संविधान जागर यात्रेच्या तयारीसाठी भेटीगाठी घेत हिंडत होतो. आमच्या विभागातल्या एका नेत्यांना भेटायचे होते. ते माजी मंत्रीही आहेत. ती कोजागिरीची रात्र होती. त्या निमित्त काही तरुण मुलांनी आयोजित केलेल्या गरब्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. आम्ही तिथेच गेलो. तर त्यांनी मंचावरच बोलावून घेतले. समोर गरब्यात थिरकणारी मुले-मुली आणि वर मंचावर आमच्या गप्पा...यात्रेच्या तयारीपासून ते आगामी निवडणुकांपर्यंत. एक प्रश्न बरेच दिवस विचारायचाच होता तो त्यांना विचारला.
म्हटले, “ही मुले किती धुंद झाली आहेत. अशा या नाचाची त्यांना गरज आहे. तिकडे गुजरातमध्ये आंबेडकर जयंतीला ‘भीम गरबा’ चालल्याचे मी यूट्युबला पाहिले आहे. आपल्याकडे का नाही आपण तसे करत? गरबा किंवा दांडिया हा नाच आहे. देवा-धर्माच्या निमित्ताने तो सुरु झाला. पण आता ती धर्माची चौकट असण्याचे कारण काय? नाच तो नाच. तो देवीच्या गाण्यांवर होतो. तसाच भीमगीतांवरही होऊ शकतो. नाहीतरी गरब्यात सगळी गाणी काय देवीची असतात असे नाही. हिंदी गाण्यांचे रीमिक्स, नुसती धून असतेच की!”
दहा वाजायला आले होते. नियमाप्रमाणे दहा वाजता थांबायला लागणार होते. शेवटचा टप्पा सुरु होता. समोरची मुले बेधुंद गिरक्या घेत नाचत होती. त्यावेळीही एक हिंदी गाण्याची धूनच लागली होती. त्यात देवी, हिंदू धर्म कोठेच नव्हता.
आमचे हे नेते-माजी मंत्री म्हणाले, “अरे, करायला हरकत नाही. पण समाज काय म्हणेल म्हणून आपण गप्प बसतो.”
समाज म्हणजे बौद्ध समाज. आमचा हा विभाग बौद्धांचा बालेकिल्ला. बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळात येणे-जाणे असलेला, दलित पँथरचा झंझावात अनुभवलेला. हिंदू सण-समारंभ करणे सोडा, चुकून त्यात कोणी दिसला तरी त्याची खैर नसायची अशी या पँथर्सची दहशत. आम्ही लहान. पण त्याच दहशतीचे पुरस्कर्ते. हे नेतेही त्याच संस्कारांतून गेलेले. मध्ये खूप पाणी वाहून गेले. दूषित-प्रदूषित. अजूनही वाहते आहे. जुन्या विद्रोहाच्या नौका कागदी असल्यासारख्या कुठच्या कुठे वाहून गेल्या. त्यांचा काहीही थांग नाही. या नौकाचालकांच्या देखत आता या विभागात गणपती बसतात. नवरात्र होते.
यावेळच्या अनंत चतुर्दशीला आमच्या बुद्धविहाराच्या सर्वसाधारण सभेसाठी मी तिथे होतो. गल्ली-गल्लीतून सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुका निघत होत्या. जयभीम वगैरे नावाच्या मित्रमंडळांच्या भक्तगणांचे फ्लेक्स बॅनर रस्ताभर लागलेले. आमच्या या नेत्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. त्यांनी रस्त्यावर कडेला मंडप टाकलेला. त्यात त्या मंचावर उभ्या राहून गणेशभक्तगणांचे स्वागत करुन मिरवणुकांना निरोप देत होत्या. हे गणपती काही मिश्र समाजाचे नव्हते. बौद्धांनी बौद्धांसाठी बसवलेले बौद्धांचे सार्वजनिक गणपती. त्याचे स्वागत करणाऱ्या नगरसेविका बौद्ध. नवरात्र आणि नंतर देवीच्या मिरवणुकाही अशाच बौद्धांनी बौद्धांसाठी काढलेल्या. वर उल्लेख केलेला गरबाही बौद्धांनी आयोजित केलेला. त्यात थिरकणारी मुलेही बौद्धांचीच. आणि आम्ही स्टेजवरचेही सगळे बौद्धच.
