“एका स्त्रीवर अत्याचार झाला आहे, असे का तुम्ही म्हणत नाही? दलित स्त्री असे का म्हणता? जातीला का मध्ये आणता? हा जातिवाद नाही का? आम्ही तर एका स्त्रीवर अन्याय झाला आहे, याच भावनेतून निदर्शनाला आलो.”
मनीषा वाल्मिकी अत्याचार व हत्येच्या विरोधातील आमच्या एका निदर्शनाला आलेल्या कथित वरच्या जातीतील स्त्रीचा प्रश्न. आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या परीने उत्तर दिलेही. पण हा प्रश्न इथेच व याचवेळी विचारला गेला असे नाही. अशा प्रकरणांत तो वारंवार पुढे येतो.
माझे अशावेळी सहकाऱ्यांना सांगणे असते- ‘प्रथम त्यांच्या सहभागी होण्याचा मनापासून आदर करा. त्यांच्या जात-वर्ग थरातील लोक सर्रासपणे अशा निदर्शनांत येत नाहीत, अशावेळी ही जी त्या थरातील एकटी-दुकटी माणसे येतात त्यांच्याबद्दल आपली भावना आदराची हवी. त्यांचा प्रश्न, शंका स्वीकारा. त्याला तात्काळ युक्तिवादाने उडवून लावू नका. शांतपणे त्यांच्याशी संवादी चर्चा करा. आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करा. ते त्यांना पटलेच पाहिजे, अशी अपेक्षा व आग्रह मात्र ठेवू नका. ही मंडळी स्त्रीवरील अन्यायाच्या विरोधात उभी राहत आहेत, हीही स्वागतार्हच बाब आहे. समाजाला पुढे नेणारीच बाब आहे. आपल्या मित्र यादीत या लोकांना घालून त्यांच्याशी संपर्क ठेवायला हवा.’
मनीषा वाल्मिकीवरील अत्याचार व निर्घृण हत्येच्या विरोधात यावेळी करोनाचा काळ व त्यामुळे एकत्र जमायला बंधने असतानाही खूप निदर्शने झाली. दलितांच्या संघटनांनीच फक्त ती केली असे नाही. भाजप सोडून जवळपास सर्व पक्षांनी आपापल्या परीने अशी निदर्शने केली. काँग्रेस यात यावेळी आघाडीवर होता. राहुल-प्रियंका यांना झालेल्या हाथरस येथील धक्काबुक्कीने या निदर्शनांना आणखीनच जोर आला. या निदर्शनांत दलितेतर मंडळींचा लक्षणीय सहभाग होता. यावेळी मुस्लिम समाजाने काही ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेऊन निदर्शने संघटित केली होती, हे विशेष. CAA-NRC विरोधातील आंदोलनाचा संदर्भ याला असावा. आपण एकटे पडता कामा नये, समाजातील अन्य पीडित विभागांशी सहकार्य गरजेचे आहे, याची जाणीव त्यामागे असावी. मोदी-योगी राजवटीमुळे समाजातील मागास प्रवृत्तींना मिळालेला आधार व प्रोत्साहन, वाढते आर्थिक ताण यांमुळे देशातील लोकशाहीवादी व्यक्ती, पक्ष, संघटना यांत असलेली तीव्र नाराजी मनीषा वाल्मिकी अत्याचाराविरोधात एकवटली असेही दिसते.
