Friday, May 31, 2019

तिसऱ्यांची खबरबात


मोदींच्या विस्मयकारक, गतवेळेपेक्षा दणदणीत विजयाने सत्ताकारणातील सर्व समीकरणेच कोसळली आहेत. काँग्रेस वा भाजप आघाडीत थेट सामील नसलेल्यांतल्या काहींना मोदींना पूर्वीइतके बहुमत न मिळाल्यास योग्य बोली लावून सत्तासोपान चढण्यास सहाय्य करु अशी आशा होती. खुद्द भाजप आघाडीतीलच कोणाला हिशेबात धरण्याची मोदींना आता गरज उरली नाही, तिथे या स्वतंत्र बाण्यावाल्यांना विचारतो कोण? भाजप आघाडीला ३५१ जागा मिळाल्या असल्या तरी त्यातल्या ३०२ एकट्या भाजपच्या आहेत. गतवेळेपेक्षा २० जागा यावेळी जास्त मिळाल्या आहेत. म्हणजे भाजप केवळ आपल्या हिंमतीवर सरकार स्थापन करु शकतो. त्यामुळे त्याच्या अन्य सहकाऱ्यांना मापात राहावे लागणार आहे. भाजपला पडलेल्या मतांची टक्केवारी यावेळी ५० टक्क्यांहून अधिक आहे. राजस्थानसारख्या राज्यांत तर ती ६० टक्क्यांहून अधिक आहे. गेल्यावेळी ती राष्ट्रीय स्तरावर ३० टक्क्यांच्या आसपास होती. काँग्रेसचीही यावेळची टक्केवारी तुलनेने वाढली असली तरी जागांचा लाभ त्या प्रमाणात त्याला मिळवता आलेला नाही. पूर्वीपेक्षा ७-८ जागा अधिक असल्या तरी भाजपच्या जागा काँग्रेसपेक्षा ६ पटीने अधिक आहेत. खुद्द राहुल गांधी यांचा अमेठीतला पराभव, विधानसभेत नुकत्याच जिंकलेल्या राजस्थानमध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळणे, काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागणे ही त्याची स्थिती खूप दयनीय आहे.

अशावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही आघाड्यांत नसलेल्यांची दखल घेण्यात याक्षणी कोणाला फारसे स्वारस्य वाटणार नाही. परंतु, ९९ जागा आजही त्यांच्या पदरात आहेत ही अगदीच मामुली गोष्ट नव्हे. शिवाय यातल्या अनेकांच्या राजकीय पटावरील पुढच्या चाली चाणाक्ष राजकारण्यांना दुर्लक्षून चालणार नाही. त्या आपल्या सोयीच्या व्हाव्यात यासाठी त्यांकडे त्यांना लक्ष ठेवावेच लागणार. आपल्यालाही या सगळ्याचा संदर्भ असण्यासाठी त्यांचा धावता परिचय करुन घेऊ.

अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष, मायावतींचा बहुजन समाज पक्ष, अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोकदल यांनी उत्तर प्रदेशमध्ये महागठबंधन केले होते. भाजप हटाव हा त्यांचा मुख्य नारा असला तरी त्यात काँग्रेसला त्यांनी सामील केलेले नव्हते. मात्र दोन जागा काँग्रेसला आम्ही स्वतःहून सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. काँग्रेसला हे न रुचल्याने त्याने आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले. हे उमेदवार या गठबंधनाच्या महत्वाच्या उमेदवारांना धक्का लागणार नाही अशा बेताने उभे केले होते, तसेच भाजपला जाणारी उच्चवर्णीयांची मते खायची त्यांची रणनीती होती वगैरे बोलले गेले तरी अशी तिहेरी लढत भाजपला उपयुक्त ठरणार हे नक्की होते. अर्थात, आताच निकाल पाहता हे सर्व एकत्र आले असते तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपनेच मात दिली असती. ८० पैकी भाजप आघाडीला ६४ जागा आहेत. तर महागठबंधनला १५ आणि काँग्रेसला सोनिया गांधींची केवळ एक जागा मिळाली आहे.

काँग्रेसला सोबत घेण्यात मोडता घातला तो मायावतींनी. राजस्थान, मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपात काँग्रेसने त्यांच्याशी योग्य न्याय न केल्याचा त्यांचा आक्षेप होता. जाहीर न केलेले अजूनही एक कारण होते. उद्या काँग्रेस आणि भाजप यांना सत्ता घेण्याइतके बळ नाही मिळाले तर तिसरी आघाडी करुन पंतप्रधानपदावर दावा करण्याचा हेतूही यामागे असल्याचे बोलले जाते. न जाणो भाजपलाच मदत करण्याची वेळ आली तर काँग्रेस मोठा अडथळा ठरणार. कारण तो सोडून महागठबंधनातल्या मायावतींसह अन्य सहकाऱ्यांनी भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ यापूर्वी केलेलीच आहे.

