'सद्धम्म'साठी दिलेला लेख
कालची गोष्ट.
‘मनसेचे लोक म्हणतात, बाबासाहेब ‘आमचे’ असे तुम्ही का म्हणता ? ‘आपले’ म्हणा ना ! त्यांनी घटना देशासाठी लिहिली. फक्त दलितांसाठी नाही. महाराष्ट्र राज्याबद्दल, मराठी माणसाबद्दल त्यांनी भूमिका मांडली. बाबासाहेब हे आपल्या सगळ्यांचे आहेत. सर्व महाराष्ट्राचे, सर्व देशाचे आहेत. तुम्हीच लोकांनी बाबासाहेबांना संकुचित बनवले.’
...वस्तीतील एक तरुण कार्यकर्ता बैठक संपल्यावर माझ्याशी बोलत होता. नंतर रिपब्लिकन नेत्यांना त्याने जाम शिव्या घातल्या आणि मग ‘आपली पोरे मनसेत जातात याला जबाबदार कोण ?’ असा उत्तराची अपेक्षा नसणारा प्रश्न माझ्यापुढे टाकला.
मागचा एक धम्मचक्रप्रवर्तन दिन.
दीक्षाभूमीवरील स्तूपात फिरत होतो. बाबासाहेब व त्यांच्या वरच्या बाजूस बुद्धाची आशीर्वाद देणारी प्रतिमा एकत्रित असलेला एक फोटो समोर होता. सोबतच्या तरुण कार्यकर्त्याने निरागसपणे विचारले, ‘सर, बाबासाहेब अाणि बुद्ध एकाच वेळेस होते का ?’
एका साहित्यिक मित्राच्या जुने कार्यकर्ते असलेल्या वडिलांचा अमृतमहोत्सव.
अनेक अधिकारी, संपादक, साहित्यिक, प्रतिष्ठित मंडळी जमलेली. हॉलच्या बाहेर अनेक गाड्या लागलेल्या.
पंच्याहत्तरी-ऐंशीचे लोक भाषणात बाबासाहेबांच्या काळातल्या जुन्या स्फूर्तिदायी आठवणी जागवत होते. त्यांच्या वाणीतून, डोळ्यांतून तत्कालीन चळवळीचा अभिमान, तेज ओसंडत होते. साठीचे लोक पँथरच्या काळातील आठवणींनी सुरुवात करत आज कशी चळवळ संपली आहेचा निराश सूर लावत होते. त्यांच्या चेह-यांवर काही ‘गमावल्याची’ छाया तरंगत होती.
12 ते 22 वयोगटातील आमची (म्हणजे 40 ते 50 चा वयोगट) मुले आजुबाजूला खेळत किंवा गप्पा मारत होती. त्यांना यात काहीच ‘गम्य’ नव्हते. आता ती कंटाळू लागलेली. ‘बुफे’ च्या टेबलावरील पात्रांची झाकणे कधी उघडतात, याची वाट पाहत असलेली.
माझ्या मित्राची शिक्षिका असलेली पत्नी मला म्हणाली, ‘भाऊजी, ह्यांना आवरतं घ्या म्हणावं आता. पोरं पार कंटाळलीत. आम्हाला त्रास द्यायला लागलीत.’
माझा बाप म्हणजे तुझा आजा ‘मेलेली जनावरं ओढायचा’ सांगितल्यावर माध्यमिक शाळेतील माझा मुलगा मला म्हणाला होता- ‘काय पकवतोयस !’
...पुढचं काही ऐकून घ्यायला त्याला इंटरेस्ट नव्हता. टीव्हीवर चाललेल्या ‘रोडीज’ मधल्या युवक-युवतींच्या विरोचित करामतींत तो गुंगून गेला.
आपला भूतकाळ, आपला समाज, आपली चळवळ याविषयी जाणीवपूर्वक बोलण्याचा माझा प्रयत्न सुटत नाही. लादले न जाता त्याच्या कलाकलाने बोलत असतो. थोडा प्रतिसाद, अन् बरेचसे दुर्लक्ष असे चालते.