‘निर्भया’ प्रकरणावेळी कथित वरच्या जातीतील विद्यार्थी, महिला, पुरुष प्रचंड संख्येने व संतापाने रस्त्यावर उतरले होते. एकीकडे स्वत्वाचे भान आलेली शिक्षित तरुण मुली-मुले, दुसरीकडे राजधानी असली तरी दिल्लीचे मुंबईसारख्या शहरांच्या तुलनेत स्त्रीला अधिक दुय्यम लेखणारा सांस्कृतिक माहोल आणि दिल्लीतील त्या दरम्यानची विविध कारणांनी तयार झालेली अस्वस्थता यांमुळे निर्भया प्रकरणात प्रचंड उद्रेक झाला. वरच्या जातीतील स्त्रियांवरील सर्वच अन्यायाविरोधात इतक्या जोराच्या, तीव्रतेच्या प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत. अर्थात, दलित स्त्रियांवरील अन्यायाबाबत तेवढेही होत नाही. मनीषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणातील आताचा प्रतिसाद हा अपवाद वाटावा असाच आहे. ज्याचा प्रश्न त्यानेच उतरावे, इतरांना त्याच्याशी देणेघेणे वाटत नाही, एकप्रकारचे अलिप्तपण हे अलीकडे खूप वाढले आहे. मात्र, दलितांच्या प्रश्नाबाबत हे नित्याचे वैशिष्ट्य आहे. तेथे केवळ अलिप्तता नसते, तर त्यापलीकडे मनात अजून काही असते. त्यात द्वेष, घृणा, आपली पायरी सोडून वागतात, माजलेत...यातले एक किंवा दोन किंवा सगळेच थोडे थोडे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांचा संघर्ष सर्वज्ञात आहे. तथापि, सवर्ण हिंदूंत अस्पृश्यता पाळण्याबद्दल एक अपराधभाव जागवण्याची मोठी कामगिरी गांधीजींनी केली. आज ते राहिलेले नाही.
कथित वरच्या जातीतील पुरोगामी कार्यकर्ते-कार्यकर्त्या अशी निदर्शने संघटित करण्यापासून ती जिथे होतील तिथे सहभाग द्यायला, त्याला हरप्रकारे सहाय्य करायला तयार असतात, ही नेहमीची बाब आहे. पण त्यांच्या सहभागाने त्यांचा समाज आला असे होत नाही. असे होत नाही तोवर आपण एक राष्ट्र बनू शकत नाही, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते खरे आहे. आत्ममग्नतेच्या सार्वत्रिक मर्यादा लक्षात घेतल्या तरी सवर्ण स्त्रीवरील अन्यायाच्या वेळी जेवढ्या व्याप्तीने हळहळ, संताप व्यक्त होतो तेवढा दलित स्त्रीवरच्या अन्यायाबाबत होत नाही. दलित पुरुषांबाबतही होत नाही. आणि मुसलमानांबद्दलही होत नाही. मुसलमानांबद्दल ते आपल्या बरोबरीचे या देशाचे समान हकदार आहेत, याला मनातून प्रचंड प्रतिरोध असतो. पण महाराष्ट्रातले बौद्ध सोडल्यास किरकोळ अपवाद वगळता अन्य दलित जाती या ‘हिंदू’ आहेत. मात्र तरीही त्यांना ‘आपले’ मानले जात नाही.
याच भावनेचा संबंध मनीषावर ती दलित स्त्री आहे म्हणून अत्याचार होण्याशी असतो.
जिथे लोक थेट एकमेकांना ओळखत नसतात अशा शहरातील रस्त्यावर विशिष्ट जात-धर्म-प्रदेशाचा बोध होणार नाही असा सर्वसाधारण पोषाख घातलेल्या एखाद्या अनोळखी स्त्रीची छेड काढली जाते, तेव्हा ती केवळ ‘स्त्री’ची छेड असते. छेड काढणाऱ्याला या स्त्रीची जात, धर्म ठाऊक नसतो. ती दलित असली तरी ती दलित आहे म्हणून तिच्यावर अन्याय झालेला नसतो. एक स्त्री म्हणूनच झालेला असतो. अशावेळी दलित स्त्रीवर अन्याय झाला हे म्हणण्यात अर्थ नाही. मात्र गावात, वस्तीत जिथे जाती-धर्म ठाऊक असतात, त्यांच्यातील ताणतणावांचा इतिहास असतो, तिथे होणारी घटना केवळ स्त्री वा पुरुषावर होणाऱ्या अन्यायाची असेल असे नाही. म्हणजे प्रत्येक अन्यायामागे जाती-धर्माचे संदर्भ असतात असा एकशे एक टक्के पद्धतीचा निष्कर्ष काढू नये. मात्र शक्यता ही जाती-धर्माच्या संदर्भांची अधिक असते.