पण एक आहे. आमचा हा विभाग बाबासाहेबांचा कडवा अभिमानी. बालेकिल्लाच तो! भीमजयंतीची मिरवणूक काय जोशात निघते म्हणून सांगू! तिला तोड नाही.
आमचे हे नेते आंबेडकर जयंतीनिमित्त गरबा आयोजित करण्यात पुढाकार घ्यायला मग का तयार नाहीत? मुलांना तर आवडेलच ते. त्यांना ‘समाज काय म्हणेल?’ ही जी अडचण वाटते तो ‘समाज’ कोणता?
एकतर यांच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही जागे असलेले आदर्श बौद्ध समाजाचे संकेत. जुन्या विद्रोही संस्कारांचे अवशेष. शिवाय बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञांचा वचक. दुसरे म्हणजे बौद्ध मंडळी हिंदू सणांत कितीही ‘समरस’ झाली तरी त्यास अधिकृत मान्यता अजून मिळालेली नाही. आता वस्त्यांत राहत नाहीत, पण माध्यमांतून ज्यांचे धर्मपीठ कब्जा करुन आहे ते विद्वान बौद्ध बौद्धांच्या या अधःपतनाबाबत निवाडे देत असतात, फर्मान काढत असतात. जसा मी, तसेच हे सर्व ज्या वस्त्यांतून बाहेर गेले, त्यांच्या वस्त्यांत हेच चालू आहे, जे माझ्या. त्यांत काहीही हस्तक्षेप करण्याची ताकद आमची नाही. तथापि, अशी ताकद नाही, हे कबूल करण्याचीही कुवत नाही. जिला बाबासाहेब आंबेडकर आणि गणपती दोघेही सारखे ती नवी पिढी आम्हाला जुमानत नाही, जुमानणार नाही. पण आमच्या या नेत्यांच्या मनात आमच्याविषयी काही इज्जत असते. कारण तेही आमच्याच विद्रोही पिढीचे. त्यामुळे नव्या बदलाला सामोरे जाण्याचे त्यांचे धैर्य मर्यादित. त्यांच्या पुढच्या पिढीत ही कमजोरी नक्की असणार नाही.
माझे हे तिरकस बोलणे सोडून द्या. त्यातल्या मुद्द्याची चर्चा करु.
जुन्या अन्यायी, कर्मठ व्यवस्थेवर आघात करुन झाले. पण तिच्या जागी नव्या रचनेचे काय? नवदीक्षित बौद्ध हे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य मानले गेलेले मुख्यतः महार. या अस्पृश्य मानलेल्या जाती हिंदू धर्मसंस्कारांत वाढलेल्या. हे संस्कार शेकडो वर्षांचे. बौद्ध झाल्या झाल्या ते जातील हे शक्य नव्हते. म्हणूनच काय सोडा व काय धरा हे सुस्पष्टपणे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी धम्मदीक्षेवेळी बावीस प्रतिज्ञा दिल्या. दीक्षा दिल्यावर दीड महिन्यातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. बौद्ध धर्मीय संस्कृतीच्या नव्या संस्थात्मक रचना करण्यासाठीचा पुरेसा वेळ त्यांना मिळाला नाही. तरीही ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. आणि विधीबाबत काही ढोबळ आराखडा मांडला. पुढच्या नेतृत्वाकडून त्यांचा जो विकास होणे अपेक्षित होते, तसा तो झाला नाही. नंतर पँथरच्या काळात जोरदार सांस्कृतिक-सामाजिक तोडफोड, मूर्तिभंजन झाले. पण नवी रचना झाली नाही. हमरी-तुमरीवर येऊनच्या वादांत, नेतृत्वाच्या स्पर्धेत पँथरच्या ठिकऱ्या उडाल्या. जिथे संघटनेचीच रचना नाही तिथे नव्या सांस्कृतिक रचनांचे अवधान ते काय राहणार!
