‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ या म्हणीची आठवण भाजपची तिरंगा यात्रा बघून येत होती. स्वातंत्र्याच्या सत्तरीनिमित्त त्यांनी हे अभियान चालवले होते. हा काही सरकारी कार्यक्रम नव्हता. म्हणजे नाईलाज म्हणून तिरंग्याचा सन्मान करायची औपचारिकता नव्हती. तो त्यांचा राजकीय कार्यक्रम होता. ठरवून केलेला. संघाच्या सल्ल्याने, सहभागाने, स्वयंसेवकांच्या पुढाकाराने अमलात येणारा.
याच संघाने घटना समितीत तिरंग्याचा निर्णय झाल्यावर आपल्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्राच्या १४ ऑगस्ट १९४७ च्या संपादकीयात संघाने आपला अभिप्राय नोंदवला होताः 'जे लोक नशिबाने सत्तेवर आले आहेत, ते भलेही आपल्या हाती तिरंगा सोपवतील; पण हिंदू त्याचा ना कधी सन्मान करतील ना कधी त्याला स्वीकारतील. ३ हा आकडा मूळातच अशुभ आहे आणि ज्या ध्वजात ३ रंग आहेत, तो खूप वाईट मानसशास्त्रीय परिणाम घडवेल आणि देशाला नुकसानकारक ठरेल.'
हजला जाणाऱ्या मांजरीला समजू उपरती झाली. आपले चुकले याचे भान आले आणि पापक्षालनासाठी ती देवाच्या दरबारी चालली आहे. पण संघाने आपली तिरंग्याविषयीची ही भूमिका बदलल्याचे व ती का बदलली याचे काहीच स्पष्टीकरण आजपर्यंत दिलेले नाही. म्हणजेच तिरंग्याची ही हज यात्रा ही उपरती वा पापक्षालन वगैरे काही नसून तो नव्या उंदरांचा शोध आहे. स्वातंत्र्यासाठी हुतात्मे झालेल्यांबद्दल जी सर्वसामान्य माणसाच्या मनातली देशभक्तीची भावना असते तिला ललकारणे व स्वातंत्र्यसंगराच्या वारश्याचे लोणी बळकावणे ही बोकेगिरी या मागे आहे.
खोटारडे, तोतये, धूर्त, मतलबासाठी रुप बदलत राहणारे, कपटी, पाताळयंत्री असे हे झोटिंग आहेत. महात्मा गांधींचा खून, बाबरी मशिदीचा विध्वंस व त्यानंतरच्या दंगलीतला रक्तपात इथपासून ते आज सांविधानिक मार्गांनी दिल्लीचे तख्त ताब्यात घेऊन संविधान उध्वस्त करण्याचे, भारतीयत्वाची वीण विस्कवटवण्याचे प्रयत्न या सगळ्याला कोंदण देणारी ही प्रतिगामी विचारसरणी आहे.
हे आव्हान मोठे आहे, भयावह आहे.
पहिले पंतप्रधान म्हणून राष्ट्राची धुरा हाती घेतल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरुंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा परिपाठ सुरु केला होता. राष्ट्रउभारणीसाठीचे सल्ले, धोक्यांबाबतचे इशारे त्यांत असत. ७ डिसेंबर १९४७ ला त्यांनी लिहिलेल्या एका पत्रातील संघासंबंधीचा इशारा संक्षेपाने पुढे देत आहे-
‘ही एक खाजगी सेना (Private Army) आहे. नाझी पद्धतीने जाणारी. तीच तंत्रे वापरणारी. नकारात्मक प्रचारावर यांचा भर असतो. त्याला तर्काची गरज नसते. बुद्धीला ताण देण्याची गरज नसते. या प्रवृत्तीला वेळीच रोखले नाही तर ती देशाला भविष्यात गंभीर दुखापत करील. भारत यातूनही तरेल. पण गंभीर जखमा होतील व त्या बऱ्या व्हायला खूप वेळ लागेल.’
या इशाऱ्यानंतर ७ आठवड्यांनी गांधीजींचा खून झाला. आज देशाची सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. देशवासीयांची मने विखंडित करण्याचे होत्र चालू आहे. संविधानातील पायाभूत मूल्यांची आहुती त्यात पडत आहे. देश गंभीर जखमी झाला आहे.
संघाचे आव्हान हे असे आहे.