मनीषा वाल्मिकीच्या बाबत तर तिच्या आजोबांपासूनचा संबंध आहे. छेडछाडीच्या प्रकरणात मनीषाच्या आजोबांनी आरोपी संदीप ठाकूरच्या आजोबांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली तक्रार केली होती. तेव्हापासून त्यांच्यात ताण होते. वाल्मिकींची दोनचार घरे आणि बाकी बहुसंख्य ठाकूर समाज असे असताना ही हिंमत वाल्मिकींची होतेच कशी, हा मोठा दुखरा भाग यात आहे. अत्याचार व खूनाची घटना घडल्यानंतर आता तिथे स्थानिक भाजप नेत्याच्या पुढाकाराने ठाकुरांच्या बैठका होत आहेत. आरोपींच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले जाते आहे. या स्त्रियांवर संस्कार नसतात, म्हणून त्यांच्याबाबतीत हे घडते असे बेमुर्वतपणे अजून काही भाजप नेते बोलतात. या वातावरणात मनीषावर होणारा अत्याचार व त्यानंतर तिचा खून या घटना दलित म्हणून आहेत. स्त्री ही अब्रूची वाहक असते या धारणेमुळे जुन्या काळापासून युद्धात, अलीकडच्या दंगलींत विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होत आलेत. तोच भाग इथेही आहे. दलितांना धडा शिकवायला त्यांच्या मुलीला लक्ष्य केले गेले.
म्हणूनच मनीषावरील अत्याचार हा दलित व स्त्री असा दुहेरी आहे. यात पहिले आहे तिचे दलितपण. नंतर स्त्रीपण. म्हणून मनीषावरील अत्याचाराबाबत बोलताना ‘दलित स्त्री’ वर अत्याचार असेच बोलणे योग्य आहे. ज्यांना ती स्त्री आहे हेच महत्वाचे वाटते त्यांना हा सर्व समज नाही. त्यांना तो द्यावा लागेल. भारतातील जात-वास्तव समजावून सांगावे लागेल. तुम्ही वैयक्तिकरित्या जात मानत नसाल, तो संदर्भ तुमच्या मनात येत नसेल, यावरुन सगळ्या समाजाचे मापन करणे वास्तवाला धरुन होणार नाही.
दलितांवरील अन्यायाच्या विरोधात दलित समाजाने बंड करुन उठणे हे भागच आहे. त्याला पर्याय नाही. गुलामाला गुलामीची जाणीव करुन दिल्याशिवाय तो बंड करुन उठत नाही, हा बाबासाहेबांचा संदेश मूलभूत आहे. मी तुमच्या अन्यायापुढे मान तुकवणार नाही. तुम्हाला व्यवस्था-संस्कृतीने दिलेली अधिमान्यता मला मंजूर नाही. मी ती मानत नाही, हे अन्यायी उच्चजातीयांच्या नजरेला नजर भिडवून दलितांनी सांगणे, ही समतेच्या लढ्याची पूर्वअट आहे. त्याचबरोबर या कथित उच्चजातीयांच्या जातीत त्यांच्या अंतर्गत संघर्ष करणारे मित्र मिळवणेही तेवढेच गरजेचे आहे. केवळ कायदा बाजूने असून चालत नाही. दलित अत्याचारविरोधी कायदा आहे, त्याखाली तक्रारीही दाखल होतात. पण ५ टक्क्यांच्या पुढे देशात दोषसिद्धी नाही, हे कशाचे लक्षण आहे? ज्या जातवर्गाचे वर्चस्व व्यवस्थेवर आहे, त्यांच्याविरोधात स्थानिक पोलीस वा प्रशासन जात नाही. वरुन दबाव आला तर ते हलल्याचे दाखवतात. पण त्यांच्या हातात जेवढे असते तेवढ्यात पुरावे नष्ट करुन