Friday, April 29, 2011

सोनिया गांधींचे अण्‍णा हजारेंना पत्र

सोनिया गांधी

अध्‍यक्ष

राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती

19 एप्रिल 2011

प्रिय अण्‍णा हजारेजी,

आपल्‍या 18 एप्रिल 2011 च्‍या पत्राबद्दल धन्‍यवाद.

आपल्याला यापूर्वीच्‍या पत्रात मी जे लिहिले होते, तीच बाब मी पुनश्‍च इथे नमूद करु इच्छिते की, लाचखोरी व भ्रष्‍टाचार यांच्‍या विरोधातील लढा ही तातडीची गरज आहे, असे मी मानते. सार्वजनिक जीवनातील सचोटीसाठीच्‍या संघर्षाला असलेल्‍या माझ्या बांधिलकीविषयी आपल्‍या मनात अजिबात शंका नसावी. संसदीय लोकशाहीच्‍या परंपरा व व्‍यवहार यांच्‍याशी सुसंगत असणा-या लोकपाल या संस्‍थेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

लोकपाल विधेयक हे राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीसमोरील कार्यक्रमपत्रिकेचा ए‍क खास भाग होता. आपल्‍याला ठाऊकच आहे की, राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या श्रीमती अरुणा रॉय यांच्‍या नेतृत्‍वाखालील पारदर्शकता, उत्‍तरदायित्‍व व राज्‍यकारभार यासंबंधीच्‍या कार्यगटाने 4 एप्रिल रोजी या विषयावर एक बैठक बोलावली होती. या बैठकीत आता संयुक्‍त समितीत असलेल्‍या श्री. शांती भूषण, श्री. संतोष हेगडे व श्री. प्रशांत भूषण तसेच स्‍वामी अग्निवेश, श्री. अरविंद केजरीवाल यांसह नागरी समाजाच्‍या अनेक प्रतिनिधींचा समावेश होता. ज्‍यांच्‍या नावांचा उल्‍लेख केला आहे, ती मंडळी आपल्‍याशी जवळून संबंधित आहेत. कार्यगटाने यापुढेही अशा विचारविनिमय बैठका घ्‍यायचे ठरवले आहे. राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या 28 एप्रिल रोजी व्‍हावयाच्‍या बैठकीतील चर्चा व मंजुरीसाठीची व्‍यापक तत्‍वे या बैठकांतून निश्चित करावयाची आहेत.

वस्‍तुतः आपल्‍या 8 एप्रिलच्‍या पत्रात, जे माझ्या कार्यालयाला दुपारच्‍या सुमारास मिळाले, स्‍वतः तुम्‍ही म्‍हटले आहेः

‘मी आपल्‍या निदर्शनास आणू इच्छितो की, समाजातील माहीतगार मंडळींसोबत घेण्‍यात आलेल्‍या आपल्‍या राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या उपसमितीच्‍या बैठकीत प्रदीर्घ चर्चांनंतर दोन प्रश्‍न वगळता लोकपाल विधेयकासंबंधीच्‍या व्‍यापक आशयाला मान्‍यता देण्‍यात आली.

‘मी आपल्‍याला विनंती करतो की, कृपया राष्‍ट्रीय सल्‍लागार समितीच्‍या संपूर्ण बैठकीतील चर्चेचा मसुदा आपण लवकरात लवकर मिळवावा आणि त्‍यातील निर्णयांची सरकारला शिफारस करावी.’

नु‍कतेच मी वर नमूद केल्‍याप्रमाणे, पुढच्‍या घटनांनी (ज्‍यांची तुम्‍हाला कल्‍पना आहे) चालू प्रक्रियेवर आघाडी घेईपर्यंत राष्‍ट्रीय सल्‍लागार समिती याच दिशेने वाटचाल करत होती.

प्रसारमाध्‍यमांद्वारे जी विधाने व्‍यक्‍त होत आहेत, त्‍यासंबंधात बोलायचे झाल्‍यास मी आपल्‍याला खात्री देते की, या बदनामी मोहिमेच्‍या राजकारणाला माझा कोणत्‍याही प्रकारे पाठिंबा नाही तसेच त्‍यास मी उत्‍तेजन देत नाही.

शुभेच्‍छांसहित,

आपली विश्‍वासू,

सही/-