या आव्हानाचा मुकाबला होतच नाहीये, असे नाही. खूप प्रयत्न चालू आहेत. तथापि, पुरोगामी शक्तींचे हे प्रयत्न बरेचसे विस्कळीत आहेत. आणि या उधळलेल्या वारुला रोखण्यात एक विचार व एक समूह म्हणून ताकदीने उभी राहण्याची धमक दाखवू शकणारी आंबेडकरी चळवळ पूर्ण निस्तेज, गलितगात्र आहे. तिच्या ऐतिहासिक जबाबदारीचे भान हरवलेले आहे.
त्यामुळे तिच्यावर चालून जाणे संघाला सोपे गेले आहे. या चळवळीचे मानबिंदू असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचे अपहरण ते त्यातील नेत्यांना-विद्वानांना सामीष चारा देऊन दावणीला बांधणे यासाठी संघाला फारच अल्प सायास करावे लागत आहेत.
ते सहजच बाबासाहेबांना जे म्हणायचे होते तेच आम्ही म्हणत आहोत. बाबासाहेबांना जे करायचे होते, तेच आम्ही करत आहोत असे बिनदिक्कत सांगत आहेत. काही भूमिकांच्या बाबतींत तर संघाचे प्रचारक म्हणूनच बाबासाहेबांना उभे केले जाते आहे.
उदाहरणादाखल काही मुद्द्यांची चर्चा करु.
बाबासाहेबांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त केंद्र सरकारने संसदेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाबरोबरच अनेकविध कार्यक्रम सरकारी पातळीवर घेतले. घेतले जात आहेत. शाळा-कॉलेजांना सक्तीने करायला लावले. आम्हालाच कसे बाबासाहेबांचे सर्वाधिक लागते आहे, हे त्यातून दर्शवायचे होते. संघाने ‘ऑर्गनाझर’ या आपल्या मुखपत्राचा विशेषांकच काढला. त्यात बाबासाहेबांविषयी गौरवपर लेख आहेत. मात्र संघाच्या भूमिकांना छेद जाणार नाही, उलट पूरक ठरेल अशीच त्यांची मांडणी आहे. १७ एप्रिल २०१६ च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये ‘Which Ambedkar?’ या लेखात रामचंद्र गुहांनी या ‘ऑर्गनायझर’च्याच जुन्या भूमिकांचा दाखला देऊन संघाची दांभिकता उघडी पाडली आहे.
संघाला बाबासाहेब लिहीत असलेली घटना व त्यांचे हिंदू कोड बिलासाठीचे झटणे दोन्ही नामंजूर होते. गुहा घटनेविषयीची संघाची भूमिका नोंदवतात-
‘या संविधानाबाबतची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यात काहीही भारतीय नाही. ...यात प्राचीन भारतीय सांविधानिक नियम, संस्था, संज्ञा, परिभाषा यांचा मागमूसही नाही. ...प्राचीन भारतातील अतुल्य अशा सांविधानिक विकासक्रमांचा यात उल्लेख नाही. स्पार्टाचा लायकर्गस किंवा पर्शियाचा सोलोन यांच्या कितीतरी आधी मनूचे नियम लिहिले गेले आहेत. आजही मनुस्मृतीतले हे नियम जगात प्रशंसिले जातात आणि भारतीय हिंदूंना उत्स्फूर्तपणे त्यांच्या अनुपालनास व अनुसरणास उद्युक्त करतात. पण आपल्या घटना पंडितांच्या दृष्टीने त्यांस काहीही मोल नाही.’ (ऑर्गनायझर, ३० नोव्हेंबर १९४९)
माणुसकीचे हक्क हिरावून घेणारी संहिता म्हणून बाबासाहेबांनी ज्या मनुस्मृतीचे महाड सत्याग्रहावेळी दहन केले, त्या मनुस्मृतीचे फक्त गोडवे नव्हेत, तर तिच्यावर आधारित स्वतंत्र व आधुनिक भारताचे संविधान रचले जावे, ही संघाची भूमिका होती. ती किती प्रतिगामी होती, हे आणखी स्पष्ट करण्याची गरज नाही. वरील अवतरणातील ‘घटना पंडित’ ही उपरोधिक संज्ञा बाबासाहेबांसारख्या घटना बनविण्यात कळीची भूमिका निभावणाऱ्यांना उद्देशून आहे, हे उघड आहे.
