Thursday, August 6, 2015

हे चित्र बदलणार कसे-कोण?


मे महिन्यात कोकणात होतो. पुतण्याची घरभरणी होती. घरभरणी म्हणजे गृहप्रवेश समारंभ. बाहेरगावचे नातेवाईक, पाहुणे मंडळी वेळेवर आली होती. विधी लावणारेही हजर होते. वाडीतले लोकही बऱ्यापैकी जमले होते. उन्ह मी म्हणत होते. असह्य उकाड्याने लोक हैराण झाले होते. कधी एकदा कार्यक्रम होतो अशा मनःस्थितीत सगळे होते.

पुतण्याला म्हणालो, “अरे कुणाची वाट बघतोयस आता? सुरु कर विधी. जे थोडे राहिलेत ते येतील. त्यांची वाट नको बघू. गरमीने हैराण झालेत सगळे. लोकांना लवकर मोकळं कर.’ 

तो म्हणाला, ‘लोकांची वाट नाही बघत मी. जेवण व्हायची बघतोय. ते तयार झालं की विधीला सुरु करु.’

“अरे, जेवण कुठं जातंय. ते होईल तोपर्यंत. तू कर सुरु.” मी म्हणालो.

‘’अण्णा, अहो, ही वाडीतली माणसं विधी आधीच झाला आणि जेवण तयार नसलं, तर वाट बघणार नाहीत. निघून जातील.”

त्याच्या या उत्तराने मी अचंबित झालो. म्हणजे बदल होत होते. त्यांचा मी साक्षीदारही होतो. पण असलं तयार तर जेवू, नाहीतर चाललो, ही माहिती मला नवी होती.

माझ्या माहितीतले काळाचे वेगवगळे टप्पे आठवले. माझ्या लहानपणी लोक अशा कार्यक्रमाची वाटच बघत असायचे. जेवणावर तुटून पडायचे. घरातल्या पोरा-सोरांना झाडून पंगतीला आणायचे. आजाऱ्यांची ताटे घेऊन जायचे. उपासमार खूप असे. मी मुंबईलाच जन्मलो, वाढलो. शाळेच्या सुटीत गावी येई. त्यावेळी जे बघत असे तो माझा अनुभव. सुटीवर आलेला मुंबईचा पोरगा म्हणून त्यातल्या त्यात चांगले माझ्या वाट्याला येई. पण डाळीच्या आमटीत डाळ शोधावी लागेच. अगदीच पाणी होईल म्हणून ती पीठ घालून घट्ट केली जाई. फोडणीला तेल असून नसल्यासारखे. आजूबाजूला तर लोक दोनदा जेवलेत असे क्वचितच दिसे. कोंड्याची भाकरी अन् त्याच्याबरोबर लाल तिखट असे हातावर घेऊन पटकन संपवून टाकणारे लोक दिसत. रात्रीच्या जेवणात सगळ्यांकडे भात (कोकणातले असूनही) असेच असे नाही. नाचणी-वरीची किंवा तांदळाची भरपूर कोंडा घातलेली भाकरी आणि तोंडी लावायला सुकटीचे पाणी. सणासणासुदीला केव्हातरी वडे, घावणे व घरच्या कोंबड्याचे कालवण दिसे. माझ्या वडिलांच्या लहानपणी तर आणखीच वाईट अवस्था होती. त्या वर्णनात आता जात नाही. लग्नादी कार्यक्रमातले जेवण म्हणजे भात, डाळ व भाजी अशा तीन वस्तू असणे. गोड पदार्थ काही नाही. तरीही भरपेट जेवायला मिळणार म्हणून लोक कधी एकदा विधी होतो आणि पंगत बसते, यास आतूर झालेले असत.

