Wednesday, December 16, 2020

हम हिंदू भी-मुसलमान भी


“मेरा निकाह हुआ और मेरी बहन के फेरे.”...झूमवरील सत्रात एक कार्यकर्ती बोलत होती. हे एवढेच ऐकणाऱ्याला वाटू शकते, बोलणारी मुसलमान आहे आणि तिच्या मुसलमान बहिणीने हिंदूशी लग्न केले. कारण तिने फेरे घेतले. पण तसे नाही. या दोघी हिंदू आहेत आणि मुसलमानही. एकाचवेळी दोन्ही धर्माच्या. हे अचंबित करणारे आहे ना? हो. मीही हे सगळे ऐकताना अचंबित झालो होतो. आणि पुढे अधिक ऐकल्यावर चिंतित..!

राजस्थानातील चीता मेहरात समुदायाच्या कार्यकर्त्यांसमवेत माझे एक सत्र कोरो संस्थेने आयोजित केले होते. झूमवर चाललेल्या या ऑनलाईन सत्रात प्रथम कार्यकर्ते बोलत होते. आपल्या समाजाची वैशिष्ट्ये सांगत होते. त्याच्यासमोरचे आताचे पेच मांडत होते. हे ऐकून नंतर मला संविधानातील मूल्यांचा परिचय करुन द्यायचा होता. त्यांच्या आताच्या पेचावर काही मार्ग सुचवायचे होते. मी बोलायचे ते नंतर बोललो. मार्ग काही असे झूमवरील एका सत्रातून पुढे येत नाहीत. ते त्यांच्यासोबत राहून शोधायचे असतात. अशा सत्रात काही ढोबळ दिशा सुचवता येतात. तशा सुचवल्याही. पण त्यातून काही तोडगा निघणे तूर्त महाकठीण वाटते.

चीता मेहरात हे समुदायाचे नाव ऐकून हा लेख वाचणाऱ्यातल्या काही जाणकारांना यांचे वैशिष्ट्य नक्की आठवले असेल. माझ्यासारख्या अगदी अनभिज्ञ किंवा धूसर कल्पना असणाऱ्यांना वाटणारे आश्चर्य वाटले नसणार. पण याबाबतीत वाचकांमध्ये माझ्यासारखे अनभिज्ञ अधिक असणार. त्यादृष्टीने ही माहिती देत आहे. वास्तविक ही माहितीही खूप परिपूर्ण नाही. या सत्रात कळली ती. आणि नंतर ऑनलाईन शोधली ती. या समूहाच्या वस्त्यांत काही मी फिरलो नाही. त्यांच्या लढ्यांत भाग घेतलेला नाही. लोकांशी प्रत्यक्ष भेटून बोललो नाही. प्रत्यक्ष बोलणाऱ्यांचे यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिलेत. अधिक सखोल माहिती आपण नंतर घ्याल. मीही मिळवेन. तूर्त, त्यातील पेचाकडे लक्ष वेधले गेले तरी पुरे आहे. तो पेच गंभीर आहे. भारतीय संविधानातल्या धर्म, श्रद्धा, उपासना स्वातंत्र्याशी निगडित आहे. भारताच्या भारतीयत्वाशी जोडलेला आहे.

राजस्थानातील अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यांत पसरलेला सुमारे दहा लाखांची संख्या असलेला हा चीता मेहरात काठात समुदाय. चीता, मेहरात, काठात अशा अंतर्गत तीन ओळखी, भाग असलेला एकाच वैशिष्ट्यांचा हा समुदाय. हिंदू व मुसलमान दोन्ही. तुमचा धर्म कोणता या प्रश्नाला आतापर्यंत तरी त्यांचे उत्तर आहेः हिंदू-मुसलमान. पुढचे ठाऊक नाही. आणखी काही काळाने दोन स्वतंत्र उत्तरेही मिळू लागतील. त्याची सुरुवात झालीच आहे.

