Friday, June 1, 2018

रोखणे म्हणजे जिंकणे नव्हे


कर्नाटकचा निकाल लागताना मी सतलजच्या तीरावर हिमाचलमध्ये होतो. त्या डोंगर-दऱ्यांतही नेटवर्क उत्तम मिळत होते. त्यामुळे मोबाईलवर निकाल कळत होते. त्या रम्य परिसरातही भाजपची घोडदौड बघून कासावीस व्हायला झाले. अस्वस्थता घेरायला लागली. काँग्रेस विजयी व्हावी, किमान जनता दलाचा पाठिंबा घेऊन सत्ता घेता यावी एवढे बहुमत काँग्रेसला मिळावे या अपेक्षेच्या दरडी कोसळू लागल्या. अखेर सायंकाळी भाजप १०४ जागांवर स्थिरावला आणि काँग्रेस व जनता दल (से) मिळून बहुमतात आहेत असे कळल्यावर हायसे वाटले. काँग्रेसचे निवडून आलेले आमदार ७८ व जनता दलाचे ३८. म्हणजे काँग्रेसचे आमदार जनता दलापेक्षा दुपटीने अधिक. तरीही काँग्रेसने जनता दलाने सरकार बनवावे, आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली या शहाणपणाने खूप बरे वाटले. जनता दलाने त्यास प्रतिसाद दिला व त्याचे नेते कुमारस्वामी यांनी त्याप्रमाणे सरकार बनविण्यास आम्हाला आमंत्रित करावे असे राज्यपालांना पत्र दिले. भाजप जरी एक पक्ष म्हणून बहुमतात असला तरी निवडले गेलेले विविध पक्षांचे सदस्य एकत्रितपणे सत्तेवर दावा करत असतील व त्यांचे एकत्रित संख्याबळ भाजपहून अधिक असेल तर त्यांना सरकार बनविण्यास निमंत्रित करणे हे राज्यपालांचे कर्तव्य होते. तरीही मोदी-शहांचे गुलाम असल्यासारखे राज्यपाल वागले. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माझ्या आशा मावळल्या. पुन्हा निराशा दाटून आली. आता काही खरे नाही. साम, दाम, दंड, भेद तसेच कपट, लबाडी वगैरे घटक ज्यांच्या घरी पाणी भरतात ती मोदी-शहा दुकली गोवा, मणिपुरादी राज्यांप्रमाणे विरोधकांतले आमदार फोडून विश्वासमत जिंकणार याबद्दल मला शंका राहिली नव्हती. तथापि, आश्चर्यकारकपणे या दुकलीच्या व राज्यपालांच्या हुमदांडगेपणाला सर्वोच्च न्यायालयाने लगाम लावला. ..पुढे सगळी स्थितीच पालटली. हिमाचलमधून परतताना पुन्हा मनात आनंदाची शिरशिरी उम़टली. आता दोन दिवसांत कुमारस्वामींचा शपथविधी व त्यानंतर विश्वासमताचा सोपस्कार होईल. त्याला फारशी अडचण येईल असे वाटत नाही. अर्थात, आपल्याच आमदारांना हॉटेलवर ठेवून विश्वासमतापर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागणे ही तशी लाजिरवाणीच स्थिती आहे. केव्हाही धोका होऊ शकतो याचेच ते निदर्शक आहे. 

सुटीवर फिरायला, विश्रांतीला गेलो तरी कर्नाटकचे काय होते आहे याची चिंता लागून राहणे, ते सात-आठ दिवसही राजकारण विसरता न येणे, राजकारणातल्या घडामोडींनी वैयक्तिक जीवनातल्या आशा-निराशेची जागा घेणे हे वाईट आहे हे मला कळते. पण हा काळ नेहमीच्या लोकशाही चौकटीत चालणाऱ्या लढायांचा नाही. ही चौकटच उध्वस्त करु पाहणारा फॅसिझमचा अवलांच संविधान व त्यावर निर्भर असलेले माझे वैयक्तिक, सामाजिक जीवन गडप करु पाहत असताना मी देवदारांच्या राईत पूर्ण रममाण कसा होईन? तेथील सौंदर्य उपभोगताना राजकीय मळभाने मन झाकोळलेले राहणारच. 

