Monday, April 20, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार (सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत, १४ एप्रिल १५)

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार' या विषयावर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर १४ एप्रिल २०१५ या बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंतीनिमित्ताने साडेनऊच्या बातम्यांत सुरेश सावंत यांची झालेली ही मुलाखत. बाबासाहेब केवळ दलितांचे नव्हे; तर मानवमुक्तीच्या प्रवाहातील महामानव, त्यांचे दलित-श्रमिक-स्त्रियांच्या उन्नतीचे प्रयत्न, त्यांचे विचारस्वातंत्र्य व म. गांधी, दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या, आरक्षण इ. मुद्द्यांचा या मुलाखतीत मागोवा घेण्यात आला आहे. (मुलाखतीची मूळ लिंकः https://youtu.be/WmQAt9YfXXs?t=668)

Thursday, April 16, 2015

जात नाहीशी होणार आहे का?

हा प्रश्न कार्यकर्त्यांपासून विचारवंतांपर्यंत कायम चर्चेचा राहिलेला आहे. सध्या दिल्लीतील ‘आप’च्या दणदणीत विजयाने या चर्चेला एक नवी फोडणी बसली आहे. तळपासून वरपर्यंतच्या सर्व जातींनी ‘आप’ला पाठिंबा दिला आहे. तेव्हा, आता लोक ‘बिजली-सडक-पानी’ यालाच महत्व देतात; जातींना नाही. जात गैरलागू ठरत आहे, असेही निष्कर्ष काढले जात आहेत. एक कार्यकर्ता या नात्याने मुख्यतः निरीक्षणे व काही थोरा-मोठ्यांचे संदर्भ या आधारे या चर्चेत मी पडत आहे.

जात हे खास भारतीय समाजाचे (फार तर भारतीय उपखंडाचे) वैशिष्ट्य. जगात इतर ठिकाणी वर्गीय किंवा वांशिक अथवा त्वचेच्या रंगावरुन पडणारे फरक आढळतात. पण आपल्याकडे तसे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारतात त्याप्रमाणे, मद्रासच्या काळ्याकुट्ट ब्राम्हणात व पंजाबच्या श्वेतवर्णी ब्राम्हणात कोणते साम्य आहे? उलट मद्रासचा अस्पृश्य व ब्राम्हण वंशाने जास्त निकट आहेत. महाराष्ट्रातही देशस्थ ब्राम्हण व दलित यांच्यात रंगावरुन काय फरक करणार? विशिष्ट पर्यारणात तो विशिष्ट समूह किती काळ राहतो, त्यावर त्याचा रंग व शारीरिक ठेवण ठरते, असे मानववंशशास्त्र मानते. वंश हा प्रकारच अलिकडच्या संशोधनाने निकाली काढला आहे. आपल्याकडे रंगापेक्षा, त्याच्या वर्गापेक्षा ‘जात’ महत्वाची मानली जाते. जन्मापासून मिळणारी जातीची ओळख त्याच्या मृत्युनंतरही कायम राहते. एखाद्याला धर्म विचारला आणि त्याने उत्तर दिले – ‘हिंदू’; तर तेवढ्याने प्रश्नकर्त्याचे समाधान होत नाही. जात हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. जातीशिवाय नुसती ‘हिंदू’ म्हणून ओळख अपुरी असते. इतर धर्मांचे तसे होत नाही. तथापि, भारतातील अन्य धर्मांनाही या जातींची लागण कमीअधिक प्रमाणात झालेली आढळते.

इतरत्र वर्गीय, वांशिक रचना असताना भारतात मात्र जात कशी काय जन्माला आली?

बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, समाज वर्गीय असणे ही जागतिक वस्तुस्थिती असल्याने सुरुवातीचा हिंदू समाजही त्याला अपवाद नव्हता. मात्र नंतर भारतात वर्ग बंदिस्त झाला. तसे जगात इतर ठिकाणी झाले नाही. भारतातही आपल्या वर्गाबाहेर विवाह करण्याची प्रथा प्रारंभी होती. नंतर ही वर्गबाह्य विवाहपद्धती बंद होऊन ती वर्गांतर्गत झाली. भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासात वर्गबाह्य विवाहपद्धतीवर अशारीतीने वर्गांतर्गत विवाहांचा वरचष्मा होण्यातून जातिसंस्थेचा उदय झाला. अशारीतीने ज्याने प्रथम आपला वर्ग बंदिस्त केला तो वर्ग म्हणजे पुरोहितवर्ग, असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. अनुकरणाच्या प्रक्रियेने पुरोहितवर्गानंतर इतर वर्गांनीही आपली दारे बंद करुन स्वतःला बंदिस्त केले. आणि अशारीतीने जाती तयार झाल्या. जातिव्यवस्था ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे, असे बाबासाहेब म्हणतात.

