Sunday, October 17, 2021

भागवतांची चिंता व त्यावरचा उपाय

अलिकडेच उत्तराखंडमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लग्नासारख्या छोट्या स्वार्थासाठी हिंदू मुले-मुली धर्म बदलतात हे चूक आहे’, असे मत व्यक्त केले.  साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी 'हिंदू-मुसलमानांचा 'डीएनए' एकच आहे, दोहोंचे पूर्वज समान आहेत’ असे ते एका जाहीर सभेत बोलले होते. 'हिंदुत्व म्हणजेच भारतीयत्व' असे तर ते नेहमीच बोलत असतात. मग मोहन भागवतांना मुलांनी धर्म बदलण्याची चिंता का? भागवतांच्या व्याख्येप्रमाणे असा धर्म बदलणाऱ्यांचे हिंदुत्व व डीएनए तर तोच राहणार आहे.

त्यांच्या म्हणण्याची संगती लागत नाही. कारण एकीकडे उत्तराखंडच्या भाषणात ते पालकांना कानपिचक्या देतात- “आमच्या मुलांना (अशा धर्मांतरास प्रवृत्त न होण्याच्या दृष्टीने) आम्हीच तयार करत नाही. घरातच त्यांना तसे संस्कार देण्याची गरज आहे. आपल्या धर्माबाबत अभिमान, आपल्या उपासनेबद्दल आदर त्यांच्या मनात तयार करायला हवा.” म्हणजे इथे ते हिंदू हा अन्य धर्मांप्रमाणे एक संघटित, विशिष्ट उपासना पद्धती असलेला धर्म (रिलिजन) असा अर्थ घेतात. अनेकविध धारणा, विविध उपासना पद्धती यांना सामावणारे हिंदुत्व म्हणजे भारतीयत्व ही इतर वेळची त्यांची भूमिका त्यांना इथे अभिप्रेत नाही. पण पुन्हा लगेचच ते भारतीय परंपरेवर येतात. या परंपरेची प्रशंसा ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी केल्याचा ते उल्लेख करतात. आई-वडिलांची सेवा कशी करायची हे भारतीय परंपरेतून आपण शिकले पाहिजे, असे थॅचरबाईंनी म्हटल्याचे ते नमूद करतात. पुढे बोलताना ते म्हणतात, “वेदांपासून महाभारतापर्यंत आमचे ग्रंथ आम्हाला धर्माचे पालन कसे करायचे ते सांगतात.” वेद, महाभारत यांमधला धर्म हा रिलिजन नव्हे. त्यातला धर्माचा अर्थ नीती, कर्तव्य असा आहे. मार्गारेट थॅचर या नीती धर्माने प्रभावित आहेत. हिंदू रिलिजनने नाही.

भागवत हिंदू धर्म व हिंदुत्व बहुधा वेगळे धरत असावेत. भारतीयत्वात किंवा त्यांच्या संज्ञेनुसार हिंदुत्वात हिंदू, मुसलमान किंवा अन्य धर्मीय या सर्व भारतीयांचा समावेश होतो. कारण त्यांचे पूर्वज समान आहेत. त्यांचा डीएनए एक आहे. मुलांनी आपला धर्म सोडून दुसरा स्वीकारला तरी ते या व्यापक हिंदुत्व वा भारतीयत्वाचाच घटक राहतात. त्याची चिंता असायचे मग कारण नाही. मात्र त्यांना ती चिंता वाटते. म्हणजेच हिंदू हा रिलिजन आहे असे ते मानतात. हिंदुत्वात सगळे सामावतात, मात्र हिंदू हे जन्मानेच असावे लागतात. त्यात दुसरे सामावू शकत नाहीत. त्यातले बाहेर जाऊ शकत नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो.

घोळ होतो आहे. हा हिंदू – हिंदुत्वाचा घोळ भागवत सोडवतील तेव्हा सोडवोत. पण त्यांची आताची चिंता (मुलांनी लग्नासाठी धर्म बदलणे) दूर करण्याचा मार्ग कठीण नाही. तो त्या अर्थाने त्यांच्याच हातात आहे. कसा ते पाहू.