निकालांचा वेध घेत सतलजच्या काठी मी उभा होतो तिथून जवळच एक बाई झाडाच्या सावलीत बसली होती. आमच्या सोबतची मुले राफ्टिंगला गेली होती. त्यांच्या परतण्याची आम्ही वाट पाहत होतो. त्या बाई आपल्या शाळेतून परतणाऱ्या मुलांची वाट पाहत होत्या. समोरच्या पुलाकडे त्या नजर लावून होत्या. त्यांच्याशी बोलणे छेडले तेव्हा त्या म्हणाल्या-“ पूल हलतो. म्हणून मुलांची काळजी वाटते.“ त्यांचे गाव जवळच होते. घरे नजरेच्या टप्प्यात होती. अधिक चौकशी केल्यावर त्या स्वतःहून म्हणाल्या- “आम्ही हरिजन आहोत.” त्या मोकळेपणाने बोलताहेत हे पाहून माझा धीर चेपला व विचारले, ‘’जात कोणती?”. त्या म्हणाल्या- “लोहार”. (आपल्याकडे महाराष्ट्रात लोहार अन्य मागासवर्गात म्हणजे ओबीसींत मोडतात. हिमाचल प्रदेश तसेच अन्य काही राज्यांत लोहार अनुसूचित जातींत येतात. परीट, कुंभार अशा काही जातींचेही तसेच आहे. आपल्याकडे त्या ओबीसी तर इतर काही राज्यांत त्या दलित मानल्या जातात. या आधारे महाराष्ट्रातही आम्हाला अनुसूचित जातींत घाला अशी त्यांची मागणी उठत असते. असो. असे का ही चर्चा स्वतंत्रपणे केव्हातरी.) पुढे विचारले- “जातिभेदाचे काय?” त्या उत्तरल्या- “हो. चालतो ना! आता फरक पडलाय. कार्यक्रमाला परस्परांकडे जाणेयेणे असते. पण पंगती दोघांच्या वेगळ्या. ती वर दिसताहेत ती घरे ब्राम्हणांची.” त्यांनी वरच्या दिशेने बोट दाखवले. मग नेहमीचा उत्सुकता असणारा प्रश्न विचारला, “आंतरजातीय लग्नं होतात का?” त्या म्हणाल्या- “हो. होतात. पण विरोध खूप होतो. सरकार अशा लग्नांना पैसे देते.” यानंतर मग भाजप, मोदींकडे आलो. “भाजप जातिवादी आहे ना?” या अपेक्षित उत्तरासाठीच्या माझ्या प्रश्नरचनेवर त्या बाईंनी ‘हो’ म्हटले. पण त्या ‘हो’त खूप जोर नव्हता. वरताण म्हणजे तिने स्वतःहून मोदींची प्रशंसा सुरु केली. मोदींमुळे मुलांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचे पैसे येऊ लागले, सुविधा मिळू लागल्या वगैरे. पुढे त्या म्हणाल्या- “फिर भी मोदी अच्छे नहीं है ऐसे लोग कहते हैं.” 

मोदींच्या सत्ताग्रहणानंतर, विशेषतः भाजपशासित राज्यांत कट्टर हिंदुत्ववाद्यांचे जे थैमान सुरु झाले त्याचा फटका मुस्लिमांना सर्वाधिक व त्याखालोखाल दलितांना बसतो आहे. याच्या परिणामी मुस्लिमांतून त्यांना राजकीय विरोध होतो आहे हे उघड दिसते. पण दलितांतून सरसकट असा विरोध होतो आहे हे स्पष्ट दिसत नाही. अनेक ठिकाणी भाजपला दलितांतून पाठिंबा मिळताना दिसतो. कर्नाटकात गेल्यावेळी म्हणजे २०१३ च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला दलित मतदारसंघांतून ४९ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्या फक्त ३४ आहेत. म्हणजे त्यांनी १५ जागा गमावल्या. तर भाजपने ३१ दलित मतदारसंघांत विजय मिळवला. काँग्रेसपेक्षा त्या कमी असल्या तरी गेल्यावेळी त्यांच्याकडे या मतदार संघातल्या फक्त ९ जागा होत्या. म्हणजे २२ जागांची अधिकची कमाई त्यांनी यावेळी केली आहे. 