आजचे त्यांचे-बहुसंख्यांचे मुख्य स्वरुपवैशिष्ट्य हिंदू-मुसलमान हेच आहे. एकाच कुटुंबात दोन्ही उपासना होतात. दोन्ही धर्मांचे सण साजरे केले जातात. आपल्या आवडीनुसार दोन्ही पेहराव केले जातात. मशीद व देऊळ दोन्ही त्यांच्या गावांत आहेत. कुटुंबातील सदस्यांची नावेही मिश्र आहेत. वडिल जवाहरसिंग तर मुलगा सलालुद्दिन. एक बहीण सलमा, तर दुसरी विद्या. सुरुवातीला ज्या कार्यकर्तीचे अवतरण दिले आहे, ती कार्यकर्ती व तिची बहीण याच प्रकारची. दोघींची लग्ने दोन धार्मिक पद्धतीने झालेली. या पद्धती कोण ठरवते? ..ज्यांचे लग्न होणार आहे ती मंडळी. त्या उभयतांची इच्छा. लग्न ज्या पद्धतीने झाले, त्याच पद्धतीने पुढील सर्व रीतीरिवाज होतील असे नाही. ही मंडळी पूजाही घालतील. मुलांची नावे दोन्ही धर्मातली ठेवतील. या मुलांना त्यांचे स्वातंत्र्य असेल, त्यांनी कोणत्या रीती पाळाव्यात याचे. दिवाळी व ईद दोन्ही आपलेच समजून हे लोक साजरे करतात. ‘न हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा’ हा प्रश्न आतापर्यंत तरी त्यांच्यापर्यंत येत नव्हता. आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना ‘इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा’ ही भूमिका घेण्याची गरज भासत नव्हती. ही गंगा-जमनी तहजीब जरुर. पण ती संगमाजवळची नाही; जिथे दोन प्रवाह एकत्र होताना दिसतात. संगमाच्या पुढे दोहोंचा एकच प्रवाह झाल्यानंतरची ही अवस्था आहे. एकाच शरीरात दोन्ही भाग गुंतून गेलेले. उभयलिंगी अर्धनारी नटेश्वरासारखे एकच उभयधर्मी अस्तित्व. तब्बल सातशे वर्षे ते आहे.

हो. सातशे वर्षांचा इतिहास ही मंडळी सांगतात. या इतिहासाचे सुस्पष्ट पुरावे काही मला लक्षात आले नाहीत. परंपरेने सांगितला गेलेला तो इतिहास आहे. हे लोक स्वतःला पृथ्वीराज चौहान या पराक्रमी राजपूत, क्षत्रिय राजाचे वंशज मानतात. याच राजाच्या वारसदारांच्या नावांवरुन कोणी चीता, तर कोणी मेहरात तर कोणी काठात आहे. याचा एक उपयोग किंवा प्रतिबंध लग्न ठरवताना होतो. चीता लोक चीता समूहात लग्न करत नाहीत. ते मेहरात किंवा काठात समूहात सोयरीक करतात. एकप्रकारची ती आता गोत्रे आहेत. एकाच गोत्रात लग्न करायला बंदी आहे. पण हिंदू राजाचे हे वंशज मुसलमानपण कसे झाले? त्याची कथा सांगतात. मुघल बादशहाच्या आक्रमणानंतर त्याच्या तीन अटी आम्ही स्वीकारल्या. दफन, खतना आणि हलालचे मांस खाणे. या तीन अटी आमच्यातला प्रत्येकजण पाळतोच. नाव हिंदू असले, लग्न हिंदू पद्धतीने झाले तरी त्याला खतना करुन घ्यावा लागतो. मेल्यावर त्याचे दफन होते. जिवंत असताना तो हलालचेच मांस खातो. (एकाच झटक्यात नव्हे तर जनावराची मान अर्धवट कापून सगळे रक्त निघून जाण्याने मांस शुद्ध होते अशी समजूत आहे. त्यास हलाल म्हणतात.) या तीन अटी पाळणे हे त्यांच्या समाजाचे खास वैशिष्ट्य असल्याचे ही माणसे अभिमानाने सांगतात. आक्रमकाने लादलेल्या अटी आजही का पाळायच्या? तर आम्ही शब्दाला पक्के आहोत. पण हाच मुद्दा आता काही ‘बाहेरची’ मंडळी उपस्थित करत आहेत. तिकडे नंतर येऊ. ही मंडळी तीन तलाक मानत नाहीत. गायीला माता समजतात. स्त्री-पुरुष एकत्र नमाज पढतात.