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचाही हाच हिशेब होता. पंतप्रधानकीच्या स्पर्धेत त्याही होत्या. काँग्रेसमधूनच फुटल्याने त्यांची काँग्रेसबद्दलची तीव्रता होतीच. डाव्यांच्या त्या काँग्रेसमध्ये असल्यापासूनच्या विरोधक आहेत. त्यांच्याकडूनच तर त्यांनी सत्ता हिसकावून घेतली. मोदी-अमित शहा यांनी प. बंगालमध्ये-त्यांच्या घरातच मुसंडी मारल्याने त्यांना फॅसिझमच्या विरोधात सर्व बिगर भाजप पक्षांशी मैत्र साधावे लागले. त्यांनी कलकत्त्याला या पक्षांच्या नेत्यांनी बोलावून जी महारॅली केली ती यासाठीच. निवडणुकपूर्व युती मात्र यातल्या कोणाशी त्यांनी केली नाही. भाजपने निवडणूक आयोगाला धाब्यावर बसवून बंगालमध्ये मांडलेल्या प्रचाराच्या मुसंडीला अभूतपूर्व यश आले. त्यांनी ४२ पैकी १८ जागा मिळवल्या. गेल्यावेळी त्या फक्त २ होत्या. तृणमूलच्या जागा २२ झाल्या. गेल्यावेळी त्या ३४ होत्या. कम्युनिस्टांना दोन जागा होत्या. यावेळी एकही नाही. काँग्रेसला गेल्यावेळी ४ जागा होत्या. त्या यावेळी २ झाल्या.

ममतांच्या आधी ३५ वर्षे प. बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या आणि केंद्रात २००४ साली साठच्या आसपास जागा असलेल्या कम्युनिस्टांची स्थिती दिवसेंदिवस वाईट होते आहे. आताच्या १७ व्या लोकसभेत जेमतेम ६ जागा त्यांना असणार आहेत. त्रिपुरातली त्यांची सत्ता गेली. यावेळी केरळमधून लोकसभेसाठी त्यांना केवळ १ जागा आहे. २०१४ ला त्या ६ होत्या. उरलेल्या २० पैकी १९ काँग्रेस आघाडीने जिंकल्या आहेत.

फॅसिस्ट भाजपच्या विरोधात सर्व लोकशाहीवाद्यांनी एकवटले पाहिजे, ही डाव्यांची भूमिका राहिली आहे. मात्र माकपमध्ये प्रकाश करात प्रवाह काँग्रेसशी सहकार्य करायच्या बाजूने कायमच नव्हता. गंमत म्हणजे तिसऱ्या आघाडीतल्या भाजपशी थेट संबंधांचा इतिहास असलेल्या पक्षांबाबत असे वावडे करातांना नव्हते. सीताराम येचुरी प्रवाहाने पक्षांतर्गत संघर्ष करुन ही भूमिका मवाळ केली. तथापि काँग्रेसशी प्रत्यक्ष सोबत-एकत्र प्रचार करायचा नाही या अटीवर फॅसिझमच्या मुकाबल्याची रणनीती त्यांनी स्वीकारली. भाकपची भूमिका राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसशी सहकार्याची राहिली. मात्र जागावाटपात काँग्रेसने योग्य तो आदर न राखल्याने नाईलाजाने पक्षाच्या अस्तित्वासाठी आम्हाला काही ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करावे लागले, असे त्यांचे म्हणणे आहे. बेगुसराय कन्हैया कुमारसाठी सोडायला राष्ट्रीय जनता दलाने नकार दिल्याने तिथे तिहेरी लढत झाली. कन्हैया कुमारच्या प्रचाराचा व त्याला मिळालेल्या प्रतिसादाचा रागरंग पहाता तो निवडून येईल अशीच कल्पना अनेकांची होती. प्रत्यक्षात भाजपचे गिरीराज सिंह मोठ्या मताधिक्याने तिथे निवडून आले. कन्हैया कुमार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. महाराष्ट्रात परभणीची जागा भाकपने लढवली. काँग्रेस आघाडीने ती सोडायला नकार दिला होता. दिंडोरीची जागाही अशीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोडायला नकार दिल्याने माकपने स्वतंत्रपणे लढवली.