पटलेला धर्म स्वीकारण्याचा अधिकार घटनेने आपल्याला अनुच्छेद २५ नुसार दिलेला आहे. मी माझा जन्मजात धर्म सोडून मला पटलेला दुसरा धर्म स्वीकारु शकतो. उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या हिंदू धर्मात जन्मास आले तो सोडून १४ ऑक्टोबर १९५६ ला ते बौद्ध झाले. त्यांच्या आवाहनाप्रमाणे त्यांच्या लाखो अनुयायांनीही त्यांचे अनुकरण करत हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला. इथे हिंदू धर्म त्यागाची व बौद्ध धर्म स्वीकाराची कारणे बाबासाहेबांनी दिली आहेत. ती कोणाला पटोत न पटोत, पण ती ठोस आहेत, हे कबूल करावे लागते.

लग्नासाठी धर्म बदलणे यात अशी कारणे नाहीत. पहिला धर्म सोडून दुसरा स्वीकारण्यामागे तो पटल्याचा मुद्दा इथे नाही. यात एक तांत्रिक अपरिहार्यता आहे. घटनेने पती-पत्नी म्हणून कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या व्यक्तीची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. विशेष विवाह कायद्याची त्यासाठी तरतूद सरकारने केली आहे. या कायद्याखाली लग्न करताना उभयतांपैकी कोणालाही आपला धर्म बदलण्याची गरज नसते. तथापि, यासाठीच्या प्रक्रियेत एक अडचण आहे. या कायद्याखाली एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. म्हणजेच फॉर्म भरल्यानंतर एक महिन्याने लग्न करता येते.  हा एक महिना विवाह नोंदणी निबंधकांच्या वेब पोर्टलवर कोणाचे काही आक्षेप आहेत का ते विचारण्यासाठी लग्न करु इच्छिणाऱ्या जोडीची माहिती जाहीर केली जाते. या लग्नाच्या विरोधात जर आई-वडिल वा अन्य नातेवाईक वा धर्माचे ठेकेदार असतील तर त्यांना ही एक महिन्याची मुदत व माहिती म्हणजे लग्नात मोडता घालायला आयती संधीच असते. कायदेशीरदृष्ट्या सज्ञान व दोहोंची संमती असेल तर नातेवाईक काहीच करु शकत नाहीत. पण मारहाण, धमक्या, अपहरण या मार्गांनी ते हे लग्न मोडतात. अशा विरोधामुळे तातडीने व लपून-छपून लग्न करु पाहणाऱ्या जोडप्याला हा कायदा आधार देत नाही. त्यासाठी मग धार्मिक विधीचा आधार घेतला जातो. धार्मिक पद्धतीत वधू - वर एकाच धर्माचे असावे लागतात. ज्या एकाचा तो धर्म नसेल त्याला तो पटो वा न पटो केवळ लग्नासाठी जोडीदाराचा धर्म स्वीकारावा लागतो. याला उपाय विशेष विवाह कायद्यातली जाहीर नोटीशीची अट रद्द करणे व या जोडप्याला त्यांनी मागणी केल्यास सुरक्षितपणे महिनाभर गुप्तपणे राहता येईल अशी व्यवस्था सरकारने करणे हा आहे. जीवनाचा साथीदार निवडताना धर्म बदलण्याचे हे अपरिहार्य कारण नक्कीच छोटे नाही.

मोहन भागवत ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आहेत, त्या संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक असलेले नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी आपले संघाशी असलेले नाते सोडलेले नाही. या नात्याचा हवाला देऊन मोहन भागवतांनी मुला-मुलींना लग्नासाठी धर्म बदलावा लागू नये म्हणून विशेष विवाह कायद्यात वर सुचवलेली दुरुस्ती करण्याचे आवाहन मोदींना करायला हवे. ते झाल्यास आपल्या पसंतीचा जोडीदार (मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, आर्थिक स्तरातला असो) मुलामुलींनी निवडावा असे आवाहन मोहन भागवत बिनधोकपणे करु शकतील. यात काही विघ्न येऊ नये यासाठी अशा मुलांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा आदेश त्यांनी संघ स्वयंसेवकांना दिल्यास व्यापक, उदार भारतीयत्व वा त्यांच्या भाषेत हिंदुत्व अधिकच झळाळून उठेल. अशारीतीने हिंदू धर्म व हिंदुत्व दोन्ही सुरक्षित राहतील.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