बालपणापासून फ्लॅट व मिश्र संस्कृतीत वाढलेल्या माझ्या मुलाला इतरांपासून काही वेगळे दिसत असले तर घरातला बाबासाहेबांचा फोटो, बुद्धाची मूर्ती एवढेच. तो बाय डिफॉल्ट ‘निरीश्वरवादी’ आहे. याचे कारण घरात कोणत्याही देवाचे अस्तित्व नाही, चर्चा नाही.
वरच्या सर्व प्रसंगांतील ‘युवा पिढी’ बौद्धच आहे. पण विविध आर्थिक व शैक्षणिक थरातली. बौद्ध असण्याबरोबरच आणखी एक गोष्ट तिच्यात सामायिक आहे. ती म्हणजे- आंबेडकरी चळवळीबाबतची निर्भान, निर्शल्य दिशाहिनता. ज्याचे भान नाही, ज्याचे शल्य नाही, ज्याचा खेद नाही अशी दिशाहिनता.
ह्याला जबाबदार कोण ?
...परिस्थिती ?
होय. पण काही प्रमाणात. परिस्थिती बदलतच असते. जग परिवर्तनशील आहे. थोपवू म्हटले तरी ते थांबणार नाही. जगातल्या, समाजातल्या सगळ्यांच्याच जगण्याला ह्या बदलत्या परिस्थितीचे संदर्भ असतात. बौद्धांच्या तसेच बौद्धेतरांच्या.
पण परिस्थिती सुटी नसते. ती एक शृंखला असते. तो एक प्रवाह असतो. स्वच्छ, गढूळ, डोह, खडक असे सगळे त्यात असते. या परिस्थितीच्या स्थित्यंतरात आधीचे प्रगतीशील घटक पुढच्या पिढीकडे जाणीवपूर्वक सोपवावे लागतात. मागच्याने पुढच्याकडे मशाल सोपवायची असते. मागच्याने पुढच्याला चाल द्यायची असते. ही जाणीवपूर्वकता चळवळीत विशेष महत्वाची असते. आंबेडकरी चळवळीत हे झाले का ? होत आहे का ?
याचे उत्तर ‘जवळ जवळ नाही’ असे द्यावे लागले असते, तरी बरे झाले असते. ते कमी धोकादायक होते. पण ‘विचित्र, तिरपागडे, हानिकारक’ असे काहीतरी पुढच्या पिढीला सोपवले जात आहे. आणि ते खूपच गंभीर आहे.
आंबेडकरी चळवळ याचा अर्थ काय ?
बौद्धांनी (म्हणजे पूर्वाश्रमीच्या महारांनी) बौद्धांसाठी (म्हणजे पूर्वाश्रमीच्या महारांसाठी) चालवलेली चळवळ, असा आहे का ?
नाही. ती सर्व पीडितांना, शोषितांना मुक्त करणारी मानवमुक्तीची चळवळ आहे, अशीच आपण तिची व्याख्या करतो. ती केवळ बौद्धांपुरती संकुचित होणे आपल्याला तत्वतः मान्य नाही.
मग वरच्या पहिल्या घटनेतील मनसेला बाबासाहेबांचे व्यापकत्व आजच्या आंबेडकरी तरुणांना सांगण्याचा अधिकार कोणी दिला ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी छेडलेले देशव्यापी भूमिहिनांचे आंदोलन, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सारस्वताला हादरविणारे दलित साहित्य, सामाजिक-राजकीय जीवनाला थरारुन सोडणारी दलित पँथरची गर्जना, नामांतर-रिडल्सची आंदोलने अशा अनेक सत्कर्मांची नोंद आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात असली तरी आज वट्टात पराभूतता, दिशाहिनता हेच आहे. याला कारण कोण ?
निःसंशय आंबेडकरी चळवळीतले आजचे नेते आणि आजची शिक्षित व मध्यमवर्गीय मध्यवयीन पिढी.
आज ऐक्य केलेल्या रिपब्लिकन नेत्यांचा नजिकच्या भूतकाळातला व्यवहार काय राहिला आहे ?