हिंदू स्त्रियांच्या अधिकारासाठी हिंदू कोड बिलाचा मुद्दा बाबासाहेबांनी लावून धरला व पुढे ते मंजूर होत नाही म्हणून मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामाही दिला. आमच्या धर्मात ढवळाढवळ करु नका, अशा धमक्या हिंदू धर्मातल्या कट्टरपंथीयांकडून बाबासाहेबांना त्या काळात येत होत्या. मोर्चे निघत होते. संघही या बिलाच्या विरोधात पुढाकाराने होता. खुद्द सरसंघचालक गोळवलकर गुरुजी याबाबत काय म्हणतात त्याचे ऑर्गनायझरमध्ये छापून आलेले अवतरण गुहा पुढीलप्रमाणे देतात-
“या सुधारणांत काहीही भारतीय नाही. विवाह व घटस्फोटाच्या प्रश्नांची सोडवणूक अमेरिका आणि ब्रिटिश नमुन्यांप्रमाणे आपल्या देशात होऊ शकत नाही. हिदू संस्कृतीप्रमाणे विवाह हा संस्कार आहे. तो मृत्युनंतरही बदलता येत नाही. केव्हाही बदलावा असा तो ‘करार’ नाही.” गोळवलकर पुढे म्हणतात, “अर्थात, देशातील काही भागात हिंदू समाजातल्या काही खालच्या जातींत घटस्फोटाला मान्यता आहे व रीतीप्रमाणे त्यांच्यात घटस्फोट होतातही. पण त्यांची ही रीत आदर्श मानून सर्वांनी तिचे अनुकरण करावे असे होऊ शकत नाही.” (ऑर्गनायझर, ६ सप्टेंबर १९४९)
पुढच्या एका संपादकीयात ऑर्गनायझरने या बिलाचा कठोर निषेध केला आहे. आंबेडकर व नेहरु हे या बिलाचे शिल्पकार आहेत म्हणून त्यांचा ‘ऋषी आंबेडकर व महर्षी नेहरु’ असा उपहासही केला आहे. बाबासाहेबांबाबत संघाची ही दुहेरी नीती उघड करताना बाबासाहेबांवरील अशाच आणखी काही टीकांची नोंद गुहांनी या लेखात केली आहे. जिज्ञासूंनी मूळ लेखात ती पहावी. गुहांचा संदर्भ इथे थांबवतो.
जुनी मते काळ, संदर्भ, आकलन बदलले की बदलतात. त्यात वावगं काही नाही. पण या बदलांचे कारण व विकासक्रम कळला तर. नाहीतर ते ढोंग वा चालबाजी असते. संघाबद्दल तोच तर आक्षेप आहे. त्याच्या भूमिका बदलाचे कारण ते देत नाहीत. म्हणजेच ती ढोंगबाजी आहे.
संघाची मंडळी विविध मार्गांनी प्रचारत असतात की बाबासाहेबांचे धर्मांतर ही व्यापक हिंदुत्वाच्या कक्षेच्या आतलीच उडी आहे. ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज या रांगेतलाच एक बौद्ध संप्रदाय. शिवाय हिंदू अवतारकल्पनेप्रमाणे तो विष्णूचा अवतार आहेच. हिंदू विवाह कायद्यात बौद्ध, जैन, शिख या धर्मांचा समावेश होतो. हे तिन्ही धर्म सावरकरांच्या पितृभू संकल्पनेप्रमाणे हिंदू ठरतात. बाबासाहेबांचा हिंदू धर्माच्या आचरणाला विरोध आहे-तत्त्वज्ञानाला नाही...हे सगळं गुंफायचा प्रयत्न संघ प्रचारक करत असतात.
‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ ही बाबासाहेबांची घोषणा, त्यांच्या ‘जातिनिर्मूलन’ या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मग्रंथांवर घातलेले घाव, ‘रिडल्स इन हिंदुइजम’ मध्ये राम-कृष्णावर केलेली टीका, भगवतगीतेवर अनेक ठिकाणी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांच्या २२ प्रतिज्ञांमधील ‘मी राम, कृष्ण..यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही’ ही किंवा ‘मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो..’ किंवा ‘बुद्ध हा विष्णूचा अवतार हा खोटा व खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो’...या प्रतिज्ञा या सगळ्याचे मग काय करायचे?