(पुण्यनगरी, १७ ऑक्टोबर २०२१)

Saturday, October 2, 2021

भवतालातील व्यथांचा कृतिप्रवण वेध

पंच्याहत्तरीचा लेखाजोगा घेण्याचे हे वर्ष. स्वातंत्र्याने खूप काही बदलले. विकासाला चालना मिळाली. लोकांचे जीवनमान उंचावले. मात्र या विकासाचे, जीवनमान सुधारण्याचे प्रमाण समलयीत झाले नाही. काहींना अमाप तर काहींच्या वाट्याला अल्प आले. काहींची तर विकासाची गाडी चुकली असेही दिसते. बदलाच्या प्रक्रियेत नवे प्रश्न तयार झाले. त्यांचे ताण वा वेदना तीव्र आहेत. हे भोग वाट्याला आलेल्यांच्या मनात स्वातंत्र्याने मला काय दिले हा प्रश्न, शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर याचे मोजमाप वैचारिक, ललित, संशोधनात्मक अंगाने होत आले आहे. त्या क्रमात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या या टप्प्यावर ‘भवताल’ मधील लेखन पाहायला हवे. स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या लेखिका वृषाली मगदूम संवेदनशीलतेने व डोळसपणे आपला हा भवताल निरखताना दिसतात. हे त्यांचे निरखणे दुरुन नाही. कार्यकर्त्या म्हणून भवतालातील कुरुपता दूर करण्यात स्वतः हस्तक्षेप करतानाचे त्यांचे हे निरीक्षण आहे. म्हणूनच स्वातंत्र्य अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने समाजाची मानसिकता, कृती व शासकीय धोरणाची दिशा काय असावी याची सूत्रेही त्यातून व्यक्त होतात. कथा-कादंबरीकार असलेल्या वृषाली मगदूम यांचे ‘भवताल’ मधील लेख हे नुसते विचारांची मांडणी करणारे लेख नाहीत. त्यात घटनांची मालिका आहे, संवाद आहेत. या घटना कथा-कादंबरीप्रमाणे काल्पनिक नाहीत. वास्तविक आहेत. त्यामुळे या लेखांना कथालेख अथवा कथात्म लेख म्हणणे अधिक योग्य राहील. या कथात्म स्वरुपामुळे दोन-तीन बैठकीत वाचून पूर्ण होण्याची वाचनीयता या पुस्तकाला लाभली आहे.

शिक्षण, दारु, रेशन, शौचालय, बालविवाह, स्त्रीचे दुय्यमत्व, लैंगिक छळ, समलिंगी, ज्येष्ठ नागरिक, जात-धर्माचे भेद, रुढीप्रियता असे अनेकविध विषय वृषाली मगदूम इथे हाताळतात. त्यांच्या आजच्या स्थितीचे मोजमाप करतात. साक्षरतेचे, शिक्षणाचे प्रमाण स्वातंत्र्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षांत लक्षणीय वाढले आहे. तथापि, अन्य देशांच्या अगदी आपल्या शेजारच्या चीनच्या तुलनेत आपण मागे आहोत, याची नोंद इथे आहे. आपल्या देशातील बदलांची गती पाहायची तर गेल्या दशकातील आकडे स्त्री शिक्षणाचे प्रमाण व जागृती वाढल्याचे दाखवतात. त्याचवेळी या प्रगतीच्या गतीशी स्त्रियांतील आत्मविश्वास, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, समतेचा विचार यांची गती अनुरुप आहे का, हा प्रश्नही उपस्थित केला गेला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक छळाच्या विरोधात कायदा आला. ‘विशाखा मार्गदर्शक सूचना’ आल्या. तरी त्यांचे संरक्षण मिळण्यात स्त्रियांना अनंत अडचणी येतात. ही घटना घडते तेव्हा दोघांव्यतिरिक्त कोणी नसते. त्यामुळे ती सिद्ध करणे महिलेला अवघड जाते. तो अनुभव सांगण्याची लाज वाटते. व्यवस्थापनाच्या प्रमुख स्थानी स्त्री असली तरीही एकूण पुरुषप्रधान संस्कारांचेच वर्चस्व असल्याने या प्रकरणांत चालढकल होत राहते. न्याय दुरापास्त होतो. मुलग्यांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण प्रगत विचार परंपरेच्या महाराष्ट्रात घटते आहे. २००१ च्या जनगणनेत अन्य राज्यांच्या तुलनेत चौथ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र २०११ च्या जनगणनेत दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगून राज्यातील गर्भलिंग परीक्षेच्या घटना लेखिकेने नोंदवल्या आहेत. भौतिक उन्नतीच्या क्रमात ‘मुलगाच हवा’ ही मागास मानसिकता वाढते आहे.