बाबासाहेबांची ही उपपत्ती नमुन्यादाखल दिली. जातीच्या उद्गमाविषयी अशा अनेक उपपत्त्या अनेक मोठ्या अभ्यासकांनी मांडलेल्या आहेत. त्यांच्यात मतभिन्नताही खूप आहे. त्यांचा अभ्यास उपयुक्त आहेच. पण माझी तशी तयारी नाही. आणि आताचा तो मुख्य विषयही नाही.

जात निर्माण झाली व ती आज आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपला आताचा प्रश्न- ही जात नाहीशी होणार आहे का?

काहींचे म्हणणे असते, जात नाही ती जात. तुम्ही कितीही लढलात, झगडलात तरी जात काही जाणार नाही. तर काहींना वाटते, आज तसा जातिभेद राहिलेलाच नाही. निदान आम्ही तरी मानत नाही.

असते एकेकाचे मत. तुमचेही असू शकते. माझेही आहे. पण मी ते सरळ मांडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी जातीचे स्वभावधर्म/लक्षणे सांगितली आहेत. त्यांच्या आधारे मी माझी निरीक्षणे नोंदवणार आहे.

पुनरुक्ती टाळण्यासाठी या दोहोंनी सांगितलेली सामायिक लक्षणे स्वतंत्रपणे न नोंदवता ती एकत्र करत आहे. ती अशीः १) एका जातीला दुसरीबद्दल आपुलकी नाही. २) स्वतःचा वेगळेपणा कायम राखण्यासाठी झटत असते. ३) आपल्याच जातीत रोटीव्यवहार. ४) आपल्याच जातीत बेटीव्यहार. ५) जातिवर्धक असा पेहराव. ६) आनुवंशिकता. ७) जन्मसिद्ध व्यवसाय. ८) उच्चनीचता, अस्पृश्यता. ९) जातपंचायत.

ही लक्षणे आजही दिसतात का, त्यांच्यात काही फरक पडला आहे का, याचा विचार करु.

एका जातीला दुसरीबद्दल आपुलकी नाही, हे आजही दिसते. तीव्रतेत फरक असतो. सवर्ण जातींमध्ये असलेला दुरावा आणि सगळ्या सवर्ण जातींना दलित जातींविषयी असलेला दुरावा यांत दलित जातींविषयीची तीव्रता अधिक असते. स्वतःचा वेगळेपणा कायम राखण्यासाठी झटणे, हे लक्षण आजही आहे. जातींची संमेलने, लग्ने यांतून हे व्यक्त होत असते. आनुवंशिकतेने तर जात सिद्ध होत असते. बापाची जात मुलाला हे जातीच्या जन्मापासून आजतागायत चालू आहे. आनुवंशिकता या लक्षणाला अजिबातच धक्का पोहोचलेला नाही.

जातिवर्धक किंवा जात दर्शविणारा पोशाख हे लक्षण आज जवळपास गैरलागू झाले आहे. ऐपत झाली तरीही ब्राम्हणासारखा पोशाख दलित करु शकत नसे. धर्मानेच बंदी होती. बाबासाहेबच सुटाबुटात राहू लागले. त्यांच्यानंतरच्या शिक्षित दलित पिढीने जाणीवपूर्वक तो वेश स्वीकारला. आता अशी जाणीव ठेवण्याची गरजच नाही, इतके वातावरण बदलले आहे. पोशाखाची एकसारखी धाटणी रुळली आहे. प्रादेशिकतेचे फरकही पोशाखाने ओलांडले आहेत. काही पुरोहिताचा व्यवसाय करणारे ब्राम्हण सोडले तर, शेंडीवाला ब्राम्हण सहसा दिसत नाही. वरुन पोशाखात सारखेपणा असला तरी द्विज जातींमधील काही जण अजूनही आतून जानवे घालतात.