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील एमआयएमसह केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग खूपच लक्षवेधक होता. काँग्रेसशी युती करण्याची आमची तयारी होती, पण त्यांनी आमच्या मागणीनुसार जागा सोडायला नकार दिल्याने-त्यांनाच युती नको असल्याने आम्ही स्वतंत्रपणे लढलो, असे बाळासाहेब आंबेडकरांचे म्हणणे आहे. १२ जागांच्या मागणीवर काँग्रेस ६ जागा द्यायला तयार झाली. तथापि मुदतीत काँग्रेसने उत्तर दिले नाही म्हणून २२ जागांवर बाळासाहेबांनी उमेदवार जाहीर केले. आता या २२ जागा आम्ही मागे घेणार नाही असे म्हणत त्यांनाच काँग्रेसने हाताची निशाणी द्यावी अशी नवी मागणी त्यांनी केली. मागणी-प्रतिसादाचा हा झुलवता प्रवास जाहीर आहे. मतविभागणीचा फायदा भाजपला नको म्हणून आम्ही आमचा स्वाभिमान गहाण टाकायचा का असा वंचितचा सवाल होता. ४८ पैकी आता फक्त एक जागा वंचितची-एमआयएमच्या इम्तियाज अलींची औरंगाबादहून आली आहे. बाळासाहेब स्वतः अकोला व सोलापूर येथून पडले. वंचितच्या उमेदवारीमुळे अशोक चव्हाणांसारखा महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष मतविभागणीने पडला. अशीच अजून काही ठिकाणची स्थिती आहे. सगळे आकडे हा लेख लिहिपर्यंत उपलब्ध नसल्याने अंदाजे बोलावे लागत आहे. भाजपला मदत करण्यासाठीच बाळासाहेबांनी स्वतंत्रपणे लढण्याची ताठर भूमिका घेतल्याचा आरोप होतो आहे. बाळासाहेबांचे त्यावर ‘आम्ही काही कोणाचे गुलाम नाही’ असे प्रत्युत्तर आहे. काँग्रेस संपली आहे. आता लढाई थेट भाजपशी आहे असे सांगून आगामी विधानसभा आमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

आंध्रला स्वतंत्र दर्जा देण्याच्या मागणीची पूर्तता करत नाही, याखातर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर भाजपविरोधी आघाडी उभी राहावी याच्या प्रयत्नात राहिले. त्यांना यावेळी आंध्रच्या राज्य आणि लोकसभा या दोन्ही स्तरावर वायएसआरसीच्या जगन रेड्डींनी चितपट केले. लोकसभेच्या २५ पैकी २४ जागा जगन रेड्डींच्या पक्षाने जिंकल्या. केवळ एक जागा चंद्राबाबूंच्या तेलगु देसमला मिळाली. विधानसभेच्या १७५ पैकी १४९ इतक्या भरभक्कम जागा जिंकून राज्य त्यांनी ताब्यात घेतले आहे.

शेजारच्या तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला ८ जागा मिळाल्या आहेत. त्यांचा काँग्रेसला विरोध होता. भाजपसोबतही त्यांना जायचे नव्हते. ते आणि जगन रेड्डी मतदानोत्तर तिसरी आघाडी बनवण्याच्या प्रयत्नात होते. पण भाजपच्या विजयी भूकंपाने हे प्रयत्न आता कोलमडून पडले आहेत.

ईशान्य भारतातील जेमतेम एक-दोन लोकसभेच्या जागा असलेल्या काही राज्यांतील विजयी पक्ष आधी भाजप आघाडीचा घटक होते. तथापि नागरिकत्वाच्या नव्या प्रस्तावित कायद्याच्या ते विरोधात असल्याने त्यांनी भाजपची साथ सोडली. बिजू जनता दलाचे ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही आपल्या मागण्यांची पूर्तता होत नाही म्हणून भाजपची साथ सोडली. त्यांना लोकसभेच्या यावेळी १३ जागा मिळाल्या. आपल्या मागण्यांसाठी ते पुन्हा भाजपची साथ करायला तयार आहेत. पण आता भाजपलाच गरज उरलेली नाही.

दिल्लीबरोबर पंजाब-हरयाणातही युतीचा आग्रह आपने धरल्याने काँग्रेसशी त्याची युती होऊ शकली नाही. परिणामी मागच्या वेळेप्रमाणे दिल्लीच्या सातही जागा याहीवेळी भाजपने घेतल्या. आप तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.