एक सांगायला हवे. पँथरने कविता, साहित्य, भाषणे, मोर्चे आदि मार्गांनी व्यवस्थेवर जे आघात केले त्यातून आमची पिढी घडली. ती प्रेरणा, अस्मिता आजही बलवान आहे.
‘हा भाकरीचा जाहीरनामा
हा संसदेचा रंडीखाना
ही देश नावाची आई
राजरोस निजते कुबेराच्या सोबत..’
हे नामदेवचे (नामदेव ढसाळ यांचे. तेव्हा नामदेव ढसाळांना नामदेव, राजा ढालेंना राजा असेच म्हणायची प्रथा होती) शब्द ही सडकी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच्या तोफा आमच्या हाती देत असे.
तर
‘मनगटावरच्या चमेलीगजर्यात कवळया कलेजीची शिकार उरकून
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक’
या ओळी कमालीची करुणा आणि संताप आमच्या आत निर्माण करत असत.
साचलेपण आलेल्या मराठी साहित्यसंस्कृतीला ही निखाऱ्यांची भेट होती. त्यातून तीही तावून-सुलाखून निघाली. दलित, विद्रोही साहित्याने एक नवी संस्कृती साहित्यविश्वात निर्माण केली. त्याने नव्या सौंदर्यशास्त्राचाही निकड अधोरेखित केली. नवे संकेत, नव्या प्रतिमा, नवी भाषा, नवी शैली, नवे शब्द यांनी मराठी साहित्याची समृद्धी वाढायला मदत झाली.
ही प्रचंड मोठी कामगिरी होती. तथापि, ती या साहित्य क्षेत्रातच. तसेच त्याने प्रेरित झालेला घटक हा शिक्षित दलित तरुणच होता. - त्यातलाही एक विभाग. हे वर्णन वस्तुस्थितीला धरुन होईल. हे मुक्तछंदीय आधुनिक काव्य वा लघुकथा, एकांकिका न आकळणारा सर्वसामान्य समाज बहुसंख्येने या प्रभावक्षेत्राच्या बाहेरच होता. त्याला पँथरांची अन्यायाविरुद्ध आग ओकणारी भाषणे कळत होती. त्याने तो पेटून उठत होता. पण संस्कृतीच्या नव्या रचना त्याला त्यातून मिळत नव्हत्या. त्याच्या सांस्कृतिक जीवनावर प्रभाव गाजवत होत्या त्या कव्वाल्या आणि त्याही आधी काही विभागांत आंबेडकरी जलसे.
जलशांची परंपरा महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलश्यांपासून. बाबासाहेबांच्या काळात भीमराव कर्डकांनी हे जलसे सुरु केले. खुद्द बाबासाहेबांनी ‘माझी दहा भाषणे आणि कर्डकांचा एक जलसा’ अशी त्यांची प्रशंसा केली होती. या जलशांना पुढे ‘आंबेडकरी जलसे’ असे नाव पडले. मी कोकणात हे आंबेडकरी जलसे पाहिलेत. आमच्या वाडीतलेच कलाकार होते. या जलशांतील विषय, गाण्यांचा आशय आंबेडकरी, पण त्याची रचना कोकणातल्या ‘नमन’ किंवा ‘दशावतारी’ या प्रकाराशी साधर्म्य असलेली.
