Saturday, July 8, 2017

हम लडेंगे साथी!

______________________________

भाजपने राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांची उमेदवारी जाहीर केल्यावर लगेच लिहिलेला हा लेख आहे. छापून येईपर्यंतच्या काळातले काही बदललेले संदर्भ त्या त्या ठिकाणी कंसात नोंदवले आहेत.
_____________________________

हीही लढाई आपण हरणार. हरण्याचे दिवस संपायची शक्यता जवळपास दिसत नाही. फॅसिझमची चाल दिवसेंदिवस दमदार होते आहे. याचा अर्थ गलितगात्र व्हायला झाले आहे किंवा हरणारच आहोत तर का लढा असेही काही नाही. लढायचे आहेच. शत्रूला अविरोध जिंकू द्यायचे नाही म्हणून. लढायची सवय मोडू नये म्हणून. पुढच्या पिढीला आम्ही न लढता रणांगण सोडले असे वाटता कामा नये म्हणून. या लढण्यातून मागून येणाऱ्या फळीला काही बोध मिळावेत म्हणून. जिंकणे व हरणे या शेवटच्या वस्तुस्थिती नसतात, हेही मला ठाऊक आहे. आजचे शत्रूचे जिंकणे ही कायमची अवस्था नसेल. पायउतार होण्याची शक्यता त्याच्याबाबतीतही असणार आहे. न जाणो या लढाईला असे काही वळण मिळेल की शत्रूला माघार घ्यावी लागेल. अन् जय आमच्या पदरी पडेल. ...जर-तरचं सोडून देऊ. आमच्या फौजेची आजची अवस्था अशा कोणत्याही विजयाकडे निर्देश करत नाही. तिची झाडाझडती, डागडुजी, नव्याने बांधणी निकडीची झाली आहे.

राष्ट्रपती या सर्वोच्च पदासाठी रामनाथ कोविंद यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली. ती जाहीर करताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद देताना 'ते दलित आहेत' हे न चुकता अमित शहांनी अधोरेखित केले. संघीय विचारांचे, भाजपच्या दलित मोर्च्याचे अध्यक्ष, प्रवक्ते व सध्या बिहारचे राज्यपाल असा त्यांचा प्रवास असला तरी ही उमेदवारी जाहीर करेपर्यंत त्यांचे नाव फार कमी जणांना ठाऊक होते. ज्यांना उमेदवारी दिली जाईल असा कयास होता, अशा भाजपमधल्या भल्याथोरल्या मंडळींना बाजूला सारुन त्याअर्थाने नगण्य माणसाला ही उमेदवारी दिली गेली. भाजपचे (म्हणजेच संघपरिवाराचे) हे सामर्थ्य आहे. त्यांच्या लांब पल्ल्याच्या लढ्यातली ती चाल आहे. त्यासाठी आपल्या वैयक्तिक सत्ताप्रतिष्ठेच्या, मानमरातबाच्या आकांक्षा बाजूला सारण्याची कुवत भाजपच्या नेत्यांत आहे.

या उमेदवारीने विरोधकांची दाणादाण उडाली. कोविंदांना विरोध करेल तो दलितविरोधी मानले जाईल, असे रामविलास पासवान म्हणाले. त्यांचा इशारा, धमकी खरी निघाली. आधल्या दिवशी विरोध करणाऱ्या मायावतींनी दुसऱ्या दिवशी पाठिंबा दिला. नितीश कुमारांनी स्वागत केले. यांच्या स्वागतामुळे आपल्या मतांची गरज भाजपला उरणार नाही, हे लक्षात येताच उद्धव ठाकरेंचा रात्रीचा विरोधाचा आवेश सकाळी मलूल होऊन पाठिंब्यात रुपांतरित झाला. उद्धव ठाकरेंचे सोडू. ते त्यांच्या सोबत होतेच. नसलेल्यांपैकी तसेच पुरोगामी छावणीत ऊठबस करणारे स्वागताला पुढे येऊ लागले आहेत. अजून येतील. ‘दलित’ पत्त्याचा जोरच तसा आहे. जे विरोधात निवडणूक लढवतील, त्यांचाही दलित उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. (लेख लिहिल्यानंतरची घडामोडः आता विरोधकांकडून मीरा कुमार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या दलित समूहातील आहेत.)

