजे. या लेखातील नोंदी ही या झलकेची झलक आहे. 

या सर्वजणी १९२५ ते १९३८ या दरम्यान जन्मलेल्या. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाचा गांधी-नेहरुंच्या नेतृत्वाखालचा अखेरचा टप्पा, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, ७५ च्या महिला वर्षाच्या पार्श्वभूमीवर अधिक उठावाने पुढे आलेली स्त्रीवादी चळवळ, आणीबाणी या समाजाची प्रचंड घुसळण करणाऱ्या घटनांच्या त्या स्वाभाविक साक्षीदार तसेच त्यात हस्तक्षेप करणाऱ्या घटक राहिल्या आहेत. उच्चवर्णीय, शूद्र आणि दलित या तीन सामाजिक स्तरांची देण त्यांना जन्माने मिळाली. स्वअर्जित नसलेल्या या सामाजिक स्तराच्या बाहेर निघण्याच्या, त्या स्तरातील अन्यांना अशारीतीने बाहेर काढण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचेही दर्शन आपल्याला या पुस्तकात घडते. 

प्रेमा पुरव

अन्नपूर्णा महिला मंडळ आणि पुढे अन्नपूर्णा उद्योग उभा करणाऱ्या म्हणून मुख्यतः महाराष्ट्राला परिचित असलेल्या प्रेमाताई पुरव मूळच्या गोव्याच्या. लहान असतानाच भोवताली उसळलेल्या गोवा मुक्ती आंदोलनात त्या उतरतात. बंदूक चालवायला शिकतात. गोमंतक पिपल्स पार्टीशी जोडल्या जातात. बॉम्बसाठी कच्चा माल तसेच दारुगोळा इच्छित स्थळी लपवून नेण्यात सहभागी होतात. एकदा पणजीला स्फोट करण्यासाठी वाहून नेलेल्या दारुगोळ्याचा ऐनवेळी स्फोट झालाच नाही. पोलिसांच्या पकडीतून पळताना झालेल्या गोळीबारात त्यांचे दोन्ही पाय जायबंदी होतात. सहा तास ऑपरेशन करुन त्या गोळ्या काढाव्या लागतात. 

लहानपणीच घर सुटते. (पुढे ११ वर्षांनी त्या आई-वडिलांना भेटतात, अशी नोंद पुढे त्यांनी केलेली आढळते.) गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहत, जमेल तसे शिक्षण घेत प्रेमाताईंचे क्रांतिकार्य चालू राहते. आधी गोवा पीपल्स पार्टी आणि नंतर कम्युनिस्ट पार्टीशी त्या जोडल्या जातात. गोवा, बेळगाव असे लपत छपत कम्युनिस्ट पार्टीच्या अड्ड्यात कामगार वर्गाच्या मक्केला मुंबईला पोहचतात. या प्रवासात एका वेश्येने त्यांना दिलेला आधार आणि त्यातून त्यांच्या दयनीय स्थितीची झालेली जाणीव याची हकिगत प्रेमाताईंनी आपल्या निवेदनात नमूद केलेली आहे. कम्युनिस्टांच्या गिरगावातल्या कम्युनमध्ये त्यांचा पुढचा मुक्काम होतो. कैफी आझमी, बलराज सहानी, अण्णाभाऊ साठे हे काही त्यांच्या कम्युनमधील नामांकित सहनिवासी. मुंबईतच त्यांचे पुरवांशी रजिस्टर्ड लग्न झाले. 

इथे त्या गिरणी कामगार युनियनचे काम करु लागल्या. पीठाच्या गिरणीतले खाली पडलेले पीठ गोळा करुन त्याची खळ करुन पोस्टर लावण्याचा अनुभव त्या इथे नोंदवतात. कम्युनिस्ट पक्षाचे काम करत असतानाच गांधी-नेहरुंचा प्रभाव आमच्यावर असल्याचे त्या सांगतात. 