जन्मसिद्ध व्यवसायांत खूप बदल झाले. आणि गतीने होत आहेत. औद्योगिकीकरणाने जातिनिहाय व्यवसायांचा पायाच मोडून काढला. नेहमी दिले जाणारे उदाहरण म्हणजे, बाटाच्या कारखान्यात चपला बनविणारे हे काही सगळे चांभार नसतात. कोल्हापूरची अभ्यंकरांची (चित्पावन ब्राम्हण) चप्पल खूप प्रसिद्ध आहे. बाबासाहेबांनी जातियतेची दलदल असलेली खेडी सोडायचा आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात महार मंडळी शहरांकडे आली आणि ब्रिटिशकालीन औद्योगिकरणाच्या संधींचा त्यांनी वापर केला व गिरणी, रेल्वे इ. उद्योगांत कामाला लागले. अनेक जातींचे लोक आज आपला पारंपरिक व्यवसाय करताना दिसत असले तरी, त्यांना ते काम करण्याची सक्ती आज धर्म करत नाही. अर्थात सफाई कामांत आजही दलितच प्रामुख्याने आहेत, संडास सफाईचे काम तर भंग्यांच्याच वाट्याचे अशी स्थिती आज दिसते. याचे कारण या अप्रतिष्ठित, घाणीच्या धंद्यांत इतर जातींचे लोक येत नाहीत. आणि जे दलित किंवा भंगी येतात, त्यांना इतर रोजगार सहजासहजी मिळत नसतो आणि हे काम त्या मानाने सहज उपलब्ध होते. शिवाय ते त्यांचे पारंपरिक काम असल्याने त्यांना ते अपरिचित नसते. हे काम केल्याने जात बुडविली, असे कोणी हिणवणारही नसते. पण आधी म्हटल्याप्रमाणे त्यांना ते करण्याची सक्ती नसते. अशा कामांतले दलित कामगार आपल्या मुलांनी या कामांत येऊ नये, असाच प्रयत्न करतात. काही बनिया जाती नव्या भांडवली व्यवसायांत आपले पारंपरिक कौशल्य वाढवून अधिक प्रगत होताना दिसतात. या व्यवसायांत जम बसविण्यास त्यांच्या जातबंधूंचे सहाय्य त्यांना होत असते. जातींचे बंध त्यांना इथे उपयुक्त ठरतात. पण या धंद्यांत इतर जातींचेही लोक मुसंडी मारताना दिसू लागले आहेत. थोडक्यात, जाती म्हणजे श्रमिकांची विभागणी, हे एकेकाळचे ठळक वास्तव आता वेगाने धूसर होत आहे.

रोटीव्यवहार आपल्याच जातीत असे शहरात राहिलेले नाही. खेड्यांतही बदल होतो आहे. दलितांसाठी वेगळे कप ठेवण्याचा मागासपणा अजून काही गावाकडच्या हॉटेलांत चालतो. त्यांना वेगळे वाढले जाते. आपल्या पंक्तीला बसवले जात नाही. हा भेदभावही अनेक खेड्यांत आढळतो. दलितांसाठी वेगळे पाणवठे ठेवण्याकडेच कल असतो. दृश्य स्वरुपातली अस्पृश्यता गतीने कमी होत आहे. मात्र उच्चनीच भाव अजूनही लक्षणीय आहे. जातपंचायत हे जातीचे व्यवच्छेदक लक्षण आजही दिसते. स्वरुप व कार्य थोडे बदलले आहे. काही भटक्या, दलित जाती सोडल्या तर आता न्याय जातपंचायतीत होत नाही. कायदा, न्यायालयांचा वापर होतो. पण लग्नकार्याला, जातींच्या संमेलनांना, जातीतील मुलांच्या विकासाला मदत करणारी अशी जातमंडळे आता आहेत. काहींनी आपले हॉल, मंगल कार्यालयेही बांधलेली आढळतात.

मुद्दाम शेवटी चर्चेसाठी ठेवले ते लक्षण म्हणजे जातीअंतर्गत बेटीव्यवहार. प्रत्येक जातीचा, कुटुंबाचा आटोकाट प्रयत्न असतो, तो आपल्या मुला-मुलींनी जातीतच लग्ने करावीत असा. त्याच जातीच्या माता-पित्यांपासून मूल जन्मण्यातून ती जात चालू राहणार असते. वर्गांतर्गत विवाह ही जातीच्या अस्तित्वासाठी कळीची बाब असते. वंश वा रक्तशुद्धीसाठी हे आवश्यक आहे, असेही काही कर्मठांचे म्हणणे असते. पण जातींच्या प्रारंभापासून आजतागायत पूर्णपणे यशस्वी न झालेली ही बाब आहे. मिश्रणे कायम होत राहिली. अधिकृत विवाहाने अथवा अनधिकृतपणे. म्हणूनच तर जाती रुपावरुन समजत नाहीत. आंतरजातीय विवाह जुन्या काळीही होत होते. आता तर त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पळून जाऊन लग्न करणारे बहुधा भिन्न जातींचे-धर्मांचेच असतात. आज काही जण ठरवून करावयाच्या विवाहांमध्येही वेगळ्या जाती सहन करतात. पण खालच्या नको असे जाणीवपूर्वक म्हणतात. वर्तमानपत्रातल्या जाहिरातींत ‘जातीची अट नाही (SC/ST क्षमस्व)’ असे कटाक्षाने नोंदवलेले आढळते.