कपडे, घरे यांचीही स्थिती अशीच. बहुतेक वयस्क लंगोटी लावलेले. मुलं नागडी-उघडी, महिलांची धडुतं धड नसलेली. नळ्या-कौलाची घरे चुकून मध्ये दिसायची. बाकी केंबळी. म्हणजे गवताच्या छपराची. ज्यांचे मुंबईला चाकरमानी होते व जे काही मनिऑर्डर करत त्यांचे त्यातल्या त्यात बरे चाले. विधवा-निराधारांची अवस्था विंदांच्या कवितेतल्या धोंड्या न्हाव्याच्या माघारणीसारखी. मोडकळणीला आलेल्या घराच्या पडवीत आला दिवस कसातरी ढकलणारी. नितांत सुंदर निसर्ग आणि त्यासोबत तेवढीच कुरुप दरिद्रावस्था. दोघं एकत्र नांदणारी.

७० च्या दशकात रेशन, विधवा-निराधारांना पेन्शन, घरबांधणीला सहाय्य, पाण्यासाठी हातपंप आणि मुख्य म्हणजे रोजगार हमीसारख्या योजना सुरु झाल्या आणि उपासमारीची तीव्रता कमी होऊ लागली. रोजगार हमीवर तर लोक झाडून जात. हसत-खिदळत जाणाऱ्या त्या काफिल्यासोबत जाण्याची मला जबर इच्छा असायची. पण घरचे जाऊ द्यायचे नाहीत. धान्याची व रोख रकमेची निश्चिती या हसण्या-खिदळण्यामागे हसायची. वेगाने बदल होऊ लागले ते ९० नंतर. सरकारी योजना वाढल्या. शहरांत कंत्राटी पण रोजगाराच्या संधी वाढल्या. आमच्या गावातले लोक मुख्यतः मुंबईला पण त्याचबरोबर सांगली, कोल्हापूरकडेही जात. ते आता वाढू लागले. पूर्वी बायका-मुले गावी असत. आता तीही जाऊ लागली. खाण्याची आबाळ होते म्हणून स्वयंपाकाला बायको पाहिजे, मुलांची शिक्षणं शहरात चांगली होतात...ही कारणे होती-दिली जात. हे स्थलांतर एवढे आहे की काही घरं ओसाड पडली. काहींना कुलुपं लागली. काही घरांत म्हातारी माणसं आहेत म्हणून ती आहेत. गणपतीला आणि होळीला अजून तरी हे चाकरमानी येतात. काही जण लग्नकार्याला, खास करुन मे महिन्याच्या सुटीत मुलांना घेऊन येतात. झाडलोट, दिवाबत्ती होते. घरातला म्हातारा-म्हातारी गेल्यावर हेही बंद होणार.

सर्व शिक्षा अभियानात शाळांच्या इमारती झकपक होऊ लागल्या पण पट वेगाने घसरु लागला. शेतं पडिक राहण्याचं प्रमाण वाढलं. गुरं कमी होऊ लागलीत. सारवायला शेण मागावं लागतं, शोधावं लागतं. पूर्वी गवत कमी पडायचं. आता गुरेच कमी झाल्याने गवत काढलं जात नाही. वेगळ्या अर्थाने या गवताचं रान माजू लागलं आहे. त्यामुळे वणवा लागला तर त्याची तीव्रता व नुकसानही जास्त होते. रस्ते होऊ लागल्याने व त्यावर दिवसातनं दोनदा एस.टी.-पण रिक्शा हवी तेव्हा मिळत असल्याने डोंगरवाटा कमी झाल्या. कोल्हापूर-मुंबईचे शिक्षक, प्राध्यापक, नोकरदार, व्यावसायिक जमिनी विकत घेत आहेत. काही पाडून ठेवतात. तर काही काजू-आंब्याच्या बागा करतात. ते राहत मात्र तिथे नाहीत. 