समतेच्या ऐवजी समरसता बोलत राहणे हा असाच चकवा. समरसता या शब्दात सर्व भेद व विषमतांसह गुण्यागोविंदाने (आपापल्या पायरीप्रमाणे) राहा, हे अभिप्रेत आहे. दुसऱ्याच्या सुख-दुःखात समरस व्हा, सगळे भेद विसरून आपल्यातला बंधू-भगिनीभाव जागवा अशा व्यापक अर्थानेही संघ समरसता शब्द योजत नाही. बाबासाहेबांनी या सर्व उतरंडी, भेदभाव संपवून माणुसकीने ओतप्रोत भरलेली समता प्रस्थापित करण्याचे लक्ष्य समाजाला दिले. समतेचा हा अर्थ विस्मरणात टाकण्यासाठी समरसता हा शब्द आहे. जर संघ बदलतो आहे तर समरसता या शब्दाचा त्याग करुन समता शब्दच त्याने त्याच्या मूळ अर्थासह रूढ केला पाहिजे. बाबासाहेब स्त्री-पुरुष समतेचे पुरस्कर्ते होते. संघात स्त्रियांना आजही प्रवेश नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र संघटन आहे. हे ही संघाने बदलले पाहिजे. स्त्रियांना संघात प्रवेश मिळाला पाहिजे. बाबासाहेबांचे १२५ व्या वर्षाचे गुणगान गाणाऱ्यांनी त्यांच्या उपदेशातल्या या किमान बाबीही का आचरणात आणू नयेत?
बाबासाहेबांची मुसलमानांविषयीची मांडणी व काश्मीरच्या ३७० कलमाबाबतचे म्हणणे संघाला हर्षवायू घडवणारे आहे. दोहोंच्या मांडणीत साधर्म्य आहे. पण हेतूंमध्ये साम्य नाही. बाबासाहेबांचे हे म्हणणे त्यांच्या सबंध जीवनध्येयाच्या संदर्भात पाहिले तर संघ व बाबासाहेबांच्या मूळ उद्दिष्टांतच फरक आहे. शिवाजीला दाढी व औरंगजेबालाही दाढी म्हणून दोघे एक नव्हेत. तसेच हे आहे. बाबासाहेब स्वतःला प्रथम व अंतिमतः भारतीय मानतात. इतर कोणत्याही निष्ठांनी या भारतीयत्वाला छेद जाणे त्यांना मंजूर नाही. तर संघ स्वतःचे राष्ट्रीयत्वच हिंदू मानतो. त्या हिंदुत्वात तो भारतीयत्वाचा समावेश करतो. तिथे भारतीय प्रथम नाही. बाबासाहेब समाजात बंधुतेला अनन्य महत्व देतात. संघ मुस्लिम-ख्रिश्चनांसारख्या अल्पसंख्याकांबद्दल द्वेष पसरवतो. बाबासाहेबांची टीका नवसमाजाच्या बांधणीसाठी आहे, तर संघाची टीका त्याच्या विघटनासाठी आहे.
संघ असे हे भ्रमाचे जाळे तयार करत असला तरी बाबासाहेबांसारखे हाडूक गिळणे सोपे नाही. ते घशात अडकल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या समाजाचे बव्हंशी नेते विकले गेल्याने व तोही आज बेसावध असल्याने संघाचे फावते आहे.
तो सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या दौर्बल्याची थोडी अधिक चिकित्सा करायला हवी.
मला ६ डिसेंबर १९९२ ची दुपार आठवतेय. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना आदरांजली व्हायला नेहमीप्रमाणे दादर परिसरातील वेगवेगळ्या मार्गांवरुन हजारो लोक चैत्यभूमीकडे चालत आहेत. प्लाझाच्या पुढे गोमंतकच्या समोरच्या फुटपाथवर एक टेबल मांडलेला. त्यावर दोन फोटो. शेजारी शेजारी. पहिला रामाचा. प्रत्यंचा ताणून युद्धास उभा ठाकलेला. दुसरा बाबासाहेबांचा. बोट उंचावलेला. या फोटोंना हार घालत होते प्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके. हार घालून झाल्यावर त्यांनी दोन घोषणा दिल्या. पहिली ‘सियावर रामचंद्र की...’ व दुसरी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...’