भाजप आणि काँग्रेस या दोहोंच्या आघाड्यांच्या बाहेर असलेली ही मंडळी हा काही तिसरा फ्रंट नाही. ते सगळे स्वतंत्र आहेत. त्यातले अनेक सेक्युलर, लोकशाहीवादी म्हणवणारे वा त्यांचा तसा इतिहास असलेले, तर काही थेट डावे आहेत. पण आज जवळपास हे सर्व केवळ आपल्या राज्याच्या वा पक्षाच्या अस्तित्वाच्या हितसंबंधांनी मर्यादित झालेले आहेत. वास्तविक काँग्रेसशी तात्त्विक पायावर त्यांची व्यापक आघाडी होऊ शकते. पण मुख्यतः व्यवहार व काही वेळा वैचारिक अहंता आड येते. भाजपविरोधी आघाडी मजबूत व्हायला तो मोठा अडथळा आहे. ...तूर्त अशा आघाडीने काही साधणार नाही. भाजपचे मजबूत स्वबळ आहे. मात्र, पुढच्या वाटचालीसाठी, सर्वसाधारण सहमतीच्या मुद्द्यांवर लढण्यासाठी ही साथसोबत गरजेची आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(महाराष्ट्र टाइम्स, २६ मे २०१९)

Wednesday, May 1, 2019

निकाल काहीही लागला तरी...

हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा महाराष्ट्रातील शेवटचे मतदान होऊन गेलेले असेल. त्यामुळे माझ्या खाली मांडलेल्या विचारांचा मतदानावर काही प्रभाव पडायची वा निवडणुकीत सहभागी पुरोगामी कार्यकर्त्यांच्या नाउमेद होण्याची काहीही शक्यता नाही.

आपल्या बोलण्या-लिहिण्याचा इतका मोठा परिणाम होतो असा समज ज्या पुरोगामी मित्रांचा आहे, त्यांच्यासाठी हे वरील स्पष्टीकरण दिले. हा लेख आधी आला असता तरी फारसे काही होण्याची शक्यता नव्हती. याच मनःस्थितीतून प्रवास करणाऱ्यांनी ‘हो, आम्हालाही असेच वाटते’ असे सांगितले असते, तर ज्यांना हे मंजूर नाही, त्यांनी आपला विरोध नोंदवला असता. निवडणुका चालू असल्याने त्याला थोडी अधिक धार असती एवढेच. असे अभिप्राय देणारे हे नेहमीचेच लोक असते.

याचा अर्थ ही स्थिती अशीच कायम राहणार आहे, असे माझे म्हणणे नाही. माणसे परिवर्तनशील असतात. परिस्थिती माणसाला आणि माणूस परिस्थितीला घडवत असतो. त्यातून काही आश्वासक क्रम उदयाला येतात. क्षीण का होईनात असे आश्वासक क्रम आजही कुठे ना कुठे दिसत असतात. या छोट्या व सुट्या धारांचा प्रवाह व्हावा ही अपेक्षा आहे. त्यामुळे माझ्या म्हणण्याला काही अर्थ आहे अथवा ते गैरलागू आहे याविषयी सम्यक भाष्य करण्याची अवस्था आज ना उद्या येईल ही शक्यता धरुन मी लिहीत असतो. पुढील मुद्दे नोंदवतानाही हीच अपेक्षा आहे.

मोदींच्या २०१४ च्या सत्ताग्रहणानंतर अनेक पुरोगामी कार्यकर्ते संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराला लागले. मीही त्यातलाच. आधी अशी नड भासली नव्हती. संघप्रणीत फॅसिस्ट प्रवृत्तींचा धिंगाणा आधीही होता. पण सत्तेत आल्यावर तो तुफान वेगाने वाढला. त्याचा धक्का आम्हाला जोरदार बसला. पूर्वी ही प्रचिती नव्हती. काँग्रेसच्या पुढाकाराखालील सरकारविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने लढू शकत होतो. या राजवटीत ती शक्यता राहिली नाही. हा अनुभव अनेक पुरोगामी जाहीरपणे दोन राजवटींची तुलना करताना हल्ली सांगतात. आज संविधानाला दिसणारा धोका पूर्वी वाटत नव्हता.

...तर असे संविधानाच्या रक्षण-संवर्धनाच्या कामात सक्रिय असलेले वा त्याविषयी आस्था असणारे सर्व छटांचे पक्षीय, बिगरपक्षीय, केवळ जनसंघटनावाले, काही एनजीओवाले पुरोगामी एकत्र येण्याचा क्रम सुरु झाला. विविध कार्यक्रम, आंदोलने होऊ लागली. माझा ज्या व्यापक उपक्रमांत सहभाग राहिला त्यातला एक संविधान दिनी देवनार ते चैत्यभूमी ‘संविधान जागर यात्रा’ संघटित करण्याचा आणि दुसरा चवदार तळ्याच्या संगराच्या पूर्वदिनी रायगड ते महाड असा शिवराय ते भीमराय ‘समता मार्च’ काढण्याचा. अजूनही आनुषंगिक बरेच उपक्रम झाले. हजारोंचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमांत आम्ही सर्वांनी ‘भाजपविरोधात एकास एक उमेदवार’ सर्व लोकशाहीवादी पक्षांनी एकत्र येऊन दिले पाहिजेत असे आवाहन करत होतो. सहभागी पक्षांपैकी कोणी त्याला जाहीरपणे नकार दिला नव्हता. उलट बहुतेकांनी पाठिंबाच दिला होता.