एकेकाळी दलित चळवळीला सामाजिकतेबरोबरच वर्गीय परिमाण देऊन समग्र परिवर्तनाची मांडणी करणारे नामदेव ढसाळ शिवसेनेबरोबर काय म्हणून गेले ? नामांतर लढ्यातील ‘लॉंग मार्च’ची पुण्याई ज्यांच्या नावावर जमा आहे, त्या प्रा. जोगेंद्र कवाडेंनी नितीन गडकरी आणि त्यांच्या भाजपला पाठिंबा काय म्हणून दिला होता ? लढाऊ व संघटक म्हणून ख्याती व सर्वाधिक लोकप्रियता असलेल्या रामदास आठवलेंनी कॉंग्रेस व पुढे राष्ट्रवादीशी जातीयवादी शक्ती सत्तेवर येऊ नयेत म्हणून सहकार्य केले. हा तर्क योग्यच होता. पण चळवळ सोडायचे काय कारण होते ? सत्तेत भागिदारी न करताही हे सहकार्य करता आले असते. त्याचा प्रचंड दबाव कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर राहिला असता. आठवलेंची नैतिक व पर्यायाने राजकीय ताकद खूप वाढली असती. सत्तेत सहभागी व्हायचे, ते आपल्या समाजासाठी, असे म्हणता म्हणता ढाण्या पँथरची नखे सत्ताधा-यांनी बोथट कधी केली, हे त्यालाही कळले नाही. कळले तेव्हा या पँथरच्या आग ओकणा-या डोळ्यांच्या कचकड्या झाल्या होत्या. आता या डोळ्यांना कोण घाबरणार ? दिल्लीत मंत्रिपद दिले नाही तेव्हा, तसेच शिर्डीत पराभूत झाल्यावर आंदोलन करणा-या आठवलेंच्या कार्यकर्त्यांना जनतेने साथ दिली नाही. सत्तेच्या विविध स्तरांवर लाभार्थी झालेल्या पँथर कार्यकर्त्यांचे पोषाख, व्यक्तिमत्व, वागणे अन्य सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांहून कोणत्याही अर्थाने भिन्न दिसत नाही. सत्तेच्या दलालांच्या या बाजारात नव्या पिढीला जुना पँथर कसा होता, हे दाखवायचे झाले, तर म्युझियमध्ये ठेवायला त्याचा सांगाडाही शिल्लक नाही. एकतर त्यांच्या हाडांनाही मांद्य आलेले आहे किंवा ती अगदी भुसभुशीत झालेली आहेत.
रामदास आठवलेंची जमेची बाजू म्हणजे ते संकुचित नाहीत, आक्रस्ताळे नाहीत. व्यापक एकजुटीच्या बाजूचे आहेत, धर्मांधतेच्या निश्चित विरोधात आहेत. पण हा चांगुलपणा व्यवहारात शक्ती म्हणून आज रुपांतरित होत नाही. प्रकाश आंबेडकरांचे चळवळीतले पदार्पणच मुळी ‘सम्यक समाज आंदोलन’ या व्यापक पायावर झाले. ते एकजातीय (म्हणजे केवळ बौद्धांपुरते) तेव्हाही नव्हते, आताही नाहीत. मात्र ते जातींच्या बेरजांवर विश्वास ठेवतात. शिवाय सत्तेच्या सारिपाटात कोणाशीही- भाजप-सेनेशीही एकजुटीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष क्रम त्यांना मंजूर असतात. विदर्भात काही ठिकाणी त्यांनी स्वतःचा असा जनाधार तयार केला आहे. संघटना बांधली आहे. ते यावेळच्या ऐक्य प्रक्रियेपासून ठरवून दूर होते. त्यांनी स्वतःच्या ताकदीवर दोन आमदार यावेळी निवडून आणले आहेत. त्यामुळे स्वाभिमानाने सत्तेचे राजकारण आम्हीच करतो, असा दावा ते करु शकतात. पण त्यांच्या जुन्या हेकेखोर व अविश्वासार्ह व्यवहारांमुळे त्यांना आंबेडकरी जनतेची व्यापक मान्यता अजूनही नाही. गवईंचे राजकारण सत्तेची ऊब घेत जाण्याचे राहिले. त्यांची निष्ठा काही काळ त्यांच्या सुपुत्रांनी रिडालोसमध्ये जाऊन भंग केली. तथापि, चुकीची दुरुस्ती लगेच करुन ते मूळ वळचणीला परतले.