मग गावात कोण राहतात व त्यांचे कसे चालते? निवृत्त पेन्शनर. त्यांनी घरे चांगली बांधलेली आहेत. ज्यांना मुंबईला किंवा अन्य शहरांत जाता आले नाही किंवा तिथे जाऊन जमले नाही, असे. जे शहरात कुटुंबाची राहण्याची सोय करु शकले नाहीत, अशांची बायका-मुले. गावीच राहणाऱ्यांनाही रोजगार आहे. पण तो मुख्यतः बांधकामाचा, तोडीचा. तो जिथे असेल तिथे राहतात. आठवड्याला घरी येतात. जवळ असला तर संध्याकाळी घरी येतात. हे लोक जवळपासच्या जमिनी कसतात. फक्त भात. नाचणी-वरी बंद. एखाद्यानं करायची ठरवली तरी इतरांच्या भोवतालच्या जमिनी पड असल्याने डुकरं ती टिकू देत नाहीत. ही शेती अर्थात आतबट्ट्याची. म्हणजे बाहेर रोजावर गेले तर याच्या कितीतरी पटीने धान्य बाजारातून विकत आणता येते. काही जण हौसेने, तर काही जण तेवढा तरी घरचा भात खायला मिळेल म्हणून शेती करतात. वर्षागणिक अशांचे प्रमाण कमी होते आहे.

शेती जवळपास नाही. रोजावर कामाला जाणे. तरी जेवायला आता तीन वेळा असते. भात, भाकरी, आमटी व भाजी असते. आठवड्याला मटण असते. यासाठीच्या जवळपास सर्व वस्तू बाजारातनं खरेदी करतात. असलाच तर भात घरचा. रेशनवरचे धान्य व रॉकेल काट्या-मापात मारले जाऊनही मदतीस येते.

विपन्नावस्था नाही. उपासमार नाही. अंगभर कपडे आहेत. घरकुलासारख्या योजनांतून घर आहे. म्हणजे तसे बरे चालले आहे. तरीही मला अस्वस्थ व्हायला होते. शेती नाही, गुरे नाहीत, कोंबड्या पाळणे बंद होते आहे. याचा अर्थ, गावच्या पर्यावरणातून उपजीविका जवळपास होत नाही. किंवा कमी कमी होत चालली आहे. बाहेरचा रोजगार बांधकाम, तोडीचा. त्याचे भविष्य काय? बांधकामाचा रोजगार असाच टिकेल कशावरुन? पुढची पिढी मातीत हात घालायला तयार नाही. ती शहराच्या वाटेवर.

या इथेच इथल्या संसाधनांच्या सहाय्याने उत्तम क्रयशक्ती देणारा रोजगार तयार होऊ शकतो काय? मोहन सकपाळ (समाजवादी चळवळीतला कार्यकर्ता व माझा जुना मित्र. आम्ही एकाच गावचे.) आणि मी माहिती काढू लागलो. गजानन खातूभाईंसारख्या ज्येष्ठांचा सल्ला घेतला. दापोली कृषी विद्यापीठातील डीनचे एक भाषण ऐकले. त्यात त्यांनी जगात ज्यांना उत्तम मानले जाते व चांगला भाव मिळू शकतो, अशी फळे, भाज्या, औषधी वनस्पती, झाडे कोकणात होऊ शकतात, असे सांगितले. पण हे करणार कोण?

आमच्या वाडीतल्या काही जणांनी देवरुखच्या मातृमंदिरच्या सहकार्याने पऱ्ह्याचे पाणी पंपाने घेऊन सामुदायिक भाजी उत्पादित करण्याचा प्रयोग केला. पण नंतर पंप बिघडला. तो दुरुस्त कोण करणार, सगळे जण समान मेहनत करत नाहीत, मग मी एकटाच का करु, बाजारात ही भाजी विकायला कोण जाईल अशा काही मुद्द्यांवर हा सहकार खोळंबला आणि थांबला. यात सहभागी असलेल्या माझ्या चुलतभावाला मी म्हटले, स्वतंत्रपणे तू तुझ्या कुटुंबासहित हाच प्रयोग कर, त्याला लागणारे सहाय्य उभे करायला मी मदत करतो. तो आधी हो म्हणाला. पण नंतर प्रतिसाद देईना. त्याला बिनाझंझटचे दिवसभर काम केले की संध्याकाळी २०० कधी २५० रुपये हातात रोख मिळणे जास्त सोयीचे वाटले.