सातशे वर्षे ठीक चालले होते. त्यांचे ‘हिंदू-मुसलमानत्व’ अभंग होते. पण आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समजाने त्यांच्यासमोर प्रश्न उभे करायला सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये केसपेपर काढताना, ट्रेनचे रिझर्वेशन करताना ‘रामचंद्र हुमायून’ असे नाव सांगितले की लोक चमत्कारिकपणे बघू लागतात. ओळखपत्र दाखवले की पोलीस संशय घेऊ लागतात. ‘असली नाम बोल’ असे दटावले जाते. शाळेत पूर्वी धर्माच्या रकान्यात धर्म ‘हिंदू-मुसलमान’ असा लिहिला जात असे. आता तिथेही प्रश्न येऊ लागले आहेत. या प्रश्नांनी, संशयी नजरांनी या लोकांच्या मनात आपल्यातच काही न्यून आहे का, असा सवाल उभा राहिला सुरुवात झाली. ही दुभंग व्यक्तिमत्वाची लक्षणे वाढू लागली आहेत. तोच त्यांच्यापुढे आताचा पेच आहे. वास्तविक हा त्यांचा रोग नाही. लोलकातले विभिन्न रंग बघण्याची क्षमता नष्ट होणे हा बाहेरच्यांना झालेला रोग आहे. ठरीव रंगच बघण्याची ही त्यांची मर्यादा आहे. विविध रंगच्छटा अनुभवण्याचे त्यांचे सामर्थ्य गळून पडते आहे, ही समस्या आहे. पण बहुसंख्यांचा आजार आजार नसतो. तो मापदंड असतो. तेच प्रमाण असते. अल्पसंख्यांचे मोजमाप त्यातूनच होते. या बहुसंख्यांच्या आजाराला सांस्कृतिक-धार्मिक मूलतत्त्ववादी आणि त्यांचा वापर करणारे राजकारणी यांनी अधिक गंभीर केले.

यू ट्युबवरील एका व्हिडिओत चीता समूहातील एक कार्यकर्ता सांगतो- ‘याची सुरुवात मीनाक्षीपुरमच्या धर्मांतराने झाली. १९८१ साली तिथल्या दीडशे दलितांनी जातीय अत्याचाराच्या परिणामी सामूहिक धर्मांतर केले. ते मुसलमान झाले. आणि आमच्याकडे विश्व हिंदू परिषदेचे लक्ष वळले. पृथ्वीराज चौहानाचे वंशज असताना तुम्ही मुसलमान कसे? नक्कीच तुम्हाला जबरदस्तीने मुसलमान केले गेले असणार? आतापासून तुम्ही फक्त हिंदू म्हणूनच राहायचे. मुसलमान म्हणून असलेली सगळी चिन्हे, रीतिरिवाज, पोषाख, मशिदीत जाणे बंद व्हायला हवे...असे धर्मादेश येऊ लागले. दुसरीकडून तबलिगी मंडळींनी येणे सुरु केले. सच्चा मुसलमान म्हणून सर्व हिंदू रीतींना तुम्ही सोडले पाहिजे असे त्यांचे फतवे निघू लागले. बाबरी मशीद-रामजन्मभूमी प्रकरण आणि आता भाजप केंद्रात आल्यावर ही प्रकरणे तीव्र होऊ लागली आहेत.’

असे छोटे छोटे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर पाहायला मिळतात. केवळ फेटे असलेले चीता मेहरात लोक समोर आहेत आणि त्यांच्यासमोर कोणी हिंदुत्ववादी नेता त्यांच्या चौहान रक्ताला ललकारतो आहे. तुम्ही असली हिंदू व्हायला हवे वगैरे. दुसरीकडे मुस्लिम मौलवींच्या मेळाव्यात केवळ मुस्लिम समजला जाणारा पेहराव व दाढी असलेले चीता मेहरात काठात लोक दिसतात. या प्रभावाखाली येऊन मी मुसलमान, माझी बायको मुसलमान, माझी मुले मुसलमान, त्यांची नावे मुसलमान, आम्ही फक्त मशिदीतच जातो, केवळ मुसलमानांचे सणच साजरे करतो असे कडवेपणाने बोलणारा चीता समूहातील माणूस दिसतो. तर याच्या बरोबर उलट आम्ही चौहान की औलाद, सच्चे हिंदू सांगणारी माणसेही त्यांच्यातच दिसतात.

मी सत्र घेत असलेल्या लोकांचा तीव्रतेने सवाल होता– अशी कोणतीतरी एक बाजू घेण्यास सांगणाऱ्यांचे काय करायचे? आम्ही दोन्ही असलेले एक आहोत. या आमच्या ओळखीवर, अस्तित्वावर घाला आला आहे. आपल्या मुलाबाळांचे भविष्य नीट व्हायचे असेल, तर कोणतीतरी एक बाजू पकडणे-हिंदू किंवा मुसलमान यांपैकी एक होणे यात शहाणपण आहे, हा व्यवहारी विचार करणारे लोक आमच्यात वाढू लागले आहेत. त्याचे काय करायचे?’