प्रत्यक्षात लोकसभेच्या या निवडणुकांत ही एकजूट आकाराला आलेली नाही, ही दुःखद वस्तुस्थिती. आमचे आवाहन हवेत उडून गेले. अर्थात आमच्या आवाहनाच्या ताकदीने हे होणार होते असेही नाही. पण जे झाले ते अत्यंत त्रासदायक आहे. याची कारणे काय?

एक कारण दिले जाते ते असे- “काँग्रेसने आमच्याशी सन्मानजनक बोलणी केली नाहीत. आम्हाला न्याय्य प्रमाणात जागा दिल्या नाहीत. शेवटी आम्हाला आमच्या पक्षाचे अस्तित्व टिकवायचे तर स्वतंत्रपणे उभे राहणे भाग आहे. अर्थात, आम्ही लढवत असलेल्या जागा सोडून अन्य ठिकाणी भाजपला हरवू शकेल अशाच उमेदवाराला पाठिंबा द्या, असे आम्ही आवाहन करतो आहोत.” काहींनी आम्ही अमक्या ठिकाणांहून लढणार आहोत, असे आधीच जाहीर केले. त्याचे कारण “चर्चेला बसल्यावर कमीजास्त करण्यासाठी असे दबावतंत्र अवलंबावे लागते,” असे ते देतात.

दुसरे कारण- “काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुठच्या उमेदवाराचा प्रचार करायचा? हे सगळेच लबाड. त्यांच्या विरोधातच तर आम्ही कायम लढतो आहोत. बरे, त्यांना काही विचाराशी देणेघेणे नाही. तिकिट मिळणार नाही असे दिसताच हे टगे सहजी उठून भाजपमध्ये डेरेदाखल झाले. अशांना कुठे फॅसिझमशी लढायचे आहे? हे तर त्यांचे मित्रच आहेत. अशावेळी का म्हणून आपण आपल्या समुदायांना अशा पक्षांना सहाय्य करायला सांगायचे? आपली लढाई लांबपल्ल्याची आहे. ती आपली आपण लढावी.”

तिसरे कारण- “वंचित-बहुजनांच्या स्वायत्त राजकारणाच्या उभारणीचे. आज तयार झालेला अस्मितेचा माहोल वाया न घालवता त्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी आम्हीच मुख्य प्रवाह आता होत आहोत. तेव्हा एकास-एकचा प्रश्न येतोच कुठे?”

चौथे कारण दिसते ते असे- काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर बोलणी करण्यासाठी डावे, पुरोगामी पक्ष एकत्र येत नाहीत. त्यांचे आपसांतही जागांवर एकमत होत नाही. वा होणार नाही असा अंदाज असतो. त्यात काही बढे भाई म्हणून पेश येतात. म्हणून मग ते स्वतंत्रपणे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर बोलणी करतात.

जर फॅसिझमचा धोका एवढा प्रचंड असेल, मोदी निवडून आले तर आजची घटना राहील की जाईल, पुन्हा निवडणुका होतील की नाही ही शंका आहे. म्हणजेच आपल्या सर्वांचेच अस्तित्व शिल्लक राहणार की नाही असा प्रश्न आहे. अशावेळी आपल्या पक्षाचे अस्तित्व वा आपला सन्मान ही मुख्य बाब कशी काय होऊ शकते? संसदीय प्रणालीची, आजच्या राजकीय व्यवहाराची, आपले समुदाय टिकवून धरण्याची ती अपरिहार्यता आहे, असे या डाव्या-पुरोगामी पक्षांतील मित्र सांगतात. या अपरिहार्यतेचा मार्क्सवाद, आंबेडकरवाद, गांधीवाद वा समाजवाद वा अन्य प्रगतीशील विचारसूत्रांच्या आधारे केलेले विश्लेषण किमान निकालानंतर तरी त्यांनी करणे गरजेचे आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ अधिकृत परंपरा संविधानवादी असली व अजूनही त्यांत या परंपरेचे वहन करणारे नेते-कार्यकर्ते वा त्यांना प्रतिसाद देणारी जनता असली तरी त्यांतल्या बहुसंख्य नेत्यांचा राजकारण हा वैयक्तिक उन्नतीचा धंदा आहे, ही काही नवी गोष्ट नाही. त्यांची त्यांच्यातच चाललेली कुरघोडी, परस्परांचे पाय कापणे आपण रोज पाहतो आहोत. तरीही फॅसिस्ट भाजपच्या तुलनेत ते चालतील, आज फॅसिझमचा पराभव करु, नंतर या राजकीय धंदेवाल्यांशी लढू असे आपण म्हणतो. कारण आज या दोहोंचा एकाचवेळी पराभव करुन आपण सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नाही, हे आपल्याला कबूल असते.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरंजामी चारित्र्य, आपसातली कापाकापी ही जुनीच बाब आहे. पण आपण डावे, पुरोगामी एकत्र येऊन आपसात जागांची निश्चिती करुन त्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी एकत्रित बोलणी का करु शकत नाही? आपल्यातल्या या एकसंधतेच्या उणीवेला काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार आहेत का? आपल्यातल्या काही पक्षांना फोडण्याचा, ज्यांची विशिष्ट मतदारसंघात काही ताकद आहे अशा पुरोगामी पक्षांतल्या महत्वाकांक्षी नेतृत्वाला काही आमिषे दाखवण्याचा प्रयत्न ते जरुर करु शकतात. पण त्यास बळी पडणारे आपल्यातले लोक ही आपली कमजोरी झाली. बरे, दोन डाव्यांच्या बाबत तर हाही प्रश्न नाही. मग ते एकत्र येऊन जागांची बोलणी का नाही करत? यातले द्वंद्व काय ते कळत नाही.