म्हणजे गावातच कोणी अशी आधुनिक बागायती शेती केली व त्यात त्याला डोके न लावता काम करण्याचा नियमित रोजगार दिला, तर तो करायला तयार होता.

असा एक प्रयोग रणजित खानविलकर यांच्या पुढाकाराने चिपळूण जवळ पेढांबे या गावी होत असल्याचे आम्हाला कळले. त्याला आम्ही भेट दिली. आमच्या गावातून आधी ठरल्याप्रमाणे बरेच जण येणार होते. पण शेवटी दोन तरुण फक्त आले. या प्रयोगाचे सगळे तपशील मला ठाऊक नाहीत. पण त्याचे सूत्र आकर्षक वाटले. आमच्या लोकांच्या मानसिकतेला तो पर्याय होऊ शकतो असे वाटते. 

हा त्यांचा प्रयोग म्हणजे ‘फार्मर्स कार्पोरेट’. सहकार नव्हे. पड जमिनी एकत्र करुन त्यावर केळी, अननसासारखी पिके आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापनाने घ्यायची. जे शेतकरी यात सामील होतील, ते या कंपनीचे भागधारक. जमिनींची मालकी ज्याची त्याची. सातबारे स्वतंत्र. बॅंकांकडून कर्जही वैयक्तिक घ्यायचे. पण ते करायचे एकत्र. आलेला नफा-डिव्हिडंड जमिनीच्या शेअरप्रमाणे मिळणार. या शेतीत काम करणाऱ्यांना पगार कंपनी देणार. तंत्रज्ञ, व्यवस्थापक बाहेरुन आणणार. भागधारक शेतकऱ्यांचे संचालक मंडळ. काही कामे यांत्रिक. मातीत हात घालू न इच्छिणाऱ्या तरुणांनाही करता येण्यासारखी. एखाद्या भागधारकाला यात राहायचे नसल्यास तो आपली जमीन या प्रयोगातून काढून घेऊ शकतो. शेवटी कायद्याने ती त्याच्याच ताब्यात असते. पिके वर्षभराच्या मुदतीचीच असल्याने शेतकऱ्याची जमीन दीर्घकाळ अडकून पडत नाही.

हा प्रयोग आमच्या गावातही व्हावा, असा मोहनने व मी प्रयत्न केला. करतो आहोत. खानविलकर सहकार्य करायला तयार आहेत. लोकांशी बोललो. बैठका घेतल्या. पेढांब्याला किंवा इतरत्र जिथे कोठे असे प्रयोग होत असतील तेथे एकत्र जाऊन पाहू, अशाही सूचना-विनवण्या केल्या. पण काही हलत नाही. मुंबईला नोकरी करणारे यात डोके घालायला फारसे उत्सुक नाहीत. गावच्यांना आता जे चालले आहे, तेच बरे वाटते. नाही कोणी म्हणत नाही. पण होतही काही नाही.

यावर उपाय म्हणजे वैयक्तिक कोणीतरी पुढाकार घेऊन, स्वतःची तसेच इतरांची जमीन भाड्याने घेऊन असा प्रयोग करुन दाखवणे. असा कोण गावात (गावाच्या बाहेरही) सापडतो का पहातो आहोत. शेतीचे प्रयोग करणारे कोणी हरहुन्नरी तरुण गावात येऊन राहून काही करु शकतील का, त्याचाही शोध घेत आहोत.

हे नाही झाले तर काय होईल?