स्टडी सर्कल हा कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ते घडविण्याचा महत्वाचा व नियमित उपक्रम. ‘विचारांविना काम हे आंधळे असते, तर कामाविना विचार निष्फळ असतो’ ही मार्क्सची शिकवण. त्यामुळे अभ्यासवर्ग व चळवळीतले प्रत्यक्ष काम यांची सांगड हे कम्युनिस्ट चळवळीचे वैशिष्ट्य. समाजवादी चळवळीतही असे स्टडी सर्कल चाले. पुढे या दोन्ही चळवळींतून त्यास ओहोटी लागली. त्याचे परिणामही भोगावे लागले. प्रेमाताई सांगतात – ‘डांगेंचे स्टडी सर्कल म्हणजे आम्ही वेडे व्हायचो. स्टडी सर्कलमधून गेलेले पार्टीत टिकले. तत्त्वापासून ढळले नाहीत.’ स्टडी सर्कलचे हे महात्म्य शांता रानडेंच्या कथनातूनही आपल्याला कळते. 

गिरणी कामगार युनियनचं काम करताना मिटिंग संपल्यावर कामगाराच्या घरी जाण्याचा परिपाठ प्रेमाताईंनी सुरु केला. कामगार बाहेर बोलतो तसं घरी वागतो का, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. घरच्या बाईची स्थिती जाणून घ्यायची होती. बाई सतत कावलेली. अठरा ते वीस तास काम करणारी. ही बाई स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. मी कोणीतरी आहे. मी काहीतरी करु शकते हा विश्वास तिच्यात आला पाहिजे, ही जाणीव प्रेमाताईंना या घरभेटींतून झाली. त्यातूनच त्यांच्या कामाने वेगळे व कायमचेच वळण घेतले. अन्नपूर्णा महिला मंडळ उभे राहिले. खुद्द डांगेंनीच अन्नपूर्णाची घटना लिहून दिल्याचे त्यांनी नोंदवले आहे. तरीही हे नवे काम पार्टीचे काम आहे का, असे प्रश्न उपस्थित होत असत. स्त्रियांच्या लढ्याला सैद्धांतिक पाठिंबा असलेल्या कम्युनिस्ट पक्षात प्राधान्य मात्र त्यास नव्हते. 

इंदिरा गांधींनी केलेल्या बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे २० टक्के कर्ज दुर्बल घटकांना द्यायचे धोरण आले. त्याचा उपयोग अन्नपूर्णाच्या बायकांचे गट करुन त्यांच्यासाठी कर्ज घेण्यासाठी झाला. अन्नपूर्णाच्या कामाला चालना मिळाली. या कामातल्या अडचणी, आव्हाने त्यांनी नमूद केली आहेत. नवऱ्याचे नाव लावल्याने दारुडे नवरे बायकांकडे कर्जातला हिस्सा मागू लागले. यावर बँकवाल्यांशी झगडून प्रेमाताईंनी मार्ग काढले. 

बायकांना मारहाण होता कामा नये, यासाठी संघटनेचे बळ देणे, बलात्कार झालेल्या स्त्रियांना आधार देणे, वेश्यांच्या मुलींना आधार देऊन त्यांना स्वावलंबी करणे...अशी अनेक कामे अन्नपूर्णाद्वारे करण्यात आली. आईचं नाव मुलाला लावता येणे, घरावर नवऱ्याबरोबर बायकोचे नाव हवे यासाठीचे प्रेमाताईंचे प्रयत्न पुढे यशस्वी झाले. सरकारने तसे निर्णय जाहीर केले. मायक्रोक्रेडिटची कल्पना इला भट, जया अरुणाचलम आणि प्रेमाताई अशा तिघींनी आणल्याचे त्या नमूद करतात. 

महागाई प्रतिकार समितीत अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे यांच्यासह प्रेमाताई आघाडीवर होत्या. त्यावेळी लाटणे मोर्च निघत. प्रेमाताईंचे पुढे अन्नपूर्णाचे गाजलेले काम म्हणजे बायांनी डबे करणे. त्यावरुन त्यांना टोमणे मारले जात – ‘लाटणी दाखवली सरकारला आणि शेवटी लाटणीच दिली ना बायकांच्या हातात!’ 

