Saturday, April 3, 2010

आंदोलन विशेषांकावर दिलेली प्रतिक्रिया

प्रिय सुनीती,

सप्रेम नमस्‍कार,

'आंदोलन’च्‍या विशेषांकाबद्दल प्रतिक्रिया देण्‍यास उशीर झाल्‍याबद्दल दिलगिरी व्‍यक्‍त करतो.

तुमचे पत्र मिळाले पण त्‍या आधी पाठवलेला अंक मात्र पोहोचला नाही. पोस्‍टात प्रत्‍यक्ष जाऊन तुमच्‍या पत्रातील अंक पाठवल्‍याचा उल्‍लेख दाखवून तक्रार केली. पण याही वेळी उपयोग झाला नाही. आमच्‍या नव्‍या मुंबईत ज्‍याला रद्दीचीही किंमत येणार नाही, असेच टपाल, तेही बरेच उशीरा, पोहोचते. अंक शेवटी अन्‍य ठिकाणाहून मिळवला.

प्रतिक्रियेच्‍या उशिराबद्दल एवढे समर्थन पुरे.

अंक सुंदर, समग्र झाला आहे. तुमच्‍या साक्षेपी व कुशल संपादनाला मुख्‍य श्रेय जाते. मनःपूर्वक अभिनंदन!

माझा लेख वाचून अनेकांचे मला फोन/एसएमएस आले. माझ्यासाठी नेहमीच्‍या वर्तुळाबाहेरील व बरेचसे अपरिचितांचे हे फोन होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रतिक्रिया औपचारिक नव्‍हत्‍या. आपण ‘योग्‍य लाईन’वर आहोत, याचा दिलासा मिळाला. तुम्‍ही लेख छापला नसतात, तर अर्थातच हे कळले नसते. त्‍याबद्दल तुमचे मनापासून आभार.

जीवन समग्र असते. त्‍यामुळे राजकारणही समग्र असावे लागते. अंकात जीवनाच्‍या विविध क्षेत्रांना तुम्‍ही जाणीवपूर्वक भिडला आहात. आंदोलनांच्‍या विखुरलेपणाची, मर्यादांची वस्‍तुनिष्‍ठ नोंद घेऊन या सर्व आंदोलनांना कवेत घेणारे समग्र राजकारण उभे राहावे, ही तुमची कळकळ, आस प्रत्‍यही जाणवते. नव्‍या जगाची आस’ या तुमच्‍या व मेधाताईंच्‍या लेखात त्‍याची नोंद करताना तुम्‍ही ‘जनआंदोलनंदेखील विस्‍थापित समूहांना त्‍यांच्‍या प्रश्‍नापलीकडे व्‍यापक भूमिका घेऊन उभे राहण्‍यात कमी पडताहेत, तशीच त्‍या प्रश्‍नांना प्रत्‍यक्ष सामोरं जावं न लागणा-या समाजाला त्‍या प्रश्‍नासंदर्भात भूमिका घ्‍यायला लावण्‍यातही.’ असे म्‍हटले आहे. उल्‍काच्‍या संपादकीयातही ‘आंदोलने होत आहेत पण या आंदोलनांचा आणि मूलभूतरीत्‍या व्‍यवस्‍था परिवर्तन करण्‍याच्‍या लढ्याचा सांधा निखळला आहे....या लढ्यातून निर्माण होणा-या ऊर्जेचे राजकीय शक्‍तीत रुपांतर होतानाही दिसत नाही. तसेच संसदीय राजकारणात सक्रीय असणारे डावे पक्ष व हे जीवन वाचवण्‍यासाठी लढे लढवणा-या जनसंघटना यांच्‍यातील जैविक नातेदेखील तुटले आहे.’ अशी नेमकी नोंद आहे.

हा ‘पेच’ आहे, याची तुम्‍ही लोक नोंद घेत आहात व तो दूर व्‍हावा, यासाठी तळमळत आहात, याचे मला व आमच्‍यातल्‍या (म्‍हणजे लाल निशाण पक्षातल्‍या) काहींना अप्रूप व समाधानही वाटते. समाधान यासाठी की, काही बाबतींत मतभिन्‍नता असली तरी हा पुरोगामी चळवळींपुढचा ‘पेच’ सुटण्‍याची ‘आस’ तुम्‍हा मंडळींशी नाते अधिक घट्ट व्‍हायला मदतकारक होईल.

दुर्दैवाने आमच्‍या डाव्‍या पक्षांतल्‍या जवळपास कोणासही या ‘पेचा’चा वारा लागत नाही. जणू त्‍यांच्‍या सर्व संवेदना बधीर झालेल्‍या आहेत. त्‍यांच्‍याकडे प्रत्‍येक गोष्‍टीला उत्‍तर आहे. त्‍यांची मुखपत्रे चाळली तरी हे जाणवते. हे अंक त्‍यातील कागदासारखेच शुष्‍क. त्‍यांत ओलावा असा नसतोच. ट्रेड युनियन एके ट्रेड युनियन, तीही अर्थवादी, काही असंघटित क्षेत्रातल्‍या संघटना, महिला आघाड्या... हे केले म्‍हणजे कष्टक-यांचे राजकारण झाले, ही त्‍यांची ठाम समजूत. मार्क्‍सवाद नित्‍यनूतन विरोधविकासी वास्‍तवाचा सर्जक शोध आहे, हे न कळणारे आजचे मार्क्‍सवादी आहेत. (सन्‍माननीय अपवाद आहेत, पण त्‍यांचा प्रवाह नाही. म्‍हणून सरसकट विधान केले आहे.) असो.

खातूभाईंचा लेख मला सगळयात जास्‍त आवडला. वर लिहिलेले ‘मार्क्‍सवाद नित्‍यनूतन विरोधविकासी वास्‍तवाचा सर्जक शोध’ म्‍हणजे काय, ते त्‍या लेखातून कळते. आजच्‍या तरुण पिढीच्‍या मानसाचा माझा अंदाज स्‍पष्‍ट व्‍हायला मला खूप मदत झाली. खातूभाई आमच्‍यापेक्षा खूपच तरुण आहेत, याचीही खात्री झाली. खातूभाईंचे व्‍यक्तिशः आभार.

माध्‍यमांविषयीचे काही लिखाण सामान्‍य कार्यकर्त्‍या वाचकांना पुरेशा तयारीअभावी जड वाटू शकते. अर्थात, सामान्‍य कार्यकर्त्‍यांना माध्‍यमांचे, साहित्‍याचे भान सोप्‍या पद्धतीने कसे द्यायचे, हा प्रश्‍नच आहे म्‍हणा.

आता थांबतो. पुन्‍हा एकदा एक चांगला व संदर्भ अंक दिल्‍याबद्दल अभिनंदन व आभार.

आपला,

सुरेश सावंत