शेती हळूहळू पूर्ण संपेल. गुरे नसतील. सगळं काही बाजारावर व उक्त्या रोजगारावर अवलंबून असेल. बाहेरची मंडळी जमिनी विकत घेऊन प्रॉपर्टी म्हणून पाडून ठेवतील. आजच आमच्या गावातली एका कातळाच्या डोंगरावरची कित्येक एकर जमीन एका माजी मंत्र्यांच्या वडिलांनी विकत घेतली आहे. अजूनही घेत आहेत. तिथे त्यांना दगडाची खाण सुरु करायची आहे. त्या खाणीचा आवाज, धूळ, भोवतालच्या झाडाझुडपांचा नाश हे मला कल्पनेतही सहन होत नाही. प्रत्यक्ष होईल, तेव्हा काय वाटेल माहीत नाही. अशा जमिनी जातील. आम्ही सह्याद्रीच्या कुशीतले. किनाऱ्याजवळच्या पर्यटनातल्या नफ्याच्या शक्य़ता संपल्या किंवा अजमावून झाल्या की आमच्याकडे देशी अथवा परदेशी कंपन्यांचा मोहरा वळेल. आधी कंत्राटी शेती सुरु होईल. मग जमिनीच विकत घेतल्या जातील. एकसाची, पैसे देणारीच पिके घेतली जातील. वैविध्य टिकेलच असे नाही. 

या कार्पोरेटना रोखायचे असेल किंवा त्या पुढे आल्या तर त्यांच्याशी ताकदीने मुकाबला अथवा बोलणी करायची असतील, तर आज शेतकऱ्यांच्या नियंत्रणाखालील कार्पोरेट्स तयार व्हायला हव्यात.

मी किंवा मोहन यातले तज्ज्ञ नाही. अभ्यासकही नाही. साधारण समजुतीने बांधलेला हा अंदाज आहे. आज जे चाललेय, जे लोकांना पूर्वीच्या तुलनेत बरे वाटतेय त्यातून काहीतरी मोठे बिनसणार आहे, असे मात्र नक्की वाटते. जाणत्यांनी याविषयी अधिक बोलावे. आमचा समज वाढवावा. त्यांची आमच्या गावातल्यांशी मुंबईला तसेच गावी भेटायची इच्छा असल्यास, परिसराला भेट द्यायची असल्यास ती आम्ही नक्की संघटित करु. खरं म्हणजे अशांच्या प्रतीक्षेतच आम्ही आहोत.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
_______________________________________
आमचे गावः कनकाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

(साभारः आंदोलन शाश्वत विकासासाठी, ऑगस्ट २०१५)

| आमच्या गावाच्या परिसराची कल्पना देणारे काही फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करावे. |

Sunday, August 2, 2015

अण्णाभाऊ 'विश्वव्यापी जनगणा' चे! (नाहीत एका जातीचे)

काल कॉ. गोविंद पानसरे अभिवादन समितीनेे काळाचौकी येथे आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमावरुन परतत होतो. वाटेत डीजे लावलेली मिरवणूक दिसली. मिरवणूक कोणाची ते दुरुन कळत नव्हते. आज टिळकांचीही पुण्यतिथी. पुण्यतिथीला काय डीजे लावण्याची पद्धत नाही. शिवाय टिळकांची आमच्या भागात अशी मिरवणूक कोणी काढण्याची शक्यताही नाही. डीजे जोरात होता. कानाचे पडदे फाडणारा. पण लोक मात्र शंभराच्या आतच होते. जवळ गेल्यावर अण्णाभाऊंचा ट्रकवर उभा केलेला फोटो दिसला. या भागातच १४ एप्रिलला बाबासाहेबांच्या प्रतिमेची अशीच डीजे लावलेली मिरवणूक पाहिली होती. आवाज कानठळ्या बसवणारा व छातीचे ठोके वाढवणारा. पण त्याला लोक हजाराच्या वर होते. अण्णाभाऊंची मिरवणूक त्याच भागात असताना हे हजार लोक त्यात का नाही सहभागी झाले? म्हणजे या मिरवणुकीत फक्त मातंग समाजच असणार. आंबेडकर जयंती बौद्धांची. अण्णाभाऊंची जयंती मातंगांची. मातंग हे बौद्धांच्या तुलनेत संख्येने कमी. म्हणून त्यांची मिरवणूक छोटी.

जाती-धर्म-देश या भेदांच्या पल्याडच्या 'विश्वव्यापी जनगणा' ला आवाहन करणारे, 'एकजुटीच्या या रथावरती होऊन आरुढ हो बा पुढती' व 'जग बदल घालूनी घाव' हा बाबासाहेबांचा संदेश 'सांगून गेले मला भीमराव' या गीतातून देणारे अण्णाभाऊ असे केवळ त्यांच्या जातीत बंदिस्त व्हावेत?