त्यातच या मागास मानसिकतेला हल्ली जाति-धर्माच्या गडद होणाऱ्या भेदांची फोडणी बसते आहे. महात्मा फुले व सावित्रीबाईंना घरातून बाहेर काढल्यावर ते उस्मानशेकडे राहायला गेल्याचे नोंदवून लेखिका सवाल करतात - फुले पती-पत्नींच्या स्त्रीहक्काच्या लढ्याच्या परंपरेतील महाराष्ट्रात स्त्रियांतील भगिनीभाव संपुष्टात आला आहे का? हिंदू-मुस्लिम स्त्रियांच्या मनातील एकमेकांविषयीचे अंतर वाढते आहे. मुस्लिम मुलींत बुरख्याचे प्रमाण वाढले आहे. पण त्याचबरोबर ‘आमचा धर्म सांगतो व तो आम्ही घातलाच पाहिजे हे मला पटले आहे’ हे त्या सांगतात ते अधिक चिंतेचे आहे. लेखिकेची प्राध्यापिका मैत्रिण पौरोहित्य करणाऱ्या बाईचा सत्कार करण्याची सूचना करते. स्त्रियाही पुरुषांप्रमाणेच पौरोहित्य करु शकतात, हे तिला अभिमानाचे वा विशेष कर्तृत्वाचे वाटते. अन्य एके ठिकाणी असे पौरोहित्य करणारी स्त्री ‘सौभाग्यवती’ असण्याची अट असल्याचे लेखिका नोंदवतात.

जात दुस्वास्वाची कीड दोन दलित गरीब समूहांतही कशी शिरली आहे, याचा साक्षात्कार लेखिकेला अचंबित करणारा व खंतावणारा आहे. १४ एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या फोटोला अभिवादन करण्याचा कार्यक्रम कचरा वेचक महिलांच्या वस्तीत झाला. काही काळाने संघटनेच्या कार्यालयात बसलेल्या लेखिकेला वस्तीतून एका महिलेचा फोन आला – “ताई, बाया कचऱ्यावरुन आल्यात व भांडू लागल्यात. त्यांचे नवरे दारु पिऊन आलेत व आंबेडकरांच्या फोटोपुढील फुलं, गुलाल फेकून दिलाय.” लेखिका पुढे लिहिते – ‘मला अतिशय राग आला. पोलिसांना सांगून मी त्यांना आत टाकले. संध्याकाळी सोडायला लावले. दुसऱ्या दिवशी वस्तीत मीटिंग घेतली तर कळले, संघटनेनं अण्णा भाऊ साठेंचा कार्यक्रम कधी घेतला नाही. मग बाबासाहेबांचाच का?’

कचरा वेचक भगिनी हीच ओळख ठाऊक असलेल्या लेखिकेला हा भेद नवीन होता. बौद्ध म्हणजे पूर्वाश्रमीचे महार व मातंग या गावकुसाबाहेरच्या दलित जाती. बाबासाहेब आंबेडकर या दोहोंचे उद्धारकर्ते. थोर साहित्यिक व शाहीर अण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते. खुद्द अण्णा भाऊ साठे बाबासाहेबांबद्दल ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेला मला भीमराव’ हे शाहिरी कवन गातात. इथे मात्र हेच अण्णा भाऊ साठे त्यांच्या जन्माच्या जातीमुळे मातंग समाजाला पूज्य बनतात. तर बाबासाहेब महार जातीत जन्माला आल्याने परके होतात. हे खूपच त्रासदायक आहे. दलित चळवळीतील आंबेडकरोत्तर नेतृत्वाचा व्यवहार आणि दलितांत पाचर मारण्यात ज्यांचा फायदा आहे, असे बाहेरचे हितसंबंधी यांच्यामुळे ही वेळ आली आहे. हे वेळीच सांधले गेले पाहिजे.