याला उत्तर देताना प्रेमाताई म्हणतात – ‘अरे, लाटणं कधी कसं वापरायचं शिकवलं ना तिला! डोक्यात घालायचं तेव्हा डोक्यात घाल; चपातीवर मारायचं तेव्हा चपातीवर मार.’ 

कुमुद पावडे 

वैचारिक, समीक्षात्मक लेखन करणाऱ्या लेखिका तसेच दलित स्रीमुक्ती चळवळीतल्या आघाडीच्या कार्यकर्त्या कुमुद पावडे. कुमुद पावडे यांची बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ भरात असलेल्या काळात घडण झाली. चळवळ भरात असली तरी या चळवळीच्या परिणामी जे दलित समाजातून शिक्षितांचे पीक यायचे त्यास अजून अवकाश होता. अशा काळात महार समाजातले कुमुद पावडेंचे वडिल मॅट्रिक होते. ते रॉयिस्ट होते, त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या विचारांचे अनुयायी. विविध जातींच्या तेलीपुरा, माळीपुरा अशा वस्त्या असलेल्या नागपुरातल्या सीताबर्डी महारपुरा इथे त्या वाढल्या. घरातले वातावरण शिक्षणाला अनुकूल, मात्र बाहेरचे प्रतिकूल. अशा स्थितीत संघर्ष करत त्या शिक्षणाची शिडी चढत गेल्या. त्या काळातल्या त्या संस्कृतच्या विद्वान. शूद्रातिशूद्रांनी संस्कृत ऐकले, बोलले तर ज्या अमानुष शिक्षा मनुस्मृतीने सांगितल्या होत्या आणि म्हणून बाबासाहेबांनी तिचे प्रतीकात्मक दहन केले होते, त्या मनुस्मृतीच्या संस्कृत भाषेच्या त्या तज्ज्ञ झाल्या. बाबासाहेबांना संस्कृत शिकू दिले नाही, याची सलही त्यांच्या संस्कृत शिकण्यामागे होती. 

सरकारचा संस्कृत विद्वानाला मिळणारा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यावेळी पुण्याला शंकराचार्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. त्यावेळी त्यांनी सस्कृतमधून भाषण केले. त्या भाषणात त्या म्हणाल्या- “ज्या स्त्रियांना आणि शूद्रांना तुम्ही मनाई केली होती संस्कृत शिकायला, आज त्यांनीच तुमचं संस्कृत वाचवलं आहे.” 

कुमुद पावडे संस्कृतच्या विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका होत्या. संस्कृतच्या त्यांच्या ज्ञानाचा रिलडल्स प्रकरणी तसेच जगजीवनराम रेल्वेमंत्री असतानाच्या एका वादावेळी उपयोग झाला होता. त्यांनी उद्घाटन केलेला पुतळा उ. प्रदेशचे मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांनी दूधाने धुतला. त्यावेळी ‘हे ब्राम्हणही गोमांस खात होते. हे आम्हाला काय शिकवणार!’ अशी जगजीवनराम यांनी टीका केली होती. त्यावेळी ‘सिद्ध करुन दाखवा’ असे आव्हान त्यांना केले गेले. शंकराचार्यांनी अलाहाबाद हायकोर्टात केस केली. त्यावेळी कुमुदताईँनी अधिकृत पुरावे काढून दिले. मग ती केस मागे घेतली गेली. 

कुमुद पावडे यांचे लग्न आंतरजातीय. पती सामाजिक कार्यकर्ते. मराठा पाटील घरातले. सासऱ्यांचा खूप विरोध झाला. भावाने केलेल्या या कर्तबगारीचे फळ म्हणून त्याच्या बहिणींना-कुमुदताईंच्या नणंदांना अस्पृश्यासारखे वागवले गेले. सासरेही कुमुदताईंच्या घरी आले तर नातवाला हात लावत नसत. घरी राहत-जेवत-पाणी पीत नसत. पती जातीतल्या लग्नसमारंभात गेले तर त्यांना पंगतीला बसू देत नसत. 