‘तुम्ही तटून उभे राहा. आपली भूमिका, परंपरा सोडू नका. कितीही दबाव येऊ दे.’..असा थेट उपदेश काही मी केला नाही. जो सभोवतालचे राजकीय, सांस्कृतिक वास्तव भान ठेवून बघतो त्यास हे सोपे उत्तर देऊन जमणारे नव्हते. आपण आपली परंपरा, द्विधर्मी ओळख जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करायला हवा, एवढे मात्र बोललो. मुख्य सांगितले ते आपल्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेतल्या विचारबहुलतेविषयी, वैविध्याविषयी. उदा. सम्राट अशोक, त्याचे वडील बिंदुसार व आजोबा चंद्रगुप्त हे अनुक्रमे बौद्ध, वैदिक व जैन होते. एकाच घरात विविध धर्माची माणसे असू शकत होती. आपल्या पसंतीच्या धर्मांची उपासना करण्याचे स्वातंत्र्य एका कुटुंबात असतानाही त्यांना होते. महात्मा फुलेंच्या कल्पनेतल्या आदर्श कुटुंबाची रचना सांगितली. त्या रचनेत आई, वडील, बहीण, भाऊ प्रत्येकजण त्यांना पटलेला धर्म स्वीकारू शकतात. विविध धर्माचे लोक एकाच कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदू शकतात. सम्राट अशोकाच्या प्राचीन काळात व आधुनिक काळातील महात्मा फुलेंच्या विचारभूमिकेत भारतात जर अशी वेगवेगळे धर्म पाळण्याची मुभा असेल तर तुम्ही चीता मेहरात काठात मंडळी तीच परंपरा पाळत आहात. तुमची परंपरा ही भारतीय परंपरा आहे. संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा चोख अंमल करणारा तुमचा समुदाय आहे. याचा न्यूनगंड नव्हे, तर सार्थ अभिमान वाटला पाहिजे.

पुढे धर्म व आधुनिकता याची थोडी अधिक चर्चा आम्ही केली. धर्माचे एक अंग आध्यात्मिक विचार हे, तर दुसरे अंग आचार व्यवहाराचे. ज्यावेळी आजच्यासारखी घटना, कायदे नव्हते त्यावेळी धर्म ती जबाबदारी निभावयाचा हे बरोबर आहे. पण आता त्याची गरज आहे का? धर्माने अध्यात्म, उपासना एवढ्यापुरते सीमित राहून लग्नासारख्या बाबी विशेष विवाह कायद्यावर सोपवल्या तर काय हरकत आहे? या कायद्याखाली होणारी लग्ने ही दोन भारतीयांची असतात. तिथे धर्माचा संबंध नसतो. आपापला धर्म पाळायची अनुमती लग्न करणाऱ्या दोघांनाही राहते. दोघे भिन्न धर्माचे असले तर लग्नासाठी म्हणून धर्मांतर करण्याची कोणा एकाला गरज नाही. केवळ वेगवेगळ्या धर्माचे असतानाच नव्हे, तर एका धर्माचे असतानाही लग्ने विशेष विवाह कायद्याखाली करण्याची वहिवाट प्रयत्नपूर्वक आपण सुरु करायला हवी.

ही चर्चा झाली. काही नवे कळल्याचे, आश्वासक वाटल्याचे अभिप्राय ऐकणाऱ्यांनी दिले. करोनाकाळ संपला की प्रत्यक्ष भेटू, अधिक बोलू ठरले.

हे वेबसत्र संपले. पण माझी अस्वस्थता अधिक वाढली. या खंडप्राय देशात खंडीने असलेल्या परंपरांचे हे अजब मिश्रण आणि तेच त्याच्या टिकण्याचे, प्रवाही राहण्याचे गमक आहे, ही जाणीव एकीकडे मन समृद्ध करत होती. तर दुसरीकडे हे सगळे एका साच्यात कोंबू पाहणाऱ्या, त्यासाठी पराकोटीच्या हिंसेला उतरणाऱ्या मूलतत्त्ववादी पिशाच्च्यांचे पलिते डोळ्यांसमोर नाचत होते.

माझा अंदाज निराशाजनक वाटेल. पण ‘हिंदु-मुसलमान’ असलेल्या चीता मेहरात काठात समुदायाचे पुढच्या एक-दोन दशकांतच मुख्यतः हिंदू आणि उर्वरित मुसलमान असे विभाजन अटळ आहे.

...हा अंदाज चुकावा अशी मनोमन इच्छा आहे.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(आंदोलन, डिसेंबर २०२०)


Attachments area