कचरा वेचक महिला हा स्त्री मुक्ती संघटनेच्या कामाचा व पर्यायाने लेखिकेच्या कामाचा मुख्य भाग आहे. आंबेडकरी चळवळीचा वावर असलेल्या स्थिर वस्त्यांहून अगदी वेगळ्या, अधिक वंचित, अधिक दैन्य असलेल्या या अतिगरीब कचरा वेचकांच्या वस्त्या आहेत. हिरावलेले माणूसपण, असहाय्य बकाल भग्नता आणि त्यातही वाट शोधत, फोडत बाहेर येणारे जीवनाच्या चैतन्याचे हिरवे कोंब हे या वस्त्यांचे व्यक्तित्व. या कचरा वेचक महिला, त्यांच्या वस्त्या, तेथील प्रश्न यांवर बरेच लेख या पुस्तकात आहेत. ते वाचताना ‘जिन्हे नाज़ हैं हिंद पर वो कहाँ हैं..?’ हा प्यासातल्या गुरुदत्तचा प्रश्न आपल्या संवेदनांना सतत धडका देत राहतो. माणूस नावाच्या प्राण्यासाठी संविधानाने घोषित केलेल्या मूलभूत अधिकारांचा इथे काहीच थांग लागत नाही.

ज्या गरिबांसाठी रेशनची व्यवस्था आहे, तिचा लाभ घेण्यासाठी लागणारे रेशनकार्ड कागदोपत्री पुराव्यांशिवाय मिळत नाही. कारण वास्तव्य अधिकृत नाही. अधिकारी म्हणतात जन्माचा दाखला आणा, मग रेशनकार्ड देतो. जन्मदाखला काढायला गेले की तेथील अधिकारी म्हणतात त्यासाठी आधी रेशनकार्ड लागेल. आधी कोंबडी की आधी अंडे यासारखाच हा जटिल प्रश्न बनवला जातो. पैसे दिले की सगळं सोपं होऊन जातं. पण तो मार्ग न अवलंबता हक्कासाठी लढायचा दूरवरचा मार्ग पत्करायचे शिक्षण संघटना लोकांना देते. पण हा मार्ग खूप बिकट, थकविणारा असतो. याचे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. शहराच्या स्वच्छतेत, घरकामांसाठी ही माणसे हवी असतात. पण विकसित होणाऱ्या शहरांत, वाढत्या टोलेजंग, आलिशान इमारती ज्या जागांवर उभ्या राहतात, त्यावरील या वस्त्या फुंकरीने उडवून लावल्या जातात. वस्त्यांतील या माणसांचे जगणे वावटळीतल्या कागदाच्या कपट्यांप्रमाणे अवकाशात अधांतरी इतस्ततः भरकटत राहते.

या वस्त्यांतली पुरुषांची व्यसनाधीनता आणि त्याचे परिणाम ही गृहीत बाब आहे. पण स्त्रियांची व्यसनाधीनता चिंतेचे गांभीर्य भूमितीश्रेणीने वाढवते. दारु पिणाऱ्या मीनाला आई हटकते तेव्हा ती आईला शिविगाळ करते. म्हणते – “मी माझ्या पैश्याची पिते. पैसे कमावते. मला तुला अडवायचा अधिकार नाही.” लेखिका पुढे लिहिते – ‘मीना दारुच्या गुत्त्यावर जाते. दारु पिते. शरीर विकते. पाचशेची नोट घेऊन फुल्ल टाईट होऊन घरी परतते. शुद्धीवर येते तेव्हा तिला या साऱ्याची लाज वाटते. दारु सोडायची तिला तीव्र इच्छा असते. पण हे दुष्टचक्र ती भेदू शकत नाही.’