मी थबकून हे सारे पाहत होतो. सुधीर फडके संघाचे होते. संघाने अशी श्रद्धा व्यक्त करणे हा त्यांचा अधिकार होता. मुद्दा तो नव्हता. मुद्दा होता चैत्यभूमीकडे जाणाऱ्या कोणाच आंबेडकर अनुयायांना ते दृश्य चकित करत नव्हते हा. राम व बाबासाहेब शेजारी असण्यात काही वावगे वाटताना त्यांना दिसत नव्हते. यातल्या अनेकांच्या घरी, जरी त्यांनी अधिकृतपणे हिंदू देवतांचा त्याग केला असला तरी प्रत्यक्षात हिंदू देवांच्या तसबिरी बाबासाहेबांच्या तसबिरीसोबत सहकार्याने बसलेल्या असतात. हे एक कारण चकित न होण्याचे. ते समजू शकतो. पण दुसरे कारण राजकीयदृष्ट्या कप्पेबंद झालेले असणे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या त्या धगधगत्या काळात आंबेडकरी समुदाय अलिप्त होता. हे गंभीर होते.
एका अस्वस्थतेत मी पुढे गेलो. आणि काही तासांनी बातमी आली- बाबरी मशीद उध्वस्त करण्यात आली. म्हणजे फडके जेव्हा ‘सियावर रामचंद्र की जय’ म्हणत होते, त्याचवेळी कारसेवक रामलल्लाची दुंदुभी देत बाबरी मशिदीवर पहारी-फावडी चालवत होते. ...नंतर दंगली सुरु झाल्या. रक्तपात. आयाबायांचा आक्रोश...हे सगळं. या दंगली शमवण्यात, त्यातील मदतकार्यात जे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले त्यात मीही एक होतो. मृत, जखमी व बेसहारा बळींचे ते चेहरे, त्या वेदना आठवल्या की आजही अस्वस्थ व्हायला होते. ...आणि असहाय्यही वाटते.
या वेदनेत, असहाय्यतेत भर घालणारी एक गोष्ट होती ती म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयायांचे हिंदूंबरोबर मुस्लिमांच्या विरोधात उभे राहणे, हल्ल्यांत सामील होणे. जी मुस्लिमविरोधी भाषा शिवसेना वापरत होती, तीच भाषा हे आमचे लोक वापरताना दिसत होते. मी जिथे राहत होते त्या चेंबूरमध्ये मी हे प्रत्यक्ष अनुभवले. सर्वसामान्य आंबेडकरी अनुयायांमध्ये मुस्लिमद्वेष हिंदूंप्रमाणेच आजही व तसाच आहे.
विभूतिपूजेला तीव्रतर विरोध असणाऱ्या बाबासाहेबांचीच आज विभूती झाली आहे. त्यांच्या जयंत्या-मयंत्या-मिरवणुका जोशात होतात. पण ते देव म्हणून. त्यांच्या विचारांच्या जोपासनेचे प्रयत्न नगण्य आहेत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच ही घसरगुंडी सुरु झाली. सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा कोणत्याच क्षेत्रात समाजाला प्रबोधित करायचे काम हे प्राधान्याचे मानले गेले नाही. त्याला गृहीत धरण्यात आले. (याला अपवाद आहेत. पण ते नियम सिद्ध करण्याइतकेच.) पँथरच्या ललकाऱ्यांनी व्यवस्थेला हादरवले, पण फारसे मोडले नाही. जिथे कुठे पडझड झाली तिथे नवी रचना झाली नाही. समाजाच्या स्वयंभू गतीवर सगळे सोडले गेले. जाणीवपूर्वक हस्तक्षेप हा भाग राहिला नाही. वर अपवादात्मक प्रयत्न म्हणालो ती मंडळी आपापल्या क्षेत्रात खटपटी-झटपटी करत राहिली. पण त्याला सार्वत्रिक कार्यक्रमाचे स्वरुप आले नाही. या स्वतंत्र बाण्याच्या मंडळींचेही पुढे कंपू झाले व नंतर केवळ एकटे खांब उरले.