वडिलांचा पाठिंबा असला तरी या लग्नाचे महार समाजातूनही स्वागत झाले असे नाही. लग्न जातीतच व्हायला हवे, ही भावना. तसेच अजूनही एक कारण. ते असे – ‘आपल्या जातीतल्या चांगल्या मुली इतर जातीतले लोक करायला लागले, तर आपल्या जातीतल्या मुलांचा प्रश्न तयार होईल.’ 

आंतरजातीय लग्न हा जातिनिर्मूलनाचा एक उपाय आहे, असे बाबासाहेबांनी सांगितले असले तरी अशा लग्नांत ही टीका आजही कानावर येते. 

कुमुदताईंनाही अस्पृश्यतेचे अनुभव आलेत. या अनुभवांत ब्राम्हणांपेक्षा बहुजन त्यांच्याशी अधिक कडवेपणाने वागल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. 

लिंगभाव, प्राधान्यक्रम आणि वर्गस्तर या तिन्हींचा परिणाम स्त्रियांच्या, दलित स्त्रियांच्या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित करताना होत असतो, याची विविध उदाहरणे त्या देतात. दलित चळवळीत दलित स्त्रियांचे प्रश्न दुय्यम ठरतात. दलित साहित्यिक परिषदांत स्त्रियांचे परिसंवाद शेवटी ठेवले जातात आणि बोलायला लागलं की आता थांबवा, थांबवा असेही करतात. सर्वसाधारण स्त्री चळवळीत दलित स्त्रियांच्या खास प्रश्नांबद्दल देणेघेणे नसते. ‘आम्ही स्त्रियांना वेगळे मानत नाही. त्या आमच्याबरोबरच आहेत’ असे बोलले जाते. आयएएस अधिकाऱ्यांच्या वगैरे उच्चभ्रू दलित बायकांमध्ये खेड्यातल्या दलित स्त्रियांबद्दल कुचेष्टेचा भाव असतो. सवर्ण स्त्रिया दलित स्त्रियांचे प्रश्न घेतात तेव्हा ते दलित पुरुषांना सहन होत नाही. या सवर्ण स्त्रिया आमच्या बायकांना बिघडवतात असा त्यांचा सूर असतो. 

शांता रानडे 

शांताताईंचे दीड वर्षांपूर्वी ९३ व्या वर्षी निधन झाले. तोवर त्या क्रियाशील होत्या. विविध चळवळींशी त्या अखेरपर्यंत संबंधित होत्या. त्यांच्या या पुस्तकातील निवेदनात त्यांच्या प्रवासाविषयी सांगताना अनेक वैचारिक मुद्दे तसेच उद्बोधक घटनांची नोंद त्यांनी केली आहे. 

त्यांच्या घडणीचा परिसर स्पष्ट करताना नोंदवलेली एक गंमतीशीर पण माणसाचे साध्यातले मोठेपण समजण्यासाठीची एक नोंद ज्ञानकोशकार केतकरांविषयीची आहे. केतकर ज्ञानकोशाचे ग्रंथ पिशवीत घालून घरोघर विकत असत. 

४२ ला शांताताई शाळेत होत्या. गांधी-नेहरुंच्या अटकेच्या विरोधात शाळा बंद करण्यात त्याही सामील झाल्या. पुढे ४३ ला मॅट्रिक झाल्यावर त्या कॉलेजमध्ये गेल्या. शांताताईंचा भाऊ नवजीवन संघटनेशी संबंधित आणि बाहेरच्या भारलेल्या वातावरणाचा कॉलेजमधील प्राध्यापक-विद्यार्थ्यांवरचा परिणाम यांतून त्या चळवळीशी जोडल्या गेल्या. त्यावेळी स्टडी सर्कल चालत. गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर अशी बडी मंडळी ही स्टडी सर्कल्स घेत असत. चालू घडामोडी, मार्क्सवाद समजून सांगितला जाई. सरदारांच्या स्टडी सर्कलमध्ये स्थानिक संदर्भ खूप असत. 