ते ती केसच कमजोर करुन टाकतात. पुढे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले तरी पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारेच निकाल लागतो. स्थानिक पातळीवरच केस कमकुवत ठेवली की तिचे पुढचे भवितव्यही अनिश्चित होते. म्हणूनच विरोधकांच्या जातीतही आपले मित्र असण्याला खूप महत्व आहे. त्यामुळेच असलेले मित्र टिकवणे व नवे जोडणे ही प्रक्रिया जाणीवपूर्वक व सातत्याने करावी लागेल. जिथे राहायचे आहे तिथे आपण अल्पसंख्य आहोत, बहुसंख्य व साधनसंपन्न, सत्तासंपन्न मंडळी ती आहेत. अशावेळी सरकारने कितीही आश्वासन दिले, कितीही बंदोबस्त ठेवला तरी तो तात्पुरता असेल. लांब पल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी तिथेच आपला दोस्ताना बळकट करणे गरजेचे आहे. खैरलांजी प्रकरणात दलित अत्याचार असतानाही दलित अत्याचार कायदा लागला नाही, हे आपण पाहिले. शिवाय तिथली इनमिन तीन असलेली दलित कुटुंबे पुढे त्या गावातूनच परागंदा झाली. कोणी म्हणेल, म्हणूनच आम्ही म्हणतो दलितांच्या स्वतंत्र वसाहती झाल्या पाहिजेत. बाबासाहेबांनी या मुद्द्याचा एकदा उच्चार केला. पण पुढे तो काही चळवळीचा कार्यक्रम त्यांनी केला नाही. तथापि, आजही ही कल्पना दलित बुद्धिजिवींमधून कधीतरी पुढे येत असते. या कल्पनेची आजच्या काळातली व्यवहार्यता हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. मात्र त्याने देश एक होण्यासाठी आवश्यक असलेला बंधु-भगिनीभाव निश्चित तयार होत नाही. बाबासाहेब समता, स्वातंत्र्य या मूल्यांच्या रक्षणासाठी बंधुता ही आवश्यक अट मानतात.
विरोधकांच्या जातींतून मित्र मिळण्याची प्रक्रिया हल्ली खूप कमी झाली आहे. अशावेळी एक एक माणूस जोडण्याला महत्व द्यायला लागेल. पण इथेच एक दुसरी अडचण तयार होते. ती पूर्ण एकतर्फी नाही. दोन्हींकडे त्याबाबतची जबाबदारी जाते. मात्र त्यातले पेच हेरुन त्यांची सोडवणूक करण्याची निकड दलित शिक्षित मध्यमवर्गात अभावानेच आढळते.
दलित स्त्रीवर अत्याचार झाला. आता कुठे आहेत निर्भयावाले?, कुठे गेले ते मेणबत्तीवाले? ..असे प्रश्न दलित शिक्षित मध्यमवर्गातून विचारले जातात. हे प्रश्न खोटे नसतात. पण ते विचारण्याच्या शैली व आविर्भावामुळे सवर्णांच्या विवेकाला आवाहन करण्यात ते कमी पडतात. त्यांच्यातील अपराधभाव जागवण्याऐवजी समर्थनाचे काटे पिंजारायला मदत करतात. या कथित उच्च जातीयांतले विरोधक चवताळतात. अधिक विरोधात जातात. तर मित्र असलेले सवर्ण व्यथित होतात. त्यांना एकीकडे दलितांची बाजू घेतात म्हणून त्यांच्या समाजात विरोधाला, टोमण्यांना सामोरे जावे लागते. तर दुसरीकडे ज्यांची बाजू आपण घेतो ते आपल्याला आपले म्हणत नाहीत, ही भावना त्यांना कष्टी करते.