जसे विद्रोही साहित्यिक-कवी आंबेडकरी समूहातून आश्चर्यकारकरित्या बहुसंख्येने आले, तसेच त्याआधी आणि नंतरही कव्वाली गायक याच आंबेडकरी समूहातून मोठ्या प्रमाणात आले. त्यांतले काही तर खरोखर खूप प्रतिभावान होते. (यातली बरीच प्रतिभा दारुत संपली हे खेदाने बोलावे लागते.) कव्वाली ही सूफी पंथाची देणगी. उर्दूचे बुलंद सौंदर्य प्रकट करणारी. मी ऐकलेल्या आंबेडकरी कव्वालांचेही उर्दू बुलंद होते. त्यांची गायकी उर्दू-मराठी असे.
आमच्या गावी लग्नाची गाणी बौद्ध महिला म्हणत. त्यांच्या नुसत्या चाली ऐकल्या तर त्या चाली आणि आजूबाजूच्या कुणबी, गवळी, सुतार, गुरव वाड्यांतून कानावर येणाऱ्या लग्नाच्या गाण्याच्या चाली यात फरक नसे. फरक असे या गाण्यांच्या शब्दांत. बौद्ध महिलांच्या लग्नगीतांत बाबासाहेब, बुद्ध...अगदी बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आणि पुतण्या मुकुंद यांचीही नावे गुंफलेली असायची. हीच स्थिती पाळणा गीतांची. ‘जो जो रे बाळा जो’ आणि चाल बौद्ध वा हिंदूंची तीच. त्यातले नावांचे व काही वर्णनांचे शब्द वेगळे. हिंदूंच्या पाळणागीतांत राम-कृष्ण तर बौद्धांच्या पाळणागीतांत भीमबाळाची महती असे.
संस्कृतीची ही मुळे लोकमनात खूप खोलवर रुजलेली असतात. त्यांच्या आधारावर त्यांचे सामूहिक कलांचे आविष्कार फुलत असतात. विशिष्ट प्रदेशातील लोकसमूह जाती, धर्म निरपेक्ष पद्धतीने या मुळांतून जीवनरस शोषत असतो. आपापला नवस्वीकृत आशय वेगळा असला तरी त्याच्या सांगितिक वा अन्य कलात्मक बंधांचा स्रोत बहुधा एकच असतो. अनेक पुरोगामी चळवळींनी आपल्या प्रचार-प्रसारासाठी या पारंपरिक आकारबंधांचा वापर केला आहे. ओवी, नमन, मंगळागौर, भारुड हे पारंपरिक रचनाबंध आणि त्यातून मांडावयाचा आशय पुरोगामी. स्त्री मुक्ती संघटनेचे मुक्तनाट्य ‘मुलगी झाली हो’ किंवा चळवळीत नेहमी म्हटली जाणारी ‘सावित्रीची ओवी’ हे याचे उत्तम नमुने आहेत. हे पारंपरिक कलाप्रकार वापरल्याने हा आशय लोकांना अधिक भिडतो असे लक्षात येते. आधुनिक अभिजात साहित्यातही हा अनुभव येतो. पारंपरिक स्रोतांशी जोडून विकसित होणारे साहित्य हे अधिक लोकप्रिय होते असे आढळते. परंपरेच्या पायावर नवतेची इमारत अधिक भक्कम होते हा बोध यातून मिळतो.
बौद्ध वा निधर्मी होऊन हिंदू धर्माशी नाते तोडणे याचा अर्थ त्यातील कर्मकांडाशी, विषमतेशी, अवैज्ञानिक शिकवणुकीशी नाते तोडणे होय. हिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसांत लोकप्रिय असलेले कलाप्रकार त्यासाठी नाकारण्याची गरज नाही. मुळात हिंदू ही ओळख अलीकडची आहे. विविध पंथांचे साहचर्य-विरोध यातून साकारलेली भारतीय संस्कृती ही मिश्र आहे. ती गंगा-जमनी तहजीब आहे. कोणा एका पंथाला तिची सपूर्ण मालकी बहाल करणे हे वस्तुस्थितीला सोडून होईल. त्यामुळेच हे कलाप्रकार हिंदू धर्माच्या मालकीचे आहेत असे समजणे अनैतिहासिक आहे.