अण्णाभाऊंच्या जयंतीवरुन आलो ती काळाचौकी ही बहुजन श्रमिक-कामगार वस्ती. काळाचौकीच्या कार्यक्रमातील बॅनरवर ते 'लोकशाहीर व कॉम्रेड' होते, या मिरवणुकीतील बॅनरवर ते केवळ 'लोकशाहीर' होते. अखिल जगातील शोषित-पीडितांच्या क्रांतीसाठी लढणाऱ्या या कॉम्रेडला आपल्या जातीव्यवस्थेने त्याच्या जातीत कोंबला. महार-मांगांची एकत्रित ओळख 'दलित'. पण बौद्ध आपल्याला मांगांशी जोडून घ्यायला तयार नाहीत व मांगही बौद्धांच्या कडक बाण्याने बिथरुन आपले 'हिंदू'पण अन्य सवर्णांच्या हिंदूपणाशी जोडण्यात सुरक्षितता शोधणारे. (याला अपवाद आहेत. पण बौद्ध व मातंगांचे मुख्य लक्षण आज हेच आहे.)

या मिरवणुकीत सहभागी झालेले मातंग, न (अथवा कमी प्रमाणात) सहभागी झालेले बौद्ध व ही मिरवणूक लांबून पाहणारे रस्त्यावरचे सवर्ण हे सगळे काळाचौकीच्या कार्यक्रमात 'श्रमिक' म्हणून एकत्र होते. तिथे त्यांच्या जातीच्या ओळखी गळून पडल्या होत्या. सर्व तऱ्हेच्या शोषणाला विराम देऊ पाहणारी 'माणसे', 'साथी', 'कॉम्रेड' या ओळखीने ते शाहीर कृष्णकांत जाधव वयाच्या ७६ व्या वर्षीही दमदारपणे गात असलेल्या दिवंगत शाहीर आत्माराम पाटलांच्या 'ज्ञातिविसर्जनाच्या लावणीला' साथ देत होते.

जातीचा कार्यक्रम संघटित करणे तुलनेने सोपे असते. पण हा अशा संकुचित अस्मितांना मोडून व्यापक मानव्याच्या ओळखीचा गजर करणारा कार्यक्रम संघटित करणे खूपच कष्टप्रद असते. तो करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे अभिवादन समितीच्या संयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद.

- सुरेश सावंत

याकूबचा अंत्यविधी

याकूबचे शव माहीमला येणार व तिथून ते अंत्यविधीसाठी ६ वा. मरिन लाईन येथील बडा कबरस्तानमध्ये नेले जाणार असे जाहीर झाले होते. अंत्ययात्रेला मात्र बंदी होती. या दोन्ही ठिकाणचा माहौल पहावा, मुस्लिम समाजाच्या मनःस्थितीचा अंदाज घ्यावा म्हणून मी गेलो. निलेशशीही येण्याचे बोललो होतो. त्याला सरळ मरिन लाईनलाच यायला सांगितले होते. माहीमला सव्वा चारला पोहोचलो. तर मी पोहोचण्याच्या १० मिनिटे आधीच याकूबचे शव सी लिंकवरुन नेण्यात आल्याचे कळले. त्याच्या घराच्या व माहीम चर्चपर्यंतच्या परिसरात हजारो लोक जमले होते, असे आमच्याशी संबंधित तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांच्या मते हे लोक फक्त माहीमचे नव्हते. खूप लोक बाहेरुन आले होते. ते 'याकूब मेमन अमर रहे'च्या घोषणा देत होते. स्त्रिया अशा प्रसंगात कमी असतात. पण इथे स्त्रियाही लक्षणीय होत्या. त्याही घोषणा देत होत्या. या कार्यकर्त्यांना हा माहौल नवीन होता. त्यांना वातावरणात खूप ताण व काहीशी भीतीही जाणवत होती. याकूब मेमनच्या घराजवळ राहणाऱ्या एका कार्यकर्तीशी बोललो. तिच्या म्हणण्यानुसार याकूब मेमन गुन्हेगार होता, हे कोणाच्याही गावी नव्हते. मुस्लिम म्हणून त्याला लक्ष्य करण्यात आले, इतर समाजाच्या तुलनेत आम्हाला असेच लक्ष्य करण्यात येते अशी रागाची भावना लोकांच्या मनात ठसठसते आहे. हे ठसठसणे काय रीतीने बाहेर येईल, याबाबत या कार्यकर्तीला भय वाटते.