कार्यकर्ते ही माणसे आहेत. पुरोगामी चळवळीत आली म्हणजे ती आपापल्या जात-वर्गाच्या संस्कारांतून पूर्णपणे बाहेर निघाली असे होत नाही. ती प्रक्रिया आहे. स्वतःला सतत तपासत राहावे लागते. चिमटे काढत राहावे लागतात. डीकास्ट, डीक्लास होणे यासाठी मनाच्या नियमित व्यायामाची व परीक्षणाची गरज असते. डीकास्ट होणारा डीक्लास होतोच असे नाही. तर डीक्लास झालेला डीकास्ट झालेला असेल असे नाही. डीकास्ट व डीक्लास याबरोबरच डीअहंता हा प्रकारही असायला हवा. तो खूप अडथळे करतो. जातिभेदाबद्दल घृणा असलेल्या, कथित तळच्या जातीतील जोडीदार निवडलेल्या, वडिलोपार्जित संपत्तीचा तसेच उत्तम करिअरचा त्याग करुन फकिरी जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्याला/कार्यकर्तीला ‘मी’ हे केले याचीच अहंता असू शकते. त्यातून त्याच्या अस्तित्वाला, त्याच्या म्हणण्याला विशेष किंमत मिळायला हवी, या भावनेचा विंचू त्याला नकळत डसतो. त्याच्या ध्यानीमनी नसताना मग सोबतचे कार्यकर्ते दुखावतात. ते जर कथित तळच्या जातसमूहातले असले तर त्यांना ते अधिकच लागते. हा कॉम्रेड किंवा साथी आपली वरची जात विसरलेला नाही, असे आरोप मग सुरु होतात. ज्यांना या कथित वरच्या जातीच्या कार्यकर्त्याशी स्पर्धा करायची असते, ते जाणीवपूर्वक त्याचे भांडवल करतात.
संघटनेतील कथित तळच्या जातसमूहातील कार्यकर्त्यांची नेतृत्वक्षमता वाढावी यासाठी पोषक वातावरण तयार करणे, काही खास प्रयत्न करणे, आपण मागच्या ओळीत उभे राहून (म्हणजे बॅकसीट ड्रायव्हिंग नव्हे) पुढच्या रांगेत त्यांना उभे करणे, सुकाणू त्यांच्या हाती देणे हे सवर्ण नेतृत्वाने ठरवून करायला हवे. दलित-बहुजनांचा प्रश्न मी उत्तम प्रकारे मांडू शकतो, त्यासाठी लढू शकतो, हे शंभर टक्के खरे असले तरीही ही मागची रांग स्वीकारणे उच्च जातीय कार्यकर्त्यांना भाग आहे. तो त्यांच्या क्षमतेचा वा निष्ठेचा प्रश्न नाही. इतिहासातली ती कर्जे आहेत. लाभार्थी सांस्कृतिक मिरासदारांचे वारसदार म्हणून आपल्याला ती फेडावीच लागणार हे मनाने स्वीकारायला हवे. उच्च जातीय कार्यकर्त्यांचा भरणा असलेल्या संघटनेत पूर्ण नेतृत्वक्षमता असलेला निम्न जातीय कार्यकर्ता डावलला जातो, ही उदाहरणे आहेत. जिथे जाणीवपूर्वक निम्न जातीय कार्यकर्त्यांना वाव दिला जातो, अशीही उदाहरणे आहेत. ती वाढली पाहिजेत. अधिक ठळकपणे दिसली पाहिजेत.