लिंगायतांच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीला काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मान्यता दिली. ज्यांच्या पुरोगामी विचारांमुळे सनातनी संतापले आणि त्यांनी कलबुर्गी व गौरी लंकेश यांचा खून केला हे दोघेही लिंगायत. या खुनांच्या विरोधात देशभरचे पुरोगामी बुद्धिजीवी, कलावंत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बंगलोरमध्ये तर प्रचंड मोठा मोर्चा झाला. विशिष्ट पक्षाच्या बाजूच्या नसलेल्या या कलावंत-लेखक मंडळींनी आपल्या विवेकाला सक्रिय कृतीत आणून यावेळी भाजपच्या विरोधात आपापल्या माध्यमांतून आघाडी उघडली. पण या सगळ्याचा परिणाम नक्की काय व किती झाला? भाजपला मिळालेल्या जागांचे यश हा परिणाम दर्शवत नाही. उलटच दिसते. त्यांच्या जागा गेल्या वेळच्या तुलनेत तिपटीच्या जवळपास गेल्या आहेत. गेल्या वेळी त्या ४० होत्या. यावेळी १०४ आहेत. लिंगायत आमदारांपैकी ६५ टक्के आमदार भाजपकडे आहेत, तर काँग्रेस व जनता दल (से) यांचे मिळून लिंगायत आमदार ३५ टक्के आहेत. लिंगायतांना स्वतंत्र धर्म बहाल केल्याचा तसेच कलबुर्गी, लंकेश या लिंगायत पुरोगाम्यांच्या खूनाच्या रोषाचा परिणाम इथे कुठेच दिसत नाही. 

याचा अर्थ कसा लावायचा? …मतदारांना स्वाभिमान नाही? लोक लाचार झालेत? ते दहशतीखाली आलेत? आम्ही पुरोगाम्यांनी मोदींचे एवढे पोलखोल केले. कर्नाटकातील प्रचारादरम्यान नेहरु-थिमय्या, नेहरु-भगतसिंग याबाबत मोदींनी खोटे बोलण्याचा कहरच केला होता. त्यांचा हा खोटारडेपणा रवीश कुमार, विनोद दुआ आदि नामांकित विवेकी पत्रकारांनी जनतेसमोर पुराव्यानिशी उघड केला. मग मतदार जनतेने तो गंभीरपणे का घेतला नाही? जनताही मोदींसारखी सोयीने खोटे स्वीकारणारी निघाली का? 

शहाणी किंवा लबाड असे निष्कर्ष व्यक्तीबाबत काढणे समजू शकते. पण जनता नावाच्या व्यक्तींच्या समूहाला अशी द्विध्रुवीय विशेषणे लावणे कठीण आहे. निवडणुकीतील निकाल हे अनेक हितसंबंधांचा सरमिसळ परिणाम असतो. वरुन शांत दिसणाऱ्या अथवा ठरावीक दिशेने लाटा प्रवास करत असलेल्या समुद्रात खोलीच्या विविध टप्प्यांवर अनेक प्रवाह असतात. त्यांची दिशा एक नसते. हे प्रवाह वा त्यांची दिशा वरुन दिसत नसते. अगदी किनाऱ्यापासून थोड्या दूरवर पाण्यात गेलेल्यांनाही हे प्रवाह खेचून घेतात हे आपल्याला ठाऊक आहे. हे प्रवाह माणसाच्या मनासारखे स्वयंगतीचे नसतात. त्यांची नैसर्गिक गती शोधता येऊ शकते. निवडणुकीच्या राजकारणात माणसे कशी वागतात. त्यांच्या मनाची सामूहिक प्रतिबिंबे निकालात कशी उमटतात हा शोध संपूर्णतः गणिताने घेणे कठीण आहे. अधिकाधिक बारकाईने तपशील जमविणे व त्यांचा अन्वय लावणे ही कला, प्रतिभाही आहे. अर्थात, कोणी कितीही प्रतिभावान असला तरी निवडणुकीच्या निकालाबाबत सर्व कळल्याचा दावा तो करुच शकत नाही. जास्तीत जास्त कळल्याचे विधान तो फारतर करु शकेल. आपण पुरोगाम्यांनी अशी वस्तुनिष्ठतेने बारकावे तपासण्याची वृत्ती जोपासणे खूप गरजेचे आहे. त्यातून शंभर टक्के कळणार नाही. मात्र जास्तीत जास्त कळण्याची वा अंदाज येण्याची शक्यता नक्की वाढू शकते. अशा तपासाची काही क्षेत्रे नोंदवावीशी वाटतात ती अशीः 