पुढे कम्युनिस्ट पक्षाच्या स्टडी सर्कलविषयी त्या एक टीका नोंदवतात. त्या म्हणतात- ‘कम्युनिस्टांच्या ज्या अनेक चुका झाल्या, त्यापैकी एक म्हणजे त्यांनी न्या. रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची दखल घेतली नाही. मार्क्स, एंगल्स यांचे रेफरन्सेस देण्याऐवजी इथले संदर्भ दिले असते, तर ते लोकांत अधिक रुजले असते.’ डांगेंना मात्र त्या वेगळे काढतात. क्रांती आयात करुन होत नाही. ती इथूनच निर्माण व्हावी लागते, असे डागेंचे म्हणणे त्या नोंदवतात. डांगे ललित वाङ्मय वाचत. राजवाड्यांच्या त्या काळात स्फोटक अशा विवाहसंस्थेच्या इतिहासाची दोन प्रकरणे डांग्यांनी आपल्या प्रेसमध्ये छापली. या प्रेसवर जप्ती आली. 

शांताताई कम्युनिस्ट पक्षाच्या सभासद झाल्या. शेवटपर्यंत त्या पक्षाच्या कार्यकर्त्या राहिल्या. कम्युनिस्ट राज्यव्यवस्था नुसती कन्सेप्ट नाही. सोव्हिएट युनियनच्या उदाहरणामुळे प्रत्यक्षात ती येऊ शकते अशा विश्वासाचा तो काळ होता. त्यामुळे खूप तरुण मंडळी त्याच्याकडे आकर्षित होत असत. ५२ च्या पहिल्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. तेलंगणाच्या कॉ. रविनारायण रेड्डी यांना नेहरुंपेक्षा अधिक मते मिळाली (नेहरु प्रचंड लोकप्रिय असण्याचा तो काळ होता), असे त्या नोंदवतात. 

गोवा मुक्ती तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून कम्युनिस्ट विचाराचे अनेक कार्यकर्ते तयार झाले, असे त्या नमूद करतात. त्याच्या पुढचेच त्यांचे विधान मात्र असे येते- ‘पण बाईला मुक्त केलं घरातून खरोखरी गांधींनी.’ शांताताई असोत वा प्रेमाताई दोघी कम्युनिस्ट असल्याने त्यांची गांधीजींबद्दलची ही भावना विशेष ठरते. 

पार्टी कॉम्रेड रानडेंशी त्यांचे पार्टी प्रतिज्ञा घेऊन कम्युनमध्ये लग्न होते. रजिस्ट्रारला तिथे बोलावले जाते. पती-पत्नीच्या नात्यावर पक्षधोरण काय व किती परिणाम करते याचे एक तीक्ष्ण उदाहरण शांताताई देतात. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने सोव्हिटवर हल्ला केल्यानंतर इंग्लंड व सोव्हिएट दोस्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल दोन भूमिका कम्युनिस्ट पक्षात तयार होतात. स्वातंत्र्य चळवळीच्या बाजूने असणाऱ्यांना पक्षातून काढून टाकले जाते. रानडे त्यात असतात. अशावेळी दि. के. बेडेकर शांताताईंना घटस्फोट घेण्याची सूचना करतात. कारण? – ‘रानडेंना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. पक्षाची सिक्रेट्स बाहेर जातील.’ (..ही सूचना काही शांताताईंनी मानली नाही.) 

कार्यकर्त्या नवऱ्याच्या पुरुषपणाविषयी बोलताना त्या म्हणतात- ‘पुरुषी वृत्ती जायला वेळ जाणार. मी आंघोळीचे पाणी काढून दिले असते तर आनंदच वाटला असता त्यांना. पण मी ते केलं नाही कधी. जेवणखाण मी व्यवस्थित करत होते.’ 

ट्रेड युनियन पातळीवर स्त्रियांच्या प्रश्नाकडे स्त्री म्हणून पाहिले गेले नाही, याबाबत प्रेमा पुरवांप्रमाणेच शांताताई खंत व्यक्त करतात. ट्रेड युनियनच्या अर्थवादी संस्कृतीबद्दल, कामगारांच्या बदलत्या स्वयंकेंद्री वृत्तीबद्दल त्या चिंता व्यक्त करतात. कंपनी वाचवण्याऐवजी ती बुडताना मला अधिकाधिक कसे मिळेल ही कामगारांची विवंचना असते, हे स्पष्ट करणारे एक उदाहरणही त्या देतात. 