निवडणुकांपूर्वी कधीच अशी पुरोगाम्यांची सरसकट जूट झालेली नाही. ती नेहमी निकालानंतर झालेली दिसते, असे सीताराम येचुरी अलिकडेच म्हणाले. कबूल. पण आज फॅसिझम असताना व आपली सगळ्यांची जाहीर इच्छा त्यांच्याविरोधात एकत्र लढायची असतानाही हे चालू द्यायचे का? बरे, ही वस्तुस्थिती झाली. पण त्यामागची कारणे काय? प्रादेशिक, स्थानिक अडचणी, गुंते, हितसंबंध इ.. पण ते आवाक्यात कसे आणायचे?

वायनाडला राहुल गांधी उभे राहिले. माझ्या मते त्यांनी तसे करायला नको होते. पण राहुल गांधींहून अधिक वैचारिक तयारी, अंतर्विरोधांच्या उकलीचे कौशल्य आणि राजकीय जाणतेपण असलेल्या डाव्यांनी राहुल गांधींची ही कृती गैर आहे, पण फॅसिझमचा धोका ज्या तीव्रतेने आम्हाला जाणवतो तो परतवण्यासाठी आम्ही या जागेहून लढत नाही, अशी भूमिका घेणे का शक्य झाले नाही? अशी ताकद डावे का दाखवू शकले नाहीत?

बेगुसरायला कन्हैया कुमार उभा आहे. त्याबाबतही तेच. महाठबंधनाचा पाठिंबा असेल तरच लढायचे ही कन्हैयाची आधीची भूमिका होती. भाजप निवडून आलेल्या या जागेवर आरजेडी गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आणि कम्युनिस्ट तिसऱ्या स्थानावर होते. आपला दावा सबळ करायला हे कारण आरजेडीकडे होते. वास्तवात आरजेडीच्या तरुण नेतृत्वाला आपल्याला बिहारात नवा तरुण प्रतिस्पर्धी नको आहे, असे बोलले जाते. काहीही असो. आता तिथे तिरंगी लढत आहे. कन्हैयाने महागठबंधनाचा पाठिंबा नसला तरी निवडणूक लढायचे ठरवले. त्याच्या प्रचाराला मिळणाऱ्या प्रतिसादाची दृश्ये रोमांचक आहेत. त्याला आर्थिक तसेच अन्य सहाय्य लोक ज्याप्रकारे करत आहेत, ती फार आश्वासक बाब आहे. केवळ पैसेवाला नव्हे, तर कोणीही सामान्य मनुष्य निवडणुकीला उभा राहू शकतो, हे घटनेतील आदर्श तत्त्व बेगुसरायमध्ये प्रत्यक्षात आलेले दिसते आहे. कन्हैया इथे निवडून येऊ शकतो, असे अनेकांना वाटते. तो निवडून यावा म्हणून मीही देव पाण्यात घालून बसलो आहे. त्याच्या हजरजबाबी, विचारपरिप्लुत आणि अमोघ वक्तृत्वाच्या लोकसभेतील दर्शनाला मी आतुर आहे.