परिणामी, या विधानसभा निवडणुकांत रिपब्लिकन उमेदवारांचा त्यांच्या बालेकिल्ल्यांतही (म्हणजे बौद्ध मतदार मोठ्या संख्येने असलेले विभाग) धुव्वा उडाला. याचा अर्थ, ‘ऐक्या’च्या फार्साला नेहमी फसत आलेली आशावादी बौद्ध जनता यावेळच्या ‘रिपब्लिकन ऐक्या’वर मात्र भाळली नाही. तिने एकतर पारंपरिकरित्या कॉंग्रेसला आणि तिच्यातील तरुणांनी ‘मनसे’ला कौल दिला. (बसपचे ‘माया’जालही यावेळी फाटले होते)
रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व बौद्धांच्या बाहेर कधी गेलेच नाही. त्यांनी बाबासाहेब ‘महान होते’ हे सांगण्याच्या आणि त्यांच्या नावाच्या वापराच्या पल्याड परिणामकारक असे काही सांगितलेच नाही. वासाहतिक शोषणाचे विश्लेषण करणारे बाबासाहेब, जागतिक लोकशाही लढ्यांचा वारसा व संदर्भ देणारे बाबासाहेब, कामगारांसाठी 8 तासांचा दिवस, कामगार स्त्रीला बाळंतपणाची रजा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, समस्त हिंदू स्त्रियांना वारसा हक्क यांसाठी झगडणारे बाबासाहेब, भाषावार प्रांतरचनेसंबंधी-पाकिस्तानविषयी भूमिका मांडणारे बाबासाहेब आम्ही अन्य समाजाला कधी समजावलेच नाहीत. एवढेच नाही. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला वैश्विक बुद्ध दिला. तोही आम्ही ‘महार’ करुन टाकला. अन्य समाजातील अनेकांचा ‘बुद्ध’ हा महार होता असा समज आहे. हे त्यांचे अज्ञान आहे, हे खरेच. पण आपले नाकर्तेपण त्यामुळे कमी होत नाही.
आज आपल्यात 74 टक्के (ब्राम्हण समकक्ष जातींच्या खालोखाल) साक्षरता आहे. 4 वर्तमानपत्रे आहेत. उच्चपदस्थ अधिकारी, विचारवंत आहेत. सुस्थित असा लक्षणीय मध्यमवर्ग आहे. तरीही गेल्या 59 वर्षांत बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला बुद्ध हा ‘वैश्विक ठेवा’ आपण सार्वत्रिक करणे सोडाच; आपल्या व्यतिरिक्तच्या अन्य दलित व मागास जातींपर्यंत नेऊ शकलो नाही. लोकल ट्रेनमध्ये ‘सम्राट’ हातात असला की इतर लोक थोडे वेगळ्या नजरेने आपल्याकडे का पाहतात ?
भारत बौद्धमय करण्याचा मार्ग म्हणजे जयंती-मयंतीला आपल्याच कोंडाळ्यात बेंबीच्या देठापासून भाषणे करणे असा आपण लावलेला आहे. शिक्षित मध्यमवर्गीय झोपडपट्टीतल्या जयंतीत प्रमुख पाहुणा म्हणून बाबासाहेबांबद्दल, बुद्धाबद्दल मोठमोठ्या गोष्टी करतो आणि आपल्याच सोसायटीतल्या, ऑफिसातल्या दुस-या बौद्धाला चारचौघात ‘जयभीम’ म्हणायला कचरतो. बुद्ध, बाबासाहेब या प्रेरणांचा व विचारांचा गंध आपल्या व्यक्तिमत्वातून अशारीतीने पाझरला पाहिजे की इतर लोक त्याकडे आकर्षित व्हायला हवेत. आणि त्यांनी विचारले पाहिजे, ‘तुमचे व्यक्तित्व इतके सच्छिल, सुगंधी असण्याचे रहस्य काय ?’ आणि आपण साभिमान विनम्रतेने सांगू शकलो पाहिजे – ‘बाबासाहेब व बुद्ध.’ पण हे आपण केले नाही.