मोदी खोटे बोलतात. रेटून खोटे बोलतात. पण ते खोटे आहे हे सर्वसामान्यांना कुठे ठाऊक असते! ज्यांच्याबद्दल ते खोटे बोलत असतात ते नेहरु, थिमय्या, भगतसिंग यांच्याबद्दल आजच्या काळात माहीतगार असणारे जनतेत तसे अगदी अल्प. ते कोणी उघड केले तरी त्याबद्दल गांभीर्याने दक्ष असणारेही कमी. खरे म्हणजे राजकारणात काही गंभीरपणे बोलायचे असते, जनतेचे शिक्षण करायचे असते हा पुरोगामी राजकारण्यांबाबतही जनतेला अनुभव नाही. मोदींच्या-संघाच्या फॅसिस्ट राजकारणाविषयी जनतेला तिला समजेल अशा भाषेत, शांतपणे समजावून सांगण्याची पद्धत अत्यल्प अपवाद वगळता पुरोगाम्यांत दिसत नाही. त्यांची मोदींवरची घणाघाती टीका जनतेतल्या अनेकांना कंठाळी वाटू शकते. फॅसिझम म्हणजे काय हे उलगडून सांगितल्याशिवाय केवळ फॅसिस्ट शब्दाचे वारंवार उच्चारण करणे फक्त शिवीसारखे वाटू शकते. भौतिक प्रश्नावर लढणारे पुरोगामी जनतेला त्या प्रश्नांसाठी जवळचे वाटतात. पण या प्रश्नांचा व व्यापक राजकारणाचा संबंध जोडून त्याची समग्रता लक्षात आणून देणारेही अपवादात्मकच आहेत. बाकी सर्व भौतिक प्रश्नांवर मोर्चाला आलेले लोक आपल्या राजकीय विचारांना मानणारच असे सोयीने गृहीत धरतात. लोकही त्यांच्या सरकारविरोधी वा मोदीविरोधी घोषणांना जोरदार प्रतिसाद देतात. ती सहज सवयीची कृती वा नेत्याच्या प्रति कृतज्ञता असते. ते त्यांना प़टलेलेच असते असे नाही. पुरोगामी मंडळी कार्यकर्त्यांची शिबिरे क्वचित घेतात. तीही विशिष्ट विषय घेऊन तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या पद्धतीची नसतात. सुट्या विषयांवर सुटे सुटे ‘रिसोर्स पर्सन’ बोलावून बरेचदा हे शिबीर साजरे केले जाते. दैनंदिन आंदोलनातून राजकीय विचारांचा पेळू वळायचा व त्यातून सूत कातायचे हे घडत नाही. साहजिकच जनतेत जाऊन त्यांचे शिक्षण करणारे जाणते कार्यकर्ते तयार होत नाहीत. याच्या उलट विरोधी विचारांकडे-विशेषतः संघपरिवाराकडे अशा कार्यकर्त्यांची फौजच्या फौज आहे. 

मोदींना स्वतःचा स्वार्थ नाही. बायको-पोरे नाहीत. ते कोणासाठी भ्रष्टाचार करणार? ..हे अनेकांच्या मनात खोलवर असते. वास्तविक सत्तेची आकांक्षा हीही एक प्रेरणा असते. ही प्रेरणा असलेले रुढ भाषेत बिनभ्रष्टाचारी, त्यागी असेही असू शकतात. ही जाणीव सर्वसामान्य जनतेला नसते. शिवाय मोदींच्या जनतेशी संवादी बोलण्याचा प्रभाव हाही घटक असतो. अर्थात तो निर्णायक नाही. नाहीतर उत्तम वक्तृत्ववाले सर्वच नेते झाले असते. तसे होत नाही. काँग्रेसने आतापर्यंत काय केले हा खरा-खोटा प्रचार जनतेत जोरदार मुरलेला आहे. भोवताली दिसणारे स्वार्थी, सत्तेचे भाट काँग्रेसवाले इतक्या संख्येने दिसतात की त्यापुढे सोनिया, राहुल गांधी, मनमोहनसिंग फिके पडतात. काँग्रेसच्या धोरणाचा सर्वाधिक लाभार्थी मध्यमवर्ग आपल्या आत्मकेंद्रित स्वार्थापायी व सांस्कृतिक वर्चस्वाच्या दांभिकतेत लपेटल्याने काँग्रेसचा कडवा टीकाकार असतो. काँग्रेसचे मुस्लिम धार्जिणेपण, दलित-आदिवासींबद्दलचे जवळिकीचे धोरण त्याच्या अंगावर पाल पडल्यासारखे येत असते. त्याचा उच्चवर्णीय हिंदुत्वाचा आत्मिक कंड व त्यात गुंडाळलेल्या संकुचित राष्ट्रवादाची खाज भाजप व खास करुन मोदी शमवतील याची त्याला खात्री असते. 