...पण माझ्या पाण्यात घातलेल्या देवांनी दगा दिला तर! तर तिथे भाजप निवडून येईल. मग आजवरच्या कन्हैयाच्या फॅसिझमविरोधातल्या लढाईचे काय करायचे? अशी शक्यता थोडीशी जरी असेल तरी कन्हैयाने लढता कामा नये होते. कम्युनिस्टांनी जाणतेपणाने एकतर्फी माघार घेऊन आरजेडीला पाठिंबा द्यायला हवा होता. शिवाय कन्हैया आज एका मतदारसंघातच अडकला आहे. तो देशभर हिंडून भाजपची धज्जियां उडवायला फिरला असता तर त्याचा कितीतरी अधिक उपयोग नसता का झाला?

आम्ही डावे वा पुरोगामी यांची ताकद क्षीण होते आहे. आम्ही न वाढण्याचे कारण काँग्रेस आहे का? १९७७, १९८९ हा आलेख काँग्रेसच्या खाली जाण्याचा आहे. या काळात आम्ही का नाही वाढलो?  जातीयवादी शक्ती कशा काय वाढल्या? गांधीहत्येनंतर वळचणीला गेलेला संघपरिवार राक्षसी बहुमताने २०१४ ला आमच्या उरावर कसा काय बसतो?. ..याचा विचार आपण करत आलो आहोत. नाही असे नाही. पण त्यातून मिळालेल्या बोधाप्रमाणे वळत नाही आहोत. पुढचे आपले डावपेच त्याप्रमाणे ठरताहेत असे दिसत नाही.

काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ‘गेल्या ५०, ६० वर्षांत काहीही झालेले नाही, गरीब अधिक गरीब झाले...’ या प्रकारे आपण बोलत आलो. आज मोदींनी तेच पकडले आहे. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीही केलेले नाही, हे ते या जुन्या आधारावर दणकून बोलत आहेत. आपली त्यामुळे पंचाईत होते आहे. प्रत्युत्तरादाखल गेल्या ७० वर्षांत काय काय झाले हे नाईलाजाने सांगण्याची आपल्यावर पाळी येते आहे. वास्तविक काय झाले आणि काय नाही, काय राहिले, कुठे घसरण सुरु झाली असे साकल्याने मांडण्याची आपली तऱ्हाच नाही. युनियनच्या वा जनसंघटनांच्या मोर्च्यांसमोर आपण केलेली, ऐकलेली भाषणे आठवावीत.

संसदीय प्रणालीत खूप अपुरेपणा आहे. पण घटनाकारांनी या अपुरेपणाचा विचार करुन आजच्या घडीला तीच आम्हाला उपयुक्त आहे, असा निर्वाळा दिला. तथापि, आमच्या चळवळीच्या गाण्यांत ‘संसद हे दुकान आहे’ किंवा ‘उचला पुढारी-आपटा पुढारी’ असे टीपेला जाऊन म्हटले जाते. यातून समोरच्यांवर आम्ही काय संस्कार करत आलो? आजच्या लोकशाहीला अर्थपूर्ण करण्यासाठी आपण दलित, आदिवासी, कष्टकऱ्यांनी लढले पाहिजे असा संदेश न देता या निवडणुका, ही लोकशाही ‘सब झूट है’ हाच विचार रुजवतो. भ्रष्टाचार हाच सर्व दैन्याचे कारण व तो मोडायला सबगोलंकारी पद्धतीने संसदेला घेरण्याच्या आंदोलनांनी आम्ही हर्षोत्फुल्ल होतो. त्यात पुन्हा एकदा संपूर्ण क्रांतीचा उभार आम्हाला दिसू लागतो. या उभाराच्या परमानंदात काँग्रेसबाबतची शिसारी भाजपला आमची दोस्तशक्ती बनवते. अण्णांच्या आंदोलनात डावे, मधले, उजवे एका सूरात ‘इन्किलाब’ची घोषणा देताना आपण पाहिले आहेत.

...मोदींना लोकशाही मोडून कल्याणकारी हुकुमशहाची छबी तयार करायला हे आम्ही तयार केलेले वातावरण आयतेच मिळाले आहे.