दादासाहेब गायकवाडांचा भूमीहक्काचा लढा हा दमदार अपवाद वगळता बौद्धेतर दलितांना-सवर्ण कष्टकऱ्यांना एकवटण्याचे प्रयत्न सोडा ते आपले वाटेकरी होणार नाहीत, याची दक्षता अधिक घेतली गेली. मांग, चांभार, ढोर हे बौद्ध झाले नाहीत म्हणून त्यांना हिणवणे. आमच्या बापाने राखीव जागा मिळवल्या त्याचा तुम्ही लाभ घेत आहात, असे म्हणून त्यांचा पाणउतारा करणे याचा परिणाम ते दूर जाण्यात झाले. यात त्या समाजविभागांचा बाबासाहेबांच्या हयातीतच असलेला स्वभाव, त्यांच्या नेत्यांची वागणूक या बाबीही कारण आहेत. पण थोरल्या भावाची जबाबदारी बौद्ध समाजाने नीट पार पाडली नाही हे निश्चित. परिणामी, मांग समाज औपचारिकरित्या जयभीम म्हणतो. पण अंतर्गत ‘जय लहूजी’वर त्याचा जोर असतो. त्याने आता बौद्धच राखीव जागा हडप करतात, म्हणून आम्हाला आमच्या जातीसाठी स्वतंत्र वाटा द्या अशी मागणी चालवली आहे. चांभार समाज तर औपचारिकरित्याही ’जयभीम’ वाल्यांशी संगत करत नाही. महाराष्ट्रातल्या चांभारांना आपल्याला चुकून दलित वर्गवारीत घातले गेले असे वाटत असते.
बौद्धांविषयीची या अन्य दलित समूहांची मनःस्थिती लक्षात घेऊन भाजप, शिवसेना यांनी त्यांना गटवले. आम्ही जातपात न मानता कसे बरोबरीचे अधिकार देतो हे दाखवण्यासाठी त्यांची सरकारे आली तेव्हा या बौद्धेतर दलितांना आमदार व मंत्रिपदाच्या जागा लक्षणीयरित्या दिल्या. संघ एका बाजूला बौद्ध समाजाला चुचकारतो आहे, बाबासाहेबांना स्वयंसेवक बनवतो आहे, तर दुसरीकडे या बौद्धेतर दलितांशी हिंदू म्हणून सलगी वाढवत आहे. त्यांना बौद्धांपासून दूर राखण्याचा प्रयत्न करतो आहे. २३ जून २०१६ च्या सकाळमध्ये नागपूरातील अशाच एका मातंग समाजाच्या मेळाव्याचा वृत्तांत आहे. त्यात नोंदवलेले सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणातील हे वक्तव्यः “पाणी, देऊळ आणि स्मशान सर्व हिंदूंना समान असावे यासाठी संघ प्रयत्न करीत आहे. संघात जातीचे वर्गीकरण केले जात नाही. हिंदू समाजाचे अंग असलेला मातंग समाज उपेक्षित राहू नये ही संघाची इच्छा आहे. शिक्षणापासून सुरवात करा, अडचणीतून मार्ग काढा, समाज शिक्षित झाला तर प्रगती शक्य आहे. पराभवाला विजयात परिवर्तित करायचे असेल तर समाजाची मनःस्थिती बदलवण्याची तयारी ठेवा. हिंदू समाज तुमच्या सोबत राहील.”
दर्शनी या विधानांत गैर काही नाही. कोणी म्हणेल तुम्हालाच काविळ झाल्याने तुमची नजर पिवळी झाली आहे. हो, ते खरे आहे. माझ्यासारख्याला त्यातले पिवळे भागच दिसू लागतात. जे अनेकदा इतरांना मी दाखवू शकत नाही. सिद्ध करु शकत नाही.
मातंग समाजाने अण्णाभाऊ साठेंना बाबासाहेबांच्या जागी प्रतिष्ठित करायचा प्रयत्न चालवला आहे. अण्णाभाऊंचे स्वतःचे म्हणून एक मोठेपण आहे. ते कम्युनिस्ट कार्यकर्ते. साहित्यिक. आपल्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राचा लढा दुमदुमवून टाकणारे. सगळ्या सर्वहारांना एकवटवू इच्छिणारे. त्यासाठी बाबासाहेबांच्या एकजुटीच्या रथाचे गाणे गाणारे. अधिकृत आंबेडकरी समाज म्हणून जन्माधिष्ठित दावा असणाऱ्या बौद्धांपैकी काहींना अण्णाभाऊंचे हे कम्युनिस्टपण भलतेच सलत असते. म्हणून बाबासाहेबांबरोबर अण्णाभाऊंचा संग त्यांना नकोसा होतो. एकूणच कम्युनिस्ट, गांधीवादी यांच्याबरोबरचे बाबासाहेबांचे ऐतिहासिक छत्तीसआकडी वाद ही बौद्ध मंडळी आजही घालत असतात. या वादांचे तत्कालीन संदर्भ, सामायिक शत्रूविरोधी सहमतीच्या मुद्द्यांवर एकत्र येण्याची वर्तमानातील निकड हे काहीही लक्षात घेतले जात नाही. भागवतांचे नंतर बघू आधी ‘जयभीम-लाल सलाम’ एकत्र गुंफून जयभीमला काळिमा (की लालिमा?) लावणाऱ्या कन्हैया व त्याच्या साथीदार लालभाईंचा (मग ते जयभीमवाले असले तरीही) बंदोबस्त करु, असा पवित्रा या आंबेडकरवाद्यांचा असतो. गांधीजींबद्दल काही बरं यांच्यासमोर बोलणे म्हणजे जमदग्नीचा कोप ओढवून घेणे होय.