वरील निरीक्षणांतून असे दिसते की, काही लक्षणे आज अजिबात दिसत नाहीत, किंवा नष्ट होऊ लागली आहेत. काही लक्षणांचे मर्म आजही ताजे आहे. पण एकूणात जातींच्या भिंतींना जोरात धडका बसू लागल्या आहेत. काही ठिकाणी भगदाडेही पडू लागली आहेत. म्हणजेच दिशा जात जाण्याची आहे. पण...

हा ‘पण’ अवघड घाट आहे. राजकारणी आणि जातीजातींत तयार होणारा मध्यमवर्ग हा या जातिअंताच्या झारीतला शुक्राचार्य आहे. राहू, केतू जे काही म्हणायचे ते म्हणा. जातिअंताची दिशा आपल्या स्वार्थासाठी अडवून ठेवण्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम हे घटक करत आहेत.

भारतातील लोकशाही इतर नवमुक्त राष्ट्रांमधली एकमेव टिकलेली लोकशाही आहे. ही बाब अभिमानास्पदच आहे. पण लोकशाही जीवनप्रणाली पूर्णांशाने आपल्यात मुरणे अजून खूप दूर आहे. जातीची एकगठ्ठा मते हा या लोकशाही प्रक्रियेला अडसर ठरतो. आज उमेदवार ठरवताना त्याची जात, त्याच्या मतदारसंघातील जातींचे बलाबल हे हिशेब प्रधान असतात. मग पुरोगामी नेत्यांकडूनही दुर्बल जातींच्या बेरजांची भाषा सुरु होते.

आता मागास जातींतही एक मध्यमवर्ग तयार होऊ लागला आहे. हा शिक्षित, थोडाफार साधनसंपन्न मध्यमवर्ग त्या त्या जातीचा प्रवक्ता असतो. तो त्या जातीचे नेतृत्व करत असतो. ते आवश्यकच असते. पण त्याच्या स्तराच्या आर्थिक, भौतिक आकांक्षा त्याच्यात संधिसाधूपणा निर्माण करतात व त्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी तो आपल्या समाजविभागाला वापरु लागतो. त्या समाजविभागाचा त्राता म्हणून आभास तयार करतो. मात्र त्याचे खरेखुरे प्रश्न शेवटास नेत नाही. त्याच्या स्वार्थासाठी तो ते कायम ताजे ठेवत असतो.

यामुळे मरु घातलेल्या जाती ताज्या राहतात.

हे बदलू शकत नाही का? निश्चित बदलू शकते.

जातींच्या लक्षणांचा आढावा घेताना जातींची दिशा जाण्याची आहे, हे जे म्हटले ते आपोआप घडलेले नाही. विज्ञानतंत्रज्ञानाने उत्पादनव्यवस्थेत झालेले बदल तसेच जाणीवपूर्वक केलेले सामाजिक प्रबोधनाचे, बदलाचे संघर्ष, असंख्य थोरा-मोठ्यांचे, जाणत्यांचे अथक प्रयास त्यामागे आहेत. असेच अथक, जाणते प्रयास आपल्याला करावे लागतील. भौतिक परिस्थिती तर पोषकच आहे.

यादृष्टीने जातिअंताच्या लढवय्यांनी सुचवलेले व अवलंबलेले तसेच काही नवीन उपाय आपल्याला योजावे लागतील. त्यातील काही असेः

बाबासाहेब तसेच अन्य सुधारकांचा ज्यावर भर होता तो आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करतच राहावा लागेल. याचा अर्थ, मने जुळत नसतील तरी उच्च ध्येयासाठी आंतरजातीय विवाह करणे, असे नव्हे. जात हे मर्यादित क्षेत्र असते. मोकळ्या जगात वावरणाऱ्या मुलामुलींना मनाजोगता जोडीदार निवडण्याची संधी व मोठ्यांचा पाठिंबा असेल तर बहुतेक विवाह हे जातिबाहेरच होतील. कारण हे मोकळे जग विविध जाती-धर्म समूहांचे मिश्रण आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी अशी लग्ने कोणत्याही धार्मिक पद्धतीने न करता विशेष विवाह कायद्याखाली नोंदणी पद्धतीने करावी. आपल्या मुलांची शाळेत कोणतीही जात वा धर्म नोंदवू नये. मुलांची नावे त्याचे नाव + आईचे नाव + वडिलांचे नाव अशारीतीने लावावी. त्यामुळे आडनावातून जात कळण्याचा तसेच मूल आईचे व वडिलांचे दोघांचे असताना केवळ वडिलांचे नाव धारण करण्यातली पितृप्रधानता दिसण्याचा प्रश्न निकाली निघतो. असे करणारे लोक पूर्वी दुर्मिळ होते. आता ते वाढताना दिसत आहेत, हे आश्वासक आहे.