भाजप-मोदींकडे संघटना आहे व ती जिंकण्याच्या इर्ष्येने लढते आहे. भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची संघटना अगदीच विसविशीत आहे. पुरोगाम्यांचे तर राजकीय संघटनात्मक अस्तित्व नगण्य म्हणावे असे आहे. अशावेळी मोदींच्या नोटबंदीचा, जीएसटीचा, महागाईचा कितीही त्रास झाला तरी पर्याय म्हणून कोणाला निवडायचे हा प्रश्न अनेक सामान्यांचा असतो. काँग्रेसला आजवर संधी दिली. अजून काही काळ मोदींना दिली तर काय बिघडते असे त्यांना वाटत असते. ज्या दलितांना भाजपच्या जातीय राजकारणाचा त्रास होतो, तो आता वाढला आहे हे खरे. पण पूर्वीही तो होताच. इथे या त्रासाला कारण आधीच्या व्यक्ती होत्या तर इथे भाजपचे अधिकृत धोरण आहे, हे त्यांना लक्षात येत नाही. दलितांतल्या जातींची फोडाफोडी, त्यातल्या मध्यवर्गीयांना सत्तालाभाच्या जाळ्यात ओढण्याचे कसब यात भाजप-संघ सराईत आहे. शिवाय हे त्यांचे कार्य सत्तेवर येण्याच्या कैक वर्षे आधीपासून आहे. अत्याचारांच्या घटना इतर ताणांसहित एकत्र होतात त्यावेळी दलितांमधून उद्रेक घडतात. पण ते ओसरले की पुन्हा पहिले पाढे पंचावन. त्यांचा आक्रोश समग्र परिवर्तनासाठी व्यवस्थेला धडका देण्यास कामी येत नाही. मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या भोवतालच्या दलित कुटुंबियांना काय मिळाले यावरच या दलित मतदाराचा निर्णय ठरतो. हिमाचलमधल्या बाईला तुम्ही मतदान कोणाला करता असे विचारल्यावर ती म्हणाली- “आम्ही एकत्र गाव म्हणून ठरवतो. शेवटी आपल्याला कोण मदत करणार आहे त्यावर आमचे मतदान ठरते.” ..यात सबंध दलित हितसंबंध कोठे येतो? दलितांच्या जाणतेपणालाही खूप मर्यादा आज आहेत. भीमा-कोरेगावच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र बंद मध्ये आघाडीवर असणारा आमच्या एका बौद्ध मित्राचा मुलगा हनुमान जयंतीच्या बजरंग दलाच्या पोस्टरवरही दिमाखात आपली प्रतिमा मिरवताना दिसला. त्याच्या समजाचे घनफळ-क्षेत्रफळ कसे मोजायचे? 

मुस्लिम, दलित यांच्यावरच्या अन्यायाचे लागते असणारा बंधुतेचा समाज आज नाही. त्याला त्यांच्यापासून अलिप्त केले गेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या प्रगतीच्या मार्गातल्या या धोंडी आहेत, ती घाण आहे इतपत मानसिकता तयार झाली आहे. गांधी-आंबेडकरांच्या काळात दलितांवरील अन्याय हा सवर्ण हिंदुंत काही प्रमाणात अपराधभाव जागवत होता. आज त्यांच्याविषयी घृणा तयार झालेली आहे. त्यामुळे मुस्लिम-दलितांवर अन्याय करणारा भाजप हा मुद्दा सर्वसामान्य सवर्ण हिंदूंना पटत नाही. आणि तेच बहुसंख्य आहेत. भारतीयत्व म्हणजेच हिंदुत्व असे असणे का गैर आहे हे त्याला कळत नाही. आदिवासी हिंदू नाही हे आम्ही पुरोगामी जोरात मांडतो. पण खुद्द आदिवासींत आम्हाला हिंदू म्हणा अशी एक प्रतिष्ठावर्धक अनुकरणीय अपेक्षा दिसते. वेगवेगळ्या कारणांनी भाजपला मते न देणाऱ्यांनाही भाजपचे हे म्हणणे पटत असते. त्यांच्या या मताचा निरास करणारी परिणामकारक प्रचारयंत्रणा पुरोगामी, लोकशाहीवादी यांच्याकडे आज नाही. हे करायला हवे याची आचही नाही. 