एक साधी लढ्याची रणनीतीही ते लक्षात घेत नाहीत. आज संविधान धोक्यात आहे. संविधान मानून ते संवर्धित व्हावे म्हणून लढणाऱ्या शक्तींनी संविधान परिवार म्हणून एकत्र यायला हवे आणि संविधान उध्वस्त करणाऱ्या संघपरिवाराला नेस्तनाबूत करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. तोवर आपसातल्या मतभेदांना ‘टाईम प्लिज’ दिली पाहिजे.
पण हे होत नाही, म्हणून संघ निवांत आहे.
आंबेडकरी चळवळीच्या या दुर्दशेला एक रुपेरी कडा अलिकडे दिसू लागली आहे. ‘उना’तील दलित उठावाने ती दृगोचर झाली आहे. गाय तुमची माता-तिची अंत्यक्रिया तुम्हीच करा, असे सवर्ण समाजाला ही दलित मंडळी ठणकावून सांगत आहेत. आपला पारंपरिक घाणीचा व्यवसाय त्यागून उपजीविकेसाठी जमिनीसारख्या साधनांची मागणी करत आहेत. राज्य व्यापणाऱ्या तसेच राज्याला व केंद्रालाही हादरवणाऱ्या (मोदींना दलित माझे बांधव आहेत म्हणायला लावणाऱ्या) या आंदोलनात अजून पूर्ण आकाराला आले नसले तरी नव्या नेतृत्वाचे अंकुर उदयास येऊ लागले आहेत.
ही प्रक्रिया देशभर कमीअधिक सुरु आहे. देशात दलितांची संख्या १६.६ टक्के इतकी भरभक्कम आहे. या दलितांत शिक्षण वाढत आहे. जागृती वाढत आहे. या शिकलेल्या मुलांना बाबासाहेब आंबेडकर आपले आयकॉन वाटतात. ते त्यांचे आराध्य होतात. हे दलित वेगवेगळ्या जातीचे आहेत. पण त्या प्रत्येकाला बाबासाहेब अगदी खास आपले वाटतात. यात बाबासाहेबांची थोरवी आहेच. पण बाबासाहेबांची जात ‘महार’ महाराष्ट्राबाहेर नसण्याने या प्रक्रियेला मोठा हातभार लावलेला आहे. महाराष्ट्रात बौद्धांनी (पूर्वाश्रमीच्या महारांनी) जी बाबासाहेबांवर जातीची मालकी स्थापित केली आहे, तशी ती बाहेर कोणी एक दलित जात स्वाभाविकरित्याच करु शकत नाही. महाराष्ट्रात महारांच्या या मालकीमुळे अन्य दलित जाती फटकून राहतात, ती संभावना बाहेर गळून पडते. महाराष्ट्रात आधी वर्णन केल्याप्रमाणे जे चांभार इथे बाबासाहेबांपासून फटकून राहतात, जयभीम म्हणण्याने ज्यांना अधःपतित झाल्यासारखे वाटते, त्या चांभार जातीच्या उत्तर प्रदेश, पंजाबमधील समूहांच्या अस्मितेचा ‘जयभीम’ चा घोष हा प्राण आहे. पंजाबमधील चांभार समाजातली १८ वर्षांची पॉपगायिका ‘माही गिन्नी’ यू ट्यूब, फेसबुकवर आपल्या जातीचे नाव गाण्यात पालुपदासारखे वारंवार घेते तेव्हा जातीयवादी व्यवस्थेच्या थोबाडातच हाणते असे वाटते. तिच्या आल्बमधील ही पंजाबी गाणी ‘जयभीम’ ने, बाबासाहेबांच्या छायाचित्रांनी भरलेली-भारलेली आहेत. महाराष्ट्रातल्या ‘जयभीम’ गाण्यांपासून पूर्ण वेगळा असा पॉपसंगीताचा, पंजाबी नाचांचा बाज असलेल्या आल्बमध्ये माही गिन्नीला नाचताना, गाताना बघणे हा फारच प्रेरक व आश्वासक अनुभव आहे.