एक खरे की माणूस कलेचा केंद्र होणे ही आधुनिक घटना आहे. त्यापूर्वी सर्व कला या ईश्वराची करुणा भाकणाऱ्या वा त्याच्या निमित्तानेच सादर होत असत. त्यामुळे या कलांचा आशयही धार्मिकच असे. दांडियाचा संबंध कृष्ण-गोपींच्या रासक्रीडेशी आहे. आपण चळवळीच्या गाण्यांत जर देवाचा आशय काढून आधुनिक प्रगतीशील आशय घालतो तर मग दांडिया वा गरबा यातील देवाचा संबंध काढून टाकून त्या जागी नव्या प्रगतीशील आशयाचे रोपण करण्यास काय हरकत आहे? आज दांडिया वा गरबा अनेक धर्मांच्या-जातींच्या मुलांना भारुन टाकत असेल, त्यांच्या ऊर्जेचे विरेचन करत असेल, त्यातील लय-ठेका त्यांना परमानंद देत असेल आणि यात काही नकारात्मक विचार वा जाणीव नसेल तर आपण त्याचा स्वीकार का करु नये? मुले स्वीकारतातच आहेत. त्याच्या असेल त्या आशयासह. आपण जाणत्यांनी त्यात नवा आशय घातला तर ही मुले तो नाकारणार थोडाच आहेत! तुम्ही हा आशय द्या, नका देऊ. त्यांना जे करायचे आहेत ते ते करणारच आहेत. आपण बौद्ध वा पुरोगाम्यांनी आपल्या मनातल्या धुसफुसणाऱ्या कर्मठतेला विराम देण्याची खरी गरज आहे.
ही अडचण महाराष्ट्राबाहेरच्या दलित उत्थानाला फारशी येत नाही. महाराष्ट्राबाहेरचा नवशिक्षित, नवजागृत दलित थेट बाबासाहेब व त्यांच्यामुळे बुद्धाशी जोडला जातो. त्यात महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचे काही योगदान नाही. त्यामुळे त्यात ही धुसफुसणारी कर्मठताही नाही.
पारंपरिक ‘बले बले’ भांगडा आणि आफ्रिकी-अमेरिकन विद्रोहींनी सत्तरच्या दशकात अमेरिकेच्या रस्त्यावर लोकप्रिय केलेला ‘रॅप’ यांचे फ्यूजन करुन पंजाबातील दलित समाजातली १७-१८ वर्षाची गिन्नी माही ही गायिका ‘राज बाबा साहिबदा’ व ‘जयभीम’ ज्या जोशात गाते त्याने माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. अभिमानाने ऊर भरुन येतो. ती एका गाण्यात तर आपली जात (डेंजर चमार) ज्या आवेशात सांगते तेव्हा तर तिने व्यवस्थेला लावलेल्या सुरुंगांचेच स्फोट होत आहेत असे वाटते. पंजाबीबरोबरच तिने हिंदीतही गाणी म्हटली आहेत. तिच्या ‘नमो बुद्धाय’ या हिंदी गाण्यात पंचशीलाचे तसेच निळे ध्वज पार्श्वभूमीवर लहरत असतात. बाबासाहेबांच्य प्रतिमा तर बहुतेक गाण्यांत असतातच. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती बुद्धाबरोबरच पंजाबातील सुधारक संत सतगुरु रविदासांची महती गाते. बुद्ध आणि रविदास यांच्या प्रतिमा एकामागून एक येत राहतात. तिला बुद्ध स्वीकारण्यासाठी त्यांच्या पारंपरिक रविदासांना नकार द्यावा लागत नाही. उलट या समन्वयातून ती नवी ताकद जन्मास घालते.