किती महत्वाचा आहे ना हा ‘दलित’! सरकारी आकडेवारीनुसार सरासरी दिवसाला दोन दलितांची हत्या, ११ दलितांचा अमानुष छळ, चार दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. रोहित वेमुलाची आत्महत्या, उनातील गोरक्षकांची दलितांना बेमुर्वत जीवघेणी मारहाण, सहारनपूरला झालेला दलितांवरचा हिंसाचार, बुलढाण्यातील दलित स्त्रीची नग्न धिंड, कर्नाल येथे मोर्च्यात सहभागी दलितांवर भरलेले देशद्रोहाचे खटले ही दलित किती महत्वाचे आहेत याची अलिकडची अगदी ताजी उदाहरणे. दलितांवरचे अत्याचार ही नवी घटना नाही. आधीच्या राजवटींतही ते चालूच होते. मग नवे काय?

सहारनपूरच्या हल्लेखोरांची ‘अभी सरकार हमारी है और प्रशासन भी हमारा है’ ही वक्तवे हे नवीन आहे. अत्याचारी, प्रतिगामी मानसिकतेला भाजपच्या संघी सरकारमुळे बळ व संरक्षण मिळते आहे, हे नवीन आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम-ख्रिश्चन, सेक्युलर, समाजात सद्भावना प्रचारणारे यांचा नायनाट करणे अथवा त्यांना मिंधे, गुलाम बनविणे हे संघ परिवाराचे परमध्येय आहे. त्याच्या पूर्तीसाठी आपणच एकेकाळी झिडकारलेल्या संविधानाचा गौरव करुन, त्याची शपथ घेऊन सत्तासोपान चढायचा व त्या सत्तेच्या आधारे आपले काम तमाम करायचे ही त्यांची रणनीती आहे. या रणनीतीचा काही मतभेद असले तरी संघपरिवारातील संघटना, व्यक्ती मान ठेवतात. तिच्या यशस्वीतेसाठी खटपट करतात. पूरक राहतात. वैयक्तिक लाभ, पद, प्रतिमा यांची पत्रास त्यांना नसते. पायाचे दगड व्हायची त्यांची तयारी असते. अनुकूल मशागतीसाठी खत म्हणून विसर्जित होण्यात त्यांना बहुमान वाटतो.

आणि याचीच पुरोगामी-लोकशाहीवादी छावणीत वानवा आहे. ती छावणी म्हणायची का असाही प्रश्न आहे. सुट्या सुट्या लोकांचा तो सोयीचा कोठूनही, कधीही बाहेर निघता येईल असा तंबू आहे. राजकारणाच्या वरच्या आघाडीपासून तळात जनसंघटनेचे वा व्यक्तिगत पातळीवर विचारप्रसाराचे काम करणारे बहुसंख्य पुरोगामी (अल्प अपवाद वगळता) यात मोडतात.