आमच्या एकत्रित कृतीच्या परिणामांची आम्ही चिकित्सा काही करतो का हा मला प्रश्न आहे. डाव्या पुरोगामी पक्षांनी आधी रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली रिडालोस तयार केले. ते भाजपच्या वळचणीला गेल्यावर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लोकशाही आघाडी तयार केली. ती अधिकृतपणे विसर्जित न करता प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी सुरु केली. जे डावे वा पुरोगामी त्यांच्यासोबत गेले नाहीत वा त्यांच्याशी प्रकाश आंबेडकरांनी या नव्या मोहिमेबद्दल ती सुरु करताना चर्चाही केली नाही, त्या डाव्या-पुरोगाम्यांनी याबद्दल कुठचाच प्रश्न बाळासाहेबांना विचारला नाही. बाळासाहेब त्यात नाहीत, तरीही जुनी आघाडी सुरु आहे, असेही दिसत नाही. आता निवडणुकीत बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल या पक्षांचे खाजगीत काहीही मत असले तरी जाहीरपणे त्यातील काही व्यक्तीच बोलल्या. त्यांच्याविषयी पक्षपातळीवर विश्लेषणाचा ठोस आधार असलेली भूमिका डावे, समाजवादी, पुरोगामी घेऊ शकलेले नाहीत. बाळासाहेबांनी स्वतःसह आपल्या वंचित आघाडीच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्यानंतर काही काळाने बाळासाहेबांच्या उमेदवारीला जवळपास सगळ्यांनी आणि त्याव्यतिरिक्त काही ठिकाणच्या त्यांच्या ‘चांगल्या’ उमेदवारांना आपापल्या सोयीनुसार पाठिंबा या मंडळींनी दिलेला दिसतो. ...फॅसिझमला हरवण्यासाठीच्या लढाईच्या डावपेचातली ही आमची सुसंगत कृती आहे, असे ही मंडळी मनापासून म्हणू शकतात का? बाळासाहेबांना मानणारा बौद्ध समुदाय नाराज होऊ नये, ही लघुदृष्टीच त्यामागे दिसते.

काही पक्षीय तसेच बिगरपक्षीय जनसंघटनेचे पुरोगामी कार्यकर्ते निःसंदिग्धपणे भाजपचा पराभव इच्छित असले आणि हा पराभव आम्ही करु शकत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यावा असे मनोमन त्यांना वाटत असले तरी, जमेल तसे ते आपल्याशी संबंधितांना खाजगीत सांगत वा सूचित करत असले तरी, थेट प्रचारात सक्रिय राहणे त्यांना अडचणीचे वाटते आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या त्यांच्या मतदारसंघातील उमेदवाराचे चारित्र्य. या कार्यकर्त्यांचा या उमेदवाराबद्दलचा आधीचा अनुभव आणि त्याच्याशी झालेला लोकांच्या प्रश्नांवरील संघर्ष. हे सगळे विसरुन त्याच्या बरोबरीला बसून प्रचार करायचा म्हणजे कसे काय? लोक काय म्हणतील? हेही मॅनेज झाले असा अपप्रचार नाही का होणार? आपल्या कार्यकर्तेपणाच्या नैतिकतेचे काय?

...मला वाटते आपल्या तसेच अन्य सर्व लोकांना जाहीरपणे मनापासून आपली भूमिका सांगणे गरजेचे आहे. त्याउपर कोणाला काय वाटायचे ते वाटो. फॅसिझमला संपवण्याच्या लढ्यासाठी स्वतःची वा संघटनेची प्रतिमा पणाला लावायची वेळ आली तरी बेहत्तर असा हा काळ आहे. फॅसिझमला हरवण्याच्या लढाईत मी कोणत्याही कारणाने कच खाल्ली हे अर्थातच भूषणावह नाही.

या सर्व स्थिती-वृत्ती-विचारांच्या घालमेलीच्या पार जाऊन भाजपविरोधी आघाडीच्या विरोधात सशक्त प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात अनेक पुरोगामी ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते उतरलेले दिसतात. अनेक कलावंत, साहित्यिक, पत्रकार यांनी या निवडणुकीत भाजपविरोधी मतदान करण्याचे जाहीर आवाहन केलेले आहे. हे क्रम छोटे पण आश्वासक आहेत.

मोदींनी २०१४ ला विकासाच्या नावाने मते घेतली व सत्तारुढ झाले. त्यानंतरचा प्रत्यक्ष कारभार हा स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळीतून साकार झालेली आणि संविधानात औपचारिकरित्या बद्ध झालेली मूल्ये उध्वस्त करण्याचाच राहिला. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे भारताची सर्वसमावेशक वीण उसवणारा संघपरिवारप्रणीत संघटनांचा हैदोस आणि त्याला राज्यकर्त्यांचा आधार व संरक्षण हे आपण नित्य अनुभवले.

निकाल काहीही लागला तरी, म्हणजे मोदी पुन्हा सत्तेवर आले तर अधिकच आणि सत्तेवरुन गेले तरीही या मंडळींनी पेरलेले हे विष उतरवणे, त्यांनी उसवलेली वीण ठीकठाक करणे हे खूप चिवट व दीर्घ पल्ल्याचे काम राहणार आहे. त्यासाठीच्या लढ्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी वरील प्रश्नांना पुरोगामी पक्षांना-कार्यकर्त्यांना भिडावेच लागेल.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, मे २०१९)