चळवळीच्या बदलत्या स्वरुपाविषयी, त्यातील एनजीओकरणाविषयी त्या टीका करतात. घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणाऱ्या कार्यकर्त्यांचे कमी होणे, एमएसडब्ल्यू कार्यकर्त्यांचे अधिक पगारासाठी संघटना सोडून जाणे अशी निरीक्षणे त्या नोंदवतात. 

शांताताईंचा या पुस्तकातला भाग अधिक मोठा आहे. तो तपशीलात वाचणे गरजेचे आहे. राजकीय-सामाजिक-स्त्रियांच्या चळवळीतले अनेक पेच, ताणे-बाणे त्यांनी बारकाईने, सजगपणे नोंदवले आहेत. त्यांची निरीक्षणे बाहेरुन केलेली नाहीत. त्या त्यात आत होत्या. काम करत होत्या. त्यामुळेच मुलाखत देताना त्या म्हणतात- ‘तुम्ही लिहायचं काम करताय. पण इतिहास कोण घडवणार? इतिहास घडवल्याशिवाय तुम्ही काय लिहिणार आहात त्याबद्दल. तेव्हा आधी चळवळीत सामील व्हा. इतिहास घडवा...’ 

सीमा साखरे 

सीमा साखरे स्त्रीवादी चळवळीतल्या तडफदार कार्यकर्त्या. थेट बोलणाऱ्या. स्त्रियांवरच्या अन्यायाच्या विरोधात कुठेही धाव घेणाऱ्या नेत्या म्हणून एकेकाळी त्यांचे नाव सतत गाजत असे. देशभर गाजलेली मथुरा केस (आदिवासी मुलीवर पोलीस कोठडीत बलात्कार) रिविजनसाठी त्यांनी टाकली. त्याविरोधात मोर्चे काढले आणि त्या विशेष प्रकाशझोतात आल्या. 

बालपण कष्टात. आईने म्हैशी पाळून घर सांभाळलं. वडिलांविषयी त्या म्हणतात- ‘मुलं पैदा करण्यापलीकडं काही केलं नाही.’ वडिलांचे आईला दुय्यमपणे वागवणे पाहून त्यांना प्रश्न पडतो- मुलं बायकांची का नसतात? घर बायकांचे का नसते? 

ताक विकत हिंडताना छोट्या सीमाला समाजाचे दर्शन झाले. शाळा शिकायची इच्छा वाढत होती. पण शक्य होत नव्हते. गाडगेबाबांविषयी खूप आकर्षण होते. तेच एके दिवशी छोट्या सीमाला भेटतात आणि शाळेत घालतात. 

अशीच साने गुरुजींची एक आठवण त्या नोंदवतात. एका घरी गुरुजी येतात. सीमाताईंना पुढे बोलावले जाते. पण मी काळी आहे, म्हणून येणार नाही असे त्या सांगतात. त्यावेळी गुरुजी हात धरुन सीमाला आत नेतात व म्हणतात – ‘तुला कोणी सांगितलं तू काळी आहेस? तू सुंदरच आहेस.’ हा प्रसंग सांगून सीमाताई म्हणतात – ‘तेव्हापासून मी ठरवलं आपण सुंदरच आहोत. नंतर हा विचार कधीच मनात आला नाही. माझ्यावरचं मोठ्ठं ओझं साने गुरुजींनी काढलं.’ 

सीमाताईंचं लग्न आंतरजातीय. नवरा मराठा. या तेली. इथेही थेट त्या सांगतात- मी प्रेम केलं नाही. त्यानं केलं नाही. हे लग्न नवऱ्याने मी त्याच्या बापाने वाढवलेला संसार सांभाळायला केलं होतं. 

अत्याचाराविरोधात कणखरपणे उभे राहायला हवे. कदाचित घर तुटेल. पण पुरुषाला जरब बसेल. चांगली मूल्यं येतील. कुटुंबव्यवस्था जास्ती बरी होईल, हे त्या महिलांना शिकवत असतात. त्या दांभिकतेला उघडं करतात. म्हणतात- ‘सगळं झाकूनपाकून अशाच ब्रोकन फॅमिलीज चालवल्या तर त्यांचे दुष्परिणाम होतील.’ 