संविधानाला उध्वस्त करु पाहणाऱ्या ‘संघपरिवारा’विरोधात संविधानाचे संरक्षण व संवर्धन हे ज्यांचे ध्येय आहे अशा सर्व पुरोगामी शक्तींचा व्यापक एकजुटीचा ‘संविधान परिवार’ सर्व शक्तिनिशी उभा राहणे ही आज काळाची गरज आहे. अनेकविध मतभेद असले तरी संविधान धोक्यात आहे, ते नाही वाचवले तर आपण सगळेच गोत्यात येऊ यावर नक्की सहमती आहे. तेवढीच घेऊन पुढे जायला हवे. सगळ्या मतभेदांचे निरसन होऊन आपणे सर्व बाबतीत एकमत होईल ही अपेक्षा मूळातच गैर आहे. आजची लढाई तर थेट फॅसिझमशी आहे. अशावेळी ज्यांच्याशी आपण भौतिक प्रश्नांवर लढत आलो त्या विरोधी वर्गातले जर फॅसिझमच्या विरोधात असतील तर त्यांच्याशीही प्रासंगिक दोस्ती करावीच लागेल. मात्र याबाबत एक महत्वाचे पथ्य पाळणे गरजेचे आहे. ज्या मुद्द्यांवर आपण एकत्र आलो, त्याच मुद्द्यांवर या आघाडीतील चर्चा सीमित ठेवायची. याचा अर्थ आपले मुद्दे आपण सोडले असा होत नाही. पण आपले तत्त्व, आपला कार्यक्रम, आपले चारित्र्य किती लखलखीत आहे याची उजळणी या मंचावर अस्थानी व दुसऱ्याला उकसवणारी होऊ शकते. शिवाय वैयक्तिक, स्थानिक हिशेब गैरसोयीचे ठरले की चलाखीने तात्त्विक मतभेद उकरुन काढले जातात. असे मंच, आघाड्या मोडण्याची ही महत्वाची कारणे आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी भाजपविरोधात सर्व सेक्युलर पक्षांचा एकच एक उमेदवार देण्यासंबंधीच्या सोनिया गांधींच्या घरी झालेल्या बैठकीला मायावती, ममता, लालू, शरद पवार असे अनेक लोक होते. नितीश कुमार येऊ शकले नव्हते. एका दुसऱ्या कार्यक्रमात ते आणि मोदी एकत्र होते. वास्तविक याच नितीश कुमारांनी भाजपशी सत्तेतली संगत सोडल्यावर सेक्युलॅरिझमसाठी देशात एकच एक भाजपविरोधी आघाडी उघडण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्याचे आपण नेते व उद्याचे पंतप्रधानपदाचे दावेदार अशी त्यांची रणनीती होती. पण लालूंचे भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या गर्तेत रुतत जाणे वा त्यांच्या संगतीचा उपयोगापेक्षा त्रासच होईल, असा अंदाज आल्याने नितीश कुमारांनी आपल्या लोहियावादाच्या सामायिक नात्याला तिलांजली द्यायचे ठरवलेले दिसते. (तशी त्यांनी ती आधीही दिलीच होती.) राष्ट्रपतीपदासाठीच्या कोविंद यांच्या उमेदवारीचे त्यांनी केलेले स्वागत त्यांचे भाजपच्या दिशेने सरकणे सूचित करते. बिहारमधील महादलित समूहाच्या मतांचा विचार त्यामागे आहेच. पण ही अपरिहार्यता तेवढीच नसावी. त्यांनी आपले पुरोगामीत्व गुंडाळण्यामागे आणखीही काही समीकरणे असावीत.

मायावतींना आपली भूमिका बदलताना उ. प्रदेशातली दलित मते ही अपरिहार्यता असणारच. सहारनपूरच्या हिंसेत ठाकूरांशी टक्कर घेणारी दलित तरुणांची भीम आर्मी ही संघटना. ती महाराष्ट्रातल्या दलित पँथरची आठवण करुन देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांखालोखाल कांशिराम यांना प्रेरणास्थान मानणाऱ्या या भीम आर्मीला मायावतींनी भाजपचे हस्तक ठरवून टाकले आहे. स्वतःला नवा स्पर्धक नको यासाठी तसेच/किंवा भाजपला सहाय्य करुन स्वतःचे संकुचित हितसंबंध जपण्यासाठीचाही हा डाव असावा. कट्टर आंबेडकरी बाण्याच्या मायावती भाजपशी सत्तेत भागीदार झाल्या होत्याच. महाराष्ट्रात भाजप-काँग्रेसविरोधात डाव्या-समाजवादी-पुरोगाम्यांच्या ‘रिडालोस’ प्रयोगाचे नेते रामदास आठवले सरळ उठून भाजपचे मांडलिक झाले. नव्या तरुणांना आंबेडकरवाद, लोहियावाद शिकवताना या शीर्षासनांबद्दल कसे समजवायचे?