ज्या विभागांचे प्रश्न असतात, त्यांच्या चळवळीचे नेतृत्व त्या विभागातूनच येणे अधिक नैसर्गिक आहे. त्यांच्याकडे त्या प्रश्नांचे बारकावे ठाऊक असण्याची, त्या समूहाची मानसिक आंदोलने टिपण्याची, त्या विभागांशी त्यांच्या भाषेत संवाद करण्याची अधिक क्षमता असू शकते. बाहेरच्या विभागातील कार्यकर्ता/कार्यकर्ती श्रमपूर्वक ही क्षमता मिळवून अधिक प्रभावीपणे तो लढा लढवू शकतात, अशी उदारहणे कमी नाहीत. ज्या विभागातून नेतृत्व उभे राहण्याची अजून क्षमताच नाही, तेथे हे करणे भाग आहे. पण प्रयत्न त्या विभागातून लवकरात लवकर नेतृत्व उभे राहण्याचाच असायला हवा. आपण मागची रांग जितक्या लवकर स्वीकारु तेवढे उत्तम. शाहू महाराजांनी १९२० साली कोल्हापूरच्या माणगाव येथील अस्पृश्यांच्या परिषदेत बोलताना सोबत असलेल्या २९ वर्षांच्या तरुण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करुन समोरच्या जमावाला ते म्हणाले, “आता तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे.” महाराज कोल्हापूरचे केवळ राजे नव्हते. तेथील दलित-बहुजनांचे ते नेतेही होते. अशावेळी आपल्याला मानणाऱ्या अस्पृश्य विभागाला त्याच्या नेत्याकडे सोपविणे ही महाराजांची उदारता, मोठेपण होतेच. पण चळवळ पुढे जाण्यासाठी काय योग्य ते हेरण्याचे वस्तुनिष्ठ द्रष्टेपण त्यांच्यात होते.
प्रबोधन खूप उपयुक्त असते. पण फक्त प्रबोधनाने चळवळी होत नाहीत. त्यासाठी संघटना बांधावी लागते. फुले, आंबेडकर, पेरियार यांनी प्रबोधनाबरोबरच संघटना बांधली. बोलणाऱ्या-लिहिणाऱ्या टिळक, गोखले, गांधी, नेहरु यांची काँग्रेस संघटना होती. ज्यांचे आपण पुरोगामी विरोधक आहोत, त्या हिंदुत्ववाद्यांनी त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही चिकाटी, चिवटपणाने बांधलेली आजची सर्वात शक्तिमान व मजबूत संघटना आहे. संघटना बांधणे या प्रसुतिवेणा असतात आणि त्यानंतरचे कष्टमय, जागरुक संगोपनही असते. यात अजिबात भाग न घेता समाजमाध्यमांवर मते प्रदर्शित करणे, वादांच्या लढाया लढणे, परस्परांची मापे काढणे सोपे आहे. ते जबाबदारीने करुया. त्यातील बेजबाबदारपणा आपल्या सगळ्यांच्या हेतूला मारक आहे. अर्थात, हेतूच कोणाला तरी डिवचणे व त्यातून आनंद घेणे असेल तर ती वेगळी गोष्ट. पण तो कोतेपणा आहे. तो आनंद मुक्त नसून कृतक आहे. आपण आपल्या मनाला तपासले तर किल्मिषांची दाट कोळिष्टके आत व्यापून राहिलेली आढळतील.
ती झाडूया. खूप मोकळे, हलके वाटेल.
‘न हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचन। अवेरेन च सम्मन्ति एस धम्मों सनन्तनों’ (वैराने वैर शमत नाही. ते अवैराने म्हणजेच मैत्रीने शमते) हे खरोखरच्या वैऱ्यांबद्दल तथागत गौतम बुद्ध म्हणतात. जे आपले खरे शत्रू नाहीत, त्यांच्या काही वास्तव-आभासी बाबींविषयी आपल्या मनात किंतु वा राग आहे, त्या मित्रांबद्दल हे करणे खरोखरच कठीण आहे का?
- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com
(आंदोलन, नोव्हेंबर २०२०)