गुजरातमधील नवजागृत दलितांनी आपल्या पारंपरिक गरब्याला बाबासाहेबांच्या गाण्यांची जोड देऊन ‘भीम गरबा’ निर्माण केला आहे. त्यातले एक गायक अशोक सोळंकी गरब्याच्या तालावर नाचणाऱ्या आपल्या स्त्री-पुरुष साथींना गाण्यातून आवाहन करतात- ‘दलितो नाचो, दलितो गाओ I’ पुढे देवीचे नाही तर बाबासाहेबांचे गुण गातात, त्यांची शिकवण सांगतात- ‘बाबा भीमराव तारा काइदा बोले I’
आम्ही मुंबईच्या अनेक बुद्धविहारांत संविधानाच्या प्रचारासाठी बैठका घेत असतो. बौद्ध या नात्याने अनेक धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेत असतो. संविधानावर गाणी रचणारे, ती सादर करणारे माझे दोन सहकारी एकदा विहारातल्या कार्यक्रमाला जमलेल्या बायांना म्हणाले, “विहारात यायचे, वंदना म्हणायची, प्रवचन ऐकायचे आणि जायचे. बरे, वंदना-पूजा हे सगळे पालीत असल्याने काय म्हणतोय तेही कळत नाही. केवळ एवढेच म्हणायचे आणि फक्त ऐकायचे असे का? आपण नाचायचे का नाही? बाया-पुरुषांनी विहारात, त्याच्या पटांगणात गाऊन-नाचून आपले सण का नाही साजरे करायचे? त्यातून आनंद का नाही घ्यायचा?”
मला एकदम नवे काही कळल्यासारखे झाले. मी पूर्वी बौद्ध धम्मावर प्रवचन देत असे. आताही कधीकधी देतो. पाली सूक्ते मराठीत झाली पाहिजेत हे मी बोलत असे. पण बौद्ध धम्माचे पालन, पूजन ही गंभीरच बाब असली पाहिजे, हा दंडक माझ्याही मनात कुठेतरी होता. माझ्या या सहकाऱ्यांच्या प्रश्नाने मला नवे कळले ते असे- केवळ गंभीरपणे विहारात वंदना घेण्याने बौद्धपण स्थापित होणार नाही. त्यासाठी लोकांना सामूहिकपणे नाचता-गाता येतील, आनंद घेता येईल अशा नव्या रचना करण्याची गरज आहे. केवळ वैचारिक प्रबोधनाने नवी प्रगतीशील संस्कृती आकाराला येणार नाही. लोकांच्या पारंपरिक कलांच्या आकृतिबंधांवर आधारलेले नवे आविष्कार तयार करण्याची नितांत गरज आहे. ते नाही केले तर लोक दोन पातळ्यांवर जगणार आहेत. जगत आहेत- विहारात आणि नवरात्रात.
हा पेच लडाख-अरुणाचल-सिक्किमच्या पारंपरिक बौद्धांमध्ये नाही. शेकडो वर्षांत त्यांची म्हणून संस्कृती, गाणी, नृत्ये तयार झाली आहेत. प्रश्न महाराष्ट्रातल्या बौद्धांचा आहे. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी महायान, हीनयान या पारंपरिक बौद्ध पंथांपासून निराळा असा ‘नवयान’ जन्मास घातला. जन्मदाते लगेच गेल्याने या नवयानाच्या नव्या संस्कृतीच्या रचनांबाबत त्यांना काही करता आले नाही. आपल्याला मात्र या प्रश्नापासून फार काळ दूर राहता येणार नाही. बाबासाहेबांची धम्मक्रांती प्रवाहित ठेवायची असेल तर नवदीक्षित बौद्धांच्या नव्या संस्कृतीची चौकट सिद्ध करावीच लागेल.
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, डिसेंबर २०१८)