(लेख लिहिल्यानंतरची घडामोडः मिराकुमारांची उमेदवारी जाहीर झाल्यावर मायावतींनी कोविंद हे संकुचित विचारसरणीचे प्रतिनिधीत्व करतात, मिराकुमार कोविंदापेक्षा अधिक सक्षम दलित उमेदवार आहेत म्हणून कोविंद यांना पाठिंबा देण्याचा विचार बदलून मिराकुमार यांना देत आहोत, असे निवेदन केले आहे. विरोधकांनी दलित उमेदवार दिला नाही तर कोविंद यांना आम्ही सहाय्य करु. कारण ते दलित आहेत, अशी आमची भूमिका होती, असेही त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे. दलित व संकुचित विचारसरणी यांत ‘दलितपण’ हे परिमाण मायावतींच्या लेखी महत्वाचे आहे, हे विशेष.)

मुंबईत सहारनपूर, बुलढाणा येथील दलित अत्याचारांच्या प्रकरणाविरोधात व एकूण फॅसिझमविरोधात अनेक संघटना एकत्र येऊन निदर्शनादी कार्यक्रम करत आहेत. सहारनपूरच्या हिंसापीडितांना मुंबईत बोलावून त्यांची वेदना त्यांच्याच तोंडून ऐकण्याची सभाही झाली. राज्यपालांना निवेदन दिले गेले. मुख्यमंत्र्यांना देण्याची तयारी चालू आहे. हे तसे आम्हा सर्वांना खूप आश्वासक व उभारी देणारे आहे. पण आपली तीच जुनी वैगुण्ये इथेही आडवी येत आहेत. उदा. श्रेय, नाव व प्रसिद्धीबाबत अतिसंवेदनशील असणे, मतभिन्नतेविषयी पुरेसे सहिष्णू नसणे इ.. या स्थितीत आपण आपले बघावे (म्हणजे आपल्या संघटनेचेच किंवा वैयक्तिक पातळीवर जमेल तेवढे काम करावे) अशा मनःस्थितीत काही कार्यकर्ते जातात. निष्क्रिय होत व्यापक एकजुटीतून हळूहळू बाहेर पडतात. पुढे त्या एकजुटीची हालचालच थांबते.

बुद्धी व वृत्ती या दोन भिन्न गोष्टी आहेत याचा तीव्र प्रत्यय भोवतालच्या पुरोगामी नेतेमंडळींकडे पाहिले की येतो आहे. बुद्ध, कबीर, गांधीजी यांनी वृत्तीला खूप महत्व दिले असे माझे आकलन आहे. होतकरु कार्यकर्त्यांत 'पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का पढे, सो पंडित होय' हे खूप मुरवायची गरज आहे. मैत्री, करुणा, बंधुता ही मूल्ये आपल्या व्यक्तित्वाचा अभिन्न हिस्सा व्हायला हवा. विद्वान नाही झालात तरी चालेल पण साधा माणूस बना हे आपल्या सहकाऱ्यांवर सतत बिंबवत राहायला पाहिजे असे मला वाटते.

पुरोगाम्यांच्या एकजुटीची ही कथा एकदाच नाही, वारंवार अशी निष्फळ, अपूर्ण राहते. आमचे असेच काही होणार याची आशंका दाट आहे. पण म्हणून काहीही न करता शांत बसणे हा उपाय नक्की नाही. या स्थितीतून बाहेर पडण्याचे काही नवे मार्ग शोधण्याचा प्रयास व तोवर जमेल त्या साधनांनी, असेल त्या ताकदीने लढत राहायलाच लागेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

___________________________

आंदोलन, जुलै २०१७