निला या कचरा वेचक तरुणीची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्याच्या ती प्रेमात पडते व ज्याच्यापासून तिला मूल होते, तो तिला व बाळाला पुलाखाली सोडून जातो. त्या अवस्थेतही तिच्यावर सामूहिक बलात्कार होतो. तिचे मानसिक संतुलन जाते. रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिला वस्तीतल्या महिला आणतात. उपचार करतात. पुढे तिला मनोरुग्णालयात दाखल करावे लागते. मुलाला तिच्यापासून विलग करुन बालगृहात ठेवावे लागते. ती बरी झाल्यावर इथून मला सोडवा, बाळाला मला भेटवा, असा आकांत करत राहते. या सगळ्यात लेखिका व संघटनेचे कार्यकर्ते पोलीस, संस्था, हितचिंतक डॉक्टर, मीनाचे नातेवाईक यांना गाठून प्रचंड प्रयत्न करतात. यातून बरेच यश मिळते, पण शेवट परिपूर्ण होत नाही. समाजबदलाचे संघर्ष विशिष्ट मुदतीचे असू शकत नाहीत, हे खरे. पण त्यात भरडणाऱ्या आपल्याशी संबंधित व्यक्तीला मदत करण्यात आपण पुरे पडलो नाही, ही टोचणी राहतेच.

ज्येष्ठांचे प्रश्न हा विकासाच्या नव्या प्रारुपातला एक महत्वाचा घटक. लेखिकेने तिच्या अवतीभवतीच्या, मित्र-मैत्रिणींच्या मध्यवर्गीय घरांतली उदाहरणे देऊन, आपल्या युरोपभेटीतल्या निरीक्षणांमधून त्याचे विविध आयाम मांडले आहेत. परदेशी मुले असलेले वृद्ध, मुले इथेच असली तरी आई एकाकडे तर वडिल दुसऱ्याकडे, आपल्या आईवडिलांना बायकोने सांभाळणे गृहीत धरणाऱ्या नवऱ्याला बायकोचे आईवडिल न चालणे, म्हातारपणातील ज्येष्ठांच्या स्वभावाचे मुलांना होणारे त्रास अशा अनेक बाबींची नोंद या लेखांत आहे. या ताणांचा-त्रासांचा निरास होण्यासाठी लेखिकेला उपाय वाटतो तो असा – ‘..एकमेकाला समजून घेऊन संवाद करणे गरजेचे आहे. आपल्या देशातले वृद्धाश्रम व पाळणाघरे जेव्हा बंद होतील तेव्हाच कुटुंबसंस्था विकसित होईल. कुटुंबसंस्था विकसित झाली की व्यक्तिवाद संपुष्टात येईल.’ लेखिकेच्या संवेदनशील मनाचा हा आशावाद जरुर; पण तो तसा आकाराला येणे हे ऐतिहासिक क्रम पाहता संभवनीय वाटत नाही. कुटुंबसंस्था विकसित झाली की व्यक्तिवाद संपुष्टात येईल की व्यक्तिवाद संपुष्टात आल्यावर कुटुंबसंस्था विकसित होईल? व्यक्तिवादाला जन्म देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे काय? वृद्धाश्रम, पाळणाघरे बंद होणे हा कुटुंबसंस्था विकसित होण्याचा निकष असू शकत नाही. सांप्रत अर्थचौकटीत ज्या पुढच्या टप्प्यावर स्त्री-पुरुष नाते जाणार आहे, त्या टप्प्यावरील कुटुंबाची रचना नव्या रीतीचीच राहणार आहे. लेखिकेला अपेक्षित परस्पर आदर, जिव्हाळा, जबाबदारी या मूल्यांचा आधार त्या रचनेला कसा मिळेल ही चिंता अर्थातच महत्वाची आहे.

स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतल्या या भवतालात स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत काय बदल व्हायला हवेत, म्हणजेच स्वातंत्र्य अधिक अर्थपूर्ण कसे करायचे, यासाठीचे मुद्दे स्त्री मुक्ती संघटनेने प्रकाशित केलेल्या वृषाली मगदूम यांच्या ‘भवताल’ या पुस्तकाने सशक्तपणे पुरवले आहेत.

- सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com

__________

| भवताल |

वृषाली मगदूम

स्त्री मुक्ती संघटनेचे प्रकाशन

मूल्य : रु. १५० | पृष्ठे : २५५

__________

(आंदोलन, ऑक्टोबर २०२१)