बौद्धांमधला शिक्षित मध्यमवर्ग ही खरे तर ताकद आहे. पण तिच्यात अनेक विकृती तयार झाल्या आहेत. एकूण मध्यमवर्गात आलेली आत्ममश्गुलता बौद्ध मध्यवर्गातही गतीने येऊ लागली आहे. शासकीय नोक-या, आरक्षणे, बढत्या, महामंडळांची कर्जे, गृहसंस्थांतल्या सवलती यांत आपल्याला व आपल्यानंतर आपल्या मुलाबाळांनाच लाभ कसा मिळेल, याबाबत तो विलक्षण दक्ष असतो. आपली जात्याच असलेली राजकीय-सामाजिक तल्लखता तो इथे पुरेपूर वापरतो. त्यासाठी वशिला, लाच, सत्ताधा-यांची खुशामत इ. रुढ मार्गांतला कोणताही मार्ग त्याला वर्ज्य नसतो. पण आपल्याच समाजातल्या गरीब स्तरातील बौद्धांचे कष्टकरी, गरीब म्हणून असलेले प्रश्न सोडवण्याबाबत, त्यांवर चळवळ संघटित करण्याबाबत तो अलिप्त राहतो. आपल्या मुलांसाठी आपण आरक्षण न घेतल्यास आपल्यातल्या गरीब मुलांना त्याचा लाभ मिळेल, हा अंतर्गत सामाजिक न्याय त्याला मंजूर नसतो. आपली मुले अभिजनवर्गात मिसळावीत म्हणून आपली ‘ओळख’ ओळख लपविण्याचा, पुसण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आंबेडकरी परिभाषेचा वाराही त्यांना लागणार नाही, याची निर्लज्ज दक्षता घेतो. सोसायटीतल्या गणेशोत्सवात सर्वधर्मसमभाव किंवा औचित्याचा प्रश्न म्हणून सहभागी होणे वेगळे. पण ‘आम्ही तुमच्यातलेच’ हे दाखवण्यासाठी स्वतःच गणपती बसविण्यासारखे प्रकार तो करतो, हे आक्षेपार्ह आहे. जसजसा आर्थिक स्तर बदलेल, जसजसे घर अनेक खोल्यांचे होत जाईल, तसतसा बाबासाहेबांचा फोटोही हॉलमधून बेडरुमध्ये आणि नंतर तेथूनही दिसेनासा होतो. हा शिक्षित मध्यमवर्ग आपल्या नेत्यांचे राजकारण दुरुस्त करण्याचा आग्रह धरण्याऐवजी संधी मिळताच तो स्वतःच त्याचा वाटेकरी होतो. आपल्या व्यवहाराचे ढोंगी समर्थन करतो. आंबेडकरी चळवळीवरची ही साय दिवसेंदिवस दाट होत चालली आहे. आंबेडकरी चळवळीच्या दिशाहिनतेत त्यामुळे भर पडते आहे.
आंबेडकरी चळवळीचे भवितव्य धोक्यात आहे, ही चिंतेची बाब आहे. आणि त्याहून चिंतेची बाब म्हणजे युवा पिढीला या धोक्याची जाणीवच नसणे ही आहे.
यावर उपाय काय ?
ज्यांना हे कळते, असे अनेक कार्यकर्ते आजही आंबेडकरी तसेच अन्य पुरोगामी चळवळीत आहेत. आंबेडकरी समाजाने आपली मूळ उमेद पुन्हा जागवावी, खरेखुरे आंबेडकरी कार्यकर्त्याचे नवे तेजोमयी व्यक्तित्व घडवावे, पहिल्यापेक्षा अधिक व्यापक जाणीव घेऊन क्रियाशील व्हावे, यासाठी या जाणत्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावयास हवेत. परिस्थितीच्या रेट्याची वाट न बघता एकएका कार्यकर्त्याशी संवाद केला पाहिजे. काही किमान सहमतीच्या मुद्द्यांवर हालचाली सुरु केल्या पाहिजेत. धुक्यात नुसतेच गप्प उभे राहण्यापेक्षा त्यातल्या त्यात विरळ थरातून हिंमतीने वाट शोधायला लागले पाहिजे. या प्रयत्नांतूनच सूर्य उगवणार आहे. धुके सरणार आहे. वाट स्पष्ट होणार आहे. दिशा मोकळ्या होणार आहेत.