नंतर आम्ही त्या परिसरातून, त्याच्या घराच्या जवळून एक चक्कर टाकली. त्यावेळी खूप विरळ लोक रस्त्यावर होते. पोलीस बंदोबस्त मात्र जोरात होता. तिथून मी मरिन लाईनला बडा कबरस्तानला गेलो. निलेश माझ्या आधीच तिथे गेला होता. मी प्रवासात असतानाच त्याच्याकडून कळले की, तो तिथे जाण्याआधीच याकूबचा दफनविधी झालेला होता, लोक परतत होते. मी ६ च्या दरम्यान पोहोचलो. मलाही लोक व पोलीस तसेच अन्य सुरक्षा दलाचे लोक परतताना दिसले. याचा अर्थ जाहीर वेळेच्या आधीच अंत्यविधी झाला होता.

बडा कबरस्तानच्या आत डोकावलो. पण लोक बाहेर निघत असल्याने आता थांबण्यात व अधिक आत जाण्यात काही अर्थ नव्हता. मग मीही परतलो. मरिन लाईन स्टेशनवर आलो तर पलिकडे समुद्र व ढग जमून आलेले दिसले. ट्रेन पकडण्याऐवजी सरळ समुद्रावर गेलो. पाऊस सुरु झाला. वारा व पाऊस अंगावर घेत कठ़ड्यावरून चालत नरिमन पॉईंटवरुन चर्चगेट स्टेशनला आलो. रात्रभर जागलो होतो. पहाटे सव्वापाचच्या न्यायालयाच्या निकालानंतर आडवा झालो. पण ताठरलेपणाने काही झोप येत नव्हती. आता जे व्हायचे ते झाले होते. याकूब संपला व दफनही झाला. त्यामुळे तसेच वारा-पाऊस-समुद्र-चालणे यामुळे माझ्या अंगातला-मनातला ताणही विरु लागला होता. आता घरी आलो. मोकळे वाटते आहे. पुढे जे होईल, त्याला सामोरे जायला निश्चिंत झालो आहे.

(३० जुलै २०१५)

याकूब मेमनची फाशी

याकूब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने ज्या चर्चा, ज्या बाजू ज्यारीतीने घेतल्या जात आहेत, त्याने धार्मिक ध्रुवीकरण वाढण्याचा धोका आहे. याकूबच्या फाशीच्या बाजूचे ते देशभक्त व त्याविषयी तसेच एकूण फाशीच्या शिक्षेविषयीच वेगळे मत मानणाऱ्यांना गद्दार ठरवून संविधानाने दिलेल्या विचार-अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धडधडीत अवमान केला जातो आहे. सेक्युलॅरिझम, देशाची एकता, सामाजिक सद्भाव व शांतता यांना आधीच डळमळीत करण्याचे प्रयत्न चालू होते, त्यांस आता उधाण येणार आहे. अतिरेक्यांच्या कारवायांत वाढ होण्याचा संभव आहे. लोकांच्या भावना-अस्मितांचा वापर संकुचित राजकीय स्वार्थासाठी करणाऱ्यांचा धंदा तेजीत येणार आहे. या उन्मादी वातावरणात सम्यक, विवेकी भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्यांच्या प्रयत्नांना जो काही क्षीण प्रतिसाद मिळत असे, त्यालाही आता खीळ बसणार आहे.

...हाही काळ सरेल. पण आता तरी अस्वस्थता दाटून आली आहे.
(२९ जुलै २०१५)