यात आणखी एक वैशिष्ट्य आहे. पंजाबात समतावादी संत रविदासांची प्रेरणा मानणारा हा दलित चांभार समुदाय आहे. माही गिन्नी बाबासाहेबांबरोबरच रविदासांना भजताना दिसते. तिच्या एका मुलाखतीवेळी तिच्या घरातला फोटो दिसतो. त्यात बाबासाहेबांच्या मोठ्या उभ्या प्रतिमेसोबत वर दोन कोपऱ्यांत एका बाजूला संत रविदास तर दुसऱ्या कोपऱ्यात तथागत बुद्ध दिसतात. मुद्दा हा, आपल्या सर्व पुरोगामी प्रेरणांना एकत्रित घेऊन पुढे जाताना ही मंडळी दिसतात. देशातल्या दक्षिणोत्तर, पूर्व-पश्चिम सर्व दिशांच्या दलितांत हेच वैशिष्ट्य दिसते. महाराष्ट्रातल्या आंबेडकरी बौद्धांचा एकारलेपणाचा रोग व एकाकीपणाची अवदशा त्यांची नाही, हे पाहून बरे वाटते. महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळ अस्मितेच्या अंगानेच प्रामुख्याने गेली. जाते आहे. महाराष्ट्राबाहेरच्या या चळवळींनी उपजीविकेच्या प्रश्नांशीही तिची सांगड घातली आहे. म्हणूनच तिच्या विकासाच्या व व्यापक होण्याच्या शक्यता वाढतात.
आज या सगळ्या प्रांतांतील दलित चळवळीला एकत्र गुंफणारा आयकॉन बाबासाहेब असला तरी संघटक, नेता म्हणून एक गट, संघटन लागते. त्याची अजूनतरी अनुपस्थिती दिसते. कांशिराम-मायावतीही ते करु शकले नाहीत. महाराष्ट्रातील आंबेडकरी नेतृत्वाला अजूनही मोठा अवकाश, संधी आहे. या देशभरच्या आंबेडकरी चळवळींना महाराष्ट्रातील अशा नेतृत्वाने साद घातली तर जोरात प्रतिसाद मिळू शकेल. पण तो अधिकार महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीला तयार करावा लागेल. त्यासाठी स्वतःला दुरुस्त करावे लागेल.
दलितांची देशातली संख्या २५ कोटींच्या वर आहे. या दलितांतले (महाराष्ट्रातल्या महारांचा व आग्र्यातल्या काही बौद्धांचा अपवाद सोडला तर) बहुसंख्य स्वतःला हिंदू समजतात. त्यांच्या देवता हिंदू, सण हिंदू, तीर्थक्षेत्रे हिंदू आहेत. पण त्यांची आत्मिक प्रेरणा बाबासाहेब आहे. बाबासाहेब हे त्यांचे सर्वोच्च श्रद्धास्थान झाले आहे. संघासारख्या ससाण्यांच्या बेरकी नजरेला ते बरोबर कळते, म्हणून ते बाबासाहेबांच्या चरणी इतके लीन होत आहेत. मोदी ‘दलितांना नको, मला गोळ्या घाला’ म्हणूनच सांगत आहेत.
संघाचा धोका, बाबासाहेबांचे अपहरण रोखण्यासाठी देशभरची दलित चळवळ अन्य पुरोगामी चळवळींसोबत एकत्र येण्याची प्रक्रिया आज ना उद्या गती धरेल. पण ही वेळ लवकर आणण्यासाठीच्या सारथ्याची जागा रिकामी आहे. महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीकडे हे सारथ्य नैसर्गिकरित्या येऊ शकते. आपल्या उणिवांना झटकून माही गिन्नीसारख्या कोवळ्या शलाकांना सामावून घेणारे नवउन्मेषाचे प्रतोद ती हाती घेणार का, हा प्रश्न आहे. ते तिने घ्यावेत अशी आत्यंतिक इच्छा जरुर आहे.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
__________________________________
वसा, दिवाळी २०१६