रिपब्लिकन पक्ष नाम के वास्ते का होईना आज एकवटला आहे. त्याला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. ही दिशा कोणती हे फार शोधण्याची गरजच नाही. आता तरी बाबासाहेबांनी त्यांच्या खुल्या पत्रात मांडलेली ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ची संकल्पना पुरेशी आहे. आधी तिथवर पोहोचणे आवश्यक आहे. मग त्याचा विकास करता येईल.
काय आहे ही संकल्पना ?
लोकशाही रचनेत लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करणे (खरा रिडालोस), ही तळमळ त्यात आहे. त्यात कोठेही एकजातीयता, विशिष्टता नाही, तर समष्टीच्या समग्र कल्याणाचा घोष त्यात आहे. केवळ बौद्धांचा पक्ष असे जे संकुचित स्वरुप आजच्या रिपब्लिकन पक्षाचे आहे, त्याचा मागमूसही बाबासाहेबांच्या मूळ संकल्पनेत नाही, किंबहुना त्यास पूर्ण विरोधी अशीच बाबासाहेबांची मांडणी आहे. या पक्षाच्या संकल्पनेसंबंधात त्यांनी एस.एम. जोशी, लोहिया यांच्याशी बोलणीही सुरु केली होती. तथापि, त्याच काळात त्यांचे महापरिनिर्वाण झाल्याने ही बोलणी पुढे जाऊ शकली नाहीत.
या मांडणीबाबत आणखी काही नोंदवत राहणे, ही विनाकारण पुनरुक्ती ठरेल. बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्षाची संकल्पना स्पष्ट करणारे त्यांचे ‘खुले पत्र’ (ज्याचा सगळे ऐक्यवादी रिपब्लिकन पुढारी उल्लेख करत असतात व त्यावर आधारित आमचे ऐक्य किंवा पक्ष असल्याचा दावा करत असतात व नेमके त्याच्या विरोधात व्यवहार करत असतात) जिज्ञासूंनी मुळातून वाचावे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन व भाषणे, खंड 20’ मध्ये ते उपलब्ध आहे.
असा रिपल्किन पक्ष उभा करुन सर्व पीडितांच्या मुक्तीच्या कार्यक्रमावर चळवळ उभारणे व त्या क्रमात निवडणुका लढणे असे व्हायला हवे.
दुसरे म्हणजे, बुद्धविहार केंद्र धरुन वस्तीत सामाजिक ऐक्य उदयास आले पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे विचार व त्यांनी दिलेला बौद्ध धम्म या सर्व गटातटांत मान्यता असलेल्या सामायिक व अत्यंत आदरणीय बाबी आहेत. प्रत्येक बौद्ध वस्तीत बुद्धविहार असतेच. या बुद्धविहारात त्या वस्तीतले सर्व गटातटांना मानणारे सामान्य लोक एकत्र येऊ शकतील. बाबासाहेब, त्यांचे विचार व बुद्ध धम्म या सामायिक बाबींबाबत अधिक समजून घेणे, आपले जाणतेपण वाढविणे व समाज म्हणून एक राहणे, हे होऊ शकते. अट एकच, पक्षीय किंवा गटाच्या राजकीय भूमिकांची या पातळीवर चर्चा न करणे. प्रत्येकाला राजकीय भूमिका घ्यायला मोकळीक ठेवणे. समान किमान भूमिकेवर आधारलेल्या वस्त्यांवस्त्यांमधील अशा सामान्यांच्या ऐक्यातूनच राज्यपातळीवरील टिकाऊ ऐक्य उदयास येऊ शकेल. अत्याचार करु धजणा-यांना या ऐक्याचा निश्चितच धाक राहील व राजसत्तेलाही या ऐक्याची पदोपदी दखल घ्यावी लागेल.
असे आणखी अनेक उपाय असू शकतात. अशा उपायांनीच आंबेडकरी चळवळीचे भवितव्य सुरक्षित करता येईल. अशा सम्यक आंबेडकरी चळवळीचा नैतिक व तात्विक दीपस्तंभच आपल्यातल्या युवा पिढीला दिशा देईल.
- सुरेश सावंत