व्हॉट्सअप-फेसबुकवर पुरोगामी-प्रतिगामी झुंजी जोरात लागतात. त्यात पुरोगाम्यांचे कंड शमतात. मोदींना-संघाला आम्ही कसे धुतले याचे कृतक समाधान मिळते. यापलीकडचा जो समाज असतो, ज्यातून मतदान अधिक होत असते, त्याच्याशी आमचा फारसा संपर्क वा संवाद नसतो. त्यामुळे आमचे फेसबुकवरचे शहाणपण या सामान्य मतदारापर्यंत वाहत नाही. सर्वसामान्यांना दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश ही नावेही ठाऊक नसतात. असली तरी त्यांच्या हत्येचे गांभीर्य बरेच विस्मरणात गेलेले असते. त्यांच्याविषयीचे कार्यक्रम खूप मर्यादित विभागांत होतात. दलितांतल्या नव्या पिढीत आता नामदेव ढसाळ, राजा ढाले या पँथरकाळातल्या तळपत्या ताऱ्यांची नावे माहीत नसलेले बरेच आढळतात. समाजमाध्यमांचा वापर याचा एक नक्की अवकाश आहे. तथापि, प्रत्यक्षातल्या लोकांना भिडणे याला आजही पर्याय नाही. तेव्हा पुरोगामी विद्वतजगतातल्या मंडळींनी आपल्या क्षेत्राबाहेरच्या या सामान्यांशी बोलण्याचा खास प्रयत्न करायला हवा. 

सर्वसामान्यांतले बहुसंख्य लोक विवेकवादी नसतात. वैज्ञानिक तार्किक दृष्टिकोन त्यांच्याकडे नसतो. अनुभवाच्या एका चौकटीत त्यांच्या मर्यादित जाणतेपणाने मुख्यतः भावनिक प्रतिसाद ते देत असतात. यातून एक सुज्ञताही प्रकट होत असते. तथापि, भावनांना आवाहन करणाऱ्यांच्या जाळ्यात ते सहज अडकतात. यांत ते प्रसंगी क्रूरही होतात. गोध्रा व त्यानंतरच्या कितीतरी जातीय संहारात आपण ते पाहिले आहे. समाज शांत असताना त्याला मानवतेचे भावनिक आवाहनही पटते. संतांची करुणा त्याला भावते. राष्ट्रवादाचा वास्तविक अर्थ त्याला उमगत नाही. पण वैविध्यपूर्ण सहअस्तित्वाची भूमिका त्याला उदात्त, उन्नत वाटू शकते. मुद्दा आहे, हे सकारात्मक भावनेचे आवाहन त्याला दमदारपणे, सातत्याने, त्याच्यात घुसून, वावरुन आपण करणार आहोत का? 

...तपासाची अशी अनेक क्षेत्रे असू शकतात. त्या सर्वांचा विचार व्हावा, ही पुरोगामी सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे. भाजप-संघाच्या राजकारणाचा संदर्भ २०१९ च्या जय-पराजयापुरता मर्यादित नाही. तो त्यानंतरही राहणार आहे. २०१९ ला भाजपला सत्तेतून पायउतार होण्यास समजा आपण भाग पाडले तर त्याचा अर्थ या मंडळींना सत्तेपासून रोखले एवढाच असेल. त्यांच्या प्रतिगामी विचारांशी असलेली लढाई जिंकली असा त्याचा अर्थ नसेल. तसा तो समजणे ही आत्मवंचनाच नव्हे तर आत्मघात ठरेल. पुरोगामी विचारांच्या मशागतीनेच प्रतिगामी विचारांची विषवल्ली वठणार आहे. ही मशागत लांब पल्ल्याची आहे. आपली तयारी व उमेद तशीच लांब पल्ल्याची असावी लागणार आहे. 

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, जून २०१८)