जातींच्या ओळखी नाहीशा होऊन शोषक व शोषित असा वर्गीय झगडा उभा राहायचा असेल, तर गावकुसाच्या आतल्या व बाहेरच्या कष्टकऱ्यांचे ‘कष्टकरी’ हे नाते ठळक करावे लागेल. त्यासाठी त्यांच्या सामायिक प्रश्नांचे लढे जोरदार करावे लागतील. आणि त्यांचे त्या लढ्याच्या क्रमात, मात्र जाणीवपूर्वक जातिअंताचे प्रबोधन करावे लागेल. कष्टकरी म्हणून नाते उजळले की जातीचा संस्कार आपोआप जाईल, असे होणार नाही. हजारो वर्षांच्या तिच्या अस्तित्वाची मनावर चढलेली पुटं लगेच जात नसतात. जात हे त्या अर्थाने काळजाचे दुखणे असते. ते काळजीपूर्वक हाताळावे लागते.

याचबरोबर आपल्या जातीअंतर्गत तयार झालेल्या परंतु संकुचित स्वार्थासाठी जातीला वापरणाऱ्या आपल्याच मध्यमवर्गीय जाचबांधवांशी संघर्षही करावा लागेल. राखीव जागा केवळ आर्थिक निकषावर नको, हे बरोबरच आहे. पण ती जागा खुली न करता, त्या वर्गवारीत ओबीसींप्रमाणे दलित-आदिवासींसाठीही अंतर्गत आर्थिक निकष लावण्याची मागणी कधीतरी करावीच लागेल. त्या विशिष्ट वर्गवारीसाठी असलेल्या सवलती त्या वर्गवारीतील अधिक गरिबाला मिळणे, हाच न्याय आहे. राखीव प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या वरच्या थरातील व्यक्ती राखीव जागा अथवा सवलतीचा लाभ घेताना दिसल्यामुळे तिच्याविषयी जो खुल्या वर्गातील निम्न आर्थिक स्तरातील लोकांमध्ये दुखरेपणा तयार होतो, तो निवळायला मदत होईल.

युरोपात सरंजामशाही तिच्या भाराने कोसळली. ती कोसळत असताना तेथील समाजाच्या सर्वांगात बदलाच्या ऊर्मी वाहू लागल्या. राजकीय व सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा एकच प्रवाह तिथे होता. आपल्याकडे मात्र निराळे घडले. आपली सरंजामशाही मोडकळीला येण्याची चिन्हे दिसू लागली होती. परंतु, तिची मूळे अजून सुकलेली नव्हती. अशावेली इंग्रज येथे आले आणि त्यांनी आपल्या भांडवलशाहीचे कलम येथील सरंजामशाहीवर केले. त्यामुळे भांडवली विकास, त्यातून नवे रोजगार, आधुनिक शिक्षण, लोकशाहीसारखा नवविचार यांसोबतच सरंजामशाहीतील जाती, जुनाट बंधने, संस्कार टिकून राहिले. परिणामी ‘आधी सामाजिक की आधी राजकीय’ असा तिढा इथे तयार झाला. साहजिकच सामाजिक व राजकीय चळवळींचे पुरस्कर्ते परस्पर शत्रू वाटावेत असे चित्र तयार झाले. या विशिष्ट अवस्थेमुळे भांडवली विकासातही जातींचे तण जोमदार राहिले. स्वातंत्र्यानंतर हा अंतर्विरोध नष्ट झाला. तथापि, शोषक वर्ग व त्याला आपल्या संकुचित स्वार्थासाठी पाठिंबा देणारा मध्यमवर्ग हे तण आज पोसतो आहे. जातीच्या आवाहनाला अजिबात थारा न देता निखळ लोकशाही निवडणुकांची प्रक्रिया होण्यासाठी सायास करावे लागतील. अथक सामाजिक प्रबोधन व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक एकजुटीचा संघर्ष करत भांडवली लोकशाही विकासाला (समाजवादाच्या वाटेवरील अपरिहार्य टप्पा म्हणून) गती देण्यानेच जातींचे ढासळू लागलेले, तरीही आज भक्कम असलेले बुरुज उध्वस्त होणार आहेत.

...जात खरोखरच नाहीशी होणार आहे.


- सुरेश सावंत

(आंदोलन, एप्रिल २०१५)