सुमन बंग 

डॉ. अभय बंग यांच्या आई, असे आपण ओळख सांगायचे म्हणून बोलू शकतो. पण ते खरे नाही. म्हणजे अभय, अशोक यांच्या त्या आई हे खरेच. पण त्यांची स्वतंत्र आणि मोठी ओळख आहे. त्यांच्या शिकवणी व प्रयत्नांच्या चबुतऱ्यावर अभय व अशोक या भावंडांची ओळख तयार झाली. वास्तविक चळवळीतल्या क्रियाशील मंडळींना वर्ध्याच्या चेतना विकास संस्थेचे नाव काढले की सुमनताईच आठवतात. 

लग्नाआधीपासून सार्वजनिक कामात सक्रिय असलेल्या सुमनताईंचे लग्न प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते ठाकूरदास बंग यांच्याशी होते. ठाकूरदास बंगांबरोबर त्या शेतीच्या प्रयोगात सहभागी होतात. सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि शेती करुन जे मिळेल त्यावर जगायचं, असा हा प्रयोग होता. भूदान चळवळीत विनोबांनी ठाकूरदासांना सोबत नेले आणि नंतर हा प्रयोग तिथेच थांबला. सुमनताईंच्या स्वतःच्या उपक्रमशीलतेने विविध कामे सुरु झाली. 

सेवाग्रामची नई तालीमची बेसिक एज्युकेशनची बंद पडलेली शाळा त्यांनी पुन्हा सुरु केली. स्वतःची मुले बाहेरच्या शाळेत राहिली तर माझ्या वाणीला बळ येणार नाही, या भूमिकेतून अभय व अशोक यांनाही याच शाळेत घालतात. त्यांच्या व्यक्तित्वात त्यामुळे झालेले उत्तम बदल त्या नोंदवतात. 

विनोबांचा सहवास व अनेक प्रश्नांवर, अगदी वैयक्तिकही, मार्गदर्शन मिळणाऱ्यांत सुमनताई होत्या. भूदानाच्या मोहिमेत त्याही सहभागी होत्या. तथापि, विनोबांसारख्या मोठ्यांच्या सर्वच सल्ल्यांना पूर्ण स्वीकारले असे त्यांनी केले नाही. स्वतःचा मार्ग स्वतःच्या विचाराने, पटून अवलंबणाऱ्यांतल्या त्या होत्या. भूदानाच्या कामाविषयी त्या म्हणतात- ‘नंतर भूदानात माझं मन रमेना. वाटलं, आपण नुसतंच प्रचारकी काम करतोय. नुसतं मागणं, मागणं. ...मी जास्त प्रॅक्टिकल आहे. वैचारिक भाग कमी.’ पुढे त्यांनी त्यांना जे काम तीव्रतेने करावेसे वाटत होते त्या महिला-बाल विकास कामात स्वतःला झोकून दिले. या कामात त्यांनी नियमित कामाबरोबरच सुदर्शन, दंपतीचं स्वागत, चांगलं काम केलेल्याचा सत्कार असे अनेक सर्जनशील उपक्रम सुरु केले. 

कोणेतही ‘वादी’ बनण्यापेक्षा मानवतावादी बनणे त्या अधिक पसंत करतात. त्यासाठीचे उत्तर ‘गांधी’ आहे, असे त्यांना वाटते. 

विचारांची, संघटनेची बांधिलकी विचक्षकपणे स्वीकारुन स्वतःचा मार्ग तलाशणाऱ्या आणि त्यावर आयुष्यभर चालणाऱ्या या आमच्या आया-आज्या मानवतेचे अवकाश उजळविणाऱ्या अग्निशलाकाच आहेत. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन ई अंक, जून २०२०) 

____________________ 

आकाश पेलताना...परिवर्तनाच्या वाटेवर 

प्रकाशकः आलोचना, पुणे 

देणगी मूल्यः रु. २५० 

संपर्कः ०२०-२५४४४१२२; alochanapune@gmail.com

____________________